संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

विठ्ठल किती गावा ? (भाग ४)

VitthalBW

विठ्ठल किती गावा ? (भाग ४)

आपल्याकडे गोरा रंग हे सौंदर्याचे एक महत्वाचे लक्षण समजले जाते, किंबहुना बहुतेक वेळा कोणाचेही सौंदर्य ठरवतांना पन्नास टक्क्यांहून जास्त मार्क रंगाला आणि नाक, डोळे, ओठ, गाल वगैरेंना उरलेले मार्क विभागून दिले जातात असे कधीकधी वाटते. आपल्या मुलासाठी मुलगी पहातांना मुलगा जर गोरा असेल तर त्याला अनुरूप म्हणून गोरी मुलगी हवीच आणि मुलगा काळासावळा असला तरी पुढे त्यांना गोरी मुले व्हावीत असे म्हणून त्याचे आईवडीलसुध्दा गोरीच मुलगी पसंत करतात. यामुळे कृत्रिम गोरेपणा देण्यासाठी अंगाला लावायच्या क्रीम्सच्या जाहिरातींचा सारखा भडिमार होत असतो आणि त्या बाजारात खपतातसुध्दा. गोरेपणाचे एवढे स्तोम माजलेले असले तरी भक्तांचा अत्यंत प्रिय असा विठ्ठल मात्र काळा सावळाच आहे. पंढरपुरातल्या देवळातली विठोबाची मूर्ती काळ्या दगडामधून बनवलेली आहेच, गावोगावी असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरांमध्येही त्या बहुधा काळ्या रंगाच्याच दिसतात. संतांपासून ते आजकालच्या गीतकारांपर्यंत सर्वांनी एकमुखाने ‘या सावळ्या तनूचे’ भरपूर गुणगान केले आहे.

त्याचे सावळे सुंदर रूप सदोदित आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे एवढीच आपली एकमेव इच्छा आहे आणि तिची पूर्तता आपण जन्मोजन्मी मागितली आहे, असे संत तुकाराम महाराजांनी खाली दिलेल्या अभंगात सांगितले आहे. पांडुरंगासारखा दयाळू कुठेही शोधून सापडणार नाही अशी त्याची स्तुती करून आपले एवढेसे मागणे तो सहजगत्या देऊन टाकेल असी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥

स्व.श्रीनिवास खळे यांनी बांधलेल्या गोड चालीवर पं.भीमसेन जोशी यांनी हा सुंदर भजन गायिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=S21sHLDyCF8

माझ्या लहानपणी खूप गाजलेल्या आधुनिक भक्तीगीतांमध्ये सुध्दा सावळ्या विठ्ठलाच्या अनुपम रूपाचे आणि त्याचे दर्शन करताच देहभान हरपून गेल्याच्या अनुभवाचे वर्णन केले आहे. त्याने आपल्यावर कृपा करावी, आपला उध्दार करावा अशी प्रार्थना केली आहे. श्यामलवर्णी विठ्ठलाच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन करून असा लाखात एक पति मिळाल्याबद्दल रखुमाईचे भाग्य किती थोर आहे हे तिलाच उद्देशून तिसऱ्या गाण्यात सांगितले आहे. ही अतीशय गोड आणि अर्थपूर्ण गाणी अनुक्रमे कवी रा.ना.पवार, कवी सुधांशु आणि कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिली असली तरी स्व.दशरथ पूजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनीच ती तीनही गीते गायिली आहेत.

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ।
विसरूनी गेले देहभान ।।ध्रु.।।
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळां ।
दाटला उमाळा अंतरि माझ्या ।
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग ।
तारिले अभंग तूच देवा ।।१।।
जगी कितीकांना तारिलेस देवा ।
स्वीकारी ही सेवा आता माझी ।
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत ।
ठेव शिरी हात पांडुरंगा ।।२।।

कवि रा.ना.पवार, सुमन कल्याणपूर

देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा ।।ध्रु.।।
विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तिचा मळा ।।१।।
साजिरे रुप सुंदर, कटि वसे पितांबर।
कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टीळा ।।२।।
भजनात विठू डोलतो, किर्तनी विठू नाचतो
रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा ।।३।।

कवि सुधांशु , गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=pbVXc5Z7zCA

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।ध्रु.।।
मेघासम जो हसरा श्यामल ।
चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता ।
रूप दिसे ग ठायी ठायी ।।१।।
भक्‍तांचा जो असे आसरा ।
या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे ।
हाकेला ग धाव घेई ।।२।।

कवयित्री शांताबाई जोशी, गायिका सुमन कल्याणपूर
https://www.youtube.com/watch?v=0-AVvTppRhw

स्वरसम्राज्ञी लतादीदींनी गायिलेले गीतकार पी.सावळाराम यांचे एक गाणे माझ्या लहानपणी म्हणजे आकाशवाणीच्या जमान्यात खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्ती संत मीराबाईने केली होती तशी मधुरा भक्ती आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राधेचे उदाहरण दिले आहे. शेवटच्या कडव्यात संत जनाबाईचे उदाहरण देऊन त्या भक्तीमधले आध्यात्मही दाखवले आहे.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।ध्रु.।।
नेत्रकमल तव नित फुललेले ।
प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी ।
मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती ।
प्रसन्‍न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीती ।
अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची ।
गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पुन कंठी मुक्‍तीसाठी ।
अविरत दासी झुरते ।।३।।

कवि पी.सावळाराम, गायिका लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=kg4AODDkqFg
स्व,माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले खाली दिलेले गाणेसुध्दा माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्तीसुध्दा थोडीशी मधुरा भक्ती वाटते.

विठ्ठला रे, तुझे नामी, रंगले मी रंगले मी ।
विठ्ठला रे, रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।ध्रु।।
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।१।।
तुझी सावळीशी कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।२।।
तुझ्या भजनी रंगता, न उरे काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सखया कांता, मोहरते मी रोमरोमी ।।३।।

माणिक वर्मा

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला विठ्ठलाचे अभंग आणि भक्तीगीते यांचे सुरेल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक वेळा त्यातल्या एकाद्या कार्यक्रमाला मी हजेरी लावत असे. याचे मुख्य कारण म्हणजे मला ते अभंग, ती गाणी ऐकायला आवडतात. मला ती का आवडतात हे एक गूढ आहे. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे सुरस वर्णने संतमंडळींनी केली आहेतच, माडगूळकर आणि खेबूडकरांसारख्या आधुनिक गीतकारांनीही केली आहेत. तसा थोडा फार अनुभव आपल्यालाही येतो असे सांगणारी माणसे आपल्याला भेटतात, देवळांमध्ये दर्शनाला आलेल्या काही भाविक लोकांच्या चेहेऱ्यांवर ते भाव उमटलेले दिसतात, पण मला स्वतःला मात्र कधी असा उत्कट अनुभव आला नाही. कुठल्याही देवाचे नाव घेताच गोड मिठाई खाल्ल्याचा भास झाला नाही किंवा त्याच्याकडे पहात असतांना आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीवही राहू नये अशी उन्मन अवस्था झाली नाही. देवाचे नुसते नाव जिभेवर घेतले किंवा त्याचे चित्र डोळ्यांनी पाहिले की पापाच्या राशी जळून जातील आणि पुण्याचे डोंगर उभे राहतील हे ही मला कधी पटले नाही. पण असे असले तरी भजन, अभंग, भक्तीगीते वगैरे गाणी ऐकतांना मला खूप चांगले वाटते आणि मी त्यात इतके समरस होऊन ते गायन ऐकतो की क्वचित कधी तिथल्या श्रोत्यातला एकादा मुलगा किंवा मुलगी जाता जाता माझ्याही पाया पडून जाते.

एका वर्षी मी आषाढी एकादशीच्या सुमाराला पुण्याला असतांना तिथे सुद्धा एक चांगला कार्यक्रम पाहिला होता आणि त्याबद्दल या ब्लॉगवर लिहिलेही होते. पुढच्या वर्षी एकादशीच्या दहा बारा दिवसांपूर्वीच त्यानिमित्याने वाशीला पहिला सांगीतिक कार्यक्रम होऊन गेला. त्या वेळी सादर केली गेलेली गाणी ऐकता ऐकता त्या अनुरोधाने मला आणखी काही प्रसिध्द गाणी आठवत गेली. तेंव्हा त्यांचेच एक संकलन करायचे ठरवले. मराठी भाषेत अशी असंख्य गीते आणि अभंग आहेत, त्यातली माझ्या माहितीतली आणि आवडती अशी काही लोकप्रिय गाणी मी या लेखमालिकेसाठी निवडली.

‘विठ्ठल किती गावा ?’ असे या लेखाचे शीर्षक ठेवले असल्यामुळे ज्या गीतांमध्ये विठोबाच्या गायनभक्तीचा उल्लेख आहे अशी गाणी आणि अभंग पहिल्या भागात निवडले. यात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेली भक्तीगीते होती. संत नामदेवांनी आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले अभंग दुसऱ्या भागात घेतले होते. संत नामदेवांच्या अभंगांमधले तीन विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी आणि तीन त्याच्या नावाच्या उच्चारावर लिहिलेले होते. सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांचे अभंग तिसऱ्या भागात घेतले होते आणि विठ्ठलाला मातेच्या जागी मानून त्याला विठू माउली, विठाबाई वगैरे नावांनी संबोधन करून लिहिलेले अभंग आणि गीते सुद्धा याच भागात घेतली होती. विठ्ठलाच्या सावळ्या पण मनोहर अशा रूपाचे वर्णन करणारे अभंग आणि गीते आणि निरनिराळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांची उरलेली गीते या चौथ्या भागात एकत्र करून मी ही मालिका संपवत आहे.

संतांनी विठोबाला ‘माउली’ असे म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती ‘लेकरे’ झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ असे लिहिले असले तरी ‘नामयाची जनी’ अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित “संत जनाबाईंनी असा विचार केला असेल” अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.

विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।
अनुराधा पौडवाल

संत नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांची विठ्ठलाशी इतकी जवळीक होती की त्याचे गुणगान करणे, दर्शन करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्याच्याशी एकेरीवर येऊन (खोटे खोटे) भांडलेसुध्दा. असेच थोडेसे उद्दामपणाचे वाटणारे गा-हाणे त्यांनी खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यांनी या अभंगात विठ्ठलाला जवळ जवळ जाबच विचारला आहे.

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥१॥
भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचना, काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण, आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा, म्हणे नामा ॥४॥
पं.भीमसेन जोशी

कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदर रीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. ‘उठा उठा हो गजमुख’ यासारख्या पारंपारिक रचना आणि ‘घनःशायामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ यासारख्या ‘अमर भूपाळ्या’ प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।।ध्रु.।।
दारी तव नामाचा चालला गजरू ।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू ।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।।१।।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।।२।।

अजित परब https://www.youtube.com/watch?v=KPNzbc–aL0

स्व.ग.दि.माडगूळकरांनीच लिहिलेले एक अप्रतिम गीत अजरामर झालेले आहे. हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत मला इतके आवडले की या एका गीतातल्या शब्दरचनेच्या मागे दडलेला अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. एक कुंभार आणि त्याने बनवलेली गाडगीमडकी यांच्या रूपकामधून त्यांनी परमेश्वर आणि मनुष्यप्राणी, आत्मा आणि व्यक्तीमत्व यांचे चित्रण या गीतात केले आहे.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।ध्रु.।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा ।
तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत, ना पार ।।१।।
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे ।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।२।।
तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ।
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।३।।

चित्रपट प्रपंच, गायक आणि संगीत सुधीर फडके
https://www.youtube.com/watch?v=EeNd0JJbM-U

स्व.वसंत प्रभू यांचे संगीत दिग्दर्शन आणि कवी पी.सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे. परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुध्दा देव प्रसन्न होतो असा भाव खाली दिलेल्या पहिल्या गाण्यात आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।ध्रु.।।
तुळशी-माळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले, चुकूनिया एक वेळ ।
देव्हार्‍यात माझे देव. ज्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाच माझी होती, वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्‍ती ।
शिकवण मनाची ती, बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला ।।२।।

लता मगेशकर
हे गाणे परंपरागत प्रथांना सरळ सरळ धक्का देणारे असल्यामुळे ते ऐकून लहान मुलांच्या मनांवर ‘वाईट संस्कार’ होतील म्हणून “त्यांना ते ऐकू देता कामा नये” असा विचार करणारे काही वडीलधारी लोक माझ्या लहानपणी होते. पी.सावळाराम आणि वसंत प्रभू याच जोडीने आणलेल्या खाली दिलेल्या गाण्यात तर त्यांच्या मते कहर झाला होता. “पंढरपूर सोडून विठ्ठलाने निघून जावे” असा आग्रह खुद्द रखुमाईच करते असे या गाण्यात म्हंटले आहे. पण गंमत म्हणजे यातल्या कशाचाच काही अर्थ समजून न घेता त्या निमित्याने ‘विठ्ठल’ हे नाव कानावर पडते म्हणून हेसुध्दा ‘देवाचे गाणे’ आहे असे समजणारेही काही लोक त्या काळात होते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला ।
विनविते रखुमाई विठ्ठला ।।ध्रु.।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्‍तजनांचा ।
भक्‍त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।
आशा भोसले

गेले अनेक दिवस पायपीट करून पुढे पुढे जात असलेल्या भक्तजनांच्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरला पोचल्या असतील. भक्तजनांचा इतका मोठा मेळा दर्शनाला येत आहे हे पाहून विठ्ठलाने आणि रखुमाईनेही पंढरपूरामध्येच आपला मुक्काम युगे अठ्ठावीस ठेवला असणार. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे चंद्रभागेचे वाळवंट संकुचित झालेले असले तरी सगळे भक्तजन मिळेल तेवढ्या जागेत झेंडा रोवून हरिनामाचा गजर करत राहतील. याचे वर्णन करणारे एक गाणे मी लहानपणी शिकलो होतो ते असे होते.
विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ।
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला ॥

याच विषयावरचे भारुडाच्या अंगाने जाणारे एक वेगळे गाणे आता उपलब्ध आहे ते असे आहे.

या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥
कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ झेंडा रोविला ।
उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ झेंडा रोविला ।
पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥ झेंडा रोविला ।
https://www.youtube.com/watch?v=wk00gJeEy9s

उद्याच्या आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर इथे जमलेल्या असंख्य भाविकांना इथूनच नमन करून आणि त्यांच्या गजराचा आनंद टेलिव्हिजनवरून पहात ही मालिका आवरती घेत आहे.
. . . . . . . . . . . . . . . .. . (समाप्त)

<—————- मागील भाग ३

विठ्ठल किती गावा ? (भाग ३)

विठ्ठलाला पाहतांना आपली काय अवस्था होते, कसे देहभान हरपून जाते, मन मुग्ध होते वगैरे अनुभव संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहेत. संत तुकाराम आणि संत नामदेवांनीसुध्दा वेगळ्या पध्दतीने असेच काहीसे सांगितले आहे. हे आपण यापूर्वीच्या भागांमध्ये पाहिले. लेखाच्या या भागात इतर संतमंडळींचे अभंग पाहू.

संत एकनाथ महाराज तर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल असे म्हणत पांडुरंगाशी एकरूप झाले होते. विठ्ठल हा वेगळा कोणी नसून आपला अंतरात्मा आहे असे तत्वज्ञान त्यांनी या अभंगात सांगितले आहे. त्या अनुषंगाने भावभक्ती म्हणजे चंद्रभागा नदीतले पाणी, दया क्षमा शांती हे गुण म्हणजे तिच्या तीरावरले वाळवंट, ज्ञान ध्यान पूजा विवेक म्हणजे वाद्याचा नाद, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये हे सगळे मिळून झालेले शरीर म्हणजेच पंढरपूर अशी एकाहून एक वरचढ रूपके त्यांनी या अभंगात दिली आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूर पंढरपुराला जाण्याची गरज नाही. तो या इथे तुमच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने सदैव वास करत असतो असे त्यांना सांगायचे आहे असे दिसते.

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥
हा अभंग  पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजात

संत कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती, पण चिखलातून कमळ उगवावे याप्रमाणे ती वेगळी होती. आईचा पेशा न पत्करता तिने विठ्ठलाची भक्ती केली. या अभंगात तिने विठ्ठलाला आपला सखा म्हणून त्यालाच आपले रक्षण करण्याची विनंती केली आहे.

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥
बालगंधर्वांच्या आवाजात https://www.youtube.com/watch?v=FRAY6avIy9w
नाट्यगीत

“ऊस डॊंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा?” यासारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारा प्रश्न विचारणा-या संत चोखा मेळा यांनी विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपूर नगरीचे वर्णन असे केले आहे. विठ्ठलाचा नामघोष. त्याचे भजन कीर्तन वगैरेंची त्यांनासुध्दा किती गोडी होती हे यात दिसते.
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्‍ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥
श्री.जी एम लोंढे यांच्या आवाजात https://www.youtube.com/watch?v=DEGdQrcqOUc

संत चोखा मेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुध्दा परम विठ्ठलभक्त होती. तिनेही स्वतः सुंदर अभंग लिहिले आहेत, पण त्यांच्या शेवटच्या ओळीत स्वतःचा उल्लेख मात्र चोखियाची महारी असा केला आहे. या काहीशा अपरिचित कवयित्रीचे दोन प्रसिध्द अभंग खाली दिले आहेत. विठोबाचे नाम गायिल्याने संसार सुखाचा होईल, कामक्रोध आदि गळून जातील वगैरे जो उपदेश इतर संतांनी केला होता तोच तिच्या पहिल्या अभंगांमध्येही आहे. विठ्ठलाच्या दर्शनामुळे मीपण गळून पडले, देहभान राहिले नाही वगैरे मनाची उन्मन झालेली अवस्था दुस-या अभंगात वर्णलेली आहे. तेराव्या शतकातल्या संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि संत सोयराबाई या व्यक्ती त्या काळातल्या समाजाच्या तळागाळातल्या समजल्या जात होत्या असे त्यांच्यासंबंधी असलेल्या माहितीत सांगितले जाते. यावरून त्या बहुधा अशिक्षित असाव्यात असे वाटेल, पण हे अभंग पाहिले तर असे दिसते की त्यांनासुध्दा मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत होती आणि त्यांनी चांगल्या साहित्यरचना करून ठेवल्या आहेत.

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Naam

हा दुसरा अभंग किशोरीताईंनी किती अप्रतिम गायिला आहे हे ऐकाच.
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूं पण गेले वाया । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥
किशोरी आमोणकर यांच्या आवाजात

————–
“त्वमेव माता पिता त्वमेव ..” असा एक संस्कृत श्लोक आहे, “तुमही हो माता पिता तुमही हो। …” असे त्याचे हिंदीमधले रूपांतरही प्रसिध्द आहे. “देव हाच आपला माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळे काही असतो.” किंवा “माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळी रूपे घेऊन देवच आपल्या पाठीशी सदैव उभा असतो.” अशी सुवचने ऐकण्यात आणि वाचण्यात येत असतात. सर्वव्यापी असा एकच परमेश्वर या सर्वांमध्ये अभिप्रेत असतो. पण संत नामदेव मात्र त्यांच्या परमप्रिय विठ्ठलाला या सर्व आप्तेष्टांच्या रूपांमध्ये तर पहातातच, शिवाय तीर्थक्षेत्रासारखे ठिकाण आणि देवपूजेसारखा विधी हे देखील खालील अभंगाप्रमाणे त्यांना विठ्ठलमय झालेले दिसतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
पं.भीमसेन जोशी यांनी गायिलेला हा अत्यंत लोकप्रिय अभंग

सर्व विश्वात भरलेला एकच परमेश्वर असला तरी हिंदू धर्मामध्ये त्याची उपासना अनेक नावांनी केली जाते. त्यातही लक्ष्मीनारायण आणि शंकरपार्वती अशा पतिपत्नींच्या काही जोड्या आहेत. त्यांच्यातल्या लक्ष्मी, पार्वती आणि अंबाबाई, भवानी, दुर्गा, काली वगैरे त्यांची रूपे मातेच्या ठिकाणी मानली जातात. भगवान विष्णू, महादेव, मारुती, गणपती आदि पुरुष देवांना कोणी “आई” अशी साद घातलेली सहसा ऐकण्यात किंवा वाचण्यात येत नाही. विठ्ठल हे भगवंताचे रूप मात्र याला अपवाद म्हणावे लागेल. विठोबा हा देवच मुळी त्याच्या भक्तांना फार जवळचा, अगदी घरातल्या व्यक्तीसारखा वाटतो. तो कुठे तरी दूर स्वर्गात, कैलास पर्वतावर किंवा वैकुंठधामामध्ये वास करत नसून त्याच्या भक्तांच्या अगदी जवळपास असतो. घरातल्या माणसांमध्येसुध्दा आईच सर्वांना अत्यंत जवळची असते. यामुळे अनेक संतांनी विठ्ठलाला प्रेमाने आई असे संबोधले आहे.

संत नामदेवांनीच लिहिलेल्या विठोबाच्या आरतीमध्ये त्याला आईच्या रूपामध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आईच्या येण्याची आपण किती आतुरतेने वाट पहात आहोत हे लिहिल्यानंतर विठोबाची स्तुतीही केली आहे. एका अभंगामध्येसुध्दा नामदेवांनी असेच आवाहन करतांना विठ्ठलाला फक्त स्वतःची आई न म्हणता सर्व विश्वाची जननी असे संबोधित केले आहे आणि फक्त स्वतःला येऊन भेटण्याऐवजी सर्व भक्तांचा उध्दार करायला सांगितले आहे.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ३ ॥
पारंपारिक आरती

येई वो विठ्ठले भक्तजनवत्सले। करुणाकल्लोळे पांडुरंगे ।।१।।
सजलजलदघन पितांबरपरिधान । येई उद्धरणे केशिराजे भक्तजनवत्सले ।।२।।
नामा म्हणे तू विश्वाची जननी । क्षीराब्धीनिवासिनी जगदंबे ।।३।।

श्री.सुरेश वाडकर यांच्या गोड आवाजात
स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणा-या संत जनाबाईंनीसुध्दा विठ्ठलाला विठाबाई करून आईचे स्थान दिले आहे. तिला बोलावणे करतांना तिच्यासोबत भीमा आणि चंद्रभागा यांनाही घेऊन येण्याची विनंती जनाबाईंनी केली आहे. आशा भोसले यांनी गायिलेली या अभंगाची ध्वनिमुद्रिका प्रसिध्द असली तरी हा अभंग मी इतर काही सुप्रसिध्ध गायकांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये सुध्दा आळवून आळवून गायिलेला ऐकला आहे.
येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥
माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥
आशा भोसले यांचे अजरामर गीत

चित्रपट या आजच्या युगामधल्या माध्यमातले प्रसिध्द गीतकार स्व.जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या एका गीतामध्ये त्यांनीसुध्दा “विठुमाऊली” अशी साद घालून तिला “तू माऊली जगाची” असे सांगतांनाच आपल्या माउलीत विठ्ठलाची मूर्ती पाहिली आहे.

विठुमाऊली तू माउली जगाची।
माउलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।ध्रु.।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।१।।
लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला मायबापा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची ।
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।२।।

चित्रपट – अरे संसार संसार, संगीत – अनिल अरुण
गायक सुधीर फडके, जयवंत कुळकर्णी, सुरेश वाडकर
https://www.youtube.com/watch?v=0bt66pFaMro

 

<——- मागील भाग २                       पुढील भाग ४ ———>

विठ्ठल किती गावा ? (भाग २ )

विठ्ठल किती गावा ? (भाग २ )

संत तुकाराम महाराजांनी सुध्दा सर्वांगाने विठ्ठलाची भक्ती करण्याचा उपदेश दिला असला तरी वाणीमधून त्याचे गोड नाम घेण्यावर जास्त भर दिला आहे हे यापूर्वीच्या भागात पाहिले. संत नामदेवांचा जास्त भर विठोबाच्या दर्शनावर दिसतो. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त समजले जातात. विठोबा त्यांच्याशी बोलतो, त्यांनी नैवेद्यासाठी दिलेली खीर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो वगैरे कथा प्रसिध्द आहेत. त्यांच्या अभंगांमध्येसुध्दा विठ्ठलाबरोबर असलेली त्यांची सलगी कधी कधी दिसून येते. विठ्ठलाच्या मुखाकडे पाहताच तहान भूक यांचाही विसर पडतो, पाप, ताप, दुःख नाहीसे होऊन जातात, वासना गळून पडतात. त्याला भेटतांना आईच्या कुशीत शिरल्यासारखा आनंद होतो. चकोर पक्षी चंद्राला पाहण्यासाठी आसुसलेला होऊन अत्यंत आतुरतेने त्याच्या उगवण्याची वाट पहात असतो, आकाशात ढग जमलेले पाहून मोराला आनंदाचे भरते येते आणि तो थुई थुई नाचू लागतो, अशाच प्रकारे नामदेवांनाही विठ्ठलाच्या मुखकमलाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेली असते आणि ते होताच त्यांना अत्यानंद होतो असे ते खाली दिलेल्या अभंगात सांगतात.

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

पं.जितेंद्र अणिषेकी

संत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली असायची हे वरील अभंगात त्यांना सांगितले आहे. खालील अभंगात हेच व्यक्त करून विठोबाची भेट झाल्यानंतर काय काय करायचे त्यांनी मनात योजलेले असते त्याचीही यादी ते देतात. विठ्ठलाचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याच्या अंगाला उटी लावून, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे. हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख ।
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१।।
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी ।
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ।।२।।
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा ।
घालू घननीळा आवडिने ॥३।।
नामा म्हणे विठो पंढरीचा राणा ।
डोळिंया पारण होत असे ॥४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pahu_Dya_Re_Maj
विठ्ठलाच्या दर्शनाची इतकी गोडी संत नामदेवांना लागली होती की ते रोज त्रिकाल घेता यावे यासाठी पंढरपूरलाच कायमचे वास्तव्य करावे, फक्त या जन्मातच नव्हे तर जन्मोजन्मी ते करायला मिळावे अशी प्रार्थना ते विठोबाला करतात. पंढरीला रहायचे झाल्यास रोज चंद्रभागा नदीत स्नान, संतमंडळींचे दर्शन आणि विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी त्याचे कीर्तन वगैरे अनेक लाभ त्यातून मिळवता येतील. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाच्या पायरीपाशीच नामदेवांची समाधी आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा विठ्ठलाने मान्य केली असे दिसते. पण संत नामदेव कायम पंढरपूरला राहिले नाहीत, त्यांनी त्या काळात भारतभ्रमण केले, उत्तरेला अगदी पंजाबपर्यंत जाऊन आले आणि त्यांनी सगळीकडे भागवतधर्माचा प्रसार केला असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या कृतींचा समावेश शीखधर्मीयांच्या ग्रंथसाहेबातसुध्दा केलेला आहे. त्याआधी ते पंढरीला केवढे मानाचे स्थान देतात ते या अभंगात लिहिले आहे.

पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
पं.भीमसेन जोशी

पंढरपूरला वास्तव्य करण्याची संत नामदेवांनी विठ्ठलाला मागणी केली होती हे वरील अभंगात स्पष्ट होतेच. पंढरीच्या रहिवाशांना ही संधी मिळत असल्यामुळे ते सगळे पावन झाले आहेत कारण त्यांचे देणे, घेणे, काम करणे वगैरे संपूर्ण जीवन कसे विठ्ठलमय आणि त्यामुळे आनंदमय झालेले आहे, हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.

पंढरीचे जन अवघे पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥
नामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें ।
विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhariche_Jan_Avaghe

संत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक अभंग लिहिलेले आहेतच, त्यांनीही विठ्ठलाच्या नाममहात्म्याबद्दलसुध्दा अभंग लिहिलेले आहेतच. त्यातल्या एका अभंगाला श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या द्वयीने नवीन पध्दतीच्या संगीतामधून खूपच श्रवणीय असे रूप दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥१॥
म्हणा नरहरी उच्‍चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया, प्रेमभावो ॥२॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=gO8A_ivui7s

संत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे, त्याचे नामस्मरण करण्याची खूप इच्छा मनात उफाळली आहे, पण कां कुणास ठाऊक, ते इतस्ततः भरकटते आहे, मनात इतर विकार, वासना वगैरेंनी थैमान मांडले आहे, कधी झोपेची पेंग येते आहे, पण त्यांचे मन विठ्ठलाच्या नामावर एकाग्र होत नाही. यामुळे चिंतित होऊन ते देवालाच विचारतात की “आज माझे मन तुझे गोड नाव का घेत नाही आहे?, मी त्यासाठी आता काय करू?” यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. “केशवा, पंढरीराया” अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा “तुझं नावसुध्दा मनात का येत नाही?” असे नामदेव का म्हणत आहेत ते समजत नव्हते. पण त्याची अतीशय गोड चाल खूप आवडत असल्यामुळे स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेले हे गाणे माझ्या मनात पक्के घर करून बसले आहे. माझ्या लहानपणीच्या टॉप टेन गाण्यात हे अजरामर गीत नक्कीच होते. आजही जुन्या सुगम संगीताच्या काही कार्यक्रमांमध्ये हे गाणे हमखास ऐकायला मिळते.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करु यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्‍ती नामा म्हणे ॥४॥
 माणिक वर्मा  https://www.youtube.com/watch?v=J0ePeuD4pWg

संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारत उभी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हंटले जाते. या संतशिरोमणी तुकोबांनी ज्ञानेश्वरांना “ज्ञानियांचा राजा गुरू महाराव” असे म्हंटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृत भाषेत केलेल्या गीतोपदेशाची सविस्तर उकल मराठी भाषेत केल्याबद्दल “ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता” असे मराठी भाषा म्हणते असे गीतकार स्व.पी.सावळाराम लिहितात. संत ज्ञानदेवांचे ज्ञान, प्रतिभा, कल्पनाशक्ती वगैरे अलौकिक गुणांचा स्पर्श त्यांच्या काव्यरचनांना झालेला जाणवतो.

दृष्टी, ध्वनि, स्पर्श, गंध आणि चंव हे गुण आपल्या ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला समजतात. यांच्या बाबतीत दुसऱ्याला आलेले अनुभव आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट गोष्टींची फक्त कल्पनाच करू शकतो. आपल्या मनातली अमूर्त कल्पना स्पष्टपणे व्यक्त करून ती इतरांना सांगता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण निराकार असा परमेश्वर सामान्य कुवतीच्या माणसाला समजणे फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणारे साधकच त्या संकल्पनेचा विचार करू शकतात. त्या मानाने सोपा असा भक्तीमार्ग संतांनी दाखवला, सर्वसामान्य लोकांना तो पटला आणि त्यांनी त्यानुसार त्याचा अवलंब केला. कोणत्याही दैवतावर भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण साकार रूप असले तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला कसे महत्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले होते याची उदाहरणे आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिली. ही सगळी त्याच्या सगुण रूपाची भक्ती होती.

संत ज्ञानेश्वरांनीसुध्दा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची महती काही अभंगांमधून केली आहे. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे. काही देवळांमधले भजन नेहमी या अभंगापासून सुरू केले जाते. विठ्ठलाचे रूप पाहून खूप आनंद झाला, पूर्वपुण्याईमुळेच विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली असा साधा संदेश त्यांनी या अभंगात दिला आहे.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।
पं.भीमसेन जोशी – https://www.youtube.com/watch?v=jccB-GulANQ

याच कल्पनेचा विस्तार करून हा आनंद मिळवण्यासाठी पंढरपूरला जाऊन त्याला भेटेन, मला माझ्या माहेरी गेल्याचे आणि माहेरच्या मायेच्या आप्तांना भेटण्याचे सुख त्यातून मिळेल, माझ्या पुण्याईचे फळ मला त्यात मिळेल, माझे सारे विश्वच आनंदाने भरून जाईन वगैरे वर्णन त्यांनी खाली दिलेल्या अभंगात दिले आहे.

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avaghachi_Sansar_Sukhacha
मंजुषा कुलकर्णी पाटील – https://www.youtube.com/watch?v=PsEzUrh8O4M

संत ज्ञानेश्वर महाज्ञानी होते, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे त्यांना साध्य होते, पण इतरेजनांसाठी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती करणे शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा त्यांनी पुरस्कार केला. सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे विलक्षण आहेत असे सांगतांना त्याच्या दृष्य (सगुण) रूपाचे कसलेच वर्णन न करता पतितांना पावन करणारा, मनाला मोह घालणारा अशासारखे त्याचे महात्म्य आणि ध्येय, ध्यास, ध्यान वगैरे मानसिक क्रियांमधून चित्ताला भेटणारा असा हा परब्रह्म हे विठ्ठलाचे वर्णन या अभंगात दिले आहे.

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।१।।
पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।२।।
ध्येय ध्यास ध्यान चित्‍त निरंजन ।। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।३।।
ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।४।।
माणिक वर्मा – https://www.youtube.com/watch?v=8n39AGuANEM

संगीताबरोबरच वाङ्मयाचासुध्दा सखोल अभ्यास केलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानदेवांचे काही वैशिष्टपूर्ण असे अभंग निवडले, त्यांचा भावार्थ समजून घेऊन त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लतादीदी व आशाताई यांनी त्या तितक्याच सुरेलपणे गायिल्या. यामधून काही अपूर्व अशी भक्तीगीते तयार झाली आहेत. पं.हृदयनाथ यांच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये यातली एक दोन तरी गीते असतातच. त्यावेळी त्यातल्या गहन अर्थाबद्दल जे निरूपण ते करतात तेसुध्दा त्या मधुर गाण्याइतकेच सुश्राव्य असते. विठ्ठलाचे गुणगान करण्यासंबंधीची त्यातली तीन गाणी खाली दिली आहेत.

घराजवळ कावळा कावकाव करायला लागला तर तो पाहुणा येणार असल्याची पूर्वसूचना देतो अशी एक समजूत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष पंढरीनाथ विठोबाच येणार आहेत अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी खाली दिलेल्या अभंगात रंगवली आहे. त्या विठ्ठलाबद्दल काही तरी सांग, तो कधी येणार आहे, केंव्हा भेटणार आहे हे सांगितलेस तर मी तुला दूधदहीभात खायलाप्यायला देईन, तुझ्या पायात सोन्याचे दागीने घालीन वगैरे लालूच त्याला दाखवतात, आपली आतुरता त्यातून दर्शवतात. या सगळ्यांच्या मागे गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असणार.

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
लता मंगेशकर – https://www.youtube.com/watch?v=fWJbLGI_Jv8

खाली दिलेल्या अभंगात त्यांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून ‘कानडा हो विठ्ठलू’ची मूळ भाषा कानडी होती त्यामुळे पुढे ‘बोलणेच खुंटले’ आणि ‘शब्देविण संवादू’ झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात ‘आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत’ असा आहे. तो नाना तऱ्हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा ‘कानडा हो विठ्ठलू’ आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे. या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच ‘भावसरगम’ या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी ही माहिती सांगितली.

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
आशा भोसले – https://www.youtube.com/watch?v=4lp6WHPA25Y

संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठलाच्या नामाचा घोष, त्याच्या रूपाचे दर्शन वगैरेंमधला आनंद दाखवून दिला. संत ज्ञानेश्वरांनीही तो दाखवलाच, पण खाली दिलेल्या अभंगात ते सांगतात की त्याच्या सान्निध्यामुळे वातावरणात एक अद्भुत सुगंध दरवळला. मला त्यामधून त्याचे आगमन झाल्याचे समजले आणि पुढे होऊन त्याचे दर्शन घेतल्यावर तर माझे देहभान हरपून गेले. हे गोड गाणे लतादीदी आणि किशोरीताई या दोघींनीही गायिले आहे.

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
लता मंगेशकर
किशोरी आमोणकर -https://www.youtube.com/watch?v=URiwSFKeN3s
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

 

<——- मागील भाग १                            पुढील भाग ३ ———>

विठ्ठल किती गावा ? (भाग १)

हा लेख मी चार वर्षांपूर्वी लिहिला असला तरी आजही तितकाच समर्पक आहे. मूळच्या आठ भागांचे एकत्रीकरण करून तो ३-४ भागांमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. 

भाग १

बरोबर पंचावन्न वर्षांपूर्वी जून महिन्यात मी पुण्यनगरीत पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यापूर्वी या शहराबद्दल माझ्या वाचनात थोडे फार आले होते. ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ वगैरे पुण्याची ख्याती होतीच. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आदि थोर पुरुषांची ती कर्मभूमी होती. ना.सी.फडक्यांच्या कादंबऱ्यांमधली वर्णने वाचतांना ते एक रम्य आणि रोमँटिक ठिकाण वाटत होते. “रोज सकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि साधे वरण खाऊन उरलेली पै न पै शिल्लक टाकायची आणि त्या शिल्लकेमधून आयुष्याच्या अखेरीला (त्या काळातल्या गावाबाहेरच्या आणि ओसाड अशा) डेक्कन जिमखान्यावर ‘श्रमसाफल्य’ यासारख्या नावाची एक लहानशी बंगली बांधायची यात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा म्हणजे पुणेकर.” अशा अर्थाचे वाक्य पुलंनी एका ठिकाणी असे लिहिले होते. वाचलेल्या अशा काही वर्णनांमधून पुण्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती. डेक्कन जिमखाना म्हणजे श्रमपरिहार करण्यासाठी नेहमी निवांतपणे आरामखुर्चीवर बसून राहणाऱ्या वृध्दांचा शांत परिसर असावा आणि त्या भागातल्या शाळाकॉलेजांमधली मुले मुली थोडासा गोंगाट करून त्या शांततेचा भंग करीत असावेत अशी त्या भागासंबंधीची एक विचित्र कल्पना माझ्या मनात होती. त्यापेक्षा फारच वेगळे दृष्य मला पहिल्याच दिवशी तिथे पहायला मिळाले.

इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधून निघून जंगली महाराज रोडवरून डेक्कन जिमखान्यापर्यंत फेरफटका मारतांना तो रस्ता माणसांनी तुडुंब भरलेला दिसला. बाजूच्या फर्ग्यूसन रोडवर तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. त्या काळातसुध्दा मुंबई म्हणजे अती गजबजलेले शहर होते, पण मला पुण्यामधली त्या दिवशीची गर्दी कमालीची वाटली. त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की धोतर नेसलेले, कपाळावर गंधाचा टिळा आणि बुक्का लावलेले आणि डोक्यावर पांढरी टोपी किंवा पागोटे धारण केलेले पुरुष आणि नऊ वार लुगडी नेसलेल्या स्त्रिया अशा खेडुतांची संख्या त्यात प्रचंड प्रमाणात होती. डेक्कन जिमखान्यासारख्या पॉश समजल्या जाणाऱ्या भागात मला याची अपेक्षा नव्हती. होस्टेलवरच्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून याचा उलगडा झाला. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून आलेली तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्यांचा त्या दिवशी पुण्यात मुक्काम होता. त्यापूर्वी मला या पालख्यांची माहिती नव्हती. तिथून ते सगळे वारकरी पुढे पायी चालत पंढरपूरला जाणार होते आणि आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोचणार होते. ‘आषाढीकार्तिकी’ला पंढरपुरात ‘चंद्रभागातीरी’ गोळा होणा-या असंख्य ‘भक्तजनां’विषयी मी ऐकले होते, पण तिकडे जायला निघालेल्या भक्तांचा तो पुण्यातच जमा झालेला महासागर पाहून मी चकित होऊन गेलो. त्या गर्दीतले सगळेच भाविक लोक ‘विठूनामा’चा गजर करीत पंढरपूरपर्यंत चालत जाणारे नसले तरी न जाणारे लोक सुध्दा संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने तिथे जमले होते. मागे राहिलेले विठ्ठलभक्तसुध्दा एकादशीच्या दिवशी उपास करणार, घराजवळच्या देवळात जाऊन विठोबाचे दर्शन घेणार, निदान घरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेची भक्तीभावाने पूजा करणार, त्याच्यासमोर अभंगवाणी गाऊन त्याची स्तुती आणि प्रार्थना करणार होते यात शंका नव्हती.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला पंढरीला जाणाऱ्या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत जाते आणि त्याचे नवनवे उच्चांक स्थापित होतात असेच दिसते. इतक्या लोकांच्या मनात हा अमाप भक्तीभाव, ही गाढ श्रध्दा वगैरे भावना कशामुळे उत्पन्न होतात याचा तर्कशुध्द उलगडा मला आजवर झालेला नाही. ज्याला विठ्ठल, विठोबा, विठूराया, पांडुरंग वगैरे अनेक नावांनी त्याचे भक्त आळवतात, विठाई, विठू माउली अशा नावांनीसुध्दा ज्याला संबोधतात, अशा त्या विठ्ठलाचे एवढे जबरदस्त आकर्षण कशामुळे निर्माण होते याबद्दल अनेक संतांनी त्यांच्या रचनांमध्ये सांगून ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या लहानपणापासून ज्या लोकांच्या कानावर हे अभंग पडत गेले असतील, त्यांच्या मनावर त्यांचा अर्थ खोलवर बिंबत गेला असणार, आपल्या परंपराप्रिय समाजात वारीला जाण्याची प्रथा सुध्दा वडिलांकडून मुलाकडे अशी पुढे पुढे चालत राहिली असणार. पण तो उपक्रम नुसताच जुलुमाचा रामराम असता तर पुढल्या पिढीतल्या लोकांनी एकादे निमित्य दाखवून कधीच बंद करून टाकला असता. तसे न करता अधिकाधिक लोक उत्स्फूर्तपणे यात सामील होऊ लागले आहेत, याचा अर्थ त्यातून त्यांना आर्थिक फायदा नसला तरी मानसिक लाभ तरी मिळत असणार.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मुंबईपुण्यासह सगळ्या शहरांमध्ये खास सांगीतिक कार्यक्रम केले जातात. योजना प्रतिष्ठान या संस्थेतर्फे झालेल्या या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला मी ओळीने अनेक वर्षे हजेरी लावलेली आहे. स्व.पं.शिवानंद पाटील, योजनाताई, अजित कडकडे, सुरेश वाडकर, साधना सरगम यासारख्या लोकप्रिय गायकांनी गायिलेले अभंग त्यात ऐकले आहेत. एकादशीच्याच दिवशी या कार्यक्रमाला येणे अनेक प्रेक्षकांना सोयीचे नसल्यास त्याच्या तीन चार दिवश आधीपासून ते ठेवले जातात. या मालिकेतल्या सगळ्याच कार्यक्रमांना सर्व वयोगटांमधल्या श्रोत्यांनी चांगली हजेरी लावली आणि नवोदित कलाकारांच्या गायनाला देखील उत्स्फूर्त दाद दिली.

या विठ्ठलाबद्दल इतिहासकाळामधल्या संतांपासून आजच्या युगातल्या गीतकारांपर्यंत अनेकांनी काय सांगितले आहे याचा अत्यंत त्रोटक आढावा या लेखमालिकेत घेण्याचा एक लहानसा प्रयत्न यंदाच्या वारीच्या निमित्याने मी करणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यासाठी तर विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते. काया, वाचा. मनसा ते सतत त्याचेच ध्यान करत असत. तो त्यांच्या चित्ती वास करत असला तरीसुध्दा त्याचे नाव जिभेवर घेतांना, त्याची गीते गातांना त्यांना अतीशय आनंद वाटत असे. त्यांना लौकिक धनदौलतीचा मोह नव्हताच. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंची वस्त्रालंकारांचा नजराणा भेट म्हणून पाठवला तेंव्हा ही संपत्ती आम्हाला तृणासमान आहे असे म्हणून त्यांनी तो साभार परत पाठवला. विठ्ठलाचे भजन गात असतांना साथीसाठी उपयोगी पडणारे टाळ आणि चिरळ्या त्यांच्यासाठी अनमोल द्रव्यासारख्या होत्या. विठ्ठलाचे नाव घेतल्याने त्यांना अमृताचा घोट घेतल्याप्रमाणे संजीवनी प्राप्त होत असे. त्यातून त्यांच्या सर्वांगाला चैतन्य मिळत असे.

विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठलाची गीते गातांना त्यांच्या अंतरंगात होणारे परिणाम या अभंगात आहेत, तर या गायनभक्तीमुळे सर्वांचाच उध्दार व्हावा यासाठी खाली दिलेल्या अभंगातून ते सगळ्या जनतेला उपदेश करत असतात. विठ्ठलाचे मनात स्मरण करावे, मुखाने त्याची गीते गावीत आणि विटेवर उभे असलेले त्याचे रूप डोळ्यांनी पहावे असे ते सांगतात. हे करण्यामध्ये त्यांचाच फायदा कसा आहे हे पुढील कडव्यांमध्ये दिले आहे. अनाथ लोकांसाठी तो भाऊ होऊन त्यांची काळजी घेतो. हाच आशय जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या अलीकडच्या गाण्यामध्ये आहे. आपला सध्याचा जन्म म्हणजे एक पासिंग फेज आहे. याच्या आधी अनेक जन्म होऊन गेले असतील आणि नंतरही होणार आहेत अशी हिंदू धर्माची परंपरागत शिकवण आहे. संत तुकारामाच्या काळात तर याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान विठ्ठलाला जो कोणी शरण जाईल त्याला तो मुक्ती देईल हे खूपच मोठे आमिष त्यांनी दाखवले आहे. त्याचे नाव घेऊन त्याचे गीत गातांना त्यात तल्लीन होऊन समाधी लागली तर त्या अनुभवामधून तोंड तर गोडावणारच ना ?

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्‍तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

https://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_Giti_Gava

मी जो अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकला होता त्यातल्या गायकाचे अस्पष्ट उच्चार, मायक्रोफोनमधून होणारे डिस्टॉर्शन आणि कदाचित माझ्या ऐकण्यात होणारी गफलत या सगळ्यांचा मिळून असा परिणाम झाला की मला हा अभंग सारखा “विठ्ठल किती गावा” असा ऐकू येत होता. मग मनात विचार आला की संत तुकारामांचे शब्द वेगळे असले तरी निरनिराळ्या संतांनी, कवींनी आणि गायकांनी विठ्ठलाचे गुणगायन किती प्रकारे केले आहे हे सांगणारा एक लेख लिहिण्यासाठी ‘विठ्ठल किती गावा’ हे शीर्षक चांगले आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . .. .. . . . . .. .

५३० संत

आपल्या संतांच्या काळात फोटोग्राफर नव्हते की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या. त्या काळातल्या चित्रकारांनी त्या विभूतींची चित्रे रंगवून ठेवली असली तरी ती आता कुठे असतील कोण जाणे? अलीकडल्या म्हणजे गेल्या शंभर वर्षांमधल्या काळात रंगवलेल्या त्यांच्या तसबिरीच आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. यात संत ज्ञानेश्वर हे बहुधा मांडी घालून बसलेले आणि हातात पोथीचे एक पान धरून ते वाचतांना किंवा काही तरी नवे लिहितांना दिसतात, तर समर्थ रामदासस्वामी हातात कमंडलू घेऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतात. संत तुकारामांनी एका हातात छोटीशी वीणा आणि दुसऱ्या हातात चिपळ्या धरलेल्या दाखवतात. हे चित्र पाहता ते वीणेच्या झंकाराचा सुर आणि चिपळ्यांचा ताल धरून अभंग गात असावेत किंवा “जय जय रामकृष्ण हरी”, “जय जय विठ्ठल रखुमाई” असा नामघोष करत असावेत असे वाटते. विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करणे किती आनंददायी आहे, तसेच लाभप्रद आहे हे तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून सांगितले आहे. “विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥” आणि “विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ॥” या दोन अभंगांबद्दल मी या लेखाच्या वरील भागात लिहिले होते. संतश्रेष्ठ तुकारामांचेच अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय असे आणखी दोन अभंग खाली दिले आहेत.

फक्त वाचेनेच विठोबाचे गोड नाव उच्चारून तिथे थांबू नका, तर शरीराच्या इतर ज्ञानेंद्रियांना आणि मनालासुध्दा त्याचा लाभ घेऊ द्या असे पहिल्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. डोळ्यांनी त्याची मूर्ती पहा आणि ते सुंदर रूप साठवून ठेवा, पण त्यावेळी मन मात्र त्याच्या चरणापाशी लीन झालेले असू दे, आपल्या जिवाचे कान करून विठ्ठलाचे गुणगान लक्षपूर्वक ऐका, असे केलेत तर देहभान हरपून जाईल, जिवाला विठोबापासून दूर होण्याची इच्छा होणार नाही. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पुढल्या काळात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात भक्तांची इतकी गर्दी होईल की कुणालाही त्याच्या पाया पडून एक मिनिटसुध्दा तिथे थांबू दिले जाणार नाही याची त्यांना कल्पना नसेल. देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याने मानवाला डोळे दिले आहेत, त्याचे नाव घेण्यासाठी जिव्हा दिली आहे, ते ऐकण्यासाठी कान दिले आहेत, दान देण्यासाठी हात दिले आहेत वगैरे गोष्टी एका प्रसिध्द हिंदी संताच्या रचनेमध्येसुध्दा सांगितल्या गेल्या आहेत. संत तुकारामांचे सांगणे देखील साधारणपणे असेच आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तिथें धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghei_Ghei_Majhe_Vache

हाच उपदेश तुकारामांनी खाली दिलेल्या अभंगातही केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने, गुणगानाने मनातले काम. क्रोध लोभ आदी षड्रिपू मनातून चालले जातात आणि त्चांनी रिकामी केलेली पोकळी विठ्ठलाने भरली जाते. भक्त विठ्ठलमय होऊन जातो. असे संत तुकाराम या अभंगात सांगतात.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

हा अंभंग पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन सुप्रसिध्द गायक गायिकांनी निरनिराळ्या पध्दतीने गायिला आहे हे या अभंगाचे एक वैशिष्ट्य आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Bolava_Vitthal_Pahava_Vitthal

संत तुकारांमांना स्वर्गलोकी जाऊन तीन साडेतीनशे वर्षे होऊन गेल्यानंतरच्या आजच्या काळातल्या कवींनीसुध्दा विठ्ठलाच्या नामाच्या उच्चारण्याबद्दल गीते लिहिली आहेत. खाली दिलेले गाणे आजच्या काळात लिहिले गेले असले तरी त्यात संतांच्या काळाचेच वर्णन केलेले आहे. “माझा मऱ्हाटाचि बोलू कवतुके। तरी अमृताते पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।” असे आत्मविश्वासाने लिहिणारे संत ज्ञानदेव, “पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग।।” असे सांगणारे संत चोखा मेळा आणि “नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥” अशी भावना बाळगणारे संत नामदेव हे सारे जण पंढरपूरच्या इंद्रायणीकाठी वाळवंटावर गोळा झाले आहेत. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग झाल्याने ते निस्संग होऊन नाचत आहेत आणि त्यांच्यासाठी एकतारीच विठ्ठलाचे गीत गात आहे असे या गाण्यात कवीने लिहिले आहे. कवीच्या कल्पनेमध्ये हे संत प्रत्यक्षात एकाच वेळी पंढरपूरला एकत्र आले आहेत.

एकतारि गाते, गाते गीत विठ्ठलाचे ।
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे ।।
मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ।
ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे ।।
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा ।
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे ।।
अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ ।
भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे ।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ektari_Gate_Geet_Vitthalache

खाली दिलेल्या गीतात कवीने पांडुरंगाचे वर्णन एका विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे. अक्षांश आणि रेखांशाचे आडवे, उभे धागे आहेत अशी कल्पना करून यामधून पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला आहे (विठ्ठलाने अशी रचना केली आहे). अशी वेगळी (भौगोलिक स्वरूपाची) कल्पना कवीने केली आहे. आणि पृथ्वीपुरता विचार करायचा झाल्यास तेच सर्वात पहिले विणकाम असे म्हणता येईल. या गाण्याच्या दुस-या चरणात कवी माणसांच्या जगात येतो. हात आणि पाय ही त्याची कर्मेंद्रिये असली तरी मनाने (किंवा बुध्दीने) दिलेल्या आज्ञांचे ते फक्त यंत्रवत पालन करतात, म्हणून त्यांना मागाची उपमा दिली आहे. माणसांनी मनांमध्ये मने गुंतवून त्याचा बहारदार शेला विणावा, बंधुभावाच्या चरख्यावर एकजुटीचा मजबूत धागा तयार करावा वगैरे सूचना केल्या आहेत. त्यात विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा चांगल्या आचरणावरच जास्त भर दिला आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धी उघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

http://www.youtube.com/watch?v=vNdCT3psfcA
. . . . . . . . . . . . . . . . . . . .

…………   पुढील भाग २

 

अभंग रंग

हा लेख मागल्या वर्षी (२०१२मध्ये) आलेल्या अनुभवावरून तेंव्हा लिहिला होता. या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या निमित्याने इथे चिकटवत आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्य एक छान पहायला आणि मुख्य म्हणजे ऐकायला मिळाला. काणेबुवा प्रतिष्ठान कडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य काणेबुवांच्या शिष्या मंजुषा कुलकर्णी पाटील, किशोरी आमोणकरांचे शिष्य रघुनंदन पणशीकर आणि स्व.जितेंद्र अभिषेकी यांचे चिरंजीव शौनक अभिषेकी या मुरलेल्या गायकगायिकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. तबल्याच्या साथीला पं.विजय घाटे आणि पखवाजवर पं.भवानीशंकर हे गायकांच्यापेक्षाही प्रसिध्द असे आघाडीचे कलाकार होते, सारेगमपवरील अप्रतिम बांसुरीवादनाने घराघरात पोचलेले अमर ओक आणि टाळ या वाद्याच्या वादनामधील एकमेव तज्ज्ञ असलेले प्रख्यात आणि ज्येष्ठ कलाकार माउली टाकळकर हे सुध्दा साथीला होते. हार्मोनियमवर साथसंगत करणारे श्रीराम हसबनीस अजून फार जास्त प्रसिध्द झाले नसले तरी उत्तम वादन करीत होते. इतक्या सगळ्या गुणी कलाकारांनी एकत्र येऊन सादर केलेला हा कार्यक्रम लाजवाब होणारच !

शौनक अभिषेकी यांनी काही श्लोक गाऊन मंगलमय सुरुवात करून जय जय रामकृष्णहरी या नामाचा घोष सुरू केला आणि सभागृहात धार्मिक वातावरण निर्माण केले. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. त्यानुसार मंजुशाने संत ज्ञानेश्वरांच्या अभंगापासून या अभंगरंगाची पारंपरिक पध्दतीने सुरुवात केली.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सर्व विठ्ठलभक्त पंढरपूरच्या यात्रेला जातात. हे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराजांचा अभंग शौनकने सादर केला.

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी । आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥

त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी गायिलेला अभंग मी पूर्वी ऐकलेला नव्हता. यात संत एकनाथांनी नारायणाची विनवणी केली आहे.

अहो नारायणा, सांभाळावे अपुल्या दीना ।।
अमुची राखावा जा लाज, परोपरा हेचि काज ।।
सांभाळावी ब्रीदावळी, दया करुणाकल्लोळी ।।
एका जनार्दनी शरण, करुणाकर पतितपावन ।।

ज्ञानेश्वरांनी पाया रचला, नामदेवांनी ओसरी बांधली, एकनाथांनी खांब उभे केले या क्रमाने महाराष्ट्रातील संतांनी उभ्या केलेल्या मंदिराचा कळस संत तुकारामांनी रचला. त्यांचा एक सुप्रसिध्द अभंग मंजुषाने सादर केला. वाचा, नेत्र, कान, मन वगैरे सर्वांगाने विठोबाची भक्ती करावी आणि त्यात देहभाव हरपून जावे असे संत तुकोबांनी या अभंगात सांगितले आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥

या कार्यक्रमाचे एक संयोजक आणि पुण्याचे उपमहापौर श्री. दीपक मानकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मध्यंतरानंतर त्यांनी एक अलीकडच्या काळातले प्रसिध्द गाणे गाऊन घेतले. संत नामदेवांच्या या अभंगाला पारंपरिक भजनापेक्षा वेगळ्याच प्रकारची चाल लावून संगीतकार श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर या द्वयीने भक्तीसंगीताच्या क्षेत्रात एक वेगळे असे स्थान मिळवून दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥
म्हणा नरहरी उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया ॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥

मध्ययुगात होऊन गेलेल्या संतमंडळींनी पंढरीचे गुणगान केलेले आहेच, पण आजकालच्या युगातले कवी अशोकजी परांजपे यांनी जुन्या काळच्या भाषेत पंढरपूराचे सुंदर वर्णन केले आहे. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर या दोघांनी मिळून हे गाणे फारच सुंदर गायिले.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।ध्रु.।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पेशवाईत होऊन गेलेले शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेली घनःश्यामसुंदरा ही अमर भूपाळी आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला यासारखी गीते शांतारामबापूंनी काढलेल्या चित्रपटातून एका काळात लोकप्रियतेच्या आणि प्रसिध्दीच्या शिखरावर पोचली होती. त्यांनी लिहिलेले एक गाणे पं.सुरेश हळदणकरांच्या आवाजात प्रसिध्द झाले होते. त्यातली शब्दरचना यापूर्वी कधी लक्ष देऊन ऐकलेली नसल्यामुळे आतापर्यंत मी त्याला नाट्यसंगीत समजत होतो. ती गौळण आहे हे आज समजले. मंजुषाच्या गोड आवाजात तिचा अर्थही सुसंगत वाटला आणि समजला.

श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
मथुरेची बारी । पाहू मज हो गिरिधारी ।
विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
पतीभयाने देह रोड । हरि पदरातें सोड ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
आणिल्या गोपि महालासी । होनाजिरायासी ।
जा मुकुंदा सोड रे ॥ हरि पदरातें सोड ॥

मुख्यतः शास्त्रीय संगीतातील आजच्या काळातल्या सर्वश्रेष्ठ गायिका समजल्या जाणा-या किशोरीताई आमोणकरांनी काही अप्रतिम सुगम संगीतही गायिले आहे, त्यात भक्तीसंगीताला महत्वाचे स्थान आहे. त्यांचे शिष्यवर रघुनंदन पणशीकरांनी तुकारामाच्या या अभंगातून किशोरीकाईंची आठवण करून दिली. मंजुषाने गायिलेल्या तुकारामाच्याच घेई घेई माझे वाचे या अभंगात सांगितल्यानुसार आचरण केल्यानंतर भक्ताची काय अवस्था होते, ते या अभंगात सांगितले आहे.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

संत चोखा मेळा यांनी लिहिलेला एक अभंग पं.जितेंद्र अभिषेकी यांनी एका काळी ज्याच्या त्याच्या ओठावर आणला होता. त्यांचे सुपुत्र शौनक यांनी आपल्या दणदणीत आवाजात त्याचा नाद सभागृहात घुमवला.

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥

विठ्ठल हा देव रामदासांना रामच वाटला होता, इतर अनेक संतांनी त्याला निरनिराळ्या रूपात पाहिले. संत तुकारामाच्या एका अभंगात त्यांनी त्याच परमेश्वराची अनेक रूपे दाखवली आहेत.

श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा नारायणा ।।
सकल देवाधिदेवा, कृपाळू, वाली, केशवा ।
महानंदा, महानुभावा, सदाशिवा, सदंगरूपा ।
अगा ये सगुणा, निर्गुणा, जय जगचालिता, जगजीवना ।
वसुदेवदेवकीनंदना, बाळरांगणा, बाळकृष्णा ।
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी ।
हीच करितसे विनवणी, भावबंधनी, सोडवावे ।।

कार्यक्रमाची सांगता मंजुषाने संत कान्होपात्रा यांच्या या प्रसिध्द अभंगाने भैरवी रागात केली.

अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥४।।

सर्वच गायक वादकांनी आपल्या कौशल्याची कमाल करून प्रत्येक अभंगाला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळवली. अमर ओक यांनी बांसुरीवर अप्रतिम साथ दिलीच, शिवाय बहुतेक अभंगामध्ये आपले स्वतःचे सुरेख तुकडे वाजवून रसिकांची वाहवा मिळवली. मिलिंद कुलकर्णी यांचे निरूपण फारच छान होते. अनेक संत आणि अर्वाचीन कवींच्या रचनांमधील ओळींचा संदर्भ देत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते.

बरेच दिवसांनी असा कानाला आणि मनाला तृप्त करणारा कार्यक्रम पहायची संधी मिळाली.
—————————————————————————

पंढरपूरचा विठोबा – भाग १ ते४

मी हा लेख २०१३मध्ये चार भागात प्रकाशित केला होता. ब्लॉगवरील पोस्टांची संख्या मर्यादित करण्याच्या उद्देशाने आणि वाचकांच्या सोयीसाठी हे चारही भाग एकत्र करीत आहे. दि. १३-०३-२०२१

पंढरपूरचा विठोबा – भाग १

माझे आईवडील त्यांच्या पिढीमधील इतर लोकांप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच भाविक प्रवृत्तीचे होते. माझ्या वडिलांच्या मनात पंढरीच्या विठोबाबद्दल अपार श्रद्धा होती. गळ्यात तुळशीची माळ धारण करून ते अधिकृत ‘वारकरी’ झाले नव्हते, पण दरवर्षी न चुकता ते पंढरीची वारी करायचे. नोकरीत सुटी मिळणे शक्य नसल्यामुळे ते पायी चालत जात नव्हते. रेल्वे किंवा बसने प्रवास करून पंढरीला जात असत. त्या सुमारास येणारे रेल्वेमधील अमाप गर्दीचे लोंढे आणि पंढरपुरामध्ये राहण्याखाण्याच्या सुव्यवस्थेचा संपूर्ण अभाव यामुळे होणारे अतोनात हाल सोसण्याची शारीरिक क्षमता आणि मानसिक बळ त्यांच्यापाशी होते. घरातील इतरांना मात्र ते जमणार नाही या विचाराने ते एकटेच पंढरपूरला जाऊन येत असत. पंढरपूर आणि तिथला विठोबा यांचा उल्लेख नेहमी कानावर पडत राहिल्यामुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा तयार झाली होती.

पंढरपूरच्या वारीसंबंधात पूर्वी मी एक लेखमालिका लिहिली होती. निरनिराळ्या संतांनी लिहिलेल्या अभंगवाणीचा त्यात प्रामुख्याने उल्लेख केला होता. त्या वेळी पारंपरिक अभंगांच्या सहाय्यानेच या अजब सोहळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी केला होता. आधुनिक काळातील गीतकारांच्या रचनांमधून या विषयावर पहायचे मी यंदा मनात योजले आहे. ही लेखमाला दोन वर्षांपूर्वीच आनंदघन या माझ्या मुख्य ब्लॉगवर दिलेली होती. ती तयारच असल्यामुळे आता एकादशीचा मुहूर्त साधण्याची वाट पहात न बसता मी आजच या विषयावर लिहायला सुरुवात करणार आहे.

संतांच्या जीवनावर काढलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभंगांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न होत असतोच. शिवाय त्यांना आधुनिक काळातील गीतकारांनी केलेल्या गीतांची जोड दिली जाते. चित्रपटातल्या वातावरणाशी जुळेल अशा भाषेचा उपयोग करून लिहिलेली ही गाणी सुध्दा आपल्याला कित्येक वेळा तीन चारशे वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. दिवसाची सुरुवात मंगल प्रभातसमयी गायिलेल्या भूपाळीने होत असे. त्या परंपरेला धरून श्रीविठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदीमांनी लिहिलेली ही मधुर भूपाळी पहा.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।
दारी तव नामाचा चालला गजरू।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।। आता जाग बा विठ्ठला ।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।। आता जाग बा विठ्ठला ।

विठ्ठलाला जागे करून झाल्यानंतर त्याची मनोभावे पूजाअर्चा करायची, त्याचे गुण गायचे. हे सगळे करतांना मनात कुठेतरी कसले तरी मागणे खदखदत असतेच. सामान्य लोक लगेच ते मागून मोकळे होतात. संत सज्जन त्यांच्या मनावर ताबा ठेवतात. पण कधी हताशपणा आला तर मात्र निरुपायाने त्यांनाही विठ्ठलाचाच धावा करावा असे वाटते. कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांच्याच लेखणीतून उतरलेला हा धावा. भगवंताने पूर्वी कुणाकुणा भक्ताला कशी मदत केली होती यांची उदाहरणे देऊन आपल्या सहाय्यासाठी धावून येण्याची गळ त्यात त्याला घातली आहे.

धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी ।
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी ।।
एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी ।
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसी घडी ।।
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी ।
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिसि उडी ।।

विठ्ठलाचे गुणगान करतांना त्याच्याशी आपले जवळचे नाते जोडण्याचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केला होता. वैकुंठात राहणारा विष्णू किंवा कैलासातल्या शंकरासारखा विठ्ठल दूरस्थ देव नाही. तो आपल्या कुटुंबातलाच आहे. विठोबाच आपले मायबाप, बंधूभगिनी, गुरू वगैरे सर्व काही असल्याचे सांगणारे अनेक प्रसिद्ध अभंग आहेत. याच आशयावर जगदीश खेबूडकर यांनी असे लिहिले आहे.

विठुमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।
काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा ।
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला मायबापा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।
लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला पांडुरंगा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

क्षेत्र पंढरपूर आणि तेथील विठ्ठलरखुमाई ही दैवते यांच्याबद्दलचा भक्तीभाव मधुकर जोशी यांच्या खाली दिलेल्या गीतात दिसतोच, शिवाय वेळ पडताच आपला हा आवडता देव कसा भावाचा भुकेला आहे आणि भक्तांचिया काजासाठी, त्यांच्या प्रेमासाठी धाव घेऊन जातो हेसुध्दा या गीतात सांगितले आहे.

पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई ।
जय जय विठ्ठल रखुमाई ।।
क्षेत्र असे हे परमार्थाचे ।
पावन जीवन हो पतितांचे ।
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी ।।१।।
द्वारावतिचे देवकिनंदन ।
गोरोबास्तव भरती रांजण ।
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी ।।२।।
आसक्तीविण जेथे भक्ती ।
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती ।
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई ।।३।।

पंढरपूरचा विठोबा – भाग २

ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळापासून ते आजपर्यंत विठ्ठलाचे भक्त त्याचे गुणगान आणि प्रार्थना भजने आणि पदे या काव्यमाध्यमातून करत आले आहेत. अलीकडच्या काळातल्या कवींनी रचलेल्या काही रचना पाहू. माझ्या लहानपणी मी ऐकलेले माणिक वर्मा यांचे हे गाणे किती गोड आहे ? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा रूप पाहता लोचनी यासारख्या संतांच्या अभंगातला भाव यात आहेच. हे सांगणारी स्त्री असल्यामुळे जरा जास्त भावुक होऊन त्याच्या स्मरणाने मोहरून गेली आहे.

विठ्ठला रे, तुझ्या नामी रंगले मी, रंगले मी ।
रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।
तुझी सावळी ही कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।
तुझ्या भजनी रंगता, नुरे काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सख्या कांता, मोहरते मी रोमरोमी ।।

कवी सुधांशु यांनी लिहिलेल्या, दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजाने ऩटलेल्या खालील गीताची गोडी अवीट आहे. विठ्ठलाच्या साजि-या गोजि-या रूपाबरोबरच पंढरपूरला जमलेल्या भक्तांच्या मेळाव्याचे वर्णनही या गाण्यात आले आहे. विठोबा हा भक्तांचा जवळचा सखा त्यांच्या सहवासात रंगतो, त्यांच्याबरोबर डोलतो, नाचतो, बागडतो वगैरे त्याची वैशिष्ट्ये यात आली आहेत.

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा ।।
विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा ।।
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर ।
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा ।।
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ।
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा ।।

कवीवर्य बा.भ.बोरकर यांनी पांडुरंगाचे गुणगान एका वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर केले आहे. भक्ती, श्रद्धा यांनी ओथंबलेल्या त्यांच्या मनाला विठ्ठल हा एकाच ओळीत चंदनासारखा शीतल आणि इंधनासारखा ऊर्जस्वी व प्रकाशमान भासतो. अखेरच्या ओळीत ते स्वतःचे अस्तित्वच पांडुरंगात विलीन होऊन त्याच्याशी एकरूप झाल्याचे सांगतात.

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥१॥
दयेचा सागर मायेचे आगर । आनंदाचे घर पांडुरंग ॥२॥
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा । श्रद्धेचा विसावा पांडुरंग ॥३॥
तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन । प्रकाश वर्धन पांडुरंग ॥४॥
अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग । देहीचा साष्टांग पांडुरंग ॥५॥

दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातले कवयित्री शांताबाई जोशी यांच्या गीतात विठोबाचे गुणगान वेगळ्या त-हेने केले आहे. इतक्या सुरेख आणि सर्वांना प्रिय असणा-या विठ्ठलाची रखुमाई झाल्याबद्दल त्यात तिचे कौतुक केले आहे. सर्वसाधारण मनोवृत्ती असलेल्या बाईला असा क्षणात इकडे क्षणात तिकडे जाणारा नवरा मिळाला तर कदाचित वेगळे काही वाटेल, पण ती रखुमाई आहे आणि भक्तांसाठी इकडे तिकडे जात असला तरी तो विठ्ठल तिच्या बाजूला अठ्ठावीस युगे एका विटेवर उभा आहे.

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।
मेघासम जो हसरा श्यामल, चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता, रूप दिसे ठायी ठायी ।।
भक्तांचा जो असे आसरा, ह्या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे, हाकेला ग धाव घेई ।।

पंढरपूरचा विठोबा – ३

पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या गीतकार संगीतकार जोडीने मराठी रसिकांना अप्रतिम गाण्यांचा जो ठेवा देऊन ठेवला आहे त्याला जोड नाही. भावनांनी ओथंबलेली त्यांची अजरामर गाणी आहेतच, विठ्ठल या मराठी माणसाच्या अत्यंत प्रिय देवाची आळवणी करणारी गीतेसुद्धा त्यांनी दिली आहेत. लता मंगेशकरांचे खाली दिलेले अजरामर गीत संत जनाबाई विठ्ठलाला म्हणते आहे की मीराबाई तिच्या गिरधर गोपालाला असा संभ्रम आधी पडतो आणि तिची ही आर्तता मुक्तीसाठी आहे हे शेवटच्या ओळीत वाचल्यावर आपल्याला प्रेमभावनेतून थेट अध्यात्माकडे नेते.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।
नेत्रकमल तव नित फुललेले, प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी, मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीति, अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची, गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पून कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते ।।३।।

आशाताईंनी गायिलेल्या खालील लोकप्रिय गीतात पांडुरंगाचे वर्णन विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे तर त्या गाण्यात जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे हे सत्यकथन केले आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धिउघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

वरील गीताच्या शेवटल्या ओळीत बंधुत्वाचा पुरस्कार केला आहे. पी.सावळाराम यांच्या मनातल्या सामाजिक बांधिलकीला खालील गाण्यात बहर आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला आलेले बाजारू रूप पाहून रखुमाई इतकी व्यथित झाली आहे की तिला क्षणभरही तिथे रहावेसे वाटत नाही. ख-या भक्तमंडळींना बाजूला सारून भोंदू लोकांनी देवाचा संपूर्ण ताबा घेतला हे तिला असह्य झाले आहे. आपण आता इथून निघूया, तुम्हाला नसेल यायचे तर मला तरी निरोप द्या असे ती विठोबाला काकुळतीने म्हणते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा ।
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।

खालील गाण्यात पी.सावळाराम यांनी पंढरीतील परिस्थितीवर एका वेगळ्या प्रकारे भाष्य केले आहे. देव चराचरात भरलेला असतो, तो सगळीकडेच असतो असे आपण समजतो, तरीही त्याच्या दर्शनासाठी देवळात जातो. पण या गाण्यातली स्त्री असे सांगते की मी असे काही केले नाही, फक्त स्वतः चांगली वागले आणि काय चमत्कार पहा, तोच मला भेटायला माझ्याकडे आला. पुंडलीकाची मातापितासेवा पाहून तर तो स्वर्गातून त्याला भेटायला पंढरपूरला आला होता. त्याचप्रमाणे सद्वर्तनाची कदर करून तोच भक्ताकडे जातो असे या गाण्यात सुचवले आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।
तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ ।
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती ।
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला ।।२।।

देवळात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा मानवतेचे वर्तन हे अधिक धार्मिकतेचे लक्षण असते या विचाराचा पी.सावळाराम यांनी पुरस्कार केला आहेच. आईबाप हे सर्वात मोठे दैवत माझ्याजवळ असतांना त्यांना सोडून पंढरपुराला जायची मुळी मला गरजच नाही. असे खालील गाण्यातली नायिका ठामपणे सांगते.

विठ्ठल रखुमाई परी ।
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी ।
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे ।
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे ।
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे ।
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी ।।१।।
सात समिंदर भरूनी उरली माया आईची ।
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची ।
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची ।
वत्सलमूर्ति माय माउली मानस – देव्हारी ।।२।।
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी ।
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी ।
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी ।
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी ।।३।।

पंढरपूरचा विठोबा – भाग ४

आपापल्या काळात तुफान लोकप्रियता पावलेली आणि मलाही आवडलेली निरनिराळ्या प्रकारची चार गाणी या समारोपाच्या भागात देणार आहे. दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि विठ्ठल शिंदे यांनी पारंपारिक अभंगाच्या धाटणीवर गायिलेल्या पाउले चालती या गाण्यात भक्ताच्या मनःस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या आयुष्यात दारिद्र्याने गांजलेल्या भक्ताची पावले वारीची वेळ आली की आपोआप पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात आणि देवदर्शनाचा प्रसाद घेतल्यानंतर त्याला नवचैतन्य प्राप्त होते, त्याचे उद्विग्न मन शांत होते आणि संसार गोड वाटायला लागतो. असे हे सरळ सोपे भक्तीगीत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ ।।
गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने, पडता रिकामे भाकरीचे ताट ।
आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते, पाहुनिया सारे फिरविती पाठ ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट ।
मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तैसा आणि गोड संसाराचा थाट ।।

विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याने ज्या अनेकांना वेड लावले आहे त्यांच्यात माझासुद्धा समावेश होतो. हे गाणे मी पहिल्यांदा ऐकल्यापासून आजतागायत या गाण्याचा नंबर माझ्या टॉप टेनमध्ये लागत आला आहे. सुधीर फडके यांनी लावलेली चाल आणि दिलेल्या स्वराने ते अजरामर झाले आहेच, पण ग दि माडगूळकरांच्या शब्दरचनेला तोड नाही. जसजसे माझे अनुभवविश्व समृद्ध होत गेले तसतसे मला त्यात जास्त सखोल अर्थ सापडत गेले. याचा शब्दशः अर्थ घेतल्यास विठ्ठल नावाच्या अलौकिक कुंभाराला उद्देशून हे गाणे म्हंटले आहे, त्यात आधी त्याची तोंडभर स्तुती करून अखेर त्याच्या वागण्यामधील विसंगतीचा जाब त्याला विचारला आहे असा अर्थ निघतो. पण हे गाणे रूपकात्मक आहे हे उघड आहे. विठ्ठल म्हणजे तो जगाचा नियंता आणि त्याने तयार केलेली मडकी म्हणजे यातले सारे जीव, विशेषतः माणसे असा त्यातला छुपा अर्थ आहे. जगाचा जेवढा अनुभव येत जाईल त्याप्रमाणे त्या माणसांमधली तसेच त्यांच्या नशीबांमधली विविधता याची उदाहरणे मिळत जातात आणि त्या शब्दांमध्ये दडलेल्या अर्थाच्या अधिकाधिक छटा दिसतात. जास्त विचार केल्यानंतर मला वाटले की हा कुंभार कोणत्याही सृजनशील (क्रिएटिव्ह) कलाकाराचे प्रतीक असू शकतो. गदिमांसारखा कवी किंवा एकादा चित्रकार किंवा नटश्रेष्ठ आणि त्यांच्या रचना यांच्या संदर्भात या गाण्यातल्या ओळींचा वेगळा अर्थ काढता येतो. अखेर अंतर्मुख होऊन विचार केला तर विठ्ठल हा आपला अंतरात्मा आहे आणि आपल्याला तो निरनिराळ्या प्रकारे घडवत आला आहे असेही वाटते. गदिमांना हे सर्व अर्थ किंवा एवढेच अर्थ अपेक्षित होते असे माझे म्हणणे नाही. आणखी कोणी यापेक्षा वेगळे इंटरप्रिटेशन करू शकेल. ही या गाण्याची खुबी आहे आणि त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य त्यात दिसते.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा.
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे,
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

झेंडा या मागील वर्षी येऊन गेलेल्या सिनेमातले अरविंद जगताप यांनी लिहिलेले शीर्षकगीत चांगले गाजले होते. टीव्हीवरील मराठी सारेगमप या मालिकेमुळे जगापुढे आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम या आळंदीच्या भजनगायकाला त्या स्पर्धेचे परीक्षक अवधूत गुप्ते यांनी पार्श्वगायनाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले. खरे तर हे गाणे म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. इथल्या अनुभवाने गोंधळलेला माणूस अखेर आपले गा-हाणे विठ्ठलापुढे मांडून त्यालाच मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. त्यामुळे विठ्ठला अशी त्याला घातलेली साद एवढाच या गाण्याचा विठ्ठलाशी संबंध आहे.

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं … आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला … कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी,
विठ्ठला … कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हे जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती,
विठ्ठला … कोणता झेंडा घेऊ हाती ?

देवकीनंदन गोपाळा या संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटातले विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हे गाणे सर्वच दृष्टीने मनाला भिडणारे आहे. गदिमांनी केलेली उत्कट शब्दरचना, राम कदम यांचे संगीत आणि भारतरत्न पं.भीमसेनजींनी त्यावर केलेली सुरांची बरसात यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे. भैरवी रागातील या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली तर त्याचे आर्त स्वर खूप वेळ मनात घुमत राहतात. या गाण्यात विठ्ठलाचे नामस्मरण नाही की त्याची प्रार्थना नाही की त्याला केलेली विनंती किंवा मागणेही नाही. संत गाडगेबाबांच्या महानिर्वाणाने सर्व संत व्याकुळ झाले आणि प्रत्यक्ष विठ्ठलावर त्याचा एवढा आघात झाला की त्याच्या पायाखालील विटेपर्यंत त्याची कंपने गेली अशी कल्पना गदिमांनी या गीतामध्ये मांडली आहे.

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, राउळीची घाट, निनादली ॥१॥
ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ, इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात, तुका समाधीत, चाळवला ॥३॥
सज्जनगडात टिटवी बोलली, समाधी हालली, समर्थांची ॥४॥
एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत, भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव, निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥
संत-माळेतील मणी शेवटला, आज ओघळला, एकएकी ॥७॥

. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

तुका आकाशाएवढा

विठ्ठलाच्या भक्तीच्या संप्रदायाचा “ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा” असे म्हंटले जाते. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या या कार्याचा प्रसार नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सांवता माळी, सेना न्हावी, एकनाथ प्रभृती अनेक संतांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला. तुकारामांनी आपल्या रसाळ वाणीमध्ये लिहिलेल्या अभंगातून भक्तीमार्ग घराघरात नेऊन पोचवला. त्यांनी रचलेल्या अभंगांची मोठी संख्या, उच्च दर्जा आणि अमाप लोकप्रियता यामुळे ‘अभंग’ हा शब्द ऐकताच तुकारामांचेच नांव लगेच डोळ्यासमोर येते, इतकी “अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची” झालेली आहे.

संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये विषयांची भरपूर विविधता आहे. परमेश्वराची, मुख्यतः विठ्ठलाची भक्ती हा मुख्य उद्देश असला तरी त्यातसुद्धा “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥”, “राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥” आणि “सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे॥” यासारख्या कांही अभंगामध्ये त्या देवाचे वर्णन किंवा स्तुती केली आहे. “घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।”, “विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥” आणि “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥” सारख्या अभंगात त्याच्या नामस्मरणाचा महिमा वर्णिला आहे. “जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥” अशा अभंगात त्याच्या गांवाला जाऊन त्याचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच त्यामुळे नक्की मनाला विसावा मिळेल असे सांगितले आहे. “अगा करुणाकरा करितसे धांवा । या मज सोडवा लवकरी॥” यासारख्या कांही अभंगात काकुळतीला येऊन त्याचा धांवा केला आहे. त्याला भेटण्याची मनाला लागलेली आस आणि त्यामुळे होणारी जिवाची तगमग खालील प्रसिद्ध अभंगात व्यक्त केली आहे.

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥

कन्या सासुराशीं जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा।  केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळे ॥४॥

विठ्ठलाची प्राप्ती झाल्यावर झालेली मनाची उन्मन अवस्था काय वर्णावी?
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो झालें कांहीचिया बाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

विठोबाखेरीज इतर देवांची आराधनासुद्धा तुकारामांनी केली आहे. “ॐकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥” यात गणेशाची तर “कृष्ण माझी माता, तर कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा।।” यात कृष्णाची प्रार्थना केली आहे. विष्णूची स्तुती करतांनाच भागवत धर्माचे मर्म खालील अभंगात विषद केले आहे.
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आइकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥

चांगल्या वागणुकीचा उपदेश करणारे अनेक अभंग आहेत. नरसी महेतांच्या “वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीर परायी जाणे रे।” परदुःखे उपकार करे ते मन अभिमान न आणे रे।।” या सुप्रसिद्ध भजनामधील उपदेश तुकारामांनी “पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥” या अभंगात केला आहे. त्यांच्या खालील अभंगाचा उल्लेख आपल्या नव्या (२००८ मधल्या) राष्ट्रपतींनी आपल्या शपथविधीमध्ये केला होता.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासीं अपंगिता पाही । त्यासी धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी ।  तोचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

पंढरीला जाण्याची इच्छा, त्यासाठी लागलेली अतीव ओढ व्यक्त करून तेथे गेल्यावर काय पहायला मिळेल याचे सुंदर वर्णन “खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ।।” या अभंगात तुकारामांनी केले आहे. पण त्यांना सुद्धा सर्व विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभररूपाची ओळख पटली होती. एका अभंगात ते म्हणतात,
“जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरुनियां ॥ चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सवें माझा ॥” दुसऱ्या एका अभंगात भक्त आणि देव यांचे अद्वैत त्यांनी कोणालाही सहज समजाव्यात इतक्या सुंदर उपमा देऊन दाखवले आहे.

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ॥२॥
जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥३॥
देव देहात देहात, का हो जाता देवळात ॥४॥
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥५॥

भक्तीरसपूर्ण रचना करतांनासुद्धा त्यातील विविध अलंकारांच्या प्रयोगातून आपल्याला तुकारामांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडते. सोप्या शब्दात अगदी रोजच्या जीवनामधील उदाहरणे देत ते आपला मुद्दा किती प्रभावीपणे मांडतात हे आपण वरील कित्येक उदाहरणात पाहिले आहे. त्यांच्या कल्पकतेचा एक आविष्कार खालील अभंगात कसा दिसतो हे पहा. “तुला स्वतःला तुझे महत्व कसे समजणार? ते तर आम्ही भक्तजनच जाणतो.” असे ते देवालाच तऱ्हेतऱ्हेची उदाहरणे देऊन विचारतात.
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
कैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटीं । नाही त्याची भेटी भोगती ये ॥४।।

आजकाल पर्यावरणाला मोठे महत्व प्राप्त झाले असल्यामुळे आपले लक्ष वनस्पतींकडे गेले आहे. निवांतपणा मिळण्यासाठी अनेक लोक चार दिवस शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत जातात. तुकारामांनासुद्धा निसर्गरम्य वातावरण भावत होते. पण या एकांताचा सदुपयोग ते मनन, चिंतन आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी करीत असत. ते म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

तुकाराम महाराजांनी जे लोकांना सांगितले तसेच वर्तन स्वतः केले. ते संसाराचा त्याग करून त्यापासून दूर गेले नाहीत. पण आपला प्रपंच करतांना “जोडावे धन उत्तम वेहारे” अशी सचोटी त्यांनी कठोरपणे पाळली. खरे तर त्यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे त्यांनी फारसे “धन” गोळा केलेच नाही. ते एकदा एका जमीनदाराच्या शेताची राखण करीत असतांना त्या शेतात जनावरे घुसवण्यात आली. तरी देखील विठ्ठलाच्या कृपेने त्यात भरघोस पीक आले. त्यामुळे खजील झालेल्या जमीनमालकाने त्याच्या अपेक्षेहून अधिक आलेले धान्य तुकारामांच्या घरी पाठवून दिले. तुकारामांनी ते सरळ गोरगरीबांना वाटून टाकले. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपल्या सेवकांकरवी त्यांच्या कुटुंबियांसाठी वस्त्राभूषणांचा नजराणा पाठवून दिला. “न बोलावता आपल्या पायाने चालत आलेली ही लक्ष्मी आहे.” असा लंगडा युक्तीवाद न घालता “आम्हाला ती विषासमान आहे.” असे म्हणून त्यांनी तो नजराणा साभार परत करून दिला. अशा कित्येक घटना त्यांची सात्विकता आणि सत्याचा आग्रह दाखवतात.

त्यांचा मत्सर करणाऱ्या सालोमालोमुळे तुकारामांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागला. पण “निंदकाचे घर असावे शेजारी” असे म्हणत त्यांनी तो स्वखुषीने सहन केला. तुकारामाच्या अभंगाची गाथा नदीच्या पाण्यात बुडवून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. इंद्रायणी नदीने स्वतः तिला तारून तुकारामाला ती परत आणून दिली अशी आख्यायिका आहे. “जनमानसाच्या अंतरंगात भिनलेले भाव कागद नष्ट केल्यामुळे नाहीसे होत नाहीत आणि अक्षर वाङ्मय अजरामर होण्यासाठी नश्वर कागदावर अवलंबून नसते.” हा याचा मतितार्थ आहे.

तुकाराम महाराजांना जनसामान्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही किंवा त्याचे आकर्षणही वाटले नाही. त्यांनी अहंकारावर पूर्ण विजय मिळवलेला होता. त्यांना मोठेपणाचा बडेजाव नकोच होता. सगळे लोक आपल्या समृध्दीची मागणी देवाकडे करतांना दिसतात. तुकाराम महाराज त्याच्या उलट लहानपणाचे वरदान देवाकडे मागतात.

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण ।  व्हावे लहानाहून लहान ॥५।।

पण लहान होणे याचा “किडामुंगीसारखे राहणे” असा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. त्याच्या जोडीला इतर अनेक गोष्टींची मागणी त्यांनी देवापुढे ठेविली आहे. “सगळ्या जगाचे भले होवो” असे दान त्यांनी मागितलेले नाही. स्वतःसाठी धनसंपदा तर त्यांना कधीच महत्वाची वाटली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांना मरणोपरांत स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षसुद्धा नको होता. या जन्मातच त्यांना ज्या गोष्टींची गोडी लागली होती त्या ईशभक्ती, संतसंग वगैरे देऊन “मला खुषाल पुन्हा जन्माला घालावे.” असे वरदान त्यांनी देवाकडे मागितले. खालील अभंगांवरून हे स्पष्ट होते.

हेचि मज व्हावी आंस। जन्मोजन्मी तुझा ध्यास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।
चंदभागे स्नान। तुका मागे हेचि दान।।

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,

अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता।।४।।

————————————————————–
ऋणनिर्देश
गेल्या महिनाभरात विठ्ठल आणि संतमंडळीं यासंबंधात लिहितांना संतांनी रचलेल्या अनेक सुंदर रचना मी उद्धृत केल्या आहेत. त्यातील बहुतेक गीते अनेक वेळा ऐकल्यामुळे त्यातील बऱ्याचशा ओळी स्मरणात राहिलेल्या असल्या तरी त्यामधील अचूक शब्दरचना वाचून नीट समजून घेण्यासाठी  ‘आठवणीतील गाणी’ आणि ‘मराठीवर्ल्ड’ या संकेतस्थळांचा भरपूर आधार मला मिळाला. या दोन्ही स्थळांनी लोकप्रिय तसेच कांहीशा अप्रसिद्ध पण उत्कृष्ट गाण्यांचा खजीना मराठी रसिकांसाठी मुक्तहस्ते उपलब्ध करून दिला आहे, तसेच आपल्याला हवे असलेले गाणे शोधण्याची उत्कृष्ट सोय करून दिलेली आहे. त्याबद्ल ही दोन्ही स्थळे चालवणा-या संयोजिकांचा मी शतशः ऋणी आहे. या संकेतस्थलांचे दुवे असे आहेत.

आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/
मराठीवर्ल्ड

संपादन दि.२४-०६-२०१९

 

ज्ञानेश्वर माउली

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्या इतर साहित्यिक रचनांवर कोणताही अभिप्राय देण्याएवढी माझी पात्रता नाही. पं.भीमसेन जोशी, स्व.बाबूजी, मंगेशकर मंडळी यांच्यापासून अजित कडकडे, सुरेश वाडकर वगैरेपर्यंत अनेक गायकगायिकांनी आजवर आपल्या सुस्वर संगीतामधून त्यांचे जे अभंग व ओव्या आपल्या मनावर ठसवल्या आहेत त्यावरूनच त्यातील दिव्यत्वाची प्रचीती येते. ज्ञानेश्वर महाराजांचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी त्याला चमत्कारांचा आधार देण्याची कधीच आवश्यकता नव्हती. विज्ञानामधून सिद्ध झालेल्या निसर्गाच्या नियमांचा भंग करणाऱ्या चमत्कृतीपूर्ण घटना वगळूनसुद्धा ज्ञानदेवांचे जीवनचरित्र अद्भुत म्हणावे लागेल.

जन्माला आल्यापासूनच त्यांची “संन्याशाची मुले” म्हणून हेटाळणी सुरू झाली. लहानपणीच माथ्यावरचे आईवडिलांचे छत्र अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हरपले. मोठा भाऊ निवृत्ती अरण्यात वाट चुकून हरवला. त्याला वाघाने खाल्ले असल्याची आशंका असल्याने तो परत येईल अशी फारशी आशा नव्हती. ज्या समाजाकडून त्यांचा पदोपदी अपमान होत होता त्याच्याकडेच भिक्षांदेही करून बालवयातील ज्ञानदेवांना आपल्या दोन लहान भावंडासह स्वतःचे पोट भरण्यासाठी धडपड करावी लागली. तरीही आपली ज्ञानपिपासा आणि अस्मिता जागृत ठेऊन जेवढे ज्ञान कानावर येत होते, दृष्टीला पडत होते ते त्यांनी ग्रहण करून ठेवले. निवृत्तीनाथ गुरूकडून दीक्षा घेऊन परत येताच ज्ञानेश्वरांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आणि रीतसर शास्त्राभ्यास सुरू केला.

त्या काळात धर्मशास्त्राचे सगळे ज्ञान संस्कृत भाषेमधील ग्रंथात दिलेले होते. पाठांतर करून ते पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेले असले तरी निव्वळ घोकंपट्टी करणाऱ्या लोकांना त्यामागील तत्वांचा बोध होत नव्हता. ते जाणू शकणारे पंडित काशी किंवा पैठण अशा तीर्थस्थळी रहात असत आणि संपर्कसाधनांच्या अभावी त्यांचा विचार घेणे सर्वसामान्य लोकांना अशक्य होत असे. याचा अतिशय दुःखद अनुभव ज्ञानदेवांच्या वडिलांना आला आणि त्यात त्यांचे कुटुंब होरपळून निघाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते ज्ञान लोकांच्या बोलीभाषेत आणणे आवश्यक आहे हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. इतर सर्व धर्मग्रंथांचे सार असे ओळखल्या जाणाऱ्या भगवद्गीतेवर ‘भावार्थदीपिका’ या नांवाचे भाष्य त्यांनी मराठी भाषेत लिहिले. तेच आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखले जाते. त्या काळात हा एक क्रांतिकारक आणि धक्कादायक उपक्रम होता. तो करतांना मूळ गीतेमधील गोडवा किंचितही कमी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. “माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।” एवढा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांचे समकालीन संत नामदेव म्हणतात,

“संस्कृत भाषा जनासी कळेना, म्हणूनि नारायणा दया आली हो ।
देवाजीने परी घेतला अवतार, म्हणति ज्ञानेश्वर तयालागी हो ।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ साराहूनि सार, फोडिले भांडार वैकुंठीचे ।
नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण । तयाचे चरण वंदीन मी ।।”

ज्ञानदेवांनी हा ग्रंथ तर लिहिला पण त्यातील भाव लोकांपर्यंत कसा पोचवायचा हा एक प्रश्न होता. त्या काळात मुद्रण आणि प्रकाशनाची सोय नव्हती. एका पोथीमधील एक एक शब्द काळजीपूर्वकरीत्या सुवाच्य अक्षरात लिहून तिची दुसरी प्रत काढावी लागत असे. त्या पोथीचे दहा जणांच्या समक्ष वाचन केले किंवा कोणी ती तोंडपाठ करून तिचे सार्वजनिक पारायण केले तरच त्यातील मजकूर इतरांना समजत असे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला भावार्थ या पद्धतीने फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकला असता. शिवाय गीतेमधील योगांच्या संकल्पना समाजातील निरक्षर घटकांना कळायला कठीण होत्या. त्यामुळे सर्व समाजाला चटकन समजू शकतील, लक्षात ठेवता येतील अशा सोप्या शब्दात लिहिलेल्या चार ओळींच्या अनेक अभंगांची रचना त्यांनी केली.

“देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेग करीं । वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥”

यासारखे रोज म्हणता येतील असे हरिपाठाचे अभंग त्यांनी सामान्य जनांना शिकवले. “रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी।” यासारखी विठ्ठलाची स्तुती करणारे अनेक अभंग लिहिले. त्याची भक्ती करण्यामध्ये संसाराचे सुखाचा मार्ग आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. एका अभंगात ते सांगतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेवीवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥”

“एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा। वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं। धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥”

यासारख्या अभंगातून “भक्तीमार्ग अगदी सोपा आहे. त्याचे पालन करणे सर्वांना शक्य आहे. ईश्वरप्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या करण्याची गरज नाही.” अशा अर्थाचा उपदेश जनसामान्यांना केला. “जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत” असे सांगून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भजनामध्ये गोडी वाटावी यासाठी “कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥” यासारखी आकर्षक भारुडे लिहिली. “पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥” आणि “रंगा येईं वो येईं, अंगणी । विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ।।” यासारख्या मनोरंजक रचना केल्या. “घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥” यासारख्या विराण्या  रचल्या. इतकेच नव्हे तर मोक्षपट नांवाच्या एका खेळाची संकल्पना त्यांनी दिली. आजकालच्या सापशिडीच्या खेळासारख्या एका पटावरील घरात वेगवेगळ्या पापपुण्यांची नांवे लिहिलेली असत. कवड्या किंवा फांसे टाकून मिळालेल्या दानाप्रमाणे आपली सोंगटी पुढे सरकवत न्यायची. परोपकारासारख्या पुण्यश्लोक घरात पोचल्यास तेथील सोपान चढून वरचे घर गांठायचे आणि चोरीसारख्या पापमय घरात गेल्यास सापाने गिळंकृत केल्यामुळे त्याच्या शेपटीपर्यंत खाली घसरत यायचे असा हा खेळ होता. पापपुण्याच्या खऱ्या कल्पना अगदी खेळता खेळता लोकांच्या मनात मुराव्यात यासाठी केलेला तो अफलातून प्रयत्न होता. आता तो मूळ स्वरूपात फारसा पहायला मिळत नाही.

भक्तीमार्गाचेच थोडे उच्च पातळीवरील वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केलेले आहे.
“समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान ।परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥”

तर थोडे गूढ वाटणारे वर्णन असे आहे.
“इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ।
मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता अति बहरू कळियासी आला ।।१।।
मनाचिये गुंथी गुंफियला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला ।।२।।”

सामान्य लोकांसाठी लिहिलेल्या अभग व ओव्यामधूनसुद्धा त्यांच्या विचारांची उंची कशी दिसते पहा! विठ्ठलाचे दर्शन घडल्यावर मनाला होणारा आनंद ते “अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥” असा व्यक्त करतात तर चंचल मनाला स्थिर राहण्यासाठी ते आवाहन करतात,
“रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥”

ज्ञानेश्वरी लिहितांना प्रारंभी गणपतीची आराधना करतांनासुद्धा सरळसोटपणे  “वक्रतुंड महाकाय” अशी गजाननाच्या शारीरिक वर्णनापासून सुरुवात न करता ते अशी करतात.
“ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥”

सामान्य लोकांना समजायला सोपा असा भक्तीमार्ग त्यांनी दाखवला असला तरी “चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ।” या शब्दात आदि शंकराचार्यांनी सांगितलेले अद्वैत त्यांनी अनुभवलेले होते. निर्गुण निराकार परब्रह्माची ओढ त्यांच्या मनात होती. तशा अर्थाच्या कित्येक रचना त्यांनी केल्या आहेत. खालील रचनांमध्ये ते स्पष्टपणे दिसते.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।  तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति अपणांसकट ।  अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

“कानडा हो विठ्ठलू” या अभंगात ते निराकार विठ्ठलाचे वर्णन करून अखेरीस म्हणतात,
“बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।”

द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारात त्यांना विरोधाभास दिसत नाही. दोन्ही मार्ग आपापल्या जागी योग्यच आहेत असे ते  “तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।  सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।।” या अभंगात सांगतात. तर दुस-या ठिकाणी म्हणतात,
“अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥”

संस्कृत भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना आकलन व्हावे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली याचे जनाबाईसारख्या सुसंस्कृत मनाच्या, सगुणभक्ती आचरणाऱ्या आणि परमात्मज्ञानाची उत्सुकता बाळगणाऱ्या साधकाला खूपच अप्रूप होते. त्यामुळे  असा ज्ञानेश्वर आपला सखा, नातेवाईक असावा असे वाटल्यामुळे ती म्हणते.

ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर ।। १।।
मरोनिया जावे। बा माझ्या पोटा यावे ।। २ ।।
ऐसे करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ।। ३ ।।
जावे वोवाळूनी । जन्मोजन्मी दासी जनी ।।४।।

संतशिरोमणी तुकाराम महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वराच्या श्रेष्ठपणाचे गुणगान असे केले आहे.
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरासी काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळखणे । इतरां तुळणे काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥

राम जनार्दनांनी त्यांची आरती रचली आहे.
आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा । सेविती साधूसंत मनु वेधला माझा ।।
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी ।।
प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मचि केले । राम जनार्दनी, पायी ठकचि ठेले ।।

अशा प्रकारांनी अनेक संतांनी तर ज्ञानेश्वराच्या कार्याचा गौरव केलाच. संतपरंपरेचा जो धर्म होता तोच माझा धर्म आहे असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील कवीश्रेष्ठ ग.दि.माडगूळकरांनी ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांचे देदिप्यमान रूप या गीतामध्ये दाखवले आहे.

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ।
ज्ञानियांचा राजा, भोगतो राणीव, नाचती वैष्णव, मागेपुढे ।
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, कैवल्याचे ।
उजेडी राहिले, उजेड होऊन. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ।

ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात अनेक प्रकारांच्या रचना केल्या. त्यांची अगाध विद्वत्ता, लालित्यपूर्ण शब्दरचना, कल्पनेची भरारी, साध्या सोप्या तसेच गूढ रहस्यमय रचना करण्याची हातोटी वगैरे विविध अंगांनी त्या बहरल्या आहेत हे पाहून मन थक्क होते. हे सगळे करतांना आपण हा एक यज्ञ करीत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली. यातून त्यांना आपला कसलाही स्वार्थ साधण्याची मनोकामना नव्हती. संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो असे पसायदान त्यांनी अखेरीस मागितले आहे.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

“चिंता करतो विश्वाची” असे सांगणारे ज्ञानदेव अवघ्या जगावर प्रेम करीत होते. त्यांनी भोगलेल्या कष्टामुळे आलेल्या कडवटपणाचा लवलेशसुद्धा त्यांच्या स्वभावात आला नाही की त्याची छायासुद्धा त्यांच्या लेखनात डोकावली नाही. “पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद। ” इतक्या सहज भावनेने त्यांनी त्यांना त्रास देणा-या लोकांना क्षमा केली. म्हणूनच आजसुद्धा त्यांचे भक्त त्यांना ‘ज्ञानेश्वर माउली’ या नांवाने संबोधतात.

 

………. संपादन दि.२५-०६-२०१९

विठ्ठल हा कितवा अवतार?

विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची खूप सविस्तर माहिती बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल मात्र थोडा संभ्रम आहे.

दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक समजतात, पण ‘विष्णूचा अवतार’ म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच ‘विष्णूचा नववा अवतार’ मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच ‘बुद्ध’ नांवाचा नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट पाहिला त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले गेले.

भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर येथील जागी आले. नेमका त्या वेळेस पुंडलीक आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता, म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोडा वेळ उभे रहायला सांगितले. पुंडलिकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही नको असे पुंडलीकाने सांगितले. “स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग” असे म्हणताच “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” असे मागणे त्याने मागितले आणि देवाने “तथास्तु” म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.

‘अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक ‘अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही. गौतमबुद्धाने मात्र ‘सिद्धार्थ’ या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते मला माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.

विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, परशुराम, राम, कृष्ण हे अवतारसुद्धा शस्त्रधारी असतात,  पण पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला. विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या अनेक आख्यायिका आहेत. “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” ही मागणी अशा रीतीने पूर्ण होतांना दिसते.

आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला ‘धम्म’च वेगळा मानतात आणि चीन, जपान, श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.