सिंहगड रोड – धायरी

मी २०१५ मध्ये मुंबई आणि नवी मुंबईला कायमचा रामराम ठोकून पुण्याला आलो तेंव्हा सिंहगड रस्त्यावरील धायरी इथे रहायला आलो होतो आणि तीन वर्षे तिथे राहिलो. तिथे मुक्काम असतांना सिंहगड रोडसंबंधातल्या माझ्या सगळ्या जुन्या व नव्या आठवणी मी सहा भागांमध्ये लिहिल्या होत्या. ते सगळे भाग एकत्र करून इथे देत आहे.

सिंहगड रोड – भाग १

माझ्या ब्लॉगमध्ये मी स्वतः असतोच. त्यामुळे सिंहगड रोड हा ब्लॉगसुध्दा ‘सिंहगड रोड आणि मी’ असाच असणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या रस्त्याचा इतिहास, भूगोल वगैरेसंबंधी माहिती न सांगता हा रस्ता माझ्या जीवनात कसा येत गेला त्याचा हा वृत्तांत आहे.

आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी या लहान गावात माझे बालपण गेले. माझ्या लहानपणी मी बेळगाव, सांगली, कोल्हापूर यासारखी जवळची शहरे सुध्दा कधी पाहिली नाहीत, त्यामुळे पुणे तर माझ्या दृष्टीने खूपच दूर होते. साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि त्या लहान गावात जी पुस्तके किंवा मासिके माझ्या वाचनात येत होती त्यातल्या चोरून वाचलेल्या अनेक कथाकादंबऱ्यांमधली मुख्य पात्रे पुण्यात रहात आणि पर्वती, पेशवे पार्क, तळ्यातला गणपती वगैरे परिसरामध्ये घुटमळत असत. पुढे तयार झालेल्या सारसबाग नावाच्या सुंदर उद्यानाने त्यामधील प्रेमी युगलांसाठी निवांत आडोशांची सोय केली. अशा प्रकारे गणपती आणि पर्वती या धार्मिक स्थानांना एक वेगळे रोमँटिक आणि गूढ असे वलय प्राप्त झाले होते. त्या काळात पुण्यावरचा कोणताही लेख पर्वतीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता. पुण्याहून आमच्याकडे आलेल्या किंवा पुण्याला जाऊन आलेल्या लोकांच्या बोलण्यामध्ये या ना त्या निमित्याने पर्वतीचा उल्लेख हमखास येत असेच. या सगळ्यांमुळे माझ्या वाचनामधून आणि मोठ्या लोकांच्या बोलण्यातून पर्वती हे आणखी एक नाव माझ्या मनःपटलावर कोरले गेले होते.

मी कॉलेजला गेल्यानंतर पुण्याला पहिली भेट दिली. तेंव्हा मला पर्वती पहायची तीव्र इच्छा असल्याचे तिथे असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सांगितले आणि त्यानेही ती लगेच पूर्ण केली. आम्ही दोघे बसने प्रवास करून टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या समोरच्या बसस्टॉपवर उतरलो आणि त्या कॉलेजच्या कुंपणाला लागून असलेल्या रस्त्याने चालत चालत पर्वतीच्या टेकडीवर गेलो. वाटेत लागलेल्या इमारतींमधल्या संस्था, बंगल्यांमध्ये राहणारी मोठी माणसे, वगैरेंबद्दल सांगत असतांनाच माझा भाऊ वाटेत लागणाऱ्या रस्त्यांचीही थोडी माहिती देत होता. ती बहुतेक नावे मी पहिल्यांदाच ऐकत असल्यामुळे मला त्यामधून फारसा बोध होत नव्हता आणि ती लक्षात राहणे तर कठीणच होते, पण त्यातले एक नाव ऐकताच मी क्षणभर थबकून तिथेच उभा राहिलो कारण ते नाव माझ्या मनात आधीपासून रुतून बसलेले होते.

“हा रस्ता सिंहगडाकडे जातो.” असे त्याने सांगताच शिवाजी महाराजांचे किल्ले सह्याद्री पर्वतावर होते ही इतिहासातली पुस्तकी माहिती मला आठवली आणि मी लगेच बोलून दाखवली.
“बरोबर आहे, पण सह्याद्रीच्या रांगा तर पुण्यापासूनच सुरू होतात. त्यातला सिंहगड हा जवळचा किल्ला इथून अंदाजे पंधरा मैलांवर (चोवीस किलोमीटर्सवर) असेल.” त्याने सांगितले. म्हणूनच तर राजमाता जिजाबाईं यांना तो कोंढाणा किल्ला त्यांच्या लालमहालामधून दिसला आणि तो काबीज करून आणण्याची आज्ञा त्यांनी राजांना दिली हे ही मला आठवले.
“म्हणजे हा रस्ता सुध्दा चारशे वर्षांपूर्वी बांधला आहे ! सगळ्याच किल्ल्याकडे जाण्यासाठी असे रस्ते पण बांधले होते का?”
माझी जिज्ञासा संपत नव्हती, पण आता माझ्या सर्वज्ञ भावाने हात टेकले.
“ते माहीत नाही रे, मुठा नदीच्या कांठावर वसलेल्या लहान लहान गांवांना जोडत हा रस्ता खडकवासल्याला जातो. तिथे एक मोठे धरण आहे, तसेच मिलिटरीचे कॉलेज (एनडीए), एक मोठे संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणखी काही काही आहे. कदाचित त्यासाठी इंग्रजांच्या काळातच हा पक्का रस्ता बांधला गेला असेल. तिथून पुढे डोंगरातल्या इतर गांवांकडे जाणारे निरनिराळे साधे रस्ते आहेत, त्यातला एक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवापर्यंत जातो.”
त्यावेळी या विषयावरचे आमचे बोलणे एवढ्यावरच संपले असावे, मला त्यातले इतर काहीच आठवत नाही. सिंहगड आणि पर्वती ही मनावर कोरलेली दोन नावे असलेली ठिकाणे एकमेकांना रस्त्याने जोडलेली आहेत एवढे मात्र लक्षात राहिले. जाता जाता मी त्या रस्त्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.
एकाद्या मोठ्या गावाबाहेर गेल्यावर आजूबाजूच्या खेड्यांकडे जाणारे रस्ते, त्यांच्या बाजूला लावलेल्या झाडांमधून डोकावणारी घरे, देवळे, रस्त्यावरून अधून मधून जाणारी एकाददुसरी वाहने, सायकलीवरून किंवा चालत जाणारे पाचदहा वाटसरू वगैरेंची आठवण करून देणारा असा तो रस्ता त्या काळात होता. फक्त त्यावर गुरेढोरे आणि बैलगाड्या दिसत नव्हत्या किंवा बैलगाड्यांच्या चाकोऱ्या पडलेल्या नव्हत्या एवढेच.

इंजिनियरिंगच्या अभ्यासात आकंठ बुडून गेल्यावर मला डोके वर करायलाही उसंत मिळत नव्हती आणि शिक्षण संपल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईला गेलो. त्यामुळे स.प.महाविद्यालयाच्या बाजूने जाणाऱ्या त्या रस्त्याने मी पुनः कधीच पर्वतीवर चालत गेलो नाही. त्यामुळे वाटेत लागलेला सिंहगडचा रस्तासुध्दा मला नेमका कुठे दिसला होता हे मी नंतर विसरून गेलो.

सिंहगड रोड – भाग २

मी पुण्याला कॉलेजात असतांना लकडी पुलापासून सुरू होणारा डेक्कन जिमखाना हा त्या मानाने शहरातला आधुनिक भाग समजला जात होता. त्या काळातले मुख्य पुणे शहर तिथूनच सुरू होत होते. कर्वे रोडवरील आयुर्वेद रसशाळा जवळ जवळ गावाच्या हद्दीवर होती. पुढे काही ठिकाणी तुरळक वस्ती दिसत होती, पण त्या काळात मला कधीच तिकडे जायची गरज पडली नाही. मी नोकरीला लागल्यानंतर अनेक वेळा पुण्याला येऊन जात असे. तेंव्हा माझी ऑफीसची बहुतेक कामे उपनगरांमधल्या कुठकुठल्या कारखान्यात असायची आणि माझे बहुतेक सगळे नातेवाईक शहराच्या जुन्या भागातल्या पेठांमध्ये रहात असत. यामुळे माझा पुण्यातला संचार तेवढ्या भागातच होत असे. तरीसुध्दा पुणे शहर सर्व बाजूंनी कसे पसरत चालले होते याची माहिती मला बोलण्यामधून मिळत होतीच.

ज्या लोकांनी पूर्वीचे जुने वाडे किंवा चाळी यामधल्या एक दोन खोल्यांमध्ये संसार थाटले होते त्या लोकांच्या पुढल्या पिढ्या कोथरूड, एरंडवणे, पौड रोड, कर्वेनगर वगैरे भागांमध्ये सेल्फकन्टेन्ड फ्लॅट्समध्ये रहायला जात होत्या किंवा सातारा रोडवरील बिबवेवाडी, पद्मावती, सहकारनगर यासारख्या भागांमध्ये स्थलांतर करत होत्या. नव्याने पुण्यात येणारे मध्यमवर्गीय लोकसुध्दा याच भागात घरे पहात होते किंवा त्यांना तिकडेच मनासारख्या जागा मिळत होत्या. यामुळे पुढील दोन तीन दशकांच्या काळात माझ्या परिचयातली बरीचशी मंडळी या दोन भागात रहायला लागली. थोडक्यात म्हणजे मुठा नदीच्या डाव्या तीरावरील भागामध्ये आणि दक्षिणेला सातारा रोडवर होत असलेल्या शहराच्या विस्तारात नवनव्या वस्त्यांमध्ये भर पडत होती. या विस्ताराची खबर मला मिळत होती आणि या ना त्या निमित्याने मला कधीकधी तिकडे जावेही लागत होते. पण या दोन भागांच्या बेचक्यातल्या म्हणजे मुठा नदीच्या उजव्या तीरावरील भागाचा कसा विकास होत होता याचा मात्र बरीच वर्षे मला पत्ता ही नव्हता. किंबहुना माझ्या लेखी तो भाग अस्तित्वातच नव्हता. सिंहगडाकडे जाणारा रस्ता त्या भागातून जातो किंवा तो एक मोठा हमरस्ता होत होता हे ही मला समजले नव्हते. मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) सुरू झाला तेंव्हा तो वाकडपासून कात्रजपर्यंत ओसाड भागातून जात होता, पण एकवीसाव्या शतकात मात्र वाकड, हिंजवडी, बालेवाडी, बाणेर, बावधान, वारजे वगैरे खूप मोठा पट्टा झपाट्याने विकसत गेला आणि त्याचा वेग वाढतच आहे. पूर्वीच्या काळात त्यांच्या तुलनेत सिंहगड रोडला तितके प्राधान्य मिळाले नाही असे वाटते.

एकोणीसशे नव्वद पंच्याण्णऊच्या सुमाराला एके दिवशी माझा मुंबईतच राहणारा एक आतेभाऊ मला भेटायला आला आणि त्याने बोलताबोलता मला एक लहानसा धक्का दिला. त्याने पुण्याजवळच्या कुठल्याशा बुद्रुक किंवा खुर्दमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता म्हणे. ते नवराबायको दोघेही मुंबई महापालिकेत नोकरीला असल्यामुळे तिथे चांगले स्थायिक झालेले होते आणि त्यांना रिटायर व्हायला निदान पंचवीस वर्षे अवकाश होता. त्यामुळे त्यांनी आताच असल्या खेड्यात घर का घेतले याचे मला सहाजिकच आश्चर्य वाटले. किंचित हेटाळणीच्या स्वरातच मी त्याला विचारलं, “काय रे, तुझं हे बुद्रुक नेमके कुठं आहे?”
त्याने अत्यंत अभिमानाने सांगितलं. “सिंहगड रोडवर.”
“काय?” मी ताड्कन उडालो. थोडासा सांवरून त्याला विचारलं “म्हणजे तू एकदम मावळ्यांच्या वस्तीत रहायला जाणार ? शेला, पागोटं वगैरे घेऊन ठेवलं असशील ना!” त्याचे ते बुद्रुक सिंहगडाच्या अगदी पायथ्यापाशी असावे असेच मला वाटले होते. तोंपर्यंत मी सिंहगडही पाहिला नव्हता, फक्त ह.ना.आपट्यांच्या कादंबरीतले त्याचे वर्णन वाचले होते.
“नाही रे, सिंहगड रोड पुण्यातच आहे.” त्याने मला नसलेली माहिती दिली. मला तीस वर्षांपूर्वी पाहिलेला सिंहगडकडे जाणारा लहानसा रस्ता आठवला.
“अरे व्वा ! तो गावाबाहेरचा जुना खेडवळ रस्ता सिंहगड रोड कधी झाला?” मी विचारले.
आता मात्र त्याला बोलायची संधी मिळाली. “म्हणजे तुला एवढं सुध्दा माहीत नाही? अरे सिंहगड रोड कसला पॉश रोड आहे! आपल्या चेंबूरमध्येसुध्दा असला रस्ता नाही.” कदाचित त्या काळात नसेलही.
“खरंच ? मला येऊन पहायलाच हवं.” मी म्हणालो.
“पुढच्या आठवड्यात आम्ही सगळ्या जवळच्या नातेवाइकांसाठी तिथे एक कार्यक्रम ठेवला आहे ते सांगायलाच मी आलो होतो. अर्थातच तुम्हालाही यायचे आहेच. तुम्ही सगळे येणार ना ?”
“हो, नक्की येणार.”

असे मी सांगितले खरे आणि मला जायची इच्छाही होती, पण आयत्या वेळी काही अडचण आल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. माझ्या त्या आत्तेभावाला तिथे प्रत्यक्षात रहायला जायचे नव्हतेच, त्याने फक्त गुंतवणूक म्हणून तो विकत घेऊन ठेवला होता. त्या फ्लॅटचे पुढे काय झाले कोण जाणे, पण मला काही तो पहाण्याची आणि त्या निमित्याने सिंहगड रोडचे नवे रूप पाहण्याची संधी मिळाली नाही. त्याने तो फ्लॅट बहुधा विकून टाकला असावा. मी धायरीला रहायला आलो तोवर तो आत्तेभाऊ स्वर्गवासी झाला होता आणि त्याच्या कुटुंबातले कोणीही तिथे कधीच आले नाही.

सिंहगड रोड – भाग ३

त्या गोष्टीनंतर आणखी दहापंधरा वर्षांच्या काळात माझ्या माहितीतली काही कुटुंबे सिंहगड रोडवरील आनंदनगर, वडगांव, धायरी वगैरे भागात रहायला गेली असे ऐकले किंवा तिकडे रहात असलेल्या काही लोकांशी माझा नव्याने परिचय झाला. मी त्यांना प्रत्यक्ष भेटायला तिकडे गेलो नाही, पण त्यांच्या बोलण्यातून तो परिसर माझ्या ओळखीचा व्हायला लागला. वीसबावीस वर्षांपूर्वी मला आमच्या अगदी जवळच्या आप्तांकडून एक आगळ्या स्वरूपाची लग्नाची आमंत्रणपत्रिका आली. त्या विवाहसोहळ्यात फारसे धार्मिक विधी नव्हते, मुहूर्ताची वेळसुध्दा दिलेली नव्हती. अमूक तारखेला सकाळपासून सर्वांनी एका ठिकाणी जमायचे, यजमान कुटुंबाला आणि एकमेकांना भेटायचे, वधुवरांना आशीर्वाद द्यायचे आणि खात पीत तो दिवसभर मजेत घालवायचा असा झकास कार्यक्रम होता. त्या अजब कार्यस्थळाचा पत्ता दिला होता ‘अभिरुचि कॉटेज रेस्टॉरेंट, भिडे बाग, वडगांव बुद्रुक, सिंहगड रोड’. आम्हाला तिथे जायलाच तर हवे होतेच, शिवाय हा एक नवा अनुभव, ती वेगळ्या प्रकारची लग्नसमारंभाची जागा आणि अजून न पाहिलेला सिंहगड रोड या सगळ्यांचे मला आकर्षण होते. आम्ही ठरल्याप्रमाणे पुण्याला जाऊन तिथला सिंहगड रोड गाठला आणि तो पहात पहात, विचारपूस करत वडगांवपर्यंत गेलो. तिथून पुढे जातांना आमची गाडी एका मोठ्या फ्लायओव्हरच्या खालून पलीकडे गेली. वरून जाणारा रस्ता म्हणजे मुंबईपुणे द्रुतगति महामार्गाचाच पुढे बंगलोरकडे जाणारा विस्तार होता असे समजले. तो महामार्ग कात्रजला जाऊन जुन्या सातारा रोडला मिळत होता. कात्रजच्या घाटाला टाळणारा (बायपास करणारा) नवा बोगदा त्यानंतरच्या काळात तयार झाला.

बंगलोर हायवे पार करून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरानंतर भिडे बाग आली. ते एक निसर्गसुंदर असे रिसॉर्ट होते. त्यात एकाद्या खेड्याचा देखावा तयार केला होता. खूप लहान मोठी झाडे होती, त्यांच्या आड एक दोन खोल्या असलेली लहानगी कॉटेजेस थोड्या थोड्या अंतरावर जराशी अस्ताव्यस्त वाटतील अशी बांधलेली होती, फुलझाडांचे अनेक ताटवे होते, त्यांना आणि झाडांना वळसे घालत वळणावळणाने जाणाऱ्या अरुंद पायवाटा होत्या. स्वादिष्ट खाण्यापिण्याची छानशी व्यवस्थादेखील मोठ्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या जागेत केली होती. त्या जागेतले एकंदर वातावरणच एकदम शांत आणि प्रसन्न होते. आपण एका महानगराच्या आसमंतात आहोत हे विसरायला लावणारे होते. व्यवस्थित निगा राखलेली निरनिराळ्या प्रकारची आणि आकारांची झाडे, त्यांची विविध आकाराची पाने, रंगीत सुंदर फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, मधूनच दिसणारे रंगीबेरंगी पक्षी, शांत वातावरणात स्पष्टपणे ऐकू येणारी त्यांची गोड किलबिल वगैरे सगळे काही आम्हा शहरवासियांसाठी विलक्षण होते.

पुण्यातल्या जुन्या काळातल्या पारंपरिक पध्दतीच्या सुप्रसिध्द मंगल कार्यालयांमधला गोंगाट, गर्दी आणि तिथे दरवळणारे वास किंवा धूर यांनी भरलेल्या कोंदट वातावरणापेक्षा हा खूप वेगळा अनुभव होता. आमच्यासाठी राखून ठेवलेल्या झोपडीमध्ये आमचे सामान ठेऊन आम्ही बाहेर पडलो, यजमान आणि वधूवरांना भेटून झाल्यावर इतर कोण कोण पाहुणे आले आहेत ते पहात आणि त्यांच्या गाठी भेटी घेत त्या विस्तीर्ण बागेतले निसर्गसौंदर्य न्याहाळत मनसोक्त फिरत राहिलो. आम्हाला ती निवांत जागा इतकी आवडली की एकादा दिवस आपल्या परिवारासह पिकनिकसाठी तिथे जायचे आणि मुक्तपणे फिरत वेळ घालवायचा असे ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो. त्या वेळी आम्ही मुंबईला परत गेलो आणि नंतर तो योग जुळून आला नाही, पण ती कल्पना मात्र मनात रुजून राहिली.

बारा वर्षांपूर्वी आमच्या विस्तारित परिवारातल्या म्हणजे चुलत, आते, मामे, मावस वगैरे जवळच्या नात्यातल्या सगळ्या लोकांनी लग्नमुंजीसारखे कुठलेही निमित्य नसतांना फक्त मौजमजा करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि दोन दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करत, गाणी गात, नाचत, खेळत घालवायचे असे ठरले. टेलीफोनवरूनच साठसत्तर लोकांनी तयारी दाखवली आणि हा आकडा शंभरावर जाण्यासाऱखा असल्याने तितक्या लोकांची एकत्र राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी निवांत जागा पाहणे आवश्यक होते. थोडी चौकशी केल्यावर खडकवासला धरणाच्या पलीकडे त्यासाठी एक योग्य स्थान सापडले आणि त्या शांतिवन रिसॉर्टचे दोन दिवसांसाठी फक्त आमच्या ग्रुपसाठी बुकिंग करून ठेवले. पुण्यात राहणाऱ्या काही लोकांनी कार पूलिंग करून आपापल्या गाड्यांनी आधी एका ठिकाणी जमायचे आणि सर्वांनी मिळून पुढे जायचे म्हणजे प्रत्येकाला ती आडवळणातली नवी जागा शोधत बसावे लागणार नाही असे विचारांती ठरवले.

मध्यंतरीच्या काळात मुठा नदी ओलांडून जाण्यासाठी राजाराम पूल बांधला गेला होता आणि तिथून म्हात्रे पुलापर्यंत नदीच्या काठाने चांगला प्रशस्त नवा रस्ता बांधला गेला होता. त्यामुळे कोथरूड, कर्वे नगर पासून औंध, पाषाण वगैरे सगळ्या भागांमध्ये रहात असलेल्या लोकांना सिंहगड रोडवरील बराचसा दाट वस्ती आणि रहदारीचा भाग टाळून थेट विठ्ठलवाडी गाठता येत होती. त्या भागांमधून येणारे आम्ही दहापंधराजण आधी ठरवून राजाराम पुलाच्या कर्वेनगरकडच्या टोकाला जमलो. पुलाच्या पलीकडे समोरच एक मोठा पहाड दिसत होता. त्यामुळे आपण आता नदी ओलांडली की लगेच गावाबाहेर पडून निसर्गाच्या कुशीत प्रवेश करणार असे वाटून मी खूष झालो होतो.

त्याप्रमाणे राजाराम पूल ओलांडून आम्ही सिंहगडरोडला लागलो, पण मला वाटले होते त्याप्रमाणे आम्ही अजून शहराबाहेर पडलो नव्हतो. समोर दिसणाऱ्या डोंगराला डाव्या बाजूला ठेऊन आम्ही तो डोंगर आणि मुठा नदी यांच्या मध्ये असलेल्या भागातून पुढे जात राहिलो. विठ्ठलवाडी, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी वगैरे वस्त्या एकामागून एक येत गेल्या. त्यात काही अगदी जुनी मातीची कौलारू किंवा पत्रे लावलेली घरे, काही दुमजली चाळी, काही टुमदार बंगले, कांही गगनचुंबी आधुनिक इमारती असे सर्वांचे मिश्रण दिसत होते. रस्त्याच्या कडेला नाना प्रकारची आधुनिक पध्दतीची दुकाने थाटलेली होती आणि ती गिऱ्हाइकांनी गजबजलेली होती. या रस्त्यावरून मी सात आठ वर्षांपूर्वी भिडे बागेत गेलो होतो, पण तेवढ्या काळात बराच बदल झालेला दिसत होता. पूर्वी विरळ वाटणारी वस्ती दाट झाली होती आणि आधी वेगवेगळ्या असलेल्या वस्त्या सलग झाल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या तर अनेक पटीने वाढली होती. पुणे शहराचा विस्तार जवळ जवळ खडकवासल्यापर्यंत येऊन पोचलेला होता. पुढे विस्तीर्ण जलाशय आणि मिलिटरीचे साम्राज्य असल्याने नागरी वस्तीला पसरायला वाव नव्हता. आमचे शांतिवन मात्र त्यांच्याही पलीकडच्या बाजूला होते. तिकडल्या एका खेडेगावात पोचल्यानंतर आम्ही सिंहगडकडे जाणारा रस्ता सोडून दिला आणि शांतिवनाकडे जाणारा रस्ता धरला.

सिंहगड रोड – भाग ४

मध्यप्रदेशातले आमचे एक आप्त दहा बारा वर्षांपूर्वी स्थाईक होण्याच्या विचाराने पुण्याला आले. त्यांच्यासाठी सोयिस्कर घर शोधतांना त्यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून तिथे बांधल्या जात असलेल्या अनेक संकुलांमधील इमारतींची पाहणी केली. त्यांच्या सर्व गरजा भागवण्याइतक्या सुखसोयी असणारे आणि त्यांच्या बजेटमध्ये बसणारे असे धायरी भागात बांधले जात असलेले एक घर त्यांनी विचारपूर्वक निवडून पक्के केले. त्या वेळी आम्ही मुलाकडे पुण्याला आलो होतो आणि वारजेजवळील आदित्य गार्डन सिटीमध्ये रहात होतो. तिथून बंगलोर हायवेवरून जाऊन मुठा नदी ओलांडली की वडगाव लागते आणि तिथून सिंहगड रोडने पुढे गेले की धायरी, म्हणजे ती जागा वारजेपासून फक्त पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर असणार असे आम्हाला आधी वाटले आणि आम्ही उत्साहाने ती जागा पहायला गेलो. पण नदी ओलांडून पलीकडे गेल्यानंतर लगेच एक फ्लायओव्हर सुरू झाला आणि तो काही नाले आणि वाटा यांच्यावरून जात सिंहगड रोडला सुध्दा ओलांडून पलीकडे दूर जाऊन पोचला. हायवेच्या डाव्या बाजूलाच सिंहगड रोडला जोडणारा रस्ता एक रस्ता होता, पण तो फक्त तिकडून हायवेकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी एकेरी करून ठेवलेला असल्याने आमच्या उपयोगाचा नव्हता. त्यामुळे आम्ही कात्रजच्या दिशेने आणखी पुढे गेलो आणि पुढल्या फ्लायओव्हरच्या (नवले पुलाच्या)खालच्या कमानीखालून हायवे ओलांडला. तिथून यू टर्न घेऊन वारजेच्या दिशेने परत आल्यावर सिंहगड रोडला जाऊन मिळणारा दुसरा रस्ता घेतला. अशा रीतीने ज्या पॉइंटला आम्ही हायवेवरून सिंहगड रोड ओलांडला होता तिथून दीड दोन मैलांचा फेरा घालून पुन्हा त्याच ठिकाणी खालून जाणाऱ्या सिंहगड रोडला येऊन लागलो.

सिंहगड रोडवर खूप ट्रॅफिक जॅम होता. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे सरकत गेल्यावर त्याचे कारण समजले. तिथे एका उड्डाणपुलाचे बांधकाम चालले होते. त्यासाठी अर्धा रस्ता खणून ठेवला होता आणि दोन्ही बाजूची वाहतूक उरलेल्या रस्त्यातून कशीबशी होत होती. धायरी फाट्यावर तर सगळा सावळागोंधळ होता. बांबूच्या स्कॅफोल्डिंगमधून वाट काढत वळणारी वाहने आडवी तिडवी येऊन रस्ता जास्तच अडवीत होती. कसेबसे आम्ही धायरीच्या वाटेला लागलो तेंव्हा तो रस्तासुध्दा वाहनांनी फुललेला होताच. आम्ही आता मुंगीच्या पावलांऐवजी गोगलगाईच्या गतीने सरकायला लागलो. कुठल्या गल्लीत वळायचे हे आम्हाला नेमके माहीत नव्हते. खुणेचे गणपतीचे देऊळ शोधता शोधता थोडे पुढेच गेलो आणि मागे वळून परत आल्यानंतर जे के हिल पार्कचा फलक दिसला. तिकडे जाणारी गल्ली मात्र संपूर्णपणे मोकळी होती. पण तिथे पोचेपर्यंत चांगला सव्वादीड तास वेळ लागला होता.

या वसाहतीमध्ये हिल म्हणजे टेकडी नव्हतीच, उलट थोडा उतार होता आणि पार्क किंवा बागेच्या नावाने फक्त कुंपणावर एका रांगेत लावलेली शोभेची झाडे होती. लांबट आकाराच्या त्या प्लॉटमध्ये दहा टोलेजंग इमारतींचे अजस्र चौकोनी ठोकळे एका सरळ रेषेत उभे करून ठेवले होते. त्यातल्या जवळ जवळ शेवटच्या इमारतीत आम्हाला जायचे होते. तोंपर्यंत अंधार पडायला लागला होता. इमारतीचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसल्यामुळे लिफ्ट बसवली नव्हती, जिन्याच्या पायऱ्यांवर लादी नव्हती, जिन्याचे कठडेही नव्हते, दिवे तर नव्हतेच. आम्ही अंधारात चाचपडत सिमेंटच्या पायऱ्यांवरून दोन मजले चढून वर गेलो. तिथे पुन्हा दोन्ही बाजूंना जाणाऱ्या दोन बोळकंड्या होत्या आणि त्यांच्या दोन बाजूंना प्रत्येकी दोन दोन फ्लॅट असे एकूण आठ फ्लॅट होते. त्यातल्या टोकाच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो.

त्या घराच्या भिंती उभारल्या होत्या, पण त्यांना दरवाजे आणि खिडक्या नव्हत्या. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी आत शिरून सगळीकडे ओल झालेली होतीच, त्यात सिमेंट आणि माती मिसळलेली होती. पँट दुमडून आणि हाताने थोडी वर धरून आम्ही आपला तोल सांभाळत आत शिरलो. आमच्या आप्तांनी माहिती सांगायला सुरुवात केली, “हा हॉल, हे किचन, या बेडरूम्स, इथे टॉयलेट्स” वगैरे वगैरे. त्या घराला दोन प्रशस्त बाल्कन्या होत्या, पण तिथे बरेच पाणी साठलेले होते आणि निसरड्या जमीनीवर पाय घसरून पडण्याची खात्री होती. यामुळे आम्ही तिकडे जाऊन पाहण्याचे धाडस केले नाही. “त्या बाल्कनीमधून दिसणारे दृष्य फार मोहक असते, आधी दूरवर पसरलेली निसर्गरम्य शेते, झाडेझुडुपे वगैरे आणि पलीकडे डोंगरांच्या रांगा, त्यांच्याच एका बाजूला नांदेडसिटीमधले गगनचुंबी टॉवर्स आणि टेकडीवर वसवलेले डी एस के विश्व …” वगैरेंचे रसभरीत वर्णन माझ्या आप्तांनी केले. त्यांना तो फ्लॅट आवडला होताच. मी यापूर्वी राहिलेलो असलेल्या प्रशस्त घरांच्या तुलनेमध्ये तो माझ्या पसंतीला उतरत नसला तरी मी सुध्दा त्यांच्या होकारात होकार मिळवत आणि त्या जागेची तोंडदेखली स्तुति करत राहिलो.

वारजेला परत येतांना पुन्हा एकदा सिंहगड रोडवरील त्या ट्रॅफिकमधून मुंगीच्या पावलांनी सरकत जाण्याचे दिव्य तर करावे लागलेच, पण तिथून परत जातांनासुध्दा सरळ हायवेला जोडणारा रस्ता नव्हताच. आता हायवेच्या पुलाखालून आधी पलीकडे गेलो, तिथून उलट कात्रजच्या दिशेने मैलभर जाऊन दुसरा फ्लायओव्हर गाठला, त्या ठिकाणी हायवेच्या पुलाखालून पुन्हा अलीकडे आलो आणि हायवेवर चढून आमच्या मार्गाला लागलो. या भागातल्या रस्त्यांचे नियोजन करणारा इंजिनियर बहुधा सातारा किंवा कऱ्हाडचा असावा. तिकडच्या बाजूने हायवेने आल्यास थेट सिंहगड रोडला जोडणारे रस्ते होते तसेच सिंहगड रोडवरून थेट त्या दिशेने जाण्याची सोय होती, पण वारजे, वाकडच्या बाजूला राहणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना मात्र येतांना आणि जातांना अशा दोन्ही वेळा दोन दोन मैलांचा वळसा घालावा लागत होता.

काही महिन्यांनंतर ती इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आमची आप्त मंडळी तिथे रहायला गेली. त्यांना भेटायला आम्ही पुन्हा सिंहगड रोडवरून धायरीला गेलो. आता ती इमारत रंगरंगोटी करून बाहेरून छान दिसत होतीच, आतमध्ये दिव्यांचा झगमगाट होता, अंतर्गत सजावटीने तो फ्लॅट आता सुरेख दिसत होता. बाल्कनीमधून दिसणारे सृष्टीसौंदर्य लोभसवाणे होते, त्यांनी घरातल्या सगळ्या सुखसोयी करून घेतलेल्या होत्याच. धायरी गावाच्या मुख्य रस्त्यापासून तो पुरेसा दूर असल्यामुळे तिथल्या रहदारीचा गोंगाटगलका ऐकू येत नव्हता, पण त्या रस्त्यावर सगळ्या प्रकारची दुकाने असल्यामुळे कुठल्याही जीवनावश्यक वस्तूची गरज पडली तर चालत जाऊन पंधरा वीस मिनिटात आणि वाहनाने गेल्यास पाच मिनिटात ती मिळण्याची सोय होती. तिथून पुणे शहराकडे अनेक बसेस जात होत्या, एकापाठोपाठ एक रिक्शा दिसत होत्या. आमचे नातेवाईक त्या जागेवर बेहद्द खूष झालेले दिसत होते.

सिंहगड रोडवरील धायरी फाट्याच्या कोपऱ्यावर बांधलेला फ्लायओव्हर बांधून पुरा झाला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरची रहदारी थोडीशी सुधारली होती, पण गंमत अशी होती की त्या फ्लायओव्हरवरून पुढे खडकवासल्याकडे जाणारी वाहने अगदी कमी आणि धायरीकडे वळणारीच जास्त असा प्रकार होता. त्यामुळे त्या अरुंद वाटेत खूप गर्दी झाली होती. हायवेवरून सिंहगड रोडकडे जाणारा एक शॉर्टकट निघाला होता, पण झाडाझुडुपांमधून आणि ओढेनाल्यांमधून वाट काढत वळत वळत जाणारा तो कच्चा रस्ता अगदीच जुनाट ग्रामीण भागातला वाटत होता. वाटेत एका जागी तर अशी परिस्थिती होती की तिथून फक्त चिटपाखरेच दिसत होती. एकसुध्दा माणूस किंवा वाहन दृष्टीपथात नव्हते. रात्रीच्या अंधारात तर त्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्याने जाणे शक्यच नव्हते. त्यापेक्षा दोन मैलांचा वळसा घातलेला बरा होता. सिंहगड रोडवरील धायरीला जाण्यासाठी या सगळ्या दिव्व्यांमधून जावे लागल्यामुळे मला ती जागा मनापासून विशेष आवडली नाही. आपण स्वतः सुध्दा तिथे रहायला जावे असा विचार त्यावेळी मनाला शिवला नाही.

धायरीमधल्या त्या घराच्या खिडकीमधून दूर डोंगरावर वसलेले डीएसके विश्व दिसताच माझ्या मनात दडलेली एक जुनी आठवण जागी झाली. माझ्या हैदराबादच्या आतेभावाने सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्याला स्थायिक व्हायचे ठरवले होते तेंव्हा डीएसके विश्वामध्ये घर घेतले होते. मुख्य शहरापासून बरेच दूर असलेल्या एका मोठ्या टेकडीच्या माथ्यावरील माथेरानसारख्या रम्य वातावरणात ती जागा आहे, निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या अनेक उंच इमारतींमधून हे स्वर्गासारखे स्वयंपूर्ण विश्व वसवले आहे, तिथे सगळ्या सुखसोयी आहेत, पण शहरातला गोंगाट नाही वगैरे त्याचे रसभरीत वर्णन त्याने मागे एकदा तो कुठेतरी भेटला असतांना सांगितले होते. ती स्वर्गसम जागा नेमकी कुठे आहे हे मात्र तेंव्हा माझ्या लक्षात आले नव्हते. सिंहगड रोड हा पुण्याकडून तिथे जायचा रस्ता आहे हे ही मला त्या वेळी समजले नव्हते. या वेळी त्याचे जे दुरून दर्शन घडले ते मात्र सिमेंट काँक्रीटच्या जंगलासारखेच वाटले.

मी पहिल्यांदा सिंहगड रोड पाहिला तेंव्हा तिथल्या भिडे बागेत गेलो होतो. तो रस्ता काही खास वाटला नव्हता, पण ती बाग मला खूप आवडली होती. त्या दिवसाच्या अनेक गोड आठवणींमध्येच एक वेगळी आठवणही होती. त्या उपवनातल्या निसर्गाला न शोभणारे असे काही पुणेरी फलक जागोजागी लावलेले होते आणि त्यावर “झाडांवर चढू नये”, “फुले तोडू नये” यासारखे अनेक नियम आणि ते न पाळल्यास त्याची काय फळे भोगावी लागतील याचा इशारा वगैरे बराच मजकूर होता. त्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तत्पर रक्षक आणि रक्षिका तैनात केल्या गेल्या होत्या. आम्ही सगळे सुशिक्षित, सुसंस्कृत, सूज्ञ वगैरे लोक असल्यामुळे ते बोर्ड न वाचताही तसे शहाण्यासारखे वागत होतो. पण अवखळ लहान मुलांना मात्र तिथे बागडायला शब्दशः मोकळे रान मिळाले होते. त्यांना निसर्गतःच निसर्गाचे जास्तच आकर्षण असते. त्यांना झाडाझुडुपांबरोबर लगट करायला आवडते. एकाद्या लहानग्या मुलाने किंवा मुलीने कुंपणावरच्या झुडुपाचे पान जरी तोडले तरी लगेच कोणी तरी येऊन तिचा कान पकडायचा, तिने भोकाड पसरले की तिची आई धावत यायची, मग तिला चार शब्द सुनावले जायचे, तिचा मूड गेल्यामुळे तिने आणखी दोघीतीघींच्या मूडवर विरजण घालायचे असे प्रकारही होत होते.

या वेळी धायरीला जातांना मी भिडे बाग कुठे दिसते हे लक्ष देऊन पहात होतो. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे जात असल्याने ती माझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. तरीही मला ती कुठे दिसलीच नाही. मध्यंतरीच्या काळात त्या भागात अभिरुचि नावाचा एक मोठा मॉल उभारलेला होता आणि तिकडे जाण्यासाठी दोन, तीन व चार चाकी वाहनांची रीघ लागली असल्यामुळे ट्रॅफिक जॅम जास्तच वाढला होता. या मॉलमुळे अनेक लोकांची खूप सोय झाली होते हे अगदी खरे असले तरी पूर्वीची सुंदर भिडे बाग नाहीशी झाल्याची हळहळही वाटली. जिथे पानालासुध्दा धक्का लागलेले खपवून घेतले जात नव्हते तिथली सगळी झाडे, संपूर्ण बागच उध्वस्त केली केली गेली होती आणि त्या जागेवर एक काँक्रीटचा अवाढव्य आणि बेढब ठोकळा उभा केला होता !
———————————-

सिंहगड रोड – भाग ५ (धायरी)

लहानपणापासूनच माझ्या मनात सिंहगड या शब्दाभोंवती एक उज्ज्वल ऐतिहासिक वलय होते. कदाचित त्यामुळे सिंहगड रोडबद्दलसुध्दा थोडे कुतूहल निर्माण झाले होते, पण त्या रस्त्यावरून प्रत्यक्षात एक दोन वेळा गेल्यानंतर ते मावळले. पन्नास वर्षांपूर्वी मी पुण्यात शिक्षण घेत असतांनाच्या काळात जसा सिंहगड रोड हा एक पुणे शहराच्या बाहेर जाणारा रस्ता होता त्याचप्रमाणे कर्वे रोड आणि पौड रोड हे सुध्दा त्या काळात गांवाबाहेरचेच रस्ते होते. पण नंतरच्या काळात त्या दोन रस्त्यांच्या आजूबाजूने नवनवीन वस्त्या निर्माण होत गेल्या आणि त्यांचा झपाट्याने विकास होत गेला. एकविसावे शतक उजाडेपर्यंत माझ्या ओळखीतली कांही जुनी मंडळी या भागात रहायला गेली होती आणि पुण्यात नव्याने आलेल्या लोकांनी तिथे घरे घेतली होती. माझे त्यांच्याकडे जाणे, येणे, राहणे व्हायला लागले होते. त्यामुळे पुण्याचे ते नवे भाग माझ्या माहितीतले होत होते. पण त्या मानाने पाहता सिंहगड रोड जरासा मागे राहिला होता. त्या भागात मोठमोठी हॉस्पिटल्स, कॉलेजे, उद्याने, थिएटरे, भव्य इमारती वगैरेसारख्या ठळक दिसणाऱ्या खुणा तयार झाल्या नव्हता. मला कामासाठी तिकडे जाण्याची गरज पडत नव्हती. त्या भागातली दुकाने आणि बाजारपेठांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी झगमगाट व गजबजाट दिसत होता. २०११-१२ मध्ये मला दिसलेला धायरी भाग तर अजूनही मागास वर्गात मोडण्यासारखा वाटत होता. माझे तोंपर्यंतचे बहुतेक आयुष्य अणुशक्तीनगर आणि वाशीसारख्या सुनियोजित आणि टिपटॉप वसाहतींमध्ये आणि उच्चशिक्षित वर्गामधील लोकांमध्ये गेले असल्यामुळे आपण स्वतः या ग्रामीण वाटत असलेल्या धायरीमध्ये येऊन रहावे असा विचार त्या वेळी माझ्या मनात आला नाही.

पण नियतिची चक्रे आपल्याला अज्ञात अशा पध्दतीने फिरत असतात. तीनचार वर्षांच्या काळात माझा मुलगा वारजे सोडून धायरीला जे के हिल पार्कमध्येच धायरीला रहायला गेला आणि आम्ही त्याच्याबरोबर रहायला पुण्याला आलो, त्या भागातले रहिवासी झालो आणि “आम्ही ना, हल्ली सिंहगड रोडवर राहतो.” असे सर्वांना सांगायला लागलो.

आपल्या वास्तव्याच्या नव्या भागाची माहिती तर करून घ्यायला हवीच ना ! मी थोडे हिंडून फिरून आणि विचारपूस करून ती करून घेतली. धायरी हे पुरातन काळापासूनचे मूळ खेडेगाव सिंहगड रोडपासून काही अंतरावर वसलेले आहे. जुन्या मुख्य पुणे शहराबाहेर पडल्यावर दत्तवाडी, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी वगैरे पूर्वीच्या वस्त्या लागतात. त्यांना मागे टाकून वडगांव बुद्रुक पार केल्यानंतर सिंहगड रस्ता खडकवासल्यावरून सिंहगडाकडे जातो आणि त्याच्या डाव्या बाजूला येऊन मिळालेला रस्ता धायरी गांवाकडे जातो. खरे तर तिकडे जाणाऱ्या त्या रस्त्याचे नाव धायरी फाटा असे होते. पण एकविसाव्या शतकात या जवळ जवळ दोन किलोमीटर लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरपूर वस्ती वाढत गेली. आता हा सगळाच भाग धायरी या नावाने ओळखला जातो आणि जिथे हे रस्ते मिळतात त्या कोपऱ्याला धायरी फाटा म्हणायला लागले आहेत.

त्या रस्त्यावर अनेक जुनी, नवी देवळे आहेत. फाट्याजवळ आधी गारमाळ नावाची वस्ती लागते. तिथून पुढे गेल्यावर नवशा गणपतीचे देऊळ लागते त्या भागाला गणेशनगर म्हणतात. आणखी पुढे गेल्यावर लागणाऱ्या चौकात उंबऱ्या गणपतीचे देऊळ लागते. तिथून एक रस्ता उजवीकडे डी एस के विश्व, नांदेड गाव वगैरेकडे जातो आणि दुसरा डावीकडे बेणकर वस्ती, रायकर मळा, नऱ्हे गाव वगैरेंकडे जातो. चौकात न वळता समोर थोडेसेच पुढे गेल्यावर भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तिथून जुने धायरी गांव सुरू होते. धायरी ग्रामपंचायतीची हद्द आणि पुणे महापालिकेची हद्द दाखवणारा एक लहानसा फलक त्या रस्त्याच्या कडेला दिसतो. तो दिसला नाही तर आपल्याला काहीही फरक जाणवत नाही इतके पुणे महानगरपालिका आणि धायरी ग्रामपंचायत हे आता सलग झालेले आहेत. धायरी गांवाचा जुना भाग अजूनपर्यंत पुणे महानगराच्या सीमेपलीकडे असला तरी आतासुध्दा पी एम पी एल बसेस धायरी गावात जातातच, लवकरच पूर्ण धायरी भाग पुणे शहरात विलीन होणार असल्याची घोषणा झाली आहे.

या धायरी रस्त्याला दोन्ही बाजूंना फुटत जाणाऱ्या गल्ल्यांना १, २, ३, ४ असे क्रम दिले आहेत. त्यामुळे पत्ता सापडणे सोपे आहे. या गल्ल्यांना एकमेकांना जोडणारे रस्तेच नाहीत. त्यामुळे या भागात गल्लीबोळांचे जाळेही नाही. एकाद्या उभ्या सरळसोट झाडाला आडव्या फांद्या फुटत जातात आणि त्या एकमेकांपासून दूर दूर जातात तशी या गावाची रचना आहे. एका गल्लीमधल्या टोकाच्या घरामधून शेजारच्याच गल्लीच्या टोकाच्या घरी जायचे असेल तर मुख्य रस्त्यापर्यंत येऊन तिकडे जावे लागते. आमचे घर धायरी गांवाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील अशाच एका गल्लीच्या टोकाशी होते.
………….

सिंहगड रोड – भाग ६ (धारेश्वर मंदिर)

धायरीतल्या रस्त्यांवरून चालत जातांना एक वेगळी गोष्ट जाणवते. धारेश्वर मेडिकल, धारेश्वर प्रोव्हिजन्स, धारेश्वर फॅब्रिकेशन, धारेश्वर एंटरप्राइजेस अशा प्रकारची धारेश्वर या नावाची अनेक दुकाने इथे जागोजागी दिसतात. एक दुकान नजरेआड जायच्या आत बहुधा दुसरे दिसतेच. धायरी हे गावच धारेश्वरमय असल्यासारखे दिसते. याचे कारण इथल्या धारेश्वर या स्थानिक दैवतावर धायरीवासियांची अमाप भक्ती आहे. धारेश्वर हे सुध्दा रामेश्वर, त्र्यंबकेश्वर यासारखेच भगवान शंकराचे एक नाव आहे. धायरी गावाचा अधिपती म्हणून धायरेश्वर किंवा धारेश्वर अशी एक व्युत्पत्ती कदाचित असावी असे काही लोकांना वाटते, पण महादेवाचे हे नांव जास्त प्रचलित नसले तरी महाराष्ट्रात आणि बाहेरही इतर कांही ठिकाणी या नावाची शंकराची देवळे आहेत. त्यामुळे कदाचित आधी धारेश्वराचे देऊळ बांधले गेले असेल आणि त्याच्या सोबतीने आजूबाजूला धायरी गाव वसले असेल अशीही शक्यता वाटते.

धायरी हे गाव आणि धारेश्वराचे देऊळ हे दोन्ही छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळापासून आहेत, राजे आणि त्यांचे शूर मावळे या महादेवाच्या दर्शनाला येत असत असे इथे सांगितले जाते. तसे लिहिलेला फलक किंवा शिलालेख वगैरे काही मला त्या जागी दिसला नाही. धायरी गावाला लागूनच असलेल्या एका उंचवट्यावर हे मंदिर बांधलेले आहे. नक्षीदार खांब, सुबक आकाराच्या कमानी वगैरेंनी नटलेला प्रशस्त सभामंटप, बंदिस्त गाभारा, त्यावर उंच निमुळते शिखर वगैरे पारंपरिक पध्दतीच्या रचनेचे असले तरी ते देऊळ मला तरी खूप पुरातन किंवा ऐतिहासिक काळातले वाटत नाही. पुरातत्वखात्याचा बहुभाषिक माहिती किंवा सूचना फलक या जागेवर दिसत नाही आणि या जागेवर त्यांचे नियंत्रणही नाही.

कदाचित मूळचे मंदिर खूप जुने असेल आणि वेळोवेळच्या राज्यकर्त्यांनी त्यात भर टाकली असेल किंवा त्याचा जीर्णोध्दार केला असेल. रायकर, चाकणकर वगैरेसारख्या धायरीतल्या प्रतिष्ठित धनिक कुटुंबांनी दिलेल्या देणग्या आणि केलेल्या सुधारणा दाखवणाऱ्या संगमरवरी शिला या देवळात बसवलेल्या आहेत. हे मंदिर कुणी बांधले, कधी बांधले, हे किती जुनेपुराणे आहे किंवा नाही याच्याशी इथे येणाऱ्या श्रध्दाळू भक्तजनांना काही देणे घेणे नसतेच. देवदर्शन आणि प्रार्थना करण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे येत असतात.

महादेवाचे मुख्य मंदिर मध्यम आकाराचे आहे. देवळाच्या बाहेर समोरच एक सुबक अशी नंदीची काळ्या दगडामधली कोरीव मूर्ती आहेच, शिवाय देवळाच्या आत प्रवेश केल्यावर नंदीची पितळेची आणखी एक प्रतिमा आहे. सभामंटपाचा उंबरा ओलांडून तीन चार पायऱ्या खाली उतरून गाभाऱ्यात जावे लागते. तिथल्या लादीमध्ये केलेल्या वीतभर खळग्याच्या आत शिवलिंग आहे. ते बहुधा स्वयंभू असावे असे त्याच्या आकारावरून वाटते. नैसर्गिक खडकांच्या आकारानुसार अशी रचना केली असेल. कोणीही भाविक या देवळात थेट गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. शिवलिंगाला स्पर्श करू नये अशी सूचना मात्र तिथे लिहिली आहे. त्यावर फुले, पाने, माळा वगैरे वाहू शकतात.

महाशिवरात्रीला इथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होतेच, पण श्रावणातल्या दर सोमवारीसुध्दा बरीच गर्दी होते. तिचे नियमन करण्यासाठी देवळाच्या बाजूलाच मोठा मांडव घालून त्यात रांगेने उभे राहण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय गाभाऱ्याच्या भिंतीवर एक मोठा आरसा अशा खुबीने लावून ठेवला आहे की सभामंटपामधूनच आतील शिवलिंगाचे दर्शन घेता येऊ शकते. त्यामुळे काही भाविक फार वेळ रांगेत उभे न राहता ते आरशातले दर्शन घेऊ शकतात.

देवळासमोरील नंदीच्या दोन्ही बाजूंना दोन उंच दीपमाळा आहेत. उत्सवांच्या काळात रात्रीच्या वेळी तिथे दिवे लावले जातात. देवळावरही विजेच्या दिव्यांची रोशणाई करतात. मंदिराच्या सभोवती चांगले प्रशस्त मोकळे आवार आहे. बाजूला इतर देवतांच्या लहान लहान घुमट्या आहेत. एका बाजूला कट्ट्यावर जुन्या काळातले देव मांडून ठेवलेले आहेत. संपूर्ण आवाराला चांगली फरसबंदी केली आहे आणि कठडा बांधला आहे. रस्त्यापासून देवळापर्यंत जाण्यासाठी दोन बाजूंनी चांगल्या पाच सहा मीटर रुंद आणि चढायला सोप्या अशा पन्नास साठ दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर पादत्राणे ठेवायची व्यवस्था आहेच, त्याच्या बाजूला पाण्याचे नळ लावून ठेवले आहेत. सगळ्या लोकांनी देवळात प्रवेश करण्याच्या आधी हात पाय धुवून पवित्र होऊन पुढे जावे अशी अपेक्षा असते आणि तशी सूचना लिहिलेली आहे.

भाविकांची बरीच गर्दी असली तरीही या मंदिराच्या आवारात खूप स्वच्छता बाळगली जाते, कुठेही कचरा पडलेला किंवा साठलेला दिसत नाही. देवळाचे आवार जमीनीपासून बरेच उंचावर असल्यामुळे माथ्यावर भरपूर वारा असतो, आजूबाजूला रम्य निसर्ग आहेच. मुख्य रस्त्यापासून दूर असल्यामुळे तिथपर्यंत रहदारीचा आवाज येत नाही. यामुळे या जागी गेल्यावर मनाला शांत आणि प्रसन्न वाटते. या मंदिरात श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीसारख्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम चाललेले असतात. पायऱ्यांच्या खालच्या परिसरात छोटी जत्रा भरते. मुलांची खेळणी, फुगे, भाजीपाला, धार्मिक पुस्तके, मिठाई, लहान सहान उपयोगी वस्तू वगैरेंचे तात्पुरते स्टॉल लागतात. मुलांच्या मनोरंजनासाठी गोल फिरणारे हत्ती घोडे (मेरी गो राउंड) आणि तिरप्या प्रचंड चक्राचे पाळणे (जायंट व्हील्स) असतात. हवा भरलेल्या मोठमोठ्या रबरी गाद्यांवर अगदी छोटी मुले नाचत असतात किंवा त्यांच्या घसरगुंड्यांवर घसरत असतात. देवदर्शनाचा धार्मिक आनंद मिळतोच, शिवाय ही सगळी मौज पाहून मन उल्हसित होते.

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ७ ते ९

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान (खास पुरुषांसाठी) मागील भाग : स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ४ – ६
https://anandghare2.wordpress.com/2022/11/23/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-2/


स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ७ – अग्निदिव्य – २

एकदा अतीशय कडाक्याची थंडी पडलेली असतांना अकबर बादशहाच्या मनात एक लहर आली आणि त्याने असे ऐलान करवले की जर एकादा माणूस उघड्या अंगाने रात्रभर यमुना नदीच्या थंडगार पाण्यात उभा राहिला तर त्याला बक्षिस म्हणून सोन्याचे कडे दिले जाईल. या मोठ्या बक्षिसाच्या आशेने काही धीट लोक संध्याकाळी पाण्यात उतरले, पण कमालीचा गारवा सहन न झाल्याने ते बाहेर पडत गेले. अखेर फक्त एक माणूस मात्र दुसरा दिवस उजाडेपर्यंत तग धरून पाण्यात उभा राहू शकला आणि बक्षिस घेण्यासाठी बादशहाच्या दरबारात गेला. त्याला कोणीतरी विचारले, “काय रे, तू रात्रभर काय करत होतास ?”
त्याने सांगितले, “सगळीकडे मिट्ट काळोख होता, फक्त राजमहालात लावलेल्या दिव्यांचा थोडा उजेड दिसत होता म्हणून मी तिकडे पहात वेळ काढला.”
यावर दरबारातल्या कोणा दीडशहाण्याने शेरा मारला की याला तर राजमहालातल्या दिव्यामधून ऊष्णता मिळत होती, त्यामुळे त्याला बक्षिस देण्याची गरज नाही. त्या वेळी अकबरानेही ते मान्य केले. आता बादशहाला कोण शहाणपणा समजावणार ? तो बिचारा माणूस खट्टू होऊन चालला गेला, पण त्याला न्याय मिळवून द्यायचा असे बिरबलाने ठरवले.

दुसरे दिवशी सकाळी त्याने आपल्या घरासमोरच्या झाडाच्या एका फांदीच्या खाली जमीनीवर एक चूल पेटवली, त्या फांदीला एक मडके टांगून त्यात डाळ, तांदूळ आणि पाणी घालून ठेवले आणि तो स्वतः बाजूला जमीनीवर बसून राहिला, दरबारात गेलाच नाही. त्याची अनुपस्थिती लक्षात आल्यावर बादशहाने त्याला बोलवायला एक नोकर पाठवला. बिरबलाने त्याला सांगितले, “मी खिचडी शिजवायला ठेवली आहे, तेवढी शिजली की मी ती खाईन आणि लगेच दरबारात येईन.” थोड्या थोड्या वेळाने त्याला बोलवण्यासाठी आलेल्या प्रत्येक सेवकाला त्याने हेच सांगितले. अखेर रागाच्या भरात स्वतः अकबर बादशहा तिथे आला. त्याने सगळा प्रकार पाहिला आणि त्याला हंसू आवरेना. तो बिरबलाला म्हणाला, “अरे तू मूर्ख आहेस का? आगीपासून इतक्या दूर ठेवलेल्या भांड्यातली खिचडी कशी शिजेल?”

बिरबलाने शांतपणे उत्तर दिले, “खाविंद, माफ करावे, पण आपल्या राज्यात जर राजमहालातल्या मिणमिणत्या दिव्यांची ऊष्णता दूर नदीत उभा राहिलेल्या माणसापर्यंत जाऊन पोचत असेल, तर या धगधगत्या चुलीतली ऊष्णता इथल्या इथे वर मडक्यापर्यंत का नाही पोचणार?” अर्थातच अकबराने त्या माणसाला बोलावून सोन्याचे कडे बक्षिस दिले.

या मनोरंजक गोष्टीमधूनसुद्धा अग्नीचे विशिष्ट गुणधर्म प्रगट होतात. आगीपासून जसजसे दूर जाऊ तसतशी तिची धग (तीव्रता) कमी होत जाते आणि त्या ठिकाणचे तपमानही कमी होत जाते. म्हणूनच आपण शेकोटीच्या जवळ जाऊन ऊब घेतो. बिरबलाच्या चुलीपासून निघालेली ऊष्णता मडक्यापर्यंत पोचतांपोचतां इतकी कमी झालेली असणार की त्यातले पाणी उकळणार नाही आणि त्यातली डाळ आणि तांदूळ शिजणार नाहीत एवढे कोणालाही सामान्यज्ञानामधून कळते.

आता यातले विज्ञान पाहू. स्वयंपाकघरातल्या शेगडीवर ठेवलेल्या भांड्याच्या तळातील भागातले पाणी तापल्यावर हलके होऊन वरच्या बाजूला जाते आणि वर असलेले तुलनेने गार आणि जड असलेले पाणी खाली जाऊन त्याची जागा घेते. ते पाणी ऊष्ण होऊन वर जाऊन पुन्हा वरच्या पाण्याला खाली ढकलते. याला अभिसरण (कन्व्हेक्शन) असे म्हणतात हे आपण मागील भागामध्ये पाहिले आहे. भांड्यामधले पाणी अशा प्रकारे वरखाली फिरत राहते, पण मोकळ्या हवेला प्रतिबंध नसतो. शेगडीमधील ज्वालेने तापलेली ऊष्ण हवा लगेच भांड्याच्या संपर्कात आली तर त्याला तापवते, पण ती एकदा का आजूबाजूच्या मोकळ्या हवेत मिसळली की सर्व दिशांना पसरत जातांना तिथे असलेल्या थंड हवेत मिसळत जाते. यामुळेच बिरबलाच्या मडक्यापर्यंत पोचलेली हवा पार थंडगार झाली होती आणि त्यातल्या पाण्याचे तपमान उत्कलनबिंदूपर्यंत म्हणजे १०० अंशापर्यंत पोचत नसल्यामुळे त्यातली खिचडी शिजू शकत नव्हती.

आपल्या स्वयंपाकघरातल्या शेगडीमधून निघत असलेल्या ज्वालांमधली जास्तीत जास्त ऊष्णता भांड्याला मिळावी अशी योजना या शेगडीच्या रचनेत केलेली असते. भांड्यांच्या बुडालाही थोडा खोलगटपणा दिलेला असतो. यामुळे ऊष्ण हवेचा प्रवाह त्या भांड्याला लगटून आणि त्याला तापवत बाहेर पडतो. तीन किंवा चार बर्नर्सच्या शेगड्यांमध्ये लहानमोठे बर्नर्स असतात. बर्नरच्या आकारानुसार तिथे येऊन जळणारा गॅस कमी जास्त होतो, याशिवाय प्रत्येक बर्नरमधील फ्लेम (ज्वाला) कमी जास्त करण्यासाठी कळ्या (नॉब) असतात. आपल्याला एकादाच कप चहा करायचा असेल तर लहान बर्नरवर लहानसे भांडे ठेवून आपण गॅसची बचत करू शकतो कारण मोठ्या बर्नरमधून निघणाऱ्या ज्वाला भांड्याच्या कडेने बाजूला निघत असतील तर त्यांच्यामधून निघणारी बरीचशी ऊष्णता भांड्याला न मिळता ती वाया जाईल. याच्या उलट भल्या मोठ्या कुकरमध्ये दहा माणसांसाठी वरणभात शिजवायला ठेवतांना तो कुकर लहान बर्नरवर ठेऊन मंद आंचेवर ठेवला तर त्यातले पाणी उकळण्याच्या तपमानापर्यंत पोचायच्या आधीच बर्नरकडून मिळत असलेली सगळी ऊष्णता उत्सर्जनामधून वातावरणात पसरली जाईल. शेगडीमधून मिळणारी ऊष्णता, वातावरणात फेकली जाणारी ऊष्णता आणि शिजत असलेल्या अन्नाला मिळणारी ऊष्णता यांचा ताळेबंद व्यवस्थित सांभाळला गेला तर ऊष्णता वाया न घालवता कमीत कमी वेळात आणि कमीत कमी गॅसचा वापर करून अन्न शिजवता येते.

यासाठी शेगडीवर ठेवलेल्या अन्नाकडे सतत थोडे लक्ष ठेवायला हवे. थंड पदार्थ तापवत असतांना सुरुवातीला त्याला जास्त ऊष्णता देणे आवश्यक असते, पण तो एकदा आपल्याला हवा तेवढा गरम झाला की तेवढेच तापमान टिकवून धरण्यासाठी इतक्या जास्त ऊष्णतेची आवश्यकता नसते. कुकरमधले पाणी उकळल्यानंतर त्याचे तापमान वाढत नाही पण आतले तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभरे, वाटाणे वगैरे निरनिराळी धान्ये शिजण्यासाठी एकसारखाच वेळ पुरेसा नसतो. कुकरमधील पाण्याला उकळी आल्यानंतर त्यातील पदार्थ शिजण्यासाठी आवश्यक इतका जास्त वेळ द्यावा लागतो. त्या काळामध्ये शेगडीची आंच कमी केली तर कमी गॅस खर्च होऊनही ते तापमान टिकवले जाते आणि अन्न शिजते. शेगडी जास्त आंचेवर जळत ठेवली तर पाण्याचे रूपांतर वाफेत होत राहील आणि ती वाफ आणि जास्तीची ऊष्णता वारंवार शिटीमार्गे बाहेर पडत जाईल. अन्न शिजण्यासाठी तीन शिट्या द्या असे सांगणे शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे आहे, कारण शिट्या वाजल्यामुळे अन्नाला काहीही फायदा होत नाही. तो फक्त एक अनुभवावून आलेला वेळेचा अंदाज असतो.

ऊष्णतेविषयक एक शास्त्रीय नियम असा आहे की पाण्याचा उत्कलनबिंदू त्यावरील दबावावर (प्रेशरवर) अवलंबून असतो. समुद्रसपाटीवरील सर्वसामान्य वातावरणात तो १०० अंश सेल्सियस एवढा असतो, पण पाण्यावरचा दबाव वाढवून सुमारे दुप्पट केला की तो त्याहून जास्त म्हणजे सुमारे १२० अंश होतो. बहुतेक प्रेशर कुकरमध्ये हे केले जाते. १०० अंश तापमानावर सहजासहजी न शिजणाऱ्या डाळी व कडधान्ये या तापमानाला शिजतात. त्यांना आधीच बराच वेळ पाण्यात भिजवून ठेवले तर ते पदार्थ फुगतात, त्यांचे सूक्ष्म कण सैलसर होतात आणि ते कमी तापमानावर आणि कमी वेळात शिजतात. यातले विज्ञान न शिकलेल्या सुगृहिणींनासुद्धा हे अनुभवाने चांगले ठाऊक असते.

शेगडीवरील अन्न शिजण्यासाठी १०० – १२० अंश एवढेच तापमान पुरेसे असते, पण तळणीसाठी याहून जास्त म्हणजे १५०, १६०, १७० अंश यासारख्या उच्च तापमानांची आवश्यकता असते. तेलाचे तापमान जास्त असले तरच तळायला घातलेल्या पदार्थांमधल्या पाण्याची लगेच वाफ होऊन ती भराभर बाहेर पडेल आणि तो पदार्थ खमंग तळला जाईल. आपण तळणीसाठी निरनिराळी तेले वापरतो, त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. पण खूप जास्त तापवल्यानंतर सगळ्याच तेलांमधून वाफ किंवा धूर निघायला लागतो. यामुळे तेलांमधली काही उपयुक्त अशी व्होलेटाइल तत्वे उडून जातात. तेल आणखी जास्त तापवले तर ते कढईमध्येच पेट घेऊन त्याचा भडकाही उडतो. भारतात तरी कोणीच स्वयंपाकघरात थर्मॉमीटर ठेवत नाहीत. यामुळे तापत असलेल्या तेलाचे तापमान मोजण्याचा प्रश्न येत नाही. पण तळल्या जात असलेल्या पदार्थांकडे लक्षपूर्वक पाहिल्यास तेलाच्या तापमानाचा अंदाज येतो तो घ्यावा. तेल जास्तच तापले तर आगीची आंच कमी करावी आणि तळणीचे काम फार सावकाश चालले असेल तर शेगडीची आंच वाढवावी.

तव्यावर भाकरी किंवा पोळी भाजण्यासाठी तो तवा चांगला तापलेला असणे आवश्यक असते. तवा चांगला तापलेला असला तर त्यावर पोळी टाकतांच तव्याला स्पर्श करणाऱ्या कणकेच्या भागातल्या पाण्याची लगेच वाफ होते आणि ती वाफ पोळीला किंचित उचलून धरते. यामुळे ती पोळी तव्याला चिकटत नाही. थंड तव्यावर टाकलेली पोळी किंवा डोसा कसा त्याला चिकटतो याचा अनुभव बहुतेक सगळ्यांना येतो. तव्यावर घातलेली पोळी लगेच करपायलाही लागते. यामुळे तिला उलथून तिची पलीकडची बाजू भाजून घेतात आणि खालची व वरची अशा दोन्ही बाजू खरपूस भाजून घेतल्यानंतर तिची तव्यावरून उचलबांगडी होते. याच वेळी पुढील पोळी लाटली जात असते. त्यात जास्त वेळ गेल्यामुळे तव्यावरली पोळी वेळेवर उलथली नाही तर ती करपते. ते होऊ नये यासाठी मध्येच तव्याखालची आंच कमी करावी लागते आणि नवी पोळी भाजायला टाकतांना तिला पुन्हा वाढवणेही आवश्यक असते. भाकरी आणि फुलके चांगले भाजले जाण्यासाठी त्यांना शेगडीतल्या आगीवरच क्षणभर धरतात. यासाठी जास्तच कौशल्य लागते. तरीसुद्धा हाताला चटके बसतातच. माणसाच्या संसारासाठी समर्पक उपमा देतांना “अरे संसार संसार, जसा तवा चुह्यावर, आधी हाताले चटके तवा मियते भाकर” असे बहिणाबाईंनी सांगून ठेवले आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास स्वयंपाक करत असतांना त्या कामासाठी किती ऊष्णतेची गरज असते आणि आपण किती ऊष्णता शेगडीमधून पुरवतो यांचे समीकरण जुळले तर अन्नपदार्थ करपतही नाही, कच्चाही रहात नाही आणि चविष्ट होतो.

. . . . . . . . . . . . . . . . . .

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ८ – अग्निदिव्य – ३

अन्नपदार्थांचे शिजवणे, तळणे आणि भाजणे या प्रमुख क्रियांसाठी लागणारी कमी किंवा जास्त ऊष्णता कशी पुरवली जाते हे मागील भागात पाहिले. बहुतेक भारतीय खाद्यपदार्थ तयार करण्यांसाठी यातल्या दोन किंवा तीनही क्रियांचा संयुक्तपणे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ भाजी बनवण्यासाठी आधी फोडणी करतांना त्यात मोहऱ्या, हिंग, जिरे, मिरे, लवंग, दालचिनी यासारखे मसाल्याचे पदार्थ काही सेकंद तळले जातात, त्यात चिरलेल्या भाजीच्या फोडी टाकून त्यांना परततांना त्या जराशा भाजल्या जातात आणि त्यानंतर त्यात पाणी घालून ती भाजी शिजवून घेतात. याउलट आमटी करण्यासाठी आधी डाळ शिजवून तिचे वरणात रूपांतर करतात आणि त्यानंतर त्याला तळलेल्या मिरच्यांची फोडणी देतात.

या तीन प्रमुख क्रियांचे काही उपप्रकार आहेत. वाफवणे हा शिजवण्याचाच एक थोडा वेगळा प्रकार आहे. भाकरी किंवा फुलके भाजण्याचे काम तव्यावर होते तसेच प्रत्यक्ष आग किंवा निखारा यावरही केले जाते. तळण्यामध्ये डीप फ्राइंग आणि शॅलो फ्राइंग (तेलावर परतणे) असे दोन प्रकार आहेत. थालीपीठ भाजत असतांनाच त्यावर तेल सोडून तळणे व भाजणे या संमिश्र क्रिया केल्या जातात. पराठे भाजतांना देखील या तंत्राचा उपयोग करतात. काही लोक पुरणाची पोळी भाजत असतांना तिच्यावर तूप घालतात. चिकनला तेल आणि मसाल्यांमध्ये चांगले मुरवून ठेऊन तंदूरमध्ये भाजतात तेंव्हा ते थोडे तळलेही जाते. या सगळ्या पाकक्रियांमध्ये आपापल्या बुद्धीनुसार वेगवेगळे प्रयोग केले जातात.

डाळ, तांदूळ, कडधान्ये वगैरे अन्नपदार्थ उकळत्या पाण्यात काही काळ शिजवत ठेवण्याचे काम कुकरमध्ये कसे केले जाते यामागचे विज्ञान आधीच्या भागात सविस्तर दिले आहे. उकळत्या पाण्यापेक्षासुद्धा वाफेमध्ये बरीच जास्त ऊर्जा (ऊष्णता) असते, वाफेचा चटका भयंकर असतो. प्रेशर कुकरमधील डब्यांमध्ये ठेवलेल्या डाळ आणि तांदुळालासुद्धा ही ऊष्णता वाफेमधूनच मिळते. इडली, ढोकळा यासारखे काही पदार्थ तर फक्त वाफेवर शिजवले जातात. इडल्यांना शिजवण्यासाठी आवश्यक असलेले पाणी त्यांच्या वाटलेल्या पिठात आधीच घातलेले असते. खालून मिळालेल्या वाफेमधील ऊष्णतेने त्यातल्या जास्तीच्या पाण्याची वाफ होऊन निघून जाते आणि इडल्या शिजून तयार होतात. त्यांना कुकरच्या नेहमीच्या प्रेशर व टेंपरेचरवर शिजवल्यास त्या जास्त शिजून त्यांचा लगदा होतो. तसे होऊ नये यासाठी कुकरची शिटी काढून ठेऊन वाफेला बाहेर जाऊ दिले जाते. यामुळे आतले तपमान प्रमाणाबाहेर वाढत नाही. कोबीसारख्या काही भाज्या आणि मोड आलेली कडधान्ये, मटार किंवा मक्याचे कोवळे दाणे वगैरे वाफवून सॅलडसोबत खाल्ल्यास त्यातली जीवनसत्वे वाया न जाता आपल्याला मिळतात.

ऊष्णता ही नेहमी जास्त तपमानाकडून कमी तपमानाकडे वहात असते असा त्या शास्त्राचा प्रमुख नियम आहे. शेगडीमधील आंचेमुळे आगीवर ठेवलेला तवा तापत असतो. यामुळे अर्थातच शेगडीमधील ज्वाला किंवा निखारे हे तव्याहून जास्त ऊष्ण किंवा प्रखर असतात. त्यावर भाजला जाणारा पदार्थ लवकर भाजला जातो आणि करपतोसुद्धा. तो भाजायला ठेवल्यावर एक दोन सेकंदात परतत रहावा किंवा बाहेर काढावा लागतो.

नेहमीच्या तळणीच्या कामासाठी खोलगट आकाराच्या कढईमध्ये भरपूर तेल घेतात आणि कडकडीत तापलेल्या तेलात अलगद सोडलेली भजी, वडे, चकल्या वगैरे पदार्थ तळले जात असतांना ते त्यात बुडत किंवा तरंगत असलेले दिसतात. शिवाय त्यांना झाऱ्याने हलवण्याचे काम चाललेले असते. यामुळे त्या पदार्थांना सर्व बाजूंने तापलेल्या तेलाची ऊष्णता मिळत जाते. अशा प्रकारच्या तळणक्रियेला इंग्लिश भाषेत डीप फ्राइंग म्हणतात. भजी तळायला कढईत घालायच्या आधी ती भिजवलेल्या बेसनात बुडवून घेतात, यामुळे त्यावर बेसनाचा एक थर बसलेला असतो. तापलेल्या तेलात टाकल्यावर या बेसनामधले पाणी आधी वाफ होऊन बाहेर पडते आणि भज्यावर तळलेल्या बेसनाचे आवरण तयार होते. तळण्याच्या क्रियेत थोडे तेल भज्याच्या आतपर्यंत जात असते. यामुळे तिथले काद्याबटाट्यांचे काप, मिरच्या वगैरे पदार्थसुद्धा तापलेल्या तेलाच्या संपर्कात येतात, पण बाहेरील आवरणाच्या मानाने कमी. बाहेरचे आवरण करपू नये या दृष्टीने त्याचा रंग बदलला की ती भजी झाऱ्याने बाहेर काढली जातात. झाऱ्यामध्ये असलेल्या छिद्रांमधून तेल खाली कढईत पडते आणि फक्त भजे वर राहते. तोपर्यंत आतील पदार्थ काही प्रमाणात तळले, काही प्रमाणात भाजले आणि काही प्रमाणात शिजले जात असतात आणि त्यामधून एक अप्रतिम अशी चंव निर्माण होते. थेट आपल्या भज्यांसारखा दिसणारा एक पदार्थ मी एकदा अमेरिकेतल्या एका हॉटेलात खाल्ला, पण त्याची चंव बरीच वेगळी लागत होती. थोडे संशोधन केल्यावर समजले की तिकडच्या एका कंदमुळाच्या तुकड्यांना मक्याच्या पिठात (कॉर्नफ्लोअरमध्ये) घोळून त्याला ऑलिव्ह ऑइलमध्ये तळून काढले होते. फ्राइड चिकनवर तळलेल्या अंड्याच्या बलकाचे ऑमलेटसारखे आवरणही मी पाहिले आहे. पदार्थ वेगवेगळे असले तरी त्या सर्वांच्या मागचे विज्ञान तसेच असते.

फोडणी हे तळणीचे लघुरूप असते. त्यासाठी पळीत किंवा लहानशा कढईमध्ये थोडेसे तेल तापवायला घेतात. त्यात मोहरीचे दोन चार दाणे टाकून ते किती तापले याचा अंदाज घेतात. हे आपले पारंपारिक देशी थर्मॉमीटर आहे. मोहरी तडतडली की तेल पुरेसे गरम झाले असे समजायचे. त्यानंतर लगेच त्यात मोहऱ्या, हिंग, इतर मसाले, मिरच्या, लसूण वगैरे आपल्याला हवे असलेले पदार्थ पटापट घालून ती फोडणी हव्या त्या अन्नपदार्थावर घातली जाते. भाजीसारख्या काही पदार्थांची सुरुवात फोडणीपासून होते तर चटणी व कोशिंबिरींसारख्या काही पदार्थांवर सर्वात शेवटी फोडणी देतात. काही पालेभाज्यांची सुरुवात फोडणीपासून झालेली असली तरी त्या पानात वाढायच्या आधी त्यांना पुन्हा वरून आणखी एक फोडणी दिली जाते. त्यामुळे ती जास्त चविष्ट लागते. यातही विज्ञानापेक्षा पाककौशल्याचा अधिक भाग असतो.

शॅलो फ्राइंगमध्ये एका सपाट बुडाच्या पसरट फ्राइंग पॅनमध्ये किंवा मोठ्या तव्यावर थोडेसे तेल पसरून तापवायला ठेवतात. कटलेट किंवा पॅटिससारखे चपट्या आकारचे पदार्थ त्यावर मांडून ठेऊन त्यांना मंद आचेवर तापवत ठेवतात. तव्यावर पसरलेल्या तेलात त्या पदार्थांचा खालचा पापुद्रा तळला जात असतो. काही वेळाने उलथन्याने त्यांना उचलून पालथे टाकतात आणि आणखी काही वेळ तापवत ठेवतात. यामुळे तो दोन्ही बाजूंनी खरपूस भाजला किवा तळला जातो. यासाठी त्याचा मूळ गोळा आधीच शिजवलेला असणे आवश्यक असते. बटाटे, मटार, गाजर यासारख्या भाज्या आधी शिजवून घेऊन त्यांना कुस्करून आणि त्यात ब्रेडचा चुरा वगैरे आधीच चांगले भाजलेले पदार्थ मिसळून हे खाद्यपदार्थ तयार केले जातात. ज्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने डीप फ्राइड किंवा तळकट पदार्थ खाणे वर्ज्य असेल त्यांच्यासाठी शॅलो फ्राइड पदार्थ हा एक चविष्ट पर्याय मिळतो. काही प्रकारच्या सुक्या चटण्यासुद्धा तेलावर परतून म्हणजे शॅलो फ्राय करून तयार केल्या जातात.

अन्न टिकून राहणे हा देखील विज्ञानाचाच एक भाग आहे. शिजवलेला कोणताही पदार्थ कच्च्या पदार्थांइतका टिकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात कधी कधी सकाळी शिजवलेला पदार्थ संध्याकाळपर्यंत खराब झालेला दिसतो. खरपूस भाजलेला पदार्थ त्या मानाने जास्त काळ टिकतो आणि तळलेला पदार्थ कित्येक दिवस नासत नाही. अन्नाला नासवणारे कीटाणू, जिवाणू वगैरे (बॅक्टीरिया, फंगस आदि) सूक्ष्म जीव दमट वातावरणात झपाट्याने वाढतात हे त्याचे शास्त्रीय कारण आहे. या कारणानेच थंड हवामान असलेल्या देशांमध्ये तसेच रेफ्रिजरेटरमध्ये या खलनायकांची वाढ वेगाने होत नसल्याने अन्न जास्त काळ टिकते. मसाले आणि तेल या गोष्टी अन्न टिकवायला मदत करतात कारण त्यात बॅक्टिरियांची वाढ वेगाने होत नाही. भरपूर तेलात मुरलेले लोणचे कित्येक महिने टिकून राहते.

. . . . . . . . . . . . . . .

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ९ – विजेचा उपयोग

वाफेच्या इंजिनांच्या शोधापासून आधी कारखान्यांमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती विजेच्या प्रवाहाबरोबर थेट घराघरातल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाऊन पोचली. विजेच्या दिव्यांनी लख्ख उजेड निर्माण करून रात्रीच्या काळोखावर मात केली, घरबसल्या आपल्या खोलीमध्येच पंख्याच्या सहाय्याने हवा तेंव्हा वारा घेता यायला लागला आणि पंपांमधून पुरवलेले पाणी घरांच्या आतपर्यंत येऊन पोचले. दळणे, वाटणे, कुटणे, खिसणे, घुसळणे वगैरे बरीचशी स्वयंपाकघारातली कामे मिक्सरग्राइंडरवर व्हायला लागली आणि चूल किंवा शेगडी यांनासुद्धा विजेच्या शेगड्यांचे पर्याय उपलब्ध झाले.

चुली, शेगड्या, भट्ट्या वगैरे जुन्या पारंपारिक साधनांमध्ये इंधन जाळण्याच्या रासायनिक क्रियेमधून ऊष्णता निर्माण केली जाते. विजेपासून ऊष्णता निर्माण करण्यामागचे विज्ञान वेगळे आहे. विजेचा प्रवाह कोणत्याही वाहकामधून (कंडक्टरमधून) जात असतांना त्या प्रवाहाला अंतर्गत विरोध होतो आणि त्या विरोधामधून ऊष्णता निघते, किंबहुना विद्युत्प्रवाहातल्या थोड्या ऊर्जेचे ऊष्णतेमध्ये रूपांतर होते. तांबे (कॉपर) या धातूच्या तारेमधून जातांना वीजेला अत्यल्प विरोध होतो, तर नायक्रोमसारख्या मिश्रधातूमध्ये प्रखर विरोध होतो. वाहकाच्या तारेची जाडी कमी असेल आणि लांबी जास्त असेल तर त्या प्रमाणात विरोध वाढतो आणि अधिक ऊष्णता बाहेर पडते. असे विजेच्या शास्त्राचे काही प्राथमिक नियम आहेत.

या तत्वांचा उपयोग करून स्वयंपाकघरातल्या उपयोगासाठी अनेक प्रकारची उपकरणे तयार केली जातात. मी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांना हॉस्टेलमधल्या काही विद्यार्थ्यांकडे क्वचित कधी तरी उपयोग करण्यासाठी एक अत्यंत प्राथमिक स्वरूपाची साधी स्वस्तातली विजेची शेगडी असायची. एका चिनी मातीच्या जाडसर तबकडीमध्ये वळणावळणाचे खाचे करून त्यात नायक्रोम वायरचे स्प्रिंगसारखे दिसणारे भेंडोळे बसवलेले असायचे. बटन दाबताच विजेचा प्रवाह सुरू झाला की ते भेंडोळे तापून लालबुंद होत असे. या शेगडीमधून धूर बाहेर पडत नसल्यामुळे खोलीचा दरवाजा बंद करून शेगडी सुरू केली की बाहेर कोणाला त्याचा पत्ता लागत नसे आणि काम झाल्यावर तिला लपवून ठेवणे सोपे होते. त्यातूनही रूमवर अचानक घातलेल्या धाडीत ती जप्त झाली तरी त्याचे फारसे दुःख होत नसे. पण अशा प्रकारे उघड्या तारेमधून वीजप्रवाह खेळवणे धोक्याचे असते. त्या तारेला भांड्याचा किंवा हाताचा स्पर्श झाला तर जोराचा घातक झटका बसण्याची भीती असते. शिवाय जास्त गरम झाल्याने किंवा शॉर्टसर्किट होऊन केंव्हाही ती कॉइल पटकन तुटून जात असे. असली तकलादू शेगडी रोज धुवून पुसून स्वच्छ करण्याची तर सोयच नसते. यामुळे मी अशा प्रकारची गावठी शेगडी आमच्या स्वयंपाकघरात कधीच आणली नाही.

या शेगडीच्या रचनेत आवश्यक त्या सुधारणा करून सुरक्षित अशा अनेक हॉट प्लेट्स बाजारात आल्या आणि येत आहेत. विजेच्या या शेगड्यांमधून कसल्याही ज्वाला निघून वर ठेवलेल्या भांड्यांना तापवत नाहीत. कॉइलजवळची तापलेली ऊष्ण हवा आणि उत्सर्जनामधून बाहेर पडणारी ऊर्जा यामधूनच त्या भांड्यांना ऊष्णता मिळते. यामुळे गोल आकाराची कढई किंवा खोलगट बुडाची पातेली यासाठी तितकीशी सोयीची नसतात. ऊर्जा वाचवण्याच्या दृष्टीने किंवा ऊष्णता वाया जाऊ नये यासाठी हॉट प्लेटसोबत फ्राइंग पॅनसारखी सपाट बुडाची भांडी वापरणे चांगले असते.

साध्या शेगडीवरचे भांडे ज्वालांच्या वरच्या बाजूला ठेवणे आवश्यकच असते, पण विजेच्या शेगडीतल्या कॉइल्स वर, खाली, बाजूला, आडव्या, उभ्या अशा कशाही रचून ठेवल्या तरी तेवढीच ऊष्णता देतात. यामुळे त्यांची विविध प्रकारांनी रचना करता येते. पॉप अप टोस्टरमध्ये त्या कॉइल्स उभ्या ठेवलेल्या असतात आणि ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही बाजूंनी खरपूस भाजतात. तर सँडविच टोस्टरमध्ये त्यांना पसरवून ठेवलेले असते. गोल किंवा चौकोनी आकारांच्या अनेक प्रकारच्या लहान मोठ्या ओव्हन्स मिळतात. केक, बिस्किटे, पफ वगैरेसारखे आंग्ल पदार्थ तर त्यात करता येतातच, पण पापड भाजण्यापासून ते शाही पुलाव शिजवण्यापर्यंत अनेक भारतीय पदार्थसुद्धा आता ओव्हनमध्ये केले जाऊ शकतात.

इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह या नावांच्या विजेच्या उपकरणांच्या आणखी दोन शाखा आता निघाल्या आहेत. तांब्याच्या तारेच्या भेंडोळ्यामधून विजेचा उभयदिक्प्रवाह (Alternating current आल्टर्नेटिंग करंट) नेला आणि त्याच्या मध्यभागी (core) कोअरमध्ये लोखंडाचा तुकडा किंवा पत्रा ठेवलेला असला तर त्यात आलटून पालटून चुंबकीय क्षेत्रे तयार होत राहतात आणि अखेरीस त्यांचे ऊष्णतेमध्ये रूपांतर होते. याला चुंबकीय प्रवर्तन (Magnetic induction मॅग्नेटिक इंडक्शन) म्हणतात. या प्रकारच्या उपकरणात एका लोखंडाच्या मिश्रधातूच्या पात्राभोवती तांब्याच्या तारा गुंडाळलेल्या असतात. त्यामधून विजेचा प्रवाह गेला की थेट त्या पात्रामध्येच ऊष्णता निर्माण होते. यामुळे ऊष्णता वाया जात नाही आणि ते भांडे लवकर तापते. या तत्वावर काम करणारे कुकर विजेची बचतही करतात.

मोबाइल फोनचे काम ज्या लहरींवर चालते तशा प्रकारच्या अतीसूक्ष्म विद्युत लहरी (मायक्रोवेव्ह्ज) हवेमधून किंवा विद्युत वाहक (इलेक्ट्रिकल कंडक्टर) पदार्थांमधून निर्विघ्नपणे आरपार जाऊ शकतात पण पाण्यामधून जातांना त्यांना प्रखर विरोध होतो. मायक्रोवेव्ह ओव्हन या तत्वावर कार्य करते. यात ठेवलेले पाणी किंवा दूध काही सेकंदात तापते. भात सुद्धा लवकर शिजतो. पण भाजणे किंवा तळणे ही अधिक तापमानावर होणारी कामे या ओव्हनमध्ये करत नाहीत. या ओव्हनचे एक खास वैशिष्ट्य असते. कढई किंवा पातेल्यात घालून साध्या शेगडीवर तापवायला ठेवलेला पदार्थ बाहेरून आतल्या बाजूला तापत जातो पण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रात गरम करायला ठेवलेला पदार्थ यात आतबाहेर सर्वकडे तापतो, पण ते भांडे मात्र थंडच राहते. ते सहजपणे उचलून टेबलावर आणून ठेवता येते. या खास सोयीमुळे नवे खाद्यपदार्थ शिजवण्यापेक्षा फ्रीजमधून काढलेले थंड पदार्थ किंवा बाजारातून आणलेले तयार खाद्यपदार्थ गरम करण्यासाठीच मायक्रोवेव्ह ओव्हनचा जास्त उपयोग केला जातो. हे काम काही संकंदांमध्ये होते हा याचा मुख्य फायदा आहे. मात्र कुठल्याही प्रकारची धातूची वस्तू चुकूनसुद्धा या ओव्हनमध्ये ठेवायची नसते. तसे केले तर त्यातल्या अतीसूक्ष्म विद्युत लहरींना (मायक्रोवेव्ह्ज)ना विरोध होणार नाही आणि एक प्रकारचे शॉर्ट सर्किट होऊन ती ओव्हन खराब होऊ शकते.

कॉइलच्या शेगडीवरच्या भांड्याला बाहेरून ऊष्णता मिळते, इंडक्शन कुकरमध्ये थेट भांडेच तापते आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तर भांड्यातला पदार्थच तेवढा गरम होतो अशी गंमत आहे. विजेचा प्रवाह कमी किंवा जास्त करून त्यांचेवर नियंत्रण करण्याची अनेक साधने निघाली आहेत. एकदोन बटने दाबून तापमान (टेंपरेचर) आणि वेळ निश्चित करून दिली की ती ओव्हन्स आपल्या आपण चालत राहतात आणि ठराविक वेळानंतर बंद होतात. त्यांच्यावर लक्ष ठेवायची गरज नसते. अशा फायद्यांमुळे विजेच्या उपकरणांद्वारे स्वयंपाक करण्याचे एक नवे दालनच उघडले गेले आहे.

भारतात विजेचे दर अवाच्या सव्वा असल्यामुळे यांचा वापर अजून तसा कमीच होतो, पण वाढत्या शहरीकरणाबरोबर त्याचे प्रमाण वाढत आहे. युरोपअमेरिकेतल्या हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेऊन फक्त श्वासोछ्वासापुती थोडी मोकळी हवा खेळती ठेवली जाते, ती ज्वलनात खर्च होऊ नये, शिवाय हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून घरात इंधन जाळण्याचे प्रमाण कमीत कमी ठेवले जाते. विजेवर चालणारी उपकरणे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) होत चालली आहेत, कमी वेळात काम करतात. या कारणांमुळे आजकाल परदेशांमध्ये मात्र बहुतेक सगळा स्वयंपाक विजेवरच होऊ लागला आहे.

. .. . . . . . . . . . . . . . . . . .. . (क्रमशः)

पुढील भाग १०-१२ https://anandghare2.wordpress.com/2023/01/12/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-4/

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ४ – ६

मागील भाग :
स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान …. (खास पुरुषांसाठी) – भाग १ – ३ प्रस्तावना आणि पूर्वतयारी
https://anandghare2.wordpress.com/2022/10/11/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86/

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान …. (खास पुरुषांसाठी) – भाग ४ – यांत्रिक क्रिया

टारझन किंवा मोगलीसारखे घनदाट जंगलात राहणारे आदिवासी लोक अजूनही नैसर्गिक स्वरूपात मिळणारे अन्नच खात असतील, पण मी हा लेख त्यांच्यासाठी लिहिलेलाच नाही आणि तो चुकूनसुद्धा त्या लोकांच्या वाचनात येण्याचीही सुतराम शक्यता नाही. आंतर्जाल (इंटरनेट) पाहणाऱ्या सुशिक्षित लोकांच्या स्वयंपाकघरात चूल, शेगडी, ओव्हन यासारख्या साधनांनी त्यांचे अन्न भाजून किंवा शिजवून ते पचण्यायोग्य तयार करण्याची व्यवस्था नक्कीच असते. गेल्या काही शेकडो किंवा हजारो पिढ्यांपासून आपल्या पोटांना रांधलेले अन्नच खायची संवय झालेली आहे. असे असले तरी कांदे, टोमॅटो, काकड्या अशासारख्या भाज्या आपण अजूनही कच्च्याच खाऊ शकतो आणि पचवूही शकतो, पण म्हणून कोणी अख्खा मुळा किंवा गाजर पानात वाढत नाहीत. बहुतेक घरांमध्ये त्या भाज्याही त्यांच्या फोडी किंवा काप करूनच खाल्ल्या जातात.

भाज्यांना चिरून त्यांच्या लहान किंवा मोठ्या फोडी करतात, किसणीने त्यांचा कीस काढतात, आले, लसूण, मिरची वगैरेंना ठेचून, बारीक वाटून किंवा कुटून त्यांचा ठेचा करतात. या सगळ्या यांत्रिक (मेकॅनिकल) क्रियांमागले विज्ञान आधी पाहू. भाजी चिरून उघडी ठेवली की तिच्या प्रत्येक तुकड्याचा त्याच्या सर्व बाजूंनी हवेशी संपर्क येतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास चिरलेल्या भाज्यांच्या पृष्ठभागांचे क्षेत्रफळ (सरफेस एरिया) अनेक पटींने जास्त असते. यामुळे त्यांची वातावरणाशी होणारी देवाणघेवाणही अनेक पटीने वाढते. ही कशा प्रकारची असते ?

कपडे पसरून वाळत घातले की ते लवकर वाळतात कारण वाढलेल्या क्षेत्रफळामुळे त्यातल्या पाण्याची वाफ होण्याची क्रिया (बाष्पीभवन) अधिक वेगाने होते. याचप्रमाणे चिरलेल्या भाज्या हवेच्या संपर्कात येताच त्या लवकर सुकायला लागतात. आपण कांदा चिरतो तेंव्हा त्यातला एकादा तीव्र घटक पाण्याच्या वाफेप्रमाणेच उडून हवेत मिसळतो. त्याचे अतीसूक्ष्म असे कण आपल्या डोळ्यात गेले तर चुरचुरून डोळ्यात पाणी येते. ते नाकात शिरल्याने आपल्याला त्यांचा वास येतो. स्वयंपाकघरात चिरलेल्या कांद्याचा वास बाहेरच्या खोलीत किंवा शेजारीसुद्धा पसरतो पण टोपलीतल्या कांद्याचा फारसा पसरत नाही. याचाच अर्थ चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्यांमधला पाण्याचा अंश आणि आणखी काही घटक हवेमध्ये विलीन होतात आणि हवेसोबत पसरत जातात, अर्थातच ते आपल्या खाण्यात येत नाहीत. ही त्या भाज्यांची हवेशी होणारी देवाण झाली. आता घेवाण कशा प्रकारची होत असते तेही पाहू.

हवेमध्ये असलेली वाफ व धुळीचे कण आणि त्यांच्यासोबत असू शकणारे व्हायरस व बॅक्टीरियांसारखे सूक्ष्म जीव या भाज्यांकडे आकर्षित होऊन त्यांना चिकटून बसतात. चिरलेल्या कांद्याच्या या खास गुणासंबंधीचे संदेश (मेसेजेस) ई मेल, फेसबुक आणि आता वॉट्सअॅपवर अनेक वेळा फिरतांना दिसतात. त्या रोगजंतूंना म्हणे कांदे खूप आवडतात. ते मेसेजेस वाचनात आल्यापासून मला थोडे अस्वस्थच वाटायला लागले आहे कारण मलाही कच्चा कांदा खायला आवडतो. आता माझ्या आणि व्हायरस व बॅक्टीरिया यांच्या आवडी सारख्या का असाव्यात ? त्या संदेशांमध्ये जर थो़डेसे तथ्य असेल तर मात्र आपण त्या धोक्यापासून जरा जपून रहायला पाहिजे. हा चिरलेला कांदा पुढे तळला किंवा शिजवला जाणार असला तर ते रोगजंतू त्या क्रियेमध्ये आपोआप नष्ट होतील, पण कच्चा कांदा खाल्ला गेला तर त्यापासून धोका असू शकतो.

अदृष्य अशा व्हायरस व बॅक्टीरियांप्रमाणेच माशा, चिलटे आदि कीटकांना देखील चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्या फार म्हणजे फारच आवडतात. हवेमधून पसरलेला त्यांचा गंध या कीटकांपर्यंत पोचतो ना पोचतो तेवढ्यात ते आपापल्या आप्तेष्टांना लगेच बोलावून घेतात आणि त्यांचे थवेच्या थवे त्या अन्नपदार्थांवर घोंघावू लागतात. मग त्यांच्या पायांना, पंखांना आणि शरीरांना चिकटलेले व्हायरस व बॅक्टीरिया सुद्धा आलेच. जास्त वेळ गेला तर हे कीटक तिथेच आपली अंडीपिल्ली घालून प्रजोत्पादनालाही सुरुवात करून देतात. बुरशीसारखे वनस्पती जातीमधले जीव ही त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी हलवतात आणि वाढीला लागतात. चिरून किंवा किसून ठेवलेल्या भाज्यांमध्ये हवेमार्फतच या सर्वांचा प्रवेश होतो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास भाज्यांना आधीपासून चिरून किंवा किसून उघडे ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. थोडा वेळ ठेवायच्याच असल्या तरी त्यांना झाकून ठेवावे म्हणजे त्यांचा हवेशी कमी संपर्क येईल. पण पूर्णपणे सीलबंद करून ठेवण्यातही वेगळा धोका असतो. या भाज्या शेतामधून तोडून आणल्या असल्या तरी त्या मृत झालेल्या नसतात, त्या अजूनही जीवंत असतात. त्यांचा सुद्धा श्वासोच्छ्वास सुरू असतो, त्यासाठी त्यांना प्राणवायू (ऑक्सीजन)ची आवश्यकता असते. पूर्णपणे सीलबंद करून ठेवल्या तर त्या गुदमरून जीव सोडतात आणि अॅनॉरॉबिक प्रजातीचे जीवाणू त्यांना कुजवण्याची क्रिया सुरू करतात. अशा नासक्या सडक्या भाज्या आपण कधी खात नाही. निवडतांना तो भाग काढून टाकतो.

चिरणे, कापणे, किसणे, वाटणे वगैरे क्रियांमधल्या तंत्रज्ञानात झालेली प्रचंड प्रगती तर मी माझ्या आयुष्यातच पाहिली आणि अनुभवली आहे. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या स्वयंपाकाचे सगळे काम जमीनीवर बसूनच केले जात असे. विळी, किसणी, खलबत्ता, पाटा-वरवंटा वगैरे आयुधे जमीनीवरच मांडून त्यावर चिरणे, किसणे, कुटणे, वाटणे वगैरे केले जात असे. उखळ आणि जाते तर जमीनीमध्ये गाडून ठेवलेले असायचे. भाजी चिरण्याच्या विळीच्या वक्राकृती पोलादी पात्याला दर महिन्या दोन महिन्यात एकदा तरी धार लावून घ्यावी लागत असे. ते पाते एका लाकडी पाटाला पक्के जोडलेले असायचे. त्या पाटावर बसून त्या विळीवर भाजी चिरणे हा कौशल्याचा भाग असायचा आणि त्या कामात एकाग्रता (कॉन्सेंट्रेशन) फार आवश्यक असायची. “नजर हटी और दुर्घटना घटी।” या घोषवाक्या(स्लोगन)नुसार जरा इकडे तिकडे लक्ष गेले की भाजीबरोबर आपले एकादे बोट कापले गेलेच समजा !

मी मुंबईला आल्यानंतर तिथल्या घरातल्या किचनमध्ये ओटा होता. तिथे उभ्याने स्वयंपाक करतांना विळीचा उपयोग सोयीचा नव्हता. यामुळे तिच्या जागी सुरी आली, पुढे तिची जागा स्टेनलेस स्टीलच्या दंतुर चाकूंनी घेतली. या साधनांमध्येसुद्धा बोट कापण्याची भीती असली तरी ती सौम्य झाली होती. पूर्वीच्या काळी चौकोनी या एकाच आकाराची पितळेची किसणी असायची. त्यातून जरा भरड असा एकाच आकाराचा कीस निघत असे. त्या किसाला कुटून किंवा वाटून पाहिजे तेवढे बारीक केले जाई. किसण्याच्या कामात काकडीबरोबर आपल्या बोटांची सालडीही सोलून निघायची भीती असायचीच, त्यामुळे त्यातही एकाग्रता आलीच. पुढे स्टेनलेस स्टीलच्या अनेक आकारांच्या आणि प्रकारांच्या किसण्या बाजारात आल्या. भुईमुगाचे दाणे (शेंगदाणे) कुटून त्याची पूड करण्याऐवजी एका यंत्रामध्ये घालून त्याचा किसून भुगा केला जाऊ लागला. पण त्याला कुटलेल्या दाण्यासारखी चंव मात्र येत नाही असे अनेकांचे म्हणणे असते. अंजलीसारख्या ब्रँडनेमखाली बाजारात आलेल्या अनेक यंत्रांमुळे चिरणे, किसणे वगैरे कामे थोडी सोपी आणि सुरक्षित झाली. तरी ती यंत्रेसुद्धा हातानेच चालवावी लागतात आणि त्या कामालाही वेळ लागतो.

विजेवर चालणाऱ्या मिक्सर ग्राइंडर यंत्रांनी मात्र खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणली. कारखानदारीमधून सुरू झालेले यंत्रयुग त्यांनी थेट स्वयंपाकघरात आणले. किसायचा किंवा वाटायचा असलेला पदार्थ एका गोल आकाराच्या भांड्यात ठेवला आणि मशीनचे बटन दाबले की त्या भांड्याच्या मधोमध असलेल्या उभ्या दांड्याला जोडलेले एक धारदार पाते दर मिनिटाला हजारो आवर्तने (आर पी एम) इतक्या वेगाने घूँँँँँँँँँँँँँँ करत फिरते आणि आपल्याला हवे असलेले काम चुटकीसरशी करून देते. मी मुंबईला आलो त्या काळात हे यंत्र भारतात तयार होत नव्हते आणि स्थानिक बाजारात मिळतही नव्हते. परदेशदौरा करून आलेले लोक आपल्या जवळच्या आप्तांसाठी ते घेऊन येत. स्मगलिंग करून आणलेला मौलिनॅक्स कंपनीचा मिक्सर काही लोक मनिष मार्केटमधून घेऊन येत आणि आपल्या आतेभावाच्या मेहुण्याने दिला वगैरे थापा मारत किंवा लपवून ठेवत. सुरुवातीच्या काळात हे यंत्र जरा नाजुक असायचे आणि अतिशय जपून वापरावे लागत असे. कारण ते बिघडले तर दुरुस्त करण्याची सोय नसायची. पुढे सुमीतसारख्या ब्रँडने मात्र दणकट बनावटीचे यंत्र तयार केले आणि घरोघर आणले. त्याचा आणखी विकास होऊन आता फूड प्रोसेसर अशा भारदस्त नावाखाली ते मिरवते. नवीन स्वयंपाकघरात त्या यंत्रासाठी खास जागा तयार केली जाते.

. . . . . . . . . . . . .

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान …. (खास पुरुषांसाठी)

भाग ५ – भाजणे, तळणे, शिजवणे

स्वयंपाकघर म्हंटले की खेड्यातल्या माणसाच्या डोळ्यासमोर मातीच्या चुली येतात, तर पूर्वीच्या काळी लहान गावातल्या लोकांच्या डोळ्यासमोर केरोसीनचा (रॉकेल) स्टोव्ह येत असे. आता तिथेही गॅस मिळायला लागला आहे. शहरातल्या बहुतेक लोकांना ओट्यावर ठेवलेली गॅसची शेगडीच आठवते आणि इकडच्या काही लोकांना तसेच परदेशी रहाणाऱ्या सगळ्या लोकांना हॉट प्लेट्स, ओव्हन्स वगैरे विजेवर चालणारी साधने डोळ्यांसमोर येतात, कारण अशा ऊर्जस्वी साधनांकडेच स्वयंपाकामधली मुख्य भूमिका नेहमी दिलेली असते. विळी, किसणी वगैरे बिचारींना दुय्यम (आताच्या भाषेत सहाय्यक) भूमिकांवर समाधान मानावे लागते. प्रमुख भूमिकांमधल्या साधनांमध्ये इंधनापासून किंवा विजेपासून ऊष्णता निर्माण होते आणि ती अन्नाला देऊन त्यावर भाजणे, शिजवणे, तळणे वगैरे प्रक्रिया केल्या जातात. ही ऊष्णता कशी निर्माण होते, ती अन्नपदार्थांपर्यंत कशी पोचवली जाते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होतात या सगळ्यांमध्ये विज्ञान ठासून भरलेले आहेच. त्या विज्ञानातील तत्वांचा उपयोग करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचाही खूप विकास झाला आहे.

मक्याचे कणीस, भरतासाठी वांगे किंवा तंदूरी चिकन यासारखे पदार्थ थेट आगीतच धरून भाजतात, तर भाकरी, पोळी, डोसा वगैरेंना तव्यावर भाजले जाते. त्यासाठी तापवलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब टाकला की लगेच सुर्र असा आवाज काढत त्याची वाफ होऊन जाते आणि तेलाचा थेंब टाकला की काही क्षणांमध्ये त्याचा भडका उडतो. याचा अर्थ तापलेल्या तव्याचे तापमान प्रत्यक्ष आगीपेक्षा थोडे कमी असले तरी पाण्याचा उत्कलन बिंदू (बॉइलिंग पॉइंट) आणि तेलाचा ज्वलनबिंदू (फ्लॅश पॉइंट) याहून ते जास्त असते. तळणीचे तेल याहून जरा कमी ऊष्ण ठेवले जात असले तरी त्यात टाकलेल्या पाण्याची लगेच वाफ होतेच. अन्न शिजवण्याच्या क्रियेत पाणी उकळल्यानंतर त्याचे तापमान (टेंपरेचर) सुमारे १०० अंश सेल्सियस (सेंटिग्रेड) वर स्थिर असते. प्रेशर कुकरमध्ये ते त्याहून थोडे जास्त असते. म्हणजे शिजवणे, तळणे आणि भाजणे या क्रिया अधिकाधिक तापमानावर होत असतात.

या क्रियांमध्ये नेमके काय होत असते ? गहू, तांदूळ, कडधान्ये वगैरेंच्या अंतर्गत रचनेत त्या धान्यांचे सूक्ष्म कण एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात. पोटातल्या निरनिराळ्या पाचक रसांशी त्यांचा संयोग होण्यात अडचणी येतात. यामुळे ती कच्ची धान्ये पचायला जड असतात. त्यांचे दळून पीठ केले तरी त्या पिठाच्या एक एक कणांमध्ये अनंत अतीसूक्ष्म असे कण दडलेले असतात. शिजवतांना ते सैल होतात, तसेच कदाचित त्यांच्यात काही रासायनिक क्रिया घडतात. यामधून ते कण मऊ होतात आणि त्यांचे पचन होणे सुलभ होते. भाजण्याच्या क्रियेमध्ये वरवरचा भाग जळून कडक होतांना दिसत असला तरी आतले मक्याचे दाणे किंवा वांगे हे एक प्रकारे शिजते आणि मऊ होते तसेच रुचकर होते. तळण्याच्या क्रियेत सुद्धा भज्याच्या पोटातले पीठ, कांद्याचे किंवा बटाट्याचे काप वगैरेंमध्ये असलेल्या पाण्याची वाफ होऊन ते शिजतात, शिवाय तेलाचे सूक्ष्म कण त्यांच्यात मिसळून एक वेगळी चांगली चंव त्या तळलेल्या भज्यांना आणतात.

भाजायला ठेवलेल्या पदार्थांना खालून ऊष्णता मिळत असते, तसेच वरील हवेमुळे ते वरून थंड होत असतात. भाजले जाणारे पदार्थ सतत फिरवत ठेवतात. यामुळे त्यांचे तापमान (टेंपरेचर) प्रमाणाबाहेर वाढू दिले जात नाही. तसे न करता ते पदार्थ तसेच काही वेळ आगीमध्येच ठेऊन दिले, तर मात्र त्यांच्या आगीत असलेल्या भागाचे तापमान ज्वलनबिंदूपर्यंत पोचते आणि ते पदार्थ जळायला लागतात. अन्नामधील पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) हे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सीजन यांच्या संयोगामधून तयार झालेले असतात. जळण्याच्या क्रियेमध्ये आधी त्यांचे विघटन होते, त्यामधून निघालेल्या हायड्रोजन व ऑक्सीजन यांच्यापासून पाण्याची वाफ तयार होऊन ती हवेत निघून जाते आणि कार्बन जळतो, तरी काही भाग शिल्लक राहतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांच्यामधील पाण्याचा अंशामुळे त्या कार्बोहायड्रेट्सचे पूर्ण ज्वलन होत नाही आणि अर्धवट जळल्यामुळे त्यांचा काळा कोळसा होतो. यामुळे करपलेला भाग काळा दिसतो. त्या पदार्थाला तसेच जळत ठेवले तर मात्र तो कोळसासुद्धा पेट घेतो आणि जळून खाक होतो. “लकडी जल कोयला बने, कोयला जल बने राख।” असे एक मीराबाईंचे सुंदर पद आहे. त्यात हे उदाहरण दिले आहे.

वांगे भाजतांना फक्त त्याच्यावर असलेल्या सालीचा जळून कोळसा होऊ दिला जातो आणि तिला काढून टाकून आतला चविष्ट गर खाल्ला जातो. तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजतांनासुद्धा ती जळणार नाही इकडे सतत लक्ष ठेवावेच लागते. यासाठी तव्यावर टाकल्यानंतर काही संकंदात त्यांना उलथून पुन्हा तव्यावर टाकले जाते. त्यांचा तव्याशी स्पर्श करणारा म्हणजे खालचा पृष्ठभाग भाजला जात असतांना आधी त्यामधील पाण्याच्या अंशाची वाफ होऊन तो कडक होतो आणि त्यानंतर तो करपायला लागतो. तापलेल्या तव्यावरील भाकरी तरीही काढली नाही तर ती आतपर्यंत करपत जाऊन संपूर्ण काळी ठिक्कर पडेल आणि तरीही तशीच तव्यावर राहिली तर तिची जळून राख होईल.

तळण्याच्या बाबतीतसुद्धा वरील प्रमाणे करपणे घडतेच. तळण्याच्या क्रियेत सुरुवातीला त्या तळणीमधील पाण्याची वाफ होऊन त्यातला ओलावा कमी होत जातो आणि ते भजे किंवा ती चकली कडकडीत होत जाते. त्यानंतर तेलाचे तापमान वाढू लागते तसे तळणीचे पदार्थ करपायला लागतात. तरीही तिकडे लक्ष दिले नाही तर तेलच उकळून त्याची वाफ होऊ लागते आणि ती पेट घेऊन ते तेलसुद्धा कढईच्या आत जळायला लागते.

डाळ तांदूळ शिजवतांना त्यात भरपूर पाणी घातले असेल तर शिजवण्याच्या क्रियेत ते पाणी त्या धान्यांमध्ये शोषले जाते आणि त्यामुळे ते अन्न शिजते. शोषले गेलेले पाणी त्या धान्यामधील घट्ट चिकटलेल्या कणांना एकमेकांपासून थोडे दूर करते. यामुळे ते अन्न फुगते. मूठभर तांदूळ शिजायला ठेवले तर त्यापासून झालेल्या भाताचे आकारमान कित्येक पटीने जास्त असते. गरजेपेक्षा जास्त पाणी घातले असेल तर मात्र ते शिल्लक राहते आणि ते काढून टाकून दिले तर अन्नातील काही उपयुक्त तत्वे त्यांच्याबरोबर निघून जातात. पाणी कमी घातले गेले तर तो भात किंवा ते वरण न शिजता कच्चेच राहते. इतकेच नव्हे तर भांड्याच्या बुडाला करपतेसुद्धा. याकारणाने अन्न शिजवण्याच्या बाबतीत ते अन्न आणि त्यात घालायचे पाणी यांचे प्रमाण लक्षपूर्वक ठेवावे लागते.

या पाकक्रियांमध्ये विज्ञानाचा भाग कमी आणि पाककौशल्याचा भाग जास्त असतो.

. . . . . .. . . . . . . . . ..

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ६ – अग्निदिव्य -१

आपल्या स्वयंपाकघरात तयार होणारे बहुतेक सगळे अन्नपदार्थ भाजणे, शिजवणे किंवा तळणे अशा प्रकारच्या अग्निदिव्यामधून गेल्यानंतर ते रुचकर आणि पचनसुलभ बनतात. यासाठी त्यांना ऊष्णता देणाऱ्या अग्नीचे स्वरूप आणि गुणधर्म जाणून घेणे स्वयंपाककलेत खूप महत्वाचे असते. माझी आई विज्ञान हा एक विषय म्हणून कधीच शाळेत जाऊन शिकली नव्हती. ऊष्णतेचे वहन (कंडक्शन), अभिसरण (कन्व्हेक्शन) आणि उत्सर्जन (रेडिएशन) यांच्यासंबंधीचे थर्मोडायनॅमिक्समधले (औष्णिकगतिशास्त्रामधील) किचकट नियम तिने कधी वाचले नव्हते किंवा ते असतात हे सुद्धा तिने ऐकलेले नव्हते. त्यातल्या फॉर्म्यूलांबद्दल (सूत्रांबद्दल) तर ती संपूर्णपणे अनभिज्ञ होती. तरीसुद्धा स्वयंपाकघरात काम करत असतांना आलेल्या अनुभवांमधून तिला त्या क्रियांचे जेवढे सखोल आकलन झाले होते तेवढे अनेक पढिक इंजीनियरांना झाले नसेल. स्वयंपाकातल्या या कामातले विज्ञान कोणतीही सूत्रे (फॉर्म्यूले) व गणिते न मांडता सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचा एक प्रयत्न मी या लेखात केला आहे.

लाकूड, कोळसा, रॉकेल किंवा गॅस अशा स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इंधनांना जाळून त्यामधून चुलीशेगडीत आग निर्माण करतात आणि त्या इंधनांचा वेगळेपणा कसा आहे एवढे सर्वांनाच ठाऊक असते. एका क्षुल्लक ठिणगीने गॅसचा लगेच भडका उडतो तर रॉकेलमध्ये बुडवलेला स्टोव्हचा काकडा काडेपेटीतल्या जळत्या काडीने पेटवावा लागतो. चुलीमधल्या लाकडाने पेट घेण्यासाठी आधी कागद, गोवरी वगैरे पेटवून आणि फुंकणीने फुंकून बराच प्रयत्न करावा लागतो. पण एकदा का जाळ निर्माण झाला की त्यानंतर मात्र ते इंधन जळत राहते. असे का होत असेल ?

हवेमध्ये सुमारे वीस टक्के प्राणवायू (ऑक्सीजन) असतो एवढे सामान्यज्ञान आजकाल बहुतेकांना असते. हवेमधील या प्राणवायूचा इंधनाशी संयोग झाला की ते पेट घेते. पण ही क्रिया सर्वसाधारण तापमानाला म्हणजे रूम टेंपरेचरला घडत नाही. लाकूड, कोळसा, रॉकेल वगैरे इंधने कधीही ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत. पण ठिणगी किंवा जळती काडी यातून ही क्रिया सुरू करून दिली की त्या इंधनांच्या ज्वलनामधून खूप ऊष्णता बाहेर पडते आणि त्यामुळे त्या ठिकाणचे तापमान वाढत जाते आणि त्या वाढलेल्या टेंपरेचरला आजूबाजूचे अधिकाधिक इंधन पेटत जाते. लाकडाचा किंवा कोळशाचा ढिगारा असला तर तो पेट घेऊन मोठी आग लागेल, पण चूल किंवा शेगडीमध्ये त्यांचे प्रमाण थोडेसे असल्यामुळे स्वयंपाक करण्यापुरती लहानशी आग तिथे तयार होते.

आगीला टिकवून धरण्यासाठी जशी इंधनाची गरज असते तितकीच प्राणवायूचीसुद्धा असते. एकाद्या बंद डब्यामध्ये जळता निखारा ठेवला तर तिथल्या हवेतला प्राणवायू संपला की तो आपोआप विझून जातो. चूल आणि शेगडी यांनाही ज्वलनासाठी पुरेशी हवा मिळणे आवश्यक असते. आगीचा एक गुणधर्म असा आहे की ज्वाला नेहमी वरच्या बाजूलाच जाते. आगीतल्या ऊष्णतेमुळे तापलेली हवा आणि धूरही वर वरच जातो आणि धुराड्यामधून घराबाहेर पडतो. चूल आणि शेगडीच्या खालच्या बाजूने बाहेरची थंड हवा आत शिरून आतील आगीला जळत ठेवते आणि तापलेली हवा वर वर जाते. ज्वलनासाठी तिथली हवा कमी पडली तर आग कमी होते त्या वेळी फुंकणीने किंवा खास प्रकारच्या पंख्याने जास्त हवेचा पुरवठा करतात. केरोसीनचा स्टोव्ह आणि गॅसची शेगडी यांना असा बाहेरून हवेचा आधार देण्याची गरज नसते. त्यांच्या आजूबाजूला हवा असणे एवढेच पुरेसे असते. स्टोव्हला पंप मारून टाकीमधून जास्त केरोसीन वर आणले जाते तेंव्हा त्याची धग वाढते, शेगडीचा नॉब फिरवून गॅसचा पुरवठा कमी जास्त केल्याने त्याची आंच कमीजास्त होते.

आजकाल चूल बरीचशी मागे पडत चालली असल्यामुळे यापुढील भागात मी फक्त शेगडीचाच उल्लेख करणार आहे कारण दोन्हीमागील विज्ञान सारखेच आहे. शेगडीवर ठेवलेले भांडे, तवा वगैरे आगीच्या संपर्कात येत असल्याने त्यांना अग्नीमधील ऊष्णता थेट मिळते. त्यामुळे त्यांचे तापमान वाढत जाते. आगीचा संपर्क फक्त त्यांच्या बुडाशी येत असतो, पण ही ऊष्णता वहनक्रियेने त्या भांड्याच्या वरच्या भागात पसरत जाते, म्हणजे तळातला जो भाग आधी आगीमुळे तापतो तो आपली थोडी ऊष्णता शेजारच्या भागाला देतो, त्यामुळे तोही तापतो. असे करता करता संपूर्ण भांडेच तापत जाते. तव्यावर ठेवलेली भाकरी किंवा पोळी त्यामुळे भाजली जाते आणि कढईत टाकलेली भाजी गरम होते आणि शिजते.

त्या भांड्यामधील अन्नाबरोबर पाणी ठेवले असेल तर याशिवाय आणखी एक गोष्ट घडते. भांड्याच्या तळातील भागातले पाणी तापते तेंव्हा ते गरम होते तसेच किंचित हलके होते आणि वरच्या बाजूला जाते आणि वरील पाणी खाली जाऊन त्याची जागा घेते. ते ऊष्ण होऊन वर जाऊन वरच्या पाण्याला खाली ढकलते. अशा प्रकारे त्या भांड्यातले पाणी आतल्या आत फिरत राहते आणि यामुळे त्या भांड्यामधले सगळे पाणी तापते. याला अभिसरण (कन्व्हेक्शन) असे म्हणतात.

या दोघींखेरीज आणखी एक क्रिया घडतच असते. ऊष्णतेचा एक गुणधर्म असा आहे की ती सतत सगळ्या बाजूंना बाहेर फेकली जात असते. या क्रियेला उत्सर्जन (रेडिएशन) असे नाव आहे. ऊष्णतेच्या या गुणधर्मामुळेच आपल्याला पृथ्वीवर बसल्या जागी खूप दूर असलेल्या सूर्यापासून रोज दिवसाउजेडी ऊर्जा मिळते. शेगडीवरील भांडेसुद्धा सगळ्या बाजूंना ऊष्णता बाहेर फेकत असते. यामुळेच त्या वेळी घरातल्या इतर खोल्यांच्या मानाने स्वयंपाकघर अधिक गरम किंवा ऊबदार वाटते. ऊष्णतेच्या या उत्सर्जनामुळे ते भांडे मात्र थोडे थंड होत असते. त्याला खालच्या बाजूने शेगडीकडून मिळणारी ऊष्णता अशा प्रकारे वाटली जात असल्यामुळे त्या भांड्याचे तापमान एका मर्यादेपर्यंत वाढून तिथे स्थिरावते. खूप मोठे पातेले शेगडीवर ठेऊन खाली अगदी मंद आंच दिली तर त्यातला पदार्थ बिरबलाच्या खिचडीप्रमाणे कधी शिजणारच नाही. असे का व्हावे? बिरबलाची खिचडी का शिजत नव्हती? हे आपण पुढील भागात पाहू.

. . . . . . . . . . . . . . . . . . .. . (क्रमशः)

पुढील भाग : स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ७ ते ९

ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

देव आणि दैव यावरील वादविवाद किंवा संवाद अनंत काळापासून चालत आले आहेत आणि दोन्ही बाजूंनी सबळ पुरावे आणि मुद्दे मांडले जातात. माणसाच्या जीवनात त्याला मिळणारे किंवा न मिळणारे शिक्षण, यश, सुख, दुःख, संपत्ति, विपत्ति वगैरे सगळे काही कोणी ब्रह्मदेव आधीच ठरवतो किंवा सटवाई देवी त्याच्या कपाळावर लिहून ठेवते आणि ते सगळे वेळेनुसार तसेच होत जाते अशी पारंपरिक श्रद्धा आहे. ती सगळी त्याच्याच या किंवा पूर्वीच्या जन्मामधील कर्मांची फळे असतात असे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात सांगितले जाते. देव सगळे बघत असतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे घटना घडत असतात असे इतर धर्मीयसुद्धा मानतात. पण यात खूप विसंगति दिसतात आणि हे तर्कसंगत तर वाटतच नाही, त्यामुळे हे बुद्धीला पटत नाही. पण कधी कधी संख्याशास्त्रात बसणार नाहीत इतके योगायोग जुळून येतात. त्यामुळे देवावर आणि नशीबावर विश्वास बसावा असे वाटते. मी निरनिराळ्या काळात या विषयावर लिहिलेले तीन लेख एकत्र करून प्रस्तुत केले आहेत. यात प्रामुख्याने मला आलेले अनुभव त्या त्या वेळीच लिहून काढलेले आहेत.

१. विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद

Tuesday, November 22, 2011

विज्ञानाच्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. “देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।” अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा “धर्म ही अफूची गोळी आहे.” असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानात देवाला स्थान नाही, पण कदाचित प्रारब्धाला असावे.

विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. “हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत” अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.

अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव ‘अणुशक्तीनगर’ असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणाऱ्या अनेक विद्वानांबरोबर माझा व्यक्तीगत परिचय झाला, मला अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

आपण ‘निधर्मी’ आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न मानणारे इतरधर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने त्यांच्या ईश्वराची प्रार्थना करीत. त्यासाठी त्यांनी आपापली वेगळी प्रार्थनास्थळे बांधली होती आणि तिथे विशिष्ट दिवशी ते मोठ्या संख्येने जमत असत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.

कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात कधीही येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.

वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच ‘विज्ञान’ आणि ‘ईश्वर’ या एकमेकांच्या विरोधी ‘म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह’ संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, “आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला ‘काँन्स्टंट’ हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे …” थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.

माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते सगळे एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते.

आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी “मी इलाज करतो, ‘तो’ बरे करतो (आय ट्रीट, ‘ही’ क्युअर्स)” असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, “कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही.” आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, “हे सगळे ‘तो’ ठरवतो.” त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.

गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी खाली दिलेल्या एका लेखात केले आहे. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची (‘नियर मिस्’ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. ‘त्या’चे कार्यक्षेत्र ‘संकटमोचन’ एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी ‘त्या’च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे.

मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. “हे आपले नाही, परक्याचे आहे” असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुसऱ्यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुसऱ्याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही.

शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. मला स्वतःलासुध्दा हा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणाऱ्या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणाऱ्या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभरही शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. ‘पॉझिटिव्ह’ किंवा ‘निगेटिव्ह व्हायब्रेशन्स’, ‘आत्मिक’ किंवा ‘प्राणिक’ प्रकारची ‘कॉस्मिक एनर्जी’ असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. ‘सिध्दीं’द्वारे तो ‘छूमंतर’ करणाऱ्यांकडे जात नाही. पुराणातील ‘सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां’ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तरच त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुसऱ्या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल.



२. ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

… Friday, November 18, 2011

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे.

सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.

असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुसऱ्या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.

प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.

जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुसऱ्याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.

पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.

आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात फार काही विशेष नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.

मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!


३. देव तारी ……. मला

Friday, May 08, 2015
भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा “अरे देवा (ओ माय गॉड)”, “देव जाणे (गॉड नोज)” असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच ‘देव आठवतो’ असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. “शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?” असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. “असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो.” असे उद्गार काढले गेलेच.

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, “या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर.” तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. “अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत.” एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.

हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.


४. योगायोग की भाग्य?

Thursday, August 07, 2008

दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच “भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला.” अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले, तसेच स्वतःचाच थोडा रागही आला.

पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून “हॅपी बर्थडे टू यू” म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्या मुलाचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला.

शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शाळेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती! मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे सहसा कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली.

लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नवऱ्याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल? आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही.

पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली.

खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्याच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते.

मीच लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे ‘सत्याचे प्रयोग’!

माझा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी जन्माला आलेली मोहन सहस्रबुद्धे नावाची आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली हा आणखी एक योगायोग. जुळ्या भावंडांचा जन्म एकाच दिवशी झालेला असतो. त्यांना सोडूनही शाळेतल्या वर्गात एकच जन्मतारीख असलेली दोन मुले असण्याची शक्यता असते, पण माझ्या बाबतीत तसे काही झाले नाही. शाळा, कॉलेज किंवा नोकरीतले समवयस्क सहकारी यातला कोणीच नेमका माझ्याच जन्मतारखेला जन्माला आलेला नव्हता, पण पत्नीच्या दूरच्या नात्यातला हा मोहन मला योगायोगाने कुठेतरी भेटला, आमचे जन्मतारखेबद्दल बोलणे झाले आणि त्यातून हा योगायोग दोघांना समजला. पण आमचे भाग्य किंवा आयुष्य यात फारशी साम्यस्थळे नव्हती. त्यामुळेही माझा ज्योतिषशाास्त्रावर मात्र कधीच विश्वास बसला नाही.

तेथे कर माझे जुळती – भाग १८- श्रीकांत भोजकर

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या व्यक्तींबद्दल मला खूप आदर वाटला, ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडला अशा लोकांची लहानशी व्यक्तीचित्रे मी ‘तेथे कर माझे जुळती’ या मथळ्याखाली माझ्या ब्लॉगवर चितारलेली आहेत आणि जी माणसे माझ्या मनाला चटका लावून हे जग सोडून गेली त्यांच्या आठवणी मी ‘स्मृती सोडुनी जाती’ या लेखमालेमध्ये लिहिल्या आहेत. गेला बराच काळ मी या दोन्ही विभागात नवे लेख लिहिलेच नव्हते. आता पुन्हा या मालिकांमध्ये भर घालणार आहे. मी आज ज्या व्यक्तीविषयी लिहायला घेतले आहे त्या माझ्या प्रिय मित्राबद्दल मला आदरही वाटतो, एके काळी त्याने माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला होता, पण आता त्याच्या फक्त आठवणीच राहिल्या असल्यामुळे हुरहूरही वाटते. यामुळे त्याच्या आठवणींचा समावेश कोणत्या मथळ्याखाली करावा हा मलाही एक प्रश्नच पडला होता.

मी पुण्याच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांच्या वसतीगृहात रहायला गेलो तेंव्हा प्रिन्सिपॉलपासून विद्यार्थ्यांपर्यत किंवा रेक्टरपासून मेसमधल्या वाढप्यापर्यंत त्या परिसरातली एकही व्यक्ती माझ्या ओळखीतली नव्हती. मी अचानक एका पूर्णपणे अनोळखी अशा जगात रहायला गेलो होतो आणि त्यामुळे मनातून थोडा भांबावलेलाच होतो. माझ्या खोलीत माझ्याच वर्गातली आणखी दोन मुले होती, त्यातला प्रदीप मुंबईहून आला होता आणि अशोक कोल्हापूरचा होता. त्या दोघांचेही पूर्वीपासूनचे काही मित्र आमच्या तसेच आधीच्या बॅचमध्ये शिकत असल्यामुळे ते दोघे नेहमी आपल्या मित्रांच्या कंपूत जाऊन बसायचे आणि मी थोडासा एकटा पडलो होतो, नवीन मित्र जोडण्याच्या प्रयत्नात होतो.

मी अशा अवस्थेत असतांना “तो काय म्हणतोय् काय की रेss, मी ते काय ऐकणार नै बsघss …” असे काहीतरी माझ्या ओळखीचे हेल काढून मोठ्याने बोलत असल्याचे आवाज कानावर पडले. ते आवाज आजूबाजूच्या खोलीमधून येत होते म्हणून मी पहात पहात गेलो आणि मला त्या आवाजाचा मालक श्रीकांत भोजकर दिसला, मध्यम उंची पण पिळदार बांधा, तशाच पिळदार मिशा, भेदक नजर वगैरेनी युक्त असे रुबाबदार व्यक्तीमत्व असलेला मुलगा. त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला विचारले, “तू पणss बेळगावकडचा का रेss?” माझा अंदाज बरोबर होता. तो बेळगावचाच होता, पण दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहिल्याने त्याच्या बोलीभाषेवर पुण्याचे संस्कार झाले होते. मी दोन वर्षे मुंबईत राहून आलो असल्यामुळे माझ्या जमखंडीच्या बोलीभाषेत बंबइया हिंदीतले धेडगुजरी शब्द घुसले होते, पण माझ्या बोलण्याची मूळची कानडी स्टाइल फारशी बदललेली नव्हती. आम्ही दोघे एकाच भागातले असल्याची खूण लगेच पटली आणि आमची अशी ओळख झाली. पुढे तिचे रूपांतर कधी गट्टीत झाले आणि ‘मिस्टर भोजकर’चा ‘भोज्या’ होऊन गेला ते कळलेही नाही.

आमच्या भोज्याचा स्वभाव बोलका होता आणि त्याला सगळ्या बाबतीत आवडही होती आणि गतीही होती. त्यामुळे त्याच्याशी बोलायला विषयांची कमतरता नव्हतीच, मला त्याच्याशी संभाषण सुरू करण्यासाठी मुद्दाम काही करायची गरजच कधी पडली नाही. बहुतेक वेळा तोच काही ना काही मजेदार गोष्टी रंगवून सांगत असे. त्याला आमच्या लहानशा जगातल्या सगळ्या विषयांची माहिती असायचीच, त्यातल्या प्रत्येकावर त्याचे मत असायचे आणि त्यावर तो ठाम असायचा. काही बाबतीत तर हट्टीसुद्धा म्हणता येईल. रूढी परंपरांच्या काही बाबतीत तो जुन्या विचारांचा होता. तो शुद्ध किंवा कट्टर शाकाहारी होता. त्यासाठी त्याने पूर्णपणे शाकाहारी असलेल्या कर्नाटक क्लबच्या सेक्रेटरीशी कानडीमधून बोलून त्या मेसमध्ये प्रवेश घेतला होता. आधी संमिश्र स्वरूपाच्या महाराष्ट्र क्लबमधल्या सामिष पदार्थांची चंव पाहून घेतल्यानंतर भोज्याच्या ओळखीने मीसुद्धा कर्नाटक क्लबचा सदस्य झालो.

चीनबरोबर झालेल्या युद्धानंतरच्या त्या धामधुमीच्या काळात पाकिस्तानशीसुद्धा युद्ध होण्याची शक्यता दिसत होती आणि आम्ही कॉलेजात असतांनाच ते युद्ध झालेही. त्या काळातली परिस्थिती पाहता आम्हाला एन सी सी चे प्रशिक्षण कंपल्सरी केले होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांनी परेड मैदानावर जाऊन हजेरी लावली. कमांडंटने सांगितले की सर्वांनी संपूर्ण चेहेऱ्याची चांगली गुळगुळीत दाढी करूनच परेडला यायला पाहिजे, म्हणजे मिशा सफाचट करायला हव्या होत्या. श्रीकांतला आपल्या पिळदार मिशांचा अभिमान तर होताच, पण वडील जीवंत असणाऱ्या मुलाने मिशा उतरवणे हे त्याच्या दृष्टीने अक्षम्य होते. त्याने या प्रॉब्लेमवरही मार्ग काढला. त्या वेळी नौदलाच्या एन सी सी ची वेगळी शाखा होती आणि त्या शाखेत दाढी ठेवली तर मिशा ठेवायला परवानगी होती. भोज्याने लगेच त्या शाखेत नाव नोंदवले आणि जितका काळ एन सी सी चे ट्रेनिंग होते तितका काळ तो सरदारजी होऊन राहिला होता.

त्याच्या अंगात उपजतच भरपूर नेतृत्वगुण होते. त्यामुळे तो पाहता पाहता आपसूकच आम्हा सर्वांचा लीडर बनला. दोन मुलांमधले भांडण मिटवायचे काम असो किंवा रेक्टरकडे जाऊन कसली तक्रार करणे असो सगळ्यांची नजर भोजकरकडे जाई आणि तो पुढाकार घेऊन ते काम यशस्वीपणे तडीला लावून देत असे. त्याने निवडणूक लढवली असती तर कुठलेही पद त्याच्याकडे सहज चालून आले असते, पण हातात घेतलेले कोणतेही काम मन लावून लक्षपूर्वक करायचे अशी सवय त्याला होती आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अशी कुठलीही जास्तीची जबाबदारी अंगावर घ्यायची नाही यावर तो ठाम होता.

कॉलेजच्या तीन वर्षांच्या काळात हॉस्टेलमधल्या ज्या सात आठ मित्रांचा आमचा एक ग्रुप तयार झाला होता त्यात भोजकर नैसर्गिक लीडर होता. नेहमीचे डेक्कनवर फिरायला जाणे असो किंवा हॉटेलमध्ये (शाकाहारी) खाद्यंती, रेडिओवरली गाणी ऐकणे, कधी नाटकसिनेमा, लहानशी पिकनिक, पत्त्यांचा अड्डा जमवणे, सबमिशन्सचे काम उरकणे असो, किंवा नुसताच हसतखिदळत टाइमपास करणे असो या सगळ्यांमध्ये त्याचा उत्साह असायचाच आणि तो इतरांनाही सोबत घेऊन, कधी कुणाला डिवचून तर कधी धीर देऊन सगळ्यांना कामाला लावायचा. पुढे जाऊन इनिशिएटिव्ह, ड्राइव्ह, मोटिव्हेशन वगैरे मॅनेजमेंटमधले शब्द ऐकतांना माझ्या नजरेपुढे भोजकरचे उदाहरण लगेच उभे रहात असे. सकारात्मक विचार आणि धडाडी या गुणांचे वस्तुपाठ त्याच्या वागण्यामधून मिळत होते. अशा मित्रांमुळेच आमच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाची खडतर तपश्चर्येची वर्षे बरीच सुखावह झाली होती.

१९६६ मध्ये माझे इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण संपले आणि मी नोकरीसाठी मुंबईला जाऊन तिथे स्थायिक झालो. त्या काळात संपर्काची काही साधनेच नव्हती. हॉस्टेलमधल्या मित्रांचे परमनंट अॅड्रेस नसायचेच, माझ्याप्रमाणेच ते सगळेही नोकरी मिळेल तिकडे जाणार हे ठरलेलेच होते. मग त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा तरी कसा करायचा? आमच्यातल्या कुणाकडेच टेलीफोनही नव्हते आणि त्या काळात ते लगेच मिळण्याची सुतराम शक्यताही नव्हती. त्यामुळे अचानक कोणीतरी एकादा कॉलेजातला मित्र प्रवासात किंवा सिनेमा थिएटरात अशा ठिकाणी भेटला तर त्याच्याशी थोडे बोलणे व्हायचे आणि त्याला अशाच कुठेतरी भेटलेल्या इतर मित्रांची खबरबात त्याच्याकडून कळायची. अशा प्रकारे पहिली दोन तीन वर्षे मला भोजकरबद्दल थोडी उडती माहिती मिळत गेली आणि नंतर तीही मिळणे कमी कमी होत थांबले. या अथांग दुनियेत तो कुठे रहात होता, काय करत होता याचा मला मागमूसही लागत नव्हता.

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या मुंबईत घर घेतले होते. तिथे आजूबाजूला काही नवेजुने मित्र रहात होते ते नेहमी मला भेटत असत. तोपर्यंत इंटरनेट सुरू झाल्यामुळे माझे अनेक मित्र आधी ईमेलमधून आणि नंतर ऑर्कुट, फेसबुक वगैरेतून संपर्कात राहिले होते, पण ते सगळे मला नोकरीच्या अखेरच्या काळात भेटलेले होते. शाळा आणि कॉलेजमधला माझा कोणताच मित्र माझ्या या नव्या संपर्कमाध्यमांच्या कक्षेत अजून आला नव्हता. दहा वर्षांनी मी पुण्याला स्थलांतर केल्यावर मुंबईतल्या मित्रांचे प्रत्यक्ष भेटणे थांबले आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले माझे जुन्या काळातले कोणते मित्र आता कुठे भेटतील याचा शोध मी सुरू केला.

जेंव्हा श्रीकांत भोजकर आता पुण्यातच राहतो हे मला समजले तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला भेटायची प्रचंड उत्कंठा मला लागली आणि तो योगही लगेचच आला. आम्ही इंजिनियरिंग कॉलेजमधून केलेल्या निर्गमनाला पन्नास वर्षे पूर्ण होण्याचा सुवर्णमहोत्सव समारंभपूर्वक साजरा करायचे माझ्या काही मित्रांनी ठरवले आणि त्यासाठी पुण्यातल्या सगळ्या बॅचमेट्सची एक बैठक मल्टीस्पाइस हॉटेलमध्ये ठेवली गेली. मी त्या मीटिंगला आवर्जून हजेरी लावली आणि यापूर्वी मी ज्यांना विशीमध्ये पाहिले होते असे पण आता सत्तरीमध्ये गेलेले अनेक मित्र एकसाथ भेटले. त्यातल्या ज्याला मी अगदी सहजपणे ओळखू शकलो तो श्रीकांत भोजकरच होता. त्या कार्यक्रमानंतर आम्ही एकमेकांची थोडी विचारपूस केली आणि पुन्हा भेटायचे ठरवून निरोप घेतला. त्या काळात मी स्वतः बिकट परिस्थितीमधून जात होतो त्यामुळे भोजकरच्या घरी जाऊन त्याला भेटणे मला शक्य झाले नाही, पण आम्ही टेलीफोनवरून अनेक वेळा बातचित केली, ई मेल, फेसबुक आणि वॉट्सॅपवरून संदेशांची देवाणघेवाण करीत राहिलो.

त्याच्या बोलण्यावरून मला असे समजले की भोजकरने आधीची काही वर्षे इंजिनियरिंगच्या क्षेत्रात काम केले आणि त्यामधून तो मॅनेजमेंटकडे वळला. पण दुसऱ्याची चाकरी करून तो सांगेल ते काम करण्यापेक्षा स्वतः शिक्षक होऊन इतरांना ज्ञानदान करणे श्रेष्ठ आहे असे त्याच्या मनाने घेतले आणि तो जीवनाचे रूळ बदलून शिक्षणक्षेत्रात गेला. तो जिथे जाईल तिथे त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो चमकणार तर होताच. त्याने या क्षेत्रातही थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये दौरे करून व्याख्याने दिली, कार्यशाळा चालवल्या आणि त्यातून असंख्य मॅनेजर्सना प्रशिक्षण दिले होते. तो कुणाकडे नोकरी करीत नसल्यामुळे सक्तीच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न नव्हता आणि आपले आवडते विद्यादानाचे व्रत सत्तरीमध्ये गेल्यावरसुद्धा जमेल तेवढे चालवतच राहिला होता. यामधून त्याचे अनेक चाहते निर्माण झाले होते आणि त्याचा लोकसंग्रह वाढतच होता.

सदानंद पुरोहित याने आमच्या बॅचच्या सुवर्णमहोत्सवासाठी पुढाकार घेऊन कामातला सिंहाचा वाटा उचलला होता, त्यासाठी तो रात्रंदिवस प्रचंड धडपड करीत होता, पण त्याच्या पाठीवर हात ठेऊन “तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत” असे त्याला सांगणाऱ्यांमध्ये श्रीकांत भोजकर प्रमुख होता. या कामासाठी सर्वानुमते जी समिति संगठित केली गेली होती तिचे अध्यक्षपण सहजपणे त्याच्याकडे आले होते आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेऊन तो समितीतल्या कार्यकर्त्यांना सतत योग्य मार्गदर्शन करत होता आणि त्यांच्या कामात सक्रिय सहभागी होत होता.

सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरसुद्धा पुण्यात राहणाऱ्या काही मित्रांनी एकमेकांना भेटण्यासाठी दर तीनचार महिन्यांमधून एकदा ब्रेकफास्ट मीटिंग करायची असे ठरवले आणि त्यातल्या पहिल्या एक दोन मीटिंग्जना भोजकरसुद्धा नेहमीच्या उत्साहाने हजर राहिला आणि आपल्या बोलण्यामधून त्याने रंग भरला. त्या दरम्यान आमच्या दोघांचाही कॉलेजमधला जवळचा मित्र असलेल्या कृष्णा कामतचा पत्ता मला लागला. तो बारा वर्षे आखाती प्रदेशात राहून नुकताच भारतात परत आला. त्याला मी आमच्या ब्रेकफास्ट मीटिंगबद्दल फोनवरून सांगितले आणि तो आला तर भोजकरसह आणखी काही जुन्या मित्रांची एकत्र भेट होईल असे आमिष दाखवले. त्याने यायचे लगेच कबूल केले आणि ठरल्याप्रमाणे तो पुण्याला आलासुद्धा.

पण त्या दिवशी भोजकर मात्र त्या मीटिंगला येऊ शकला नाही. मग मी त्याच्या घराचा पत्ता विचारून घेतला आणि कामतसह दोन मित्रांना सोबत घेऊन त्याचे घर गाठले. आम्ही त्याच्या घरी गेलो त्या वेळी तो खाटेवर झोपून राहिलेला नव्हता किंवा गंभीर आजारी असल्यासारखा वाटतच नव्हता, वरवर तरी तो तसा ठीकच दिसत होता. फक्त त्याने कंबरेला पट्टा बांधलेला होता आणि पाठीच्या कण्याला धक्का लागून त्रास होऊ नये म्हणून तो बाहेर हिंडत फिरत नव्हता असे त्याने सांगितले. वयोमानानुसार असा तात्पुरता त्रास अनेक लोकांना झालेला मी पाहिला होता म्हणून आम्हीही त्याला “चार दिवस आराम कर, मग सगळे ठीक होऊन जाईल.” असे सांगितले. आम्हाला भेटून त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही दीड दोन तास छान गप्पा मारल्या, पन्नास वर्षांपूर्वीचे हॉस्टेलमधले दिवस आठवून त्या वेळच्या अनेक मजेदार घटनांची उजळणी केली तसेच सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे काय काय करायचे प्लॅन आणि विचार आहेत यावरही थोडी हलकीफुलकी चर्चा केली. आता आमच्या जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा जुळायला सुरुवात झाली होती.

पन्नास वर्षांमध्ये भोजकरच्या मूळच्या उत्साही, सकारात्मक आणि हंसतमुख वृत्तीत काहीच फरक पडला नव्हता, तसेच आपल्या मतावर ठाम असण्याचा गुणही तसाच होता. फक्त दुसऱ्या कोणी विरुद्ध मत मांडलेच तर तो आता त्यावर वाद न घालता “जय जय रघुवीर समर्थ” किंवा “जेजेआरएस” असे म्हणून वादाला तिथेच पूर्णविराम द्यायला लागला होता. तो वॉट्सॅपवर काही धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकत असे ते पाहता त्याच्या धार्मिक वृत्तीत किंचित वाढ झाली असावी. टेलीफोन उचलल्यावर तो हॅलो न म्हणता “जय जय रघुवीर समर्थ” असे बोलायचा आणि संभाषणाची अखेरही त्या घोषवाक्याने करायचा. त्याची ही नवी लकब आता माझ्या कायम लक्षात राहणार आहे आणि त्याची आठवण करून देणार आहे.

पण त्यानंतरच्या आमच्या कुठल्याच ब्रेकफास्ट मीटिंगला तो येऊ शकला नाही. पण तो यारोंका यार होता. त्याला मित्रांबरोबर चार घटका हंसतखेळत घालवायची दांडगी हौस होती. परगावाहून किंवा परदेशामधून आलेला आमचा एकादा मित्र त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून यायचा आणि त्या भेटीची छायाचित्रे भोजकर स्वतःच वॉट्सॅप किंवा फेसबुकवर टाकायचा, असे दर महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी होतच असे. त्या फोटोतला त्याचा हंसरा चेहेरा पाहून त्याची तब्येत चांगली प्रगतिपथावर आहे असेच वाटायचे. त्याशिवाय सोशल मीडियावरून त्याचे इतर मेसेजेसही नेहमी येतच होते. मुळात त्याला एकादे गंभीर स्वरूपाचे दुखणे झाले होते हेच मला कित्येक महिने समजले नव्हते. दर मीटिंगच्या दिवशीसुद्धा “तो आज येणार आहे” असे कोणीतरी सांगायचा आणि सगळे खूश व्हायचे, त्याला जिने चढायची दगदग करावी लागू नये म्हणून आम्ही माडीवरच्या हॉलमध्ये न जाता खालच्या लॉनमध्ये जमायचो, पण वाट पाहून त्याला फोन केल्यावर तो या वेळी येऊ शकणार नाही असे समजत असे. असेही दोन तीन वेळा झाले.

त्याचे दुखणे म्हणजे वयोमानामुळे आलेली साधी पाठदुखी नसून त्याचे प्रोस्टेट ग्रंथींचे ऑपरेशन झाले असल्याचे मला बऱ्याच काळानंतर कळले. पण त्याच सुमाराला आमच्या दुसऱ्या एका मित्राचे तशाच प्रकारचे ऑपरशन झाले होते आणि तो तीनचार महिन्यात चांगला हिंडूफिरू लागला होता एवढेच नव्हे तर परदेशी जाऊन आला होता हे समजल्यामुळे मी भोजकरबद्दल निश्चिंत होतो. फक्त त्याला पूर्ववत धडधाकट व्हायला आणखी किती अवधी लागतो याची वाट पहात होतो.

मध्येच एकदा त्याला पुनः हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले आणि आता मात्र त्याला भेटून यायलाच हवे असे मी आपल्या मनाशी ठरवले. पण आज, उद्या, परवा करता करता मधले काही दिवस निघून गेले आणि एका सकाळी अचानकपणे तो आपल्यात राहिला नसल्याची धक्कादायक वार्ताच समजली. या वेळी आम्ही सगळे मित्र त्याच्या घरी जमलो ते त्याचे अंतिम दर्शन घेऊन साश्रु निरोप देण्यासाठी. तो तर आता काहीच बोलू शकत नव्हता, पण त्याने आम्हाला “जय जय रघुवीर समर्थ” असे म्हणूनच आमचा निरोप घेतला असणार असे मला वाटून गेले. या गोष्टींनाही आता तीन वर्षे होऊन गेली, पण त्या तशाच्या तशाच स्मरणात राहिल्या आहेत.

आनंदघन आणि निवडक आनंदघन

आनंदघन

जानेवारी २००६ मध्ये हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्या वेळी ते तसेही अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची एकूण संख्या शंभराच्या आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. त्याआधी मी आंतरजालावर एकंदरीतच जेमतेम दहा बारा ब्लॉग्ज वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्यामधील एकादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व ब्लॉग्जची शीर्षके निरर्थक तरी होती किंवा अनाकलनीय ! त्यामुळे मी तरी त्या नावांकडे एकेक खुणेचे दगड याहून अधिक लक्ष दिलेच नाही.

माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. आधी सगळे सोपस्कार तर होऊन जाऊ देत, ब्लॉगची सुरुवात तर होऊ दे, नंतर कधी तरी वाटल्यास नांव बदलून घेऊ असा विचार त्या क्षणी माझ्या मनात होता. पण नंतर मला कधी तसे करावेसे वाटलेच नाही कारण आनंदघन हेच नांव चांगले वाटायला लागले होते.

आनंदघन या शब्दाचा अर्थ काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे घनदाट आनंद, आनंद बरसणारा मेघ असा कांही तरी तो असणार. गणित विषयात ज्यांना गोडी वाटते ते त्याचा अर्थ आनंद गुणिले आनंद गुणिले आनंद अशी बीजगणितातील व्याख्या किंवा भूमितीमधील आनंदाचे त्रिमिति रूप असा काढू शकतील. आनंदघन म्हणजे आनंदाचा अर्क किंवा निर्भेळ आनंद असे परमेश्वराचे वर्णन आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केले आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्या खाली दिल्या आहेत.
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥

भारतरत्न लता मंगेशकर यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी स्व.भालजी पेंढारकरांच्या कांही मराठी चित्रपटांना अत्यंत मधुर असे संगीत देतांना संगीत दिग्दर्शक म्हणून आनंदघन हे नांव घारण केले होते. त्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांसोबत हे नांवसुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडावर झाले होते. अशा या नांवाचा उपयोग मी करू शकतो कां व ते कितपत योग्य आहे असे प्रश्न मनात येत होते. त्यावर मला असे वाटले होते की लता, आशा, मीना व उषा ही मंगेशकर भगिनींची नांवे धारण करणाऱ्या लक्षावधी स्त्रिया महाराष्ट्रात दिसतील. प्रसिद्ध व्यक्तींचे नांव आपल्या मुलाला ठेवण्याची आपल्याकडे पद्धतच आहे. तर मग मी आपल्या नवजात ब्लॉग बाळाला आनंदघन हे नांव ठेवणे तसे रूढीला धरूनच नाही का ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काळांत पूजनीय लतादीदी आनंदघन या नांवाने चित्रपटसंगीत देत होत्या, तेंव्हासुद्धा एक आघाडीची गायिका व एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्या लता मंगेशकर या मूळच्या नांवानेच प्रसिद्ध होत्या. गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी आनंदघन या नांवाने कांही कार्य केले असल्याचे मी तरी ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या टोपणनांवाचा उपयोग करून मला कांही फायदा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, किंवा त्यांच्या नांवावर मी आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही कुणाला वाटायला नको. या सगळ्या कारणांनी मी आनंदघन हेच नांव चालू ठेवले. आता सोळा वर्षे होऊन गेली तरी माझा हा ब्लॉग याच नावाने चालला आहे आणि पाच लाखांवर वाचकांनी त्याला भेटी दिल्या आहेत.

आनंदघन https://anandghan.blogspot.com/ हा ब्लॉग लिहिण्यामागील माझा मूळ उद्देश आधी नाविन्याचा आनंद मिळवणे हा होता आणि नाविन्य संपल्यानंतर निर्मितीचा आनंद मिळवणे हा होता. त्याचप्रमाणे तो वाचणाऱ्या लोकांनाही त्यापासून आनंद मिळणे आवश्यक आहे. तसाच माझा प्रयत्न अजूनही सुरू आहे.

निवडक आनंदघन

मी आनंदघन या ब्लॉगची सुरुवात ब्लॉगस्पॉटवर केली होती, पण याहू ३६० नावाच्या एका नव्या स्थळावर अधिक सुविधा होत्या म्हणून मी हा ब्लॉग याच नावाने तिथे लिहायला लागलो होतो. पण काही काळानंतर ते स्थळच बंद पडले आणि ब्लॉगस्पॉटची मालकी बदलून ती गूगलकडे गेली तरी ते स्थळ मात्र चालू राहिले, म्हणून मी या ब्लॉगचे पुनरुज्जीवन केले आणि तिकडचे बरेचसे लेख इथे पुनःप्रसारित केले. त्यानंतर मला वर्डप्रेस या आणखी एका नव्या स्थळाची माहिती मिळाली आणि त्यांची मांडणी अधिक आकर्षक वाटली. यदाकदाचित ब्लॉगरनेही आपले धोरण बदलले आणि तिथली ब्लॉगची सुविधा अडचणीत आली तर आपले लिखाण आंतरजालावर कुठे तरी उपलब्ध असावे अशा विचाराने मी वर्डप्रेसवर ‘निवडक आनंदघन’ हा वेगळा ब्लॉग सुरू केला. आनंदघन या मूळ ब्लॉगमधले मला स्वतःला जास्त पसंत पडलेले लेख पुन्हा वाचून आणि त्यात काही सुधारणा करून मी ते लेख या स्थळावर देत आलो आहे. वाचकांनी माझ्या या उपक्रमालाही भरघोस पाठिंबा दिला आणि या स्थळाला भेटी देणाऱ्या वाचकांची संख्याही आता तीन लाखांवर गेली आहे याचे मला समाधान आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार.

केवढा चांगुलपणा ?


स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुसऱ्यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

प्रभाताई ही प्रमोदची सर्वात थोरली बहीण होती आणि त्यांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या प्रमोदला प्रभाताईंनी तिच्या अंगाखांद्यावर खेळवले होते आणि प्रमोदला समज आल्यापासून तो तिला घरातल्या एकाद्या वडीलधारी व्यक्तीसारखा मान देत आला होता. दोघेही मोठे झाले, त्यांनी आपापले संसार थाटले, त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले. प्रभाताई अशीच एकदा प्रमोदकडे थोडे दिवस रहायला आली होती. तिचा सारा जन्म लहान गावातल्या मध्यमवर्गीय घरात गेला होता, तिथे तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती, पण प्रमोदला त्या मानाने जरा चांगले दिवस आले होते. आपल्या बहिणीने आपल्या घरी चार दिवस चांगले ऐशोआरामात रहावे, तिला कसलेही कष्ट पडू नयेत असे प्रमोदला वाटत होते. घराची साफसफाई, धुणी भांडी वगैरे कामे करण्यासाठी ठेवलेल्या कामवाल्या बायका दिवसातून दोन वेळा येऊन ती सर्व कामे करून जात असत. श्रम आणि वेळ वाचवणारी स्वयंपाकघरातील जेवढी उपकरणे आणि यंत्रे बाजारात आली असतील त्यातली बहुतेक सगळी प्रमोदच्या घरी होती. त्यामुळे स्वयंपाकाचे कामसुध्दा बरेच सोपे झाले होते. घरातले कोणीही प्रभाताईला कसल्याच कामाला हात लावू देत नव्हते. तिने दिवसभर बसून किंवा वाटल्यास लोळत राहून पडल्या पडल्या आराम करावा, टीव्हीवरील कार्यक्रम पहावेत, रेडिओ किंवा टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकावीत, पुस्तके आणि मासिके वाचावीत, वाटल्यास आजूबाजूला फेरफटका मारून यावा, देवळात जाऊन यावे अशी प्रमोदची विश्रांतीची कल्पना होती. पण प्रभाताईच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. तिच्या दृष्टीने ज्ञान, मनोरंजन, अध्यात्म वगैरे गोष्टी चवीपुरत्या ठीक होत्या. दिवसातला सगळा वेळ त्यात घालवणे तिला कठीण जात होते. आयुष्यभर ती घरातली सगळी कामे आनंदाने करत आली होती. आतासुध्दा भावाच्या घरातही निदान थोडेसे काम केल्याखेरीज तिला चैन पडत नव्हती, पण कोणीही तिला काहीच करू देत नव्हते. प्रमोद आणि प्रतिभाला काय वाटेल अशा विचाराने ती आपल्या मनातली बेचैनी दाखवत नव्हती, आपण तिथे मजेत असल्यासारखी वागत होती.

एकदा असे झाले की प्रभाताईचा गुरुवारचा उपास असल्याने तिला संध्याकाळी जेवायचे नव्हते. हे समजल्यावर तिच्या उपासाच्या फराळासाठी प्रतिभाने साबूदाणा भिजवून ठेवला. अचानक काही जरूरीच्या कारणाने तिला एका मैत्रिणीकडे जाणे आवश्यक झाले. प्रभाताईंना सोबत नेले तर त्यांना दगदग झाली असती, शिवाय ऑकवर्डही वाटले असते. त्यांना घरी एकटीने बसवून ठेवणेही प्रतिभाला प्रशस्त वाटले नाही. तिने फोनवर प्रमोदशी बोलून घेतले आणि काय करायचे ते ठरवले. प्रमोद ऑफीसमधून परत यायच्या वेळी ती तयार होऊन बसली आणि तो घरी येताच मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली.

त्या दिवशी प्रमोदला त्याचे सर्व काम संपवण्यासाठी ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. तिथली एक दोन कामे त्याच्याबरोबर घरी आली. त्यांचा शांतपणे अभ्यास करून आणि त्यावर विचार करून त्याला निर्णय घ्यायचा होता. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले आणि बॅग उघडून तो कामाचे कागद बाहेर काढणार होता तेवढ्यात त्याला प्रभाताईची हाक ऐकू आली. आपल्याला नको म्हणणारे कोणी नाही असे पाहून प्रभाताई स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यांची हाक ऐकून प्रमोद लगेच तिथे गेला. तिने साबूदाण्याची खिचडी करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी तिला कढई पाहिजे होती. त्याच्या स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली खण करून त्यात भांडी ठेवण्याची व्यवस्था होती आणि काही डबे ठेवले होते. ओट्यापासून दोन हात मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला कप्पे केले होते आणि काही डबे त्यात ठेवले होते. ओट्याखाली ठेवलेले सामान काढण्यासाठी खाली वाकावे लागत होते आणि वर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलावर चढावे लागत होते. वयोमानानुसार प्रभाताईंना या दोन्ही गोष्टी करणे कष्टाचे किंवा धोक्याचे होते. तिला स्वयंपाकघरातले कसले काम न सांगण्यामागे हेही एक कारण होते. शिवाय गॅस, ओव्हन, मिक्सर वगैरेंचा वापर कसा करायचा हे तिला माहीत नव्हते.

स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ठेवले असेल हे प्रमोदलाही नीटसे ठाऊक नव्हतेच. त्याने अंदाजाने कढई शोधून काढून दिली, त्याबरोबर झाराही दिला. साबूदाण्याची खिचडी कशी करतात आणि त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात हे त्याला माहीत नव्हते आणि ते कुठे ठेवले असतील याचीही कल्पना नव्हती. स्वयंपाकघरात आणलेला प्रत्येक पदार्थ ते नाव लिहिलेल्या ठराविक डब्यातच भरून तो डबा ठराविक फडताळातल्या ठरलेल्या जागीच ठेवायचा अशी शिस्त त्यांच्या घरी नव्हती. प्रभाताईला पाहिजे असलेले जिन्नस तिलाच शोधायला सांगणे त्याला योग्य वाटले नाही. कढई मिळताच तिने शेंगदाण्याचे कूट कुठे आहे ते विचारले. तयार केलेले कूट घरात असेल की नाही याची प्रमोदला खात्री नव्हती. निरनिराळे डबे काढून ते उघडून पहातांना त्याला एका डब्यात कच्चे शेंगदाणे सापडले. त्याने ते भाजले आणि मिक्सर चालवून त्याचे कूट करून दिले. त्यानंतर तूप, जिरे, खोबरे, मीठ, साखर वगैरे एक एक गोष्टीचं नाव काढताच प्रमोद ती शोधून काढून देत राहिला, तसेच गॅस पेटवायचा, विझवायचा, त्याची आच कमी किंवा जास्त करायची वगैरे कामांसाठी तो स्वयंपाकघरात जा ये करत राहिला.

तो विचार करत होता की प्रभाताईला साबूदाण्याची खिचडी हवी आहे असे तिने तासाभरापूर्वी सांगितले असते तर प्रतिभाने ती करून दिली असती. तिला मैत्रिणीच्या घरी जायला उशीर होऊ नये म्हणून कदाचित तिने प्रतिभाला सांगितले नसेल. अजून तासाभरात प्रतिभा परत आली असती आणि तिने त्यानंतर खिचडी करून दिली असती. पण तिला यायला उशीर लागला असता तर प्रभाताईला तोपर्यंत उपाशी रहावे लागले असते. त्याला स्वतःला साबूदाण्याची खिचडी करणे येतच नव्हते. त्यामुळे ताईला जे जे भांडे किंवा जिन्नस लागेल ते ते तो शोधून देत राहिला. सगळे काम संपले असे पाहून प्रमोदने आपली बॅग उघडून त्यातले कागद बाहेर काढले. ते वाचायला तो सुरुवात करत होता तेवढ्यात प्रभाताईने साबूदाण्याच्या खिचडीने भरलेली प्लेट आणून त्याच्या हातात दिली. तो उद्गारला, “अगं ताई, तुझा उपास आहे ना? तूच ही प्लेट घे. मी जेवणात खाईन.”

संध्याकाळच्या या वेळी काही खाण्याची त्याला सवय नव्हती आणि गरजही वाटत नव्हती. उलट अवेळी जास्तीचे खाण्यामुळे रात्रीचे जेवण व्यवस्थित होणार नाही आणि पचनसंस्था नीट राहणार नाही असे त्याला वाटत असे आणि तो शक्य तोवर ते टाळत असे. पण प्रभाताई म्हणाली, “अरे, आत्ता गरम गरम खाऊन घे. जेवणापर्यंत ती थंड होऊन गेल्यावर तिची चंव राहणार नाही.”
तो म्हणाला, “ठीक आहे. तू ही प्लेट घे. मी बशीत थोडी खिचडी घेऊन खाईन.”
ताई म्हणाली, “नाही रे, तुपातले पदार्थ खाऊन अलीकडे मला खोकला येतो आणि शेंगदाण्याने पित्त होते म्हणून मी खिचडी खाणं सोडलं आहे.”
हा धक्का प्रमोदला अनपेक्षित होता. तो म्हणाला, “मग तू रात्री काय खाणार आहेस ? आणि ही खिचडी कुणासाठी बनवलीस ?”
ताई म्हणाली, “मी थोडी फळं आणि दूध घेईन. तुला खिचडी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी तर ही बनवली आहे.”
प्रमोदने नाइलाजाने प्लेटमधून चमचाभर खिचडी उचलून तोंडात टाकली. घास खाऊन झाल्यावर “मस्त झाली आहे.” असं तो सांगणार होता तेवढ्यात ताई उद्गारली, “कशी झालीय् कुणास ठाऊक!”
तो म्हणाला, “असं का म्हणतेस? किती वर्षांपासून तू खिचडी करते आहेस? ती बिघडणं कसं शक्य आहे? “
ताई म्हणाली, ” अरे, फोडणीत घालायला ताजी हिरवी मिरची मिळाली असती तर चांगला स्वाद लागला असता. “

आता मात्र प्रमोदला रहावलं नाही. आपल्या हातातलं महत्वाचं काम सोडून इतका वेळ तो निरनिराळ्या वस्तू आणि जिन्नस शोधून तिला देत होता. ‘मिरची’ म्हंटल्यावर त्याने शोधून काढून दिलेल्या मिरच्या हिरव्या होत्या की लाल, शिळ्या होती की ताज्या इकडे त्याने पाहिले नव्हते आणि त्याने काही फरक पडेल असेही त्याला वाटले नव्हते. आता तेवढीच उणीव ताईने का काढावी असे त्याला वाटून गेले.
तो म्हणून गेला, “आपल्या आईबाबांनी तर असं शिकवलं होतं की समोर येईल ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं असतं आणि त्याला नावं ठेवायची नसतात. त्यामुळे मी तरी असली एवढी बारकी चिकित्सा कधी केली नाही.”

प्रभाताईंचा चेहेरा खर्रकन उतरला आणि त्या देवासमोर जाऊन स्तोत्र म्हणत बसल्या. प्रमोदनं आपली प्लेट बाजूला सरकवून दिली आणि ऑफीसमधून आणलेल्या कागदात डोके खुपसले. पण आपण काय वाचत आहोत ते त्याला समजत नव्हते.
प्रभाताई आणि प्रमोद दोघेही मनाने खूप चांगले होते, दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा विचार करून कृती करत राहिले, पण अखेर त्यातून त्यांच्यात थोडासा दुरावाच निर्माण झाला. त्यापेक्षा त्यांनी आधीच एकमेकांना विचारून घेतले असते तर ?

एक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)

त्या चिरस्मरणीय दिवसाला आता बरोबर पंधरा वर्षे होऊन गेली आहेत. त्या दिवसाची हकीकत मी त्या काळी लिहिलेल्याच शब्दात देत आहे.

समजा एकादा माणूस महिना दीड महिना गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्यातून सावरतांना त्याच्या एका हाताने भिंतीला धरून हळू हळू एक एक पाऊल टाकीत बेडरूमपासून दिवाणखान्यापर्यंत धडपडत येण्याचे सुध्दा एखाद्या वर्षभराच्या बाळाने केलेल्या प्रगतिसारखे तोंड भरभरून कौतुक होते आहे, जागीच बसल्या बसल्या कांही करावे म्हंटले तर दीड महिन्यापासून त्याच्या कॉंप्यूटरनेही दगा दिला आहे, अशा परिस्थितीत त्याचा एक संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीचा गेला असे होऊ शकेल? काल माझ्या बाबतीत अगदी अस्संच झालं.

कालचा दिवस थोडा वेगळा होताच, काल गुरुपौर्णिमा होती. मला जरी कोणी गुरु मानत नसले तरी काय झालं, मी तर अनेक लोकांना आपले चेले समजतो आणि जमले तर प्रत्यक्ष भेटीत नाहीतर निदान फोनवर तरी त्यांना अनाहूत सल्ले द्यायचे सत्कार्य अधून मधून करीतच असतो. पण काल मात्र या कामासाठी माझा फोनच मुळी माझ्या हाती लागत नव्हता. त्याचं काय आहे की माझ्या सौभाग्यवती परंपरांना जिवापाड जपणाऱ्या संगीताच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे आजी व माजी गुरु, गुरुबंधू, गुरुभगिनी, शिष्यवर्ग या सर्व लोकांबरोबर दिवसभर त्यांची उभयपक्षी फोनाफोनी होत राहिली. योगायोगाने कालच माझ्या धाकट्या मुलाचा वाढदिवस होता व तो दीड वर्षानंतर नुकताच सुटीवर मायदेशी आलेला. त्यामुळे या निमित्ताने त्याचे अभीष्टचिंतन करून त्याच्याबरोबर दीड वर्ष सांचलेल्या मनसोक्त गप्पागोष्टी करण्यांत आमच्या नातलगांची अहमहमिका लागलेली होती. या सर्वांकडून माझ्या तब्येतीची चौकशी सुद्धा व्हायची. त्यामुळे त्यांचेबरोबर माझेही मधून मधून फोनवर बोलणे व्हायचेच. एकूण सांगायचे तात्पर्य म्हणजे आमचा फोन दिवसभर सतत गुंतलेला होता. त्यामुळे माझे सगळेच चेले मात्र माझ्या तांवडीत न सांपडता बचावले.

माझ्या प्रकृतिअस्वास्थ्याचा विचार करतां मुलाच्या वाढदिवसाला या वर्षी आम्हा सर्वांना कुठे बाहेर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे घरीच मेजवानी करून आपल्या परीने तो साजरा करणे क्रमपात्र होते. शिवाय अगदी घरच्यासारखे असलेले आप्तेष्ट या वेळी घरी भेटायला येणार हे नक्की होते. त्यांचे तोंड गोड करायला पाहिजे हे ओघाने आलेच. त्यामुळे सर्वांशी सविस्तर विचारविनिमय करून सर्वांच्यासाठीच चांगले स्वादिष्ट, सात्विक व पौष्टिक तसेच तबेतीसाठी सुरक्षित असे अन्नपदार्थ निवडून ते कोठकोठून मागवायचे, आणावयाचे किंवा घरातच बनवायचे याचे नियोजन केले गेले.

मी दीड महिना इंटरनेट न पाहिल्याने त्यासाठी बोटे शिवशिवत होती. कांहीही करून आपला संगणक कार्यान्वित करायचा आणि आपण वर्षारंभाला सुरू केलेल्या ब्लॉगवर तो मृत कॅटेगरीमध्ये घोषित होण्यापूर्वीच गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर त्यावर पुढचा भाग लिहायचाच असा निर्धार मी केला होता. त्यासाठी एका संगणकतज्ञाचा फोनवरूनच पिच्छा पुरवला होता. दोन तीन वेळा त्याचे तंत्रज्ञ येऊन पाहून गेले होते. पण दर वेळी त्यांना एखाद्या चिप किंवा कार्डामध्ये कांही ना कांही दोष आढळायचा व ते स्पेअरमध्ये आहेत कां याची चौकशी ते करायचे, कधी खोडरबर, कधी ब्लेडचे पाते तर कधी प्लायर मागायचे. शेवटी मी वैतागून त्यांच्या मालकाला झाडले आणि मी कांही कॉंम्प्यूटरचा वर्कशॉप चालवीत नाही याची आठवण त्याला करून दिली. माझ्याकडे वाटले तर माझे आयडेंटिटी कार्ड मिळेल, एखादे क्रेडिट कार्ड असेल, झालेच तर रेशन कार्ड असेल पण कॉंप्यूटराचे कार्डस मी कशाला जवळ ठेवीन? तसेच, वाटले तर अंकल चिप्स किंवा लेहर कुरकुरे शेजारच्या वाण्याकडून मागवून घेईन पण कॉंप्यूटरमधल्या मायक्रोचिप्स कशाशी खातात ते इथे कुणाला माहीत आहे?

या वेळी मात्र ते लोक हांतातल्या बॅगेत अनेक प्रकारचे सुटे भाग व विविध हत्यारे, एक नवीन की बोर्ड आणि नवे कोरे स्कॅनर कम प्रिंटर कम झेरॉक्स मशीन वगैरे सगळे घेऊन आले हे पाहून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मला माझ्या नोकरीमधील पहिला दिवस आठवला. त्या दिवशी मी ऑफीसच्या कॉमन हॉलमध्ये कुठेतरी टेकायला सोयिस्कर जागा मिळते कां या शोधांत होतो, पण कागदपत्रांच्या फक्त कृष्णधवल नक्कला देऊ शकणाऱ्या एका बोजड झेरॉक्स मशीनने मात्र एक आलीशान एअरकंडीशन्ड खोली व्यापलेली होती. तिथे अनुज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश सुद्धा मिळत नव्हता. त्या काळी रस्तोरस्ती कॉपियर्सचे पेव फुटलेले नव्हते आणि अशा प्रकारचे यंत्र असू शकते हेच मुळी लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे आमच्या ऑफीसांत असे अद्ययावत इम्पोर्टेड मशीन आहे हे किती तरी दिवस मी फुशारकी मारून अज्ञ लोकांना सांगत होतो. आणि आज त्यापेक्षा कितीतरी सुधारलेले बहुगुणी पण छोटेसे यंत्र चक्क माझ्या घरांतल्या टेबलावर विसावणार होते. पण इतकी जय्यत तयारी करून सुद्धा शेवटी माझा दोन अडीच वर्षे जुना संगणक व ते आधुनिक यंत्र यांच्या कुंडल्या कांही जुळल्या नाहीत. सरतेशेवटी मोठ्या कष्टी मनाने मी त्या मेकॅनिकांना ते दोन्ही उचलून आपल्या कार्यशालेत नेऊन तिथेच हा घोळ सोडवायला सांगितले. पण माझ्या निर्धाराचे काय? शरीर व्याधीग्रस्त असले तरी मनाची उभारी अजून शाबूत होती. उलट ते अधिकच हट्टी झाले होते. मुलाने केवळ त्याच्या महत्वाच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी खास राखून ठेवलेला त्याचा लॅपटॉप मागून घेतला. त्या संगणकाला फक्त आंग्लभाषा अवगत होती आणि त्याला मराठी कशी शिकवावी हे मला माहीत नव्हते. त्यामुळे गुरुपौर्णिमेबद्दल इंग्रजीमध्येच चार वाक्ये लिहून काढली.

ब्लॉगवर जेमतेम चार वाक्ये लिहून होत असतांनाच पुन्हा एकदा टेलीफोन खणखणला. या वेळेस पुण्याला ऑफीसच्या कामासाठी गेलेल्या मोठ्या मुलाचे कातर आवाजातील हॅलो कानी आले. आम्ही केंव्हापासून आतुरतेने त्याच्या परतीची वाट पहात होतो. कदाचित थोड्याच वेळांत आपण पोचत आहोत, येतांना बाजारातून कांही आणायचे आहे कां असे त्याला विचारायचे असेल असे आधी वाटले. पण असा कातर आवाज कां? त्याने अतिशय अधीर स्वरांत मुंबईतील सद्यपरिस्थितीची चौकशी केली. मला कांहीच उमजेना. कारण या सगळ्या गडबडीत रोज टेलीव्हिजन समोर ठिय्या मारून बसणाऱ्या मला या वेळेस त्याची आठवण सुद्धा झाली नव्हती व त्यामुळे घराबाहेर आजूबाजूला काय चालले होते याचे यत्किंचित भान नव्हते. लगेच साऱ्या जणांनी टी.व्ही.समोर धांव घेतली. कांही मिनिटांपूर्वी मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेची ब्रेकिंग न्यूज व त्याची हृदयद्रावक दृष्ये सगळ्या चॅनेल्सवर दिसत होती.

या धक्क्यामधून भानांवर येऊन कांही उत्तर देण्याआधीच टेलीफोनचा संपर्क तुटला होता. माझा मुलगा या क्षणी कुठे आहे हे सुद्धा समजले नव्हते. त्याने कोठल्या तरी अनोळखी नंबरावरून, बहुतेक कुठल्या तरी अनोळखी गांवातील बूथवरून फोन लावला असावा असे कॉलर आयडी वर दिसणाऱ्या आंकड्यावरून दिसत होते. त्यानंतर पुन्हा कांही त्याचेबरोबर संपर्क जुळत नव्हता. पुणे मुंबई रस्ता पश्चिम रेल्वेपासून खूपच दूर अगदी वेगळ्या वाटेला आहे हे समजत होते. पण अशी मोठी घटना एका ठिकाणी होऊन गेल्याचा धक्काच इतका जबरदस्त होता की याच वेळी इतर ठिकाणी काय काय चालले असेल याची चिंता वाटत होती. शिवाजी पार्कवर घडलेल्या एका वाईट घटनेचे ठाणे कल्याण डोंबिवलीपर्यंत उमटलेले तीव्र प्रतिसाद दोनच दिवसापूर्वी पाहिले होते. पण आता मुलाच्या परतण्याची अधीरपणे वाट पहात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो सुखरूपपणे घरी येऊन पोचल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

त्या आधीच हातात टेलीफोन नंबरांची वही घेऊन मुंबईतील आप्तेष्टांना फोन लावणे सुरू झाले होते. आमचे कांही जवळचे आप्त मुंबईच्या पश्चिम उपनगरांत रहात होते तर कांहीजण कामासाठी रोज तेथे जायचे. त्या सर्वांची काळजी होती. पण बहुतेक ठिकाणी फोन लागतच नव्हते. कदाचित टेलीफोन सिस्टिम्स जॅम असतील किंवा वाहतूक बंद पडल्याने ते लोक वेळेवर घरी पोचले नसतील असा विचार करून पुढला नंबर फिरवायचा. मध्येच एकादा नंबर लागायचा किंवा दुसऱ्या कोणाचा तरी फोन यायचा. धडधडत्या अंतःकरणाने बोलल्यावर त्याच्या कडून तिसऱ्या कोणाची खुषाली कळायची. त्यातून थोडासा रिलीफ मिळायचा. असे करीत करीत रात्री उशीरापर्यंत आपले बहुतेक सर्व लोक सुखरूप असल्याचे कळून जीव भांड्यात पडला. देवाच्या कृपेने आपण यातून कसे थोडक्यांत बचावलो याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी होती.

वाढदिवसाच्या घरगुती समारंभाची सगळी तयारी आधीपासून केलेली होती, सगळे खाद्यपदार्थ घरी आले होते व सारी अपेक्षित मंडळीही थोडी उशीरा कां होईना पण एकत्र जमली होती. ती येईपर्यंत त्यांची वाट पाहणे आवश्यक होतेच, समारंभ साजरा करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. पण परिस्थितीचे आकलन न झाल्यामुळे केक कांपायची घाई करणाऱ्या बाळगोपाळांना आवर घालणे कठीण होत होते. यामुळे अखेर त्या समारंभाची औपचारिकता कशीबशी पूर्ण करून टाकावी लागली.

शेवटी झोपतांना मनांत विचार आला, “कसला हा दिवस? अनेक लोकांबरोबर शुभेच्छा, अभीष्टचिंतन यांचे आदान प्रदान व हंसत खेळत गप्पागोष्टी, अंगांत त्राण नसतांना निव्वळ उत्साहापोटी केलेली केवढी तरी हालचाल, आशा निराशा यांचा लपंडावाचा खेळ, मन उद्विग्न करणाऱ्या भयानक घडामोडी, हृदयद्रावक दृष्ये पाहून झालेले दारुण दुःख, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी चिंता, शेवटी त्यातून मुक्ती, आधी मोठ्या हौसेने ठरवलेला पण मन घट्ट करून कसाबसा आटोपून घेतलेला एक औपचारिक समारंभ, इतक्या सगळ्या गोष्टी एकांच दिवसांत घडाव्यात ?”

परतलो मातृभूमीला

आम्ही दोघे २००८-०९ मध्ये अमेरिकेला जाऊन तिथे काही दिवस राहून आलो होतो. आमच्या त्या वेळच्या आठवणी आणि गंमती जंमती मी ४०-५० भागांमध्ये सविस्तर लिहून ठेवल्या होत्या. त्या इथे वाचायला मिळतील.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be/page/5/

या आठवणींमधला एक राहून गेलेला लेख या पोस्टमध्ये देत आहे. त्यानंतर २०१९-२० मध्ये मी पुन्हा अमेरिकेला जाऊन आलो. त्या वेळच्या वेगळ्या गंमतीजमती मी आता या ब्लॉगवर क्रमाक्रमाने देणार आहेच. पण त्याची सुरुवात मी परतीच्या प्रवासापासून करीत आहे कारण तोसुद्धा या शीर्षकाखाली चपखल बसतो.

१. परतलो मातृभूमीला

मला पहिल्यापासूनच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यात मला कसलाही त्रास वाटत नाही किंवा कधी कंटाळा येत नाही अशा नकारार्थी कारणांमुळे नव्हे तर त्यात पहायला मिळणारी अनुपम दृष्ये, कानावर पडणारे मंजुळ ध्वनी, चाखायला मिळणारे चविष्ट खाद्यपदार्थ, भेटणारी वेगवेगळी माणसे आणि निरनिराळ्या वातावरणात रहाण्याचा मिळणारा अनुभव या सर्वांमधून जी एक सर्वांगीण अनुभूती होते ती मला सुखावते. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या निमित्याने मी प्रत्येकी कांहीशेहे वेळा परगांवी जाऊन आलो आहे. असे असले तरी नोकरीत असेपर्यंत कधीही सलग दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेरगांवी जाऊन तिथे राहिलेलो मात्र नव्हतो. मला तशी संधीच मिळाली नसेल असे कोणी म्हणेल, किंवा नाइलाजाने कुठेतरी जाऊन राहण्याची आवश्यकता पडली नसेल असेही कोणी म्हणेल. दोन्हीही कारणे खरीच असतील, तसे घडले नाही एवढे मात्र खरे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच्या काळात प्रवासाला गेल्यावर घरी परतण्याची एवढी घाई नसायची आणि त्यासाठी सबळ अशी कारणे देता येत नव्हती त्यामुळे हा कालावधी चार पाच आठवड्यांपर्यंत लांबत गेला. आम्ही मागच्या वर्षी (२००८ मध्ये) मुलाला भेटून येण्यासाठी अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा त्यासाठी सहा आठवडे एवढा कालावधी माझ्या मनात आला होता. त्यासंबंधी सखोल अभ्यास, विश्लेषण वगैरे करून त्यावर मी कांही फार मोठा विचार केला होता अशातला भाग नव्हता, पण सहा आठवड्याहून जास्त काळ आपण परदेशात राहू शकू की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. उन्हाळ्यात अमेरिकेतले हवामान अनुकूल असते, त्यामुळे बहुतेक लोक तिकडे जायचे झाल्यास उन्हाळ्यात जाऊन येतात, पण आम्हाला गेल्या वर्षी ते कांही जमले नाही. उद्योग व्यवसायात आलेली जागतिक मंदी आणि अमेरिकेची होत चाललेली पीछेहाट पाहता पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत वाट न पाहता त्याआधीच जाऊन यायचे ठरले. शिवाय उद्या कुणी पाहिला आहे हा एक प्रश्न होताच. घरातला गणेशोत्यव झाल्यानंतर इकडून निघायचे आणि दिवाळी साजरी करून कडाक्याची थंडी सुरू होण्याच्या आधी परतायचे असा माझा बेत होता.

आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात वेगळे विचारचक्र फिरत होते. आमचे अमेरिकेला जायचे नक्की झाल्यापासून सर्व संबंधित दस्तावेज गोळा करून त्यासाठी लागणारी सरकारी अनुमती मिळवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला निघण्यासाठी बांधाबांध करणे यात कित्येक महिन्यांचा काळ लोटला होता. एवढ्या सायासाने अमेरिकेला जाऊन पोचल्यानंतर तिथे सहा महिने राहण्याची परवानगी मिळाली होती तिचा पुरेपूर फायदा आम्ही घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. तर्कदृष्ट्या ते अगदी बरोबर होतेच आणि तशी त्याची मनापासून इच्छा होती. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे ‘पोटापुरता पसा’ तो ‘देणाऱ्याच्या हाता’ने अगदी घरबसल्या मिळत होता आणि जास्तीची ‘पोळी पिकण्या’साठी मी भारतातसुध्दा कसलीच हालचाल करत नव्हतो. अमेरिकेत तर मला कुठलाही कामधंदा करून अर्थार्जन करायला तिकडच्या कायद्याने बंदी होती. तसे झाल्याचे आढळल्यास तडकाफडकी माझी उचलबांगडी करण्यात येईल असा दम मला प्रवेश करण्याची परवानगी देतांनाच भरला गेला होता. माझा तसा इरादाही नव्हता. मी स्वतःला इथल्या कुठल्या समाजकार्यात गुंतवून घेतलेले नव्हते. इथे भारतात राहतांना मी कधी लश्करच्या भाकऱ्याही भाजल्या नाहीत तेंव्हा परदेशात जाऊन तिथल्या कुणा परक्यासाठी कांही करायला मी कांही अमेरिकन नव्हतो. त्यामुळे इथे असतांनाही माझा सगळा वेळ स्वतःच्या सुखासाठी आणि आपल्या माणसांसाठी यातच खर्च होत असे आणि ते करणे मला अमेरिकेतसुध्दा शक्य होते. मग भारतात परत जायची घाई कशाला करायची? या युक्तीवादाला माझ्यापाशी तोड नव्हती.

अमेरिकेतील आमचे वास्तव्य अत्यंत सुखासीन रहावे यासाठी मुलाने चंगच बांधला होता असे दिसत होते. भारतात आमच्या घरात असलेल्या एकूण एक सुखसोयी तिथे उपलब्ध होत्याच, त्या चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे सहसा त्यात बिघाड उत्पन्न होत नसे. पाणी टंचाई, विजेचे भारनियमन यासारख्या कारणांमुळे त्या कधी बंद ठेवाव्या लागत नसत. यात घरकाम आणि आराम करण्याची साधने आली तसेच करमणुकीचीसुध्दा आली. तिकडच्या टेलीव्हिजनवर शेकडो वाहिन्यांवर चाललेले कार्यक्रम लागायचे, शिवाय दीडशेच्या वर चित्रपट ‘ऑन डिमांड’ म्हणजे आपल्याला हवे तेंव्हा पाहण्याची सोय होती. भारतात जर आपल्याला पहायचा असलेला चित्रपट टीव्हीवर लागणार असेल तर आधीपासून ठरवून त्या वेळी करायची इतर कामे बाजूला सारून टीव्हीच्या समोर फतकल मारून बसावे लागते आणि दर दहा मिनिटांनी येणा-या जाहिराती पहाव्या लागतात तसे तिथे नव्हते. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तेंव्हा तो सिनेमा पाहता येत असेच, शिवाय वाटल्यास आपणच पॉज बटन दाबून त्यात लंचब्रेक घेऊ शकत होतो. ब्लॉकबस्टर नांवाच्या कंपनीकडून दोन नवीन सिनेमांच्या डीव्हीडी घरपोच येत, त्या पाहून झाल्यानंतर दुकानात देऊन आणखी दोन डीव्हीडी निवडून घ्यायच्या आणि त्या परत केल्या की लगेच आणखी दोन नव्या डीव्हीडी घरी यायच्या अशी व्यवस्था होती. त्यातून नवनव्या तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटांचा एक प्रवाहच वहात होता असे म्हणता येईल.

असे असले तरी इतके इंग्रजी पिक्चर्स पाहण्यात आम्हाला रुची नसेल म्हणून हवे तेवढे हिंदी चित्रपट पहायची वेगळी व्यवस्था होती. मुलाने भारतातून जातांनाच अनेक सीडी आणि डीव्हीडी नेल्या होत्या, इतर जाणाऱ्या येणाऱ्यांकडून काही मागवल्या होत्या, तसेच आमच्याकडील हिंदी आणि मराठी डिस्क आम्हीही नेल्या होत्या. अशा प्रकारे घरात जमवून ठेवलेला बऱ्यापैकी मोठा स्टॉक होताच, त्याशिवाय आता अमेरिकेतसुध्दा हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडीज विकत किंवा भाड्याने मिळू लागल्या आहेत. मुलाच्या मित्रांच्याकडून कांही मिळाल्या आणि किती तरी सिनेमे चक्क इंटरनेटवर सापडले. मी त्यापूर्वी आयुष्यातल्या कुठल्याही तीन महिन्यात, अगदी कॉलेजात असतांनासुध्दा पाहिले नसतील इतके हिंदी, मराठी आणि इंग्रजी सिनेमे मी या वेळी अमेरिकेत पाहून घेतले.

सिनेमा पाहणे हा मनोरंजनाचा एक थोडा जुना झालेला भाग झाला. आज टेलिव्हिजन पाहणे हा एक मनोरंजनाचा भाग न राहता जीवनाचा भाग बनून गेला आहे. आपली आवडती मालिका पाहिल्याखेरीज चैन पडेनासे झाले आहे. पण कांही हरकत नाही. भारतात जे कार्यक्रम पाहण्याची संवय जडली आहे तेसुध्दा वॉच इंडिया नांवाच्या वेबसाइटवर जगभर दाखवले जातात. त्याचेही सभासदत्व घेऊन ठेवले होते. भारतात रात्री प्रक्षेपित होत असलेले कार्यक्रमच आम्ही मुख्यतः पहात असू, पण त्यावेळी अमेरिकेत सकाळ असे एवढा फरक होता. त्यामुळे आपली रोज सकाळी करायची कामे विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा पाहून त्यानुसार करीत होतो.

निवृत्तीनंतर रिकामेपणाचा उद्योग म्हणून आणि कांही तरी करीत असल्याचा एक प्रकारचा आनंद प्राप्त करण्यासाठी मी ब्लॉगगिरी सुरू केली आहे. त्यात खंड पडू नये याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. अमेरिकेत दुर्लभ असलेली मराठी (देवनागरी) लिपी घरातल्या संगणकावर स्थापित झाली होती. अत्यंत वेगवान असे इंटरनेट कनेक्शन तर चोवीस तास उपलब्ध होतेच. मला एकाच कॉम्प्यूटरवर टेलिव्हिजन पाहणे आणि लेखन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाहीत म्हणून चक्क एक वेगळा संगणक घरी आणला.

बहुतेक दर शनिवार रविवार आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात जात असे. आता भारतातसुध्दा मॉल संस्कृती आली आहे, तिकडे ती पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्यामुळे एक एक मोठा मॉल किंवा स्टोअर म्हणजे एक भव्य असे प्रदर्शनच असते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, अत्यंत कलात्मक रीतीने सजवून आणि व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेल्या वस्तू पहातांना मजा येते. त्यातले शोभेच्या वस्तू असलेले दालन म्हणजे तर एकादे म्यूजियमच वाटावे इतक्या सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू तिथे पहायला मिळतात. त्या दुकानांत कोणीही वाटेल तितका वेळ हिंडावे, कांही तरी विकत घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही. इतक्या छान छान गोष्टी पाहून आपल्यालाच मोह होतो यातच त्यांचे यश असते. दिवसभर भटकंती केल्यानंतर बाहेरची खाद्यंतीही ओघानेच आली. त्यासाठी मेक्सिकन, इटॅलियन ते चिनी आणि थाय प्रकारची भोजनगृहे आहेतच, पण उत्कृष्ट भारतीय भोजन देणारी निदान चार पांच हॉटेले मिळाली.

अशा प्रकारे आमची मजाच मजा चालली असली तरी घरी परतायची एक ओढ लागतेच. शिवाय घरात करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करता आली तरी घराबाहेरचे वातावरण कांही आपल्याला बदलता येत नाही. तिथल्या कडाक्याच्या थंडीशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपला हात दाखवते आणि शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यानंतर तो त्रास सहन करत तिथे राहणे सुखावह वाटत नाही. अशा कारणांमुळे मी योजलेले सहा आठवडे आणि मुलाने ठरवलेले सहा महिने म्हणजे सव्वीस आठवडे यातला सोळा हा सुवर्णमध्य अखेर साधला गेला आणि अमेरिकेत गेल्यापासून सोळा आठवड्यांनी आम्ही अमेरिकेचा निरोप घेऊन जानेवारी २००९च्या अखेरीस आम्ही मातृभूमीकडे परत आलो. आम्ही ज्या मार्गाने अमेरिकेला आलो होतो त्याच मार्गाने म्हणजे अॅटलांटा- नेवार्क- मुंबई असे परत आलो. परतीचा प्रवासही तसाच झाला. त्यात काही वेगळा अनुभव आला नाही. या भेटीत तिकडे पाहिलेल्या बहुतेक सगळ्या जागांची वर्णने मी या ब्लॉगवर केलेली आहेत.
Posted by Anand Ghare June 11, 2009

२. चीनमार्गे परतीचा प्रवास

आजकाल विमानाच्या प्रवासाची तिकीटे इंटरनेटवरूनच काढली जातात आणि त्यांची किंमत ठरलेली नसते. समजा मला आज पुण्याहून बंगलोरला जायचे तिकीट पाच हजाराला मिळाले असेल तर माझ्या शेजारच्या प्रवाशाला कदाचित सहा हजार रुपये मोजावे लागले असतील किंवा त्याला ते तिकीट फक्त चार हजारालाही पडले असेल. ‘मेक माय ट्रिप’ सारख्या काही कंपन्या हे बुकिंग करतात. आपल्याला कुठून कुठे आणि कधी प्रवास करायचा आहे ही माहिती कांप्यूटरवरून किंवा सेलफोनवरून दिली की त्या तारखेला जात असलेल्या अनेक विमान कंपन्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या व पोचण्याच्या वेळा आणि तिकीटाची यादी समोर येते. त्यातला सगळ्यात स्वस्त किंवा सोयिस्कर पर्याय निवडून आपण काय ते ठरवायचे आणि लगेच तितके पैसे क्रेडिट कार्डाने भरून ते बुकिंग करून टाकायचे. परदेशाला जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांच्या दरांमध्ये तर प्रचंड तफावत असते. दोन महिने आधीपासून बुकिंग केले तर ते तिकीट अर्ध्या किंवा पाव किंमतीतही मिळू शकते आणि आयत्या वेळी काढल्यास कदाचित तीन चारपट जास्त पैसे मोजावे लागतात किंवा ते विमान रिकामेच जात असेल तर आयत्या वेळी ते तिकीट अगदी स्वस्तातही मिळू शकते. जे लोक केवळ मौजमजेसाठी दोन चार दिवस कुठे तरी फिरायला जाऊन येत असतात ते अशा दुर्मिळ संधीचा लाभ उठवतात, पण त्यात खूपच अनिश्चितता असते. त्यामुळे आधीपासून ठरवून प्रवासाला जाणारे माझ्यासारखे रिकामटेकडे पर्यटक दोन महिने आधीपासून नियोजन करतात.

मी मागल्या वर्षी अमेरिकेला जाऊन आलो होतो. तिथे तीन महिन्याचा मुक्काम होऊन गेल्यावर मला परतीच्या प्रवासाचे वेध लागले. ख्रिसमसच्या सणाच्या काळात जगभर सगळीकडेच पर्यटकांची गर्दी होत असल्याने विमानांच्या तिकीटांना जास्त मागणी असते आणि अमेरिकेत राहणारे बरेचसे भारतीय लोकही तिथली थंडी टाळून उबदार भारताचा दौरा काढत असतात. त्यामुळे त्या काळात तिकीटांचे दरही वाढलेले असतात. म्हणून तो काळ संपल्यावर म्हणजे जानेवारीच्या अखेरीकडे मी भारतात परत यायचे असे नोव्हेंबरमध्येच ठरले. त्यानुसार निरनिराळ्या तारखांना उपलब्ध असलेल्या तिकीटांची चौकशी करतांना एक प्रचंड सवलतीची ‘डील’ मिळाली. वीस जानेवारीला लॉस एंजेलिसहून निघून बेजिंगमार्गे मुंबईला जायच्या प्रवासाचे तिकीट फक्त प्रत्येकी साडेतीनशे डॉलर्सला मिळत होते. यावर क्षणभर तरी माझा विश्वासच बसला नाही कारण मी अमेरिकेला जातांना एमिरेट्सच्या विमानाने दुबईमार्गे गेलो होतो तेंव्हा ते सहा सातशे डॉलर्स पडले होते. माझ्या मुलाने लगेच एअर चायनाची टिकीटे बुक करून टाकली. यात काही फसवाफसवी तर नसेल ना अशी शंका मला आली, पण माझा मुलगा गेली अनेक वर्षे याच कंपनीतर्फे बुकिंग करत आला होता आणि नेहमी त्याला चांगलाच अनुभव आला होता म्हणून तो निर्धास्त होता.

माझ्या मनात लहानपणापासूनच चीनबद्दल संमिश्र भावना होत्या. मी शाळेत शिकतांना भूगोल या विषयात मला चीनबद्दल जी माहिती मिळाली ती अद्भुत होती. आपल्या भारताच्या अडीचपट एवढा विस्तार असलेल्या या अवाढव्य देशात भारताच्या दीडपट एवढी माणसे रहातात, तरी ते सगळे लोक एकच भाषा बोलतात आणि एकाच लिपीत लिहितात हे कसे याचे मला मोठे गूढ वाटायचे. तिथेही काही हजार वर्षांपासून चालत आलेली जुनी संस्कृती आहे आणि हजारो वर्षांच्या इतिहासात तो देश अखंडच राहिला आहे. मुसलमानी आणि युरोपियन लुटारूंच्या धाडींना त्यांनी दाद दिली नाही आणि कडेकडेचा किंवा किनाऱ्यावरला थोडा भाग सोडला तर चीनच्या मुख्य भूमीवर कुणाही परकीयांना कधी कबजा करू दिला नाही. दुसऱ्या महायुद्धातला अगदी थोडासा काळ सोडला तर इतर सर्व काळ हा संपूर्ण देश स्वतंत्रच राहिला होता. कम्युनिस्टांनी आधी रशीयाची मदत आणि शस्त्रास्त्रे घेऊन उठाव केला आणि हा देश जिंकून घेऊन आपली सत्ता स्थापित केली, पण रशीयाच्या सैनिकांना तिथे शिरकाव करू दिला नाही. चीनने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले होते एवढेच नव्हे तर थोड्याच कालावधीत रशीयाचे बहुतेक सगळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले होते. त्या काळात भारताचे चीनबरोबरचे संबंध चांगले होते. माओझेदुंग आणि चौएनलाय या दुकलीने भारताला भेट दिली तेंव्हा त्यांचे प्रेमाने स्वागत केले गेले होते आणि “हिंदी चीनी भाई भाई” च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. कम्युनिस्टांच्या राज्यात तिथल्या जनतेवर प्रचंड दडपशाही केली जात होती असे काहीसे ऐकले असले तरी मला लहान वयात त्याचा अर्थ समजत नव्हता. त्यामुळे लहानपणी मला तरी चीनबद्दल कौतुक, गूढ आणि आकर्षण वाटत होते.

१९६२ साली चीनने विश्वासघात करून सीमाप्रदेशावर आक्रमण केले आणि तेंव्हा झालेल्या लढाईत भारताचे अनेक जवान मारले गेले, तसेच आपल्या देशाची नाचक्की झाली. यामुळे चीन हा एकदम एक नंबरचा शत्रू झाला आणि ते देश व तिथले लोक यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण झाला तो जवळजवळ कायमचा. मध्यंतरीच्या काळात तो राग हळूहळू कमी होत होता, पण गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि सीमेवर झालेल्या चकमकींमुळे तो आता पुन्हा वाढत गेला आहे.

असे असले तरी मी मुंबईला रहायला गेल्यावर आधी गंमत म्हणून तिथल्या चिनी हॉटेलांमध्ये जाऊन चिनी खाद्यपदार्थ खात होतो. पुढील काळात सरसकट सगळ्याच हॉटेलांमध्ये चायनीज अन्न मिळायला लागले, इतकेच नव्हे तर त्याचा थेट आमच्या स्वयंपाकघरातही प्रवेश झाला. परदेशांमध्ये तर बहुतेक सगळीकडे मला चायनीज फूड मिळत असे आणि ते सर्वात जास्त आवडत असे. मी पश्चिम अमेरिका दर्शनाची लहानशी ट्रिप केली होती ती एका चिनी कंपनीने काढली होती आणि त्यातले निम्म्याहून जास्त पर्यटक चिनी होते. त्यातले किती चीनमधून आलेले होते आणि किती अमेरिकेत स्थाईक झालेले चिनी होते कोण जाणे. पण त्यांच्यासोबत फिरतांना ना मला शत्रुत्व वाटले होते, ना त्या लोकांना. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये जिकडे तिकडे चीनमधून आलेल्या वस्तू प्रचंड प्रमाणात दिसत होत्या आणि त्या कमालीच्या स्वस्त भावाने विकल्या जात असल्यामुळे हातोहात खपत होत्या आणि घरोघरी जाऊन पोचत होत्या. इतकेच नव्हे तर मी कामानिमित्य ज्या कारखान्यांमध्ये जात होतो तिथेही यंत्रसामुग्री आणि कच्चा माल वाढत्या प्रमाणात चीनमधून यायला लागला होता. या सगळ्यांमुळे मला चीनविषयी अधिकाधिक कुतूहल वाटायला लागले होते.

माझ्या आयुष्यातल्या बहुतेक कालखंडामध्ये चीन हा देश बांबूच्या दाट पडद्याआड दडला होता आणि परकीय पर्यटकांना तिथे प्रवेश नव्हता, त्यामुळे मी कधी चीनला जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण पंधरावीस वर्षांपूर्वी चीनने आपली धोरणे बदलली आणि अर्थव्यवस्था थोडी मुक्त करून युरोपअमेरिकेतील भांडवलदारांना चीनमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिली. त्यानंतर अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने स्थापन केले, ऑफीसे उघडली आणि त्यानिमित्याने अनेक लोक चीनला जाऊन यायला लागले. काही प्रमाणात पर्यटकांचेही जाणेयेणे सुरू झाले. माझ्या माहितीतलेही काही लोक चीनचा दौरा करून आले. पण आता वयोमानाने माझ्यातच फिरायचे त्राण उरले नसल्यामुळे मला ते शक्य नाही. त्यामुळे असा अचानक चीनमार्गे प्रवास करायचा योग आला याचा मला मनातून थोडा आनंदच झाला. खरे तर वाटेत दोन दिवस बैजिंगला मुक्काम करून फिरायला मला आवडले असते, पण ते शक्य नव्हतेच. निदान तिथला विमानतळ तरी पहायला मिळेल, आभाळातूनच थोडे दर्शन घडेल आणि जमीनीवर आपले पाय टेकतील एवढे तरी होईल याचेच समाधान.

काही दिवसांनी आमच्याकडे भारतातला एक पाहुणा आला. त्याला आयटी उद्योगातला उदंड अनुभव होता आणि त्याने अनेक वेळा निरनिराळ्या मार्गांनी पृथ्वीप्रदक्षिणा केलेली होती. त्यात चीनमार्गे केलेला प्रवासही होता. तो म्हणाला, ” ते ठीक आहे, पण तुम्ही जेवणाचे काय करणार आहात?”
मी म्हंटले, ” मस्त दोन वेळा चायनीज फूड खाऊ, मला तर खूप आवडते.”
त्यावर तो म्हणाला, “अहो आपण पुण्यामुंबईला किंवा इथे अमेरिकेत जे चायनीज खातो तसले काही खरे चिनी लोक खातच नाहीत. ते लोक मीट म्हणून जे काय खायला घालतील त्याचा भयंकर वाससुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही आपले तुमच्यासाठी ‘हिंदू फूड’ बुक करा.” असा सल्लाही त्याने दिला. आम्ही तो ऐकून घेतला, पण त्यावर काही कारवाई केली नाही, कारण माझी सून एकदा चायना ए्रअरने प्रवास करून आली होती आणि ती तर पक्की शाकाहारी होती. ब्रेड, भात, बटाटे असे काही ना काही पोटभर अन्न तिला प्रवासात मिळाले होते.

वीस जानेवारीला आमचे उड्डाण होते. त्यासाठी आधी काही चौकशी करायची गरज आहे का असे मी मुलाला विचारले, पण त्याला पूर्ण खात्री होती. एक दोन दिवस आधी विमानकंपनीकडून का ट्रॅव्हलएजंटकडूनच आम्हाला स्मरणपत्र आले आणि प्रवासासाठी तयार रहाण्याची सूचना आली. मी आपले सगळे कपडे आणि औषधे वगैरे इतर सामान माझ्या बॅगेतच ठेवले होते. रोजच्या वापरातले कपडे हँगरला टांगले होते. ते गोळा करून बॅगेत ठेवायला तासभरसुद्धा लागला नसता. मी स्वतःसाठी अमेरिकेत काहीच खरेदीही केली नव्हती कारण मला लागणारे सगळे काही इथे पुण्यातच मिळते हेही मला ठऊक होते. पण भारतातल्या इतर नातेवाईकांना देण्यासाठी काही खेळणी, कॉस्मेटिक्स, खाऊ आणि इतर काही सटरफटर लहानशा गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या त्या सगळ्या वस्तूंना कपड्यांबरोबर अॅडजस्ट करून प्रवासाच्या बॅगा भरल्या.

ठरल्याप्रमाणे वीस जानेवारीला आम्ही लॉसएंजेलिस विमानतळाकडे जायला निघालो. विमानतळावरच काही बांधकाम सुरू केले होते आणि तिथे जाणारा मुख्य रस्ताच वहातुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे टॅक्सीवाल्याने वळसा घालून आम्हाला विमानतळाच्या दुसऱ्या भागात नेऊन सोडले. त्यात थोडा जास्तीचा वेळ खर्च झाला, पण थोडी घाई करून आम्ही आमच्या विमानाच्या निर्गमन स्थानावर वेळेवर जाऊन पोचलो. त्या भागात गेल्यागेल्याच मला चीनमध्ये गेल्याचा भास झाला. आमच्या चहूबाजूला सगळे चिनीच दिसत होते. कॅलिफोर्नियामध्ये चीन, जपान, कोरिया या भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातले काही लोक चीनला जायला निघाले असतील, तसेच चीनमधून अमेरिकेला फिरायला आलेले लोक परत जात असतील अशा लोकांमध्ये सगळे आपल्याला तर सारखेच दिसतात. तसे थोडे गोरे किंवा काळे अमेरिकन आणि भारतीय वंशाचे लोकही होते, पण ते सगळे मिळून पंधरावीस टक्के असतील.

आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे आमच्या समोरच शाळेतल्या मुलामुलींचा एक घोळका बसला होता आणि किलबिलाट करत होता. आठदहा वर्षाची ती गोल गोबऱ्या चेहेऱ्याची गुटगुटित मुले खूपच गोड दिसत होती. ती वीसपंचवीस मुले आईवडिलांना सोडून शिक्षकांच्या सोबतीने चीनच्या सहलीला निघाली असावीत किंवा चीनमधून अमेरिकेला येऊन आता परत मायदेशी चालली असावीत. त्यांच्या धिटाईचेच आम्हाला कौतुक वाटले. प्रत्येकाच्या हातात एक लेटेस्ट मॉडेलचा सेलफोन होता आणि ती त्यावर काही तरी आजूबाजूच्या मुलांना चढाओढीने दाखवत होती आणि ते पाहून खिदळत होती. मधून मधून त्यांचा गाईड त्यांना काहीतरी सूचना देत किंवा दटावत होता. मला त्यातले अक्षरही समजत नव्हते, पण पहाण्यतच मजा येत होती आणि वेळ चांगला जात होता.

विमानात जाऊन बसायला ठरवून दिलेल्या वेळेला अजून दहापंधरा मिनिटे अवकाश असतांनाच काही लोकांनी गेटच्या दिशेने रांगेत उभे रहायला सुरुवात केली आणि ते पाहून मला भारताची आठवण झाली. आमची जी सीट ठरलेली होती तीच आम्हाला मिळणार होती, आधी विमानात शिरून जागा पकडायचा प्रश्नच नव्हता. तरीही लोक का घाई करतात ते मला काही समजत नाही. म्हणून आम्ही आपल्या जागी शांतपणे बसून राहिलो होतो. पण ती रांगच मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत वाढत आमच्यापर्यंत आली तेंव्हा नुसते उठून उभे राहिलो आणि पाय मोकळे करून घेतले. तेवढ्यात ती रांग पुढे सरकायलाही लागली आणि आम्ही सगळे आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न झालो. ती गोड चिनी बालके मात्र अदृष्य झाली होती. त्यांना विमानाच्या वेगळ्या भागात जागा दिली गेली असणार आणि बहुधा आधी आत नेऊन बसवले असावे.

ते एक महाकाय जंबो जेट होते, तरीही त्यातल्या सगळ्या म्हणजे चारपाचशे जागा भरल्या असल्यासारखे दिसत होते. आमच्या आजूबाजूला तसेच मागेपुढे सगळे चिनीच होते. त्यांच्याशी काही संवाद साधायचा प्रश्नच नव्हता आणि मी तसा प्रयत्नही केला नाही. समोरच्या स्क्रीनवर काय काय दिसते ते पहायचा प्रयत्न केला, पण तो स्क्रीन, त्याची बटने आणि त्यावर दिसणारी हलणारी चित्रे या कशाचीच क्वालिटी वाखाणण्यासारखी नव्हती, त्यामुळे जे दिसेल ते कसेबसे पहावे लागत होते. मी घरी येईपर्यंत त्यातले काहीसुद्धा माझ्या लक्षात राहिले नाही. आता तर त्यात कुठले प्रोग्रॅम होते हेसुद्धा आठवत नाही.

विमानात ठरल्याप्रमाणे जेवणे आणि नाश्ते मिळाले ते अगदीच काही वाह्यात नव्हते. चिकन किंवा फिश मागून घेता येत होते त्यामुळे बैल, उंदीर किंवा बेडूक असे काही खायची वेळही आली नाही की नुसते उकडलेले बटाटेही खावे लागले नाहीत. विमानप्रवासात कुठेच झणझणीत पदार्थ देत नाहीत. सगळीकडे मिळतात तितपत सौम्य किंवा बेचव जेवण या विमानप्रवासातही मिळाले. आमच्या मित्राने घातलेली भीती सत्यात उतरली नाही.

लॉसएंजेलिसहून निघाल्यावर आम्ही पश्चिमेच्या दिशेने पॅसिफिक महासागरावरून झेप घेऊ अशी माझी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात आमचे विमान उत्तरेकडेच झेपावले आणि अमेरिकेच्या भूप्रदेशावरूनच पुढे जात राहिले. मला खिडकीजवळची सीट मिळाली नसल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हतेच, पण दूर क्षितिजावरसुद्धा पाणी दिसत नव्हते. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे उत्तरेच्या दिशेनेही आपण दुसऱ्या गोलार्धात जाऊ शकतो याचा अनुभव मी या आधीही घेतला होता, तसा या प्रवासातही आला. आमच्या विमानाने पुढे गेल्यावर कुठेतरी वळून पॅसिफिक महासागर ओलांडलाही असेल, पण ते माझ्या लक्षात आले नसेल.

आम्ही बैजिंगच्या जवळपास पोचलो तोपर्यंत तिथला स्थानिक सूर्यास्त व्हायची वेळ झाली होती आणि प्रत्यक्ष तिथे पोचेपर्यंत तर अंधारच पडला. त्यामुळे त्या शहराचे फारसे विहंगम दर्शन झालेच नाही. तिथे उतरल्यानंतर पुढे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी आमच्याकडे दीड तासांचा वेळ होता. त्यामुळे इकडेतिकडे रेंगाळायला जास्त फुरसत नव्हती. तरीही आपण ट्रान्जिट लाउंजमध्ये जाऊन आधी पुढील विमानाचे गेट पाहून घेऊ आणि बैजिंगची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू विकत घेऊन तिथला चहा किंवा कॉफी प्यायला वेळ मिळेल असे मला वाटले होते.

सर्व प्रवाशांबरोबर विमानातून उतरल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चालायला लागलो. मी आतापर्यंत जेवढे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठळक अक्षरातले इंग्रजी बोर्ड जागोजागी लावलेले पाहिले होते, पण बैजिंगला ते सापडतच नव्हते. आमच्या विमानातले बहुतेक प्रवासी बहुधा शहरातच जाणार हे मला अपेक्षित होतेच, पण ट्रँजिट लाउंज किंवा इंटरनॅशनल कनेक्शन्सकडे जाणारा रस्ता असा बोर्डच कुठे दिसला नाही. विचारपूस करायला कोणता काउंटरही नव्हता. सगळ्या प्रवाशांबरोबर बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जात असतांना एक युनिफॉर्म घातलेली महिला दिसली. ती बहुधा गर्दीवर लक्ष ठेवणारी सिक्यूरिटीवाली असावी. तिलाच आम्ही मुंबईला जायच्या विमानाकडे जायची वाट विचारली. भाषेचा प्रॉब्लेम तर होताच. त्यामुळे तिला आमचे बोलणे कळले की नाही ते ही आम्हाला समजत नव्हते. पण तिने एका बाजूला बोट दाखवले आणि आम्ही त्या बाजूला वळून चालायला लागलो.

त्या अरुंद रस्त्यानेही बरेच प्रवासी पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग पुढे गेल्यावर तिथे एक सिक्यूरिटी चेक लागला. कदाचित दुसऱ्या देशांमधील सुरक्षातपासणीवर चिनी लोकांचा विश्वास नसावा. त्यामुळे विमानातून आलेल्या प्रवाशांनीसुद्धा पुढल्या विमानात शिरायच्या आधी तिथल्या सिक्यूरिटीमधून जाणे आवश्यक होते. रांगेमध्ये शंभरावर लोक होते आणि फक्त दोनच एक्सरे मशीने होती. त्यांचे कामही सावकाशपणे चाललेले होते. तिथे गेल्यावर अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट आणि खिशातल्या सगळ्या वस्तू काढून ट्रेमध्ये ठेवल्या, एका सैनिकाने पायापासून डोक्यापर्यंत अगदी कसून तपासणी केली आणि पुढे जायची परवानगी दिली. पुन्हा सगळे कपडे अंगावर चढवून आणि पर्स, किल्ल्या, घड्याळ, मोबाईल वगैरे गोष्टी काळजीपूर्वक जागच्या जागी ठेवायचे सोपस्कार केले.

तोपर्यंत एक तास होऊन गेला होता आणि पुढे जाणारे विमान कुठे मिळेल हेही आम्हाला अजून समजले नव्हते. इकडे तिकडे पहातांना एका ठिकाणी सगळ्या फ्लाइट्सची यादी दिसली त्यावरून आम्हाला प्रस्थान करायचे गेट समजले. ते गेट कुठे आहे हे शोधून काढून तिथे जाऊन पोचेपर्यंत आमच्या फ्लाइटचे बोर्डिंग सुरू होऊन गेले होते. आता कुठले सोव्हनीर आणि कुठली कॉफी? तिथे आजूबाजूला कसली दुकाने आहेत, ती आहेत तरी की नाहीतच हेसुद्धा पहायला वेळ नव्हता. आम्हीही घाईघाईने विमानात जाऊन बसलो.

या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय होते. त्यामुळे एक वेगळा फील आला. हे विमान लहान आकाराचे असले तरी एअर चायनाचेच असल्यामुळे तिथली सर्व्हिसही पहिल्या विमानासारखीच होती. तसेच स्क्रीन, त्यावर तसलेच व्हीडिओ, तशाच हवाई सुंदरी आणि तसेच जेवण होते. बाहेर सगळा अंधारगुडुपच होता. थोडे स्क्रीनकडे पहात आणि थोड्या डुलक्या घेत वेळ काढला. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे एक दीड वाजता मुंबई विमानतळ जवळ आल्याची आणि थोड्याच वेळात विमान खाली उतरणार असल्याची घोषणा झाली आणि त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या त्याबरोबर एक खास आणि वेगळी सूचना दिली गेली. “जर कोणता प्रवासी वूहानहून आला असेल आणि त्याला ताप किंवा सर्दीखोकला असेल तर त्याने मुंबई विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्याला भेटावे.” असे त्यात सांगितले गेले. आम्हाला त्याचे थोडे नवल वाटले, पण आम्हाला तर वूहान नावाची एक जागा आहे हेसुद्धा माहीत नव्हते आणि आम्ही थेट अमेरिकेतून आलो असल्यामुळे ती सूचना आम्हाला लागू होत नव्हतीच. पण हा काय प्रकार असेल याचा पत्ता लागत नव्हता.

मुंबई विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन काउंटरकडे जायच्या रस्त्यावर एक मोठा उभा बोर्ड ठेवला होता आणि त्यावर ‘करोनाव्हायरस’ असा मथळा होता. ते वाचून मला पहिल्यांदा हा शब्द समजला. पुढे तो सगळ्यांच्या जीवनात इतके थैमान घालणार असेल याची मात्र तेंव्हा पुसटशी कल्पनाही आली नाही. त्या बोर्डावर खाली बरेच काही लिहिले होते, पण ते वाचायला त्यावेळी कुणाकडेच वेळ नव्हता. त्या काळात रात्रीच्या वेळी परदेशांमधून अनेक विमाने मुंबईला येत असत. त्यामुळे इमिग्रेशन काउंटरसमोर ही भली मोठी रांग होती. त्यातून पुढे सरकत सरकत आमच्या पासपोर्टची पाहणी झाल्यावर आम्ही सामान घ्यायला गेलो.

आम्हाला उशीर झाल्यामुळे आमच्या विमानातले थोडे सामान आधीच येऊन कन्व्हेयर बेल्टवर आले होते आणि काही सामान कुणीतरी उचलून बाजूला काढून ठेवले होते. परदेशातून आल्यावर बेल्टवरली आपली बॅग ओळखणे हेही एक मोठे दिव्य असते. एक तर आपण असल्या अवाढव्य बॅगा एरवी कधी कुठेच नेत नाही, त्यामुळे त्यांचे रंग, आकार वगैरे आपल्या ओळखीचे नसतात आणि इतर अनेक प्रवाशांकडेही तशाच दिसणाऱ्या बॅगा असतात. म्हणून आपली बॅग ओळखून येण्यासाठी मी त्यांवर मोठी लेबले चिकटवतो, त्यांना रंगीत रिबिनी बांधतो अशा खुणा करून ठेवतो, पण वाटेत बॅगांची जी आदळआपट होते त्यात कधीकधी त्या खुणा नाहीशा होण्याचीही शक्यता असते.

आम्ही आमच्या बॅगा शोधल्या, त्यात आमच्या दोन बॅगा आम्हाला सापडल्या आणि दोन सापडल्याच नाहीत. आता त्या आल्याच नाहीत की भामट्यांनी पळवून नेल्या हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही एअरलाइन्सच्या काउंटरवर चौकशी करायला गेलो. तिथे बॅगा न मिळालेले वीसपंचवीस प्रवासी तावातावाने भांडत होते. काउंटरवाल्या माणसावर जोरजोरात ओरडत होते. तो तरी काय करणार? मुकाट्याने सगळे ऐकून घेत होता. थोडी शांतता झाल्यावर त्याने सगळ्यांना एकेक फॉर्म दिला आणि तो भरून द्यायला सांगितले. आपले नावगाव, पत्ता, फ्लाइट नंबर, सामानाच्या रिसीटचे नंबर वगैरे सगळा तपशील भरून आम्ही तो फॉर्म परत दिला. तोपर्यंत त्याच्याकडे विमानकंपनीकडून काही माहिती आली होती त्यात बैजिंगलाच राहून गेलेल्या सामानाचा तपशील होता. आमच्या नशीबाने त्यात आमच्या बॅगाही होत्या असे वाटले आणि थोडा धीर आला.

ते सामान पुढच्या फ्लाइटने मुंबईला पाठवतील असे आश्वासन मिळाले, पण बैजिंगहून मुंबईला येणारे पुढचे विमान तीन दिवसांनंतर येणार होते. पण आम्हाला तर पुण्याला जायचे होते, मुंबईत राहणे शक्यच नव्हते. मग आमचे सामान कूरियरने पुण्याला पाठवले जाईल असे सांगून त्याने आमचा पुण्याचा पत्ता लिहून घेतला. या गोंधळामध्ये आणखी तासदीडतास गेला. पण जास्त सामान नसल्यामुळे कस्टममध्ये वेळ लागला नाही. आम्ही ग्रीन चॅनेलमधून लवकर बाहेर आलो. आम्ही पुण्याला जाण्यासाठी गाडी बुक केलेली होतीच आणि तिचा सज्जन ड्रायव्हर आमची वाट पहात थांबला होता. पुढे मात्र आम्ही दिवस उजाडेपर्यंत सुरळीतपणे पुण्याला घरी येऊन पोचलो आणि एकदाचे हुश्श म्हंटले. तीन दिवसांनंतर आमचे राहिलेले सामानही आले.

अमेरिकेतले लोक सहसा घरात वर्तमानपत्रे घेतच नाहीत. मी तिथे असतांना रोज टीव्हीवरल्या बातम्यासुद्धा पहात नसे. अधून मधून जेंव्हा ऐकल्या होत्या त्यात कधीच करोनाव्हायरसचा उल्लेखही झाला नव्हता. २० जानेवारी २०२० रोजी आम्ही लॉसएंजेलिस विमानतळावर चांगले दीडदोन तास बसलो होतो किंवा इकडेतिकडे फिरत होतो. तिथून तर दररोज कितीतरी विमानांची बैजिंग किंवा शांघायला उड्डाणे होत असतात, पण तिथेही या साथीच्या वृत्ताचा मागमूससुद्धा नव्हता. कुठेही मुंबईतल्यासारखा बोर्ड नव्हता आणि कोणीही प्रवासी मास्क लावून बसले नव्हते. बैजिंगच्या विमानतळावरसुद्धा आम्हाला काही वेगळे जाणवले नाही. तिथे काही लोकांनी मास्क लावलेले दिसले, पण त्या लोकांना काही त्रास असेल किंवा प्रदूषणामुळे त्रास होण्याची भीती वाटत असेल असे मला त्यावेळी वाटले असेल. खरे तर आम्हाला त्याबद्दल विचार करायला सवड नव्हती. त्यामुळे २२ जानेवारीला मी मुंबईला येऊन पोचेपर्यंत कोरोना हे नावही ऐकले नव्हते.

मी पुण्याला आल्यावर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात त्याविषयी उलटसुलट काहीतरी छापून आलेले समोर येत होते. त्या काळात तो फक्त चीनमधल्या वूहान या शहरापुरताच मर्यादित होता, पण तिथे तो झपाट्याने वाढत होता आणि टीव्हीवर दाखवली जाणारी त्या शहरातली दृष्ये भयानक असायची. आम्हा दोघांना सर्दीखोकला, ताप असले काही लक्षण नसल्यामुळे आम्ही बचावलो अशी खात्री होती, पण पुढे बातम्यांमध्ये असे यायला लागले की ती लक्षणे २-३ दिवसांनंतर दिसायला लागतात. आम्ही इथे येऊन पोचल्याच्या २-३ दिवसानंतर हा कालावधी क्रमाक्रमाने ४-५, ७-८, १०-१२ दिवस असा वाढतच गेला आणि त्याप्रमाणे आमच्या मनातली सुप्त भीतीही रेंगाळत राहिली. शिवाय असेही समजले की ज्याला अजीबात लक्षणे कधी आलीच नाहीत असा माणूससुद्धा संसर्गाचा वाहक असू शकतो. त्यामुळे मी शक्यतो स्वतःला इतरांपासून दूर दूरच ठेवत राहिलो. मी चीनमार्गे प्रवास केला आहे असे कुणाला सांगायचीही सोय राहिली नव्हती. त्यामुळे मी तो विषयच टाळत राहिलो. यातून पूर्णपणे मुक्त व्हायला जवळजवळ महिनाभर लागला, पण त्यानंतर लवकरच हा कोरोना इतर मार्गांनी भारतात आलाच आणि सगळा देश लॉकआउट झाला. त्यातून तो आजवर पूर्णपणे सावरलेला नाही.

थोडक्यात सांगायचे झाल्यास चीनमार्गे भारतात परत येण्याच्या प्रवासात किंवा त्यानंतर मला तसा काही त्रास झाला नाही. तो सुरळीतच झाला असे म्हणता येईल, पण त्यात काही मजा मात्र आली नाही आणि तो संस्मरणीय वगैरे काही झाला नाही.

पुण्याचा स्वाइनफ्ल्यू २००९

हा लेख मी १४ ऑक्टोबर २००९ रोजी लिहिला होता. सध्याची परिस्थिती याहून खूपच गंभीर आहे, पण काही गोष्टी पूर्वीसारख्याच घडल्या असे दिसते.

मेक्सिकोमध्ये स्वाइनफ्ल्यूचा उद्रेक झाल्यानंतर त्याची साथ शेजारच्या यूएसएमार्गे जगभरात पोचेल अशी आशंका सगळ्यांनाच वाटू लागली होती. त्याला रोखण्याच्या उद्देशाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याला सुरुवात झाली होती. पण ही तपासणी नेमकी कशी करत होते कोण जाणे? क्ष किरणांच्या तपासणीतून शस्त्र दिसू शकते, स्फोटकाचा वास प्रशिक्षित कुत्रे ओळखू शकते, पण स्वाईनफ्ल्यूचे विषाणु अशा रीतीने शोधून काढून अलार्म वाजवणारे यंत्र अजून निघालेले नाही. “आमची तपासणी झाल्याचे आम्हाला तर समजले सुध्दा नाही”, “त्या पांढरा डगला घातलेल्या बाईंचे प्रवाशांच्याकडे लक्ष तरी कुठे होते? ती तर मोबाईल कानाला लावून नुसती खिदळत होती.” अशा प्रकारचे शेरे, ताशेरे ऐकायला किंवा वाचायला मिळत होते. फक्त रोगट डुकराचे मांस खाल्ल्यामुळेच हा रोग होतो अशी भ्रामक समजूत पसरली असल्यामुळे भारतातले लोक निर्धास्त होते. पण अखेर व्हायचे होते ते झालेच. पुण्यातली एक दुर्दैवी शाळकरी मुलगी या रोगाला सर्वात आधी बळी पडली आणि त्या बातमीने हाहाःकार उडवला.

त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा केसेस लागोपाठ येत गेल्या. पुण्याबाहेर मुंबई, बंगळूरू, दिल्ली, अहमदाबाद अशा दूर दूर असलेल्या शहरातून स्वाईन फ्ल्यूच्या बातम्या येऊ लागल्या, एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातसुध्दा त्याची लागण झाली असल्याचे वाचून सर्वांचे धाबे दणाणले. संशयित, पॉझिटिव्ह निघालेले, उपचार घेत असलेले आणि दगावलेले अशा सर्व रुग्णांची आंकडेवारी रोजच्या रोज वर्तमानपत्रात येऊ लागली. पण या सर्वच संख्यांमध्ये संपूर्ण भारतातली अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात अर्ध्याहून अधिक पुण्यातले रोगी असत. यामुळे पुण्याचा उल्लेख फ्लुणे असे व्हायला लागला होता. कांही लोकांनी तर स्वाईन फ्ल्यूइतकाच पुण्याचा धसका घेतला होता.

सर्दीखोकल्याच्या उपचारासाठी मुंबईतल्या आमच्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, “पुण्याला जाऊन आलात कां?”. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, “पुण्याहून तुमच्या घरी कोणी आले आहेत काय?” मी जर हो म्हंटले असते तर बहुधा त्यांनी मला थेट कस्तरबा रुग्णालयात पाठवले असते. आम्हालाही मनातून भीती वाटत होतीच. मुंबईच्या घरातला पांच दिवसाचा गणेशोत्सव संपल्यानंतर चार दिवस पुण्यातली आरास आणि तिथला विसर्जनाचा सोहळा पहायचा असे आमचे ठरले होते, पण भीतीपोटी तो बेत रद्द केला. या साथीचा पुण्याच्या गणेशोत्सवावर परिणाम झालेला टीव्हीवर दिसत होता, पण तो साजरा झालाच आणि विसर्जनाची मिरवणूकसुध्दा निघालीच. सुदैवाने त्यातून साथीचा मोठा उद्रेक झाला नाही.

त्या काळात एकदा पुण्याला रहात असलेल्या माझ्या मुलाचा दुपारी मला फोन आला. “ईशाला एकदम खूप जास्त ताप आला आहे आणि तो उतरत नाही आहे.” असे त्याने फोनवर सांगितले. ते दोघे बरेच अस्वस्थ झालेले त्यांच्या आवाजावरून जाणवले. अशा वेळी त्यांना आपल्याकडून होईल ती मदत करावी म्हणून आम्ही दोघे लगेच वाशीहून निघालो आणि पुण्याला जाऊन पोचलो. तोपर्यंत रात्र झाली होती. आम्ही तिथे पोचताच त्यांनी आम्हाला आमच्या वेगळ्या खोलीत नेले आणि रात्रभर तिथेच थांबायला सांगितले. लहानग्या ईशाला पहायला आम्ही अधीर झालो होतो, पण तिला एका वेगळ्या खोलीत झोपवले होते आणि तिथे कुणालाही जाऊ द्यायचे नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते, कारण तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तोपर्यंत औषधांनी तिचा ताप कमी झाला होता आणि काळजीचे कारण उरले नव्हते पण आम्ही दोघे वयस्क असल्यामुळे आम्हाला संसर्गाचा जास्त धोका होता म्हणून आमच्या मुलाने आम्हा दोघांना सकाळ उजाडताच वाशीला जायला परत पाठवून दिले.

अजूनही ती साथ पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. महिनाभर उलटून गेला असला तरी अजून नवे रुग्ण सापडत आहेत. कालच दोन लहान मुलींचा बळी पडल्याची बातमी आजच्या पेपरात आहे. फक्त आता त्याचे फारसे कांही वाटेनासे झाले आहे. दहशत वाटेनासी झाल्यावर आता दिवाळीसाठी आम्ही पुण्याला आलो आहोत आणि नाकावर आच्छादन न घालता पुण्याच्या रस्त्यातून फिरतही आहोत. पुण्यातील रस्त्याने चालतांना तोंडावर मास्क परिधान केलेले किंवा नाकाला रुमाल लावून जाणारे लोक दिसतात, पण त्यांची टक्केवारी ८०-९० पासून १०-१५ पर्यंत खाली आली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात लोकांची तोबा गर्दी आहे. स्वाईनफ्ल्यूसंबंधी उपयुक्त माहिती आणि खबरदारीचे उपाय यांचे फलक पुणे महानगरपालिकेने शहरात जागोजागी लावले आहेत. त्यातून लोकांचे प्रबोधन होऊन या साथीच्या प्रसाराला थोडा आळा बसला आहे यात शंका नाही.

या साथीवर लस बनवण्याच्या कामातसुध्दा पुणेकर शास्त्रज्ञांनी प्रगती केली असल्याची बातमी वाचली होती. (त्यानंतर एकदा आम्ही पुण्याला गेलो होतो तोपर्यंत ती लस बाजारात आली होती आणि आम्ही ती टोचून घेतली होती.) त्याशिवाय कांही लोकांनी इतर मार्ग शोधून काढले आहेत. योगायोगाने नारायण पेठेतल्या एका पुरातन गणपतीमंदिरासमोरून चाललो होतो. हे नांव पुणेकर मंडळींच्या बोलण्यातून ऐकलेले असल्यामुळे आत जाऊन दर्शन घेतले. लाकडाचे चौकोनी खांब, त्यावर लाकडी तुळया, कडीपाटाचे छत वगैरे जुन्या पध्दतीचे बांधकाम अजून टिकून आहे. बहुतेक खांबांवर अमूक तमूक गोष्टी करू नयेत याबद्दल सूचना देणा-या पुणेरी पाट्या लावलेल्या होत्या. बाहेर येतांना प्रवेशद्वाराजवळच स्वाईनफ्ल्यूबद्दल कांहीतरी लिहिलेला फलक दिसला. त्यावर एक संस्कृत श्लोक दिसल्यामुळे तो फलक वाचून पाहिला. स्वाईनफ्ल्यूपासून स्वतःचा खात्रीपूर्वक बचाव करण्याच् म्हणून कांही उपाय त्यावर दिले होते. ते असे आहेत.

  • गायीच्या शेणाच्या गोव-या आणून घरात ठेवाव्यात
  • रोज गोमूत्रप्राशन करावे
  • अमक्या तमक्या पदार्थांनी युक्त असा धूप जाळावा
  • खाली दिलेला मंत्र २१ वेळा म्हणावा
    संगजा देशकालोत्थाअपि सांक्रमिका गदाः।
    शाम्यन्ति .त्सरणतो दत्तात्रेयम् नमामि त्वम् ।।

**************

या लेखापूर्वी दि. ५ ऑगस्ट २००९ ला लिहिलेला लेख

स्वाइन फ्ल्यू

थोड्या दिवसांपूर्वी हे नांव पहिल्यांदा ऐकले होते तेंव्हा ते दूर परदेशात आलेल्या एका साथीचे नांव होते. डुकराचे मांस खाल्यामुळे तो रोग होतो असा त्याच्याबद्दल गैरसमज असल्यामुळे आपल्याला त्याची कांही भीती नाही याची इकडील लोकांना खात्री वाटत होती. यापूर्वी बाहेरच्या जगात मॅड काऊ आणि बर्डफ्ल्यूच्या साथी येऊन गेल्या होत्या. भारतात गोमांसभक्षण अत्यल्प प्रमाणात होते आणि त्या साथीचा प्रादुर्भाव झाला नाही. बर्डफ्ल्यूची लागण आधी कोंबड्यांना झालेली समजत असे आणि त्या संशयाने लक्षावधी कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. त्यानंतरसुध्दा अनेक महिने कित्येक लोक चिकन खात नव्हते. तो आजारही इकडे पसरला नाही. या अनुभवामुळे स्वाइनफ्ल्यूच्या साथीचे सुरुवातीला फारसे गांभीर्य वाटले नव्हते.
हळूहळू तो जगभर पसरत गेला. तेंव्हा परदेशातून येणा-या प्रवाशांतल्या संशयित रोग्यांची आरोग्यतपासणी होऊ लागली. परदेशातून येणारे लोक विमानानेच येतात आणि कांही थोड्या महानगरांतच ते उतरतात यामुळे त्याचे नियंत्रण करणे शक्य आणि सोपे आहे असा समज होता. परदेशात लागण होऊन इकडे आलेल्या रोग्यांची संख्या चाचणीनुसार वाढत असली तरी त्यांच्यातील बरेचसे लोक त्या परीक्षेचा निष्कर्ष येण्यापूर्वीच बरे होऊन गेलेले असत. त्यामुळे या रोगाचे स्वरूप अगदी सौम्य असावे आणि पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते अशा समजुतीने इथल्या लोकांना त्यापासून भीती नाही असे वाटले होते.
कालपरवा आलेल्या बातम्यांवरून हे सगळे गैरसमज दूर झाले असणार. परदेशात जाऊन न आलेल्या, पुण्यातील एका मुलीचा मृत्यू या आजाराने झाला आहे. एकंदर रोग्यांची संख्या पाहता आणि संख्याशास्त्राच्या हिशोबाने हा रोग कॉलरा, प्लेग या रोगांसारखा भयानक नाही असे असले तरी एकाद्या केसमध्ये तो प्राणघातक होऊ शकतो हे दिसून आले आहे. या घटनेमधून खालील विदारक सत्ये समोर आली आहेत.
१. परदेशातून आलेले विषाणू आता स्थानिक वातावरणात पसरले आहेत आणि त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे अवघड झाले आहे.
२. याची लक्षणे पावसाळ्यात सर्रास सगळ्या लोकांना होत असलेल्या विकारांपासून फारशी वेगळी नाहीत. त्यामुळे तो पटकन ओळखू येत नाही.
३. याची चाचणी करण्याची पध्दत अत्यंत महाग आहे आणि थोड्या जागी ती उपलब्ध आहे. फक्त परदेशातून आलेल्या विमानप्रवाशांच्या बाबतीत ती करणे शक्य होते, पण सरसकट सगळ्या रोग्यांची त्यासाठी तपासणी करणे शक्य नाही.
४. ज्या दुर्दैवी मुलीचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करणे आणि त्यानुसार औषधोपचार करणे शक्य होते व ते झाले होते असेही या बातमीत आले आहे. पुण्यातल्या विख्यात हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार होत होते. त्यात हयगय झाली की पूर्वीचा अनुभव नसल्यामुळे त्यात कांही तृटी राहिल्या की तिला झालेला हा रोगच वैद्यकशास्त्राच्या आंवाक्याच्या बाहेर गेला होता वगैरेवर चर्चा होत राहील. हे प्रकरण आता राजकारण आणि न्यायव्यवस्था या क्षेत्रात जाणार अशा बातम्या आहेत. त्यामुळे वृत्तपत्रातल्या बातम्यांच्या आधारे त्याबद्दल कांही न बोलणेच इष्ट आहे.
५. आतापर्यंत ज्या शाळांची नांवे या संदर्भात पेपरमध्ये आली आहेत त्या सर्व शाळा उच्चभ्रू लोकांच्या मुलांच्या आहेत. ‘हा एक परदेशातला रोग आहे’ असा समज आधी होता, आता “तो कॉन्व्हेंटमधल्या मुलांना होणारा आहे” असे कोणाला कदाचित वाटेल. तसे समजायचे कारण नाही. तो आबालवृध्द कोणालाही होऊ शकतो.

उगाच भीती पसरवावी असा हे लिहिण्याचा उद्देश नाही. जगातल्या कुठल्याच देशात या रोगामुळे हाहाःकार उडालेला नाही. त्यामुळे त्याचे स्वरूप सौम्यच असावे असे वाटते. पण तो आता दर्लक्ष करण्याइतका किरकोळ राहिलेला नाही. तो होऊ नये यासाठी नक्की कशी सावधानता बाळगावी हे मलासुध्दा ठाऊक नाही. जमेल तेवढी सावधगिरी बाळगावी आणि नियमित आहार, व्यायाम वगैरे करून आपली प्रतिकारशक्ती शाबूत ठेवावी एवढेच करणे सध्या शक्य आहे.
मला ईमेलवरून आलेली त्रोटक माहिती खालील चित्रात दिली आहे.