निवडणुका – भाग ३

निवडणुका – भाग १

निवडणुका – भाग २

सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीच्या हिंदुस्तानातल्या काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांनी १८८५ साली ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या संघटनेची स्थापना केली. त्या काळातल्या इंग्रज सरकारच्या नोकरीतले एक वरिष्ठ अधिकारी अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनीच यात पुढाकार घेतला होता. त्या काळातल्या ‘एतद्देशीय मनुष्यांची’ मते ‘कनवाळू’ इंग्रज सरकारला कळावीत आणि सरकारला त्यानुसार त्यांचे कल्याण करता यावे असा ‘उदात्त उद्देश’ त्यामागे होता. यातल्या सदस्यांनी आपापसात चर्चा करावी, काही उपाय किंवा उपक्रम सुचवावेत आणि त्यासाठी मायबाप सरकारकडे अर्ज विनंत्या कराव्यात अशा स्वरूपाचे काम ती संघटना सुरुवातीला करायची. वीस पंचवीस वर्षानंतरच्या काळात त्या संघटनेच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. ‘लाल, बाल, पाल’ या नावाने ओळखल्या गेलेल्या लाला लाजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या झुंजार नेत्यांनी त्या संघटनेत प्रवेश केला आणि तिला नवीन दिशा दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारला विनंत्या करून न थांबता मागण्या करायला सुरुवात केली आणि अंतर्गत स्वायत्ततेपर्यंत (होमरूल) त्या वाढवत नेल्या. शिवाय या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून तिचे संघटन करून त्यांच्या मागण्यांसाठी जनतेचा पाठिंबा मिळवायची सुरुवात केली. त्यांच्यानंतर आलेल्या महात्मा गांधी आणि सरदार पटेल, पं.नेहरू, नेताजी सुभाष आदि त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह, चळवळी, आंदोलने वगैरेमधून आपल्या कार्याचा विस्तार भारतभराच्या कानाकोपऱ्यात नेऊन पसरवला, त्या वेळच्या काँग्रेसने देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून तिचा पाठपुरावा केलाच, १९४२ साली इंग्रजांना ‘चले जाव’ असे सांगितले. तोपर्यंत या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर झाले होते आणि तिचे लक्षावधी कार्यकर्ते खेडोपाड्यांमध्ये विखुरलेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस काँग्रेस हाच राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेला एकमेव पक्ष होता. हिंदुमहासभा नावाचा एक पक्ष होता, पण त्याला देशभरातल्या सर्वसामान्य जनतेचा आधार नव्हता.

रशीयामध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर त्या देशात कम्युनिस्टांची राजवट सुरू झाली आणि जगभरातल्या सर्व शोषित वर्गांनी एक होऊन उठाव करावा आणि सरंजामशाही आणि भांडवलशाहीचे या जगातून पुरते उच्चाटन करावे असे जाहीर आवाहन त्यांनी वेळोवेळी केले. त्या क्रांतिकारी विचारप्रवाहाचे वारे भारतापर्यंत येऊन पोचले आणि कम्युनिस्ट पक्षाचे लहानसे रोपटे इथेही उगवले. त्या रोपट्याला गिरणीकामगारांच्या युनियनमध्ये आणि तेलंगणासारख्या काही भागांमध्ये काही अंकुरही फुटले. काँग्रेसमधल्या काही जहाल समाजवादी विचारसरणी असलेल्या गटांनी बाहेर पडून समाजवादी, प्रजासमाजवादी यासारखे नवे पक्ष स्थापन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमधून पुढे आलेल्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांच्या विचारसरणीवर आधारलेला भारतीय जनसंघ स्थापन केला. १९५१ साली भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेंव्हा अशा प्रकारे काही इतर पक्ष निर्माण झाले होते, पण त्यांचा प्रभाव फारच मर्यादित प्रदेशांमध्ये होता. भारतात विलीन झालेल्या बहुतेक संस्थानांमधल्या प्रजेची भूतपूर्व संस्थानिकांवर निष्ठा होती. त्याचा फायदा घेऊन ते ही एकाद्या पक्षातर्फे किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. तरीही या सर्वांना मिळून फक्त १२५ जागा जिंकता आल्या आणि ३६४ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला.

यापूर्वीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे पं.नेहरूंच्या जीवनकाळात झालेल्या १९५७ आणि १९६२ साली झालेल्या पुढील दोन निवडणुकांमध्ये याचीच जवळजवळ पुनरावृत्ती झाली. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर अनेक जुन्या नेत्यांनी पक्ष सोडला किंवा त्यांनी इंदिराजींनाच पक्षाबाहेर काढले. अशा प्रकारे काँग्रेस पक्षाची विभाजने होत गेली. तोपर्यंत देशातल्या परिस्थितीमध्ये बराच फरक पडला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतलेले बहुतेक सगळे पुढारी दिवंगत झाले होते किंवा जर्जरावस्थेत पोचले होते. जुने मतदारही जाऊन पारतंत्र्याचे दिवस न पाहिलेल्या नव्या मतदारांची बहुसंख्या झाली होती. यामुळे स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग हा महत्वाचा मुद्दा राहिला नव्हता. काँग्रेसमधल्या जुन्या खोडांना वगळले गेले तरी बहुतेक सगळे सक्रिय कार्यकर्ते इंदिराजींच्याच बाजूला राहिले. तरीही या फाटाफुटीचा परिणान होऊन १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसच्या खासदारांची संख्या ३००च्या आत आली, पण ती बहुमतासाठी पुरेशी होती. १९७१ सालच्या युद्धानंतर इंदिरा गांधींना मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या पुन्हा पूर्वीसारखी साडेतीनशेवर गेली. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७च्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला खरा, पण तीनच वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत त्याने पुन्हा उसळी मारून ३५० चा आकडा पार केला. १९८४ साली इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथमच ४०० चा आकडा ओलांडून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि इतर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचा पुरता धुव्वा उडवला.

त्यानंतर मात्र भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. १९८९ ते २००९ च्या दरम्यानच्या वीस वर्षांमध्ये पाचच्या ऐवजी सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण त्यातल्या एकाही निवणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेच नाही. दर वेळी इतर पक्षांचे सहाय्य घेऊन मंत्रीमंडळे बनवली गेली आणि त्यातली काही थोडे दिवसच चालली. या काळात सात पंतप्रधान झाले, त्यातल्या नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग या तीघांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला, पण अटलजींचेसुद्धा पहिले मंत्रीमंडळ १३ दिवसातच गडगडले होते. विश्वनाथप्रतापसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा आणि आय. के. गुजराल या इतर चौघाचा कारभार प्रत्येकी एक वर्षसुद्धा टिकला नाही. ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केली त्यांची सरकारेदेखील इतर पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांच्या सहाय्यानेच चालवलेली असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर सतत एक अस्थिरतेची टांगती तलवार असायचीच. वरील चौघे आणि त्यापूर्वी पंतप्रधान झालेले मोरारजीभाई देसाई व चरणसिंह हे सगळे पूर्वीच्या काँग्रेसमधूनच फुटून बाहेर पडलेले होते. याचा अर्थ असा की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २०१४ या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अटलबिहारी वाजपेयी वगळता इतर सगळे पंतप्रधान आजी किंवा माजी काँग्रेसमनच होते.

१९८९ पासून सलग पंचवीस वर्षे कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालेले नव्हते. त्यामुळे बहुपक्षी राज्यकारभार चालला होता. पण वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) या नावाची आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही अशा साधारणपणे तुल्यबळ अशा दोन आघाड्या तयार झाल्या होत्या. यातल्या काही घटकपक्षांची संख्या आणि नावे बदलत गेली. पण त्याने लक्षणीय असा फरक पडला नाही. यांच्याशिवाय सगळ्या डाव्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्नही अनेक वेळा केले गेले, त्यांना फारसे यश कधीच मिळाले नाही. २०१४ च्या निवडणुकी अशा परिस्थितीत झाल्या.
——-

त्यापूर्वी २००८ साली अमेरिकेत झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच बरॅक ओबामा हा सावळ्या वर्णाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्या निवडणुकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. त्या काळातली तिथली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. ती अर्थातच भारतातल्या त्यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा बरीच वेगळी होती.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फेऱ्या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यातली बरीचशी वगळून अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिल्यानंतर त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे एकाच दिवशी होत नाहीत. एकेका राज्याचे निकाल जसे जाहीर होत होते तशी परिस्थिती बदलत होती. आज हिलरी क्लिंटन पुढे आहेत तर दुसरे दिवशी लागलेल्या निकालांनुसार बरॅक ओबामा पुढे गेले आहेत असा सस्पेन्स काही दिवस चालल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी त्याचा रागरंग पाहिला आणि या शर्यतीमधून माघार घेऊन ओबामांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र त्या अंतर्गत चुरस बाजूला ठेऊन ओबामांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्याही राहिल्या. रिपब्लिकन पक्षातर्फे विशेष चर्चा न होताच जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. मी अधून मधून पर्यटन करण्यासाठी इकडे तिकडे हिडूनही आलो, पण मोठमोठी छायाचित्रे असलेले फ्लॅक्सचे अवाढव्य फलक मला कुठल्याच गावातल्या रस्त्यात कोठेही लावलेले दिसले नाहीत आणि ध्वनिवर्धकांचा कर्कश गोंगाटही कुठेही ऐकू आला नाही. अल्फारेटाच्या मी रहात असलेल्या भागात तरी कधीच कोणाची जंगी मिरवणूक निघाली नाही की मोठी जाहीर सभा झाली नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी मोठ्या सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर मात्र निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या वेळी प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या. २००८ साली फेसबुक किंवा ट्विटर यासारखी माध्यमे अजून अवतरली नव्हती.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका गंभीर आर्थिक संकटात सापडली होती असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा मोह ओबामा टाळायचे. “प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे.” असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. “मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे.” असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण तत्कालिन आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

