राम जन्मला ग सखी

RamSeeta

आज रामनवमी आहे. देशभरात आणि आता परदेशातही जिथे जिथे भारतीय लोक असतील तिथे रामजन्माचा उत्सव साजरा केला जाईल. या वेळी सुंठवडा वगैरे वाटायची पध्दत आजकाल राहिली नसली तरी पेढे वाटून आनंद व्यक्त होईल. त्या निमित्याने थोडा रामनामाचा जप केला जाईल, रामरक्षेचे पठण होईल, कोणाला येत असेल तर रामाची आरती गायली जाईल. सगळीकडे रामाची गाणी तर ऐकायला नक्की मिळतील. टीव्हीवर त्याची क्षणचित्रे आपल्याला दिसतील.

प्रभू रामचंद्राचा विलक्षण प्रभाव आपल्या नकळत आपल्या जीवनावर पडलेला असतो. श्रीराम, रामचंद्र, रघुनाथ, राघव, सीताराम, राजाराम, जयराम यासारखी त्याची अनेक नांवे आपल्या ओळखीची असतात. त्या नांवाच्या अनेक मानवी विभूती इतिहासात होऊन गेल्या, गेल्या शेदोनशे वर्षात ज्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आणि अजून करताहेत त्या प्रसिध्द व्यक्तींमध्ये कुठे कुठे यातले एकादे नांव दिसते, यातील प्रत्येक नांवाची निदान एक तरी व्यक्ती माझ्या व्यक्तिगत परिचयाची आहे, तशीच इतर सगळ्यांच्या ओळखीचीही असेल. माझ्या आधीच्या पिढीपासून माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत सगळीकडे मला हे नांव पहायला मिळते. रामाप्रमाणेच आपल्या मुलाने ही पराक्रमी, सत्यवचनी आणि आदर्शवादी व्हावे अशी इच्छा त्याचे नांव ठेवतांना आईवडिलांची असेल. त्यालाही रामाप्रमाणे वनवास मिळावा असे मात्र मुळीसुध्दा वाटले नसेल. पण कोणाच्याही जीनवात दुर्दैवाने काही वाईट दिवस आलेच तर “प्रभू रामालासुध्दा वनवास भोगावा लागलाच ना? ” असा विचार करण्यामधून त्या व्यक्तीच्या चटक्यांचा दाह किंचित सौम्य होतो.

साहित्यामध्ये आणि विशेषतः काव्यामध्ये रामायणाची गोष्ट कधीच जुनी झाली नाही. या कथेच्या अनेक पैलूंचे प्रत्यक्ष दर्शन तर आपल्याही जीवनात घडतेच, शिवाय वेगवेगळ्या संदर्भात त्यातील घटनांचा उल्लेख येतो, त्या प्रसंगी त्या काळातली पात्रे कशी वागली याची उदाहरणे दिली जातात. विशेषतः पितृभक्ती, वचनपूर्ती, बंधुप्रेम वगैरेंबद्दल रामायणामधील दाखले दिले जातात. शिवधनुष्यभजन पेलणे, लक्ष्मणरेखा आदि लोकप्रिय वाक्प्रचार रामायणामधून आले आहेत. भजने, भक्तीगीते, भावगीते आदि सुगम संगीताच्या प्रकारांमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना उद्देशून किंवा त्यांचे गुणगान करणा-या अनंत रचना आहेत आणि अजूनही नव्या नव्या रचना होत असतात.

रेडिओ आणि टेलीव्हिजन या आधुनिक काळातल्या दोन्ही प्रसारमाध्यमांवर माझ्या आठवणींमधल्या काही काळापुरते ‘राम’राज्य निर्माण झाले होते. मी शाळेत शिकत असतांना जेंव्हा आकाशवाणीवर गीतरामायणाचे साप्ताहिक प्रक्षेपण सुरू झाले तेंव्हा या एका कार्यक्रमाने मराठी जगतात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. बाकीची सारी कामे बाजूला सारून किंवा आधी आटपून घेऊन या कार्यक्रमाची वेळ झाली की घरातली सगळी माणसे रेडिओच्या भोवती गोळा होऊन बसत आणि कानात प्राण ऐकून ती गाणी ऐकत असत. इतकी अफाट लोकप्रियता दुस-या कोणत्याही गीतमालिकेला मिळाल्याचे उदाहरण मला माहीत नाही.

रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामायण दाखवायला सुरुवात केल्यानंतर देशभर हेच चित्र निर्माण झाले होते. कांहीही झाले तरी रामायणाची वेळ साधायचीच अशा निर्धाराने बाकीची कामे संपवली किंवा टाळली जात. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरातल्या गर्दीच्या रस्त्यांवर रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळेत कर्फ्यू असल्यासारखा शुकशुकाट दिसायचा. त्या काळातल्या दोन मजेदार घटना मला आठवतात.

एका मरहूम खाँसाहेबांच्या नांवाने चाललेल्या संगीत महोत्सवाच्या शेवटच्या पर्वात दुस-या एका तत्कालीन प्रसिध्द खाँसाहेबांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. आज रामायण बुडणार या विचाराने श्रोतेमंडळी हळहळत होती आणि चुळबुळ करत होती. पण कार्यक्रमाची वेळ होऊन गेली तरी मुख्य गायकाचाच पत्ता नव्हता. रस्त्यात शुकशुकाट झालेला असल्यामुळे ट्रॅफिक जॅमचा प्रश्नही नव्हता. अखेर रामायणाची वेळ संपल्यावर पांच मिनिटात खाँसाहेब आले. त्यांनी विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची माफी मागितली. अखेरीस “मी घरातून लवकर निघून इथपर्यंत वेळेपूर्वीच येऊन पोचलो होतो आणि वेळ काढण्यासाठी इथे जवळच राहणा-या माझ्या मित्राच्या घरी बसलो होतो. त्यानंतर रामायण सुरू झाल्यानंतर ते बुडवून मी इकडे कसा येऊ शकणार?” असे उद्गार त्यांनी काढले. विलंबामुळे झालेली सगळी कसर त्यांनी नंतर आपल्या गायनातून भरून काढली हे सांगायला नकोच.

दुसरा प्रसंग माझ्या नात्यातल्या एका लग्नाचा आहे. सकाळचा नाश्ता आणि मुहूर्ताच्या अक्षता टाकून झाल्यानंतर जेवणाला वेळ होता. जवळ राहणारी स्थानिक मंडळी आपापल्या घरी जाऊन रामायण पाहू शकत होती. बाहेरगांवाहून आलेल्या पाहुण्यांनी काय करायचे? वरपक्षानेही त्यात इंटरेस्ट दाखवलेला असल्यामुळे धावपळ करून एक टीव्हीचा मोठा संच बाजारातून मंगल कार्यालयात आणला गेला आणि कसा ते कुणास ठाऊक, त्याला तात्पुरता एंटेना जोडून रामायणाचे सार्वजनिक पाहणे सुरू झाले. थोड्या वेळानंतर कोणाच्या तरी असे लक्षात आले की सगळी स्वयंपाकी मंडळीसुध्दा त्यासाठी हॉलमध्ये येऊन बसली आहेत. त्यांना कामाला लावण्यासाठी बाहेर पिटाळणे सुरू झाले. पण इतर प्रेक्षकांनीच त्यांची बाजू घेत “आम्हाला जेवणाला उशीर झाला तरी चालेल. त्यांना रामायण पाहू द्या.” असे सांगितले. कदाचित त्या महाराजांनी नाराज होऊन लग्नाचा स्वयंपाक बिघडवू नये अशा विचाराने त्यांना रामायण पाहू दिले गेले असेल.

गीतरामायणाला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्यातली कांही गाणी निरनिराळ्या कार्यक्रमातून अजून ऐकू येतात आणि मुख्य म्हणजे नव्या पिढीतल्या मुलांनासुध्दा ती गावीशी व ऐकावीशी वाटतात. उघड्या मैदानात नाचगाण्याचे कार्यक्रम होणे आता सामान्य झाले आहे, पण जेंव्हा गीतरामायणाला पंचवीस वर्षे झाली तेंव्हा तेंव्हा तसे नव्हते. तरीसुध्दा स्व.सुधीर फडके यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विस्तृत पटांगणात हा रौप्यमहोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. बाबूजींचे गायन ऐकायला दूरदूरहून आलेल्या श्रोत्यांनी ते पटांगण रोज तुडुंब भरत होते. त्यांचे दिव्य गायन प्रत्यक्ष ऐकण्याचे आणि संगीताच्या कार्यक्रमासाठी जमलेला एवढा मोठा जनसागर पाहण्याचे भाग्य त्या वेळी मला पहिलांदाच लाभले.

आज रामनवमीच्या निमित्याने स्व. ग.दि.माडगूळकरांच्या शब्दात रामायणकालीन रामजन्माचा सोहळा खाली देत आहे.

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी ।
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें ।
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ।
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी ।
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं ।
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या ।
’काय काय’ करित पुन्हां उमलल्या खुळ्या ।
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं ।
गेहांतुन राजपथीं धावले कुणी ।
युवतींचा संघ एक गात चालला । राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें ।
हास्याने लोपविले शब्द, भाषणें ।
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

वीणारव नूपुरांत पार लोपले ।
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले ।
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती ।
गगनांतुन आज नवे रंग पोहती ।
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं ।
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी ।
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला ।। राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

राम जन्माच्या उत्सवाची एक आठवण

चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी ।
गंधयुक्त तरीही वात ऊष्ण हे किती !
दोन प्रहरी कां ग शिरी सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला ।।

या सुंदर शब्दात महाकवी ग.दि.माडगूळकरांनी रामजन्माचे वर्णन गीतरामायणात केलेले आहे. दरवर्षी रामनवमीला गांवागांवातल्या राममंदिरांत रामजन्मोत्सव साजरा केला जातो. मुंबईतही ठिकठिकाणी होत असतो. इथली हवा नेहमीच कसल्या प्रकारच्या गंधांनी भरलेली असते ते सर्वांना माहीत आहे. त्यातली ऊष्णता मात्र चांगलीच दाहक झालेली असते. त्यामुळे भर दुपारी हातातले काम आणि वातानुकूलित खोली सोडून रणरणत्या उन्हात दूरच्या राममंदिरात जाण्याइतका उत्साह सहसा कोणाला नसतो. यापूर्वी मी किती वर्षांपूर्वी आणि कुठल्या गावातल्या कुठल्या देवळातल्या रामजन्माच्या उत्सवाला गेलो होतो ते सुद्धा आता आठवत नाही.

पाच सहा वर्षांपूर्वी एकदा मी मध्यप्रदेशातील टिमरनी नांवाच्या गांवी रामनवमीच्या सकाळीच जाऊन पोचलो होतो. तिथे आमच्या आप्तांच्या घराजवळच रामाचे देऊळ होते आणि घरातली सगळी मंडळी जन्माच्या वेळी तिकडे जाणारच होती, त्यामुळे मलाही त्या ठिकाणी साजरा होत असलेला रामजन्मोत्सव पहायची आयतीच संधी मिळाली. तसा मी नियमितपणे भक्तीभावाने देवळात जाणा-यातला नाही, पण आपले सगळे उत्सव मात्र मला मनापासून आवडतात.

आम्ही पावणेबाराच्या सुमाराला मंदिरात पोचलो तोपर्यंत त्या देवळाचा लहानसा सभामंटप माणसांनी नुसता फुलला होता. त्यात स्त्रिया व पुरुषांसाठी वेगळे विभाग व येण्याजाण्याचे स्वतंत्र दरवाजे ठेवले होते. आत जाण्याच्या वाटेमध्येच बसकण मारून मी तिला थोडी अरुंद केली. माझ्या मागून आलेल्या दहा बारा लोकांनी तर तिला पुरती बुजवून टाकली. त्यानंतर आयत्या वेळी आलेले लोक मग दरवाजाच्या बाहेरील कट्ट्यावरच बसले किंवा दाराबाहेरच उभे राहिले.

सभामंटपात एका मंचकावर एक महाराज विराजमान होऊन समारंभाचे सूत्रसंचालन करीत होते. त्यांच्या तोंडाजवळ ध्वनिक्षेपक व हाताशी एक बाजाची पेटी होती आणि बाजूलाच एक तबलेवाला बसला होता. त्यांच्या आधाराने ते मधून मधून थोडेफार गात होते. त्यांचे कीर्तन कां भजन अव्याहत सुरू होते. माझ्या लहानपणी आमच्या गांवात दर वर्षी या वेळी रामजन्माच्या आख्यानाचे कीर्तन लावीत असत. दशरथ राजा व त्याच्या तीन राण्यांपासून सुरुवात करून त्याने केलेला यज्ञ, त्यात साक्षात अग्निनारायणाने प्रकट होऊन पायसदान करणे, त्याच्या तीनऐवजी चार वाटण्या होणे वगैरे सारा कथाभाग सुरसपणे रंगवीत बरोबर बाराच्या ठोक्याला पुत्रजन्माचा सोहळा संपन्न व्हायचा. टिमरनीच्या देवळातले हिंदी भाषिक महाराज मधूनच कांही वाक्ये बोलत होते, तुलसीदासाच्या रामायणातले दोहे कधी बोलून सांगत होते तर कधी गाऊन दाखवत होते. अधून मधून रामनामाचे वेगवेगळे जप करीत होते. “हाथी घोडा पालकी, जय बोलो सियारामकी” अशा पद्धतीची कित्येक यमके त्यात होती. उपस्थितांच्या संख्येच्या मानाने सामूहिक भजनाचा आवाज क्षीण वाटत होता यामुळे “जो काम नही करना चाहिये वो करनेमे लोगोंको शर्म नही आती पर भगवानका नाम लेनेमे आती है।” असे महाराजांचे ताशेरे मध्येच मारून झाले. त्याचा इतकाच उपयोग झाला की आधीपासून खालच्या आवाजात बोलणारे कांही लोक मोठ्याने ओरडू लागले. माझ्यासारख्या नवख्या लोकांना त्यातले शब्दच नीटसे कळत नव्हते तर त्यांचा उच्चार कसा करणार? त्यांनी नुसतेच ओठ हालवले.

बारा वाजायला पांच मिनिटे कमी असतांना गाभा-याचा दरवाजा बंद झाला व बाहेर रामनामाचा घोष चालत राहिला. लोकांच्या हातात फुले किंवा पाकळ्या वाटल्या गेल्या. बारा वाजता दरवाजा उघडला आणि सगळ्यांनी दारापर्यंत जाऊन आंतील राम लक्ष्मणांच्या मूर्तीच्या दिशेने पुष्पवर्षाव केला. प्रत्येक रामभक्ताने इतक्या छोट्या गाभा-याच्या आत प्रवेश करणे शक्यच नव्हते. त्यातून उगीच चेंगराचेंगरी झाली असती. दारामधूनच आतल्या मूर्तींवर फुले उधळून झाल्यावर सर्वांनी बसून घेण्याची सूचना झाली. तोंडाने नामसंकीर्तन सुरूच होते. आरती सुरू होताच सगळे लोक पुन्हा उभे राहिले. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हे भजन आरतीच्या स्वरूपात परंपरागत संथगती चालीवर खालच्या सुरात सामूहिकरीत्या म्हंटले. त्यानंतर मंत्रपुष्पांजली झाल्यावर व आरतीचे तबक फिरवून झाल्यावर पुन्हा सगळ्यांनी बसून घेतले.

मी लहानपणी पाहिलेला बाळाला पाळण्यात घालण्याचा आणि सर्वांनी त्याचा दोरीने झोके देण्याचा सोहळा तिकडच्या भागात निराळ्या पध्दतीने होतो. आरती संपल्यानंतर श्रीरामाच्या बालपणासंबंधीचे दोहे सुरू झाले. एका शेल्याची छोटी लांबट घडी घालून व ती दोन माणसांनी दोन टोकांनी धरून झोपाळ्यासारखे झोके देत त्याचा झूला केला. त्याच्या आंत काय ठेवले होते ते दिसले नाही. ते रामलल्लाचे प्रतीक असावे. तो झूला प्रेक्षकांमध्ये फिरवून झाला. लोकांनी त्याला स्पर्श करून त्यातही कांही नोटा वा नाणी टाकली. त्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना चिमूट चिमूट पांजरी का पंजेरी नांवाचे चूर्ण वाटण्यात आले. तो पदार्थ सुंठवडा तर नक्कीच नव्हता. त्याला धण्याची चंव मात्र लागत होती. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असतांना ते चूर्ण मुठीत धरून घरी नेण्यासारखे नव्हते त्यामुळे तिथेच ते तोंडात टाकून हात झटकले.

देवळातले भजन, संकीर्तन वगैरे अजून किती वेळ चालणार होते कुणास ठाऊक! पण आपला कार्यभाग उरकला असे ठरवून आणि बाहेर ताटकळत बसलेल्या भाविकांना आत जाऊन देवदर्शनाची संधी द्यावी या उदात्त हेतूने आम्ही घरी परतलो. घरी तयार करून ठेवलेले जेवणसुद्धा आमच्या येण्याची वाटच पहात होते ना!

श्रीरामाची उपासना

विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना आणि उपासना करणे कठीण असते. यामुळे ती असंख्य दृष्य प्रतिमांच्या स्वरूपात केली जाते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय सांभाळणारी ब्रम्हा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती आणि आदिशक्ती ही ईश्वराची प्रमुख रूपे धरली तरी प्रसंगोपात्त इतर अनेक रूपांमध्ये देव प्रकट झाला किंवा त्याने अवतार घेतला याच्या सुरस कथा आपल्या धार्मिक वाङ्मयात आहेत. अंबरीशासाठी भगवान विष्णूचे जे दहा अवतार झाले त्यातील मत्स्य, कूर्म वगैरेंबद्दल कोणाला फारसे कांही माहीत नसते, किंवा त्यांची स्वतंत्र मंदिरे सहसा दिसत नाहीत. मोठ्या देवळांच्या भिंतींवर किंवा खांबांवर कधी कधी दशावताराची चित्रे असतात त्यात मत्स्यावतार दिसतो. अनेक देवळांच्या फरशीवर कासवाला विराजमान होतांना दिसते, पण तो कूर्मावतार आहे का याबद्दल मला शंका वाटते. कुणीही त्याची पूजा करतांना मी पाहिले नाही. वराह, नरसिंह, वामन वगैरेंची देवळेही कमीच आहेत आणि घरात त्यांची प्रतिमा ठेवून त्यांची उपासना करणारे मी तरी पाहिले नाहीत. परशुरामाला आजकाल खूप महत्व आणि प्रसिध्दी मिळत असली तरी त्यामागची कारणे वेगळी असावीत. राम आणि कृष्ण हे दोन अवतार मात्र विशेष प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत. आपले जीवन रामाने किती व्यापून टाकले आहे हे आपण मागील भागात पाहिले होते. त्याच्या उपासनेबद्दल थोडे या भागात पाहू.

परंपरेने चालत आलेल्या समजुतीनुसार रामनामाचा जप केल्याने माणसाच्या सर्व पापांचे क्षालन होते, त्याचे दैन्य, दुःख वगैरे नाहीशी होतात आणि अंती तो भवसागर पार करतो अशी भाविकांची दृढ श्रध्दा असते. “रामनामाने शिळा उध्दरल्या.” या कथेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपला उध्दार होण्याच्या इच्छेने श्रध्दाळू लोक जमेल तेंव्हा जमेल तितके वेळा तोंडाने रामनाम घेतात. बरेच लोक “श्रीराम जयराम जयजयराम” या मंत्राचा नियमितपणे एकशे आठ किंवा हजार वेळा जप करतात. वेळी प्रसंगी लक्ष किंवा कोटी वेळा या नामाचा जप करण्याचे किंवा अखंड नामस्मरणाच्या सप्ताहासारख्या उत्सवाचे आयोजन केले जाते

‘सेतुबंधन’, ‘ पुष्पक विमान’ वगैरे सर्व पौराणिक संकल्पना शंभर टक्के सत्य होत्या असे मानणारा सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांचा एक नवा वर्ग मला भेटतो. या लोकांनी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले असते पण तरीसुध्दा  आर्किमिडीज, न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिध्दांतांपेक्षा या लोकांचा पुराणांतील कथांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एवढी प्रगती केलेली होती की त्यांना हे साध्य होते असे त्यांना ठामपणे वाटते. विज्ञानातील चार शब्दांचा उपयोग करून “रामनामाच्या उच्चारातून ज्या ध्वनिलहरी उठतात त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती घरभर पसरून कानाकोप-यातल्या ऋण ऊर्जेला हुसकून लावते. याच लहरी शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात, छातीचे ठोके नियमित करतात, रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. एकंदरीतच शरीर, मन आणि आत्मा यांचे शुध्दीकरण करतात.” वगैरे अनेक ‘शास्त्रीय’ गुण हे लोक रामनामाला जोडतात. पण भक्तीमार्गाने जाऊन प्रत्यक्षात रामाचे नामस्मरण करतांना मात्र मी त्यांना फारसे पाहिले नाही.

माझ्या लहानपणच्या जगात रोज संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर घरातली सारी मुले एकत्र बसून रामरक्षा म्हणत. त्यामुळे सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळते, सर्व मनोकामना पूर्ण होतात वगैरे सांगितले जात असले तरी तसा तेवढा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. त्या वयात मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची वाट पहायला धीर नसतो. आंबा खावा असे वाटले की अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसाप्रमाणे कोणीतरी तो हांतात आणून द्यायला हवा तर त्याचा कांही उपयोग! पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवाचे नांव घेऊन त्याचे संरक्षण राम करो अशी रोज प्रार्थना करीत असलो तरी ठेचकाळणे, खोक पडणे, ताप, खोकला, पोटदुखी वगैरे जे कांही व्हायचे ते होतच असे. त्या वयात पापक्षालन, मोक्ष, मुक्ती वगैरेंचे आकर्षण वाटायचेच नाही. तरीही एक मजेदार कारण पटत असे. त्या लहान गांवात कांही पडकी ओसाड घरे होती, अनेक जुनाट वृक्ष होते आणि रात्री काळोखाचे साम्राज्य असे. त्यात “हा खेळ सांवल्यांचा” चालत असे. वा-याच्या झुळुकीबरोबर पाने हालत आणि कुठला तरी नादही त्याबरोबर कधी वहात येत असेल. त्यामुळे अनेक प्रकारचे भास कोणाला तरी होत आणि त्याची वर्णने तिखटमीठ लावून पसरली जात. अमक्या झाडावर मुंजा आहे, दुसरीकडे हडळ आहे, कुठे बांगड्यांची किणकिण ऐकायला येते तर कुठे पैंजणांची छुमछुम वीजत असते अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच कानावर पडत असे. असल्या अगोचर शक्तींवर रामरक्षा हा रामबाण उपाय होता. त्यामुळे भक्तीभावाने नसली तरी भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामरक्षा म्हंटली जात असे.

आमच्या गांवात शंकराची अनेक देवालये होती. मारुती, गणपती, विठोबा, दत्त वगैरें देवांची एकाहून जास्त देवळे होती. घरातील वडील मंडळींपैकी कोणी ना कोणी दर सोमवारी शंकराच्या, गुरुवारी दत्ताच्या, शुक्रवारी अंबाबाईच्या आणि शनिवारी मारुतीच्या दर्शनाला नियमितपणे जात. एकादशीला विठ्ठल आणि संकष्टीला गणपतीच्या देवळात जाणे ठरलेले असे. तिथे जाऊन कुणापुढे नारळ फोडणे, कुठे ओटी भरणे, कुठे तिथल्या दिव्यात तेल घालणे, कुठे अभिषेक करवणे वगैरे विधी अधून मधून होत असत. गांवात रामाचे मंदीरसुध्दा होते, पण त्याचे दर्शन घेण्याचा कुठला वार किंवा तिथी ठरलेली नव्हती. दरवर्षी होणा-या रामनवमीच्या सोहळ्याखेरीज एरवी कधी रामाच्या देवळात गेल्याचे मला आठवत नाही. घरातल्या देवांच्या सिंहासनात इतर अनेक मूर्ती होत्या, रांगणारा बाळकृष्णसुध्दा होता, पण रामाची मूर्ती कांही नव्हती. नाही म्हणायला दिवाणखान्यात अनेक देव देवता, साधुसंत आणि पूर्वजांच्या फोटोबरोबर रविवर्म्याने काढलेले रामपंचायतनाचे फ्रेम केलेले चित्र होते. पण कधी त्याला हार घातलेला आठवत नाही. एकंदरीत आमच्या घरातल्या रोजच्या पूजाअर्चेच्या विधीमध्ये रामाचा समावेश नव्हता. माझ्या ओळखीत तरी मी इतर कोणाकडेही तो पाहिला नाही. आमच्या गांवातले राममंदीर आणि नाशिकचे काळा राम व गोरा राम वगळता इतर कुठल्या गांवातले राममंदीरसुध्दा मला पाहिल्याचे स्मरणात नाही. मुंबईला गिरगांवात मराठी लोकांचे आणि माटुंग्याला मद्रासी लोकांचे अशी रामाची मंदिरे आहेत असे नुसते ऐकले आहे.

उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे खूप महत्व आहे. अनेक लोक त्याची पारायणे सारखी करत असतात. कांही लोकांना ते तोंडपाठ असते. रामचरितमानसातल्या दोह्यांवर आधारलेले सवाल जवाब किंवा अंताक्षरीचे कार्यक्रमदेखील तिकडे होतात इतके ते सर्वश्रुत आहे. रामचरितमानसाइतके लोकप्रिय रामायणाचे पुस्तक महाराष्ट्रात नाही. आमच्या घरी रामविजय नांवाची एक पोथी होती ती माझ्या आईला अत्यंत प्रिय होती. एकादे कथाकादंबरीचे पुस्तक कुठेही, केंव्हाही बसून किंवा पडल्या पडल्या संवडीने वाचता येते, मधला कंटाळवाणा भाग वाटल्यास वगळता येतो किंवा ते पुस्तक वाचणेच अर्धवट सोडता येते. तसे पोथीच्या बाबतीत करता येत नाही. तिचे पारायण करायचे झाल्यास सचैल स्नान करून पाटावर बसून त्यातील अक्षर अन् अक्षर स्पष्ट उच्चार करीत वाचायचे असते. सुरू केलेला अध्याय मध्येच सोडता येत नाही आणि सुरू केलेले पारायण पूर्ण करून त्याची विधीवत यथासांग समाप्ती करावी लागते. लहान मुलांना हे सगळे शक्य नसल्याने मला ती पोथी वाचायची फारशी संधी मिळाली नाही. पण जेवढी श्रवणभक्ती करता येणे शक्य झाले त्यावरून त्या पोथीत रामाच्या चरित्राची गोष्ट अत्यंत रसाळ शब्दात सांगितली आहे एवढे नक्की समजले. रामनामाचा जप, रामरक्षा आणि या पोथीच्या पारायणाखेरीज रामाची अन्य कोणती उपासना आमच्या घरी होत नव्हती.

रामदासस्वामी पूर्णपणे रामभक्त होते. त्यांना जगात चोहीकडे श्रीरामाचे दर्शन होत होते. कंबरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठोबाला पाहून त्यांनी ” इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा” असे विचारले होते. पण त्यांनीसुध्दा श्रीरामाची मंदिरे उभी करण्याऐवजी हनुमंताची देवळे बांधून त्यातून जनतेचे बलसंवर्धन करण्यासाठी प्रचार केला असे दिसते. आजही गांवागांवात जेवढी मारुतीची देवळे दिसतात तेवढी श्रीरामाची दिसत नाहीत.

—–

श्रीराम जयराम

लवकरच रामनवमी येत आहे. त्यानिमित्य रामाविषयीच्या काही आठवणी आणि विचार प्रस्तुत केले आहेत. संपादन दि. २४-०६-२०२१ :श्रीरामाचे एक गीत

मला समजायला लागल्यापासून अगदी रोजच रामाचे नांव या ना त्या कारणाने कानावर पडतच आले आहे. पाहुण्यांचे स्वागत किंवा बोलण्याची सुरुवात “रामराम”ने होते. कधी कधी हा मनाविरुध्द केलेला ‘जुलुमाचा रामराम’ असतो. निरोप घेतांना पुन्हा “अमुचा रामराम घ्यावा ” असे म्हणतात. कामाचा पसारा फार झाला तर त्याचा ‘रामरगाडा’ होतो आणि बरेच वेळा ‘रामभरोसे’ रहावे लागते. एकादी अनपेक्षित किंवा कल्पनातीत घटना पाहिली की इंग्रजाळलेले लोक ‘ओ गॉड!’ म्हणतात, तसे आमच्याकडे वेगळ्या पट्टीमध्ये ‘राम राम’ किंवा ‘रामा रामा’ म्हणतात. असंभव या मालिकेतले दीनानाथ शास्त्री सारखे “श्रीराम श्रीराम” म्हणत किती छान उसासे सोडत असतात! रोज सकाळी टीव्हीवरचे ‘राम राम पाटील’ नवनवे विषय घेऊन आपल्या भेटीला येतात. रामराव, रघुनाथ किंवा रघू, रामप्रसाद, रामअवतार, रामनाथन, रामदुराई यासारखे रामाचे नांव धारण केलेले आपल्या ओळखीतले कोणी ना कोणी हटकून भेटतच असे. निवृत्तीनंतर माझा जनसंपर्क कमी झाला असला तरी टी.व्ही. पहाणे वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातली माणसे भेटली नाहीत तर पडद्यावरली पात्रे दिसतात.

रामाचा उल्लेख असलेली शेकडो लोकप्रिय मराठी आणि हिंदी गाणी आहेत. ‘रामा रघूनंदना’, ‘रघुनंदन आले आले’, ‘उठी श्रीरामा पहाट झाली’, ‘विजयपताका श्रीरामाची’, ‘कौसल्येचा राम बाई’, यासारखी मराठी आणि ‘रामचंद्र कह गये सियासे’, ‘रामा रामा गजब हुई गवा री’, ‘रामजीकी निकली सवारी’, ‘राम करे ऐसा हो जाये’, ‘हरे कृष्ण हरे राम’ यासारखी हिंदी गाणी यातले एकादे तरी गाणे अधून मधून कानावर पडते. त्याशिवाय ‘रामका गुणगान करिये’ आणि ‘रामरंगी रंगले’ वगैरे शास्त्रीय संगीतातली भजने आहेतच. लहानपणी भेंड्या खेळतांना ‘र’ हे अक्षर आले की फार चांगले वाटायचे, कारण रामाची अनेक गाणी तर आहेतच शिवाय रामाच्या श्लोकांनी भरलेला रामरक्षेचा मोठा रिझर्व्ह स्टॉक असल्यामुळे हरण्याची चिंता नसायची.

माझ्या लहानपणच्या बहुतेक मित्रांना रामरक्षा तोंडपाठ असायची. सगळ्या मुलांनी रोज संध्याकाळी शुभंकरोती म्हणून झाल्यानंतर परवचे आणि रामरक्षा म्हणायची त्या काळी पध्दतच होती. त्यामुळे मला रामरक्षा पुस्तकातून वाचायला येण्यापूर्वीच ती ऐकून ऐकून पाठ झाली होती. त्यातल्या संस्कृत शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना त्यांना कांही अर्थ असतो किंवा असायला हवा असा विचारही तेंव्हा मनाला शिवत नव्हता. पुष्कळ पुढल्या काळात संस्कृत आणि इतर भाषाविषयांचे शिक्षण घेतल्यानंतर त्यातला थोडा थोडा अर्थ समजू लारला आणि विविध अलंकार लक्षात येऊ लागले.

रामरक्षेच्या सुरुवातीचाच “ध्यायेदाजानुभावं धृतशरधनुष्यं बध्दपद्मासनस्थं।” हा श्लोक (समजला तर) साक्षात रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर उभी करतो. लहानपणी आम्हाला मात्र त्यातली कमी अधिक होणारी लय तेवढी मजेदार वाटायची. या श्लोकातली जोडाक्षरे आणि विषेषतः धृतशरधनुष्यं, नवकमलमिलल्लोचनं असे शब्दप्रयोग न अडखळता म्हणता आले की बोलण्यातला बोबडेपणा संपला अशी स्पष्ट उच्चाराची एक त-हेची परीक्षा होती. “शिरोमे राघवः पातु भालं दशऱथात्मजः। कौसल्येयो दृषौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।” या श्लोकात डोके, कपाळ, कान, नाक, डोळे वगैरेंचे रक्षण करण्यासाठी रामाची जी वेगवेगळी नांवे घेतली आहेत त्यातून त्याचे कुल, आईवडील, बंधु, गुरू वगैरेंची माहिती होते. “स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः।” म्ङणजे दिव्य अस्त्रांनी भरलेला भाता खांद्यावर बाळगणारा राम माझ्या खांद्याचे रक्षण करो आणि शिवधनुष्य भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो या ओळी किती समर्पक आहेत? “सुग्रीवेश कटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभू” वगैरेमधून रामाच्या भक्तांचे उल्लेख येतात. रामरक्षेतील या श्लोकांमधून रामाच्या चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टी तर समजतातच, शरीरशास्त्राचीसुध्दा थोडी तोंडओळख होते. शास्त्रविषय शिकवण्याची किती मजेदार रीत होती ना?
“रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।”
या श्लोकात राम या नामाच्या प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे “रामः रामौ रामाः .. प्रथमा ” पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता. शार्दूलविक्रीडित या वृत्तात असल्यामुळे हल्ली हा श्लोक मंगलाष्टकांच्या स्वरूपात कानावर पडतो. खाली दिलेल्या एका श्लोकात रामायणाचे सार दिले आहे.
आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगम् कांचनम् ।
वैदेहीहरणम् जटायुमरणम् सुग्रीवसंभाषणम् ।।
वालीनिर्दलनम् समुद्रतरणम् लंकापुरीदाहनम् ।
पश्चाद्रावणकुंभकर्णहननम् एतद् हि रामायणम् ।।
रामायणावर आधारलेल्या असंख्य उत्तमोत्तम कृती आहेत. गदिमांच्या गीतरामायणाचे वर्णन थोडक्यात करताच येणार नाही. त्यावर तर एक स्वतंत्र लेखमालाच लिहावी लागेल. तुलसीदासाच्या रामचरितमानसाचे पारायण नवरात्राचे नऊ दिवस चालते. त्याबरोबरच अभिनय करून रामलीलेमधून रामायणातले प्रसंग रंगमंचावर उभे करतात. खरे तर आपले जीवन रामाने इतके व्यापलेले आहे की जेंव्हा एकाद्या गोष्टीत अर्थ किंवा स्वारस्य नसेल तर “त्यात राम नाही” असे म्हणतात. एरवी सगळीकडे राम भरलेलाच असतो!

**********************************

श्रीरामाचे एक गीत :

शौनक अभिषेकींच्या आवाजातील श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं .

नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