चंद्राची गाणी

चंद्राची गाणी – भाग १ – बालगीते

कोजागरी पौर्णिमा https://anandghare2.wordpress.com/2017/10/05/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be/

मी एकदा कोजागरी पौर्णिमेनिमित्य होऊन गेलेले खास चंद्रगीतांचे दोन कार्यक्रम पाहिले होते. यावरून मला आठवले की या ब्लॉगच्या सुरुवातीलाच ‘तोच चंद्रमा नभात’ या नावाची एक दीर्घ मालिका मी ३३ भागात लिहिली होती. तिच्या अखेरीस ‘चंद्र’ या विषयावरील किंवा चंद्राचा उल्लेख असलेली बरीचशी गाणी मी जमवली होती. तिचा संग्रह पुन्हा उघडून पाहिला आणि त्यातली काही निवडक गाणी तसेच त्यात नसलेली पण मी ऐकलेली चांगली गाणी या ब्लॉगवर द्यायचे ठरवले.
आपल्या तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

मधुसूदन कालेलकर हे तसे पाहता गद्य लेखक, नाटककार, पटकथाकार वगैरे म्हणून नावाजलेले आहेत, पण बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातली ही अंगाई ऐकत ज्या मुली मोठ्या झाल्या त्या आता माता झाल्या आहेत आणि त्यांच्या लहानग्या मुलांना हे गाणे ऐकवत थोपटतांना मी त्यांना पाहिले आहे.

थोपटून थोपटून बाळ झोपी गेल्यावर सुध्दा आईचं लक्ष त्याच्याकडे असतंच. त्याला झोपेतच मंद मंद हंसतांना पाहून ती म्हणते,

चांद मोहरे, चांदणे झरे, झोपेतच गाली असा, हसशी का बरे ?

गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी ।
उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?

उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला ?
दिसते का हळू विमान, एक संचरे ?

बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे ?
खचितच तेच प्राणनाथ, सांगू काय रे ?

जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड ।
फिरुनी जाय लंघुनीया, सात अंबरे ।।

लहान बाळाच्या कल्पनाविश्वात काय काय दडलेले असेल आणि त्यातले काय त्याच्या स्वप्नात येत असेल कोण जाणे, पण लहान मुलांच्या गोष्टीतल्या नीलपरीचा आधार घेऊन आईचे मन बाळाच्या वतीने आभाळात उंच भरारी घेते आणि तिथेही तिला तिचा प्राणनाथ दिसतो. अशी कल्पना कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. याच गदिमांनी अजरामर झालेले गीतरामायण लिहिले. त्यातली श्रीरामाची आई कौसल्यामाई आपल्या तान्हुल्या रामचंद्राचे किती कौतुक करते यावर त्यांनी एक पूर्ण गीत लिहिले आहे.

सावळा गं रामचन्द्र माझ्या मांडीवर न्हातो। रक्तगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो।।

या गीतात चंद्राचा उल्लेख दोन जागी आला आहे. एका ओळीत ती माउली म्हणते,

सावळा गं रामचन्द्र रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो।।

निजलेल्या रामचंद्राला पाहून आभाळातला चंद्र लाजून ढगाआड लपून बसतो पण रामचंद्राला पहायला जेंव्हा चंद्र ढगाबाहेर येतो, तेंव्हा तो रामचंद्राच्या नजरेला पडताच त्याला इतका आवडतो की आपल्या हातात चंद्र हवा म्हणून तो हट्टच धरतो. याबद्दल कौसल्या सांगते,

सावळा गं रामचन्द्र चन्द्र नभीचा मागतो। रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो।।

बाळ बोबडे बोल बोलायला लागतं तसे आई त्याला गाणी शिकवायला लागते. गेल्या कमीतकमी तीन पिढ्या एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणत मोठ्या झाल्या आहेत. ते आहे

चांदोबा चांदोबा भागलास कां, लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी।।

या गाण्यात काय गंमत आहे कोण जाणे. पण त्याची लोकप्रियता पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी या गाण्याला शाळकरी मुलांच्या अँगलमधून कांही आशय देण्याचा प्रयत्न केला आहे तो अशा प्रकारे

चांदोमामा चांदोमामा भागलास काय ? घरचा अभ्यास केलास काय ?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय ? पुस्तक हरवून बसलास काय ?
चांदोमामा चांदोमामा रुसलास काय ? गणितात भोपळा घेतलास काय ?

एके काळी गृहपाठ न करणे, पुस्तक हरवणे, गणीतात शून्य मार्क मिळवणे वगैरे गोष्टींची मुलांनी खूप भीती वाटायची. चांदोबाच्या पळपुटेपणाच्या आणि लपून बसण्याच्या मागे यातलेच काही कारण असावे असा तर्क या गाण्यात आहे.

लहान मुलांना सगळ्यात प्रिय खाऊ म्हणजे चॉकलेट. त्याचाच बंगला बांधला तर त्याच्या आजूबाजूला कसले दृष्य असेल? त्याची कल्पना फुलवतांना मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ।।
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार । शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार ।।
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन । हेलो हेलो करायला छोटासा फोन ।।
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार । पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल ।।

यानंतर त्या बंगल्याची कल्पना फुलवतांना त्यात मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो । छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो ।।
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला । मैनेचा पिंजरा वर टांगला ।।
किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला ?

कधी कधी मुलाचा सख्खा मामा त्याला हंसत खेळत बाराखडी शिकवण्यासाठी अ आ आई म म मका, मी तुशा मामा दे मला मुका ।। हे गाणं म्हणतो त्यातसुध्दा चांदोमामा पाहिजेच

प प पतंग आभाळात उडे। ढ ढ ढगात चांदोमामा दडे।।

एखादी चिमुरडी पोर एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी आणण्यासाठी आपल्या दादाच्या मागे लागते. या खास वहिनीला घरी कशी आणायची?

वहिनीला बसायला चांदोबाची गाडी । चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी ।
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान। ….. असा सगळा तिचा थाटमाट!

दुसरी एक छकुली चन्द्राला ( किंवा चन्द्रिकेला) चंदाराणी म्हणते आणि विचारते

चंदाराणी, चंदाराणी, कां ग दिसतिस थकल्यावाणी ?

शाळा ते घर घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा,
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?

वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई।
म्हणुनिच कां तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी।।

चंद्राला कोणी चंदाराणी म्हणते तर कोणी चंदाराजा म्हणत बोलावते,

चंदाराजा ये ये, चंदाराजा ये ।।

निळ्या निळ्या आभाळात, लखलखत्या चांदण्यात ।
शुभ्र रुपेरी रथात, बसुनि इथे ये ।।

शुभ्र रुप्याची गाडी, पळवी सशाची जोडी ।
दूर करुन अंधारा, उजळित नभ ये ।।

या इथे नि तुजवाचुन, व्याकूळ हो तूच जाण ।
एक दिनी मनोरथा, पुरविण्यास ये।।

आपल्या घरामध्येच गोजिरवाणे हंसरे तारे असतांना आभाळातल्या चांदण्या पहायची गरजच कुठे आहे असं विचारीत एक आई म्हणते,

घरात हंसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे ? असा प्रश्न विचारून ती पुढे असे सांगते.

गोकुळ येथे आनंदाचे, झरे वाहती शांतिसुखाचे ।
वैभव पाहुन मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे ।। मी पाहू कशाला नभाकडे ?

आमच्या लहानपणी शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये पहिली कविता होती

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ।
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे ।

आणि शेवटी

इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील ।।

आमच्या शालेय शिक्षणाची सुरुवात अशा सुंदर आणि सकारात्मक विचाराने व्हायची.

———–

चंद्राची गाणी – भाग २ – प्रेमगीते

चंद्र आणि प्रेम यांचे अतूट नाते युगायुगापासून चालत आले आहे. महाकवी कालीदासांपासून ते आजच्या नवकवींपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रेम या विषयावर साहित्यिक कृती निर्माण केल्या आहेत त्यात कुठे ना कुठे चंद्र डोकावतांना दिसतोच. चांदण्या रात्रीच्या धुंद करणाऱ्या वातावरणाचे वर्णन मराठी कवितेत विविध तऱ्हेने आले आहे.

मुख्यतः शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन त्यातल्या गाण्यांना एकत्र गुंफण्यापुरते प्रसंग टाकून अनेक संगीत नाटके तयार करण्यात आली. त्या नाटकांमधल्या गाण्यांमध्ये शब्दांना फार जास्त महत्व नसे, किंबहुना ती नाट्यगीते एकाद्या बंदिशीसारखी अगदी लहानशी असत आणि त्यातल्या ओळी पुनःपुन्हा घोळवून गायिल्या जात तरीसुध्दा अनेक गाण्यांचे बोल स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. ते शब्द आलाप तानांच्या गुंत्यांमध्ये हरवून जातात. काही सुंदर गीते मात्र याला अपवाद आहेत. अशा एका भावपूर्ण आणि सुप्रसिध्द नाट्यगीताचे बोल आहेत,

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा ।

दाही दिशा कशा खुलल्या, वनिवनि कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनि जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा।।

चंद्रामुळे समुद्राला भरती येते त्याचबरोबर हृदयातल्या प्रीतीच्या सागरालाही येते आणि चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो आणि प्रणयरसाने भारला जातो असे वर्णन या गीतात आहे.

चित्रपट या माध्यमात मात्र आणि विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये अनेक भावपूर्ण गीते पहायला मिळतात आणि ऐकून ऐकून तोंडपाठ होतात. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले असेच एक सदाबहार गीत आहे,

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला ।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो ।
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो ।
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा ।
अंग का चोरिसी दो जीवांच्या संगमा ।
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

चांदण्या रात्रीमधल्या अशा धुंद वातावरणाचा लाभ प्रेमिकांनी घ्यायलाच पाहिजे ना? रेडिओवरील भावसरगम नावाच्या कार्यक्रमातल्या या विषयावरील पहिल्याच गाण्याने पन्नास वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. त्या काळात या गाण्याने धमाल उडवून दिली होतीच, त्यानंतर असंख्य वेळा असंख्य कार्यक्रमात ते गायिले जाऊनही आणि ऐकूनही त्याची गोडी अजून अवीट राहिली आहे. मराठी भावगीतामध्ये हा मैलाचा दगड ठरला. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल, श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल आणि अरुण दाते व सुधा मलहोत्रा यांचे आवाज यामध्ये सर्वात जास्त सरस काय आहे ते सांगता येणार नाही. प्रेम या भावनेचा इतका तरल आविष्कार आणखी कुठे पहायला मिळणार नाही. दुसरे तिसरे काही नको, चंदेरी रातीत फक्त एकमेकांच्या जवळ असणे एवढेच या गीतातील प्रेमिकांना हवे आहे. हे प्रेमी युगल म्हणते,

शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी ।
चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातूनी ।
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा ।
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू, भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला ।
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा ।
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जिवा ।
अंतरीच्या स्पंदनाने, अन् थरारे ही हवा ।
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा ।
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥

शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी ।
दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी ।
वाकला फ़ांदीपरी, आता फुलांनी जीव हा ।
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥
हेच कवी, संगीतकार आणि गायकगायिका यांचे आकाशवाणीच्या त्याच मालिकेतले त्या काळातले दुसरे अप्रतिम गाणे आहे. त्यातले प्रेमी युगुलही चांदण्या रात्री एकत्र आले आहे आणि हातात हात घेऊन बसले असतांना त्यांना रोजचाच चंद्र वेगळा आणि नवा नवा वाटू लागतो.

हात तुझा हातात अन् धुंद ही हवा ।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।ध्रु।।

रोजचेच हे वारे, रोजचेच तारे ।
भासते परि नवीन विश्व आज सारे ।
ही किमया स्पर्शाची भारिते जिवा ।।१।।

या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया ।
मोहरले हृदय तसे मोहरली काया ।
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा ।।२।।

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो ।
स्वप्‍नांच्या वाटेने चांदण्यात नेतो ।
बिलगताच जाईचा उमलतो थवा ।।३।।

…… आणि त्या सुखाचा उपभोग घेता घेता..

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे ।
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ।
आज फुले प्राणातून केशरी दिवा ।।४।।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।

फक्त हातात हात घेऊन एकमेकांच्या जवळ राहण्यात सर्वच प्रेमिकांचे समाधान होत नाही. ते एक एक पाऊल पुढे जाण्यासाठी आतुर झालेले असतात. अशी एक अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला ।
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला ।
साजणा रे मोहना रे ऐक ना रे, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगे सोयरे मी सांडिले पाटी ।।

मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती ।
प्रीतीची हीच ना रीती, कशाला कुणाची भीती ।
झाडामागे चांद हा वरती आला, ये ना ये ना जीव आतुर झाला।
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ।।

साजणाने तिला प्रतिसाद दिल्यावर मग तर काय विचारता? आता ही चांदरात मनात केवढा कल्लोळ माजवणार आहे अशा विचाराने ती म्हणते,

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच ।
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच ।
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर ।
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ।
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून ।
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून ।
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥

तर एका नाट्यगीतामधला नायक असे उद्गार काढतो,

चांद माझा हा हासरा, नाचवी कसा प्रेमसागरा, प्रीतलहरी ये भरा।।
गुण कनकाचा नवकोंदणी गे, शोभसी सखे तू हिरा ।।
प्रेमाचे रंग अनेक आहेत. एकमेकांच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर ते सहजपणे समजू नये यासाठी कधी कधी लपवाछपवीचे खेळ सुरू होतात, पण ते शक्य असते का? मग..

लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे, उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे, घडल्यावाचुन चुकेल का ?

….. या खेळात सुध्दा चंद्र असा येतो …

पुरे बहाणे गंभिर होणे, चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे, केली चोरी छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल कां?

चंद्राच्या साक्षीने सगळे होत असते, तो सुध्दा लपून छपून ते पहात असतो, शिवाय प्रेमिकांच्या मनातही चांदणे फुललेले अलते, त्यामुळे ते गुपित उघड होणारच. अशा अवस्थेत कोणी सावधगिरीचा इशारा देते.

हसले मनी चांदणे, जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे ।।

बोचतील ग, फुलं जाइची तुझी कोमला काय ।
चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ?

पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे ।
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे ।

कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू ।
लाजलाजर्‍या कळ्याफुलांना खुद्‌कन्‌ आलं हसू ।

हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी ।
का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ?

का ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्‍या जणी ?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ।।

किति, किति ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची ।
नव्हे ग श्यामसुंदराची ।।

नव्या संसाराची चित्रे कल्पनेमध्ये रंगवतांना एक युवती म्हणते,

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची ।।ध्रु।।

सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली ।
कळिकळि फुलून ही चढते, मंडपी वेल मायेची ।।१।।

संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली ।
आली वयात खुदुखुदू हसते, होऊनी नवरी लग्नाची ।।२।।

हे माहेर , सासर ते, ही काशी, रामेश्वर ते ।
उजळिते कळस दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची ।।३।।

गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर या त्रिकूटाने अनेक अतीशय गोड गाणी दिली आहेत. त्यांच्या या अजरामर झालेल्या गीतातसुध्दा शेवटी चंद्र आलाच. ल या अक्षराने सुरू होणारी मराठी गाणी कमी आहेत, पण हे अक्षर गाण्याच्या शेवटी खूप वेळा येते. त्यामुळे भेंड्यांच्या कोणत्याही खेळात हे गाणे हटकून येतेच.

रोजचाच चंद्र प्रेमिकांना नवा नवा वाटतो हे वर आलेलेच आहे. दुसरा एक प्रेमी आपल्या सखीला असेच सांगतो आणि अर्थातच तीही त्याला सुरेख प्रतिसाद देते.

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी ।
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतिकुंज हा, बैस ये सुहासिनी।।

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी ।
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी ।
अननुभूत माधुरी आज गीत गायनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी ।।

कोण बाइ बोलले वाणि ही प्रियंवदा ।
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा ।
कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी ।।

मुंबईचा जावई या चित्रपटातली लग्न होऊन सासरी आलेली एक लाजरी बुजरी नववधु आधी लहानशा घरातल्या नातेवाईकांच्या बुजबुजाटाने बावरून गेलेली असते. त्या जोडप्याला एकांत मिळावा म्हणून एकदा घरातली इतर सारी मंडळी बाहेर जातात. ऑफीसमधून घरी येणार असलेल्या पतीची वाट पहात असतांना ती विचार करते,

कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता?

कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालु का, कवळू तुज नाथा ?

फुलते कळि की फुलवी वारा ?
चंद्र हसवि की हसवी तारा ?
कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता ।।

कुणी न पुढती कुणी न पाठी ।
घरात आहे मीच एकटी ।
प्रथमदर्शनी बोलायाचा, भाव तरी कोणता ?

चंद्राचा उल्लेख असलेली अशी किती प्रेमगीते सांगावीत?

. . . . . . . . . . . . . . . . . . .

चंद्राची गाणी – भाग ३ – विरहगीते

चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.

रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।

उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,

चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम मादक गीत आपल्याला दिले आहे.

आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.
कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाजऱ्या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।

बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।

कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?

कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणाऱ्या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.

मधुचंद्र चित्रपटातल्या बिचाऱ्या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,

मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत ।
अशी निघाली लग्‍नानंतर, वार्‍यावरची वरात ।
वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।

अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्‌. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.

वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।

कवयित्री शान्‍ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.

प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन्‌ आंसवे ती, आज तू विसरून जा ।।

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।

कवयित्री शान्‍ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?

चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।

किंवा

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।

————–

चंद्राची गाणी – भाग ४ – इतर गीते

निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।

या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुसऱ्यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहेऱ्याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?

कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।

टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वाऱ्यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।

केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।

चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले अशा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.

प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणाऱ्या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।

मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।

विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।

अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

एरवी नुकताच उगवलेला ‘चंद्र पुनवेचा’ नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.

संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गायिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।
हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।

किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलास आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, गळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।

सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका तऱ्हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.

पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।
वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।

‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.

पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।

गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।

सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।

विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।

जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे ज्ञानेश्वरांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.

. . . . . . . (समाप्त)

नवी भर दि. १९-१०-२०२१

चंद्रावरील लोकप्रिय हिंदी गाणी

1 आधा है चंद्रमा
2 चांद मेरा दिल चांदनी हो
3 ये चांद सा रोशन चेहरा
4 ये रात भीगी भीगी
5 तू मेरा चांद मै तेरी चाँदनी
6 चांद जाने कहा को गया
7 चांद को क्या मालूम
8 चांद फिर निकला मगर
9 चौधवी का चांद हो
10 धीरे धीरे चल चांद गगनमें
11 एक रात में दो दो चांद खिले
12 ना ये चांद होगा
13 ओ रात के मुसाफिर चंदा
14 तुझे सूरज कहूं या चंदा
15 वो चांद खिला वो तारे हँसे
16 ये रात ये चांदनी फिर कहाँ
17 खोया खोया चांद

आज कोजागिरी पौर्णिमा आहे.
योगायोग की काय कुणास ठाऊक, मी ही छतावर आणि ती ही आली होती.
असे वाटले चंद्र छतावर उतरला होता, ती माझ्यासमोर आली आणि माझ्या लक्षात आले…
“तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला।
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला!”
चंद्र खळखळून हसला. मग त्याला मी विचारले,
“मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं, मेरे यार सा हसीं?
चाँद ने कहा, चाँदनी की कसम, नहीं, नहीं, नहीं।”
“रुक जा रात ठहर जा रे चंदा!”असं म्हणत मी चंद्राला थांबण्यासाठी आर्जव केली. त्याला आकाशात रेंगाळत चालण्याची मनधरणी केली..
“धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात,
टूट ना जायें सपने
धीरे धीरे चल, चाँद गगन में!”
कदाचित, चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा. नाहीतर शरदाच एवढ सुंदर चांदणं दिसलं नसतं. इतकी वर्ष झाली पण अजूनही..
“तोच चंद्रमा नभात आहे अन् तिच ‘अश्विन’ यामिनी आहे, आणि मज समेत तिच ती कामिनी आहे”.
अरे! पण हे काय बघतोय मी?..
“एक रात में दो दो चांद खिले,
एक घुँघट में एक बदरीमें”
ती लाजली अन् मी बावरून गेलो.
“चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घबराया”
नक्कीच काल रात्री काय घडले म्हणुन उद्या सारे चर्चा करतील,.
“कल चौदहवी की रात थी,
शब्बभर रहा चर्चा तेरा।
कुछ ने कहा ये चाँद है,
कुछ ने कहा चेहरा तेरा।।”
यामध्ये माझी काही चुक आहे का? मी विचारतो,
“ओ रात के मुसाफिर,
चंदा ज़रा बता दे
मेरा कसूर क्या है,
तू फ़ैसला सुना दे!!”
परंतु काही असो आजतरी…..
“वो चाँद खिला, वो तारे हँसे
ये रात अजब मतवाली है;
समझने वाले समझ गये है,
ना समझे, न समझे वो अनाड़ी हैं !”

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना संगीतमय शुभेच्छा !!

संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

कवितांमधले मन आणि मनावरील कविता

संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या कवींपर्यंत असंख्य कवींनी मन या विषयावर किंवा त्यासंबंधी काव्ये लिहिली आहेत. अनेक निष्णात संगीत दिग्दर्शकांनी लावलेल्या मधुर चालींवर मोठमोठ्या गायक गायिकांनी गाऊन त्या गीतांना अजरामर केले आहे. अशा प्रसिद्ध काव्यांमधल्या मला आवडणाऱ्या कांही रचनांची एक माळ गुंफायचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. 

मन म्हणजे काय हे कुणाला सांगायची काही गरज आहे कां? आपल्या सर्वांकडे मन असतेच. अनेक, किंबहुना असंख्य निरनिराळ्या कल्पना, विचार आणि भावनांचे तरंग त्यात सतत उठत असतात तसेच ते विरूनही जात असतात. पण त्यांना थारा देणारे हे मन आपल्या शरीरात नक्की कुठे असते? प्रीतीमुळे प्रेमिकांच्या ‘हृदया’ची स्पंदने (‘दिल’की धडकने) वाढतातच, शिवाय ‘बहरुन ये अणु अणू, जाहली रोमांचित ही ‘तनू’ अशी त्यांची अवस्था होते. एकादी करुण घटना नेहमी ‘हृदय’द्रावक असते आणि ज्याच्या ‘काळजा’ला ती भिडत नाही त्या माणसाला आपण ‘निर्दय’ म्हणतो. आईचे मृदू ‘काळीज’ मायेने ओथंबलेले असते तर क्रूर कर्म करणा-या माणसाला उलट्या ‘काळजा’चा म्हणतात. भीतीपोटी आपल्या ‘पोटा’त गोळा उठतो, ‘पाय’ लटपटतात, चित्तथरारक गोष्टीने ‘सर्वांगा’वर कांटा उभा राहतो, तर रागाने ‘तळपाया’ची आग ‘मस्तका’ला जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असा परिणाम करणाऱ्या भावना मात्र इथे तिथे निर्माण न होता फक्त मनातच निर्माण होतात. म्हणजे त्या नेमक्या कुठे उठतात?

या मनाला शरीरातल्या हात, पाय, हृदय, काळीज, मेंदू यासारख्या अवयवांसारखा विशिष्ट आकार नसतो, ते कधी डोळ्यांना दिसत नाही की कानाला ऐकू येत नाही. रंग, रूप, गंध, स्पर्श, चंव, भार, घनता असले जड वस्तूचे कोणतेच गुणधर्म त्याला नसतात. पण जरी त्याचे आकारमान सेंटीमीटर किंवा इंचात मोजता येत नसले तरी एकाद्याचे मन आभाळाहून मोठे असते तर कोणाचे अतीशय संकुचित, अणूरेणूहून तोकडे असू शकते. त्याचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत मात्र असते. कुणी तरी म्हंटले आहे,
“शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुसऱ्या कोणालाही मनाइतका मान नाही.”
असे हे मन ! पाच ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला सभोवतालच्या जगाची माहिती मिळते आणि आपल्या बुध्दीला त्यातून सगळे समजत असते. पण मनाचे अस्तित्व मनालाच जाणवते, ते समजले असे वाटते पण उमगले याची खात्री वाटत नाही. मग आपले मन कल्पनेनेच त्याचाच शोध घेत राहते. असाच एक शोध कवी सुधीर मोघे यांनी किती सुरेख शब्दात व्यक्त केला आहे !

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले ।
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले।
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा ।।

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ ।
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल ।
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही ।
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही ।
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा ?

या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यासाठी सुधीर मोघे यांनीच आपल्या दुसऱ्या एका सुरेख कवितेमध्ये थेट मनालाच असा प्रश्न विचारला आहे. पण हा प्रश्न विचारणारा ‘मी’ म्हणजे कोण असेल आणि त्याला मनाचे मनोगत कसे कळेल हा आणखी एक मोठा गहन प्रश्न आहे.

मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का !

कोण जाणे केवढा तूं व्यापतोस आकाशाला ।
आकाशाचा अर्थ देसी एका मातीच्या कणाला ।
तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का !

कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श ।
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश ।
तुझे अरुपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का !

कशासाठी कासाविशी कुणासाठी आटापिटी ?
खुळ्या ध्यास-आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनांतले आर्त माझ्यामनी ढळेल का !
मना तुझे मनोगत मला कधीं कळेल का ?

असे हे मन ! भल्या भल्यांना न कळलेले, बुध्दीच्या आणि जाणीवांच्या पलीकडे असलेले पण तरीही सतत खुणावत राहणारे ! महान कवीवरांनी लिहिलेल्या विविध लोकप्रिय गीतांमधूनच त्यात डोकावून पहाण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

. . . . . . . . . . . . . . .

आपल्या मनात उठणाऱ्या निरनिराळ्या भावनांमध्ये प्रेम ही सर्वात उत्कट असते. त्यामुळेच संवेदनशील कवीमनाला ती सर्वात जास्त भुरळ पाडते. या भावनेचीच अगणित रूपे त्यांनी आपल्या रचनांमधून दाखवली आहेत. प्रेमाचा अंकुर मनात कधी फुटला हे एका प्रेमिकेला समजलेसुध्दा नाही. ते जाणता अजाणता घडून गेले, कसे ते पहा. या ठिकाणी हृदय या शब्दाचा अर्थ फक्त मन असाच होऊ शकतो. शरीरविज्ञानातल्या हृदयात चार मोकळे कप्पे असतात आणि ते आळीपाळीने आकुंचन व प्रसरण पावून त्यातून रक्ताभिसरणाचे कार्य करत असतात. प्रीतीच्या किंवा कुठल्याही भावना अज्ञात अशा मनातच जागतात.

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा ।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते ।
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ।
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता ।।

दिवसरात्र ओढणी या मनास लागते ।
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते ।
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता ।।

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी ।
नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी ।
वेड वाढवून तो उडून जाय मागुता ।।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।

पण तो अंकुर वेगाने वाढत जातो आणि त्यातून मन मोराचा सुंदर पिसारा फुलतो. तेंव्हा ती प्रेमिका म्हणते.

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला।

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला।
गोजिरवानी, मंजुळ गाणी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला।
येडं येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला ।।

हे वेडावलेले मन आपल्या मनातले गुपित कुणाला तरी सांगून टाकायला आसुसलेले असते, पण तसे करायची त्याला लाजही वाटत असते. आपल्याला नक्की काय झाले आहे असा संभ्रमही त्याला पडत असतो. जे काहीतरी झाले आहे ते शब्दात कसे व्यक्त करायचे असा प्रश्नसुध्दा त्याला पडतो. ते स्वतःलाच विचारते,

काय बाई सांगू ? कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

उगीच फुलुनी आलं फूल ।
उगिच जीवाला पडली भूल ।
त्या रंगाचा, त्या गंधाचा ।
अंगावर मी ल्याले साज ।
काही तरी होऊन गेलंय आज !

जरी लाजरी, झाले धीट ।
बघत रहिले त्याला नीट ।
कुळवंताची पोर कशी मी ।
विसरुन गेले रीतरिवाज ?
काही तरी होऊन गेलंय आज !

सहज बोलले हसले मी ।
मलाच हरवुन बसले मी ।
एक अनावर जडली बाधा ।
नाहि चालला काही इलाज ।
काही तरी होऊन गेलंय आज !
हे तसे अजून तरी एकतर्फी प्रेम आहे. पण ते मनात नवीन इच्छा आकांक्षा निर्माण करते आणि त्यांची पूर्ती होण्यासाठी त्याला तसाच प्रतिसादही मिळायलाच हवा ना ! पण हे कसे घडणार ? आपल्या मनातल्या भावना दुस-या कोणाला सांगण्याआधी ते मन स्वतःलाच विचारते,

मी मनात हसता प्रीत हसे ।
हे गुपित कुणाला सांगु कसे ?

चाहुल येता ओळखिची ती ।
बावरल्यापरि मी एकांती ।
धुंद जिवाला डोळ्यांपुढती ।
नव्या नवतिचे स्वप्न दिसे ।।

किंचीत ढळता पदर सावरी ।
येता जाता माझि मला मी ।
एक सारखी पाहि दर्पणी ।
वेड म्हणू तर वेड नसे ।।

काहि सुचेना काय लिहावे ।
पत्र लिहू तर शब्द न ठावे ।
नाव काढिता रूप आठवे ।
उगा मनाला भास असे ।।

सांगायला जावे तर आवाज फुटत नाही, लिहायला शब्द सुचत नाही म्हणून प्रेमिका एक आगळा मार्ग शोधून काढते. आपल्या मनातल्या अस्फुट भावना प्रियकराला कळाव्यात म्हणून प्रेमिका सांगते

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे ।
साजाविना कळावे संगीत लोचनांचे !

मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा ।
सांगावया तुला ते नाही जगात भाषा !
हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे ।।

हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही ।
कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही ।
दोघांस गुंतवीती, म‍उ बंध रेशमाचे ।।

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या ।
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या !
गंधात धुंद वारा, वा-यात गंध नाचे ।।

थोडी धिटावलेली आणि कल्पक प्रेमिका काव्यमय भाषेत विचारते.

हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ?

बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?

दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
दीप लोचनी सदैव तू रे, संध्यातारक होशील का ?

घराभोवती निर्झर नाचे, जाणुन अपुल्या गूढ मनाचे
झाकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशील का ?

. . . . . . . . . . . . . .

मनातल्या भावना शब्दात व्यक्त केल्या नाहीत, बोलून दाखवल्या नाहीत तरीसुध्दा त्या काही लपून रहात नाहीत. आपला चेहेरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात. मनातले भाव त्यावर प्रकट होत असतात. शिवाय वागण्यातल्या छोट्या छोट्या बाबीत त्या कशा दिसून येतात हे या कवितेत दाखवले आहे.

लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे ।
नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे ।
रंग गालिचा छ्पेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे ।
उन्हात पाउस, पुढे चांदणे ।
हे प्रणयाचे देणे घेणे ।
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे ।
चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे ।
केली चोरी छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

पण एकादा माणूस मठ्ठ असतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात येतच नाही. कदाचित त्याला प्रतिसाद द्यायचा नसतो, सगळे समजून उमजून तो आपल्याला काही न कळल्याचे सोंग आणत असतो. त्यामुळे अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी ।
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती ।
छंद कधी कळणार तुला, नाचणा-या जलातला ।

जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली ।
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला ।।

मनात येईल तसे वागणे आपल्याला बरेच वेळा शक्य नसते. या जगात रहायचे असेल तर कसे वागायचे हे बहुतेक वेळी बुध्दी ठरवत असते. तसेच अपेक्षाभंग झाला तर मन बेचैन होते त्या वेळी बुध्दी त्याची समजूत घालत असते. मन वेडे असते, अशक्य गोष्टींचा हव्यास धरते, पण बुध्दी शहाणी असते. ती मनाला थाऱ्यावर आणायचा प्रयत्न करते. खरे तर मन आणि बुध्दी या एकमेकींपासून वेगळ्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत हे अजून नीटसे समजलेले नाही. मेंदूमधल्या वेगवेगळी कार्ये करणाऱ्या भागांना आपणच ही नावे दिली आहेत. ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून मिळणाऱ्या माहितीचे संकलन बुध्दी करते. पण मन त्यावर विचार करते, तसेच स्वतंत्रपणेही मनात विचार उठत असतात. पण या विचारांचे मूल्यमापन बुध्दीकडून होत असते आणि आपण त्यानुसार निर्णय घेतो. मन स्वभावतः उच्छृंखल असते, पण त्याच्या मोकाट सुटू पहाणाऱ्या वारूला वेसण घालायचे काम बुध्दी करत असते. कृतीवर बुध्दीचे नियंत्रण कदाचित असेलही, पण विचार करायला मन नेहमी तयार असते. श्रीरामाच्या गुणरूपाचे वर्णन ऐकूनच जानकी त्याच्यावर इतकी मोहित होते की त्याला कधी पाहीन असे तिला वाटू लागते. त्या काळातल्या समाजरचनेनुसार तिला प्रत्यक्ष मिथिलानगरीहून अयोध्येला जाणे शक्य नसते. ती कल्पनेनेच तिकडे जाण्यासाठी मनोरथाला आदेश देते,

मनोरथा, चल त्या नगरीला ।
भूलोकीच्या अमरावतिला ।।

स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी ।
सडे शिंपीले चंद्रकरांनी ।
शीतल वारा सारथि हो‍उनि ।
अयोध्येच्या नेई दशेला ।।

सर्व सुखाचा मेघ सावळा ।
रघुनंदन मी पाहिन डोळा ।
दोन करांची करुन मेखला ।
वाहिन माझ्या देवाला ।।

एकाद्या प्रियकराच्या मनात जेंव्हा त्याच्या सुंदरा प्रियेची श्यामला मूर्ती भरते तेंव्हा ती सतत त्याच्या मनःचक्षूंना दिसायला लागते. तो मनातल्या मनात तिचे चित्र काढून ते रंगवू लागतो.

मानसीचा चित्रकार तो ।
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ।।

भेट पहिली अपुली घडता ।
निळी मोहिनी नयनी हसता ।
उडे पापणी किंचित ढळता ।
गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो ।।

मम स्पर्शाने तुझी मुग्धता ।
होत बोलकी तुला नकळता ।
माझ्याविण ही तुझी चारुता ।
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो ।।

तुझ्यापरि तव प्रीतीसरिता ।
संगम देखून मागे फिरता ।
हसरी संध्या रजनी होता ।
नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो ।।

. . . . . . . . . . .

आपली विवेकबुध्दी, तारतम्य, वास्तवाचे भान, संयमी वृत्ती वगैरे गोष्टी जागृत असतांना मनावर अंकुश ठेवतात. मनाला बुध्दीचा थोडा धाक असल्यामुळे ते जरासे सांभाळूनच विचार करत असते. पण निद्रावस्थेत जाताच स्वप्नांमध्ये ते मन स्वैर भरारी मारू शकते. वास्तवाचे दडपण नसल्यामुळे स्वप्नाच्या जगात आपले मन स्वच्छंदपणे मुक्त विहार करू शकते. लहानपणी सिंड्रेला आणि स्नोव्हाइट यांच्यासारख्या परीकथांमध्ये रमलेले बालमन यौवनाच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर स्वतःला त्या नायिका समजून त्या कथांमध्ये स्वतःला पाहू लागते. अशा सर्व परीकथांमध्ये अखेरीस श्वेत अश्वावर आरूढ होऊन एक उमदा राजकुमार दौडत येतो आणि खलनायकाचा पाडाव करून त्या नायिकांना आपल्या बरोबर घेऊन जातो. अखेरीस ते दोघे चिरकाल सुखाने राहू लागतात असा सुखांत केलेले असतो. असाच एकादा राजकुमार निदान आपल्या स्वप्नात तरी अवतरावा असे या मुग्धेला वाटते.

परीकथेतिल राजकुमारा,
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक ।
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे ।
शब्दांवाचुन जाणुन सारे ।
‘राणी अपुली’ मला म्हणोनी ।
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली ।
दिवसा रात्री नित्य देखिली ।
त्या रूपाची साक्ष जिवाला ।
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली ।
नवख्या गाली येइल लाली ।
फुलापरी ही तनू कापरी ।
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी ।
साठवीन ते चित्र लोचनी ।
नवरंगी त्या चित्रामधले ।
स्वप्नच माझे होशील का ?

अशाच दुसऱ्या एका स्वप्नाळू मुलीलासुध्दा मनातून असेच काहीतरी वाटत असते. तिच्या स्वप्नातल्या जगात सारे काही सुंदर असते. निसर्ग आपल्या सौंदर्याने मस्त वातावरणनिर्मिती करत असतो. अशा त्या स्वप्नामधल्या गावात तिचा मनाजोगता जोडीदार मिळाला तर तिच्या आनंदाला किती बहर येईल? याचे सुखस्वप्न ती पहात राहते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले ।
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले ।
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ।।

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी ।
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी ।
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा ।।

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।

वरील दोन्ही गाण्यामधल्या नवयुवतीला अजून प्रत्यक्ष जीवनात कोणी साजेसा साजण भेटलाच नसावा. त्यामुळे त्या एक गूढ आणि रम्य असे स्वप्नरंजन करत आहेत. पण एकाद्या मुलीला असा साजण डोळ्यासमोर दिसतो आहे पण तो तिच्यापाशी येत नाही. कदाचित त्याला तिची ओढ वाटत नसेल किंवा काही व्यावहारिक अडचणी असतील. अशा वेळी ती तरुणी त्याला निदान स्वप्नात तरी भेटण्याची इच्छा अशी व्यक्त करते.

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे ।
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग ।
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता ।
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

या मुलीचे लग्न आता ठरले आहे, मुहूर्ताला अक्षता टाकायचा अवकाश आहे. पण मधल्या काळातला दुरावा तिला असह्य वाटत आहे. लोकलाजेनुसार तिला आपल्या भावी वरापासून दूर रहावे लागत असल्यामुळे ती त्याला स्वप्नातच भेटत राहते आणि भेटल्यानंतर काय काय घडेल याची सुखस्वप्ने पहाण्याचा छंद तिला लागतो.

स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी ।
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी ।।

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी ।
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी ।।

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची ।
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची ।
माझ्या प्रियापुढे का, लाजून राहिले मी ।।

एकांत हा क्षणाचा, भासे मुहूर्तवेळा ।
या नील मंडपात, जमला निसर्गमेळा ।
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी ।।

घेशील का सख्या, तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला, साक्षी वसंत राजा ।
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी ।।

दोघांचे मीलन झाल्यानंतर त्यांना पुढचे दिसायला लागते. ज्या मुख्य कारणासाठी निसर्गाने हे स्त्रीपुरुषांमधले आकर्षण निर्माण केले आहे त्याची पूर्ती होण्याला प्रत्यक्षात अवधी लागत असला तरी मनोवेगाने ती क्षणात करता येण्याजोगे स्थान म्हणजे स्वप्नच !

काल पाहिले मी स्वप्न गडे ।

नयनी मोहरली ग आशा ।
बाळ चिमुकले खुदकन हसले ।
मीही हसले, हसली आशा ।
काल पाहिले मी स्वप्न गडे ।।

भाग्यवतीचे भाग्य उजळले ।
कुणीतरी ग मला छेडिले ।
आणि लाजले, हळूच वदले ।
रंग सावळा तो कृष्ण गडे ।।

इवली जिवणी इवले डोळे ।
भुरुभुरु उडती केसहि कुरळे ।
रुणुझुणु रुणुझुणु वाजति वाळे ।
स्वप्नि ऐकते तो नाद गडे ।।

अशा प्रकारे मनात उठणाऱ्या वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना वगैरेंची पूर्ती स्वप्नात होत असते अशी रूढ कवी कल्पना आहे. निदान असे गृहीत धरून कवीलोकांनी जागेपणीच अनेक प्रेमगीते लिहिली आहेत. मला स्वतःला मात्र अशा सुखद स्वप्नांचा अनुभव तसा कमीच येतो. कधी तो आलाही असला तरी जाग येताच मी ते सगळे विसरून जातो, त्यामुळे तो लक्षात रहात नाही. मला प्रत्यक्षात अप्राप्य वाटणारी कोणतीही गोष्ट कधी स्वप्नात मिळाली असे आठवत नाही. उलट काही वेळा मी स्वप्नातून खडबडून जागा होतो तेंव्हा मी किंचाळत उठलो असे बाजूचे लोक सांगतात. अर्थातच मी स्वप्नात काहीतरी वाईट किंवा भयावह पाहिले असते. कधी कधी मला स्वतःलासुध्दा असे वाटते की आपण एका अशक्यप्राय अशा कठीण परिस्थितीत सापडलो आहोत असे काहीतरी स्वप्नात दिसले असावे आणि जागा झाल्यानंतर कसलाच प्रॉब्लेम नसल्याचे पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडतो. अशा दुःस्वप्नांना इंग्रजीत ‘नाइटमेअर’ असे वेगळे नाव दिले आहे. चांगले आशादायक असे ‘ड्रीम’ आणि भीतीदायक ते ‘नाइटमेअर’!

“मनी वसे ते स्वप्नी दिसे” अशी म्हण आहे. काही अंशाने ती खरी आहे. कारण एकादा विचार, एकादी कल्पना मनात आली तरच ती स्वप्नात येऊ शकेल. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जंगलातली झोपडी एका आंध्रप्रदेशात जन्म घालवलेल्या मुलाला स्वप्नात दिसली अशा भाकडकथांवर माझा काडीएवढा विश्वास बसत नाही. माणसाला पुनर्जन्म असतो आणि पूर्वीच्या जन्मातले मन किंवा त्याचा अंश तो या जन्मात आपल्याबरोबर घेऊन येतो असल्या गोष्टी शास्त्रीय कसोटीवर सिध्द झालेल्या नाहीत. या जन्मातच जे काही पाहिले, ऐकले, वाचले, अनुभवले त्याच्या अनुषंगाने मनात विचारांचे तरंग उठत असतात आणि ही क्रिया स्वप्नातदेखील चालत राहते, किंबहुना स्वप्नामध्ये तिला वास्तवातले निर्बंध रहात नाहीत.

“मन चिंती ते वैरी न चिंती” अशी आणखी एक म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीतून पुढे कसे अधिकाधिक चांगले घडेल याची सुखस्वप्ने जसे मन पहात असते, त्याचप्रमाणे अपेक्षित किंवा अनपेक्षित कारणांमुळे कोणते धोके उद्भवू शकतात याचा विचारसुध्दा मनच करत असते. निसर्गाने सजीवांना दिलेले हे एक वरदान आहे. धोक्याची कल्पना असल्यामुळे त्यापासून बचाव करण्याची तयारी ते करू शकतात. पण अनेक वेळा हा धोका अकारण दिसतो आणि त्यामुळे मनाला मात्र घोर लागतो. नाइटमेअर्स अशा प्रकारच्या विचारांमुळेच दिसतात. जास्त काळजीपूर्वक वागायचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दुःस्वप्ने जास्त प्रमाणात दिसत असावीत आणि बिंदास वृत्तीचे लोक सुखस्वप्ने पहात मजेत राहात असावेत असा माझा अंदाज आहे.

. . . . . . . . . . . .

सुखस्वप्ने पहात रहावे असे सर्वांनाच वाटते, पण ते संपल्यानंतर काय ? सावज हातात सापडल्यानंतर शिकारीतली मजा खलास होते, मुक्कामाला पोचल्यानंतर प्रवासातली गंमत संपते त्याचप्रमाणे स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्याचे काही वाटेनासे होते. एकादी गोष्ट विनासायास हाती लागली तर तिचे काहीच मोल वाटत नाही. हा मनाचा विचित्रपणा वाटेल पण तसेच असते. शेवट गोड असो किंवा नसो गोष्ट संपून जाते. तसे होण्यापेक्षा स्वप्न अर्धेच रहावे असे एका कवीला वाटते. या गाण्यात ते सांगतात,

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ।
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ।।

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या ।
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या ।
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा ।।

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी ।
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी ।
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा ।।

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता ।
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता ।
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ।।

मनाला जाळणारी चिंता, व्याकुळ करणारी काळजी नेहमीच अनाठायी असते असेही नाही. अनेक वेळा मनातल्या शंका कुशंका खऱ्या ठरतात. एवढेच नव्हे तर कथेला अकल्पितपणे कलाटणी मिळते. सगळे काही मनाजोगे होत असते, पुढे मिळणाऱ्या सुखाची कल्पना करून मनात मांडे खात असलेल्या माणसाच्या पुढ्यात नियती वेगळेच ताट वाढून ठेवते. त्याचे मन आक्रोश करते,

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे ।
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे ।।

बहर धुंद वेलीवर यावा ।
हळुच लाजरा पक्षी गावा ।
आणि अचानक गळुन पडावी,
विखरुन सगळी पाने ।।

भान विसरुनी मिठी जुळावी ।
पहाट कधि झाली न कळावी ।
भिन्न दिशांना झुरत फिरावे,
नंतर दोन दिवाणे ।।

हळुच फुलाच्या बिलगुनि गाली ।
नाजुक गाणी कुणी गायिली ।
आता उरली आर्त विराणी.
सूरच केविलवाणे ।।

जुळली हृदये, सूरहि जुळले ।
तुझे नि माझे गीत तरळले ।
व्याकुळ डोळे कातरवेळ.
स्मरुन आता जाणे ।।

काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत तर करायला गेले एक आणि झाले भलतेच असे होत राहते. महाभारतातल्या सत्यवतीची कथा असेच काही सांगून जाते. सामान्य कोळ्याची देखणी पोर मत्स्यगंधा साम्राज्ञी होण्याचे स्वप्न पहाते आणि ते पूर्ण होतेसुध्दा. पण त्यानंतर मात्र सगळे विस्कळत जाते. एकामागोमाग एक एकापेक्षा एक अनपेक्षित घडना घडत जातात आणि तिला त्या पहाव्या लागतात. अखेरीस उद्वेगाने ती म्हणते,

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा ।
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ।।

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे ।
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा ।।

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा ।
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा ।
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा ।।

याहूनही जास्त हृदयविदारक अनुभव आल्यामुळे अत्यंत निरोशेने ग्रस्त झालेले एक मन आक्रंदन करते,

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई ।
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही ।।

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे ।
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडूनी जाई ।।

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ।।

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा ।
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन्‌ सद्भावा ।
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई ।।

आशा निराशा हे मनाचे विभिन्न भाव आहेत. आशा, अभिलाशा, अपेक्षा वगैरेंचा निरनिराळ्या प्रकारचा आविष्कार पहिल्या चार भागांमध्ये दिसला, तसेच निराशा, वैफल्य वगैरे भावांची निर्मितीदेखील मनातच होत असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येतो, पण महान लोक सगळ्या जगाची चिंता वहातात. एका विशिष्ट दुःखाकडे न पहाता एकंदरीत समाजाच्या कष्टांवर बोट ठेवतात. आजचेच जग वाईट आहे असातला भाग नाही. कित्येक दशकांपूर्वी कवीवर्य भा.रा.तांबे यांनी लिहिले आहे,

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ?
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ।।

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ।।

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा ।
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा ।।

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी ।
इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी ।।

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ।।

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कुणी, हसे कोणी, करी हेवा !

मनासारखे चालले आहे असा कधीकधी भास होत असतो. निदान इतरांना तसेच वाटत असते. सगळे काही व्यवस्थित असतांनादेखील हा माणूस सुखी का नाही असा प्रश्न त्याला पडतो, त्याला त्याचे सुख दुखते आहे असे समजतो. अशा माणसाची व्यथा वेगळीच असते. त्याचे दुखणे त्याला मनातून सतत टोचत असते पण ते व्यक्त करायची सोय नसते. सांगून ते कोणाला कळणारच नाही, ऐकणारा त्याची टिंगल करेल, त्याला मूर्खात काढेल, त्यामुळे त्याला होत असलेल्या त्रासात आणखी भर पडेल याची त्याला जवळ जवळ खात्री असते. त्याचे मन स्वतःलाच सांगते,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी ।
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना ।
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

कदाचित अशा विचाराने म्हणा किंवा दुसऱ्या कोणाची टीका सहन करून घ्यायची त्याच्या मनाची तयारी नसल्यामुळे असेल पण एकादा माणूस नेहमीच आपले ओठ घट्ट मिटून ठेवतो. कदाचित स्वभावानेच तो पक्का आतल्या गाठीचा असेल, आपल्या सुखातही कोणी वाटेकरी नको आणि दुःखातही नको अशी त्याच्या मनाची वृत्ती असेल. आणखीही काही कारणे असतील, तीसुध्दा तो कोणालाही सांगत नाही. कोणालाही काहीही सांगायला तो तयार नसतो. त्याला काही विचारायला कोणी गेला तर तो निर्धाराने म्हणतो,

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही ।।

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे ।
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही ।।

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज ।
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही ।।

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला ।
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही ।।

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी ।
त्याचा कोष किना-यास कधी लाभणार नाही ।।

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही ।।

. . . . . . . . . . . .

बहुतेक माणसे एका ठराविक चाकोरीतले जीवन जगत असतात, त्यांचे विश्व एका लहानशा चौकटीत सामावलेले असते. त्यातला उजेड कमी झाला की सगळे जग कायमचे अंधारात बुडाले आहे असे त्यांना वाटायला लागते. अतीव नैराश्य, वैफल्य आदींने ते ग्रस्त होतात. मनातली ही भावना टोकाला गेल्यास आत्महत्येचे विचार त्यात यायला लागतात. पण त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन पाहिले तर सुख दुःख ह्या गोष्टी अशा सर्वसमावेशक नाहीत, स्थळकाळाप्रमाणे त्या सारख्या बदलत असतात ते त्यांना समजेल. ते पाहिल्यावर त्यांच्या मनाचा दुबळेपणा झटकून टाकू शकतात आणि जीवनाचा आनंद त्यांना दिसू लागतो. कवीवर्य गदिमांनी ही शिकवण या गाण्यात किती चांगल्या शब्दात दिली आहे पहा.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ।
फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा ।।

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा ।
अविचार सोड असला कोल्लाळ कल्पनांचा ।
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ।।

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे ।
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे ।
हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा ।।

का कालचा उद्याला देसी उगा हवाला ।
द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला ।
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ।।

काही महानुभावांचे मन इतके सुदृढ बनलेले असते की दुःखाचे चटके ते हंसत हंसत सोसतात. अंगाला ओरबडणारे कांटे फुलांसारखे कोमल वाटतात. सोबतीला कोणी नसला तरी एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोरांच्या गीतानुसार आपल्या मार्गावर चालत राहतात. येशू ख्रिस्तासारखे महान लोक आपला क्रूस स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतांनादेखील यत्किंचित कुरकुर करत नाहीत. असे महान लोक म्हणतात,

वाटेवर काटे वेचीत चाललो ।
वाटले जसा फुलाफुलात चाललो ।।

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी ।
आपुलीच साथ कधी करित चाललो ।।

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद ।
नादातच शीळ वाजवीत चाललो ।।

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ।
ढळलेला तोल सावरीत चाललो ।।

खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे ।
फेकुन देऊन अता परत चाललो ।।

मनाने निर्मळ असणे अतीशय महत्वाचे आहे. अनेक दुर्गुणांच्या डागामुळे ते मलीन झाले असेल तर त्या माणसाच्या उन्नतीत त्याची बाधा आल्याशिवाय राहणार नाही. “नाही निर्मळ ते मन तेथे काय करील साबण ?” असे विचारून चित्तशुध्दी करण्याचा उपदेश संतांनी दिला आहे. मनात जर खोटेपणाचा अंश नसेल, त्यात कोणाबद्दल कटुता नसेल, कसला संशय नसेल तर तो माणूस आपले काम करतांना कचरणार नाही, आत्मविश्वासाने प्रगतीपथावर वाटचाल करत राहील आणि जगात यशस्वी होईल. सोप्या ग्रामीण भाषेत हा संदेश असा दिला आहे.

मन सुद्ध तुझं गोस्ट हाये प्रिथिविमोलाची ।
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची ।
पर्वा बी कुनाची ।।

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला ।
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला ।
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची ।।

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई ।
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई ।
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची ।

मन हे असेच बहुरंगी असते. कधी नैराश्याच्या गर्तेत खोल बुडेल तर कधी गगनाला गवसणी घालायला जाईल. संयम हे शहाणपणाचे लक्षण मनाला आवर घालण्याचा प्रयत्न नेहमी करत असते, पण कधी कधी त्याचा इलाज चालत नाही. वेडे मन त्याला न जुमानता पिसाट होतेच ! ते त्याच्या अडेलतट्टूपणावर ठाम राहते. त्यावेळी मनासारखे वागण्याखेरीज कोणताही पर्याय त्याला मान्य नसतो.

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !

आजच्या पिढीतल्या गुरू ठाकूर यांनी मनाच्या अनेक रूपांचा सुरेख ठाव घेतला आहे. हळवेपणा, बेधुंद वृत्ती, स्वप्नरंजन, विगहाकुलता, आशा. निराशा अशा त्याच्या विविध त-हा त्यांनी किती छान रंगवल्या आहेत !

मन उधाण वाऱ्याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

पण मन या विषयावर मराठी भाषेतली जितकी गीते मी वाचली किंवा ऐकली आहेत त्या सर्वांमध्ये मला स्व.बहिणाबाईंनी लिहिलेल्या ओव्या जास्त आवडतात. मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे असे त्या सांगतात. कल्पनेची ही उंच भरारी आणि तिचे असे सुंदर शब्दांकन “माझी माय सरसोती, मले शिकयते बोली, लेक बहिनाच्या मनी किती रुपीतं पेरली।” असा सार्थ दावा करणाऱ्या बहिणाबाईच करू शकतात. मनाबद्दल त्या सांगतात,

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा ।
जशा वाऱ्यानं चालल्या, पान्यावऱ्हल्या रे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं, जसं वारा वहादनं ।।

मन पाखरू पाखरू, याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
अरे, इचू, साप बरा, त्याले उतारे मंतर !

मन चपय चपय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसंचा दाना ।
मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन, आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी, काय तुझी करामत !

देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले, असं सपनं पडलं !

. . . . . . . . . . . . .

माणसाच्या आयुष्यात मनाचे स्थान सर्वात मोठे आहे हे सांगून झाले आहेच. आपल्या जीवनाच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर आपले मन बसलेले असते आणि रस्त्यामधले खड्डे किंवा अडथळे चुकवून, प्रसंगी वेग वाढवून किंवा धीमा करून आपल्या जीवनाला ते पुढे नेत असते. इतर लोक दहा मुखांनी दहा सल्ले देत असतात. त्यातला आपल्याला सोयीचा आणि लाभदायक असा सर्वात योग्य कोणता हे मनच ठरवते कारण सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव त्यालाच असू शकते. त्यामुळेच “ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे.” अशी एक म्हण आहे. कोणतीही गोष्ट “करू, करू” असे नुसते तोंडदेखले म्हणणारे लोक सहसा कधी कृती करत नाहीत, पण एकाद्याने ते काम मनावर घेतले तर मात्र तो माणूस ती गोष्ट पूर्ण करतो. त्यासाठी त्याच्या मनाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. सांगाल तेवढेच काम करणाऱ्या सांगकाम्याचा बैल रिकामाच राहतो तसेच यंत्रवत हालचालीमधून केलेल्या विचारशून्य कृतीमधून सहसा फारसे काही साध्य होत नाही. एकाद्या कार्यासाठी कायावाचामनसा वाहून घेतल्यानंतर ते सिध्दीला जाते. तनमनधन अर्पण करणे म्हणजे संपूर्ण समर्पण झाले. अर्थातच त्यात मनाचा वाटा फार मोठा आणि मोलाचा असतो. अनेक मार्गांनी धन मिळवता येते आणि दाम देऊन तन (मनुष्यबळ) विकत घेता येते पण मनावर मात्र दुसरा कोणीसुध्दा ताबा मिळवू शकत नाही. ते ज्याचे त्यानेच स्वेच्छेने अर्पण करावे लागते.

मनाचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखूनच समर्थ रामदासांनी अनेक मनाचे श्लोक लिहून जनतेच्या मनातल्या सज्जनाला आवाहन केले आणि त्याला उपदेशामृत पाजून सन्मार्गाला जाण्यास उद्युक्त केले. भक्तीमार्गाचा मार्ग धरून अंती मोक्षप्राप्ती करण्याचा उपदेश त्यात आहे असे वर वर पाहता वाटते. पण परमार्थ साधता साधता त्याआधी या जगात कसे वागावे याची सोपी शिकवण त्यात दिली आहे. शतकानुशतके पारतंत्र्यात भरडलेल्या मनांची मरगळ झटकून त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न या सोप्या पण मनाला भिडणाऱ्या श्लोकांमधून समर्थांनी केला होता.

इतर साधूसंतांनीदेखील जनतेच्या मनालाच आवाहन करून भक्तीमार्गावर नेले. मोक्ष, मुक्ति असे कांहीही मिळवण्यासाठी आधी मनाला प्रसन्न ठेवा, त्यात देवाची मूर्ती ठेवा आणि मनोमनी त्याची पूजा करा म्हणजे सगळे तुमच्यामनासारखेच होईल असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।२।।

मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।३।।

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आन दैवत । “तुका” म्हणे दुसरें ।।४।।

एकदा विठ्ठलाचे चरणी लीन झाल्यानंतर मनाला दुसरीकडे कोठेही जायला नको असे वाटते असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दुसऱ्या एका  अभंकात  म्हणतात,

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया ॥१॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगे खरे माप ॥४॥

संत एकनाथांनी हाच भाव वेगळ्या शब्दांमध्ये सांगितला आहे. एकदा त्या गोविंदाचा छंद लागला की दुसरी कसली काळजी नाही, दुसरा कसला विचारच मनात आणण्याची गरज नाही.
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद नि जसे रामरूप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ॥३॥
गोविंद हा जनी-वनी, म्हणे एका जनार्दनी ॥४॥

संत गोरा कुंभाराच्या जीवनावरील चित्रपटातल्या गीतात गदिमांनी या भावना अशा व्यक्त केल्या आहेत,

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम ।।

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म ।
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म ।
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम ।।

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी ।
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी ।
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम ।।

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा ।
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा ।
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम ।।

तर गोरा कुंभार या नाटकातले अशोकजी परांजपे यांचे पद असे आहे,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ।।

जन्म-मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।

चराचरापार न्या हो जाहला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

संत तुकारामाचे मन विठ्ठलाच्या चरणी रमले होते तर संत तुलसीदासाचे मन श्रीरामामध्ये विलीन झाले होते. खूप जुन्या काळातल्या तुलसीदास या नाटकातले गोविंदराव टेंबे यांचे पद असे आहे.

मन हो रामरंगी रंगले।
आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले ।।

चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले ।
भवतरंगी रंगले ।।

मन या विषयावर असंख्य गीते आहेत. त्यातली माझी आवडती तसेच तुफान लोकप्रिय असलेली काही गाणी निवडून या लेखाचा प्रपंच केला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या सगळ्याच रचना महान आहेत. त्यात गाठलेली विचारांची उंची आणि शब्दांमध्ये दडलेला गहन अर्थ समजून घेणे सोपे नाही. हे “विश्वचि माझे घर” किंवा “चिंता करतो विश्वाची” असे सहजपणे सांगून जाणाऱ्या ज्ञानेश्वरांनी विश्वरूप परमात्म्याशी त्यांचे मन कसे एकरूप होऊन गेलेले आहे हे या अभंगात सांगितले आहे. यावर आणखी भाष्य करण्याची माझी योग्यताच नाही.

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

. . . . . . . . . . . . . . (समाप्त)

एके दिवशी …. एक कथा

सूर्याचे भ्रमण हस्त नक्षात होत असतांना महाराष्ट्राच्या कांही भागात हादगा खेळण्याची पारंपारिक रीत आहे. कांही ठिकाणी तो भोंडला या नांवाने ओळखला जातो तर कांही जागी त्यातल्या गाण्यांना भुलाबाईची गाणी असे नांवही आहे. मी सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या निमित्याने निरनिराळ्या हादग्याच्या गाण्यांच्या चालीवर ही छोटीशी गोष्ट लिहिली होती. मी या गाण्यात कांही पारंपारिक हदग्याच्या गाण्यांच्या ओळींचा समावेशसुद्धा केला आहे. प्रत्यक्ष हादगा किंवा भोंडला खेळणाऱ्या मुलींपर्यंत ती गोष्ट पोचवता येणे मला शक्यच नव्हते म्हणून आमच्या हितगुज नावाच्या सांस्कृतिक मंडळाच्या वार्षिक उत्सवात मी ती चालीवर वाचून दाखवली होती. या गोष्टीतले वातावरण १५ वर्षांपूर्वीचेच आहे. तेंव्हा बुकिंग वगैरे कामे नेटवर होत नव्हती, अजून वॉट्सअॅप आले नव्हते, एसएमएस नुकतेच सुरू झाले होते. सासूसासरे, मुलगा आणि सून सगळे एकत्र रहात होते.

एलोमा पैलोमा गणेशदेवा । माझी गोष्ट सांगू दे करीन तुझी सेवा ।।
गोष्ट सांगाया द्यावी देवा । थोडीशी बुध्दी ।।

**** *** (चाल बदल)
एके दिवशी मिस्टर जोशी, निघाले ऑफीसला ।
त्यांच्यासाठी लंचबॉक्स, मिसेसने भरला ।।
भरलेला डबा तिने, बॅगेमध्ये ठेवला ।
बॅगेचा खणसुध्दा, हळूच तपासला ।।

**** ***(चाल बदल)
त्यात होतं एक पाकीट । पाकीटाच्या आंत तिकीट ।
तिकीट होतं सिनेमाच्या, थिएटरचे ।।
तिकीट अलगद काढलं । ब्लाउजमध्ये खोचून दिलं ।
कारण लागली चाहूल, नव-याची ।।
“झालं कां गं इन्स्पेक्शन । बॅग देतेस कां आणून ।
बस जाईल निघून, ऑफीसाची ।। ”
नवरा निघाला घाईत । हंसून दाखवला हात ।
फिरताच त्याची पाठ, काढलं तिकीट ।।
तारीख दहा ऑक्टोबर । म्हणजे गेला शनिवार ।
खेळ दुपारचे चार, वाजतांचा ।।

**** ***(चाल बदल)
त्या दिवशी काय काय झालं, तिला सारं आठवलं ।
सकाळीच तिनं होतं, नवऱ्याला विचारलं ।।
“शनिवारची सुटी ना आज, पाऊस आहे ओसरला ।
थोडी मौज मस्ती करू, जायचं कां हो पिक्चरला” ।।

**** ***(चाल बदल)
म्हणाला “ते शक्य नाही गं । कामाचा साठला हा ढीग ।
क्लीअर करायचाय् बॅकलॉग, ऑफीसवर्कचा” ।।
असं जातांना सांगून गेला । रात्री उशीरा परतला ।
त्याचा अर्थ नीट आला , आता ध्यानात ।।
क्षणात तिनं लावला फोन । खणातच वाजला रिंगटोन ।
घरीच मोबाइल सोडून, गेली की स्वारी ।।
तिनं पुन्हा पाहिलं तिकीट । उलटून पाठपोट ।
सापडलं एक नांव ‘जेनेट’, अन् फोन नंबर ।।
नवऱ्याच्या मोबाइलवर । तिने शोधले कॉल्ड नंबर ।
जेनेटचा वारंवार, रेकॉर्ड होता ।।

**** ***(चाल बदल)
रागाचा पारा तिच्या अनिवार चढला ।
कसा बसा वेळ तिनं चरफडत काढला ।
ऑफिस सुरू झाल्या झाल्या टेलिफोन लावला ।
नवऱ्याचं एक्स्टेन्शन सांगितलं द्यायाला ।।

**** ***(चाल बदल)
तिथली शिष्ट रिसेप्शनिस्ट । म्हणते काय काम अर्जंट ।
केल्यावर खूपच रिक्वेस्ट, केलं कनेक्ट ।।
“मला आत्ता आहे मीटिंग । माझा साहेब झोटिंग ।
उगारून दोन शिंगं, बघतो आहे ना ।।
माझी मीटिंग संपल्यावर । मीच फोन करीन बरं ।”
एवढं सांगून रिसीव्हर, दिला की ठेऊन ।।
आला प्रचंड वैताग । जिवाची झाली तगमग ।
धुमसतच लागली मग, घरकामाला ।।
दुपारची जेवणं झाली । सासू कलंडून गेली ।
सून करीतच राहिली, विचार मनात ।।

**** ***(चाल बदल)
सासूबाई दाखवतात किती त्या सोज्ज्वळ ।
कुणालाही वाटावे या बाई किती प्रेमळ ।
माझ्या वागण्यातलं त्यांना बोचतं कुसळ ।
नणंदेच्या तोऱ्याचं मात्र चालतं मुसळ ।।
मला कळलं आहे त्यांचं इंगीत सगळं ।
परवाचीच गोष्ट आहे पुरावा सबळ ।।

**** ***(चाल बदल)
नणंदा भावजया दोघी जणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
“फ्रीजमधलं चॉकलेट खाल्लं कोणी” । मलाच विचारलं ।।
गेल्या महिन्यामधली गोष्ट । करते सारं चित्र स्पष्ट ।
मनाला होतात कष्ट । आठवल्यावर ।।
आत्याबाईंचं पत्र आलं । चारूचं लग्न ठरलं ।
सर्वांना होतं बोलावलं । आग्रहानं ।।

**** ***(चाल बदल)
सासरे म्हणाले, “मी तर मामा ।
येईन कामा धामा । माझ्या भाच्याचं लगीन ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
सासू म्हणाली,” जाणारच् मी ।
मी तर सख्खी मामी । माझ्या भाच्याचं लगीन ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
नणंद म्हणाली, ” मी तर करवली ।
माझा करवलीचा मान । नटून थटून छान छान ।
खूप धमाल करीन, माझ्या भावाचं लग्न ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।

**** ***(चाल बदल)
नवरोजीनं मात्र केला पुरता बेरंग ।
सदान् कदा त्याच्या आपल्या ऑफिसच्या मीटिंग ।
त्यात म्हणे आणखी कोणी बडं प्रस्थ येणार ।
कोणालाही आता बॉस सुट्टी नाही देणार ।।

**** *** चाल बदल
मी आपलं म्हंटलं उगीच । “यांना सोडून घरीच ।
कशी येऊ एकटीच, मी हो लग्नाला ।।”
तेवढं सर्वांनी ऐकलं । सीरीयसली की घेतलं ।
गेले ना सोडून एकलं, मला हो घरी ।।

**** *** चाल बदल
आता नवऱ्याचंसुध्दा फुटलं गुपीत ।
माझ्याहून प्रिय त्यांना जेनेटची संगत ।।
मला खोटं सांगून तिला सिनेमाला नेतात ।
मरमर मरून त्यांच्यासाठी काय आपली गत ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।

विचार आला मनात हे, कसलं आपलं जिणं ।
सारे अप्पलपोटे इथे, मला विचारतं कोण ।
एका एका प्रसंगाची, होऊन आठवण ।
अश्रूंच्या मोत्यांनी भरले, डोळ्यांचे रांजण ।।
अस्सं सासर द्वाड बाई मारतं कोंडून ।।

आठवले मी माहेरी, किती होते सुखात ।
कशाची ना चिंता होती, ना कशाची ददात ।
कित्ती कोडकौतुक रोज, गोडधोड पानात ।
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला घालतं ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।

**** *** चाल बदल
झाली मनाची तडफड । माहेराची लागली ओढ ।
सासू मात्र होती गाढ, झोपलेली ।।
तिला मुळी कल्पनाच नाही । सुनेचं बिनसलं कांही ।
उठल्यावर गेली तीही, मंडळात ।।
पतीचा ना आला फोन । तगमग होईना सहन ।
चिठ्ठी लिहून ठेऊन, गेली माहेरा ।।
जेंव्हा संध्याकाळ झाली । घरची मंडळी परतली ।
त्यांची दाणादाण उडाली, चिठ्ठी वाचून ।।

**** *** चाल बदल
सासूबाईंनी फोन लावला । “ये गं सूनबाई आपल्या घराला ।
माझा नेकलेस देते तूला ।”
“तुमचा नेकलेस नको मला । कधीच औट ऑफ फॅशन झाला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।”
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

सासऱ्याने एसेमएस केला । “ये गं सूनबाई आपल्या घराला ।
नवीन स्कूटी घेतो तूला ।”
“एसेमएसचा रिप्लाय आला । स्कूटी बिट्टी नको मला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।”
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

नणंद गेली समजावयाला । “चल गं वहिनी आपल्या घराला ।
सेंटची बाटली देते तूला ।”
“मुळीच नको बाटली तुझी । त्याची मला आहे अॅलर्जी ।
यायची इच्छा नाही माझी।”
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

**** *** चाल बदल
सरते शेवटी मिस्टर जोशी, स्वतः गेले बोलवायला ।
समजावण्या की जाब विचाराया, की दम भरायला ।।
“काय प्रकार आहे हा सांग, कशाचा घेतेस सूड ।
सकाळी तर तुझा होता, किती चांगला मूड ।।”

**** *** चाल बदल
पर्समधून काढलं तिकीट । “काय आहे आठवा हे नीट ।
कोण सटवी ही जेनेट , आहे कां उत्तर ।।”
नवरा म्हणाला हांसून । “तूच पहा लावून फोन।
स्वतः घे करून पूर्ण, शहानिशा ।।”

**** *** चाल बदल
टेलीफोनवर तिने, नंबर लावला ।
दुस-या बाजूने एक, पुरुष बोलला ।
“धिस ईज जेनेट ट्रॅव्हल मॅडम, वॉट् कॅन आय् डू फॉर यू ।
वुई हॅव मेनी पॅकेजेस अँड , आय् कॅन मेक वन फॉर यू ।।”

**** *** चाल बदल
मिसेस गेली भांबावून । पतीच्या हातात दिला फोन ।
सांगितले लगेच त्यानं , “जोशी स्पीकिंग ।।
आमचं झालं कां बुकिंग । हॉटेल, ट्रॅव्हल, साईट सीइंग ।
केंव्हा मी येऊ सांग, तिकीट घ्यायला ।।”
पत्नीला मग सांगितलं । “लग्नाला जाणं हुकलं ।
तुझं तोंड हिरमुसलेलं , दिसलं आईला ।।
तिच्या मनाला लागलं । बाबांनी मला सांगितलं ।
मी सुध्दा ठरवलं, कांही मनात ।।
आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी । जोशात करावी साजरी ।
गोवा पहायची करावी पुरी, तुझी इच्छा ।।
शनिवारी योगायोगानं । येतांना ऑफीसमधून ।
मिस्टर मिसेस महाजन , भेटले वाटेत ।।
गेलेले नुकते गोव्याला । म्हणे छान पॅकेज मिळाला ।
ट्रॅव्हल एजंटचा नंबर दिला , त्यांनी लगेच ।।
जो कागद मिळाला खिशात । ते होते गं हेच तिकीट ।
त्यामागे लिहिला घाईत , फोन नंबर ।।
मोबाईलवर लावून फोन । मी सांगितला माझा प्लॅन ।
म्हणाला दिवसांनी दोन , मिळतील तिकीटे ।।
कांही हातात नव्हतं आलं । म्हणून तुला नाही सांगितलं ।
त्यानं एवढं सगळं झालं, महाभारत ।।”

**** *** चाल बदल
एके दिवशी मिस्टर जोशी आणि मिसेस जोशी ।
समजुतीच्या घोटाळ्याला पडले कसे हो फशी ।
संशयकल्लोळाची एक कहाणी छोटीशी ।
सांगितली तुम्हा आज, सांगा वाटली कशी ।।
एके दिवशी .. . . . . . . ..

 

पडू आजारी – एक स्वानुभव

या घटनांना आता बारा वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे थोडे तटस्थ नजरेने पहाणे शक्य आहे.

पडू आजारी - एक स्वानुभव

शिकलो काव्य “पडू आजारी, मौज हीच वाटे भारी”।
बालपणीच्या पुस्तकांतली गंमत खाशी ती न्यारी।।

दहा जणांचे कुटुंब होते नंदनवन पृथ्वीवरचे।
गोजिरवाणे बालक तेथे कौतुक सर्वांना त्याचे।।
झाली सर्दी तया खोकला तापहि आला बारीकसा।
आजारी वदती ते त्याला सारे देती भरंवसा।।
मऊ भात वर तूप मेतकुट ऊन ऊन देती सांजा।
विश्रांती घेरे बाळा तू आता शाळेला ना जा।।
पाठीवर मायेने फिरती थरथरते हात वडिलधारी।
तयास वाटे पडू आजारी गंमत ही वाटे भारी।।१।।

काळही सरला त्याने नेले ओढुनिया प्रेमळ हांत।
पोटासाठी भटकत फिरते नवी पिढी परदेशांत।।
विस्कटली ती कुटुंबसंस्था विखरुनि गेली सारीजणे।
आपआपुल्या घरट्यामध्ये राहतात चिमणाचिमणे।।
सर्व आधुनिक उपकरणांने नित्य घडे त्यांची सेवा।
संसाराचा सुखी दिखावा इतरांना वाटे हेवा।।
रक्तचाप मधुमेह वगैरे पण व्याधी जडल्या शरीरी।
पडावयाचे नच आजारी उगा व्हायचे कांहीतरी।।२।।

प्रभात ओली चिंब प्रगटली रिमझिम पाऊस लेवूनी।
विचार करतो भ्रमण करावे हातांत छत्री घेऊनी।।
आणि अचानक काय जाहले तया न येई उमजूनी।
डळमळले भूमंडळ सारे सिंधूजळ भासे गगनी।।
गरगर सारे फिरू लागले घरही तयाच्या सभोवरी।
उलट्या होती एकसारख्या अंगी ये ग्लानी भारी।।
दीन अवस्था पाहताक्षणी पत्नी त्याची त्वरा करी।
“अहो किती पडलात आजारी, चला झणी डिस्पेन्सरी”।।३।।

कसेबसे त्याला गाडीने चिकित्सालयाप्रति नेले।
नाडीचे ठोके मोजियले रक्तदाबही तपासले।।
झाले होते स्वैरभैर ते क्षणी घटे तर क्षणि वाढे।
दिधले डाक्टरने इंजेक्शन त्वरित तयाच्या शिरेमध्ये।।
आली निद्रा गाढ म्हणावी कां ग्लानी तेही न कळे।
रक्तचाप नाडी यांचे पण हळूहळू सांधे जुळले।।
होईल सारे सुरळित सांगुन दिले धाडुनी माघारी।
विसंबुनी त्यावर आजारी परतोनी आला स्वघरी।।४।।

सततचि होता वांत्या त्याच्या शरीरातले द्रव घटले।
पुनर्द्रवीकरणाचे चूर्ण सिस्टरने होते दिधले।।
द्रावण करुनी त्याचे त्याने घोटघोट प्राशन केले।
वमनक्रिया अनिवार परंतु सारे उलटे परतवले।।
इस्पितळामध्ये नेऊनी तयास मग एडमिट केले।
सलाईन इंजेक्शनद्वारे औषधोपचार चालविले।।
रात्रभरीच्या त्रासानंतर प्रातःकाली स्थिती बरी।
कशामुळे पडलो आजारी याचा सतत विचार करी।।५।।

वांत्या त्याच्या पुऱ्या थांबता शीशभ्रमण कमी झाले।
नवी समस्या नवेचि प्रकरण त्यात अचानक उद्भवले।।
अठरा तास उलटुनी गेले उत्सर्जन नाही घडले।
घट्ट किवाडे बंद तयांची शरीर व्याकुळ तळमळले।।
नळ्या खुपसुनी करता निचरा पुढला मार्ग सुरू झाला।
दुसऱ्या द्वारी जुनाट शत्रू उग्र रूप धारुन आला।।
मूलाधारसमस्या जागृत झाली जोमाने द्वारी।
असह्य त्याच्या कळा आजारी सहन कशा करणार तरी।।६।।

शल्यविभागामध्ये नेले उपाय सांगितला त्यानी।
रक्तदाब मधुमेह यावरी पूर्ण नियंत्रण घालोनी।।
खात्री पटल्यावर करायचे छोटेसे आपरेशन।
त्या दृष्टीने सुरू जाहले इन्शुलिन इंजेक्शन।।
दोन दिवस झाल्यावर त्यांचे झाले पूर्ण समाधान।
तपासण्यांचे रिपोर्ट आले ते प्रयोगशाळेतून।।
दुसऱ्या कक्षामध्ये निजवले पूर्ण करायासी तयारी।
घटनाचक्राने आजारी गोंधळला पुरता भारी।।७।।

शल्यक्रियेच्या रुग्णांमध्ये त्याची व्याधी अतिक्षुद्र।
आडजागी निजवले तयाला कुणा न चिंता ना कदर।।
आणि अचानक उठला रात्री शिरामध्ये तीव्र शूळ।
चैन उडाली वांत्या झाल्या डळमळले भूमंडळ।।
खूप विव्हळल्यावरती दिधले सलाईन इंजेक्शन।
पूर्वतयारी तरीही करती करावया ऑपरेशन।।
तळमळला धांवाही करतो कुणी वांचवा धांव हरी।
नच पाडू ऐसा आजारी यातना ज्यांच्या जिव्हारी।।८।।

दुसरे दिवशी येता भार्या तिज सांगितली कर्मकथा।
शल्यक्रिया तहकूब करोनी पुन्हा पाहिली मुख्य व्यथा।।
विचारविनिमय करुन धाडले मज्जातज्ञाचियाकडे।
तपासुनी निष्कर्ष काढला हे तर मेंदूचे कोडे।।
एम.आर.आय. चित्रात पाहिले छोट्या मेंदूचे कष्ट।
रक्तवाहिन्यांच्या एम.आर.ए. ने केले चित्र स्पष्ट।।
निदान निश्चित झाले आणिक सुरू औषधे मग दुसरी।
आशेवर राही आजारी मनोमनी पण अधांतरी।।९।।
.
.
.
.
.
.

सरले दुखणे, हळूहळू मग, गाडी आली रुळावरी ।
पडलो होतो आजारी पण , मौज वाटली नच भारी ।।

झाडांनासुद्धा एक मन असतं कां?

524 trees

झाडांनासुद्धा एक मन असतं कां?

शास्त्र विषय शिकलो होतो लहानपणी शाळेत
अवघ्या सृष्टीमध्ये प्रकार फक्त दोनच आहेत

सजीव आणि निर्जीव यांत येतं सारं जग
जीवसृष्टीचेही पुन्हा दोनच प्रमुख भाग

पशु पक्षी मासे यांची प्राण्यात होते गणती
व्हायरसपासून वृक्षांपर्यंत सा-या वनस्पती

असं सुद्धा ऐकलं होतं आम्ही लहानपणी
जिवासंगतीने येतात मन बुद्धी दोन्ही

माणसांच्याच काय कुत्री मांजरांच्या भाषा
दर्शवतात सुखदुःखे आशा निराशा

वनस्पतींना सुद्धा ती भासतात कां
झाडांनासुद्धा एक मन असतं कां?

 

भर उन्हात विसावतात प्राणी झाडाखाली
त्यांना सुखावते त्याची दाट सावली

तेंव्हा त्या वृक्षाला काय जास्त वाटतं
सावली घातल्याबद्दल धन्यभाव मनात

का होरपळतांना रणरणत्या उन्हात
तगमग होते त्याची पाने जाता सुकत

कधीतरी झाडाला ते सांगता येईल कां
झाडांनासुद्धा एक मन असतं कां?

 

पावसाची एकादी ही येते जेंव्हा सर
झाडामध्ये आमूलाग्र होते स्थित्यंतर

काळवंडलेलं झाड पुन्हा टवटवीत होतं
चैतन्यानं त्याचं सारं अंग सळसळतं

मंद झुळुकेने हवेच्या जेंव्हा तृण झुललं
करीमच्या कवीमनाला होतं जाणवलं

कोयता लावाया त्याचं मन नाही धजलं
गवतावरती फिरवित ते हात राहिलं

झाडांच्या भावना आपल्याला कळतील कां
मुळात झाडांनासुद्धा मन असतं कां?

 

कांही लोक शाकाहारी शुद्ध असतात
केवढा मोठा त्याचा टेंभा ते मिरवतात

म्हणतात कोणाचे लचके ते तोडत नाहीत
किंवा कुणाची मुंडी मुरगळत नाहीत

धान्याच्या पिकांची किती कत्तल करतात
कंदमुळांची पाळेमुळे खोलवर खणतात

खेद खंत दुःख याचं त्यांना होतं कां
खरंच झाडांनासुद्धा मन असतं कां?

 

सणासुदीला पानांचं तोरण बांधतात
फुलांनी आपले मांडव ते सजवतात

मोहक इकेबानाचं किती कौतुक करतात
माणसांच्या शोभेसाठी फुले वापरतात

वृक्षांना उपाशी ठेवून बोनसाय बनवतात
दिवाणखान्याची त्याने शोभा वाढवतात

बोनसायच्या मनात कांही भाव नसतात कां
पण झाडांनासुद्धा मन असतं कां?

 

वर्षारंभी फळबाजार द्राक्षांनी भरतो
सीडलेस द्राक्षे सारी फस्त ती करतो

बिनबियांची बोरं पेरू चिकू संत्री आली
मनासारखी फळे फक्त गर आणि साली

गोडी वाढवतांना त्यांची झाड कसं फसतं
का वांझोट्या फळावर करतं प्रेम जास्त

त्या झाडांना हे सगळं ठाऊक असतं कां
खरंच झाडांनासुद्धा मन असतं कां?

——————  आनंद घारे

 

 

कवी व कविता

 

कवि

कवी व कविता

(क काकिकी ववा वि वी त ता तिती या बारा अक्षरात ओढून ताणून आशय शोधण्याचा एक प्रयत्न )

 

काकवी विकतात का कवी, काततात का वात ?
वीत वीत वाकत, विकतात का कात ?

कविता वितात कवी, तावातावात ,
कातावतात कितीक, काका वा तात ।।

कविता वात का कात, काकवी का ताक ?
कावा का वाकविवाक, कावकावतात काक ।।

वाकवी ती वकता, तकता की वाकवी
ताकत वा कवतिक किती, वा कविता वा कवी  ।।

वर दिलेल्या (न)कवितेत मला अभिप्रेत असलेला आशय खाली देत आहे.

काकवी विकतात का कवी काततात का वात? वीत वीत वाकत विकतात का कात?
कोणी म्हणेल, काय अचरटासारखा प्रश्न आहे ना? कवी म्हणजे एके काळी बहुधा शिक्षक, प्राध्यापक असायचे. आजकाल इंजिनियर, डॉक्टर वगैरे मंडळीदेखील कविता करायला लागली आहेत. हल्ली देशाचे राष्ट्रपति किंवा पंतप्रधानसुद्धा कवी असतात. कवींचं असं कांहीतरी स्टँडर्ड स्टेटस हवं. आता महानोरासारख्या शेतीवाडी पहाणा-यांनी कधी उसाचे गु-हाळ घातलंही असेल. शान्ताबाई लहानपणी कधी सुताबरोबर खेळल्याही असतील. साने गुरुजी आणि विनोबाजींनी राष्ट्रासाठी सूतकताई केलेली आहेच. पण पानवाला आणि कवी ? छेः ! कल्पनाच करवत नाही.
पण नीट विचार केला तर लक्षात येईल की काकवीमध्ये गोडवा असतो, लाघटपणा असतो. उसाला आधी चरकात चांगळा पिळून त्यातला रस तेवढा वेगळा काढतात, त्या रसाला ऊष्णता देऊन चांगले रटारटा आटवल्यानंतर त्याची काकवी बनते. कवितेमध्ये सुद्धा जीवनाचा असाच अर्क येतो ना? काकवीत बुडवलेला चमचा जरी चाटला तरी त्याचा गोडवा बराच वेळ जिभेवर रेंगाळतो. कवितेचंही असंच आहे ना? कापसापासून दिव्याची वात कशी बनवतात? आधी त्याचे अस्ताव्यस्त तंतू ताण देऊन सरळ रेषेत आणतात आणि पीळ देऊन त्यांना एकमेकात गुंतवतात. कवितेमध्ये अशीच सुसंगति आणण्याचा प्रयत्न असतो. पुढे ती वात ज्योत आणि तेल यातला दुवा बनते. माथ्याला आग लागलेली असतांनाही जळता जळता आपले कर्तव्य बजावते वगैरे तिचे अनेक गुण सांगता येतील. कातामुळे तोंडाला चव येते, रंग चढतो, चुन्याची दाहकता कमी होते. कवितेचा असाच परिणाम जीवनावर होतो ना? तेंव्हा पहिल्या ओळीतील प्रश्नाला होकारार्थी उत्तर द्यावे लागेल.

काकवी वितात कवी तावातावात, कातावतात कितीक काका वा तात
या ओळीत थोडासा श्लेष मारला आहे. ताव म्हणजे आवेश तसेच कागदाचा गठ्ठा. आणि त्याची व वेळाची नासाडी वडीलधा-या मंडळींना रुचत नाही.

कविता वात का कात काकवी का ताक, कावा का वाक विवाक कावकावतात काक
कविता म्हणजे नक्की काय आहे? वात म्हणजे वा-यासारखी स्वैर आणि मुक्त, का वात म्हणजे उन्माद आणणारी, का वात (वैताग) आणणारी ? का काताप्रमाणे रंग, सुगन्ध आणि चव आणणारी? काकवीसारखी मधुर का ताकासारखी शीतल? त्यात कावा म्हणजे लपवाछपवी असते का उघड वाद विवाद, चर्चा असते, का निरर्थक कावकाव असते? का काकदृष्टीचे टीकाकार अशी ओरड करतात?

वाकवी ती वकता तकता की वाकवी, ताकत वा कवतिक तव वा कविता! वा कवी!
वकत म्हणजे काळाला ती जुमानत नाही, काळाच्या ओघात वाहून जात नाही, क्षणार्धात आपल्याला भूतकाळ किंवा भविष्यकाळात घेऊन जाते. तकत म्हणजे राजसिंहासन सुद्धा आदराने तिच्यापुढे नतमस्तक होतं. एवढं तिचं सामर्थ्य, कवतिक ( माझा मराठाचि बोलु कवतिके मधलं) अशी ही कविता आणि हे कवी !

माझे (सांगीतिक) जेवण खाणे

मधु आणि मंजुळा एक अनुरूप जोडपे. मधूला खाण्याची आवड तर मंजुळेला स्वयंपाक करण्याची. त्यामुळे दोघांचं ब-यापैकी जमायचं. पण मंजुळेला दुसरी एक आवड होती ती म्हणजे सतत गाणी गुणगुणण्याची. ती कांही मधूला आवडत नसे. त्यानं मंजुळेला एक सवलत दिली की गाण्यात खाण्याचा उल्लेख असेल तर ते गाणे त्याला चालेल.
त्यांच्या आयुष्यातला असाच एक सुटीचा दिवस उजाडतो. गोड भूपाळी म्हणत मंजुळा दिवसाची मंगलमय सुरुवात करते.
“उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख । ऋद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी ।। ”
पुढचं कडवं ती गुणगुणत असते तेवढ्यात मधूला अंथरुणात चुळबुळ करतांना पाहून ती एकदम शेवटच्या कडव्यावर येते.
“कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकाची वाटी। रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो ।।”
दारावरची बेल वाजते. ती उठून दूध घेते, तापवायला ठेवते, चहा करून आणते. मधू जागा होऊन लोळत पडलेला असतो. चहाचा कप त्याच्यापुढे धरून ती म्हणते.
“रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा, घे रे चहा। कप भरला अति सुंदर । बशी ही किती नक्षीदार । अजून हवी का साखर, ढवळुनी पहा । घे रे चहा ।।”
चहापान आटोपल्यावर ते सकाळच्या कामांना लागतात. पेपर आल्यावर तो वाचणं सुरू होतं. थोड्या वेळानं मधूला वाटतं, आपण नुसताच पेपर काय वाचतोय्? त्याच्याबरोबर कांही नको? तो मंजुळेला हांक मारतो. हातात दुसरा कप घेऊन ती येते. आता तिचं शास्त्रीय संगीत सुरू झालेलं असतं. (राग काफी)
“कैसी ये कॉफी बनाई, बनाई, बनाई, बनाई, बनाआआई”
मधू म्हणतो “थांब. एक कप कॉफी बनाई बनाई किती वेळा सांगशील? एवढ्यानं माझं भागणार आहे काय?” तोपर्यंत तिनं हातात एक ट्रे आणलेला असतो. तो समोर ठेवीत ती अलहैया बिलावल रागात म्हणते,
“ब्रेड बटर ये, ले आयी हूँ मैं । ब्रेड बटर ये एएएए ……..
ब्रेडको सेकके टोस्ट बनाय़ी, मक्खन जॅम उसे चुपडाय़ी । ये लो खाओ मोरे पिया मन भाय़ी ।
ब्रेड बटर ये एएएए…..”
नाश्त्याचा कार्यक्रम झाल्यावर ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. शॉवर सुरू करताच वरून जलधारा कोसळायला लागतात.
“घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा । आता भज्यांचा घाणा तळते, करी घेउनि झारा ।
कोसळती धारा ।
गरम चहाने भरली किटली । सवे भज्यांची रास मांडली ।
मस्त मजेने फस्त करू त्या, दिन ओला न्यारा । कोसळती धारा ।”
मेघ मल्हार, मिया मल्हार वगैरे गाऊन झाल्यावर मंजुळा बाहेर येते. पॉवडर, कुंकू, नीट नेटके कपडे वगैरे करून पुन्हा स्वयंपाकघरात जाते. आता तिची अभंगवाणी सुरू होते.
“कांदा मुळा भाजी, अवघी आणू ताजी ताजी ।
काकडी आणि गाजर, किसून करू कोशिंबीर ।
हिरवी मिरची लसूण, घेऊ बारीक वाटून ।
बटाट्याच्या या काच-या, त्यांना परताव्या ब-या ।
कोबी फ्लॉवर मटार, रस्सा त्यांचा चवदार ।
पालकाची पातळभाजी, करी नवरोबाला राजी ।। कांदा मुळा…”
सगळं चिरणं, खिसणं, वाटणं, कुटणं वगैरे झाल्यावर ती गॅसकडे येते. आता ओव्या सुरू करते.
“अरे संसार संसार, गॅसवरचा कुकर । आधी येतसे प्रेशर, डाळ शिजते नंतर ।।
अरे संसार संसार, नाही भांडण तंडण । एकीकडे टाकू भाजी, दुसरीकडे वरण ।।
अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये । पोळी लाटाच्या लाटण्या, सोटा कधी म्हणू नये ।।
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार । एकमेकांच्या सांगाती, दुधामधील साखर ।।”
सगळा स्वयंपाक तयार होतो. आज मंजुळानं खास मधूसाठी त्याच्या आवडीची कढी बनवलेली असते. ती पाहून तो आनंदाने “कढी, मार उडी” म्हणेल या कल्पनेनेच ती सुखावते. ताटे मांडून दोघे जेवायला बसतात. एक मिनीट, दोन मिनिटं, तीन मिनिटं होऊन चांगली चार मिनिटे व्हायला आली तरी इतका वेळ मंजुळा अजून कांहीच बोललेली नाही, तिने गाणंही म्हंटलं नाही हे लक्षात येऊन मधू अस्वस्थ होतो. तिला त्याचं कारण विचारतो. आता मंजुळेच्या मौनाचे बांध फुटतात. ती गाऊ लागते,
“कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही । जेवणाच्या ताटामध्ये तुझ्या पाहणार नाही ।।”
मधूला अजूनही कांही समजत नाही. सगळं तर सुरळीतपणेच चाललंय्. तो विचारतो, “अगं,पण कां?” मंजुळा पुढे म्हणते,
“तुझ्यासाठी कटाक्षाने आले घातले ठेचून । साजूक तुपामध्ये रे दिली फोडणी वरून ।
पहिली कढीची वाटी ना रे संपणार कां ही? कांही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।”
झाली गोष्ट आता मधूच्या लक्षात येते. सारवासारव करीत तो सांगतो, “अगं, मी वाटीतली गरमागरम कढी पाहिली होती. पण बोटांना चटका बसेल म्हणून चटणी कोशिंबिरीच्या चवी घेत थोडा वेळ थांबलो होतो.” तो कढीचे भुरके मारायला सुरुवात करतो. एक वाटी संपते, दुसरी संपते, तिसरी संपायला येते. ते पाहून मंजुळा तृप्त होते. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. त्याला ऊत येऊन ओठावर शब्द येतात, “जेवणात ही कढी अशीच राहु दे । तुज भुरके घेतांना मला पाहु दे ।।
हळु बोटे चाटायचा छंद आगळा । आवडीचा त्याविण कां अर्थ वेगळा ।
ओघळ रे हातांवर, खुशाल वाहू दे । जेवणात ही कढी अशीच राहु दे ।।”
पोटभर जेवण झाल्यावर छान सुस्ती येते. दोघे वामकुक्षी घेतात. चार वाजतात.
“चार वाजले वेळ झाली, चहा करण्याची । चहा करण्याची, दुपारचा चहा करण्याची ।।”
असे म्हणत मंजुळा स्वयंपाकघरात जाते. तोंडाने भारुडे, गवळणी, जोगवा वगैरे पारंपारिक लोकगीते गुणगुणणे सुरू असते. थोड्या वेळाने कंटाळून मधू आंत जाऊन पाहतो. त्याला बघितल्यावर मंजुळा म्हणायला सुरू करते,
“चहाची किटअली, बिस्किटांचा डअबा । घेऊन मी येते थांबा । थोडा वेळ थांबा ।।
ग्लुको मोनॅको चविष्ट, खुसखुशीत मारी ।
क्रीम बिस्किटांच्या आंत व्हॅनिला स्ट्रॉबेरी ।
नव्या चवीही आणल्या, संत्रा आणि आंबा । थोडा वेळ थांबा, अगदी, थोडा वेळ थांबा ।।”
चहापान झाल्यावर दोघेही तयार दोऊन समुद्रकिना-यावर फिरायला जातात. ताज्या शुद्ध हवेबरोबरच पाणी पुरी, भेळ पुरी, पाव भाजी, दाबेली वगैरे खातात, मिक्स फ्रूट ज्यूस, ड्राय फ्रूट लस्सी पितात आणि सावकाशपणे घरी परततात. मंजुळाचे पोट गच्च भरलेले असते, आणखी कांही खाण्याची वासना तिला नसते. मधूने तर जास्तच हादडलेलें असल्याने त्यालाही इच्छा नसेल असं तिला वाटतं. पण फॉर्मॅलिटी म्हणून ती विचारून बघते. आता मधूलाही गाण्याची स्फूर्ती येते. तो गाण्यात म्हणतो,
“माझे जेवण खाणे, माझे जीवन खाणे ।
निशा असो वा दिवस असू दे । चमचमीत वा मधुर असू दे ।
भूक असो अथवा नसू दे । सततच चरत रहाणे । माझे जीवन खाणे ।।”
आता मात्र मंजुळाही कंटाळलेली असते. ती म्हणते,”ठीक आहे, दुपारचं थोडं अन्न उरलं आहे, त्याला ताजी फोडणी घालून देते. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्हाला थोडी मदत करावी लागेल.” ती भैरवी सुरू करते,
“स्वैपाकघरा, याहो जरा । करि हा धरा, जपुनी सुरा ।
मी फोडणी, करिते तुम्ही । कोथिंबीर अन्, कांदा चिरा ।।”
कांदा चिरायच्या कल्पनेनंच मधूच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. तो कांही म्हणायच्या आंत मंजुळा अंतरा सुरू करते,
“वस्त्रे जहाली, तंग ना । दम लागतो, चढता जिना ।
या ओळखूनी, लक्षणा । खादाडी आता, आवरा ।
उदरावरी, करुणा करा । स्वैपाकघरा, विसरू जरा ।।”