श्रीकृष्णाच्या चरित्रावरील लोकप्रिय गीते

आज गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी आहे. कृष्ण हा हिंदू धर्मीयांचा अत्यंत लाडका आणि मनाजोगा देव असल्यामुळे हा सण भक्तीभावाने म्हणण्यापेक्षा उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. काही लोकांच्या घरी हा आनंदोत्सव आठवडाभर साजरा केला जातो. गणेशोत्सव किंवा नवरात्राप्रमाणे या सात आठ दिवसात कृष्णाच्या मूर्तीची सजावट करून तिच्यासमोर संगीत नृत्य आदी सेवा सादर करतात. या सजावटीमध्ये कृष्णाच्या जन्मातल्या अनेक प्रसंगांची चित्रे असलेल्या झांक्या मुख्यतः असतात. या निमित्याने कृष्णाच्या जीवनामधील कांही घटनांवर लिहिलेली गाणी सादर करण्याचा विचार आहे.

यातले पहिले गाणे सत्यभामेच्या तोंडी आहे. सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या प्रमुख राण्या सर्वांना माहीत आहेत. यातली रुक्मिणी ही आदिशक्ती, आदिमायेचा अवतार असल्याने तिच्यात दैवी गुण होते, तर सत्यभामा पूर्णपणे मानवी आहे. मनुष्याच्या मनात उठणारे सारे विकार तिच्या मनात उठत असतात. याचा फायदा घेऊन नारदमुनी कळ लावण्याचे काम करत असतात. ते एकदा सत्यभामेला एक पारिजातकाचे फूल आणून देतात. त्याकाळात हे फूल फक्त स्वर्गलोकात उपलब्ध होते. त्या फुलाचे अनुपम सौंदर्य आणि नारदमुनींनी केलेले त्याचे रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध होते की मला रोज हे फूल हवे असा हट्ट कृष्णाजवळ धरते. कृष्णभगवान तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचे एक रोप स्वर्गामधून मागवतात आणि सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशेजारी ते लावतात. ते झाड वाढतांना पहात असतांना सत्यभामा प्रेमाने आणि अहंकाराने त्याच्याकडे पहात असते. शेजारच्या महालात रहात असलेल्या रुक्मिणीकडे हे झाड नाही, तिला न देता श्रीकृष्णाने ते खास आपल्याला दिले आहे यामुळे आपण वरचढ असल्याचा आभास होऊन ती अतीशय सुखावते. त्याचा उल्लेख करून रुक्मिणीला सारखी डिवचत असते, पण रुक्मिणी तिच्याकडे लक्षच देत नाही.

झाड मोठे झाल्यावर त्याला कळ्यांचा बहर येतो. उद्या त्या उमलतील, आपण त्या फुलांचा गजरा करून तो आपल्या केशसंभारावर माळू आणि द्वारकेतल्या लोकांना दुष्प्राप्य असलेले हे वैभव सगळ्यांना दाखवू, ते पाहून रुक्मिणी चिडली, आपल्यावर जळफळली तर कित्ती मजा येईल अशा प्रकारचे विचार करत ती झोपी जाते. दुस-या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी ती अंगणात जाते आणि पहाते की तिच्या झाडावरली फुले वा-याने उडून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडत आहेत आणि ती बया शांतपणे त्यांचा हार गुंफत बसली आहे. हार गुंफून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार कृष्णालाच समर्पण करते. हे पाहून दिग्मूढ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते,

बहरला पारिजात दारी
फुले का, पडती शेजारी ?
…… हे काय होऊन बसले आहे ? या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्का बसतो.

माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणि जन तिजसी म्हणती
दुःख हे, भरल्या संसारी !
….. कृष्णाचे सर्वात जास्त प्रेम तिच्यावर आहे अशी तिची समजूत असते. कृष्णाचे तिच्याबरोबर असलेले लाघवी वागणे तिला सारखे हेच दाखवत असते, पण लोकांच्या नजरेत मात्र ती ‘दुसरी’ असते. रुक्मिणी हीच मुख्य पत्नी किंवा पट्टराणी, सगळा मान सन्मान नेहमी तिला मिळत असतो हे सत्यभामेला सहन होत नसते. तिला हे दुःख सारखे टोचत असते. आजही पारिजातकाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते.

असेल का हे नाटक यांचे,
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का, करिति चक्रधारी ?
. . . . . . हळूहळू तिच्या डोक्यात वेगळा प्रकाश पडतो. धूर्त कृष्णाने हे मुद्दाम केले असेल का? ते आपल्याशी कपटाने वागले का अशा संशय तिच्या मनात उत्पन्न होऊ लागतो.

वारा काही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो, दौलत तिज सारी !
. . . . . . . . कृष्णावरचा राग हा केवळ संशयावरून आलेला आहे, पण वा-याने केलेली कृती समोर दिसते आहे. तिच्या लहानशा जगातले सगळे प्रजाजन जसे रुक्मिणीलाच अधिक मान देतात त्यांच्याप्रमाणे हा वारा सुध्दा पक्षपाती झाला आहे. आपल्या अंगणातील प्राजक्तपुष्पांची दौलत हा वारा खुषाल तिला बहाल करतो आहे. हा आपल्यावर केवढा अन्याय आहे या विचाराने ती चिडून उठते, पण आपण त्याला काहीही करू शकत नाही ही निराशेची असहाय्यतेची भावना तिच्या मनाला ग्रासून टाकते.

अशा प्रकारे सत्यभामेच्या मनात उठणा-या विविध भावनातरंगांचे सुरेख चित्रण या गीताच्या तीन कडव्यातून कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी केले आहे. स्व.सुधीर फडके यांनी दिलेल्या सुमधुर चालीवर स्व. माणिक वर्मा यांनी अशा आर्ततेने हे गाणे गायिलेले आहे की एकदा ऐकले तर ते आतमध्ये कुठेतरी रुतून बसते. आज ही त्रयी आपल्यात नसली तरी अशा अजरामर कृतींमुळे ते अमर झाले आहेत. मधुवंती या मधुर रागावर आधारलेले हे गाणे एका काळी आकाशवाणीवरील संगीतिकेसाठी बसवले होते हे आज ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल.

गीत – ग. दि. माडगूळकर, संगीत – सुधीर फडके, स्वर – माणिक वर्मा, पुणे आकाशवाणी संगितिका ’पारिजातक’
———————————————————

बंधुभगिनीभाव

श्रीकृष्णाचे जीवन अद्भुत आणि अगम्य घटनांनी भरलेले आहे. रॅशनल विचार करून त्याची नीट सुसंगती लागत नाही. पौराणिक कालखंडात अगदी अटळ समजली जाणारी आकाशवाणी खोटी ठरवण्यासाठी कंसमामा आयुष्यभर प्रयत्न करत राहिला. त्या प्रयत्नात अनेक दुष्टांचा नाश झाला, तसेच निष्पाप जीवांचाही बळी गेला. देवकीच्या सर्व पुत्रांचा जन्मतःच कपाळमोक्ष करण्याचा चंग कंसाने बांधला होता, तरीही बलराम त्याच्या जन्माच्याही आधी आणि श्रीकृष्ण नवजात बालक असतांना सुखरूपपणे गोकुळाला जाऊन पोचले. त्याच्या पाठीवर जन्माला आलेली सुभद्रा कंसाच्या तावडीतून कशी सुटली, तिचे बालपण कुठे गेले वगैरेबद्दल मला काहीच माहिती नाही. महाभारताची जेवढी गोष्ट मला ठाऊक आहे त्यात सुभद्रेचा प्रवेश ती उपवर झाली असतांना होतो. कृष्णाच्या सहाय्याने अर्जुन तिचे हरण करून (पळवून) नेतो. या कथेवर संगीत सौभद्र हे नाटक रचलेले आहे. त्यानंतर सुभद्रा जी लुप्त होते ती कौरवांचा चक्रव्यूह भेदतांना अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या मातेच्या रूपातच पुन्हा भेटते. कृष्ण आणि बलराम यांचे बालपण गोकुळात जाते आणि कंसाच्या वधानंतर लगेच ते सांदीपनीच्या आश्रमात अध्ययनासाठी जातात आणि चौदा वर्षानंतर माघारी येतात. त्यानंतर सारा काळ धामधुमीचा असतो. त्यामुळे ही बहीण भावंडे कोणत्या काळात आणि कुठे एकत्र राहतात कोण जाणे.

अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ असतो. या नात्याने श्रीकृष्ण आणि द्रौपदी हे दीर भावजय लागतात, पण ते एकमेकांना बहीण भाऊ मानतात. कृष्णाला जशी सुभद्रा ही सख्खी बहीण असते तसाच द्रौपदीला धृष्टद्युम्न हा सख्खा भाऊ असतो, पण श्रीकृष्ण आणि द्रौपदी ही बंधुभगिनीची जोडी अद्वितीय मानली गेली आहे आणि आदर्श नातेसंबंधांचे उदाहरण म्हणून तिचा उल्लेख केला जातो. त्यांनी अनेक कवींना स्फूर्ती दिली आहे. सखाराम गटणेचे पात्र रंगवतांना पु.ल.देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे मीसुध्दा एका वयात श्यामची आई हे जगातले सर्वश्रेष्ठ पुस्तक आणि साने गुरुजी हे सर्वश्रेष्ठ लेखक मानत होतो. मी त्या वयात असतांना आचार्य अत्रे यांचा श्यामची आई हा चित्रपट आला. त्यातले त्यांनीच लिहिलेले आणि आशाताईंनी गायिलेले एक गाणे अजरामर झाले. कोकणातल्या येश्वदेच्या तोंडी शोभून दिसतील अशी आचार्यांची साधी पण भावपूर्ण शब्दरचना आणि साधी सोपी, लोकगीताच्या वळणाने जाणारी वसंत देसाई यांनी दिलेली चाल मनात घर करून राहते.

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुनं । द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।।

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण । विचाराया गेले नारद म्हणून ।
बोट श्रीहरिचे कापले ग बाई । बांधायाला चिंधी लवकर देई ।
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी । फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?”
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ? परी मला त्याने मानिली बहीण ।
काळजाचि चिंधी काढून देईन । एवढे तयाचे माझ्यावरी ऋण ।
वसने देउन प्रभू राखी माझी लाज । चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून । प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण ।
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण ।।

रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम । पटली पाहिजे अंतरीची खुण ।
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण । प्रीती ती खरी जी जगी लाभाविणं ।
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न ।।

“वसने देउन प्रभू राखी माझी लाज” या ओळीवरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधण्याचा हा प्रसंग द्रौपदीवस्त्रहरण होऊन गेल्यानंतर घडलेला असावा. कृतज्ञतेच्या भावनेतून द्रौपदीने आपले वस्त्र फाडून त्याची चिंधी काढून दिली असे कदाचित वाटेल. पण खाली दिलेल्या गाण्यावरून असे दिसते की कृष्णाच्या बोटाला झालेली जखम पाहून द्रौपदीचे हृदय कळवळले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने पांघरलेल्या भरजरी शेल्याची चिरफाड केली. यावर कृष्ण प्रसन्न होऊन द्रौपदीला आश्वासन देतो, “तुला जर कधी गरज पडली तर मी नक्की धावून येईन.” त्यावर द्रौपदी म्हणते, “तुझ्यासारखा पाठीराखा असतांना मला कसली काळजी?” या संवादावरून असे वाटते की द्रौपदीच्या चिंधीची परतफेड कृष्णाने द्रौपदीला अगणित वस्त्रे देऊन केली. हे गाणे कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी स्वरबध्द केले आहे. हे गीतदेखील आशाताईंनीच गायिले आहे.

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला
बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्न माधव झाला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !
म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !
प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला, चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !

 

कवी योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेल्या खालील गाण्यात द्रौपदीने व्याकुळ होऊन कृष्णाचा धांवा केला आहे. अशा प्रसंगी द्रौपदी स्वतः होऊन चिंधीचा उल्लेख करेल अशी शक्यताच नाही. ती फक्त आपल्या असहाय्य परिस्थितीचे निवेदन करून कृष्णाची आळवणी करते आहे. त्या काळच्या भयाकुल अवस्थेत तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे तिला सावळ्या गोपाळाचे रूप दिसते आणि तिला धीर देते. श्रीनिवास खळे यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर हे गीत माणिक वर्मा यांनी गायिले आहे.

तव भगिनीचा धावा ऐकुनि, धाव घेइ गोपाळा ।
गोपाळा, लाज राख नंदलाला ।।

द्यूतामध्ये पांडव हरले, उपहासाने कौरव हंसले
लाज सोडुनी सभेत धरिले, माझ्या पदराला ।।

अबलेसम हे पांडव सगळे, खाली माना घालुनि बसले ।
आणि रक्षाया शील सतीचे, कुणी नाही उरला ।।

आंसू माझिया नयनी थिजले, घाबरले मी, डोळे मिटले ।
रूप पाहता तुझे सावळे, प्राण आता उरला ।।
—————————-

श्रीकृष्णाची गीते – भाग ४

श्रीकृष्णाची गीते – भाग ४

जगाच्या पाठीवर

कृष्ण, यशोदा, राधा आणि मीरा यांच्या परस्पर संबंधावर आधारलेली अगणित गाणी हिंदी व मराठी सिनेमात आहेत. पाळणा,  प्रेमगीत, रूपक, नाचाचा कार्यक्रम, लावणी अशा अनेक रूपात ती गाणी दाखवलेली आहेत. १९६० साली प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटाच्या कथानकाचा श्रीकृष्णाच्या जीवनाशी काडीमात्र संबंध नव्हता. त्याले सामाजिक जीवन तत्कालीन होते. त्यातल्या कथानायकाच्या व्यक्तीरेखेचे श्रीकृष्णाशी कसलेच साम्य नव्हते. राजा परांजपे यांचा सशक्त अभिनय व कल्पक दिग्दर्शन आणि एक चाकोरीबाहेरचे वेगळे कथानक यामुळे तो जितका गाजला तितकाच त्यातील अर्थपूर्ण आणि मधुर गाण्यांमुळे. या चित्रपटातील कर्णमधुर गाणी आज होणा-या सुगम संगीताच्या विविध स्पर्धेतदेखील युवा कलाकारांकडून नेहमी म्हंटली जातात इतकी त्यांची अवीट गोडी आहे. स्व.ग.दि.माडगूळकरांनी रचलेल्या या गीतामधील तीन गीते सूरदास व मीराबाई यांच्या पदांची आठवण करून देतात. या गाण्यांमधील कल्पना आणि काही प्रतिमा त्या मूळ पदांसारख्या वाटल्या तरी गदिमांनी आपल्या प्रतिभेने आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वाने आपल्या शब्दांमध्ये ती चालीवर इतकी चपखल बसवली आहेत की ती स्वतंत्र गीते वाटावीत. मराठी सिनेमामधली गाणी आणि पूर्वीची राजस्थानी व ब्रिज भाषेतली पदे खाली दिली आहेत.

नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम ॥धृ.॥
कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम ॥१॥
बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम ॥२॥
जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम ॥३॥

मीराबाईचे पद

माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।
कोई कहै छानै, कोई कहै छुपकै, लियो री बजंता ढोल।
कोई कहै मुहंघो, कोई कहै सुहंगो, लियो री तराजू तोल।
कोई कहै कारो, कोई कहै गोरो, लियो री अमोलिक मोल।
या ही कूं सब जाणत है, लियो री आँखी खोल।
मीरा कूं प्रभु दरसण दीज्‍यो, पूरब जनम को कोल।
———–

नाचनाचुनीं अति मी दमलें, थकलें रे नंदलाला ! ॥धृ.॥

निलाजरेपण कटिस नेसलें, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचें कुंडल कानीं, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठिं घातली माला ॥१॥

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीति नूपुर पायीं, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणीं फेंकी, मजवर आला गेला ॥२॥

स्वतःभोवतीं घेतां गिरक्या, अंधपणा कीं आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारीं मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला ॥३॥

सूरदासांचे पद

अब मै नाच्यूँ बहुत गोपाल ।
कामक्रोधको पहिरीचोलना, कंठ विषयती माल ।।
महामोहके नूपुर बाजत, निंदा शब्द रसाल ।
भरम भ-यो मन भये पखावज, चलत असंगत चाल ।।
तृष्णा नाद करत घट भीतर, नानाबिधी दै ताल।
मायाको कटि फेंटा बाँध्यो, लोभ तिलक दै भाल ।।
कोटिक कला कांछि दिखलाई, जलथल सुधि नहि काल ।
सूरदासकी सबै अविद्या, दूरि करो नंदलाल ।।
————-
उद्धवा, अजब तुझे सरकार !
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता
बोरी-बाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !

सूरदासांचे पद – या पदामधील उदाहरणे वेगळी आहेत, पण सज्जनांना या जगात त्रास सहन करावा लागतो आणि दुर्जनांचे फावते ही उफराटी रीत असल्याची तक्रार हाच भाव त्यात दाखवला आहे.

उधो करमनकी गति न्यारी ।
सब नदियाँ जल भरि भरि रहियाँ। सागर केहि बिध खारी।।
उज्ज्वल पंख दिये बगुलाको । कोयल केहि गुन कारी ।।
सुंदर नैन मृगाको दीन्हे । बन बन फिरत उजारी ।।
मूरख मूरख राजे कीन्हे । पंडित फिरत भिखारी ।।
सूर स्याम मिलनेकी आसा । छिन छिन बीतत भारी ।।
——————–

<————- मागील भाग : भाग ३

श्रीकृष्णाची गीते – भाग ३

लोकधारा

सूरदास आणि मीराबाई यांच्याही आधी बंगालमध्ये होऊन गेलेल्या जयदेवांनी ‘गीतगोविंद’ या संस्कृत काव्याची रचना केली. कृष्ण आणि राधा यांचे प्रेम हा या काव्याचा मध्यवर्ती विषय आहे. धार्मिक विषयावरील ग्रंथात क्वचितच आढळणारा नवरसांचा राजा शृंगाररस या काव्यात पहायला मिळतो. त्यांच्यानंतर त्याच भागात होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू मीरेसारखेच कृष्णाचे निस्सीम भक्त होते आणि कृष्णाचे भजन करतांना तल्लीन होऊन नाचत असत. त्यांनी सुरू केलेल्या कृष्णभक्तीच्या परंपरेची छाप तिकडच्या लोकनृत्यांवरही पडलेली दिसते. ओडिसी तसेच मणिपुरी शैलीच्या नृत्यांमध्ये कृष्णाच्या जीवनावर आधारलेले प्रसंग बहुधा असतातच.

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी तर कृष्णाचे जन्मस्थान. त्याचे बालपण पण तिथेच गेले. सूरदासांनी आपल्या प्रतिभेने ते रंगवले आहेच, पण त्या भागात विकसित झालेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या  “आज कैसी ब्रजमे धूम मचायी”, “बिरजमे धूम मचाये स्याम”, “होरी खेलत नंदलाला बिरजमे”, “सांवरे ऐजैहो जमुनाकिनारे मोरा गांव ” आदि अनेक चीजांमध्ये कृष्णाचा उल्लेख येतो. राजस्थानमध्ये मीराबाईची भजने लोकप्रिय झालीच पण शेजारच्या गुजरातमध्येही कृष्णाची गाणी म्हणत गरबा, दांडिया रास वगैरेच्या प्रथा सुरू झाल्या. कर्नाटकातले ‘बैलाटा’ हे पारंपरिक नृत्यनाट्य आता ‘यक्षगान’ या नांवाने प्रसिद्ध झाले आहे. यात श्रीकृष्ण, रुक्मिणी व सत्यभामा यांच्या प्रमुख भूमिका असलेले पारिजातक आख्यान रंगमंचावर सादर करतात. पुरंदरदासांचे ‘कृष्णा नी बेगने बारो (कृष्णा तू लवकर ये ना)’ हे भजन सुप्रसिद्ध आहे. कांही वेळा या भजनाच्या आधारावर भरतनाट्यम किंवा कुचिपुडी नृत्यसुद्धा केले जाते. अशा प्रकारे भारताच्या विविध भागात कृष्णाचे वर्णन करणारी किंवा त्याला उद्देशून म्हंटलेली पदे परंपरागत लोकसंगीतात प्रचलित झालेली आहेत.

महाराष्ट्रातसुद्धा संतवाङ्मयामध्ये कृष्णभक्तीला महत्वाचे स्थान आहे. “कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥” असे ज्ञानेश्वर महाराज विचारतात. तर  “वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।।” असे वर्णन संत एकनाथ करतात. तुकाराम महाराज म्हणतात,
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ।।
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारू । उतरी पैलपारू भवनदीची ।।
कृष्ण माझे, मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ।।
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटो ना करावा परता जीवा ।।

मुख्यतः अभंग गाऊन भजन करतांना त्याबरोबर भारुडे, जोगवा, गवळणी वगैरे म्हणायची प्रथा आहे. त्यातला गौळण हा प्रकार देवळातून उचलून तमाशातसुद्धा आणला गेला. सुरुवातीला गण आळवून झाल्यावर गौळण सादर केली जाते आणि त्यानंतर वगाला सुरुवात होते. दह्यादुधाने भरलेली गाडगी मडकी डोक्यावर घेऊन गवळणींनी मथुरेच्या बाजाराला जायला निघायचे. कृष्णाने त्यांना वाटेत अडवायचे आणि त्यानंतर त्यांचे उडणारे खटके विनोदी पद्धतीने दाखवले जातात. शाहीरांच्या इतर रचनांमध्येसुद्धा कृष्ण हा विषय येतोच. “घनःश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला । उठी लवकरि वनमाळी उदयाचली मित्र आला ।।” या ‘अमर भूपाळी’सारखेच  “सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ” हे गीतसुद्धा प्रसिद्ध आहे.

लोककला आणि कृष्ण यांचे नाते इतके घट्ट जमले होते की मराठी भाषेत जी पहिली संगीत नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आणि त्यांनी नाट्यकलेचे नवे युग सुरू केले त्यात ‘स्वयंवर’ आणि ‘सौभद्र’ ही नाटके ठळकपणे समोर येतात. आज शंभर वर्षे होऊन गेल्यानंतरसुद्धा त्यांचे प्रयोग करणे आणि पाहणे रसिकांना आवडते.

<———– मागील भाग : भाग २                                                पुढील भाग : भाग ४ ———–>

श्रीकृष्णाची गीते – भाग २

मीराबाईच्या रचना

मीराबाईची श्रीकृष्णभक्ती अगदी आगळ्या प्रकारची होती. ती सर्वस्वी फक्त कृष्णाचीच आहे अशी तिची गाढ श्रद्धा होती. त्याचेशिवाय आपले असे दुसरे कोणीसुद्धा नाही. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे कोणी आपले नाही. तिच्या बालपणीच तिचे लग्न करून दिलेले होते, पण तिने मात्र आपले तन, मन, धन वगैरे सारे कृष्णाला अर्पण केले होते. लग्नाच्या नव-याला ती आपला पती मानतच नव्हती. त्यामुळे त्याच्या निधनाचा शोकही तिने केला नाही. घरदार, लोकलाज सारे सोडून देऊन ती साधुसंतांच्या संगतीत राहू लागली. राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईने गांवोगांव वणवण फिरत स्वतःला पूर्णपणे कृष्णभक्तीलाच वाहून घेतले. डोक्यावर फक्त मोरपीस खोचणारा गिरधर गोपाल तिचा पती होता आणि तशाच साधेपणाने राहणे तिला पसंत होते. “बाला मैं बैरागण हूंगी। जिन भेषां म्हारो साहिब रीझे, सोही भेष धरूंगी।” असे मीराबाईने एका गीतात म्हंटले आहे.  संपूर्ण चेहेरा झाकून टाकणारी भरजरी राजस्थानी चुनरी सोडून देऊन तिने साध्या कापडाचा पदर माथ्यावर घेतला आणि मोती मूँगे यासारख्या रत्नांचे हार गळ्यात घालण्याऐवजी फुलांची वनमाला धारण केली. अश्रूंचे सिंचन करून कृष्णप्रेमाची वेल लावली आणि तिची वाढ होऊन त्याला आनंदाचे फळ आले. दुधाच्या मंथनातून निघालेले लोणी इतरांना खाऊ दिले आणि स्वतः ताकावर समाधान मानले. भक्तांना पाहून ती राजी झाली, पण जगाची रीत पाहून तिला रडू आले. आता गिरधर गोपालच तिला तारून नेईल अशी तिची श्रद्धा होती. किती अप्रतिम काव्य या गीतात आहे?

मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई।।
जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई।
तात मात भ्रात बंधु आपनो न कोई।।
छांडि दई कुलकी कानि कहा करिहै कोई।
संतन ढिग बैठि बैठि लोकलाज खोई।।
चुनरी के किये टूक ओढ़ लीन्ही लोई।
मोती मूंगे उतार बनमाला पोई।।
अंसुवन जल सीचि सीचि प्रेम बेलि बोई।
अब तो बेल फैल गई आंणद फल होई।।
दूध की मथनियाँ बड़े प्रेम से बिलोई।
माखन जब काढ़ि लियो छाछ पिये कोई।।
भगति देखि राजी हुई जगत देखि रोई।
दासी मीरा लाल गिरधर तारो अब मोही।।

हीच भावना दुस-या एका गीतात आहे. तिच्या जगावेगळ्या वागण्यामुळे अस्वस्थ झालेल्या तिच्या सास-याने आपल्या अब्रूखातर विषाचा प्याला तिच्याकचे पाठवून दिला आणि तिने तो हंसत हंसत पिऊनही टाकला. पण “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय आला.
पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
‘मीरा’ के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥

मीराबाईच्या एक एक रचना अनमोल मोत्यासारख्या आहेत. कधी ती तिला आपल्या नोकरीत ठेऊन घेण्याची विनंती कृष्णाला करते. “तुझ्या बागेत काम करतांना रोज तुझे दर्शन घेऊन तुझे गुण गाईन” असे म्हणते.
स्याम! मने चाकर राखो जी । गिरधारी लाला! चाकर राखो जी।
चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसण पासूं। ब्रिंदाबन की कुंजगलिन में तेरी लीला गासूं।।

आपल्या विरहव्यथा तिने “हे री मैं तो प्रेम-दिवानी मेरो दरद न जाणै कोय। या गाण्यात अतिशय उत्कटपणे मांडल्या आहेत. तर कधी “पपैया रे पिवकी बाणि न बोल। सुणि पावेली बिरहणी रे थारी रालेली पांख मरोड़।।” असे पपीहाला सांगून “ही विरहिणी तुझे पंख पिरगाळून टाकेल” अशी धमकी त्याला देते. “पीहू पीहू पपीहो न बोल ” या लोकप्रिय गाण्याची प्रेरणा कवीला याच पदावरून मिळाली असेल. “म्हारो प्रणाम बांकेबिहारीको।” असा नमस्कार घालून ती “प्रभुजी मैं अरज करुँ छूं म्हारो बेड़ो लगाज्यो पार।।” अशी विनंती करते. “बसो मोरे नैनन में नंदलाल। मोहनी मूरति सांवरि सूरति, नैणा बने बिसाल।” या मीराबाईच्या प्रार्थनेवरून तिला ‘दरसदिवानी’ म्हंटले गेले असेल.

मीराबाईची सारीच गीते दुःखी नाहीत.
बरसै बदरिया सावन की सावन की मनभावन की।
सावन में उमग्यो मेरो मनवा भनक सुनी हरि आवन की।
या गाण्यात तिला काळ्या मेघातून बरसणा-या श्रावणधारांमधून घननीळाची चाहूल लागते आणि तिचे मन उल्हसित होते. “माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।” या गीतात तर ती “मी विकत घेतला श्याम” असे ठासून सांगते.

मीराबाईच्या गीतांमध्ये कमालीची भावपूर्ण शब्दरचना तर आहेच, ती अत्यंत तालबद्ध आहेत आणि त्यांतील शब्दांनादेखील नादमाधुर्य आहे. त्यामुळेच महान संगीतकारांनी त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि आघाडीच्या गायकांनी त्या रचना अजरामर करून ठेवल्या आहेत.

<—  मागील भाग : भाग १                                                    पुढील भाग : भाग ३ —–>

श्रीकृष्णाची गीते – भाग १

१. सूरदासांच्या रचना

व्यासांच्या महाभारतातल्या श्रीकृष्णाला घराघरात पोचवण्याचे काम त्याच्या भक्तांनी लिहिलेल्या सुरस पदांनी केले. त्यात सूरदास आणि मीराबाई यांची नांवे सर्वात मुख्य आहेत. दोघेही निस्सीम कृष्णभक्त होते, पण त्यांच्या भक्तीचे मार्ग भिन्न होते. सूरदासांच्या पदांमध्ये बाळकृष्णाच्या लीलांचे कौतुक केले आहे. चोरून लोणी खातांना यशोदामाईने रंगेहाथ पकडल्यानंतरसुद्धा कृष्ण आपला कशा प्रकारे बचाव करतो, कोणकोणती कारणे सांगतो ते या सुप्रसिद्ध पदात पहा.

मैया मोरी मैं नहीं माखन खायो ।।
ख्याल परै ये सखा सबै मिलि मेरैं मुख लपटायो॥

भोर भई गइयन के पाछे मधुबन मोहे पठायो ।
चार पहर बंसी बट भटक्यों साँझ परी घर आयो ।।

देखि तुही छींके पर भाजन ऊंचे धरि लटकायो।
हौं जु कहत नान्हें कर अपने मैं कैसें करि पायो॥

मुख दधि पोंछि बुद्धि इक कीन्हीं दोना पीठि दुरायो।
डारि सांटि मुसुकाइ जशोदा स्यामहिं कंठ लगायो॥

ये ले अपनी लकुटि कमरिया बहुत ही नाच नचायो ।
सूरदास तब हँसी जशोदा  ले निधि कंठ लगायो ।।

बाल बिनोद मोद मन मोह्यो भक्ति प्राप दिखायो।
सूरदास जसुमति को यह सुख सिव बिरंचि नहिं पायो॥

“माझ्या मित्रांनी दुष्टपणाने बळजबरीने माझ्या तोंडाला लोणी फासले, मी तर पहाटेच गायी चारायला रानात गेलो होतो तो संध्याकाळी घरी परत आलो, तू लोणी इतक्या उंच शिंक्यावर टांगून ठेवले होतेस तिथे माझे इवलेसे हात कसे बरे पोचतील?” वगैरे कारणे देऊन झाल्यावर थोडेसे दही शिल्लक असलेला द्रोण कृष्णाने हळूच लपवून दिला. हे सगळे एकून यशोदेला हंसू आवरले नाही. तिने कृष्णाला मायेने जवळ घेतले. भगवान शंकर किंवा ब्रह्म्याला जे सुख मिळाले नाही ते यशोदेला प्राप्त झाले असे सूरदास म्हणतात.

सूरदासांनी कृष्णाच्या बालपणावर अनेक गीते लिहिली आहेत. त्यातील
जसोदा हरि पालनैं झुलावै। हलरावै दुलरावै मल्हावै जोइ सोइ कछु गावै॥
मैया मोहि दाऊ बहुत खिझायौ।
मोसौं कहत मोल कौ लीन्हौ, तू जसुमति कब जायौ।।
वगैरे कांही गीते आजही खूप लोकप्रिय आहेत.

सूरदासांनी लिहिलेली भजने तर खूपच गाजली आहेत. त्यातील कांही प्रसिद्ध भजने खाली दिली आहेत.

अब मै नाच्यूँ बहुत गोपाल। कामक्रोधको पहिरी चोलना कंठ विषयकी माल।।

अखियाँ हरि दर्शन की प्यासी । देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहत उदासी ॥

प्रभू मोरे अवगुण चित न धरो । समदरसी है नाम तिहारो चाहे तो पार करो ॥

राधे कृष्ण कहो मेरे प्यारे भजो मेरे प्यारे जपो मेरे प्यारे ॥

भजो गोविंद गोपाळ राधे कृष्ण कहो मेरे ॥

एका भजनात सूरदासांनी जगातील अनेक विसंगतींचे मार्मिक दर्शन घडवून आणले आहे. गोड्या पाण्याने भरभरून नद्या वाहत समुद्राला मिळतात पण समुद्राचे पाणी मात्र खारट, बगळ्याला पांढरे शुभ्र पंख आणि कोकिळा काळी, हरणाला सुंदर डोळे दिले आहेत पण तो रानावनात भटकत असतो, मूर्ख लोक राज्य करतात आणि पंडित भिकेला लागतात वगैरे दाखवून अखेरीस घनःश्यामाला भेटण्यासाठी आपण किती व्याकुळ झालेलो आहोत ते त्यांनी सांगितले आहे.

उधो करमनकी गति न्यारी ।
सब नदियाँ जल भरि भरि रहियाँ। सागर केहि बिध खारी।।
उज्ज्वल पंख दिये बगुलाको । कोयल केहि गुन कारी ।।
सुंदर नैन मृगाको दीन्हे । बन बन फिरत उजारी ।।
मूरख मूरख राजे कीन्हे । पंडित फिरत भिखारी ।।
सूर स्याम मिलनेकी आसा । छिन छिन बीतत भारी ।।

————> पुढील भाग २

 

गोकुळाष्टमी

आपण दर वर्षी गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्साहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. विस्तारपूर्वक सांगता येईल असे त्यांचे मोठे चरित्र नाही. परशुराम हा आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमापेक्षा भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे अत्यंत कठीण आहे. गोपाळकृष्ण मात्र आपल्याला थोडासा आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, थट्टामस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.

कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना कंसाला मिळते आणि कृष्णाचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी दुभंगून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.

त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची माहिती कंसाला मिळते आणि त्या मुलाला ठार मारून टाकण्याचे अनेक उपाय तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. “मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।” वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.

असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणाऱ्या लढायांच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर द्वारका नगरी वसवून तिथे त्यांच्यासह तो स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर तऱ्हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.युद्ध अटळ झाल्यावर “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।” असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच “सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते।” असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। ” हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.

असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आणि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे सर्वांनाच त्या सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.