दूरसंचार किंवा टेलिकम्यूनिकेशन

भाग १

आपण बोलतो तेंव्हा तोंडामधून निघणारा आवाज ध्वनिलहरींमधून आपल्या आजूबाजूला पसरत जातो. जवळच असलेल्या दुसऱ्या माणसाच्या कानापर्यंत तो पोचतो आणि त्याला आपले बोलणे ऐकू येते. त्याचप्रमाणे आपल्यावर पडलेला प्रकाश परिवर्तित होऊन सगळीकडे पसरत जातो. जवळच असलेल्या दुसऱ्या माणसाच्या डोळ्यांपर्यंत तो पोचतो आणि त्यामुळे त्याला आपण दिसतो. हा माणूस आपल्यापासून दूर जात असतांना त्याला ऐकू येणारा आपला आवाज क्षीण होत जातो आणि काही अंतर गेल्यावर तो पूर्णपणे थांबतो. त्यानंतरही जरी त्याला आपले बोलणे ऐकू आले नाही तरीसुध्दा आपल्यामध्ये अडथळा नसला तर त्याच्या डोळ्यांना आपण दिसत राहतो. पण त्याला दिसत असलेली आपली आकृती दूर जाता जाता लहान लहान आणि अस्पष्ट होत जाते आणि अखेर तीही दिसेनाशी होते. तांब्याच्या तारेमधून वाहणारा विजेचा प्रवाह मात्र फारसा क्षीण न होता याही पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पोचतो. विजेच्या या गुणधर्माचा उपयोग टेलिफोनमध्ये केला जातो. त्याच्या एका बाजूच्या उपकरणामधील मायक्रोफोनमध्ये बोललेल्या आवाजाचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते. त्या लहरी तारेमधून दुसऱ्या बाजूच्या उपकरणापर्यंत (रिसीव्हरपर्यंत) वहात जातात. तिथे असलेल्या स्पीकरमध्ये या विद्युत लहरींचे रूपांतर पुन्हा आवाजामध्ये होते आणि तिकडच्या माणसाला ते बोलणे जसेच्या तसे ऐकू जाते. अशा प्रकारे दूर असलेल्या व्यक्तीबरोबर यंत्रांद्वारे संपर्क करण्याला ‘टेलिकम्यूनिकेशन’ (दूरसंचार) किंवा ‘टेलकॉम’ म्हणतात.

आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या किंवा डोळ्यांना न दिसणाऱ्या ‘रेडिओ वेव्हज’ या प्रकारच्या लहरी आभाळामधून दूरवर पसरत जातात. रेडिओस्टेशनमधील उपकरणांमध्ये मूळ आवाजांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते आणि तिथे तयार केलेल्या या विद्युत लहरींची सांगड रेडिओ वेव्हजशी घालून त्यांचे प्रसारण केले जाते. जगभरामधील असंख्य रेडिओ स्टेशनमधून निघालेल्या या लहरी आपल्या आसपास भिरभिरत असतात. आपल्याला हव्या असलेल्या स्टेशनमधून आलेल्या लहरी आपल्याकडील रेडिओमध्ये वेगळ्या काढल्या जातात, त्यांचे ‘अँप्लिफिकेशन’ करून म्हणजेच त्यांची तीव्रता वाढवून त्या स्पीकरला दिल्या जातात आणि स्पीकरमध्ये त्यांचे पुन्हा आवाजात रूपांतर होऊन आपल्याला तो कार्यक्रम ऐकू येतो. साधारणपणे अशाच प्रकारच्या क्रिया टेलिव्हिजन स्टेशनमध्ये दृष्यांच्याही बाबतीत घडतात आणि तिथून प्रसारित केलेली स्थिर किंवा चलचित्रे आपल्याला घरबसल्या दिसतात, त्यांच्याबरोबर ध्वनीसुध्दा ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष जगातले आवाज निर्माण झाल्यानंतर क्षणार्धात विरून जातात पण ते रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय झाल्यानंतर आधी तबकड्यांमध्ये आणि नंतर फितींमध्ये (टेपवर) ते साठवून ठेवता आले आणि त्यांना फोनोग्रॅम किंवा टेपरेकॉर्डरवर वाजवून ते ध्वनि पुन्हा पुन्हा ऐकता येणे शक्य झाले. पुढे जाऊन यात अधिक सुधारणा होत गेल्या. अलीकडल्या काँप्यूटर क्रांतीनंतर हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, काँपॅक्ट डिस्क (सीडी), डीव्हीडी, पेन ड्राइव्ह असे अनेक प्रकारचे स्मृतिकोष (मेमरी) तयार होत गेले आणि आपल्याला हवे ते ध्वनि किंवा चित्रे त्यात साठवून ठेवता आली.

टेलीफोन आणि रेडिओ या वस्तू लहानपणीच माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. मी लग्न करून आपले घर थाटेपर्यंत टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांची त्यात भर पडली. अर्थातच या गोष्टींनी घरातली बरीच जागा व्यापून टाकली. एकाच प्रकारचे काम करणारे पण निरनिराळे अँप्लिफायर आणि स्पीकर या उपकरणांमध्ये असत. कालांतराने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर यांना एकत्र आणून ‘टू इन वन’ उपकरण आले त्यामुळे थोडी जागा वाचली, पण रेकॉर्ड केलेली चलचित्रे दाखवणारे व्हीसीआर आले आणि त्यांनी अधिक जागा काबीज केली. नव्वदीच्या दशकात घरातले संगणक (पीसी) आले आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या आंतर्जालाने (इंटरनेटने) टेलिकॉमच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यापूर्वी फक्त रेडिओ स्टेशन किंवा टेलिव्हिजन ट्रान्स्मिशनमधून येणारे कार्यक्रम आपण पाहू किंवा ऐकू शकत होतो. या क्रांतीनंतर दूर कुठेतरी कुणीतरी कसलाही ध्वनि, चित्रे किंवा मजकूर अपलोड करावा आणि आपण घरबसल्या आपल्या पीसीवर तो ऐकावा, पहावा किंवा वाचावा हे सगळे शक्य झाले. ध्वनि, चित्रे किंवा मजकूर यांचे आधी विजेच्या लहरींमध्ये रूपांतर करणे आणि त्यांचे प्रक्षेपण करणे ही कामे आता आपण आपल्या घरी बसून (कदाचित आपल्याही नकळत) करत असतो. तसेच इतरांनी केलेले प्रक्षेपण अतिसूक्ष्म लहरींमधून आपल्या आसपास भिरभिरत असते, त्यातले आपल्याला हवे तेवढे उचलून घेऊन त्यांचे मजकूर, ध्वनि किंवा आकृती यांमध्ये रूपांतर करण्याचे काम आपला संगणक करत असतो. हे काम करण्यासाठी त्यातसुध्दा मायक्रोफोन, अँप्लिफायर आणि स्पीकर असावे लागतात.

दूरसंचारासाठी लागणारे संदेश (‘टेलिकम्यूनिकेशन’चे सिग्नल्स)) इकडून तिकडे पाठवण्याच्या पध्दतींमध्येही आमूलाग्र बदल होत गेले. तारायंत्र (टेलिग्रॅम) आणि दूरध्वनि (टेलिफोन) यांचे व्यवहार जगभर पसरलेल्या तारांच्या जाळ्यामधून होत असत. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे प्रसारण त्यासाठी खास उभारलेल्या उंच अशा टॉवरच्या माथ्यावर बसवलेल्या ट्रान्स्मिटरमधून होत असे. अशा टॉवर्सची गणना शहरामधील, देशामधील किंवा जगामधील सर्वात उंच स्ट्रक्चर्समध्ये होत असे. तिकडून आलेले सिग्नल ग्रहण करण्यासाठी घराघरांवर अँटेना लावलेले असत. काही काळानंतर अशा व्यक्तीगत अँटेनांच्या ऐवजी केबलमधून टीव्हीचे सिग्नल घेणे सुरू झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यक्तीगत डिश अँटेनांचे युग आले आहे. टीव्ही प्रोग्रॅम्सचे सिग्नल्स आता थेट अवकाशामधील (स्पेसमधील) कृत्रिम उपग्रहांवरून आपल्या घरातल्या डिशवर येतात. टू जी, थ्री जी, फोर जी वगैरे तंत्रज्ञानामुळे ते थेट आपल्या मोबाइल फोनवर येऊ लागले. त्यासाठी शहरांमध्ये जागोजागी इतके मायक्रोवेव्ह ट्रान्स्मिशन टॉवर्स उभे राहिले की त्यामधून होणाऱ्या किरणोत्सर्गाबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू आहे. इंटरनेटबद्दलही साधारणपणे अशाच प्रकारच्या सुधारणा होत गेल्या. सर्वात आधी टेलिफोन लाइन्समधून, त्यानंतर केबल आणि आता वायरलेस कम्युनिकेशन सुरू झाले आहे. जागोजागी उपलब्ध असलेल्या वाय फाय सोयीमधून आपण आपल्या मोबाईलवर इंटरनेट पाहू शकतो.

आपल्या घरात असलेल्या आपल्या उपयोगाच्या सगळ्या उपकरणांमध्ये ध्वनीचे रूपांतर विजेत आणि विजेचे रूपांतर ध्वनीमध्ये करणे या समान प्रकारच्या क्रिया होत असतात. मग त्यासाठी वेगवेगळी उपकरणे कशाला हवीत? एकाच यंत्रांद्वारा ही सगळी कामे करता येणार नाही का? असा प्रश्न पूर्वी माझ्या मनात नेहमी उठत असे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीच माझ्या अल्पमतीने मी टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांना जोडून दिले होते, त्यामुळे टीव्हीवरील गाणी परस्पर टेप करून ठेवणे आणि टेपवरील गाणी टीव्हीच्या जास्त चांगल्या स्पीकरवरून वाजवणे असले उद्योग मी करू शकत होतो. हे काम अंतर्गत यंत्राकडून नक्कीच जास्त सुबकपणे होऊ शकले असते. टीव्हीसाठी वेगळा आणि काँप्यूटरसाठी वेगळा मॉनिटर दुप्पट जागा अडवीत होते, ते काम एकच यंत्र का करू शकणार नाही? असे विचार माझ्या मनात येत असत, पण भारतातल्या बाजारात तरी अशा प्रकारचे संयुक्त यंत्र मिळत नव्हते आणि जागतिक बाजारपेठांमध्ये सुध्दा बहुधा ते नसावे. पंधरावीस वर्षांपूर्वीच्या त्या काळातले माझ्या कल्पनेतले असले ‘ऑल इन वन’ यंत्र सामान्य शोकेसमध्ये ठेवता येण्याजोगे होते आणि टेलिव्हिजन, रेडिओ, टेप रेकॉर्डर, व्हीसीआर, काँप्यूटर आणि टेलिफोन या सर्वांचा समावेश त्या यंत्रात होऊ शकला असता.

असे यंत्र बाजारात न येण्यामागे दोन कारणे असावीत. पहिले म्हणजे सर्वच ग्राहकांना या सगळ्या सोयींची गरज वाटत नसावी, मग त्यांनी नको असलेल्या गोष्टी का विकत घ्याव्यात? दुसरे कारण असे आहे की घरातला एक सदस्य टेलिव्हिजन पहात असतांना दुसऱ्याला इंटरनेटवर जाऊन सर्फिंग किंवा ई-मेल करायची असली आणि तिसऱ्याला टेलिफोन आला तर ते एकमेकांशी कसे जमवून घेतील? या पेक्षा या गोष्टी वेगवेगळ्या असणे एका दृष्टीने बरेच होते.

पंधरावीस वर्षांपूर्वी मोबाइल फोन आले होते, पण त्यांचा उपयोग बोलणे किंवा एसएमएस टेक्स्ट पाठवणे एवढाच होता. पुढे त्याला कॅमेरा जोडला गेला आणि घाऊक प्रमाणात संगीत किंवा व्हिडिओज साठवणारी मेमरी जोडली गेली. त्यामुळे त्याचा आवाका वाढत गेला. आता सेलफोनवर इंटरनेट किंवा टीव्ही पाहण्याची व्यवस्था झाली आहे. त्यावरून सिनेमा किंवा क्रिकेटची मॅचसुध्दा पाहता येते. म्हणजेच आपल्याला हवे ते आवाज, हवी ती चित्रे दूरदेशी असलेल्या आप्ताला किंवा मित्राला पाठवून देऊ शकतो आणि त्याने पाठवलेले संदेश, चित्रे आणि आवाज आपण वाचू, पाहू किंवा ऐकू शकतो, तसेच रेडिओ स्टेशन आणि टीव्ही चॅनेल्सवरील कार्यक्रमसुध्दा ऐकू व पाहू शकतो आणि रेकॉर्डही करू शकतो. म्हणजे मला अभिप्रेत असलेले एकत्रीकरण आता प्रत्यक्षात उतरले आहे आणि ते सुध्दा खिशात ठेवता येईल इतक्या लहान आकाराच्या यंत्रात आणि आपल्याला परवडू शकेल इतक्या किंमतीत. मला घरात एक समाईक यंत्र अपेक्षित होते, आता घरात जितकी माणसे राहतात त्यांच्याही पेक्षा जास्त इतकी प्रत्येकाच्या खिशात किंवा पर्समध्ये मावणारी सेलफोन नावाची अद्भुत यंत्रे असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील ही घोडदौड विस्मित करणारी आहे.

……………………….

भाग २: बिनतारी संदेशवहन

दूरसंचाराची सुरुवात तारेने (टेलिग्रॅमने) झाली, त्यानंतर टेलिफोन, रेडिओ, टेलिव्हिजन, टेलिप्रिंटर, वायरलेस कम्युनिकेशन, सॅटेलाईट वगैरेद्वारा त्यात प्रगति होत गेली.

तार सेवेनंतरच्या काळात विज्ञानाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत गेली. इंग्रजी मुळाक्षरांचे मोर्सकोडमध्ये आणि मोर्सकोडमधल्या खुणांचे पुन्हा एबीसीडीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांद्वारा होऊ लागले आणि त्यातून टेलिप्रिंटर तयार झाला. दांडा आणि पट्टी याऐवजी एक थरथरणारा पडदा लावला तर त्यामधून निरनिराळे आवाज काढता येतात हे पाहून मानवी आवाज काढू शकणारे स्पीकर तयार झाले आणि त्यांचा उपयोग करून निर्माण केलेल्या टेलिफोनने एक नवा अध्याय सुरू केला. टेलीफोनमुळे संभाषण करणे शक्य होत असल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने झाला, पण हे संभाषण फक्त मौखिक स्वरूपाचे असते. ते स्पष्टपणे ऐकू गेले नाही किंवा ऐकणाऱ्याने समजण्यात काही चूक केली तर त्यावर उपाय नसतो आणि ते तपासून पाहणे अशक्यप्राय असते. टेलिग्रॅममधला संदेश लेखी असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा वाचता येतो, तिसऱ्या माणसाला दाखवता येतो, रेकॉर्डमध्ये ठेवता येतो, त्याची प्रत काढता येते वगैरे फायदे त्यात असल्यामुळे कायदेशीर आणि ऑफीशियल कामांसाठी टेलिग्रॅम, टेलीप्रिंटर, टेलेक्स वगैरेंवरच सर्वांची भिस्त राहिली.

या सगळ्या संदेशवहनासाठी तारांमधून जाणारा विजेचा प्रवाह हेच माध्यम असायचे. पण वातावरणामधून किंवा निर्वात पोकळीमधूनसुध्दा विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म लहरी प्रकाशाच्या वेगाने दूरवर प्रवास करतात याचा शोध लागला आणि तशा प्रकारच्या लहरी उत्पन्न करणे तसेच ग्रहण करणे यावर नियंत्रण करता आल्यानंतर बिनतारी संदेशवहनाची सुरुवात झाली. या माध्यमामधूनसुध्दा सोपे संदेश पाठवणे सुलभ असल्यामुळे याचा उपयोगसुध्दा आधी टेलिग्रॅम पाठवण्यासाठी झाला. अशा प्रकारची पहिली ‘बिनतारी’ ‘तार’ पाठवूनसुध्दा शंभर वर्षांहून जास्त काळ लोटला आहे हे कदाचित कोणाला फारसे ठाऊक नसेल. ‘बिनतारी’ दूरध्वनि संदेश पाठवायला त्यानंतर वीस पंचवीस वर्षे लागली. रेडिओ वेव्ह्जचा हा उपयोग करणे खूप खर्चाचे आणि कठीण असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते परवडणारे नसावे, यामुळे त्याचा सार्वजनिक प्रसार मात्र हळूहळू झाला.

तारांमधून जाणारी वीज त्या तारेच्या एका टोकापासून निघून तिला जोडलेल्या तारांमधून ठराविक सर्किटमध्येच वाहते, पण प्रसारणकेंद्रामधून निघालेल्या रेडिओ लहरी चहूदिशांना पसरत जातात. यामुळे त्यांचा चांगला उपयोग आकाशवाणीसाठी केला गेला आणि जगभरातल्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू झाली आणि त्यांच्यावरून झालेले प्रसारण घरोघरी बसलेले लोक ऐकू लागले. रेडिओलहरींचा हाच उपयोग बहुतेक लोकांना माहीत असतो. यात आणखी प्रगती झाल्यानंतर दूरचित्रवाणी (टीव्ही) सुरू झाली.

सार्वजनिक जीवनात बिनतारी संदेशवहनाचा असा उपयोग होत असला तरी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग निरोप पाठवण्या आणि घेण्यासाठी होत राहिला. समुद्रात सफर करणारी जहाजे एकमेकांशी वायरलेसवर संपर्क करू लागली. त्या काळातला एक मजेदार किस्सा असा आहे. एकदा रात्रीच्या वेळी एका जहाजाचा कप्तान स्वतःच निरीक्षण करत असतांना त्याला दूर एक दिवा दिसला आणि तो थेट आपल्याच दिशेने येत आहे असे वाटल्याने त्याने संदेश पाठवला, “ताबडतोब १० अंश उजवीकडे वळ.”
उत्तर आले, “तुझे जहाजच ताबडतोब १० अंश उजवीकडे वळव.”
“तू माझे ऐक. मी कॅप्टन बोलतो आहे”
“तू माझे ऐक. मी ऑपरेटर बोलतो आहे”
“माझे लढाऊ जहाज आहे, माझ्याकडे दहा तोफा आणि वीस आगबोटींना बुडवता येईल इतका दारू गोळा आहे. जिवाची पर्वा असेल तर मुकाट्याने तुझे जहाज वळव.”
“तुला काय करायचे असेल ते कर (आणि मसणात जा). मी दीपस्तंभावर बसलो आहे.”
(मूळ कल्पना रीडर्स डायजेस्टवरून)

सागरी प्रवासाप्रमाणेच हवाई प्रवासातसुध्दा कोणालाही कसलाही निरोप पाठवण्यासाठी बिनतारी संदेश हाच एक मार्ग असतो. आकाशामधून विमानतळावर विमान उतरवण्यासाठी तिथल्या यंत्रणेला तयार रहायला सांगणे आवश्यक असते. विमानांची संख्या वाढत गेल्यानंतर विमानतळावरील रहदारीचे नियंत्रण करण्याची गरज पडू लागली आणि आता तर कुठलेही विमान एकाद्या विमानतळाजवळ आले की त्याने आभाळातसुध्दा कशा घिरट्या घालायच्या हे ग्राउंड कंट्रोलवालेच ठरवतात आणि तसे आदेश वैमानिकाला देत राहतात. पन्नास वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मुंबईचे विमानतळ पाहिले तेंव्हा तिथल्या मैदानात फिरत असलेले काही गणवेशधारी लोक हातात धरलेले एक उपकरण कानाला लावून सारखे काही तरी बोलतांना दिसले. त्यांच्याकडे असलेला वायरलेस वॉकीटॉकी सेट मी त्यावेळी पहिल्यांदा पाहिला. तोपर्यंत मी साध्या टेलिफोनवरसुध्दा कोणाशी कधी बोललेलो नव्हतो. त्यामुळे विमानतळावरल्या लोकांकडचे अजब उपकरण पाहून माझ्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. आताचा मुठीत मावणारा चिमुकला सेल फोन आणि अँटेनाची लांब शेंडी असलेला त्या काळातला हातभर लांबीचा वॉकीटॉकी सेट यांची मनातल्या मनात तुलना करतांना हसू येते.

बिनतारी संदेशवहनाचा भरपूर उपयोग सैन्यदलामध्ये केला जातो. सीमेवरील सैनिकांना मागे असलेल्या छावणीशी तसेच एकमेकांशी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. दर इतक्या लढवय्यांमागे एक संपर्क साधणारा असे काही प्रमाण ठरवले जाते आणि तितके सिग्नलमेन ठेवले जातात. याचा सराव करण्यासाठी शहरात असतांनासुध्दा वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग केला जातो. मागे काही काळासाठी आमच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एक लश्कराची छावणी ठेवली होती. त्या काळात दिवसरात्र अधून मधून आमच्या टीव्हीवर अचानक एक प्रकारची खरखर सुरू होत असे आणि काही काळ ती चालत असे. टीव्हीच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून त्यात काही बिघाड सापडला नाही. शेजारीपाजारी चौकशी करता त्यांनासुध्दा असाच अनुभव येत होता. त्या वेळी आकाशसुध्दा निरभ्र असायचे. त्यामुळे हा डिस्टर्बन्स कुठून येतो ते काही समजत नव्हते. पुढे ती छावणी उठली आणि हा प्रॉब्लेमही नाहीसा झाला, तेंव्हा त्याचे कारण आमच्या लक्षात आले.

युरोपच्या सफरीमधल्या व्हॅटिकन सिटीमध्ये आम्ही फिरत होतो त्या वेळी त्या भागात निरनिराळ्या देशांमधल्या पर्यटकांचे निदान शंभर तरी घोळके फिरत होते आणि त्यांचे एकमेकांमध्ये थोडे मिसळणे अपरिहार्य होते. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला कानावर बसवायचे एक उपकरण (हेडफोन) दिले होते आणि आमचा गाईड प्रत्येक ठिकाणची माहिती आणि पुढे जाण्याच्या सूचना त्यावर देत होता. यामुळे प्रत्येकाला सगळी माहिती चांगली ऐकू येत होती आणि एकत्र राहण्याला मदत मिळत होती. युरोपअमेरिकेतल्या काही ठिकाणी तिथली स्थळे किंवा त्यांवरील प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला एक बिनतारी हेडफोन दिला होता आणि आपल्याला हव्या असलेल्या भाषेमधली कॉमेंटरी त्यातून ऐकण्याची सोय होती.

मी एकदा कोलकात्याच्या उपनगरातल्या एका कारखान्यात गेलो होतो, त्या काळात तिथली दूरध्वनिसेवा इतकी खराब आणि बेभरंवशाची होती की त्या कंपनीने कारखाना आणि हेड ऑफीस यांच्या दरम्यान थेट संपर्क साधण्यासाठी खासगी वायरलेस सेट बसवला होता. आमच्या ऑफीसातही बिनतारी संपर्कयंत्र बसवलेले होते. भारतातल्या दूरवरच्या दुर्गम भागांमध्ये असलेल्या आमच्या प्लँट्स आणि प्रॉजेक्टसाइट्सवर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी आम्ही त्यावर संभाषण करत असू. एसटीडीची सेवा सगळीकडे उपलब्ध होण्यापूर्वीच्या त्या काळात तेवढा एकच मार्ग आम्हाला उपलब्ध होता. पण हे वायरलेसवरले बोलणे सोपे नसायचे. टेलीफोनप्रमाणे त्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी संदेश पाठवले जात नसत. आपण एक वाक्य बोलून ‘ओव्हर’ असे म्हणायचे आणि एक बटन दाबून धरायचे, त्यानंतर पलीकडचा माणूस उत्तर देऊन ‘ओव्हर’ म्हणेल तेंव्हा ते बटन सोडून दुसरे दाबायचे आणि पुढले वाक्य बोलायचे अशी थोडी कसरत करावी लागत असे. त्यातसुध्दा खराब हवामान, सूर्यावरली चुंबकीय वादळे वगैरेंमुळे खूप डिस्टर्बन्स येत असे. आणि त्या सगळ्यावर मात करून आपले काम झाल्याचे समाधान मिळवायचे असे.

अनेक वर्षांपासून अशा प्रकारे विशिष्ट कारणांसाठी वायरलेस कम्युनिकेशनचा उपयोग होत होता. त्याच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली आणि तो उपयोग वाढत गेला. सुरुवातीला बरीच वर्षे मुंबईमध्ये फक्त स्थानिक दूरदर्शन दिसत असे. निरनिराळी केंद्रे बिनतारी यंत्रणांमधून एकमेकांशी जोडली गेली आणि मल्टिचॅनल टीव्ही सुरू झाला. पूर्वीच्या काळच्या वर्तमानपत्रांच्या निरनिराळ्या गावामधील वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या टेलिप्रिन्टरमधून मुख्य कार्यालयाकडे जात असत आणि आणि दूरदेशीची छायाचित्रे रेडिओफोटोद्वारे तिकडे येऊन ती छापून येत असत. वृत्तपत्रीय क्षेत्रामधल्या संदेशवहनामध्ये काळानुसार सतत वाढ होत गेली. आता तर एकेका वर्तमानपत्रातला सगळाच मजकूर बिनतारी यंत्रणांमार्फत ठिकठिकाणी पाठवला जातो आणि ठिकठिकाणच्या स्थानिक आवृत्यांमध्ये त्या ठिकाणच्या छापखान्यांमध्येच छापला जातो. अनेक वर्षे अस्तित्वात असलेली स्थानिक आवृत्ती आणि डाक एडिशन अशा निरनिराळ्या आवृत्या आता सहसा कुठे दिसत नाहीत, पण सगळ्याच मुख्य वर्तमानपत्रांच्या वीसपंचवीस ठिकाणांहून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या आवृत्या असतात.

गेल्या काही दशकांमध्ये अंतराळविज्ञानामधले (स्पेस सायन्स) संशोधन आणि बिनतारी संदेशवहन यांनी हातात हात धरून एकमेकांच्या आधाराने प्रचंड प्रगती केली. अग्निबाण (रॉकेट) उडवण्याचा एकादा शास्त्रीय प्रयोग केल्यापासून कुठल्याही क्षणी तो आकाशात किती उंचावर आणि नेमक्या कोणत्या जागी आहे आणि किती वेगाने कोणत्या दिशेने पुढे जात आहे वगैरे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्या रॉकेटसोबतच अत्यंत प्रभावी आणि वेगवान असे प्रक्षेपक (ट्रान्मिटर्स) पाठवणे, तसेच त्यांनी पाठवलेली माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील अशी अनेक उपकरणे जमीनीवर अनेक ठिकाणी जय्यत तयार असणे आवश्यक असते.

हा अग्निबाण वातावरणामधून वेगाने वर झेपावत असतांनाच आजूबाजूच्या वातावरणाची माहिती गोळा करून पाठवणारी उपकरणेसुध्दा त्याच्यासोबत पाठवली जातात. हे रॉकेट पृथ्वीपासून दूर जात असतांना सभोवतालच्या वातावरणामधला हवेचा दाब आणि तपमान कमी होत जाते, पण अग्निबाणाच्या उडण्याच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड धग, तसेच हवेच्या घर्षणामुळे निर्माण होणारी ऊष्णता यांचाही परिणाम त्या रॉकेटसोबत पाठवलेल्या प्रत्येक उपकरणावर होत असतो. अशा प्रकारे त्यांना अत्यंत कठोर परिस्थितींमध्ये तग धरून कार्य करत रहायचे असते. यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू खास प्रकारच्या पदार्थापासून तयार करावी लागते.

अमेरिकेतली नासा आणि रशियामधली तत्सम संस्था यांनी अब्जावधी डॉलर्स किंवा रुबेल्स खर्च करून जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन करवले आणि त्यामधून अनेक नवनवीन मिश्रधातू तसेच मानवनिर्मित पदार्थ तयार करवून घेतले. या संशोधनामधून शिकत आणि नवनवे प्रयोग करून सुधारणा करत खूप लांब पल्ल्याची मोठमोठी रॉकेट्स तयार केली गेली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून दूर निघून जाणारे अग्निबाण उडवण्याची किमया साध्य झाल्यानंतर पृथ्वीसभोवती घिरट्या घालत राहणारे कृत्रिम उपग्रह तयार करून अशा रॉकेट्सच्या सहाय्याने त्यांना अवकाशात धाडण्यात आले.

अवकाशसंशोधनाच्या बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानासोबत संदेशवहनातही अद्ययावत सुधारणा करून अंतरिक्षात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांबरोबर सतत संपर्क ठेवणेही अगत्याचे होते. त्यासाठी उपग्रहावर कुशल आणि विश्वासार्ह असे प्रक्षेपक ठेवले गेले, तसेच त्यांना चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशातून मिळवण्याची सोय केली गेली. सुरुवातीला शास्त्रज्ञांच्या गरजेसाठी तयार झालेल्या या तंत्रज्ञानाचा सामान्य जनतेला कसा लाभ होऊ शकेल याचाही विचार करण्यात आला. त्यासाठी जास्तीचे वेगळे ट्रान्स्मिटर्स व रिसीव्हर्स उपग्रहावर बसवून ते जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले. टेलिव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट यासारख्या सेवांसाठी आवश्यक असलेले संदेशवहन त्यामधून करता येऊ लागले. या संदेशांच्या लहरी सरळ रेषेमध्ये प्रवास करत असल्यामुळे आणि पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे जमीनीवर त्या फार जास्त अंतरावर जात नाहीत, पण उपग्रहावरून पृथ्वीचा मोठा भाग सरळ रेषेत येत असल्यामुळे ते प्रसारण खूप मोठ्या प्रदेशात पसरले जाते. या कारणामुळे उपग्रहामार्फत होणारे संदेशवहन अनेकपटीने प्रभावशाली ठरले. अर्थातच हे सगळे पूर्णपणे बिनतारी असते.

जनतेला द्यायच्या असलेल्या सेवा अखंडितपणे उपलब्ध होण्यासाठी खास प्रकारचे उपग्रह तयार करून ते अंतराळात अशा खुबीने सोडले जातात की आपल्याला ते आकाशात एका जागी स्थिर वाटतात. त्यांना जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. पृथ्वी ज्या गतीने स्वतःभोवती फिरते तेवढ्याच गतीने ते विषुववृत्ताभोवती फिरत असतात. विषुववृत्ताभोवती असलेल्या अशा अनेक उपग्रहांमधून जगभरातले संदेशवहन सतत चाललेले असते.

अग्निबाण आणि उपग्रह यांत वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू आकाराने आणि वजनाने लहानात लहान असणे अत्यंत आवश्यक असते. या दृष्टीने संशोधन करून प्रत्येक उपकरणामधला प्रत्येक भाग किती सूक्ष्म करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मिनिएचरायझेशनमुळे इलेक्ट्रॉलिक्सच्या बाबतीत कल्पनातीत फरक पडले. व्हॉल्व्ह्सच्या जागी सेमिकंडक्टर्स, त्यांच्या अनेक एलेमेंट्सना जोडणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, अनेक पीसीबी मिळून इंटिग्रेटेड सर्किट्स, लक्षावधी भाग एकत्र केलेले मायक्रोप्रोसेसर्स वगैरे पायऱ्या एकामागोमाग पार करून अत्यंत सक्षम पण आकाराने चिमुकली उपकरणे तयार होत गेली. हाताच्या मुठीत मावतील एवढे लहान पण अनेक कामे करू शकणारे सेलफोन हे याचे उदाहरण आहे. गंमत म्हणजे या प्रगतीबरोबर नवनव्या उपकरणांच्या किंमतीही कमी कमी होत गेल्या. वाढत्या महागाईच्या काळात हा एकमेव अपवाद म्हणता येईल.

सेलफोन आल्यानंतर तर संदेशवहनात क्रांतिकारक बदल झाले. आज आपल्याला घरात, ऑफिसात, रस्त्यात किंवा जिथे कुठे असू तिथून सातासमुद्रापलीकडे असलेल्या व्यक्तीशी बोलता येते, तसेच लेखी निरोप पाठवता येतात, चित्रेसुध्दा पाठवता येत असल्यामुळे आपण त्याच्या चेहऱ्यावरले भाव पाहू शकतो. महाभारतातल्या संजयाला या प्रकारच्या दिव्य शक्तीचे एकतर्फी वरदान मिळाले होते, तो फक्त दूरचे पाहू किंवा ऐकू शकत होता, इतर अनेक ऋषीमुनिवर्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होते असे सांगतात. पण आजच्या तंत्रज्ञानाने सर्वसामान्य मर्त्य मानवांना कसलीही तपश्चर्या न करता हे वरदान प्राप्त झाले आहे. कोणत्याही खास सोयी म्हणजे एका काळी फक्त अतिविशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी असायची. आता इतक्या चांगल्या सोयी कुणाच्याही खिशाला परवडणाऱ्या किंमतीत सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झाल्या आहेत. बिनतारी संदेशवहनाने आता आपले जग लहान झाल्यासारखे, जवळ आल्यासारखे वाटायला लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: