अमेरिकेची लघुसहल – ९ – वॉशिंग्टन डीसी १

WDC 1capitol

अमेरिकेच्या लघुसहलीच्या दुस-या दिवशी सकाळी नायगाराच्या धबधब्याच्या परिसरात भरपूर वेळ घालवून आणि दुपारी कॉर्निंग ग्लास म्यूजियम पाहून झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामाला आम्ही मेरीलँड राज्यामधल्या एका गांवी मुक्कामाला जाऊन पोचलो. तिसरे दिवशी सकाळी उठून लगेच पुढल्या प्रवासाला लागायचे होते. आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो, तिथल्या खोलीतल्या छोट्याशा स्वच्छतागृहात व्यवस्थितपणे उभे राहून कपडे बदलण्याइतकीसुध्दा जागा नव्हती, हवेत चांगलाच गारठा होता आणि आमच्याकडे फार वेळही नव्हता, त्यामुळे प्रातःस्नान वगैरे करायचा विचारही आमच्यातल्या कोणाच्या मनात आला नाही. या टूर पँकेजमध्ये नाश्त्याचा अंतर्भाव नव्हताच. खोलीत ठेवलेल्या किटलीत पाणी उकळून कॉफी तयार करून ती बिस्किटांच्या सोबतीने प्यालो आणि आंघोळीच्या गोळ्या घेऊन बसमध्ये जाऊन बसलो. उजाडतांच आमची बस वॉशिंग्टन डीसीच्या मार्गाला लागलीसुध्दा. संपूर्ण देशाची राजधानी असल्यामुळे तिथे अनेक सरकारी कार्यालये आहेत, तसेच पर्यटकांसाठी खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे तिथल्या ऑफीसांमध्ये काम करणारे कर्मचारी, तिथे आपापली कामे करवून घेण्यासाठी येणारे नागरिक, ते शहर पहायला येणारे टूरिस्ट आणि या सर्वांना विविध सेवा उपलब्ध करून देणारे व्यावसायिक अशा सगळ्या लोकांचीच सकाळ होताच वॉशिंग्टन डीसी कडे जाण्यासाटी धडपड सुरू होते. सर्व दिशांनी त्या शहराच्या दिशेने जाणारे सारे रस्ते वाहनांनी दुथडी वाहू लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही मुद्दाम शक्य तितके लवकर निघालो होतो. तरीसुध्दा शहराच्या जवळ जाता जाता गर्दीचा मुरंबा (ट्रॅफिक जॅम) सुरू झाला आणि तो दाट होत गेला. अमेरिकेतल्या सगळ्याच मोठ्या शहरात अनेक उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते बांधून ट्रॅफिक सिग्नल टाळण्यात आले असल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक त्या कारणाने सहसा कधी पूर्णपणे बंद पडत नाही, पण वाहनांची संख्या फार जास्त झाल्यामुळे त्याची गती मात्र मंदावते. हळूहळू पुढे सरकता सरकता दुरूनच वॉशिंग्टन मेमोरियलचा उंच मनोरा दृष्टीला पडला आणि सर्वांना हायसे वाटले.

देशाच्या पूर्वेकडील भागातल्या वॉशिंग्टन डीसी इथे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानी आहे एवढे तरी जगातील सर्वच सुशिक्षित लोकांना माहीत असते. अमेरिकेच्या पश्चिम किना-यावर वॉशिंग्टन नांवाचे एक राज्य आहे. त्याच्या नांवाबरोबर गल्लत होऊ नये म्हणून नेहमी राजधानीच्या शहराचा उल्लेख ‘वॉशिंग्टन डीसी’ असा केला जातो. बहुतेक अमेरिकन लोक तर फक्त ‘डीसी’ एवढेच म्हणतात. अमेरिका (म्हणजे यूएसए) हे आजच्या जगातले सर्वाधिक बलशाली राष्ट्र आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही देशाच्या कारभारात हस्तक्षेप करायचा त्याला हक्क आहे अशी एक समजूत आहे. पूर्वीच्या काळातले बलिष्ठ सम्राट, ताकतवान बादशहा वगैरे लोक इतर राज्यांवर सरळ सरळ आक्रमण करीत आणि जिंकलेल्या देशाचा खजिना लुटून आणत असत. तो राजा शरण आला आणि त्याने गयावया केली तर त्याच्याकडून जबरदस्त खंडणी वसूल केली जात असे. आजकाल तसे करत नाहीत. मोठे देश लहान देशांना शस्त्रास्त्रे, यंत्रसामुग्री वगैरे विकत घ्यायला लावतात आणि ते पुरवणा-या कंपन्यांकडून कराच्या रूपाने पैसे गोळा करतात. त्यामुळे तिथली सरकारे प्रत्यक्ष खंडणी वसूल करत नसली तरी जगभरातून संपत्तीचा ओघ त्या दिशेने वहात असतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय धोरणांचा परिणाम जगभरातल्या इतर मित्र किंवा शत्रूराष्ट्रांच्या तसेच तटस्थ राष्ट्रांच्याही धोरणावर होत असतो. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या अंतर्गत कारभारामुळे तिथल्या कुठल्याही बाजारावर त्याचा प्रभाव पडला तर त्याचे पडसाद जगभरातील इतर बाजारांत उमटतात. अशा कारणांमुळे वॉशिंग्टन डीसी ही एका अर्थाने सध्याच्या जगाचीच राजधानी झाली आहे, निदान ती राजकीय दृष्ट्या जगाच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणता येईल.

शेती, व्यापार, कारखानदारी वगैरे उद्योग व्यवसाय अमेरिकेत पहिल्यापासून पूर्णपणे खाजगी मालकीचेच आहेत. ते स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयोग तिथल्या सरकारने कधी करून पाहिला नसावा. रस्ते बांधणी, रेल्वेमार्ग उभारणे आणि त्यावर धांवणा-या मोटारगाड्या, ट्रेन्स, इतकेच नव्हे तर आकाशात उडणारी विमाने आणि पाण्यातल्या आगबोटी वगैरे नागरी वाहतूकीची सारी साधने, तसेच शिक्षण, मनोरंजन आदि बहुतेक गोष्टी तिथे खाजगी क्षेत्रात आहेत. इतकेच नव्हे तर शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने आणि अग्निबाणसुध्दा खाजगी क्षेत्रात असलेल्या काही कारखान्यांत तयार होतात. राज्य सरकारांना बरीच स्वायत्तता असून कायदा आणि सुव्यवस्था, न्यायसंस्था वगैरे खाती त्यांच्या अखत्यारीत येतात. अर्थ, परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण अशी मोजकीच क्षेत्रे केंद्र सरकारकडे आहेत. त्यातली परराष्ट्रसंबंध आणि संरक्षण ही फक्त खर्चाचीच आणि चांगलीच खर्चिक खाती आहेत आणि त्यांचा खर्च चालवण्यासाठी कररूपाने निधी गोळा करणे हे केंद्र सरकारचे मुख्य काम समजले जाते.

अमेरिकेतील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील संस्थानांना सोयिस्कर अशा ठिकाणची ही जागा प्रत्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टननेच राजधानीसाठी निवडली होती. त्या जागेवर अमेरिकेच्या राजधानीचे हे शहर तत्कालिन प्रसिध्द वास्तुविशारदाच्या देखरेखीखाली अत्यंत व्यवस्थितपणे नियोजन करून वसवले गेले आहे. या शहरात सुंदर इमारती, विस्तीर्ण उद्याने, त-हेत-हेची वस्तुसंग्रहालये, स्मृतीस्थाने वगैरेंची नुसती रेलचेल आहे. गेल्या दोन शतकांमधील वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमूने इथे पहायला मिळतात. जिकडे नजर जाईल तिकडे कांही तरी सौंदर्यच पहायला मिळेल असे वाटत राहते.

. .  . . . . .  . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल – ८ – कॉर्निंग ग्लास सेंटर

कॉर्निंगग्लास

नायगाराच्या धबधब्याच्या सान्निध्यात तीन तास घालवतांना त्याचे सौंदर्य सर्व बाजूंनी पाहून डोळ्यात भरून घेतले, कड्यावरून खाली झेपावणा-या पाण्याचा कल्लोळ कानात घुमत राहिला होता, पोटपूजा करून पोटही भरून घेतले आणि आमची बस पुढील प्रवासाच्या मार्गाला लागली. अमेरिकेतल्या फॉल सीजनमध्ये रंगीबेरंगी साजशृंगाराने नटलेल्या वृक्षराईचे सौंदर्य दोन्ही बाजूला पसरले होते. ते न्याहाळत तीन साडेतीन तासांनंतर आम्ही कॉर्निंग ग्लास सेंटरला जाऊन पोचलो. या ठिकाणी कांचेच्या खास वस्तूंचे सुंदर संग्रहालय आहे, तसेच पर्यटकांनी, विशेषतः लहान मुलांनी या जागी भेट देऊन कांच या पदार्थाबद्दल मनोरंजक माहिती मिळवावी यासाठी तिथे छान व्यवस्था केली आहे.

कॉर्निंग ही कांचसामान तयार करणारी जगातली एक अग्रगण्य कंपनी आहे. अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेल्या नाजुक शोभिवंत वस्तूपासून ते बंदुकीच्या गोळ्यांनासुध्दा दाद न देणा-या बुलेटप्रूफ कांचेपर्यंत आणि ग्लासफायबरसारख्या बारिक तंतूपासून ते विकिरणांना प्रतिरोध करणा-या शिशासारख्या जड आणि जाड लेडग्लासपर्यंत सारे कांही कांचेचे सामान ही कंपनी तयार करते. बाहेरून दिसणारा त्या इमारतीचा आकार आणि जेथपर्यंत आम्हाला नेले गेले तिथून दिसणारा अंतर्भाग पाहता या कारखान्याच्या अवाढव्य पसा-याचा अंदाज आला.

कांचेपासून वस्तू कशा प्रकारे निर्माण करतात याचे प्रात्यक्षिक दाखवणारा एक सुनियोजित कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर चाललेला असतो. आमच्या आधी तेथे पोचलेली पर्यटकांची तुकडी बाहेर निघताच आम्ही त्या खास सभागृहात प्रवेश केला. तिथेच ठेवलेल्या एका छोट्याशा भट्टीमधून एका कुशल कारागीराने रसरसत्या कांचेचा एक छोटासा गोळा बाहेर काढला, त्यात जोराने फुंकर मारून त्याला चांगले फुलवले आणि लांब दांड्यांच्या विविध हत्यारांच्या सहाय्याने त्याला वेगवेगळे आकार दिले, त्या गोळ्याला निरनिराळ्या रंगांच्या भुकटीत लोळवून त्याला वेगवेगळ्या छटा दिल्या आणि बोलता बोलता त्यातून एक सुरेख फ्लॉवरपॉट तयार करून दाखवला. माझे सारे सहप्रवासी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्याचे कसब पहात राहिले. यापूर्वीही मी अनेक जागी ग्लायब्लोइंग पाहिलेले असल्यामुळे मला तांत्रिक दृष्टीने पाहता त्यात कांही नवीन गोष्ट दिसली नसली तरी त्या कलाकाराचे हस्तकौशल्य आणि मुखकौशल्य मात्र निश्चितपणे वाखाणण्याजोगे होते.

वीस पंचवीस मिनिटांचे हे प्रात्यक्षिक पाहून झाल्यानंतर आम्ही त्या जागी असलेले प्रदर्शन पाहिले. ऐतिहासिक काळापासून अद्ययावत जमान्यापर्यंत वेगवेगळी तंत्रे वापरून तयार केलेल्या काचेच्या असंख्य वस्तू त्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडून ठेवल्या होत्या. जवळजवळ साडेतीन हजार वर्षांपासून माणूस कांच बनवत आला आहे हे मला माहीत नव्हते. संपूर्णपणे कांचेपासून तयार केलेला एक राजमहाल आणि एक नौका या वस्तू मला फार आवडल्या. याशिवाय अनेक प्रकारचे पेले, सुरया, तबके वगैरे नक्षीदार वस्तू होत्याच.

कॉर्निंग ग्लास सेंटर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढला प्रवास सुरू केला आणि वॉशिंग्टन डीसीच्या जवळपास कुठेशी रात्रीच्या मुक्कामाला जाऊन पोचलो. पुन्हा पुन्हा अमेरिकन बर्गर किंवा सँडविचेस वगैरे पचायला जड पदार्थ खाण्यापेक्षा या वेळी थोडे हलकेफुलके चिनी भोजन खाणे बरे वाटले आणि त्या गावात ते मिळालेसुध्दा. आमचा टूरच चिनी लोकांनी अरेंज केला होता आणि त्यात निम्मे तरी चिनी होते आणि त्यांच्या शिवाय इतर अनेक आशियाई प्रवासी असल्यामुळे चांगले चिनी हॉटेल असलेल्या ठिकाणीच आमच्या रहाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. ज्यांना चायनीज नको होते त्यांच्यासाठी मॅक्डोनाल्ड आणि केएफसी वगैरे पर्याय होतेच. आदल्या दिवसाप्रमाणेच दुस-या दिवशी सकाळी करायच्या नास्त्याची बेगमी करून घेतली आणि हॉटेलातल्या उबदार अंथरुणावर अंग टाकले.

अमेरिकेची लघुसहल – ७ -दुसरा दिवस -४ नायगारा- न पाहिलेल्या गोष्टी

Niagarablog4

चाळीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो त्या काळात त्या जागेपर्यंत जाऊन पोचणे हेच एक दिव्य होते आणि ते करायला आलेल्या माणसांना पहायला कुतूहलाने जे कोणी पशुपक्षी बाहेर आले असतील तेवढेच जीव आमच्यासोबत होते. गोकाकजवळ असलेला घटप्रभा नदीवरचा धबधबा तसा मनुष्यवस्तीपासून जवळ असला तरी तो पहाण्यासाठी ज्या वेळी आम्ही तेथे गेलो होतो तेंव्हा तरी आमच्याव्यतिरिक्त आणखी कोणीच तेथे दिसले नाही. भेडाघाटचा धबधबा जेंव्हा मी पहिल्यांदा पाहिला त्या वेळी वाळूतून मैलभर चालत जातायेतांना वाटेत भेटलेली माणसे धरून एकंदर पन्नाससाठजण भेटले होते. पण अलीकडे मी तेथे गेलो तेंव्हापर्यंत तिथल्या रस्त्यात खूप सुधारणा झाली होती, एवढेच नव्हे तर धबधब्यावरून खाली कोसळणारे पाणी अगदी जवळून पहाता यावे यासाठी खास प्लॅटफॉर्म उभे केलेले दिसले. परगांवाहून आलेले पर्यटक आणि सहलीला आलेले स्थानिक यांनी तो भाग फुलून गेला होता. नायगाराचा धबधबा पाहायला जगभरातून येणारे पर्यटक आणि त्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत यांचा विचार करता ही एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे आणि मार्केटिंगच्या बाबतीत अग्रणी असलेल्या अमेरिकन लोकांनी त्या दृष्टीने जे जे कांही उभे करून ठेवले आहे ते कल्पनातीत आहे असे म्हणता येईल.

अमेरिकेतल्या तीन वेगवेगळ्या पॉइंटवरून आम्ही या धबधब्याच्या तीन धारा पाहिल्याच, यापूर्वी कॅनडामधून हॉर्सशूफॉलकडे पहात पहात मी चांगला तासभर तिथल्या घळीच्या कांठाकांठाने बांधलेल्या रस्त्यावर फिरलो होतो. मेड ऑफ द मिस्ट च्या बोटीत बसून आम्ही खळाळणा-या प्रवाहातून धबधब्याच्या जवळजवळ खाली पोचलो आणि केव्ह ऑफ द विंडमध्ये जमीनीवरून धबधब्याच्या आंतल्या अंगाला जाऊन समोर कोसळणा-या पाण्याच्या धागा जवळून पाहिल्या. नायगाराचा इतिहास सांगण्याच्या निमित्याने त्याची विविध रूपे दाखवणारी चित्रफीत पाहिली होती. त्याशिवाय उंच मनो-यावरून दिसणारे खालचे विहंगम दृष्यसुध्दा पूर्वी पाहिले होते. याहून आणखी वेगळे काय पहायचे राहिले असे कोणालाही वाटेल. पण अमेरिकन लोकांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल इतक्या त-हत-हेच्या सोयी या ठिकाणी करून ठेवल्या आहेत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्यावर लेजरबीम्सचे झोत सोडून त्याला रंगीबेरंगी करण्यात येते याबद्दल मी ऐकले होते, पण हे पाहण्याची व्यवस्था आमच्या टूरमध्ये समाविष्ट नसल्याचे ऐकल्यावर थोडा कट्टू झालो होतो. नायगाराला आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी केलेल्या त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी तिथे गेल्यानंतर समजल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला वेळही नव्हता, आमच्याकडे जास्तीचे पैसेही नव्हते आणि मुख्य बाबी पाहून झाल्यानंतर त्याचे एवढे वैषम्य वाटले नाही.

नायगाराच्या व्हिजिटर सेंटरच्या बाहेरच एक मोठे फुलांचे उद्यान आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या सरोवरांचे आकार या उद्यानात हिरवळीमधून दाखवले आहेत. नायगरा गॉर्ज डिस्कव्हरी सेंटरमध्ये ही सरोवरे आणि नद्या कशा तयार झाल्या याची कुळकथा चित्रांमधून दाखवली आहे. तिथल्या मत्स्यालयात दीड हजार प्रकारचे जलचर तसेच पेंग्विनसारखे पक्षी पहायला मिळतात. जेअरडेव्हिल म्यूजियममध्ये साहसवीरांची साहसी कृत्ये चित्रे आणि चलचित्रे यांतून उभी केली आहेत. भयानक दृष्ये दाखवून घाबरवून सोडण्यासाठी एक भुताटकीचे घर (हाँटेड हाऊस) आहे. आधुनिक युगातली प्रगती इथल्या एरोस्पेस म्यूजियममध्ये पहायला मिळते. आर्ट अँड कल्चरल सेंटरमध्ये नानाविध कलांचे दर्शन घडते. लंडनच्या प्रसिध्द मादाम तूसादच्या धर्तीवर बनवलेल्या हाउस ऑफ वॅक्समध्ये मोठमोठ्या प्रसिध्द व्यक्तींचे पूर्णाक़ती पुतळे ठेवले आहेत. स्कूबा सेंटरमध्ये जाऊन पाण्यात खोलवर डुबकी मारून येण्याची सोय आहे, तर हॅलिकॉप्टरमध्ये बसून वरून खालचे दृष्य पहायची व्यवस्था आहे. अॅनिमेटेड राइडमध्ये बसून चक्क धबधब्यावरून पाण्याबरोबर खाली कोसळल्याचा (खोटा) अनुभव घेण्याची व्यवस्था एका ठिकाणी केलेली आहेत. ही कांही उदाहरणे झाली, अशासारख्या अनंत गोष्टी त्या जागी आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या सुखसोयींनी युक्त अशी ज्याच्या त्याच्या खिशाला परवडणारी किंवा कापणारी अनेक हॉटेले, कॅसिनोज आणि रेस्तराँज तर आहेतच.
————————————————————————————————–

अमेरिकेची लघुसहल ६- दुसरा दिवस -३ नायगारा -३

niagaraBlog3

नायगाराच्या धबधब्यावरून पडणा-या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्या जागी एक लांब, रुंद आणि खोल अशी दंतुर आकाराची मोठी घळ तयार झाली आहे. या घळीच्या कांठाकांठाने वेगवेगळ्या ठिकाणांवरून तिथल्या तीन धबधब्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. त्यातील प्रत्येक पॉइंटला जाण्यासाठी पक्का रस्ता, त्या जागी निरीक्षण करीत उभे राहण्यासाठी विस्तीर्ण जागा, सुरक्षेसाठी मजबूत असे कठडे अशा सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. त्याखेरीज घळीच्या तळाशी जाऊन समोरून खाली पडणारे पाण्याचे प्रवाह पाहण्यासाठी अनेक सोयी आहेत. त्यातल्या दोन व्यवस्था पाहण्याचा समावेश आमच्या सहलीच्या कार्यक्रमात होता.

मेड ऑफ दि मिस्ट या नांवाची वाहतूक कंपनी मोटर लाँचमधून या नदीतून फिरवून आणते. तीन्ही जागी धबधब्यातून पडणारे पाणी खालच्या एकाच मोठ्या डोहात एकमेकांमध्ये मिसळते आणि त्याचा खळाळता प्रवाह नदीच्या पात्रातून वहात वहात पुढे ओंटारिओ सरोवराकडे जातो. धबधब्याच्या पातळीवरून दरीत खाली उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. कॉलेजात असतांना मी गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो. त्या काळी खाली उतरण्यासाठी मातीच्या उतारावर पाय-या होत्या. त्यातून घसरत आणि धडपडत आम्ही मित्रमंडळी खाली उतरून गेलो होतो आणि जमीनीला दोन्ही हात टेकून रांगत रांगत वर चढून आलो होतो. त्या तरुण वयात ते शक्य होते आणि त्यात खूप मजाही वाटली होती, पण आता त्याचा विचारसुध्दा केला नसता. नायगाराला मात्र अपंग माणूस सुध्दा व्हीलचेअरवर बसून खालपर्यंत जाऊ शकतो. त्या खोल घळीच्या एका किना-यावर एक उंचच उंच पोकळ खांब उभा करून त्यावर मोठा प्लॅटफॉर्म केला आहे. वरील बाजूच्या इमारतीतून तिथपर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पुलावरून तिथपर्यंत गेलो आणि लिफ्टने खाली उतरलो. याचे इंजिनिअरिंगसुध्दा थक्क करणारे आहे.

खाली मोटर लॉँचचा धक्का आहे. त्यात जाण्यापूर्वी सर्व पर्यटकांना एक निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा रेनकोट देतात. तो अंगावर चढवणे आवश्यक आहे. खळाळत्या पाण्यातून ती बोट हिंडकळत पुढे पुढे जाते आणि एकेका धबधब्याचे दृष्य अगदी जवळून पहायला मिळते. इतक्या उंचीवरून खाली पडतांनाच त्या पाण्याचा अवाढव्य असा शॉवर झालेला असतो. त्याची धार शिल्लक रहात नाही. शिवाय खाली पडलेल्या पाण्याचे असंख्य तुषार पुन्हा कारंज्यासारखे उंच उडत असतात. ते अंगावर घेत घेत फिरायला अपूर्व मजा येते. जोराचा थंडगार वारा सुटलेला असल्यामुळे अंगावर पुरेसे गरम कपडे असणे आवश्यक होते. त्या डोहात अर्धा पाऊण तास चक्कर मारून एक वेगळा थरारक असा अनुभव गांठीला बांधून परत आलो.

त्यानंतर केव्ह ऑफ दि विंड नांवाच्या जागी गेलो. धबधब्याच्या खाली डोंगराच्या कड्याच्या कांठाकांठाने चालत जायची एक वळणावळणाची वाट बांधली आहे. या ठिकाणी अंगावर पिवळा रेनकोट आणि पायात प्लॅस्टिकचे सँडल्स घालून त्या निसरड्या वाटेवरून फिरून यायचे. काही कांही ठिकाणी अनेक पाय-या चढाव्या आणि उतराव्या लागतात. या पदयात्रेत सगळीकडेच जवळ जवळ मुसळधार पाऊस पडत असल्याचा भास होतो. थेट धबधब्याच्या खाली उभे राहून वरून बदाबदा पडणारे पाणी त्याचा प्रचंड आवाज ऐकत पहाणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे. त्या जागेच्या नांवावरून तिथे एकादे विंड टनेल असेल असे मला आधी वाटले होते. तसा गार वारा वहात होता, पण भुयार मात्र नव्हते. पैसे खर्च करून आणि शरीराला कष्ट देऊन असा थरारक अनुभव घ्यावा असे माणसाला कां वाटते याचे मात्र कोडे पडते.

या परिसरात एक पार्क आहे. त्याच्या प्रवेशद्वारापाशी निकोला टेसला या संशोधकाचा पुतळा उभा केला आहे. नायगारा धबधब्यापासून वीजनिर्मिती करणारी यंत्रसामुग्री बसवून त्याचा उपयोग करण्याचे काम त्याने केले. या खेरीज अनेक चित्तवेधक जागा या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या आम्ही पाहू शकत नव्हतो. पुरेसा वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर त्या ठिकाणी दोन तीन दिवस मुक्काम करूनच त्या पाहता येतील. पण महत्वाच्या आणि प्रसिध्द गोष्टी पाहून त्या सहलीचे सार्थक झाल्याचे समाधान बरोबर घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.

अमेरिकेची लघुसहल ५- दुसरा दिवस -२ नायगारा -२

niagaraBlog2

नायगारावरील चित्रफीत पाहून झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष धबधबा पहायला निघालो. आपल्याला माहीत असलेल्या भारतातल्या किंबहुना जगातल्या बहुतेक सर्व नद्या एकाद्या पर्वतावर उगम पावतात आणि समुद्राला किंवा दुसर्‍या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. पण नायगरा नदी ही या नियमाला अपवाद आहे. कॅनडाच्या सीमेवर असलेल्या पाच महासरोवरांपैकी ईरी या एका सरोवरातून नायगारा नदी निघते आणि ओंटारिओ या दुसर्‍या सरोवराला ती जाऊन मिळते. थोडक्यात ईरी सरोवराचा ओव्हरफ्लो या नदीतून ओंटारिओ सरोवरात होतो. या नदीची लांबी जेमतेम छप्पन मैल आहे. आणि तिला सलग उतार नसून ती एका कड्यावरून धाडकन उडी मारून एकदम खालच्या पातळीवर येते. यातूनच हा धबधबा तयार झाला आहे.

धबधब्याच्या वरच्या अंगाच्या प्रवाहाच्या पात्रात कांही बेटे आहेत. त्यातल्या गोट आयलंड नावाच्या बेटाने नदीचा प्रवाह दुभंगून त्याचा एक भाग कॅनडाच्या प्रदेशातून आणि दुसरा यूएसएमधून वहात जातो आणि वेगवेगळ्या जागी असलेल्या निरनिराळ्या उंच खडकावरून खाली कोसळतो. यूएसएमधील नदीच्या प्रवाहाचे पुन्हा दोन वेगळे भाग होतात आणि एकमेकांच्या जवळच पण वेगळ्या कड्यांवरून खाली येतात. अशा तर्‍हेने एका परिसरातच नायगाराचे तीन स्वतंत्र धबधबे आहेत.

सर्वात लहानसा ब्राइडल वील हा सुमारे १७ मीटर रुंद आणि २५ मीटर उंच आहे, दुसरा अमेरिकन फॉल तीनशे मीटर रुंद आणि असाच २५-३० मीटर उंच आहे आणि तिसरा म्हणजेच सर्वात मोठा हॉर्सशू फॉल मात्र ८०० मीटर रुंद आणि ५० मीटरावर उंच आहे. या भागातली जमीन अतीशय उंचसखल असल्यामुळे यातल्या प्रत्येक धारेमधल्या वेगवेगळ्या बिंदूंपाशीसुध्दा हे आंकडे वेगळे असणार आणि ऋतुमानानुसार त्यातल्या पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने या आंकड्यांत सारखा बदलही होत असतो. ही मोजमापे फक्त अंदाज येण्यापुरती आहेत. या ठिकाणी धबधब्याच्या पायथ्याशी एक खूप मोठे जलविद्युत केंद्र आहे आणि पाण्याचा बराचसा भाग तिकडे वळवला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी कधी कधी धबधब्यावरून पडणारा मुख्य प्रवाह अर्ध्यावरसुध्दा आणला जातो. तरीदेखील तो दर सेकंदाला दीड हजार घनमीटर इतका प्रचंड असतो. हिवाळ्यात सरोवरातले पाणी गोठून गेल्यामुळे त्याचा प्रवाह कमी होतो आणि उन्हाळ्यात ते बर्फ वितळल्यामुळे नायगरा नदीला पूर येतो.

पावसाळ्याच्या दिवसात पुणे मुंबई प्रवासात खंड्याळ्याच्या घाटातून जात असतांना आपल्याला अनेक जलौघ कडेकपारावरून खाली झेपावतांना दिसतात. तशाच प्रकारचा पण मोठ्या आकाराचा ब्राइडल वील हा पहिला आणि लहान धबधबा आहे. त्याच्या पाण्याच्या झिरझिरीत पापुद्र्यातून अनेक झिरमिळ्या लोंबतांना पाहून कोणा कवीमनाच्या संशोधकाला त्यावरून एकाद्या नववधूचा चेहरा आठवला. कपाळाला फुलांच्या मुंडावळ्या किंवा सेहरा बांधलेली भारतीय नववधू किंवा अत्यंत तलम कापडाचा बुरखा (ब्राइडल वील) पांघरलेली ख्रिश्चन ब्राइड यांचा चेहरा म्हंटले तर झाकलेला असतो पण त्या पडद्यातून दिसतही असतो, तसेच या धबधब्याचे रूप आहे, म्हणून त्याला ब्राइडल वील फॉल असे नाव दिले आहे. हा धबधबा पाहण्यासाठी एक खास जागा ठेवली आहे, त्याठिकाणाहून तो व्यवस्थितपणे पाहता येतो.

ब्राइडल वील पाहणे आणि त्या ठिकाणचे फोटो काढणे वगैरे झाल्यानंतर आम्ही अमेरिकन फॉल्स पहायला गेलो. हा धबधबा खूप मोठा आहे. ज्या डोंगरावरून नायगारा नदी खाली उडी मारते त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रत्येक धबधब्याच्या समोरच्या बाजूला दुसर्‍या कंगोर्‍यावर उभे राहून त्याचे छान दर्शन घेता येते. अमेरिकन धबधब्याचा आकार विशाल आहे, तसेच खाली पडत असलेले पाणी खाली पडतांना खालच्या खडकावर आपटून पुन्हा वर उसळी घेते ल्यामुळे उडणारे तुषार खूप उंचवर उडत असतात. ते एकमेकात मिसळून धुक्याचा एक प्रचंड पडदाच उभा असल्यासारखे वाटते. आम्ही सकाळच्या वेळी गेलो असल्यामुळे सूर्याचे किरण या पडद्यावर पडून त्यातून अत्यंत सुरेख असे इंद्रधनुष्य तयार होत होते. खाली पाण्याला टेकलेले आणि वर आभाळापर्यंत पोचलेले ते इंद्रधनुष्य आपल्याबरोबर पुढे पुढे जात असतांना पाहून खूप गंमत वाटत् होती.

अमेरिकन फॉल मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही हॉर्सशू फॉल पहायला गेलो. कॅनेडियन बाजूला असलेला हा सर्वात मोठा आणि खरा नायगरा धबधबा! घोड्याच्या नालेसारखा वक्राकार असलेल्या या भव्य धबधब्याचे दर्शन खरोखरच स्तिमित करणारे आहे. आम्ही यूएसएच्या बाजूला असल्यामुळे आम्हाला या वेळी तो बाजूनेच पहायला मिळाला, पण पूर्वी मी हा धबधबा कॅनडामधून पाहिला होता तेंव्हा त्याचे अगदी समोरून दर्शन झाले होते. त्यावेळी त्या धबधब्याला नजरेसमोर ठेऊन आम्ही निदान तासभर तरी समोरच्या रुंद रस्त्यावर पायी येरझारा घालत होतो. त्याशिवाय कॅनडाच्या भागात असलेल्या उंच मनोर्‍याच्या सर्वात टोकाच्या मजल्यावर असलेल्या फिरत्या रेस्टॉरेंटमध्ये बसून धबधब्याकडे पहात पहात रात्रीचे भोजन घेतले होते. या वेळी पलीकडच्या तीरावर असलेला हा मनोरा सहप्रवाशांना दाखवून मी तिथे गेलो होतो असे सांगून थोडा भाव खाऊन घेतला.

अमेरिकेची लघुसहल ४- दुसरा दिवस -१ नायगारा -१

niagaraBlog1

नायगाराच्या धबधब्याहून खूप उंच असलेले धबधबे आणि नायगारा नदीच्या कांहीपट रुंद पात्र असलेल्या विशाल नद्या आपल्या भारतात आहेत. यातल्या कांही नद्यांना पूर आलेला असतांना त्याना घातलेल्या बंधा-यांवरून खाली झेपावत जाणारे प्रचंड जलौघही मी पाहिले आहेत. नायगारासारखे रुंद धबधबे मी फारसे पाहिले नसले तरी कदाचित जगात इतरत्र असतील असे मला वाटते. पण नायगाराला जेवढी उदंड प्रसिध्दी मिळाली आहे तेवढी इतर कुठल्याही जागेला मिळत नाही. नायगारा नदी फारशी मोठी नसली तरी तिला पहायला येणा-या पर्यटकांचा ओघ मात्र नेहमीच प्रचंड असतो. या पाहुण्यांना निरनिराळ्या प्रकारचा अनुभव देऊन तृप्त करणारे अनेक कल्पक उपक्रम या जागी चालतात. त्या सगळ्याच ठिकाणी हौशी पर्यटकांच्या लांब रांगा लागतात. यात आपली पाळी लवकर येऊन जावी म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर तिथे न्यायचे आमच्या सहलीच्या आयोजकांनी ठरवले होते.

आमच्या भ्रमणकाळात अमेरिकेच्या त्या भागात चांगलीच कडाक्याची थंडी पडू लागली होती. आम्ही तर मुंबईच्या उकाड्यातून तिकडे गेलो असल्यामुळे आम्हाला जरा जास्त हुडहुडी भरत होती. आम्हाला सांगितले गेल्याप्रमाणे आम्ही भल्या पहाटे उठलो तेंव्हा हवेतले तपमान शून्याच्या जवळपास पोचलेले होते. नळाचे पाणी गोठले नसले तरी बर्फासारखे थंडगार होते, त्यामुळे लगेच गीजर सुरू केला. झोपायच्या खोलीत गालिचा अंथरलेला होता, पण बाथरूममधल्या बर्फासारख्या लादीला पाय टेकवत नव्हता. दोन दिवसाच्या प्रवासात ओझे नको म्हणून आम्ही चपला बरोबर नेल्या नव्हत्या. एक टर्किश टॉवेल जमीनीवर अंथरून पायाला लागणारा थंडीचा चटका घालवला. थंडीमुळे दिवसभरात घाम आलेला नव्हताच आणि धुळीशीही संपर्क झालेला नसल्यामुळे शारीरिक स्वच्छतेसाठी सचैल स्नान करण्याची आवश्यकता नव्हती, ते करण्याची तीव्र इच्छा होत नव्हती आणि त्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अमेरिकनांसारखे रहायचे ठरवून गरम पाण्याने हातपायतोंड धुवून घेतले आणि कपडे बदलून आम्ही तयार झालो.

आम्ही युरोपच्या दौ-यावर गेलो असतांना प्रत्येक मुक्कामात रोज सकाळी भरपूर काँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. आम्हाला एकादे दिवशी सकाळी लवकर निघायचे असले तरी खास आमच्या ग्रुपसाठी तो वेळेच्या आधी देण्याची व्यवस्था केलेली असे. अमेरिकेच्या या मिनिटूरमध्ये खाण्यापिण्याची जबाबदारी आयोजकांवर नव्हतीच. हॉटेलची रेग्युलर सर्व्हिस सुरू व्हायला अवधी होता. पण याची कल्पना आधीच देऊन ठेवलेली असल्यामुळे आम्ही आदल्या रात्रीच बन, वेफर्स, फळे वगैरे खाद्यसामुग्री बाजारातून आणून ठेवली होती. शिवाय न्यूजर्सीहून आणलेले आमचे फराळाचे डबे सोबतीला होतेच, पण इतक्या पहाटे काही खाण्याची इच्छा नसल्य़ामुळे गीजरच्या गरम पाण्यात डिपडिप करून गरम गरम चहा बनवला आणि बिस्किटांबरोबर प्राशन केला.

सकाळी उजाडताच आम्ही बफेलो शहर सोडले आणि वीस पंचवीस मिनिटांत नायगराच्या परिसरात जाऊन पोचलो. तो जगप्रसिध्द धबधबा पाहण्याची सर्वांना उत्कंठा असली तरी आधी आम्हाला तिथल्या एका सभागृहात नेले गेले. तिथला शो सुरू व्हायला वेळ होता, म्हणून बाजूच्या स्टॉलवरून सर्वांनी सँडविचेस, बर्गर यासारखे कांही पदार्थ विकत घेतले आणि एका हातात ती डिश आणि दुस-या हातात कोकची बाटली धरून अमेरिकन स्टाइलने हॉलमध्ये प्रवेश केला. अलीकडे मॉल्समध्ये असतात तशासारखे हे लहानसे सभागृह होते, पण त्यात समोरच्या बाजूला अवाढव्य आकाराचा पडदा होता. नायगारा लीजेंड्स ऑफ अॅड्व्हेंचर या नांवाचा एक माहितीपट त्यावर दाखवला गेला.  हजारो वर्षांपूर्वी त्या भागात वास्तव्य करणा-या रेड इंडियन लोकांच्या टोळक्यांचे दृष्य सुरुवातीला पडद्यावर आले. त्यात लेलावाला नांवाची एक सुंदर, धीट आणि मनस्विनी युवती असते. तत्कालीन रीती रिवाजांप्रमाणे टोळीमधील सर्वात बलदंड अशा पुरुषाबरोबर तिचे लग्न ठरवले जाते. पण केवळ वडिलांच्या आज्ञेखातर त्या आडदांड धटिंगणाशी विवाह करणे लेलावालाला मान्य नसते. लग्नसमारंभाच्या रात्रीच ती आपल्या झोपडीतून निसटते आणि घनदाट जंगलात पळून जाते. खलनायकाची माणसे शिकारी कुत्र्यांसारखी तिच्या मागावर जातात. त्यांना चुकवण्यासाठी एका लहानशा नांवेत बसून ती नायगारा नदीत शिरते आणि धबधब्याच्या परिसरातल्या दाट धुक्यात अदृष्य होते. अशी कांहीशी दंतकथा त्या भागातील आदिवासी लोकांमध्ये प्रसृत आहे. त्यानंतर चांदण्या रात्री अधूनमधून तिची अंधुक पण कमनीय आकृती त्या धबधब्याच्या कोसळत्या पाण्यात कोणाकोणाला दिसत राहते अशी समजूत आहे. या प्रेमकथेचे अत्यंत मनोवेधक चित्रण या लघुपटात केले आहे.

त्यानंतर कथानक एकदम पंधरासोळाव्या शतकात आले आणि युरोपातल्या लोकांनी अमेरिकेतील मिळेल त्या भागाचा ताबा घ्यायला सुरुवात केल्याची दृष्ये पडद्यावर आली. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी आधी आदिवासी लोकांना तिथून पिटाळून लावले आणि त्यानंतर आपसात मारामा-या सुरू केल्या. अमेरिकन राज्यक्रांती झाल्यानंतर नायगाराचा तो भाग स्वतंत्र झाला, पण पलीकडचा कॅनडा ब्रिटीशांच्या ताब्यात राहिला. नायगाराच्या परिसरात होऊन गेलेल्या त्या काळातल्या कांही चकमकी आणि लढायांचे छायाचित्रण पडद्यावर जीवंत केले गेले. त्या ऐतिहासिक काळातले गणवेश, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांच्या रणनीती वगैरे सर्व गोष्टी अत्यंत लक्षवेधी स्वरूपात दाखवल्या गेल्या.

सगळी युध्दे संपल्यानंतर त्या भागातल्या नागरी वाहतुकीचा कसा विकास होत गेला, कोणकोणत्या प्रकारच्या नौकांचा उपयोग करून इथल्या नदीचा खळखळता प्रवाह ओलांडण्याचे प्रयत्न करण्यात यश आले, त्यात यशस्वी झालेल्या तसेच कधीकधी अपयशी ठरलेल्या साहसी वीरांच्या गाथा सांगितल्या गेल्या. नायगराचा धबधबा, त्याच्या वरच्या भागात अतीशय वेगाने धांवणारा आणि खाली खळाळत जाणारा पाण्याचा प्रवाह या तीन्ही गोष्टी साहसी लोकांना कांही तरी अचाट करून दाखवण्याची प्रेरणा नेहमीच देत आल्या आहेत. अनेक लोकांनी त्या प्रयत्नात आपले प्राण गमावले आहेत, कांही लोक त्या दिव्यातून सुखरूपपणे बाहेर आले आहेत, तर कांही लोक त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याकारणाने जेमतेम बचावले. यातल्या कांही लोकांच्या चित्तथरारक कथा दाखवल्या गेल्या. विशेषतः एक लहान मुलगा नांवेत बसून वरच्या भागात नदी ओलांडत असतांना ती नांव भोव-यात सापडते त्याची कथा मनाला स्पर्श करते. अनेक धाडशी लोक जिवावर उदार होऊन त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्या मुलाचे प्राण वाचतात. तसेच एक प्रौढ बाई लाकडाच्या पिंपात बसून धबधब्याच्या पाण्याबरोबर खाली कोसळते. खालच्या बाजूला असलेले नावाडी तिचा शोध घेऊन ते पिंप कांठावर घेऊन येतात. आजूबाजूला जमा झालेले तिचे आप्त जसे श्वास रोखून ते पिंप उघडण्याची वाट पहात असतात तसेच प्रेक्षकसुध्दा मुग्ध होऊन पुढे काय होणार याची वाट पहात असतात. ती बाई हंसत हंसत पिपातून बाहेर आलेली पहाताच सर्वजण सुटकेचा निःश्वास सोडतात.

अशा प्रकारची अनेक चित्तथरारक नाट्ये एकमेकात गुंफून या लघुपटात पेश केली गेली. पार्श्वभूमीवर सतत नायगराचा धबधबा निरनिराळ्या अँगलमधून दाखवला जात होता.  वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्याची अनंत रूपे मंत्रमुग्ध करणारी होती. त्याच्या जोडीला रहस्यमय कथा उलगडत जात होत्या. आकर्षक दृष्ये आणि मनोरम पार्श्वसंगीत यांच्या मिश्रणाने तो कार्यक्रम बहारदार असाच होता. त्यात तासभर गेल्याचे कोणालाही वैषम्य वाटले नाही. बहुतेक पर्यटक इतके प्रभावित झाले होते की घरी गेल्यानंतर इतरांना दाखवण्यासाठी या लघुपटाच्या डीव्हीडी त्यांनी विकत घेतल्या.

. . .  ..  . . . ..  . . . (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल – २ – पहिला दिवस – सहस्रद्वीपे

1000Islands

आमच्या बसमध्ये सर्वात जास्त चिनी प्रवासी होते आणि त्यानंतर भरतखंडातून आलेले दिसत होते. आमच्या चिनी वाटाड्याने हंसतमुखाने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रवासाची माहिती दिली. आम्ही ठरलेल्या मार्गावरूनच पण उलट दिशेने प्रवास करून वर्तुळ पूर्ण करणार आहोत आणि एक बिंदूसुध्दा वगळला जाणार नाही असे आश्वासन देऊन या तीन दिवसात आपण कायकाय पहाणार आहोत याची लांबलचक यादी वाचून दाखवली. आम्ही त्या सहलीची पुस्तिकाच पाहिली नसल्यामुळे नायगरा आणि वॉशिंग्टन या दोन शब्दांपलीकडे त्यातून आम्हाला फारसा बोध झाला नाही. पण त्याखेरीजसुध्दा बरेच कांही पहायला मिळणार आहे हे ऐकून सुखावलो.

त्यानंतर त्याने या प्रवासाचे कांही नियम सांगून कांही आज्ञावजा सूचना केल्या. संपूर्ण प्रवासात प्रत्येक प्रवाशाने त्याला दिलेल्या जागेवरच बसले पाहिजे. बसचा नंबर लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा. कोठल्याही ठिकाणी बसमधून उतरल्यानंतर सर्व पर्यटकांनी सतत मार्गदर्शकासोबतच रहाणे उत्तम, पण घोळक्यातून कोणी वेगळा झालाच तर त्याने दिलेल्या वेळेवर बसपाशी येऊन थांबावे. गाईडचा मोबाईल नंबर आपल्याकडील मोबाईलवर सांठवून ठेवावा, पण कृपया “आमच्यासाठी बस थांबवून ठेवा.” असे सांगण्यासाठी त्याचा उपयोग करू नये, वाटल्यास पुढच्या ठिकाणाची चौकशी करून “आम्ही त्या जागी स्वखर्चाने येऊन भेटू.” असे सांगण्यासाठी करावा. तीन दिवसांचा बसचा प्रवास आणि दोन रात्री झोपण्याची सोय एवढ्याचाच समावेश या तिकीटात आहे. त्याखेरीज अन्य सर्व खर्च ज्याने त्याने करायचे आहेत. पोटपूजेसाठी अधून मधून बस थांबवली जाईल, तेंव्हा जवळ असलेल्या कोणत्याही खाद्यगृहात जाऊन ज्याला पाहिजे ते आणि हवे तेवढे हादडून घ्यावे किंवा बरोबर नेण्यासाठी विकत घेऊन ठेवावे, पण वेळेवर बसपर्यंत पोचायचे आहे याचे भान ठेवावे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाण पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यासाठी एकंदर बत्तीस डॉलर गाईडकडे सुरुवातीलाच द्यावेत. गाईड आणि ड्रायव्हर यांना दर डोई दररोज सहा डॉलर टिप द्यायची आहे, ती मात्र टूरच्या शेवटी एकत्रच गोळा केली जाईल. अशा प्रकारचे त्याचे निवेदन बराच वेळ चालले होते. प्रत्येक वाक्य एकदा इंग्लिशमध्ये बोलून त्याचे मँडारिनमध्ये भाषांतर करू तो सांगत होता. यँकीजच्या मानाने त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते आणि बंगाली लोकांशी बोलण्याची संवय असणा-या लोकांना ते समजायला अडचण नव्हती. इंग्लिशमधील वाक्यच मँडारिनमध्ये सांगायला त्याला दुप्पट वेळ लागतो आहे असे वाटून तो कदाचित त्यांना जास्त सविस्तर सांगत असावा अशी शंका येत होती.

त्याचे निवेदन संपल्यानंतर आमची बस सुरू होऊन मार्गाला लागली तोंपर्यंत सव्वानऊ वाजले होते आणि सकाळच्या न्याहरीची वेळ झाली असल्याचे संदेश जठराकडून यायला लागले होते. प्रवाशांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी टूरिस्ट कंपनीकडे नव्हतीच. “सर्व पर्यटक ब्रेकफास्ट करूनच आले असावेत” असे त्यांनी गृहीत धरले होते की “हे चिनी लोक सकाळचा नाश्ताच करत नाहीत.” यावर चर्चा करीत आम्ही आपले फराळाचे डबे उघडून जठराग्नीला आहुती दिल्या. दोन तीन तासानंतर आमची बस एका गॅस स्टेशनवर म्हणजे अमेरिकेतल्या पेट्रोल पंपावर थांबली. बस आणि प्रवासी दोघांनीही अन्नपाणी भरून घेतले.

न्यूयॉर्क शहर सोडून बाहेर पडतांना आमची गाडी अतीशय रुंद अशा महामार्गावरून धावत होती. तोंपर्यंत आम्हाला अमेरिकेत येऊन चार पांच दिवस झाले होते आणि आम्ही रोज फिरतच होतो. त्यामुळे तिकडले महामार्ग, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने, त्यांचा एकत्रित घोंघावत येणारा आवाज, मैल दीड मैल लांब रस्त्यावरील असंख्य वाहने पाहून एक अजस्त्र प्राणी सरपटत जात असल्याचा होणारा भास या सर्व गोष्टींची संवय व्हायला लागली होती. जसजसे आम्ही शहरापासून दूर जात गेलो, रस्त्यांची रुंदी, त्यांवरील वाहनांची गर्दी, बाजूला दिसणा-या इमारतींची उंची आणि संख्या वगैरे सारे कमी कमी होत गेले. थोड्या वेळाने नागरी भाग संपून कंट्री साइड (ग्रामीण भाग) सुरू झाला आणि तोसुध्दा मागे पडून डोंगराळ भाग सुरू झाला. ही सारी न्यूयॉर्क राज्याचीच विविध रूपे असल्याचे समजले.  त्या वेळी फॉल सीजन चालला असल्यामुळे सारे ‘डोंगर’ फक्त ‘दुरून साजरे’च दिसत नव्हते, तर रंगाच्या बरसातीने ते चांगले सजले होते. शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी लहानसा सरडा त्याचा रंग बदलतो आणि झाडीमध्ये किंवा झाडांच्या खोडात दिसेनासा होतो. शीत कटिबंधातले हे ताडमाड उंच असंख्य वृक्ष मात्र थंडीपासून आपला जीव वाचवण्यासाठी आपले रंग बदलतात आणि त्यामुळे जास्तच उठून दिसतात.

संध्याकाळच्या सुमाराला आम्ही ‘थाउजंड आयलंड’च्या भागात जाऊन पोचलो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि कॅनडा या दोन देशांच्या दरम्यान पांच मोठमोठी सरोवरे आहेत. त्यातल्या ओंटारिओ सरोवरात एका उथळ भागाच्या तळावर हजारोंनी उंचवटे आहेत. त्यातले जे बाराही महिने पाण्याच्या वर राहतात आणि ज्यावर निदान दोन तरी वृक्ष बारा महिने असतात अशा बेटांची संख्याच अठराशेच्या वर आहे. त्याशिवाय पाण्याची पातळी उंच जाताच अदृष्य होणारी किंवा वृक्षहीन अशी कितीतरी बेटे असतील. यातील बहुतेक बेटे त्यांवर जेमतेम एकादी इमारत, थोडीशी बाग वगैरे करण्याइतकी लहान लहान आहेत. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी लोकांचे लक्ष या बेटांकडे गेले. अनेक श्रीमंत लोकांनी यातली बेटे विकत घेऊन त्यावर बंगले बांधले आणि उन्हाळ्यात ते इथे येऊन मौजमजा करू लागले. थंडीच्या दिवसात हे सरोवरच गोठून जात असल्यामुळे या भागातली रहदारी कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मोठ्या मोटरबोटींनी त्यातल्या कुठल्याही बेटावर जाता येते.

‘अंकल सॅम बोट टूर कंपनी’च्या मोटरबोटीत बसून आजूबाजूची बेटे पहात आम्ही तासभर या सरोवरात फेरफटका मारला. प्रत्येक बेटावरील इमारत हे वास्तुशिल्पकलेचा नमूना वाटावा इतकी आगळी वेगळी वाटते. कोणी त्याला किल्ल्याचा आकार दिला आहे तर कोणी भूतबंगला वाटावा असा भयावह आकार दिला आहे. सरोवरातून जाता जाता दृष्टीपथात येणा-या द्वीपांबद्दल एक मार्गदर्शक माहिती सांगत होता. कोणते बेट कोणत्या अब्जाधीश सरदाराने कधी विकत घेतले किंवा सध्या ते कोणत्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्या ताब्यात आहे याबद्दल मनोरंजक माहिती दिली जात होतीच, कांही बेटांसंबंधी करुण कथासुध्दा सांगितल्या जात होत्या. त्यातली कोणतीच नांवे आमच्या ओळखीची नसल्यामुळे आम्हाला त्यात फारसा रस नव्हता आणि एकदा ऐकून ती नांवे लक्षात राहणे तर केवळ अशक्य असते. यांमधील अनेक बेटांवर आता हॉटेले उघडली असून जगभरातले नवश्रीमंत लोक उन्हाळ्यात तिथे सुटी मजेत घालवण्यासाठी येतात. हे करणेसुध्दा आमच्या दृष्टीने कल्पनेच्या पलीकडचे होते. आम्ही त्यांना दुरून पाहू शकलो इथपर्यंतच आमची मजल होती.

तासभर या आधीच निसर्गरम्य तसेच मानवाने जास्तच आकर्षक केलेल्या सहस्रद्वीपांची एक झलक दुरूनच पाहून आम्ही पुढील प्रवासासाठी आपल्या बसमध्या परत आलो.

.  . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

अमेरिकेची लघुसहल – १ – पहिला दिवस – प्रयाण

NYGateway

न्यूयॉर्कहून निघून वॉशिंग्टन डीसी आणि नायगारा धबधबा वगैरे पाहून येण्याची तीन दिवसांची सहल आम्ही ठरवली होती. अमेरिकेतल्या एका यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या या सहलीची तिकीटे आम्ही इंटरनेटवरून काढली होती. ही सहल करण्यासाठी आम्ही दोन दिवस आधी न्यूजर्सीमधील पारसीपेनी या गावी येऊन थांबलो होतो. त्यासाठी अॅटलांटाहून नेवार्कला येतांना विमानाचा प्रवास केल्यामुळे सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेले सामान हँडबॅगेत आणि उरलेले सूटकेसमध्ये भरून नेले होते. आता तीन दिवस बसमधून फिरायचे असल्यामुळे सामानाची उलथापालथ करावी लागली. बसमधून उतरून पायी फिरतांना लागणा-या खाण्यापिण्याच्या आणि इतर अत्यावश्यक वस्तू खांद्याला टांगून नेण्याच्या झोळीत ठेवल्या, संध्याकाळी मुक्कामाला गेल्यावर लागणा-या गोष्टी आणि जास्तीचे कपडे बसच्या होल्डमध्ये टाकायच्या बॅगेत ठेवले, दोन दिवस फिरण्यात मळलेले कपडे आणि अनावश्यक वस्तूंचे गाठोडे बांधून बाजूला केले आणि प्रवासात घालायचे कपडे बॅगेवर ठेवले. सकाळी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून रात्री झोपण्याच्या आधीच ही सारी आवराआवर करूनच गादीवर अंग टाकले.

पहाटे गजर लावून जाग आल्यावर आधी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आदल्या दिवशी पहाटे होता तसा पाऊसवारा नव्हता हे पाहून हायसे वाटले. हवामान अनुकूल नसले तरीसुध्दा वेळेवर जाऊन टूरिस्ट बस गाठायची होतीच, पण वरुणदेवाच्या कृपेने सारे कांही शांत होते. त्यामुळे अंगातला उत्साह दुणावला. झटपट सारी कामे आटपून चहाबरोबरच दोन चार बिस्किटे खाऊन निघालो. सोमवारी सकाळी न्यूयॉर्कला ऑफीसला जाणा-या लोकांची गर्दी असणार हे लक्षात घेऊन आणि शक्य तर ती टाळण्यासाठी जरूरीपेक्षा थोडे आधीच घराबाहेर पडलो. बसस्टॉपवर विशेष गर्दी नव्हती, लवकरच बस आली. तिच्यातही पुरेशी जागा होती. यावेळच्या प्रवासात फक्त आम्ही दोघे आणि फडके पतीपत्नी अशी पर्यटक मंडळीच होतो, सौरभ आणि सुप्रिया आमच्याबरोबर फिरणार नव्हते. आदले दिवशी न्यूयॉर्कला जाण्याची आमची रंगीत तालीम झाली असल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. बसचे तिकीट काढण्यासाठी सुटे पैसै काढून तयार ठेवले होते. तिकीट काढून लहान मुलांप्रमाणे खिडकीजवळच्या चांगल्या जागा पकडून बसून घेतले. आमचे अमेरिकादर्शन आता कुठे सुरू झाले होते आणि आम्हाला थोड्या वेळात जास्तीत जास्त पहायचे होते.

वाटेत चढणा-या प्रवाशांची गर्दी या वेळी थोडी जास्त असल्यामुळे बस भराभर भरत गेली. आम्ही आदले दिवशी या रस्त्याने एकदा गेलेलो असल्यामुळे कांही खुणेच्या जागा पाहिल्यावर आठवत होत्या. पहिल्या नजरेतून निसटलेल्या कांही जागा या वेळी लक्ष वेधून घेत होत्या. तासाभरात पोर्ट ऑथॉरिटीचे बस टर्मिनस आले. या वेळी सबवेच्या भानगडीत न पडता टर्मिनसच्या बाहेर पडून सरळ टॅक्सी केली आणि बोवेन स्ट्रीटवरल्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफीसकडे प्रयाण केले. आम्ही पोचेपर्यंत ते ऑफीस उघडलेही नव्हते. आजूबाजूची बरीच दुकानेसुध्दा बंदच होती, थोडी उघडली होती आणि कांही आमच्यादेखतच उघडत होती. ऑफीसच्या दरवाजापाशीच सामान ठेऊन आजूबाजूचे निरीक्षण करत उभे राहिलो.

हा भाग म्हणजे न्यूयॉर्कचे ‘चायनाटाउन’ असावे. जिकडे पहावे तिकडे चित्रलिपीतली विचित्र अक्षरे दिसत होती. ती पाहून ‘अक्षरसुध्दा न कळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ समजत होता. त्या चित्रांच्या बाजूला इंग्रजी भाषेतली अक्षरे नसली तर आम्ही चीनमध्ये आलो आहोत असेच वाटले असते. सगळ्या दुकानांवर चिंगमिंग, झाओबाओ, हूचू असलीच नांवे दिसत होती.  भारताप्रमाणेच युरोपअमेरिकेतसुद्धा सगळ्या जागी चिनी खाद्यगृहे असतात, भारतात कुठे कुठे चिनी दंतवैद्य दिसतात, पण न्यूयॉर्कच्या या भागात हेअरकटिंग सलूनपासून डिपार्टमेंटल स्टोअरपर्यंत आणि इलेक्ट्रीशियनपासून अॅडव्होकेटपर्यंत सगळ्या प्रकारच्या दुकांनांचे किंवा ऑफीसांचे चिनी नांवांचे फलक होते.  रस्त्यावर चालणा-या लोकांत प्रामुख्याने मंगोलवंशीयच दिसत होते.

थोड्या वेळाने एका चिनी माणसाने येऊन दरवाजा उघडला. समोर फक्त एक जिना होता आणि तो चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर टूरिस्ट कंपनीचे केबिनवजा ऑफीस होते. दोनतीन मिनिटात त्याचा सहाय्यकही आला. त्याच्या पाठोपाठ आम्ही जिना चढून वर गेलो. आम्ही पर्यटक असल्याचे सांगताच त्याने काँप्यूटरवर आमची नांवे पाहून घेतली आणि केबिनच्या बाहेर पॅसेजमध्ये मांडलेल्या खुर्च्यांवर बसायला सांगितले. आम्ही रेस्टरूमची चौकशी केल्यावर त्याने शेजारचा एक बंद दरवाजा किल्ली लावून उघडून दिला. रस्त्यावरची नको ती माणसे त्याचा दुरुपयोग करायला येतात म्हणून ही खबरदारी घ्यावी लागत असल्याचे त्याने कुलुप उघडता उघडता सांगितले.

आमच्या पाठोपाठ आणखी कांही माणसे चौकशी करायला माडीवर आली, तिथे ठेवलेल्या सातआठ खुर्च्या केंव्हाच भरून गेल्या. कांही तरुणांनी उठून वरिष्ठ नागरिकांना जागा दिल्या. त्यानंतर सारखी माणसे येऊन चौकशी करून जातच होती आणि खाली रस्त्यावर जमलेल्या माणसांचा मोठा गलका ऐकायला येऊ लागला होता. थोड्याच वेळात तीनचार युवक ऑफीसात जाऊन हातात पॅड्स घेऊन बाहेर आले. एटथर्टी, एटफॉर्टी, फिली, डीसी असे कांही तरी पुटपुटणा-या त्यातल्या एकाला मी माझ्याकडचे ई-टिकीट दाखवले, ते पाहून त्याने दुस-याला बोलावले. त्याने आपल्या पॅडवरील चार नांवांवर टिकमार्क करून मला आमचे सीटनंबर्स सांगितले. आम्ही सर्वांनी आपली ओळख दाखवण्यासाठी आपापले पासपोर्ट तयार ठेवले होते, पण त्याची गरज पडलीच नाही. बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत हे सुध्दा त्या प्राण्याने मला विचारले नाही. खाली जाऊन रस्त्यावरील एका चिनी दुकानाच्या समोर जाऊन थांबायला सांगून तो धडाधडा जिना उतरून नाहीसा झाला.

आम्ही हळूहळू खाली उतरलो. तोपर्यंत रस्त्यावर शंभर दीडशे माणसांची झुम्बड उडालेली होती. ते तीनचार युवक एकेकाची तिकीटे पाहून त्याला कुठकुठल्या दुकानांच्या समोर जाऊन थांबायला सांगत होते. अशा रीतीने रस्त्यावरच तीन चार वेगवेगळे घोळके तयार झाले. कांही लोक तेवढ्यात समोरच्या दुकानात जाऊन तिथे काय मिळते ते पाहून विकत घेत होते. तोंपर्यंत रस्त्यावर ओळीने तीन चार बसगाड्या येऊन उभ्या राहिल्या.  प्रत्येक युवकाने आपापला घोळका त्यातल्या एकेका गाडीत नेला. आम्हीही आमच्या ग्रुपबरोबर आमच्या गाडीत जाऊन आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. त्या गाड्या साधारणपणे एकाच वेळी सुटून वेगवेगळ्या ठिकाणांना जाणार होत्या हे उघड होते. पण त्या जागी बस स्टेशनसारखे फलाट नव्हते की कसलेही बोर्ड नव्हते आणि कोणती गाडी कुठल्या गावाला जाणार आहे हे दाखवणारे कसलेच चिन्ह नव्हते. पण सगळे प्रवासी आपापल्या गाडीत पोचले असणार. अमेरिकेसारख्या प्रगत देशातले हे रस्त्यावरचे प्रिमिटिव्ह स्टाईलचे मॅनेजमेंट माझ्या चांगले लक्षात राहील.

आमच्या मार्गदर्शकाने बसमध्ये येऊन सगळे प्रवासी आले असल्याची खात्री करून घेतली. आमच्या अपेक्षेप्रमाणेच ही वॉशिंग्टन आणि नायगाराची तीन दिवसांची ट्रिप असल्याचे सांगून त्याबरोबर त्याने एक हलकासा धक्काही दिला.  इंटरनेटवर वाचलेल्या माहितीनुसार आम्ही पहिल्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला जाणार होतो. दुस-या दिवशी नायगाराला जाऊन तिस-या दिवशी परतणार होतो.  न्यूयॉर्कच्या मानाने वॉशिंग्टनला हवा उबदार राहील आणि अंगातले लोकरीचे कपडे काढून फिरता येईल अशी आमची कल्पना होती. त्यानुसार तिथल्या व्हाईट हाउस सारख्या शुभ्र इमारतींच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या फोटोत आपल्याला कोणता रंग खुलून दिसेल याचा सखोल विचार करून कांही महिलांनी त्या दृष्टीने आपला वेष परिधान केला होता. त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पाडणारी घोषणा त्या मार्गदर्शकाने केली. हवामानाचे निमित्य सांगून त्यामुळे आपली सहल उलट दिशेने जाणार असून आता तिसरे दिवशी परत येतांना आपण वॉशिंग्टनडीसीला जाणार आहे हे ऐकून अनेकांचा थोडा विरस झाला. पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते

.  . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)
—————————————–

न्यूयॉर्कची सफर – ३ स्वातंत्र्यदेवता (उत्तरार्ध)

स्वातंत्र्यदेवी

 

लिबर्टी आयलंडवरील लँडस्केपिंग खूप छान केलेले आहे. दीडशे फूट उंच पेडेस्टलवरील दीडशे फूट उंच पुतळा त्याच्या फार जवळून नीट दिसणार नाही. हे लक्षात घेऊन त्याच्या सभोवताली पूर्वी जिथे किल्ला होता तेवढ्या जागेत अकरा कोन असलेल्या ता-याच्या आकाराचा चौथरा बांधला आहे. त्याच्या सर्व बाजूला मोठी मोकळी जमीन सोडून त्यात सुंदर लॉन केले आहे आणि समुद्रकिना-याच्या बाजूने प्रशस्त असा रस्ता बांधला आहे. या बेटावर कोणतेही वाहन न्यायला परवानगी नाहीच. हे प्रेक्षणीय स्थळ पहात पहात मौजमजा करण्याच्या उद्देशाने तिथे आलेले हौशी पर्यटक घोळक्या घोळक्याने त्या रस्त्यावरून पायी फिरत असतात. तो भव्य आणि सुडौल पुतळा, त्याच्या सभोवतालचा गवताचा हिरवा गार गालिचा, अफाट पसरलेल्या समुद्रातल्या लाटा, न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरातल्या उंच इमारती आणि रंगीबेरंगी चित्रविचित्र पोशाखात फिरणारे पर्यटकांचे नमूने आळीपाळीने पहात आणि रमतगमत आम्ही त्या बेटाला एक प्रदक्षिणा घातली. तोपर्यंत सर्वांना चांगली भूक लागली होती म्हणून क्षुधाशांतीसाठी मॅक्डोनाल्डच्या खाद्यगृहात गेलो.

त्याच्या विशाल रेस्तराँमध्ये ग्राहकांच्या सातआठ रांगा लागल्या होत्या आणि प्रत्येक रांगेत तीसपस्तीस माणसे उभी होती. हे सगळे लोक आमच्यासाठी कांही खाद्यपदार्थ शिल्लक ठेवतील की नाही अशी शंका मनात आली आणि आम्हाला जेवण मिळायला किती वेळ लागणार आहे असा प्रश्न पडला. पण त्या रांगा भराभर पुढे सरकतांना दिसल्यामुळे त्यात उभे राहून घेतले. चार पाच प्रकारच्या काँबोंचे सचित्र वर्णन समोरच्या मोठमोठ्या फलकांवर दिले होते. त्यात कोणताच शाकाहारी प्रकार दिसत नव्हता. बरीच चौकशी करून कदाचित सॅलड या नांवाने अनोळखी पालेभाज्यांची न चिरलेली पाने मिळाली असती, पण चार पाच दिवस नुसती तीच खाऊन राहणे जरा कठीणच होते. फिरण्यासाठी अंगात त्राण आणि मनात उभारी यायला हवी आणि त्यासाठी पोटोबा शांत राहणे अत्यंत आवश्यक होते. अशा वेळी शेळ्यामेंढ्यांचे खाणे आपण खायचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनाच आपल्या पोटात जागा देणे बरे वाटले. त्यामुळे यावेळी घरी नवरात्र बसलेले असल्याचा विचार बाजूला ठेवला आणि प्रवासातल्या आपद्धर्माचे पालन केले.

एवढा विचारविनिमय करून मेनू ठरवेपर्यंत आम्ही काउंटरपाशी येऊन पोचलो होतो. तिथे ऑर्डर आणि पैसे देऊन कूपने विकत घेतली आणि पुढे सरकलो. डिलीव्हरी काउंटरवर पोचेपर्यंत आमचे ट्रे मांडून तयार होते. त्या ठिकाणचे दृष्य अविस्मरणीय होते. एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम बर्गर एकापाठोपाठ एक सरकत येत होते. फायरब्रिगेडच्या मोठ्या नळातून बदाबदा पाणी पडावे तसे फ्रेंच फ्राईज धबाधब कोसळत होते आणि तिथले अत्यंत तत्पर कर्मचारी त्यातून भराभर ट्रे जमवत होते. पेय घेण्यासाठी रिकामे पेले दिले. बाजूला प्रत्येकी चारपाच तोट्या असलेली चारपाच वॉटरकूलरसारखी दिसणारी यंत्रे होती. त्यातून हवे ते पेय आपल्या हाताने आपल्या पेल्यात पाहिजे तेवढे घ्यायचे. मी भारतातल्या तसेच युरोप आणि अमेरिकेतल्यासुध्दा इतर अनेक शहरातले मॅक्डोनल्डचे जॉइंट्स पाहिले आहेत, पण अशी कार्यक्षमता आणि तत्परता मला कपठेही दिसली नाही. अन्न पुरवणारी तिथली यंत्रसामुग्री आणि कर्मचारी दोघांची कामे एकमेकांना साजेशीच होती. लंचटाइमच्या मर्यादित वेळात ऑफीसमधल्या सगळ्या लोकांना भराभर जेवण वाढून देणा-या कंटीनबॉइजचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. त्याच श्रेणीत या मॅक्डोनल्डवाल्यांनी बराच वरचा क्रम पटकावला.

१८८३ साली न्यूयॉर्क इथल्या एम्मा लाझारस या कवयित्रेने लिहिलेली एक कविता ब्राँझच्या पत्र्यावर कोरून या पुतळ्याच्या पायथ्याशी ठेवली आहे. जगभरातल्या सगळ्या देशांनी आपल्याला नको असलेली बेघर, दरिद्री, गांजलेली आणि थकलेली माणसे इकडे पाठवावीत. त्यांना इथे मोकळा श्वास घेता येईल, मी माझ्या हातातला दिवा त्यांच्यासाठी उंच धरते आहे, असे या कवितेत तिने लिहिले आहे. त्या काळात अमेरिकेत भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती होती पण तिचा सदुपयोग करण्यासाठी मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे जो कोणी तिकडे येईल त्याचे स्वागत होते. तरीसुध्दा वाहतुकीची साधने कमी असल्यामुळे आगबोटीत बसून परदेशी जाऊ इच्छिणा-यांची संख्या कमीच होती. आज सव्वाशे वर्षानंतर अशी परिस्थिती आली आहे की जगभरातले धडधाकट, कष्टाळू आणि हुषार लोक तिथे जायला उत्सुक आहेत आणि त्यांना अमेरिकेत येण्यावर कडक निर्बंध घालावे लागत आहेत, तसेच त्यांना मायदेशात थांबवून धरण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात.

The New Colossus

A sonnet by poet Emma Lazarus is inscribed in bronze at the base of the Statue of Liberty. The sonnet, titled “The New Colossus”, reads:

Not like the brazen giant of Greek fame
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame,
“Keep, ancient lands, your storied pomp!” cries she
With silent lips. “Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore,
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!”

by Emma Lazarus, New York City, 1883

न्यूयॉर्कची सफर – २ – स्वातंत्र्यदेवीचा पुतळा -१

LibertyCombo

 

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या नांवाने जगप्रसिध्द असलेला स्वातंत्र्यदेवताचा पुतळा न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या अत्यंत गजबजलेल्या मुख्य भागापासून अडीच किलोमीटर दूर असलेल्या एका निर्जन अशा बेटावर उभा केला आहे. तिथे जाण्यासाठी मोटर लाँचची व्यवस्था आहे. आम्ही रांगेत उभे राहून काढलेले तिकीट फक्त या प्रवासासाठीच होते. (असे लाँचमधून पलीकडे गेल्यानंतर समजले.) मॅनहॅटमच्या बॅटरी पार्कमध्ये असलेल्या काउंटरवरून तिकीटे काढून समोरच असलेल्या फेरी स्टेशनवर गेलो आणि विमानतळावर असते तसल्या लांब रांगेत उभे राहिलो. लिबर्टी द्वीपावर जाऊ इच्छिणा-या सर्व पर्यटकांची त्या जागी कसून सुरक्षा तपासणी होत होती. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची धारदार किंवा अणकुचीदार वस्तू, विषारी द्रव्य, स्फोटक किंवा घातक रसायन, हत्यार वगैरे कांही नाही आणि तिथे असलेल्या कोणा माणसाला किंवा निर्जीव वस्तूला आमच्यापासून किंचितही धोका नाही याची पूर्ण खातरजमा झाल्यानंतर आम्हाला पुढे जायची परवानगी मिळाली.

पलीकडच्या बाजूला मोटरलाँचच्या धक्क्याकडे जाण्यासाठी एक लांबलचक मार्गिका होती. तिच्यात फारशी गर्दी नाही हे पाहून आम्ही झपाझपा चालत पुढे गेलो. पण तिच्या दुस-या टोकाला पोचेपर्यंत तिथले गेट बंद झाले. आमच्या पुढे गेलेले लोक तिथे उभ्या असलेल्या बोटीत चढत असलेले दिसत होते. ते सगळे चढून गेल्यावर तिथला तात्पुरता यांत्रिक पूल उचलला गेला, तटावरील खुंटाला बांधलेले साखळदंड सोडले गेले आणि ती बोट जागची हलली. पलीकडून परत आलेली बोट आसपास रेंगाळतांना दिसतच होती. जागा मिळताच ती पुढे येऊन किना-याला लागली. तोपर्यंत आमच्या मागे भरपूर पर्यटक येऊन उभे राहिलेले होतेच. आम्ही सर्वजण रांगेने बोटीत चढलो. खालच्या बाजूला बसण्यासाठी आसने होती, तरी आम्ही तडक डेकवर गेलो आणि मोक्याची जागा पकडून उभे राहिलो.

सागरकिना-यावर आल्यापासून समोरचे लिबर्टी आयलंड आणि त्यावरील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा आकार दिसत होता.  लाँच किना-यावरून निघून जसजशी दूर जाऊ लागली तसतसा तो अधिकाधिक स्पष्ट होत गेला. तसेच मॅनहॅटनच्या अगडबंब इमारतींचा आकार हळूहळू लहान होत गेला आणि त्याच्या आजूबाजूच्या, तसेच मागील बाजूच्या इमारती दिसू लागल्या. खाडीच्या मध्यावर जाईपर्यंत न्यूयॉर्कचा ब्रुकलिन भाग, जर्सी सिटी, न्यूयॉर्क बंदरावरील राक्षसी क्रेन्स, तिथे उभी असलेली जहाजे वगैरे मनोरम दृष्य एका बाजूला आणि बेटावरील भव्य चबूतरा आणि त्यावर असलेली शिल्पकृती दुस-या बाजूला असे सगळेच पाहून डोळ्यात साठवून घेण्यासारखे होते. पहाता पहाता लिबर्टी द्वीप जवळ आले. त्याला अर्धा वळसा घालून आमची बोट पलीकडल्या बाजूला असलेल्या धक्क्यावर गेली. बेटाला वळसा घालता घालता स्वातंत्र्यादेवीच्या पुतळ्याचे सर्व बाजूने दर्शन घडत गेले. मागून, पुढून व बाजूने अशा सर्व अंगांनी दिसणारे त्याचे सौष्ठव आणि सौंदर्य पाहून सारेजण विस्मयचकित होत असलेले त्यांच्या चेह-यावर दिसत होते.  जेटीला बोट लागताच उतरून आम्ही बेटावर गेलो.

सहा हेक्टर क्षेत्रफळाचे हे पिटुकले बेट म्हणजे एक मोठा खडक आहे असे म्हणता येईल. युरोपियन लोकांचे ताफे जेंव्हा न्यूयॉर्कमार्गे अमेरिकेत यायला लागले तेंव्हा त्यातल्या कोणीतरी हे बेट काबीज करून घेतले. या ठिकाणी एक दीपस्तंभ बांधून येणा-या जहाजांना धोक्याचा इशारा दिला जाऊ लागला. हस्ते परहस्ते करीत ते सन १६६७ मध्ये बेडलो नांवाच्या गृहस्थाकडे आले आणि ऐंशी वर्षे त्या कुटुंबाकडे राहिल्यामुळे त्याच्या नांवानेच ते ओळखले जाऊ लागले. आणखी कांही हस्तांतरणानंतर अखेर ते सरकारी मालकीचे झाले. या जागी कधी क्षयरोग्यांची वसाहत बनवली गेली होती तर कधी छोटीशी लश्करी छावणी. त्या काळात या बेटावर अकरा कोन असलेल्या ता-याच्या आकाराची छोटी गढी सुध्दा बनवली होती.. सन १८७७ मध्ये स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभा करण्यासाठी या जागेची निवड करण्यात आली.

फ्रान्सच्या जनतेच्या वतीने अमेरिकन जनतेला ही अद्भुत भेट दिली गेली आहे. सुप्रसिध्द फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्ता बार्तोल्दी याने याची निर्मिती केली. त्यासाठी आलेला खर्च फ्रेंच जनतेने वर्गणी काढून उभ्या केलेल्या निधीतून झाला. अमेरिकन सरकारने हा पुतळा बेडलो बेटावर उभारण्याची परवानगी दिली, पण त्यायाठी निधी मंजूर केला नाही. अमेरिकेतल्या पुलित्झर आदी प्रभृतींनी त्यासाठी वर्गणी गोळा केली. सुमारे दीडशे फूट उंच आणि सव्वादोनशे टन वजनाचा हा पुतळा जुलै १८८४ मध्ये तयार झाल्यावर त्याची तीनशे तुकड्यात विभागणी करून ते भाग दोनशेहून अधिक पेट्यात भरून समुद्रमार्गे अमेरिकेत पाठवण्यात आले. हा पुतळा उभारण्यासाठी दीडशे फूट उंचीचा म्हणजे सुमारे पंधरा मजले उंच असा मोठा चबुतरा बांधला गेला. त्यावर सर्व भागांची जोडणी करून ऑक्टोबर १८८६ मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण झाले. हा पुतळा इतका वजनदार असला तरी तो आंतून पोकळ आहे. भरीव असता तर त्याचे वजन किती हजार टन झाले असते याची कल्पना यावरून येऊ शकेल. त्याला जहाजातून आणणे तर शक्यच झाले नसते आणि दुसरा कोणता मार्ग तेंव्हाही उपलब्ध नव्हताच आणि आजही नाही.

या पुतळ्याच्या आंतल्या अंगाला एक मजबूत पोलादी सांगाडा आहे. प्रसिध्द आयफेल टॉवरचा निर्माता गुस्ताव्ह आयफेल याने तो तयार केला होता. तांब्याच्या पत्र्याचे अनेक भाग साच्याच्या सहाय्याने ठोकून तयार करून त्या सांगाड्यावर बसवले आहेत आणि एकमेकांना जोडून त्यातून अखंड आकृती तयार केली आहे. दीडशे फूट उंचीचा हा प्रमाणबध्द पुतळा सर्वसामान्य माणसाच्या तीसपट एवढा मोठा आहे. म्हणजेच त्याचे नाक, कान डोळे वगैरे प्रत्येकी कांही फुटात असणार. त्याच्या चबुत-याच्या आंतल्या अंगाने वर जाण्यासाठी शिड्या आहेतच, त्यातून वर चढत लिबर्टीच्या मस्तकावरील मुकुटापर्यंत जाता येते. मुकुटाच्या डिझाइनमध्येच २५ खिडक्यांचा समावेश केला आहे. त्यातून सभोवतीच्या प्रदेशाचे विहंगावलोकन करता येते.

लाँचमधून धक्क्यावर उतरल्यानंतर आम्ही जेटीवरून चालत मुख्य बेटावर आलो. पुतळ्याच्या सर्व बाजूला प्रशस्त मोकळी जागा ठेवली आहे. आमच्या आधीच शेकडो पर्यटक तिथे येऊन पोचलेले होते. त्यामुळे त्या जागी अगदी जत्रेइतकी दाटी नसली तरी चांगली वर्दळ होती. बरोबर खाणेपिणे नेणे वर्ज्य असले तरी त्या ठिकाणी गेल्यावर ते विकणा-यांची रेलचेल होती. त्यामुळे तोंडात कांहीतरी चघळत किंवा हातातल्या बाटलीतले घोट घेत सगळे लोक आरामात फिरत होते. आम्हीही त्यात सामील झालो.

फिरता फिरता एका जागी थोडे लोक चबुत-याच्या आंतमध्ये प्रवेश करतांना दिसले म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण त्या जागी एक चौकीदार होता आणि त्यांने आमच्याकडे तिकीट मागितले. तिथे आंत जाण्यासाठी वेगळे तिकीट होते असे तो म्हणाला. त्यासाठी तिकीट काढण्याची आमची तयारी होतीच, पण हे तिकीट त्या बेटावर मिळतच नाही, नावेत बसण्याआधी ऑफीसमधूनच ते काढायला हवे होते. पण तिकीटविक्रीच्या जागी तसे कांहीच लिहिलेले नव्हते आणि इतक्या दुरून आलेल्या आम्हाला ती जागा पाहू द्यावी वगैरे आम्ही त्याला सांगितले, पण तो बधला नाही.  “तुम्ही वाटले तर परत गेल्यानंतर ऑफीसात जाऊन वाटेल तेवढे भांडू शकतो, पण आता कृपया मला माझे काम करू द्या.” असे त्याच्या आडदांड आकाराच्या मानाने अत्यंत सभ्य शब्दात त्याने सांगितल्यामुळे आम्हाला चबुत-याच्या आंत जाऊन वरपर्यंत चढून जाता आले नाही. अमेरिकन व्यवस्थेला शिव्या घालत आणि ही गोष्ट आम्हाला आधी न सांगितल्याबद्दल सौरभला दोष देत आम्ही पुतळ्याची परिक्रमा चालू ठेवली. हे तिकीट किना-यावरसुध्दा काउंटरवर मिळत नाही. त्यासाठी खूप आधीपासून ऑनसाइन बुकिंग करावे लागते वगैरे माहिती हळूहळू कळत गेल्यानंतर त्याबद्दल कांही करणे आम्हाला शक्यच नव्हते हे लक्षात आले. विमानातून प्रवास केल्यानंतर उंचावरून खाली जमीनीवरले दृष्य पाहण्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटले नाही.

युरोप अमेरिकेतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळी असते तसे सॉवेनियर्सचे दुकान इथे होतेच, ते जरा जास्तच विस्तीर्ण होते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे चित्र काढलेल्या असंख्य प्रकारच्या शोभेच्या तसेच उपयोगाच्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या. त्या पाहून त्यातली निवड करण्यात मग्न झालेल्या पर्यटकांची झुम्मड उडाली होती. आम्हाला पुढील प्रवासात जवळ ठेऊन घेता येईल अशी बेताच्या आकाराची मूर्ती घेऊन आम्ही बाहेर निघालो.

. . . . . . . . . . (क्रमशः)

————————————-