अमेरिकेतल्या या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत बरेच साम्य दिसल्यामुळे मला त्या सारख्या आठवत होत्या. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या अंतर्गत विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच काम मोदींनीही केले. भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसते. तरीसुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुश यांच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, ती काही प्रमाणात चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारावर वैतागली होती. अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे ती नेहमीच व्यक्तीकेंद्रित होत असते, भारतातल्या निवडणुकांमध्ये आधी एका पक्षाला निवडून द्यायचे असे ठरलेले असले तरी पं.नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळातच त्या व्यक्तीकेंद्रित झालेल्या होत्या. त्यानंतर २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. “अबकी बार मोदी सरकार” हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. टी व्ही वरील संवादांमध्ये ओबामांच्या पुढे मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी तर या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे या अस्त्राचा यशस्वी वापर केला.

पोस्टर्स, मिरवणुका, सभा, घरोघरी जाऊन प्रचार वगैरे सर्व प्रकारचा प्रचार २०१४ मधल्या भारतातल्या निवडणुकीमध्ये झालाच, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्यात अधिक सुधारणा होऊन जास्त वाढ झाली. पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले प्रमुख, गावातले आणि गल्लीतले म्होरके या सगळ्यांच्या चेहेऱ्यांच्या भाऊगर्दीत कुठे तरी उमेदवाराचा सुहास्य मुखडा दाखवणारे अगडबंब फ्लेक्स सगळ्याच पक्षांतर्फे कोपऱ्याकोपऱ्यांवर लावले गेले होते. ते एकसारखेच दिसत होते. त्यांच्यात काही फरक आहे असे निरखून पाहिल्याशिवाय जाणवत नव्हते. कोणत्याही उमेदवाराच्या जिंकण्याची खात्री असो, आशा असो किंवा डिपॉझिटसुद्धा राखण्याची शक्यता नसो, त्याचा मुखडा अशा फलकांवरून मतदारांना आवाहन करत असतांना दिसायचा. पण मिरवणुका काढण्यासाठी आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी चार लोकांचे जमणे आवश्यक असल्यामुळे हे काम मात्र मोठे पक्षच करू शकत होते. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत पाहिलेल्या टीव्ही वरच्या प्रचाराइतकाच किंवा त्याहून कांकणभर जास्तच प्रचार भारतातल्या टीव्हीवर होत होता, पण त्याची क्वालिटी मात्र जेमतेमच होती. एकादे आकर्षक घोषवाक्य घेऊन ते सतत कानावर आदळत राहण्याचा इतका अतिरेक झाला होता की त्यावरील विडंबनांचे पेव फुटले होते. यावेळी मोठ्या पक्षांनीही त्यांच्या प्रचारासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला होता. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपवरील संवादांना जगात दुसरा कुठला विषयच नसावा असे वाटत होते. त्या माध्यमांवर कोणीही काहीही लिहू शकतो असा समज असल्यामुळे बेछूट विधाने आणि त्यांवर त्याहून भयानक वादविवावाद यांना ऊत आला होता. सेलफोनवर अनाहूत टेक्स्ट मेसेजेसचा वर्षाव होत होता. अर्थातच या सगळ्यांचा परिणाम निवडणुकांवर झाला असणारच.

वरील दोन्ही निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. आम्ही अमेरिका या परदेशाचे नागरिक नव्हतो आणि तिकडे कोणीही निव़डून आले तरी आम्हाला त्याचे कसले सोयरसुतक असण्याचे काही कारण नव्हते. तरीसुद्धा निवडणूक संपल्यानंतर तिच्या निकालांची वेळ होताच आम्ही टेलिव्हिजनच्या समोर ठाण मांडून बसलो होतो आणि डोळ्याची पापणी लवू न देता त्याच्याकडे पहात आणि कान टवकारून निवेदने ऐकत बसलो होतो. २०१४ सालच्या भारतातल्या निवडणुका तर आमचाच भाग्यविधाता ठरवणार होत्या. सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. पण इथल्या निवडणुका झाल्यानंतर मतमोजणीसाठी मध्ये कित्येक दिवस वाट पहावी लागली होती या गोष्टीचा राग येत होता. निकालाचा दिवस उजाडल्यावर सगळी कामे कशीबशी आटोपून किंवा न आटोपताच आम्ही टेलिव्हिजनकडे धाव घेतली आणि निरनिराळ्या वाहिन्यांवरून दाखवण्यात येत असलेली तीच तीच दृष्ये दिवसभर पहात आणि तेच तेच बोलणे ऐकत राहिलो. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, पण सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाची पार वाताहात होईल असे वाटले नव्हते. या निवडणुकीमध्ये एनडीएला भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते.

पंचवीस वर्षांचा अनिश्चिततेचा काळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देशाला स्थिर सरकार मिळणार आहे यातही एक समाधान होते.

. . . . . . . . . . . . . (समाप्त)

2 प्रतिसाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: