एक खूप जुना पण आठवणीत राहिलेला अनुभव
रेडिओवर ऐकलेली गाणी (अर्थातच सुगम) आपल्याला डिट्टो म्हणता येतात असा माझा शाळेत असतांना गोड गैरसमज होता. शाळेत होणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये मला भाग घ्यायलासुद्धा मिळायचा, तो बहुधा माझ्या चांगल्या पाठांतरामुळे किंवा स्पष्ट उच्चारांमुळे असावा. सूर, ताल व लय हे गायनासंबंधीचे शब्द कधी माझ्या कानावर पडलेच नव्हते. मोठेपणी संगीताबद्दल वाटणारी गोडी वाढत गेली आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीत गाणाऱ्या अनेक दिग्गजांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यामधून ताल, सूर व लय यांचे व्याकरण आणि चांगल्या गायनातील खास जागा वगैरेंची किंचितशी जाण आली, तसेच हे काही आपले काम नाही हे समजले आणि आपण आपली श्रवणभक्ती करावी हे निश्चित झाले.
शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या एका स्थानिक संस्थेच्या गुरूपौर्णिमेला होणाऱ्या वार्षिक समारंभाला मी दरवर्षी एक चाहता आणि प्रेक्षक किंवा श्रोता म्हणून हजेरी लावत असे. वेगवेगळ्या वर्गांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या गायनाची चुणूक दाखवणारा छोटासा कार्यक्रम करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना या वेळी प्रमाणपत्रे देत असत. मी अशाच एका समारंभाला दरवर्षीप्रमाणे गेलो होतो. हळूच डुलक्या घेतांना किंवा चुकीच्या जागी दाद देतांना उगाच पकडले जाऊ नये म्हणून मी नेहमी शेवटच्या रांगेत बसण्याची खबरदारी घेतो. तशी त्या दिवशीसुद्धा घेतलेली होती. तरीसुद्धा आयत्या वेळी माझे नांव पुकारून मला प्रमाणपत्रे वाटण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले. इतकेच नव्हे तर शेजारी बसलेल्या सद्गृहस्थाने मला हात धरून जागेवरून उठवले. त्यामुळे मला पुढे होण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
खरे तर मी संगीताची प्रारंभिक परीक्षासुद्धा दिलेली नव्हती आणि ती दिली असती तर त्यात मी उत्तीर्ण झालो असतो की नाही याची शंकाच होती. पण एक दोन पासून सात आठ वर्षांपर्यंत संगीतसाधना करून परीक्षा पास झालेली मुलेमुली क्रमाक्रमाने येत होती, भारतीय परंपरेप्रमाणे माझ्या पाया पडून माझ्या हस्ते प्रमाणपत्र घेऊन हंसल्यासारखे करून जात होती. मला मात्र भयंकर अवघडल्यासारखे झाले होते. माझे वय व हुद्दा बघूनच मला तेथे बोलावले गेले असणार हे उघड होते. कदाचित संस्थेच्या संचालक मंडळींना संगीताव्यतिरिक्त इतर कारणांमुळे माझ्याबद्दल आदर वाटतसुद्धा असेल. पण ज्या मुलामुलींना मी प्रमाणपत्रे देत होतो त्यांना मनातून काय वाटत असेल? त्यांच्या मनात कितपत आदरभावना असेल? अमक्या अमक्या गृहस्थांच्या हस्ते मला हे प्रमाणपत्र मिळाले हे ते लक्षांत ठेवतील कां? तसे अभिमानाने कुणाला सांगतील कां? हे प्रश्न विचारायचा धीर मला झाला नाही. एक दोन अपवाद सोडले तर त्यांच्यातले किती जण आज मला ओळखतील याचीही शंकाच आहे.
एखाद्या बक्षिससमारंभाला प्रमुख पाहुणा ठरवतांना ज्यांचा गौरव करावयाचा असतो त्या लोकांना त्या पाहुण्याबद्दल आदर वाटण्यासारखे त्याचे त्या क्षेत्रातील कर्तृत्व असायला हवे असे मला तरी वाटते. मला आधी विचारले असते तर मी नकारच दिला असता, पण बहुधा ते आधीपासून ठरवलेलेच नसावे. आयत्या वेळी सभागृहात कोण कोण उपस्थित आहेत ते पाहून कुणीतरी माझी निवड करून ते जाहीर करून टाकले असावे. माझ्या ऑफिसमधल्या अशा अनेक बक्षिस समारंभांमध्ये मी बक्षिसे दिली आहेत, पण ती माझ्या क्षेत्रातल्या नव्या लोकांना दिली होती आणि त्यांना माझ्याबद्दल आदरभाव वाटावा इतपत कामगिरी मी केलेली होती. या बक्षिस समारंभाचा अनुभव मात्र थोडा वेगळा आणि मला अनपेक्षित असा होता.
—————————————————————————————–
तुमचं नांव काय हो?
एका गांवातील वाचनालयाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनासाठी एका प्रथितयश साहित्यिकाला पाचारण केले होते. सभेचे अध्यक्षपद एका स्थानिक पुढा-याने भूषविले होते. त्याला साहित्याचा फारसा व्यासंग नव्हता. त्यामुळे साहित्यिकांची फारशी माहिती नव्हती. आपल्या सराईत वाक्पटुत्वाचा उपयोग करून त्याने भाषण ठोकायला सुरुवात केली. “माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजचा दिवस या गांवाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. आज या गांवाला, या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला चांगल्या सुसंस्कृत नागरिकांची अत्यंत गरज आहे. तसे चांगले नागरीक घडायला पाहिजे असतील तर त्यांनी चांगली चांगली पुस्तके वाचून प्रबुद्ध व्हायला पाहिजे. आपले महान नेते महात्मा गांधीजी, पंडित नेहरूजी, लोकमान्य टिळक वगैरे मंडळींनी मोठमोठी पुस्तके लिहून देशाला मार्गदर्शन केले. त्यामधील कांही पुस्तके तर त्यांनी तुरुंगात बसून लिहिलेली आहेत. या गांवातील लोकांना चांगली पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून आम्ही या गांवात हे वाचनालय सुरू करीत आहोत. या प्रसंगी आपल्याला एक फार मोठे साहित्यिक पाहुणे लाभलेले आहेत. त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा लिहून साहित्याच्या जगात मोलाची भर घातली आहे. त्या पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी या वाचनालयाचे उद्घाटन करावे व आपले विचार आपल्यासमोर मांडून आम्हांस उपकृत करावे.” एवढे म्हणून ते खाली बसले आणि शेजारी बसलेल्या पाहुण्यांना त्यांनी हळूच विचारले, “खरंच, तुमचं नांव काय हो?”
प्रतिक्रिया व्यक्त करा