अमेरिकेची सफर – भाग ४ – विमानातल्या गंमती

युरोपच्या सहलीवर गेलो होतो तेंव्हा जेवण वाढण्याच्या आधी हवाईसुंदरीने प्रत्येक प्रवाशाला स्वागतपेयाची (वाईनची) एक पिटुकली बाटली आणून दिली होती. पुढे करायच्या असलेल्या दीर्घ यात्रेच्या प्रारंभालाच मध्यरात्रीनंतर अवेळी मद्यपान करून पचनसंस्थेचे (आणि स्वतःचे) संतुलन बिघडवून घ्यावे की नाही या संभ्रमात पडल्यामुळे मी त्या वेळी तिला (बाटलीला) स्पर्शही केला नव्हता. पण परतीच्या प्रवासात पहिली बाटली संपवून दुसरी मागून घेतली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई केली होती, तसेच प्रवासाने आलेला शीण घालवला होता. दीड वर्षानंतर अमेरिकेला जातांना त्याची आठवण झाली. पण या वेळी मी वेगळ्या कंपनीच्या विमानात बसलो होतो, तसेच मध्यंतरीच्या काळात वाहतूक उद्योगाच्याच परिस्थितीत बराच बदल झालेला असल्यामुळे अवांतर खर्चाला कात्री लावणे सुरू झाले होते याची झलक लगेच दिसली.

“पहिल्या वर्गातील सर्व प्रवाशांना उत्तेजक पेय देण्यात येईल, जनता श्रेणीतील प्रवासी पांच डॉलर देऊन ते विकत घेऊ शकतील.” अशी घोषणा भोजनसेवा सुरू होण्याच्या आधी झाली. ज्या लोकांचे उत्पन्न डॉलरमध्ये आहे अशांना पांच डॉलरचे फारसे मूल्य वाटणार नाही, पण मी जन्मभर काटकसर करून शिल्लक टाकलेले रोकड रुपये मोजून डॉलर विकत घेतलेले असल्यामुळे निदान डॉलरमध्ये खर्च करण्याची संवय होण्यापूर्वी तरी त्यांची रुपयांमधली किंमत डोळ्यासमोर येणार हे साहजीकच होते. त्यामुळे हा ‘अवांतर’ खर्च करायचे टाळून मी आपला फुकट मिळणारा ‘डाएट कोक’ मागितला. सेवकाने थर्मोकोलच्या एका लहानशा ग्लासात बर्फाचे मोठमोठे खडे टांकून त्यावर थोडासा कोकाकोला ओतून दिला. हातात मद्याचा प्याला धरलेला आहे अशी कल्पना करून अगदी लहानसे घोट घेत मी त्यातले बर्फ वितळायची वाट पहात राहिलो.

पेयाच्या पाठोपाठ भोजन आले. घरून निघतांना भूक लागलेली नसल्यामुळे विमानाचे चेक इन, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपल्यानंतर रात्रीचे जेवण विमानतळावरच घेतले होते. त्यानंतर एवढ्यात पुन्हा भूक लागली नव्हती, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पोटात कांही घालण्याची संवय शरीराला नव्हती. त्यामुळे जेवणाची एवढी निकड नव्हती. पण या वेळी अन्नाला नकार दिला तर पुढचा घास केंव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. शिवाय आता अमेरिकेला जाईपर्यंत एवी तेवी दिवसाचे सारे वेळापत्रक उलटे पालटे होणारच होते. त्यातल्या त्यात पचायला सोपे जाईल असे शाकाहारी जेवण मागितले.

त्या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय असले तरी विमानातले सेवक-सेविका श्वेत, अश्वेत आणि मिश्र वर्णाचे पण सगळे अमेरिकन होते. त्यांच्याकडून मिळणा-या शाकाहारी भोजनात उकडलेल्या भाज्या, शिजवलेला पास्ता, मॅकरोनी, चीजचे काप अशा सात्विक (मिळमिळीत) पदार्थांची मला अपेक्षा होती. पण रंगवलेल्या तांदुळाचा भात, रसाळ पातळ भाजी, कसलीशी उसळ यासारखे चक्क भारतीय पदार्थ वाढलेले ‘ताट’ समोर आले. ते अन्नपदार्थ चविष्ट असले तरी त्यांची चंव थोडी तामसी धाटणीची (झणझणीत) होती. त्यातल्या बटाट्याच्या फोडी, मटार आणि मक्याचे दाणे वगैरे वेचून काढून रंगीत भाताचे चार घास त्यांच्याबरोबर तोंडात टाकले, चिरलेल्या भाज्यांचे काप आणि फळांच्या फोडी तोंडी लावल्या आणि कोक मिसळलेले बर्फाचे पाणी पिऊन ते पोटात ढकलले. गोठवून चामट झालेले पराठे, पु-या किंवा उत्तप्पा नाश्त्याच्या नांवाने खायची मला मुळीच इच्छा नसल्याने नॉनव्हेज ब्रेकफास्टच घ्यायचा असे ठरवून टाकले. प्रत्यक्षात शाकाहारी न्याहारी अपेक्षेपेक्षा चांगली निघाली असे नंतर समजले, पण ऑमलेट, कटलेट वगैरेने युक्त काँटिनेंटल ब्रेकफास्ट मात्र खरोखरच छान होता.

या लांबच्या प्रवासात पिण्याच्या पाण्याची काय सोय होईल हा एक चिंतेचा विषय होता आणि निघण्यापूर्वी त्यावर थोडी चर्चासुध्दा झाली होती. भारतातले सारेच प्रवासी नेहमी आपल्यासोबत पाणी ठेवतात. घरून निघतांना पाण्याची बाटली बरोबर नेली नाही तर स्टेशन किंवा स्टँडवर विकत घेतात आणि घाईघाईत ते जमले नाही तर रेल्वे आणि बसमधल्या प्रवाशांना त्यांच्या जागेपर्यंत पाण्याची बाटली आणून देणारे विक्रेते सारखे फिरतच असतात. भारतातल्या ऊष्ण हवामानात अधून मधून पाण्याचा घोट पिऊन घसा ओला करण्याची गरज पडत असते. पण युरोप अमेरिकेतले बहुतेक लोक कधी पाणी पीतच नाहीत. आपल्याला तरी कोक किंवा बीयर पिऊन तहान भागल्यासारखे कांही वाटत नाही. त्यामुळे इकडून तिकडे गेल्यानंतर थोडी पंचाईत होते. चार पाच वर्षांपूर्वी आपल्या बरोबर पाण्याची बाटली ठेवता यायची, पण आता सुरक्षिततेच्या कारणांमुळे कोठलाही द्रवपदार्थ केबिन बॅगेजमध्ये नेता येत नाही.

युरोपच्या सहलीवर जातांना पाण्याने भरून सहलीमधील सर्व प्रवासात बरोबर ठेवण्यासाठी, कदाचित त्या कोठून आणल्या याची सहप्रवाशांनी कौतुकाने चौकशी करावी म्हणून, पुण्याच्या दोन महिलांनी तुळशीबाग किंवा तत्सम बाजारपेठा धुंडाळून अत्यंत आकर्षक अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या हौसेने आणल्या होत्या. कशा कोण जाणे, त्या मुंबईपासून व्हिएन्नापर्यंत कशाबशा त्यांच्याबरोबर पोचल्याही होत्या, पण पुढे रोमला जाणा-या विमानात बसण्यापूर्वी झालेल्या सिक्यूरिटी चेकमध्ये तिथल्या ऑफिसरने सरळ त्यांच्या बॅगेतून त्या काढल्या आणि कच-याच्या डब्याच्या स्वाहा केल्या. ते पाहतांना कोमेजलेला त्यांचा चेहरा पाहवत नव्हता. या अनुभवानंतर पाण्याची बाटली बरोबर नेण्यात कांही अर्थ नव्हता.

नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेल्या एका सद्गृहस्थाने सांगितले की त्याने एक रिकामी बाटली सामानातून नेली आणि जेवणाच्या वेळी ती पाण्याने भरून घेऊन आपल्याजवळ ठेवली होती. मी कांही त्या बाटलीबद्दल जास्तीची चौकशी केली नाही. रात्रीच्या जेवणासाठी विमानतळावर जी पाण्याची बाटली घेतली होती, तिच्यातलेच उरलेले पाणी फेकून देऊन ती बॅगेच्या बाजूच्या कप्प्यात ठेऊन दिली. पण सुरक्षा कर्मचा-याने क्ष-किरणांच्या परीक्षेच्या आधीच बॅगेतून काढून तीही टाकून दिली. पण पेयजलाबद्दल जेवढे आधी वाटले होते किंवा सांगितले गेले होते तसे कांही प्रत्यक्ष विमानाच्या प्रवासात जाणवले नाही. एक तर तिथली हवा थंडगार असल्याने कंठाला शोष पडत नव्हता आणि दर दोन तीन तासात एकादे तरी शीत किंवा ऊष्ण पेय प्यायला मिळत असल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा होत होता. कदाचित भारतीय प्रवाशांना पाण्याची तहान लागते हे माहीत असल्यामुळे असेल, पण अधून मधून केबिन क्र्यूमधले कोणी तरी पाण्याची मोठी बाटली आणि थर्मोकोलचे ग्लास हातात घेऊन पॅसेजमध्ये चकरा मारून जायचे आणि तृषार्त प्रवाशांची तहान भागवायचे.
.. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

अमेरिकेची सफर – भाग ३ – मुंबईहून प्रयाण

मुंबईहून नेवार्कला जाणा-या आमच्या विमानात जवळ जवळ तीनशे प्रवाशांची व्यवस्था असावी. त्यातल्या बहुतेक सर्व जागा भरल्या होत्या. तुरळक दोन चार आसने रिक्त असलीच तरी मी जिथे बसलो होतो तिथून ती माझ्या नजरेला पडली नाहीत. अमेरिकेला जाणारे ते एका अमेरिकन कंपनीचे विमान असले तरी त्यातले बहुसंख्य प्रवासी मात्र भारतीयच होते. त्यात बरीच मराठी माणसेही दिसत होती. प्रवाशांच्या नांवाची यादी घेऊन मी कांही त्यातली मोजदाद वगैरे केली नाही, पण डोळे आणि कान उघडे ठेवून इकडे तिकडे लक्ष दिले तर थोडा फार अंदाज येतो. त्यानुसार मी यापूर्वी केलेल्या प्रवासांच्या मानाने मला या दोन्हींचे प्रमाण या वेळी जास्त दिसले. कामकाजानिमित्य आणि पर्यटनासाठी भारतात ये जा करणा-या अमेरिकनांपेक्षा तिकडे जाणा-या येणा-या भारतीयांचे प्रमाण आता खूप जास्त झाले आहे हे पाहून मनाला बरे वाटले.

आजकाल परदेशाला जाणा-या सगळ्याच विमानात प्रत्येक प्रवाशाच्या समोर एक स्क्रीन असतो, या विमानातसुध्दा तसा तो होता आणि हाताला विश्रांती द्यायच्या दांडीवर (हँडरेस्टवर) एक रिमोट खोचून ठेवला होता. त्यावर ए पासून झी (अमेरिकेतला झेड) पर्यंत सारी मुळाक्षरे आणि १ ते ९ व ० पर्यंत आंकडे असलेला कीबोर्ड सुध्दा होता, पण त्यावरचे कोणतेच बटन दाबून त्या काळ्या स्क्रीनवर उजेड न पडल्यामुळे मी त्याला पुन्हा जागच्या जागी ठेवून दिले. थोड्या वेळानंतर आजूबाजूच्या प्रवाशांच्या स्क्रीन्समध्ये चैतन्य आलेले दिसल्यानंतर मीही कुठलीशी कळ दाबून माझ्या स्क्रीनला प्रकाशमान केले. आपत्कालीन परिस्थितीत काय काय करावे याच्या सूचना त्यावर त्या वेळी दिल्या जात होत्या. केबिनमधला हवेचा दाब कमी झाला, विमान पाण्यावर उतरले किंवा त्याला जमीनीवरच पण अकस्मात उतरावे लागले तर प्रवाशांनी काय काय करायचे याचा पाढा वाचला जात होता. या प्रकारच्या सूचना मी यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या असल्यामुळे त्याची सुरुवात चुकली तरी त्याने फारसे कांही बिघडले नाही.

माझ्या पहिल्या विमानप्रवासात “मे आय हॅव युवर अटेन्शन प्लीज” हे शब्द ऐकताच मी लगेच एकाग्र चित्ताने त्या हवाई सुंदरीच्या सांगण्याकडे लक्ष दिले होते आणि त्या आणीबाणीच्या सूचना ऐकून तिला मनातल्या मनात “जरा शुभ बोल ना गं नारी” असे म्हंटले होते. त्या सूचनेत सांगितल्याप्रमाणे आसनासमोरच्या खणात ठेवलेले ‘माहिती पत्रक’ काढून ते ‘काळजीपूर्वक’ वाचायचा प्रयत्न केला, पण त्यात कांहीच लिहिलेले नव्हते, नुसती चित्रेच होती. त्या चित्रांचा मला पूर्ण बोध झालाच आहे अशी खात्री मला तरी आजतागायत कधी देता आली नाही. आपत्कालीन परिस्थितीत उघडायच्या विमानाच्या दरवाजाच्या जवळ बसलेल्या प्रवाशांनी तो कसा उघडायचा हे नीट समजून घ्यावे, न पेक्षा आपले आसन बदलून घ्यावे असेही सांगितले जाते, पण कोणीही या कारणासाठी आपले आसन बदलल्याचे मला कधीही दिसले नाही. त्या दरवाजाच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाकडून तो दरवाजा उघडण्याचे प्रात्यक्षिक परीक्षा करवून घ्यावे आणि त्यात उत्तीर्ण होणा-याला विमानाच्या प्रवासाचे भाडे बक्षिस म्हणून द्यायला हरकत नाही असे मला वाटते. मात्र “मरता क्या नही करता ।” या उक्तीनुसार त्या जागेवर बसलेला एकादा मरतुकडा माणूससुध्दा आणीबाणीच्या प्रसंगी जोर लावून तो अवजड दरवाजा उघडून देईल असा विमान कंपनीतल्या लोकांचा विश्वास असावा. पण माझा असा विश्वास नसल्यामुळे विमान रनवेवर धांवायला लागताच मी आपला मनातल्या मनात “आपदाम् अपहर्तारो दातारो सर्व संपदाम् ” हा रामरक्षेतला श्लोक म्हणू लागतो.

सेफटी इन्स्ट्रक्शन्स संपल्यानंतर स्क्रीनवर जगाचा नकाशा दाखवून त्यात आपले विमान कुठपर्यंत आले आहे ते दाखवणे सुरू झाले. संगणक हाताशी असल्यामुळे त्या चित्राच्या सोबतीला माहितीचा भडिमार सुरू होता. विमानाचा सध्याचा वेग, त्याने जमीनीच्या वर गांठलेली उंची, बाहेरच्या हवेचे तपमान, मुंबईहून निघाल्यापासून आतापर्यंत कापलेले अंतर, नेवार्कला पोचण्यासाठी उरलेले अंतर, ते कापण्यासाठी लागणारा वेळ, मुक्कामाला किती वाजता पोहोचण्याची शक्यता, आता तिथे किती वाजले असतील, इत्यादी इत्यादी भरमसाठ आंकडेवारी एकामागोमाग दाखवत होते. आपल्या प्रवासाबद्दल कोठलाही प्रश्न कोणाच्या मनात आला की लगेच त्याचे उत्तर हजर ! पण हे सतत किती वेळ पाहणार? मनोरंजनासाठी अनेक भाषांमधले अनेक चित्रपट पाहण्याची व्यवस्था होती, वेगवेगळे संगीत ऐकण्याची सोय होती, तसेच अनेक प्रकारचे खेळ खेळता येत होते. यातली निवड करण्यासाठी टचस्क्रीन तंत्राचा उपयोग करणे थोड्या सरावानंतर जमायला लागले. त्यानंतर अधून मधून डुलक्या घेत हिंदी नाहीतर इंग्रजी चित्रपट पहात, केंव्हा गाणे ऐकत आणि दोन्हीचा कंटाळा आला तर सुडोकूसारखे एकादे कोडे सोडवत वेळ काढायचे अनेक उपाय तर समजले. त्याशिवाय वाचण्यासाठी, किंवा त्यातली चित्रे आणि जाहिराती पाहण्यायाठी गुळगुळित पृष्ठांचे मॅगझीन होतेच.

. …….. . . . . . . . .. (क्रमशः)

वृक्षांची रंगसंगती

उत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते. त्यामागची कारणपरंपरा समजल्यावर कुतूहलाची जागा अचंभ्याने घेतली. इथे नेमके काय घडते ते समजण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या वनस्पतीशास्त्राची थोडक्यात उजळणी केली तर तुलनेसाठी ते सोपे जाईल. सगळ्या झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात. बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुस-या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुध्दा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते. आपल्याकडे दिसणारे वड, पिंपळ, आंबा, चिंच, बाभूळ, गुलमोहोर आदी मोठे वृक्ष अगदी लहानपणापासून पहाण्यात असतात. त्यातले कांही तर आजोबा, पणजोबांच्या काळातले असतात. म्हणजे त्यांचा बुंधा आणि मुख्य शाखा पूर्वीच्या असतात. फुले आणि फळे तर अगदी अल्पकाल झाडांवर असतात आणि पानेंसुध्दा बदलत राहतात. कांही विशिष्ट ऋतूंमध्ये या झाडांना जोमाने नवी पालवी फुटते आणि कांही काळात त्यांची पिकली पाने जास्त संख्येने गळतात असे दिसले तरी बाराही महिने ही झाडे मुख्यतः हिरवी गार असतात. हा हिरवा रंग पानांमधल्या क्लोरोफिल या रासायनिक तत्वामुळे त्यांना प्राप्त होतो. जमीनीतून मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार यांचा हवेमधील कर्बद्विप्राणिल वायूंबरोबर संयोग घडवून आणण्याचे काम हे क्लोरोफिल फोटोसिन्थेसिस या क्रियेमधून करते. यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि यातून अन्न तयार होते. या अन्नावर झाडांची वाढ होते, तसेच हे अन्न खाऊन कीटक, पक्षी आणि शाकाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांचा उदरनिर्वाह त्यांना खाऊन होतो. हे सारे पशुपक्षी श्वसनक्रियेत हवेतला प्राणवायू घेतात आणि कर्बद्विप्राणिल वायू हवेत सोडतात. अशा प्रकाराने सृष्टीमधील जीवनाचे संपूर्ण चक्र चालत राहते. ऊष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधाच्या दक्षिणेकडल्या भागांत हे असे युगानुयुगे चालत आलेले आहे, पण त्याहून उत्तरेकडे वेगळ्या प्रकारचे हवामान असते. अमेरिकेच्या उत्तर भागात हिंवाळ्याच्या दिवसात तपमान शून्य अंशाच्या खाली जाऊन सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरते. दिवसाचा कालावधी अगदी लहान होतो आणि त्या वेळेतही सूर्यनारायण क्षितिजावरून जेमतेम हांतभर वर येऊन पुन्हा खाली उतरतो. यामुळे कडक ऊन असे फारसे पडतच नाही. सगळे पाणी गोठून गेल्यामुळे झाडांची मुळे पाणी शोषून घेऊन त्याला फांद्यांपर्यंत पोचवू शकत नाहीत. त्यामुळे फोटोसिन्थेसिस ही क्रिया मंदावते. आपल्याकडली बारमाही हिरवी झाडे अशा वातावरणात तग धरू शकणार नाहीत. पण या थंड हवामानात वाढलेल्या वृक्षांच्या जातींनी या संकटावरचा मार्ग शोधून काढला आहे. या वृक्षांना वसंत ऋतूमध्ये पानाफुलांचा बहर येतो. इथल्या उन्हाळ्यातले मोठे दिवस, त्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे त्यांचा सदुपयोग करून ही झाडे झपाट्याने वाढतात, तसेच अन्न तयार करण्याचा कारखाना जोरात चालवून त्याचा भरपूर साठा जमवून ठेवतात. कडक थंडीत आणि अंधारात फोटोसिन्थेसिस होत नसल्यामुळे पानांचा फारसा उपयोग नसतो, त्याशिवाय त्यांचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे त्यातून जास्त बाष्पीभवन होते, त्यावर जास्त बर्फ सांचून त्याचा भार वृक्षाला सोसावा लागतो असे तोटेच असतात. हे टाळण्यासाठी हे वृक्ष आधीपासूनच तयारीला लागतात. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे वृक्ष आपली वाढ थांबवतात आणि त्यांच्या पानांमधल्या क्लोरोफिलचे विघटन होणे सुरू होते, तसेच पानांमधले रस झाडाच्या आंतल्या बाजूला शोषले जाऊ लागतात. ते फांद्या आणि खोडांमधून अखेर मुळांपर्यंत जाऊन पोचतात आणि सुरक्षितपणे साठवले जातात. झाडांना थंडीत न गोठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण यामुळे मरगळ येऊन ती पाने सुकायला लागतात आणि गळून पडतात. पाने नसल्यामुळे झाडांचे श्वसन जवळ जवळ बंद होते आणि मुळांकडून पाण्याचा पुरवठा थांबल्यामुळे रसांचे अभिसरण होऊ शकत नाही. त्यापूर्वीच ही झाडे झोपेच्या पलीकडल्या डॉर्मंट स्थितीत जातात. आपल्याकडचे योगीराज सर्व शारीरिक क्रिया अतिमंद करून वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहात असत असे म्हणतात. ही झाडेसुध्दा दोन तीन महिने ध्यानावस्थेत काढून स्प्रिंग येताच खडबडून जागी होतात. पानांमध्ये हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलखेरीज कॅरोटिनाइड्स, क्झँथोफिल, अँथोसायनिन यासारखी पिवळ्या आणि तांबड्या रंगांची रसायनेसुध्दा असतात. एरवी क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे इतर रंग झाकले जातात. जेंव्हा क्लोरोफिल नष्ट होते तेंव्हा इतर द्रव्यांचे रंग दिसायला लागतात. कांही झाडे फॉलच्या काळात लाल रंगाचे अँथोसायनिन तयारही करतात. या द्रव्यांमुळे निर्माण होणारे रंग एकमेकात मिसळून त्यांच्या प्रमाणानुसार रंगांच्या वेगवेगळ्या असंख्य छटा तयार होतात. मात्र ही झाडे कोणालाही आकर्षित करण्यासाठी हे रंग धारण करत नाहीत. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली असते त्यात ते बायप्रॉडक्ट्स तयार होतात. हे सगळे पाहता झाडांना फक्त जीव असतो एवढेच नसून त्यांना बुध्दी, विचारशक्ती आणि दूरदृष्टीसुध्दा असते की काय असे वाटायला लागते. ——–

दुरून डोंगर साजिरे

“बडा घर पोकळ वासा”, “नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा”, “वरून कीर्तन आंतून तमाशा” अशा “दिसतं तसं नसतं” या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं यातला विरोधाभास दाखवणा-या अनेक म्हणी प्रचारात आहेत. “दुरून डोंगर साजिरे” ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा “जवळ जाता द-या खोरी ” हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल द-या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खो-यांबरोबर कां घालावी? खो-यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात. अशी रम्य जागा जवळ जाऊन पाहतांना साजरी वाटत नसते कां? मला तर डोंगरसुध्दा जवळून पहातांना छानच वाटतात. त्यांवर चढउतार करण्याचा कष्टाचा भाग सोसला तर तिथले निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते. म्हणून तर सारी हिल स्टेशन्स इतकी लोकप्रिय असतात. कित्येक लोक मुद्दाम डोंगराळ भागात गिरीसंचाराला (ट्रेकिंगला) जातात. हे सारे लोक या पर्यटनांत घेतलेल्या सुखद अनुभवांचे चर्वण वर्षानुवर्षे करतांना आपल्याला दिसतात. त्यामुळे डोंगर दुरून तर साजिरे दिसतातच, जवळ गेल्यावर अनेकदा ते मनोहारी वाटतात.

असे असले तरी “दुरून डोंगर साजिरे ” या म्हणीचा एक अनपेक्षित असा वेगळाच अर्थ मागच्या आठवड्यात अचानकपणे माझ्या समोर आला. अमेरिकेच्या उत्तर भागातल्या रानावनांमधून आमची बस जात असतांना बाजूला दूरवर नजर पोचेपर्यंत फॉल कलर्सने रंगवलेल्या वृक्षराई दिसत होत्या. कांही ठिकाणी लाल, पिवळा, सोनेरी, केशरी आणि हिरवा या रंगांच्या विविध छटांनी सुशोभित झालेले अप्रतिम डोंगरमाथे क्षितिजापर्यंत पसरलेले दिसत होते. पण जेंव्हा मी कांही रंगीबेरंगी झाडे जवळ जाऊन पाहिली तेंव्हा मला धक्काच बसला. दुरून इतक्या सुंदर दिसणा-या या झाडांची पाने जवळून पहातांना मलूल दिसत होती. सूर्यप्रकाशात लाल, शेंदरी, सोनेरी रंगांत चमकणारी ही पाने जवळून निस्तेज, गरीब बिचारी अशी वाटत होती. त्यांची परिस्थिती दयनीय वाटावी अशीच झालेली होती, कारण आतां त्यांचे दिवस भरत आले होते. झाडांना जीव असतो हे तर आपल्या सर जगदीशचंद्र बसूंनी सिध्द करून दाखवले आहेच. त्यातल्या पानांना स्वतंत्र बुध्दी असेल तर त्यांनी आपल्या भाऊबंदांना गळून पडतांना पाहिले असणार आणि आपली गतसुध्दा आता तशीच होणार या विचाराने ती भयभीत होऊन किंवा निराशेने फिकट पडलेली असतील. ही सारी इतकी रंगीबेरंगी पाने गळून पडून या झाडांचे बुंधे आणि फांद्या यांचे फक्त काळवंलेले सांगाडे आता शिल्लक राहणार आहेत ही कल्पना माझ्याने करवत नव्हती.
शाळेत असतांना एक कविता शिकलो होतो ती अशी होती.

आडवाटेला दूर एक माळ । तरू त्यावरती थोरला विशाल ।
आणि त्याच्या बिलगूनिया पदासी । जीर्ण पाचोळा पडे तो उदास ।।

इथे तर हमरस्त्यापासून जवळच ओक, मेपल आदि ताडमाड उंच वृक्षांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या आणि त्यांच्या पायथ्याशी गळलेल्या पानांचा इतका खच पडला होता की त्याखालची जमीन व त्यावर उगवलेली हिरवळ त्या पाचोळ्याच्या दाट थराखाली झाकली गेली होती. हे आता वाढतच जाणार होते आणि वा-याच्या झुळुकेने त्यातल्या कांही पानांना उडवले तरी ती बाजूला पडलेल्या पाचोळ्याचा थरच वाढवत होती.

 

हेमंताचे दिवस मजेचे

 

ऋतुराज वसंताच्या आगमनाने सारी सृष्टी प्रफुल्लित होते. तिचे भाट कोकिलपक्षी वसंताचे स्वागत आपल्या सुस्वर गायनाने करतात असे मानले जाते. आपल्याकडे जागोजागी उत्साहाने निरनिराळ्या प्रकाराने व वसंतोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर येणारा दाहक ग्रीष्म ऋतू तापदायक वाटतो. त्यामुळे चातकाच्या आतुरतेने सारे लोक पहिल्या पावसाची वाट पाहतात. जीवनदान देणारा वर्षा ऋतू कांही दमेकरी सोडल्यास सर्वांनाच अत्यंत प्रिय असतो. पण भरपूर पाण्याची सोय होऊन गेल्यानंतर निरभ्र आकाशातले शरदाचे चांदणे आकर्षक वाटायला लागते. ‘शारद चंदेरी’ रात्रींची मजा चाखल्यानंतर वर्षाच्या अखेरीस शिशिरातल्या ‘माघाची थंडी’ धुंदी देते. या दोन ऋतूंच्या मध्ये येऊन जाणारा हेमंत ऋतू मात्र कधी सुरू झाला आणि कधी संपला याबद्दल फारसे बोलले जात नाही. त्याचे खास असे ठळक वैशिष्ट्य सांगता येत नाही.

युरोप अमेरिकेत असे सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे होत नाहीत. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून पुढले सहा महिने रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो आणि सप्टेंबरच्या शेवटल्या आठवड्यापासूनचे सहा महिने दिवसापेक्षा जास्त वेळ रात्र असते. या फरकामुळे होणारे तपमानातले बदल उन्हाळा (समर) आणि हिंवाळा (विंटर) या मुख्य दोन ऋतूंच्या रूपाने दिसतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला एकदम सगळी झाडे फुलांनी बहरलेली दिसू लागतात. या काळाला ‘स्प्रिंग’ म्हणतात. ऋतुचक्रातला हा पहिला ऋतू वसंताप्रमाणे लोकप्रिय असतो. पण त्यानंतर येणारा ‘समर’ जास्त सुखावह वाटतो. या काळात बहुतेक लोक सुटी घेऊन कुठे ना कुठे हिंडण्याफिरण्याचे आणि मौजमस्ती करण्याचे बेत आखतात. पूर्वी तर कित्येक संस्थांना केवळ यासाठी महिनाभर सुटी देत. त्यानंतर हिंवाळ्यातल्या थंडीची चाहूल लावणारा ‘ऑटम’ किंवा ‘फॉल सीझन’ येतो. अमेरिकेतले लोक मात्र सकारात्मक विचार करून त्याची मजा अनुभवतात.

या काळात निसर्गात एक अद्भुत दृष्य पहायला मिळते. योगायोगाने मला इकडे आल्या आल्या उत्तरेकडली घनदाट राने पहायला मिळाली. हेमंत (फॉल) ऋतू येताच ही झाडे आपला रंग बदलू लागतात. उन्हाळ्यात हिरवी गर्द दिसणारी वनराई लाल, केशरी, शेंदरी, सोनेरी, पिवळा धमक अशा विविध रंगांच्या असंख्य छटा धारण करते. एकादे संपूर्ण झाड लालचुटुक दिसते तर एकाद्या झाडाच्या निरनिराळ्या शाखा वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाल्या असतात. कांही झाडांच्या फांद्या अनेक रंगांनी सजलेल्या असतात. या सगळ्या रंगरंगोटीमध्ये एक प्रकारची सिमेट्री असावी असे वाटते. ‘फॉल कलर्स’ या नांवाने ओळखले जाणारे हे दृष्य फारच विलोभनीय असे असते. अनेक पर्यटक मुद्दाम ते पाहण्यासाठी प्रवासाला निघतात.

या दिवसात, म्हणजे सध्या (ऑक्टोबर महिन्यात) अजून दिवसातले अकरा तास उजेड असल्यामुळे कडाक्याची थंडी अजून सुरू झालेली नाही. पहाटे गारवा वाटत असला तरी उन्हे वर आल्यानंतर वातावरण प्रसन्न होते. संध्याकाळी ते आल्हाददायक असते. यावरून आपल्याकडल्या हेमंत ऋतूची आठवण येते. हे ‘हेमंताचे दिवस मजेचे रविकिरणात नहाण्या’साठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतांना दिसतात.

———————————————————————————————————–

अमेरिकेची नवी वाट – २ – थोडे स्पष्टीकरण

अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला (laptop) माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिसळपावचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन “जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे” असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली. अशा प्रकारे मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे असे कोणी लिहिले होते. कांही लोकांनी प्रवासाला लागणारे कमीत कमी अंतर आणि त्यामुळे होणारी इंधनाची व वेळेची बचत यासारखे मुद्दे मांडून झाल्यावर त्यावर युक्लीडच्या प्रमेयाच्या आधाराने त्यांचे विश्लेषण करून चर्चेचा स्तर बराच उंचावला होता. त्यातील मुद्द्यांचा विचार करून ही पुरवणी जोडायचे ठरवले.

१९९६ साली मी मुंबईहून टोरोंटोला गेलो होतो तेंव्हा आमच्या सरकारी ऑफिसातल्या फॉरेन ट्रॅव्हल सेलने माझे तिकीट लंडनमार्गे काढले होते आणि बिलातले प्रत्येक अक्षर व आकडा डोळ्यात तेल घालून तपासणा-या आमच्या अकाउंट्स खात्याने माझा ट्रॅव्हल क्लेम बिनबोभाटपणे मंजूर केला होता. माझे सामान्यज्ञान जरी कच्चे असले तरी त्या काळात कॅनडाला जाण्याचा दुसरा जवळचा किंवा स्वस्तातला मार्ग असता तर तो या विशेषज्ञांना नक्की ठाऊक असता अशी माझी खात्री आहे.

” सन २००१ साली डेल्टा, कॉन्टिनेंटल आणि युनायटेड या प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी उत्तर ध्रुवावरून चीनपर्यंत व्यावसायिक उड्डाणे करण्याची नुकतीच सुरुवात केली होती ( त्यानंतर त्यांनी ती सेवा भारतापर्यंत वाढवली असावी.) आणि एअर इंडियाने तर या मार्गावरून पहिले विमान २००७ साली उडवले.” अशी माहिती मला शोधयंत्राद्वारे (Search Engines) मिळाली. मी स्वतः नवी वाट शोधून काढल्याचा दावा कधीच केला नव्हता पण ही वाट किती जुनी आहे याची कल्पना प्रवास करतांना मला नव्हती, पण त्याने माझ्या अनुभवात विशेष फरक पडला नसता. त्यामुळे माझ्या लेखाला ‘ अमेरिकेची नवी वाट’ असा सुटसुटीत मथळा देण्याऐवजी ‘आधीपासून अस्तित्वात असलेली आणि चांगली रुळलेली पण मी यापूर्वीच्या आयुष्यात कधीही न पाहिलेली अमेरिकेची वाट ‘ असे लांबलचक नांव दिले असते तरी त्याखालचा मजकूर जवळजवळ तसाच राहिला असता .

‘विमानप्रवासाचा इतिहास’ या विषयावरील चर्चेचा धागा मी सुरू केला असता तर कोणत्या कंपनीने तयार केलेले आणि कोणत्या कंपनीने उडवलेले विमान पहिल्यांदा भारतातून निघून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेला गेले याच्या इतिहासाची पाळेमुळे खणून काढली असती. पण माझ्या लेखाचा तो उद्देश नव्हता. आपण एकाद्या नवख्या गांवात जातो तेंव्हा रेल्वे स्टेशनातून बाहेर कसे पडायचे ते सुध्दा आपल्याला ठाऊक नसते. बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरच्या पाट्या वाचत वाचत आणि चौकशा करत आपण योग्य स्थळी पोचतो. या सगळ्या गोष्टी जुन्याच असल्या तरी आपण प्रथमच पहात असतो. त्यामुळे त्याचे वर्णन रंगवून इतरांना सांगतो. बहुतेक सारी प्रवासवर्णने अशाच प्रकारे लिहिली गेली आहेत. मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर न्यूयॉर्कला पोचेतोपर्यंत मी जे पाहिले, अनुभवले ते विस्मरण होण्याच्या आत थोडक्यात लिहून काढले होते.

मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये कमीत कमी अंतर कसे काढायचे या विषयाकडे वळू. या दोन शहरांच्या बिंदूंना जोडणारी सरळ रेषा काढली तर ती पृथ्वीच्या पोटातून जाते. त्यामुळे आकाशमार्गाने त्यांना जोडणा-या सर्व रेषा वक्रच असणार. परवा वॉशिंग्टन डीसी मध्ये फिरतांना एका वस्तुसंग्रहालयाच्या समोर अनेक मोठमोठे ग्लोब मांडून ठेवलेले पाहिले. थोडे लक्ष देऊन निरीक्षण केल्यावर युक्लिडचा नियम लक्षात आला तसेच मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमधले कमीत कमी अंतर कुठल्या वक्र रेषेनुसार येते तेही कळले. आपली ठेंगणी ठुसकी आणि ढेरपोटी पृथ्वी उत्तर व दक्षिण ध्रुवांपाशी जराशी चपटी आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे. विषुववृत्ताचा परीघ उत्तर व दक्षिण ध्रुवांमधून जाणा-या पृथ्वीच्या परीघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आमच्या विमानाने घेतलेला उत्तर दिशेचा मार्ग अर्थातच जवळचा होता. त्याशिवाय ध्रुवप्रदेशातले वातावरण स्तब्ध असल्यामुळे हवेचा विरोधसुध्दा थोडा कमी असतो म्हणे.

कोणत्याही वाहनातून जमीनीवरून वाहतूक करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधावे लागतात. ते अमूक इतक्या वर्षांपूर्वी बांधले गेले असे सांगता येते. हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते आणि ते पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. मुंबई व न्यूयॉर्क ही शहरे वसण्यापूर्वीच युक्लिडने आपले सिध्दांत सांगितले होते. भूगोलाच्या रचनेचा अभ्यासही पूर्वीपासून होत आला आहे. शंभर वर्षांपूर्वी जेंव्हा राईट बंधूंनी पहिले सुनियंत्रित विमान उडवले होते तेंव्हाच मुंबईपासून न्यूयॉर्कचे कमीत कमी अंतर कोठल्या मार्गाने ठरेल याची माहिती शास्त्रज्ञांना बहुधा उपलब्ध असावी. प्रत्यक्षात कोणत्या मार्गाने विमान न्यायचे हे तांत्रिक प्रगती व राजकीय परिस्थिती या कारणांनी ठरते.

भारतातून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेकडे विमान नेण्यासाठी वाटेत न थांबता तितके लांबचे अंतर उडत जाण्याची क्षमता असलेले विमान हवे किंवा वाटेत थांबून इंधन भरण्याची सोय असायला हवी. तसेच पूर्वीच्या सोव्हिएट युनियनकडून किंवा नंतरच्या काळात त्यामधून फुटून निघालेल्या राष्ट्रांची परवानगी हवी. त्या भागावरून जातांना तिथे जमीनीवरून विमानांना मार्गदर्शन करणारी सक्षम व सुसज्ज अशी यंत्रणा पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर उत्तर ध्रुवापाशी कोठेही ते विमान खाली उतरवणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून त्याची तरतूद करायला पाहिजे. अशा अनेक कारणांमुळे वीसाव्या शतकात अशी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली नाहीत. हेरगिरी करणारी खास विमाने कधीपासून जगभर सगळीकडे फिरत आली आहेत.

———————————————————————————————

अमेरिकेत सारे कांही शक्य आहे

या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत आहे. चार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या निवडणुकीत बरॅक ओबामा घसघशीत मताधिक्याने निवडून आले होते. त्या काळात मी अमेरिकेत होतो. निवडणुकीपूर्वीचा प्रचार आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर झालेला जल्लोष प्रत्यक्ष (मुख्यतः टीव्हीवर) पाहिला. त्यातली एक आठवण.

१९०८ साली सप्टेंबरच्या अखेरीस मी अमेरिकेत जाऊन पोचलो तेंव्हा तिथे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण अमेरिकेत भ्रमण करतांना कोठेही मोठमोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक दिसले नाहीत की कोठेही ध्वनीवर्धकांचा (लाऊडस्पीकर्सचा) कर्कश गोंगाट ऐकू आला नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमधल्या मोठ्या मैदानात किंवा इतर शहरांमधल्या मोठ्या सभागृहांमध्ये प्रचाराच्या काही सभा होत असत आणि त्यांचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना खास कार्यक्रम चाललेले असायचे. आजकाल तिकडे प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होत असावा. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या.

तेथील लोकांच्या स्थानिक समस्यांशी माझे कांहीच देणे घेणे नसल्यामुळे त्या बाबतीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही, पण त्यांच्या बोलण्याचा थोडा एकंदर अंदाज येत होता. प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत झालेल्या गैरव्यवहारामुळे आज अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे असाच तेथील सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे फार मोठे भांडवल करण्याचा मोह टाळून, “प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते करायचे आहे.” असे प्रतिपादन ओबामा करायचे. त्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचे सूतोवाच ते आपल्या भाषणात करत. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. मॅकेन यांच्या भाषणात जेवढा ओबामाचा उल्लेख मला आढळला तेवढा मॅकेन यांच्या नांवाचा उल्लेख ओबामांच्या भाषणात मला तरी जाणवला नाही. “ओबामा जे सांगताहेत ते ते कसे काय करणार आहेत?” असा सवाल मॅकेन हे नेहमी करायचे. त्यावर एक मंद स्मित करून “अमेरिकेत सारे कांही शक्य आहे” असे ओबामा सांगायचे.

ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी स्वतः आपल्या भाषणात केला. “मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे.” असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असे दिसते. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीय त्यांच्या बाजूला आले. त्यामुळेच ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री.ओबामा यांनी या शब्दात केली.
“If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer.”

“अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत.” या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती शक्य झाली होती आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले होते. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल इथे आलेल्या दिवसापासून मला त्यांचे कौतुक वाटत होते.

अमेरिका ! अमेरिका !!

अमेरिका ! अमेरिका !! – पूर्वार्ध

अमेरिकेत घडलेल्या घटना, तिथल्या नेत्यांची वक्तव्ये, सरकारची धोरणे, त्यानुसार इतर देशात होत असलेल्या कारवाया, आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडी, एवढेच नव्हे तर हॉलीवुडचे चित्रपट, त्यातले कलाकार, अमेरिकेतले खेळाडू वगैरेसंबंधी कांही ना कांही भारतातल्या प्रमुख वर्तमानपत्रात रोजच्या रोज छापून येत असते. त्यात बातम्या असतातच, कांही लेख किंवा वाचकांची पत्रेसुध्दा असतात. अमेरिकेत जाऊन यशस्वी झालेल्या भारतीयांच्या गौरवगाथा हा एक नवा विषय हल्ली प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. या रोजच्या वाचनामुळे अमेरिकेबद्दल कुतूहल वाटते, तिकडे जाऊन प्रत्यक्ष पहायची इच्छा होते आणि मला तर ते आपल्या आटोक्यात आहे असे पहिल्यापासून वाटत आले आहे.

मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला तेंव्हा समाजाच्या विविध थरातले विद्यार्थी तेथे आले होते. त्यातल्या कांही मुलांचे पालक मोठमोठ्या हुद्यावर काम करत होते तर कोणाचे आई वा वडील परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा विमान कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांचे नेहमी परदेशी जाणे येणे होत असे. इंजिनियरिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ड्रॉइंगमधल्या आडव्या-उभ्या रेघा सुध्दा मारायला शिकायच्या आधीपासून “आपण तर एम. एस. करायला स्टेट्सला जाणार, तिकडेच मायग्रेट होणार” वगैरे गोष्टी ती मुले करायची. ज्या माणसाच्याकडे जेवढी बुध्दीमत्ता आणि शिक्षणाची आवड असेल त्या प्रमाणात त्या माणसाचे शिक्षण होते अशी एक गैरसमजूत त्या वयात माझ्या मनात होती. त्यामुळे जर ही मुले पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असतील तर आपण तिथे जायलाच हवे, किंबहुना तिकडे जाणारच असे त्या मुलांचे ज्ञान आणि अभ्यासातली प्रगती पाहिल्यानंतर मला वाटू लागले होते.

अमेरिकेसारख्या परदेशात जाऊन रहायचे असेल तर तिथली बोलीभाषा तसेच तिथे मिळणारे खाणेपिणे यांची ओळख करून घेणे आवश्यक होते. ही मुले त्यासाठी वेस्टएंड आणि अलका टॉकीजमध्ये लागणारे एकजात सारे इंग्रजी चित्रपट पहायचे आणि कँपातल्या हॉटेलांमध्ये खादाडीसाठी जायचे. ही दुसरी गोष्ट फारच खर्चिक असल्यामुळे मला परवडण्यासारखी नव्हती आणि त्याची गरजही भासत नव्हती कारण घरातून निघून हॉस्टेलमध्ये रहायला गेल्यानंतर तिथल्या मेसमधले जेवण गिळणे मला मुळीसुध्दा कठीण गेले नव्हते, इतकेच नव्हे तर ते अन्न आवडू लागले होते. अमेरिकेत गेल्यावर तिकडच्या अन्नाचीसुध्दा आपल्याला अशीच संवय होईल याची मला खात्री होती, पण तिकडची बोलण्यातली भाषा शिकणे मात्र आवश्यकच होते. तिथल्या प्रोफेसरांचे बोलणेच आपल्याला समजले नाही तर तिथे जाऊन शिकणार तरी कसे? या कारणाने त्या मुलांबरोबर मी सुध्दा इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. कांही दिवसांनंतर मला ते सिनेमे समजायला लागले आणि इंग्रजी शिव्या तोंडात बसल्यानंतर तर माझा आत्मविश्वास भरपूर वाढला. त्यानंतर मला त्या दे मार चित्रपटांचे आकर्षण वाटणे कमी झाले, प्रॅक्टिकल्सच्या सबमिशनचा बोजा वाढत गेला आणि परीक्षेचा अभ्यास वाढला यामुळे मला सिनेमे पहाण्यासाठी वेळही मिळेनासा झाला. त्यामुळे पुढे हा (अमेरिकेचा) अवांतर अभ्यास फक्त काही अतिप्रसिध्द सिनेमे पाहण्यापर्यंत मर्यादित राहिला.

कॉलेजातले शिक्षण चालले असतांना हळू हळू वरच्या वर्गातल्या मुलांच्या ओळखी झाल्या. कॉलेजच्या शेवटच्या वर्षातली जी मुले खरोखरच अमेरिकेला चालली होती त्यांची वेगवेगळ्या प्रकारे तयारी चालली होती. यूसिसमधून अमेरिकन कॉलेजांची व युनिव्हर्सिट्यांची माहिती मिळवणे, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी फॉर्म मागवणे, पासपोर्ट व व्हिसाचे, तसेच टोफेल, गेट वगैरे परीक्षांचे फॉर्म आणणे, ते सारे फॉर्म भरून पाठवणे, प्रवेश आणि शिष्यवृत्तींसाठी शिफारसपत्रे मिळवणे, स्वतःच्या जन्माच्या दाखल्यापासून ते वाडवडिलांची इस्टेट आणि कमाई यांच्या दस्तऐवजांपर्यंत कागदपत्रे जमा करणे, त्यांच्या प्रति काढणे इत्यादी सतराशे साठ बाबी त्यात होत्या. त्यातले बहुतेक काम त्या मुलांचे पालक किंवा काका, मामा वगैरे कोणीतरी करीत होते. माझ्या मागे अशा कोणाचे पाठबळ नव्हते आणि ते सगळे काम स्वतः करण्यासाठी लागणारा वेळ व पैसे खर्च करणे मला शक्य नव्हते. त्यातूनही अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला, फ्रीशिप, स्कॉलरशिप, असिस्टंटशिप वगैरे मिळून तिथे येणा-या खर्चाची सोय झाली तरीसुध्दा तिथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढायलासुध्दा त्या काळात खूप म्हणजे खूपच पैसे पडायचे. कॉलेजच्या तीन वर्षांच्या संपूर्ण शिक्षणासाठी राहण्या व जेवण्यासकट माझा जितका खर्च झाला असता त्यापेक्षा जास्त किंमत अमेरिकेपर्यंत जाण्याच्या विमानाच्या एका प्रवासाच्या तिकीटाची होती. हे पैसे कोठून आणायचे हा ही एक गहन प्रश्न होता. त्यात लक्ष घालून दुःखी होण्यापेक्षा मन लावून अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क मिळवावेत, दोन तीन वर्षे नोकरी करतांना हळू हळू सारी कागदपत्रे जमवावीत आणि पैसे साठवावेत असा विचार करून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा बेत मी त्या वेळी पुढे ढकलला. . . . . . . . . . . . . . .. .. .

 

अमेरिका ! अमेरिका – उत्तरार्ध

इंजिनियरिंग कॉलेजमधले कांही ‘बडे बापके बेटे’ असलेले सहाध्यायी तिथे प्रवेश झाल्याझाल्याच पुढे अमेरिकेत जाऊन एमएस करण्याचा त्यांचा बेत सर्वांना सांगायला लागले होते. ते ऐकून आपण सुध्दा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असा विचार माझ्याही मनात येत होता, पण त्या वेळी ते कर्मकठीण असल्यामुळे तो बेत तात्पुरता तहकूब करून मी तो विषयच बाजूला ठेवून दिला होता. माझ्या कांही मित्रांनी मात्र आपापल्या कांही धनिक मित्रांचे हात घट्ट धरून ठेवले आणि त्या मित्रांच्या आधाराने ते स्वतःसुध्दा एक दोन वर्षानंतर अमेरिकेला जाऊन पोचले.

माझ्या सुदैवाने मला इथे भारतात मनासारखे काम मिळाले होते. त्यात रोजच्या रोज कांही तरी वेगळे वाचायला, पहायला, शिकायला आणि करायलासुध्दा मिळत होते. नवनवी आव्हाने समोर येत होती आणि ती स्वीकारून पेलून दाखवण्यातला आनंद मिळत होता. पगार बरा होता आणि परदेशी जाण्यासाठी काटकसर करून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा मनासारखा खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत होती. थोडक्यात म्हणजे मी त्यात रमलो होतो. शिवाय कामानिमित्य कधी ना कधी परदेशप्रवास घडणार याचीही मला जवळ जवळ खात्री होती. परदेशात जाऊन कायमचे तिकडे रहाण्याची मला मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे एकादी ट्रिप मारायला मिळणे मला पुरेसे वाटत होते. हातचे सुखी जीवन सोडून पळत्याच्या पाठीमागे लागावे असे कांही तेंव्हा वाटले नाही आणि उच्च शिक्षणाच्या निमित्याने अमेरिकेला जाण्याची मनातली इच्छा हळू हळू विरून गेली.

माझ्या अपेक्षेनुसार परदेशी जाण्याच्या संधी मला मिळाल्या आणि त्रिखंडात थोडेसे भ्रमण झाले. त्यामुळे फ्रँकफूर्टच्या भव्य विमानतळावरील मिनि थिएटरमध्ये सिनेमा पाहतांना मी कसा भान हरपून गेलो होतो, टोरोंटोचा उंचच उंच सीएन टॉवर पाहतांना केवढा आश्चर्यचकित झालो होतो किंवा लंडनला वॅक्स म्यूजियममध्ये मला एक विलक्षण माणूस भेटला होता वगैरे गप्पा मीसुध्दा मारू शकत होतो. परदेशगमनातला ‘अपूर्वाई’ आणि नवलाईचा भाग संपल्यानंतर मला त्याचे खास कौतुक वाटेनासे झाले. सी एन एन सारख्या वाहिन्यांवरून अमेरिकेतल्या जीवनाची चित्रे आपल्याला रोजच घरबसल्या दिसतात आणि माझ्या दौ-यांमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्यांपेक्षा ती फारशी वेगळी नसतात. आता तर अंतर्बाह्य पाश्चात्य धाटणीची दिसणारी घरे, ऑफीसे, दुकाने आणि मोटारगाड्या भारतात सर्रास दिसू लागल्या आहेत. अमेरिकेत प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याचा योग जरी वेळोवेळी हुलकावण्याच देऊन गेला असला तरी परिस्थितीत एवढे बदल झाल्यानंतर त्याची टोचणी वगैरे कधी बोचत राहिली नाही.

आमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने परदेशात गेली आहेत. त्यातही अमेरिकेत जाणा-यांचीच बहुसंख्या आहे. आपल्या मुलांना भेटून येण्याचे निमित्य करून आमच्या ओळखीतले बरेच लोक अमेरिकेची वारी करून आले. शेजारीपाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे सगळ्यांच्या मेळाव्यात कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेच्या प्रवासातले मजेदार अनुभव सांगून आणि तिकडच्या वातावरणाचे तोंडभर कौतुक करून झाल्यानंतर “तिकडे सगळे कांही खूपच छान असले तरी आपल्याला तर बुवा त्याचा भयंकर कंटाळा आला आणि म्हणून आम्ही कधी एकदा आपल्या घरी परत जातो असे झाले होते.” वगैरे सांगायचे. आपल्यालाही असले कांही बोलण्याची संधी मिळावी एवढ्यासाठी तरी एकदा अमेरिकेला जाऊन यायला पाहिजे असे आता नव्याने वाटू लागले आणि आम्हीसुध्दा अमेरिकेला जाऊन यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे जे काम मी चाळीस वर्षांपूर्वी करण्याचे टाळले होते ते नव्याने पुन्हा हातात घेतले.

पण चाळीस वर्षांपूर्वी मी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतो तसा आता नव्हतो. माझ्याकडे पासपोर्ट उपलब्ध होता आणि व्हिसा मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे कशा प्रकारची कागदपत्रे लागतात, तसेच ती कुठे मिळतात याची बरीच माहिती व पूर्वानुभव होता. त्यातले बरेचसे दस्तऐवज आधीच माझ्या संग्रहात होते ते बाहेर काढून चाळून पहायला सुरुवात केली. आवश्यक जागी अद्ययावत माहिती भरून त्यांचे नूतनीकरण करायचे आणि जे आपल्याकडे नसतील ते प्राप्त करून घ्यायचे काम करायला हळू हळू सुरुवात केली.

आजकाल इंटरनेटवर याबद्दल खूप मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली आहे. अशाच एका सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या स्थळाला भेट देऊन त्याबद्दल तिथे दिलेली माहिती उतरवून घेतली. ती अत्यंत उपयोगी होतीच, व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी पडणा-या संभाव्य कागदपत्रांची एक लांबलचक यादीसुध्दा त्यात मिळाली. पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची? त्यापेक्षा आपल्या घरी आपण निवांतपणे सुखात रहावे हे उत्तम असा विचार मनात आला.

पण इतर लोक काय करतात त्याचीही एकदा चौकशी करायचे ठरवले. नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले आणि तिकडे जायला निघालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गांठून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. त्यात थोडी फार तफावत असली तरी त्यांचा लसावि, मसावि काढून विशेष कष्ट न करता त्यातल्या त्यात कोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकतील त्यांची अखेरची यादी करून तेवढी गोळा करायची असे ठरवले. सुदैवाने तेवढ्यावर आमचे काम झाले आणि इंटरव्ह्यूत पास होऊन व्हिसा मिळाला. महत्वाचे असे कांही तरी मिळाल्याचा जो आनंद या वेळी झाला तसा आनंद कित्येक वर्षानंतर होत होता.

अमेरिकेची सफर भाग २ – अमेरिकेची नवी वाट

पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. त्या काळात मला अमेरिकेच्या अंतर्गत भूगोलाची विशेष माहिती नसल्यामुळे त्या शहरांचा फारसा संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत झाली होती.  पूर्वीच्या काळी (म्हणजे दहा पंधरा वर्षांपूर्वी) न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे.  आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका  शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे. मागे एकदा मी कॅनडामधील टोरोंटोला गेलो होतो तो लंडनमार्गेच जाऊन परत आलो होतो आणि दोन्ही प्रवासात लंडनच्या भूमीवर पाय टेकवले होते. अमेरिकेच्या पश्चिम किना-यावर सिलिकॉन खोर्‍याचा विकास सुरू झाल्यानंतर भारतीयांचे लोंढे तिकडे जाऊ लागले ते मात्र अतीपूर्वेतील हाँगकाँग, शांघाई, टोकियो वगैरे चिनी जपानी शहरांना जाऊन तिकडून पॅसिफिक महासागर ओलांडून ‘एले’ला (लॉसएंजेलिसला) जातात अशी नवी माहिती मिळाली.  थेट न्यूयॉर्कला जायचे माझे तिकीट निघाले तेंव्हा आपण पश्चिमेकडून जाणार असेच मला वाटले होते. नकाशात मुंबई आणि न्यूयॉर्कला जोडणारी आडवी सरळ रेषा काढली तर ती अरबस्तान आणि उतर आफ्रिकेतल्या सहाराच्या वाळवंटावरून जाते. त्यामुळे आपले थेट जाणारे विमान कदाचित युरोपला बाजूला ठेऊन सरळ आफ्रिकेवेरून अमेरिकेला जाईल असे वाटले.

मुंबईच्या विमानतळावरून उडणारी सगळीच विमाने आधी पश्चिमेकडे जुहूच्या दिशेने झेप घेतात. समुद्रावर चार पांच मैल गेल्यानंतर डावीकडे वळून हैद्राबाद, बंगळूरूकडे किंवा उजवीकडे वळून दिल्ली, कोलकात्याकडे जातात हे मी अनेक वेळा पाहिले होते. या वेळेस आपले विमान कोठेही न वळता सरळ पश्चिमेकडे पुढे जात राहील अशी माझी अपेक्षा होती. पण उड्डाणानंतर लगेच उजवीकडे वळून ते उत्तरेकडे बडोद्याच्या दिशेने जमीनीच्या वरून उडू लागलेले पाहून आपण चुकीच्या नंबराच्या विमानात बसलो की काय अशी शंका क्षणभर मनात चमकून गेली. आता हे विमान आपल्याला ज्या देशात घेऊन जाईल तिथे जाणे भागच होते. पण मॉनिटरवर न्यूयॉर्क हेच गन्तव्य स्थान दिसत असलेले पाहून जीव भांड्यात पडला आणि ते तिथे कोणच्या मार्गाने जाणार आहे याच्या कुतूहलाने मनात जन्म घेतला.  

उत्तर दिशेला दहा बारा अंशाचा कोन करून आमच्या विमानाचे सरळ रेषेत ‘झेपावे उत्तरेकडे’ चालले होते. गुजरात आणि राजस्थानला पार करून ते पाकिस्तावर आले, तिथून अफगाणिस्तानावरून उडत जात असतांना कोणा तालिबान्याच्या तोफेचा गोळा तर तिथपर्यंत चुकून येणार नाही ना याची काळजी वाटली. पण रमजानच्या  महिन्यात रात्रीचा इफ्तार खाऊन ते सारे अतिरेकी गाढ झोपी गेलेले असणार!  अफगाणिस्तानावरून आमचे विमान कझाकस्तान, उझ्बेकिस्तान वगैरे देशांवरून जात होते. ताश्कंदचा एक अपवाद सोडला तर तिकडचे कोणतेही ठिकाण ओळखीचे वाटत नव्हते. पृथ्वीवरचा इकडचा भाग मी यापूर्वी कधी नकाशातदेखील पाहिलेला नव्हता. आणखी वर (म्हणजे उत्तरेकडे) गेल्यावर उरल पर्वतांच्या रांगा (मॉनिटरवर) दिसू लागल्या. बाहेर अंधार गुडुप असल्यामुळे खिडकीतून कांहीच दिसण्यासरखे नव्हते. मॉस्कोलासुद्धा दूर पश्चिमेकडे सोडून आमचे उड्डाण उत्तर दिशेने वर वर चालले होते. थोड्या वेळाने इस्टोनिया, लाटव्हिया वगैरे देश बाजूला सोडून आणि फिनलंड, स्वीडन यांना मागे टाकून आम्ही नॉर्वेच्या पूर्व टोकाला स्पर्श केला. भारतापासून इथपर्यंत आम्ही सलग जमीनीवरूनच उडत होतो. नॉर्वे ओलांडल्यानंतर पहिल्यांदा एक लहानसा समुद्र आला. अॅटलांटिक महासागर जिथे आर्क्टिक महासागराला मिळत असेल तो हा भाग असावा. आपल्या आयुष्यात आपण कधीही उत्तर ध्रुवाच्या इतक्या जवळ येऊ शकू असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. खिडकीबाहेर एक गंमतशीर दृष्य दिसत होते.  खाली सगळा अंधार होता पण आमच्या बाजूला क्षितिजापलीकडे थोडा अंधुक उजेड दिसत होता. तो बहुधा उत्तर ध्रुवाच्या पलीकडे ज्या भागात सहा महिन्यांचा दिवस चालला होता तिकडून हा उजेड आकाशात परावर्तित होत असावा.

आमचे विमान नाकासमोर सरळ रेषेत उडत असले तरी नकाशात मात्र ते डावीकडे वळत वळत आधी उत्तरेऐवजी वायव्येकडे, त्यानंतर पश्चिमेकडे,  नैऋत्येकडे करीत चक्क दक्षिण दिशेने उडू लागले. वाटेत ग्रीनलँडचा बर्फाच्छादित भागही येऊन गेला आणि आम्ही उत्तरेच्या बाजूने कॅनडात प्रवेश केला. यापूर्वी एकदा मी पूर्वेच्या बाजूने कॅनडात येऊन दक्षिणेला नायगारापर्यंत म्हणजे यूएसएच्या सीमेपर्यंत आलो होतो. या वेळी ती सीमा विमानातून ओलांडून युनायचेड स्टेट्समध्ये दाखल झालो.  नव्या देशात आल्याचा आनंद होताच, अकल्पितपणे एक नवी वाट पाहिल्याचा बोनस मिळाला.

हा वृत्तांत चार वर्षांपूर्वीचा आहे. आता उत्तरेकडून थेट अमेरिकेला जाणे येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे.

अमेरिकेची सफर भाग १ – निघालो अमेरिकेला

मी चार वर्षांपूर्वी अमेरिकेची वारी करून आलो होतो. त्याच वेळी ही लेखमाला लिहून माझ्या आनंदघन या ब्लॉगवर प्रकाशित केली होती.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, यू.एस.ए. किंवा बोलीभाषेत फक्त अमेरिका या देशाबद्दल लहानपणापासूनच माझ्या मनात गुंतागुंतीच्या संमिश्र भावना उमटत होत्या. कधी या देशाचे कौतुक वाटले तर कधी तिटकारा. पण एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे प्रचंड कुतूहल आणि दुसरी म्हणजे तो देश पहाण्याची प्रबळ इच्छा.

अमेरिकेच्या इतिहासाबद्दल माझे ज्ञान कोलंबसाच्या सफरीपासूनच सुरू होते. पृथ्वी गोल आहे याची खात्री पटल्यानंतर पश्चिमेच्या दिशेने गेल्यास पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानला जाणारा जवळचा मार्ग मिळेल अशा आशेने तो उलट्या दिशेने निघाला. अमेरिकेच्या किना-याजवळची कांही बेटे पाहून त्याला हिंदुस्थानच सापडल्याचा भास झाला. त्याचे दमलेले सहकारी आणखी पुढे जायला तयार नव्हते आणि आपण लावलेला हिंदुस्थानचा शोध कधी एकदा आपल्या राजाला सांगतो असे कोलंबसला झाले होते. त्यामुळे अधिक खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता तो तिथूनच परतला. पुढे अमेरिगो व्हेस्पुसी वगैरे लोकांनी कोलंबसाने शोधलेला भूभाग वेगळाच असल्याचे दाखवून दिल्यानंतर त्या खंडाचे नांव अमेरिका असे ठेवण्यात आले आणि कोलंबसाला सापडलेल्या बेटांना वेस्ट इंडीज म्हणायला सुरुवात झाली. अमेरिकेतले मूळचे प्रवासी मात्र ‘इंडियन’च राहिले. भारतीयांपासून त्यांचा वेगळेपणा दाखवण्याकरता त्याला कधी कधी ‘रेड’ हे विशेषण जोडण्यात येते. त्यानंतर युरोपियन लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे गेल्या आणि त्यांनी तिथे नंदनवन फुलवले.

अमेरिका ही जगातील सर्वात धनाढ्य व बलाढ्य अशी महासत्ता अशीच मला या गोष्टी समजायला लागल्यापासून या देशाची ओळख आहे. खेड्यातल्या श्रीमंत सावकाराबद्दल गरीब शेतक-याच्या मुलाला जे कांही वाटत असेल किंवा गल्लीतला पोर अमिताभ बच्चनसंबंधी कसा विचार करेल तशीच माझी अमेरिकेबद्दल भावना असायची. दबदबा, आदर, वचक, असूया, कौतुक वगैरे सगळ्या परस्परविरोधी भावना त्यात आल्या. अमेरिकेसंबंधी माहिती तर सतत कानावर पडतच असायची. तिकडे घरातल्या माणसागणिक उठायबसायच्या आणि झोपायच्या वेगळ्या खोल्या आणि फिरायला वेगळ्या मोटारी असतात वगैरे ऐकून अचंभा वाटायचा, तसेच हे पहायला आणि उपभोगायला तिकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हायची.

अमेरिकेत आधी गेलेल्या युरोपियन लोकांनी स्थानिक लोकांची निर्घृण कत्तल केली तसेच आफ्रिकेतून पकडून आणलेल्या निग्रो लोकांना पशूसारखे वागवून त्यांच्याकडून ढोरमेहनत करून घेतली वगैरेंच्या कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्यांच्या आजच्या समृध्दीचा पाया त्यांच्या पूर्वजांच्या अशा अमानुष वागणुकीवर रचलेला आहे हे विसरता येत नाही. पण आज अमेरिकेत असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाइले जातात, तसेच तिथे व्यक्तीविकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे म्हणतात. गेल्या शतकात कृषी, खाणकाम, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अमेरिकेने जी घोडदौड केली आहे ती फक्त कौतुकास्पद नव्हे तर विस्मित करणारी आहे.

इंग्रजांपासून स्वतंत्र झालेल्या भारताने अमेरिकेच्या गोटात सामील होणे नेहमीच नाकारले होते. यामुळे दीर्घ काळ राजकीय क्षेत्रात या दोन देशात मतभेद राहिले. कधी कधी ते विकोपालाही गेले होते. आता त्यांच्यातले संबंध चांगले झाले आहेत. पण अमेरिकन सरकारची धोरणे बहुतेक सुशिक्षित भारतीयांना पसंत पडत नव्हती. एका बाजूला अमेरिकन सरकारवर टीका करायची पण तिथे जायची संधी मिळाली तर ती मात्र सोडायची नाही असेच चित्र बहुतेक मध्यमवर्गीय सुशिक्षित भारतीयांच्या घरी मला दिसत आले आहे.

अशा संमिश्र भावना घेऊन मीही अमेरिकेच्या वारीला निघालो. तिथे जाऊन मला अर्थार्जन करायचे नाही आणि ते करण्याची मुभाही नाही. तिथल्या सुबत्तेचा माफक उपभोग घेत राहणे, हिंडणे, फिरणे, हिंडता फिरता निरीक्षण करणे आणि ‘लाइफ एन्जॉय करणे’ एवढाच माफक उद्देश होता.

 . .. . . . . .  . . . . .. . . . (क्रमशः)