माझी डिजिटल दिवाळी

दोन वर्षांपूर्वी २०१८ साली मला योगायोगाने जवळजवळ एकांतात दिवाळी साजरी करावी लागली होती, पण इंटरनेटच्या माध्यमामधून मी दिवसरात्र अनेक आप्त आणि मित्र यांच्या संपर्कात राहिलो होतो. त्याची हकीकत मी त्यावर्षी आनंदघन या माझ्या ब्लॉगवर दिली होती. ती आज या ठिकाणी देत आहे. कोरोनामुळे या वर्षीसुद्धा कुणाचेच कुणाकडे जाणेयेणे होणे कठीण झाले आहे. त्यामुळे फेसबुक आणि वॉट्सअॅपवरच भर द्यावा लागणार असे दिसते.

माझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे अपरंपार महत्वाचा सण असायचा. त्या चारपाच दिवसांमधली खाद्यंति, नवे कपडे, दिवे, रांगोळ्या, फटाके, पाहुण्यांची गर्दी वगैरे सगळे काही जन्मभर लक्षात राहिले आहे. याचे कारण म्हणजे ते नेहमीपेक्षा खूपच वेगळे असायचे. त्या रेशनिंगच्या काळात रोजच्या आहारातली धान्येसुद्धा खुल्या बाजारात मिळायची नाहीत. रेशनच्या दुकानात जे आणि जेवढे धान्यधुन्य मिळेल तेच शिजवायचे आणि एकाद्या कालवणाबरोबर पोटात ढकलून भूक भागवायची अशी परिस्थिती होती. फक्त सणावाराच्या दिवशीच थोडे गोडधोड खायला मिळायचे. त्यामुळे दिवाळीतले चार दिवस रोज निरनिराळी पक्वान्ने आणि शिवाय इतर वेळी फराळाचे चविष्ट पदार्थ खाणे म्हणजे प्रचंड चंगळ होती. त्या काळात एरवी रोज जुनेच कपडे धुवून वापरायचे, उसवले तर शिवण मारून आणि फाटले तर ठिगळ लावून त्यांचे आयुष्यमान वाढवत रहायचे आणि मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान व्हायला लागल्यावर ते लहान भावाने घालायचे अशीच रीत होती. दर वर्षी दिवाळीत मात्र नवे कपडे मिळत असल्यामुळे त्यांचे मोठेच अप्रूप वाटायचे.

आजकाल आपण सगळ्या प्रकारच्या मराठी पदार्थांशिवाय काश्मीरी राजमा ते दाक्षिणात्य डोसे, गुजराथी उंधियो ते बंगाली रोशगुल्ले, एवढेच नव्हे तर चिनी मांचूरिया ते इटालियन पिझ्झापर्यंत असंख्य खाद्यपदार्थ नेहमीच हॉटेलात जाऊन खातो किंवा ते घरबसल्या खायला मिळतात, कुठलेसे बंधू किंवा राम यांच्या नावांच्या खाद्यपदार्थांची पुडकी कपाटांमध्ये आणि डबे फ्रिजमध्ये पडलेले असतात. आपल्याला इच्छा होईल त्या क्षणी आपण गोड किंवा तिखटमिठाचा एकादा पदार्थ चाखू शकतो. त्यांच्या या वाढलेल्या उपलब्धतेमुळे आता दिवाळीतल्या खाण्याचे विशेष महत्वच वाटेनासे झाले आहे. त्याचप्रमाणे आपण नेहमीच भरमसाट कपडे खरेदी करत असतो आणि कृत्रिम धाग्यांचे आजकालचे कापड आटत नाही, विटत नाही की फाटत नाही आणि ते वर्षानुवर्षे नवे कोरेच दिसते. तरीसुद्धा दिवाळीला नेमाने नवे कपडे घेतो पण त्यापासून लहानपणी वाटायचा तेवढा आनंद मात्र आता मिळत नाही.

शिक्षण आणि नोकरीसाठी परगावी रहात असलेली आमच्या एकत्र कुटुंबातली झाडून सगळी मंडळी माझ्या लहानपणी दिवाळीला सहकुटुंब घरी जमायचीच. त्यांच्या आगमनाने आमचा वाडा एकदम गजबजून जात असे. त्यात लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असायचे. मग गप्पागोष्टी, थट्टामस्करी, हास्यविनोद, गाणी, नकला, पत्ते आणि सोंगट्यांचे डाव वगैरेंमध्ये सगळा दिवस तर धमाल यायचीच, रात्रीसुद्धा गच्चीवर अंथरुणे पसरून त्यात दाटीवाटीने पडल्यापडल्या गप्पांचे फड खूप रंगायचे. लहानपणाबरोबरच हा अद्भुत अनुभव मात्र संपून गेला. पुढील काळात सारी भावंडे एक दोन खोल्यांच्या लहान लहान घरांमध्ये देशभर विखुरली आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी दिवाळीचे आकर्षण पुरेसे सशक्त राहिले नाही. मी मुंबईत असतांना दिवाळीमध्ये तिथल्या भावाकडे किंवा बहिणीकडे आवर्जून जात असे आणि एकादा दिवस ते माझ्याकडे येत असत. पुण्यामधली आप्त मंडळीसुद्धा दिवाळीतल्या एका दिवशी एकत्र जमत असत, पण हळूहळू हे भेटणेसुद्धा कमी होत गेले.

गेल्या काही वर्षांपासून आंतर्जाल (इंटरनेट) आणि दूरध्वनि (टेलीफोन) यांच्या माध्यमामधून मात्र जगभर पसरलेली आपली माणसे एकमेकांना जोडली गेली आहेत. पाहिजे तेंव्हा आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना पिटुकल्या पडद्यावर डोळ्यांनी पाहू शकतो किंवा त्यांना समोर पाहता पाहता त्यांच्याशी बोलूही शकतो. वॉट्सअॅपवर सतत काही ना काही संदेशांची देवाणघेवाण चाललेली असते. त्यामुळे ते लोक इतके दुरावल्यासारखे वाटत नाहीत. या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे काही जुने आणि आधी दुरावलेले मित्र किंवा आप्तसुद्धा आता आपल्या संपर्कक्षेत्रात आले आहेत.

या वर्षी दिवाळीला माझी नातवंडे त्यांच्या आईबरोबर ‘मामाच्या गावाला’ गेली होती. मुलाला ऑफिसमध्ये अत्यंत आवश्यक असे काम असल्यामुळे तो इथेच थांबला होता, पण घरी असतांनासुद्धा बहुतेक वेळ तो त्याच्या काँप्यूटरमध्ये डोके खुपसून आणि फोनवर कुणा सहकाऱ्याशी किंवा क्लायंटशी बोलत बसलेला असे. माझी तब्येत तशी ठीक असली तरी एकट्याने कुठे जाण्यायेण्याइतकी धडधाकट राहिली नव्हती. त्यामुळे ‘मै और मेरी तनहाई’ तेवढे एकमेकांना सोबत करत होतो पण इंटरनेटमधून अख्खी डिजिटल दुनिया मला भेटत होती आणि माझ्याशी बोलत होती. त्यातली काही माणसे खरीखुरी आणि आमच्या जवळची होती, तर काही मला या आभासी दुनियेत भेटलेली होती, त्यांनी आपला जो मुखवटा ठरवून दाखवला होता तेवढाच मला माहीत होता.

या दुनियेमध्येसुद्धा मोठ्या धूमधडाक्याने दिवाळी साजरी होत होती. अगदी वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाची व्यवस्थित सविस्तर सचित्र माहिती एका पाठोपाठ एक पहायला आणि वाचायला मिळत होती. वसुबारसेला कुठल्याही गोठ्यात न जाता मला सवत्स धेनूंचे दर्शन घडले. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात म्हणे. एका शिल्पाच्या छायाचित्रात प्रतीकात्मक रीतीने गायीच्या पोटातले अनेक देव दाखवले आहेत. धनत्रयोदशीला समुद्रमंथनामधून धन्वंतरी प्रकट झाले म्हणून त्या दिवशी त्याचीही पूजा करतात हे मला माहीत नव्हते. तसेच दिवाळीत देवांचा खजिनदार कुबेर याचीही पूजा करतात म्हणे. देवादिकांनासुद्धा आजार होत असतील का? ते झाले तर धन्वंतरी आणि अश्विनीकुमार त्यांच्यावर कसले उपचार करत असतील? कुबेराकडे देवांचा कुठला खजिना असायचा? त्यात कुठले धन ठेवले असायचे? ते धन तो कुठे ठेवत असेल आणि त्याचा विनियोग कोण, केंव्हा आणि कसा करत असेल? असले प्रश्न मात्र कुणालाच पडत नाहीत. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले असे मी लहानपणापासून ऐकत होतो, पण त्या दिवशी कालीमातेनेसुद्धा एकाद्या असुराला मारले असावे. मला आलेल्या एका शुभेच्छापत्रावर दिलेल्या चित्रात तसे दाखवले आहे तर दुसऱ्या चित्रात साक्षात शंकरालाच कालीच्या पायाशी दाखवले आहे. त्याचा उलगडा होत नाही. श्रीकृष्णाचे नरकासुराला मारतांनाचे चित्र मात्र कुठे दिसले नाही.

अमावास्येच्या रात्री सगळीकडेच भक्तीभावाने लक्ष्मीपूजन आणि दिव्यांची जास्तीत जास्त आरास करतात, त्याच्यापाठोपाठ फटाक्यांचा धुमाकूळ सुरू होतो आणि बराच वेळ चालतो. आजकाल वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यावर अंकुश लावण्यासाठी बराच प्रचार होत असतो. या वर्षी निदान पुण्यात तरी त्याचा थोडा परिणाम झाला असावा असे वाटले. आमच्या भागात या वर्षी मी पहिल्यांदाच रहात होतो, पण आतापर्यंत इतर ठिकाणी जो कानठळ्या बसवणारा आवाज कानावर यायचा तसा या वर्षी इथे आला नाही. पाडव्याच्या दिवशी बालश्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता आणि त्याच्या छताखाली सर्व गोकुळाचे पावसापासून रक्षण केले होते. त्या घटनेनिमित्य या दिवशी उत्तर भारतात गोवर्धनपूजा करतात ही एक नवी माहिती समजली. कार्तिक शुद्ध द्वितियेला म्हणजे आपल्याकडल्या भाऊबीजेच्या दिवशी उत्तर भारतातले काही लोक चित्रगुप्त महाराजांची पूजा करतात हे आणखी एक नवे ज्ञान मला या वर्षी मिळाले.

दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या डिजिटल विश्वातल्या मित्रांनी (यात नातेवाईकांचाही समावेश होतो) असंख्य शुभकामनासंदेश (ग्रीटिंग्ज) तर पाठवलेच, त्यानिमित्य अनेक अफलातून विशेष लेख आणि कविताही फेसबुक आणि वॉट्सअॅपवर पाठवून दिल्या. काही लोकांनी शास्त्रीय संगीताचे आणि एका मित्राने खास दिवाळीवरील अनेक मराठी गाण्यांचे रेकॉर्डिंग पाठवले. शिवाय टेलिव्हिजनवर रोज सकाळी दिवाळीपहाटेचे विशेष कार्यक्रम दाखवले जात होतेच, इतरही काही ना काही खास कार्यक्रम असायचे. रोजच्या डेली सोप म्हणजे नेहमीच्या मालिकांमधल्या कुटुंबांमध्येसुद्धा दिवाळीमधला प्रत्येक दिवस अगदी साग्रसंगीत साजरा होतांना दिसत होता. अंगाला तेल लावून मालिश करणे, तबकात निरांजन आणि सुपारी ठेऊन आणि ओवाळून औक्षण करणे, सर्वांनी मिळून हास्यविनोद करत फराळ करणे वगैरे तपशीलासह दिवाळीतले घरगुती प्रसंग इतके हुबेहूब चित्रित केले होते की ते माझ्या आजूबाजूलाच घडत असल्याचे वातावरण निर्माण करत होते. गंमत म्हणजे खरी दिवाळी संपून गेली तरी यांची दिवाळी आणखी २-३ दिवस हळूहळू चाललेलीच होती.

माझ्या काही आप्तांनीसुद्धा आपल्या पोस्टमध्ये तो सण कुणीकुणी कसा साजरा केला यांची अनेक छायाचित्रे (फोटो) आणि चलतचित्रे (व्हीडिओ) पाठवली होती. त्यात फराळाचे पदार्थ, किल्ले, फुलबाज्या, ओवाळण्याचे कार्यक्रम वगैरे सगळे काही छान दाखवले होते. ती चित्रे पाहतांना मीसुद्धा मनाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत होतो. त्याशिवाय रोज सकाळसंध्याकाळी टेलीफोन आणि व्हीडिओ कॉल्स होत होतेच.

मी कॉलेजशिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घरापासून दूर रहात असतांनासुद्धा दरवर्षी दिवाळीला मात्र नेमाने घरी जात असे. दिवाळीच्या दिवशी एकट्याने घरात बसून राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. पण मी एकटा कुठे होतो? “लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥” असे म्हणत प्रत्यक्ष माणिक वर्मांनी माझ्या दिवाळीची सुरुवात करून दिली होती. साक्षात बिस्मिल्लाखानांच्या सुस्वर अशा शहनाईवादनाने माझी मंगलप्रभात सुरू होत होती. त्यानंतर पं.भीमसेनअण्णा आणि कुमारजी वगैरे थोर दिवंगत मंडळींपासून ते राहुल आणि कौशिकीपर्यंत आताची तरुण गायक मंडळी यांची शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळत होती. शिवाय लतादीदी, आशाताई, रफी, मुकेश, किशोर वगैरेंची तर विविध प्रकारची हजारो सुरेल गीते साथीला होतीच. संगीत ऐकून झाले असेल तर वाचण्यासाठी अनेक विनोदी किंवा माहितीपूर्ण पोस्टांचा प्रवाह या सोशल मीडियावर अखंड वहात होता. त्यांच्याहीपेक्षा मजेदार अशी चित्रे, चलचित्रे आणि व्यंगचित्रे छान मनोरंजन करत होती. लिहायचा मूड आला तर माझे स्वतःचे ब्लॉग होतेच, फेसबुकवरही लिहिण्याची सोय होती. फेसबुक आणि वॉट्सअॅपवरील मित्र त्यावर ‘आवडले’ (लाईक)चे शिक्के मारून उत्साह वाढवत होते किंवा काही वेळा आपले शेरे मारत होते, तसेच मी इतरांच्या लेखनावर करत होतो. त्यावर मग उत्तरप्रत्युत्तरांच्या फैरी झडत होत्या आणि या विषयावर आपली मते भिन्न असल्यामुळे “वुई अॅग्री टु डिसअॅग्री”वर जाऊन त्या थांबत होत्या. हे सगळे एरवीसुद्धा चालतच असते. दिवाळीमुळे त्यात खंड पडला नव्हता. या सर्वांच्या साथीमुळे मला केंव्हाच एकटा पडल्यासारखे वाटलेच नाही.

तेंव्हा अशा रीतीने साजरी झालेली ही माझी पहिली डिजिटल दिवाळीसुद्धा मला आनंदाचे दोनचार क्षण देऊनच गेली. या वर्षी मला आलेल्या आणि आवडलेल्या खास संदेशांचा एक संग्रह करून मी तो या ठिकाणी जपून ठेवला आहे.

https://anandghare.wordpress.com/2018/11/13/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%ae/

हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा

हॅप्पी दिवाली

मागच्या वर्षी माझा वाढदिवस दसरा आणि दिवाळी यांच्यामधल्या दिवसांमध्ये आला होता. त्यामुळे त्या तीन आठवड्यात आधी हॅप्पी दसरा, मग हॅप्पी बर्थडे आणि त्यानंतर हॅप्पी दिवाळी वगैरे मेसेजेसचा एका पाठोपाठ एक नुसता वर्षाव होत होता. त्यात चिंब भिजून गेल्यामुळे मलासुध्दा मनातून थोडं हॅपी हॅपी वाटायला लागलेलं असतांना एक संस्कृतीसंरक्षक गृहस्थ भेटले.
“कसे आहात?” त्यांनी विचारलं, ती एक औपचारिक चौकशी असेल असं मला वाटलं.
मी अजून हॅपी मूडमध्येच होतो. हंसत हंसत म्हणून गेलो, “मजेत!”
ते एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पहात राहिले. बहुधा त्यांना या उत्तराची अपेक्षा नसावी. हे जग, आपला देश, आपले शहर यात रोज उठून केवढ्या भयानक घटना घडत आहेत, आपला समाज अधःपाताच्या खोल रसातळाच्या दिशेने चालला आहे, आपली कुटुंबसंस्था कोलमडून पडायला लागली आहे, आपली शरीरे व्याधींनी आणि मने चिंतांनी पोखरून निघत आहेत आणि या माणसाच्या वाट्याला तरी काय कमी पीडा आल्या आहेत? अशाही परिस्थितीत हा माणूस मजेत कसा असू शकतो? आणि तरीही तोंड वर करून तसं सांगायलाही याला काहीच कसे वाटत नाही? असे प्रश्न मला त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायला लागल्यामुळे मी थोडासा वरमलो आणि चांचरत म्हणालो, “म्हणजे देवाच्या दयेने माझं तसं ठीक चाललं आहे, आला दिवस पुढे ढकलतो आहे.”
“मग मघाशी काय म्हणालात?” ते मघाचे उत्तर विसरायला तयार नव्हते.
माझ्या हातातला मोबाईल दाखवत मी बोललो, “अहो बघा ना, यात सगळं हॅपी हॅपी भरलंय्, म्हणून …. ”
“हे एक खूळ किती बोकाळलंय् बघा! अहो ख्रिश्चन लोक मेरी ख्रिसमस म्हणतात, मुसलमान लोक ईद मुबारक म्हणतात, त्यांना त्यांच्या धर्माचा केवढा अभिमान आहे आणि आपले लोक? ते अजूनही इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडलेले नाहीत, “हॅप्पी दिवाळी” म्हणायला यांना लाजा कशा वाटत नाहीत?” त्यांच्या सात्विक संतापाचा पारा चढायला लागला होता.
“अहो मला हे संदेश पाठवणारे सगळे लोक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधीच इंग्रजांची गुलामी पाहिलेलीही नाही.”
“बघा तरीसुध्दा ते हॅपी हॅपीची पोपटपंची करताहेत! आता यांना काय म्हणावं?”
“अहो, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं संक्रांतीला म्हणतो, सोन्यासारखं रहा असं दसऱ्याला म्हणतो तसंच एकदा मी एकाला सांगितलं, बाबारे, दिवाळी आली, आता दिवे लाव, उजेड पाड, देव तुझं भलं करो. तर तो माझ्यावरच चिडला की हो. मी त्याला मराठीत काय सांगायला पाहिजे होतं?”
“कां, शुभ दीपावली म्हणता नाही येत?”
“दिवाळी तर शुभ असतेच ना? त्यात मी माझं म्हणून काय सांगितलं?”
“मग दिवाळीच्या शुभेच्छा म्हणावं.”
“आताशी मी तेच करतोय्. मराठीभाषिकांना शुभेच्छा, हिंदीभाषिकांना शुभकामनाएँ लिहितो, पण त्यात मजा, आनंद वगैरे भावना येत नाहीत. शुभेच्छा हा शब्द कुणी शोधून काढला कोण जाणे, तो कृत्रिम आणि कोरडा वाटतो. मी तामीळतेलुगू आणि मल्याळीबंगाली मित्रांचं काय करू? मला त्यांच्या भाषा येत नाहीत आणि त्यांना माझी. नेहमी आम्ही इंग्रजीमधूनच एकमेकांशी बोलतो. ती आता आमची संपर्कभाषा आहे. यात कुणाच्या गुलामीचा संबंध कुठे येतो?”
त्यांना लगेच काही उत्तर सुचले नाही, तेवढ्यात मीच त्यांना विचारलं,
“तुम्ही तर सगळी पोथ्यापुराणं वाचली असतील, त्यात शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द कुठे येतात का? म्हणजे रावणाने कुंभकर्णाला किंवा सुभद्रेनं द्रौपदीला कुठल्याशा सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असले उल्लेख आहेत का?”
“अहो, त्या काळात तशी रीत नव्हती.”
“तेंव्हाच कशाला? साठपासष्ट वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुध्दा सणासुदीच्या दिवशी लहान मुलांनी घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि त्यांनी मोठा हो, शहाणा हो असे आशीर्वाद द्यायचे अशी पध्दत होती. मी तरी तेंव्हा शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द ऐकलेसुध्दा नव्हते. ते संस्कृतमधले असल्यासारखे वाटतात, पण प्राचीन काळातल्या मूळच्या संस्कृत भाषेत ते उपयोगात होते का ?”
“मी म्हंटलं ना की ही आपली संस्कृती नाहीच, हे इंग्रजांचं आंधळं अनुकरण आहे.”
“कदाचित असेलही, पण त्यात काय वाईट आहे? वैदिक काळातले लोक जसे रहात होते तसे आपण आज राहतो का? इंग्रज लोकसुध्दा रोमन साम्राज्याच्या किंवा आठव्या हेन्रीच्या काळात रहायचे तसे आता रहात नाहीत. काळाबरोबर सगळ्याच लोकांची राहणी, त्यातल्या चालीरीती हळूहळू बदलत असतात. त्यातले जे आपल्याला बरे वाटते ते आपण कळत नकळत उचलतो. त्याचा उगाच अंधानुकरण, सांस्कृतिक गुलामगिरी वगैरे मोठा बाऊ कशाला करायचा?”
“पण हॅप्पी दिवाळी असं म्हणायचं नाही म्हणजे नाही. आपली संस्कृतीच सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. आपण तीच पाळायची.” हरिदासाची कथा मूळपदावर यायला लागली.
“आणि आज थोडी मजा करून घे, आनंदी रहा असे कुणालाही सांगणे ही गोष्टच आपल्या संस्कृतीत बसत नाही. असंच ना?”
हा माणूस वाया गेला आहे, याला काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार त्यांनी बहुधा केला असावा. मलाही आपला चांगला मूड घालवायचा नव्हता. मी मनातल्या मनात त्यांनाही हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पण माझ्या मनातलं चक्र फिरतच राहिलं. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. पूर्वीच्या काळातसुध्दा अनेक उत्सव असायचेच आणि कुठलाही उत्सव कधी एकट्याने साजरा होतच नसतो, त्यात कसलीच मजा नसते. लहानपणी आम्ही शुभेच्छा हा शब्द उच्चारत नसलो तरी गांवातल्या नातेवाइकांना आणि मित्रांना भेटून त्यांच्यासह सणवार साजरे करत होतो. या एकत्र येण्यात, सहवासातच उत्सवाचा खरा आनंद असायचा. पुढे शहरात रहायला लागल्यावर दूर दूर रहात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य होत नव्हते, पण टेलीफोनचा प्रसार झाल्यावर सणासुदीला त्यांच्याशी टेलीफोनवर बोलून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे सुरू झाले. मधल्या काळात रंगीबेरंगी आकर्षक अशी ग्रीटिंग कार्डे बाजारात आली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. आपल्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त करायचे एक आयते आणि सोपे साधन मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा या काळात प्रचलित होत गेली.

प्रत्यक्ष भेटण्याला आणि टेलीफोनवरल्या संभाषणालाही स्थळकाळाच्या मर्यादा होत्याच. इंटरनेटच्या आगमनानंतर त्या मर्यादा अमर्याद विस्तारल्या गेल्या. ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमुळे शेकडो मित्र आणि आप्त जोडले गेले. त्या सर्वांना शब्द आणि चित्रांमधून एकाच वेळी संदेश पाठवणे शक्य झाले. ही माध्यमे मुख्यतः इंग्रजी भाषेत चालत असल्यामुळे त्या भाषेचा प्रभाव पडणारच आणि या संदेशांमध्ये ती भाषा प्रामुख्याने निदान सध्या तरी दिसणारच. आपण तरी तिला परकी मानून तिचा तिरस्कार का करायचा? त्या संदेशांमधल्या भावना आणि उद्देश समजून घेऊन उत्सव साजरा करावा हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते?

दिन दिन दिवाळी

DIWALI 2018
मी अगदी लहान असतांना म्हणजे शाळेत जायच्याही आधी एक बडबडगीत ऐकले आणि गुणगुणले होते आणि ते अजून माझ्या लक्षात आहे. यातला कोण लक्षुमन, कसली खोबऱ्याची वाटी आणि कुठल्या वाघाच्या पाठीत कुणी काठी घालायची असले प्रश्न तेंव्हा माझ्या मनात आले नव्हते आणि नंतर मलाही कोणी विचारले नाहीत. दर वर्षी दिवाळीच्या दिवसात या गाण्याची पारायणे होत असत आणि त्या वेळी घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये जी कोणी लहान मुले असतील त्यांना हे गाणे शिकवून त्यांच्याकडून बोबड्या बोलात हावभावासह म्हणून घेतले जात असे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ।
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या ।
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा ।
दे माय खोबऱ्याची वाटी ।
वाघाच्या पाठीत घालीन काठी ।।

या बडबडगीताला जोडून दिवाळीमधल्या सर्व दिवशी काय काय करायचे याचे छान वर्णन करणारे “दिवाळीच्या दिवशी ग, दिवशी ग …… आली आली दिवाळी, दिवाळी” हे एक सुरेख गाणे मला या ध्वनिफीतेमध्ये मिळाले होते. (आता ते दिसत नाही.)
https://www.youtube.com/watch?v=bR3dneyjJ-4
———————-

माझ्या जन्माच्याही आधी म्हणजे १९४० च्या काळातल्या शेजारी या खूप गाजलेल्या आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या चित्रपटातले अत्यंत जुने पण तरीही आजतागायत ऐकू येणारे असे दीपोत्सवावरचे अजरामर गाणे आहे, लखलख चंदेरी. शेजारी राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये निर्माण झालेला दुरावा संपून शेवट गोड झाल्यानंतर सगळे गांवकरी एकमुखाने हे गीत गात आणि त्या तालावर नाचत दिवाळीचा आनंदोत्सव कसा साजरा करतात याचे चित्रण या गाण्यात सुरेख केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=qNAdSpieRCg

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।
झळाळती कोटी ज्योती या, हा, हा।।

चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून ।
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण ।
नाचती चंद्र तारे, वाजती पैंजण ।
छुनछुन झुमझुम, हा, हा ।।

झोत रुपेरी, भूमिवरी गगनात ।
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत ।
कणकण उजळीत, हासत हसवीत ।
करी शिणगार, हा, हा ।।

आनंदून रंगून, विसरून देहभान ।
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया ।
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून ।
एक होऊ या, हा, हा ।।

—————————————-

माझ्या लहानपणी १९५५ साली आलेल्या भाऊबीज या सिनेमातले सोनियाच्या ताटी हे गाणे माझ्या एकाद्या बहिणीच्या तोंडी ऐकल्याशिवाय माझी भाऊबीज कधी साजरी होत नव्हती. आशाताईंनी गायिलेले हे गोड गाणेसुध्दा साठ वर्षांनंतर अजून टिकून राहिले आहे. भावाबहिणीमधल्या नात्याचा सगळा गोडवा या गाण्यात उतरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=p_C1k78XuBs

सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ।
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

माया माहेराची पृथ्वीमोलाची ।
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची ।
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

चांदीचे ताट, चंदनाचा पाट ।
सुगंधी गंध दरवळे, रांगोळीचा थाट ।
भात केशराचा, घास अमृताचा ।
जेवू घालिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी ।
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी ।
नक्षत्रांची सर, येई भूमिवर ।
पसरी पदर भेट घ्याया ।
चंद्र वसुधेला, सखा रे भेटला ।
पाठीशी राहु दे छाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया ।।

पंचप्राणांच्या वाती, उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया

—————————————–
अष्टविनायक या चित्रपटातली सगळीच गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि लोकांच्या ओठावर बसली. त्यातले एक गाणे खास दिवाळी या सणावर होते. तसे पाहता अमावास्येच्या आगे मागे असलेल्या दिवाळीत कसले मंद आणि धुंद चांदणे आले आहे ? उलट दिव्यांच्या रांगा लावून गडद अंधाराचा नाश करणे हा दीपावलीचा उद्देश असतो. पण ज्यांच्या मनातच प्रेमाचे चांदणे फुलले आहे, नयनांमध्ये दीप उजळले आहेत त्यांना त्याचे काय ? दिवाळीचा परम आनंद आणि उत्साह या गाण्यात छान टिपला आहे.

आली माझ्या घरी ही दिवाळी ।
सप्तरंगात न्हाऊन आली ।।

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे ।
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे ।
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे ।
कोर चंद्राची खुलते भाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले ।
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले ।
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी ।
सूर उधळीत आली भूपाळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली ।
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली ।।
संग होता हरी जाहले बावरी ।
मी अभिसारीका ही निराळी ।।
आली माझ्या घरी ही दिवाळी ।।
——————————

दिवाळीतले फटाके

DiwaliCrackers

आश्विन अमावास्येच्या काळोखात दिव्यांच्या रांगा लावून ‘दीपावली’ साजरी करण्याची परंपरा ‘दिवाळी’ या सणाने सुरू झाली. त्याला शेकडो वर्षांचा काळ उलटून गेला. आजही धार्मिक परंपरा किंवा शास्त्र म्हणून दिवाळीमध्ये रोज संध्याकाळी घरोघरी तेलाच्या पणत्या लावल्या जातातच. पण विजेच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश मिळण्याची सोय झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि झगमगणा-या दिव्यांच्या माळांनी अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई करणे सुरू झाले. आज कोणत्याही शहरात एक फेरफटका मारून पाहिल्यास त्याची प्रचीती येईल. लहान मुलांनी विजेशी खेळणे सुरक्षित नसते आणि त्यांना ते करणे शक्यही नसते म्हणून बहुतेक घरी हे काम मोठी माणसेच करतात. दिवाळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फराळ. पूर्वीप्रमाणे आता सगळे खाद्य पदार्थ घरी तयार करण्याची खटपट केली जात नाही. मोठ्या शहरात तर मिठायांचे इतके वेगवेगळे प्रकार आता मिळतात आणि ते आकर्षक वेष्टनांमध्ये विक्रीसाठी मांडून ठेवले जातात की दिवाळीसाठी तेच मोठ्या प्रमाणात आणले जातात. हल्लीच्या काळात वर्षभरच चांगले चुंगले खाऊन जिभेचे चोचले पुरवणे चाललेले असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची पूर्वीसारखी अपूर्वाई राहिली नाही. या सगळ्यांच्या तुलनेत दिवाळी म्हंटले की लहान मुलांना लगेच कशाची आठवण प्रकर्षाने येत असेल तर ती फटाक्यांचीच !

पुराणातल्या कहाण्यांमध्ये फुलापानांच्या माळा, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या वगैरे इतर प्रकारच्या सजावटीचे उल्लेख सापडतात, दीपज्योती तर कुठल्याही मंगल प्रसंगी आवश्यकच असते, पण गंमत म्हणून धडाडधूम आवाज करणारे फटाके उडवणे दिसत नाही. स्फोटकांचा शोध चीनमध्ये लागला आणि फटाक्यांचा उपयोगही सर्वात आधी म्हणजे सातव्या शतकात चीनमध्ये सुरू झाला. त्याचे तंत्रज्ञान तिकडून युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यात प्रचंड प्रगती आणि सुधारणा केली. ब्रिटीशांच्या काळात त्याची भारतात आवक झाली आणि फटाके उडवणे हा कोठल्याही उत्सवाचा अविभाज्य भाग झाला. इतर समारंभ एका कुटुंबापुरते किंवा एका समूहापुरते मर्यादित असतात, पण दिवाळी हा सर्वांचाच सण असल्याने त्याचे कानठळ्या बसवणारे आवाज एकाच वेळी सगळ्या बाजूने येत राहतात.

प्रकाश आणि ध्वनि यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवण्याचा प्रयत्न दिवाळीत उडवायच्या दारूमधून केला जातो. त्यामुळे लहान किंवा मोठा आवाज करणारे फटाके आणि निरनिराळे प्रकाश उत्पन्न करणारी उत्पादने असे दोन मुख्य प्रकार यात असतात. याशिवाय आकाशात उडणारे अग्निबाण असतात, तसेच यांना एकत्र आणणारे फटाके असतात. कशात आधी अग्निबाण आकाशात उडतो आणि वर गेल्यानंतर त्याचा स्फोट होऊन धमाका होतो किंवा त्यातून चमकदार ठिणग्यांचा वर्षाव होतो. लहानशा फटाकडीपासून सुतळी बाँबसारख्या मोठ्या फटाक्यापर्यंत त्यात अनेक प्रकार असतात, तसेच फुलबाजी, भुईचक्र आणि कारंजे वगैरे निरनिराळ्या प्रकाराने प्रकाशाची आतिशबाजी केली जाते. त्यातही एकाच रंगाच्या किंवा विविध रंगांच्या ठिणग्या उडवल्या जातात.

हे सारे फटाके कोणत्या तत्वावर काम करतात हे अनेकांना ठाऊक नसते पण ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे कुतूहल शमवण्याचा एक लहानसा प्रयत्न या लेखात केला आहे. आपण साधा कागद किंवा लाकडाचा तुकडा जाळतो तेंव्हा त्यांच्यामधील मुख्यतः कार्बन व हैड्रोजनच्या अणूंचा हवेमधील प्राणवायूच्या अणूंशी संयोग होऊन कार्बन डायॉक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते आणि त्या रासायनिक क्रियेत या पदार्थांमधून ऊष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्या ठिकाणचे तपमान वाढते आणि त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांमुळे आपल्याला जाळ दिसतो, तसेच त्यात हात घातल्यास हाताला चटका बसतो. या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात. ज्वलनाची क्रिया होण्यासाठी जळणारा पदार्थ आणि प्राणवायू यांची आवश्यकता असते आणि ही क्रिया उच्च तपमानालाच होऊ शकते. यामुळे वातावरणाच्या तपमानात (रूम टेंपरेचरला) कागद किंवा कपडे ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत.

गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात. बंदुका व तोफा यांना उडवण्यासाठी लागणारी किंवा सुरुंगाची दारू या प्रकारची असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये याच प्रकारची दारू सौम्य रूपात वापरली जाते.

फटाका तयार करतांना कागदाची जाड गुंडाळी करून त्यात ही दारू भरतात आणि त्याला जोडलेली एक कागदाची वात बाहेरपर्यंत ठेवली जाते. या वातीवर दारूचा पातळसा थर दिलेला असतो. ती पेटवली की हळूहळू आतपर्यंत जळत जाते. यामुळे पेटवणा-याला दूर पळायला वेळ मिळतो. कागदाच्या गुंडाळीच्या आतील दारू बाहेरील हवेशिवायच पेट घेते. त्यांच्या ज्वलनातून जे वायू बाहेर पडतात त्यांचे आकारमान मूळ स्थितीच्या शेकडो पटीने जास्त असते आणि त्यांना व्यापण्यासाठी फटाक्याच्या आत पुरेशी जागा नसल्यामुळे त्या वायूचा दाब वाढत जातो. कागदाचे वेष्टण आतल्या बाजूने जळत जाऊन कमकुवत होत जाते. अखेर आतला दाब सहन न झाल्यामुळे ते टराटरा फाटते आणि आतील वायू सर्व बाजूंनी वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे हवेत कंपने निर्माण होऊन मोठा ध्वनि निघतो. हे सगळे क्षणार्धात होते. फटाक्यामधील दारूचा प्रकार आणि प्रमाण यानुसार लहान किंवा मोठा स्फोट होऊन थोडा किंवा कानठळ्या बसवणारा आवाज निघतो. अगदी लहानशा कागदाच्या दोन गोल तुकड्यांमध्ये कणभर दारू ठेवून टिकली तयार होते. ती खेळातल्या पिस्तुलात ठेऊन तिचा घोडा ओढला की पिस्तुलातला खटका दाणकन टिकलीवर आदळून तिच्यातल्या दारूचा लहानसा स्फोट होतो. अनेक फटाके एकमेकांना जोडून त्यांची माळ तयार करतात आणि त्यातले सारे फटाके एकदम न उडता ते एकामागोमाग एक करून उडावेत अशी त्यांची रचना केली असल्यामुळे ती माळ काही सेकंद किंवा मिनिटे तडतडत राहते.

फटाक्याच्या वेष्टनाची गुंडाळी करतांना तिच्या एका बाजूला मोकळी वाट ठेवली तर ज्वलनामुळे आत निर्माण झालेले वायू त्यातून वेगाने बाहेर पडतात आणि न्यूटनच्या तिस-या नियमानुसार त्याच्या प्रतिक्रियेमुळे तो फटाका उलट बाजूने दूर फेकला जातो. अग्निबाणामधील फटाक्याला खालच्या बाजूने मोकळी वाट असते. त्यातून हे ऊष्ण वायू बाहेर पडतात आणि काडीला जोडलेला फटाका आभाळात उड्डाण करतो. त्याच फटाक्यातल्या दुस-या कप्प्यात आणखी थोडी दारू भरलेली असते. बाण आकाशात उंच उडल्यानंतर ती दारू पेटते आणि तिचा स्फोट होतो.

शोभेच्या दारूला जाड वेष्टण नसते. तिचा एकदम स्फोट होऊ नये म्हणून तिच्यात काही न जळणारी रसायने किंवा धातूंचा भुगा मिसळतात. त्यांना तापवल्यावर उच्च तपमानाला त्यांचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कॅल्शियमचा रंग केशरी होतो तर सोडियमचा पिवळा, तांब्याचा निळा तर बेरियमचा हिरवा. पांढरा शुभ्र प्रकाश देण्यासाठी मुख्यतः मॅग्नेशियम किंवा अॅल्युमिमियमचा वापर होतो. मॅग्नेशियम धातू स्वतःच ज्वालाग्राही असल्यामुळे त्यातूनच अत्यंत चमकदार अशा ठिणग्या पडतात. फुलबाजी पेटवली की तिच्या काडीला चिकटवलेली दारू किंवा मॅग्नेशियमची पूड जळत राहते. त्याचबरोबर या भुग्याचे कण तापून चमकतात आणि त्यांच्यामधून रंगीबेरंगी प्रकाशकिरण बाहेर पडतात. भुईचक्र तयार करण्यासाठी ही शोभेची दारू एका कागदात गुंडाळून तिचे वेटोळे लहानशा भिंगरीला चिकटवतात. त्यामुळे ती प्रकाशाचे झोत टाकत स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते. एका कोनिकल आकाराच्या वेष्टनात बरीच दारू भरून ठेवली तर त्याचे झाड किंवा कारंजे होते.

फटाके तयार करतांना त्यातून होणारे स्फोट विध्वंसक होऊ नयेत इतपत लहान ठेवले असतात, पण माणसाला धाडसाचे वेड असल्यामुळे तो त्याचा आकार वाढवत जातो. असे मोठ्या आकाराचे फटाके उडवतांना पुरेशी काळजी घेतली नाही आणि कोणी त्या फटाक्याच्या अगदी जवळ आला तर स्फोटाच्या धक्क्याने त्याला इजा होऊ शकते. ढिले किंवा ज्वालाग्राही कपडे पेट घेऊन तो माणूस भाजू शकतो. फार मोठ्या आवाजाने त्याचे कान बधीर होऊ शकतात. एकादी ठिणगी डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते. लहान मुले आणि वृध्द लोकांची सहनशक्ती कमी असते. त्यामुळे जो प्रखर उजेड किंवा आवाज मोठे लोक सहन करू शकतात, त्यांच्यामुळे लहान मुलांना किंवा वृध्दांना इजा होऊ शकते. पर्यावरण हा एक नवा मुद्दा अलीकडे अधिकाधिक महत्वाचा होत चालला आहे. दिवाळीनिमित्य फार मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेल्यामुळे त्यांच्या ज्वलनामधून निघालेले विषारी वायू हवेत मिसळतात आणि त्रासदायक ठरतात. ज्या लोकांची श्वसनसंस्था कमकुवत असते अशा लोकांना श्वास घेणेसुध्दा जड जाऊन त्यांचा जीव व्याकूळ होतो. या सगळ्यांचा विचार करून केवळ मौज म्हणून फटाक्यांवर कमी भर देणेच योग्य आहे.

——————

दिवाळीतला किल्ला

 

कल्पकता आणि निर्मितीची आवड या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सगळ्या माणसांना जन्मजात मिळतात. बहुतेक लहान मुलांमध्ये त्या दिसून येत असतात, पण “इथे पसारा मांडू नकोस, गोंधळ करू नको” असे आदेश देत आणि “तुला लागेल, इन्फेक्शन होईल, आजारी पडशील” अशी भीती दाखवून बरेचसे आईवडील, विशेषतः माता आपल्या मुलांमधल्या त्या उपजत गुणांना दडपून टाकतात हे पाहून मला त्यांची कीव करावीशी वाटते. सुदैवाने माझ्या लहानपणी मला असले काही ऐकावे लागले नाही. तसे आमचे कुटुंब अत्यंत बाळबोध होते आणि धार्मिक परंपरा पाळण्याबद्दल कसलीही तडजोड चालत नसे. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाने करण्याच्या कामात एक शिस्त असायची. पण ती कामे करून झाल्यानंतरही भरपूर मोकळा वेळ मिळत असे आणि तो सर्वस्वी आपला असायचा. मुले काय करताहेत यावर घरातल्या मोठ्या माणसांचे लक्ष असले तरी त्यात त्यांची अडकाठी नसायची. त्यात कुठे खरचटले, चटका बसला, बोट कापले, कपडे मळले, अंग घाण झाले असे व्हायचे. तरीही “नसते उपद्व्याप कशाला करायला गेला होतास?” असे विचारून त्यासाठी पाठीत धपाटा घातला जात नसे. असल्या उद्योगातून काही उपयुक्त किंवा चांगले निष्पन्न झाले तर त्याचे कौतुकदेखील होत असे.

दिवाळीमध्ये करायचा किल्ला म्हणजे आमच्या निर्मितीक्षमतेचा परमोच्च बिंदू असे कदाचित म्हणता येईल. त्याची तयारी वर्षभर चालत असे. त्या काळात आमच्या असल्या हौसेच्या कामाचे शाब्दिक कौतुक होत असले तरी त्यासाठी दिडकीचीसुध्दा आर्थिक मदत मिळत नसे. घरात किंवा आसपास उपलब्ध असलेला कच्चा माल वापरूनच जे काही करायचे ते करावे असा अलिखित नियम होता. रिकाम्या काडेपेट्या, खोके, डबे, बाटल्या, फ्यूज झालेले बल्ब असल्या टाकाऊ वस्तू गोळा करून आम्ही मुले त्यांना अडगळीच्या खोलीत ठेवत असू आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यावर विचारचक्र सुरू होत असे. दिवाळीच्या आठवडाभर आधी त्या बाहेर काढून किल्ल्याच्या रचनेला प्रत्यक्ष सुरुवात होत असे.

आमचे राहते घर पूर्णपणे दगडमातीचे होते. घरातली जमीन, भिंती, माळवद सारे काही मातीपासून बनवलेले होते. घराबाहेर तर जिकडे तिकडे मातीच माती असायची. त्यामुळे पृथ्वी या पहिल्या पंचमहाभूताला सर्वत्र बराच मान होता. मला तरी कधीच मातीबद्दल घृणा वाटली नाही. किल्ला तयार करण्यासाठी आधी दगड, माती, विटा वगैरे जमवून त्याचा ढीग रचायचा. दगडविटांना व्यवस्थितपणे जोडून आणि मातीच्या चिखलाने त्यांना लिंपून घेऊन त्यातून किल्ल्यासाठी हवा तसा आकार निर्माण करायचा. डोंगर, कडे कपारी, गडकोट, सपाट जमीन, पाण्याचे तळे वगैरे भूभाग तयार झाल्यानंतर त्यावर घरे, बंगले, रस्ते, वाहने, माणसे वगैरेंनी त्याला सजवायचे. दिवाळी सुरू होईपर्यंत जेवढा वेळ मिळेल तितका वेळ हे काम चालत असे. आपल्या संग्रहातली सारी चित्रे व खेळणी त्यावर मांडत असू. या किल्ल्याला स्थळकाळाचे कोठलेही बंधन नसायचे. कमळातल्या लक्ष्मीपासून महात्मा गांधींपर्यंत कोणत्याही देवदेवता व ऐतिहासिक व्यक्ती आणि हत्तीघोड्यापासून (न उडणा-या) विमानापर्यंत कोणतेही वाहन त्यात येत असे. त्यांच्या आकारमानात प्रमाणबध्दता किंवा रचनेत सुसंगती असण्याचा प्रश्नच नव्हता.

शाळेत असेपर्यंत आम्ही दरवर्षी दिवाळीला किल्ला बनवत होतो. त्यानंतर ही प्रथा खंडित झाली ती झालीच. माझी मुले लहान असतांना माझ्या ऑफीसला जाण्यायेण्यातच सारा दिवस संपून जात असल्याने मला अवांतर कामासाठी रिकामा वेळच नव्हता आणि आम्ही कॉस्मोपोलिटन वस्तीत रहात असतांना शेजार पाजारी इतरांकडे किल्ला बनतांना दिसत नसल्यामुळे मुलांनीही त्याची मागणी केली नाही.
या वर्षी मी दिवाळीत पुण्याला आलो आहे. या शहराला अजूनही मराठी संस्कृतीचा थोडा स्पर्श शिल्लक असल्यामुळे कुठून तरी माझ्या सात वर्षाच्या नातींना दिवाळीतल्या किल्ल्याचा सुगावा लागला आणि आपल्याकडे तो हवा असा त्यांनी हट्ट धरला. आजच्या पध्दतीनुसार किल्ला कुठे (तयार) मिळतो, त्याचे प्रदर्शन लागले असेल वगैरे वेगळ्या वळणाने चर्चा चालली असतांना चिमुरडी ईरा ठामपणे म्हणाली, “असा बाजारातून किल्ला विकत आणला तर त्यात आपलं काय आहे?”
लगेच तिची तळी उचलून धरत मी म्हणालो, “बरोबर बोललीस. आपण मिळून घरी किल्ला तयार करूया.” तिच्यामुळे आता पन्नास वर्षांनंतर यावर्षी पुन्हा एकदा किल्ला बनवायची संधी मला मिळाली.

दिवाळीला जेमतेम दोनतीनच दिवस उरले असल्यामुळे त्या कामाची सुरुवात तत्परतेने करणे आवश्यक होते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातल्या आधुनिक पध्दतीच्या फ्लॅटमध्ये दगड, माती, विटा, वाळू असले (आता घाणेरडे समजले जाणारे) पदार्थ आणणे म्हणजे अब्रह्मण्यम्. थर्मोकोलपासून पर्यावरणाला असलेल्या धोक्यामुळे तोही नकोच. पर्यावरणाला धोका नसलेल्या कागद, पुठ्ठे, चिंध्या वगैरे पदार्थांपासून जे काही करता येईल तेवढे करायचे ठरवले. लहानपणच्या संवयीनुसार घरातले रिकामे खोके, डबे, बाटल्या वगैरे टाकाऊ वस्तू जमवल्या, चित्रकलेसाठी आणि प्रिंटरसाठी आणलेले कागद घेतले. त्यावर रेखाटन करायचे, त्यांना कात्रीने कापायचे आणि गोंदाने किंवा चिकटपट्टीने जोडायचे असे करत किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, कमान, राजवाडा वगैरे सगळे भाग बनवून त्याला किल्ल्याचा आकार दिला. स्केचपेन आणि रंगीत खडूने त्यांना रंगवून टाकले. पाहता पाहता किल्ला तयारही झाला.

वयोमानाप्रमाणे अधू होत चालेली दृष्टी, थरथरणारी बोटे आणि त्यात पूर्ण ताळमेळ नसणे वगैरेंमुळे आमच्या किल्ल्याला सुबकपणा आला नसेल. ईशा इरा तर असली कामे पहिल्यांदाच करत होत्या. त्यांच्याकडून कौशल्याची अपेक्षा नव्हती. पण आजकालच्या एका जाहिरातीत येते त्याप्रमाणे “टेढा है, पर मेरा है।” या भावनेने आम्ही सारे या किल्ल्यावर खूप खूष आहोत.

(हा लेख दोन वर्षांपूर्वी लिहिला होता.)

लक्ष्मीपूजन

आमच्या घरी वडिलोपार्जित गडगंज मालमत्ता नव्हती, पण आमची गणना खाऊन पिऊन सुखी लोकात होत असे. मौसमानुसार जी कांही धान्ये, भाजीपाले आणि फळफळावळ वगैरे त्या भागात मुबलक आणि स्वस्तात किंवा फुकट उपलब्ध होत असत ती भरपूर प्रमाणात घरी यायची, पाककौशल्याने त्यांतून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होऊन पानात पडायचे आणि अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत सर्वजण ते चवीने पोटभर खात असत. रोज लहान मुलांना दूध प्यायला मिळायचे, जेवणात ताक असायचे, आल्या गेल्यांसाठी चहा कॉफी व्हायची आणि मोसमानुसार आंब्याचे पन्हे किंवा लिंबाचे सरबत बनायचे. आमची पेयसंस्कृती एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे खाऊनपिऊनचा अर्थ सुध्दा एवढाच होता. आमचा उद्योग व्यवसाय वगैरे नसल्यामुळे माझ्या वडिलांना दर महिन्याला जेवढा पगार मिळत असे आणि वर्षाला स्केलप्रमाणे इन्क्रिमेंट मिळत असे त्यापेक्षा जास्त धनप्राप्ती होण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे लक्ष्मीमाता आमच्यावर प्रसन्न झाली असती तरी तिने कशा रूपाने आम्हाला घबाड दिले असते ते समजत नाही. अर्थातच त्या काळात असा विचारही कोणी करत नसे.

त्या मानाने सरस्वतीची आमच्या घरावर जास्त कृपा असावी. सगळ्याच मुलांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे आणि त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे ती शाळेत हुषार समजली जायची. त्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे असे सतत त्यांच्या मनावर बिंबवले जात असे आणि एकदा ते मोठे झाले की लक्ष्मीची कृपाही त्यांच्यावर होईलच अशी आशा वाटत असे. त्यामुळे आम्ही सगळी मुले मनोमनी सरस्वतीचे उपासक होतो. पण देवी शारदेची प्रत्यक्ष पूजा मात्र फक्त शाळेतच केली जात असे. घरात सरस्वतीची प्रतिमा नव्हतीच. तिच्या चित्राला कधी हार घातल्याचे मला आठवत नाही. दर वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अत्यंत उत्साहाने केले जात असे.

पूजेच्या देव्हा-यात अंबाबाईची मूर्ती असली तरी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासाठी वेगळा चांदीचा शिक्का होता. तो कोठीतून बाहेर काढून चिंच आणि रांगोळीने घासून लखलखीत केला जायचा. ताट, वाट्या, पेले, तबक, निरांजने, कुंकवाच्यी कोयरी, पळी पंचपात्र वगैरे सर्व चांदीची भांडी काढून तीही स्वच्छ केली जात. संध्याकाळ झाली की एका चौरंगावर देवीची आरास करायची. चांदीच्या नाण्याच्या शेजारी एक दोन सोन्याचे अलंकार ठेवायचे. त्या सर्वांची साग्रसंगीत शोडशोपचार पूजा केली जायची. त्या वेळी घरातली सर्व मंडळी नवे कपडे आणि ठेवणीतले दागदागिने अंगावर चढवून त्या काळात जितके शक्य असेल तितके नटून थटून त्या जागी उपस्थित होत असत. दरवर्षी दिवाळीला घरी कोणी ना कोणी पाहुणे असतच. तेसुध्दा सालंकृत होऊन पूजेला येऊन बसत. डाळिंबे, सीताफळे यासारखी एरवी आमच्या भागात न दिसणारी फळे लक्ष्मीपूजनासाठी मुद्दाम शहरातून मागवली जात. केळी, चिकू, संत्री, मोसंबी वगैरे असतच. एका ताटात विविध प्रकारची फळे मांडून ठेवली जात तर दुस-या ताटात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुका मेवा नैवेद्यासाठी मांडून ठेवलेला असे. पेढे बर्फी वगैरे मिठाई असेच. साळीच्या लाह्या आणि बत्तासे असणे अत्यावश्यक असे. असा इतका आकर्षक प्रसाद समोर दिसत असला तरी आमचे लक्ष तिकडे नसायचे. ही पूजा संपली रे संपली की आम्ही अंगणात धूम ठोकून फटाके उडवायला सुरुवात करत असू.

मागल्या वर्षी आम्ही दिवाळीला अमेरिकेत होतो. पण तिथेसुध्दा लक्ष्मीपूजन केलेच. त्यासाठी काय काय लागते याची यादी करून आणि ते कुठे मिळते याची चौकशी करून त्यातल्या बहुतेक गोष्टी पैदा करून ठेवल्या. फटाकेसुध्दा आणले होते, पण अमेरिकेतल्या प्रदूषणाच्या नियमात ते उडवणे बसेल की नाही याची भीती असल्यामुळे ते उडवायचा धीर झाला नाही. पूर्वीपासून अमेरिकेत राहणारे दुसरे कोणी आधी सुरुवात करेल याची वाट आम्ही पहात होतो, पण ती झालीच नाही.

दिवाळी कशासाठी?

दीपावली २२

येणार येणार म्हणता दिवाळी आली सुध्दा. भारताच्या महाराष्ट्रासह बहतेक सगळ्या भागात या सणाची पूर्वतयारी कधीच सुरू झाली आहे, आज हा आनंदोत्सव सुरू झाला आहे. आपल्याला दिवाळीमुळे कां आनंद व्हावा या प्रश्नाचे पटकन उत्तर देणे तसे कठीण आहे. हा सण कशासाठी साजरा करायचा यासंबंधी कांही आख्याने आहेत. दुष्ट नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने ज्या हजारो स्त्रीपुरुषांना बंदीवासातून मुक्त केले त्यांना त्या वेळी खूप आनंद झाला असेल आणि बळीराजाला बटु वामनाने पाताळात पाठवून दिल्यामुळे भयमुक्त झालेल्या देवादिकांना दिलासा मिळाला असेल, पण पुराणकाळात असंख्य राक्षस, दैत्य आणि असुर होऊन गेले आणि देवाने किंवा देवीने प्रकट होऊन त्यांचा निःपात केला, त्या सगळ्यांची आपण अशी आठवण ठेवत नाही. त्यातही बंगालमधल्या दुर्गापूजेत महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीची स्थापना करून आराधना केली जाते आणि उत्तर भारतीय लोक दसऱ्याला रामलीला व रावणदहन यातून तो पौराणिक काळ उभा करतात. पण दिवाळीच्या दिवसात आपण श्रीकृष्ण किंवा वामनाची पूजा करत नाही आणि नरकासुर किंवा बळीराजाचा साधा उल्लेखसुध्दा होत नाही. मग हा आनंदोत्सव कशासाठी? दुःख किंवा बंधनातून मुक्ती मिळतांना जो आनंद होतो तो त्या दुःखाच्या तीव्रतेवर आणि बंधनाच्या जांचकपणावर अवलंबून असतो. नरकासुर किंवा बळीराजा यांच्यामुळे आपल्याला त्रासच झाला नाही तर त्यापासून मुक्तीचा आनंद तरी कसा वाटणार? त्यामुळे ही कारणे फारशी सयुक्तिक वाटत नाहीत.

इतर असंख्य प्रकारे सुध्दा आपल्याला आनंद मिळत असतो. सुरेख दृष्य, मधुर आवाज, सुगंध, चविष्ट पदार्थ आणि कोमल स्पर्श आपल्या शरीराला सुखवतात. कथा, कविता, वर्णने वगैरे वाचतांना त्यात मन रमते, रहस्याचा उलगडा करताना बुध्दी संतुष्ट होते अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुळात माणसाला आनंद हवाच असतो आणि तो मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चाललेले असतात. आनंद प्राप्त झाल्यावर तो व्यक्त करण्यातसुध्दा मजा असते. हे जर नेहमीचेच असले तर त्यासाठी दिवाळी कशाला हवी?

आनंद ही व्यक्तीगत भावना असल्यामुळे तो ज्याला त्याला आपापल्या मनात होत असतो, पण इतरांच्या सहवासात तो व्यक्त केला तर जास्त मजा येते. यामुळेच वाढदिवसापासून बढतीपर्यंत अनेक घटना आपण एकत्र येऊन साजऱ्या (सेलिब्रेट) करतो. पण हा सुध्दा तसा लहानसा ग्रुप असतो. एकादा सण सर्व समाजाने ठरवून एकाच दिवशी साजरा केला तर तो असंख्यपटीने मोठ्या प्रमाणात होतो. या कारणाने असे सण एकाच वेळी सर्व समाजाने साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. दिवाळीपर्यंत पावसाळा संपून नद्यांना आलेले पूर ओसरलेले असतात. त्यामुळे दळणवळण पूर्ववत झालेले असते. खरीप पिके हातातोंडाशी आलेली असल्यामुळे त्यासाठी केलेल्या श्रमांचे सार्थक होतांना दिसत असते. हे कृषीउत्पन्न बाजारात येणार असल्यामुळे व्यापारी खुषीत असतात. हवामान प्रसन्न असते. अशा सगळ्या दृष्टीने हा कालखंड सर्वांना सोयीचा असल्यामुळे दिवाळीचा सण लोकप्रिय झाला असावा.

आता आजच्या नागरी समाजजीवनात यातल्या कशाचेच विशेष महत्व राहिले नाही. त्यामुळे दिवाळी म्हणजे ठरवून केलेली मौजमजा हाच अर्थ उरला असला तरी धमाल करून सण साजरा करण्यासाठी तो पुरेसा आहे. दिवाळीचे प्रसन्न वातावरण निर्माण करणाऱ्या कवी यशवंत देव यांच्या एका गीताच्या कांही ओळी खाली दिल्या आहेत.

दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

दीपोत्सव

“असतोमासद्गमय। तमसोमाज्योतीर्गमय। मृत्योर्माअमृतंगमय।” असे आदर्श मानवी जीवनाचे त्रिसूत्र आपल्या प्राचीन वाङ्मयात दिलेले आहे. यातली पहिला म्हणजे सत्याची कास धरून नेहमी सदाचाराचे पालन करण्याचा सन्मार्ग आदर्श असला तरी कांही प्रसंगी व्यावहारिक दृष्ट्या तो बिकट वाटतो. सर्वसामान्य माणसाला मिथ्या किंवा फसव्या प्रलोभनांचा मोह आवरता येत नाही. सदाचरणाचे सुपरिणाम दूरगामी असतात, ते लगेच दिसत नाहीत. कीर्तीरूपे अजरामर होण्याचा तिसरा रस्ता तर अडचणींचे पहाड फोडून स्वतःच तयार करावा लागतो आणि ते सर्वांना शक्य नसते. शिवाय तेवढे कष्ट करणा-याला त्याचे फळ प्रत्यक्ष मिळत नाहीच. दुसरा मार्ग तुलनेत सोपा आहे. एक लहानशी ज्योतसुध्दा आसपासचा आसमंत उजळून टाकते आणि त्या उजेडात आपण न ठेचकाळता मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे जीवनाचा हा दुसरा मार्ग हा सर्वसाधारण माणसाला अवलंबता येतो आणि त्याची फळे लगेच दिसू लागतात. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि इच्छा असेल तेवढी मजल त्या मार्गावर मारणे शक्य असते. या वचनात तमस याचा अर्थ फक्त रात्रीचा काळोख एवढ्यापुरता मर्यादित नसून सर्व प्रकारच्या अंधारांचा समावेश त्यात होतो. अज्ञान, भय, निराशा आदींमुळे मनात दाटलेला अंधःकार जास्तच भीषण असतो. ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला हित आणि अहित समजल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन त्यानुसार प्रगती करू शकतो. अज्ञात गोष्टींबद्दल वाटणारी भीती त्याची माहिती मिळाल्यावर कमी होते किंवा नाहीशी होते, निराशेने ग्रस्त झाले असतांना आशेचे किरण दिसल्यावर मनाला केवढी उभारी येते!

एका दिव्याचा उजेडसुध्दा काळ्याकुट्ट अंधारातून एक छान दृष्य अनुभव आपल्याला देतो, तर दिव्यांची रांगच लावली तर ती पाहून किती मजा येईल? आश्विन महिन्यातल्या कोजागरी पौर्णिमेला चंद्राच्या पिठुर चांदण्याचा अनुभव घेतल्यानंर येणा-या अमावास्येची काळोखी रात्र दिव्यांनी उजळून टाकण्याची कल्पना ज्या कोणाला सुचली असेल त्याचे कौतुक वाटते. आजकाल विजेच्या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशात आपण रोज रात्री पडणारा अंधार आपल्यापुरता तरी मिटवून टाकला आहे, पण शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजही अनेक खेड्यापाड्यांपर्यंत वीज पोचलेली नाही किंवा भारनियमनामुळे ती असून नसल्यासारखी असते, पण उजेड पाडण्यासाठी तेथे रॉकेलचे कंदील तरी असतात. पूर्वीच्या काळात तेसुध्दा नव्हते. समई, निरांजन किंवा पणतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे दिसेल तेवढ्यावरच समाधान मानून घ्यावे लागत असे. फारच महत्वाचे काम असले तर दिवटी किंवा मशाल पेटवीत असत. अशा काळातल्या गडद अंधारात पणत्यांची रांग करून केलेली आरास, उंच काठीवर बांधलेला आकाशदिवा वगैरे फारच मनोहर दिसत असणार.

काळानुसार प्रगत झालेल्या तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या काळोखाचा गडदपणा कांहीसा कमी झाला आहे आणि जास्त लखलखीत उजेड पाडण्याची साधने उपलब्ध झाली आहेत. विजेने उजळणा-या दिव्यांच्या माळा अधिकाधिक प्रखर होत आहेत, त्यांची होत असलेली उघडझाप आणि बदलते रंग यांतून त्या अधिकाधिक आकर्षक होत आहेत. आतिशबाजीचे नवनवे प्रकार निघत आहेत. जमीनीवरून आभाळात उंचवर उडणारी प्रकाशाची झाडे अधिकाधिक रंगीबेरंगी होत आहेतच, पण आधी आकाशात उंच उडून तिथून खाली रंगीबेरंगी ठिणग्यांचा वर्षाव करणारे अग्निबाण खूपच नयनमनोहर दिसतात. तेजाची ही सगळीच रूपे अत्यंत विलोभनीय वाटतात.

माझ्या जन्माआधी आलेल्या शेजारी या चित्रपटातल्या या गाण्यात तेजाच्या या न्यारी दुनियेचे किती छान वर्णन केले आहे?

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती हा हा हा !
चला धरू रिंगण, गुढी उभी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
गातसे चंद्र तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम हा, हा !
झोत रुपेरी, भूमीवरी गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कण कण उजळीत, हासत हसवीत
सरीतील गार हा हा हा !
आनंदुन रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी कुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या या या !

आली दिवाळी – भाग ५

पूर्वीच्या काळातल्या कुटुंबप्रमुखांचा दरारा एकाद्या सर्वसत्ताधीशासारखा असायचा. त्यांना विरोध करण्याची तर कोणाची प्राज्ञा नसायचीच, पण एरवीसुध्दा घरातले लोक त्यांच्यासमोर थोडे धांकातच उभे रहात असत. त्यात दिवाळीतला पाडवा हा खास कुटुंबप्रमुखांचा दिवस असे. मात्र त्यांचे प्रेमळ कुटुंबवत्सल रूप त्या दिवशी सर्वांना जवळून पहायला मिळत असे.
त्या दिवशी ओवाळणीचा मोठा समारंभ होत असे. अग्रपूजेचा मान माझ्या वडिलांचा असे. माझी आई, बहिणी, वहिन्या वगैरे घरातील सर्व सुवासिनी त्यांना ओवाळून घेत, तसेच सर्व लोक वांकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत. कुणाच्या पाठीवरून हात फिरवून, कुणाला जवळ घेऊन, लहान मुलांना मांडीवर बसवून घेऊन ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करीत. चांगल्या कामाचे कौतुक करून त्याला शाबासकी देत. शुभाशीर्वादाबरोबर सर्वांना कांही बक्षिस किंवा खाऊसुध्दा मिळत असे. त्यानंतर पतिपत्नींच्या जोड्या यथानुक्रमाने येत. आपापल्या पतीला ओवाळून बायका त्यांच्याकडून एकादा दागिना किंवा उंची साडी अशी मौल्यवान भेटवस्तू मिळवीत आणि लगेच ती परिधान करून येत. त्याचे सर्वांकडून तोंड भरून कौतुक होत असे.

उखाण्यात नांवे घेऊन या कार्यक्रमाची सांगता होत असे. आजी झालेल्या ज्येष्ठ महिलादेखील या वेळी वक्त सिनेमातल्या अचला सचदेवला लाजवतील एवढ्या लाजून चूर होत. नव्या नव-या एकादा उखाणा घोकून आलेल्या असल्या तरी आयत्या वेळी गोंधळून जाऊन तो न आठवल्यामुळे “समोरच्या कोप-यात उभी व्हिंदमाता .. ” यासारखे कांहीतरी होत असे. पण अनुभवी स्त्रिया त्यांना लगेच सांवरून घेत. त्यामुळे “…चे नांव घेते तीन गडी राखून ” असले मात्र कांही होत नसे.

भाऊबीजेचा दिवस खास बंधुभगिनी प्रेमाचा. खूप मंडळी जमा झालेली असल्यामुळे घरातल्या प्रत्येक मुलाला १-२ वर्षाच्या चिमुरडीपासून १-२ मुलांची आई झालेल्या ताई, माई, अक्कापर्यंत लहानमोठ्या बहिणी असत, त्याचप्रमाणे प्रत्येक बहिणीला तान्ह्या बाळापासून मिशी फुटलेल्या दादापर्यंतचे भाऊ असत. भावंडांमध्ये चुलत, मावस, आत्ते, मामे असा भेदभाव होत नसला तरी सख्ख्या बहीणभावांचे प्रेम जरा जास्त उतू जात असे. सकाळपासूनच सगळ्या भावांचे लाड सुरू होत असत. जेवणातसुध्दा याच्या आवडीची अमकी भाजी हिनं मुद्दाम बनवली आणि त्याला आवडते म्हणून तमकी कोशिंबीर तिनं केली आहे वगैरे आवर्जून सांगितले जात असे आणि त्यावरून थोडासा प्रेमळ संवादही होत असे.

भाऊबीजेच्या ओवाळणीचा कार्यक्रम थाटात होत असे. आधी समस्त बालगोपाल नवे कपडे घालून एकसाथ रांगेने पाटावर बसत. मुलीसुध्दा चांगल्या नटून थटून तयार होत. मोठी झालेली एक एक मुलगी एक दोन लहान मुलींना हाताशी धरून सर्व भावांना ओवाळीत असे. ओवाळणी घालण्यासाठी प्रत्येक मुलाच्या हातात बंद्या रुपयांची नाणी देऊन ठेवलेली असत. ती कमी पडलीच तर पहिल्या फेरीत ताटात टाकलेली नाणी उचलून पुढील फेरीत घालण्यासाठी पुन्हा उपयोगात आणत. या वेळी कपाळाला कुंकवाचा टिळा लावणे, निरांजनाने ओवाळणे, डोक्यावर अक्षता टाकणे वगैरे क्रियांना महत्व असे. त्या व्यवस्थित झाल्याच पाहिजेत. कोणाला कोणी किती ओवाळणी घातली याला कांही महत्व नव्हते. मुलांच्या ओवाळण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या माणसांचा होई. त्यात मिळालेली ओवाळणी मात्र बहिणी ठेऊन घेत आणि आपल्याबरोबर घेऊन जात.

भाऊबीजेबरोबर दिवाळीची सांगता होत असे आणि परगांवी जाणा-यांची घाई सुरू होई. किरकोळ रजा टाकून आलेल्या लोकांना कामावर हजर व्हायचेच असल्यामुळे लगेच निघावेच लागे. मुलांच्या शाळा सुरू व्हायला दोन चार दिवस वेळ असेल तर त्यांना राहण्याचा आग्रह केला जाई आणि त्याला मान देऊन त्यांचा मुक्काम एक दोन दिवसाने वाढत असे. ज्यांना कसलेच वेळेचे बंधन नसेल अशा पाहुण्यांना थांबवून घेतले जाई. “आज अमका वार आहे “, “तमकी तिथी आहे “, “एका दिवशी तीघांनी तीन दिशांना जायचे नसते “, ” आभाळात ढग दिसताहेत” अशी वेगवेगळी कारणे त्यासाठी दिली जात. कॉलेजात शिकण्यासाठी शहरात राहणा-या मुलांना स्वतःलाच परत जाण्याची घाई नसे. ती आपण होऊनच शक्य असेल तोंवर रेंगाळत. आठवडाभरात आमच्या शाळा उघडत, सगळी पाहुणे मंडळी परतून गेलेली असत आणि नेहमीचे रूटीन सुरू होऊन जाई.

त्या वेळची सर्व मुले मोठी होऊन नोकरीला लागली आणि दहा दिशांना पांगली. मागची पिढी काळाच्या पडद्याआड गेली. गांवातल्या वाड्याची देखभाल करायला कोणी राहिले नाही. त्यामुळे तोही विकला गेला. दिवाळीला सगळ्यांनी एकत्र जमायला जागाच राहिली नाही. आधी आधी दोन किंवा तीन भावंडे कोणाकडे तरी जमत असू. संसाराचा व्याप वाढत गेला तसे तेही जमेनासे झाले. आपापल्या घरकुलात राहूनच दिवाळी साजरी करू लागलो.

आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दर दिवाळीला घरात एकादी मोठी वस्तू येऊ लागली, चांगल्या प्रतीचे फॅशनेबल कपडे, त-हेत-हेच्या मिठाया, लहानपणी दृष्टीलाही न पडलेले सुके मेवे वगैरे गोष्टी घरी येऊ लागल्या. झगमगत्या रंगीबेरंगी दिव्याच्या माळांनी बाल्कन्या उजळून उठल्या, त्यांच्यापुढे मिणमिणत्या पणत्यांना पूर्वीएवढे महत्व राहिले नाही. नाना प्रकारचे चित्रविचित्र फटाके उडवले जाऊ लागले. दिवाळीत सर्वांच्या अंगात तेवढाच उत्साह असायचा, पुढल्या पिढीतली मुले त्यात मनसोक्त रंगायची, मी सुध्दा त्यांच्या आनंदात सहभागी होत राहिलो. पण लहानपणी खूप लोकांनी एकत्र येऊन दिवाळीचा सण साजरा करण्यात जी अपूर्व मजा येत होती त्याची सर कितीही पैसे खर्च करून येण्यासारखी नाही असे मात्र मनात कुठे तरी वाटायचे.

. .. .. . . . . . .. . . . . .. . . . . . .. . . (समाप्त)

आली दिवाळी – भाग ४

दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा म्हणजे ‘बडा खाना’, ‘ग्रँड फीस्ट’ किंवा ‘मेजवानी’चा दिवस। त्या काळात प्रचलित असलेल्या पक्वानांचे वर्गीकरण केले तर श्रीखंड आणि बासुंदी हे सर्वोत्कृष्ट श्रेणीतले पदार्थ, साखरभात, पुरणपोळी, बेसनाचे लाडू वगैरे उत्कृष्ट श्रेणीत आणि लग्नाच्या जेवणात हमखास असणारे जिलबी आणि बुंदीचे लाडू ही लोकमान्य पक्वान्ने असत. पुरणाचे ‘कडबू’ आणि ‘हुग्गी’ या नांवाची गव्हाची खीर हे आमच्या भागातले कानडी पध्दतीचे प्रकार याच श्रेणीत मोडत. शेवयाची खीर, शिरा यासारखे पदार्थ बनवण्यासाठी सणासुदीची वाट पहायची गरज नसायची. सहज केंव्हाही मनात आले की ते पटकन केले जात असत. ते लोकमान्य असले तरी ते मेजवानीत असलेच तर दुय्यम स्थानावर असत. त्याशिवाय खास उपवासाचे, फराळाचे, बाळंतिणीला किंवा लहान मुलांना पौष्टिक म्हणून देण्याचे असे निरनिराळे असंख्य गोडाधोडाचे पदार्त असले तरी ते मोठ्या मेजवानीत सहसा केले जात नसत. पेढे, बर्फी वगैरे मिठाया जेवणात वाढल्या जात नसत. फ्रूट सॅलड, कस्टर्ड, आइस्क्रीम वगैरे नाविन्यपूर्ण पदार्थ हौस म्हणून कधी तरी केले जात. बंगाली चमचम, सोंदेश किंवा उत्तर भारतातल्या हलवायांच्या विविध मिठाया अजून घरी तयार केल्या जात नव्हत्या आणि त्या गांवातल्या बाजारातही मिळत नव्हत्या.

पाडव्याच्या मेजवानीत श्रीखंडपुरीचा बेत हे जवळ जवळ ठरूनच गेले होते। इतक्या माणसांसाठी पोटभर श्रीखंड बनवणे हेसुध्दा एक आव्हानच असे. त्या काळात चितळे, वारणा किंवा अमूलचे श्रीखंडाचे डबे आणून ते फ्रीजमध्ये ठेवायची सोय नव्हती. जितके श्रीखंड करायचे असेल त्याच्या तीन चारपट दूध आदल्या दिवशी आणून ते तापवायचे, त्याला चिनी मातीच्या बरणीत किंवा मातीच्या मडक्यात विरजण लावून ठेवायचे, दही जमताच त्याला पंच्यात बांधून खुंटीला टांगून ठेवायचे आणि अखेर ते पंच्यातले चक्क्याचे गोळे एकत्र करून त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, केशर वगैरे चांगले मिसळायचे, जायफळ उगाळून त्याची पेस्ट त्याला लावायची, त्यावर चारोळ्यांचे दाणे पसरायचे वगैरे सारे सोपस्कार केल्यानंतर ते श्रीखंड बनायचे. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातली कोणतीही कृती वेळेवर केली नाही तर घोटाळा होण्याची शक्यता असते. सगळी अवधाने सांभाळून अखेर ज्या वेळी ते पानात वाढले जाईल त्या वेळी त्या श्रीखंडाला नेमका हवा तितकाच आंबटपणा आणि गोडवा आला म्हणजे मिळवली.

कोठल्याही सणासुदीला नैवेद्यासाठी शेवयाची खीर आणि पुरण असायलाच हवे अशी प्रथा त्या काळी होती। श्रीखंड हे मुख्य पक्वान्न झाले. नैवेद्याच्या ताटात एकादा लाडू, मोदक किंवा शि-याची मूद ठेऊन ‘पंच’पक्वान्नाचा आंकडा साधला जात असे. जेवणावळीसाठी केळीची पाने आणून, त्यांना बरोबर सारख्या आकारात कापून ती मांडली जात. शक्यतो प्रत्येक पानाभोवती कमानीची रांगोळी काढली जाई. यात आपापली कला दाखवण्याची चुरस असे. अगदीच वेळ कमी पडला तर उरलेल्या पानांभोवती रांगोळी घालण्याच्या यंत्राने पट्टे ओढत. त्यात फुले आणि वेलबुट्ट्यांची नक्षी निघत असे.

पानांत कोणते अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने आणि कोणत्या जागेवर वाढायचे याचे नियम ठरलेले होते। केळीच्या पानाच्या डाव्या भागात सर्वात वर मीठ आणि लिंबाची फोड ठेवायची. त्यानंतर अनुक्रमाने कुटलेली सुकी चटणी, वाटलेली ओली चटणी, कोशिंबीर, भरीत, चटका वगैरे दुय्यम तोंडी लावणी असत. अखेरीस तळलेले सांडगे, पापड्या, कुरडया, भजी वगैरे कुरकुरीत पदार्थाने डावी बाजू सजत असे. उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आमटीचा द्रोण ठेवलेला असे. भोपळा किंवा वांग्याच्या भाजीतल्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी करून कांही लोक या नावडत्या भाज्या खाणे टाळत. बटाट्याची सुकी भाजी हवीच, जोडीला फ्लॉवरचा रस्सा किंवा एकादी सैलशी पालेभाजीही असे. आग्नेय बाजूला भाताची पांढरी शुभ्र मूद अलगद हाताने ठेवून तिच्यावर पिवळ्या धम्मक वरणाने ‘आइसिंग’सारखी सजावट करीत. त्यावर पळीभर तूप वाढले की पहिले वाढणे संपले.

‘वदनी कवळ घेता …..’ श्रीहरीचे नांव घेऊन ‘यन्तुनदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाओषधयो भवन्तु। …….’ अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे। त्यातसुध्दा पहिल्या घासात खीर संपवायची, त्यानंतर लिंबाची फोड वरणभातावर पिळायची, त्यावर द्रोणातली आमटी ओतून भात कालवून घ्यायचा हा जेवण सुरू करण्याचा अलिखित क्रम ठरलेला असायचा. त्यानंतर हवा तो पदार्थ खायला मोकळीक होत असे. तोंपर्यंत भात वरण आणि तूप वाढायला येत असे. पुढे श्रीखंडपुरी येणार हे ठाऊक असल्यामुळे सहसा कोणी तो घेत नसे. ‘पांढ-या’ भाताच्या पाठोपाठ ‘काळा’ किंवा मसालेभात येई तो मात्र आवडीने घेऊन खाल्ला जात असे. बटाटा, वांगी, तोंडली वगैरेंच्या फोडी घातलेला मराठी मसालेभात व्यवस्थित रीतीने केला तर फ्राइड राईस, पुलाव किंवा बिर्याणीपेक्षाही अधिक चविष्ट लागतो असे माझे मत आहे.

भातप्रकरण शक्यतों झटपट आवरून गाडी श्रीखंडपुरीच्या मुख्य रुळांवर येत असे। त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन “अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव। ” असा आशीर्वाद देऊन पानावरून उठत.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग ५ : https://anandghare2.wordpress.com/2010/11/04/%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%ab/