अवघे गरजे पंढरपूर

आषाढी वारीसाठी गांवोगांवातून निघालेल्या दिंड्या, पालक्या यांच्या मार्गक्रमणाविषयीचे वृत्तांत आणि त्यांची क्षणचित्रे गेले कांही दिवस वर्तमानपत्रात व दूरचित्रवाणीच्या सर्व मराठी वाहिन्यांमधून रोज पहायला मिळत होते. या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू आज देवशयनी एकादशीला गांठला गेला. हे सारे वारकरी तर पंढरपूरला पोचलेच, त्याखेरीज रेल्वेगाड्या, बसगाड्या, खाजगी वाहने भरभरून भाविकांनी पंढरपूर गांठले. यासाठी खास गाड्या तर सोडलेल्या होत्याच, पण जेवढी गर्दी डब्यांच्या आंत असेल तेवढीच गाड्यांच्या टपावरदेखील दिसत होती. या वर्षी दहा लाखांवर भाविक या यात्रेला आले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

या सगळ्या लोकांनी काय केले असेल? चंद्रभागेला भरपूर पाणी आलेले आहेच, त्यात डुंबून घेतल्यानंतर जेवढ्या लोकांना जमले असेल तेवढे लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असतील. बाकीच्या लोकांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर करून भीमातीर दुमदुमून टाकले असणार. कवी अशोकजी परांजपे यांनी याचे असे सुंदर वर्णन केले आहे.
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पंढरीला होणारी ही यात्रा गेली सात आठ शतके इतका काळ दरवर्षी भरत आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळातील वारीचे वर्णन करतांना असे म्हंटले आहे.
कुंचे पताका झळकती । टाळ मृदूंग वाजती ।
आनंदे प्रेमे गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ।।
आले हरीचे विनट । वीर वि़ठ्ठलाचे सुभट ।
भेणे झाले दिप्पट । पळती थाट दोषांचे ।।

त्यांचे समकालीन संत नामदेवांनीसुद्धा विठ्ठलाच्या वाऱीकरांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांचे एकमेकांबरोबर वर्तन कशा प्रकारचे असायचे हे संत नामदेवांनी किती छान शब्दांत दाखवले आहे?
एकमेका पुढे लवविती माथे ।
म्हणती आम्हाते लागो ऱज ।।
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी ।
नाचति हरिरंगी नेणती लाजु ।।
हर्षे निर्भर चित्तीं आनंदे डोलती ।
हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ।।

हे सगळे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराज सांगतात.
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।

संत तुकारामांनी म्हंटले आहे.
उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर। ऐसै विटेवर देव कोठे ।।
ऐसे संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे । पंढरी निर्माण केली देवे ।।

अशा या अद्वितीय नगरीला जाऊन विठ्ठलाचे भक्त किती आनंदित होतात आणि काय धमाल करतात याबद्दल तुकोबाराय सांगतात.
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई। नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी। एक एका लागती पायीं रे।। १।।
नाचती आनंद कल्लोळीं। पवित्र गाणे नामावळी रे।
कळिकाळावरी घातली कास। एक एकाहुनी बळी रे।। २।।
गोपीचंदन तुळशीच्या माळा । हार मिरविती गळा रे ।।
टाळमृदुंगघाई पुष्पवर्षाव । अनुपम सुखसोहळा रे ।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी। मूढजन नारी लोका रे ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्ण अभिनाम विसरली जाती । एकएका लोटांगणी जाती रे ।।
निर्मळ चित्ते झाली नवनीते । पाषाणा पाझर सुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।६।।

अशा सोप्या केलेल्या पायवाटेवरून जावे असे वाटून लक्षावधी लोकांनी त्यावरून जाऊन त्या पायवाटेचा हमरस्ता केला आणि नामस्मरणाच्या घोषाने पंढरपूरचे वातावरण दुमदुमून गेले.

पाऊले चालती पंढरीची वाट

पंढरीच्या विठ्ठलाचे गुणगान आणि स्तुती करणारे शेकडो अभंग संतश्रेष्ठांनी लिहिले आहेत आणि भजनाच्या परंपरेतून ते आजही वारकऱ्यांच्या ओठावर आहेत. त्यामधील कांही अभंगांना आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी चाली लावल्या आणि लोकप्रिय गायक गायिकांनी आपल्या गोड गळ्यातून गाऊन ते आपल्या घराघरापर्यंत पोचवले. तीन वेगळ्या स्तरांवरून व्यक्त होणारे विठोबाचे वर्णन त्यांमधील कांही मोजक्या ओळीतून दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखमालेच्या पहिल्या तीन भागात केला होता. भजनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये एक भक्त अभंग ‘सांगतो’, म्हणजे त्यातील एक एक ओळ टाळ व मृदुंगाच्या भजनी ठेक्यावर गातो आणि बाकीचे सर्व टाळकरी ती ओळ तशाच चालीने समूहाने गातात. यामुळे भजनामधील सर्व अभंग त्यांच्या मुखातून वदले जातात. अशा प्रकारे वारंवार ऐकण्या व गाण्यामुळे हळूहळू त्यांना ते अभंग पाठ होतात. त्याचप्रमाणे त्यातील भावसुद्धा त्यांच्या मनाला जाऊन भिडणारच. संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगामध्ये त्यांनी आपल्या मनामधील उत्कट इच्छा व्यक्त केली आहे. खाली दिलेल्या अशा अभंगांतून पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागल्यामुळे हे सारे वारकरी आपली घरदारे सोडून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत सामील होत असतील कां?

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृत स्वप्न सुषुप्त नाठवे। पाहता रूप आनंद साठवे ।।
बाप रखुमादेवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण ।।

होकार आणि नकार अशी दोन्ही उत्तरे या प्रश्नाला देता येतील. आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाप्रचंड रांगा लागतात. त्यात दहा बारा तास उपाशी तापाशी उभे राहून वाट पाहण्याची तपश्चर्या केल्यानंतर विठोबाच्या पायावर क्षणभर डोके टेकवण्याची संधी मिळते. त्या दिवशी पंढरपूरला गेलेल्या लक्षावधी भाविकांच्या मनात ही इच्छा असणार यात शंका नाही. पण त्यांमधील किती वारकरी हे दर्शन घेऊ शकतील हे थोडेसे गणित केले तर लक्षात येईल. अगदी दर सेकंदाला एक एवढ्या भरभर हे वारकरी पुढे सरकत राहिले असे धरले तरी तासाभरामध्ये ३६०० जणांचा नंबर लागेल. पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंतच्या कालात मधील पूजाअर्चांना लागणारा वेळ सोडून उरलेल्या वेळेत फार फार तर चाळीस ते पन्नास हजार भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचे सुख प्राप्त होऊ शकेल. म्हणजे राहिलेले ऐंशी नव्वद टक्के भक्त ते घेऊ शकत नाहीत. हे त्यांना आधीपासून ठाऊक असते. त्यांच्यामधील बहुतेकजण विठोबाच्या देवालयाच्या शिखराचे किंवा पायरीचे दर्शन घेऊनच माघारी जातात. कांही थोडेच लोक पुढे चार पांच दिवस तिथे मुक्काम वाढवून गर्दी कमी झाल्यानंतर देवदर्शन करून घेतात. मात्र प्रत्येक वारकऱ्याने आपल्यासोबत विठ्ठलाची प्रतिमा आणलेली असते. दिवसातून वेळोवेळी तिचे दर्शन घेऊन ते प्रार्थना करतात. अशा प्रकारे त्या प्रतिमेचे दर्शन त्यांना रोज होत असले तरी पांडरंगाच्या पंढरपूर येथील मूर्तीचे दर्शन होऊ शकत नाहीच.

असे जर असेल तर मग ते तर घरी बसूनसुद्धा करता आले असते. त्यासाठी एवढे कष्ट घेऊन उन्हातान्हातून आणि भर पावसातून पंढरपूरपर्यंत पायी चालत जाण्याची काय गरज आहे? त्यांना कशाची आस लागत असेल? असे कोणाला वाटेल. त्यामागे अर्थातच इतर कांही सबळ कारणे असली पाहिजेत. एक तर परंपरेनुसार दरवर्षी वारी करायची हे ठरून गेलेले असते. एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की हे कमिटमेंट पाळावे लागते. दुसरे कारण म्हणजे आपण देवासाठी कांही करतो आहोत या भावनेमध्येच त्यांना एक प्रकारचे समाधान मिळते. महात्माजींनी सांगितल्याप्रमाणे त्यागाविना भक्तीला अर्थ नसतो. आपण देवासाठी कष्ट घेतले तर देव आपली पूर्ण काळजी घेईल अशी श्रद्धा भक्तांच्या मनात असते. मनापासून केलेल्या शारीरिक श्रमाचे त्यांना कांही वाटत नाही. पर्वतांवर ट्रेकवर जाणारे लोक असेच कष्ट करतात ते कशासाठी? त्यातून त्यांना समाधान मिळते म्हणूनच ना?

तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाविकांच्या दृष्टीने तो एक अविस्मरणीय असा सुखद अनुभव असतो. आजकालच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण सतत जगाच्या संपर्कात राहतो. पण पूर्वीच्या काळात एकदा दिंडीबरोबर घर सोडले की परत येईपर्यंत रोजच्या सगळ्या विवंचनापासून मुक्त होऊन दिवसरात्र परमेश्वराचे नामस्मरण आणि संतांचा सहवास यात एका वेगळ्या सात्विक वातावरणात राहण्याचा एक आगळा अनुभव त्यांना मिळत असे. त्यामुळे  दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या खालील गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे आषाढी कार्तिकीच्या वाऱ्यांचे दिवस आले की वारक-यांची पावले आपोआप पंढरीच्या दिशेने पडू लागतात.

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ।।
गांजूनी भारी दु:ख दारिद्र्याने । करी ताणताण भाकरीचे ताट ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा । अशा दारिद्र्याचा होई नायनाट ।।
मनशांत होता पुन्हा लागे ओढ । दत्ता मांडी गोड अंतराचा थाट ।।
पाऊले चालती पंढरीची वाट ।।

हे गाणे यू ट्यूबवर पहा :

 

                                          –  संपादन दि.२३-०६-२०१९

राजस सुकुमार मदनाचा पुतळा

संत ज्ञानेश्वरांनी दाखवलेल्या विठ्ठलाच्या अनाकलनीय अशा ‘कानडा’ रूपाचे आणि संत जनाबाईने कल्पनेने रंगवलेल्या त्याच्या ‘लेकुरवाळ्या’ रूपाचे ओझरते दर्शन पहिल्या दोन भागात घेतल्यावर आता पंढरीच्या विठोबाच्या प्रत्यक्षातील मूर्तीचे वर्णन संतांनी कोणत्या शब्दात केले आहे ते थोडेसे पाहू. माझ्या लहानपणी मी कधीकधी वडिलांच्याबरोबर विठोबाच्या देवळातल्या भजनाला जात होतो. पुरेशी मंडळी जमताच टाळमृदुंगाच्या तालावर “जय विठोबा रखुमाई”चा नामघोष सुरू होत असे. त्याने थोडे वॉर्मिंगअप होऊन एक टेंपो निर्माण झाला की संत तुकारामाच्या “सुंदर ते ध्यान” या अभंगाने भजनाची सुरुवात होत असे. वर्षानुवर्षे, कदाचित पिढ्यानपिढ्या, ही परंपरा तिथे चालत आली होती. श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली आणि लता मंगेशकरांनी गायिलेली या अभंगाची मधुर चाल मी नंतर ऐकली, पण लहानपणी देवळामध्ये ऐकलेली परंपरागत चाल अजून स्मरणात आहे. तो अभंग असा आहे.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।।१।।
तुळशीहार गळां कांसे पितांबर । आवडे निरंतर तेचि रूप ।।२।।
मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजित ।।३।।
तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख । पाहूीन श्रीमुख आवडीने ।।४।।

विठ्ठलाच्या रूपाचे गुणवर्णन करणारा तुकाराम महाराजांचाच दुसरा एक लोकप्रिय अभंग पं.भीमसेनजींनी गायिलेला आहे.

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलीया ।।१।।
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।।२।।
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ।।३।।
कासे सोनसळा  पांघरे पांटोळा । घननीळ सांवळा बाईयांनो ।।४।।
सकळही तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ।।५।।

विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारे हे दोन्ही अभंग वाचून पाहतांना त्याची वस्त्रे, अलंकार, सौंदर्य वाढवणारे लेप वगैरेचे वर्णन आणि ते रूप पाहून तुकारामांना कोणती अनुभूती होते यांचे दर्शन त्यात घडते. विठ्ठलाच्या मूर्तीमधील त्याची मुद्रा तेवढी सांगून ‘सुंदर’ एवढ्या एका शब्दात त्याच्या रूपाचे वर्णन पहिल्या अभंगात केले आहे आणि ‘सूर्यचंद्रांनासुद्धा फिका पाडणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ अशा उपमा आणि विशेषणे दुस-या अभंगात दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे कोणाच्याही वर्णनात त्याचा चेहेरामोहरा, नाकडोळे, अंगकाठी वगैरेबद्दल सांगितले जाते. कपाळ, गाल, जिवणी, हनुवटी वगैरे अधिक बारकाईचा तपशील साहित्यामध्ये आढळतो. त्यावरून त्या व्यक्तीचे चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभे रहावे अशी अपेक्षा असते. कदाचित विठ्ठलाची चिरपरिचित छवी आधीच सर्वांच्या मनात कोरलेली असल्यामुळे तिच्याबद्दल अधिक वर्णन करण्याची आवश्यकता भासली नसावी.

लहानपणीच मी दुस-या एका देवळात भजन ऐकायला जात असे. तिथली परंपरा वेगळी होती. तिथले भजन संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या विठ्ठलाच्या रूपाच्या अभंगाने सुरू होत असे. या अभंगातसुद्धा ‘बरवा’ एवढ्या एका शब्दात सारे वर्णन आले. उरलेल्या सा-या ओळी ज्ञानरायांचा भक्तीभाव दर्शवतात.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।

‘रंगा येई वो ये’ या दुस-या एका रचनेमध्ये संत ज्ञानदेवांनी खालील ओळीत दिल्याप्रमाणे विठ्ठलाचे थोडेसे वर्णन करून पुढे “असशील तसा इकडे धांवत ये” असा त्याचा धांवा केला आहे.
कटी कर विराजित, मुगुट रत्नजडित ।
पीतांबरू कासिला, तैसै य़ेई कां धांवत ।।  

पंढरपूरचा विठोबा हा साक्षात विष्णूच उभा आहे अशी भक्तांची श्रद्धा असल्यामुळे त्याची पाषाणाची मूर्ती कुणी व कधी घडवली वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही. आजचा सर्वसामान्य मूर्तीकार जी मूर्ती कोरतो तिचे ती एक शिल्पकृती म्हणून जे परीक्षण केले जात असेल तशा प्रकारचा विचारसुद्धा देवस्थानांमधील देवादिकांच्या प्रतिमांच्याबद्दल कोणी मनात आणू शकत नाही आणि सौंदर्यशास्त्राचे नेहमीचे मापदंड इथे मुळीसुद्धा लागू पडत नाहीत. दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न करून तिथपर्यंत पोचलेल्या भाविकाच्या मनात आपल्याला हे दुर्लभ दर्शन घडते आहे याचाच इतका परम आनंद असतो की तो दुसरा तिसरा कोणता विचारच करू शकत नाही. “आज मी धन्य झालो” एवढाच विचार त्याच्या मनात येतो.

विठो माझा लेकुरवाळा

आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचण्यासाठी गांवोगांवाहून निघालेल्या वारक-यांच्या दिंड्यांचे वृत्तांत आपण हल्ली रोजच्या बातम्यांमध्ये वाचतो किंवा पाहतो. “मनुष्यबळाचा हा केवढा अपव्यय आहे? या लोकांनी त्याऐवजी कांही उत्पादक काम केले तर त्यांची आणि देशाची संपदा वाढेल.” असा व्यवस्थापकीय विचार पूर्वी माझ्या मनात येत असे. “इतक्या लोकांना आपापल्या घरांतून पंढरपुराला खेचून नेणारी कोणती आकर्षणशक्ती असेल? कोणते बल हे काम करवून घेत असेल? कसली ऊर्जा त्यासाठी उपयोगी पडत असेल?” वगैरे कुतूहलात्मक प्रश्न आता समोर येतात. या गोष्टींचे मूल्य मला न्यूटन आणि जूल्सच्या परिमाणात काढता येणार नसले तरी या संकल्पना मला विज्ञानाच्या अभ्यासातूनच मिळाल्या आहेत. विज्ञानावरील निष्ठा न सोडता समोर येत असलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्यांची उत्तरे शोधण्याचा तोकडा प्रयत्न करावासा वाटतो.

पंढरीच्या विठ्ठलाचे जबरदस्त आकर्षण या भक्तांच्या मनात असते हे उघड आहे. यामुळे या पांडुरंगाची विविध रूपे पहाण्यापासून सुरुवात केली. त्याच्या दर्शनाने माझ्या मनात कोणते तरंग उठतात याला महत्व न देता त्याच्या परमभक्तांनी त्याच्याबद्दल जे सांगितले आहे अशा कांही अजरामर रचना वाचून मला त्यातले जेवढे आकलन झाले ते या पानांवर थोडक्यात देत आहे. चर्मचक्षूंना अनाकलनीय वाटणारे पण मनाला दिव्य तेजाने दिपवणारे असे ‘कानडा विठ्ठलू’चे रूप संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एका अभंगात वर्णिलेले आहे ते मी पहिल्या भागात दिले होते. त्याचबरोबर या ‘कानडा राजा’ने भक्तांसाठी मनुष्यरूप धारण केल्याचे दाखले महाकवि गदिमांनी आपल्या गीतामध्ये कसे दिले आहेत ते दाखवले होते.

अशा स्वरूपाच्या अनेक आख्यायिका प्रसृत आहेत. बालक नामदेवांनी अनन्य भक्तीभावाने अर्पण केलेला नैवेद्य पांडुरंगाने भक्षण केला, चोखामेळ्याला संगत देऊन त्याच्या गुरांचा सांभाळ केला, दामाजीपंतांनी उपाशी गरीबांना सरकारी गोदामामधील धान्य दिले त्याच्या वतीने बादशहाकडे जाऊन त्याची मोहरांमध्ये किंमत मोजली या घटनांचे उल्लेख त्या गाण्यात आहेत. त्याशिवाय जनाबाईला जात्यावर दळण दळायला तर एकनाथांना चंदनाचे खोड उगाळायला विठ्ठलाने मनुष्यरूप धारण करून हातभार लावला असे म्हणतात. शून्यामधून प्रकट होणे आणि कार्यभाग संपल्यावर अदृष्य होऊन जाणे या गोष्टी चित्रपटात पटण्यासारख्या वाटल्या तरी त्या प्रत्यक्षात घडू शकत नाहीत. त्याचा अन्वयार्थ घ्यावा लागेल. “त्या त्या प्रसंगी जे कोणी धांवून आले त्या लोकांमध्ये या संतमंडळींना परमेश्वराचे रूप दिसले.” असे कदाचित म्हणता येईल असे मला वाटते.

बहुतेक वेळा देव आणि त्याचे भक्तगण यांत खूप लांबचे अंतर असते. देवांचे वास्तव्य एक तर कैलास किंवा वैकुंठ अशा त्यांच्या स्वतंत्र स्वर्गलोकांत असते नाहीतर तो निर्गुण, निराकार, अगम्य स्वरूपात चराचरामध्ये भरलेला असतो किंवा भक्ताच्या हृदयात विराजमान झालेला असतो. भक्तांनी ज्याच्याबरोबर अगदी घरातल्या प्रियव्यक्तींसारखी जवळीक दाखवली असा विठोबासारखा दुसरा देव क्वचितच सापडेल. “बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।” असे संत एकनाथ म्हणतात आणि पुंडलीकाला भाऊ तर चंद्रभागेला बहीण मानतात. “विठू माऊली तूं, माऊली जगाची। …. विठ्ठला, मायबापा।” असे आधुनिक काळातील कवी जगदीश खेबुडकर यांच्या गीताचे बोल आहेत. संत जनाबाईने एका अभंगात “ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ।।” अशी साद घातली आहे तर दुस-या अभंगात त्या काळातील सारीच संतमंडळी ही विठोबाची लेकरे आहेत अशी कल्पना करून तो आपल्या बाळगोपाळांना लडिवाळपणे अंगाखांद्यावर घेऊन खेळवतो आहे असे सुरेख कौटुंबिक चित्र रंगवले आहे. अशा रचना गाता गाता इतर भक्तांनासुद्धा त्या माउलीचा लळा लागला तर त्यात काय नवल?

विठो माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।१।।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।।२।।
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ।।३।।
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।।४।।
बंका कडियेवरी । नामा करांगुली धरी ।।५।।
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६।।

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ।।१।।
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।२।।
पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ।।३।।
माझी बहिण चंद्रभागा । करीतसे पापभंगा ।।४।।
एका जनार्दनी शरण । करी माहेराची आठवण ।।५।।

ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ।।१।।
भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ।।२।।
इतुक्यासहित त्वां बा यावे । माझे अंगणी नाचावे ।।३।।
माझा रंग तुझे गुणी । म्हणे नामयाची जनी ।।४।।

कानडा हो विठ्ठलु

 

आज आषाढी एकादशीनिमित्य हा लेख.

पांडुरंगकांती दिव्यतेज झळकती। रत्नकीळ फांकती प्रभा ।।१।।
अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथची शोभा।।२।।
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू। येणे मज लावियला वेधू।।३।।
खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी। आळविल्या नेदी सादु।।४।।
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे।।५।।
परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे।।६।।
पायां पडू गेले तंव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे।।७।।
समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे।।८।।
क्षेमालागी मन उतावीळ माझे। म्हणवोनी स्फुरताति बाहो।।९।।
क्षेम देऊं गेले तंव मीचि मी एकली। आसावला जीव राहो।।१०।।
बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।११।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।१२।।

संत ज्ञानेश्वरांचा हा अजरामर अभंग आशा भोसले यांच्या आवाजात सर्वांनीच ऐकला असेल. त्यामधील ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू ‘ या ओळीमुळे विठ्ठल हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले की काय असे कांही लोकांना कदाचित वाटेल. पंढरपूरपासून कर्नाटकाची सीमा तशी जवळच आहे. सीमेपलीकडील उत्तर कर्नाटकामध्येसुद्धा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने आहे. ‘विठोबा’, ‘पांडुरंग’ ही नांवे तिकडे सर्रास ठेवली जातात. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपी येथे विठ्ठलाचे सुरेख देऊळ तेथील राजाने बांधले होते. पंढरीच्या विठ्ठलाने तेथे वास्तव्य केले होते अशा आख्यायिका तिकडे प्रसृत आहेत. कर्नाटकातील संत पुरंदरदास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्य़ा प्रत्येक पदाचा शेवट ‘पुरंदरविठ्ठला’ या शब्दांने होतो. हे सगळे खरे असले तरी वर दिलेल्या ज्ञानदेवांच्या अभंगामधील ‘कानडा’ या शब्दातून मात्र वेगळा अर्थ निघतो.

मी असेही ऐकले आहे की ‘कानडा’ हा शब्द श्रीकृष्णाच्या ‘कान्हा’ या नांवावरून आला असावा. विठोबाची ‘रखुमाई’ म्हणजे ‘रुक्मिणी’ हे तर उघड आहे. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे तर पांडुरंग हे विष्णूचेच रूप आहे. भक्त पुंडलीकाला दर्शन देण्यासाठी तो अवतीर्ण झाला त्या वेळी पुंडलीक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता. ती अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला भेटायलासुद्धा तो तयार नव्हता. पण आलेल्या पाहुण्याचे स्वागत तर केले पाहिजे. त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाट किंवा सतरंजी तो कोठून आणणार? त्याने जवळच पडलेली एक वीट श्रीविष्णूच्या दिशेने भिरकावून दिली आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली. त्या विटेवर उभा राहून तो ‘विठ्ठल’ झाला तो कायमचाच अशी त्याची कथा आहे. म्हणजे विष्णू या शब्दाचा विष्टू, इट्टू, विठू, विठोबा असा अपभ्रंश होत गेला किंवा विटेवरचा म्हणून तो विठ्ठल झाला असेल. विष्णू म्हणजेच कान्हा आणि त्यावरून कानडा हे नांव आले अशी उपपत्ती कोणी सांगितली. परंतु या अभंगाची रचना करतांना ज्ञानराजांना मात्र हा अर्थसुद्धा अभिप्रेत नव्हता.

या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच ‘भावसरगम’ या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी थोडी माहिती सांगितली. ‘कानडा हो विठ्ठलू’ची भाषा कानडी होती त्यामुळे पुढे ‘बोलणेच खुंटले’ आणि ‘शब्देविण संवादू’ झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात ‘आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत’ असा आहे. तो नाना त-हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूपे विलक्षण असतात. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात,  त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा ‘कानडा हो विठ्ठलू’ आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे.

“ज्ञानियाचा वा तुक्याचा तोचि माझा वंश आहे।” असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील महाकवी ग.दि.माडगूळकरांनी त्यांच्या शब्दात पंढरीच्या या ‘कानडा राजा’चे वर्णन “वेदांनाही नाही कळला अंतपार याचा” असे केले आहे. निर्गुण निराकार अशा ईश्वराने कंबरेवर हात ठेवलेले सावळे सुंदर मनोहर रूप तर घेतलेच, त्याशिवाय वेळोवेळी आपल्या भक्तांच्या जीवनात विविध रूपे घेऊन तो कसा सामील झाला याचाही थोडक्यात उल्लेख या गीतामध्ये गदिमांनी केला आहे.

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।
कानडा राजा पंढरीचा।।

निराकार तो निर्गुण ईश्वर। कसा प्रकटला असा विटेवर।
उभय ठेविले हांत कटीवर। पुतळा चैतन्याचा।।१।।

परब्रम्ह हे भक्तांसाठी। मुके ठाकले भीमेकांठी।
उभा राहिला भाव सावयव। जणु की पुंडलिकाचा ।।२।।

हा नाम्याची खीर चाखतो। चोखोबाची गुरे राखतो।
पुरंदराचा हा परमात्मा। वाली दामाजीचा।।३।।