चंद्रयान आणि काळ, काम, वेग

“चंद्रयान  एका दिवसात (पृथ्वीवरच्या) चंद्राभोवती अनेक वेळा फिरत असले तरी चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालेल.” असे मी चंद्रयान या विषयावर लिहिलेल्या लेखात लिहिले होते. या वाक्यातले सारे शब्द ओळखीचे असल्यामुळे त्यांचा अर्थ सर्वांना समजला असेल, पण त्यावरून चंद्रयानाच्या प्रवासाचे आकलन मात्र आपापला अनुभव आणि ज्ञान यांच्या आधाराने होईल. निदान माझ्या बाबतीत तरी अनुभवाची गाठोडी पटापट उघडतात आणि ज्ञानाची किवाडे अंमळ हळू खुलतात असे होते. त्या क्रमाने या वाक्याचा काय बोध होतो ते या लेखात देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

चंद्रयान एका दिवसात अनेक वेळा आणि अनेक दिवसात एक वेळा कांहीतरी करते म्हणताच आपण अशा प्रकारे कोणती कामे करतो याच्या अनुभवाच्या फाइली मनात उघडल्या जातात. मी वर्षातून एकदा आयकरविवरण भरतो, मोटारीच्या विम्याचे नूतनीकरण करतो, महिन्यातून एकदा विजेचे बिल भरतो, आपले केस कापवून घेतो, दिवसातून अनेक वेळा कांही खाणेपिणे होते, दरवाजा उघडतो आणि बंद करतो अशी कांही उदाहरणे पाहून चंद्रयानही तसेच कांही करत असेल असे पहिल्या क्षणी वाटते. माझा मित्र रोज कामावर जातो, महिन्यातून एकदा गावात राहणा-या भावाला भेटतो आणि वर्षातून एकदा दूर परगावी असलेल्या बहिणीला भेटून येतो, चंद्रयानसुध्दा असेच महिन्यातून एकदा पृथ्वीभोवती आणि वर्षातून एकदा सूर्याभोवती फिरून येत असेल असे त्याला वाटण्याची शक्यता आहे.

पण खगोलशास्त्राची आवड असेल किंवा माझे लेख वाचून त्यातले कांही लक्षात राहिले असेल, तर त्या ज्ञानाच्या ज्योतीच्या प्रकाशात कांही वेगळे दिसेल आणि या दोन उदाहरणातला महत्वाचा फरक लगेच समोर येईल. मी दार उघडत असतांना विजेचे बिल भरत नसतो आणि केशकर्तनालयातल्या कारागीराकडून आपल्या केसांवर कलाकुसर करून घेत असतो तेंव्हा इन्कमटॅक्सचे चलन लिहीत नसतो. या चारही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे माझा मित्र जेंव्हा त्याच्या भावाच्या घरी गेलेला असतो तेंव्हा तो त्याच्या ऑफीसातही नसतो किंवा बहिणीकडेही नसतो. चंद्रयान मात्र चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या सर्वांना एकाच वेळी अव्याहतपणे प्रदक्षिणा घालत असते. चंद्राच्या कक्षेत पोचल्यापासून त्याचे हे भ्रमण सुरू झाले आहे आणि त्याचे इतर कार्य थांबल्यानंतरही जोंपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि ते स्वतः अस्तित्वात आहेत तोंवर त्याचे भ्रमण असेच अविरत चालत राहणार आहे. वर दिलेल्या वेगवेगळ्या कामात मात्र मी एका वेळी फक्त कांही सेकंद, मिनिटे किंवा तास एवढाच वेळ खर्च करतो आणि तो कालावधी दिवस, महिना व वर्ष यांच्या तुलनेत अत्यल्प असतो. यामुळे या कामांची चंद्रयानाच्या भ्रमणाशी तुलना होऊ शकत नाही.

आपला श्वासोच्छवास आणि रक्ताभिसरण या क्रिया मात्र चंद्रयानाच्या भ्रमणाप्रमाणे अखंड चालत असतात, पण त्या सुरळीत चालत असतांना आपल्याला जाणवत नाहीत. (बंद पडल्या तर मात्र लगेच जीव कासावीस होतो.) मिनिटाला किती वेळा श्वास घेतला जातो आणि नाडीचे किती ठोके पडतात हे वैद्यकीय तपासणीत मोजले जात असल्यामुळे अनेक लोकांना त्यांचा अंदाज असतो, पण त्यातून किती घनमीटर हवा फुफ्फुसाच्या आंतबाहेर जाते आणि किती लीटर रक्त धमन्यांतून वाहते याची आंकडेवारी क्वचितच कोणाला ठाऊक असते. काळकामवेगाचे उदाहरण पाहतांना आपल्या शरीरात चालणा-या या क्रियांचा विचार आपल्या मनात येत नाही. फार पूर्वी गॅलीलिओच्या मनात तो चमकला आणि त्यातून लंबकाच्या घड्याळांचा विकास झाला हे सर्वश्रुत आहे.

चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या तीघांनाही चंद्रयान सतत प्रदक्षिणा घालत असते म्हंटल्यावर ठराविक कालावधीत त्या किती वेळा होतात ते पाहून त्याचे काम मोजता येईल. वर्षभरातून तो सूर्याभोवती फक्त एक प्रदक्षिणा घालतो आणि पृथ्वीभोवती त्या तेरा होतात. (तेरा ही संख्या मुद्रणदोषातून आलेली नाही. एका वर्षात बारा पौर्णिमा आणि अमावास्या येत असल्यामुळे आपला चंद्र बारा वेळा पृथ्वीभोवती फिरतो अशी सर्वसामान्य समजूत आहे, पण पृथ्वीसभोवतालच्या बारा राशींच्या चक्रातून तो प्रत्यक्षात तेरा चकरा मारतो हे कदाचित कित्येकांना माहीत नसेल.) चंद्राभोवती मात्र रोज बारा या हिशोबाने चंद्रयान वर्षात चार हजारावर प्रदक्षिणा घालेल. हे आंकडे पाहिल्यावर तेच त्याचे मुख्य काम आहे असे कोणीही म्हणेल. एका अर्थाने ते बरोबर आहे. चंद्राचे निरीक्षण करण्यासाठीच त्याला अंतराळात पाठवले आहे. त्या कामासाठी जिथे जिथे चंद्र जाईल तिथे तिथे त्यालाही गेलेच पाहिजे आणि खुद्द चंद्रच त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. म्हणजे चंद्राच्या गाड्यासोबत चंद्रयानाच्या नळ्याची यात्रा घडते असे म्हणता येईल.

चंद्रयानावर ठेवलेल्या त्याच्या अनेक दिव्यचक्षूंमधून त्याचे निरीक्षणाचे काम चालते. चंद्रावरून निघणारे प्रकाश किरण, अतिनीलकिरण, क्षकिरण, गॅमाकिरण वगैरे सर्व प्रकारचे किरण चंद्रयानाच्या अँटेनावर येऊन पोचतात. ते सारे किरण एकाद्या आरशाने करावे तसे परस्पर पृथ्वीकडे परावर्तित केले जात नाहीत, तर त्यातून मिळणारी माहिती संदेशवाहक लहरींमार्फत पृथ्वीकडे पाठवली जाते. हे काम करण्यासाठी ती माहिती गोळा करणे, संदेशवाहक लहरी निर्माण करणे, त्यांची सांगड घलून त्यांचे प्रक्षेपण करणे वगैरे कामे केली जातात, त्याचबरोबर पृथ्वीवरील नियंत्रणकक्षातून आलेले संदेश वाचून त्यातून मिळालेल्या आज्ञांचे पालन केले जाते. या कामासाठी लागणारी ऊर्जा चंद्रयानावरील बॅटरीमधून घेतली जाते. सूर्यकिरणांमधून मिळालेल्या ऊर्जेचे विजेत परिवर्तन करून खर्च झालेल्या विजेची भरपाई करण्यात येते. ही सगळी कामे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकाशी तुलना करणे हे एका माणसाने भाजी निवडणे, दुस-याने पुस्तक वाचून अभ्यास करणे आणि तिस-याने भिंत रंगवणे अशासारख्या कामांची तुलना करण्यासारखे होईल. त्याची कांही गरजही नाही. हे सर्व मिळून चंद्रयानाचे काम चालत असते.

चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्याभोवती एका ठराविक कालात चंद्रयान किती प्रदक्षिणा घालते हे आपण पाहिले आहे, पण ते करतांना ते किती किलोमीटर अंतर कापते याचीही तुलना करता येईल. एका वर्षात चंद्राभोवती चार हजार घिरट्या घालतांना ते सुमारे पाच कोटी किलोमीटर इतके अंतर कापते, पृथ्वीभोवती तेरा वेळा फिरतांना तीन किलोमीटराहून थोडे जास्त अंतर पार करते आणि सूर्याभोवती घातलेल्या एकाच प्रदक्षिणेतले अंतर एक अब्ज किलोमीटरपेक्षा जरासे कमी असते. याचा अर्थ ते इतर दोन्हींच्या कित्येकपटीने जास्त आहे असा होईल. म्हणजेच सूर्यप्रदक्षिणा ही त्याच्या भ्रमणाची प्रमुख बाब झाली!

ही सर्व अंतरे एका वर्षात कापलेली असल्यामुळे वर्षाला अमूक इतके कोटी किलोमीटर हे त्या भ्रमणाचे वेग झाले. पण असले मोठे आकडे आपल्या ओळखीचे नसतात. शाळेतल्या कुठल्याशा इयत्तेत खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्या मी शिकलो होतो. १ या आंकड्यावर दहाबारा की पंधरावीस शून्ये ठेवल्यावर या संख्या येतात. प्रत्यक्ष उपयोगात किंवा सोडवलेल्या गणितातसुध्दा हे आंकडे संपूर्ण आयुष्यात कधीच न आल्यामुळे त्यांचे मूल्य त्यांवर असलेल्या त्या दहा वीस शून्यभोपळ्यांपेक्षा कधीच जास्त वाटले नाही आणि त्या पूज्यांची संख्यासुध्दा लक्षात राहिली नाही. ज्या लोकांना कोटी आणि अब्ज या संख्यांचा उपयोग प्रत्यक्षात कधी करावा लागला नसेल त्यांना त्या दोन्ही संख्या सारख्याच महाप्रचंड वाटण्याची शक्यता आहे.

रस्त्यावरून धावणा-या मोटारी आणि रुळावरल्या आगगाड्या यांचा अनुभव सर्वांना असल्यामुळे त्यांचे दर ताशी किलोमीटर किंवा मैलातले वेग सर्वांच्या ओळखीचे असतात. अलीकडे अनेक लोक विमानाने प्रवास करतात, त्यांना त्याच्या वेगाचा अंदाज असतो. चंद्रयानाचा सरासरी वेग तासाला सुमारे पावणेसहा हजार किलोमीटर इतका आहे. म्हणजे प्रवासी विमानांच्या वेगाच्या सातआठपट आणि मोटार व आगगाडीच्या वेगाच्या जवळ जवळ पन्नाससाठपट एवढा तो आहे. त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग थोडा कमी असला तरीसुध्दा तो तासाला साडेतीन हजार किलोमीटर इतका आहे. पण त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग मात्र ऐकूनच भोवळ आणण्याइतका जास्त म्हणजे दर तासाला एक लक्ष किलोमीटरहून जास्त आहे. याचाच अर्थ दर सेकंदाला चंद्रयान चंद्राभोवती फिरण्यासाठी दीड किलोमीटर पुढे जाते, पृथ्वीच्या कक्षेत एक किलोमीटर पुढे सरकते आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तीस किलोमीटर इतकी वाटचाल करते असा होतो. म्हणजे सूर्याभोवती साठ पाउले टाकतांना ते दोन पाऊले पृथ्वीभोवती आणि तीन पाउले चंद्राभोवती टाकते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी याहून जास्त ओळखीचे एक उदाहरण देतो.

एक आगगाडी भरधाव वेगाने पुण्याहून कोल्हापूरला चालली आहे, त्यातला एक वेटर एका ट्रॉलीवर खाद्यपदार्थ ठेऊन पँट्रीतून गार्डाच्या डब्याकडे जात आहे आणि एक मुंगी त्या ट्रॉलीच्या खांबावर चढून वरखाली करते आहे असे समजा. वाटेत कोठेतरी रुळांपासून थोडे दूर उभे राहून कोणी त्या गाडीकडे पाहिले तर त्याला काय दिसेल? त्या वेटरसकट ती आगगाडी उत्तरेकडून दक्षिणेकडे धडधडत जातांना त्याला दिसेल. तिच्यातला वेटर आगगाडीच्या उलट दिशेने मागे चालत असला तरी त्या निरीक्षकाला मात्र तो पुढेच जातांना दिसणार. खूप बारीक लक्ष देऊन पाहिल्यास गाडीतील इतर प्रवासी जेंव्हा पंचवीस मीटर पुढे गेले तेंव्हा तो वेटर चोवीसच मीटर पुढे गेला असे त्याला दिसेल. ती बारकीशी मुंगी कांही त्याला दिसणार नाही, पण खास प्रकारच्या दुर्बिणीतून पाहून दिसलीच तर ती सुध्दा तेवढ्या अवधीत चोवीस मीटर पुढे गेलेली आणि वीतभर वर सरकलेली त्याला दिसेल.

अंतराळातून पृथ्वीवरील हालचालींवर नजर ठेवणा-या उपग्रहातल्या दुर्बिणीतून पाहिले तर ती आगगाडी, त्यातला वेटर आणि बाहेरचा निरीक्षक हे सगळेच त्या अवधीत पृथ्वीच्या पृष्ठभागाबरोबर वेगाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असलेले दिसतील आणि त्यात ती गाडी किंचित दक्षिणेकडे सरकल्याचे दिसेल. या सर्वांपेक्षा शेकडोपट अधिक वेगाने ही सारी पात्रे सूर्याभोवती फिरत आहेत हे मात्र त्यातल्या कोणालाच जाणवणार नाही!

चन्द्रयानाच्या निमित्याने – यशोगाथा (उत्तरार्ध)

Chandrayan7

 

मुंबई ते दिल्लीचा प्रवास असो किंवा सातारा ते फलटणपर्यंतचा असो, त्यात निर्गमन, मार्गक्रमण आणि आगमन असे त्या प्रवासाचे तीन टप्पे असतात. पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यांवर त्या त्या ठिकाणी असलेल्या तत्कालिन स्थानिक परिस्थितीचा प्रभाव असतो, पण तो अल्पकाळासाठी असतो. दोन गांवातले अंतर कापण्यामधले मार्गक्रमणच महत्वाचे असते आणि तेच आपल्या लक्षात राहते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत मार्गक्रमणाची गोष्ट मात्र यापेक्षा वेगळी आहे.

पृथ्वीवरून आभाळातला चंद्र डोळ्यांना दिसतो. त्यामुळे नेम धरून सोडलेल्या बाणाप्रमाणे रॉकेटसुध्दा चंद्राला बरोबर नाकासमोर ठेवून सरळ रेषेत त्याच्याकडे झेपावत असेल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचत असेल असे कोणालाही वाटणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात ते तसे नसते एवढे मला माहीत होते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ते यान आधी पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालीत राहते आणि त्यात स्थिरावल्यानंतर चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करते एवढे मला ऐकून ठाऊक होते. ज्या वेगाने ते आकाशात झेप घेते तो पाहता ते कांही मिनिटातच पृथ्वीभोवती फिरू लागेल, त्यानंतर कांही तासात ते पुढील प्रवासाला निघू शकेल आणि एक दोन दिवसात चंद्रापर्यंत जाऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती. पण चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाची जी बातमी आली तिच्यातच त्या यानाला चंद्राजवळ जायला पांच दिवस लागतील हे वाचून थोडे आश्चर्य वाटले होते. प्रत्यक्षात तर २५ ऑक्टोबर २००८ला इकडून निघालेले हे यान दोन आठवडे उलटून गेले तरी ते अजून आपल्या मुक्कामाला पोचल्याची बातमी आली नाही. साध्या प्रवासी विमानाच्या गतीने सुध्दा एवढ्या काळात ते चंद्रापर्यंत जाऊन पोचले असते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले आहे आणि इतके दिवस तिथे काय करते आहे हे समजत नव्हते. अखेरीस १२ नोव्हेंबरला चंद्रयान आपल्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावले आणि १४ नोव्हेंबरला त्याने भारताचा झेंडा चंद्रावर रोवला.

प्रत्यक्ष प्रवासाचा मार्ग साधारणपणे वर दिलेल्या चित्रात दाखवल्यासारखा होता. सर्कसमधील ट्रॅपीझ या प्रकारातला क्रीडापटू एका उंच झोपाळ्यावर चढतो, त्याला झोका देत देत तो उंच उंच जातो आणि खूप मोठा झोका दिल्यानंतर पटकन आपला झोपाळा सोडून दुसरा झोपाळा पकडतो, तशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरता फिरताच तिच्यापासून दूर दूर जात चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्राभोवती फिरता फिरता त्याच्या जवळ जवळ जात त्याने आपले नियोजित स्थान ग्रहण केले. तारीखवार त्याची प्रगती खाली दिल्याप्रमाणे झाली.
२२ ऑक्टोबर : पृथ्वीवरून उड्डाण करून २२९००/२५५ कि.मी. च्या लंबवर्तुळाकार कक्षेत तिच्याभोवती भ्रमण सुरू
२३ ऑक्टोबर : कक्षा ३७९००/३०५ कि.मी. वर नेली
२५ ऑक्टोबर : कक्षा ७४७१५/३३६ कि.मी. वर नेली
२६ ऑक्टोबर : कक्षा १६४६००/३४८ कि.मी. वर नेली
२९ ऑक्टोबर : कक्षा २६७०००/४६५ कि.मी. वर नेली
०४ नोव्हेंबर : पृथ्वीपासून ३८०००० कि.मी. वर चंद्राच्या जवळ पोचले
०८ नोव्हेंबर : ७५०२/५०४ कि.मी. या कक्षेत चंद्राभोवती भ्रमण सुरू
०९ नोव्हेंबर : कक्षा ७५०२/२०० कि.मी. वर नेली
१२ नोव्हेंबर : १०० कि.मी. अंतरावरून चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण सुरू
१४ नोव्हेंबर : एम.आय.पी.(प्रोब) च्या सहाय्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज उतरवला.
२२ ऑक्टोबर रोजी पृथ्वीभोवती फिरतांना चंद्रयानाला एका परिभ्रमणासाठी फक्त साडेसहा तास इतका वेळ लागत होता. तो कालावधी वाढत वाढत २९ ऑक्टोबरला ज्या कक्षेत चंद्रयान पोचले तिच्यात सहा दिवसांइतका झाला होता. त्यानंतर बहुधा शेवटचे भ्रमण पूर्ण होण्याच्या आधीच ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्यानंतर ते चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर राहून वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत फिरत राहिले. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांना भेत देत आपले एक आवर्तन ते सुमारे दोन तासात पूर्ण करत होते. तोपर्यंत चंद्र थोडासा स्वतःभोवती फिरलेला असतो. अशा प्रकारे चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग पाहून घेऊन त्याने त्याची छायाचित्रे पाठवली. चंद्रयान जरी (पृथ्वीवरच्या) एका दिवसात चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून पूर्णपणे मुक्त झालेले नाही. चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहिले आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालत राहिले.

चंद्रयानाच्या कक्षांमध्ये बदल करण्यासाठी त्याच्यासोबत जोडलेल्या रॉकेट इंजिनांचा उपयोग केला गेला. त्यांच्या जोरावर यानाच्या भ्रमणाची गती बदलली की त्याची कक्षा बदलते आणि त्यानंतर ते यान नव्या कक्षेत आपोआप फिरत राहते. त्यावरील विविध उपकरणांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लागणारी वीज पुरवण्यासाठी यानावर सोलर सेल्सचे पॅनेल बसवले होते. यानावरील सर्व साधनांना पुरेल इतकी वीज त्या सोलर सेल्सपासून निर्माण होते. या सर्व उपकरणांचे कसून परीक्षण केलेले असल्यामुळे निदान दोन वर्षे तरी ती अव्याहत चालत राहतील अशी अपेक्षा होती. पण त्यापूर्वीच कसलासा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे यानाशी असलेला संपर्क तुटला. तोपर्यंत चंद्रयानाकडून बरीच शास्त्रीय माहिती मिळाली. तिचे विश्लेषण करणे वगैरे काम चालतच राहील.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( इस्रो) च्या संकेतस्थळावर चंद्रयानाबद्दलची जी माहिती प्रसिध्द झाली आहे तिचा उपयोग या लेखासाठी केला आहे. या संकेतस्थळाचा दुवा खाली दिला आहे.
http://www.isro.org/chandrayaan/htmls/home.htm
गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह वगैरेबद्दलच्या शास्त्रीय माहितीचे संकलन नासाच्या आणि इतर संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीवरून केले आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

 

<———— मागील भाग – यशोगाथा (पूर्वार्ध)

चन्द्रयानाच्या निमित्याने – यशोगाथा (पूर्वार्ध)

Chandrayan6

 

चंद्रयानाच्या उड्डाणाच्या अनुषंगाने गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह आणि त्यांच्या उड्डाणासाठी लागणारे प्रयत्न यांची थोडक्यात ओळख मी याआधीच्या भागात करून दिल्यानंतर या भागात मुख्य मुद्यावर येत आहे. चंद्रयान प्रकल्पाची जाहीर घोषणा झाल्यानंतर लगेच त्यावर जे प्रतिसाद आले त्यात “आता हे कसले नवे खूळ काढले आहे?”, “या लोकांना हे झेपणार आहे काय ?”, “याची कोणाला गरज पडली आहे ?”, “याचा काय उपयोग होणार आहे?”, “आता याचा खर्च पुन्हा आमच्याच बोडक्यावर पडणार आहे ना?” अशासारखे प्रश्न अनेक लोकांनी विचारले होते. चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर त्याबद्दल वाटणारा अविश्वास आणि शंका दूर झाल्या. कालांतराने त्याचे महत्व पटल्यानंतर विरोधाची धारही बोथट होईल. रोहिणी आणि आर्यभट यांच्या उड्डाणाच्या वेळीसुध्दा अशा शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे निरसन आतापर्यंत झाले आहे.

चंद्रयान प्रकल्पाची रूपरेखा आंखतांनाच त्यामागची उद्दिष्टे निश्चित केली होती. अंतराळातील ग्रहगोलांचे वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची ही पहिलीच भारतीय मोहिम होती. त्यानुसार त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती त्या यानाने गोळा केली. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली ) बाजू तसेच पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी त्याची बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच त्याच्या गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात आली. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-याच प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी इथे दुर्मिळ असलेली मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याचा अंदाज यावरून येऊ शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.
चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे सांगता येईल.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. अंतराळातून पृथ्वीभोवती फिरून तिचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन
३. चंद्राच्या कक्षेत प्रवेश
४. चंद्राच्या कक्षेत त्याच्यापासून १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे त्याचेभोवती नियमितपणे घिरट्या घालणे.
हे चांद्रयानाचे मुख्य काम होते. हे काम करतांना त्याने खालील गोष्टी करायचे योजिले होते.
अ. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
आ. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
इ. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या मार्गाचा अभ्यास करणे, तसेच आपल्या आगमनाची खूण चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवणे.
ई. या छोट्या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी त्याच्या जवळून घेतलेली माहिती जमा करणे.

या मोहिमेतले सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवली गेली. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण झाले आणि पुढेही होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळातल्या प्रयोगात उपयोग होईल. चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधायला त्यातून मदत मिळेल. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. त्याप्रमाणे कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडू शकणारे नवे शोधसुध्दा त्यावरून लागू शकतात.

२२ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळच्या नियोजित वेळी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून चांद्रयानाने यशस्वीरीत्या उड्डाण केले. सुमारे चार दशकांपूर्वी अमेरिका व रशिया यांनी चंद्रावर स्वारी केली होती. त्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर जाऊन मानवाचे पहिले पाऊल (की बुटाचा तळवा) त्याच्या पृष्ठभागावर उमटवले होते. त्यानंतर अपोलो प्रोग्रॅममधून अमेरिकेचे दहा बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. युरोपातील देशांनी संयुक्तपणे आपले यान चंद्राकडे पाठवले होते. चंद्रयानाच्या वर्षभर आधी जपान आणि चीन या आशियाई देशांनी या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर भारताचा क्रम लागतो. पृथ्वीवरून निघून चंद्रापर्यंत पोचण्याचे जे तंत्र चाळीस वर्षांपूर्वी विकसित झाले होते त्यात मूलभूत असा फरक दरम्यानच्या काळात पडलेला नाही. मात्र अत्यंत प्रभावशाली कॅमेरे, संदेशवहनाची विकसित साधने आणि अत्याधुनिक संगणक आता उपलब्ध असल्यामुळे चांद्रयानाकडून पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार, अचूक आणि अद्ययावत माहिती मिळते. या बाबतीतचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांच्या सहयोगाने करण्यात आले.

अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात भारताचे उपग्रह विकसित देशांच्या रॉकेट्सबरोबर अवकाशात पाठवले जात. त्याच्या जोडीने अशी रॉकेट्स भारतात तयार करण्याचे प्रयत्न चाललेले होते. पोलर सॅटेलाइट लाँच व्हेहिकल्स (पीएसएलव्ही) चे तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर भारताने आपले उपग्रह त्यांच्या सहाय्याने अंतराळात पाठवणे सुरू केले. त्यात इतके यश मिळाले की भारताने आपले अनेक उपग्रह अवकाशात पाठवलेच, शिवाय परदेशांचे अनेक उपग्रहसुध्दा पृथ्वीवरून आभाळात उडवले गेले. याच मालिकेतल्या पीएसएलव्ही-एक्सएल जातीच्या अद्ययावत अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयानाने उड्डाण केले. सुमारे पंधरा मजली गगनचुंबी इमारतीइतके उंच असलेले हे रॉकेट चार टप्प्यांचे होते. यात घनरूप तसेच द्रवरूप अशा दोन्ही प्रकारच्या इंधनांचा उपयोग केला जातो. त्यांच्या जोरावर चांद्रयानाने उड्डाण केल्यानंतर तो पृथ्वीच्या सभोवती अतीलंबगोलाकार अशा कक्षेत फिरू लागला. साडेसहा तासात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतांना सुरुवातीला प्रत्येक आवर्तनात तो तिच्यापासून कमीत कमी २५५ किलोमीटर इतका जवळ यायचा तर जास्तीत जास्त २२८६० कि.मी. इतका तिच्यापसून दूर जायचा. क्रमाक्रमाने हे अंतर वाढवीत त्याने ८ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आपली कक्षा हळूहळू बदलून तो त्याच्या ठरलेल्या कक्षेमध्ये चंद्राभोवती फिरू लागला. पृथ्वीवरून निघतांना हा उपग्रह १३८० किलोग्रॅम वजनाचा होता. चंद्राच्या मार्गावर जातांना सोडलेल्या रॉकेटमुळे त्याचे वजन कमी होत गेले. चंद्राजवळ पोचेपर्यंत ते ६७५ किलोग्रॅम झाले.

चंद्राच्या कक्षेतले आपले निश्चित स्थान ग्रहण केल्यानंतर १४ नोव्हेंबर २००८च्या रात्री (भारतीय वेळेप्रमाणे) त्याने मून इंपॅक्ट प्रोब (एमआयपी) नांवाचा आपला एक दूत चंद्रावर पाठवून दिला. त्या प्रोबच्या पृष्ठभागावरच तिरंगा झेंडा रंगवलेला होता. सुमारे तीस किलोग्रॅम वजनाचा हा प्रोब स्वतःभोवती फिरत फिरत २५ मिनिटांनंतर चंद्रावर जाऊन नियोजित जागेवर उतरला आणि त्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज नेऊन ठेवला. उद्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या मालकीवरून पृथ्वीवरल्या देशांदेशांमध्ये वाद झाला तर त्यावर आता भारताला आपला हक्कसुध्दा सांगता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता उतरता त्या प्रोबने स्वतःभोवती फिरत चंद्राच्या विस्तृत भागाचे जवळून अवलोकन करून अनेक प्रकारची माहिती देखील पाठवली. भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज यापूर्वी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर फडकला होताच, आता तो चंद्रावर जाऊन पोचला आहे.
. . . . . . . .. . . . . . . . . (क्रमशः)

 

<——– मागील भाग – उड्डाणाची पूर्वतयारी         पुढील भाग – यशोगाथा (उत्तरार्ध) ———>

चन्द्रयानाच्या निमित्याने – उड्डाणाची पूर्वतयारी

Chandrayan5

 

मानवनिर्मित वस्तू अंतरिक्षात पाठवण्याच्या तयारीला दुस-या महायुध्दानंतर अकल्पित असा वेग आला. रशिया आणि अमेरिका हे देश या बाबतीत अग्रगण्य होते. त्या दोन्ही देशांनी अवकाशात
जाऊन पोचणारी वेगवान आणि शक्तीशाली रॉकेट्स पाठवली, त्यानंतर स्पुटनिक, एक्स्प्लोअरर आदि उपग्रह अंतरीक्षात सोडले आणि कांही वर्षांनी युरी गागारिन, अॅलन शेपर्ड वगैरे अंतराळवीर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर दूरवर फेरफटका मारून जमीनीवर परत आले. ही शर्यत चालतच राहिली आणि ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान यासारखे कांही इतर देश त्यात सामील झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यानेही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला अग्रक्रम दिला आणि त्यात अंतरिक्षाच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान दिले. अंतराळासंबंधीचे तंत्रज्ञान त्या काळात विकसित देशांमध्येसुध्दा ज्ञान व अज्ञान यांच्या सीमेवरचे असे (फ्राँटियर टेक्लॉलॉजी) मानले जात होते. अर्थातच ते गोपनीय स्वरूपाचे होते. आज गूगलच्या शोधयंत्रावरून आपल्याला या विषयावरील लाखो लेख किंवा शोधनिबंध सापडतील पण पूर्वी सगळी माहिती गुप्त असायची. अंतराळात पाठवण्यासाठी कशा प्रकारची उपकरणे किंवा यंत्रसामुग्री लागेल, ती कोणत्या धातूंपासून किंवा अधातूंपासून तयार करता येईल, जमीन, हवा, पाणी या महाभूतातून ते पदार्थ कसे उत्पन्न करता येतील, त्यासाठी कोणत्या प्रक्रियांचा उपयोग करावा लागेल आणि कोणत्या यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल हे सगळे गूढ असायचे.

साबूदाण्याची खिचडी किंवा कांद्याची भजी करण्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे आणि कृती पाकशास्त्रावरील छापील पुस्तकांत वाचायला मिळते. तरीसुध्दा त्याला चंव येण्यासाठी पाककौशल्य लागते. परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने स्कूटर्स, शिलाईयंत्रे वगैरे निर्माण करण्याचे कारखाने तेंव्हा भारतात निघाले होते. त्यातले अगदी खिळेमोळे आणि ते ठोकण्याचे हातोडे यासकट त्यासाठी लागणारे सगळे साहित्य आणि ते जुळवण्याची कृती त्यांच्या कोलॅबोरेटर्सकडून आयात होत असे. पण त्या काळात अणुभट्ट्या, अग्निबाण आणि उपग्रह वगैरे खास गोष्टी मात्र अशा पध्दतीने जागतिक बाजारात मिळत नसत. त्यातली थोडी मोघम माहिती हाताला लागली तरी त्या वस्तू कशा मिळवायच्या, त्या कोठे उपलब्ध असतील हा प्रश्न असायचाच. जगभरातल्या बाजारपेठांमध्ये त्याचा तपास केला जात असे. मोटारी, कापड, औषधे वगैरे ग्राहकांच्या उपयोगाच्या असंख्य वस्तू तयार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आणि साहित्य लागत असे ते तरी निदान परदेशी बाजारपेठेत मिळायचे. त्यांचाच वेगळ्या प्रकाराने उपयोग करून घेऊन आपल्याला हवा तो परिणाम साधता येईल कां याचा विचार केला जात असे. याच्या उलट अवकाशातल्या उपयोगासाठी आधी मुद्दाम बनवून घेतलेले कांही खास पदार्थ आणि उपकरणे सर्वसामान्य ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीसाठी कालांतराने सर्वांना उपलब्ध होत असत. त्यांचा चांगल्या प्रकाराने वापर करून घेता येत असे. पण आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू किंवा यंत्रसामुग्री राजकीय कारणांमुळे आयात करता येत नाहीत. त्यांचा पर्याय देशातच शोधावा लागतो. मूलभूत संशोधन, पुस्तकी ज्ञान आणि प्रसिध्द झालेली माहिती यावरून कांही तर्क बांधायचे, एकमेकांशी चर्चा, विचारविनिमय करून अंदाजाने कांही प्रयोग करून पहायचे आणि त्या आधारावर पुढे जायचे अशा पध्दतीने हे संशोधन चालायचे. अशा रीतीने नवनवे प्रयोग करीत आणि अडचणीतून मार्ग काढीत भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी या तंत्रज्ञानाचा विकास करून वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स तयार केली. या काळात आपल्या देशातल्या यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचाही फायदा मिळाला.

सर्वसामान्य यंत्रसामुग्री आणि अवकाशात पाठवायचे अग्निबाण किंवा उपग्रह बनवणे यातील दोन महत्वाचे फरक पुढे दिलेल्या सोप्या उदाहरणाने स्पष्ट होतील. स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर तयार करायचा असेल तर त्यात किती अन्न शिजवायचे यावरून त्याचा आकार ठरतो, गॅसच्या ज्वालेचे तपमान आणि वाफेचा दाब लक्षात घेऊन त्याचे भांडे कोणत्या धातूचे बनवायचे ते ठरते. एक सोपे गणित मांडून त्याची जाडी ठरवता येते. पण यातल्या अनेक बाबी अनिश्चित असतात. गॅसच्या शेगडीतल्या ज्वालेचे जास्तीत जास्त तपमान नक्की किती अंश असू शकेल ते माहीत नसते आणि वाफेचा दाब मर्यादित ठेवण्यासाठी शिट्टी, व्हॉल्व्ह वगैरे असले तरी तो उडेपर्यंत आतल्या वाफेचा दाब नक्की किती पास्कलपर्यंत वाढत जाईल हे सांगता येत नाही. कुकरच्या खाली खूप ऊष्ण ज्वाला आणि आंत थंडगार पाणी या परिस्थितीमुळे त्याच्या तपमानात जो असमतोल असतो त्याचा विपरीत परिणाम होतो, वापर करतांना त्याची झीज होते, घासतांना त्यावर चरे पडतात, आपटल्याने त्याला पोचे येतात वगैरे कारणांनी त्याची सहनशक्ती कमी होते. अखेर तो अगदी फुटला जरी नाही, नुसता थोडा वाकडा तिकडा झाला तरी त्याचे झांकण लागत नाही, त्यामुळे तो निकामी होतो. अशा कल्पना करता येण्यासारख्या तसेच तिच्या पलीकडच्या अनेक गोष्टींचा विचार करून तो बनवतांना त्याची जाडी सरळ पाच ते दहा पटीने वाढवली जाते. याला ‘फॅक्टर ऑफ सेफ्टी’ असे नांव आहे. आत शिजवण्याच्या पदार्थांच्यासह त्या कुकरचे वजन सामान्य माणसाला सहजपणे उचलता येते त्यामुळे त्याला फारसा फरक पडत नाही. पण विमान किंवा उपग्रहाचे वजन कमीत कमी ठेवणे अत्यावश्यक असल्यामुळे असा सढळपणा त्यांत चालत नाही. त्या साधनांचा उपयोग कोणत्या परिस्थितीत करायचा आहे हे नेमके ठरलेले असल्यामुळे त्यातल्या प्रत्येक बाबीची कसून चौकशी करून आणि अनेक प्रयोगाद्वारे अथपासून इतीपर्यंत समग्र माहिती मिळवली जाते व तिचे संपूर्ण विश्लेषण केले जाते. जितक्या प्रमाणात त्यातील अनिश्चितता कमी होते तितकी कमी फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरता येते. वजनाने हलके पण पुरेसे कणखर वा लवचीक असे खास मिश्रधातू निर्माण करून त्यांचा उपयोग आवश्यक किंवा शक्य असेल त्या भागांसाठी केला जातो. त्या भागांची एकच सरधोपट जाडी न ठेवता आवश्यक तिथे जास्त आणि गरज नसेल तिथे ती कमी ठेवली जाते. जे भरीव भाग जास्तच वजनदार असतात ते तितक्याच क्षमतेचे पण वजनाने हलके करण्यासाठी ते भरीव सळी(रॉड)ऐवजी पोकळ नळी(ट्यूब)पासून तयार करतात. अशा अनेक उपायांनी त्या भागांचे वजन कमी केले जाते.

दुसरा मुद्दा याच्या बरोबर उलट प्रकारचा आहे. मोटारगाडीतला एकादा नटबोल्ट ढिला झाला तर त्याचा खडखडाट ऐकून निदान भारतात तरी मोटारीचा ड्रायव्हर लगेच गाडी थांबवू शकेल, तिला रस्त्याच्या कडेला उभी करून तो इंजिन उघडून पाहील आणि त्याला जमलेच नाही तर मोटार गॅरेजमध्ये नेऊन दुरुस्त करून आणेल. विमान आकाशात उडल्यानंतर यातले कांही करता येत नाही, यामुळे ते उडण्यापूर्वीच सर्व दक्षता घेतली जाते. तरीसुध्दा त्यात कांही किरकोळ बिघाड झालाच तर कुशल पायलट ते विमान सुरक्षितपणे जवळ असलेल्या विमानतळावर उतरवतो आणि तिथले तज्ञ दुरुस्तीचे काम करतात. अग्निबाण आणि उपग्रह यांच्या बाबतीत मात्र उड्डाणानंतर कांहीसुध्दा करणे कोणालाही शक्य नसते. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्ट नेमकी आणि अचूकच असावी लागते. एकादा बोल्ट कच्चा किंवा ढिला राहिला तरी काम भागावे म्हणून चाराऐवजी ते सहा करता येत नाहीत किंवा त्यांची जाडी वा लांबी वाढवता येत नाही आणि चारातला एक बोल्ट जरी निघाला तरी त्या यंत्राचा कारभार आटोपलाच. अशा प्रकारे चूक होण्याचे मार्जिन दोन्ही बाजूंनी नसते.

या कारणामुळे दुस-या कोणत्याही व्यवसायात आढळणार नाही इतकी गुणवत्तेची काळजी या क्षेत्रात घ्यावी लागते. एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास हवेच्या तपमानातील बदलामुळे कोठल्याही पदार्थाचे जेवढे प्रसरण किंवा आकुंचन होते व त्यामुळे त्याच्या आकारमानात जो अत्यंत सूक्ष्म फरक पडतो तो सुध्दा पडू नये यासाठी कोणताही भाग बनवण्याचा अखेरचा टप्पा वातानुकूलित दालनात पूर्ण करतात. त्या दालनातल्या हवेतल्या धूलीकणांचे प्रमाण सतत मोजले जात असते. ते कमीत कमी ठेवण्यासाठी तिथली हवा सतत अनेक फिल्टर्समधून गाळली जात असते. एवढेच नव्हे, तिथल्या कामगारांना हॉस्पिटलातल्या सर्जनप्रमाणे हातात स्वच्छ मोजे घालून नाकातोंडावर पट्टी बांधावी लागते आणि ते सारखे बदलावे लागतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या कामासाठी लागणारे अगणित भाग स्वतःच्या किंवा कोठल्याही एकाच यंत्रशाळेत तयार करणे जगात कोणालाच शक्य नसते. ते काम निनिराळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विविध संस्थांकडूनच करून घ्यावे लागते. त्यासाठी बारकाईने सर्वेक्षण करून त्यांची निवड करण्यात येते. गुणवत्तेचे महत्व त्या ठिकाणच्या कामगारांच्या मनावर बिंबवावे लागते, तसेच पदोपदी अनेक किचकट चाचण्या घेऊन ती टिकवून ठेवावी लागते. “चलता है ” आणि “जाने दो यार” असे म्हणण्याची संवय असलेल्या भारतातल्या कामगारांकडून ही गुणवत्ता सांभाळून घेण्यासाठी जास्तच कसून प्रयत्न करावे लागतात.

डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्षसंशोधनाचा श्रीगणेशा झाला. वर दिलेली ही सर्व अवधाने सांभाळून आपल्या तंत्रज्ञांनी आपल्या देशातल्या कारखान्यांमध्ये रॉकेट्स बनवून घेतली, ती अधिकाधिक शक्तीशाली बनवत नेऊन रोहिणीसारख्या सक्षम अग्निबाणांची निर्मिती केली. ते उडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तळ (रॉकेट लाँचिंग स्टेशन्स) बांधले. अग्निबाणांबरोबर कोण कोणती उपकरणे अवकाशात पाठवायची ते ठरवून ती जागतिक बाजारपेठेमधून मिळवली किंवा मुद्दाम तयार करवून घेतली. उडवलेल्या रॉकेट्समधून मिळणारे संदेश ग्रहण करणे आणि त्यांचा सुसंगत अर्थ लावून व त्याचे विश्लेषण करून त्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली. ‘आर्यभट’पासून सुरुवात करून अनेक उपग्रह निर्माण केले आणि त्यांना अवकाशात स्थानापन्न केले. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी व त्यांच्या संदेशवहनासाठी सक्षम अशी यंत्रणा विकसित केली. या प्रगतीला आतापर्यंत पांच दशकाइतका वेळ लागला असला तरी हे काम करता आले हीच गोष्ट स्पृहणीय आहे आणि यात सारखी भर पडत आहे. पृथ्वीवरील वातावरणाचे निरीक्षण आणि दूरसंचार व्यवस्थेसाठी संदेशवहन अशी कामे यशस्वी झाल्यानंतर आता चंद्रयान पाठवून आपण पुढली पायरी गाठली आहे.
. . . . . . . . (क्रमशः)

<——- मागील भाग – उपग्रह          पुढील भाग – यशोगाथा (पूर्वार्ध) ———->

चन्द्रयानाच्या निमित्याने – उपग्रह

Chandrayan4

शेकडो वर्षांपासून रॉकेट्सचा उपयोग लढायांमध्ये करण्यात येत असला, त्यांच्या मा-याचा पल्ला दूरवर आणि जास्त भेदक असला तरीही त्यात अचूकपणा नसल्यामुळे त्यांचा उपयोग मर्यादित प्रमाणातच केला जायचा. दिवाळीतला आकाशबाण उडल्यानंतर तो नेमका कोणत्या दिशेने आणि किती उंच जाईल ते सांगता येत नाही, किंबहुना ते पाहण्यातच त्यातली मजा असते. त्याचप्रमाणे शत्रूसैन्याच्या दिशेने रॉकेट सोडले की ते त्याच्या आसपास कोठे तरी जाऊन कोसळायचे आणि जिथे पडेल तिथे भयानक विध्वंस व्हायचा. त्यामुळे शत्रूसैन्याचा नाश व्हायचा, त्यांचे हत्ती, घोडे, उंट वगैरे प्राणी उधळून इतस्ततः पळायचे, आसमानातून अकस्मातपणे अंगावर कोसळणा-या या संकटाला तोंड देणे अशक्य असल्यामुळे गांगरून जाऊन सैनिकांचे मनोधैर्य खच्ची व्हायचे. अशा प्रकाराने तिथे अनागोंदी माजल्यानंतर पारंपरिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेले सैनिक शत्रूवर हल्ला करायचे. दुस-या महायुध्दानंतर मात्र विज्ञान व तंत्रज्ञानात, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये विलक्षण वेगाने प्रगती झाली आणि रॉकेट्सची निर्मिती आणि त्यांचे नियंत्रण या क्षेत्रात कल्पनातीत घोडदौड झाली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अवकाशात सोडणे आणि त्याच्या सोबत पाठवलेल्या उपकरणांनी अवकाशातून पाठवलेले संदेश पृथ्वीवर ग्रहण करणे शक्य झाल्यानंतर ते किती उंच गेले हे समजणे शक्य झाले. तसेच पृथ्वीकडे दुरून पाहण्याची एक नवी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.

अंतराळात राहून आणि या दिव्यदृष्टीचा उपयोग करून घेऊन पृथ्वीवरील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दुस-या महायुध्दानंतरच्या काळात अमेरिका आणि रशिया या महासत्तांमध्ये जागतिक वर्चस्वासाठी चुरस लागली होती. १९५७ साली रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला मनुष्यनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. त्याच्या पाठोपाठ स्पुटनिक -२ या उपग्रहासोबत लायका नामक कुत्रीला अंतरिक्षात पाठवून दिले. तिची बिचारीची ती अखेरचीच यात्रा होती. अमेरिकेनेही थोड्याच दिवसांनी म्हणजे १९५८ साली एक्स्प्लोअरर -१ आणि व्हँगार्ड-१ हे उपग्रह एका पाठोपाठ सोडले. त्यानंतर इतर देशांनी आपापले उपग्रह सोडणे सुरू केले आणि ते वाढतच चालले आहे. आज सुमारे चाळीस देशांनी पाठवलेले तीन हजारावर कृत्रिम उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमधून पृथ्वीची प्रदक्षिणा करीत आहेत. (ही चार वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. आता ही संख्या निश्चितच आणखी वाढली आहे.)

या कार्यक्रमाची सुरुवात सरकारी प्रयोगशाळांनी केली होती आणि त्यांनी पाठवलेल्या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग मुख्यतः संरक्षण, हवामान, भूसर्वेक्षण आदि सरकारी विभागांनाच होत असे. संदेशवहनाचा उपयोग दूरचित्रवाणी, दूरध्वनी, आंतर्जाल वगैरे माध्यमातून आम जनतेसाठी होऊ लागल्यानंतर त्या कामासाठी अनेक निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या संस्था पुढे आल्या किंवा निर्माण झाल्या. त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारांचे उपग्रह तयार करणे आणि त्यांना अंतराळात नेऊन सोडणे हे काम व्यावसायिक तत्वावर होऊ लागले. त्यामुळे आज चाळीस देशांचे उपग्रह अवकाशात असले तरी त्यांची संरचना, आरेखन, निर्माण, उड्डाण वगैरे करण्यात स्वयंपूर्ण असलेले देश कमीच आहेत. त्यांत भारताचा समावेश होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल कोणाच्या मनात शंका असलीच तर चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाने ती दूर केली आहे. “रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा ” असे प्रेमिकांना वाटत असले आणि रोज दिसणारा चंद्र खरोखरच अल्पशा फरकाने नवा असला तरी तो एकासारखा एकच आहे. हे सर्व कृत्रिम उपग्रह मात्र एकमेकाहून वेगळे असतात. त्यांच्या उद्दिष्टानुसार त्यांची निरनिराळ्या प्रकारांनी वर्गवारी करण्यात आली आहे. बहुतांश उपग्रह मनुष्यविरहित असतात. त्यात उपकरणे आणि यंत्रे मांडून ठेवण्यासाठी पॅनेल्स आणि त्यांना धरून ठेवणारा एक सांगाडा एवढ्या गोष्टी पुरेशा असतात. त्यात फक्त स्वयंचलित सामुग्री ठेवता येते.

मानवचलित उपग्रहांमध्ये बसलेले अंतराळवीर त्यातल्या कांही उपकरणांचा वापर करून अधिक माहिती मिळवू शकतात, तिचे संकलन करू शकतात. अशा उपग्रहामध्ये त्यांच्यासाठी केबिन असावी लागते त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी खास प्रकारची खाद्ये व पेये न्यावी लागतात. त्यांना एक अगदी वेगळ्या प्रकारचा सूट अंगावर धारण करावा लागतो आणि तो एकदा अंगावर चढवला की पृथ्वीवर परत येऊन सुखरूप पोहोचेपर्यंत अंगातून काढतासुध्दा येत नाही.

हे उपग्रह वेगवेगळ्या आकारांच्या कक्षांमधून पृथ्वीभोवती घिरट्या घालतात. कांही वर्तुळाकार असतात, कांही थोड्या लंबगोलाकार असतात, तर कांही खूप मोठ्या अंड्याच्या आकारात असतात. कांही उपग्रह पृथ्वीपासून २५० किलोमीटर इतकेच दूर राहून फिरतात, तर कांही तीस बत्तीस हजार कि.मी.पेक्षा दूर जातात. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि उपग्रहाचा वेग यांमध्ये समतोल राखून हे अंतर राखले जाते. यातील पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अबाधित असते, पण उपग्रहाचा वेग कांही कारणांमुळे कमी होऊ शकतो. अत्यंत विरळ हवेतले कांही तुरळक अणु परमाणु त्याला धडकत असतात, तसेच सूर्याचे प्रकाशकिरण सुध्दा त्यात शोषले जातांना किंवा त्याच्यावरून परावर्तित होतांना त्याला अत्यल्प असा धक्का देतात हे आपल्याला खरेसुध्दा वाटणार नाही. अशा कारणाने त्याची गति किंचित जरी मंदावली तरी तो पृथ्वीकडे ओढला जातो, पृथ्वीच्या जवळ येताच वातावरणाशी घर्षण होऊन तो तापत जातो आणि नष्ट होतो.

उपग्रहाला पृथ्वीपासून दूर असलेल्या कक्षेत पाठवण्यासाठी अधिक शक्तीशाली अग्निबाणांची आवश्यकता असते आणि लहान कक्षेत पाठवणे तुलनेने सोपे असते. पृथ्वीपासून दूर असलेले उपग्रह जवळच्या उपग्रहाच्या मानाने कमी अंशात्मक वेगाने तिच्याभोवती फिरतात. एकाद्या मोठ्या गोलाच्या जवळ जाऊन पाहिल्यास त्याचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा दूर जाऊन पाहिल्यास त्याचा जास्त भाग दिसतो. त्याचप्रमाणे पृथ्वीपीसून दूर असलेल्या कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या मोठ्या भूभागाशी संपर्क करू शकतात. अशा सर्व बाजूने विचार करून उपग्रहाला कोणत्या कक्षेत ठेवायचे हे ठरवले जाते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यावर लगेच तो बरोबर आपल्या ठरलेल्या कक्षेत जाऊन स्थिरावू शकत नाही. त्याला आपल्या कक्षेत राहण्यासाठी नेमक्या आवश्यक तितक्याच वेगाने भ्रमण करणे गरजेचे असते. यासाठी लागणारी वेगातली थोडीसी दुरुस्ती करण्यासाठी उपग्रहाबरोबर थ्रस्टर रॉकेट जोडलेले असतात.

बाहेरच्या विश्वाचे निरीक्षण करण्यासाठी हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण अशीच पृथ्वीच्या जवळ म्हणजे सुमारे ६०० कि.मी. अंतरावर ठेवली आहे. ती आपली पृथ्वीप्रदक्षिणा ९७ मिनिटात पूर्ण करते. संदेशवहनासाठी उपयोगात येणारे उपग्रह विषुववृत्ताच्या बरोबर वर सुमारे छत्तीस हजार कि.मी. अंतरावरून पृथ्वीच्या अक्षासभोवती पृथ्वीइतक्याच वेगाने फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहता ते एकाच जागी स्थिर असल्यासारखे दिसतात. ते कधीही उगवत नाहीत की मावळत नाहीत. त्यामुळे एका जागी स्थिर असलेल्या पृथ्वीवरील अँटेनावरून त्या उपग्रहांबरोबर संदेशांची सतत देवाण घेवाण करता येते. या उपग्रहांनी दिवसातून एकच प्रदक्षिणा करणे आवश्यक असल्यामुळे यासाठी असे उपग्रह सर्वात दूर ठेवावे लागतात. जवळ आणि दूर यांच्या मध्यावर सुमारे वीस हजार कि.मी. अंतरावरील कक्षांमध्ये फिरणारे उपग्रह दर बारा तासात एक प्रदक्षिणा घालतात. अशा उपग्रहांचा उपयोग नेव्हिगेशनसाठी प्रामुख्याने होतो. याशिवाय सनसिन्क्रॉनस नांवाचा एक चौथा प्रकार आहे. हे उपग्रह उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. ते पृथ्वीच्या जवळून इतक्या वेगाने फिरतात की विषुववृत्तावरून निघून एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा विषुववृत्तावर येतील तेंव्हा त्या जागी स्थानिक वेळेनुसार नेमके तेवढेच वाजलेले असतात. हे उपग्रह उत्तरदक्षिण फिरतात तेंव्हाच पृथ्वी पूर्वपश्चिम फिरत असते त्यामुळे पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग त्यांच्या नजरेखालून जात असतो. वातावरणाच्या अभ्यासासाठी अशा उपग्रहांचा वापर केला जातो. याशिवाय इतर उपग्रहांचेच निरीक्षण करण्याचे काम कांही उपग्रह करतात तर कांही उपग्रह राष्ट्रीय संरक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करतात. असे उपग्रह सर्वच प्रकारच्या कक्षांमध्ये असतात.

<——— मागील भाग – अंतरिक्षात भ्रमण                        पुढील भाग – उड्डाणाची पूर्वतयारी

चन्द्रयानाच्या निमित्याने – अंतरिक्षात भ्रमण

Chandrayan3

सर आयझॅक न्यूटन यांनी ज्या काळात गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला तेंव्हा आगगाडीचे इंजिनसुध्दा अस्तित्वात आलेले नव्हते. जमीनीवर चालणारे कोठलेही स्वयंप्रेरित वाहन उपलब्ध नसतांना आभाळात उडणारे वाहन कोठून येणार ? त्यामुळे एस्केप व्हेलॉसिटीसाठी गणित मांडतांना त्या वस्तूला आकाशात गेल्यानंतर कोठलीही बाह्य प्रेरणा मिळणार नाही हे गृहीत धरले होते. त्याचप्रमाणे त्याला वाटेत होणा-या कसल्याही अडथळ्याचा विचार केलेला नव्हता. ही सगळीच बौध्दिक कसरत असल्यामुळे त्यासाठी त्यांचा विचार करण्याची एवढी गरज नव्हती. जमीनीवरून एकाद्या वस्तूला एक जोराचा फटका देऊन दर सेकंदाला ११२०१ मीटर इतक्या वेगाने आभाळात उडवून दिले की तो कायमचा तिकडचा झाला. तो कांही पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नव्हती. एवढाच निष्कर्ष त्यातून काढला गेला होता. तात्विक चर्चा करीत असतांना कांही गोष्टी आपल्याला ठाऊक असतात तशा कांही नसतात, कांही काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या जातात, तर कांही अस्तित्वात असलेल्या अनिश्चित बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. तरीही या विश्लेषणातून कांही चांगले नवे मुद्दे निघतात. यातूनच प्रगती होत असते. पण प्रत्यक्ष प्रयोग करायच्या वेळेस अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा मुळीसुध्दा आधार मिळत नाही, तसेच त्यातल्या अडचणींवर मात केल्याखेरीज तो प्रयोग सफल होत नाही. त्यामुळे प्रत्येक संबंधित गोष्टीचा सखोल विचार करावाच लागतो. यामुळेच विज्ञानाच्या अभ्यासात प्रत्यक्ष प्रयोगांना अनन्यसाधारण महत्व दिले जाते.

गेल्या शतकात जेंव्हा विमाने आकाशात उडू लागली आणि त्यापलीकडे पोचणारी रॉकेट्स उडवण्याचे प्रयोग सुरू झाले तेंव्हा त्या संदर्भातल्या इतर बाबी लक्षात घेणे आवश्यकच होते. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवेचा विरोध. साधा वाळ्याचा पंखा जरी आपण खूप जोराने फिरवावा असे म्हंटले तरी त्यासाठी मनगटाने जोर लावावा लागतो. डोळ्यांना जरी हवा दिसत नसली तरी तिचे अस्तित्व यावेळी आपल्याला जाणवते. दर तासाला वीस पंचवीस किलोमीटर या वेगाने वारा आला तर आपले कपडे फडफडायला लागतात, डोक्यावरची टोपी उडते, एका जागी ताठ उभे राहणे आपल्याला कठीण होते. ताशी शंभर दीडशे किलोमीटर वेगाच्या वादळात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. सेकंदाला अकरा कि.मी. म्हणजे तासाला चाळीस हजार कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने एकादी वस्तू हवेतून जायला लागली तर त्याला हवेकडून केवढा विरोध होईल याची कल्पना यावरून येईल. या विरोधामुळे त्या वस्तूची गती कमी होणारच. या विरोधाचे परिणाम गुरुत्वाकर्षणाच्या परिणामापेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. ती गतीमान वस्तू खालीवर , पूर्वपश्चिम, उत्तर दक्षिण अशा कोठल्याही दिशेने जात असली तरी पृथ्वी तिला फक्त खालच्या दिशेनेच ओढते. त्यामुळे वर जाणा-या वस्तूचा वेग कमी होत होत शून्यापर्यंत पोचतो आणि खाली पडतांना त्याचा वेग वाढत जातो. हवेचा विरोध मात्र त्याच्या गतीला असतो, त्याची जी कांही गती असेल ती या विरोधामुळे नेहमी कमीच होत जाते.

दुसरी गोष्ट अशी आहे की गती कमी झाली तर विरोधही कमी होतो, त्यामुळे हवेच्या विरोधामुळे ती वस्तू पूर्णपणे न थांबता पुढे जातच राहते. तिने मागे वळायचा तर प्रश्नच नाही. हवेच्या या प्रकारच्या घर्षणामुळे सुध्दा त्यातून ऊष्णता निर्माण होते आणि त्या वस्तूचे तापमान वाढत जाते. तापवल्यानंतर लोखंडसुध्दा मऊ होते, वितळते आणि जळून त्याचे भस्म होऊ शकते. अतिशय वेगाने पृथ्वीवर पडणा-या बहुतेक उल्का याच कारणाने हवेतच जळून नष्ट होतात आणि जमीनीपर्यंत पोचतच नाहीत. त्याचप्रमाणे अतीशय वेगवान अग्निबाण वातावरणातून बाहेर निघण्यापूर्वीच जळून नष्ट होण्याचा धोका असतो.

कोठलीही स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मोटार स्टार्ट केली की लगेच टॉप स्पीड पकडत नाही किंवा पंख्याचे बटन दाबताच लगेच तो फुल स्पीड घेत नाही. त्याचप्रमाणे रॉकेट जमीनीवरून हवेत उडाल्यानंतर पूर्ण वेग घेण्यासाठी कमीत कमी कांही क्षण जातीलच. त्या अवधीत गुरुत्वाकर्षण आणि हवेच्या अवरोधाने त्याची गती कमी होणार. ती घट भरून काढणे आवश्यक आहे.

एस्केप व्हेलॉसिटीएवढ्या वेगाने निघालेले रॉकेट पृथ्वीवर परत येणार नाही हे खरे असले तरी अंतराळात त्याची गती कमी कमी होतच असते. त्यामुळे चंद्रापर्यंत पोहोचायला त्याला खूप वेळ लागेल आणि आपल्याला तर त्याने शक्य तितक्या लवकर पोहोचायला हवे असते. शिवाय चंद्राजवळ पोहोचेपर्यंत त्याची गती अगदी कमी झाली असेल तर ते चंद्राकडे खेचले जाऊन धाडदिशी त्यावर आदळेल. हे होऊ नये म्हणून रॉकेटने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या तावडीत न सापडता ते चंद्राभोवती फिरत राहील अशी योजना करतात. त्यासाठी आधीपासूनच त्या रॉकेटने पुरेसे वेगवान असणे आवश्यक आहे. तो मिळवण्याच्या दृष्टीने त्याला पृथ्वीवरून निघतांना एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त वेग देणे आवश्यक ठरते.

याशिवाय आपली पृथ्वी स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत असते त्याबरोबर ते रॉकेटसुध्दा उडण्यापूर्वीही तितक्याच वेगाने पृथ्वीच्या मध्यबिंदूच्या भोवती फिरत असतेच. ज्या दिशेने ते आकाशात उडणार असेल त्यानुसार या वेगाचा परिणाम त्याच्या अवकाशातल्या प्रवासावर होतो. त्याहूनही अधिक वेगाने पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते याचे कारण सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. चंद्रसुध्दा पृथ्वीच्या बरोबर सूर्याभोंवती फिरतच असतो. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कचाट्यातून बाहेर पडल्यानंतर सुध्दा ते रॉकेट पृथ्वीबरोबर तसेच चंद्राच्या बरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतच राहते. चंद्रसुध्दा समान वेगाने फिरत असल्यामुळे रॉकेटला चंद्रापर्यंत जाण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, पण मंगळाकडे जायचे असल्यास सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून पुढे जावे लागते. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती भ्रमण हे वेगवेगळ्या पातळ्यां(प्लेन्स)मध्ये होत असल्याकारणाने या दोन्ही गतींचा एक संयुक्त परिणाम रॉकेटच्या गती आणि दिशेवर होत असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करावी लागते. अशा प्रकारचे यान बनवणे अत्यंत कठीण तसेच खर्चिक असते आणि त्यापासून दृष्य असा कोणताच फायदा लगेच मिळत नाही. म्हणूनच सारे देश त्या भानगडीत पडत नाहीत.

वर दिलेल्या अनेक कारणांमुळे चंद्राकडे पाठवायच्या रॉकेटचा वेग एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा बराच जास्त असावा लागतो. हवेच्या प्रखर विरोधामुळे निदान आज तरी ते अशक्य आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हवेचा विरोध कमी करण्यासाठी रॉकेटला त्याचा विशिष्ट आकार दिला जातो. पाण्यात पोहणा-या माशांना आणि हवेत उडणा-या पक्षांना निसर्गाने जो आकार दिला आहे, तशाच प्रकाराने फक्त समोर टोकदार आणि त्याच्या मागे गोलाकार असा हा आकार असतो. घर्षण कमी करण्यासाठी रॉकेटचा पृष्ठभाग शक्य तितका गुळगुळीत केला जातो. त्याला कोठेही कडा नसतात. उच्च तापमानावरसुध्दा कणखर राहतील अशा खास मिश्रधातूंचे कवच या अग्निबाणांना सर्व बाजूंनी दिलेले असते. कोठलेही टोकदार भाग या कवचाच्या बाहेर आलेले दिसत नाहीत.

अशी शक्य असेल तितकी सर्व खबरदारी घेतल्यानंतर देखील पृथ्वीवरून उड्डाण घेऊन ते रॉकेट थेट तिच्या कक्षेच्या बाहेर जात नाही. अशा रॉकेटमध्ये दोन किंवा अधिक टप्पे (स्टेजेस) असतात. त्याचप्रमाणे पुढील कामे करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे ठेवलेले एक यान असते, तसेच अनेक छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने त्याला जोडलेली असतात. जमीनीवरून उडतांना त्यातल्या पहिल्या स्टेजमधलासुध्दा सगळा जोर क्षणार्धात न लावता तो कांही कालावधीमध्ये सतत लावला जातो. त्यातून बाहेर पडणारा ऊष्ण वायूचा झोत त्याची गती वाढवत नेत त्याला पृथ्वीपासून दोनशे ते हजार कि.मी. इतक्या उंचीवर नेतो. तोपर्यंत पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा भाग गळून पडतो. त्यामुळे त्या रॉकेटचे वजन खूप कमी होते, तसेच हवा अत्यंत विरळ झालेली असल्यामुळे तिचा विरोध जवळ जवळ मावळलेला असतो. या उंचीवर हे रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करीत राहते. त्याने धारण केलेली ही पृथ्वीच्या उपग्रहाची अवस्था चांगली स्थिरस्थावर होईपर्यंत वाट पाहून योग्य त्या क्षणी त्याची दुसरी स्टेज कार्यान्वित केली जाते. त्यानंतर तिसरी, चौथी अशा टप्प्यांमधून मिळालेल्या ऊर्जेने ते एस्केप व्हेलॉसिटीहून अधिक वेगाने पृथ्वीपासून दूर जात राहते. चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर त्याला योग्य दिशा देऊन चंद्राभोवती फिरू दिले जाते आणि हळू हळू चंद्रापासून विशिष्ट उंचीवरील कक्षेत राहून विशिष्ट वेगाने त्याचे भ्रमण सुरू राहते. यानाचे हे भ्रमण स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यातून राष्ट्रध्वज, दुसरे एकादे प्रतीक, वैज्ञानिक उपकरणे, यासारख्या हव्या त्या वस्तू ठेवून एक छोटे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाते. हे सारे नियंत्रण छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने यांच्या सहाय्याने केले जाते.

ज्या यानामधून माणूस पाठवला जातो त्या यानाला परत आणून सुरक्षितपणे पृथ्वीवर पोचवण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच त्याला जगण्यासाठी लागणारे अन्न, पाणी, हवा वगैरेचा पुरवठा बरोबर न्यावा लागतो. त्या यानाचे अंतर्गत तपमान, हवेचा दाब वगैरे गोष्टी त्या मानवाच्या शरीराला मानवतील इतपत राखाव्या लागतात. हे जास्तीचे काम अधिकच गुंतागुंतीचे असते. मनुष्यहीन यानाचे सर्व नियंत्रण तर इथे राहून करायचे असतेच, सोबत अंतराळवीर गेलेला असला तरी तो कांही मोटार किंवा रेल्वेत असतो तसला इंजिन ड्रायव्हर नसतो, त्या यानाचेसुध्दा जवळ जवळ सर्व नियंत्रण दूरसंचार यंत्रणेने पृथ्वीवरील नियंत्रणकेंद्रातूनच करावे लागते. यासाठी जगाच्या पाठीवर निरनिराळ्या ठिकाणी निरीक्षण केंद्रे आणि संदेशवहनाची केंद्रे स्थापन करावी लागतात. त्याशिवाय त्या अंतराळवीराला सुरक्षितपणे त्यात राहण्याची सर्व तरतूद करावी लागते. इतके हे काम कठीण, गुंतागुंतीचे आणि खर्चिक असते.
. . . . . . .. .. . . . . . . (क्रमशः)

 

<———- मागील भाग – विमान आणि अग्निबाण                    पुढील भाग – उपग्रह ————>

चन्द्रयानाच्या निमित्याने – विमान आणि अग्निबाण

Chandrayan2

पक्षी आणि फुलपाखरे यांना उडतांना पाहून आकाशात विहार करण्याची ऊर्मी माणसाच्या मनात खूप पूर्वीपासून उठत आली आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले होते. त्यात यश येऊन अनेक प्रकारची विमाने आणि अग्निबाण यांच्या सहाय्याने तो आकाशातच नव्हे तर अंतराळात देखील भ्रमण करू लागला आहे. विमाने आणि अग्निबाण ही दोन्ही साधने जमीनीवरून आकाशात झेप घेतांना दिसतात, पण विमानातून चंद्रावर जाता येईल कां? किंवा अग्निबाणाच्या सहाय्याने मुंबईहून दिल्लीला जाता येईल कां? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील. त्याची कारणे मात्र निरनिराळी आहेत. विमाने वातावरणाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत त्यामुळे ती चंद्राची यात्रा कधीच करू शकणार नाहीत. एकदा उडवलेला अग्निबाण जळून नष्ट होऊन जातो त्यामुळे तो जमीनीवर उतरण्याचा प्रश्नच नसतो. तरीही त्याबरोबर अवकाशात पाठवलेले यान मात्र सुरक्षितपणे परत आणून पृथ्वीतलावर उतरवण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. त्यासाठी अनेक अग्निबाणांचा उपयोग केला जातो. हे खरे असले तरी आकाशात उडणारे विमान जसे बरोबर विमानतळावरच्या धांवपट्टीवर खाली उतरवतां येते तसे अंतराळातून परतणारे यान नेमक्या जागेवर उतरवण्याची तयारी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गांवोगांवी जसे विमानतळ बांधले गेले आहेत त्यासारखे अग्निबाण उतरवण्याचे तळ झालेले नाहीत. अग्निबाणासोबत उडवलेले क्षेपणास्त्र नेमके शत्रूपक्षाच्या गोटावर टाकून त्याचा विध्वंस करण्यापर्यंत यात प्रगती झाली आहे, पण मुंबईहून दिल्लीला जाऊन तिथे सुरक्षितपणे उतरण्याइतपत त्याचा विकास अजून व्हायचा आहे.

विमान आणि अग्निबाण यातला मुख्य फरक आता थोडक्यात पाहू. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांची फडफड करून हवेला खाली आणि मागे लोटतात आणि स्वतः पुढे जातात, तसेच समोरच्या हवेला मागे ढकलून विमान पुढे जाते. सुरुवातीच्या काळात हे काम त्याला जोडलेल्या प्रोपेलर नावाच्या अजस्त्र पंख्यांद्वारे होत असे, आजकाल बहुतेक विमाने जेट इंजिनावर चालतात (उडतात). हॅलिकॉप्टर मात्र अजूनही पंख्यांच्याच तत्वावर उडतात. कागदी बाण किंवा फ्रिसबीची डिस्क यासारखी एकादी गोष्ट हवेतून वेगाने भिरकावली की हवाच तिला उचलून धरते हे आपण पाहतोच. अशाच प्रकारे अतिशय वेगाने पुढे जाणा-या विमानाचे हवेद्वारा उध्दरण होते. आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.
१. प्रोपेलर – यात इंधनतेलाच्या ज्वलनावर चालणा-या इंजिनाला जोडलेली मोठमोठी पाती पंख्याप्रमाणे वेगाने फिरत हवेला मागे ढकलून विमानाला पुढे जाण्यासाठी गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
२. जेट – यातील इंधनाच्या इंजिनात होणार्‍या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब आधीच वाढवला जातो. इंजिनाच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे तो दाब आणखी वाढतो. या तप्त व प्रचंड दाब असलेल्या हवेला अरुंद वाटेने (नॉझल्समधून) मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. त्यातून अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान वेगाने पुढे जाते.
३. रॉकेट इंजिन – यातसुध्दा ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच विमान पुढे जाते. मात्र यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानाबरोबर नेला जातो. त्यासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेण्यात येत नाही. ही विमाने जमीनीपासून खूप वर असलेल्या अत्यंत विरळ हवेत उडू शकतात. त्याच्या पुढे जाण्यास हवेचा विरोध कमी होतो. वजनाच्या तुलनेत या प्रकारची इंजिने सर्वात अधिक शक्तीशाली असतात. अतीवेगवान अशा लढाऊ विमानांत अशा प्रकारच्या इंजिनांचा उपयोग करतात.
वरील तीन्ही प्रकारात विमानांच्या उध्दरणासाठी किंवा हवेत तरंगण्यासाठी मात्र वातावरणाची आवश्यकता असतेच असते. त्यामुळे ती अवकाशातल्या निर्वात पोकळीत उडू शकत नाहीत. विमानाला उचलून धरण्यासाठी पुरेसा इतका हवेचा दाट थर पृथ्वीसभोवती फारसा दूरवर नाही. त्यामुळे विमान जेवढे उंच जाऊन उडू शकते तेवढ्या अंतरामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात विशेष फरक पडत नाही.

रॉकेट म्हणजेच अग्निबाण यांचा इतिहास विमानांपेक्षा खूपच जुना आहे. कित्येक शतकांपासून ती बनवली जात आहेत. चिनी लोकांनी सर्वात आधी स्फोटकांचा शोध लावला आणि त्यांचा उपयोग रॉकेट्स मध्ये केला असे मानले जाते. अलीकडच्या इतिहासात अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दात त्यांचा वापर केला गेला आणि आपल्या भारतात टिपू सुलतानाने त्याचे तंत्र विकसित केले असल्याची नोंद आहे. दिवाळीतल्या फटाक्यातले बाण हे रॉकेटचेच छोटे रूप असते. त्यात भरलेल्या दारूमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने यांचे मिश्रण असते. बाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे क्षणार्धात ज्वलन होऊन त्यातून खूपसे वायुरूप पदार्थ तयार होतात. बाणाच्या छोट्याशा पण भक्कम नळकांडीमध्ये ते कोंडले गेल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो. जळलेल्या वातीतून निर्माण झालेल्या वाटेने या वायूंचा झोत खालच्या दिशेने वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या बाणाला विरुध्द दिशेने म्हणजेच वरच्या दिशेला फेकण्यात होते. बाणाला जोडलेल्या काडीमुळे त्याला एक विशिष्ट दिशा मिळते आणि त्या दिशेने तो वर उडतो आणि हवेत झेपावतो. साध्या फटाक्यामध्ये या वायूला बाहेर पडायला वाट न मिळाल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो आणि कवचाच्या चिंध्या उडवून तो बाहेर पडतो. त्याचा मोठा धमाका होतो. आजकाल मिळणा-या बाणांची रचना विशिष्ट प्रकाराने केलेली असते. त्यात अनेक कप्पे असतात. सर्वात खाली ठेवलेला बाण उंच उडतो. आकाशात गेल्यानंतर इतर कप्प्यातील स्फोटकांचा स्फोट होतो आणि त्यात ठेवलेली रंगीत भुकटी पेट घेऊन सगळ्या बाजूंना पसरते. यामुळे आकाशातून रंगीत ठिणग्यांची फुले पडत असल्याचे मनोहर दृष्य आपल्याला दिसते तसेच स्फोटाचा धमाका ऐकू येतो.

याच तत्वावर तयार करण्यात आलेल्या पण कित्येक पटीने मोठ्या आकाराच्या प्रचंड शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग क्षेपणास्त्रांच्या रूपाने युध्दात करण्यात येतो. तोफेच्या पल्ल्याच्या पलीकडे असलेल्या लक्ष्यावर तोफेपेक्षा जास्त अचूक आणि तोफेच्या गोळ्याच्या अनेकपट विध्वंसक असा मारा या अस्त्राद्वारे करता येत असल्यामुळे त्यांचा कल्पनातीत इतका विकास गेल्या शतकात झाला आहे. पण हा एक स्वतंत्र विषय आहे.  अशा रॉकेट्सपेक्षाही अनेक पटीने शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग अवकाशात झेप घेण्यासाठी केला जातो.

बिनतारी संदेशवहनावर प्रभुत्व मिळवल्यानंतर वातावरणाच्या अभ्यासासाठी या नव्या संदेशवहनाचा अधिकाधिक उपयोग करायला सुरुवात झाली. विमानांच्या उड्डाणाचा वातावरणाबरोबर प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे विमानात ठेवली जातच, त्याशिवाय हलक्या वायूने भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने कांही उपकरणे विरळ होत जाणा-या वातावरणाच्या वरच्या भागात पाठवली जाऊ लागली. अग्निबाणांचा उपयोग करून त्याहून अधिक उंची गाठता येते हे पाहून त्या दिशेने प्रयोग सुरू झाले. त्यातून अधिकाधिक उंच जाण्याचीच स्पर्धा सुरू झाली. या रॉकेट्सचे अवशेष खाली येऊन पडतात, पण जेंव्हा एस्केप व्हेलॉसिटी इतक्या वेगाने त्याचे प्रक्षेपण झाले तेंव्हा जो अग्निबाण उडाला तो पृथ्वीवर परत आलाच नाही.
. . . . . . . . . . . .. . . . . . . .(क्रमशः)

<———- मागील भाग – गुरुत्वाकर्षण                  पुढील भाग – अंतरिक्षात भ्रमण ———>

चन्द्रयानाच्या निमित्याने – गुरुत्वाकर्षण

Chandrayan1

भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या वाचल्यानंतर त्यातून जेवढे आकलन झाले असेल त्यापेक्षा जास्त कुतूहल अनेक लोकांच्या मनात निर्माण झाले असावे असा माझा अंदाज आहे. आपला अनुभव, आपले ज्ञान आणि विचारशक्ती यांच्या संदर्भातच आपण कोठल्याही गोष्टीचा अर्थ लावत असतो. मी लहान असतांना आमच्या खेडेगांवातल्या लोकांनी कधीही जवळून विमान पाहिलेले नव्हते. आभाळात ढगांच्याही पलीकडे विमानाचा एक हलणारा ठिपका तेवढा दिसत असे. चिमण्या जशा आपले पंख फडफडावत उडतात तसेच हे विमान आपल्या अजस्त्र यांत्रिक पंखांचा उपयोग करून म्हणजे त्यांना खाली वर करून आकाशात उडत असावे अशी माझी समजूत होती. त्याच काळात मुंबईत राहणा-या सर्वसामान्य लोकांनी विमानतळावरून विमाने उडतांना आणि खाली उतरतांना पाहिली होती, त्यामुळे त्यांचे पंख नेहमी पसरलेलेच दिसतात हे त्यांच्या लक्षात आले असणार. मात्र त्या काळात विमानाचा प्रवास करणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी विमानाचे उड्डाण त्याच्या आत बसून कधी पाहिले नव्हते. बसमधल्या ड्रायव्हरप्रमाणेच विमान चालवणारा पायलट त्याच्या अगदी समोरच्या भागात बसलेला असतो, त्याच्या पायापाशीच त्या विमानाचे इंजिन असेल असे अनेकांना वाटायचे. विमानाची इंजिने त्याच्या पंखाखाली असतात ही गोष्ट फक्त विमानातून प्रवास करणारे, विज्ञान व तंत्रज्ञानात रुची असलेले आणि विलक्षण निरीक्षणशक्ती असलेले एवढ्या लोकांनाच बहुधा माहीत असायची. विमान उड्डाणाच्या वेळी जमीनीवरून धांवता धांवता थोडे तिरपे होऊन आकाशात उडते त्याऐवजी चंद्रावर जाणारे रॉकेट जमीनीवरून सरळ वरच्या दिशेने आभाळात उडतांना दिसते आणि ते सरळ पुढे पुढे जात थेट चंद्रावर जाऊन उतरत असेल असे कोणाला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. पण अमेरिका आणि रशिया यांनी जी गोष्ट चाळीस वर्षांपूर्वी केली होती ती करायला आपल्याला इतकी वर्षे कां लागली आणि इतक्या उशीराने करून देखील पूर्ण जगात आपला पांचवा नंबर लागला आहे याचा अर्थ इतर विकसित देशांनासुध्दा ते अजून कां जमलेले नाही हे प्रश्न सुध्दा मनात येत असतील. त्यांची सोप्या भाषेत उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

हा विषय समजण्यासाठी गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या आपल्या भौतिक शास्त्राच्या (फिजिक्सच्या) मूलभूत ज्ञानाची थोडी उजळणी करून घेऊ. सर्व प्रकारच्या प्रवासांचा वेगवेगळ्या प्रकाराने गुरुत्वाकर्षणाशी अत्यंत निकटचा संबंध असतो. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्याला वजन प्राप्त होते, भुईला भारभूत झाल्यामुळे आपण जमीनीवर उभे राहू शकतो आणि पायाने तिला मागे रेटा देऊन पाऊल पुढे टाकतो, चालतो किंवा धांवतो. पाय घसरून किंवा ठेच लागून खाली आपटतो ते सुध्दा गुरुत्वाकर्षणामुळेच. चढ चढतांना आपली दमछाक होते आणि उतारावरून आपण सहजपणे उतरू शकतो याचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हेच आहे. सर्वसामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रीय सिध्दांत माहीत नसला तरी त्याचे हे परिणाम त्याच्या ओळखीचे असतात. जेंव्हा एका इंजिनियरला प्रवासाच्या साधनांचा अभ्यास करायचा असतो तेंव्हा मात्र गुरुत्वाकर्षणाच्या नियमांकडे त्याला सर्वात प्रथम लक्ष द्यावे लागते. सायकल, मोटार किंवा बैलगाडीची चाके गुरुत्वाकर्षणामुळेच रस्त्याला टेकलेली असतात व त्यांच्या जमीनीला चिकटून फिरण्यामुळे ते वाहन पुढे जाते. कोणत्या वाहनातून किती भार आणि किती वेगाने वाहून न्यायचा आहे याचा विचार करून त्या वाहनाची रचना केली जाते व त्यानुसार रस्ते बांधले जातात. त्यात गफलत झाल्यामुळे रस्ता खचला किंवा पूल कोसळला तर ती घटना गुरुत्वाकर्षणामुळेच घडते. आगगाडीच्या इंजिनाची चाके रुळावरून गडगडण्याऐवजी घसरू नयेत यासाठी मुद्दाम इंजिनाचे वजन वाढवावे लागते. पाण्यावर जहाजाचे तरंगणे किंवा त्याचे त्यात बुडणे या दोन्ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच घडतात. गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर मात करून विमानाला हवेत उडावे लागते, तसेच त्याला विरोध करीत सतत हवेत तरंगत राहण्यासाठी आवश्यक इतका हवेचा दाब यंत्राद्वारे निर्माण करावा लागतो. पृथ्वीवरून चंद्रावर जायचे असल्यास पृथ्वीच्याच नव्हे तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचासुध्दा विचार करावा लागतो. यामुळे लेखाच्या या भागात आपण गुरुत्वाकर्षणाचे मूलभूत स्वरूप पाहणार आहोत.

झाडावरून सुटलेले फळ खाली पडते, तसेच त्याला जमीनीवरून मारलेला दगडदेखील खाली पडतो, ढगात निर्माण झालेले पाण्याचे थेंब पाऊस पडतांना खाली येतात, त्याहून उंच आकाशात उडत असलेल्या विमानातून उडी मारल्यानंतर पॅराट्रूपर खाली येत जातो या सगळ्यांचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे आहे. त्यांच्याही पलीकडे असलेला चंद्र मात्र त्याच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीला फक्त प्रदक्षिणाच कां घालत राहतो? तो जमीनीवर येऊन पडत कां नाही? या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे? याचा विचार करावा लागेल.

झाडावरून सुटलेले फळ, ढगातले पाण्याचे थेंब आणि पॅराट्रूपर यांना वर उचलून नेणारा वेग नसतो. पण त्यांना पृथ्वी आपल्याकडे ओढत असल्यामुळे ते सरळ तिच्या जवळ येत येत जमीनीवर येऊन पडतात. पण वरच्या दिशेने फेकलेल्या दगडाला आपण एक वेग दिलेला असतो. त्यामुळे तो आधी वरच्या दिशेने जातो, गुरुत्वाकर्षणामुळे वर जाण्याचा त्याचा वेग कमी होत जातो, तरीही त्याचा वेग शून्यावर येईपर्यंत तो दगड वरच जात राहतो. जेंव्हा त्याचा वेग शून्य होतो तेंव्हा त्या दगडाने एक उंची गाठलेली असते. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्या प्रवासाची दिशा बदलून त्यानंतर तो खाली पडायला लागतो आणि तो जसजसा खाली येत राहील तसतसा त्याचा खाली पडण्याचा वेग वाढत जातो.

आपण एकादा दगड सहसा सरळ उभ्या रेषेत वर फेकत नाही. तो तिरक्या रेषेत फेकला तर फक्त त्याचा वर जाण्याचा वेगच तेवढा गुरुत्वाकर्षणामुळे कमी होतो. पण वर जातांना तसेच कांही उंची गांठल्यानंतर खाली पडून जमीनीवर येईपर्यंत तो समोर जातच असतो. आपण त्याला जास्त वेगाने फेकला तर तो जास्त उंची गाठतो तसेच जास्त दूर जातो असा अनुभव आपल्याला येतो. अशा वस्तूंच्या गमनाचे मार्ग वर दिलेल्या चित्रातील आकृती १ मधील क्रमांक ४, ५ व ६ या वक्ररेषांनी दाखवले आहेत. त्याचप्रमाणे जमीनीला समांतर रेषेमध्ये एक दगड फेकला तर तो समोर जातांजातांच गुरुत्वाकर्षणामुळे खाली येत जातो आणि वर दिलेल्या चित्रातील क्रमांक १, २ व ३ या वक्ररेषांनी दाखवलेल्या मार्गाने जात कांही अंतरावर जमीनीवर पडतो. १,२ व ३ आणि ४,५ व ६ या उदाहरणांत वस्तूच्या फेकण्याचा वेग वाढत गेला आहे, तसेच त्या जमीनीवर पडण्याचे अंतर वाढलेले दिसते.

खालील जमीन वक्राकार असेल तर सपाट जमीनीच्या मानाने ती वस्तू अधिक दूरवर जाते हे आकृती क्र. २ वरून स्पष्ट होते. यावरून सर आयझॅक न्यूटन यांना एक कल्पना सुचली. पृथ्वीवरील एकाद्या खूप उंच, म्हणजे हिमालयाच्याही दहा वीसपट इतक्या उंच पर्वताच्या शिखरावर एक तोफ ठेऊन त्यातून प्रचंड वेगाने गोळे सोडले तर ते कुठपर्यंत जातील याची गणिते त्यांनी मांडली. त्यांनी त्यासाठी कदाचित शेकडो वेगवेगळी उदाहरणे घेतली असतील, नमून्यादाखल मी आठ उदाहरणे आकृती क्र.३ मध्ये दाखवली आहेत. त्यातील १,२,३ व ४ चे गोळे वळत वळत जात पृथ्वीवर दूर दूर जाऊन पडतील. क्र.५ हा गोळा इतका वळत जाईल की एका वर्तुळाकार कक्षेमध्ये पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा करून सोडल्या जागी तो परत येईल आणि पृथ्वीभोवती फिरत राहील. गोळ्याचा वेग आणखी वाढवला तर क्र.६ व ७ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते एकाहून एक मोठ्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतील. एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर मात्र क्र.८ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते पृथ्वीपासून दूर दूर जात अनंत अवकाशात चालले जातील.

न्यूटनच्या काल्पनिक तोफेने उडवलेल्या गोळ्याप्रमाणेच आकाशातून विशिष्ट वेगाने जाणारी कोणतीही खरीखुरी वस्तूसुध्दा पृथ्वीच्या जवळून सरळ रेषेतल्या मार्गाने जात असेल तर गुरुत्वाकर्षणामुळे ती पृथ्वीकडे ओढली जाण्याने तिचा मार्ग वक्राकार होतो आणि ती पृथ्वीच्याभोवती फिरत राहते. चंद्राचे भ्रमण अशाच प्रकारे होत असते हे आकृती ४ मध्ये दाखवले आहे. गेल्या पाच दशकात मानवाने आभाळात सोडलेले हजारो उपग्रह असेच वेगवेगळ्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती फिरत आहेत.

उडवलेल्या वस्तूचा वेग कमी करण्याचे किंवा खाली येण्याचा वेग वाढवण्याचे प्रमाणाला ‘त्वरण’ (अॅक्सेलेरेशन) असे म्हणतात. सुरुवातीला त्या वस्तूचा वेग दर संकंदाला १००० मीटर इतका असला तर निघाल्यानंतर पहिल्या सेकंदानंतर तो सेकंदाला सुमारे १० मीटरने कमी होऊन ९९० मीटर इतका राहील, तर दोन सेकंदानंतर सुमारे ९८० मीटर इतकाच राहील. गुरुत्वाकर्षणामुळे हे त्वरण निर्माण होते. मात्र पृथ्वीपासून दूर जातांजातां ते कमी कमी होत जाते. त्यामुळे एकादी वस्तू अतिशय वेगाने दूर फेकली तर ती जसजशी दूर दूर जात जाईल तसतसे तिचा वेग कमी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. कांही अंतर पार केल्यानंतर तो सेकंदाला ९ किंवा ८ मीटरनेच कमी होईल. असे करता करता कुठेतरी त्या वस्तूचा वेग कमी करण्याचे प्रमाण शून्याजवळ पोचेल. पण ती वेळ येईपर्यंत ती अधिकाधिक दूर जात राहील आणि त्या क्षणी तिचा जितका वेग असेल तितक्या वेगाने ती अनंतकाळापर्यंत पुढे जातच राहील. जर एकादी वस्तू दर सेकंदाला ११.२ किलोमीटर (एस्केप व्हेलॉसिटी) एवढ्या वेगाने आपल्या समुद्रसपाटीवरून आकाशात फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा वेग कमी होत होत कधीच शून्य होणार नाही आणि ती अनंत योजने दूर गेली असेल, याचा अर्थ ती खाली येणारच नाही, अवकाशातच भरकटत राहील. पण त्यानंतर तिचा पुढे जाण्याचा वेगसुध्दा शून्याजवळ पोचला असेल, त्यामुळे ती त्याच जागी स्थिर राहील किंवा अत्यंत धीम्या गतीने पुढे जात राहील, असे एक सोपे गणित करून सिध्द करता येते. आपण पृथ्वीपासून दूर जाऊन तिथून ही वस्तू आभाळात फेकली तर ही ‘एस्केप व्हेलॉसिटी’ची
मर्यादा यापेक्षा कमी होईल.
अंतराळात यान पाठवण्यासाठी तयार करण्यात येणा-या योजनांच्या तपशीलासाठी अशा प्रकारच्या अनेक नियमांचा अभ्यास करावा लागतो. चंद्रयान हे या प्रकारचे एक अत्यंत विकसित असे वाहन आहे. त्याबद्दल आणखी थोडे पुढील भागात पाहू.
. . . . . . . . .. . . . . . . (क्रमशः)

<—— मागील भाग – परिचय              पुढील भाग  – विमान आणि अग्निबाण ———->

चंद्रयानाच्या निमित्याने – परिचय

चंद्रयान हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावले या गोष्टीला आता सुमारे चार वर्षे उलटून गेली. काही दिवसांनी ते चंद्राजवळ पोचले आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहिले. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती गोळा करून ती पृथ्वीवर पाठवली गेली. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली) बाजू तसेच त्याची पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात आली. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-या प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी दुर्मिळ मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याची माहिती यावरून मिळाली. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि  कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. चंद्रयानामधून काय मिळाले हे इतक्यात सांगता येणार नाही. पण भारताच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल नक्कीच होते.

चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे होते.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन
३. चंद्राच्या कक्षेत प्रवेश
४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले होते.
१. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
२. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे
४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे.

चंद्रयानाच्या उड्डाणाच्या निमित्याने मी सात लेखांची एक मालिका त्या काळात लिहिली होती. या काहीशा अपरिचित विषयाला सरळ हात घातल्यास काही लोकांना कदाचित तो समजणार नाही असा विचार करून त्यासाठी मला आवश्यक वाटणारी प्राथमिक स्वरूपाची वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती मी या लेखमालिकेत टप्प्या टप्प्याने दिली होती. या सात भागांचे मथळे खाली दिले आहेत. यावरून त्या भागांमधल्या मजकुराचा अंदाज येईल.
१.चन्द्रयान (भाग१) – गुरुत्वाकर्षण
२.चन्द्रयान (भाग२) – विमान आणि अग्निबाण
३.चन्द्रयान (भाग३) – अंतरिक्षात भ्रमण
४.चन्द्रयान ( भाग ४) – उपग्रह
५.चन्द्रयान ( भाग ५) – पूर्वतयारी
६.चन्द्रयान ( भाग ६) – यशोगाथा (पूर्वार्ध)
७.चन्द्रयान ( भाग ७) – यशोगाथा (उत्तरार्ध)

अनेक वर्षांपूर्वी मी चंद्रासंबंधी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती ३२ लेखांच्या मालिकेतून माझ्या ब्लॉगवर सादर केली होती. ती या दुव्यांवर पाहता येईल. तसेच ती या ब्लॉगवरसुध्दा चंद्रमा या कॅटॅगरीमध्ये पाहता येईल.
<a href=”http://anandghan.blogspot.com/2006/02/moon-part1.html”>तोच चंद्रमा नभात </a>

पुढील भाग – गुरुत्वाकर्षण ———>