जय बोलो हनुमान की

hanumanSm

माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजन्मोत्सव या सणांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात दर वर्षी रामाच्या जन्माचेच आख्यान असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवून सांगत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना आणत. त्यानंतर रामाला पाळण्यात झोपवून पाळणा, आरती, सुंठवड्याचा प्रसाद वगैरे होत असे.

आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेतल्या ‘सिटीसेंटर’ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील चांगल्या ऐसपैस कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून माझ्या सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. तिथून निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. एका आठदहा फूट उंच शिलेच्या एकाच बाजूला चित्र काढल्याप्रमाणे ही उभी मूर्ती कोरलेली होती. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायची कुणाचीच कधी हिंमत झाली नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीत असेलच.

गावातल्या इतर देवांच्या देवळातल्या गाभाऱ्यात कोणी ना कोणी पूजारी असायचे आणि तिथे लहान मुलांना सहसा प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण आमच्या मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नव्हती. त्या मारुतीच्या भव्य मूर्तीला हाताने धरूनच आम्ही त्याला प्रदक्षिणाही घालत होतो. इतकी सलगी असल्यामुळे तो देव आम्हाला जास्तच जवळचा वाटायचा. बोलतांना त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशीसुध्दा त्या देवळात उत्सव किंवा समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणाऱ्यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच. त्या काळात तरी तिथे उत्सवासाठी भजन, पूजन, कीर्तन वगैरे काही विशेष समारंभ नसायचा.

हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी आमची काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून लहानशी पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली मारुतीची तसबीर, शोभेची फुले, माळा आणि सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. “राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।” अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे. कसलाही खास प्रसादही वाटला जात नसे.

मारुतीरायाच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कुठे झाले, त्यांचा संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी मला त्यात काही स्वारस्य उरले नाही. बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमन्ताच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती किंवा त्याच्या मनात कसली महत्वाकांक्षा नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा ‘इन्फिनिटी’ या शब्दांचा अर्थ ‘मारुतीचे शेपूट’ या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर झाडांवरून पिकलेली फळे खाली पाडण्यासाठी त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना आम्हाला खूप मजा वाटत असे. त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. मारुतीच्या अंगात प्रचंड ताकत असली तरी त्याने युद्धात मोठा पराक्रम करून कुठल्या राक्षसांना ठार मारले असे रामायणाच्या गोष्टीत सांगितले जात नाही. त्या युद्धात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष फक्त एकाच पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी डोंगर, पर्वत वगैरेंना हाताने उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो. ते पृथ्वीशी सलग रीतीने जोडले असल्याचे मोठेपणी समजले.

जय बोलो हनुमान की १

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचेही परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. रामदासांनी स्थापन केलेली अकरा मंदिरे प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या शिष्यगणांनी त्यांची परंपरा पुढे नेत गांवोगांवी मारुतीची देवळे उभारली. “हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।” असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. हनुमंताची स्तुती करणारा रामरक्षेमधला एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे.
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो एक महान योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच प्रभू रामचंद्राच्या या सेवकाची गणनासुद्धा देवांमध्ये केली गेली. माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना “भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती” हे स्तोत्र शिकवले जात होते आणि ते म्हंटल्याने मारुतीराया अंगात भरपूर शक्ती देतो असा विश्वास असल्यामुळे आम्ही ते रोज संध्याकाळी म्हणत होतो. त्यानंतर दंडातल्या बेटकुळ्या फुगवून पहात होतो.

समर्थ रामदासांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे किंवा कदाचित त्याआधीपासून महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या गावांमध्ये मारुतीची देवळे आहेतच, शिवाय भारताच्या अनेक भागात ती दिसतात. दक्षिण भारतात मारुतीला आंजनेयस्वामी म्हणतात. त्यांची मंदिरे मी कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये पाहिली आहेत. जगातली सर्वात प्रचंड अशी हनुमानाची मूर्ती आंध्रमध्येच आहे आणि ती जगातल्या इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा अधिक उंच आहे. उत्तर प्रदेशातसुद्धा मी आजूबाजूच्या इमारतींपेक्षाही उंच अशा बजरंगबलीच्या मूर्ती काही ठिकाणी पाहिल्या आहेत. तुलसीदासांनी रचलेली हनुमान चालीसा उत्तर भारतीय लोकांमध्ये महाराष्ट्रातल्या भीमरूपी या स्तोत्रापेक्षाही अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा पाठ केल्यामुळे भुतेखेते, इडापिडा वगैरे सगळ्यांपासून संरक्षणाचे कवच मिळते अशी भाविकांची गाढ श्रद्धा असते. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये जिथे जिथे भारतीय लोक पूर्वीच्या काळात गेले होते तिथे तिथे त्यांनी मारुतीची मोठी देवळे आणि भव्य मूर्तींची स्थापना केली आहे. त्यातले त्रिनिदादमधले देऊळ जगप्रसिद्ध आहे.

हनुमान त्रिनिदाद
माझी मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी एक आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. त्या काळात मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले बहुधा पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत आणि डफावर थाप मारून काढलेल्या झडाड्डी झकनकच्या तालावर नाच करत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर वन्य प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. ‘भीम्या’ की ‘शिद्राम्या’ अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून गोरिल्लासारखा दिसत असे. तो कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून तिला हाताने फिरवत रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या अचरट अचाट लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे समोर दिसायचे, पण या हनुमानाला शोधत मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्या धंद्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा ‘हिन्दू धर्माचा घोर अपमान’ आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. ‘सेक्युलर’ हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

उद्या हनुमानजन्मोत्सव आहे. त्या निमित्याने मारुतीरायाचे स्मरण आणि त्याला प्रणाम करून हा छोटासा लेख त्याच्या पायाशी अर्पण.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या देवळांविषयी माहिती इथे पहावी.
https://anandghare.wordpress.com/2018/09/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3/

One Response

 1. श्री.श्रीरंग घारे यांनी खाली दिलेली प्रतिक्रिया पाठवली आहे. मी त्यांचा आभारी आहे. ” मोहरम मधे मुस्लिमेतरही सहभाग घेऊन सोंगे घेत
  सेक्यूलर शब्द ठाऊक नव्हता व निशेध/आक्षेप ही
  होत नसे.

  मोठी गोष्ट म्हणजे पिलू सरकार या नावाने परिचित
  असलेले व हनूमान मोटर ट्रक व्यवसायिक असे
  श्री पटवर्धन जे काहीं काळ आखाती देशात .होते
  त्यानी अबूबकर नावाच्या पीर/फकीराचे स्मरणार्थ
  गावा बाहेर एक मोठी मशीद/दर्गा बांधला त्या बाबत
  कधी आक्षेप/निशेध झाला नाही असे सलोख्याचे
  सामाजिक वातावरण होते.

  हनुमान उत्सव व बालपणीच्या आठवणी लेख
  आवडला व तो काळ पुन्हा अनुभवला

  सर्वाना शुभाशीष

  श्रीरंग। १९ / ४ / २०१९”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: