विधिलिखित आणि योगायोग

बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात. अशाच एका चर्चेत एकाने मला विचारले, “तुमचा नशीबावर विश्वासच नाही कां?”
मी सांगितले, “म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही.”
“म्हणजे?”
“कधी कधी एकादा हुषार, समजूतदार आणि कष्टाळू माणूस खूप धडपड करतो, पण त्याला मिळावे तेवढे यश मिळत नाही आणि बेताची बुध्दी आणि कुवत असलेला दुसरा आळशी माणूस सगळे कांही मिळवून जातो. एकाद्या गोष्टीसाठी आपण जीवतोड मेहनत करूनही ती हाती येत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट आपसूक पदरात पडते. कोणाला बंपर लॉटरी लागते तर कोणी विमान अपघातात सापडून दगावतो. हे सगळे नशीबामुळेच घडले असेच इतर सगळ्यांच्याबरोबर मीसुध्दा म्हणतो. याचा अर्थ मी सुध्दा नशीबावर विश्वास दाखवतो असा होतो. पण खरे सांगायचे तर माझ्या मते या सर्व घटना परिस्थितीजन्य असतात आणि आपल्याला त्या परिस्थितींचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ढोबळपणे विचार करतां लॉटरीमध्ये नंबर निघणे एवढे कारण बक्षिस मिळण्यासाठी पुरेसे असते आणि कोसळलेल्या विमानात तो प्रवासी बसला होता यापलीकडे त्याच्या मृत्यूसाठी दुसरे कारण असायची गरज नसते, पण आपले विचार इथे थांबत नाहीत. लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वराची इच्छा किंवा त्या माणसाचे भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो.”
“म्हणजे या गोष्टी नसतात कां?”
“ते मला माहीत नाही. पण त्या असतात असे म्हणण्यात बरेच फायदे नक्की असतात. आपण भांडून मिळवलेली गोष्टसुध्दा नशीबाने मिळाली असे म्हणून विनयशील होता येते आणि आपल्या गाढवपणामुळे हातातून निसटलेली गोष्ट आपल्या नशीबातच नव्हती अशी मखलाशी करून तो दोष लपवता येतो. तसेच दुसऱ्याच्या उत्कर्षाचे श्रेय त्याच्या भाग्याला देऊन त्याची मिजास उतरवता येते किंवा त्याच्या लबाडपणाकडे काणाडोळा करता येतो आणि काही बिनसले असेल तर त्याच्या नशीबाला दोष देऊन त्याच्या चुकांवर पांघरूण घालता येते, त्याची मर्जी राखणे किंवा त्याची समजूत घालणे वगैरे जमते. ”
“लॉटरी लागण्यात आणि विमान अपघातात तर त्या माणसाचे कर्तृत्व किंवा चूक नसतेच. त्या गोष्टी तर निव्वळ दैवयोगानेच घडतात ना?”
“नाही. त्या घटना घडण्याची कारणे निश्चितपणे असतात, पण त्या माणसाच्या बाबतीत ते घडावे हे योगायोग असतात असे मला वाटते. आपले भाग्य जन्माच्या वेळीच सटवाई कपाळावर लिहून ठेवते, दुसरी कोणती देवता ते तळहातावरील रेषांमध्ये पेरून ठेवते, भृगुमहर्षींनी संस्कृत भाषेत, नाडीग्रंथात तामीळमध्ये आणि नोस्ट्रॅडॅमसने कुठल्याशा युरोपियन भाषेत ते आधीच लिहून ठेवले आहे आणि त्यानुसारच सर्व घटना घडत आल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत वगैरे गोष्टी माझ्या बुध्दीला पटत नाहीत. ज्यांच्या अस्तित्वाबद्दलच मला शंका आहे असल्या या संकल्पनांचा अभ्यास करण्यात मी आपला वेळ वाया घालवत नाही. उलट जे लोक विधीलिखित अगदी अटळ आहे असे सांगतात आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेच लोक बोटात अंगठ्या आणि गळ्यात ताईत घालून, कपाळाला अंगारा लावून, नवससायास, उपासतापास करून ते भविष्य बदलायचा प्रयत्न करतांना दिसतात याची मला गंमत वाटते. अगदी मुंगीच्या पायाला जेवढी माती चिकटली असेल तेवढासुध्दा विश्वास मी असल्या गोष्टींवर ठेवत नाही. त्यामुळे नशीबावर माझा विश्वास नाही असेसुध्दा मीच सांगतो असेही म्हणता येईल.”
“पण तुमच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्याची प्रचीती येते म्हणून तर ते या गोष्टी करत असतील ना?”
“इतरांचे मी सांगू शकत नाही. कोणत्याही उपायाने कोणाचेही भले होत असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल. शिवाय या तथाकथित उपायांचे इतर अनेक फायदे मला दिसतात. दुःखाने पिचलेल्या आणि अपयशामुळे निराश झालेल्यांना त्या प्रयत्नांमधून दिलासा आणि धीर मिळतो, हताशपणाच्या अवस्थेत असलेल्यांना आशेचा किरण दिसतो, आपल्या पाठीशी कोणती तरी अद्भुत शक्ती उभी आहे असे वाटल्याने त्याच्या आधारामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला खंबीरपणा मिळतो, अंगात उत्साह संचारतो, काम करायला हुरुप येतो, दैववादी माणूससुध्दा आपण कांही प्रयत्न करत आहोत असे समजतो आणि त्याचे समाधान त्याला मिळते. एका दृष्टीने पाहता तोसुद्धा त्याला सुचतील ते प्रयत्न करतच असतो, या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष लाभ मिळतोच. शिवाय उपास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन करण्याच्या निमित्याने प्रवास घडतो, वेगवेगळ्या जागा पाहून होतात, चार वेगळी माणसे भेटतात, त्यातून अनुभवविश्व समृध्द होते. खास नैवेद्यासाठी तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तर अफलातून असतात. तुम्ही मला साजुक तुपातला शिरा, खव्याचा कंदी पेढा किंवा गूळखोबरे असे कांही खायला दिलेत तर मला त्याचा आनंदच वाटेल आणि मी ते आवडीने खाईन. माझ्या कपाळाला अंगारा लावलात तर मी तो पुसून टाकणार नाही याचे कारण मला तुम्हाला दुखवायचे नाही. इतरांचा विचार करूनही आपण कांही गोष्टी करत असतो. कोणा ना कोणाला बरे वाटावे म्हणून मी वर दिलेल्या अनेक गोष्टी करत आलो आहे. पण त्यामुळे माझ्या आधीव्याधी नाहीशा होतील, इडापिडा टळतील आणि माझा भाग्योदय होईल अशी अपेक्षा मात्र मी ठेवत नाही. तशा प्रकारचा अनुभव आजपर्यंत कधी मला आलेला नाही.”
“तुमच्या मनात श्रध्दाच नसेल तर त्याचे फळ कसे मिळणार? नैवेद्य म्हणून खाल्लात तर त्याचा गुण येईल, खोबरे म्हणून खाल्लेत तर तो येणार नाही, फक्त कोलेस्टेरॉल वाढेल.”
“प्रसाद म्हणून एकदम पंचवीस पेढे खाल्ले तर ते पचणार आहेत कां? माझे जाऊ द्या, पण इतरांना आलेली प्रचीती तरी दिसायला हवी ना.”
“अहो, हांतच्या कांकणाला आरसा कशाला? आपल्या गाडगीळांच्या सुजाताच्या पत्रिकेतला मंगळ जरा जड होता. मागच्या गुरुपुष्यामृताला तिने बोटात लाल खड्याची अंगठी घातली आणि सहा महिन्यात तिचे लग्न जमले सुध्दा.”
“अरे व्वा! ती एका नदीच्या रम्य किनारी उभी होती आणि तिच्या बोटातल्या अंगठीच्या प्रभावाने ओढला जाऊन एक उमदा राजकुमार अबलख घोड्यावर बसून दौडत तिच्यापाशी आला असे तर झाले नाही ना? आता सगळी राज्ये खालसा झाली आहेत आणि नद्यांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांचे किनारे रम्य उरले नाहीत, अबलख घोडे आता रेसकोर्सवरच धांवतात, त्यामुळे अशी परीकथा कांही प्रत्यक्षात आली नसेल. ती एकाद्या मॉलमधल्या मॉडेलला निरखत असतांना एकादा तरुण कारखानदार तिथे आला आणि अंगठीमुळे तिच्यावर मोहित होऊन तिला आपल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसवून घेऊन गेला असेही झाले नाही. पूर्वी ज्या स्थळांकडून तिला नकार आला होता, त्यांना उपरती होऊन आता ते सोयरीक करण्यासाठी गाडगीळांना शरण आले असेही ऐकले नाही. मुलीच्या बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतरही गाडगीळ तिच्यासाठी वरसंशोधन करत होतेच. मग त्या अंगठीने असा कोणता चमत्कार केला?”
“पण आधी तिचे लग्न जमत नव्हते आणि आता ते जमले याला तुम्ही काय म्हणाल, फक्त योगायोग? बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतर सुजाताचं लग्न ठरलं ही ज्योतिषविद्येची प्रचीती नाही तर काय फक्त योगायोग आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे कां?” त्या गृहस्थांनी मला विचारले.
मी सांगितले, “तसे म्हणता येईल, पण मी म्हणणार नाही.”
“तुमचा नशीबावर विश्वास नाही आणि हा योगायोगही नाही, मग आहे तरी काय?”
“योगायोग म्हणजे ‘कोइन्सिडन्स’ या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. त्या अर्थाने हा एक योगायोग ठरतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला ‘योगायोग’ असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सुजाताचे लग्न त्या अंगठीच्या प्रभावामुळे जमले असे तुम्हाला वाटते, या दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहे असे वाटत असल्यामुळे तुमच्या दृष्टीने तो योगायोग नव्हता. मला तसे वाटत नसल्यामुळे कदाचित त्याला योगायोग म्हणता येईल. पण सुजातामध्ये कसलीच उणीव नाही आणि गाडगीळांची परिस्थितीही चांगली आहे. तिच्या बोटात अंगठी असो वा नसो तिचं लग्न आज ना उद्या ठरणारच होतं. गाडगीळांच्या घरातल्या सगळ्याच लोकांच्या बोटात निरनिराळ्या रंगाच्या खड्यांच्या अंगठ्या नेहमीच दिसतात. म्हणजे यातही अनपेक्षित असे कांही घडलेले नाही. दोन अपेक्षित घटना घडल्या तर मला त्यात योगायोगही दिसत नाही. ज्या गोष्टीसाठी काही लोक नवससायास वगैरे करतात ती गोष्ट घडण्याची अपेक्षा तर असतेच, फक्त खात्री नसते. मनासारखे झाले की प्रचीती आली असे म्हणायचे आणि नाही झाले तर श्रध्दा कमी पडली, पूर्वसंचित आडवं आलं वगैरे स्पष्टीकरणे तयारच असतात. त्यामुळे यात अचानक घडणाऱ्या योगायोगाचं प्रमाण कमी असतं. ”
“आयुष्यातल्या ज्या गोष्टी भाग्यानुसार घडत असतात, त्यांना तुम्हीच योगायोग म्हणता ना!”
“रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. एकाद्याचे नशीब अचानक फळफळलं किंवा दैवाने घात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटला, निश्चित वाटणाऱ्या विनाशातून एकादा भाग्यवंत थोडक्यात बचावला किंवा दुसऱ्या कोणावर अचानक आकाशातून कुऱ्हाड कोसळली वगैरे जे आपण म्हणतो तशा गोष्टींबद्दल बोलतांना तसे योगायोगाने घडले असेल असे मी म्हणेन. सगळेच योगायोग परिणामकारक असतातच असे नाही. अनेक वेळा योगायोगाने घडणाऱ्या घटनांचा आपल्या जीवनावर कांहीच प्रभाव पडत नाही. दूरदेशी राहणारा एकादा जुना मित्र ध्यानी मनी नसतांना आपल्याला प्रवासात कुठे तरी भेटतो. अशा योगायोगातून चार घटका मजेत जातात आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो एवढेच होते. असले योगायोग आपण कांही काळाने विसरूनही जातो. एकादी प्रसिध्द व्यक्ती अकस्मात भेटली तर ती आठवण आपण जपून ठेवतो पण त्यातून आपल्या जीवनात कांही बदल येत नाही. अशा एकाद्या आकस्मिक भेटीतून उत्कर्षाच्या नव्या संधी मिळाल्या किंवा फसगत झाली, जीवनाची दिशाच बदलली असे झाले तर तो टर्निंग पॉइंट ठरतो आणि कायम लक्षात राहतो.”
“अशा गांठीभेटींचे योग आपोआप येत नाहीत. परमेश्वराने ते जुळवून आणले तरच ते येतात.”
“हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.”

योगायोगाबद्दल बोलायचे झाले तर कधीकधी ज्याला आपण योगायोग समजतो त्याची योजना कोणीतरी ठरवून केलेली असते पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते. कधीकधी आपल्या अज्ञानामुळे आपण तशी समजूत करून घेतो आणि नंतर जास्त माहिती मिळाल्यावर ती बदलते असेही होते. याचे उदाहरण पाहिजे असेल तर कोणतीही टीव्ही सीरीयल पहावी. याचे एक उदाहरण पहा.

बंगलोरचा बसवण्णा, चेन्नैचा चेंगप्पा आणि जयपूरचा जयसिंग हे तीन गृहस्थ १ जूनच्या सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी अंधेरीला एकाच ठिकाणी धांवतपळत जाऊन पोचले ……… योगायोग असेल.
ते तीघेही त्या ऑफीसात नोकरीला आहेत. ……….. मग ते एकत्र येणारच, त्यात योगायोग नाही.
ते तीघेही वेगवेगळ्या भागात राहतात तरीही ते नेमके एका वेळी कसे पोंचले? ….. योगायोगाने?
त्या दिवशी त्यांच्या ऑफीसच्या तिजोरीमध्ये बरीच रोकड होती ….. कदाचित योगायोगाने?
तो पगाराचा दिवस होता. ….. मग ती असणारच …. योगायोग नाही
सकाळी १० वाजून १० मिनिटांनी तिथे सशस्त्र दरोडेखोरांचे एक लहानसे टोळके आले. …… ते ठरवूनच आले असणार …. योगायोग नाही.
पण नेमके त्याच जागी कां आले? …. कदाचित योगायोगाने? किंवा कदाचित ठरवूनही आले असतील!
आल्या आल्या त्यांनी बंदुकीतून एक गोळी झाडली ….. दहशत बसवण्यासाठी असेल … योगायोग नाही
तिने थेट चेंगप्पाचा वेध घेतला ….. योगायोग ?
ते दरोडेखोर आपसात तामिळ भाषेत बोलले … कुठेतरी पाणी मुरतेय्.
कांही क्षणातच तिथे पोलीस येऊन पोचले ….. प्रचंड योगायोग …. त्यांना कसे समजले ???
ते पोलीस या दरोडेखोरांच्या मागावर होते ……. ???
ते दरोडेखोर तर बसवण्णाचा माग घेत तेथे पोचले होते. …….. कां?
त्याच्या ऑफीसात १ तारखेला बराच माल असतो असे त्याने बंगलोरला असतांना कोणाला तरी फुशारकी मारून सांगितले होते आणि त्याच्या संरक्षणासाठी कांही खास बंदोबस्त नसतो हेसुध्दा तो अनवधानाने बोलून गेला होता. ती माहिती तिकडच्या एका गँगला कळली होती …. योगायोग
आणि त्या पैशांवर डल्ला मारण्याचा बेत करून त्यांचे टोळके अंधेरीला आले होते. …. म्हणजे ठरवून, .. योगायोग नाही.
त्यांच्यातल्या एकाला कदाचित चेंगप्पाचा चेहेरा ओळखीचा वाटला ….. योगायोग
कदाचित त्या चोराला आपण ओळखले जाऊ अशी शंका आली म्हणून त्याने आधी त्यालाच गोळी घातली …… योगायोग संपला
ते दरोडेखोर बसवण्णाला शोधत मुंबईत अंधेरीला आले असल्याची माहिती त्याच्या बंगलोरच्या मित्राला कुठून तरी समजली होती …. योगायोग
आणि त्याने सकाळीच फोन करून बसवण्णाला सावध केले. ….. योगायोग नाही
बसवण्णा जाम घाबरला, त्याने चेंगप्पा आणि जयसिंगला बोलावून घेतले. त्यांनी धीर दिल्यावर त्यांच्यासोबतीने तो ऑफीसात आला. …… योगायोग संपला
जयसिंगचा एक मित्र अंधेरीला पोलिस इन्स्पेक्टर होता …… योगायोग
जयसिंगने लगेच ही बातमी आपल्या मित्राला सांगितली. अशीच माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडूनही मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या ऑफीसवर नजर ठेवलेलीच होती. ……. योगायोग संपला.
चोर तिथे आल्यानंतर लगेचच पोलीस तिथे आले आणि त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. …. योगायोग नव्हता
चेंगप्पाने ही नोकरी सोडायचे ठरवले होते. फक्त पगार घेण्यासाठी तो थांबला होता आणि त्याच दिवशी त्याला गोळी लागली …. योगायोग
त्या धक्क्याने तो खाली कोसळला असला तरी त्याची जखम गंभीर नव्हती. दोन आठवड्यात तो बरा होऊन हिंडू फिरू लागला. त्याच्या औषधोपचाराचा सगळा खर्च त्याच्या ऑफीसने केलाच, शिवाय अट्टल गुन्हेगारांना पकडून दिल्याबद्दल त्या तीघांना बक्षीसही मिळाले. …….. योगायोग म्हणावे की नाही?
आता चेंगप्पाने नोकरी सोडली नाही. मात्र तीघांनीही बदल्या करून घेतल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे ते एकमेकांपासून दूर गेले.

या सगळ्या गोष्टी त्यांच्या नशीबात लिहिल्या होत्याच असे कांही लोकांना वाटते. चेंगप्पा आणि बसवण्णा यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता किंवा त्यांच्या तळहातावरील लाइफलाईनला छेद गेलेले होते म्हणे. ते दोघे मिळून नुकतेच तिरुपतीला जाऊन व्यंकटेशाचे दर्शन घेऊन आले होते आणि सकाळी घरातून निघतांना आठवणीने तिथला अंगारा कपाळाला लावून आले होते. त्यानेच त्यांचे रक्षण झाले अशी त्यांना खात्री आहे.

मला तरी हे सगळे योगायोग वाटतात, बरेचसे योगायोग आपल्याला वाटते तेवढे दुर्मिळ नसतात, त्यांची शक्यता बरीच मोठी असते हे मी या लेखात संख्याशास्त्रामधून दाखवले आहे.
योगायोगांचे संख्याशास्त्र
https://anandghare2.wordpress.com/2010/07/29/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/

तरीसुद्धा इतके योगायोग कसे जुळून आले असा प्रश्नही पडतो.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: