संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची

हा लेख मी तीन भागात लिहिला होता. त्यांना एकत्र करून आणि थोडे संपादन करून या स्थळावर दिला आहे.

——————————–
संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग १)

bhimsen_s

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांनी त्यांच्या घरातल्या वडीलधारी लोकांच्या विरोधात जाऊन, एक प्रकारचे बंड पुकारून कलेची साधना, किंबहुना त्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. भीमसेनजी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडून संगीतशिक्षणासाठी बाहेरच्या जगात निघून गेले होते हे आता सर्वांना माहीत आहे. पण त्यांना संगीताचे बाळकडू त्यांच्या घरीच मिळाले होते, घरात त्यांच्या कानावर पडलेल्या सुरांमुळेच त्यांना बालवयातच संगीताची गोडी लागली होती, ते शिकण्याची उत्कट प्रेरणा त्यातूनच मिळाली होती, मग त्यासाठीच त्यांना आपले ते घर सोडण्याचा एवढा टोकाचा धाडसी निर्णय कां घ्यावा लागला होता?

आजच्या जगात शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वस्तीतल्या सेल्फकन्टेन्ड ब्लॉकमध्ये, म्हणजे स्व.पु.ल.देशपांडे यांच्या भाषेत ‘बंद दरवाजाच्या’ पण खूप मोकळ्या विचारांच्या संस्कृतीत राहणाऱ्या लोकांना या विरोधाभासाचा नीटसा उलगडा कदाचित होणार नाही. पण भीमसेनजींच्या उत्तर कर्नाटक प्रदेशातला साठसत्तर वर्षांपूर्वीचा कालखंड मी स्वतः अनुभवला असल्यामुळे मला तो निदान किंचित तरी समजू शकतो. त्या काळात घरात विजेचे दिवे नव्हते, पाण्याचे नळ नव्हते, रेफ्रिजरेटर, टेलीव्हिजन, वॉशिंग मशीन यासारख्या कसल्याच यांत्रिक सुखसोयी नव्हत्या. सर्वसामान्य माणसाचे जगणे आजच्या तुलनेत शारीरिक दृष्टीने कष्टमय होते. रोज पहाटे झुंजूमुंजू उजाडले की सारे जण उठायचे, दरवाजा उघडून अंगणात सडारांगोळी घालायची आणि कामाला लागायचे. त्यानंतर रात्र होईपर्यंत घराचा दरवाजा उघडाच असे. एकत्र कुटुंबातल्या घरात भरपूर माणसे असत आणि आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांचे दरवाजे उघडेच असल्यामुळे एका घरात खुट्ट झाले तरी ते सर्वांना समजत असे आणि काय झाले ते पहाण्यासाठी आणि गरज असल्यास मदतीसाठी सर्वजण धावून येत असत. गावातली सगळी माणसे ओळखीची असायची. त्यामुळे दिवसा ढवळ्या कोणी अज्ञात चोर घरात शिरण्याची शक्यताच नव्हती. घरातला सगळा कारभार उघड असल्यामुळे तो सर्वांच्या समोर असे आणि “लोक काय म्हणतील?” या प्रश्नाला जबरदस्त महत्व होते.

त्या काळच्या समाजात टोकाचा जातीभेद होता. मात्र याचा अर्थ भिन्न जातींमध्ये वितुष्ट होते असा नाही. पण बहुतांश लोक आपापल्या जातीजमातीच्या लोकांमध्येच राहणे पसंत करत असत. त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये जातीनिहाय वस्त्या, वाडे, गल्ल्या किंवा आळी असत. परंपरागत लोकसंगीताचे सुध्दा ध्रुवीकरण झाले होते. ज्या भागात श्लोक किंवा स्तोत्रांचे पठण किंवा घंटानाद आणि झांजांच्या साथीने आरत्या म्हंटलेल्या ऐकू येत असत त्या भागात ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर उच्चारलेले लावणीचे शब्द कधीच ऐकू आले नसते. मराठी संतांची अभंगवाणी आणि कानडी संतांची पदे मात्र याला अपवाद होती. विठोबा पांडुरंगाच्या भजनात सगळे लोक सामील होत असत. ग्यानबा तुकोबांचे अभंग घराघरात गायले जात असत. त्या काळातला स्त्रीवर्ग अजीबात घराबाहेर पडत नसला तरी घरातल्या घरात आणि शेजारणी-पाजरणींच्या घोळक्यात त्यांचे लोकसंगीत बहराला येत असे.

बाल भीमण्णांच्या आईला मधुर स्वरांची स्वर्गीय देणगी लाभलेली होती. संत पुरंदरदास वगैरेंची भजने ती तन्मयतेने गात असे. गायनाचा सार्वजनिक प्रयोग करणे त्या काळात वर्ज्य असले तरी घरातल्या भीमण्णांच्या कानावर ते गायन पडत होतेच आणि कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे त्यांनी ती पदे आत्मसात केली होती. त्याशिवाय भजन, कीर्तन वगैरेंमधून त्यांचे संगीताचे श्रवण होत होतेच. त्यांना क्वचित कधी शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीसुध्दा मिळत असे. त्यातून ते इतके भारावून गेले की असे दिव्य संगीत आपल्यालासुध्दा शिकायलाच पाहिजे असे त्यांच्या मनाने घेतले.

लहान मुलाची इच्छा काय आहे ते पाहून ती पुरवायची पध्दत त्या काळी नव्हती. त्याच्या हिताच्या दृष्टीने त्याने काय शिकावे ते घरातली वडिलधारी मंडळीच पहात असत. परंपरागत रूढ समजुतींप्रमाणे जोशांच्या मुलाने संस्कृत शिकून वेदशास्त्रसंपन्न व्हावे, शास्त्री पंडित म्हणून मिरवावे ही अपेक्षा असेल. ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या त्या काळातला नवा रोख पाहून त्या काळात तो इंग्रजी शिकून वकील किंवा सरकारी ऑफिसर झाला असता तर त्याने चांगले यश कमावले असते, शिक्षक झाला असता, रेल्वे, पोस्ट ऑफिस किंवा मामलेदार कचेरीत नोकरीला लागला असता तरी त्याला मान होता. गाणे बजावणे हे मात्र प्रतिष्ठित लोकांचे काम नव्हते. कलावंत या शब्दाला मान नव्हता, कलावंतीण हा तर अपशब्द होता. भीमसेन जर आधी व्यवस्थितपणे सरधोपट मार्गाला लागला असता आणि त्याने आपला शौक पुरा करण्यासाठी थोडे गायन वगैरे केले असते तर ते कदाचित त्याच्या घरच्यांना चालले असते. त्या काळातल्या समाजात देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणी त्याचे गुणगान संगीतामधून केले तर त्याचे कौतुक होते, पण माणसांचे मनोरंजन करणे अत्यंत कमीपणाचे मानले जात असे. गायक वादक वगैरे मंडळी संस्थानिक, सरदार, जहागिरदार वगैरेंच्या पदरी असत. फारशी प्रसारमाध्यमेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना लोकाश्रय नव्हता. देवल किर्लोस्कर वगैरेंच्या प्रयत्नामुळे नाटक कंपन्या चालत होत्या. संगीत शिकलेला मुलगा फार फार तर गायक नट बनू शकेल एवढीच त्याची झेप अपेक्षित होती. पण त्या व्यवसायाला नाके मुरडणारे लोकच अधिक होते.

अशा त्या काळात लहानग्या भीमाला शास्त्रीय संगीत शिकायचा ध्यास लागला. त्यासाठी घरी कोणीही त्याला पाठिंबा दिला नसता, त्या शिक्षणाची व्यवस्था करणे अशक्यप्राय होते. गावात राहून त्याची सोय होणे शक्यच नव्हते. त्यासाठी परगावी जाऊन रहायला परवानगी मागितली असती तर ती मिळाली नसती, उलट त्यात नक्कीच खोडा घातला गेला असता. असा विचार केल्यानंतर गुपचुपपणे घरातून पळून जाणे हा एकमेव पर्याय भीमण्णांना दिसला आणि तो पत्करून त्याचे होतील ते सारे परिणाम भोगण्याचे अतुलनीय मनोधैर्य अकरा वर्षाच्या वयात त्यांनी दाखवले. घर सोडल्यानंतर ते जर जवळपासच्या गावात गेले असते तर लगेच सापडले गेले असते, म्हणून ते मुद्दाम दूरवरच्या गावांमध्ये फिरत राहिले आणि कणाकणाने संगीतविद्या वेचत राहिले. त्यात थोडेफार यश मिळाल्यानंतर आपल्या गावाजवळच असलेल्या कुंदगोळ गावी जाऊन ते पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडे गेले आणि मनोभावे त्यांची सेवा करून त्यांचे पट्टशिष्य झाले.

संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग २)

इसवी सन १९३०-३५ चा काळ आजच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळात देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी रेल्वे हे बहुधा एकमेव साधन होते. त्यातसुध्दा लांब पल्ल्याच्या गाड्या अगदी कमी होत्या. स्लीपर कोचची कल्पनासुध्दा निघालेली नव्हती. बहुतेक प्रवासी जवळपासच्या गावांना जाणारे असल्यामुळे गाडीत झोपायची आवश्यकता भासत नव्हती. कोळशाच्या इंजिनावर चालणाऱ्या त्या काळातल्या झुक झुक झुक झुक अगीनगाडीच्या डब्यात प्रवाशांना बसण्यासाठी लाकडाच्या फळकुट्यांची बाकडी असत. त्यात बोट बोट भर रुंदीच्या फटी असत आणि रोज नवनव्या माणसांच्या रक्ताची चव चाखायला चटावलेल्या ढेकणांच्या फौजा त्या फटींमध्ये दडलेल्या असायच्या. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा झाली नव्हती. हिंदी बोलपट अद्याप बाल्यावस्थेत होते. त्यातली गाणी लोकांच्या तोंडात बसली नव्हती. त्यामुळे दक्षिण भारतातल्या लोकांसाठी हिंदी ही काहीशी अनोळखी भाषा होती.

अशा काळात दहा बारा वर्षे वयाचे भीमसेन दक्षिण भारतातून निघून एकट्याने प्रवास करीत उत्तर भारतात जाऊन पोचले होते. या काळात ते आजूबाजूच्या लोकांबरोबर कोणत्या भाषेत कशा प्रकारचा संवाद साधत होते ते तेच जाणो. त्यांनी आपल्या गोड आवाजात खड्या सुरात गायिलेले एकादे भजन किंवा पद ऐकल्यानंतर अधिक काही सांगायची त्यांना गरज पडत नसावी आणि कानावर पडलेल्या शब्दांवरून ते नवी भाषा लगेच शिकून घेत असावेत.

त्या दहा बारा वर्षाच्या मुलाकडे उपजीविकेचे कोणते साधन असणार? गुणग्राही आणि दयाळू लोकांच्या औदार्यावरच त्यांची गुजराण होणे शक्य होते. मिळेल ते अन्न पूर्णब्रह्म मानून गिळणे आणि जमेल तिथे हातपाय पसरून झोपणे त्यांना भाग होते. पण ते उपजीविकेच्या शोधार्थ घराबाहेर पडलेच नव्हते. हक्काचा अन्नवस्त्रनिवारा आणि मायेची पाखर देणारे आईवडिलांचे घर, जिवलग सखे या सर्वांचा त्याग करून त्यांनी हा मार्ग एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन पत्करला होता. त्यामुळे संगीताचे शिक्षण घेणे हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवून जातील त्या जागी चौकशी करून आणि त्यासाठी मिळेल ती माहिती काढून जिवाचा आटापिटा करून ते प्रयत्न करत राहिले, सतत त्या मार्गावर पुढे जात राहिले आणि अखेर कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे जाऊन पोचले.

शिष्यांची निवड करण्याच्या बाबतीत पं.सवाई गंधर्व अत्यंत चोखंदळ होते. योग्यता आणि निष्ठा यांची कसोशीने पारख करून घेतल्यानंतरच ते कोणाला आपले शिष्यत्व देत असत. पहिले काही महिने त्यांनी भीमसेनांना काहीच शिकवले नाही. तरीही ते त्यांच्याकडे राहून पडेल ते काम करून आणि श्रवणभक्तीमधून शास्त्रीय संगीताचे कण वेचत राहिले. अखेरीस गुरूंनी त्यांच्यावर खूष होऊन त्यांना गायनकला शिकवायला सुरुवात केल्यानंतरदेखील ते आठवड्यातून फक्त एक दिवस प्रत्यक्ष थोडेसे शिकवत असत. त्यानंतर आठवडाभर शिष्याने ते स्वर पुन्हा पुन्हा घोटून घोटून आपल्या गळ्यावर चांगले बसवले आणि गुरूला व्यवस्थितपणे गाऊन दाखवले तरच पुढचे शिकवत असत. अशा प्रकारे सुरुवातीला एकेक रागाचे शिक्षण महिनोगणती चालत असे. पं.भीमसेन जोशी यांनीच याबद्दल अनेक वेळा त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते.

असे असले तरी कधीसुध्दा अगदी चुकूनही त्यांच्या बोलण्यात त्याबद्दल तक्रारीचा किंचितसा सूर देखील आला नव्हता. नेहमी त्यांच्या गुरूंबद्दल त्यांचे मन अतीव आदरानेच भरलेले असायचे. त्यांच्या काळात आजच्यासारखी यांत्रिक साधने नव्हती आणि घरकामासाठी गडीमाणसे, नोकरचाकर वगैरे ठेवणे श्रीमंतांनाच परवडत असे. त्यामुळे पाणी भरणे, झाडलोट करणे यासारखी कामे घरातले लोकच करत असत आणि घरातल्या मुलांचा त्यात सहभाग असणे साहजीक असे. माझ्या लहानपणी आमच्या घरी मी ही सगळी कामे आनंदाने केली आहेत. तेंव्हा त्यांचे श्रम वाटत नव्हते की त्यात कमीपणा वाटत नसे. उलट अभिमान वाटायचा. पं.भीमसेन जोशी यांनी लहानपणी सवाई गंधर्वांच्या घरी असली तथाकथित हलकी कामे केली असली तर त्यात काहीच जगावेगळे नव्हते. उलट ते त्यांच्या घरी मुलासारखे राहिले ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

संगीत साधना – पूर्वीच्या काळातली आणि आताची (भाग ३)

ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या काळातल्या मध्यम वर्गीय घरांमधले वातावरण आजच्या मानाने खूप रूढीग्रस्त आणि काहीसे असहिष्णु होते. घरातल्या वडीलधारी माणसांनी सांगायचे आणि लहानांनी ते निमूटपणे ऐकायचे असा दंडक होता. मोठ्या मंडळींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग त्यात होत असे आणि त्यांच्या दृष्टीने कुटुंबासाठी जे चांगले असेल तेच ते सांगत असत. त्यात सर्वांचा फायदा असायचा हे खरे असले तरी लहानांच्या मनात काही वेगळा विचार आला तरी तो व्यक्त करायला ते घाबरत असत, कोणी धीटपणाने तो बोलून दाखवला तर इतर मंडळी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे सांगणे ऐकून घेत नसत आणि ऐकून घेतल्यानंतर त्यात काही गैर दिसत नसले तरीसुध्दा, “ते ठीक आहे, पण लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय?” असे म्हणून त्याला उडवून लावत असत. स्वतंत्रपणे विचार करू शकणाऱ्या ज्या व्यक्तींना हा मनाचा कोंडमारा असह्य होत असे त्यांना निमुटपणे बाहेरची वाट धरावी लागत असे. देशभक्ती किंवा समाजसेवा यासारख्या उदात्त कारणासाठीसुध्दा कुटुंबातून बाहेर पडावे लागलेल्या लोकांची अनेक उदाहरणे आहेत.

आजकाल मुंबईसारख्या शहरातल्या सेल्फकंटेन्ड फ्टॅटमध्ये (बंद दरवाजाच्या संस्कृतीत) राहणारे लोक घरी काय करतात ते इतरांना समजतही नाही, कोणी त्याची चौकशी करत नाही की त्यांना काही म्हणत नाही. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्यात अनेकपटीने वाढ झाली आहे आणि लोकापवादाचा धाक उरलेला नाही. “लोक काय म्हणतील?” ही भीती उरलेली नाहीच, उलट “लोक किती कौतुक करतील?” असा विचार केला जात आहे. सिनेमा आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृती आणि त्यातली मुक्त विचारसरणी या गोष्टी आज घराघरात जाऊन पोचल्या आहेत. कला आणि क्रीडा या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या लोकांना लहान वयातच अमाप प्रसिध्दी, गडगंज पैसा आणि भरपूर मानसन्मान मिळतात त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी पूर्णपणे बदलली आहे. झटपट यशाच्या आशेमुळे त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची गर्दी आता वाढत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कोचिंग क्लासेस गल्ल्यागल्ल्यांमध्ये उघडले जात आहेत. त्याशिवाय चांगल्या गायकांचे गायन ऐकून त्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध झाली आहेत. खेळ किंवा गाण्याची उपजत आवड असली तरी त्यात प्रगती करून प्राविण्य मिळवण्याची सुलभ सोय पूर्वीच्या काळी नसायची. आताच्या काळात त्यात यत्किंचित रस किंवा गती नसलेल्या मुलांनासुध्दा आजकालचे पालक जबरदस्तीने तशा क्लासेसना पाठवतांना दिसतात. त्या विद्यार्थ्यांमधील स्पर्धा अनेकपटीने वाढल्यामुळे त्या क्षेत्रांमध्ये पुढे येण्यासाठी आजसुध्दा जबरदस्त संघर्ष करावा लागतोच पण या कारणासाठी आता कोणाला घर सोडून जाण्याची गरज उरली नाही, न सांगता पळून जाण्याची तर नाहीच नाही.

दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या काळातला घरात असहिष्णू वाटणारा समाज प्रत्यक्षात बराच सहृदय होता. माझ्या लहानपणी आमच्या घरातले रोजचे जेवण अतीशय साधे असायचे. बहुतेक दिवस त्यात फक्त एकच कालवण असे. पण रोजचे साधे जेवण असो किंवा सणासुदीचे पंचपक्वान्नांचे असो, ठराविक दिवशी वार लावून जेवायला येणारा एकादा गरीब विद्यार्थी नेहमी पंगतीला असायचा. बदाम पिस्ते. मनुका, बेदाणे वगैरेंनी भरलेल्या बरण्या आमच्या स्वयंपाकघरातल्या फडताळांमध्ये नसायच्या, पण माधुकरी मागायला आलेल्या कोणाच्याही झोळीमध्ये सढळ हाताने ओंजळभर जोंधळे घातले जात असत. एकाद्या सधन कुटुंबाच्या आधारावर मोठी झालेली माझ्या पिढीमधली काही आश्रित माणसे मला माहीत आहेत. लहानपणीच घर सोडून कर्नाटकातून बाहेर पडलेले भीमसेन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे अनेक भागांमध्ये जाऊन पुन्हा कर्नाटकात परत आले. या सगळ्या ठिकाणी त्यांना अन्नदाते आणि आश्रयदाते लाभले. सद्गुणी, कष्टाळू आणि गरजू लोकांना त्या काळातला समाज अनेक हातांनी आधार देत असे.

आजचे दृष्य वेगळे दिसते. ‘वार लावून जेवणे’, ‘माधुकरी’. ‘आश्रित’ यासारखे शब्द आता मराठी भाषेतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या पिढीमधल्या मुलांना त्याचा अनुभव नसल्याने त्या शब्दांचा अर्थही लागत नसेल. आजचे लोक सुध्दा उदारहस्ताने मदत करतात, म्हणजे समाजसेवी संस्थांना देणग्या देतात, पण फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कोणाच्याही घरात त्या कुटुंबाच्या बाहेरच्या एकाद्या मुलाला रहाण्याजेवण्यासाठी आणून ठेवल्याचे एकही उदाहरण मला तरी दिसत नाही. आपल्या मुलांना सर्व काही उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त द्यावे अशी धडपड आजचे पालक करत असतात आणि ते करण्यासाठी आपल्या मुलांची संख्या एक किंवा दोनवर मर्यादित ठेवतात. कुटुंबनियोजनाच्या प्रसारामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे “दुसऱ्यांच्या मुलांना घरी आणून पोसण्यापेक्षा आपल्याच मुलांना जन्म दिला नसता का?” किंवा “त्या दुसऱ्यांना जर मुलांना पोसण्याची ऐपत नव्हती तर त्यांना जन्म कशाला दिला?” अशा स्वरूपाचे प्रश्न आजच्या काळातल्या कोणाच्याही मनात उठणे साहजीक आहे. पूर्वीच्या काळात हे देवाच्या मर्जीनुसार ठरत असे आणि देवाने या जगात पाठवलेल्या जीवाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना लोकांच्या मनात असे. ते चित्र आता बदलले असल्यामुळे एकाद्या गुरूच्या घरी राहून आणि त्याची सेवा करून शिक्षण मिळवणे ही गोष्ट आता बहुधा संभवत नाही. असा भाबडा विचार करून एकादा मुलगा भीमण्णांप्रमाणे घर सोडून परागंदा झाला तर त्याला कुठे थारा मिळणार नाही, उलट आता तो समाजकंटकांच्याच हातात सापडण्याचा फार मोठा धोका आहे.

पूर्वीचा काळ चांगला होता की आताचा असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर मला द्यायचे नाही. त्या काळात काही जटिल समस्या होत्या, आताच्या काळातही कसोटी पाहणाऱ्या वेगळ्या अडचणी आहेत. त्या काळात वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत्या, आता निराळ्या स्वरूपाचे मार्ग निर्माण झाले आहेत. अलौकिक गुणवत्ता, अदम्य उत्साह आणि पडतील तेवढे सारे कष्ट सहन करण्याची तयारी असेल तर तशा असामान्य व्यक्ती पूर्वीच्या काळातही सगळ्या अडचणी बाजूला सारून पुढे आल्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोचल्या, भविष्यातसुध्दा तसे होत राहणारच अशी माझी श्रध्दा आहे. त्यांचे मार्ग वेगळे असतील पण ध्येय गाठण्याची ऊर्मी आणि त्यासाठी लागणारी धडपड असेल तर ते यशस्वी होतील.

. . . . . . . . . . . . (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: