भगवान श्रीपरशुराम

भगवान परशुराम

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

“जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येईल तेंव्हा त्याला प्रस्थापित करण्यासाठी मी जन्म घेईन” असे स्वतः विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश करतांना सांगितले होते. श्रीकृष्णाच्या काळात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे नावांचे धर्म (रिलिजन्स) अस्तित्वात नव्हते. त्यामुळे गीतेमधल्या ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ वेगळा होता. सर्वांच्या हिताची वागणूक असा तो होता. “धर्माला प्रस्थापित करणे म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा पाडाव करून त्यात चांगुलपणा आणणे” असा बहुधा त्या श्लोकाचा आशय असेल. निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी प्रबळ आणि उन्मत्त झालेल्या दुष्ट असुरांना नष्ट करण्यासाठी देव आणि देवतांनी अवतार घेतल्याच्या असंख्य कथा पोथ्यापुराणात आहेत, तसेच भारतभरातल्या गावोगावी असलेल्या देवस्थानांविषयी अशा आख्यायिका सांगितल्या जातात. विष्णूच्या प्रसिध्द दशावतारातल्या मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या पाच अवतारात आवश्यक त्या क्षणी तो अवतार प्रगटला आणि अवतारकार्य संपल्यानंतर अंतर्धान पावला. राम आणि कृष्ण या दोन अवतारात मात्र त्यांच्या जन्माच्याही आधीपासून ते अवतारसमाप्तीपर्यंत सुसंगत अशी चरित्रे उपलब्ध आहेत. बौध्द धम्मातील पुराणानुसार बुध्दानेच अनेक अवतार घेतले आणि गौतम हा त्यातला अखेरचा होता. त्याने स्थापन केलेल्या धर्माला वैष्णवपंथी आचार्यांनी हिंदू धर्मामधून बाहेर ढकलले. त्यामुळे कट्टर हिंदू लोक त्याला विष्णूचा अवतार मानायला तयार होतील यात शंका आहे. शिवाय पंढरपूरचा विठोबा हाच विष्णूचा नववा अवतार आहे असेही महाराष्ट्रातले काही लोक मानतात. इतर प्रांतात अशाच प्रकारच्या आणखी काही समजुती असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे दशावतारातल्या बुध्द या नवव्या अवताराबद्दल मतभेद आहेत. दहावा कल्की अवतार अजून कधी येणार आहे कोण जाणे. सहावा परशुराम अवतार या सर्वांहून वेगळा आहे. त्याचे सुसंगत असे चरित्र सापडत नाही, पण अनेक तुटक तुटक कथांमध्ये त्याचा उल्लेख येतो. आमच्या शाळेचेच नाव परशुरामभाऊ हायस्कूल असे असल्यामुळे परशुराम हे नाव माझ्या चांगलेच परिचयाचे होते आणि त्याच्या कथांबद्दल उत्सुकताही वाटत होती. मी संस्कृत भाषेतल्या कुठल्याच पुराणाचा अभ्यास केलेला नाही. लहानपणापासून कानावर पडलेल्या आणि वाचनात आलेल्या गोष्टींवरून परशुरामाबद्दल मला समजलेल्या चार ओळी लिहिल्या आहेत.

मी शाळेत असतांना बसच्या एका प्रवासात आमची गाडी कर्नाटकातल्या संवदत्ती नावाच्या गावी बराच वेळ थांबली होती. त्या ठिकाणी यल्लम्मा देवीचे मुख्य मंदिर आहे. ही यल्लम्मा म्हणजेच रेणुका ही जमदग्नी ऋषीची पत्नी होती. रोज पहाटे उठून नदीकाठी जायचे, तिथल्या रेतीचा घ़डा तयार करायचा आणि तो पाण्याने भरून घरी न्यायचा असा तिचा दिनक्रम होता. तिच्या ठायी असलेल्या पातिव्रत्याच्या अद्भुत शक्तीमुळे तिला हे शक्य होते. एकदा ती रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा राजा तिथे आपल्या राण्यांसमवेत जलक्रीडा करत होता. हे दृष्य पाहून तिचे मन विचलित झाले आणि ती रेतीपासून घडा तयार करू शकली नाही. अनुष्ठानाला बसलेल्या जमदग्नी ऋषींना त्यासाठी हवे असलेले उदक मिळाले नाही. रेणुकेला रिकाम्या हाताने घरी परत आलेले पाहून जमदग्नी ऋषी कृध्द झाले आणि या पातकासाठी त्यांनी तिला देहांताची शिक्षा सुनावली. ती शिक्षा अंमलात आणण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. एकामागोमाग एका मुलाने मातेचा वध करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनाही मृत्यूदंड फर्मावला. अखेर परशुरामाने पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून आई आणि भावांचा शिरच्छेद केला. जमदग्नींनी त्यावर प्रसन्न होऊन परशुरामाला एक वर मागायला सांगितले. त्याने आपल्या आई आणि भावांना पुन्हा जीवंत करण्याचा वर मागून त्यांना जीवनदान दिले. ही सगळी कथा संवदत्ती येथे मलप्रभा नदीच्या किनारी घडली अशी तिथल्या लोकांची समजूत आहे. पण ती गंगा नदीच्या किनारी घडली असेही नंतरच्या काळात माझ्या वाचण्यात आले.

“विनाशाय च दुष्कृताम् ।” हे परशुरामाचे मुख्य अवतारकार्य होते. त्या काळातल्या सहस्त्रार्जुन राजाने तपश्चर्या करून हजार बाहू प्राप्त केले होते. त्यामुळे तो अतीशय उन्मत्त झाला होता आणि त्या गुर्मीमध्ये प्रजेवर अत्याचार करत होता. एकदा तो आपल्या सैन्यासह शिकारीला निघाला असतांना जमदग्नी मुनींच्या आश्रमात जाऊन पोचला. तिथे त्या सर्वांचा आदरसत्कार झाला आणि त्यांना भोजनही मिळाले. पण ज्या कपिला गायीच्या सहाय्याने हे साध्य झाले होते तिलाच तो राजा बळजबरीने आपल्यासोबत घेऊन गेला. परशुरामाला हे समजल्यावर त्याला राजाच्या या कृत्याचा संताप आला आणि त्याला त्याचा जाब विचारायला गेला. त्या दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले आणि परशुरामाने आपल्या परशूने सहस्रार्जुनाचे हजार हात कापून त्याला ठार मारले. याचा सूड घेण्यासाठी त्याच्या पुत्रांनी ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नीची हत्या केली. यामुळे परशुरामाचा राग अनावर झाला आणि त्याने सहस्रार्जुनाचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा करून एकवीस वेळा त्याच्या कुळामधील सर्व पुरुषांचा संहार केला. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीला ‘निक्षत्रिय’ बनवले असे सांगण्यात येते, पण ते बरोबर वाटत नाही. कारण जनक हा परशुरामाचा मित्र क्षत्रिय राजाच होता. विष्णूचा पुढचा श्रीरामचंद्र हा अवतार क्षत्रियांच्या रघुवंशातच झाला आणि त्या काळातसुद्धा परशुरामही होतेच.

परशुरामाने कठोर तपश्चर्या करून अनेक देवांना प्रसन्न करून घेतले होते. शंकराकडून त्याला परशू हे शस्त्र मिळाले आणि त्याने त्याचा उपयोग अनेक वेळा केला म्हणून त्याला परशुराम हे नाव मिळाले. याशिवाय भृगू ऋषींच्या कुलातला म्हणून भार्गव किंवा भार्गवराम असेही संबोधले जाते. शंकराकडूनच शिवधनुष्य आणि विष्णूकडून वैष्णव धनुष्यसुध्दा परशुरामाला मिळाले होते. परशुराम हा शस्त्रांस्त्रांच्या विद्येत पारंगत होता. त्याने एकट्याने सर्व भूमी जिंकून घेतली, पण त्याला सत्तेचा किंवा संपत्तीचा लोभ नसल्यामुळे त्याने ती कश्यप ऋषींना दान करून टाकली. त्यानंतर समुद्राला मागे हटवून तयार झालेली कोकणची नवी किनारपट्टी समुद्राकडून घेतली आणि त्यातल्या महेंद्र पर्वतावर जाऊन एका कुटीत राहू लागला. चिपळूणजवळ हा डोंगर आहे. तिथे परशुरामाचे पुरातन देऊळ आहे. त्या भागाला लोटे परशुराम असे नाव आहे. आम्ही एकदा कारवारला जात असतांना वाटेत चिपळूणला मुक्काम केला होता. तेंव्हा सकाळी लवकर उठून मी त्या मंदिरातही जाऊन आलो होतो. केरळमध्येसुध्दा अशाच प्रकारची आख्यायिका प्रचलित आहे आणि परशुरामाचे मंदीरही आहे.

रामचंद्र हा विष्णूचा सातवा अवतार पृथ्वीवर अवतरला होता तरीही परशुराम हा अवतारही तेंव्हा भूतलावर होताच. पण त्याला आता युध्द करण्याची गरज वाटत नसल्यामुळे त्याने आपले शिवधनुष्य मिथिलेच्या जनक राजाकडे ठेवायला दिले होते. या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे हा पण जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी लावला होता. तो प्रयत्न करतांना रामाकडून त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले. हे वृत्त समजताच परशुराम तिथे येऊन पोचले आणि त्याचे रामाबरोबर वाद विवाद आणि युध्द झाले. दोघेही तुल्यबळ होते. अखेर दोघांनीही आपण विष्णूचे अवतार असल्याचे ओळखले आणि त्यांच्यात समेट झाला. परशुराम आता तपश्चर्येच्या मार्गाला लागलेला असल्यामुळे त्याने आपल्याकडचे वैष्णवी धनुष्य श्रीरामचंद्राला दिले.

रामायणातला रामावतार संपून मध्ये काही काळ गेल्यानंतर महाभारतातला कृष्णावतार झाला. तरीही परशुराम होतेच. भीष्म, द्रोण आदींना परशुरामानेच शस्त्रास्त्रविद्या शिकवली. त्यांचे शिष्य असलेले द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांचे शिक्षक झाले. त्यांनी अर्जुनासारखा धनुर्धर आणि.भीम व दुर्योधनासारखे गदायुध्दपटु तयार केले. पण कर्ण हा सूतपुत्र आहे असे म्हणून त्यांनी कर्णाला धनुर्विद्या द्याला नकार दिला तेंव्हा तो सरळ परशुरामाकडे गेला आणि खोटे नाव सांगून त्यांचा पट्टशिष्य बनला. त्यानेही धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले होते आणि तो अर्जुनाला तुल्यबळ ठरला असता पण इथेही त्याचा घात झाला. एकदा त्याचे गुरू परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपलेले असतांना एका भुंग्याने त्याची मांडी पोखरायला सुरुवात केली. गुरूची निद्रा भंग पावू नये या विचाराने कर्णाने त्याला प्रतिकार न करता मांडीला पोखरू दिले. परशुरामांची झोप झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, पण कर्णाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी त्याच्या कुलाबद्दल शंका घेतली आणि त्याने खोटे सांगितल्याचे समजल्यावर त्याला शाप दिला की “तुझ्या अंतकाळी ही धनुर्विद्या तुला उपयोगी पडणार नाही.” पुढे महाभारतातल्या युध्दात कुरुक्षेत्रावर कर्णाचा अखेर असाच झाला. हा भाग आज आपल्याला अन्यायकारक वाटतो, पण संपूर्ण महाभारताची कथाच वरदान, शापवाणी, उःशाप वगैरेंमधून रचलेली असल्यामुळे त्यात एक सुसंगति आहे.

माझ्या लहानपणी मुलांनी संस्कृत श्लोक पाठ करणे आवश्यक असायचे. मी असाच पाठ केलेला एक श्लोक असा होता.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्च विभीषणः ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविता:।।
अश्वत्थामा, बलि, व्यास, हनूमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सातजण चिरंजीव आहेत असा याचा अर्थ आहे. “हे सगळेजण अजून जीवंत आहेत तर ते कुठे रहातात?” असा बालसुलभ प्रश्न मी तेंव्हा विचारला होता. “ते हिमालयातल्या गुहेत बसून तपश्चर्या करतात.” असे उत्तर त्यावर मिळाले होते. यापेक्षा चांगले उत्तर मला तरी अजून मिळालेले नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करत जीवंत राहणे याला काय उच्च स्वरूपाचा अर्थ आहे हे ही समजले नाही.

तर मला परशुरामाबद्दल अशी तुटक तुटक माहिती मिळाली, पण त्यामधून सुसंगत असे चित्र तयार होत नाही आणि जे काही चित्र दिसते ते फार दैवी आणि उदात्त वाटत नाही. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी जो आदरभाव वाटतो तो मनात उठत नाही. कदाचित माझ्या समजून घेण्यात उणीव राहिली असेल. पण यामुळे मी कधीच भगवान परशुरामाची उपासना केली नाही किंवा त्यांचे कुठले स्तोत्र मी कधी ऐकलेही नाही. हे नाव माझ्या दैनंदिन जीवनात कधी येत नव्हते. काही वर्षांपूर्वी चिपळूण इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात परशुरामावरून वाद झाला आणि त्याला जातीय स्वरूप देण्यात आलेले ऐकून मला आश्चर्य वाटले. सर्व विश्वाचा कर्ता करविता समजला जाणारा विष्णू भगवान आणि त्याने घेतलेले अवतार हे सगळ्या जगासाठी होते अशीच धार्मिक कल्पना आहे. ते खरोखर अस्तित्वात होते की नव्हते हा आस्तिक नास्तिकांमधला वाद आहे. पण त्या अवतारांनासुध्दा जातीनुसार वाटून घेणे दुर्दैवी आहे.

भगवान परशुरामांचे थोडक्यात वर्णन या श्लोकात केले आहे.
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥
वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर ।
शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ॥ – मराठी अनुवाद श्री.नरेंद्र गोळे

मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया

गणेशोत्सवाशी या ब्लॉगचे जवळचे नाते आहे. पहिल्याच वर्षी आलेल्या गणेशोत्सवात मी गणपतीची कोटी कोटी रूपे पाहून त्यांच्यावर एक लेखमाला लिहिली होती. त्यानंतर बहुतेक दरवर्षी मी या उत्सवाच्या काळात गणपतीसंबंधी चार शब्द लिहीत होतो. या ब्लॉगवरील लेखांची संख्या मला हजाराच्या आंतच ठेवायची आहे म्हणून या वर्षी मी एकाच लेखात रोज थोडी भर घालून तो पूर्ण करणार आहे.

सूर निरागस हो

गणपती या देवाचे सर्वांनाच इतके आकर्षण आहे की कट्यार काळजात घुसली या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करतांना त्यात नव्याने भर घातली ती सूर निरागस हो, गणपती या गाण्याची. या गाण्यामध्ये मधून मधून मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. या नावांचा गजर केला आहे. हे पूर्ण गाणे खाली दिले आहे.

सूर निरागस हो. गणपती,
सूर निरागस हो.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.

ॐकार गणपती.
अधिपती. सुखपती. छंदपती गंधपती
लीन निरंतर हो.
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

सूरसुमनानी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणावर.
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सूरातुन.
ॐकार गणपती. अधिपती. सुखपती छंदपती. गंधपती.
अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.

गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. सूर निरागस हो.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरेश्वर किंवा मोरोपंत ही नांवे पूर्वीच्या काळात प्रचलित होती. मोरोपंत या अठराव्या शतकांतल्या पंतकवींनी आर्या या वृत्तामध्ये अनेक इतक्या सुंदर काव्यरचना केल्या होत्या की महान संतकवि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली आणि पंतकवि वामन पंडित यांच्याबरोबर त्यांची गणना केली जाते. “सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची।” असे समजले जाते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळात मोरोपंत पिंगळे मुख्य प्रधान होते. मोरोबा विजयकर या लेखकाने घाशीराम कोतवाल ही मूळ कादंबरी लिहिली होती.

मोरेश्वर, मोरोपंत, मोरोबा किंवा मोरू, मोऱ्या वगैरे नावे असलेली पात्रे साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या कथाकादंबऱ्या, सिनेमे नाटके यांचेमध्ये सर्रास आढळत असत. त्यातला मोरेश्वर शास्त्री म्हणजे एक वेदशास्त्रसंपन्न विद्वान, पण परंपरावादी, हटवादी आणि उग्र तिरसिंगराव असावा, मोरोपंत हा हुषार, धूर्त पण सहृदय असा सद्गृहस्थ असावा, मोरोबा म्हणजे साधासुधा, परोपकारी, लोकांना सढळ हाताने मदत करणारा भलामाणूस असावा आणि मोरू म्हणजे जरा जास्तच सरळमार्गी, भोळसट आणि बावळट असावा, त्याला कुणीही आणि केंव्हाही मोरू करावे असा संकेत होता. त्या अर्थाचे बुद्दू बनवणे, पोपट करणे किंवा वडा होणे वगैरे वाक्प्रचार नंतर आले. आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे नाटक त्या काळात गाजले होतेच, पण त्यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी ते पुन्हा रंगमंचावर आले आणि विजय चव्हाणांनी टांग टिंग टिंगा कि टांग टिंग टिंगा म्हणत त्या नाटकाला आणि स्वतःच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर नेले. ज्या कोण्या महाभागाने बुद्धी आणि विद्येचे दैवत असलेल्या गणेशाच्या नावाचा असा मोरू केला होता त्याची शिक्षा म्हणून पुढील अनेक जन्म त्याचा पोपट किंवा वडा होत राहील यात शंका नाही.

आपले गणपतीबाप्पा उत्तर भारतात गणेशजी आणि दक्षिणेकडे विनायक या नांवांनी जास्त ओळखले जातात. तशी त्याची शेकडो नांवे आहेत. गणपती, तुझी नांवे किती? या नांवाने मी लिहिलेल्या ब्लॉगची सर्वाधिक वाचने झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. नारदमुनींनी लिहिलेल्या संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील आणि गणेशद्वादशनामस्तोत्रातील प्रत्येकी बारा नांवांमध्ये मोरेश्वराचा समावेश मात्र होत नाही आणि मला आंतर्जालावर मिळालेल्या ११० नांवांमध्येसुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांमध्ये मात्र मोरगांवच्या मोरेश्वराचा पहिला नंबर लागतो. मोरेश्वर हा शब्द जरी संस्कृत असला तरी संस्कृत किंवा हिंदी भाषांमध्ये लिहिलेल्या कुठल्याही स्तोत्रांमध्ये हा शब्द आल्याचे मला वाचल्याचे स्मरत नाही.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरगांवचा मयूरेश्वर
ज्यांना धड बोलताही येत नाही अशी लहान बालकेसुद्धा “गम्पतीबप्पा” म्हंटले की “मोय्या” असे किंचाळतात इतकी या शब्दांची जोडी आपल्या मनात घट्ट बसली आहे. कुठेही गणपतीबाप्पा ऐकले की मोरया हा शब्द आपोआप ओठावर येतो, इतकेच नव्हे तर तो कुणीही जोरात उच्चारला नाही तरी आपल्या कानावर आल्याचा भास होतो. ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।’ हा श्लोक लहान मुलांना शिकवतात. मोरया म्हणजे गणपती हे सगळ्यांना माहीत असले तरी ते कशासाठी? हे बहुतेक लोकांना माहीत नसते, मलासुद्धा नव्हते.
यावर थोडा शोध घेतल्यानंतर असे समजले की पुणे जिल्ह्यात मोरगांव नावाचे एक गांव आहे. पूर्वीच्या काळी तिथे खूप मोरांची वस्ती असायची म्हणून ते नांव पडले होते. पुराणकाळात सिंधुरासुर नांवाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतलेला गणपतीचा एक अवतार तिथे झाला होता अशी कथा आहे. त्या अवतारात ते मोर या वाहनावर स्वार होऊन आले होते म्हणून त्याला मयूरेश्वर असे म्हणतात. पुढे मयूरश्वरचे मोरेश्वर झाले. मोरगांव येथे गणपतीचे मोठे देऊळ आहे. अष्टविनायकांमध्ये त्याची गणना होते.

चौदाव्या शतकात चिंचवड येथे मोरया गोसावी नावाचे एक साधू रहात असत. ते गणपतीचे भक्त होते आणि नेहमी चिंचवडहून मोरगांवला चालत जाऊन गणेशाचे दर्शन घेत असत. एकदा त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते शक्य झाले नाही. पण त्यांच्या असीम भक्तीभावावर गणपती प्रसन्न झाले आणि स्वतःच चिंचवडला येऊन त्यांना दर्शन दिले, तसेच “माझ्या नावापुढे मोरया हे तुझे नांव घेतले जाईल” असा आशीर्वाद त्यांना दिला अशी आख्यायिका आहे. तेंव्हापासून “गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असे म्हणण्याची रूढी महाराष्ट्रात पडली.

छायाचित्र विकीपीडियावरून मूळ छायाचित्रकाराच्या सौजन्याने
Redtigerxyz – स्वतःचे काम,CC BY-SA 3.0,https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=8913180 द्वारे.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया रे बाप्पा मोरया रे

मोरया रे बाप्पा मोरया रे या श्री.प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या धडाकेबाज चालीवरील गाण्याने एका काळात खूप धमाल उडवली होती. गणेशोत्सवांमध्ये या गाण्याची ध्वनिफीत जिकडे तिकडे ध्वनिवर्धकावरून (लाउडस्पीकर) वाजवली जात असे. कित्येकांना हे गाणे ऐकून ऐकून तोंडपाठ झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=shw04gHOUl0

हलाखीच्या परिस्थितीमधल्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा करतांनासुद्धा किती कष्ट पडतात, पण ते समजून घेऊन बाप्पाने त्यांच्यावर कृपा करून जरा बरे दिवस आणावेत अशी विनवणी या हृदयद्रावक गाण्यामध्ये केली आहे. या गाण्याचे शब्द असे आहेत.

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया

तूच सुखकर्ता तूच दुखहरता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा || ध्रु ||

पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची
वाचावी कशी मी गाथा || १ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तान्दुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशिर्वाद आता || २ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ
कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ
साऱ्या प्रसादाची केली भेळ
गुण गाईन आणि राहीन
द्यावा आशिर्वाद बाप्पा || ३ ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

गायक : प्रल्हाद शिंदे
संगीत : मधुकर पाठक, हरेन्द्र जाधव
अल्बम : गणपती आरती

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

अष्टविनायक या गाजलेल्या मराठी चित्रपटात आठही विनायकांच्या देवळांची सुरेख वर्णन करणारे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणे स्व.जगदीश खेबूडकरांनी लिहिले होते. त्या गाण्याच्या अखेरीलासुद्धा मोरया मोरयाचा गजर आहे.

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया।
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया ।
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।।
मोरया मोरया महागणपती मोरया ।
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ।
मोरया मोरया वरदविनायक मोरया ।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया।
मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।

सातआठ वर्षांपूर्वी आलेल्या उलाढाल या चित्रपटातल्या ढोलताशांच्या आवाजाबरोबर होणाऱ्या मोरया मोरयाच्या गजराने त्या काळातल्या सगळ्या गणेशोत्सवाचे मांडव दणाणून गेले होते. अजय अतुल या संगीतकार जोडगोळीने गाजवलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहेच. या क्षणी टीव्हीवर चालू असलेल्या सूर नवा ध्यास नवा या मालिकेत मी हे दणकेदार गाणे ऐकत आहे. याचे शब्द असे आहेत.

हे देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्याइना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया

मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड, येली, पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

आदि अंत तूच खरा, तूच बुध्दीदाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया या नांवाचा एक चित्रपट सात वर्षांपूर्वी येऊन गेला. संगीतकार गायक आणि गीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी लिहिलेले त्यातले शीर्षक गीत अर्थातच बाप्पा मोरयावर आहे. गणपती बाप्पा मोरयाने पुन्हा अवतार घेऊन चुकलेल्या लोकांना योग्य वाट दाखवावी अशी विनंती या गाण्यात केली आहे.
मोरया सिनेमा टायटल साँग
https://www.youtube.com/watch?reload=9&v=aZwIwU_k6SM
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
चुकलेल्या कोकराया, वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार, बाप्पा मोरया ।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय,
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय।
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य,
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी ताल कराया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
देवा तुला देवपण देती भक्तगण,
दानवांना पाप कर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

पं.हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या भावाबहिणीच्या जोडीने अवीट गोडी असलेल्या अनेक गीतांची भर मराठी सुगम संगीतामध्ये घालून त्याला अत्यंत समृद्ध केले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्यांच्यासाठी लिहून दिलेले गजानना, श्री गणराया हे मोरयाला वंदन करणारे भक्तीगीत अजरामर झाले आहेच.
https://www.youtube.com/watch?v=fV8WIzEHD-E

गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मागच्या वर्षी आलेल्या व्हेंटिलेटर या एका वेगळ्याच विषयावरल्या चित्रपटामध्येसुद्धा गणेशोत्सवावर एक गाणे आहे. गीतकार मनोज यादव व शांताराम मापुसकर या जोडीने लिहिलेले या रे या सारे या हे गीत रोहन रोहन या संगीत दिग्दर्शकांनी बांधलेल्या चालीवर गायक रोहन प्रधान यांनी गायिले आहे. त्यातले समूहगान म्हणजे कोरस तर खूपच बहारदार आहे.
https://youtu.be/HzGE_WaSqE4

या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या ….

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या ……

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

आपल्या समाजामध्येच कुठल्याही निमित्याने मोठमोठ्याने कर्ण्यावर (लाऊडस्पीकरवर) गाणी वाजवत राहणे आणि कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे मिरवणुकींमध्ये डी जे वर गाणी लावून त्यावर नाच करणे यालाच आता खूप जोर आल्यामुळे त्यासाठी कर्कश आवाज आणि उडत्या चालींच्या गाण्यांनाही उधाण आले आहे. यात सिनेमातली गाणी, आल्बम्स, लोकगीते वगैरे सर्वांचाच समावेश होतो. गणेशोत्सवांमध्येसुद्धा ते लोण आल्याशिवाय कसे राहील? तिथे देवाशी कसलाही संबंध नसलेली पॉप्युलर गाणी तर वाजवली जातातच, मुद्दाम गणपती बाप्पाचा उल्लेख असलेली अनेक गाणीसुद्धा गणेशोत्सवाच्या सुमाराला बाजारात यायला लागली. गेल्या तीन वर्षांमधल्या अशा गाण्यांचे दुवे खाली दिले आहेत.

२०१६ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=z7W9gEtIXbU

२०१७ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=OHUy2KJlINk

२०१८ ढोल ढोल ढोल घुमू लागला
https://www.youtube.com/watch?v=esBHy_ky-PQ

आता मोरयासंबंधीचे थोडेसे अवांतर
मोरया हा शब्द शार्दूलविक्रीडित या वृत्तातल्या ओळींच्या शेवटी चपखल बसत असल्यामुळे बहुतेक मंगलाष्टकांमध्ये तो येतोच. उदाहरणार्थ
प्रारंभी नमुया महेशतनया, विघ्नांतका मोरया ।
ब्रह्मा विष्णु शिवा, उमा, कमलजा, त्रैमूर्ति दत्तात्रया ।।

मोरया मधील मोर च्या ऐवजी More हा शब्द घालून Moreया, Moreघ्या. Moreन्या, Moreद्या असे शब्दप्रयोग केलेल्या जाहिराती या दिवसात पहायला मिळतात.

आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांना तुम्ही मागे राहू नका म्होरं या, म्हणजे पुढे या असा आदेश देत असतो म्हणून त्याला मोरया म्हणतात असा अजब शोधसुद्धा कोणा डोकेबाज माणसाने लावला आहे.

अनंतचतुर्दशीला सर्व ठिकाणचे उत्सव संपून विसर्जनाच्या जंगी मिरवणुकी निघतील आणि गणपतीबाप्पा मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून रात्री उशीरापर्यंत किंवा कदाचित दुसरे दिवशी सकाळपर्यंत त्या चालत राहतील. मी या वर्षीच्या गणेशोत्सवात लिहिलेला मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा लेख रोज थोडी भर घालून पुढे नेला होता. त्या बाप्पाला मनोमन वंदन करून आज तो पूर्ण करीत आहे.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

गणपतीच्या आरत्या आणि स्तोत्रे


सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या प्रसंगी श्रीगणरायाला साष्टांग प्रणिपात.
हा उत्सव सर्वांना फलदायक ठरो अशा शुभेच्छा. या दिवसानिमित्य गणेशाची दोन स्तोत्रे आणि आरत्या खाली देत आहे.

१ गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

माझ्या लहानपणी आमच्या गावातले सगळे रस्ते मातीचे होते, रस्त्यांच्या दोन्ही कडांना उघडी गटारे असायची, त्यांच्या बाजूला इतरही घाण केलेली किंवा टाकलेली असायची आणि काही गलिच्छ प्राणी त्यातून स्वैर हिंडत असायचे. रस्त्यातल्या विजेच्या खांबांवरचे दिवे कधी पेटलेच तरी अगदी मिणमिणता उजेड देत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या तसल्या रस्त्यांवरून फिरायला नकोसे वाटत असे. दिवेलागणी होईपर्यंत आम्ही सगळेजण आपण होऊनच घरी परतत होतो. त्यावेळी घरातला महिला वर्ग रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकात गुंतलेला असायचा आणि आम्ही मुले घरी आल्यानंतर शुभंकरोती आणि परवचा म्हणून झाल्यावर श्लोक, गाणी वगैरे म्हणत बोलावण्याची वाट पहात असू.

स्वैपाक पुरा होत आला की “दुपार्तीला या रे” अशी हाक यायची आणि घरातले सगळे जण देवासमोर येऊन उपस्थित होत असत. “या वेळच्या आरतीला ‘दुपारती’ असे का म्हणतात?” असे मी एकदा मोठ्या भावाला विचारले, तेंव्हा त्याने उत्तर दिले “अरे आपण दुपारी शाळेत असतो ना? म्हणून ती संध्याकाळी करतात.” त्याचे खरे नाव ‘धूप आरती’ असे असते हे ज्ञान खूप उशीराने झाले. पण त्याने काही फरक पडला नाही, कारण आमच्या घरातल्या ‘दुपारती’मध्ये सहसा धूप नसायचाच, ती निरांजन ओवाळूनच केली जात असे. दररोज करण्याच्या या आरतीत फक्त दोनच आरत्या म्हंटल्या जात. दररोज आधी गणपतीची आरती म्हणायची आणि सोमवारी शंकराची, मंगळवार व शुक्रवारी देवीची, बुधवारी विठोबाची, गुरुवारी दत्ताची व शनिवारी मारुतीची आरती म्हणायची हा कार्यक्रम खंड न पाडता कित्येक वर्षे चालत आला होता.

संध्याकाळच्या वेळेला भुते, पिशाच्चे, दुष्टआत्मे वगैरे मोकळे हिंडत असतात आणि आरत्यांचे आवाज ऐकून ते घाबरून दूर पळून जातात असे त्या काळात सांगितले जात असे. त्यांना जास्तच घाबरवण्यासाठी आम्ही जोरजोरात झांजा वाजवून आणि तारस्वरात आरत्या म्हणत असू. आजकाल नावापुरते सायन्स शिकलेले काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह एनर्जी वगैरे शब्द वापरतात, त्यांनाही कसली तरी अनामिक भीती वाटत असते. आरत्यांचा ध्वनीच प्रभावी समजला जात असल्यामुळे त्यातल्या शब्दांकडे कोणी लक्ष देत नसत. योग्य तो ध्वनि उत्पन्न करण्यासाठी फक्त त्यांचा उच्चार बरोबर यायला हवा, अर्थ समजून घेण्याचे काही कारण नसायचे. पण माझा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळे मला तो समजून घ्यावा असे वाटत असे. त्यातल्या कुठल्या शब्दांमुळे किंवा वाक्यांमुळे भुतांना घाबरायला होते याचे कुतूहलही वाटत होते. गणपतीची आरती रोजच कानावर पडत असल्यामुळे मला बोलायला लागण्याबरोबर ती आरती आपोआप पाठ झाली होती. या आरतीतले सगळे शब्द अगदी सोपे आहेत. तरीही आज गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।

त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।

त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली, कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल माँगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रूपक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार ?

या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पिताश्री शंकर महादेव अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।

पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन, केशर आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।

तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात मी त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला पाहिला नाही.
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे सुरवर वंदना ।।

अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुस्ती भक्तांनी त्याला जोडून ही विनंती अधित स्पष्ट केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात. कदाचित संकष्टी या शब्दाचा अर्थ चतुर्थी असा न घेता खूप कष्टाची वेळ असा घेता येईल.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे. तीनशेहे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.


गणपतीची आरती – २ – शेंदुर लाल चढायो

‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही गणपतीची आरती आमच्या घरी रोज म्हंटली जात होतीच, गणेशोत्सवामध्ये त्याच्या जोडीला एक हिंदी आरती म्हंटली जात असे. राष्ट्रभाषेचा परिचय होत असतांना सुरुवातीच्या काळात त्या भाषेतल्या ज्या थोड्या रचना मी म्हंटल्या असतील त्यातली ही एक होती. या आरतीची सुरुवात अशी होती,
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

श्रीगणेशाला अंगभर लाल रंगाचा शेंदूर लावलेला आहे, शंकरपार्वतीच्या या मुलाचे लंबोदर (विशाल पोट) त्यामुळे छान लालचुटुक दिसते आहे, त्याच्या हातात गुळाचा लाडू आहे, अशा या गजाननाचा महिमा साधुसंतांना आणि देवाधिकांनाही सांगता येणार नाही इतका महान आहे, मी त्याच्या पायावर लोटांगण घालतो आहे.

त्यानंतर ध्रुवपदात त्याचा जयजयकार केला आहे.
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥

विद्या आणि सुख दोन्ही देणाऱ्या गणगायाचा जयजयकार असो, तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो, माझे मन त्यात रमून जाते.

दुसऱ्या कडव्यात गणपतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥जय० ॥२॥

आठही सिध्दी याच्या दासी आहेत, त्याच्या आज्ञेनुसार त्या वागतात, हा संकटांचा वैरी आहे, विघ्नांचा नाश करतो, हा मांगल्याची मूर्ती आणि अधिकारी आहे, याची छवि कोटी सूर्यांइतकी तेजस्वी आहे, मदमस्त हत्त्तीच्या (त्याच्या) मस्तकावर चंद्रकोर झुलत आहे. अशा श्रीगणरायाचा जयजयकार.

या गजाननाची भक्ती करणाऱ्याला कोणते लाभ मिळतात हे या आरतीच्या तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे.
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

जो कोणी भक्तीभावाने त्याला शरण जातो त्याला भरपूर संतती आणि संपत्ती मिळते, आजच्या जमान्यात खूप मुले होणे हे वरदान कोणाला परवडणारे नाही, पण तीनचारशे वर्षांपूर्वी जितकी जास्त वंशवृध्दी होईल तितके ते चांगले मानले जात असे. असे हे महाराज मला अत्यंत प्रिय आहेत म्हणून हा गोसाव्याचा मुलगा दिवसरात्र त्यांचे गुणगान करत असतो. श्रीगणरायाचा जयजयकार असो.

ही आरती हिंदी भाषेत असली तरी त्याची चाल आणि त्यातला भाव मराठी भाषेतल्या आरत्यांसारखाच वाटतो. माझ्या ओळखीतले सगळे हिंदी भाषिक जय जगदीश हरे या चालीवरच्या आरत्याच नेहमी गातात. ‘शेंदूर लाल चढायो’ ही आरती मी कधीच त्यांच्या तोंडी ऐकली नाही. ‘गोसावीनंदन’ या नावाविषयी मी थोडी माहिती गुगलून काढली. ती खाली दिली आहे, पण तो गाणपत्य होता एवढाच संदर्भ जुळतो. बाकीच्या माहितीचा या हिंदी आरतीशी कसलाच धागा जुळत नाही. त्यामुळे ही आरती लिहिणारा गोसावीनंदन कदाचित वेगळा असेल. त्याने ती कोणासाठी लिहिली याचा बोध होत नाही.

गोसावीनंदन : केतकरांच्या ज्ञानकोशात दिलेली माहिती :- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता’

गणपतीच्या आरत्यांसंबंधी अधिक माहिती माझ्या या ब्लॉगवर दिली आहे.
https://anandghare.wordpress.com/2018/09/16/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/


३. संकट नाशन गणेश स्तोत्र

(नारद पुराण, नारद विरचित)

नारद उवाच

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं
भक्तावासं स्मरेत् नित्यं आयु: कामार्थ सिद्धये ।।१।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदंतं द्वितीयकं
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं ।।२।।

लंबोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णम् तथाष्टकं ।।३।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं
एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं ।।४।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेत् नर:
न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं भवेत् ।।५।।

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।

जपेत् गणपति स्तोत्रं षड्भि: मासै: फ़लं लभेत्
संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशय: ।।७।।

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।

इति श्री नारद पुराणे नारद विरचितं
“संकटनाशनं” नाम श्रीगणेश स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु

ॐ श्री गजानन प्रसन्न

ॐ गं गणपतये नम:

———————

४. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र (मुद्गल पुराण )

ॐ श्री गणेशाय नम:

शुक्लाम्बर धरं देवं शशिवर्णम् चतुर्भुजं
प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये ।।१।।

अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो य: सुरासुरै:
सर्व विघ्नहर: तस्मै गणाधिपतये नम: ।।२।।

गणानां अधिप: चण्डो गजवक्त्र: त्रिलोचन:
प्रसन्नो भव मे नित्यं वरदात: विनायक: ।।३।।

सुमुख: एकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्च विकट: विघ्ननाशो विनायक: ।।४।।

धूम्रकेतु: गणाध्यक्ष: भालचन्द्र: गजानन:
द्वादश एतानि नामानि गणाध्यक्षश्च य: पठेत् ।।५।।

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं
इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षं अक्षयं ।।६।।

विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा
संग्रामे संकटे चैव विघ्न: तस्य न जायते ।।७।।

इति श्री मुद्गल पुराणोक्तं श्रीगणेश द्वादश नाम स्तोत्रं संपूर्णम्

शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

५. वक्रतुंड महाकाय

मी शाळेत असतांना वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे त्या सर्वांना थोडा घाबरून रहात असे. त्यातल्या कोणाला “अरे वाकड्या तोंडाच्या” अशी हाक मी मारली असती तर त्याने माझा एक गाल सुजवून माझेच थोबाड वाकडे करून टाकले असते आणि कोणाला जर मी “ढबाल्या” म्हंटले असते तर त्याच्या गुबगुबीत हाताचा ठोसा मला खावा लागला असता. त्यामुळे असले काही धाडस करायची माझी हिंमत झाली नसती, पण आपले गणपतीबाप्पा कधी असे रागावत नाहीत. मला कळायलाही लागायच्या आधीपासून “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।” हा त्यांचा श्लोक कानावर पडून मला तोंडपाठ झाला होता आणि मीसुध्दा इतर बडबडगीतांबरोबरच “वक्कतुंड म्हाकाय सुल्यकोटी समप्पब” असे काही तरी बडबडू लागलो होतो. त्या शब्दांच्या उच्चारणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि मी ते व्यवस्थित म्हणायला लागलो. तेंव्हापासून ते आजतागायत जगातल्या कुठल्याही ठिकाणच्या, अगदी इंग्लंड अमेरिकेतल्यासुध्दा, एकाद्या देवळात गणेशाची मूर्ती दिसली की त्याला हात जोडून नमस्कार करताच हाच श्लोक माझ्या ओठावर येतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्याने जात असतांना वाटेत गणेशोत्सवाचे मंडप लागतात आणि आत जाऊन मंगलमूर्तीचे दर्शन घेतांना हा श्लोकही म्हंटला जातो. असे गेल्या आठवड्यात रोज घडत आले आहे.

कोणत्या ऋषीमुनीने हा श्लोक लिहिला आहे हे काही मला ठाऊक नाही, पण गणपतीच्या सहस्रनामांमधले ‘वक्रतुंड’ हेच नाव त्यांना या श्लोकात घ्यावेसे का वाटले कोण जाणे, ‘महाकाय’ याचा अर्थ ‘आडव्या अंगाचा’ असा न घेता शक्तीशाली, सामर्थ्यवान असाही घेता येईल. या देवाचा मुखडा आणि शरीरयष्टी कशीही (कदाचित भयभीत करणारी) असली तरी त्याचे तेज कोटी सूर्यांइतके दिपवून टाकणारे आहे असे या श्लोकाच्या पहिल्या चरणात लिहिले आहे. पण त्या महाशक्तीला वंदन, नमन वगैरेसुध्दा न करता “निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा” म्हणजे “माझ्या सगळ्या कार्यांमध्ये येणारी विघ्ने सर्व वेळी दूर कर” अशी प्रार्थना किंवा मागणे या श्लोकाच्या पुढल्या ओळीत मांडले आहे. पहिल्या शब्दात त्याला नावे ठेवायची आणि पुढे लाडीगोडी लावून त्यालाच नेहमी आपली मदत करायला सांगायचे असे या श्लोकाचे स्वरूप दिसते. चांगली बुध्दी, स्वर्ग, मोक्ष, संपत्ती, शांती यातले काही न मागता आपल्या कामातले अडथळे तेवढे दूर करण्याची ही विनंती या श्लोकात आहे. देवाच्या कृपेने आपला मार्ग निर्विघ्न झाला की आपले काम आपल्या प्रयत्नानेच तडीला न्यायचे, आपले यश आपण मिळवायचे, ते आयते हातात पडायला नको असा एक चांगला विचार त्यात दिसतो.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।

या श्लोकाच्या पाठोपाठ म्हंटला जाणारा श्लोक आहे,
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती । पंचैतानि स्मरेन्नित्यम् वेदवाणी प्रवर्तते।।

(आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले सगळे काही साध्य करून घेण्यासाठी) गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती या पाचजणांचे रोज स्मरण करावे असे वेदांमध्ये सांगितले आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातला गणनाथ म्हणजेच गणपती हा सर्व गणांचा म्हणजे देवांच्या सर्व सेवकांचा प्रमुख आहे. सगळे काही करणे वा न करणे, करू देणे वा न देणे हे त्याच्या हातात आहे. सरस्वती ही विद्या, कला वगैरेंची देवता आहे. रवी, शुक्र आणि बृहस्पती हे नवग्रहांमधले प्रमुख ग्रह आहेत, त्यातला सूर्य अत्यंत तेजस्वी, प्रखर , ऊर्जा देणारा आणि जीवनाधार आहे. शुक्र आणि गुरू हे पुराणामधल्या कथांनुसार अनुक्रमे दैत्य आणि देवांचे गुरू होते. त्यांच्या सैन्यांना युध्दामधले सारे कौशल्य आणि डावपेच ते शिकवत असत. बृहस्पती हे अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान तर शुक्राचार्य हे अत्यंत धोरणी समजले जात असत. पुराणातल्या बहुतेक सगळ्या लढायांमध्ये शेवटी देवांचाच विजय होत असला तरी पराभवाने निष्प्रभ झालेल्या असुरांना शुक्राचार्य संजीवन देऊन पुन्हा बलिष्ट बनवण्याचे काम करत असत. सामर्थ्य, कलाकौशल्य, तेज, बुध्दीमत्ता, विद्वत्ता, चतुराई हे सगळे गुण अंगात बाणवले तर माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होणारच. शुक्र आणि बृहस्पती यांना विकार आणि विवेक यांची प्रतीके असेही बहुधा मानता येईल. ‘सगळे काही’ मिळवायचे असल्यास या दोघांचीही मदत लागेलच, शिवाय शक्ती, युक्ती, कौशल्य वगैरेही पाहिजेत.


या ब्लॉगवरील गणेशोत्सव

आनंदघन या नावाचा माझा ब्लॉग मी १ जानेवारी २००६ ला सुरू केला आणि अजूनही चालवत आहे. त्यात पहिल्या वर्षापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मी काही ना काही लिहीत आलो आहे. त्यातले गणपतीविषयक २९ निवडक लेख मी क्रमाक्रमाने या ब्लॉगवरदेखील सादर केले आहेत. उरलेले लेख एकत्र करून या वर्षी या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे सादर करीत आहे.

2009 : यंदाचा आमचा गणेशोत्सव

फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी पांच दिवसाचा गणेशोत्सव होत आला आहे. आमचे घर बांधतांनाच त्यातल्या सोप्याच्या मधोमध एक खास ‘गणपतीचा कोनाडा’ ठेवण्यात आला होता. एकादा लहान मुलगा त्यात चढून बसू शकेल इतका तो रुंद, उंच आणि खोल होता. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुध्दा थोड्या सजवलेला होत्या. एरवी त्या कोनाड्यात इतर शोभेच्या किंवा अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात. गणेशचतुर्थीच्या आधी तो रिकामा करून रंगरंगोटी करून तयार ठेवला जाई. घरातली मुले आपले कलाकौशल्य पणाला लावून दरवर्षी नवे मखर आणि इतर सजावट करीत असत. कॉलेजला गेल्यानंतर दरवर्षी दिवाळीला घरी जायचे असायचेच. त्यापूर्वी गणपतीसाठी एक वेगळी ट्रिप करणे शक्य नसल्यामुळे स्थानिक नातेवाईकांना भेट देणे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांची आरास पहात तिथले थोडे गाण्याबिण्याचे कार्यक्रम पाहणे एवढाच माझा गणेशोत्सवात सहभाग होत असे. लग्न करून घर थाटल्यानंतर दोन खोल्यांच्या इवल्याशा घरात गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला. बदलत्या परिस्थितीनुसार दरवर्षी कांहीतरी नवे आणि चांगले करण्याच्या प्रयत्नामधून त्यात सुधारणा होत गेली.

सेवानिवृत्तीनंतर प्रशस्त सरकारी निवास सोडून लहानशा सदनिकेत रहायला गेलो. त्यानंतर कांही महिन्यांनी एक मोठे दुखणे येऊन गेले. २००६ च्या गणेशोत्सवापर्यंत मी त्यातून हळूहळू मार्गावर येत होतो, पण अजून हिंडू फिरू लागलो नव्हतो आणि काही काम करायला अंगात फारसे त्राण नव्हते. त्यामुळे नव्या घरात पुन्हा एकदा अगदी लहान प्रमाणात गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००७ साली पुण्याला मुलाकडे गणपती ठेवायचे ठरवले. सर्वांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला. मागल्या वर्षी घरात आम्ही दोघेच राहिलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी काढत आणि शेजारपाजारच्या लोकांना बोलवत गणेशोत्सव साजरा केला.

यंदा मात्र मुले सहकुटुंब घरी येऊन पुन्हा एकदा गणेशचतुर्थीला घराचे गोकुळ झाले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. पण आता दिवस बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आपल्या कलाकौशल्याला वाव देऊन कांही नवी निर्मिती करण्याला तितकेसे महत्व राहिलेले नाही. उगाच आपल्या डोक्याला ताप देण्यापेक्षा बाजारातून रेडीमेड वस्तू आणणे सोईचे वाटते. नाना प्रकारची मखरे आणि सजावट करण्यासाठी असंख्य प्रकारच्या सुबक आणि झगमगीत गोष्टी बाजारात खचाखच भरलेल्या असतात. उपलब्ध जागा आणि खिशाचा विचार करून त्यातल्या कांही आणल्या आणि फटाफट जोडून टाकल्या. गणपतीच्या नैवेद्यापुरते एक दिवस तळलेले आणि एकदा उकडीचे मोदक घरी केले होते. त्याशिवाय पुण्याहून चितळे बंधूंची आंबाबर्फी आणि बाकरवडी आणली होती, हल्दीरामची सोनपापडी, बिकानेरची दाळमोठ आणि गुलाबजाम, शिवकृपाचे फरसाण आणि काजू कटली, गोडबोल्यांचे लाडू आणि शंकरपाळी, आणखी कोठले कांही, कोठले कांही अशा नाना तऱ्हेच्या मिठाया आणि नमकीन खाद्यवस्तूंची लयलूट होती. या निमित्याने अनेक आप्तेष्ट येऊन भेटून गेले. त्या गडबडीत पाच दिवसाचा उत्सव कसा संपला ते कळलेच नाही.

ब्लॉगगिरी सुरू केल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवात कांही तरी प्रासंगिक लिहायचे असे ठरवले होते. पहिल्या वर्षी म्हणजे २००६ साली घरबसल्याच वृत्तपत्रे आणि टीव्हीवर जेवढे गणेशोत्सव पाहिले त्यावरून गणेशाच्या ‘कोटी कोटी रूपां’वर एक लेखमालिका लिहिली. सलग अकरा दिवस मी स्वतः, माझा संगणक आणि आंतर्जाल सक्षम राहिलो आणि रोज एक लेख लिहून तो ब्लॉगवर टाकू शकलो ही त्या श्रीगणेशाची कृपाच. पुढील वर्षी मी मुंबईत नव्हतोच, पण आधीपासून थोडी तयारी केली आणि आंतर्जालावर भ्रमण करून थोडी शोधाशोध केली आणि पुण्याला राहूनच रोज एक गजाननाचे गीत ब्लॉगवर टाकत राहिलो. मागल्या वर्षी ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. या वर्षी काय करायचे किंवा काय करता येईल हे ठरत नव्हते. योगायोगाने काही विचार सुचले, कांही जुने कागद हाताशी लागले आणि त्यातून ‘आधी वंदू तुज मोरया’, ‘मूषक आणि माउस’, ‘लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव’ हे लेख लिहिले गेले. आणि आजचे हे पुनरावलोकन.

2009 : पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?

‘पुढच्या वर्षी एकदा येऊच नका’ य मथळ्याखाली श्री.संजय पेठे यांनी लोकसत्तामधल्या आपल्या ‘थर्ड आय’ या सदरात एक लेख लिहिला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक याला आज जे स्वरूप आले आहे त्याबद्दल खेद आणि सात्विक संताप व्यक्त करून गणरायांनासुध्दा कदाचित पुढच्या वर्षी येऊ नये असे वाटत असेल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे. “या उत्सवात धार्मिकपणा नाही”, “या निमित्याने कांही लोक मिरवण्याची हौस भागवून घेतात”, “बहुतेक लोक मनाची करमणूक करून घेतात”, “यातले कार्यक्रम दर्जेदार नव्हते”, “यात पैशाचा अपहार व अपव्यय होतो”, “लोकांचा वेळ वाया दवडला जातो” आणि “परदेशी लोक यातून आपल्या देशाची बदनामी करतात” हे मुख्य मुद्दे त्यांनी आपल्या लेखात मांडले आहेत. मागील आठवड्यात मी या ब्लॉगवर लिहिलेल्या दोन लेखात लोकमान्य टिळकांनी सन १८९४ आणि १८९५ मध्ये केसरीत लिहिलेल्या दोन अग्रलेखांबद्दल लिहिले होते. एकशे पंधरा वर्षांपूर्वीसुध्दा नेमके हेच मुद्दे टिळकांच्या विरोधकांनी मांडले होते असे त्यातून दिसते. आज गणेशोत्सवाचे संयोजन करणाऱ्या लोकांना लोकमान्य टिळकांच्या पायाच्या नखाचीसुध्दा सर येणार नाही हे ते स्वतः देखील मान्य करतील. असे असले तरी विरोधकांचे मुद्दे जसेच्या तसेच राहिले असल्याचे पाहून गंमत वाटली. आज या उत्सवाचे दृष्य स्वरूप बदलले आहे, त्याचा आवाका शतपटीने वाढला आहे आणि त्यातल्या वाईट प्रकारांचे समर्थन करता येणे शक्यच नाही. गणेशोत्सवावर होत असलेल्या टीकेचा जसा खरपूस समाचार लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात घेतला होता तसा आता कोणालाच घेता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या उत्सवाच्या निमित्याने लोकसंग्रह करून त्यांना देशभक्तीच्या मार्गाला लावण्याचे लोकमान्यांच्या डोळ्यासमोर असलेले उदात्त उद्दिष्ट आज आपल्यापुढे राहिलेले नाही. तरीसुध्दा लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कांही चांगले उपक्रम कांही ठिकाणी होत आहेत हे संजयनेसुध्दा मान्य केले आहे.

शंभर वर्षातल्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक दिसतो. “एरवी मद्यपान करून लोळत पडणारे बरेच लोक गणेशोत्सवाचे दहा दिवस व्यसनापासून दूर राहतात” असा एक मोठा फायदा लोकमान्यांनी नमूद केला होता. आज याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसते. अनेक प्रकारच्या धुंदीत उत्सव साजरा करणारेच कांही लोक ‘वहावत’ जातांना पहायला मिळतात. पण सारेच त्या अवस्थेत नसतात. माझ्या आजूबाजूच्या कित्येक गणेशोत्सवांच्या मंडपांत डोकावून पाहिल्यावर, आतापर्यंत झालेले कांही विसर्जन सोहळे प्रत्यक्ष पाहून झाल्यावर आणि आज या क्षणाला गांवोगांवी होत असलेल्या अनंतचतुर्दशीच्या भव्य मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण पाहतांना ज्या समाजात आज आपण राहतो त्याचेच प्रतिबिंब मला त्या गर्दीत दिसत आले आहे. “त्या समूहात फक्त आपल्यासारखे निवडक लोक तेवढे धुतल्या तांदळाचे दाणे आहोत आणि बाकीचे सरसकट सारे लोक टाकाऊ खडे आहेत” असा आव आणणे मला योग्य वाटत नाही. आपल्या भोंवताली असलेला समाज जसा आहे तसा असल्याच्या सत्याचा स्वीकार करून आपल्या परीने आपल्या कार्यक्षेत्रात जेवढे बदल करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या घरापासून करणे हेच माझ्या मते महत्वाचे आहे. सर्व समाजाला नाक मुरडून नाकारण्याने कांही साध्य होणार नाही किंवा कांही गोष्टी व्यक्तीशः आपल्याला आवडल्या नसतील तर सरसकट त्या सगळ्या चुकीच्याच किंवा हिणकसच असतात असे समजण्याचेही कारण नाही.

संजयने मांडलेले एकूण एक चांगले विचार आणि त्याने केलेल्या सर्व सूचना यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा कदाचित योगायोग असेल किंवा आम्हाला मिळालेल्या समान प्रकारच्या संस्कारांचा भाग असेल. त्या सूचना अंमलात आणल्यास त्यातून समाजाचे भलेच होईल यात व्यक्तीशः मला कांही शंका नाही. फक्त इतक्या बलिष्ठ मांजरांच्या गळ्यात कोण कोण, कशा आणि कधी घंटा बांधणार हाच एक प्रश्न आहे. पण संजय माझ्यापेक्षा वयाने तरुण असला तरी मी मात्र त्याच्या एवढा निराश झालेलो नाही आणि गणपतीबाप्पाला पुढच्या वर्षी येऊच नका असे म्हणणार नाही.

या निमित्याने लोक एकमेकांना भेटतात हीच माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. वर्षभरातून थोडे दिवस तरी ते एकत्र उभे राहून देवाच्या पारंपरिक आरत्या म्हणतात, त्यातले कांही शब्द तरी त्यांच्या मनाच्या आंतपर्यंत जाऊन पोचत असतील. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय असतो आणि कांही ना कांही निमित्य काढून मनातल्या उत्साहाला उधाण आणत असतो आणि ते तो करत राहणारच. त्यात एकमेकांचे अनुकरण होत असते तसेच प्रसारमाध्यमांमधून जे दाखवले जाते त्याचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता त्यामुळे इतर अप्रिय गोष्टी होतात म्हणून उत्सवच बंद करावा असे मी म्हणणार नाही आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मतितार्थ जर मला समजला असेल तर त्यांनीसुध्दा असे सांगितले नसते असे मला वाटते. या निमित्याने लोक एका प्रकारे एकत्र वेळ घालवतात हीसुद्धा साधी सुधी गोष्ट नाही. एकदाचे ते एकत्र जमले म्हणजे त्यांना आपल्याला हवे तसे वळण लावणे हे आपले काम आहे असे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात स्पष्ट केले होते.


2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण

“नेमेचि येतो बघ पावसाळा । हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा ।।” या उक्तीमुळे तो दरवर्षी येतो आणि त्यातच गणेशोत्सवसुध्दा आपली हजेरी लावतो. हे सगळे ठरल्याप्रमाणे घडत असते आणि ते का घडते हे सुध्दा आता बहुतेक लोकांना माहीत झाले असल्यामुळे यात कौतुक करण्यासारखे कोणालाच फारसे काही दिसत नाही. त्या उत्सवातल्या मूर्ती, सजावट, गर्दी, उत्साह, भक्तीभाव, गजर, गोंगाट, रस्त्यातले अडथळे, वाहतूकीचे नियमन, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, स्पर्धा, बक्षिससमारंभ, पुढारी आणि नटनट्यांचे गणपतीसोबत काढलेले फोटो, लोकमान्य टिळक आणि त्यांची उद्दिष्टे, पर्यावरण, त्याचा ऱ्हास आणि त्याचे दुष्परिणाम, विसर्जनातली सुसूत्रता तसेच त्यातले अपघात वगैरे वगैरे वगैरे सगळेच विषय आता इतके नेहमीचे झाले आहेत आणि त्यावर इतके चर्वितचर्वण होऊन गेले आहे की त्यासंबंधीच्या बातम्या आणि लेख पाहून त्या न वाचताच वर्तमानपत्राचे पान उलटले जाते. या विषयांवर मीसुध्दा पूर्वी बरेच वेळा लिहिले आहे. त्यात आणखी भर टाकली तर हे पानसुध्दा वाचले न जाण्याची शक्यता वाटते. यामुळे या वर्षी थोडा वेगळा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या तयारीवरील एक मजेदार अल्पकथा मागच्या भागात दिली होती. या वेळी एक वेगळा विषय हातात घेतला आहे.

आजकाल सगळ्याच क्षेत्रात नेहमी चढाओढ चाललेली असते आणि रोजच कोणी ना कोणी कसला ना कसला विक्रम मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसेच चाकोरीबाहेरचे काहीतरी वेगळे करून दाखवत असतो. गणेशोत्सव वर्षाकाठी एकदा येत असल्यामुळे त्यातसुध्दा दरवर्षी कोणी ना कोणी काही तरी वेगळे करत असतो. यंदाचे नाविन्यवीर कोण आहेत ते थोडक्यात पाहू.

लालबागचा राजा दरवर्षीच अतिशय प्रखर अशा प्रकाशझोतात असतो. तिथल्या उत्सवाच्या पूर्वतयारीपासून त्याच्या खोल सागरात केल्या जाणाऱ्या विसर्जनापर्यंत खडान् खडा बातमी रोजच्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळत असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या आणि त्यांनी उदारपणे केलेले दान याची मोजदाद होत असते आणि तो आकडा वाढत असतो. तरीसुध्दा यंदा त्यात नाविन्याचा भागही दिसला. दर्शनोत्सुक भक्तांचे कष्ट कमी करण्याच्या दृष्टीने या वर्षी त्यांच्यासाठी वातानुकूलित मंडप उभारला होता. तसेच त्यांना खाद्यपेयेसुध्दा पुरवली जात होती. देवदर्शनासाठी केलेल्या कष्टाच्या प्रमाणात पुण्यप्राप्ती होते असा काही लोकांचा समज आहे. घरात गाडी असतांनासुध्दा अन्नपाणी वर्ज्य करून उपाशीपोटी दहा दहा किलोमीटर पायपीट करून देवदर्शनाला जाणारे महानुभाव मी पाहिले आहेत. त्यांना कदाचित अशा सोयी करणे आवडले नसेल, तसेच या सगळ्या खर्चातून समाजाचा किंवा देशाचा काय फायदा झाला? असा मूलगामी प्रश्न विचारून हा सगळा आटापिटा अनाठायी आहे असा सूर अश्रध्द लोकांनी लावला असेल. तसेच एवढ्या पैशात किती लोकांना पोटभर अन्न, अंगभर कपडे मिळाले असते, किती मुले शाळेला जाऊ शकली असती वगैरेंचे आकडेदेखील देतील.

गौडसारस्वतब्राह्मण म्हणजेच जीएसबी समाजाचा गणपती अत्यंत श्रीमंत समजला जातो. त्याचे सिंहासन, अंगावर चढवलेले दागदागीने आणि मुकुट वगैरे सगळ्याच गोष्टी सोन्याने बनवलेल्या आणि रत्नजडित असतात. हे ऐश्वर्य पहाण्यासाठी भाविक तसेच उत्सुक लोक दूरदूरहून येतात. कोट्यवधी रुपये किंमतीच्या या दौलतीचा कायमचाच विमा उतरवलेला असतोच. या वर्षी तिथे येणाऱ्या प्रेक्षकांचासुध्दा विमा उतरवला होता म्हणे. विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करेलच. तरीही जर काही अनुचित घटना घडली तर त्यात हताहत होणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई करून मिळणार होती. सुदैवाने प्रत्यक्षात तशी वेळ आली नाही.

परंपरेनुसार गणेशाची मूर्ती शाडू मातीची असायची. यांत्रिकीकरण झाल्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. पर्यावरणवाद्यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा शाडूमातीकडे ओघ वळू लागला आहे. आजकाल काही लोक कसलीच मूर्ती ठेवत नाहीत, चित्राची पूजा करतात, तर काही लोक कायम स्वरूपाची मूर्ती ठेवतात, तिचे विसर्जन करत नाहीत. काही कल्पक लोक वेगळ्याच पदार्थांपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. नारळांच्या ढिगातून गजाननाचा आकार तयार केलेला मी पूर्वी पाहिला आहे. यंदा काही निराळे प्रकार केले गेले. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” असे लहान मुलांचे स्वप्न असते. ६०० चॉकलेटे आणि २०००० बिस्किटे यांचा वापर करून एक गणपतीची मूर्ती या वर्षी तयार केली गेली होती, तर दुसऱ्या एका जागी गणपतीच्या सर्वांगावर टूटीफ्रूटीचे तुकडे चिकटवले होते. अर्थातच यातला एकादा तुकडा जरी कोणी तोंडात टाकला तो गणपतीभक्षक ठरेल. यामुळे कोणीही असे करणार नाही. या मूर्तींचे विसर्जन कुठे केले आणि त्या जलाशयातील जलचर प्राण्यांना मेजवानी मिळाली की प्रदूषणाने जिवाला मुकावे लागले ते कांही समजले नाही.

ओरिसाच्या समुद्रकिना-यावर वाळूची शिल्पे बांधणाऱ्या कलाकरांना जगभर प्रसिध्दी मिळाली आहे. एका जागी असा वालुकामय गणपती तयार केला गेला. एका कलाकाराने १२ लक्ष साबूदाणे घेतले, त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगवून त्यांचा उपयोग केला आणि त्यातून अप्रतिम सुंदर रांगोळी सजवली. गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या प्रयत्नाची नोंद झाली आहे.


2010
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी

लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी या वर्षी दक्षिण भारतातल्या प्राचीन मंदिराची सजावट केली होती, पण यात फारसे नाविन्य वाटणार नाही कारण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रसिध्द देवालयाच्या प्रतिकृती केलेल्या पहायला मिळतात. या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर या गणपतीमंडळाचा गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द केला गेला. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक लोकांनी भक्तीभावाने हे पुस्तक विकत घेतले असणारच. गेली काही वर्षे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर या राजाचे जे दर्शन घडते त्यातल्या मूर्तीचा आकार सारखाच वाटतो. लालबागचा राजा फोटोवरून ओळखता यावा इतका ओळखीचा झाला आहे. पुण्यातला दगडूशेट हलवाई गणपतीसुध्दा जेंव्हापासून प्रसारमाध्यमात प्रामुख्याने दिसायला लागला आहे, त्याच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण लालबागचा राजा मात्र पहिल्यापासून असा एकाच रूपात येत नव्हता. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळी रूपे घेऊन साकारला आहे. १९४६ सालच्या उत्सवात सिंहाच्या पाठीवर पाय ठेऊन उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपात तो दिसतो, तर १९४८ साली महात्मा गांधीजींच्या रूपात. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात तो दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर पंडितजींच्या रूपात बैलगाडी चालवत होता.

गणेशोत्सवाच्या निमित्याने येणाऱ्या दर्शकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जाहिराती लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली कोण जाणे, पण सिनेमाची पोस्टर्स लावण्याची सुरुवात लालबागच्या राजापासूनच झाली. त्याचसोबत सिनेकलावंतांनी प्रत्यक्ष लालबागला येऊन या राजाचे दर्शन घेण्याला सुरू केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली. तो गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा उत्पन्न झाली आणि मग दर्शनोत्सुकांची गर्दी वाढता वाढता वाढत उच्चांक करू लागली, तसे तिचे नियोजन करण्याचे कामही वाढत गेले. लालबागला सुरू झालेले जाहिरातबाजीचे लोण पुढे कानाकोपऱ्यापर्यंत पोचले आणि त्यात कशाची जाहिरात करावी याचा नेम राहिला नाही. एक दोन वर्षांखाली जिकडे तिकडे माणिकचंद दिसत असे. या वर्षी मात्र तंबाखू, मद्य आदि व्यसनांना उत्तेजन देणाऱ्या द्रव्यांची जाहिरात करायची नाही असा निर्बंध पाळला गेला असे दिसले.

आंतर्जालावर नवे आभासी (व्हर्च्युअल) जग निर्माण झाले आहेच, त्याची वाढही पटीने होत चालली आहे. गणरायाचा यात प्रवेश होऊन त्याने आपले स्थान निर्माण करणे ओघाने आले. अनेक उत्सव मंडळांनी या वर्षी आपापल्या वेबसाइट्स उघडल्या आणि वर्गणी गोळा करण्यापासून बाप्पांचे दर्शन, पूजा आरती वगैरे दाखवण्यापर्यंत सेवा प्रदान केली. या वर्षीचा उत्सव आता संपून गेला आहे, पण पुढच्या वर्षी आधीपासून तयारी केलीत तर संगणकीय मूषकाच्या पाठीवर दोन बोटांनी टिचक्या मारत जगभरातल्या गणेशाच्या उत्सवांची चित्रे पहात विहरण करता येईल तसेच गांवोगांवच्या किंबहुना देशोदेशींच्या गणपतींची विविध रूपे पहाता येतील. ज्यांना संगणकाची एवढी आवड नाही अशा लोकांनासुध्दा लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिध्दीविनायक यांच्या आरत्या घरबसल्या पाहण्याची सोय वाहिन्यांनी केली होती आणि काही भक्तगण या वेळी घरात बसूनच टाळ्या वाजवत त्या आरत्यांमध्ये सहभागी होत होते.

लोकसत्ता या दैनिकाने गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एक लेखमालिका सादर केली होती. जपान, चीन, श्रीलंका, जावा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम आदि परदेशांमध्ये निरनिराळ्या नावाने आणि रूपांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गजाननाची माहिती दिली होती. सुप्रसिध्द अष्टविनायकांची माहिती देणाऱ्या लेखमालिका दरवर्षीच येतात. या वर्षी एका जाहिरातीमध्ये ती दिली होती, तर दुसऱ्या एका जाहिरातदाराने आरत्या आणि मंत्रपुष्प यांच छापील पुस्तिका वर्तमानपत्रांसोबत दिली होती. या निमित्याने महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या अप्रसिध्द पण जागृत समजल्या जाणाऱ्या काही अनोळखी देवस्थानांची माहिती या काळात प्रसिध्द झाल्यामुळे वाचायला मिळाली.

हिंदुस्थान टाइम्स हे दिल्लीचे वर्तमानपत्र मुंबईमध्ये जम बसवू पहात आहे. त्याने या वर्षी एक आगळा प्रयत्न केला. मोबाइल फोनवर एसएमएस देणाऱ्या वाचकांमधून लकी डॉ काढून भाग्यवान विजेत्यांना हॅलिकॉप्टरमधून गणपती विसर्जनाची दृष्ये दाखवण्यात येतील अशा अर्थाच्या मोठमोठ्या जाहिराती रोज छापून येत होत्या. ही संधी फक्त ७ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलामुलींना उपलब्ध होती. प्रत्यक्षात असे दर्शन घडवण्यात आल्याची बातमीही आली.


2011 / 2012
या ब्लॉगवरील गणेशोत्सव

मी शाळेत असतांनासुध्दा गणेशोत्सवात घरी, शाळेत आणि गावात त्याची धामधूम चालत असे. ते दिवस अगदी वेगळे वाटायचे. पुण्यामुंबईकडे आल्यानंतर इकडल्या उत्सवाबद्दल तर विचारायलाच नको. त्याचे स्वरूप बदलत चालले असले तरी त्यामागे दिसणारा उत्साह तसाच आहे किंबहुना तो वाढतो आहे. गणेशोत्सवातले दिवस त्यामुळे काहीसे वेगळे आणि संस्मरणीय असेच असतात.

आनंदघन या ब्लॉगचा श्रीगणेशा २००६ सालाच्या सुरुवातीला केला. त्याचे नांव ‘श्रीगणेशा’ असे दिले असले तरी त्यात गणेश या देवाचा उल्लेखही केला नव्हता. तेंव्हाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये असतांना आलेल्या एका वेगळ्या अनुभवाची हकीकत त्यात दिली होती. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि इतर कामे तर करू शकत नव्हतोच, हा ब्लॉगही कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या निराशाग्रस्त मनस्थितीत असतांना त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. त्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारास मी त्या मोठ्या आजारातून देवाच्या कृपेने बरा होण्याच्या मार्गावर होतो. अजून हिंडायफिरायला लागलो नव्हतो त्यामुळे घराच्या बाहेरील उत्साहाच्या वातावरणात सामील होणे मला शक्य नव्हते. घरात बसल्याबसल्याच किंवा अंथरुणावर पडल्या पडल्या गणरायाची विविध रूपे मनात आठवून आणि टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरेवर पाहून त्यावर ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही लेखमालिका लिहून आपल्या परीने ती विविध रूपे वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे सचित्र लेखांमध्ये दाखवू शकलो. अशा प्रकारे ‘कोटी कोटी रूपे तुझी’ ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या काळात माझ्या अंगात काही काम करायचे फारसे त्राण नव्हते आणि मनोबलसुध्दा बरेच ढासळलेले होते. पण तरीही नेटाने अकरा दिवस रोज काही लिहू शकलो आणि त्या काळात माझ्या काँप्यूटर आणि इंटरनेटनेही साथ दिली, घरातली वीज गेली नाही की बाहेरची इंटरनेटची केबल तुटली नाही. ही विघ्नहर्त्याची कृपा असावी असे वाटायला लागले. त्यानंतर माझ्या शारीरिक परिस्थितीतही सुधारणा होत गेली आणि मनातला आत्मविश्वास पूर्ववत होत गेला. या ब्लॉगवरील लेखनात इतके सातत्य त्यापूर्वी कधी आले नव्हते आणि नंतरही ते क्वचितच घडले असेल.

२००७ मध्ये गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. त्या वर्षी हा ब्लॉग कोमात गेला होता, पण याहू ३६० वर आनंदघन याच नावाचा दुसरा ब्लॉग चालत होता. (पुढे तो बंद पडला) माझा मराठीभाषी संगणकसखा त्या वेळेस पुण्याला माझ्यासोबत नव्हता. मुलाक़चा एक इंग्रजीभाषी लॅपटॉप माझ्या हाताशी आला, पण त्याला मराठी भाषा कशी शिकवायची याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. मला या घोळाची पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी पूर्वतयारी करून पुण्याला गेलो होतो. त्या वेळेस गजाननाची कांही विशेष रूपे आणि त्याची कांही लोकप्रिय गाणी चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न मी याहूवर केला. तीच गाणी मी नंतर २००८ साली ‘गणपतीबाप्पा मोरया’ या मथळ्याखाली या ब्लॉगवर दिली. शिवाय ‘उंदीरमामाकी जय’ हा नवा लेख लिहिला.

त्यानंतरच्या काळातसुध्दा या ब्लॉगवर मी गणेशोत्सव साजरा करत राहिलो. ‘गणेशोत्सव आणि पर्यावरण’ या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. गणेशोत्सवात होणारी सजावट आणि गणेशमूर्तींचे विसर्जन यांचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, तो कसा आणि किती कमी करता येईल याबरोबरच यात किती सत्य आणि तथ्य आहे, किती विपर्यास किंवा अतीशयोक्ती आहे, हे परिणाम टाळण्यासाठी जे पर्यायी मार्ग सुचवले जातात त्यांचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, ज्या वस्तूंच्या गणेशोत्सवामध्ये होत असलेल्या वापरावर आक्षेप घेतले जातात त्याच वस्तूंचा इतर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वापर होत असतो, मुळात समाजाला उत्सवांचीच किती गरज असते किंवा उपयोग होतो वगैरे सर्व बाजूने विचार करणारे लेख या मालिकेत दिले होते.

गणेशोत्सवाचे ऐतिहासिक महत्व सांगून झाल्यावर त्याच्याशी तुलना करून आज त्याला आलेले रूप हा एक टीका करणाऱ्यांचा आवडता विषय आहे. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवणही या वेळी केली जाते. मलाही याबद्दल लिहिण्याचा मोह झाला. इतका जुना भूतकाळ मी काही प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल फक्त वाचले आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणजे तुलनेने आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणेशोत्सवातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या आणि कोणत्या गोष्टींची उणीव भासली याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

२०११ साली गणेशोत्सवाला चारच दिवस राहिले असतांना मला पुन्हा एकदा हॉस्पिटलाची वारी करावी लागली होती. गणेशचतुर्थीच्या आदले दिवसापर्यंत तबेत थोडी नरम गरमच होती. गणेशाची स्थापना झाली, अनेक आप्तस्वकीयांच्या भेटी झाल्या, घरातले वातावरण चैतन्याने भारले गेले आणि त्यातून मलाही ऊर्जा मिळाली असावी. पुन्हा एकदा या दिवसात फक्त गणेशाबद्दल लिहायचे ठरवले. अगदी रोजच्या रोज लिहायले जमले नाही पण आठ लेख लिहिले गेले. त्यांना यथायोग्य अशी नवी चित्रे मात्र देता आली नाहीत. त्यात मी गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले. या निमित्याने काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या .

२०१२ साली आलेल्या गणेशोत्सवात मी ‘गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला’ हा विषय घेऊन त्यात गणित आणि लेखनकलांचा गणपतीशी असलेला संबंध दाखवला तसेच लोकमान्य टिळकांच्या काळापासून आजकालच्या परिस्थितीपर्यंत या उत्सवात कसा बदल होत गेला याचाही वर्तमानपत्रांमधून आलेल्या लेखांच्या आधारे आढावा घेतला.

******************

2014

गणेशोत्सवानिमित्य

तुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।

                स्व. ग. दि. माडगूळकर

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर “गणपती बाप्पा मोरया”चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.

असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, “तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो.”
त्यावर पहिला मित्र म्हणाला, “बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?”
“बुद्धी देणारा.”
“मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस.”

ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.

गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.

ःःःःःःःःःःःःःःःःः

२०१५ साली आम्ही दोघेही एका अपघातात जबर जखमी झालो होतो. परमेश्वराच्या कृपेने त्यातून वाचलो, पण दीर्घकाळ आजारी होतो आणि हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होतो. त्यामुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव मनासारखा साजरा करणे शक्य झाले नाही. याची खंतच मी दोन लेखांमधून व्यक्त केली होती. मी त्यातून हळूहळू सावरलो, पण अलकाचे दुसरे गंभीर दुखणे बळावले आणि तिची तब्येत खालावत जाऊन २०१६ च्या श्रावणमहिन्याच्या अखेरीस ती देवाघरी गेली. त्यामुळे त्या वर्षी आम्ही घरी गणेशोत्सव साजरा केरू शकलो नाहीच, ब्लॉगवरही काही लिहिण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. २०१७, २०१८ आणि २०१९ साली लिहिलेले लेख या ब्लॉगवर वेगळे चढवणार आहे.

************

गेल्या दहा वर्षातील लेखांची यादी खाली दिली आहे.

२००६ : कोटी कोटी रूपे तुझी – पुष्प १ ते ११

२००७ साली हा ब्लॉग बंद होता.

२००८ : गणपतिबाप्पा मोरया भाग १ ते ३
उंदीरमामाकी जय
गणेशोत्सव आणि पर्यावरण १ ते ५

२००९ : आधी वंदू तुज मोरया
मूषक आणि माउस
लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव -१, २
यंदाचा आमचा गणेशोत्सव
पुढच्या वर्षी लवकर या … की एकदा येऊच नका?

२०१० : गणेशोत्सवातली उणीव
यंदाच्या गणेशोत्सवातील आगळेपण
यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी

२०११ : गणपती, तुझी नावे किती ?
ॐकार गणेश
अथर्वशीर्षामधील गणपतीचे वर्णन
पुराणातला गणपती
पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी -१ ते ४

२०१२ : गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला – भाग १ – गणपती आणि गणित
भाग २ – गणेश आणि लेखनकला
भाग ३ – सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात
भाग ४ – सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार
भाग ५ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती
भाग ६ – टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती (उत्तरार्ध)

२०१३ : गणेशोत्सवातली उणीव
अनंतचतुर्दशी
वक्रतुंड महाकाय
गणपतीची आरती – २ – शेंदुर लाल चढायो
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

२०१४ : गणेशोत्सवानिमित्य

२०१५ : गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपतीबाप्पांची इच्छा

हे सर्व लेख खालील दुव्यावर एकत्र उपलब्ध आहेत.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/

दशावतार

प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहून किंवा शेषावर शयन करून करत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे चालत रहावे यासाठी अगणित निसर्गनियम करून ठेवलेले आहेत. त्यानुसार कालचक्राचे रहाटगाडगे फिरत असते. तरीही कधीकधी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे असे वाटल्यास श्रीविष्णू स्वतः पृथ्वीतलावर अवतरतात. “यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ।।” असे भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून ठेवले आहे. याच कारणासाठी त्याने दहा अवतार घेतले असे सांगतात.

पण खरे तर मुळात याची त्याला काय गरज होती? उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या परमात्म्याने आधी कुठल्याही दुरात्म्याला जन्मालाच घातले नाही, चुकून तो जन्माला आलाच तर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला संधीसाधूऐवजी साधूसंत बनवले किंवा त्याला कुठल्या तरी आधीव्याधी किंवा अपघाताने त्वरित नष्ट करून टाकले तर जगातील सज्जनांना त्याचा त्रासच होणार नाही. त्याने मनात आणले असते तर कांहीही करणे जर त्याला शक्य होते तर समजा जेंव्हा सीतेचे हरण करायला रावण आला तेंव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या असत्या किंवा द्यूत खेळायला आलेल्या दुर्योधनाला लकवा मारला असता असे काहीही झाले असते तर पुढचे सगळे रामायण आणि महाभारत सहजपणे टळले असते आणि लक्षावधी कां कोट्यावधी निरपराध सैनिकांचे प्राण वाचले असते. पण देवाने असला सोपा मार्ग अवलंबिला नाही, त्याची तशी योजना नव्हती, त्याला सगळे रामायण आणि महाभारत घडायला हवेच होते. चांगले वाईट, सुष्ट दुष्ट वगैरेंचे सगळे प्रकार त्याच्या अनुमतीने या जगात उपस्थिती लावत असतात. त्यात जास्तच असंतुलन व्हायला लागते तेंव्हा तो अवतार घेऊन त्यात हस्तक्षेप करतो असे फार तर म्हणता येईल.

मुळात या जगात देव आहे किंवा नाही हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. कारण तो नसेलच तर या लेखाचे प्रयोजन उरत नाही. तेंव्हा घटिकाभरायाठी तो आहे असे गृहीत धरू. तरीसुद्धा अमूर्त असा परमेश्वर जेंव्हा मूर्त अवतार घेऊन या जगात येतो तेंव्हा तो या विश्वाच्या निसर्गनियमांचे पालनसुद्धा कटाक्षाने करणारच अशी माझी समजूत आहे. ते नियम तोडून अशक्यप्राय असे चमत्कार दाखवण्यासारखा रडीचा डाव खेळण्याची त्याला गरज नाही. पण दशावतारांच्या सर्व कथा सुरस आणि चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात तशा घडल्या असणे केवळ अशक्य आहे असे मला तरी वाटते. “आपले महान पूर्वज खोटे कशाला बोलतील? त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण?” वगैरे म्हणत लगेच माझ्या अंगावर धांवून यायचे कांही कारण नाही, कारण मी त्यांच्याबद्दल तसे कांही म्हणतच नाही.

“मुलांनी दंगा करून घर डोक्यावर घेतलं किंवा अमकी गोष्ट शोधण्यासाठी मी घर पालथं घातलं” असं कोणी म्हंटलं तर त्याचा अर्थ सर्व भिंती आणि छपरासकट ते घर उचलून डोक्यावर धरले किंवा पालथे केले असा होत नाही. ते मराठी भाषेतले वाक्प्रचार आहेत. ते खोटे बोलणे होत नाही. आपण जेंव्हा लहान मुलांना पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील गोष्टी सांगतो तेंव्हा थापा मारणे हा आपला उद्देश असतो कां? त्या गोष्टींच्या निमित्ताने त्यातील तात्पर्य त्यांच्या मनावर बिंबवावे हा चांगला हेतू मनात धरून आपण त्या मनोरंजक काल्पनिक गोष्टी त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे सर्वसामान्य वकूबाच्या माणसाला समजतील आणि आवडतील अशा सुरस कथा रचून त्या पुराणादिक वाङ्मयामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ज्या काळात त्या रचल्या गेल्या त्या वेळी त्यांचा मतितार्थ सुद्धा सांगितला जात असेल पण तो काळाच्या उदरात लुप्त होऊन गेला आणि मनोरंजक चमंत्कृतीपूर्ण कथा तेवढ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोचल्या असणार. मधल्या काळातील लोकांनी, विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांनी त्या गोष्टींची रंजकता वाढवण्याठी त्यात भरपूर तपशिलांचा मालमसाला मिसळला असणारच. तेंव्हा आपण आता जाणून बुजून त्यांचा शब्दशः अर्थ कशाला घ्यायचा?

त्या कथांच्या मागील अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले आहेतच. दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मत्स्यावतार हा विष्णूचा पहिला अवतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमीनीवर येणाऱ्या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशु आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक बुटकासा लघुमानव आहे. त्यानंतर परशुराम हा सशक्त शूर योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. त्यानंतर आलेल्या रामाकडे अनेक प्रकारची अमोघ अस्त्रे तर आहेतच, त्याशिवाय आदर्श जीवनाचे वस्तुपाठ तो आपल्या वागण्यातून घालून देतो. त्यानंतरच्या कृष्णावतारात तर त्याने अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या, दुष्टांचा संहार केला आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या पार्थाला गीतोपदेश करून कर्तव्याचा मार्ग दाखवला. मनाचा व बुद्धीचा विकास शारीरिक बलापेक्षा उच्च दर्जाचा असतो हे त्यानंतरच्या बुद्धावतारात दाखवून दिलेले आहे. कदाचित आता यापुढे काय हा प्रश्न पडल्यामुळे कल्की अवताराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसावी.

दशावतारांचा हा क्रम पाहूनसुद्धा लगेच “उत्क्रांतीचा सिद्धांत आमच्या द्रविणमहर्षींनी कधीच लावून ठेवला होता. पाश्चात्यांनी तो चोरून आपल्या नांवावर खपवला पहा.” अशी बाष्कळ बडबड करण्याचे धैर्य मी करणार नाही. निसर्गामध्ये रोज घडत असलेला बदल पाहून त्यामागील उत्क्रांतीचे तत्व आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले असणे सहज शक्य आहे. पण त्या सिद्धांताला पार पाताळात गाडून टाकून “विश्वाची उत्पत्ती करतांना परमेश्वराने सगळे कांही उत्कृष्ट निर्मिले होते. त्यानंतर प्रत्येक युगात अवनती होत होत आता घोर कलीयुगात जगाच्या अधःपाताची परमावधी झालेली आहे.” अशी एक उफराटी समजूत मधल्या काळातील आपल्याच विद्वानांनी पिढ्यान पिढ्या आपल्या समाजाच्या मनावर बिंबवून ठेवली आहे ते कशामुळे झाले हा अवघड प्रश्न समोर येईल. दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंनासुद्धा डार्विनचा सिद्धांत अजून मान्य नाही. तेंव्हा या बाबतीत धर्म आणि विज्ञान यांची गल्लत न करणेच श्रेयस्कर ठरेल.

समाजात चाललेल्या घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या प्रवृत्ती पाहतांना मला नेहमी कोणत्या ना कोणत्या अवताराचे रूप त्यात दडलेले दिसते. त्याचा अनुक्रम कालानुसार न लावता दर्जानुसार लावला तर आपल्याला त्यातही दशावतार दिसतील. ते दाखवण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे. मोठा मासा छोट्या माशाला खातो आणि त्याच्यापेक्षा मोठा मासा त्याला गट्ट करतो हे जलचरांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. त्यामुळे सगळेच मासे आपल्या भक्षकापासून प्राण वाचवीत स्वतःचे भक्ष्य शोधत फिरत असतात. असे असले तरी त्या सगळ्यांना एकाच जलाशयात रहायचे असते. त्यातल्या मोठ्या माशांना खाणारा महाकाय देवमासा हा लहानग्या माशाला आपला रक्षक वाटतो. त्याच्याबद्दल तो एकाच वेळी भीती तसेच आदर बाळगून असतो. मानवी समाजाची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाही. आदिमानवाच्या काळात बलिष्ठ माणूस दुर्बलाला जिवानिशी मारून टाकीत असे. आजकाल अगदी तसे केले नाही तरी त्याच्या क्षेत्रामधील त्याचे अस्तित्व नष्ट करणे सर्रास चालते. हीच गोष्ट विलीनीकरण आणि संपादन या माध्यमातून व्यावसायिक संस्था करतात. विजेत्या समाजाने पराजित समाजाला उध्वस्त केल्याच्या कितीतरी घटनांनी इतिहास भरलेला आहे. हा सगळा प्रकार मत्स्यावतार झाला. सर्वात तळातला, प्राणिमात्रांच्या निव्वळ जगण्याच्या सहजप्रवृत्तीवर आधारलेला.

त्यानंतर कूर्मावतार. कासव हा तसा निरुपद्रवी प्राणी असतो. तो कुणावर हल्ला करायला जात नाही. हळूहळू सरपटत पुढे जातो. पण निग्रहपूर्वक चालत राहून चंचल सशाबरोबर लावलेली शर्यत जिंकू शकतो. त्याच्या अंगावर एक संरक्षक कवच असते. गरज पडल्यास आपले सारे अंग तो त्याच्या आंत दडवून ठेवतो. ते कवच त्याचे संरक्षण करतेच पण वेळ पडल्यास इतरांना आधार देते. समाजातला एक वर्ग असाच असतो. तो निमूटपणे आपला मार्ग चोखाळत असतो. विरोधाचे प्रहार त्याला प्रतिकार न करता सहन करतो पण त्यातून तो वाचतो. वाटल्यास स्वतःला कोषात गुरफटून घेतो. अप्रत्यक्षपणे तो अनेकांना आधार देत असतो. त्या आधाराच्या बळावर इतर लोक पुढे येतात. मेरू पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर पेलून घेऊन देवदानवांना समुद्रमंथन करणे शक्य करून देणाऱ्या व त्यात मिळालेली रत्ने त्यांनाच वाटून घेऊ देणाऱ्या कूर्मावताराची ती रूपे आहेत असे मला वाटते. सुरक्षितता आणि स्थैर्य या प्राणिमात्रांना हव्या असलेल्या प्रवृत्ती त्यात दिसतात.

पण सगळेच लोक अल्पसमाधानी वृत्तीचे नसतात. कांही जणांना वेगाने पुढे जायची इच्छा असते. इच्छित दिशेने एकाद्या वराहासारखी मुसंडी मारून त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ते बाजूला करीत जातात. मुद्दाम कोणाला इजा करावी असा त्यांचा उद्देश नसतो. त्यांना फक्त आपला मार्ग सुकर करून घ्यायचा असतो. आपला शक्य तितका विकास साधण्याची इच्छा नैसर्गिक रीत्या प्रत्येक जीवाच्या मनात उत्पन्न होतच असते आणि ती पूर्ण करण्याची धडपड तो करीत असतो. कासवाला जे जमणार नाही ते आपल्या ताकतीच्या जोरावर वराह करू पाहतो. प्रगतीची ही पुढची पायरी वराह अवतारात दिसते.

स्वतःचा हव्यास पुरवत असतांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा तोल सुटतो. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरांकडून त्या हिसकावून घेणे सुरू होते. त्यासाठी सत्ता मिळवणे आणि ती मुठीत ठेवणे यासाठी जरब बसवणे सुरू होते. दुर्बल जनता आधी कांही काळ ते अत्याचार एखाद्या निर्जीव खांबासारखे स्वस्थपणे पाहते, पण त्याचा अतिरेक असह्य होताच ती चवताळून उठते, अक्राळ विक्राळ रूप धारण करते. नृसिंहावतार हे या प्रकारच्या उत्स्फूर्त आणि हिंस्र उद्रेकाचे स्वरूप आहे. दुष्ट हिरण्यकश्यपूचे त्यात निर्घृणपणे निर्दाळण होते. फ्रान्स आणि रशीयामधील राज्यक्रांतीच्या घटना तसेच नागपूरच्या गोरगरीब महिलांनी कुख्यात गुंडाला लाथाबुक्क्यांच्या माराने चेचून टाकले त्यात समाजाचे तेच उग्र रूप दिसले. मानवी हक्कासाठी त्याने तात्पुरते पाशवी रूप धारण करणे या अवतारात दिसून येते.

बळी हा एक सज्जन राजा असतो. त्याच्या मनात आपल्या प्रजेवर अत्याचार करण्याची इच्छा नसते. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण आपल्या राज्याचा अनिर्बंध विस्तार करण्याच्या नादात तो अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करण्यात मग्न असतो. त्यामुळे त्याचा प्रजेबरोबर संपर्क रहात नाही. मात्र त्याच्या नांवाने कारभार हांकणाऱ्या अधिकाऱ्यांचा जुलूम असह्य झाल्यामुळे प्रजा नाराज होऊन बळीराजाची लोकप्रियता नाहीशी होते. बटु वामन जेंव्हा राजाला भेटतो तेंव्हा तो उदार मनाने त्याला पाहिजे ते मागायला सांगतो. आपण त्याच्या मागण्या सहज पुरवू शकू असा मोठा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर वाटत असतो. इथे बटु वामन हे त्याच्या राज्यामधील लहान (सामान्य) लोकांचे प्रतीक असावे. तो फक्त तीन पावलाइतकी जमीन मागतो. त्याचे पाऊल हे जनतेमधील असंतोषाचे प्रतीक धरल्यास पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापून जाते याचा अर्थ सगळ्यांनाच तो राजा अप्रिय झालेला असतो. दुसऱ्या पावलांने स्वर्ग व्याप्त होतो. तो तर त्याने जिंकून घेतलेला प्रदेश, तिथे कोणाला तो हवासा वाटणार? हा व्यापक असंतोष सत्तेच्या बडग्याखाली दडपून टाकल्यास तो हिंसक रूप धारण करून उसळी घेऊ शकेल याचा विचार करून बळी राजा तो जनादेश शिरसावंद्य मानून तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेऊन घेतो. थोडक्यात आपल्या राज्यात कुठेच थारा न मिळाल्यामुळे त्याला अज्ञात पाताळात स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारची रक्तहीन क्रांती हा निश्चितच पुढचा टप्पा म्हणता येईल.

राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा खड्गहस्त बनलेला समाजाचा एक वर्ग आपल्या बलाचा दुरुपयोग करून निःशस्त्र प्रजेला नाडू लागतो तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीतरी ठामपणे उभे रहावे लागते. ऋषीमुनींच्या कुळात जन्मलेला परशुराम जपतप करणे सोडून देऊन हातात परशु धारण करून त्या लढाईत उतरतो आणि त्या उद्दाम झालेल्या वर्गाला वठणीवर आणतो. या अवतारातसुद्धा मला परशुराम हा एक व्यक्ती न वाटता तो सुजाण समाजाचा प्रतिनिधी असावा असेच वाटते. मात्र त्याचा लढा पूर्वीच्या दोन अवतारामधे होता तशासारखा क्षणिक नसून तो प्रदीर्घ काळ चालत राहतो. त्याची एकवीस आवर्तने त्याला करावी लागतात.

रामावतारामध्ये राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष नाही. अयोध्या आणि लंका या दोन्ही राज्यामधील प्रजा आपापल्या राज्यकर्त्यावर खूष असलेली सुखी जनता असते. रामायणाच्या कथेमध्ये राम आणि रावण या दोन भिन्न प्रकृतीच्या मुख्य व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले, मित्र, भक्त वगैरे अनेक पात्रांची वेगवेगळ्या छटांनी युक्त व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. त्याचा चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्वनिष्ठ महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. रामरावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.

कृष्णावतारामध्ये त्याच्या जीवनात कमालीचे वैविध्य दाखवले आहे. बालपणी सवंगड्यांबरोबर खेळणारा नटखट कान्हा तसेच गोकुळातील सर्वांना आपल्या वर्तनाने तसेच बॉँसुरीच्या सुरावर भुलवणारा मोहन अचानक त्या सगळ्यांना सोडून मथुरेला जातो आणि कंसाची अन्यायी राजवट उलथून टाकतो. रुक्मिणीहरण करून तिच्याशी प्रेमविवाह करतो. स्वतः चक्रवर्ती सम्राट वगैरे बनून सत्ताधीश व्हायचा विचारही करीत नाही. त्याऐवजी पांडवांचा मित्र व सल्लागार बनतो. त्यांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाई करायला जातो आणि ती सफल न होऊन युद्धाला तोंड फुटल्यानंतर “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” असे म्हणत अर्जुनाचा सारथी बनतो. सुरुवातीलाच गुरुजनांना समोर पाहून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला रणांगणावरच धर्मशास्त्राची मूलतत्वे सांगून कर्तव्यपालनाला प्रवृत्त करतो. भीष्मपितामहांपासून दुर्योधनापर्यंत कौरवसैन्याचे जितके सेनापती झाले त्या प्रत्येकाच्या पतनाचा मार्ग शोधून पांडवांना मदत करतो. अशा प्रकारे त्याचे एक परिपूर्ण व्यक्तित्व दाखवले आहे.

नवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ या नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधीवृक्षाखाली विचारमग्न असतांना त्याला तत्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो दया, क्षमा, शांती, समता, बंधुत्व वगैरे सद्गुणांचा प्रसार करण्यात घालवतो. “अभिलाषा ही दुःखाची जननी आहे” हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे हे सत्य पुन्हा अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. त्याच्या भक्तजनांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

कल्की अवताराबद्दल मला अस्पष्ट अशी किंचित माहिती सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. सध्या वाहणारे वारे पाहता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर विश्वाला थक्क करणारा अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवणे कदाचित शक्य आहे. एका अधांतरी तर्कापलीकडे त्यात कांही अर्थ नाही.

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानवसमूहाच्या प्रवृत्ती आढळतात. राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच तर तो त्याच पठडीतला होणार अशी माझी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. यातील प्रत्येकाची उदाहरणे भूतकाळात होऊन गेलेली आहेत तसेच आजही आपल्या डोळ्यासमोर घडतांना दिसतात. ती ओळखून त्यातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हे समजण्याइतके शहाणपण आले तरी खूप फायदा होईल.

आध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम्

आदिशंकराचार्यांनी लिहिलेले निर्वाणषटकम् हे अप्रतिम स्तोत्र किंवा काव्य खाली दिले आहे, तसेच त्याचा इंग्रजी अनुवादही दिला आहे. त्यातील शिव या शब्दावरून हे शंकराचे स्तोत्र आहे असे कोणाला वाटेल, किंवा निर्वाणषटक या नांवावरून शिवरात्रीच्या दिवशी (रात्री) त्याचे पठण केल्यामुळे निर्वाण किंवा मोक्षाची प्राप्ती होते असेही कोणी सांगेल. पण या स्तोत्रामध्ये कोणत्याही देवाची स्तुती किंवा प्रार्थना केलेली नाही. मनुष्य आणि ईश्वर किंवा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधलेले आहे अशा अद्वैताच्या अवस्थेत कोण कुणाला काय मागणार? माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार? पण या रचनेतील छंदबद्धता, माधुर्य, विचारांची झेप, जगाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याविषयी असलेले ज्ञान, पांडित्य, अचूक शब्दरचना या सगळ्या गोष्टी मनाला थक्क करणार्‍या आहेत. इतर अनुवादांच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो कांही अर्थ माझ्या अल्पबुद्धीला अनुभूतीविना समजला तो आपल्या शब्दात देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.

कोSहम्? किंवा मी कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण “माझे शरीर” म्हणणारा ‘मी’ कोण आहे? हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां? निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तरी त्यात चैतन्य कशामुळे येते? स्वयंचलित यंत्रे निघण्यापूर्वीच्या काळात हा प्रश्न जास्तच महत्वाचा होता कारण जड वस्तूंमध्ये चैतन्य आणणारे एक वेगळे तत्व असणे त्या काळात आवश्यक वाटत होते. “मला कोणतीही गोष्ट समजते”, “ती माझ्या लक्षात राहते”, “मला आठवते” वगैरे मधला ‘मी’ कोण? या प्रश्नाचा वेध घेतांना ‘बुद्धी’ ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे “मला आवडते”, “मला चीड आणते” ही कामे करणारे मन आले आणि या ‘मी’पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग त्या वेळी आपल्या क्रिया कोण ठरवते? यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां? अशा आणखी किती अदृष्य गोष्टी आहेत? असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत? शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व जगभरातल्या बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो? हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे? या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. जगद्गुरु शंकराचर्चांनी त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे. यामध्ये “मी हे नाही”, “ते सुद्धा नाही” असे करीत शंकराचार्यांनी जगाचे सुंदर वर्णन केले आहे.

मन, बुद्धी, अहंकार व चित्त म्हणजे मी नाही, जीभ, नाक, कान, डोळे आदि (ज्ञानेंद्रिये) मी नाही, (पंचमहाभूतातील) जमीन, आकाश, हवा किंवा तेजसुद्धा नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी म्हणजे जीवनाचा प्राण नाही की प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच वायु नाही. रक्त, मांस, मज्जा, अस्थी, कातडी, चरबी आदि ज्या सात धातूंपासून हे शरीर बनलेले आहे किंवा ज्या पांच शारीरिक वा मानसिक आवरणामध्ये ते आच्छादित केलेले आहे ते म्हणजे मी नव्हे. हात, पाय, जीभ, व उत्सर्जक इंद्रिये ही पांच कर्मेंद्रिये म्हणजे मी नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू माझ्यात नाहीत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ही मला नकोत. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी पुण्याचा किंवा पापाचा धनी नाही. मला सुखही होत नाही की दुःखही होत नाही. मंत्रपठण, तीर्थयात्रा, यज्ञयाग किंवा वेदांताची मला गरज नाही. मी उपभोग घेणारा नाही, देणारा नाही की उपभोगाची वस्तूही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला मृत्यूचे भय नाही (कारण मला मृत्यूच नाही), मी जातींमध्ये भेदभाव करीत नाही, मला माता पिता व जन्मच नाही. भाऊ, मित्र, गुरू, शिष्य कोणीही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला विकल्प (विचार) नाही की आकार नाही. मी सर्वत्र आहे व सर्व इंद्रियांना चालवतो. पण मी कशाशीच बांधलेलोही नाही की कशापासून मुक्तही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.

निर्वाण षटकम्
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रौ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।।

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।।

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।।

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।।

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।।

अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।

——————————————————————–
I am not the thought, intellect, ego, life;
I have no ears, tongue, nostrils, eyes;
I am not the five great elements (ether, earth, fire, air, water);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।1।।

I am not the vital air nor do I have anything to do with the physiological functions of the body;
I am not the seven-fold material* nor am I attached to the five sheaths**;
I am not the five organs of action (Speech, hands, legs, genital organs, anus)
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।2।।

I have neither passion nor hatred, neither greed nor covetousness;
I have neither arrogant vanity nor do I compete with anyone;
I don’t need the four purposes of life (dharma: virtue, arTha: wealth, kAma: desire, mokSha: liberation);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।3।।

I am free of sin or merit, joy or sorrow;
I know no hymns, have no pilgrimage to make, I know no scriptures, nor have I anything to gain from rituals;
I am neither the food (the experience) nor the taster (the experiencer) nor the cook (experience-giver);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।4।।

I have no doubt of death, nor have I any caste distinction;
I have neither father nor mother, I was never born!
I have no kith or kin, no teacher or disciple;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।5।।

I am free from thoughts, formless is my only form;
I am the vitality behind the sense organs of all;
Neither attached to anything nor free from everything, all inclusive I am;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।6।।

Note:
*The seven-fold material that goes into the building up of the body: Marrow, bone, fat, flesh, blood, inner skin, outer skin
**The five sheaths of personality: Anatomical structure, Physiological structure, Mental sheath, Intellectual sheath, Bliss sheath

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन

आजकाल टीव्हीच्या एका वाहिनीवर रोज ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे (किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे) कीर्तन सादर केले जात आहे. चार वर्षांपूर्वी एकदा मला त्यांच्या कीर्तनाचा लाभ झाला होता तेंव्हा मी लिहिलेला हा लेख.

“हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिल को बहलाने के लिए “ग़ालिब”, ये खयाल अच्छा है।” असा मिर्झा गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे. या बाबतीतले माझे मतही फारसे वेगळे नाही. सौंदर्य, सुख, आनंद वगैरेची अगदी परिसीमा ज्या ठिकाणी असते ती जागा म्हणजे ‘स्वर्ग’ अशी स्वर्गाची व्याख्या किंवा संकल्पना आहे. असा एक अद्भुत स्वर्गलोक आकाशात कुठेतरी असेल असे मला तरी मुळीच वाटत नाही. आता आकाशापलीकडले अवकाशही दूर दूरवरपर्यंत पाहून झाले आहे. त्यात कुणालाही आणि कुठेही स्वर्गलोक, जन्नत, हेवन वगैरे काही आढळलेले नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागा असोत, आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित स्थळे असोत किंवा माणसांनी आपल्या चांगल्या वागणुकीमधून निर्माण केलेले आनंदी वातावरण असो, या सगळ्या सुंदर आणि आनंददायी जागा आपल्या पृथ्वीवरच असतात, आपल्याला त्या पहायच्या किंवा घडवायच्या असतात अशी माझी स्वर्गाची कल्पना आहे.

जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती, मोक्ष वगैरेंचे मला कधीच कणभरही आकर्षण वाटले नाही, त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली नाही. पण असे असले तरी मला भजनकीर्तनाचे वावडेही नाही. भक्तीरसात ओथंबलेली मधुर गीते किंवा टाळमृदुंगाच्या तालावर गायिलेले अभंग ऐकणे मला मनापासून आवडते. चांगल्या कीर्तनकारांनी केलेले कथानकाचे रसाळ वर्णन हा उत्कृष्ट प्रकारच्या कथाकथनाचा (स्टोरीटेलिंगचा) नमूना आहे आणि ते कानावर पडले तर ऐकत बसावे असे मला वाटते. कीर्तनातली कथा खरी आहे की काल्पनिक वगैरेंचा विचार करून मी त्यातली मजा घालवत नाही. मजेदार कथानक, चटपटीत संवाद, त्यांचे उत्तम सादरीकरण, मध्येच कर्णमधुर संगीत, एकादा मुद्दा पटवून देण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी पारंपरिक कीर्तनात असतात. याच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतोच ना? शिवाय कीर्तनांमध्ये मनोरंजनाबरोबरच थोडे ज्ञानामृतही मिळते.

दहा पंधरा वर्षांपूर्वी टीव्हीवर एका विशिष्ट वेळेला ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन लागत असे. त्या वेळी मी घरी असलो तर तो कार्यक्रम आवर्जून पहात आणि ऐकत असे. काही लोकांना हे पाहून त्याचे आश्चर्य वाटायचे. या निमित्याने देवाचे नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि त्यातून माझा उद्धार होईल किंवा मी सन्मार्गाला लागेन असेही कदाचित काहीजणांना वाटत असे. तसा मी काही कुठल्याही वाईट मार्गाला लागलेलो नव्हतो किंवा पापाच्या राशी जोडत नव्हतो, पण उपासतापास, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरे मार्गाने पुण्य जोडायचा प्रयत्नही कधी करत नव्हतो. सरळ मार्गाने चालून आपली नोकरी, कुटुंब, समाज वगैरेंसाठी माझी जी काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायचा मी प्रयत्न करत असे आणि करत आलो आहे.

हे काम करता करता स्वतःसाठी आनंदाचे काही कण मिळवणे आणि इतर लोकांनाही थोडा आनंद वाटणे याचाही जमेल तेवढा प्रयत्न मी करत असतो. त्या काळातली बाबामहाराजांची कीर्तने ऐकतांना त्यांचा खणखणीत आवाज, ओघवत्या भाषेमधून होत असलेले सुश्राव्य निवेदन, नर्मविनोद, रोजच्या जीवनातली उदाहरणे देणे, संतवाणीचा प्रचंड व्यासंग, अधून मधून भजनांचे सुमधुर गायन या सगळ्याचा चांगला प्रभाव पडत असे. यामुळे मला कीर्तनाचा तो कार्यक्रम ऐकायला आवडत असे. त्यातून बाबामहाराजांबद्दल कुतुहल वाटत गेले, कधी तरी त्यांचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकावे अशी एक अंधुक इच्छाही मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी उगम पावली. पुढे त्या कार्यक्रमाचे टीव्हीवर प्रक्षेपण होणे थांबले किंवा मला तो पहायला वेळ मिळेनासा झाला आणि ती गोष्ट पार विस्मरणात गेली. इतर कोणाच्या बोलण्यातूनही बाबामहाराजांच्या नावाचा उल्लेख माझ्या कानावर कधी आला नाही.

Babamaharaj

वाशीला आमच्या घराजवळ असलेल्या शंकराच्या देवळात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. आमच्या पोस्टबॉक्समध्ये येऊन पडलेले या वर्षीच्या कार्यक्रमाचे पत्रक पाहिले, तर त्यात पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचे वाचले. माझ्या जुन्या आठवणींवर पडलेली विस्मृतीची धूळ थोडी पुसली गेली आणि कधीकाळी मनात उठलेली इच्छा पुन्हा जागी झाली. तिची पूर्ती होण्याची संधी आता आयती माझ्यासमोर चालत आली होती. रात्रीचे जेवण जरा आधीच उरकून घेतले आणि बाबामहाराजांना एकदा प्रत्यक्षात पहावे, त्यांचे चार मधुर शब्द ऐकावे आणि परत यावे असा विचार करून मी घरातून निघालो. शिवमंदिर नजरेच्या टप्प्यात यायच्या आधीच लाउडस्पीकरवरून येणारे सामूहिक भजनाचे सूर कानावर पडायला लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यातले शब्द कळायला लागले. “शिव हालाहले तापला।” हा एकच चरण आळवून आळवून गायिला जात होता. “नामे तोही शीतल झाला।।” हा पुढचा चरणही अधून मधून त्याच्या सोबतीला ऐकू येऊ लागला.

मंदिराच्या फाटकापाशी जाऊन आत पाहिले. उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी देवळाजवळ एक तात्पुरते व्यासपीठ उभारले होते. त्यावर दहा बारा टाळकरी उभे राहून भजन गात होते. समोरच्या पटांगणात जाजमे अंथरलेली होती, त्यातल्या निम्म्याहून जास्त भागात दोनतीनशे श्रोते दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या मागे थोडी जागा सोडून मागच्या बाजूला शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या मात्र पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या. शिवमंदिराच्या परिसराच्या दुसऱ्या गेटमधून आत जाऊन पाहिल्यावर कोपऱ्यातली एक खुर्ची रिकामी दिसली. मी तत्परतेने जाऊन तिचा ताबा घेतला. स्टेजवरचे तेच भजन अजून सुरूच होते. तो अभंग संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष सुरू झाला. त्याला श्रोत्यांनीही साथ दिली. दहा बारा मिनिटे हरीनामाचा गजर झाल्यानंतर तो थांबला. बाबामहाराजांचा धीरगंभीर आवाज कानावर पडायला लागला.

सुरुवातीला त्यांनी त्या जागी जमलेल्या श्रोत्यांचे या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल स्वागत केले म्हणण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले. त्यातले बरेचसे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या इतर भागांमधून वाशीला आले होते. डोक्यावर पागोटे किंवा पांढरी टोपी घालून फिरणारे मराठी लोक आमच्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत इतक्या मोठ्या संख्येने रहात असतील असे मला वाटत नव्हतेच. श्रोत्यांमधली त्यांची सोठी संख्या पाहून मला जरा नवलच वाटत होते. बाबामहाराजांच्या सांगण्यातून त्याचा उलगडा झाला. काल, परवा, तेरवा कुठे कुठे त्यांचे कीर्तन होऊन गेले आणि उद्या, परवा, तेरवा ते आणखी कुठे कुठे कीर्तन करणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली. आजही त्यांचे किती भरगच्च कार्यक्रम असतात याची कल्पना त्यावरून आली.

त्यांच्याकडे गडगंज वडिलोपार्जित मालमत्ता आहे, आपल्या कीर्तनासाठी ते कुणाकडेही बिदागी मागत नाहीत, हेसुद्धा त्यांनी सांगितले, ऐंशीचे वय झाले असल्यामुळे आता त्यांच्या पायात शक्ती उरली नाही, चालण्यासाठी आधाराची गरज पडते, पण त्यांना व्यासपीठावर नेऊन बसवले की मग तासन् तास अस्खलितपणे अव्याहत बोलायला मात्र काही अडचण येत नाही. त्यांना मिळालेले तल्लख बुद्धी आणि अस्खलित वाणी यांचे वरदान त्यांनी हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवावे यासाठीच देवाने अद्याप शाबूत ठेवले आहे. त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे या भावनेने ते हा ज्ञानयज्ञ करत आहेत असेही त्यांनी सांगितले. देवाविषयी असलेल्या भक्तीभावानेच सारे श्रोते जमलेले असल्यामुळे त्यांनीही शांत राहून मनोभावे या कीर्तनाचे श्रवण करावे, गडबड गोंधळ किंवा हालचाली करून त्यात व्यत्यय आणू नये, मध्येच उठून जागा बदलू नयेत किंवा बाहेर जाऊ नये वगैरे सूचना केल्या. शिवाय असे केल्यास तो बाबामहाराजांचा नव्हे तर प्रत्यक्ष देवाचा अपमान केल्यासारखे होईल अशी भीतीही घातली. लहान मुलांना हे समजण्यासारखे नसल्यामुळे त्यांची चुळबुळ चालली होती. त्यांनी यापेक्षा घरी जाऊन टीव्ही पहावा, भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा दाखवत आहेत ती पहावी असेही त्यांनी गंमतीने सांगितले.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे हे सुश्राव्य कीर्तन एका शिवमंदिरात चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये चालले होते. विठ्ठलभक्त वारकरी सांप्रदायातले बाबामहाराज आज शिवलीलेच्या कोणत्या कथेचे आख्यान लावणार आहेत याची मला उत्सुकता वाटत होती. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले की हरिनाम हाच त्यांच्या या कीर्तनाचा विषय होता. “शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।” अशा प्रकारे त्यात शंकराचा नावापुरता उल्लेख आला होता. कुठल्याही देवाचे किंवा परमेश्वराचे नाव घेणे का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वळणावळणाचा मार्ग निवडला होता.

आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही म्हणून काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसतातच असे नाही या सत्याचा आधार घेऊन त्यातून देवाचे अस्तित्व पटवून देण्याचे अनंत तर्क नेहमी सांगितले जातात. आपल्या आजूबाजूच्या हवेपासून ते प्राध्यापकाच्या मेंदूपर्यंत याची अनेक उदाहरणे मी आजवर ऐकली आहेत. “आपल्याला हवा दिसते का? पण ती असते हे आपल्याला माहीत आहे. याचप्रमाणे देव डोळ्यांना दिसत नसला तरी तो असतो.”, “आपल्या या (नास्तिक) प्रोफेसराचा मेंदू कुणी पाहिला आहे का? नाही ना? मग कशावरून त्याच्या डोक्यात मेंदू आहे?” वगैरे वगैरे. बाबामहाराजांनी त्यांच्या कीर्तनात एक वेगळे उदाहरण दिले. ते म्हणाले, “मी आज तुम्हा सगळ्यांना पाहतो आहे, तुमच्यातल्या कुणाच्याच बापाला मी कधी पाहिले नसेल, पण त्यांच्या असण्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, त्याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही. मग ज्या देवाने सर्व जगाला जन्माला घातले त्याच्याबद्दल कोणाला का शंका असावी?”

बापावरून सांगतांना बापाचे नाव न घेतल्याने एकदा काय घोटाळा झाला याची एक गोष्ट त्यांनी सांगितली. एका माणसाचे त्याच्या म्हाताऱ्या बापाशी पटत नव्हते. एकदा त्या दोघांमध्ये खडाजंगी वाद झाला आणि “आता मी तुमचे नावदेखील लावणार नाही बघा.” असे तणतणत ते माणूस घराबाहेर पडला आणि ऑफीसला गेला. तो नेमका पगाराचा दिवस होता. पगार घेण्यासाठी तो माणूस कॅशियरकडे गेला. कॅशियरने त्याला सही करायला सांगितले. त्याने त्याच्या सहीमघले बापाचे नाव गाळून सही केली. कॅशियरने त्याला पैसे दिले नाहीत. त्याची सही रेकॉर्डशी मॅच होत नाही असे म्हणाला. तो माणूस तणतणला, कॅशियरशी भांडला, “इथे माझा बाप काम करतो का? मी केलेल्या कामाचे पैसे मला मिळायला नकोत का?” वगैरे वगैरे. कॅशियरने नियमांवर बोट ठेवले आणि आपण त्यात बदल करू शकत नसल्याचे सांगितले.

तो माणूस चिडून मोठ्या बॉसकडे गेला, त्याच्याकडे कॅशियरची तक्रार केली. बॉसने त्याला त्याचे नाव विचारताच त्याने पुन्हा बापाचे नाव वगळून फक्त आपले नाव व आडनाव सांगितले. त्यावर साहेबाने त्याला समजावले, “हे पहा, तू नोकरीला लागलास त्या वेळी आपले पूर्ण नाव दिले होतेस आणि तशी सही केली होतीस. तुझ्या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये (सर्टिफिकेट्समध्ये) तुझे तेच पूर्ण नाव लिहिलेले आहे. यामुळे तुझी हीच अधिकृत ओळख (आयडेंटिटी) आहे. तुझ्या आयडेंटिटी कार्डवर हेच नाव आणि सही आहे. तुझे नातेवाईक, जुने शेजारी, गावातले लोक तुला अमक्या माणसाचा मुलगा म्हणून ओळखतात. तू बापाचे नाव टाकलेस तरी तुमचे नाते नाहीसे होणार नाही. तुझी आतापर्यंतची ओळखच शिल्लक राहील. ती नको असेल तर तुला ही नोकरी, हे गाव वगैरे सोडून दूर कुठे तरी जावे लागेल. त्यापेक्षा हा हट्ट सोड आणि नीट सही करून तुझा पगार घेऊन जा.”

हे सांगून बाबामहाराज म्हणाले, “पाहिलेत? आपल्या बापाचे नाव सोडले तर त्या माणसाचा पगार थांबला, नोकरीवर गदा आली. त्यातून त्यालाच राग आला, दुःख झाले, मनस्ताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याला पुन्हा सगळे मिळाले, त्याचे मन शांत झाले. तुम्ही देवाचे नाव घेतले नाही म्हणून तो नाहीसा होणार नाही, तरीसुद्धा तो तुमची काळजी वहातच राहणार आहे, पण त्याचे नाव घेतलेत तर तुम्हालाच अपूर्व मनःशांती मिळणार आहे..”

हा धागा धरून त्यांनी आपली कथा मूळपदावर आणली आणि पुढले निरूपण चालू ठेवले. “शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।” या अभंगाचा संदर्भ एका पौराणिक कथेशी आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू की मंदार या पर्वताची रवी करून तिला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव यांनी तिला धरून क्षीरसमुद्रात चांगले घुसळले. या मंथनात समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर निघाली. हलाहल विष हे त्यातले एक होते. देव आणि दानव यांच्यापैकी कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. त्या जालिम विषाने सगळी सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता. त्या वेळी सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली. ते प्रगट झाले आणि त्यांनी ते विष प्राशन केले. त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांचा गळा निळा पडला म्हणून शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. ही सगळी कथा थोडक्यात सांगून कीर्तनकारांनी पुढे सांगितले की या वेळी नीलकंठ शंकराच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो कसा थांबवावा यावर त्यांना नामसंकीर्तनाचा उपाय सापडला. श्रीराम श्रीराम श्रीराम असा जप केल्याने त्यांना शीतलता प्राप्त झाली म्हणे. इतक्या भयंकर प्रसंगावर जर जप करण्याने मात करता येत असेल तर आपल्या जीवनात आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या लहान सहान कारणांवर ही मात्रा खचित लागू पडणार नाही का? असा युक्तीवाद त्यांनी केला.

शंकराने हा मंत्र सुरुवातीला कोणालाही न सांगता आपल्याजवळच ठेवला होता, पण जगाच्या कल्याणासाठी तो सर्वांना कळणे आवश्यक होते. हे कसे झाले याची एक कथा बाबामहाराजांनी सांगितली. शंकरभगवान कैलास शिखरावर एकांतात बसून हा जप करायचे आणि त्यातून त्यांना अपूर्व आनंद मिळायचा हे एकदा नारदमुनींनी पाहिले आणि त्यांच्या संवयीप्रमाणे कळ लावायचे ठरवले. त्यांनी पार्वतीकडे जाऊन तिला विचारले, “तुमचा नवरा तुमच्यावर खरेच प्रेम करतो का हो?”
पार्वती म्हणाली, “अर्थातच. तुम्हाला अशी शंका का आली?”
“तसे नाही, पण तुम्ही एकदा त्याची परीक्षा करून पहाल का?”
“त्यासाठी मला काय करायला हवे?”
“त्यांना विचारा की त्यांना कशामधून सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. ते ही गोष्ट सांगतात का? हे पहा.”
शंकर भगवान परत आल्यानंतर पार्वतीने त्यांना हा प्रश्न विचारला. शंकराला नामस्मरणाचे गूढ गुप्तच ठेवायचे होते. त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्या दोघांची जुंपली. अखेर शंकराने हार मानली आणि हा मंत्र पार्वतीला सांगितला. तिथून तो पुढे सर्वांमुखी झाला.

ही गोष्ट सांगतांना बाबामहाराजांनी पदोपदी काँटेंपररी (आजच्या काळातली) उदाहरणे देऊन त्यात रंजकता आणली. समुद्रमंथनाची गोष्ट सांगतांना ते म्हणाले, कुठल्याही (विचार) मंथनामधून जो (यशाचा) लोण्याचा गोळा निघतो तो ह़डपण्यासाठी सगळे हपापलेले असतात, पण त्यातून अपयशाचे कडवट द्रव निघाले तर ते एकमेकांवर ढकलत असतात. ते पिऊन पचवण्यासाठी एकादा खंबीर नीळकंठच पुढे येतो आणि तो पुढे सर्वांच्या आदराचा धनी होतो. शंकराला भोळासांब म्हणतात, पण तो भोळा बिळा नव्हता, तसा कुठलाच नवरा नसतो, पण घरात शांतता रहावी म्हणून आपला बावळटपणा दाखवतो. कुठलेही गुपित एकदा बायकोला कळले की ते गुपित रहाणार आहे का? ही गंमतीची काही उदाहरणे झाली.

श्रीराम हा अवतार फारच आदर्श होता, त्याच्यासारखे असामान्य आचरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्या नंतरचा कृष्ण अवतार लोकांना थोडा जवळचा वाटण्यासारखा होता. विशेषतः त्याचे गोकुळातले बालपण, त्यातला निरागस खोडकरपणा, गोपिकांशी रचलेल्या रासलीला वगैरे गोष्टी मनमोहक होत्या. या दोन्ही अवतारातले मुख्य कार्य दुष्टांचे निर्दाळन हे होते. विठ्ठल अवतारातला देव मात्र फक्त भक्तांच्या कल्याणासाठी कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा राहिला. रामाच्या हातात धनुष्यबाण तर कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्र असायचे. विठ्ठलाच्या किंवा हरीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. या तीघांची सांगड घालून तयार झालेला रामकृष्णहरी हा मंत्र संत तुकारामांना मिळाला आणि त्यांनी तो वारकरी पंथाला दिला. गेली चारपाचशे वर्षे तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीतल्या माळकरी वारकऱ्यांना दिला जात आला आहे आणि त्या पंथातले लोक या मंत्राचा नियमितपणे जप करीत आले आहेत. वगैरे माहिती त्यांनी दिली.

बाबामहाराजांनी केलेल्या कीर्तनाचे माझ्या लक्षात आलेले आणि आठ दिवसानंतर टिकून राहिलेले सार देण्याचा एक तोकडा प्रयत्न मी या लेखात केला आहे. कीर्तन संपल्यावर त्यांनी असे आवाहन केले की ज्या लोकांना वारकरी होण्याची इच्छा असेल, किंवा निर्माण झाली असेल त्यांनी लगेच पुढे येऊन त्यांच्यापाशी यावे. त्यांच्या हस्ते त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात येईल. त्यानंतर त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. रोज सकाळी गुरुमंत्राचा उच्चार करायचा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आणि एकदा दुधिवरे गावी बाबामहाराजांनी उभारलेल्या देवस्थानाचे दर्शन घ्यायचे वगैरे सोपे नियम पाळायचे.

हे नियमही माझ्यासाठी सोपे नव्हते. मी आपला मागच्या पावलांनी परत फिरलो आणि घरी गेलो. .

जय बोलो हनुमान की

hanumanSm

माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजन्मोत्सव या सणांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात दर वर्षी रामाच्या जन्माचेच आख्यान असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवून सांगत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना आणत. त्यानंतर रामाला पाळण्यात झोपवून पाळणा, आरती, सुंठवड्याचा प्रसाद वगैरे होत असे.

आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेतल्या ‘सिटीसेंटर’ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील चांगल्या ऐसपैस कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून माझ्या सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. तिथून निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. एका आठदहा फूट उंच शिलेच्या एकाच बाजूला चित्र काढल्याप्रमाणे ही उभी मूर्ती कोरलेली होती. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायची कुणाचीच कधी हिंमत झाली नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीत असेलच.

गावातल्या इतर देवांच्या देवळातल्या गाभाऱ्यात कोणी ना कोणी पूजारी असायचे आणि तिथे लहान मुलांना सहसा प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण आमच्या मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नव्हती. त्या मारुतीच्या भव्य मूर्तीला हाताने धरूनच आम्ही त्याला प्रदक्षिणाही घालत होतो. इतकी सलगी असल्यामुळे तो देव आम्हाला जास्तच जवळचा वाटायचा. बोलतांना त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशीसुध्दा त्या देवळात उत्सव किंवा समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणाऱ्यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच. त्या काळात तरी तिथे उत्सवासाठी भजन, पूजन, कीर्तन वगैरे काही विशेष समारंभ नसायचा.

हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी आमची काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून लहानशी पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली मारुतीची तसबीर, शोभेची फुले, माळा आणि सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. “राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।” अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे. कसलाही खास प्रसादही वाटला जात नसे.

मारुतीरायाच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कुठे झाले, त्यांचा संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी मला त्यात काही स्वारस्य उरले नाही. बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमन्ताच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती किंवा त्याच्या मनात कसली महत्वाकांक्षा नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा ‘इन्फिनिटी’ या शब्दांचा अर्थ ‘मारुतीचे शेपूट’ या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर झाडांवरून पिकलेली फळे खाली पाडण्यासाठी त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना आम्हाला खूप मजा वाटत असे. त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. मारुतीच्या अंगात प्रचंड ताकत असली तरी त्याने युद्धात मोठा पराक्रम करून कुठल्या राक्षसांना ठार मारले असे रामायणाच्या गोष्टीत सांगितले जात नाही. त्या युद्धात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष फक्त एकाच पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी डोंगर, पर्वत वगैरेंना हाताने उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो. ते पृथ्वीशी सलग रीतीने जोडले असल्याचे मोठेपणी समजले.

जय बोलो हनुमान की १

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचेही परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. रामदासांनी स्थापन केलेली अकरा मंदिरे प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या शिष्यगणांनी त्यांची परंपरा पुढे नेत गांवोगांवी मारुतीची देवळे उभारली. “हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।” असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. हनुमंताची स्तुती करणारा रामरक्षेमधला एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे.
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो एक महान योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच प्रभू रामचंद्राच्या या सेवकाची गणनासुद्धा देवांमध्ये केली गेली. माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना “भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती” हे स्तोत्र शिकवले जात होते आणि ते म्हंटल्याने मारुतीराया अंगात भरपूर शक्ती देतो असा विश्वास असल्यामुळे आम्ही ते रोज संध्याकाळी म्हणत होतो. त्यानंतर दंडातल्या बेटकुळ्या फुगवून पहात होतो.

समर्थ रामदासांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे किंवा कदाचित त्याआधीपासून महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या गावांमध्ये मारुतीची देवळे आहेतच, शिवाय भारताच्या अनेक भागात ती दिसतात. दक्षिण भारतात मारुतीला आंजनेयस्वामी म्हणतात. त्यांची मंदिरे मी कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये पाहिली आहेत. जगातली सर्वात प्रचंड अशी हनुमानाची मूर्ती आंध्रमध्येच आहे आणि ती जगातल्या इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा अधिक उंच आहे. उत्तर प्रदेशातसुद्धा मी आजूबाजूच्या इमारतींपेक्षाही उंच अशा बजरंगबलीच्या मूर्ती काही ठिकाणी पाहिल्या आहेत. तुलसीदासांनी रचलेली हनुमान चालीसा उत्तर भारतीय लोकांमध्ये महाराष्ट्रातल्या भीमरूपी या स्तोत्रापेक्षाही अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा पाठ केल्यामुळे भुतेखेते, इडापिडा वगैरे सगळ्यांपासून संरक्षणाचे कवच मिळते अशी भाविकांची गाढ श्रद्धा असते. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये जिथे जिथे भारतीय लोक पूर्वीच्या काळात गेले होते तिथे तिथे त्यांनी मारुतीची मोठी देवळे आणि भव्य मूर्तींची स्थापना केली आहे. त्यातले त्रिनिदादमधले देऊळ जगप्रसिद्ध आहे.

हनुमान त्रिनिदाद
माझी मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी एक आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. त्या काळात मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले बहुधा पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत आणि डफावर थाप मारून काढलेल्या झडाड्डी झकनकच्या तालावर नाच करत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर वन्य प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. ‘भीम्या’ की ‘शिद्राम्या’ अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून गोरिल्लासारखा दिसत असे. तो कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून तिला हाताने फिरवत रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या अचरट अचाट लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे समोर दिसायचे, पण या हनुमानाला शोधत मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्या धंद्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा ‘हिन्दू धर्माचा घोर अपमान’ आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. ‘सेक्युलर’ हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

उद्या हनुमानजन्मोत्सव आहे. त्या निमित्याने मारुतीरायाचे स्मरण आणि त्याला प्रणाम करून हा छोटासा लेख त्याच्या पायाशी अर्पण.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या देवळांविषयी माहिती इथे पहावी.
https://anandghare.wordpress.com/2018/09/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3/

वीर हनुमान आणि दास हनुमान हा लेख इथे पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/04/27/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/

संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

गणेशोत्सवात होत गेलेले बदल

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.05

रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येऊन जातात, त्यानुसार वातावरणात बदल होतात, झाडांना नवी पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात, फुले उमलतात आणि कोमेजतात, प्राणीमात्रांच्या जीवनात बालपण, युवा आणि वार्धक्य या अवस्था येतात. अशा प्रकारे सतत बदलत राहणे हाच सृष्टीचा स्थायी भाव आहे असे म्हंटले जाते. समाजाची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीसुध्दा हळूहळू बदलत असते आणि त्याचा परिणाम समाजातल्या चालीरीती, घडामोडी वगैरेंवर होत असतो.

१८९३ साल आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत जमीन अस्मानाइतका फरक पडला आहे. त्या काळातल्या समाजात धर्म, जात, वंश, भाषा वगैरेनुसार असंख्य गट पडलेले होते. प्रत्येक गटातले लोक निरनिराळी आळी, गल्ली, वाडी, मोहल्ला वगैरेंमध्ये गटागटाने आपापल्या संकुचित विश्वात रहात असत. त्यांच्यामध्ये आपापसात विशेष सामंजस्य नव्हते. एकमेकांविषयीचे अज्ञान, गैरसमज, दुरावा यापासून ते वैर आणि तिरस्कारापर्यंत नकारार्थी भावना मनात दडलेल्या असायच्या. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. त्यातलेही बहुतेक साक्षर लोक आपल्या अक्षरओळखीचा उपयोग पोथ्या, पुराणे, गाथा वगैरेसारख्या धार्मिक वाङ्मयाच्या वाचनासाठीच करत असत. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीत ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले होते अशा मूठभर लोकांनाच भारताचा (त्या काळामधील हिंदुस्थानचा) विशाल भौगोलिक विस्तार व उज्ज्वल इतिहास याबद्दल काहीशी माहिती असायची. इतर सर्वसामान्य लोकांचे सामान्यज्ञान त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच मर्यादित असायचे. त्यापलीकडे पसरलेल्या आपल्याच देशातल्या भूभागाबद्दल किंवा तिथे रहात असलेल्या लोकांबद्दल त्यांनी कधी फारसे ऐकलेलेही नसायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता कशी वाटणार? आपण एका मोठ्या देशाचे रहिवासी आहोत याचीच ज्यांना नीटशी कल्पना नव्हती त्यांना त्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान तरी कसा आणि किती असणार? भारतातल्या राजेरजवाड्यांच्यात चालत असलेल्या लढायांचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा देश काबीज केला होता आणि भारतामधील जनतेमध्ये एकजूट न होणेच त्यांच्या हिताचे होते. त्यामुळे येथील जनतेतल्या आपापसातील तेढीला ते खतपाणी घालत राहिले होते.

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलेले जे सुशिक्षित लोक होते, त्यामधील बरेच लोक सरकारी नोकरी करीत होते आणि इंग्रज सरकारशी इमानदार होते. इतर अनेक विद्वानांना मात्र त्या काळातली सामाजिक परिस्थिती सहन होत नव्हती. त्यांच्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या थोर लोकांनी समाजसुधारणेचा खडतर मार्ग स्वीकारला. समाजाच्या स्त्रीशूद्रादि मोठ्या भागाला त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे त्या काळातले अत्यंत कठीण काम त्यांनी हाती घेतले. त्यांना पहिली अनेक वर्षे समाजाचा नुसता विरोधच झाला नाही तर त्यांचा छळ करण्यात आला. अशा काळात इंग्रज सरकारचाही रोष ओढवून घेणे त्यांच्या कार्याला हानीकारक होते. टिळकांचे परममित्र असलेले आगरकर यांच्यासारखे काही देशभक्त लोक सभांमधील भाषणे, वृत्तपत्रांमधील लेखन वगैरे मार्गाने समाजाचे प्रबोधन करत होते तसेच सरकारकडे अर्जविनंत्या करून कायदेशीर मार्गाने समाजाचे जास्तीत जास्त हित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

लोकमान्य टिळकांचे विचार या सर्वांहून वेगळे होते. त्यांना इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करायचे होते. पण तीन चार दशकांपूर्वी १८५७चे स्वातंत्र्ययुध्द होऊन गेले होते. त्यावेळी उत्तर भारतामधील काही भागातील सैनिकांनी एकत्र येऊन त्यात उडी घेतली, पण बाकीच्या फार मोठ्या प्रदेशातील जनता त्यापासून अलिप्त राहिली होती. त्यामुळे इतर प्रदेशातील भारतीय सैनिकांच्याच सहाय्याने इंग्रजांनी ते युध्द जिंकले होते. त्यानंतर इंग्रज सरकार सावध झाले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सशस्त्र लढा देणे अशक्य झाले होते. हा इतिहास ताजा होता. एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळू शकणार नाही याची जाणीव लोकमान्य टिळकांना होती आणि सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्या संघटनेच्या बळावर इंग्रज सरकारला आव्हान दिले पाहिजे हे त्यांनी जाणले होते. सन १८९३ पर्यंत त्यांनी आपली सुप्रसिध्द स्वराज्याची मागणी उघडपणे केलेली नव्हती आणि आधी सर्व भारतीयांना संगठित करायचे, त्यांच्या मनात देशभक्तीची आंच निर्माण करायची आणि त्यांच्या बळावर स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची अशी टप्प्याटप्प्यांची योजना आखून त्यानुसार ते एक एक पाऊल यशस्वीपणे टाकत होते. त्यांनी १८९३ साली सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यातलेच एक महत्वाचे पाऊल होते.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.38.52

तत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या प्रांतांमधील आणि जातीतील लोकांना एका व्यासपीठावर आणणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाचा समारंभ हा त्यांना एकत्र आणण्याचा एकमात्र नामी उपाय होता. एतद्देशीयांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही अशा सूचना सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या असल्यामुळे त्याला सरकारकडून मनाई होण्याचा धोका नव्हता. एका ठिकाणी जमलेल्या लोकांना मनोरंजनामधून आपला देश, धर्म, संस्कृती वगैरेंची माहिती मिळावी, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, प्रेम वाटावे अशा दृष्टीने मेळ्यांचे कार्यक्रम ठेवले. त्यांना आकर्षक वाटावेत तसेच उत्साही लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुरेख आरास आणि सजावटी केल्या, गणपतीच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांसाठी वाजत गाजत मिरवणूक काढल्यामुळे या उत्सवाची माहिती गावातल्या सर्वांना कळावी आणि कुतूहलाने त्यांनी त्यात हजेरी लावावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेता यावे आणि आपला संदेश खुबीने त्यांच्यापर्यंत पोचवता यावा असा सर्व दृष्टीने विचार करून टिळकांनी या स्वरूपातला उत्सव सुरू केला होता. सिनेमा, रेडिओ, टेलीव्हिजन अशा प्रकारची कोणतीच प्रसारमाध्यमे त्या काळात उपलब्ध नव्हती आणि वर्तमानपत्रे वाचणारा सुशिक्षित वर्ग अत्यल्प होता. अशा त्या काळातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून काही सांगण्याची गरज होती, त्यांच्या संघटित प्रयत्नातूनच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना देता येणार होती. पुण्यापासून सुरुवात करून हा उत्सव देशभर गावोगावी पोचवता येईल अशा दृष्टीने त्याची रचना केली होती आणि तसे झालेही.

त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लढे झाले आणि १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. आता पारतंत्र्याचा मुद्दा राहिला नाही. जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी त्याचे स्वरूप बदलले आहे. रोजच्या सामान्य जीवनातील इतर अनेक प्रसंगी सुध्दा जातपात विसरून अनेक लोक घडोघडी एकत्र येतच असतात. त्यासाठी गणेशोत्सवासारख्या वेगळ्या निमित्याची गरज नाही. टीव्ही आणि सिनेमासारखी दृकश्राव्य प्रसारमाध्यमे उदंड झाली असल्यामुळे मनोरंजनाची तसेच प्रचाराची भरपूर सोय, किंबहुना त्यांचा अतिरेक झाला आहे, संगणक आणि आंतर्जाल क्रांतीनंतर माहितीचा महापूर आला आहे आणि मोबाईल फोनमुळे संपर्क अत्यंत सुलभ झाला आहे. त्यामुळे जनसंपर्क, ज्ञान आणि मनोरंजन यासाठी गणेशोत्सवामधील मेळ्यांची गरज नाही. तरीसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात. हे लाभ कशा प्रकारचे आणि कोणाला मिळतात या प्रश्नाला एकच उत्तर नाही. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकांमागे निरनिराळे उद्देश असतात, त्यानुसार त्यांचे फायदे संयोजकांना मिळतात.

WhatsApp Image 2018-09-17 at 07.16.03

लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालत असलेली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन सुरू झालेली काही गणेशोत्सव मंडळे अद्याप कार्यरत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आहेत. टिळकांच्या काळातली बहुतेक उद्दिष्टे आज शिल्लक राहिलेली नसली तरी वेळोवेळी समाजापुढे असलेल्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही मंडळी करीत आली आहेत. चित्ताकर्षक देखावे, पोस्टर्स, पॅम्फ्लेटे, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्रे अशा निरनिराळ्या मार्गाने ही मंडळी गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करतात. महात्मा गांधींच्या काळात दारूबंदी, अस्पृश्यतानिर्मूलन, खादी व ग्रामोद्योग यासारखे विषय होते, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना, औद्योगिक क्रांती, समाजवादी विचारसरणी, शिक्षणाचा प्रसार यासारखे विषय आले तर चीन आणि पाकिस्तानबरोबर होऊन गेलेल्या युध्दांच्या काळात देशाचे संरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता. गेल्या दोन तीन दशकांच्या काळात अवकाशात भरारी, संगणकक्रांती, माहितीतंत्रज्ञान, धूम्रपानबंदी, पोलिओचे निर्मूलन, एड्स, स्वाईन फ्ल्यू, अपहरण, दहशतवाद आदि अनेक विषयांकडे लक्ष वेधले गेले होते. पर्यावरणाचे संरक्षण हा तर हल्लीच्या काळातील गणेशोत्सवांमध्ये कळीचा मुद्दा बनून गेला आहे. पॅकिंगसाठी थर्मोकोल आणि बांधकामासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जेवढे उत्पादन वर्षभर सतत होत असते त्याच्या तुलनेत पाहता या पदार्थांचा गणेशोत्सवामध्ये होणारा उपयोग अगदी नगण्य असतो अशी वस्तुस्थिती असली तरी जणू काही गणेशोत्सवामुळेच पर्यावरणाचा सत्यानाश होणार आहे अशा थाटाचा प्रचार होत असतो. पण या निमित्याने का होईना, पर्यावरणाच्या जपणुकीकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. मी हा लेख सहा वर्षांपूर्वी लिहिला होता त्या वर्षीपासून आम्ही सुध्दा शंभर टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करीत आलो आहोत. आवर्जून शाडू मातीच्याच मूर्ती आणल्या, कागद, कापूस आणि कापड यांच्यातून देखावा निर्माण करून आरासी केल्या. उत्सव संपल्यानंतर ते पदार्थसुध्दा शक्यतो व्यवस्थित गुंडाळून ठेवले आणि त्या वर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन तात्पुरत्या उभारलेल्या पाण्याच्या कृत्रिम टाकीत केले. अशा प्रकारे त्या वर्षी आम्ही मुळामुठा नद्यांच्या पात्रात एक कणसुध्दा टाकला नाही. ज्या गणेशोत्सवांमध्ये सामाजिक विषय किंवा तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्याचा समाजावर चांगला परिणाम होण्याची शक्यता असते याचे हे एक उदाहरण आहे.

मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडूशेठहलवाई गणेशोत्सव यासारख्या अनेक उत्सवांमधील मूर्ती आता असंख्य भाविकांची श्रध्दास्थाने बनल्या आहेत. हे देव नवसाला पावतात या विश्वासाने त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यासाठी किंवा त्याच्या प्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी लक्षावधी लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी तास न् तास रांगा लावतात आणि पैसे, सोने, चांदी, दागदागीने वगैरे भरपूर मौल्यवान वस्तू स्वेच्छेने अर्पण करतात. अर्थातच त्या भक्तांच्या गर्दीची सोयीस्कर व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अशा ठिकाणचे गणेशोत्सव जास्तच धूमधडाक्यात साजरे होतात. त्या ठिकाणी अत्यंत लक्ष्यवेधी सजावट असते, त्या वर्षी दगडूशेठहलवाईच्या गणेशमंदिराला जयपूरच्या हवामहलाचे रूप दिलेले होते. या वर्षी दक्षिण भारतातल्या तंजावूर इथल्या मंदिराचा देखावा होता. हजारो भक्तांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करण्याचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो. लालबागच्या राजाचा राजवाडासुध्दा नेहमीच प्रेक्षणीय असतो. या उत्सवांनिमित्य होणाऱ्या उलाढाली आता कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यांचे आयोजन करणाऱ्या धर्मादाय संस्थांची संस्थाने झाली आहेत असे म्हणता येईल. उत्सवाच्या दहा दिवसांव्यतिरिक्त इतर काळातसुध्दा त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली जात असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरीब रुग्णांना त्यांच्याकडून मदत केली जाते. काही संस्था आपला वार्षिक ताळेबंद जाहीर रीत्या प्रकाशित करतात. नवस सायास वगैरेंवर व्यक्तीशः माझा विश्वास असो किंवा नसो, पण त्यामधून अनेक लोकांना मानसिक समाधान मिळत असेल, तर ते हिरावून घेण्याचा मला अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गणेशोत्सवसुध्दा त्या दृष्टीने पाहता समाजाच्या दृष्टीने हिताचेच म्हणता येतील.

WhatsApp Image 2018-09-16 at 23.39.06

शाळा, कॉलेजे, ऑफीसे, कारखाने, सहकारी गृहनिर्माणसंस्थांच्या किंवा सरकारी नोकरांच्या वसाहती अशा अनेक जागी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तिथे या काळात एकाद्या स्नेहसंमेलनाचे वातावरण असते. या निमित्याने अनेक लोक सहकुटुंब एकत्र येतात, त्यात काही लोकांच्या भेटी होतात, नव्या ओळखी होतात आणि जुन्या ओळखींना तजेला मिळतो. या निमित्य ठेवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये चित्रकला, शिल्पकला, विणकाम, भरतकाम, पुष्परचना, संगीत, नृत्य, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांमधील आपापले कला गुण दाखवण्याची संधी अनेक लोकांना, विशेषतः मुलांना मिळते. सजावट, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन वगैरे गोष्टी सामूहिक रीतीने करतांना लोकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आणि अनुभव मिळतो. यातून आनंद मिळतो आणि काही नवे अनुभव, नवी माहितीही मिळते.

बदललेल्या परिस्थितीतील गणेशोत्सवात जर असे सगळे चांगलेच घडत असेल त्याच्या विरोधात इतकी ओरड का केली जाते असा प्रश्न पडेल. ती ओरडही अनाठायी वाटत नाही, कारण काही गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त गोंधळ आणि गोंगाट सुध्दा होत असतो. हे उत्सवाच्या नावाने होत असलेले उरूस अनेक प्रकाराने समाजाला त्रासदायक ठरतात. याची सुरुवात दोन तीन महिन्याआधी वर्गणी गोळा करण्यापासून होते. ती करतांना स्वेच्छेपेक्षा दबावावर जास्त भर दिला जातो. मांडव घालण्यासाठी भर रस्त्यांमध्ये खड्डे खणले जातात आणि ते कधीच बुजवले जात नाहीत. अर्धा रस्ता मांडवात गेल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी संकुचित होतो आणि एरवीसुध्दा जिथे वाहनांची गर्दी असते तिथली वाहतूक जवळजवळ बंदच पडते. कर्णकर्कश भोंग्यामधून वेळी अवेळी अभिरुचीहीन गाणी मोठमोठ्याने ऐकवली जातात आणि कधीकधी त्यांच्या तालावर बीभत्स असे नाच केले जातात. या सगळ्या धांगडधिंग्यात मांगल्याचा मागमूसही दिसत नाही आणि याला धार्मिक का म्हणायचे हेच समजत नाही. अशा हिडीस स्वरूपाच्या उत्सवातून समाजाला काही तरी चांगले मिळण्याची फारशी शक्यता नसते. त्याचे आयोजन करणाऱ्यांना त्यातून वैयक्तिक फायदे होतात. त्यांच्या टोळक्यांना दहा बारा दिवस फुकटात मनसोक्त मजा करता येते आणि त्यांच्या म्होरक्यांना मिरवायला मिळते. त्यांचा धाक आणि भाव थोडा वधारतो. सर्वसामान्य माणूस थोडी कुरकुर करण्यापलीकडे काही हालचाल करायला धजत नाही.

गेल्या १-२ वर्षांपासून सरकार आणि न्यायालये यांनी त्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत आणि त्यांना कांही ठिकाणी कांही प्रमाणात यश मिळत आहे. यात आणखी पुष्कळ सुधारणा होण्याची गरज आहे. आता वाटल्यास गणपतीबाप्पानेच या लोकांना चांगली बुध्दी द्यावी अशी प्रार्थना त्याला हात जोडून करतो. एकादा वैतागलेला लेखक आता पुढल्या वर्षी येऊच नका अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला करतो. पण अशा स्वरूपाचे उत्सव साजरे करणे हा ज्यांचा धंदा बनला असेल आणि त्यात बरकत असेल तर तो आपला धंदा वाढवतच जाणार. जेंव्हा ते सुध्दा अती होईल आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेंव्हा समाजच त्याला आळा घालेल. त्या दृष्टीने प्रबोधन करणेही सुरूच आहे.

WhatsApp Image 2018-09-17 at 20.21.02

आमच्या पांच दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने झाली.  त्यासोबत ही लहानशी लेखमालिका संपवत आहे.