माझ्या पिढीमधल्या बहुधा प्रत्येक मुलाने शाळेत असतांना श्यामची आई हे पुस्तक वाचलेलेच असायचे आणि त्याने तो भारावून गेलेलाही असायचा. यातला श्याम म्हणजे लहानपणीचे साने गुरुजी अशी माझी तरी ठाम समजूत होती. त्यांची देशसेवा वगैरे गोष्टी मोठा झाल्यानंतर समजल्या.
मी अकरा वर्षांपूर्वी ‘श्यामची आई’ या चित्रपटावर लिहिलेला लेख आणि साने गुरुजींची माहिती देणारा वॉट्सअॅपवर मिळालेला एक लेख खाली दिले आहेत.
श्यामची आई
छम् छम् छम् ….. छम् छम् छम् ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम् छम् छम् ….. छम् छम् छम् ।।
मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम् छम् छम् ।।
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
“मोऱ्या मूर्खा- !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम ।।
छम् छम् छम् ।।
तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म् ।।
छम् छम् छम् ।।
हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,
भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला’श्यामची आई’ हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
‘श्यामची आई’ हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. “दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात.” असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.
—————————————–
साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा स्मृतिदिन (११ जून,१९५०)
साने गुरूजी हे प्रसिद्ध, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लिखाणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. गावची खोती त्यांच्या घराण्यात होती.खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर,१८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचे जीवन घडले . त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला.
१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीच वापरत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले , दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले , जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले . १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही कविता त्या काळी सर्व शाळांमधून शिकवली जायची
मातृहृदयी गुरुजींनी आईच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे याच नावाचा मराठी चित्रपट निघाला. रमेश देव ,सीमा,इंदिरा चिटणीस यांनी सुंदर अभिनय करून गुरुजींच्या कादंबरीला न्याय दिला .
आचार्य अत्र्यांसारख्या डोंगराएवढ्या प्रचंड माणसाने १०००० वर्षात पुन्हा होणार नाही असा अजरामर चित्रपट “श्यामची आई ” निर्माण केला. या चित्रपटाला भारत सरकारने त्याच वर्षी (१९५४)सुरु केलेला सुवर्ण कमळ पुरस्कार दिला.
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती
माणगावचे सानेगुरुजी स्मारक
साने गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग ग्राउंड बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात ‘सानेगुरुजी भवन’ आणि ‘आंतरभारती अनुवाद केंद’ अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘सानेगुरुजी भवना’मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच ‘आंतरभारती अनुवाद केंद्र’ हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक समानता येईल असे त्यांना वाटत होते परंतु समाजातील असमानता वाढतच गेली.तशातच महात्मा गांधीजींचा खून झाला त्या मुळे हळव्या मनाचे गुरुजी निराश झाले होते आणि त्यांनी २१ दिवसांचा उपवास देखील केला आणि शेवटी आपला मनोभंग झाला म्हणून ११ जून,१९५० रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेऊन जीवन संपवले आणि सारा देश एका महान देशभक्ताला मुकला.
सुधीर फडके यांनी गुरुजींचे बलसागर भारत होवो हे गाणे गायले आहे.
विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार करणाऱ्या शुचिर्भूत व्यक्तिमत्वाच्या परमपूज्य सानेगुरुजींची आठवण सगळ्यांना कायमच होत राहील.
आजच्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली
…… लेखक अज्ञात – वॉट्सअॅपवरून साभार दि.११-०६-२०२०
नवी भर दि.२४-१२-२०२०
लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्य-मिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )
- माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरून साभार
Filed under: कला आणि कलाकार, देशभक्त, व्यक्तीचित्रे | Leave a comment »