श्री दत्तगुरूंचे २४ गुरू आणि दत्तगुरूंची गाणी

नवी भर दि. १०-१२-२०१९ : श्री दत्तगुरूंची गाणी
१, संत तुकारामांनी लिहिलेला अभंग

तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।
—————-

जुन्या काळातल्या भक्तीगीतांच्या गायकांमध्ये श्री.आर एन पराडकर हे प्रमुख नाव होते. त्यांची तीन भजने खाली दिली आहेत.

२. माझ्या लहानपणापासून प्रसिद्ध असलेले श्री.आर एन पराडकर यांचे कवी सुधांशु यांनी लिहिलेले भक्तीगीत

दत्तदिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे ।।
अनुसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे ।।
तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे ।।
पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
———————–

३. माझ्या लहानपणापासून मी ऐकलेले आणि गायिलेले श्री.आर एन पराडकर यांचेच पारंपारिक भजन

धन्य हो प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
मृदंगटाळघोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लागे पायांत ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥
——————————-

४. श्री.आर एन पराडकर यांचेच आणखी एक पारंपारिक भजन

दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो ।।

तापलो गड्या त्रिविध तापे
बहुविध आचरलो पापे
मनाच्या संकल्प-विकल्पे
काळीज थरथरथर कापे
कितीतरी घेऊ जन्म फेरे
सावळ्या मला भेट द्या हो ।।

तुम्हाला कामकाज बहुत
वाट पाहू कुठवर पर्यंत
प्राण आला कंठागत
कितीतरी पाहशील बा अंत
दीनाची करुणा येऊ द्या हो
नाथा मला भेट द्या हो ।।

संसाराचा हा वणवा
कितीतरी आम्ही सोसावा
वेड लागले या जिवा
कोठे न मिळे विसावा
आपुल्या गावा तरी न्या हो
दयाळा मला भेट द्या हो ।।

स्वामी मला भेट द्या हो
दयाळा मला भेट द्या हो
सावळ्या मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो ।।
———————————————————-

५. श्री अजित कडकडे यांचे प्रसिद्ध पालखीगीत – कवी प्रवीण दवणे

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी ।।

रत्‍नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी ।।

सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत माया-मूर्ति पहाटेसारखी ।।

वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी ।।
———————————-
६. माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिच्या स्मरणार्थ तिने रचलेला एक अभंग आज खाली देत आहे.

कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।
शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।
सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।

—————————————–

मूळ लेख : श्रीदत्तगुरूंचे २४ गुरू

बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू होते असे सांगितले जाते. अत्यंत बुद्धीमान माणसाला बृहस्पतीची उपमा दिली जाते. पण ते नेमके कोणत्या देवांचे गुरू होते हे मात्र समजत नाही. गणपती, मारुती, महादेव, राम, कृष्ण, अंबाबाई वगैरे जितक्या देवतांच्या मूर्ती आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात किंवा गावातल्या देवळात असतात त्यातल्या कोणीही कधी बृहस्पतीकडे जाऊन शिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले असा उल्लेख मी तरी ऐकलेला किंवा वाचलेला नाही. दत्तगुरूंना मात्र सर्व जगाचे गुरू असे मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मिळून दत्तात्रेयाचे रूप घेतले त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. या दिवशी दत्तजन्माचा सोहळा केला जातो. या जगद्गुरू अवधूतांनी स्वतः २४ गुरू केले होते आणि त्यांच्याकडून काही गुण किंवा शिकवण घेतली होती असे त्यांनी यदुराजाला सांगितले होते अशी पुराणातली आख्यायिका आहे. दत्तगुरूंनी मानलेले हे २४ गुरू असे आहेत
१.पृथ्वी. २.वायू, ३.आकाश. ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य, ८.कबूतर, ९.अजगर, १०.समुद्र, ११.पतंग कीटक (मॉथ), १२.मधमाशी, १३.हत्ती, १४.भुंगा, १५.हरीण, १६.मासा, १७.पिंगला नर्तकी, १८.टिटवी, १९.बालक, २०.बांगड्या, २१.बाण तयार करणारा कारागीर, २२.साप, २३.कोळी (स्पायडर), २४. अळी. या यादीमधील नावे आणि त्यांचा क्रम यात काही पाठभेद आहेत. कोणी यात यमाचा समावेश केला आहे. मला जी एक यादी सहजपणे मिळाली ती मी या ठिकाणी दिली आहे. यातील प्रत्येक जीवंत व्यक्ती, प्राणी किंवा निर्जीव वस्तूपासून काही गुण शिकण्यासारखे आहेत तर काही वाईट गुण ओळखून ते टाळणे आवश्यक आहे. त्यांनाही दत्तगुरूंनी गुरूपद दिले आहे.

सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता, अग्नीचे पावित्र्य, सागराचा अथांगपणा, स्त्रीची ममता, बालकाचे निरागसपण, मधमाशीची संग्रहवृत्ती वगैरे काही गुणविशेष प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे उल्लेख नेहमी होत असतात किंवा त्यांची उदाहरणे दिली जात असतात. यांचे यापेक्षा वेगळे काही गुण दत्तगुरूंना दिसले होते. समुद्र आणि त्यातले पाणी यांची वेगवेगळी गणती केली आहे. समुद्र त्याला मिळणाऱ्या सर्व नद्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो तर “पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलाओ वैसा” या उक्तीप्रमाणे पाणी कशातही मिसळून जाते. हे गुण भिन्न आणि थोडे परस्परविरोधी आहेत. दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन स्वतःला जाळून घेणाऱ्या पतंगाचे उदाहरण प्रेमाचे द्योतक म्हणून दिले जाते, पण क्षणिक मोहाने असा अविचार करू नये हे यातून शिकण्यासारखे आहे. हत्ती हा प्राणी मदांध किंवा कामांध होऊ शकतो. मासा अधाशीपणाने आमिशाला खायला जातो आणि स्वतःच गळाला लागतो. त्याचप्रमाणे हरीण संगीताकडे आकर्षले जाते आणि माणसाच्या (शिकाऱ्याच्या) जवळ येऊन त्याच्या तावडीत सापडते. ही सगळी काय करू नये याची उदाहरणे आहेत.

काही गुणविशेष आपल्या किंबहुना माझ्या समजुतीपेक्षा वेगळे दिसतात. यात अलिप्तपणा हा कबूतराचा (नसलेला) गुण सांगितला आहे. एका कबूतराच्या जोडीच्या पिल्लांना शिकारी घेऊन गेला, त्यांच्यासाठी आणलेला चारा घेऊन कबूतरी आणि तिच्या मागोमाग नर कबूतर त्या शिकाऱ्याकडे गेले आणि त्याच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडे अलिप्तपणा असला तर ते स्वतंत्र राहिले असते. या कथेमध्ये निर्भयपणा हा सापाचा गुण सांगितला आहे. त्याचे एक कारण तो निर्धास्तपणे मुंग्यांच्या वारुळात जाऊन राहतो आणि दुसरे म्हणजे आपल्या सर्वांगावरचे कात़डे (कात) काढून टाकतो. बांगड्या आणि एकांतवास यात काय संबंध असेल असे वाटेल. इथे हे लक्षात घ्यायचे आहे की एका हातात दोन किंवा जास्त बांगड्या असल्या तर त्या किणकिण करतात, पण एकच बांगडी असली तर ती आवाज करून कोणाचे लक्ष वेधून घेत नाही. कुंभारमाशीची गोष्ट मी लहानपणी ऐकली होती. ही माशी मातीचे लहानसे घर बांधते आणि त्यात अळी (किंवा अळ्या) नेऊन ठेवते. ही माशी येऊन आपल्याला खाईल या भीतीने ती अळी सारखा तिचा विचार करते आणि त्यात इतकी एकरूप होते की स्वतःच कुंभारमाशी होते अशी ती गोष्ट होती आणि यातल्या अळीप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे स्मरण केले तर आपणही त्याच्याशी एकरूप होतो अशी शिकवण त्यातून दिली होती. अंडे, अळी, कोष आणि कीटक असे त्याचे चार जन्म असतात हे  त्यावेळी मला माहित नव्हते.

या २४ गुरूंपैकी काही गोष्टींचे संदर्भ मला नवीन होते. पिंगला ही नृत्यांगना (तवाइफ) एका ग्राहकाची आतुरतेने वाट पहात बसते पण तो येत नाही. तेंव्हा तिला असे वाटते की याऐवजी आपण अंतर्मुख होऊन (देवाचे) ध्यान केले असते तर त्याचा फायदा झाला असता, आपला उद्धार झाला असता. एकाग्रचित्ताने बाण तयार करत बसलेला एक कारागीर (लोहार) आपल्या कामात इतका मग्न झाला होता की वाजत गाजत बाजूने जात असलेली राजाची मिरवणूकसुद्धा त्याच्या लक्षात आली नाही. मनाची एकाग्रता (कॉन्सेन्ट्रेशन) हा त्याचा गुण शिकण्यासारखा आहे.  एकदा एक टिटवी (लहानसा पक्षी) काही खाद्य खाण्यासाठी उचलून घेऊन आली, तिच्याकडून ते खाद्य  हिसकावून घेण्यासाठी कावळे, घारी वगैरे इतर मोठ्या पक्ष्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या टिटवीने शहाणपणा केला आणि चोचीमधले खाद्य जमीनीवर टाकून देऊन तिथून पोबारा केला. काळवेळ पाहून क्षुल्लक बाबींचा अशा प्रकारे त्याग करणे हिताचे ठरते.  हा बोध यावरून मिळतो.

ही काही उदाहरणे आहेत. माझ्या मते जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकण्यासारखे असते आणि प्रत्येक प्रसंगातून काही बोध घेण्यासारखा असतो. फक्त आपली इच्छा आणि तयारी असायला हवी.

दत्तजन्माची कथा

अजून दत्तजयंतीला आठवडाभर अवकाश आहे, पण दरम्यान मी परगावी जाणार असल्यामुळे दत्तजन्मावर मी पूर्वी लिहिलेला ब्लॉग थोडे संपादन करून आजच देत आहे.

Dattaguru

“तीन शिरे सहा हात” धारण करणा-या दत्तात्रेयाचे “सबाह्य अभ्यंतर एक” असलेले रूप मला फारसे उमगलेले नाही. “अभाग्यासी कैसे नकळे ही मात” असे त्याच्या आरतीत पुढे म्हंटलेलेच आहे. परमेश्वराच्या विविध रूपांचे त्यात एकत्रीकरण केले असावे असे वाटते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रम्हा, विष्णू आणि शिव या त्याच्या तीन्ही रूपांचे चेहेरे त्यात आहेत. विश्वाचे पालन व संगोपन करणा-या विष्णूचा मुखडा मध्यभागी आहे. एका बाजूला जटाधारी आणि माथ्यावर चंद्राला धारण केलेला शिवाचा चेहेरा आहे तर ब्रम्हदेवाला असलेल्या चार मुखांपैकी एक मुख दुस-या बाजूला धारण केले आहे. सहापैकी चार हांतात शंख, चक्र, गदा आणि पद्म या विष्णूने धारण केलेल्या वस्तू आहेत, पांचव्या हांतात शंकराचे त्रिशूल आणि सहाव्या हांतात कमंडलू धरलेला असतो. पाठीशी कामधेनु गोमाता उभी असते, चार वेद श्वानरूपाने त्याच्या पायापाशी घुटमळत असतात. दत्तात्रेयाची ही शांतचित्त मूर्ती कल्पवृक्षाखाली उभी असते असे सांगतात. सगळ्या अद्भुत गोष्टींचे सुरेख इंटिग्रेशन त्याच्या रूपांत आहे की नाही?

दत्तात्रेयाची जन्मकथा भाविकांना मोहित करणारी आहेच, आस्था न बाळगणा-यांनासुद्धा विचार करावा लावणारी आहे. पुराणकालात अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया महान पतिव्रता आणि सर्वगुणसंपन्न तसेच सदाचरणी होती. अशा पुण्यवान व्यक्तींचे सामर्थ्य वाढत जाते आणि त्यामुळे इंद्राला आपले आसन डळमळीत होण्याची भीती वाटते. त्यामुळे त्या पुण्यवान व्यक्तीला पापाचरण करण्यास उद्युक्त करण्याचे प्रयत्न सुरू होतात असा कथाभाग इतरही काही गोष्टींमध्ये आढळतो. खरे तर मत्सर, कपट वगैरे मानवी दोष देवांमध्ये सुद्धा असावेत हे माझ्या मनाला पटत नाही. सत्वपरीक्षा पाहण्यासाठी कांही कारण द्यायचे म्हणून अशा प्रकारची स्पष्टीकरणे त्यात दिली असावीत. सोन्याचा शुद्धपणा पारखण्यासाठी त्याला मुशीत घालून तापवावे लागते तसेच माणसाची पारख त्याच्यावर आलेल्या संकटांना तो कशा प्रकारे तोंड देतो यावरून होतो. पण अत्रिमुनींचे सामर्थ्य वाढू नये म्हणून अनुसूयेला पाप करायला लावण्याचा विचार केला की अनुसूया एक स्त्री असून इंद्रपदासाठी पात्र ठरेल असे वाटून ते देवांना रुचले नाही हे कळत नाही. इंद्राचे आसन स्थिर रहावे यासाठी जगन्नियंता ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन असे काम का करावे यातले काहीच पटत नाही. पण अशी कथा सांगितली जाते.

सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ब्रम्हा, विष्णू व महेश हे तीघेही अतिथींची रूपे घेऊन तिच्या कुटीमध्ये गेले. अत्रि मुनी आपले तपाचरण करून अजून घरी परतलेले नव्हते. सती अनुसूयेने गृहिणीच्या तत्परतेने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना चार घास जेवण करूनच जायचा आग्रह केला आणि त्यांना जेवणात काय हवे याची पृच्छा केली.

आजकाल परिस्थिती बदलली आहे. अशा आगांतुक पाहुण्यांना सहसा कोणी घरातच घेत नाही.  सख्खा भाऊ जरी अचानकपणे घरी आला तर त्याला सुध्दा काय हवे ते विचारून जवळच्या हॉटेलांत ऑर्डर देऊन ते जिन्नस मागवले जातात. भावालाही आपल्या भगिनीच्या पाककौशल्याची चांगली कल्पना असल्याने तो सरळ मेनूकार्डच मागून घेऊन त्यात होम डिलीव्हरीसाठी कोणकोणते पदार्थ उपलब्ध आहेत ते पाहून आपली खाद्यंतीची हौस भागवून घेतो. असे बदललेले चित्र कधीकधी आपल्याला दिसते.

पुराणकालात अशी पद्धत नव्हती आणि सोयही नसावी. वनवासात द्रौपदीची स्वयंपाकाची सोय व्हावी म्हणून श्रीकृष्णाने तिला अक्षय थाळी दिली होती. तिच्यात सुग्रास जेवण आपोआप निर्माण होत असे. तेवढा अपवाद सोडला तर इतर गृहिणी स्वयंपाकाला लागणा-या वस्तू आपल्या संग्रही ठेवत असत आणि स्वतःच पाकसिद्धी करीत असत. सती अनुसूयेने विचारणा केल्यावर त्या पाहुण्यांनी अजबच मागणी पुढे केली. ती आपणहून जे कांही अन्न देईल ते सुग्रासच असेल, पण ते वाढतांना तिच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन घडावे यासाठी तिने ते निर्वस्त्र स्थितीत वाढावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

हे ऐकून कुठल्याही कुलीन स्त्रीच्या अंगाचा तिळपापड झाला असता आणि तशी मागणी करणा-या अतिथींना तिने लगेच घराबाहेर काढले असते. पण तसे केल्यामुळे “अतिथीदेवो भव।” या नियमाचा भंग झाला असता. आज आपल्याला त्याचे इतके महत्व वाटणार नाही, पण या नियमाचे पालन करण्यासाठी सीतामाईने लक्ष्मणरेषा ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घातला होता आणि चांगुणेने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा बळी दिला होता अशा कथा आहेत. मात्र या नियमाचे पालन करण्यासाठी सती अनुसूया विवस्त्र होऊन पाहुण्यांपुढे गेली असती तर तिचे पातिव्रत्य भंग पावले असते. अशा रीतीने तिची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी दारुण अवस्था झाली होती.

पण ती महान स्त्री यामुळे डळमळली नाही. बाहेर प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू व महेश उभे असतांना तिने आंत जाऊन आपल्या इष्ट दैवतांचे पूजन करून त्यांना आवाहन केले. “हा कठीण प्रसंग निभावून नेण्यासाठी आज माझ्या घरी आलेल्या अतिथींना माझी तान्ही बालके बनव आणि माझ्या सत्वाचे रक्षण कर.” अशी प्रार्थना करून तिने निर्वाणीचा धांवा सुरू केला. परमेश्वराला तिचे म्हणणे मान्य करावेच लागले आणि त्या तीन्ही अतिथींचे रूपांतर तान्ह्या बालकांमध्ये झाले. मनात कसलीही पापवासना न बाळगता मातेकडे प्रेमाने आणि फक्त प्रेमानेच पाहणा-या त्या बालकांना तिने त्या अतिथींनी सांगितलेल्या अवस्थेत बाहेर येऊन छातीशी धरले आणि वात्सल्याने कुरवाळले.

नंतर त्या तीघांचे मिळून एक रूप झाले आणि हाच दत्तात्रेयाचा अवतार! त्याच्या हांतात इतकी शस्त्रास्त्रे असली तरी त्यांचा वापर करून त्यांनी खलनिर्दाळन केल्याच्या कथा नाहीत. त्यांनी मुनीरूपाने अनेक अवतार धरून शिष्यवर्गाला धर्मशास्त्रांचे आणि नीतीमत्तेचे धडे दिल्याची आख्याने आणि चरित्रे पारंपरिक वाङ्मयात प्रसिद्ध आहेत. त्यांची अवतारपरंपरा अगदी वीसाव्या शतकापर्यंत चालत आली आहे अशी भाविकांची श्रध्दा आहे. भगवान दत्तात्रेयांचे दत्तगुरू हे नांवच अधिक प्रचलित आहे आणि गुरुवार हा दत्ताचा वार मानला जातो. महाराष्ट्रात तरी त्याला बरेच महत्व दिले जाते.

————————————

डॉ. दिलीप मेघ:श्याम साठे संकलित केलेल्या एका संदर्भ ग्रंथाच्या आधाराने श्री.मधुसूदन थत्ते यांनी नुकतीच ही कथा फेसबुकावर सादर केली. ती अधिक ऑथेंटिक असावी. त्यांनी या कथेची सुरुवात अशी दिली आहे.

नारद जेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेशला आपल्या भावजयीच्या, म्हणजे अनुसूयेच्या प्रखर पातिव्रत्याबद्दल सांगतो आणि खूपच गुणवर्णन करतो तेव्हा तिघांच्याही पत्नी (सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी ) अनुसूयेचा मत्सर करतात…रुसून बसतात..आपापल्या पतीदेवांना अनुसूयेची परीक्षा घ्यायला भाग पाडतात. जातात तिघे भिक्षुक बनून, अत्री घरी नाहीत हे पाहून ऋषींच्या घरी..

तसेच त्यांनी या कथेची अखेर अशी केली आहे.

नारदांनी हे वृत्त सावित्री-पार्वती-लक्ष्मी ह्यांना सांगितले..तिघी अनुसूयेची क्षमा मागायला आल्या.
“आमचे पती परत आम्हाला द्या” अशी याचना केली..
तिघे देव पूर्वव्रत झाले…म्हणाले..”माते क्षमा कर आणि निरोप दे”
अनुसूया म्हणाली माझा पाळणा रिकामा ठेवू नका…तिघेही मला पुत्र म्हणून हवे आहात..
त्याप्रमाणे अनुसूयेला चंद्र (ब्रह्म), दत्त (विष्णू) आणि दुर्वास (शंकर) असे तीन पुत्र मिळाले, त्यातले चंद्र आणि दुर्वास अनुसूयेचा निरोप घेऊन तप करायला निघून गेले आणि विष्णू मात्र दत्तात्रेय असा त्रिमूर्ती म्हणून मान्य झाला.

कथेच्या सुरुवात आणि शेवटामध्ये हा फरक असला तरी मुख्य गाभा तसाच आहे. माणसांचे (अव)गुण देवांना चिकटवण्याचा प्रयत्न दोन्हींमध्ये केला आहे. त्यामुळे मी व्यक्त केलेले विचार तितकेच समर्पक आहेत असे मला वाटते.

————————-
माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिने रचलेला श्रीगुरुदेवदत्ताची प्रार्थना करणारा एक अभंग तिच्या स्मरणार्थ आज खाली देत आहे.

कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।
शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।
सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।