ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

देव आणि दैव यावरील वादविवाद किंवा संवाद अनंत काळापासून चालत आले आहेत आणि दोन्ही बाजूंनी सबळ पुरावे आणि मुद्दे मांडले जातात. माणसाच्या जीवनात त्याला मिळणारे किंवा न मिळणारे शिक्षण, यश, सुख, दुःख, संपत्ति, विपत्ति वगैरे सगळे काही कोणी ब्रह्मदेव आधीच ठरवतो किंवा सटवाई देवी त्याच्या कपाळावर लिहून ठेवते आणि ते सगळे वेळेनुसार तसेच होत जाते अशी पारंपरिक श्रद्धा आहे. ती सगळी त्याच्याच या किंवा पूर्वीच्या जन्मामधील कर्मांची फळे असतात असे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात सांगितले जाते. देव सगळे बघत असतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे घटना घडत असतात असे इतर धर्मीयसुद्धा मानतात. पण यात खूप विसंगति दिसतात आणि हे तर्कसंगत तर वाटतच नाही, त्यामुळे हे बुद्धीला पटत नाही. पण कधी कधी संख्याशास्त्रात बसणार नाहीत इतके योगायोग जुळून येतात. त्यामुळे देवावर आणि नशीबावर विश्वास बसावा असे वाटते. मी निरनिराळ्या काळात या विषयावर लिहिलेले तीन लेख एकत्र करून प्रस्तुत केले आहेत. यात प्रामुख्याने मला आलेले अनुभव त्या त्या वेळीच लिहून काढलेले आहेत.

१. विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद

Tuesday, November 22, 2011

विज्ञानाच्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. “देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।” अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा “धर्म ही अफूची गोळी आहे.” असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानात देवाला स्थान नाही, पण कदाचित प्रारब्धाला असावे.

विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. “हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत” अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.

अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव ‘अणुशक्तीनगर’ असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणाऱ्या अनेक विद्वानांबरोबर माझा व्यक्तीगत परिचय झाला, मला अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

आपण ‘निधर्मी’ आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न मानणारे इतरधर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने त्यांच्या ईश्वराची प्रार्थना करीत. त्यासाठी त्यांनी आपापली वेगळी प्रार्थनास्थळे बांधली होती आणि तिथे विशिष्ट दिवशी ते मोठ्या संख्येने जमत असत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.

कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात कधीही येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.

वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच ‘विज्ञान’ आणि ‘ईश्वर’ या एकमेकांच्या विरोधी ‘म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह’ संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, “आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला ‘काँन्स्टंट’ हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे …” थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.

माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते सगळे एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते.

आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी “मी इलाज करतो, ‘तो’ बरे करतो (आय ट्रीट, ‘ही’ क्युअर्स)” असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, “कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही.” आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, “हे सगळे ‘तो’ ठरवतो.” त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.

गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी खाली दिलेल्या एका लेखात केले आहे. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची (‘नियर मिस्’ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. ‘त्या’चे कार्यक्षेत्र ‘संकटमोचन’ एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी ‘त्या’च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे.

मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. “हे आपले नाही, परक्याचे आहे” असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुसऱ्यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुसऱ्याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही.

शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. मला स्वतःलासुध्दा हा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणाऱ्या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणाऱ्या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभरही शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. ‘पॉझिटिव्ह’ किंवा ‘निगेटिव्ह व्हायब्रेशन्स’, ‘आत्मिक’ किंवा ‘प्राणिक’ प्रकारची ‘कॉस्मिक एनर्जी’ असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. ‘सिध्दीं’द्वारे तो ‘छूमंतर’ करणाऱ्यांकडे जात नाही. पुराणातील ‘सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां’ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तरच त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुसऱ्या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल.



२. ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

… Friday, November 18, 2011

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे.

सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.

असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुसऱ्या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.

प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.

जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुसऱ्याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.

पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.

आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात फार काही विशेष नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.

मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!


३. देव तारी ……. मला

Friday, May 08, 2015
भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा “अरे देवा (ओ माय गॉड)”, “देव जाणे (गॉड नोज)” असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच ‘देव आठवतो’ असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. “शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?” असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. “असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो.” असे उद्गार काढले गेलेच.

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, “या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर.” तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. “अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत.” एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.

हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.


४. योगायोग की भाग्य?

Thursday, August 07, 2008

दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच “भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला.” अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले, तसेच स्वतःचाच थोडा रागही आला.

पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून “हॅपी बर्थडे टू यू” म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्या मुलाचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला.

शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शाळेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती! मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे सहसा कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली.

लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नवऱ्याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल? आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही.

पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली.

खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्याच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते.

मीच लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे ‘सत्याचे प्रयोग’!

माझा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी जन्माला आलेली मोहन सहस्रबुद्धे नावाची आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली हा आणखी एक योगायोग. जुळ्या भावंडांचा जन्म एकाच दिवशी झालेला असतो. त्यांना सोडूनही शाळेतल्या वर्गात एकच जन्मतारीख असलेली दोन मुले असण्याची शक्यता असते, पण माझ्या बाबतीत तसे काही झाले नाही. शाळा, कॉलेज किंवा नोकरीतले समवयस्क सहकारी यातला कोणीच नेमका माझ्याच जन्मतारखेला जन्माला आलेला नव्हता, पण पत्नीच्या दूरच्या नात्यातला हा मोहन मला योगायोगाने कुठेतरी भेटला, आमचे जन्मतारखेबद्दल बोलणे झाले आणि त्यातून हा योगायोग दोघांना समजला. पण आमचे भाग्य किंवा आयुष्य यात फारशी साम्यस्थळे नव्हती. त्यामुळेही माझा ज्योतिषशाास्त्रावर मात्र कधीच विश्वास बसला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: