हरतालिका आणि शिवपार्वतींची गाणी

आज हरतालिका किंवा बोलीभाषेत हरताळका आहे. देवीची पूजा तिच्या अनेक रूपात केली जाते, विशेषतः काली, दुर्गा, चामुंडा आदि रूपांमध्ये ती दुष्टांचा नाश करतांना दिसते, तर लक्ष्मीच्या रूपात सुखसंपत्ती देणारी आणि सरस्वती किंवा शारदेच्या रूपात ती विद्यादायिनी किंवा कलेची अधिष्ठात्री असते. या इतर रूपांमध्ये स्त्री व पुरुष दोघेही तिची आराधना करतात, पण हरताळका, मंगळागौर वगैरे कांही व्रते मात्र खास स्त्रीवर्गासाठी राखून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचेसाठी १०० टक्के आरक्षण असते. अविवाहित मुली आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया मिळालेला नवरा सोबत रहावा म्हणून ती चालू ठेवतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा कराय़चे मुख्य कारण म्हणजे तिने अशी मनोकामना धरली आणि ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे तिचे वरदान मिळाल्यावर आपली इच्छा पूर्ण करायला ती मदत करेल अशी अपेक्षा धरणे साहजीक आहे.

कन्या वरयते रूपम् माता वित्तम् पिता श्रुतिम् असे एक सुभाषित आहे. आपल्या मुलीला कसली ददात पडू नये या दृष्टीने विचार करता तिचा नवरा गडगंज श्रीमंत असावा असे तिच्या आईला वाटते, तर त्या माणसाचा नावलौकिक चांगला असावा अशी मुलीच्या बापाची इच्छा असते. कन्येला मात्र या दोन्हीपेक्षा रूपाचे महत्व जास्त वाटते. पार्वतीच्या बाबतीत असेच दिसते. तिच्या पहिल्या जन्मात दक्ष राजा तिचा पिता होता आणि दुस-या जन्मात नगाधिराज हिमालय. आपल्या मुलीला धनवान आणि सामर्थ्यवान पती मिळवून देणे या दोघांनाही सहज शक्य होते आणि तसा प्रयत्न ते करत होते. पण उमा व पार्वती यांना मात्र शंकराशीच लग्न करायचे होते. तो कसा होता?
उसकी निशानी वो भोला-भाला, उसके गले में सर्पों की माला ।
वो कई हैं जिसके रूप, कहीं छाँव कहीं धूप, तेरा साजन है या बहुरूपिया
आणि
घोड़ा न हाथी करे बैल सवारी, कैलाश परवत का वो तो जोगी, अच्छा वही दर-दर का भिखारी

असा विचित्र वर तिला पिया म्हणून हवा हवासा वाटत होता. आणि आधी हे प्रेम एकतर्फीच होते. शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली. स्व.शांता शेळके यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
भस्मविलेपित रूप साजिरे । आणुनिया चिंतनी, अपर्णा तप करिते काननी !।
वैभवभूषित वैकुंठेश्वर । तिच्या पित्याने योजियला वर । भोळा शंकर परी, उमेच्या भरलासे लोचनी ।।
त्रिशूल डमरू पिनाकपाणी । चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि । युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ।।
कोमल सुंदर हिमनगदुहिता । हिमाचलावर तप आचरिता । आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ।।

तपश्चर्येने शंकर बधला नाही हे पाहून तिने भिल्लिणीचे रूप घेऊन त्याचे मन मोहून घेतले. हा देखील तपश्चर्येचाच एक भाग म्हणता येईल. त्यानंतर मात्र शिव आणि शक्ती यांचे मीलन झाले.

उमेच्या रूपात लग्न झाल्यानंतर ती माहेराला दुरावली होती. दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला त्यासाठी विश्वातल्या सर्व लहान मोठ्या लोकांना आमंत्रण दिले पण शंकराला दिले नाही. तरीसुध्दा माहेरच्या ओढीने तिने आपणहून तिथे जायचे ठरवले. पण अपेक्षेसारखे तिचे स्वागत झाले नाही, तिच्या नव-याचा अनादराने उल्लेख केला गेला. ही गोष्ट त्या मानिनीला सहन झाली नाही आणि तिने यज्ञाच्या कुंडात स्वतःची आहुती दिली. स्व.ग.दि.माडगूळकरांनी या प्रसंगाचे सुंदर वर्णन केले आहे.
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर । उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर ।।
माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात । चहू दिशी चालू होते संपदेचे थेर ।।
लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास । लेक पोटीचीही झाली कोप-यात केर ।।
आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी । दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर ।।
दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली । पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर ।।
परत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा । बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर ।।
प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास । नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर ।।
असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्‍नी राणी । महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर ।।

या सगळी गाणी सिनेमांमधली आहेत, पण त्यांच्या काव्यांमध्ये पौराणिक कथेतला दृष्टांत देऊन त्याची आधुनिक काळातल्या गोष्टींबरोबर सुरेख सांगड घातली आहे.

घटस्थापना

आज घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे. माझ्या आधीच्या पिढीपर्यंत बहुतेक लोक संयुक्त कुटुंबांमध्ये रहात असत. प्रत्येक घरी पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेले त्यांच्या घराण्याचे कुलाचार पाळले जात. त्यात आश्विन महिन्यातल्या देवीच्या नवरात्राला मोठे महत्व असायचे. काहीही झाले तरी हे नवरात्र व्यवस्थितपणे पाळले गेले पाहिजे याचा विचार करून त्यानुसार इतर कोणतेही कौटुंबिक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम ठरवले जात असत. आता कुटुंबे विभक्त झाल्यानंतरही कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या (बहुधा सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या) घरी नवरात्र बसवायचे आणि कुटुंबातील इतर लोकांनी शक्य तो एक दोन दिवसासाठी तिथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन यायचे, तिला नवस करायचे आणि ते फेडायचे वगैरे अनेकांच्या घरी चालत असलेले दिसते.

आश्विन शुध्द प्रतीपदेच्या दिवशी सकाळी घटस्थापना करून या नवरात्राची सुरुवात केली जाते. पुढील नऊ दिवस देवीजवळ नंदादीप तेवत ठेवतात. रोज देवीची पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य वगैरे विधी शक्यतो यथासांग केले जातात. ललितापंचमी, अष्टमी वगैरे काही खास दिवशी जास्तीचे कार्यक्रम असतात. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवून त्याच्या समोर घागरी फुंकतात. नऊ दिवस रोजच्या पूजेसाठी निरनिराळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले देवीला अर्पण करतात. आजकालच्या महिला स्वतःच रोज निरनिराळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस परिधान करतात. या सगळ्यात त्या घटाची कोणाला आठवण किंवा माहिती असते कोण जाणे.

घटस्थापना याचा शब्दशः अर्थ (मातीच्या) घटाची स्थापना करणे असा होतो. गेल्या शतकात घटाचे महत्व कमी होत गेले आहे. पण मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यापासून ते अगदी कालपरवापर्यंत म्हणजे त्या हजारो वर्षांच्या कालखंडात मातीपासून तयार केलेल्या पात्रांना अनन्यस्धारण महत्व होते. जेंव्हा मनुष्यप्राण्याने शेतीभाती करून घरात रहायला सुरुवात केली तेंव्हापासून त्याला अन्नधान्य, दूधदुभते आणि इतर आवश्यक वस्तूंचा संग्रह करण्याची गरज पटायला लागली. त्यासाठी लाकूड, माती यासारख्या सुलभपणे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून टोपल्या, खोके, गाडगी, मडकी, रांजण वगैरे तो तयार करू लागला. लोह, ताम्र इत्यादी घातूंची निर्मिती सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांची पात्रे बनू लागली, पण सर्व लोकांना मातीच सहजपणे उपलब्ध असल्यामुळे तिचा उपयोग होत राहिला. जगाच्या पाठीवरील सर्व ठिकाणच्या उत्खननामधून निघालेल्या प्राचीन अवशेषांमध्ये खापरांचे तुकडे सापडतात. आजसुध्दा खेड्यामधील गरीबांच्या घरात मातीची मडकी, घडे वगैरे असतात आणि शहरातील श्रीमंतांच्या घरात सुध्दा चिनी मातीची सुबक पात्रे आणि शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात.

अग्नी आणि चाक यांचे शोध हे मानवाच्या प्रगतीमधील अत्यंत महत्वाचे टप्पे मानले जातात. मातीपासून घटांचे उत्पादन करण्यात या दोन्हींचा उपयोग केला जातो. कुंभार आपले चाक गरागरा फिरवून मातीच्या गोळ्याला गोलाकार देतो आणि त्या कच्च्या मडक्याला भट्टीत भाजून कठीण आणि टिकाऊ बनवतो. त्यात आपले कौशल्य पणाला लावून कुंभारांनी त्यांना सुबक आकार दिले आणि खास प्रकारच्या मातीचा उपयोग करून आकर्षक रंग आणि इतर गुणधर्म देऊन त्यांचे रांजण, सुरया वगैरे विविध रूपे त्यांना दिली. ही प्रगती हजारो वर्षांपासून होत राहिली आहे.

लोखंड, तांबे, पितळ आदी धातूंचा पत्रा बनवून त्यांची पात्रे तयार करण्यात आली, पण या धातूंची अन्नपदार्थांबरोबर रासायनिक क्रिया होत असल्यामुळे स्वयंपाकघरात त्यांचा उपयोग जपून करावा लागतो. विशेषतः दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ त्यात ठेवता येत नाहीत. गेल्या शतकात आलेल्या अॅल्युमिनियम आणि स्टेनलेसस्टीलच्या भांड्यामुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. पण तोपावेतो त्यासाठी मातीच्या घटांचाच उपयोग केला जात असे. कृष्णावतारात त्याचे बालपण गोकुळात गेल्यामुळे, गोप, गोपिका आणि दहीदूधलोणी या सर्वांना महत्व प्राप्त झाले आणि त्याबरोबर घटांना सुध्दा साहित्यात वेगळे अजरामर स्थान लाभले.

हे सगळे असले तरी घट आणि देवीचे नवरात्र यांचा संबंध कुठे येतो हा प्रश्न राहतोच. नवरात्र बसवतांना देवीच्या सोबत जसा नंदादीप लावतात, तसा एक मातीचा घटसुध्दा ठेवायची पध्दत असावी. आमच्या घरी मी कधी हे पाहिले नाही, पण याचाही एक विधि आहे आणि मंत्रोच्चारासह जमीनीवर माती पसरून त्यात काही धान्ये पेरतात आणि त्यावर मातीचा घट ठेऊन त्यातही माती आणि काही विशिष्ट पदार्थ घालून त्याची पूजा करतात असे समजले. नंदादीपामधून ज्योतीची आराधना होते आणि घटाचा आकार आकाशासारखा गोल असतो त्यातून आकाशाचे प्रतिनिधित्व होते असा काहीसा विचार यामागे असावा. आजकाल नवरात्र म्हणजे गरबा, दांडिया, रास असे नवे समीकरण झाले आहे. गुजराथमधून आलेल्या या उत्सवात मात्र घटाला (किंवा घटांना) सुंदर रंगरंगोटी करून छानसे सजवलेले असते. त्यासभोवती फेर धरून नाचतांना ‘मुन्नी बदनाम हुई’ किंवा ‘हलकट जवानी’ यासारखी अभिरुचीहीन गाणी लाऊडस्पीकरवर वाजवतात हे त्यांचे आणि आपले दुर्दैव.

देवीची स्तोत्रे –

त्रिपुरसुंदरी, अन्नपूर्णा,  महिषासुरमर्दिनी वगैरे देवीच्या अनेक रूपांवर लिहिलेल्या स्तोत्रांचा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे.

या संकलनामध्ये सप्तश्लोकी दुर्गास्तोत्राचा समावेश केला आहे. दि. ११-१०-२०१८

दुर्गाद्बात्रिंशन्नाममाला या स्तोत्राचा समावेश  दि. २८ -०९-२०१९

अष्टक श्रीरेणुकेचे या स्तोत्राचा समावेश  दि. ०५ -१०-२०१९

————————————————————————————-

त्रिपुरसुन्दर्यष्टकम्

त्रिपुरसुंदरी या नावाची देवीची देवळे मी पाहिली आहेत, पण तिच्या या विशेष रूपाबद्दल लहानपणी किंवा नंतरच्या काळातही कुणाकडूनही कांही ऐकल्याचे मात्र आठवत नाही. तिचे हे आठ श्लोकी सुंदर स्तोत्र खाली दिले आहे. त्यात तिच्या रूपागुणांचे वर्णन करून (सर्वांनी) तिचा आश्रय घ्यावा असा उपदेश केला आहे. हे स्तोत्रसुध्दा उपमा, अनुप्रास, यमक वगैरे अलंकारांनी नटलेले आहेच.

त्रिपुरसुन्दर्यष्टकम्

कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं
नितम्बजितभूधरां सुरनितम्बिनीसॆविताम।
नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥१॥

कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम।
दयाविभवकारिणीं विशदरोचनाचारिणीं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥२॥

कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वॆलया।
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया
कयापि घनलीलया कवचिता वयं लॆऎलया॥३॥

कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां
षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम।
विडम्बितजपारुचिं विकचचन्द्रचूडामणिं
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥४॥

कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालङ्कृतां
कुशॆशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वॆषिणीम।
मदारुणविलोचनां मनसिजारिसम्मोहिनीं
मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रयॆ॥५॥

स्मरॆत्प्रथमपुष्पिणीं रुधिरमिन्दुनीलाम्बरां
गृहीतमधुपात्रिकां मदविघूर्णनॆत्राञ्चलाम।
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रयॆ॥६॥

सकुङ्कुमविलॆपनामलिकचुम्बिकस्तूरिकां
समन्दहसितॆक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम।
अशॆषजनमोहिनीमरुणमाल्यभूषाम्बरां
जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम॥७॥

पुरंदरपुरंध्रिकाचिकुरबन्धसैरंध्रिकां
पितामहपतिव्रतापटुपटीरचर्चारताम।
मुकुन्दरमणीमणीलसदलङ्क्रियाकारिणीं
भजामि भुवनाम्बिकां सुरवधूटिकाचॆटिकाम॥८॥

—————————————————————————————————————————-

अन्नपूर्णा स्तोत्र

ज्या घरावर अन्नपूर्णेची कृपा असते त्या घरातल्या माणसांना खाण्यापिण्याची ददात नसते, अर्थातच यात समृध्दीही आलीच आणि त्यामुळे ते घर सुखी असते. अशा अन्नपूर्णा मातेची परोपरीने स्तुति करून तिच्याकडे तिच्या कृपेची भिक्षा श्रीमद् शंकराचार्यांनी किती लीन भावनेने मागितली आहे हे वाचण्यासारखे (आणि ऐकण्यासारखेसुध्दा) आहे.

।।अन्नपूर्णा स्तोत्र।।

नित्यानन्दकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी।
निर्धूताखिल-घोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।
प्रालेयाचल-वंशपावनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपुर्णेश्वरी।।१।।

नानारत्न-विचित्र-भूषणकरी हेमाम्बराडम्बरी।
मुक्ताहार-विलम्बमान विलसद्वक्षोज-कुम्भान्तरी।
काश्मीराऽगुरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।२।।

योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माऽर्थनिष्ठाकरी।
चन्द्रार्कानल-भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।
सर्वैश्वर्य-समस्त वांछितकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।३।।

कैलासाचल-कन्दरालयकरी गौरी उमा शंकरी।
कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी।
मोक्षद्वार-कपाट-पाटनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।४।।

दृश्याऽदृश्य-प्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी।
लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी।
श्री विश्वेशमन प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।५।।

उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माताऽन्नपूर्णेश्वरी।
वेणीनील-समान-कुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी।
सर्वानन्दकरी दृशां शुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।६।।

आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी।
काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी।
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।७।।

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुंदरी।
वामस्वादु पयोधर-प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।
भक्ताऽभीष्टकरी दशाशुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।८।।

चर्न्द्रार्कानल कोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी।
चन्द्रार्काग्नि समान-कुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।
माला पुस्तक-पाश-सांगकुशधरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।९।।

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी।
साक्षान्मोक्षरी सदा शिवंकरी विश्वेश्वरी श्रीधरी।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलंबनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।१०।।

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !
ज्ञान वैराग्य-सिद्ध्‌यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्‌ II

आदि शङ्कराचार्यविरचितम् अन्नपूर्णा स्तोत्रम्।

——————————————————————————————————————————

 महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्

महिषासुरमर्दिनी जगदंबेचे हे स्तोत्र तर सुंदर आहेच, प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या ओळीत छान अनुप्रास साधला आहे. या  स्तोत्राचे वृत्त ऊर्जेने भरलेले आणि जोरकस वाटते. चालीवर म्हणून तर पहा.

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते ।
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥
अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते ।
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥
अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते ।
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते ।
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥
अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे ।
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥
अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते ।
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥
धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके ।
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥
सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते ।
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥
जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते ।
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥
अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते ।
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥
सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते ।
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥
अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते ।
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥
कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते ।
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥
करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते ।
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥
कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे ।
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे ।
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६ ॥
विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते ।
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥
पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे ।
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥
कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम् ।
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९ ॥
तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते ।
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते ।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २० ॥
अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे ।
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते जय जय हे ।
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१ ॥

https://sa.wikisource.org/s/7w7

——————————————————————————————————————-

देवीसूक्त

आदिशक्ती हे तर देवीचे रूप आहेच, पण  चेतना, क्षुधा, तृष्णा वगैरे संवेदना इतकेच नव्हे तर लज्जा, दया, क्षमा, तुष्टी  यासारख्या माणसाच्या मनात येणा-या भावना या सर्वांमध्ये देवीचे रूप पाहून तिला त्रिवार नमस्कार करा असे या सूक्तामध्ये सांगितले आहे.

अथ तन्त्रोक्तं देविसुक्तम्

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां ॥१॥

रौद्राय नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः
ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥

कल्याण्यै प्रणता वृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः।
नैरृत्यै भूभृतां लक्ष्मै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥

अतिसौम्यतिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥

यादेवी सर्वभूतेषू विष्णुमायेति शब्धिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥६॥

यादेवी सर्वभूतेषू चेतनेत्यभिधीयते।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥७॥

यादेवी सर्वभूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥८॥

यादेवी सर्वभूतेषू निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥९॥

यादेवी सर्वभूतेषू क्षुधारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१०॥

यादेवी सर्वभूतेषू छायारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥११॥

यादेवी सर्वभूतेषू शक्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१२॥

यादेवी सर्वभूतेषू तृष्णारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१३॥

यादेवी सर्वभूतेषू क्षान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१४॥

यादेवी सर्वभूतेषू जातिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१५॥

यादेवी सर्वभूतेषू लज्जारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१६॥

यादेवी सर्वभूतेषू शान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१७॥

यादेवी सर्वभूतेषू श्रद्धारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१८॥

यादेवी सर्वभूतेषू कान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥१९॥

यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२०॥

यादेवी सर्वभूतेषू वृत्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२१॥

यादेवी सर्वभूतेषू स्मृतिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२२॥

यादेवी सर्वभूतेषू दयारूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२३॥

यादेवी सर्वभूतेषू तुष्टिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२४॥

यादेवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२५॥

यादेवी सर्वभूतेषू भ्रान्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२६॥

इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्ति देव्यै नमो नमः ॥२७॥

चितिरूपेण या कृत्स्नमेत द्व्याप्य स्थिता जगत्
नमस्तस्यै, नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमः ॥२८॥

स्तुतासुरैः पूर्वमभीष्ट संश्रयात्तथा
सुरेन्द्रेण दिनेषुसेविता।
करोतुसा नः शुभहेतुरीश्वरी
शुभानि भद्राण्य भिहन्तु चापदः ॥२९॥

या साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितै
रस्माभिरीशाचसुरैर्नमश्यते।
याच स्मता तत्क्षण मेव हन्ति नः
सर्वा पदोभक्तिविनम्रमूर्तिभिः ॥३०॥


देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ।।

न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जानी स्तुतिमहो। न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा।।
न जाने मुद्रीस्ते तदपि च न जाने विलपनं। परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं।।१।।

हे माते, मी मंत्रही जाणत नाही आणि तंत्रही. मला स्तुती करणे येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ांची माहिती नाही. स्तोत्र व कथा मला ठाऊक नाहीत, मला तुझ्या मुद्रा समजत नाहीत आणि व्याकुळ होऊन हंबरडाही फोडणे येत नाही. पण मला फक्त एक गोष्ट समजते ती म्हणजे तुझे अनुसरण करणे. तुला शरण येण्यामुळेच सर्व संकटांचा नाश होतो.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया।  विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्याच्युतिरभूत्।।
तदेतत्क्षंतव्यं जननि सकलोध्दारिणिशिवे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।२।।

हे सर्वांचा उध्दार करणारे माते,  मला पूजाविधी माहीत नाही,  माझ्याकडे संपत्ती नाही, मी स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवस्थित प्रकारे पूजा करणे मला शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे तुझ्या चरणी सेवा करण्यात ज्या तृटी येतील त्याबद्दल मला क्षमा कर, कारण वाईट मुलगा जन्माला येणे शक्य आहे पण आई कधीच वाईट होऊ शकत नाही.

पृथीव्यां पुत्रास्ते जननि वहवः सन्ति निरलाः। परं तेषांमध्ये विरलतरलोSहं तव सुतः।।
मदीयोSयं त्यागः सनुचितमिदं नो तव शिवे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।३।।

माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ साधेसुधे पुत्र  आहेत पण मी त्या सर्वांमधील अत्यंत अवखळ बालक आहे. माझ्यासारखा चंचल मुलगा क्वचितच असेल. तरीही तू माझा त्याग करणे हे कधीही योग्य ठरणार नाही. कारण कुपुत्र होणे शक्य असले तरी कुमाता होणे शक्य नाही.

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता। न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे। कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।४।।

हे जगदंबे देवी माते, मी कधीही तुझ्या चरणांची सेवा केली नाही, तुला फारसे धन समर्पण केले नाही, तरीही तू माझ्यासारख्या अधम माणसावर अनुपम स्नेह करतेस कारण या जगात मुलगा वाईट होऊ शकतो पण आई कधीही वाईट बनू शकत नाही.

परित्यक्ता देवा विविधविधि सेवा कुलतया। मया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि।।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता। निरालंबोलंबोदरजननि कं यामि शरणं।।५।।

हे गणपतीला जन्म देणा-या पार्वतीमाते,  इतर अनेक देवतांची विविध प्रकाराने सेवा करण्यात मी व्यग्र होतो.  पंचाऐंशीचा झाल्यानंतर आता माझ्याच्याने ते होत नाही म्हणून मी त्या सर्व देवांना सोडून दिले आहे (कठीण पुजाविधिंना कंटाळुन मी सर्व देवांना सोडुन दिले आहे व त्यांच्या मदतीची आशा उरलेली नाही). या वेळी मला जर तुझी कृपा मिळाली नाही तर मी निराधार होऊन कुणाला शरण जाऊ?

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा। निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै।।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं।  जनःको जानीते जननि जपनीयं जपविधौ।।६।।

हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानावर पडले तरी मूर्ख माणूससुध्दा मधुपाकासारखे मधुर बोलणारा उत्तम वक्ता होतो, दरिद्री माणूस कोट्यावधी सुवर्णमुद्रा मिळून चिरकाल निर्भर होऊन विहार करतो. तुझ्या मंत्राचे एक अक्षर ऐकण्याचे एवढे मोठे फळ आहे  तर जे लोक विधीवत् तुझा जप करतात त्यांना काय मिळत असेल हे कोण जाणेल?

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो।  जटाधारीकण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।।
कपाली भूतेशो भजति जगदीशै क पदवीम्। भवानी त्वत्प्राणिग्रहण परिपाटी फलमिदम्।।७।।

जो आपल्या अंगाला चितेची राख फासतो, विष खातो, दिगंबर राहतो, डोक्यावर जटा वाढवतो, गळ्यात सांप धारण करतो, हातात (भिक्षेचे) कपालपात्र धरतो, अशा भुतांच्या व पशूंच्या नाथाला जगदीश ही पदवी कशामुळे दिली जाते?  हे भवानी, अर्थातच तुझे पाणिग्रहण (तुझ्याशी विवाह) केल्याचेच हे फळ त्याला मिळाले असणार.

न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववांच्छापि च न मे। न विज्ञानापेक्षा शशिमुख सुखेच्छापि न पुनः।।
अतस्त्वां संयाचे जननि  जननं यातु मम वै। मृडानी रुद्राणी शिवशिवभवानीति जपतः।।८।।

मला मोक्ष मिळवण्याची इच्छा नाही, जगातील वैभवाची अभिलाषा नाही, विज्ञानाची अपेक्षा नाही, सुखाची आकांक्षा नाही. हे चन्द्रमुखी माते,  तुझ्याकडे माझे एवढेच मागणे आहे की माझा जन्म मृडानी रुद्राणी शिवशिवभवानी या तुझ्या नामांचा जप करण्यात व्यतीत होवो.

नाराधितासि विधिना विविधोपचारैः। किं रुक्षचिन्तन परैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाथे। धत्से कृपामुचितमम्ब परे तवैव।।९।।

नाना प्रकारच्या पूजा सामुग्रीद्वारे तुझी विधिवत् पूजा माझ्याकडून घडली नाही. नेहमी रूक्ष चिंतन करणा-या माझ्या वाचेने कोणकोणते अपराध केले नसतील?  हे श्यामा माते,  तरीही तू स्वतः प्रसन्न होऊन माझ्यासारख्या अनाथावर थोडीशी कृपा करतेस हे तुझ्या योग्यच आहे.

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं  करोमि दुर्गे करुणार्णवेशि।।
नैतच्छठत्वं मम भावमेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।१०।।

करुणेचा सागर अशा माता दुर्गे, संकटात सापडल्यानंतर मी तुझे स्मरण करीत आहे. (आधी केले नाही) पण ही माझी शठता आहे असे मानू नकोस कारण तहान भूक लागल्यावरच मुलाला आईची आठवण येते.

जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी।
अपराध परंपरावृतम् न हि माता समुपेक्षते सुतम्।।११।।

हे जगदम्बे, माझ्यावर तुझी पूर्ण कृपा आहे हे आश्चर्य आहे मुलगा अपराधावर अपराध करीत गेला तरी माता कधीही त्याची उपेक्षा करीत नाही.

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवम् ज्ञाता महादेवी यथा योग्यं तथा कुरु।।१२।।

हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा नाश करणारी कोणी नाही हे जाणून तुला जे योग्य वाटेल ते कर.
————————————————————————————————————————
जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले हे सुप्रसिद्ध स्तोत्र व मला त्याचा समजलेला अर्थ देत आहे. भक्ती, श्रद्धा वगैरे बाजूला ठेऊन एक काव्य म्हणून पाहिले तरी त्यातील अनुप्रास, यमक, रूपक वगैरे अलंकार, छंदबद्ध तशीच भावोत्कट शब्दरचना मंत्रमुग्ध करणारी आहे असे मला वाटते. त्यात  चुका झालेल्या असतील तर त्या सर्वस्वी माझ्या अज्ञानामुळे झाल्या आहेत.


श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र

दुर्गा सप्तशती या मोठ्या ग्रंथाबद्दल ऐकले असेलच. त्याचे सार या सात श्लोकात सामावले आहे असे म्हणतात.

ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती)
ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द: । श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता:। श्री दुर्गा प्रीत्यर्थम् सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग: ।

ॐ ज्ञानिनां अपि चेतांसि देवी भगवती हि सा
बलाद् आकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।

दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तो:
स्वस्थै: स्मृता मतिं अतीव शुभां ददासि
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।

सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।

शरणागत दीनार्त परित्राण परायणे
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते
भयेभ्य: त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।

रोगान् अशेषान् अपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान्
त्वां आश्रितानां न विपत् नराणां
त्वां आश्रिता हि आश्रयतां प्रयान्ति ।।६।।

सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्र्वरी
एवं एव त्वया कार्यम् अस्मद् वैरि विनाशनं ।।७।।

इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा ।


दुर्गाद्बात्रिंशन्नाममाला  (दुर्गेची ३२ नावे)

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्बिनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ।।

दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहिन्त्री दुर्गमापहा ।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ।।

दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी ।
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ।।

दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी ।
दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी ।।

दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी ।
दुर्गमांगी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी ।।

दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ।
———————————

अष्टक श्रीरेणुकेचे

लक्षकोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती ।
अंब चंद्रवदनबिंब दिप्तमाझी लोपती ।
सिंह शिखर अचळवासी मूळपीठनायका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ १ ॥
आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणि दिव्य कुंडले ।
डोलताति पुष्पहार भार फार दाटले ।
अष्टदंडि, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका, ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ २ ॥
इंद्रनीळ,पद्मराज, पाचू हार वेगळा ।
पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळ।
पैंजणादि भूषणेंचि लोपल्याति पादुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ३ ॥
इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि वंदिती ।
आदि अंत-ठावहीन आदि शक्ति भगवती ।
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ४ ॥
पर्वताग्रहवासि पक्षी ‘अंब अंब ‘ बोलती ।
विशाल शालवृक्ष रानिं भवानि ध्यानि डोलती ।
अवतार-कृत्यसार जड-मुढादि तारका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ५ ॥
अनंत ब्रह्मांड कोटिं, पूर्वमुखा बैसली ।
अनंत गुण, अनंत शक्ति, विश्वजननी भासली ।
सव्यभागी दत्त, अत्रि, वामभागिं कालिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ६ ॥
पवित्र मातृ-क्षेत्र-धन्य वासपुण्य आश्रमी ।
अंब दर्शनासि भक्त-अभक्त येतीं आश्रमी ।
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ७ ॥
विष्णुदास यांनी रचिलेले रेणुका अष्टक पूर्ण झाले. अष्टक असे म्हटले असले तरी यांत सातच श्र्लोक आहेत.

नवरात्र

नवरात्राचा उत्सव या ब्लॉगवर साजरा करायचा विचार एकदा मनात घोळू लागला होता. घटस्थापनेच्या सुमाराला त्याची आठवण झाली. माहिती गोळा करायला सुरुवात केल्यानंतर ती सहजपणे मिळत गेली. पण तिचे संकलन करून आपल्या शब्दात ती मांडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यातली कांही माहिती निवडून देत गेलो. त्याचबरोबर कांही पारंपरिक, कांही लोकप्रिय आणि कांही मला खूप आवडलेली गीतेसुध्दा एक एक करून देत गेलो. वेळ आणि जागा यांच्या मर्यादा पाहता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि दोन प्रसिध्द देवस्थानांची माहिती दिली. याखेरीज कितीतरी स्थाने शिल्लक राहिली आहेत. मुंबईतच मुंबादेवी, काळबादेवी वगैरे जुनी आणि वॉर्डन रोडवरील समुद्रकिना-यावरील अत्यंत लोकप्रिय महालक्ष्मी वगैरे महत्वाची देवस्थाने आहेत. त्याशिवाय कल्याणची दुर्गाडी देवी, विरारच्या डोंगरमाथ्यावरली देवी वगैरे पुरातन आणि लोकप्रिय देवस्थाने आपल्या जवळपासच आहेत. शेजारच्या गोव्यातली शांतादुर्गा प्रसिध्द आहे.

शिवाय महाराष्ट्राबाहेर तर वायव्येला वैष्णोदेवीपासून ईशान्येला कामाख्यादेवीपर्यंत आणि दक्षिणेला मदुराई, कन्याकुमारीपर्यंत आदिशक्तीची खूप जगप्रसिध्द मंदिरे आहेत. म्हैसूरची चामुंडा देवी प्रसिध्द आहे. गुजराथी आणि बंगाली समाजात नवरात्रीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो. गुजराथ आणि बंगाल राज्यात तर तो गांवागांवातल्या गल्लीगल्लीत होत असतो, पण इतर राज्यातच नव्हे तर परदेशातसुध्दा ज्या ज्या ठिकाणी या समाजातल्या मंडळींची थोडी फार वस्ती आहे त्या सगळ्या ठिकाणी हा सण सार्वजनिक उत्सवाच्या रूपाने साजरा होतो. आता महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत त्याचे स्वरूप गणेशोत्सवाशी तुलना करता येण्याइतके मोठे झाले आहे. मराठी, गुजराथी वगैरे परंपरेप्रमाणे नवरात्र नऊ दिवसांचे असते आणि त्यात दस-याचा अंतर्भाव केला तर दहा दिवस होतात, बंगालातली दुर्गापूजा चार पाच दिवसच असते. उत्तर भारतीय लोक वेगळ्या प्रकारचे नवरात्र साजरे करतात. या नऊ दिवसात रोज संत तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे सुरात पठण केले जाते आणि रंगमंचावर त्यातल्या प्रसंगांचे नाट्यमय सादरीकरण रामलीलेतून केले जाते. अखेर दस-याच्या संध्याकाळी रावणदहनाने त्या नवरात्रोत्सवाची अक्षरशः धूमधडाकेबाजसांगता होते.

नवरात्राची आरती आणि नवरात्राचे गाणे या दोन सुंदर  जुन्या रचना खाली दिल्या आहेत.

श्री नवरात्री देवीची आरती

समर्थ रामदासांनी श्री नवरात्री देवीची आरती लिहिली आहे. त्यांच्या काळी देवळां देवळांत सार्वजनिक रीत्या साजरा होणारा नवरात्र महोत्सव कसा असायचा याचे चित्रणही देवीच्या अनेक रूपांबरोबरच या आरतीत पहायला मिळते.

उदोऽ बोला उदोऽ अंबाबाई माउलिचा हॊऽऽ
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।

अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतीपदे पासुनि घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनि भोंवते रक्षक ठेवुनि हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आइचे पूजन करिती हो ।।१।।

द्वितियेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशूरामाची जननी हो
कस्तुरि मळवट भांगी शेन्दुर भरुनी हो
उदोकारे गर्जति सकल चामुण्डा मिळुनी हो ।।२।।

तृतियेचे दिवशी अंबे श्रृंगार मांडिला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफ़ळा हो
कंठीची पदके कांसे पीताम्बर पीवळा हो
अष्टभुजा मिरविसि अंबे सुन्दर दिसे लीला हो ।।३।।

चतुर्थीचे दिवशी विश्र्वव्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हॊ
पूर्ण कृपे तारिसि जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ।।४।।

पञ्चमीचे दिवशी व्रत ते “उपांगललिता” हो
अर्घ्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ।।५।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफ़ळा हो
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्त कूळा हो ।।६।।

सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंग गडावरी हो
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाई जुई शेवन्ती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता घेसी झेलुनि वरचे वरी हो ।।७।।

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले प्रसन्न अंत:करणी हो ।।८।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्-भक्ती करुनी हो
षड्र्स अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो ।।९।।

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारुढ करि शस्त्रे दारुण अंबे त्वां घेउनि हो
शुम्भ निशुम्भादिका राक्षसा किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ।।१०।।

उदो उदो उदो उदो
जगदम्ब जगदम्ब जगदम्ब जगदम्ब
————————————-
नवरात्राचे गाणे किंवा नव देवता स्वरूपांची आरती या रचनेत जगन्माउलीच्या नऊ रूपांचे दर्शन घडते.

नवरात्राचे गाणे

चला सख्यांनो नवरात्राचे गाणे आपण गाऊ
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।धृ।।

मनोमनी आठवी शिवाला करांत ही वरमाला
सागर तीरी उभी राहिली कोण असे ही बाला ?
कोण असे ही बाला ?
रूप तियेचे कुमारिकेचे पहिले दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।१।।
चला सख्यांनो —

“शुभं करोती” वदली वाणी जोडुनि दोऩ्हि करांना
तेजोमय ही मूर्ति तियेची प्रसन्न करि नयनांना
प्रसन्न करि नयनांना !!!
सांजवातिला सुवासिनी ही दुसरे दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।२।।
चला सख्यांनो —

मृदुल करांनी छेडित वीणा उधळित सप्त सुरांना !
स्फ़ुर्ति दायिनी स्फ़ुर्ति देउनी धुन्द करी रसिकांना
धुन्द करी रसिकांना !!!
मयुर वाहिनी सरस्वतीला तिसरे दिवशी पाहू
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।३।।
चला सख्यांनो —

बोल “भवानी माता की जय !” गर्जत दाहि दिशांना
प्रसाद घेउनि तलवारींचा सिद्ध होति लढण्याला
सिद्ध होति लढण्याला !
शिवरायाची भवानि आई चौथे दिवशी पाहू ।
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।४।।
चला सख्यांनो —

नवयौवन संपन्न नववधू हिरवा शालू ल्याली !
फ़ुलवेलीचा साज घालुनी वसुन्धरा ही आली
वसुन्धरा ही आली !!!
वनदेवीचे रूप तियेचे पांचवे दिवशी पाहू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।५।।
चला सख्यांनो —

भाळी मळवट हिच्या शोभला कंठी रुळते माळा
खल निर्दालन करण्यासाठी त्रिशुल हातिचा सजला
त्रिशुल हातिचा सजला !!!
उग्र रूप हे व्याघ्राम्बरिचे सहावे दिवशी पाहू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।६।।
चला सख्यांनो —

हाती घेउनि अमृत कुम्भा आज कमलिनी आली
शेषशायि भगवान चरणी सेवारत ही झाली
सेवारत ही झाली !!!
सौभाग्याचे व्रत हे घेउनि कुंकुम तिलका लावू !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।७।।
चला सख्यांनो —

तव नामाचा उदो उदो चा नादहि भरला कानी
तव आगमने मांगल्याचा सुगंध भरला गगनी
सुगंध भरला गगनी !!
अष्टहि कमळे अष्टभुजेच्या चरणांवरती वाहू !!!
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।८।।
चला सख्यांनो —

भावसुरांचे आसन तुजला हृदय मंदिरी केले
पंचप्राण कुरवंडी करण्या नेत्र दीप लावियले !
नेत्र दीप लावियले !!!
दर्शन घेउन तुझेच माते आरति मंगल गाऊ !
नव रूपा ही जगन्माउली डोळे भरुनी पाहू ।।९।।
चला सख्यांनो —

या लहानशा मालिकेची सांगता माझ्या आणि सगळ्यांच्याच अतीशय आवडत्या भैरवीने करीत आहे.

भवानी दयानी, महाबाकबानी ।
सुर नर मुनिजन मानी, सकल बुद ग्यानी ।
जगजननि जगजानी,  महिषासुरमर्दिनी ।
ज्वालामुखी चंडी, अमरपददानी ।।


नवी भर दि. २६-०९-२०२२

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई l
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई ll

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई ll

सार्‍या चराचरीं तीच जीवा संजीवनी देते l
तीच संहारप्रहरीं दैत्य-दानव मारीते l
उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई ll

क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर l
अगणित खांबावरी उभे राहिले मंदिर l
नाना देव ते भोवती देवी मधोमध राही ll

तुळजापूरीची भवानी जणु मूळ आदिशक्ती l
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी l
स्वत: तरली, भक्तांना स्वयें तारुनिया नेई ll

अमरावतीची देवता शाश्वत, अमर l
अंबेजोगाईत तिने एक मांडियले घर l
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई ll

कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी l
दुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी l
किती रूपें, किती नावें परि तेज एक वाहीं ll
गीत: सुधीर मोघे
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: थोरली जाऊ

. . . . . . . . .

नवी भर दि. २८-०९-२०२२ : दुर्गामातेची आरती

संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला जोगवा

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।

।। ज्ञानोबा तुकाराम ।।

यमाई आणि योगेश्वरी

 

  

महाराष्ट्रातील आदिमायेच्या प्रमुख स्थानांमध्ये औंधची यमाई आणि अंबेजोगाईची योगेश्वरी या दोन्ही मंदिरांचा समावेश केला जातो. सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वाईजवळ औंध नांवाचे एक छोटे गांव आहे.  तेथील पुरोगामी आणि कलाप्रेमी संस्थानिकांनी ब्रिटीशांच्या काळातसुध्दा चांगला नावलौकिक कमावला होता. औंधला एका टेकडीवर यमाईमातेचे सुंदर मंदिर आहे. त्याच्या जवळच श्रीभवानी म्यूजियम आहे. राजा रविवर्मा, रावबहादुर धुरंधर, पं.सातवळेकर आणि हेन्री मूर वगैरे जगप्रसिध्द कलाकारांची चित्रे आणि शिल्पकृती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.

मराठवाड्यातील अंबेजोगाई या गांवी योगेश्वरी मातेचे प्रसिध्द देवस्थान आहे. यमाईप्रमाणेच ही देवीसुध्दा अनेक मराठी कुटुंबांची कुलदेवता आहे.  मध्यप्रदेशातील सरदार भुस्कुटे यांच्या ब-हाणपूर येथील वाड्यात योगेश्वरी देवीची स्थापना केली होती. त्या वाड्यातल्या दिवाणखान्यात नवरात्राचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असे. आता तेथील देवीचे स्थलांतर भुस्कुट्यांच्या टिमरनी येथील वाड्यात केले आहे. तिथेसुध्दा मोठ्या श्रध्देने नवरात्राचा उत्सव संपन्न केला जातो. रोज देवीची मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा केली जाते. सायंआरतीच्या वेळी सारेजण एकत्र बसून विविध स्तोत्रे म्हणतात. त्यातले एक स्तोत्र खाली दिले आहे. आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या या अष्टकातील शब्दरचना, लयबध्दता आणि अनुप्रास मनोवेधक आहेत. 

त्रिपुरसुंदरी अष्टकम् ।

कदंबवनचारिणीम् मुनिकदंबकादंबिनीम् ।
नितंबजितभूधराम् सुरनितंबिनीसेविताम् ।
नवांबुरुहलोचनाम् अभिनवांबुदश्यामलाम् ।
त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।१।।

कदंबवनवासिनीम् कनकवल्लकीधारिणीम् ।
महार्हमणिहारिणीम् सुखसमुल्लसद्वारुणीम् ।
दयाविभवकारिणीम् विशदलोचनीम् चारिणीम् ।
त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।२।।

कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया ।
कपचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया ।
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ।
कयापि घननीलया कवचिता वयंलीलया ।।३।।

कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थिताम् .
षडंबुरुहवासिनीम् सततसिद्दसौदामिनीम् ।
विडंबितजपारुचिम् विकलचंद्रचूडामिनीम् ।
त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।४।।

कुचांचितविपंचिकाम् कुटिलकुंतलालंकृताम् ।
कुशेशयनिवासिनीम् कुटिसचित्विद्वेषिणीम् ।
मदारुणविलोचनाम् मनसिजारिसंमोहिनीम् ।
मतंगमुनिकन्यकाम् मधुरभाषिणीमाश्रये ।।५।।

स्मरप्रथमपुष्पिणीम् रुधिरबिंदुनीलांबराम् ।
गृहीतमधुपत्रिकाम्  मदविघूर्णनेत्रांचलाम् ।
घनस्तनभरोन्नताम् गलितचूलिकाम् श्यामलाम् ।
त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।६।।

सकुंकुमविलेपिनाम् अलकचुंबिकस्तूरिकाम् ।
समंदहसितेक्षणाम् सशरचापपाशांकुशाम् ।
अशेषजनमोहिनीम् अरुणमाल्यभूषांबराम् ।
जपाकुसुमभासुराम् जपविधौ स्मराम्यंबिकाम् ।। ७।।

पुरंदरपुरन्ध्रिकाम् चिकुरबंधसैरंध्रिकाम् ।
पितामहपतिव्रताम् पटपटीरचर्चारताम् ।
मुकुंदरमणीमणीम्  लसदलंक्रियाकारिणीम् ।
भजामि भुवनांबिकाम् सुरवधूटिकाचेटिकाम् ।।८।।

महासरस्वती

महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे आहेत. त्यातली सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्या म्हणजे शिक्षण आणि ते म्हणजे शाळेत जाऊन परीक्षा पास होणे आणि कॉलेज शिकून पदव्या प्राप्त करणे असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. जे जे कांही शिकण्यासारखे आहे ते शिकून घेणे असा विद्या या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. परंपरागत समजुतीनुसार १४ विद्या आणि ६४ कलांची गणती केली होती. त्या नेमक्या कोणत्या होत्या यावर एकमत नाही आणि कालमानानुसार त्यातल्या कांही आता उपयोगाच्या राहिल्या नसतील आणि अनेक नव्या विद्या आत्मसात करणे गरजेचे झाले असेल. १४ आणि ६४ या आंकड्यांनाही फार महत्व द्यायचे कारण नाही. त्यापेक्षा विद्येची संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे.
कलाकार हा प्रतिभेचे लेणे घेऊन जन्मावा लागतो असे म्हणतात ते बव्हंशी खरे आहे. पण त्या अंगभूत कलेचा विकास करण्यासाठी विद्येचा अभ्यास करावा लागतो, किंवा विद्याध्ययनाने अंगातली कला जास्त बहराला येते. उदाहरणार्थ गोड गळा जन्मजात मिळाला तरी सूर, ताल, लय वगैरे समजून घेऊन नियमित रियाज करून तयार झालेला गायक संगीताचा उच्च दर्जाचा आविष्कार करू शकतो. चित्रकाराच्या बोटात जादू असली तरी त्याने रंगसंगतीचा पध्दतशीर अभ्यास केला आणि हातात ब्रश धरून तो कागदावर सफाईदारपणे फिरवण्याचा सराव केला तर त्यातून अप्रतिम चित्रे तयार होतात. महाविद्यालयीन संस्था चालवण्याच्या व्यावसायिक गरजेतून आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स असे ढोबळ विभाग केले गेले असले तरी विद्येच्या राज्यात कला, विज्ञान आणि व्यापार असे कप्पे नसतात. पदवीपरीक्षा देण्यासाठी ठराविक विषयांमधला ठरलेला अभ्यासक्रम शिकून घ्यावा, पण विद्या प्राप्त करण्यासाठी असे बंधनही नाही आणि ते शिक्षण पुरेसेही नसते.  अंगात कलागुण असतील, विज्ञानाची आवड असेल, व्यापार करण्याचे चातुर्य असेल तर या क्षेत्राची थोडी माहिती या अभ्यासक्रमांमधून मिळते आणि त्या विषयाच्या अभ्यासाला एक दिशा मिळते. विद्याध्यनासाठी पुढचा प्रवास अखंड चालत ठेवावा राहतो.

ज्ञान आणि विद्या मिळवण्यासाठी याव्यतिरिक्त अगणित क्षेत्रे उपलब्ध आहेत आणि अनेक मार्गांनी ते प्राप्त करता येते. कोणत्याही विषयाची माहिती असणे हे ज्ञान झाले आणि त्या माहितीचा उपयोग करता येणे ही विद्या असे ढोबळ मानाने म्हणता येईल. त्यामुळे ज्ञान मिळवणे महत्वाचे असले तरी ती पहिली पायरी आहे. ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या आधारे निर्णय घेता येणे, कार्य करणे वगैरे विद्या संपादन केली असल्याची लक्षणे आहेत. विद्या हे असे धन आहे की जे कधी चोरले जाऊ शकत नाही, दिल्याने कमी होत नाही वगैरे तिची महती सांगणारी सुभाषिते आहेत.

सरस्वती या अशा विद्येची देवता आहे. सरस्वतीचे पूजन करून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा रिवाज होता. बहुतेक शाळांमध्ये सुरुवातीला सरस्वतीची प्रार्थना सामूहिक रीतीने केली जाते. तिच्या रूपाचे वर्णन या श्लोकात केले आहे.

या कुंदेंदुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता | या वीणावरदण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता | सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ||

ही गोरी पान देवी पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून श्वेत रंगाच्याच कमळावर आसनस्थ आहे. ( शुभ्र रंग निर्मळता दर्शवतो) तिने आपल्या हातात वीणा धारण केली आहे, (कोठलेही शस्त्र नाही.) ब्रह्मा, विष्णू, महेश यांसह सर्व देव नेहमी तिला वंदन करतात. बुध्दीमधील जडत्वाचे निःशेष निर्मूलन करणारी ही सरस्वती देवी मला प्रसन्न होवो अशी प्रार्थना या श्लोकात केली आहे. 
सरस्वतीमातेचे असेच सुंदर, सालस आणि तेजस्वी रूप राजा रवीवर्मा यांनी वरील चित्रात रंगवले आहे. (फक्त ती कमळावर बसलेली नाही.) रंगीबेरंगी मोर हे तिचे वाहन जवळच उभे आहे.  शुभ्र राजहंस हा शारदेचे वाहन आहे असे कांही ठिकाणी दाखवतात. कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेली सरस्वतीची अत्यंत सुंदर आणि प्रसिध्द स्तुती खाली देत आहे.

जय शारदे वागीश्वरी । विधिकन्यके विद्याधरी ।।

ज्योत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा ।
उजळो तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा ।
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी ।।

वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली ।
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली ।
उन्मेष कल्प तरुवरी, डवरुन आल्या मंजिरी ।।

शास्त्रे तुला वश सर्वही, विद्या, कला वा संस्कृती ।
स्पर्शामुळे तव देवते, साकारती रुचिराकृती ।
लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वान्तरी !

महालक्ष्मी

सगळ्या लोकांच्या घरात असते त्याप्रमाणे आमच्या घरातल्या देव्हा-यातसुध्दा अन्नपूर्णेची मूर्ती होती, तिला सगळे अंबाबाई म्हणत. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होत असे तेंव्हा कमळातल्या लक्ष्मीचे चित्र असलेले नाणे बाहेर काढून घासून पुसून लख्ख करून पूजेसाठी चौरंगावरील तबकात ठेवले जात असे. पाठीमागे गजांतलक्ष्मीचे सुबक चित्र उभे केलेले असे. क्षीरसागरामध्ये शेषशयन करत असलेल्या विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसली असल्याचे चित्र पाहिले होते आणि समुद्रमंथनामध्ये निघालेल्या लक्ष्मीकौस्तुभपारिजातक वगैरे चौदा रत्नांच्या यादीत पहिलेच नाव लक्ष्मीचे होते. त्याशिवाय कोणाच्या ‘घरात लक्ष्मी पाणी भरते आहे’ किंवा कोणाचा जोडा ‘लक्ष्मीनारायणासारखा आहे’ अशासारख्या वाक्प्रचारात तिचा उल्लेख होत असे. लक्ष्मीची कधी द्विभुज, कधी चतुर्भुज तर कधी अष्टभुज अशी निरनिराळी रूपे पहायला मिळत होती. त्यातल्या महालक्ष्मी या नांवाभोवती एक प्रकारचे गूढ वलय असायचे. नवरात्रातल्या अष्टमीच्या रात्री कोणाच्या तरी घरी महालक्ष्मीची पूजा असायची. तिला घरातला बहुतेक स्त्रीवर्ग आवर्जून जात असे. एरवी कुठल्याही देवळात जातांना त्या देवाच्या पाया पडण्यासाठी लहान मुलांना बरोबर नेत असत, पण महालक्ष्मीच्या या पूजेला जातांना मात्र त्यांना घरीच ठेवून जात. त्या रात्री कोणाकोणाच्या अंगात किती आले, तिने कोणकोणते दृष्टांत आणि चमत्कार दाखवले वगैरेवर त्यानंतर खूप चर्चा रंगत असत.  मुलांना त्या चर्चेत सहभाग घ्यायला बंदी असली तरी मोठ्यांचे बोलणे त्यांच्या कानावर पडायचेच. खरे तर ती मोठ्यांचे बोलणे जास्तच लक्षपूर्वक ऐकत असतात. मला हा सगळा प्रकार अगम्य वाटायचा आणि विशेषतः एरवी ज्या महिलांच्या वागणुकीबद्दल फारसे चांगले मत नसायचे त्यांची निवड अंगात येण्यासाठी ही देवी कशाला करेल असा प्रश्न मनात आला तरी तो विचारणे हा अक्षम्य अपराध असे.  मोठेपणी विज्ञानाचा मार्ग धरल्यानंतर आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण वगैरे वाचल्यानंतर असले प्रश्न पडेनासे झाले.

कांही लोकांच्या घरी महालक्ष्मीपूजनाची प्रथा असते.  नवरात्रातील अष्टमीच्या संध्याकाळी ते महालक्ष्मीची मूर्ती तयार करतात. त्यासाठी एका लाकडाच्या ढांच्याला कापडाचे हातपाय जोडून त्याला व्यवस्थित लुगडे चोळी नेसवतात. मस्तकाच्या जागी कापडाच्या पट्ट्या घट्ट गुंडाळून त्याचे योग्य आकाराचे गाठोडे तयार केल्यावर त्यावर उकड थापून त्यात नाक डोळे वगैरे कोरून रंगवतात.  त्या मूर्तीच्या अंगावर अलंकार घालतात. आजकाल हे करण्याचे कौशल्य लुप्त होत गेल्यामुळे धातूचा तयार मुखवटा बसवू लागले आहेत. महालक्ष्मीच्या त्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर कांही स्त्रिया देवीची गाणी गातात आणि इतरजणी आळीपाळीने घागरी फुंकतात. दोन्ही हातांच्या तळव्यावर एक रिकामी घागर पेलून धरून त्या गाण्याच्या तालावर घागरीत जोरजोराने फू फू करत त्या बेभान होऊन नाचत असतात. त्यांचा आवाज रिकाम्या घागरीत घुमून त्यातून एक धुंद करणारा ध्वनी निर्माण होत असतो. अंगातले सारे बळ एकवटून पुरती दमछाक होईपर्यंत चढाओढीने हा कार्यक्रम चालत राहतो. यावेळी पुरुषांना मात्र त्या ठिकाणी जाण्याला पूर्ण मज्जाव असतो. ही प्रथा कधी आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली हे मला न सुटलेले एक कोडे आहे.

हिंदू धर्मातल्या परंपरागत धारणेप्रमाणे एकाच परमेश्वराच्या ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन रूपांकडे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे वाटून दिली आहेत. ती कामे करण्याच्या परमेश्वरी शक्तीच्या तीन मुख्य रूपांना महासरस्वती, महालक्ष्मी आणि दुर्गा अशा संज्ञा दिल्या आहेत. या तीन देवी अनुक्रमे ज्ञान, समृध्दी आणि बल यांची प्रतीके आहेत. त्यानुसार सरस्वतीच्या पूजनाने ज्ञानोपासना सुरू केली जाते आणि ज्ञानवर्धन हीच सरस्वतीची उपासना आहे असे समजले जाते. धनधान्यसंपत्ती वगैरे प्राप्त करण्याच्या हेतूने लक्ष्मीची आराधना केली जाते आणि ज्यांना ती भरपूर प्रमाणात मिळते त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे असे म्हणतात. दुष्टांचे निर्दाळन करण्यासाठी अंगात बळ मिळावे अशी प्रार्थना दुर्गामातेकडे केली जाते. 

त्यातील महालक्ष्मी देवीचे रूप अत्यंत सुंदर दाखवले जाते. तिच्या शांत सोज्वळ मुद्रेवर नेहमी वत्सलतेचा प्रेमळ भाव असतो. कोणालाही अशी आई मनापासून आवडेल. ती नेहमी प्रसन्न होते, कधीही कृध्द होत नाही. फार तर रुसून एकाद्यापासून दूर जाईल, पण त्याला शासन करत नाही. ही समृध्दीची देवता आहे. धर्माचरण म्हणजे वैराग्य, सर्व सुखांचा त्याग वगैरे जी कल्पना कधी कधी पसरवली जाते ती कशी चुकीची आहे हे यावरूनच स्पष्ट होते.  माणसाने अती लोभ धरू नये, मोहाला पडून चुकीची गोष्ट करू नये हे बरोबरच आहे, पण चांगल्या मार्गाने अर्थार्जन किंवा धनसंचय करण्यामुळे माणूस सुखी समाधानी होईल आणि सुखी समाज सुदढ होईल. धर्माचा हाच तर उद्देश आहे. सोनेनाणे तृणवत मानणा-या संतांनीसुध्दा “जोडावे धन उत्तम वेव्हारे” अशीच शिकवण दिली आहे. लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृध्दी, वैभव वगैरे प्राप्त होते या अर्थी त्याला दैवी मान्यता आहे असाच होतो. अशा या देवीच्या अपार वैभवाचे तिच्या एका भक्ताने केलेले वर्णन खालील गीतात दिले आहे.
बसुनि पालखीत, येई मिरवीत, अंबेची स्वारी ।
चालली, जंबुलगिरी मंदिरी ।।

सोन्याची पालखी तियेला, चांदीचे दांडे ।
गाद्या गिरद्या लोड मखमली, जरतारी गोंडे ।
लोडाला टेकून बैसली, अंबा जगदीश्वरी ।।

गर्द भरजरी हिरवा शालू, चोळी बुट्टीदार ।
गोठ पाटल्या तोडे वाकी, नथ लफ्फेदार ।
तियेची, नथ लफ्फेदार ।
रत्नहार कंठात शोभतो, मुकुट मस्तकावरी ।।

वाजंत्र्यांचे ताफे घुमती, सनईचे सुस्वर ।
भक्त नाचती धिंद होऊनी, करिती जयजयकार ।
तियेचा, करिती जयजयकार ।

उदो उदो अंबे उदो उदो उदो उदो .
अंबे तुझिया उदोकारे दुमदुमली नगरी ।।

सप्तशृंगी देवी जगदंबा माता

आदिमायेचे महाराष्ट्रातले चौथे शक्तीपीठ नाशिकजवळील वणी येथे सप्तशृंग नावाच्या डोंगरमाथ्यावर आहे. त्या ठिकाणी कधीकाळी सात शिखरे असावीत असा एक तर्क आहे, तर सह्याद्री पर्वताच्या सात शिखरांमधील भागाला सप्तशृंग असे म्हणत असावेत असा दुसरा तर्क आहे. पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासुर दैत्य फारच माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर चढाई करून देवाधिराज इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करायला गेला. त्या तीघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. त्या वेळेस महिषासुर सप्तशृंगाच्या परिसरात होता. तिथेच जाऊन देवीने त्याचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केल्यामुळे तिला जगदंब हे नांव प्राप्त झाले अशी कथा आहे. महिषासुरमर्दिनीची कहाणी इतर जागी सुध्दा सांगितली जात असल्यामुळे तो नक्की कुठल्या भागात होता ते समजत नाही. कदाचित त्याच्या नावाने आजपर्यंत प्रसिध्द असलेल्या म्हैसूर इथे त्याची राजधानी असेल आणि त्याचा वध दुसरीकडे झाला असेल. सप्तशृंग पर्वत रामायणकाळातील दंडकारण्याचा भाग होता. वनवासात फिरत असतांना श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी येऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले होते असे म्हणतात. ऋषी पराशर आणि मार्कंडेय यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली होती अशा आख्यायिका आहेत.
तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर या तीन्ही शक्तीस्थानांपेक्षा वणी ही जागा मुंबईहून जवळ असली तरी या क्षेत्राबद्दल मी कुणाकडूनच फारसे कधी ऐकले नाही. तिथे जाऊन आलेले लोकही क्वचितच भेटले. नाशिकला गेलेले बहुतेक लोक वेळ मिळाल्यास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन येतात, मीही आलो आहे, पण नाशिकलासुध्दा कुणीच मला वणीला जायचे सुचवले नाही. कदाचित या देवस्थानाला जाण्यासाठी खूप चढून जावे लागते म्हणून तिथे जाण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसावेत. 
माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई ।
सेवा मानून घे आई ।।

तू विश्वाची रचिली माया । तू शीतल छायेची काया ।
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई ।।

तू अमला अविनाशी कीर्ती । तू अवघ्या आशांची पूर्ती ।
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई ।।

तूच दिलेली मंजुळ वाणी । डोळ्यांमधले निर्मळ पाणी  ।
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही ।।

रेणुका माउली

महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांमध्ये माहूर येथील रेणुका माउलीचा समावेश होतो. नांदेड जिल्ह्यात माहुरगड नांवाचा एक किल्ला आहे. इतिहासकाळात या भागाचा कारभार या ठिकाणी असलेला मोगलांचा सुभेदार पहात असे. विष्णूचा सहावा अवतार परशुराम याची आई रेणुका हिचे माहूर हे जन्मस्थान आहे असे सांगतात. परशुरामाचे पिता जमदग्नी हे अत्यंत शीघ्रकोपी ऋषी होते. रेणुका ही तितकीच सात्विक स्वभावाची होती. तिच्या सत्वशीलतेमुळे आणि पुण्याईने तिच्या अंगात विलक्षण सामर्थ्य होते. दररोज सकाळी उठून ती नदीवर जात असे. नदीच्या काठावरील वाळूपासून एक घडा तयार करून त्यात नदीचे पाणी भरत असे आणि नेमाने रोज त्या जागी येणा-या एका सापाची चुंबळ बनवून ती डोईवर ठेऊन त्यावर पाण्याने भरलेला घडा ठेऊन ती आश्रमात परत येत असे. त्या पाण्याने जमदग्नी मुनी आपले अनुष्ठान करत असत.

 
एकदा रेणुका रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा एक समूह त्या जागी जलक्रीडा करत असलेला तिला दिसला. त्या स्त्रीपुरुषांची मौजमस्ती पाहून रेणुकेच्या मनातसुध्दा मोह उत्पन्न झाला आणि तिच्या एकाग्रतेचा भंग झाला. त्यानंतर कितीही प्रयत्न करून ती रेतीपासून घागर बनवू शकली नाही आणि तो सापसुध्दा वळवळत निघून गेला. हिरमुसली होऊन बिचारी रेणुका आश्रमात परत आली. तिला रिक्तहस्त पाहून जमदग्नी ऋषी संतापले आणि “ती सत्वहीन झाली आहे.” असे म्हणत त्याने तिला मारून टाकण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. पहिल्या चार मुलांनी ती मानली नाही. जमदग्नीच्या रागाच्या आगीत ते भस्म होऊन गेले. त्यानंतर बाहेरून परत आलेल्या परशुरामाला त्याने तीच आज्ञा केली. परिस्थितीचे भान ठेऊन त्याने आपल्या हातातल्या परशूने त्याने रेणुकेचा शिरच्छेद केला.  त्याच्या आज्ञाधारकपणावर प्रसन्न होऊन जमदग्नींनी परशुरामाला कोणताही वर मागायला सांगितले. त्यावर त्याने आपल्या भावासहित आईला पुनः जीवंत करण्याची विनंती केली. जमदग्नी ऋषींनी आपल्या तपोसामर्थ्याच्या बळावर ती पूर्ण केलीच, शिवाय रेणुकेचे नांव देवतांमध्ये गणले जाऊ लागून तिची आराधना केली जाणे सुरू झाले. आदिशक्तीच्या इतर सर्व स्थानी तिने एकाद्या असुराचा वध केल्याची कथा असते, तसे रेणुकेच्या बाबतीत नाही.
रेणुकेची ही कथा मी लहानपणापासून एका वेगळ्या संदर्भात ऐकत होतो. उत्तर कर्नाटकात ती यल्लम्मा या नांवाने ओळखली जाते. तिला वाहिलेल्या देवदासी तिची प्रतिमा डोक्यावर घेऊन दारोदार फिरत असतात. सौंदत्ती या गांवी रेणुकेचे (किंवा यल्लम्माचे) मोठे मंदिर आहे. त्या जागी असलेल्या मलप्रभा नदीच्या किनारी जमदग्नीचा आश्रम होता आणि वर दिलेली घटना तिथेच घडली असे त्या भागात सांगितले जाते. यल्लम्मा देवीच्या भक्तांची संख्या कर्नाटकांत खूप मोठी आहे. नांदेडजवळ असलेल्या माहूरच्या जवळपासही कधी जाण्याचा मला योग आला नाही, पण सौंदत्तीचे यल्लम्मागुडी मात्र लहानपणी पाहिले आहे.

रेणुकेलाच महाराष्ट्रात एकवीरा देवी असेही म्हणतात. लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई पुणे रस्त्यापासून अगदी जवळ कार्ल्याची लेणी आहेत. तिथेच एकवीरा देवीचे देऊळ आहे. कोळी समाजात तिचे अनेक भक्तगण आहेत.  “एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी।” हे गाणे झीटीव्हीवरील सारेगमप या कार्यक्रमात खूप गाजले होते.
विष्णुदास या तिच्या भक्ताने केलेली तिची स्तुतीपर रचना खाली दिली आहे.

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।।

जैसे वत्सालागी गाय, जैसे अनाथांची माय, माझी रेणुका ……

हाकेसरशी घाई घाई,  वेगे धांवतची पायी ।

आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, माझी रेणुका ……

खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।

विष्णुदास आदराने, वाका घाली पदराने,  माझी रेणुका …

तुळजा भवानी माता

मी लहानपणी असंख्य वेळा गोष्टीरूपाने शिवचरित्र ऐकले होते, त्यातला भवानीमातेने शिवाजीवर प्रसन्न होऊन त्याला भवानी तलवार दिली आणि तिच्या जोरावर पराक्रम करून ते छत्रपती शिवाजी महाराज बनले, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली वगैरे भाग माझ्या मनावर ठसला होता. आमच्या गांवात भवानीमातेचे असे वेगळे देऊळ नव्हते, ती तुळजापूरला असते एवढेच मोठ्या लोकांकडून ऐकले होते. तिचे दर्शन घेऊन आलेल्यांची संख्या माझ्या ओळखीत त्या काळात तशी कमीच होती.

आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो तेंव्हा तिथल्या स्थानिक साइटसीइंग ट्रिपमध्ये प्रतापगडावर गेलो होतो. त्या ठिकाणी भवानीमातेचे देऊळ आहे. शिवाजीराजांच्या काळात तुळजापूर हे स्थान विजापूरच्या आदिलशाही अंमलाखाली असल्यामुळे तिचे दर्शन घेणे कठीण होते. शिवाय ते यवन राज्यकर्ते तिथल्या देवस्थानाला उपद्रव देत असत. यामुळे त्यांच्या वहिवाटीपासून दूर असलेल्या दुर्गम अशा प्रतापगडावर तिच्या प्रतिमेची स्थापना महाराजांनी केली असावी. भवानीमातेने प्रतापगडावरील याच ठिकाणी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन भवानी तलवार दिली असे कांहीसे आमच्या वाटाड्याने सांगितले. हे मंदिर छानच वाटले. ते अनपेक्षितपणे पहायला मिळाल्यामुळे मला तर जास्तच चांगले वाटले, पण ते आरामात पहायला आमच्याकडे वेळ नव्हता. आम्हाला झटपट देवीचे दर्शन घेऊन लगेच वाटाड्याबरोबर पुढचा पॉइंट पहायला जायचे होते. त्या वेळी आमच्या ग्रुपमधले पर्यटक सोडले तर इतर भाविकांची फारशी गर्दी देवळात नव्हती. कदाचित ती नेहमी दर्शन घेणा-या लोकांची येण्याची वेळ नसेल, दूरदूरहून आलेले यात्रेकरू कांही दिसले नाहीत. आम्हीही त्यावर जास्त विचार करायच्या मूडमध्ये नव्हतो.

पुढे अनेक वेळा तुळजाभवानीचा उल्लेख वाचनात आणि बोलण्यात आला, पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग कांही आला नव्हता. दोन तीन वर्षांपूर्वी एकदा पुण्याहून मुलाचा अचानक फोन आला आणि त्याने वीकएंडला तुळजापूरला जाऊन यायचे ठरवले असल्याचे सांगून आम्हाला यायला जमेल कां ते विचारले. आम्ही तर एका पायावर तयार होतो. “चलो बुलावा आया है, माताने बुलाया है।” असे मनाशी म्हणत बॅगेत दोन कपडे टाकले आणि पुण्याला जाऊन दाखल झालो. सकाळी लवकर उठून आन्हिके आटोपली आणि सोलापूरच्या रस्त्याला लागलो. मी वीसपंचवीस वर्षांपूर्वी यस्टीच्या लाल डब्ब्यातून या रस्त्यावरून गेलो होतो, तेंव्हा पाहिलेले दृष्य आठवत होते, पण त्यात आता बराच फरक झाला होता. रस्ता चांगला प्रशस्त झाला होता आणि त्यावर असलेले असंख्य खळगे बुजले होते. पूर्वी मुख्यत्वे एस्टी बसगाड्या, मालगाड्या आणि जीप दिसल्या होत्या, आता आरामशीर लक्झरी कोच, वातानुकूलित टेंपो आणि अनेक मोटरगाड्या दिसायला लागल्या होत्या. त्यांच्या वेगातही वाढ झाली असल्यामुळे रस्त्यात फारशी गर्दी जाणवत नव्हती. जागोजागी गाड्या अडवून वसूली करणारे टोलनाके मात्र त्रासदायक वाटत होते. पूर्वी वाटेतल्या एस्टीस्टँडवर टिनाच्या टपरीत तिखटजाळ भजी खाऊन बशीत ‘चा’ ओतून प्यालो होतो. आता महामार्गाच्या कडेला आधुनिक फूडमॉल दिसत होते, कांही ढाबेसुध्दा उभे राहिले होते. चहाच्या टपरीभोवती रेंगाळणारे किंवा जमीनीवरच बसकण मारून बसलेले गांवकरी दिसत नव्हते. पागोटी आणि नऊवारी लुगडी जवळ जवळ अद्ष्य झाली होती, गांधी टोप्या आणि धोतरांची संख्या कमी होऊन जीनपँट्सची वाढली होती. मोठ्या संख्येने सलवार कमीज होत्याच, कॅप्रीसुध्दा दिसत होत्या. उजनी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय दिसला. एके काळी पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य असलेल्या रखरखीत दुष्काळी प्रदेशाचा अगदी कायापालट झाला नसला तरी अधून मधून हिरवळ आणि बागायतींचे दर्शन होत होते. हा बदल निश्चितच सुखद होता.

सोलापूर ओलांडून पुढे गेल्यानंतर रस्ता अरुंद झाला तरी चांगलाच होता. मध्ये थोडा खडबडीत भाग लागला तेंव्हा पेंगणारी मंडळी दचकून जागी झाली. थोड्याच वेळात तुळजापूर आलेच. गावात प्रवेश करताच कोणी मुले आली आणि त्यांनी ग्रामपंचायतीची ‘पट्टी’ घेतली. पुढे पहावे तिकडे माणसांचा सागर पसरला होता. त्यात गाडी कुठे उभी करायची आणि देवळात कुठल्या बाजूने प्रवेश करायचा यातले कांहीच समजत नव्हते. तेवढ्यात गळ्याभोंवती उपरणे गुंडाळलेले एक गृहस्थ उगवले आणि “आज फार गर्दी आहे, लाइनीतून दर्शन मिळायला पाच सहा तास तरी लागतीलच” वगैरे माहिती देऊन आम्हाला शॉर्टकटने आत घेऊन जाण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.  दोन लहान लेकरे आणि दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेला आमचा ग्रुप तळपत्या उन्हात उभे रहाण्याचे दिव्य करायचा विचारसुध्दा करणार नाही याची त्याला खात्री होती, शिवाय खाजगी मोटारगाडीतून आलेली पार्टी गबर असणार हे त्याने गृहीत धरून अवास्तव मागणी केली. आम्ही सेलफोनवरून एका अनुभवी नातेवाइकाशी बोलणे केले आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे घासाघीस करून त्याचे पॅकेज ठरवले. माणसांच्या गर्दीतूनच हाडत हुडत करीत त्याने गाडीला पुढे जाण्याची वाट करून तिला आडोशाला नेऊन उभी केली आणि एका आडवाटेने आम्हाला देवळात प्रवेश मिळवून दिला. वाटेत एका जागी एक पाण्याचा नळ होता, पण त्या ठिकाणी उघड्यावर आंघोळ करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. हातपाय धुवून चार शिंतोडे डोक्यावर उडवले आणि पुढे गेलो. या देवीची जेवढी प्रचंड ख्याती ऐकली होती, त्या मानाने देऊळ जरा सामान्य वाटले. वास्तुशिल्पकलेच्या दृष्टीने त्यात भव्य, दिव्य असे फारसे कांही नजरेत भरले नाही. देवळात अफाट गर्दी होती. आम्हाला गाभाऱ्याच्या जवळ रांगेत घुसवले गेले. पुढे जाऊन जेमतेम क्षणभर देवीचे दर्शन मिळाले, त्याने मनाचे पूर्ण समाधान कांही झाले नाही. आमच्या भाग्यात तेवढे तरी होते याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आम्ही पुढे आलो. देवीला वहायचा खण, नारळ, फुलांचा हार, उदबत्ती, नैवेद्य वगैरे सगळ्यांचा अंतर्भाव आमच्या पॅकेजमध्येच होता. उपरणेवाल्याने देवीचा प्रसाद, अंगारा, हळदकुंकू वगैरे आणून दिले आणि बाहेर जाण्याचा रस्ता दाखवून आमचा निरोप घेतला.

श्रीक्षेत्र तुळजापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात असले तरी सोलापूर शहरापासून जास्त जवळ आहे आणि जायला सोयीचे आहे. यमुनाचल नावाच्या टेकडीच्या माथ्यावर ते वसले आहे. तिथली भवानी देवी तुरजा, त्वरजा, तुकाई वगैरे नांवानीही ओळखली जाते. महिषासुर आणि मातंग नांवांच्या राक्षसांचा तिने या जागी संहार केल्याच्या दंतकथा आहेत, पण अशाच दंतकथा आदिशक्तीच्या इतर स्थानीसुध्दा ऐकायला मिळतात. तुळजाभवानीवर श्रध्दा असणा-या भाविकांची संख्या खूप मोठी आहे हे निश्चित.

संपादन दि.१९-१०-२०२०: मी हा लेख दहाबारा वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यानंतर मागच्या वर्षी पुन्हा मोटारीने तुळजापूरला जाण्याचा योग आला. आता पुण्याहून तुळजापुरापर्यंत जाणारा सगळा रस्ता चांगला प्रशस्त झाला आहे आणि वाटेवरील सोयींमध्ये खूप सुधारणा झाली आहे. देवळात येणारी भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे आणि त्यांच्यासाठी केलेल्या सोयीमध्ये पण खूप भर पडली आहे. अपंग भाविकांसाठी खास व्यवस्था केली आहे. त्यामुळे या वेळी आम्हाला चांगला सुखद अनुभव आला. या वेळी आम्ही तिथल्या एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये मुक्कामही केला.

तुळजाभवानीच्या उपासनेमध्ये गोंधळ या पारंपरिक लोकगीताच्या प्रकाराला मोठे महत्व आहे. असाच परंपरागत पण अलीकडच्या काळात रचलेला एक गोंधळ खाली दिला आहे.

————————————————————————————–

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला। अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला।

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी,

आज गोंधळाला ये ….

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं !
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ….

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये। गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं