आनंदघन
जानेवारी २००६ मध्ये हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्या वेळी ते तसेही अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची एकूण संख्या शंभराच्या आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. त्याआधी मी आंतरजालावर एकंदरीतच जेमतेम दहा बारा ब्लॉग्ज वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्यामधील एकादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व ब्लॉग्जची शीर्षके निरर्थक तरी होती किंवा अनाकलनीय ! त्यामुळे मी तरी त्या नावांकडे एकेक खुणेचे दगड याहून अधिक लक्ष दिलेच नाही.
माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. आधी सगळे सोपस्कार तर होऊन जाऊ देत, ब्लॉगची सुरुवात तर होऊ दे, नंतर कधी तरी वाटल्यास नांव बदलून घेऊ असा विचार त्या क्षणी माझ्या मनात होता. पण नंतर मला कधी तसे करावेसे वाटलेच नाही कारण आनंदघन हेच नांव चांगले वाटायला लागले होते.
आनंदघन या शब्दाचा अर्थ काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे घनदाट आनंद, आनंद बरसणारा मेघ असा कांही तरी तो असणार. गणित विषयात ज्यांना गोडी वाटते ते त्याचा अर्थ आनंद गुणिले आनंद गुणिले आनंद अशी बीजगणितातील व्याख्या किंवा भूमितीमधील आनंदाचे त्रिमिति रूप असा काढू शकतील. आनंदघन म्हणजे आनंदाचा अर्क किंवा निर्भेळ आनंद असे परमेश्वराचे वर्णन आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केले आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्या खाली दिल्या आहेत.
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥
भारतरत्न लता मंगेशकर यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी स्व.भालजी पेंढारकरांच्या कांही मराठी चित्रपटांना अत्यंत मधुर असे संगीत देतांना संगीत दिग्दर्शक म्हणून आनंदघन हे नांव घारण केले होते. त्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांसोबत हे नांवसुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडावर झाले होते. अशा या नांवाचा उपयोग मी करू शकतो कां व ते कितपत योग्य आहे असे प्रश्न मनात येत होते. त्यावर मला असे वाटले होते की लता, आशा, मीना व उषा ही मंगेशकर भगिनींची नांवे धारण करणाऱ्या लक्षावधी स्त्रिया महाराष्ट्रात दिसतील. प्रसिद्ध व्यक्तींचे नांव आपल्या मुलाला ठेवण्याची आपल्याकडे पद्धतच आहे. तर मग मी आपल्या नवजात ब्लॉग बाळाला आनंदघन हे नांव ठेवणे तसे रूढीला धरूनच नाही का ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काळांत पूजनीय लतादीदी आनंदघन या नांवाने चित्रपटसंगीत देत होत्या, तेंव्हासुद्धा एक आघाडीची गायिका व एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्या लता मंगेशकर या मूळच्या नांवानेच प्रसिद्ध होत्या. गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी आनंदघन या नांवाने कांही कार्य केले असल्याचे मी तरी ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या टोपणनांवाचा उपयोग करून मला कांही फायदा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, किंवा त्यांच्या नांवावर मी आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही कुणाला वाटायला नको. या सगळ्या कारणांनी मी आनंदघन हेच नांव चालू ठेवले. आता सोळा वर्षे होऊन गेली तरी माझा हा ब्लॉग याच नावाने चालला आहे आणि पाच लाखांवर वाचकांनी त्याला भेटी दिल्या आहेत.
आनंदघन https://anandghan.blogspot.com/ हा ब्लॉग लिहिण्यामागील माझा मूळ उद्देश आधी नाविन्याचा आनंद मिळवणे हा होता आणि नाविन्य संपल्यानंतर निर्मितीचा आनंद मिळवणे हा होता. त्याचप्रमाणे तो वाचणाऱ्या लोकांनाही त्यापासून आनंद मिळणे आवश्यक आहे. तसाच माझा प्रयत्न अजूनही सुरू आहे.

निवडक आनंदघन
मी आनंदघन या ब्लॉगची सुरुवात ब्लॉगस्पॉटवर केली होती, पण याहू ३६० नावाच्या एका नव्या स्थळावर अधिक सुविधा होत्या म्हणून मी हा ब्लॉग याच नावाने तिथे लिहायला लागलो होतो. पण काही काळानंतर ते स्थळच बंद पडले आणि ब्लॉगस्पॉटची मालकी बदलून ती गूगलकडे गेली तरी ते स्थळ मात्र चालू राहिले, म्हणून मी या ब्लॉगचे पुनरुज्जीवन केले आणि तिकडचे बरेचसे लेख इथे पुनःप्रसारित केले. त्यानंतर मला वर्डप्रेस या आणखी एका नव्या स्थळाची माहिती मिळाली आणि त्यांची मांडणी अधिक आकर्षक वाटली. यदाकदाचित ब्लॉगरनेही आपले धोरण बदलले आणि तिथली ब्लॉगची सुविधा अडचणीत आली तर आपले लिखाण आंतरजालावर कुठे तरी उपलब्ध असावे अशा विचाराने मी वर्डप्रेसवर ‘निवडक आनंदघन’ हा वेगळा ब्लॉग सुरू केला. आनंदघन या मूळ ब्लॉगमधले मला स्वतःला जास्त पसंत पडलेले लेख पुन्हा वाचून आणि त्यात काही सुधारणा करून मी ते लेख या स्थळावर देत आलो आहे. वाचकांनी माझ्या या उपक्रमालाही भरघोस पाठिंबा दिला आणि या स्थळाला भेटी देणाऱ्या वाचकांची संख्याही आता तीन लाखांवर गेली आहे याचे मला समाधान आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार.
प्रतिक्रिया व्यक्त करा