ग्रँड युरोप – भाग ३७ – समारोप

समारोप

दोन आठवड्यांच्या युरोपच्या सहलीनंतर वर्षभराने जितक्या आठवणी माझ्या स्मरणांत घर करून राहिल्या होत्या तेवढ्यांवरून जमेल तितका सविस्तर वृत्तांत मी मागील छत्तीस भागांत दिला. माझ्या अनुभवाच्या शिदोरीमधल्या इतर चार गोष्टीही त्या निमित्याने सांगितल्या. युरोपमध्ये घेतलेल्या अनुभवांचा भारतातील परिस्थितीच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. “मनांत आले ते लिहिले” या माझ्या ब्लॉग लिहिण्यामागील भूमिकेशी ते सुसंगत वाटावे. या ब्लॉगवरील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मालिका आहे. त्यामुळे तिच्या समारोपासाठी हा स्वतंत्र भाग लिहीत आहे.

“थोड्या दिवसात बरेच कांही पहायला मिळावे” हा या सहलीचा मुख्य उद्देश युरोपमध्ये फिरतांना पूर्णपणे सफळ झाला असे म्हणायला यत्किंचित हरकत नसावी. माझ्या त्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रचंड वैविध्य होते. निखळ निसर्गाची अनुपम रूपे स्विट्झर्लंडमध्ये पहायला मिळाली तर मानवी प्रयत्नाने घडवून आणलेला निसर्गाचा फुलोरा ट्यूलिपच्या बागेत दिसला. रोम आणि पॅरिसमधल्या भव्य ऐतिहासिक इमारतींचे अवशेष पाहिले, तसेच आजही सुस्थितीत ठेवलेल्या इतिहासकाळांतल्या अद्भुत वास्तू पहायला मिळाल्या. गतकाळातील ऐश्वर्याची साक्ष देणा-या नेत्रदीपक कलाकृतींचे दर्शन घडले. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशिल्प, नगररचना इत्यादी अनेक अंगाने ते कलाविष्कार नजरेला पडले. त्याचप्रमाणे आजच्या युगातील चैतन्यमय कार्यक्रमांची रंगतही अनुभवायला मिळाली. कलाकारांची कल्पकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची किमया या दोहोंच्या संगमामधून साकार झालेले चमत्कारसुद्धा पहायला मिळाले. यामधील कांही अनुभव माझ्या कल्पनेच्या पलीकडे चित्तथरारक होते, कांही अपेक्षेनुसार मनोहर होते, तर कांही आधी वाटले होते तितके कदाचित खास भावले नाहीत. असे असले तरी त्यामधून जे समाधान पदरात पडले ते सकारात्मकच होते. कष्ट, निराशा, पीडा अशा प्रकारचे नकारात्मक अनुभव कधीच आले नाहीत. एका वाक्यात सांगायचे तर खूप मजा आली.

पण ही मजा केवढ्याला पडली असा विचार व्यवहारी मन करते. खर्चाच्या बाजूला दोन मुख्य बाबी होत्या. या सहलीत माझे दोन आठवडे गेले आणि बरेचसे पैसे खर्च झाले. या जमाखर्चाचा ताळेबंद मांडून अखेरीस निव्वळ नफा पदरात पडला की हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला हे ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानुसार निरनिराळ्या लोकांची वेगवेगळी उत्तरे येतील. एवढेच काय पण मी स्वतः हे गणित आयुष्याच्या निरनिराळ्या अवस्थेतून जातांना वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून पाहिले होते आणि त्यातून प्रत्येक वेळी निराळे निष्कर्ष निघाले होते.

व्यापार उद्योगाच्या क्षेत्रांत “वेळ म्हणजेच पैसा” असे समीकरण मांडले जाते. अकुशल अथवा कुशल कामगार आणि अधिकारी वर्ग यांनी केलेल्या सर्व कामासाठी खर्चिलेल्या वेळेचा सविस्तर हिशोब ठेवला जातो आणि त्याचे मूल्य जमाखर्चात मांडले जाते. प्रत्येक माणसाची पात्रता, ज्येष्ठता आणि अनुभव या वरून त्या वेळेचे मूल्य ठरते. सर्वसाधारणपणे ते त्याच्या नियमित कमाईच्या प्रमाणात असते. पगारदार नोकरांचा ओव्हरटाईम, लीव्ह एन्कॅशमेंट वगैरेचा हिशोब त्या आधारावरच करतात. पण हे सगळे त्या काळात केलेल्या कामाच्या संदर्भात असते. केवळ मौजमजा करण्यासाठी कोण पैसे देणार आहे? ‘भटकंती’ यासारख्या कार्यक्रमात भाग घेणा-या कलावंतांना ते मिळतात खरे. कांही महत्वाच्या सभा, संमेलने, कार्यशाळा यांमध्ये हजर राहण्यासाठी विमानाने जाण्यायेण्याचा आणि उच्च दर्जाच्या हॉटेलांत राहण्याचा खर्च मला सुद्धा मिळाला आहे ती गोष्ट वेगळी. कारण त्या जागी उपस्थित राहणे हा सुद्धा त्या वेळी माझ्या कामाचाच एक भाग होता. पण या वेळेस युरोपच्या टूरसाठी लागणारा वेळ आणि येणारा खर्च माझा मलाच द्यायचा होता. त्याला कोणी प्रायोजक नव्हता.

कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी खर्च होणा-या वेळेचे योग्य मूल्यमापन करणे कठीण असते. प्रेमी युगुले किंवा नवदंपतीला एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणे हेच सर्वात जास्त महत्वाचे वाटते तर तान्ह्या बाळाच्या मातेला सतत बाळासोबत राहणे आवश्यक असते. त्यांनी त्यासाठी घालवलेला वेळ अमोल असतो. जीवनातील कित्येक आनंदाचे क्षण पैसे देऊन विकत घेता येत नाहीत किंवा दुःखाचे क्षण पैशाने टाळता येत नाहीत. पैसै खर्च करून आपण तो आनंद साजरा करू शकतो किंवा दुःखाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करतो एवढेच. असे असेल तर रिकाम्या वेळेचे मूल्य कसे ठरवायचे?

यासाठी बहुतेक लोक दोन मापदंडाचा उपयोग करतांना दिसतात. त्या वेळेत आपण एरवी काय केले असते हा पहिला विचार तो करतो. आपण त्या गोष्टीशिवाय आणखी निराळे काय काय करण्याच्या शक्यता होत्या हा दुसरा. त्यापासून आपल्याला कोणता लाभ झाला असता किंवा होऊ शकला असता याचे मूल्यमापन करून तो आपले निर्णय घेत असतो. हे अगदी आपल्या नकळत आपल्या मनात चाललेले असते. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात या दोन विचारांचे पारडे जड होत गेले होते. यापूर्वी बहुतेक वेळी माझ्या हातात असलेले नित्याचे काम किंवा कौटुंबिक कर्तव्ये इतकी महत्वाची असत की कांही काळ ती न करणे माझ्यासाठी शक्य नसायचे. जर त्यांच्यापेक्षाही अधिक महत्वाचे असे कार्य निघाले किंवा अचानक आणीबाणीची परिस्थिती आली तरच त्यांच्यासाठी कामातून थोडा वेळ बाजूला काढण्याची शक्यता असायची. त्यातूनही अधून मधून थोडी फुरसत मिळालीच तर आपल्या देशांतल्या सुंदर जागा पाहण्याचे आकर्षण तिकडे खेचून नेत असे. अशा प्रकारे पूर्वायुष्यात केंव्हाही भरपूर मोकळा वेळच उपलब्ध नव्हता, त्यामुळे त्याचे मूल्यमापन करण्याचा प्रश्न उद्भवला नाही.

सेवानिवृत्तीनंतर या परिस्थितीत कमालीचा फरक पडला. दैनंदिन जबाबदा-यांमधून मुक्तता मिळाल्यावर उपलब्ध वेळ कसा घालवायचा हे माझ्या मीच ठरवायचे आहे. त्यामुळे या मापदंडांना विशेष अर्थ प्राप्त झाला. पहिला प्रश्न “मी एरवी काय केले असते?” याचे उत्तर मी जे कांही जानेवारी, फेब्रूवारी, मार्चमध्ये करीत गेलो तेच एप्रिलमध्ये केले असते. त्यापासून शक्य तितका आनंद मिळवण्याचा प्रयत्न मी जरूर केला असता पण त्यातून आर्थिक लाभ कांही झाला नसताच. त्यामुळे त्याची किंमत करणे शक्य नव्हते. दुसरा प्रश्न “याव्यतिरिक्त काय काय करू शकलो असतो?” यात फारसा दम नव्हता. जर करू शकलो असतो तर मी ते जानेवारी, फेब्रूवारी, मार्चमध्ये केले नसते कां? थोडक्यात म्हणजे माझ्या वेळेचे मूल्य या वेळी नगण्य होते.

प्रत्येक माणूस पैशाबद्दल सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवाव्या लागतातच, त्याखेरीज आरोग्य, शिक्षण, मनोरंजन वगैरे ज्या इतर बाबींवर पैसे खर्च होतात, त्यासुद्धा त्याच्या जीवनासाठी आवश्यकच असतात. पण केवळ प्राथमिक गरजा भागवण्याच्या पलीकडे जाऊन तो चविष्ट अन्न खातो, छान कपडे घालतो आणि सुंदर वस्तू आणून आपले घर सजवतो. त्या सगळ्यामधून त्याला आनंद प्राप्त होतो. कांही लोकांना व्यसने लागतात, त्यापासूनही त्यांना सुख मिळतच असते, पण नंतर ते त्याच्या आधीन होतात. त्यामुळे ती त्यांची गरज बनते. बहुतेक लोकांना एकच चैन पुनःपुन्हा करावीशी वाटत नाही. ते नवनवे मार्ग शोधत असतात. हे सगळे करून शिल्लक उरलेले पैसे प्रत्येक जण जमवून ठेवतो किंवा त्यातून कसली तरी गुंतवणूक करतो. दागदागिने, घरदार, जमीनजुमला, बँकेतील खाते, शेअर्स वगैरे अनेक प्रकारची त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता त्यातून निर्माण होते. ती वाढत असलेली पाहतांना त्याला संतोष होतो. अधून मधून त्याला तीर्थक्षेत्रांची यात्रा करायची इच्छा होते, दानधर्म करावासा वाटतो. त्यातूनही त्याला एक समाधान मिळते. पैसे मिळाले तरी आनंद वाटणे आणि ते खर्च होतांनासुद्धा आनंदच वाटणे हे तार्किक दृष्ट्या विचार केल्यास अगम्य आहे. पण ते तसे होते. यामुळे या सगळ्या प्रकारे होणा-या पैशाच्या विनियोगांचे मूल्य ठरवायचे तरी कसे?

यासाठी सुद्धा वर दिलेले दोन मापदंड उपयोगी पडतात. “या पैशाचे एरवी मी काय केले असते आणि याहून वेगळे काय करू शकलो असतो?” याचा विचार केला तर त्यापासून कोणत्या प्रकारचा आणि केवढा आनंद आपल्या आयुष्यात निर्माण झाला असता याची कल्पना येते. हाच विचार मी केला आणि या सहलीवर जाण्याचा निर्णय घेतला. तो अर्थातच बरोबर ठरला. मला जे पैसे ‘बरेचसे’ वाटले ते कोणाला ‘थोडेसे’ वाटतील तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला तेवढे पैसे खर्च करणे अशक्यप्रायही वाटू शकेल. ज्याला ते शक्यच नसेल त्याला त्याबद्दल विचार करायचा प्रश्नच येत नाही. ज्याला ते क्षुल्लक वाटतील तोही त्यावर फारसा विचार करणार नाही. ज्या लोकांना ते ‘बरेचसे’ वाटत असतील तेच त्याचा जमाखर्च मांडून पाहतील. हा एवढा प्रपंच फक्त त्यांच्यासाठीच उपयोगाचा आहे.

आनंदाचे क्षण येतात आणि जातात. त्यांना आपण महसुली उत्पन्न म्हणू. या प्रवासातून आपल्या अनुभवाच्या शिदोरीत थोडी भर पडणार एवढा भांडवली स्वरूपाचा लाभ होता. याव्यतिरिक्त सांगायचे झाल्यास हा ब्लॉग लिहायला मजकूर मिळाला, तो लिहितांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला वगैरे फायदे सांगता येतील. ‘बागबान’ या सिनेमातला नायक अमिताभ बच्चन त्याच्या मनातील भावनावेगांना वाट करून देण्यासाठी त्यांचेबद्दल रोजनिशीत लिहून ठेवतो. नंतर तेच लिखाण कोणाला तरी आवडते आणि अमिताभला धनधान्यसमृद्धी, प्रसिद्धी वगैरे देऊन जाते. अशा गोष्टी नाटकसिनेमातच घडतात हे खरे असले तरी कदाचित कोणाला हे वर्णन आवडले तर? कोणी सांगावे?

. . . . . . .  . .(समाप्त)

ग्रँड युरोप – भाग ३६ -गुड बाय युरोप

गुड बाय युरोप

पॅरिसमधील लिडो शो पाहून हॉटेलवर परतेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली होती. पहाटे चार वाजता आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचे होते. त्यासाठी सामानाची बरीचशी बांधाबांध आधीच केलेली होती. पासपोर्ट आणि विमानाची तिकीटे वेगळ्या पाऊचमध्ये ठेवली.  प्रवासात घालायचे कपडे बाहेर काढून घेतले. शेवटच्या दिवशी बाहेर काढलेल्या गोष्टी परत बॅगेत जमवल्या. अनावश्यक पॅम्फ्लेट्सचे चिटोरे, प्लॅस्टिकच्या थैल्या, कार्डबोर्डचे पॅकिंग वगैरेची विल्हेवाट लावली. लवकर उठायचा उचका होता त्यामुळे शांत झोप लागणे शक्यच नव्हते. गादीवर आडवे पडून शरीराला थोडी विश्रांती दिली. निघायची वेळ होताच तयार होऊन सर्व सामानासह पांच मिनिटे आधीच खाली येऊन बसलो. आमची नीट व्यवस्था झाली असल्याची खात्री करून घेऊन आम्हाला निरोप देण्यासाठी संदीपसुद्धा बरोबर चार वाजता उठून खाली आला.

पॅरिसचे दोन विमानतळ वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ‘ऑर्ली’ येथे जुने विमानतळ आहे आणि ‘चार्ल्स द गौल एअरपोर्ट’ हे नवे विमानतळ आहे. ऑर्ली विमानतळ आमच्या हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून दिसत होते इतके जवळ होते, पण त्याचा कांही उपयोग नव्हता, कारण आमची फ्लाईट चार्ल्स द गौल एअरपोर्टवरून निघणार होती. पॅरिसमधल्या हॉटेलची स्वतःची वाहतूक व्यवस्था नव्हती. जवळपास कोठे टॅक्सीस्टँडदेखील नव्हते. त्यामुळे आमच्यासाठी शहरातून एक टॅक्सी बुक केली. ठरल्याप्रमाणे टॅक्सी वेळेवर तेथे आली. टॅक्सीत सामान ठेऊन आणि संदीपचा निरोप घेऊन निघालो. बाकीचे सहप्रवासी तर त्या वेळेस गाढ झोपेत होते. मनातूनच त्यांना निरोप दिला.

पहाटे चारच्या सुमारास मुंबईला बरीच जाग आलेली असते. हे शहर रात्रीसुद्धा बहुतेक फारसे झोपतच नाही. मुख्य रस्त्यावरील वाहतूक चोवीस तास सुरूच असते. पॅरिसला मात्र त्या वेळी रस्त्यात सगळीकडे शुकशुकाट होता. त्या शहराची अजीबात माहिती नसल्याने कुठून कुणीकडे चाललो होतो त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. उगाचच खिडकीतून दिसणा-या रस्त्यावरच्या पाट्या वाचायचा प्रयत्न करीत होतो. बराच वेळ गेल्यानंतर विमानाचे छोटे चिन्ह आणि ‘चार्ल्स द गौल एअरपोर्ट’ हे शब्द आणि त्याची दिशा दाखवणारे बाण दिसू लागल्यावर आपण योग्य त्या जागी जात असल्याची खात्री पटली.

तेवढ्यात “कुठले टर्मिनल?” असे टॅक्सी ड्रायव्हरने विचारले. ते तर मलाही ठाऊक नव्हते. “आधी एअरपोर्टला चलू आणि तेथे गेल्यावर पाहू.” असे मी म्हंटले. त्याला माझी भाषा समजली नाही. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी तिकीट काढून पाहिले. त्यावरही टर्मिनल लिहिलेले नव्हते. “आम्हाला ऑस्ट्रियन एअरवेजच्या विमानाने ऑस्ट्रियामधील व्हिएन्नाला जायचे आहे.” असे सांगितले. त्याला त्यातले कितपत समजले कुणास ठाऊक, त्याने एक नंबरच्या टर्मिनलवर जायचा निर्णय घेतला. “आता कुठून तरी टर्मिनल शोधायचे आहे, एक नंबरपासून सुरूवात करू.” असा विचार करून मी त्याला होकार दिला. मी आतापर्यंत पाहिलेल्या जवळ जवळ सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगवेगळी टर्मिनल्स होतीच. लांबलचक पॅसेजेस आणि कन्व्हेयर्सने ती आपसात जोडलेली होती. पाट्या वाचीत आणि बाण पहात मी योग्य त्या टर्मिनलकडे गेलो होतो. इथेसुद्धा तसेच असेल असे मला वाटले. आम्ही हव्या असलेल्या विमानतळावर जाण्यात कांही चूक केली नव्हती एवढे खात्रीपूर्वक रीतीने माहीत होते. तेथे गेल्यानंतर टर्मिनल शोधायचे बाकी होते. त्यासाठी पुरेसा वेळ होताच.

एक नंबरच्या टर्मिनलच्या दाराशी पोचल्यावर सामान काढून घेतले आणि ट्रॉलीवर ठेवले. दारापाशी जाताच कांचेचा दरवाजा आपोआप उघडला. आंत जाऊन पहाता तिथे चिटपांखरूसुद्धा नव्हते. हे युरोपियन लोक नेहमी अगदी वेळेवर येऊन पोंचतात हे माहीत होते. कुठे आणि कसे जायचे हे त्यांना नेमके माहीत असते, त्यामुळे ते शक्य होते. या प्रवासात सोबतीला मार्गदर्शक नसल्यामुळे आमची गोष्ट वेगळी होती. आपले चेक इन आपण करून घ्यावे असा विचार करून पुढे गेलो. टॅक्सी निघून गेलेली असल्याने मागचे दोर कापलेलेच होते. पॅसेजमधून चालता चालता एका जागी मोठा स्क्रीन होता. सकाळी सात वाजतांपासून तेथून सुटणा-या प्रत्येक विमानाचे गंतव्य स्थान, उड्डाण क्रमांक आणि वेळ त्यावर अनुक्रमानुसार दाखवली होती पण आमच्या फ्लाईटचा त्यात कोठे उल्लेखच नव्हता हे पाहिल्यावर मात्र आमचे धाबे दणाणले.

शोधाशोध करीत इन्फॉर्मेशन काउंटर गांठले. तेथेसुद्धा अजून कोणीही आलेले नव्हते. कोठल्याही एअरलाइन्सचे कार्यालय अजून  उघडलेले नव्हते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अलीकडे रात्रीच्या व पहाटेच्या फ्लाईट्स तिकडे नसतात. आपल्या मुंबईला किंवा दिल्लीला विमानतळांवर रात्रंदिवस जाग असते ते आठवले. पण त्याचा काय उपयोग? एका जागी सात आठ चिनी जपानी “चिंग मिंग” करीत उभे होते. त्यांना विचारून पाहिले. त्यांनी स्क्रीनकडे बोट दाखवले. अखेरीस एक गणवेशधारी मजूर दिसला. बुडत्याला काडीचा आधार पुरेसा असतो. त्यामुळे हांतवारे करीत त्याला विचारले. त्यालासुद्धा भाषा कळत नव्हती पण आमचा प्रॉब्लेम समजला. त्याने पहिल्या मजल्यावर जाण्याची लिफ्ट दाखवून तिकडे जाण्याचा इशारा केला. वर गेल्यावर तिथे आणखी एक माहिती देणारे काउंटर होते, पण तेसुद्धा रिकामे होते. पुन्हा खाली आलो. तो देवदूत जणू आमची वाटच पहातच उभा होता. आम्हाला दोन किंवा तीन नंबरच्या टर्मिनलवर जावे लागणार असे त्याने बोटे दाखवीत दर्शवले. पण नेमके कुठे आणि कसे जायचे हा प्रश्न होता.

लांबलचक पॅसेजमध्ये अधीरपणे येरझा-या घालता घालता दूर कोठे तरी एक गणवेशधारी महिला प्रकट झालेली दिसली. सामान अलकाजवळ सोडून दिले आणि ती परी अदृष्य होण्याच्या आंत धांवत जाऊन तिला गांठले. माझे तिकीट पाहून टर्मिनल नंबर ‘दोन डी’ वरून आमची फ्लाईट सुटेल आणि तिकडे जाण्यासाठी ट्रेन आहे एवढी खात्रीलायक माहिती तिने दिली. कुठे जायचे ते तर समजले. आता तिकडे कसे जायचे ते शोधून काढायचे होते. रेल्वे स्टेशन शोधतांना पुन्हा आमचा देवदूत वाटेत भेटला आणि आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला. तो बरोबर नसता तर मला ते ओळखूच आले नसते. कारण मोठ्या कॉरीडॉरचाच तो एक भाग असल्यासारखे वाटत होते. प्लॅटफॉर्म, रूळ, वेटिंग रूम, तिकीट ऑफीस, टाईमटेबल, इंडिकेटर यांतले कांही सुद्धा त्या ठिकाणी दिसत नव्हते. प्रवासी तर नव्हतेच. एका बाजूला मोठी चित्रे लावलेली पार्टीशन्स होती त्यातच मधेमधे सरकणारे दरवाजे होते. त्यांच्या पलीकडले कांही दिसत नव्हते.

कांही क्षणांतच धडधडण्याचा आवाज ऐकू आला आणि आगगाडीचा एकच स्वयंचलित डबा गडगडत समोर आला. डब्याचे दार उघडले त्याबरोबरच त्याच्या समोरील प्लॅटफॉर्मवरील दरवाजा सरकला आणि आंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आंत दोन तीन माणसे बसलेली होती. आम्हीही आंत जाऊन बसलो. दाराच्या वर एका रेषेचा एक नकाशा रंगवलेला होता. टर्मिनल एक, दोन, तीन आणि त्यांच्यामधील पार्क स्टेशनांच्या जागा त्यांत दिव्याने दाखवलेल्या होत्या. प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी त्याची अनाउन्समेंट होत होती आणि स्टेशन येतांच तिथला बारीकसा दिवा प्रज्वलित होत होता. अशा प्रकारची व्यवस्था मी पूर्वी इंग्लंडमध्ये पाहिलेली होती. तरीही सहप्रवाशांना विचारून घेतले. त्यांनीसुद्धा आम्ही अनभिज्ञ आहोत असे गृहीत धरून केंव्हा उतरायचे ते समजावून सांगितले. या एअरपोर्टवर गाड्या उभ्या करून ठेवण्यासाठी वेगळ्याच जागेवर गाडी पार्क करून ट्रेनने हव्या त्या टर्मिनलला जायचे अशी व्यवस्था असावी. आमचे स्टेशन येण्याच्या आधीच्याच पार्क स्टेशनवर ते लोक उतरून गेले, पण आम्हाला पुढच्या स्टेशनावर उतरायचे आहे एवढे उतरण्याआधी ते सांगून गेले.

‘टर्मिनल दोन’ आल्यावर आम्ही खाली उतरलो. पॅसेजमधील फलक व बाण पहात पहात ‘दोन डी’ शोधून काढले. इथे मात्र प्रवेशद्वारावरच एक सुरक्षा अधिकारी बसलेला होता. आमची तिकीटे पाहून त्याने बारा की बावीस अशा कुठल्या तरी नंबरच्या खिडकीवर चेक इन करून त्रेसस्ठ नंबरच्या गेटने विमानांत बसायचे आहे एवढी माहिती दिली. पहिल्यांदा आमची पूर्ण खात्री होऊन एकदांचा जीव भांड्यात पडला आणि मनांतली धुकधुक थांबली. या खिडक्या सुद्धा एकमेकीपासून खूपच दूर दूर पसरलेल्या होत्या. हळूहळू शोधत आमच्या खिडकीपर्यंत पोचलो, पण तिथे एअर फ्रान्सचे नांव लिहिलेले होते. ऑस्ट्रिया देशाचे किंवा त्यांच्या एअरलाइन्सचे नामोनिशाण तिथे दिसत नव्हते. ती खिडकीही अजून उघडलेली नव्हती. दोन तीन प्रवासी आमच्या आधी त्या ठिकाणी येऊन पोचले होते. त्यांना विचारून खात्री करून घेतली. कदाचित ऑस्ट्रियन एअरने आपले काम एअर फ्रान्सला औटसोर्स  केले असावे असे वाटले.

थोड्या वेळाने एक एक करून तिथले कर्मचारी आले आणि स्थानापन्न झाले. मॉनिटर सुरू केल्यावर व्हिएन्ना हे गांवाचे नांव आणि आमचा फ्लाईट नंबर त्यावर झळकला. खरे तर ही एअर फ्रान्सचीच फ्लाईट होती पण ऑस्ट्रियन एअर आणि तिसरीच एक सहयोगी विमान कंपनी यांच्याबरोबर ती संयुक्तपणे उडवली जात होती. त्यातील प्रत्येकीने आपापल्या सिरीजमधील नंबर तिला दिलेला होता. त्यामुळे तिला तीन वेगवेगळे क्रमांक दिलेले होते. ज्या कंपनीचे तिकीट असेल त्या कंपनीचा उड्डाण क्रमांक त्या तिकीटावर दिलेला होता. हे सगळे समजून घेण्यात थोडा वेळ गेला. तोपर्यंत आणखी सातआठ प्रवासी आले. त्यातले कांही रांगेत उभे राहिले.

चेक इनचे काम सुरू झालेले पाहिल्यावर आम्ही पुढे येऊन रांगेत उभे राहिलो. आमच्या पुढे एक लहानखोर चणीची कृश मुलगी उभी होती. ती स्वतः हांत पाय मुडपून आंत बसू शकेल एवढ्या प्रचंड आकाराची सूटकेस तिने ओढत आणली होती. त्याशिवाय पाठीवरच्या हॅवरसॅकने ती वांकली होती. दुस-या एका बलदंड प्रवाशाच्या मदतीने तिने आपली सूटकेस वजनाच्या यंत्रावर ठेवली. प्रत्येक प्रवाशाला वीस किलो वजन नेण्याची परवानगी होती त्याच्या दुपटीहून अधिक वजन त्या यंत्राच्या कांट्याने दाखवले. काउंटरवरच्या महिलेला शंका आल्यामुळे तिने पाठीवरचे हॅवरसॅकचेही वजन केले. तेसुद्धा दुपटीच्या वर निघाले. त्यावर त्यांचा फ्रेंच भाषेत वाद होत राहिला. अखेरीस उच्च अधिकारी तेथे आले आणि ती मुलगी त्याच्याबरोबर गेली. पण तोंवर आम्हाला ताटकळत उभे रहावे लागले होते. बहुधा त्या मुलीचे विमान चुकणार असे आम्हाला वाटले होते. तिने सामानाचे काय केले कोणास ठाऊक, पण विमान सुटण्यापूर्वी ती आंत येतांना दिसली.

नियोजित वेळेनुसार विमान सुटले आणि व्हिएन्नाला पोंचले. रोमला जातांना तिथूनच गेल्यामुळे तो विमानतळ थोडासा ओळखीचा झाला होता. पॅरिसलाच मुंबईपर्यंतचे ‘थ्रू चेक इन’ केलेले असल्याने बरोबर सामानाचा बोजा नव्हता. मुंबईला आमच्याबरोबर सामान समजा नाहीच पोचले तरी घरीच जायचे असल्यामुळे त्याची एवढी फिकीर नव्हती. त्यामुळे शक्य तितक्या वस्तू मोठ्या सूटकेसमध्ये बसतील तशा भरून टाकल्या होत्या, एवढेच नव्हे तर हांतात धरायच्या हँडबॅगासुद्धा एअरलाइन्सकडे देऊन टाकून फक्त अत्यावश्यक कागदपत्रे आणि फारच मौल्यवान किंवा अपूर्वाईच्या वाटणा-या बारीक सारीक वस्तू तेवढ्या आपल्याबरोबर ठेवल्या होत्या. त्यामुळे आरामात फिरत फिरत आगमनकक्षातून निर्गमनकक्षात गेलो. इमिग्रेशनचे सोपस्कार वाटेतच पार पडले. पाश्चिमात्य देशातून बाहेर जाणा-यांना कसला त्रास नसतो. तिथे प्रवेश करतांनाच थोडी कडक तपासणी होते. तीसुद्धा आमच्या बाबतीत झालेली नव्हती.

व्हिएन्नाच्या विमानतळावरील लाउंजमधून विंडो शॉपिंग करीत फिरत असतांना इंग्लंडमध्ये राहणारे एक मराठी डॉक्टरांचे जोडपे भेटले. त्या परमुलुखात मराठी शब्द कानावर पडतांच त्यांनी लगेच वळून पाहिले आणि आम्हाला अभिवादन केले. ऑस्ट्रियामध्ये परिभ्रमण करून ते इंग्लंडला परत चालले होते. तेथून मुंबईला जाणा-या विमानात अर्थातच मुख्यतः भारतीयांचा भरणा होता. बोर्डिंग गेटवर पोचताच भारतात परत आल्यासारखे वाटले. त्यातही पुण्याहून आलेला एक मराठी तरुणांचा ग्रुप पाहून खूप आनंद झाला. कोठल्याशा औद्योगिक प्रदर्शनामध्ये आपल्या उद्योगाची प्रगती प्रदर्शित करून आपल्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी करार करून ते विजयी मुद्रेने परत येत होते हे समजल्यावर माझ्यासुद्धा अंगावर मूठभर मांस चढले.

नियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. रात्रीची झोप झालेली नसल्याने दिवसभर पेंगत होतो. आम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जात होतो आणि सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत होता. त्यामुळे पटकन दिवस मावळून रात्र सुरू झाली. मध्यरात्रीच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरलो. ग्रँड युरोप टूरची य़शस्वी सांगता झाली होती.
 . . . .. . . .यापुढील अखेरचा भाग: समारोप

ग्रँड युरोप – भाग ३५ – सहप्रवासी

सहप्रवासी

युरोपच्या या सहलीमध्ये आमचा बत्तीसजणांचा समूह होता. सगळ्यांची एकमेकांशी औपचारिक ओळख करून झालेली होतीच. प्रवासात असतांना बसमध्ये झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमांतून कांही लोकांच्या अंगच्या कलाकौशल्याची माहिती झाली. एकत्र फिरतांना किंवा जेवतांना जवळ बसलेल्या लोकांशी गप्पा व्हायच्या. नवीन माणसांबरोबर झटकन घनिष्ठ मैत्री जुळायचे कोणाचेच वय राहिले नव्हते. तरीही दोन आठवडे एकत्र राहतांना एकमेकांविषयी थोडी आत्मीयता निर्माण होतेच. रोजच्या संपर्कातून एकेकाचे थोडे थोडे स्वभावविशेष कळत गेले. त्यातले कांही आवडले, कांही खटकलेही असतील. जे आतापर्यंत लक्षात राहिले ते या भागात थोडक्यात सांगायचा प्रयत्न आहे. खरे तर सगळ्यांची नांवानिशी माहिती देण्याचा माझा विचार होता, पण त्यांची संमती घेतल्याखेरीज तसे करणे योग्य न वाटल्यामुळे टोपणनांवांचाच उपयोग करणार आहे. 

आमच्या समूहातील कांही लोक दीर्घकाळ नोकरी करून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांची मुले मोठी होऊन त्यांनी आपापले संसार थाटलेले असल्याने ते आपल्या प्राथमिक प्रापंचिक जबाबदा-यामधून जवळ जवळ मुक्त झालेले होते. आता कोठे त्यांना पूर्ण वेळ स्वतःकरता जगण्याची पहिली संधी मिळाली होती आणि त्याचा ते पुरेपूर उपभोग घेत असतांना दिसत होते. व्यावसायिक मंडळी मात्र बरेच वेळा आपापल्या कामाच्या संदर्भात टेलीफोनवर चौकशा आणि चर्चा करीत असत व निर्णय किंवा सल्ला देत असत. कांही लोकांची मुले अजून लहान होती. त्यांनासुद्धा रोजच्या रोज घरची खबरबात घेतल्याशिवाय चैन पडत नसे. एकत्र बसलेले असतांना फोनवर होत असलेल्या बोलण्यातले एक दोन शब्द कानांवर पडून त्यातले एवढे लक्षात येत असे. या लोकांच्या समस्या आणि जबाबदा-या त्याच्यासोबत इकडे आलेल्या असल्याचे जाणवत होते. यातील कांही लोकांचे मोबाईल फोन तांत्रिक कारणांमुळे तिकडे चालत नव्हते, त्यामुळे प्रत्येक जागी पोचल्यावर आधी फोनची सोय कशी होते हे शोधून काढून ते लोक तिकडे धांव घेत होते. 
 
आमच्या बत्तीस जणांच्या समूहात तेरा पतिपत्नींची जोडपी होती. सत्तरी ओलांडलेले मालाडचे काका आणि तिच्या जवळपास आलेल्या काकी हे दोघे सर्वात ज्येष्ठ होते. पण दोघेही अबोल वाटल्यामुळे त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्याची फारशी संधी मिळाली नाही. परिचय करून देतांनाही त्यांनी स्वतःबद्दल विशेष माहिती दिली नाही की नंतर कोठल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात खास उत्साह दाखवला नाही.  त्यांना कोणत्या विषयात विशेष रस आहे तेच मला कधी समजले नाही आणि बोलण्याला एक समान सूत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझा फारसा संवाद साधला गेला नाही.

बोरिवलीहून आलेल्या जोडप्याबरोबर मात्र त्यांचे चांगले सख्य जमले होते. हे गृहस्थ रिझर्व्ह बँकेतून सेवानिवृत्त झाले होते, त्यामुळे परकीय चलन यासारख्या विषयावर अधिकारवाणीने बोलत होते. झुंजार मनोवृत्ती असल्याने त्यांनी ग्राहकांच्या समस्या सोडवण्याच्या चळवळीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली होती. ते मात्र सर्वांबरोबर मिळून मिसळून रहात होते. गप्पागोष्टीत आणि थट्टामस्करीत सहभागी होत होते. आपले मजेदार अनुभव सांगत होते. बोलता बोलता आम्हा दोघांच्याही परिचयाच्या अशा एक तिस-या व्यक्तीचा संदर्भ निघाला, त्यामुळे आमच्यातील जवळीक किंचितशी वाढली.

मुंबईतलेच एक पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी होते. या सहलीला ते एकटेच आले होते. त्यामुळे ते आलटून पालटून इतर सर्वांशी हवापाणी यासारख्या सर्वसामान्य विषयांवर बोलत होते. नोकरीत असतांना पोलिस अधिकारी, गुन्हेगार, नेते आणि जनता या सर्वांबरोबर त्यांचा खूप संपर्क आलेला असणार. पण त्यांच्याबद्दलच्या आपल्या अनुभवाचा किस्सा त्यांनी कधीही सांगितला नाही की कोठल्या ज्वलंत विषयावर मतप्रदर्शन केले नाही. प्रशासकीय गोपनीयतेचे ते पुरेपूर पालन करीत होते. फक्त विमानतळावरील इमिग्रेशन चेकसाठी रांगेत उभे असतांना पूर्वी कांही काळ ते त्या केबिनच्या आंत बसून इतरांचे पासपोर्ट पहात होते, आता त्यांना बाहेर उभे राहून स्वतःचा पासपोर्ट दाखवावा लागतो आहे, एवढे सांगितले. पहिल्यांदा आमची दोघांची गांठ सहार विमानतळावरच पडली होती. त्या वेळेस ते नव्या ओळखी करून घ्यायला खूप उत्सुक दिसत होते, पण विमानतळावर आल्यानंतर आयत्या वेळी केसरीने दिलेले फराळाचे सामान आणि महत्वाची कागदपत्रे आपल्या सामानांत नीट जमवून ठेवण्यासाठी मी चार बॅगा उघडून बसलेलो होतो आणि गोंधळलेल्या स्थितीत असल्याने हवा तसा प्रतिसाद देऊ शकत नव्हतो. माझे काम आटोपेपर्यंत आमच्या प्रयाणाची वेळ होऊन गेली.

पुण्याहून आलेले कविवर्य कृषीक्षेत्रातील उच्च पदवीधारक होते आणि सेवेतून निवृत्त होईपर्यंत कृषीक्षेत्रातच कार्यरत होते. पण झाडे झुडुपे आणि पानेफुले यांच्याबरोबरीने त्यांनी काव्याचा मळा फुलवला होता. त्यांचे कवितासंग्रह छापून प्रसिद्ध झाले होते. त्यातल्या कांही पुस्तकांना शासनाकडून पुरस्कार मिळून त्यांचा गौरव केला गेला होता. अर्थातच त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. कांही तरल नाजुक भावनापूर्ण तर कांही घणाघात करणा-या छंदबद्ध कविता त्यांनी वाचून दाखवल्या. “लोक असं कां वागतात” आणि “आता मी रडत नाही” यासारख्या कवितांमध्ये त्यांनी खुमासदार शैलीत रोजच्या जीवनातील विसंगतींची उदाहरणे देत समाजातील मर्मांवर नेमके बोट ठेवले असल्याने सगळ्यांनी त्याची मनःपूर्वक वाहवा केली. मात्र अखेरीस त्यांनी वाचलेले एका स्त्रीच्या दारुण शोकांतिकेची करुण कहाणी सांगणारे दीर्घ काव्य मात्र सहलीचा उल्हासाचा मूड घालवणारे असल्याने तितकेसे भावले नाही. त्यांना वयपरत्वे कांही शारीरिक त्रास होत असावा असे त्यांना पाहतांना वाटत असे. रोमच्या विमानतळावर उतरल्यापासून पॅरिसच्या लिडोशोपर्यंत सर्व ठिकाणी जिथे जिथे वाट पहात उभे रहायची वेळ आली तिथे त्यांनी कोठला तरी आधार पाहून खाली बसकण मारून घेतली. असे असले तरी एरवी त्यांचा रसिक स्वभाव आणि उत्साह तरुणांना लाजवण्यासारखा असे. बहुतेक ठिकाणे पाहून परत येणा-या लोकांत ते शेवटचे असत. 

डोंबिवलीचे गृहस्थसुद्धा साठी ओलांडल्यावर नोकरीतून निवृत्त झालेले असावेत असा आपला माझा अंदाज आहे. ओळखसमारंभात त्यांनी काय सांगितले होते ते मला आता आठवत नाही आणि नंतर त्याच्याबरोबर झालेल्या बोलण्यात कधीच त्यांच्या व्यवसायाचा विषय निघाला नाही. कदाचित ते एखादा व्यवसायही करीत असतील. पण ते फोनवर त्यासंबंधी विचारणा करतांना मला दिसले नाहीत. रोमला पोचल्याच्या पहिल्या दिवशीच संध्याकाळी ट्रेव्ही फाउंटनच्या आवारात हे जोडपे ठरलेल्या जागी वेळेवर परत येऊन न पोचल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. त्यानंतर मात्र ते नेहमी वेळेआधी येऊन हजर व्हायचे. ते जोडपे चांगलेच व्यवहारकुशल निघाले. एका विक्रेत्याबरोबर घासाघीस करून कुठल्याशा वस्तूची किंमत आम्ही अर्ध्यावर आणली होती आणि स्वतःवर खूष झालो होतो. थोड्या वेळानंतर तीच वस्तू त्याच्याही अर्ध्या किंमतीत ते विकत घेऊन आले!

एकट्याने आलेल्या पोलिस इन्स्पेक्टरांची जोड एकट्यानेच आलेल्या त्यांच्या समवयस्क डॉक्टरांबरोबर घालून दिलेली होती. जळगांव इथे या डॉक्टरसाहेबांचा दातांचा दवाखाना होता. यापूर्वीही त्यांनी बरेच जागी भ्रमण केले होते आणि त्यांच्याकडे एकंदरीतच जगाचा चांगला अनुभव होता. त्याच्याबरोबर बोलतांना त्याचा प्रत्यय येत होता.

औरंगाबादहून आलेले मध्यमवयीन डॉक्टर जोडपे अत्यंत उत्साही होते. मिस्टरांनी घरून निघण्यापूर्वीच पुस्तके वाचून युरोपचा भरपूर अभ्यास केला होता आणि या दौ-याची चांगली पूर्वतयारी करून ठेवली होती. प्रत्येक जागेचे नेमके महत्व आणि तिथे काय पहायला मिळेल याची खडा न खडा माहिती त्यांनी आधीच मिळवलेली होती. प्रत्येक स्थानाची ओळख संदीप देत असतांना ते त्याला हमखास पुरवणी जोडत होते तसेच तिथे भेटणा-या गाईडला नेमके प्रश्न विचारून त्याच्याकडून बारकाईने माहिती काढून घेत होते. आम्हा सर्वांनाच त्याचा खूप फायदा झाला. माहिती काढण्यासाठी त्यांनी इंटरनेटचा उपयोग करून घेतला नाही याचे मात्र मला आश्चर्य वाटले. ल्यूसर्न सरोवरातल्या क्रूजमध्ये रेकॉर्डवर डान्स करण्यात त्या दोघांनी आधी पुढाकार घेतला आणि आग्रहाने बाकीच्यांना त्यात ओढून घेतले. या डॉक्टरद्वयांची सोबत असल्यामुळे आम्हा सर्वांनाच एक मानसिक आधार वाटत होता, एवढेच नव्हे तर कोणालाही गरज पडताच बारिक सारिक दुखण्यावरचे आपल्याकडील एकादे औषध ते तत्परतेने काढून देतही होते. वेळप्रसंगी कोणी वैद्यकीय सल्ला मागितला तर त्यांनी कधीही आढ्यता न दाखवता तो लगेच दिला.

दोन वयस्कर मैत्रिणींची एक जोडी पुण्याहून आली होती. अशाच एका सहलीमध्ये त्या एकमेकींना भेटल्या आणि त्यांचे आपसात चांगले सूत जमले. त्यानंतर त्या एकत्र फिरायला लागल्या होत्या. ड्रेस, खाणेपिणे वगैरे सगळ्या बाबतीत त्यांची हौशी वृत्ती दिसून येत होती. त्यांनासुद्धा दिलखुलासपणे बोलायला आवडत होते. बोलण्यात थोडासा पुणेरी खोचकपणा आलेला होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या कौतुकामध्ये सुद्धा कुठेतरी तक्रारीचा बारीक सूर ऐकू येत असे. तेवढे सोडल्यास त्या चांगली कंपनी देत होत्या. मनोरंजनाच्या कार्यक्रमात एकीने पुणेरी विनोद ऐकवला तो असा.

एका पुणेरी माणसाने जीव देण्यासाठी आपल्या उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली उडी मारली. खाली पडतापडता त्याला स्वयंपाकघरात पोळ्या लाटत असलेली त्याची पत्नी दिसली. तिला पाहताच तो ओरडून म्हणाला, “रात्रीच्या जेवणात माझ्यासाठी पोळ्या करू नकोस, मी जेवायला नाही आहे.” तिने खिडकीमधून खाली पहात ओरडून विचारले, “पण आत्ताच्या करून ठेवल्या आहेत त्या वाया जाणार त्यांचे काय? आधी सांगायला काय झालं होतं?”

उरलेली सगळी व्यावसायिक मंडळी होती. त्यांच्यात कोणी चार्टर्ड अकौंटंट, कॉंट्रॅक्टर, लघु उद्योजक, व्यापारी वगैरे विविधता होती. त्यातली मिरज सांगलीकडची तीन जोडपी होती. समवयस्क आणि समान आवडीनिवडी असल्याने त्यांचा कंपू पूर्वीपासून बनलेला होता. नेहमीच ते एकत्र कोठे ना कोठे ट्रिपला जातात. या वेळेस युरोपला येऊन जरा दूरचा पल्ला गाठला होता. त्यांच्यातले तीघेही नवरे, तीघी बायका किंवा सारेचजण सगळीकडे एकत्रच असत. त्यांचा स्वयंपूर्ण ग्रुप बनलेला असल्यामुळे त्यांत इतराचा शिरकाव जास्त करून होत नसे. तसे ते सगळेच मनमिळाऊ होते, मनमौजीसुद्धा होते. त्यांचे एकमेकांना डिवचणे, चिडवणे, जोक्स मारणे आणि हंसणे खिदळणे सारखे चाललेले असे. त्याचे थोडे तुषार सगळ्यांच्याच अंगावर उडत असत. त्यांच्यामुळे वातावरण नेहमी चैतन्यमय रहात होते. त्यांच्यातले थोडा कानडी हेल काढून बोलणारे गृहस्थ खूपच विनोदी होते. गाणे म्हणायचा आग्रह केल्यावर “ऑल्वेज यू आर इन अ हरी, डोन्ट टेल गठुडं टायायला, हाऊ आय कम नांदायला” अशी लावणी म्हणून खूप हंसवले. व्यवसायानिमित्त नेहमी प्रवास करावा लागणा-या एकाने परिचयाच्या वेळेस सांगितले, “मला परगांवी फिरायला जायला फार आवडतं, त्यातही एकट्याने जायला तर जास्तच!” त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले, “अहो, हे आठवड्यातले तीन चार दिवस पुण्याला जातात आणि तीन चार दिवस इथे असतात.” “इथे” म्हणजे “सांगलीला” असे तिला म्हणायचे होते पण त्या वेळी ती इटलीमध्ये होती!

सांगलीहूनच आलेले आणखी एक वेगळे जोडपे होते. त्यातील ‘सौ’चे ठाण्याला राहणारे मामा व मामीसुद्धा त्यांच्या जोडीने आले होते. त्यांचा एक चार जणांचा वेगळाच कौटुंबिक चौकोन होता. त्यांच्यात एका पिढीचा फरक असला तरी वयात तो तितका जास्त नव्हता. सांगलीकरांना मराठी गाण्यांची खूपच आवड होती आणि त्यांचा आवाजही चांगला बुलंद होता. वेगवेगळ्या प्रकारची छान गाणी म्हणून त्यांनी मजा आणली. आपला मुलगा मात्र खरोखरच फार सुंदर गातो, ‘सारेगम’च्या स्पर्धेत त्याची निवड झाली होती पण कोठल्या तरी फेरीत अवधूत गुप्तेबरोबर झालेल्या लढाईमध्ये तो हरला हे ते आवर्जून सांगत होते. त्यांना गाण्याप्रमाणेच खाण्याचीदेखील भरपूर आवड असावी किंवा कॉँटिनेंटल न्याहारी फारशी रुचत नसावी. त्यामुळे सकाळीसुद्धा बसमध्ये त्यांचे खर्रम खुर्रम बरेच वेळा चाललेले असे.

मामासाहेबांना व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्याची प्रचंड आवड होती. प्रेक्षणीय स्थळे पहातांनाच नव्हे तर चालत्या बसमध्येसुद्धा सारखे त्यांचे शूटिंग चाललेले असायचे. बस सुरु होण्यापूर्वी होणारे ब्रीफिंगसुद्धा ते रेकॉर्ड करून घेत असत. त्यांनी बरोबर आणलेल्या आठदहा कॅसेट्स संपवून तिकडे आणखी विकत घेतल्या. परत गेल्यावर एवढ्या मोठ्या रेकॉर्डिंगचे ते काय करणार असावेत असा प्रश्न मला पडला होता. त्याचे एडिटिंग करून एक सुसंगत चलचित्र तयार करायचे तंत्र त्यांच्याकडून समजून घ्यावे असा विचार माझ्या मनात होता. पण त्यांनी कांही ताकाला तूर लावू दिली नाही. बसमधील प्रत्येकाने एक तरी आयटम सादर केलाच पाहिजे असे जेंव्हा ठरले, तेंव्हा त्यांनी खणखणीत आवाजात गणपतीअथर्वशीर्ष म्हणून “ही सहल निर्विघ्नपणे पार पडो” अशी गणरायाची भक्तीभावाने प्रार्थना केली. या मामासाहेबांनी एस्केलेटरचा उपयोग करण्यापेक्षा जिने चढून जाणे नेहमी अधिक पसंत केले. कां ते त्यांनाच माहीत!

पुण्याहून आलेल्या इंजिनियरांचा स्वतःचा छोटा कारखाना आहे. तो चालवण्याच्या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांना सक्रिय हातभार लावतात. दुस-या मोठ्या कारखान्यांमध्ये उपयोगाला येणारी खास प्रकारची यंत्रसामुग्री ते बनवतात. नव्या प्रकारचे आव्हानात्मक काम अंगावर घेऊन ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची त्यांना मनापासून आवड आहे. त्यासाठी त्यातील प्रत्येक गोष्ट मूलभूत तत्वापासून चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक असते आणि अंगात संशोधकवृत्ती असेल तर ते जमते. माझ्या जीवनातील प्रवासाशी ही गोष्ट जुळत असल्याने ब-याच वेळा आमच्या गप्पा तांत्रिक विषयाकडे वळत असत. उदाहरणादाखल हॉलंडमधील नदीच्या पाण्याची पातळी समुद्रसपाटीखाली कशी राहू शकते? त्यात तिच्या प्रवाहाचे काय होत असेल? वेगवेगळ्या पवनचक्क्यांची रचना कशी असते? त्यांचा उपयोग कशासाठी होतो? असल्या प्रश्नावर आमची खूप सविस्तर चर्चा झाली व त्यातून दोघांनाही पूर्वी माहीत नसलेल्या कांही गोष्टी कळल्या. त्यांना अभिजात संगीताची खूप आवड आहे. त्याच्याकडे गाणारा सेल फोन आहे. दीड दोन तास चालतील इतकी मधुर गाणी त्यांनी त्यात ध्वनिमुद्रित करून ठेवली होती आणि आपला रिकामा वेळ ती गाणी स्वतः ऐकण्यात किंवा आम्हाला ऐकवण्यात ते घालवीत असत. करमणुकीच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरेल पण हलक्या आवाजात कांही जुनी गोड गाणी ऐकवली.

नव्या मुंबईत राहणारे चार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांच्या पत्नी यांना मिळालेली सीट आमच्या सीटच्या रांगेत होती. त्यामुळे एकमेकांबरोबर आमचा संवाद सारखाच होत असे. दोघेही हौशी स्वभावाचे आणि अभिरुचीसंपन्न होते. बरोबर घेऊन जाण्यासाठी ते चोखंदळपणाने उत्कृष्ट वस्तू निवडत असत. केवळ इतर लोक घेत आहेत म्हणून कोठल्या गोष्टींची खरेदी त्यांनी केली नाही. कदाचित कोठल्याही वस्तूचे मूल्य आणि तिची बाजारातील किंमत याची तुलना त्याच्यातला अकाउंटंट अचूक करीत असेल. त्यांना जुन्या हिंदी गाण्यांची आवड होती आणि बरीच गाणी तोंडपाठसुद्धा होती. ती त्यांनी म्हणून दाखवली. एकाच दिवशी असलेला त्यांचा जन्मदिन आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हे दोन्ही सहलीत असतांनाच आले आणि प्रथेनुसार ते साजरे केले गेले. आभारप्रदर्शनासाठी त्यांनी माईक हातांत घेताच त्यांना पुन्हा हिंदी गाणी ऐकवण्याची फरमाईश झाली. ती त्यांनी पुरी केली पण त्यानंतर इतर सर्वांनीही गाणी, विनोद नकला असे कांही ना कांही सादर करावे असा आग्रह धरला. त्यांनासुद्धा छायाचित्रणाची भयंकर आवड होती. त्यातसुद्धा प्रत्येक फ्रेममध्ये ते किंवा त्यांच्या पत्नी यायला हवेतच असा प्रयत्न ते करीत असत. याच्या बरोबर उलट, म्हणजे निसर्गसौंदर्यात माणसांचे चेहेरे मधेमधे दिसू नयेत असा माझा कटाक्ष असे.

मुंबईचीच एक पितापुत्रांची जोडी होती. त्यातील शोडशवर्षीय अद्वैत हा अजून विद्यार्थीदशेत होताच. त्याचे वडीलसुद्धा इतर सर्व प्रवाशात वयाने सर्वाधिक तरुण होते. म्हणजे वयाने सर्वात ज्येष्ठांची एक जोडी होती तशीच सर्वात लहानांची एक जोडीच होती. ते लोक यापूर्वी पूर्व आशियामधील देशांच्या सहलीला जाऊन आले होते. अशा प्रकारे अद्वैतच्या सुदैवाने एवढ्या लहान वयात त्याला भरपूर जग पहायला मिळाले होते. या ग्रुपमध्ये इतर सगळे लोक त्याच्या वडिलांपेक्षा मोठे, कांहीतर आजोबांच्या वयाचे असल्याने त्याला समवयस्क सवंगड्यांची साथ नव्हती. पण आपले असे एकटेपण त्याने कधी जाणवू दिले नाही. नेहमी सर्वांचा आदर राखून तो सर्वांशी आपलेपणाने वागत होता. कोठलीही गोष्ट सर्वांना वाटायची असेल ते काम तो आपणहून करायचा, कोणाला लागेल ती मदत करायला हंसतमुखाने तत्पर असायचा. नव्या पिढीतल्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या घरातील मुलांबद्दल जो कांही समज प्रसारमाध्यमातील नाटकसिनेमा किंवा मालिकांमधील पात्रांद्वारे करून दिला जातो, तसा तो अजीबात नव्हता. त्यामुळे तो तर सगळ्याच प्रवाशांचा लाडका झाला होता. त्याच्या वडिलांनासुद्धा छायाचित्रणाचा प्रचंड सोस होता. त्यांच्य़ा गळ्यात किंवा हातात सतत कॅमेरा असायचाच. साल्झबर्गला कॅथेड्रलमधील सुंदर कलाकृतींची चित्रे घेता घेता ते मागेच राहून गेले आणि बाकीचे लोक कोठल्या दिशेने पुढे गेले ते न समजल्याने शोधत राहिले. बरेच अंतर गेल्यानंतर आमच्याही ते लक्षात आले आणि त्यांचा शोध सुरू झाला. बराच वेळ रहस्यमय वातावरणात गेल्य़ावर एकदाचे ते सांपडले. पण तोपर्यंत अद्वैत धीरगंभीरपणे आमच्याबरोबर उभा होता. त्याने गांगरून जाऊन हलकल्लोळ वगैरे कांही केला नाही.

आम्ही दोघे अखेरचे होतो. अलकाकडे दोन हुकुमाचे एक्के होते. एक तर तिने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अनेक वर्षे घालवलेली असल्याने तिच्या गायनाला खूप मागणी होती. अहीरभैरव रागाच्या रागदारीपासून ते मराठी लावणीपर्यंत वेगवेगळ्या ढंगाची गाणी तिने ऐकवली. दुसरे म्हणजे यापूर्वी पाश्चिमात्य जगात जाऊन आलेली ती एकमेव महिला होती. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आपला अनुभव सांगण्याचा आणि विचार व मते मांडायचा हक्क तिला मिळाला होता, तो तिने बजावून घेतला. माझ्या स्वतःबद्दल काय सांगणार? हा ब्लॉग वाचणा-या मित्रांना थोडा अंदाज आलाच असणार!

याच सहलीमध्ये केसरीचा दुसरा ग्रुप सगळीकडे आमच्या मार्गानेच फिरत होता. अनेक जागी ते लोक भेटत असत. स्विट्झर्लंडमधील आल्प्सच्या शिखरांवर आम्ही एकत्र गेलो आणि सर्व नौकाविहारांमध्ये आम्ही बरोबर असत असू. गोंधळ टाळण्यासाठी ‘संदीप ग्रुप’ आणि ‘विवेक ग्रुप’ असे त्यांचे नामाभिधान करून घेतले होते. ‘विवेक ग्रुप’ बहुभाषिक असल्याने त्यांचा कारभार हिंदी माध्यमातून चालत होता. कडेवरच्या बाळापासून ते शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारी वेगवेगळ्या वयातली मुलेमुली त्या ग्रुपमध्ये होती. अहमदनगरहून आलेल्या जोडप्याचे बाळ फारच गोड होते. त्या बाळाचा दुडूदुडू धांवणारा चपळ दादासुद्धा बरोबर होता. दोघांचेही सगळे लोक खूप कौतुक करीत. प्रवासात या मुलांच्या जेवणखाण्यासाठी खास व्यवस्था करावी लागत असे. ते त्यासाठी जय्यत तयारीनिशी आले होते. शक्य तितक्या जागी त्यांच्यासाठी ताजा गुरगुट भात किंवा खिचडी शिजवून घेत. त्याशिवाय गरम पाण्यात किंवा दुधात मिसळून लापशी बनवण्यासारखे अनेक पदार्थ त्यांनी तयार करून आणले होते. त्यासाठी त्यांची दीड महिना आधीपासून तयारी चालली होती असे त्यांनी सांगितले. दोन मुलांना सांभाळत त्यांनी सहलीचा पुरेपूर आनंद घेतला.

समोरच्या ‘विवेक ग्रुप’मधील जोडप्याबरोबर जेवताना गप्पा चालल्या होत्या. नाटक, सिनेमा, मालिका वगैरे विषय यासाठी बरा असतो. ते सगळ्यांना माहीत असतात आणि त्यात व्यक्तीगत असे कांही नसल्याने कांहीही बोलायला कोणाला संकोच वाटत नाही. समोरच्या लोकांची अंगकाठी, चेहेरेपट्टी, वेषभूषा वगैरेवरून मी त्यांना गुजराथी समजत होतो. ते मला कोण समजत होते ते माहीत नाही. आमचे बोलणे हिंदी, इंग्रजी, मराठी अशा मिश्रणातून चालले होते. कुठल्याशा नटाच्या संदर्भात ते म्हणाले, “मराठी नसूनसुद्धा तो किती फ्ल्यूएंटली मराठी बोलतो नाही कां?” अनवधानाने मी बोलून गेलो, “हो. ते तर खरंच, पण तुम्हीसुद्धा छान मराठी बोलता.” “म्हणजे काय? आम्ही पक्के मराठीच आहोत.” ते उद्गारले. त्यानंतर आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.

अशी विविध प्रकारची माणसे या सहलीच्या निमित्ताने भेटली. चार घटिका मौजमजा करणे एवढाच सर्वांचा समान उद्देश असल्यामुळे हलके फुलके बोलणे होत होते. सगळे लोक सुशिक्षित व सुसंस्कृत असल्याने विनम्रतेने वागत होते. त्यात मान अपमान, रुसले फुगवे येण्याचे कारण नव्हते. कोणाबरोबर घनिष्ठ संबंधही जुळले नाहीत की कोणाशी वितुष्ट निर्माण झाले नाही. वेगवेगळ्या वागण्याच्या त-हा मात्र पहायला मिळाल्या. प्रेक्षणीय स्थळे पहातांना मिळालेला हा बोनस होता.

ग्रँड युरोप – भाग ३४ – सहलीमधील निवासस्थाने

सहलीमधील निवासस्थाने

यापूर्वी मी कधीच कुठल्याही मोठ्या टूरिस्ट ग्रुपबरोबर फिरायला गेलो नव्हतो. ऑफिसच्या कामानिमित्य किंवा भटकंतीसाठी परगांवी गेल्यास विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनच्या जवळच्या भरवस्तीमधील एखाद्या हॉटेलात रहात होतो. वेळ मिळेल तेंव्हा आजूबाजूचा भाग पहात फिरण्याचा मला छंद होता. त्यामुळे पटकन कुठेही जाण्यायेण्याला सोयीच्या अशा जागी मी मुक्काम करीत असे. रोम या युरोपातील एका मोठ्या देशाची राजधानी असलेल्या शहरातही अशाच एका मोक्याच्या जागेवरील आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण अशा हॉटेलमध्ये आपण राहू अशी खुषीची गाजरे मी मनात खात होतो. पण आमच्या निवासाची व्यवस्था एका उपनगरात किंवा त्याच्याही पलीकडील भागात कुठेतरी झाली होती. हौसेने मुद्दाम मुंबई शहर पहायला येणा-या माणसाच्या राहण्याची सोय घणसोळी किंवा कळंबोळी इथल्या जुन्या पुराण्या लॉजवर व्हावी तशागत आमची अवस्था होती.

ते हॉटेल तसे पहायला गेल्यास जेमतेम ठीकठाकच होते. दिवसभर फिरून दमून भागून परत आल्यानंतर झोपायला मऊ गादी आणि सर्व सोयींनी सज्ज असे स्वच्छ बाथरूम याशिवाय सर्वसामान्य माणसाला आणखी कशाची गरज नसते. तेवढ्या गोष्टी तेथे अगदी व्यवस्थितपणे उपलब्ध होत्या. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त फारसे विशेष असे कांहीही नव्हते. याच्या कित्येक पटीने चांगल्या भारतीय हॉटेलांत मी अनेक जागी राहिलो आहे. इटलीमध्ये असेपर्यंत मात्र पुढील तीन चार दिवसही मुक्कामासाठी अशाच प्रकारची वेगवेगळी छोटी हॉटेले मिळाली. तिथला उन्हाळा अजून ऑफीशिअली सुरू झाला नसल्याने रूममधील एअरकंडीशनर चालणार नाही असे सांगितले गेले. चाळीतल्या खोल्यांप्रमाणे ओळीमधील सगळ्या खोल्यांना मागील बाजूने जोडणारी चिंचोळी उघडी बाल्कनी असायची पण तिचा दरवाजा सहजपणे उघडत नसे. ताज्या हवेची गरज असल्यामुळे खटपट करून तो थोडा वेळ उघडावा तर लागत असे आणि झोपी जाण्यापूर्वी पुन्हा बंद करावा लागत असे. एका जागी त्याचे हँडल एका दिशेने फिरवताच तो धाडकन अंगावरच तिरपा झाला. आता तो पडणार की काय या भीतीने हँडल उलट फिरवताच जँम होऊन बसला. अखेर एका हाताने ते हँडल मधोमध पकडून दुस-या हाताने धक्के दिल्यावर एकदाचा उघडला. त्या भानगडीत एका प्रवाशाच्या करंगळीचे टोक फटीत सापडून काळेनिळे झाले आणि बरोबर दिलेल्या फर्स्टएडच्या सामानाचाही उपयोग झाला.

आपण इथे मौज करण्यासाठी आलेलो आहोत, कुरकुरण्यासाठी नाही असा सकारात्मक विचार करून मनाची समजूत घालत होतो. पण एवढे आंतरराष्ट्रीय पर्यटक रोज इथे येत असून सुद्धा इटली हा देश सेवाक्षेत्रात भारताच्या बराच मागे आहे असे माझे मत मात्र झाले. आमच्या बजेटमध्ये ताज किंवा ओबेरॉयशी तुलना करणा-या अद्ययावत हॉटेलांची अपेक्षा मला नव्हतीच. पण चिपळूण किंवा सुरेन्द्रनगर अशा गांवी मी ज्या अप्रसिद्ध हॉटेलांमध्ये उतरलो होतो तीसुद्धा मला इटलीत लाभलेल्या कोणत्याही हॉटेलपेक्षा सर्व दृष्टीने उजवी वाटली होती. त्यानंतर ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक येथील हॉटेलसुद्धा त्याच पठडीतले होते. पण हा गांव रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेला असल्यामुळे तेथील एकंदर वातावरणच खूप प्रसन्न होते. आमच्या खोलीच्या खिडकीतूनच समोर हिरवी गर्द झाडी, त्याच्या पलीकडे उंच पहाड आणि शेवटी मागील हिमाच्छादित शिखरे दिसत होती. तिकडे पहात असतांना इतर गोष्टींची जाणीव होत नव्हती.

स्विट्झरलंडमधील ल्यूसर्न इथे गेल्यावर मात्र या परिस्थितीत चांगल्या दिशेने फरक पडला. तेथील ‘एक्सप्रेस हॉलिडे इन’ हे हॉटेल शहरापासून दूर असले तरी चांगले तसेच मोठे होते. तेथील रिसेप्शन काउंटरपासून रूम्स आणि रेस्टॉरेंट्सपर्यंत सगळीकडे आंतरराष्ट्रीय प्रतीची गुणवत्ता जाणवत होती. हवेशीर आणि सुसज्ज रूममधील भिंतींवर सुंदर चित्रे लावलेली होती. त्यामधील फर्नीचर, दारे, खिडक्या, पडदे, कार्पेट, टेलीव्हिजन सेट वगैरे सगळे कांही व्यवस्थित होते. हॉटेलच्या शेजारीच एक मॉलवजा मोठे दुकान होते. तिथे ब-याच उपयोगी वस्तू मिळत होत्या. त्यानंतर पुढेसुद्धा सगळीकडेच चांगली हॉटेले मिळाली. अॅमस्टरडॅम येथील एनएच ग्रुपचे हॉटेल तर इतके विशाल होते की त्यातील रूमचे नंबर चार आंकड्यात दिलेले होते आणि ती शोधण्यास मदत करणारा हॉटेलचा नकाशा प्रत्येकाला दिला गेला होता. पॅरिसलासुद्धा याच ग्रुपचे गगनचुंबी इमारत असलेले हॉटेल मिळाले होते व त्यातील दहाव्या मजल्यावरील आमच्या खोलीच्या खिडकीतून दूरपर्यंतचा सुरेख व्ह्यू दिसत होता. ही सगळीच हॉटेले मुख्य शहरांपासून दूर असायची. मोठ्या संख्येने येणा-या प्रवाशांची एकत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने ते सोयीचे होत असावे, तसेच आर्थिक दृष्ट्या किफायतशीर पडत असेल. स्वतंत्र बस असल्यामुळे कोठेही जाण्यायेण्याची सोय होती आणि एका शहरातून पुढच्या शहराला जातांना शहराच्या मुख्य भागातील ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता. असे अनेक पैलू त्यामागे होते असे समजत गेले.

“तिकडच्या हॉटेलांत गडी नसतात, त्यामुळे सगळीकडे आपले सामान आपल्यालाच उचलून जिन्यांवरून माडीवर चढवावे लागते. हे एक मोठे जिकीरीचे काम असते. आपल्या तब्येतीला सांभाळून ते करा बरे.” असा भीतीयुक्त सल्ला भारतातून निघतांना कोणीतरी आम्हाला दिला होता. त्यातला पहिला भाग खरा ठरला, पण सुदैवाने सगळ्या जागी लिफ्टची सोय असल्यामुळे ओझे उचलायचे कष्ट मात्र पडले नाहीत. लिफ्टमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे कांही तरुण मंडळींनी रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट न पाहता आपले सामान उचलून जिना चढून जाणे पसंत केले, ती गोष्ट वेगळी. त्यातही अत्यावश्यक व अनावश्यक असे सामानाचे दोन भाग करून रोज उचलायचा भार सगळ्या लोकांनी कमी केलेला होताच.

आजकाल पाश्चिमात्य देशात ‘रूम सर्व्हिस’ हा प्रकार सहसा नसतोच. तिकडे सगळ्याच बाबतीत स्वावलंबन आणि स्वयंसेवा हे मूलमंत्र झालेले दिसतात. त्यामुळे मनात आल्यास तोंडात टाकण्याजोग्या भरपूर खाद्यवस्तू केसरीने आम्हाला बांधून दिलेल्या होत्या, तसेच चहा कॉफी बनवण्यासाठी विजेची किटली आणि त्यांच्या मिश्रणांची तयार पाकिटे दिलेली होती. सकाळच्या चहाची ज्यांना तलफ असेल त्यांचीही अशी छान सोय झाली होती. तेथील प्रवासातील सर्व हॉटेलांत सकाळी कॉँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळाला आणि माझ्यासाठी तर तोच दिवसातील मुख्य आहार झाला. भाजलेली तृणधान्ये (सिरीयल्स), ब्रेड, फळे व दुग्धजन्य पदार्थ यांचे दहा बारापासून पंचवीस तीसपर्यंत विविध प्रकार त्यात उपलब्ध असत. तांदूळ किंवा भातापासून बनवलेले चुरमुरे व पोहे आपण खातोच, ज्वारीच्या व मक्याच्या लाह्या खातो, पण गव्हापासूनसुद्धा ते (व्हीटफ्लेक्स) बनवता येतात असे क्वचितच कोणाला माहीत असेल. मका व गहूच नव्हे तर ओट, मिलेट आदि इतर कांही स्थानिक तृणधान्यांचे फ्लेक व पफ केलेले अनेक प्रकार तिकडे दुधात बुडवून खातात. ब्रेडमध्ये सुद्धा पांढरी, ब्राऊन, चौकोनी कापा केलेली, लांबट आकाराची वगैरे विविध रूपे असलेली तसेच सपक, गोड, मसालेदार वगैरे चवीचे प्रकार असतात. क्रॉइसॉँ, मुफिन, पॅस्ट्री, रस्क आदि खास प्रकार वेगळेच. त्यांना लावण्यासाठी दोन तीन प्रकारचे लोणी असते, त्यात ‘स्निग्धपदार्थ विरहित’ असे लेबल लावलेलासुद्धा पहायला मिळाला. स्ट्रॉबेरी, रासबेरी वगैरे आपल्याकडे फारसे माहीत नसलेले जॅम असतात, पण मला तर मधच आवडत असे. ‘आपला हात जगन्नाथ’ पद्धत असल्यामुळे त्यातील बरीच निवड करून आपल्याला हवे ते वाढून घेता येत असे.

दुपारच्या जेवणात एकदा पास्ता होता, एकदा मॅकडोनल्डचे बर्गर होते, तीन वेळा पॅक करून नेलेला पुलाव किंवा बिरयाणी होती आणि उरलेल्या दिवशी ‘महाराजा’, ‘महाराणी’ किंवा ‘रामा’ यासारख्या नांवाच्या भोजनालयांचा आश्रय घेतला. रात्रीची एकूण एक जेवणे भारतीय पद्धतीचीच होती. यातली बहुतेक पंजाबी स्टाईलची होती. तुरीच्या डाळीऐवजी चण्याची किंवा उडदाची डाळ एक दोन वेळा बरी वाटते. कॅनमध्ये गोठवून ठेवलेले मटार आणि छोलेही सुरुवातीला चवीने खाल्ले पण नंतर त्यात तोचतोपणा आला. ओव्हनमध्ये भाजलेले नान तंदूरमध्ये भाजून काढल्यासारखे कांही लागत नव्हते. भाताची थोडीशी कणी कधी राहिली असली तरी कच्च्या मैद्यापेक्षा ती पचायला तरी बरी असते. तीन चार दिवस नव्याची नवलाई गेल्यानंतर अन्नातील उणीवा जाणवू लागल्या. मी तर डाळ व भाजी या गोष्टींचे घास दोन घास चटणी कोशिंबिरीसारखे शोभेसाठी पानात मांडून घेऊन दहीभात आणि पापड हा माझा मुख्य मेनू बनवला. रुचिपालट म्हणून कधी मिळाल्यास चिकनचे दोन तुकडे त्यांच्यासोबत घेत असे आणि दही नसल्यास रायताच भातामध्ये कालवून खात असे. आता ‘रायताराईस विथ चिकन’ या कॉँबिनेशनचे पेटंट मला मिळायला कोणाची हरकत नसावी. असे सगळे असले तरी मी कधीही उपाशी मात्र राहिलो नाही. पॅरिसला गुजराती पद्धतीचा खाना मिळाल्यावर माझा आनंद गगनात मावला नाही. तीन्ही त्रिकाळच्या भोजनांशिवाय मध्यंतरांमध्ये फाकण्याचे चकल्या, चिवडा, वेफर्स, सुका मेवा, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थसुद्धा सदोदित बरोबर असायचेच.

पिण्याचे पाणी हा एक युरोपच्या सहलीतला मोठा महत्वाचा विषय होता. आपणा भारतीयांना इतर कांही ‘पिण्याची’ संवय नसल्यामुळे मुळातच फार तहान लागते. त्यात “उन्हात हिंडता आहात, भरपूर पाणी पीत जा.” असा वैद्यकीय सल्ला सगळ्यांनी इथून जातांना पुन्हा पुन्हा पाजवला होता. भारतीय पद्धतीच्या भोजनालयात पुरेसे पाणी प्यायला मिळत होते खरे, पण इतर वेळी काय करायचे? पहिल्याच रात्री झोपण्यापूर्वीची औषधाची गोळी गिळण्यासाठी पाण्याची गरज पडली. मुंबईमधील साथीच्या रोगांना घाबरून अॅक्वागार्डचे पाणी पिण्याची संवय लागलेली होती. बाथरूममधल्या बेसिनचे पाणी पिण्याची हिंमत होत नव्हती. रेफ्रिजरेटरमधील मिनरल वॉटरची बाटली काढली. पण शंभर रुपयांहून अधिक किंमतीच्या या पाण्याची चंव जरा विचित्रच लागत होती. मिनरल्सच्या नांवाने त्यात काय काय भरले होते कोण जाणे. हा अनुभव नंतरच्या प्रवासात मात्र आला नाही. त्या दिवशी कसेबसे घोटभर पाणी गिळले आणि उरलेले ओतून टाकून त्या बाटलीत सरळ नळाचे पाणी भरले. एवीतेवी जेवणाच्या हॉटेलमध्ये सुद्धा नळाचेच पाणी पीत होतो. “फिरण्यासाठी हॉटेलातून निघण्यापूर्वी बाटली पाण्याने भरून घेणे” हा एक महत्वाचा आयटम त्यानंतर रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट झाला.

टूरमध्ये सगळीकडेच आम्हाला एक तान्त्रिक प्रॉब्लेम येत होता. युरोपमधील विजेच्या कनेक्शनची सॉकेट्स भारतातील सॉकेट्सपेक्षा वेगळ्या प्रकारची असतात. त्यातही जागोजागी थोडा फरक असे. आमच्या चहाच्या किटलीचा दोन पिनांचा प्लग प्रयत्न करून कसाबसा कांही जागी घुसवता येत होता, पण कॅमे-यासाठी लागणा-या बॅटरीच्या चार्जरला अमेरिकन पद्धतीच्या चौकोनी पिना होत्या व भारतात उपयोग करण्यासाठी आम्ही तीन पिना असलेले अॅडॉप्टर त्याला जोडले होते. तिकडच्या कोठल्याच रूममधील सॉकेटबरोबर या दोन्हीपैकी कांहीही जुळत नव्हते. कांही जागी बाथरूममध्ये हेअर ड्रायरसाठी अमेरिकन पद्धतीचे सॉकेट दिलेले होते आणि कांही ठिकाणी आम्हाला पाहिजे तसा ‘अमेरिकन ते युरोपियन अॅडॉप्टर’ हॉटेलच्या रिसेप्शनवर उसना मिळाला. त्यामुळे कसेबसे काम भागले खरे. पण रस्त्यातील कोठल्याही दुकानात मात्र आम्हाला तो मिळाला नाही. प्रत्येक गांवी गेल्यावर आधी त्याचा शोध घ्यावा लागत असे आणि नाही मिळाला तर काय करायचे या भीतीपोटी रेकॉर्डिंगवर मर्यादा घालाव्या लागत. एका दृष्टीने तेसुद्धा बरेच झाले असे म्हणावे लागेल कारण ते रेकॉर्ड केलेले व्हीडिओ पहायला तरी परत आल्यानंतर कोठे वेळ मिळतो?

.  . . . .  . . . . . (क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग ३३ : प्रवासातील गंमती

प्रवासातील गंमती

पॅरिसमधील रंगीन लिडो शो ने आमच्यापुरती ग्रँड युरोप टूरची सांगता झाली. आमच्या ग्रुपमधील बाकीचे सर्व सहप्रवासी दुसरे दिवशी लंडनला जाणार होते, पण सहल ठरवतांनाच आम्ही इंग्लंडचा प्रवास त्यातून वगळला होता. त्यासाठी कांही तशीच सबळ कारणे होती. आम्ही उभयतांनी लंडनची वारी पूर्वीच केलेली होती, त्यामुळे तीच जागा पुन्हा पाहण्याचे एवढे आकर्षण नव्हते ही पहिली गोष्ट होती. यापूर्वी आयुष्यात कधीही इतके दिवस सलग प्रवास केलेला नसल्यामुळे तितके दिवस आपल्या मनातला उत्साह टिकून राहील की नाही आणि इतक्या भटकंतीमध्ये आपले शरीर कुरकुर न करता साथ देईल की नाही अशी प्रश्नचिन्हे डोळ्यासमोर होती. त्यामुळे शक्य झाल्यास त्यातील तीन दिवस कमी करणे जरासे शहाणपणाचे वाटले. इंग्लंडच्या व्हिसासाठी वेगळे फोटो, वेगळे फॉर्म भरणे, कदाचित इंटरव्ह्यूची गरज वगैरे टळले असते. ही सगळी नकारात्मक कारणे झाली. सहसा मी आपले निर्णय अशा कारणांमुळे घेत नाही. पण खर्चात चांगली घसघशीत बचत होईल हे सकारात्मक कारण यांच्या जोडीला आले आणि इंग्लंडला न जाण्याचा कौल मनाने दिला. या गोष्टी एकदा ठरवल्यानंतर आपल्याला पाहिजे तेंव्हा आयत्या वेळी बदलता येत नाहीत. त्यामुळे “आपण या ग्रुपबरोबर लंडनलासुद्धा जायला हवे होते.” असा विचार पॅरिस पाहून झाल्यानंतर करण्यात कांही अर्थ नव्हता. लिडो शो पाहून परत येतांना बसमधून अखेरचे उतरल्यावर सर्वांचा प्रेमळ निरोप घेतला आणि खोलीवर जाऊन परतीच्या प्रवासाची तयारी केली. पण त्याची हकीकत सांगण्याआधी आतापर्यंत केलेल्या यात्रेमधील लक्षात राहिलेल्या कांही विशेष बाबी सांगायला हव्यात.

युरोपमधील आमचा सारा प्रवास एकाच आरामबसने झाला हे यापूर्वी आले आहेच. ही खरोखरच आरामशीर बसगाडी होती. बसमध्ये प्रशस्त मऊ सीट्स व एअरकुशनचे शॉक एब्सॉर्बर्स होते, तसेच सारे रस्ते सपाट असल्याने पूर्ण प्रवासात शरीराला एकसुद्धा धक्का बसला नाही. युरोपच्या थंड हवेत बस वातानुकूलित असण्याची काय गरज आहे असे आधी वाटले होते. पण तिकडच्या वाहनांना उघडझाप करणा-या खिडक्या नसतातच, सगळ्या खिडक्यांना मोठमोठ्या कांचा लावलेल्या असतात. श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेचा पुरवठा एअरकंडीशनिंगच्या यंत्रामधूनच केला जातो. वातावरणातील थंडपणामुळे काँप्रेसरवर कमी ताण पडत असेल आणि इंधनाची बचत होत असेल एवढेच. पण गाडीचे इंजिन सुरू करून ए.सी. सुरू केला नाही तर तोपर्यंत आंत गुदमरायला होते. त्यामुळे ते असणे आवश्यक असते.

गाडी आणि तिचा चालक या दोघांनाही युरोपभर फिरण्याचा परवाना होता. त्यांची तपासणी करण्यासाठी वाटेत कोठेही थांबावे लागले नाही. आपल्याकडे एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवेश करतांना ‘बॉर्डर फॉर्मॅलिटीज’ पूर्ण करण्यासाठी बरेच वेळा थांबावे लागते. तिथे एका देशातून दुस-या देशात जातांना सीमेवर फक्त एक फलक आणि दोन बाजूला दोन देशांचे झेंडे दिसतात. चालत्या गाडीतून ते पहात पहात पुढे जात होतो. सर्वांसाठी सामायिक शेंघेन व्हिसा असल्याने प्रवाशांचीही तपासणी करायची गरज नसते. फक्त एकाच वेळा, ऑस्ट्रियामधून लीस्टनटीनमध्ये जातांना आमचे पासपोर्ट मागितले, कारण तो देश युरोपीय संघात सामील झालेला नाही. पण स्विट्झरलंडचा व्हिसा तेथे चालतो. तेंव्हा सुद्धा आम्हा सगळ्यांचे पासपोर्ट गोळा करून एकत्र पाहून परत केले. बसमध्ये प्रत्यक्ष कोण कोण बसले आहेत हे पहायला कोणी आंत आले नाही. त्यानंतर पुन्हा कोठेसुद्धा पासपोर्ट दाखवावा लागला नाही. “मात्र तो अत्यंत महत्वाचा आहे आणि सतत सोबत बाळगणे आवश्यक आहे. चुकूनसुद्धा इकडे तिकडे ठेवू नका, हॉटेलमध्ये किंवा बसमध्ये तर नाहीच नाही.” वगैरे उपदेशाची रेकॉर्ड रोज सकाळ संध्याकाळी ऐकवली जात होती. यापूर्वीच्या सहलींमध्ये या दोन्ही ठिकाणावरून तसेच खिशातून तो चोरीला गेल्याच्या घटना घडून गेल्या असल्यामुळे सकाळी बसमध्ये चढतांना आणि रात्री परत आल्यावर उतरतांना त्याची आठवण करून दिली जात होती.

आम्ही दोन देशांमधील सीमा जशा सुलभतेने ओलांडीत होतो त्याचप्रमाणे जागोजागी असलेले टोलनाकेसुद्धा पार करून जात होतो. जवळजवळ प्रत्येक नवा पूल किंवा बोगदा बांधायला आलेला खर्च तो वापरणा-या वाहनांच्या चालकाकडून टोलच्या रूपाने वसूल करण्याची पद्धत आता भारतातही सुरू झाली आहे. युरोपात ती आधीपासून अस्तित्वात आहे. मात्र भारतात प्रत्येक जागी मोटारी अडवून ट्रॅफिकची कोंडी केली जाते तसे तिकडे नसते. गाडीच्या समोरील कांचेवरच क्रेडिटकार्डासारखे एक स्टिकर लावलेले असते. टोलनाक्यासमोरून गाडी जात असतांना एका यंत्राद्वारे दुरूनच ते वाचले जाते आणि टोलची रक्कम परस्पर बँकेमधून वसूल केली जाते.

ड्रायव्हरकडे युरोपमध्ये फिरण्याचा परवाना असला तरी सगळीकडले रस्ते त्याला कसे माहीत असतील किंवा त्याच्या लक्षात रहात असतील याचे सुरुवातीला कौतुक वाटायचे. चौकाचौकात गाडी उभी करून पुढील दिशा विचारायची सोय नव्हती कारण कोणत्याही हमरस्त्यावरून शेकडो किलोमीटर गाडी चालवली तरी एक चौक सापडणार नाही. सगळी लेफ्ट हँड ड्राइव्ह व्हेइकल्स असून ती रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जातात. वाटेत येणारे गांव रस्त्याच्या उजव्या बाजूला असो वा डाव्या बाजूला असो, तिकडे जाणारा छोटा रस्ता उजव्या  बाजूनेच फुटणार. त्याची आगाऊ सूचना एक दीड किलोमीटर आधीपासून दिली जाते. ती पाहून आपली गाडी रस्त्याच्या उजवीकडील लेनमध्ये आणून फाटा फुटल्यावर वळवायची. गांव डाव्या बाजूला असेल तर तिकडे जाणारा रस्ता हमरस्त्याला पुलावरून ओलांडून तिकडे जाईल. त्यामुळे कोणाकडे विचारपूस करायची सोय नाही. तशी आवश्यकताही नसते. फक्त रस्त्यावरील खुणा व फलक वाचून ते समजायला हवेत. त्यात एक चूक केली तर परत फिरणेही शक्य नसते कारण कोठेही यू टर्न नसतोच. निदान वीस पंचवीस किलोमीटर पुढे जाऊन तिथल्या पुलावरून आपला रस्ता पार करून परत जावे लागते.

दोन तीन दिवस निरीक्षण केल्यानंतर अधिक माहिती समजली. जगातील कोठल्याही जागेची उपग्रहावरून घेतलेली चित्रे आता गूगल अर्थमधून आपल्याला घरबसल्या दिसू शकतात. त्यात आपले राहते घऱ, ऑफिस, मित्रांची व नातेवाइकांची घरे सर्वांनीच हौसेने पाहिली असतील. तशाच प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित एक  ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) नांवाची प्रणाली निघाली आहे. तिचे सदस्यत्व घेणा-या वाहनचालकाला मोटारीत बसल्या बसल्या कोणत्या जागी कसे जायचे याचे सविस्तर मार्गदर्शन मिळते. कोणत्याही क्षणी आपली गाडी कोठे आहे ते ठिकाण समजते आणि आपल्याला कोठे जायचे आहे ते सांगितल्यावर तिकडे जाण्याचा मार्ग समोरच्या स्क्रीनवरील नकाशातून दाखवला जातो तो पाहून गेल्यावर ते ठिकाण आपोआपच येते. आमचा चालक एका गांवाहून दुस-या गांवाला जाण्यासाठी या जीपीएसचा चांगला उपयोग करीत असला तरी त्या गांवात गेल्यानंतर राहण्याचे किंवा जेवणाचे हॉटेल शोधतांना कधी कधी थोडा गोंधळ होत असे. कदाचित एकासारख्या नांवाची दोन हॉटेले असत किंवा त्याच्या स्पेलिंगमध्ये चुका होत असतील.  एकदा तर आम्हाला डोळ्यासमोर मॅकडोनाल्डचे एक रेस्टॉरेंट दिसत होते, पण जीपीएसच्या सूचनेनुसार आम्ही चार पांच किलोमीटर दूर जाऊन त्याच्या दुस-या शाखेत जाऊन पुन्हा परत आलो. या निमित्याने आपल्याला ते गांव पहायला मिळत आहे असा सकारार्थी विचार आम्ही करीत होतो.

प्रवासातच कोणीतरी आम्हाला सांगितले की मागच्या वर्षी एका ट्रिपमध्ये केसरीची बसच चोरीला गेली होती. ते ऐकून आधी सगळ्यांचेच धाबे दणाणले. मग हळू हळू अधिक चौकशी करायला सुरुवात केली. ब्रुसेल्सला गेल्यावर चोरी जिथे झाली होती ती जागासुद्धा आम्ही पाहिली. पर्यटक दुपारचे जेवण करायला गेले असतांना ड्रायव्हरलाही थोडे पाय मोकळे करून घ्यावेसे वाटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बस उभी करून तो दहापंधरा मिनिटे फिरून आला. तेवढ्यात ती बसगाडी सर्व सामानासह अदृष्य झाली होती. खरे तर दरवाज्याची किल्ली, इंजिनाची किल्ली, कॉँप्यूटरचा पासवर्ड वगैरेशिवाय चोराला ती कशी पटकन चोरता आली हेच आश्चर्यजनक आहे. वाहतुकीचे इतके संगणकीकरण केलेले असतांनासुद्धा पोलिसांना रस्त्यात कुठेही ती सापडू नये याचे त्याहूनसुद्धा जास्त आश्चर्यही वाटले आणि या आधुनिक साधनांवरील विश्वासही कमी झाला.

 . . .  .(क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग ३२ : डिस्नेलँड आणि लिडो शो

दि.२९-०४-२००७ चौदावा दिवस: डिस्नेलँड आणि लिडो शो

पहिल्या दिवशी पॅरिस शहर पाहून झाल्यावर दुसरा दिवस यापूर्वी कधी न पाहिलेल्या कांही खास गोष्टींसाठी ठेवलेला होता. सकाळी उठून तयार होऊन डिस्नेलँडला जायला निघालो. हे रिसॉर्ट शहरापासून दूर, सुमारे तासाभराच्या अंतरावर एका मोकळ्या जागेवरील निसर्गरम्य परिसरात वसवले आहे. या ठिकाणीसुद्धा पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी अवाढव्य पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. कार, बसेस, कॅरॅव्हॅन वगैरेंमधून भरभरून येणा-या लोकांची रीघ लागली होती. त्यातले बहुतेक सगळे लोक दिवसभर तेथे घालवण्याच्या तयारीनेच आलेले होते. आम्हीसुद्धा चक्क जेवणाचे डबे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तिथे गेलो होतो.

 वॉल्ट डिस्नेचे नांव कोणी ऐकले नसेल? गेल्या शतकात करमणुकीच्या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकणारी कामगिरी त्या माणसाने करून ठेवली आहे आणि त्याच्या पश्चातसुद्धा त्याची कीर्ती वाढतेच आहे. पूर्वीच्या काळातील नाटक, तमाशा, नौटंकी आदि सगळ्या करमणुकीच्या परंपरागत क्षेत्रात जीवंत माणसे रंगमंचावर येत असत. सिनेमाची सुरुवात झाल्यावर नट व नट्या पडद्यावर यायला लागल्या. या सर्वांपासून वेगळी अशी कार्टून्सद्वारा मनोरंजन करण्याची कला सादर करून तिला अमाप लोकप्रियता मिळवण्यात वॉल्ट डिस्नेचा सिंहाचा वाटा आहे. एका खास कॅमेराद्वारे वेगाने छायाचित्रे घेऊन सजीव माणसाचा अभिनय टिपून घेता येतो व त्याच प्रकारे तो पुन्हा दाखवता येतो, पण निर्जीव कार्टून्सच्या हालचाली दाखवण्यासाठी थोड्या थोड्या फरकाने अनेक चित्रे काढून ती एकामागोमाग एक दाखवावी लागतात. त्यात पुन्हा मुद्राभिनय आणायचा असेल, चेह-यावरील बदलते भाव दाखवायचे असतील तर ते किती कठीण व किचकट काम असेल? आज संगणकाच्या सहाय्याने ते बरेच सोपे झाले आहे, पण वॉल्ट डिस्नेच्या काळात तशी सोय कुठे होती? फार फार तर चित्रांचे ट्रेसिंग करता येणे त्या काळात शक्य होते. वेगवेगळे मुखवटे घालून सजीव माणसेच या हालचाली करत असतील अशी माझी समजूत होती.

 वॉल्ट डिस्नेने नुसतीच हलणारी चित्रे दाखवली नाहीत तर त्यांमधून अद्भुत पात्रे निर्माण करून त्यांच्याकरवी मजेदार गोष्टी सांगितल्या. खरे तर कुठल्याच उंदराला मिकी माऊसप्रमाणे गोलाकार कान किंवा नाकाचा शेंडा नसतो की कुठल्याच बदकाला पंखाऐवजी दोन हात नसतात. पण मिकी माऊस आणि डोनाल्ड डक यांचे बिळात राहणारा उंदीर व पाण्यावर तरंगणारे बदक यांचेबरोबर फक्त नांवापुरतेच संबंध आहेत. ते दोघे आणि मिनी, गूफी, अंकल स्क्रूज वगैरे वॉल्ट डिस्नेची सगळी पात्रे माणसांप्रमाणे चालतात, बोलतात, घरात रहातात, अंगात कपडे घालतात, पायात बूट चढवतात, मोटारी चालवतात, ऑफिसला किंवा बाजारात जातात. त्यांचे चेहेरे विचित्र असले तरी माणसांप्रमाणेच प्रत्येकाचे निराळे व्यक्तीमत्व असते व त्यानुसार तो वागतो. मात्र ती काल्पनिक पात्रे असल्यामुळे मानव शरीराचे निसर्गनियम त्यांना लागू पडत नाहीत. त्यांचे अंग इतके लवचीक आहे की ओढले तर छपरापर्यंत ताणले जाते आणि दाबले की इस्त्री केलेल्या कापडासारखे सपाट होते. कधी ते फुग्यासारखे टम्म फुगते तर कधी धुवून पिळलेल्या फडक्यासारखे दहा ठिकाणी पिरगळले जाते. हे सगळे अफलातून चमत्कार पहातांना लहान मुले तर खिदळत राहतातच, मोठे लोकसुद्धा खुर्चीला चिकटून बसतात.

सिनेमाच्या माध्यमात प्रचंड यश मिळवल्यानंतर वॉल्ट डिस्नेने मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला. केवळ मौजमजा करण्यासाठी त्याने डिस्नेलँड या एका अॅम्यूजमेंट पार्कची निर्मिती केली. त्यात चित्रविचित्र कल्पक आकारांच्या अफलातून इमारती तर बांधल्याच पण लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी विलक्षण मनोरंजक तसेच चित्तथरारक खेळांची योजना केली. या कल्पनेला लोकांकडून कल्पनातीत प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारच्या उद्यानांना मोठी मागणी निर्माण झाली. वॉल्ट डिस्नेच्या कंपनीने त्यानंतर फ्रान्स, जपान, हॉंगकॉंग वगैरे देशात स्वतःचे डिस्नेलँड उभारले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन तयार केलेले एस्सेलवर्ल्डसारखे इतर पार्कसुद्धा अनेक ठिकाणी आहेत. पण डिल्नेलँडची सर कोणाला आली नाही आणि तितकी लोकमान्यताही कोणाला मिळाली नाही.

पॅरिसच्या डिस्नेलँडचे पांच मुख्य भाग आहेत. मेन स्ट्रीट यू.एस.ए, फ्रॉंटियरलँड, अॅड्व्हेंचरलँड, फँटसीलँड आणि डिस्कव्हरीलँड. हे सारे भाग एकमेकांना लागून आहेत. त्यात निरनिराळ्या प्रकारच्या करमणुकीच्या सोयी व खेळ आहेत. मेन स्ट्रीटवर मुख्यतः आकर्षक इमारतींमध्ये दुकाने थाटलेली आहेत. घोड्याच्या बगीमधून या स्ट्रीटवरून फेरफटका मारता येतो. रोज संध्याकाळी इथे एक अनुपम अशी मिरवणूक निघते. फ्रॉंटियरलँडमध्ये फँटमचा बंगला, थंडर माउंटन, इंडियन (रेड इंडियन) खेडे, नदीमधील होड्या वगैरे आहेत. अॅड्व्हेंचरलँडमध्ये कॅरीबियन सागरी चांचे, रॉबिनसन क्रूसोचे झाडावरील घर, अल्लाउद्दीनची गूढरम्य गुहा यासारख्या जागा आहेत. फँटसीलँडमध्ये निद्रिस्तसुंदरीचा राजवाडा (स्लीपिंग ब्यूटीचा कॅसल), अॅलाइस (वंडरलँडमधील)चा भूलभुलैया, पिनोचिओ, पीटर पॅन, ड्रॅगन यासारख्या अद्भुत कृती आहेत. स्पेस माउंटन, ऑर्बिट्रॉन, लेजर ब्लास्ट, स्टार टूर यासारख्या धाडसाच्या सहली डिस्कव्हरीलँडमध्ये आहेत. एका वर्तुळाकृती मार्गावरून फिरणारी छोटीशी आगीनगाडी या सर्वांमधून सारखी फिरत असते. हनी आय श्रंक द क्राउड हा कार्यक्रम एका सभागृहात दाखवला जातो. छोटा चेतन हा चित्रपट पहातांना जसा एक खास चष्माघालावा लागत असे तसला चष्मा लावून हा चित्रपट पहायचा असतो. तो पहाता पहाता पडद्यावरील पात्रे राक्षसासारखी मोठी होऊन आपल्या अंगावर आल्यासारखी वाटतात.

एकंदरीत अठ्ठेचाळीस वैशिष्ट्यपूर्ण जागा या मायानगरीत आहेत. कुठे घोड्यावर, मोटारीत किंवा विमानात बसून फिरण्याच्या मेरी गो राउंड आहेत, त्यातसुद्धा एका पातळीवर गोल फिरणा-या, स्वतःभोवती गिरक्या घेत पिरणा-या किंवा वरखाली तिरक्या प्लेनमध्ये फिरवणा-या असे वेगवेगळे उपप्रकार, तर कुठे जायंट व्हीलमधले झुलते पाळणे आहेत. एखाद्या खडकाळ जमीनीवरून जीपगाडी भरधाव नेल्याने बसतील तसे दचके बसवणारे रोलर कोस्टर कोठे आहेत, तर तोफेच्या तोंडी दिल्याप्रमाणे एका सेकंदात वर उडवून वेगाने खाली आणणारी रॉकेटे आहेत. ज्यांच्या हाडांचे सांधे मजबूत असतील आणि हृदय धड़धाकट असेल त्यांना अनेक अभूतपूर्व असे अनुभव देणारे कांही प्रकार आहेत, तर लहान मुलांनासुद्धा भीती वाटू न देणारे साधे खेळ आहेत. त्यांना सिंड्रेला किंवा अलाईस यांच्या कल्पनारम्य विश्वात घेऊन जाण्यासाठी तशा प्रकारची कित्येक मनोरंजक स्थाने बनवून ठेवलेली आहेत. आम्ही आपल्या वयोमानाला अनुसरून आणि वैद्यकीय सल्ला पाळून जमतील तेवढे अनुभव घेतले आणि स्वतः बाजूला उभारून इतर लोकांची धा़डसी कृत्ये पाहून घेतली.

दुपारचे तीन वाजून गेल्यानंतर सारे प्रेक्षक मुख्य रस्त्यावर आले होते, तसे आम्हीही आलो. पण तोपर्यंतच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पूटपाथवर बरीच गर्दी झालेली होती. त्यातच थोडीशी चेंगराचेंगरी करून जागा करून घेतली आणि चक्क जमीनीवर बसकण मारली. इतर सगळ्या लोकांचे पायसुद्धा दिवसभराच्या फिरण्याने दुखू लागले असणार. त्यामुळे त्यांनीही तेच केले होते. चार वाजता सुरू होणा-या मिरवणुकीची सगळे लोक आतुरतेने वाट पहात होते. त्याप्रमाणे चार वाजता तिचे पडघम वाजायला लागले, पण सारे चित्ररथ तयार होऊन रस्त्यावर येऊन कासवाच्या गतीने सरकत त्यांना आमच्यासमोर येईपर्यंत निदान अर्धा तास तरी वाट पहावी लागली. तो रथांचा समूह जसजसा जवळ येत गेला तसे सारेजण उत्साहाने उठून उभे राहिले.

 ही मिरवणूक पाहणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता. मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि त्यांच्या कॉमिक्समधील चिपमंकसकट एकूण एक पात्रे तर त्यांत सामील झालेली होतीच, त्यांशिवाय सिंड्रेला, स्नोव्हाईट, स्लीपिंग ब्यूटी, ब्यूटी आणि बीस्ट, पिनॅचियो, अलाईस, लायन किंग इत्यादी सर्व परीकथांमधील वेगवेगळी पात्रे या मिरवणुकीमध्ये मिरवत होती. सजवलेल्या चित्ररथांमध्ये त्यांच्या गोष्टींमधील दृष्ये अत्यंत आकर्षक रीतीने मांडलेली होती आणि कांही पात्रे त्यावर बसलेली होती किंवा नाचत होती. त्याशिवाय प्रत्येक रथाच्या आगेमागे कांही पात्रे नाचत बागडत चालत होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाळगोपाळांशी हस्तांदोलन करीत त्यांना खाऊ वाटत होती. प्रत्येक पात्र चित्रात दिसतो तसा चित्रविचित्र पोशाख घालून आणि मुखवटे परिधान करून आल्याने ते सहज ओळखू येत होते आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत होत होते. आम्हाला फारशा राईड घेता न आल्याने मनाला जी थोडीशी रुखरुख वाटत होती ती या परेडनंतर कुठल्या कुठे पळून गेली.

 दिवसभर डिस्नेलँडच्या परीकथेतील विश्वात घालवल्यानंतर रात्री चँप्स एलिसेजवरील लिडो शो पहायला गेलो. हे सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचे जग होते. टाटा थिएटरची आठवण करून देईल अशा एका भव्य थिएटरात आम्ही प्रवेश केला. आत समोर एक विशाल मंच तर दिसत होता पण प्रेक्षकांसाठी रांगेत मांडलेल्या खुर्च्या नव्हत्या. त्याऐवजी जागोजागी छोटी छोटी टेबले मांडून त्याच्या बाजूला खुर्च्या ठेवलेल्या होत्या. म्हणजे खाणे पिणे करता करता मनोरंजनाची व्यवस्था होती तर. पण आम्ही तर रात्रीचे जेवण उरकून तिथे गेलो होतो. पुढे जाऊन पहाता रंगमंच बराचसा प्रेक्षागृहाच्या आंत आला होता व त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा होती. त्या जागेत लांबट आकाराची टेबले ठेवून आमच्या आसनांची व्यवस्था केलेली होती. आमच्यासाठी शँपेनची बाटली आणली गेली, पण तीनचार शौकीन रसखान सोडल्यास इतरांनी कोका कोला पिणेच पसंत केले.

 इथला रंगमंच अद्भुत प्रकारचा होता. पूर्वीच्या काळच्या मराठी नाटकांत अरण्य, राजवाडा, रस्ता वगैरेची चित्रे रंगवलेले भव्य पडदे पार्श्वभूमीवर सोडून त्याचा आभास निर्माण करीत असत. नंतरच्या काळात नेपथ्याच्या कलेचा व शास्त्राचा विकास झाला. त-हेत-हेचे सेट बनवण्यात येऊ लागले. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने फिरता रंगमंच आणला. दुस-या एका नाटकात सरकता रंगमंच आला. मिनिटभर स्टेजवर अंधार करून तेवढ्यात पटापट बदलता येण्याजोगे सेट आले. पण हे सगळे प्रयत्न प्राथमिक पातळीवरचे वाटावेत इतके प्रगत तंत्रज्ञान इथे पहायला मिळाले. पहाता पहाता मागचा भाग पुढे यायचा किंवा परत मागे जायचा, बाजूचे भाग सरकत बाहेर जायचे. सपाट जागेच्या ऐवजी पाय-यांची उतरंड निर्माण व्हायची. समोरील स्टेजचा मधलाच भाग भूमातेने गिळून टाकल्यासारखा गडप व्हायचा. त्यानंतर जमीनीखालून एखादा कारंजा थुई थुई नाचत वर यायचा. कधी छतामधून एक पाळणा तरंगत तरंगत खाली यायचा. या रंगमंचावरील प्रकाशयोजनासुद्धा खूपच वैविध्यपूर्ण होती. रंगांच्या छटा क्षणोक्षणी बदलत होत्याच. मध्येच एका बाजूला झोत जायचा. तेथून दुसरीकडे वळला की तोपर्यंत तिथले दृष्य पूर्णपणे बदललेले असायचे.

 वेगवेगळ्या प्रकारचे नाच हा कार्यक्रमाचा मुख्य भाग होता. त्याखेरीज जादूचे प्रयोग, कसरती, जगलरी, मिमिक्री यासारखे ब-यापैकी मनोरंजक इतर आयटमसुद्धा अधूनमधून होत होते. आपल्या हिंदी सिनेमात पूर्वी क्लबडान्स असत, त्यानंतर कॅबरे आले, आता आयटम गर्ल्सचा धुडगुस चालला असतो. या सगळ्या प्रकारात नट्यांच्या अंगावरील कपडे कमी कमी होत गेले. तरीही तिथे सेन्सॉरच्या थोड्या मर्यादा असतात. इथे पॅरिसला मात्र कसलाच धरबंध नव्हता. कधी टॉपलेस, कधी बॉटमलेस तर कधी सगळेच लेस असलेल्या तरुणींचे घोळके मंचावर येत होते, तर अधून मधून झगमगीत कपड्याने त्यांचे सर्वांग झाकलेले असायचे. कधी डोक्यावर शिरपेच घालून त्यात तुरा खोवलेला, कधी मागच्या बाजूला कोंबड्यासारखे तुर्रेदार शेपूट लावलेले तर कधी पाठीला परीसारखे पंख चिकटवलेले. इतके विविध प्रकारचे कॉस्च्यूम्स! त्यांच्या गाण्यांचे बोल मुळीच समजत नव्हते आणि डान्सच्या स्टेप्सबद्दल आम्हाला काडीचे ज्ञान नसल्याने मंचावर नक्की काय चालले आहे किंवा ते कशाबद्दल आहे याचा अंधुकसा अंदाजसुद्धा येत नव्हता. फक्त प्रत्येक आयटम पूर्वीच्या आयटमपेक्षा वेगळा होता एवढे समजत होते. हाही एक वेगळा अनुभव होता.

सभागृहातील बहुतेक टेबलांवर विराजमान झालेली युरोपियन जोडपी आपसात संवाद साधत असतांनाच हे सगळे अधून मधून निर्विकार नजरेने पहात असली तरी आम्हा भारतीय मंडळींना हे अगदीच नवीन होते. आमच्यातल्या कोणीही भारतातल्या हॉटेलात जाऊन तिथे चालत असलेला प्रत्यक्षातला कॅबरे कधी पाहिला असेल असे वाटत नव्हते. त्यातून सर्वांच्या अर्धांगिनी त्यांच्या शेजारी बसलेल्या. त्यामुळे पुरुषांना जरासे अवघडल्यासारखेच होत होते. त्यातल्या एकीने समोरच्या गृहस्थाकडे पहात “तो मेला पहा कसा आधाशासारखा त्या बायांकडे पहातो आहे.” असे आपल्या नव-याच्या कानात कुजबुजल्यावर त्या बिचा-या नव-याला आता त्याने कुठे पहावे हा प्रश्न पडून तो गोंधळून गेला. . . . . . . . .(क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग ३१ : आयफेल टॉवर

दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस: आयफेल टॉवर

आमच्या नौकाविहाराची सुरुवात आयफेल टॉवरच्या पायथ्याच्या अगदी जवळून झाली. जसजशी आमची नाव नदीमधून पुढे जात होती तसतसा तो उंच मनोरा लहान लहान होत दूरदूर जातांना दिसत होता आणि परत येतांना तो मोठा होत जवळ जवळ येतांना दिसत होता. सीन नदीचा प्रवाह या भागात चंद्रकोरीसारखा थोडासा बांकदार असल्यामुळे तो टॉवर वेगवेगळ्या कोनातूनही पहायला मिळाला. सकाळपासून पॅरिसमध्ये फिरतांना हा उत्तुंग मनोरा अधून मधून पार्श्वभूमीवर दिसत होताच. पॅरिस आणि आयफेल टॉवर यांचे अतूट नाते आहे. गेटवे ऑफ इंडिया हे जसे मुंबईचे आणि कुतुबमीनार हे दिल्लीचे प्रतीक झाले आहे तसेच आयफेल टॉवर हे सुद्धा पॅरिस शहराचे आंतरराष्ट्रीय प्रतीक झाले आहे.

फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने १८८९ साली पॅरिस येथे एक आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन भरवण्याचे ठरवले गेले. फ्रान्सने यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात केलेली लक्षणीय प्रगती या निमित्ताने जगापुढे आणावी असा एक मुख्य उद्देश त्यामागे होता. त्या दृष्टीने विचार करता फ्रान्समधील लोकांच्या कर्तृत्वाचे एक नेत्रदीपक असे एक प्रतीक बनवून त्या ठिकाणी उभे करायचे ठरले. त्यासाठी समर्पक अशी भव्य व कल्पक कलाकृती बनवण्यासाठी निविदा मागवल्या गेल्यावर त्याला शेकडो प्रतिसाद आले. तज्ञांकरवी त्यांची छाननी होऊन गुस्ताव्ह आयफेल या तंत्रज्ञाने मांडलेली टॉवरची संकल्पना स्वीकारण्यात आली. पुढे हा मनोरा त्याच्याच नांवाने जगप्रसिद्ध झाला.

औद्योगिक प्रदर्शन हे मर्यादित काळापुरतेच भरवले जाणार असल्यामुळे त्यासाठी कायम स्वरूपाच्या प्रतीकाची जरूरी नव्हती. पण या मीनाराच्या बांधणीला येणा-या खर्चाचा विचार करता त्यासाठी वीस वर्षाचा करार करण्यात आला. गुस्ताव्ह आयफेल याने हा मीनार पहायला येणा-या लोकांकडून वीस वर्षे मिळेल तेवढे उत्पन्न घ्यावे आणि त्यानंतर तो मोडकळीला काढावा असे ठरले. अशा प्रकारचा लोखंडाचा सांगाडा बांधतांना त्याचे स्वतःचे वजन आणि सोसाट्याच्या वादळी वा-यामुळे त्यावर पडणारा भार यांचा विचार मुख्यतः केला जातो. यदाकदाचित एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी त्यामुळे तो कोसळू नये यासाठी आवश्यक तो मजबूतपणाही त्याला दिलेला असतो. या गोष्टींचा त्याच्या वयोमानाबरोबर कांही संबंध नसल्यामुळे तो उभा केल्यानंतर त्याच्या मजबूतपणात कालानुसार फरक पडत नाही. गंज चढल्याने लोखंड क्षीण होत जाते या कारणाने फक्त ते लोखंड गंजणार नाही एवढे मात्र पहावे लागते. यामुळे वारंवार त्या मनो-याची कसून पहाणी करणे व गंजण्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी खास रासायनिक रंगाची पुटे त्यावर चढवणे मात्र गरजेचे असते. अशा प्रकारची निगा राखत राहिल्यास कोणतीही लोखंडी वस्तू दीर्घ काळपर्यंत टिकू शकते.

करारानुसार आयफेल टॉवर पहिले वीस वर्षेपर्यंत टिकवला गेला, तोपर्यंत तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या काळात तो जगातील इतर सर्व इमारतींहून उंच असा पहिल्या क्रमांकाचा मनोरा होता. लक्षावधी लोक तो पाहण्यासाठी दुरून येऊन गर्दी करीत होते. तो फ्रान्सचा मानबिंदू झाला होता. अशा वेळी कोण त्याला पाडू देईल? उलट त्याची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल यावर विचार आणि चर्चा सुरू झाल्या. दुस-या महायुद्धाच्या संपूर्ण कालखंडात पॅरिस शहर जर्मनीच्या ताब्यात होते. पण लढाईच्या धुमश्चक्रीमध्येही मित्रराष्ट्रांनी पॅरिस शहरावर फारशी बॉंबफेक केली नाही, आयफेल टॉवरला तर मुळीच धक्का लावला नाही. युद्धाच्या अखेरीस जर्मनीपुढे पराभवाचे सावट दिसू लागल्यावर निव्वळ सूडापोटी हा टॉवर नष्ट करण्याच्या आज्ञा हिटलरने दिल्या होत्या असे म्हणतात, पण तेथील सूज्ञ सेनाधिका-याने तसले अघोरी कृत्य केले नाही. अशा रीतीने या मनो-याला दुस-यांदा जीवनदान मिळाले.

या स्ट्रक्चरमधील प्रत्येक खांब त्याच्या माथ्यावरील संपूर्ण सांगाड्याचा भार पेलत असतो. त्यामुळे सरसकट सगळीकडे जाडजूड खांब व तुळया वापरल्या तर वरील भागाचा खालील भागावरील भार त्याला असह्य होतो. दही दंडी फोडण्यासाठी मानवी उतरंड बनवतांना जसे सर्वात वजनदार भरभक्कम गडी खालच्या साखळीत, मध्यम बांध्याचे मधील भागात आणि लहान चणीचे गडी सर्वात वर पाठवतात, तशाच प्रकारे या मनो-यासाठी वापरलेले खांब व तुळया वरून खाली येता येता त्यांचे आकारमान वाढत जाते. या कारणाने असल्या उत्तुंग स्ट्रक्चरचे डिझाईन अतीशय काळजीपूर्वक रीत्या व बारकाईने आकडेमोडी करून करावे लागते. पॅरिसची कलाविषयक परंपरा लक्षात घेऊन तो दिसायलासुद्धा देखणा दिसला पाहिजे याची विशेष काळजी घेतलेली आहे. इंजिनीयरांना सौंदर्यदृष्टी नसते असे हा मनोरा पाहिल्यानंतर कोण म्हणेल?

औद्योगिक प्रदर्शनाची तारीख आधीपासून ठरलेली असल्यामुळे कसेही करून हा मनोरा दोन वर्षाच्या काळात पूर्ण करायचाच होता आणि त्याप्रमाणे तो वेळेवर पुरा झाला. अर्थातच तेंव्हा त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागले असणार. एकंदरीत सात हजार टनावर वजन भरेल इतक्या पंधरा हजारावर लोखंडाच्या विशिष्ट आकारांचे डिझाईन करून, त्यांची ड्रॉइंग्ज रेखाटून व ते भाग कारखान्यात तयार करून इथे आणले. त्यातील प्रत्येक भाग अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. ते आकाराने सूतभर जरी लहान वा मोठे झाले असते तर त्यांची एकमेकाशी सांगड जुळली नसती किंवा परिणामी मनोरा वाकडा तिकडा दिसला असता. पंचवीस लक्ष इतके रिवेट ठोकून ते सगळे पुर्जे एकमेकांना जोडले. त्या जमान्यातील ज्या कामगारांनी हिंवाळ्यातील थंडीवा-यालासुद्धा न जुमानता इतक्या उंचीवर चढून हे जोडणीचे अवघड काम केले असेल त्यांची धन्य आहे.

हा मूळचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे. स्कायस्क्रेपर्सच्या आजच्या जमान्यात त्याची तितकीशी नवलाई वाटणार नाही. टेलीव्हिजनचे प्रसारण सुरू झाल्यानंतर आणि उपग्रहाद्वारे ते करणे सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळात जगभरातील सा-या शहरात त्यासाठी उंच मनोरे बांधण्यात आले. मुंबईमधील वरळी येथील दूरदर्शनचा टॉवरसुद्धा जवळ जवळ तितकाच उंच आहे, पण सौंदर्याच्या दृष्टीने तो आयफेल टॉवरच्या पासंगालाही पुरणार नाही. त्याची उभारणी करतांना सौंदर्य हा उद्देश डोळ्यासमोर मुळी नव्हताच. सध्या तरी कॅनडामधील टोरोंटो येथील सी.एन.टॉवर ही जगातील सर्वात उंच इमारत मानली जाते. इतर देशांतसुद्धा उत्तुंग मनोरे आहेत. पॅरिसमध्ये मात्र आयफेल टॉवर हा उंच मनोरा आयता उपलब्ध असल्याने त्याच्याच माथ्यावर चोवीस मीटर उंचीचा खांब टीव्हीसाठी उभारला आहे.

रेडिओ व टेलीव्हिजनच्या कार्यक्रमांच्या प्रसरणाव्यतिरिक्त कांही विशेष कामांसाठी आयफेल टॉवरचा उपयोग करण्यात आला. कांही काळ त्यावर महाकाय बेढब जाहिराती लावण्यात आल्या होत्या, पण त्याने त्याच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने सुदैवाने त्या काढून टाकल्या गेल्या. महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांनी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या माथ्यावर ऑब्झर्व्हेशन पोस्ट बसवले. कोणा गिर्यारोहकाने लिफ्ट वा जिन्याचा वापर न करता त्यावर चढून जाण्याचा विक्रम केला तर कोणी हातात पॅराशूट धरून त्यावरून खाली उडी मारण्याचा. पर्यटन क्षेत्रासाठी तर इथे सोन्याची खाण आहे. पर्यटकांना उंचावर नेऊन पॅरिस शहराचे विहंगम दृष्य दाखवले जाते. त्यांच्यासाठी या टॉवरमध्ये रेस्तरॉं उघडली आहेत. त्यांना आकर्षण वाटावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि त्याचे परिणामस्वरूप इथे येऊन गेलेल्या लोकांची संख्या आतापर्यंत वीस कोटीहून जास्त झाली आहे! त्यापासून असंख्य लोकांना कांही भव्य दिव्य असे करण्याची प्रेरणा मिळाली असेल ती वेगळी!

असा हा आयफेल टॉवर पाहण्याचे कधीपासून मनात होते ते एकदाचे युरोपच्या या सहलीमध्ये साध्य झाले.

 . . . . . .  . (क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग ३० : पॅरिसची सफर

दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस: पॅरिसची सफर

बसमधून पॅरिस शहराचे दर्शन घेत आम्ही ‘प्लेस द ला काँकार्ड’ला आलो. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) किंवा दिल्लीला कनॉट प्लेस या जागांचे जे महत्व आहे, तेवढे किंवा त्याहून कांकणभर जास्तच महत्व पॅरिसमध्ये या चौकाला आहे. त्याच्या विस्तीर्ण प्रांगणातून एका बाजूला ‘चँप्स एलिझेस’ हा पॅऱिसमधील, कदाचित जगातील, सर्वात सुंदर राजमार्ग जातो. या रस्त्याच्या दुस-या टोकाला, म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेली भव्य दगडी कमान इथूनसुद्धा स्पष्ट दिसते. दुस-या बाजूला एक सुंदर उद्यान आहे. या चौकातून एक रस्ता जवळच्याच सीन नदीवरील पुलावर जातो. या आवारातून आयफंल टॉवरचे दुरून दर्शनसुद्धा घडते. या चौकाच्या मधोमध इजिप्तमधून आणलेला ‘ओबेलिस्क’ आहे. सुमारे तेवीस मीटर उंच आणि २३० टन वजनाचा हा चौकोनी खांबाच्या आकाराचा अवजड शिलाखंड इथे ताडमाड उभा असून त्याच्या चारी अंगांवर प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीमध्ये कांही तरी लिहिलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूने दोन सुरेख कारंजी आहेत. शिवाय या चौकातील ऐसपैस मोकळ्या जागेच्या कोप-या कोप-यात इतर शिल्पकृती उभ्या करून ठेवलेल्या आहेतच.

सुमारे अडीचशे वर्षापूर्वी पंधरावा लुई राज्यावर असतांना या विशाल चौकाची निर्मिती करण्यात आली व त्या राजाचेच नांव त्याला दिले गेले. त्या राजाचा अश्वारूढ पुतळा त्या चौकाच्या मधोमध स्थापन केला होता. दैवदुर्विलास असा की फ्रेंच क्रांतीनंतर याच चौकात गिलोटीन उभारून त्याचाच मुलगा तत्कालिन राजा सोळावा लुई, राणी मेरी एंतोनिएत आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा निर्घृण वध करण्यात आला आणि त्या जागेचे ‘क्रांती चौक’ (प्लेस द ला रेव्हॉल्यूशन) असे नामांतर करण्यात आले. त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी बदलत्या कालानुसार त्याची नांवे पुन्हा बदलली. अखेरीस सध्याचे ‘प्लेस द ला कॉंकार्ड’ हे नांव रूढ झाले.

‘चँप्स एलिझेस’ हा दीडशे वर्षांपूर्वी बांधलेला रस्ता तब्बल सत्तर मीटर इतका रुंद आहे. त्या काळात होणारी तुरळक वाहतूक पाहता हा रस्ता इतका रुंद करणा-या अभियंत्याच्या दूरदृष्टीचे कौतुकच करावे लागेल. पॅरिसमधील उत्तमोत्तम सिनेमागृहे, नाट्यगृहे, हॉटेले, रेस्तरॉं, त-हेत-हेच्या वस्तूंची अत्यंत प्रतिष्ठित दुकाने वगैरे या रस्त्यावर आहेत. कांही मोठ्या कंपन्यांची ऑफीसेही आहेत. त्यामुळे तो अत्यंत गजबजलेला असतो. साहजीकपणेच येथील जागांचे भाव गगनाला भिडणारे असणार यात शंका नाही. ख्रिसमसच्या दिवसात इथे खूप सजावट व रोषणाई केली जाते आणि राष्ट्रीय दिनाला या रस्त्यावरून भव्य शोभायात्राही निघते. नववर्षदिवस साजरा करायला उत्साही लोक मोठ्या संख्येने इथे येऊन गर्दी करतात. अशा रीतीने हा चौक या शहरातील लोकांच्या जीवनातील चैतन्याचा भाग बनलेला आहे.

‘प्लेस द ला कॉंकार्ड’हून सुरू होणा-या ‘चँप्स एलिझेस’ या हमरस्त्याच्या दुस-या टोकाला असलेली ‘आर्च द ट्रायम्फ’ ही भव्य कमान या रस्त्यावरून जातांना सतत दिसत असते. मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया व दिल्लीच्या इंडिया गेटची आठवण करून देणारी ही कमान ही एक तशीच भव्य इमारत आहे. विजयी वीरांचे स्वागत करण्यासाठी मोठमोठ्या कमानी बांधण्याची परंपरा युरोपात पूर्वीपासून आहे. पुढे विजयाचे स्मारक म्हणून कमानी बांधणे सुरू झाले. ‘आर्च द ट्रायम्फ’ या कमानीचे बांधकाम खुद्द नेपोलियनने आपल्या एका लढाईमधील विजयाच्या स्मरणार्थ दोनशे वर्षांपूर्वी सुरू केले. पहिल्या व दुस-या महायुद्धांत शहीद झालेल्या अनाम वीर सैनिकांचे स्मारक तिथेच करण्यात आले आहे. इंडिया गेटप्रमाणेच इथेसुद्धा एक ‘अमर जवान ज्योती’ आहे आणि सैनिकाच्या स्मृतीदिनी झेंडावंदन करून त्यांना पुष्पचक्र व श्रध्दांजली वाहण्यात येते.

‘प्लेस द ला कॉंकार्ड’च्या जवळच सीन नदीच्या किना-यावर जगप्रसिद्ध आणि अतिविशाल ‘लूवर’ वस्तुसंग्रहालय आहे. हे म्यूजियम इतके अवाढव्य आहे की त्यातील सगळ्या दालनांतून नुसते फिरून येतायेता पायाचे तुकडे पडतील. युरोपमधील इतिहासपूर्व कालापासून ते ग्रीक, रोमन व त्यानंतरच्या इटालियन, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन वगैरे विविध शैलीतील चित्रे आणि मूर्ती इथे आहेत. तशाच इजिप्त, अरबस्तान, मध्यपूर्व व भारतातील प्राचीन काळातील व मध्ययुगातील मौल्यवान कलाकृतीसुद्धा या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र दालनेही बनवलेली आहेत.

आमच्या कार्यक्रमपत्रिकेत त्यामधील फक्त ‘मोनालिसाचे दर्शन’ एवढेच समाविष्ट होते असे कळले. तिथपर्यंत जातायेतांना वाटेवर इतर कलाकृती पहायला मिळाल्याच तर तो बोनस! आमच्या गाईडने प्रवेशद्वारापासून मोनालिसाच्या चित्रापर्यंत जाण्याचा आणि तिथून परत येण्याचा रस्ता व्यवस्थित दाखवला. ‘व्हीनस डिमिलो’चा सुप्रसिद्ध प्राचीन पुतळाही दाखवला. भग्नावस्थेतही तो किती सुंदर दिसतो? आता तो आमच्या वाटेवरच उभा होता कां त्यासाठी आम्हाला थोडी वाकडी वाट धरावी लागली कोणास ठाऊक! तरीसुद्धा आम्हाला जाण्यायेण्यासाठी तासाहून जास्त वेळ लागला. तो संपूर्ण मार्ग एकाहून एक अधिक सुरेख अशा अनेकविध चित्रे व शिल्पे यांनी गच्च भरला होता. त्यातील प्रत्येकाची माहिती घेत राहिलो असतो तरी एक दिवस पुरला नसता. त्यामुळे त्यांच्यावर ओझरता दृष्टीक्षेप टाकून पुढे जावे लागत होते.

मोना लिसा हे सुप्रसिद्ध इटालियन विद्वान चित्रकार लिओनार्दो दा विंची याने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस लाकडावर रंगवलेले त्याचे सर्वोत्तम तैलचित्र आहे. ते पूर्ण करायला त्याला चार वर्षे लागली असे म्हणतात. त्या काळात कॅमल कंपनीचे रंग आणि ब्रश बाजारात विकत मिळत नसत. चित्रकलेसाठी आवश्यक असलेल्या एक एक साधनासाठी लागणा-या गोष्टींचा कच्चा माल नैसर्गिक स्त्रोतामधून मिळवून त्या पासून कलाकाराला पाहिजे असेल ते तयार करावे लागत असे. पण त्यापासून तयार झालेल्या कलाकृती आज पांचशे वर्षानंतरसुद्धा चांगल्या चमकदार राहिल्या आहेत हे कौतुकास्पद आहे. ‘मोना’ हा शब्द इटालियन भाषेत ‘मॅडम’ अशा अर्थाने लावला जातो आणि ‘लिसा’ हे त्या मॉडेलच्या नांवाचे संक्षिप्त रूप आहे अशी ‘मोना लिसा’ या नांवाची व्युत्पत्ती सांगितली जाते. म्यूजियममध्ये या चित्राचे फ्रेंच भाषेमधील नांव ‘ला जाकोंदे’ असे दिले आहे.’जाकोंदे’ हे तिचे आडनांव असणार. या चित्रातील युवतीच्या ओठावरील गूढ स्मितहास्य आणि डोळ्यातून ओसंडणारे मुग्ध भाव ही या चित्राचे खास वैशिष्ट्ये आहेत. कमानदार भ्रुकुटी हे स्त्रीसौंदर्याचे लक्षण समजले जाते आणि आपल्या भुंवयांना रेखीव आकार देण्याचा बराच प्रयत्न बहुतेक महिला करतांना दिसतात. पण लिओनार्दो दा विंचीने मोनालिसाच्या भुंवया अगदी अस्पष्ट काढल्या आहेत आणि तरीसुद्धा ती अत्यंत सुंदर दिसते, कदाचित त्यामुळे तिचे बोलके डोळे अधिकच उठून दिसतात, ही गोष्ट नमूद करायला हवी.

मोनालिसाच्या चित्राची छायाचित्रे व प्रतिकृती सगळ्यांनीच पाहिलेल्या असतील. पुस्तकांत, मासिकांत, ग्रीटिंग कार्डवर, कॅलेंडरवर, कॉंप्यूटर स्क्रीनवर अशा अनेक जागी मी सुद्धा अनेक वेळा त्या पाहिलेल्या होत्या. इतकेच नव्हे तर लूवर म्यूजियमच्या दाराशी असलेल्या दुकानांत तिच्या निरनिराळ्या आकारातल्या असंख्य तसबिरी विक्रीसाठी टांगून ठेवलेल्या होत्या. ‘मोनालिसा’ हा शब्द ऐकताक्षणी तिचा सस्मित चेहरा नजरेसमोर उभा रहावा इतका तो आमच्या ओळखीचा झालेला होता. तिथे पोचल्यानंतर देवदर्शनासाठी लागते तशा लांबलचक रांगेत उभे रहावे लागले. कदाचित त्यामुळे असेल, पण इतके परिश्रम घेऊन आणि वाट पाहून अखेर जेंव्हा आम्ही त्या चित्राच्या समोर आलो तेंव्हा आपण अतिशय भव्य दिव्य असे कांही पाहत आहोत असे मात्र मनोमनी वाटले नाही. ते चित्र अत्यंत सुंदर आहे यात तिळमात्र शंका नाही. पण तेथे पोचेपर्यंत वाटेत जी इतर अनेक मोठमोठी किंवा सूक्ष्म कलाकुसरीने नटलेली चित्रे पाहिली होती, भारतातील पुणे, मुंबई, मैसूर, हैदराबाद, जयपूर आदि ठिकाणच्या वस्तुसंग्रहातील जी चित्रे लक्षात राहिली होती त्यांच्या मानाने मोनालिसा जितक्या पटीने अधिक प्रसिद्ध झाली आहे तशी दिव्यत्वाची प्रचीती कांही मला तरी तिला प्रत्यक्ष पाहतांना आली नाही. उलट ते चित्र अपेक्षेपेक्षा आकाराने लहानसेच वाटले. कदाचित अत्युत्तम कलाकृतींची योग्य पारख करण्याची दिव्यदृष्टी माझ्याकडे नसेल! युरोपमध्ये बहुतेक प्रेक्षणीय जागांचे फोटो काढू दिले जातात, कांही ठिकाणी तर त्याला प्रोत्साहन दिले जाते. या ठिकाणी मात्र मोनालिसाचे छायाचित्रे काढण्याला बंदी आहे. जे चित्र गल्लोगल्ली फुटपाथवर स्वस्तात विकत मिळत होते आणि जालावर सहजपणे फुकट मिळते त्याचा फोटो काढण्याला बंदी! इतर कांही जागी फ्लॅश वापरायला बंदी होती ते तांत्रिक कारण पटण्यासारखे आहे, पण मोनालिसाचा फोटो काढायला पूर्ण बंदी कां आहे ते कळत नाही. कदाचित पर्यटकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यातून त्यांची रांग लहान करण्यासाठीही असू शकते.

लूवर वस्तुसंग्रहालय पाहून आम्ही अत्तरांची विक्री करणा-या एका नामवंत दुकानात गेलो. तिथल्या विनोदी विक्रेत्याने आम्हा भारतीय मंडळींचे भारतीय पद्धतीने खास स्वागत केले. त्यानंतर “मेरा जूता है जापानी” हे जुने लोकप्रिय हिंदी गाणे आमच्याकडून कोरसमध्ये म्हणवून घेतले आणि “याचा गीतकार कोण आहे?” असा प्रश्न विचारला. मी शैलेन्द्रचे नांव सांगताच मला एक अत्तराची कुपी बक्षिस मिळाली. या सगळ्या गिमिक्सचा अनुकूल परिणाम झाला की नाही ते सांगता येणार नाही, कारण पॅरिसहून सेंटच्या बाटल्या आणायच्या हे सगळ्यांनी, विशेषतः स्त्रीवर्गाने, मुंबईहून निघतांनाच ठरवलेले होते. आपल्या दुकानांत आलेल्या ग्राहकांना बाहेर इकडे तिकडे न जाऊ देता आपला माल खपवण्याइतपत त्याचा फायदा झाला तरी त्याला ते पुरेसे होते.

खरेदी करून झाल्यानंतर आम्ही आयफेल टॉवरच्या पायथ्याशी असलेल्या नदीकिना-यावरील धक्क्यापाशी आलो. इथून एका अद्ययावत सोयींनी सुसज्ज अशा खूप मोठ्या मोटरलॉंचमध्ये बसून नौकाविहार केला. यात बसायला व्यवस्थित खुर्च्या होत्याच आणि प्रत्येक आसनापाशी एक ईअरफोन होता. हे श्रवणयंत्र कानाला लावून हातातील बटने दाबली की इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अशा आपल्याला हव्या असलेल्या भाषेतून निवेदन ऐकायची सोय होती. कॉमेंटरी चालू नसेल तेंव्हा संगीताचे सूर ऐकवीत होते ते मात्र समायिक होते. आमची नाव नदीमधून जसजशी पुढे सरकत होती तसतशा दृष्टीपथात येणा-या इमारतींची अल्प माहिती खुसखुशीत भाषेत निवेजक सांगत होते. ते बहुधा आधीच रेकॉर्ड करून ठेवल्यासारखे वाटत होते. पूर्वीची शहरे नदीच्या आधारावरच वसवली जात असल्यामुळे ऐतिहासिक महत्वाची चर्चे, राजवाडे, कचे-या वगैरे बहुतेक प्रसिद्ध इमारती या फेरफटक्यात येऊन गेल्या.

. . . . .  . (क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग २९ : सुंदर नगरी पॅरिस

दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस: सुंदर नगरी पॅरिस

“पॅरिस हे जगातील सर्वात सुंदर शहर आहे” असे मी फार पूर्वीपासून म्हणजे शाळेत असतांनापासून ऐकत आलो आहे. हे कोण ठरवतो, कशावरून ठरवतो, त्याचे निकष काय असतात असले प्रश्न डोक्यात यायला लागण्याच्या वयात येण्यापूर्वीपासून ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिलेली आहे. त्या शहराबद्दलच्या अधिक मनोरंजक गोष्टी नंतर हळूहळू समजत गेल्या. पॅरिस ही अनेक कलांची पंढरी आहे. त्यामळे त्या शहराची वारी करण्याची इच्छा सगळ्या कलाकारांच्या मनात असते. माझ्या अंगात कसल्याही कलागुणांचा अंशमात्र नसला तरी थोडीशी कलासक्ती असल्यामुळे किंवा निव्वळ कुतूहलापोटी कां होईना, पण ते शहर प्रत्यक्ष डोळ्यांनी पहाण्याची अनावर इच्छा माझ्यासुद्धा मनात कधीची जन्माला आलेली होती. पण आतापर्यंत ती पूर्ण करणे शक्य न झाल्यामुळे ते राहून गेले होते. युरोपच्या या सहलीच्या तेराव्या दिवशी बेल्जियम देशांतून निघून फ्रान्सला जाण्यासाठी त्यामुळेच मी खूप उत्सुक होतो.

पहायला गेल्यास पॅरिस हे शहर खूप प्राचीन आहे असे म्हणतात. ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षापूर्वीसुद्धा येथील सीन नदीवरील नावाडी, व्यापारी आणि मच्छीमार वगैरेंची वस्ती या ठिकाणी होती. आपल्या मुंबईला पूर्वीपासून कोळी लोकांची वस्ती होती तशीच इथेही होती. रोमन सम्राटांनी जेंव्हा युरोपचा मोठा भाग काबीज केला तेंव्हा या ठिकाणी त्यांनी आपली एक मोठी छावणी स्थापन केली. त्या काळात ‘ल्युतेतिया’ या नांवाने ती ओळखली जात असे. अॅस्टेरिक्सच्या कॉमिक्स वाचणा-यांना हे नांव परिचयाचे वाटेल. पुढे रोमन साम्राज्याचा अंत झाल्यानंतर ठिकठिकाणी नवे राज्यकर्ते उदयास आले. या भागातील स्थानिक राजांनी या गांवाला पुन्हा पूर्वीचे नांव देऊन इथून आपला राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. फ्रान्स हे एकसंध राष्ट्र आणि पॅरिस ही त्याची राजधानी हे दोन्ही सुमारे हजार वर्षांपूर्वी नांवारूपाला आले.

त्यानंतरच्या काळांत त्याची भरभराट होत गेली. कलाकारांच्या कलागुणांना या शहरात चांगला वाव मिळाला. त्यामुळे अनेक कलाप्रेमी इथे आकर्षिले गेले. त्यांचे प्रयत्न आणि कौशल्य यातून सुंदर इमारती उभ्या राहिल्या, विद्यापीठे आणि वस्तुसंग्रहालये उघडली गेली. हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे नंतरच्या कालखंडात स्थानिक महत्वाच्या अनेक घटनाही येथे घडून गेल्या असणार. फ्रेंच राज्यक्रांती ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना इथे अठराव्या शतकाच्या अखेरीस घडली, ती सर्व जगाला हादरवून टाकणारी ठरली. तत्कालिन राजा व राणी यासकट सगळ्या शासकवर्गाची त्यात सरसकट कत्तल करण्यात आली. एका झटक्यात शिर धडावेगळे करणारे गिलोटिन नांवाचे जीवघेणे यंत्र त्या हत्याकांडासाठी खास बनवून वापरण्यात आले. विक्षुब्ध झालेल्या जमावाला उन्मादाला विध्वंसक कृत्ये करणे शक्य असले तरी राज्यशकट चालवण्याचे विधायक काम करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे क्रांतीनंतरचा कांही काळ अनागोंदी कारभाराचा गेला. त्यानंतर हळूहळू तिथे लोकशाही स्थापन होऊन स्थिरावली.

अधून मधून युद्धे होत राहिली असली तरी शांततेच्या काळात पॅरिसचा खूपच चांगल्या त-हेने विकास होत गेला. कलेचे माहेरघर म्हणून त्याने पूर्वीच्या काळी मिळवलेली ख्याती अद्याप टिकून आहे. नगररचना असो वा वास्तुशिल्प, पुरातन शैलीची चित्रकला असो वा मॉडर्न आर्ट, पारंपरिक नृत्यकला असो वा जलद बीट्सवरील आधुनिक डान्स, या सगळ्यात पॅरिस अग्रगण्य राहिले आहे. कपड्यांच्या बाबतीत तर पॅरिसला सर्व जगातील फॅशनची राजधानी समजले जाते. सौंदर्यप्रसाधनांचे ते आगर आहे. उत्तमोत्तम अत्तर पाहिजे असेल तर ते इथेच मिळेल. अशा रीतीने पॅरिस हे एकाच वेळी ऐतिहासिक तसेच अत्याधुनिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगातून लक्षावधी पर्यटक पॅरिस पहायला येतात.

इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा रोमन लिपीमध्येच लिहिल्या जात असल्या तरी लिहिलेल्या शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे करतात. आधी फ्रेंच शब्द वाचणे आपल्याला कठीण आणि त्यांचे उच्चार समजून घेऊन ते लक्षात ठेवणे तर जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी फ्रेंच भाषा विधीवत शिकायलाच हवी. ते केलेले नसल्यामुळे पॅरिसमधील जागांना इंग्रजीमध्ये दिलेल्या नांवांचा इंग्रजी भाषेनुसार उच्चार लिहिणे मला भाग पडत आहे. एक साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास पॅरिस शहराला तेथील लोक ‘पारी’ म्हणतात तर लंडन शहराला ‘लान्द्रे’. पण मला तसा उल्लेख करता येणार नाही.

पॅरिसला पोचल्यानंतर आधी आम्ही बसमधूनच तेथील मुख्य भागाचा एक फेरफटका मारला. अतिशय नीटनेटके सरळ रेषेत जाणारे लांबरुंद प्रशस्त असे रस्ते, त्याच्या दुतर्फा रांगेने लावलेली झाडे, प्रमाणबद्ध आकाराच्या सुंदर इमारती, त्यावर केलेले कलात्मक कोरीव काम, कमानी, घुमट, खांब वगैरेंची रेलचेल, कलात्मक चबूतरे आणि त्यावर स्थापलेल्या वेगवेगळ्या शिल्पकृतींची सजावट, अधून मधून दिसणारे राजवाडे, चर्च, संग्रहालये यांच्या सुप्रसिद्ध वास्तू, कारंजे आणि पुतळ्यांनी शोभिवंत केलेले प्रचंड आकाराचे चौक वगैरे सा-याचा एकत्र परिणाम होऊन या शहराला सुंदर शहर असे कां म्हणतात ते आपल्याला सहज समजते.

  . . . . . . . (क्रमशः)

ग्रँड युरोप – भाग २८ : बेल्जियम

दि.२७-०४-२००७ बारावा दिवस: बेल्जियम

कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डन मधून बाहेर पडण्यासाठी पाय निघत नव्हता. पण ट्यूलिपच्या मनोहर विश्वातून पुन्हा आपल्या जगात परत जाणे भागच होते. त्यामुळे ठरलेली वेळ झाल्यावर आपल्या बसमध्ये येऊन पुढील प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात नेदरलँड या छोट्या देशातून बाहेर पडून बेल्जियम या त्यापेक्षाही लहान देशात प्रवेश केला. या दोन्ही देशांचे क्षेत्रफळ अगदी कमी असले तरी तेथील लोकसंख्या एक कोटीच्या वर आहे. त्यांची गणना दाट वस्तीच्या प्रदेशात होते. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने भारताचा क्रमांक जगातील सर्व देशांत एकतीसावा लागतो, तर नेदरलँड व बेल्जियम यांचे क्रमांक अनुक्रमे तेवीस व एकोणतीसावे लागतात. म्हणजेच हे दोन्ही देश या बाबतीत भारताच्यासुद्धा पुढे आहेत. त्यातीलही बहुसंख्य लोक शहरात राहतात. आल्प्स आणि ब्लॅक फॉरेस्टमधून फिरून या भागात आल्यावर लोकवस्तीमधील हा फरक जाणवण्यासारखा होताच.

ब्रिटिशांनी ज्या काळात भारतात पाऊल ठेवले तेंव्हाच त्यांच्या पुढे किंवा मागे पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच लोकांनीदेखील इकडे येऊन आपापल्या वखारी स्थापन केल्या आणि आजूबाजूला हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यामधूनच त्यांची साम्राज्ये निर्माण झाली. डच लोकांनी कांही काळ सिलोनवर म्हणजे आजच्या श्रीलंकेवर राज्य केले आणि अखेरीस जावा, सुमात्रा आदि त्या काळात ईस्ट इंडिया या  नांवाने ओळखल्या जाणा-या आताच्या इंडोनेशियावर आपला जम बसवला होता. या सगळ्यात बेल्जियमचे नांव कुठे येत नाही, कारण त्या शतकात हा देश अस्तित्वातच आलेला नव्हता. तेंव्हा आशियात आलेले कांही डच लोक आताच्या बेल्जियममधील भागातून कदाचित आलेही असतील. बेल्जियममधील लोकांची स्वतंत्र भाषा नाही. उत्तरेकडील नेदरलंडजवळ राहणारे लोक डच भाषा बोलतात, तर दक्षिणेला फ्रान्सपासून जवळ राहणारे लोक फ्रेंच. जर्मनीच्या सीमेपासून जवळ राहणारे बरेच लोक जर्मनभाषीय आहेत. डच लोक बहुसंख्य आहेत, पण फ्रेंच लोकांची संख्या त्या खालोखाल आहे. आता आंतरराष्ट्रीय संस्था तिथे आल्याने इंग्लिश निदान समजणा-या लोकांची संख्याही मोठी आहे.

नद्या, नाले, समुद्र आणि दलदल यामुळे पायदळातील शिपाई किंवा घोडेस्वार हॉलंडमध्ये जायला फारसे उत्सुक नसावेत. यामुळे हॉलंडला कांही प्रमाणात नैसर्गिक संरक्षण मिळत होते. पण बेल्जियम मात्र तीन बाजूने फ्रान्स, प्रशिया आणि ऑस्ट्रिया या बलाढ्य साम्राज्यांच्या तडाख्यात सापडत असल्यामुळे सारखे त्याचे कांही भूभाग जिंकून या ना त्या साम्राज्यात सामील करून घेतले जात असत. त्यांच्या आपसातील अनेक लढायासुद्धा बेल्जियनच्या भूमीवर लढल्या गेल्या. यामुळे बेल्जियमला ‘युरोपचे रणांगण’ असे म्हंटले जाते. नेपोलियन बोनापार्टचा अखेरचा निर्णायक दारुण पराभव वॉटरलू या जागी झाला तेंव्हापासून ‘वॉटरलू’ या शब्दाचा अर्थच ‘कायमची पुरती वाट लागणे’ असा झाला आहे. ते वॉटरलू गांव बेल्जियममध्येच आहे. आजचा स्वतंत्र बेल्जियम देश सन १८३० मध्ये प्रथम अस्तित्वात आला आणि तेंव्हापासून आतापर्यंत, मधला महायुद्धांचा काळ सोडून इतर काळात तो स्वतंत्र राहिला.

गेल्या शतकात या राष्ट्राने युरोपच्या राजकारणात महत्वाची कामगिरी बजावली आहे. पश्चिम युरोपातील देश व अमेरिका यांच्यामधील संयुक्त संरक्षणासाठी एक करार असून त्याचे पालन करण्यासाठी ‘नाटो’ ही शस्त्रास्त्राने सुसज्ज अशी समाईक संस्था आहे. तिचे मुख्य कार्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स इथे आहे. तसेच युरोपियन युनियनचे प्रमुख ठिकाण सुद्धा हेच आहे. एका अर्थाने ब्रुसेल्स ही आता केवळ बेल्जियमचीच नव्हे तर संपूर्ण युरोपची राजधानी बनली आहे असे म्हणता येईल कारण तेथील सैनिकी सामर्थ्य आणि अर्थकारण या दोन्हीचे नियंत्रण इथून होते. अर्थातच हे नियंत्रण येथील स्थानिक लोकांच्या हातात नाही.

ब्रूसेल्सला पोचल्यावर आम्ही थेट अॅटोमियम पहायला गेलो. १९५८ साली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे एक संमेलन इथे भरले होते. त्या निमित्ताने ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत आधी तात्पुरत्या उपयोगासाठी म्हणून बांधली होती. पण लोकांना ती इतकी आवडली की आता ते ब्रूसेल्सचे एक कायम स्वरूपाचे गौरवस्थान आणि पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे. लोह या धातूच्या स्फटिकाची ही १६५ अब्जपटीने मोठी प्रतिकृती आहे. वैज्ञानिक परिभाषेत हा आकार बॉडी सेंटर्ड क्यूबिक या नांवाने ओळखला जातो. असे असंख्य स्फटिक एकाला एक जोडून लोखंडाच्या कोणत्याही वस्तूला तिचा आकार प्राप्त होतो.
 
मधोमध एक अणु व त्याच्या आठ बाजूला ठराविक अंतरावर आठ अणु अशी या स्फटिकाची रचना आहे. यातील प्रत्येक अणुसाठी १८ मीटर व्यासाचा पोलादाचा पोकळ गोल बनवला असून हे गोल तीन ते सवातीन मीटर व्यासाच्या नळ्यांनी एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक गोलाच्या आंत प्रदर्शनीय वस्तू ठेवलेल्या आहेत. संपूर्ण शिल्प १०२ मीटर उंच आहे. खालून सर्वात वरच्या गोलामध्ये जाण्यासाठी अत्यंत वेगवान लिफ्ट आहे. तसेच इतर गोलांमध्ये जाण्यासाठीसुद्धा लिफ्ट आहेतच. वरील गॅलरीमधून ब्रुसेल्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. तसेच बाजूला असलेले मिनियुरोपसुद्धा इथून छान दिसते. आयफेल टॉवर, वेस्टमिन्स्टर यासारख्या युरोपमधील  प्रसिद्ध इमारतींच्या छोट्या प्रतिकृती या जागी बांधलेल्या आहेत. जवळ जाऊन त्यांना प्रत्यक्ष पहाणे मात्र आमच्या दौ-यामध्ये सामील नव्हते. दोन दिवसापूर्वीच मदुरोडॅम पाहिले असल्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटले नाही.

त्यानंतर ब्रुसेल्समधील जगप्रसिद्ध मॅनेकिन पिस् पुतळा पहायला गेलो. तो ब्रुसेल्सच्या जुन्या पुराण्या भागात असल्यामुळे आम्ही आमची बस हमरस्त्यावर सोडून पायी चालत एका मोठ्या चौकात गेलो. तेथील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन एका गल्लीतून चालत चालत एका छोट्याशा चौकात आलो. पुण्यातील कुठल्या तरी पेठेमधील गल्लीबोळांच्या चौकाएवढ्या पिटुकल्या जागेत एका कोप-यात पुरुष दीड पुरुष इतक्या उंचीच्या कट्ट्यावर हा हातभर उंचीचा रेखीव दगडी पुतळा ठेवला आहे. बाजूच्याच भिंतीवर त्याची एक ब्रॉंझमधील प्रतिकृती लावून ठेवली आहे. याबद्दल अनेक दंतकथा प्रसृत केल्या गेल्या आहेत. तो पुतळा चोरून नेण्याचे प्रयत्न अनेक वेळा झाले पण केंव्हाही ते यशस्वी झाले नाहीत म्हणे. या पुतळ्यातल्या मुलाला प्रत्येक सणासुदीला नवनवे कपडे करून घातले जातात. ते कार्य करण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते. आतापर्यंत आठशेच्या वर पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे त्या पुतळ्यावर चढवून झाली आहेत. एरवी मात्र तो नग्नावस्थेतच सारखा ‘शू’ करत उभा असतो. टक लावून जास्त वेळ पहात राहण्यासारखे फारसे कांहीच तिथे नसल्यामुळे त्या पुतळ्यावर एक नजर टाकली, तिथले फोटोबिटो काढले आणि बाजूलाच असलेल्या चॉकलेट विकणा-या मोठ्या दुकानात गेलो. आधी स्विट्झरलंडमध्ये चॉकलेटे घेतलेलीच होती. उरली सुरली हौस इथे पुरवून घेतली.

 . . . . . . . (क्रमशः)