प्राचीन काळातील भारताची विज्ञानामधील प्रगति

महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ या विषयावरील एक चित्रमय लेख सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी ई मेल्सवर फिरत होता. त्या वेळी मी आंतर्जालावर थोडे उत्खनन करून सहजपणे मिळेल तेवढी माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारावर थोर भारतीय शास्त्रज्ञ या नावाची एक लेखमाला प्रकाशित केली होती.
https://anandghare2.wordpress.com/2011/07/

मला त्यानंतरच्या काळात या विषयावरील अनेक लेख आणि साधक बाधक चर्चा वाचायला मिळाली. पुण्यात भरलेल्या आंतरराष्ट्रीय वेद विज्ञान परिषदेच्या प्रदर्शनाला भेट देऊन तिथून आणखी काही माहिती आणि चित्रे मिळवली. याच सुमारास मला शिक्षण विवेक या मासिकासाठी एक लेख लिहिण्याबद्दल विचारणा करण्यात आली. या दृष्टीने माझी तयारी सुरू असल्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला आणि हा लेख लिहून दिला. मी तयार केलेली सर्व चित्रे त्या मासिकामध्ये जागेअभावी दिली गेली नव्हती. मी या अनुदिनीमध्ये त्यांचा समावेशसुध्दा केला आहे. त्यामधून माझ्या लेखाचा विषय अधिक स्पष्ट होऊ शकेल.

ओळख प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची

प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. तिच्या प्रगतीला असंख्य विद्वानांनी हातभार लावला होता, त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची नोंद आता उपलब्ध नाही. काही शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ किंवा संहिता त्यांच्या नावानिशी माहीत आहेत. प्राचीन भारतीयांनी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन त्यानंतर या थोर शास्त्रज्ञांची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न या लेखात मी केला आहे. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून दाखवले होते. कोणाही भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे ते शास्त्रज्ञ होते.

आपले पूर्वज सोने, चांदी, लोखंड, तांबे आणि त्यांचे मिश्रधातू यांचा उपयोग करत होते. हे धातू तयार करण्यामध्ये खाणकाम (Mining), रसायनशास्त्र (Chemistry) आणि धातुविज्ञान (Metallurgy) या विद्यांचा भरपूर विकास प्राचीन भारतामध्ये झाला होता. अनेक प्रकारच्या रासायनिक क्षारांची निर्मिती करायच्या प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी उपकरणे त्यांनी विकसित केली होती. प्राणी आणि वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्यांचा उपयोग करण्याची शास्त्रे त्यांनी लिहिली होती. खगोलशास्त्रामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते आणि त्यासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक होतेच. शरीर आणि मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली आयुर्वेद आणि योग ही शास्त्रे आजही अत्यंत उपयुक्त आहेत. वास्तुशास्त्रामध्ये घरे, मंदिरे इत्यादि बांधण्यासाठी स्थापत्यशास्त्राचे नियम तयार केले. त्यांच्या आधारे बांधलेली भव्य प्राचीन मंदिरे त्याची साक्ष देतात. संस्कृत ही जगातली सर्वात जुनी अशी व्याकरणबध्द आणि अद्भुत भाषा आहे. तिच्यात विशाल शब्दभांडार आहेच, शिवाय कालमानानुसार नवनवे अर्थपूर्ण शब्द निर्माण करायची क्षमता आहे.

आचार्य चरक यांना वैद्यकीय शास्त्राचे जनक आणि आचार्य शुश्रुत यांना शल्यचिकित्सेचे जनक मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता हे आयुर्वेदाचे पायाभूत ग्रंथ आहेत. आजचे वैद्यराजही त्यांच्या आधारे चिकित्सा आणि उपचार करतात. चरकमहर्षींनी व्याधींचा प्रतिबंध, निदान आणि निवारण या तीन्हीबद्दल लिहिले आहे. रोगावर उपाय करण्यापेक्षा तो न होऊ देणेच अधिक चांगले “Prevention is better than cure” हे तत्व त्यांनी सांगितले होते. शरीरामधील कफवातपित्त हे त्रिदोष, रक्त, मांस, मज्जा, अस्थि वगैरे सप्तधातु, अन्न आणि औषधे यांचा त्यांचेवर होणारा परिणाम ही आयुर्वेदाची मूळ तत्वे त्यांनी सांगितली. शरीरपरीक्षा, मानसपरीक्षा आणि सारासारतत्व अशा रोगाचे निदान करण्याच्या पध्दती, त्यावर करण्याचे उपचार, वनस्पतीजन्य आणि रासायनिक औषधे वगैरे सर्वांबद्दल त्यांनी लिहिले. सुश्रुतमहर्षीं हे अत्यंत कुशल असे शल्यविशारद (सर्जन) होते. निरनिराळ्या शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त अशा खास प्रकारच्या सुया, चिमटे आणि चाकू आदि हत्यारे त्यांनी तयार करून घेतली होती. हाडे, त्वचा (प्लॅस्टिक सर्जरी) आणि डोळे (मोतीबिंदू) वगैरेंच्या शस्त्रक्रियांसंबंधी सविस्तर माहिती त्यांच्या संहितांमध्ये दिली आहे. आज अधिक चांगल्या आधुनिक सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे सश्रुतसंहितेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, पण आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले जातात. सुश्रुतसंहितेमध्ये शल्यचिकित्सेशिवाय आयुर्वेदासंबंधी पुष्कळ माहिती आहे. शेकडो प्रकारचे रोग, औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारची प्राणीजन्य व रासायनिक औषधे यांची माहिती त्यात आहे. महर्षी पतंजलि यांनी शरीर आणि मन निकोप आणि सुदृढ करण्यासाठी अष्टांग योग सांगितले होते. त्यामधील योगासने आणि प्राणायाम आज जगभरात लोकप्रिय झाले आहेत आणि कोट्यावधि लोक त्याचा लाभ घेत आहेत.

आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि महान शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्र व गणितशास्त्रामध्ये फार मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्या ग्रंथांवर इतर विद्वानांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या, तसेच त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. आर्यभटांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती या सर्वांमध्ये आपली छाप उमटवली. त्यांनी शून्याची कल्पना मांडली, ( पहा शून्याचा शोध) बीजगणितामधील समीकरणे सोडवली, पाय (π) या आकड्याचे ३.१४१६ इतके अचूक मूल्य काढले, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगितले आणि ज्या, कोज्या (साइन, कोसाइन) यांची संकल्पना मांडून त्यांची कोष्टके तयार केली. आर्यभटांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शंकुयंत्र, छायायंत्र, धनुर्यंत्र, चक्रयंत्र, छत्रयंत्र यासारखी विविध उपकरणे तयार केली आणि त्यांचा उपयोग करून आकाशातील ग्रहताऱ्यांची अत्यंत सूक्ष्म अशी निरीक्षणे केली. पृथ्वी गोलाकार असून तिचा परीघ किती आहे आणि ती स्वतःभोवती फिरते असे सांगितले, सूर्य आणि चंद्रग्रहणे कशामुळे होतात त्याचा शोध लावला आणि ती कधी व केंव्हा होतात याचे अचूक गणित मांडले. पंचांग तयार करण्यासाठी आर्यभट, भास्कराचार्य आदींनी दिलेल्या खगोलशास्त्रीय गणिताचा उपयोग शतकानुशतके होत राहिला.

वराहमिहिर यांनी विपुल ग्रंथरचना करून आर्यभटादि शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन पुढे नेले. गणिताच्या ज्ञानात स्वतःची भर घातलीच, प्रकाशाचे परावर्तन कसे होते यावर विचार मांडले. जमीनीवरील सर्व वस्तूंना जमीनीशी जखडून ठेवणारी एक अद्भुत शक्ती आहे असे प्रतिपादन करून एका अर्थी गुरुत्वाकर्षणाचे सूतोवाच केले. ब्रह्मगुप्त यांनीही गणितावर खूप महत्वाचे संशोधन केले. त्यांनी इतर आंकड्यांची शून्याबरोबर बेरीज, वजाबाकी व गुणाकार करण्याचे नियम सांगितले. ऋणसंख्या ही नवी संकल्पना मांडली. त्यानंतर अंकगणिताचे स्वरूपच बदलून गेले. ब्रह्मगुप्त यांनी भूमितीमधील आकारांची क्षेत्रफळे आणि बीजगणितामधील समीकरणांची उत्तरे काढण्याची सूत्रे मांडली. या तीन शास्त्रज्ञांच्या काळानंतर सुमारे चारपाचशे वर्षांनी द्वितीय भास्कराचार्य हे अद्वितीय शास्त्रज्ञ होऊन गेले. सामान्य बुद्धीच्या गणकांना बोधकर होईल आणि चतुर व ज्ञानी गणकांच्या मनात प्रीती उत्पन्न करेल असा ‘सिद्धान्तशिरोमणी’ हा ग्रंथ या भास्कराचार्यानी लिहिला. त्यात लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय असे चार भाग आहेत. त्याशिवाय त्यांनी आणखी काही विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतात. चंद्रावर पंधरा पंधरा दिवसांचे दिवसरात्री असतात, हे भास्कराचार्याना माहीत होते. ग्रहांचे भ्रमणकाळ आणि त्यांच्या दैनंदिन गती यांच्या अचूक किंमती त्यांनी काढल्या. ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांची तात्कालिक गती काढण्यासाठी कॅलक्युलससारखे सूत्र वापरावे लागते ते त्यांनी तेव्हा वापरले होते. भास्कराचार्य केवळ सैद्धांतिक खगोलशास्त्रज्ञ नव्हते तर ते उत्तम आकाश निरीक्षक होते.

या शास्त्रज्ञांखेरीज कणाद मुनि आणि नागार्जुन यांची नांवेही आदराने घेतली जातात. जगामधील सर्व पदार्थ सूक्ष्म अशा कणांमधून बनले आहेत असे प्रतिपादन कणाद मुनींनी केले होते. नागार्जुनांनी रसायनशास्त्राचे खूप प्रयोग केले. त्यांना अपेक्षित होते त्याप्रमाणे हिणकस धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करता आले नाही, पण त्या प्रयत्नात त्यांनी तसे चमकणारे अनेक नवे मिश्रधातु तयार केले आणि अनेक प्रकारची रासायने व रासायनिक क्रियांसाठी लागणारी विशेष उपकरणे तयार करून घेतली. या रसायनांचा उपयोग धातुशास्त्र आणि औषधांसाठीसुध्दा केला जात असे. बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे कांही ग्रंथ उजेडात आले, बरेचसे नष्ट झाले. आज जेवढी माहिती सहज उपलब्ध आहे त्यावरून त्यांच्या कार्याचा फक्त अंदाज घेता येतो.

या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली सगळी ग्रंथरचना संस्कृत भाषेत काव्यबध्द केली आहे. त्या प्रयत्नात शास्त्रीय माहितीचा नेमकेपणा रहात नाही आणि ती समजणे कठीण होते. शिवाय संस्कृत भाषेमधील पंडितांना विज्ञान माहीत नसते आणि विज्ञान शिकलेल्यांना संस्कृत भाषा समजत नाही, कालमानानुसार आणि संदर्भाप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात अशा अनेक अडचणी आहेत. प्राचीन काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे सिध्दांत मिळतात, पण त्यांची सिध्दता नाही, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘फॉर्म्युले’ मिळतात पण त्यांचे ‘डेरिव्हेशन’ मिळत नाही. यामुळे ते संशोधन आज प्रचलित असलेल्या वैज्ञानिक पध्दतीनुसार स्पष्ट होत नाही. तरीही सारांशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

यावर आपले मत नोंदवा