यॉर्क नगरी

york5

सैनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन नद्यांच्या बेचक्यातली ही नैसर्गिक रीत्या सुरक्षित अशी जागा बरोबर हेरून रोमन लोकांनी या ठिकाणी आपले मुख्य ठाणे वसवले होते. अधिक सुरक्षेसाठी त्यांनी गांवाभोवती भक्कम तटबंदी बांधली आणि खंदक खणले. नंतरच्या काळातील यॉर्विक आणि नॉर्मन राज्यकर्त्यांनी ती तटबंदी आणखीनच मजबूत केली. शेकडो वर्षांनंतरही या तटबंदीचा बराच भाग आजही चांगल्या अवस्थेत टिकून राहिलेला दिसतो.

व्हायकिंग्जच्या यॉर्विक या नांवावरूनच यॉर्क हे त्या शहराचे नांव पडले. नॉर्मन राजवटीमध्ये ते उत्तर इंग्लंडचे प्रमुख शहर झाले. त्या भागातल्या राज्यकारभाराची तसेच व्यापारउद्योगाची सूत्रे तिथून हलवली जात असत. यॉर्कचे हे वैभव कित्येक शतके टिकले. यॉर्कशायरचा भाग इंग्लंडच्या राज्यात सामील झाल्यानंतरही यॉर्कचे महत्व टिकूनच होते. त्या काळात तिथे अनेक उत्तमोत्तम सुंदर इमारती बांधल्या गेल्या त्या आजही पहायला मिळतात.

आधुनिक काळात या तटबंदीच्या बाहेर आणि दोन्ही नद्यांच्या पलीकडल्या भागातसुद्धा सगळ्या बाजूने वस्ती वाढत गेली. यॉर्कचे रेल्वे स्टेशन आणि नॅशनल रेल्वे म्यूझियम या नव्या भागातच प्रस्थापित झाले आहे. या भागात आधुनिक रस्त्यांचे जाळे बांधले आहे. त्यावरील मोटारगाड्यांची रहदारी पाहून ते इंग्लंडमधील इतर कोणत्याही गांवासारखेच दिसते. पण तटबंदीच्या आंत बंदिस्त असलेला शहराचा बराचसा मूळ भाग अजून पूर्वीच्याच अवस्थेत राखून ठेवला आहे. तिथे अरुंद असे दगडी रस्ते आहेत. त्यावरून फक्त पायीच चालता येते. आजूबाजूला त-हेत-हेची दुकाने आहेत. गल्लीबोळांच्या चौकाचौकात तिथून फुटणारा प्रत्येक मार्ग कोठे जातो याची दिशा दाखवणारे पुरातन वाटावेत असे सुबक फलक लावलेले आहेत. ते पाहून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाता येते. हा भाग स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही तिथे पायीच जाणे पसंत केले. तशा सिटी बस दिसल्या, पण त्यांचे मार्ग आणि नेमके कुठे जायचे ते समजून घेणे कठीण होते. त्यापेक्षा पायीपायीच इकडचे तिकडचे निरीक्षण करीत फिरणे जास्त आनंददायी होते. ऊन पडल्यानंतर वातावरणातला गारवा कमी होऊन ते उत्साहवर्धक झाले होते.

सकाळी रेल्वे म्यूजियम पाहून झाल्यानंतर आम्ही औस नदीवरील पूल पार करून आधी यॉर्क मिन्स्टरला गेलो. तिथले भव्य वास्तुशिल्प पाहून जुन्या गांवात शिरलो आणि गल्लीबोळातून फिरत फिरत जुन्या काळातल्या गांवाच्या दुस-या बाजूला असलेल्या क्लिफोर्ड टॉवरला पोचलो. या ठिकाणी वस्तीच्या मधोमध एक उंचच उंच बुरुज बांधला आहे. विल्यम द काँकरर या इंग्लंडच्या बलाढ्य राजाने आपल्या उत्तर दिग्विजयाचे प्रतीक म्हणून हा बुरुज बांधला. या बुरुजाचा उपयोग दूरवरच्या भागाचे निरीक्षण करून शत्रूसैन्याच्या हालचाली न्याहाळण्यासाठी होत होता. तसेच अत्यंत महत्वाच्या व्यक्तींना या बुरुजावर सुरक्षितपणे ठेवलेही जात असावे. त्यात कांही राजबंदीही असत. तत्कालिन राहण्याच्या खोल्या अजून पहायला मिळतात. या बुरुजावरून यॉर्क शहर आणि आसमंताचे विहंगम दृष्य दिसते.

क्लिफोर्ड बुरुजाच्या पायथ्यापाशी कॅसल म्यूजियम आहे. अनेक जुन्या काळातल्या वस्तू तिथे ठेवल्या आहेत. त्यातील जुन्या काळातील वस्त्रे प्रावरणे विशेष लक्षवेधी आहेत. एका दालनात राणी व्हिक्टोरियाच्या काळातील एक लहानशी गल्ली उभी केली आहे. तत्कालीन घरे, दुकाने, त्यावरील पाट्या, त्यातली कपाटे आणि त्यात मांडून ठेवलेला माल हे सगळे आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. रस्त्यावरून जाणारी घोड्यांची बग्गी आणि हातगाडी वगैरे तपशील देखील उभा केला आहे. अशा प्रकारची दृष्ये मी याआधी लीड्स आणि लंडनला पाहिलेली असल्यामुळे ती फारशी नाविन्यपूर्ण वाटली नाहीत.

कॅसल म्यूझियम बंद होण्याची वेळ होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. पुन्हा हवेत बोचरा गारठा आला होता. आणखी फिरण्याची हौसही शिल्लक नव्हती आणि अंगात त्राणही नव्हते. रेल्वे स्टेशनवरील उबदार वातावरणात येऊन थोडे खाऊन पिऊन घेतले. परतीच्या गाडीचे आगाऊ तिकीट काढून ठेवलेले असल्यामुळे त्याआधी लीड्सच्या दिशेने रिकाम्या गाड्या गेल्या तरी त्यातून जाणे परवडण्यासारखे नव्हते. तिथल्या दुकांनाच्या तावदानांतून विंडो शॉपिंग करत व येणा-या जाणा-या प्रवाशांचे निरीक्षण करीत आपल्या ठरलेल्या गाडीची वाट पहात राहिलो. एक प्रेक्षणीय स्थान पाहिल्याचे समाधान मनात होतेच. त्यामुळे आता सोसावा लागणारा गारठा सुसह्य वाटत होता.

यॉर्क मिन्स्टर

york4

यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला रेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा त्या भागात जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व जर्मनीमधील कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.

मिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्यातील शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदैव गर्दी असते.

रोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट स्वतः इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.

सध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केले असेल! आडव्या क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमारतीएवढा उंच आहे. अशा अवाढव्य आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.

ही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या गेल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.

या इमारतीत जागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किंवा त्याहूनही मोठ्या आकाराचे भव्य पुतळे उभे करून ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृतीही आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक्या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते? त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली?

यॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वातावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.

यॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा सखोल अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.

यॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)

york3

नॅशनल रेल्वे म्यूझियमच्या मुख्य दालनात जॉर्ज स्टीफन्सन याचा भव्य पुतळा ठळकपणे दिसतो. त्याला रेल्वेचा जनक मानले जाते आणि ते ब-याच अंशी योग्य आहे. पण त्याने रेल्वे इंजिनाचा शोध लावला अशी जी समजूत आहे ती तितकीशी बरोबर नाही. ते सुद्धा जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असे म्हणण्याइतकेच अर्धसत्य आहे. वाफेच्या शक्तीचा उपयोग करण्याचे प्रयत्न आधीपासून सुरू झालेले होते आणि या कामासाठी न्यूकॉमेन या इंजिनियरने तयार केलेल्या यंत्राची दुरुस्ती करून त्यात सुधारणा करण्यासाठी जेम्स वॉटला पाचारण करण्यात आले. त्याने त्या यंत्रात आमूलाग्र बदल करून त्याच्या कार्याची व्याप्ती वाढवली आणि त्याच्या द्वारे एक चाक फिरवण्याची व्यवस्था केली. चाक फिरवणारे पहिले इंजिन तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या गिरण्यांमध्ये करता आला आणि यंत्रयुगाच्या प्रगतीला अभूतपूर्व वेग आला. यात जेम्स वॉटची हुशारी, कौशल्य, चिकाटी वगैरेचा सिंहाचा वाटा आहेच. त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. पण त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्याच्या आधी होऊन गेलेल्या कामाचे श्रेयसुद्धा त्याच्याच पदरात पडले.

जेम्स वॉटचे वाफेचे इंजिन व बॉयलर आकाराने मोठे असल्यामुळे कारखान्यासाठी उपयुक्त होते. वाहनात वापरता येण्याजोगी त्याची लहान आवृत्ती त्याने नंतर बनवली सुद्धा. त्याच्याखेरीज इतर अनेक लोक या खटपटीला लागले होते. त्यातील कांहींना तांत्रिक अडचणी सोडवता आल्या नाहीत तर कांहींचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळे वाजले. अशा प्रकारची कोणतीही यंत्रसामुग्री सर्व प्रथम सुरळीतपणे चालवणे अत्यंत कठीण असते. त्यात पदोपदी अनपेक्षित विघ्ने निर्माण होत असतात. त्यांचे ताबडतोब निराकरण करावे लागते. त्यामुळे ज्या लोकांना त्रास सहन करावा लागतो त्यांचे मनोधैर्य सांभाळावे लागते. कसलाच पूर्वानुभव नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि जपून करावी लागते. जॉर्ज स्टीफन्सन या शर्यतीत यशस्वी ठरला. त्याने तयार केलेले इंजिन जोडलेली रेल्वे समाधानकारक रीतीने चालली आणि फायद्याची ठरली. त्यासाठी जॉर्जने केलेल्या परिश्रमाचे मोल कमी नाही. आपले सारे आयुष्य जॉर्जने या कामात घालवले आणि रेल्वे व्यवस्था नांवारूपाला आणली. त्यासाठी त्याने इंजिनात अनेक तांत्रिक सुधारणा केल्या. अनुभवामधून समजलेल्या अडचणी दूर केल्या. त्याने व्यावसायिक रेल्वेगाडी रुळावर आणली असे नक्की म्हणता येईल.

लिव्हरपूल हे बंदर आणि मँचेस्टर हे कापडगिरण्यांचे केंद्र या दोन शहरांना जोडणारी पहिली व्यावसायिक रेल्वेगाडी सुरू झाल्यानंतर लवकरच तिचे जाळे देशभर पसरत सर्व बाजूंनी लंडन शहराच्या वेशीपर्यंत येऊन पोचले. पण तोपर्यंत ते शहर जगातले सर्वात मोठे शहर होऊन बसले होते. तेथील जमीनीच्या किंमती आभाळाला जाऊन भिडल्या होत्या. तिथे अनेक सुंदर इमारती बांधून दिमाखाने उभ्या होत्या. त्या पाडणे कठीण होते. त्यामुळे लंडन शहराच्या केंद्रीय भागात रेल्वेसाठी लागणारी मुबलक जमीन उपलब्ध होणे दुरापास्त होते. त्याच वेळी तिकडे जाणा-या लोकांची रहदारी प्रचंड वाढली होती आणि त्यासाठी घोड्यांच्या गाड्या अपु-या पडत होत्या. या दोन्हींचा विचार करून जमीनीखाली भुयारातून रेल्वेमार्ग काढण्याची अफलातून कल्पना पुढे आली आणि त्या काळातल्या तंत्रज्ञांनी ती यशस्वी करून दाखवली.

बहुतेक सर्व मोठ्या शहरातल्या रस्त्यांवर रूळ टाकून त्यावर ट्राम धांवू लागल्या होत्या . त्यांना मात्र घोडे जुंपून ओढणे सोयीचे आणि किफायतशीर होते. विजेवर चालणारी इंजिने तयार झाल्यानंतर आणि विद्युत उत्पादनाची आणि वितरणाची व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर ट्रॅमसाठी घोड्यांचा उपयोग थांबला. रेलवेच्या मुख्य मार्गावर देखील विद्युतीकरण झाल्यानंतर दूर जाणा-या आगगाड्या विजेवर धांवू लागल्या. कांही मार्गांवर डिझेल इंजिनांचा उपयोग होऊ लागला. आपल्याकडे अजून होत आहे. आता जगात सगळीकडेच वाफेच्या इंजिनांना मात्र रजा देण्यात आली आहे. तांत्रिक दृष्ट्या डिझेल इंजिनसुद्धा विजेवरच चालते. आधी डिझेल इंजिन वापरून जनरेटरमध्ये वीज निर्माण करतात आणि त्या विजेवर रेल्वेचे इंजिन चालते. मोटारगाडीप्रमाणे पेट्रोल किंवा डिझेलवर चालणा-या इंजिनाचा उपयोग थेट रेल्वेची चाके फिरवण्यासाठी करीत नाहीत.

ही सगळी माहिती नॅशनल रेल्वे म्यूझियममध्ये मिळतेच. पण हे फक्त पुराणवस्तूसंग्रहालय नाही. इंग्लंडमधील इतर वस्तूसंग्रहालयांकडे पाहता ते तितकेसे जुनेपुराणेही नाही. सन १९७५ मध्ये ते सुरू झाल्यापासून त्यात अद्ययावत गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवळजवळ विमानाच्या वेगाने धांवणारे जपानमधील बुलेट ट्रेनचे इंजिनसुद्धा इथे आहे. ते तसे वेगाने चालवून मात्र दाखवत नाहीत. इथे फक्त रेल्वेची इंजिने आणि डबेच नाहीत. त्याची सिग्नलिंग व्यवस्था, त्यावरील नियंत्रण, रेल्वेमधील जेवण, टपालाची ने आण, कामगारांचे व अधिका-यांचे पोशाख, त्यांनी लावण्याचे बिल्ले, प्रवासाची तिकीटे आणि त्यांचे दरपत्रक, लाल व हिरवे बावटे, अपघात टाळण्यासाठी करण्यात येणारी व्यवस्था, अपघात झालाच तर त्यानंतर काय करायचे त्याचा तपशील, इत्यादी रेल्वेसंबंधित असंख्य गोष्टी या ठिकाणी पहायला मिळतात.

आपल्याकडे अगदी लहान मुलांना कोणी वस्तुसंग्रहालयात नेत नाहीत. शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मुलांना नेले तरी त्यांच्यावर कडक शिस्तीचे बंधन असते. इकडे जायचे नाही, त्याला हात लावायचा नाही वगैरे नियम कधीकधी मुलांना जाचक वाटतात. बहुतेक जागी फोटोग्राफी निषिद्ध असते. परदेशात वेगळेच वातावरण आहे. आपण वाटेल ते पाहू शकतो, वाटेल तितके फिरू शकतो, वाटेल त्याची छायाचित्रे काढू शकतो. यॉर्कच्या नॅशनल म्यूझियममध्ये तर लहान मुलांना बाबागाडीतून नेऊन सगळीकडे फिरवता येते. त्यांना वाटेल तेवढे बागडण्यासाठी भरपूर प्रशस्त जागा आहे. त्यांना जागोजागी खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतात. ठिकठिकाणी बसून आराम करता येतो. कोठल्याही इंजिनात किंवा डब्यात चढण्या उतरण्यासाठी लहान मुलांना सोयिस्कर असे पाय-यांचे जिने लावून ठेवले आहेत. हाताळल्यामुळे खराब होण्यासारख्या नाजुक गोष्टी तेवढ्या जाड कांचांच्या मागे बंदिस्त आहेत. उघड्या ठेवलेल्या गोष्टींना हात लावायला कसला प्रतिबंध नाही. टच स्क्रीन किंवा कीबोर्ड द्वारा पाहिजे ती माहिती मिळवून देणारे संगणक जागोजागी आहेत. तिकडल्या पर्यटकांचीसुद्धा विध्वंसक वृत्ती नसते. मुद्दाम कोणी तोडफोड करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे म्यूझियममध्ये लहान मुलांना घेऊन येणारे लोक खूप मोठ्या संख्येने दिसतात.

बीबीसी या वृत्तसंस्थेची सीबीबी नांवाची एक स्वतंत्र वाहिनी आहे. त्यावर खास लहान मुलांसाठी तयार केलेले मनोरंजक आणि उद्बोधक कार्यक्रम प्रसारित होतात. यावर दाखवल्या जाणा-या मालिकांमध्ये थॉमस नांवाचे रेल्वेचे इंजिन हे एक मजेदार पात्र आहे. रेल्वेच्या वस्तुसंग्रहालयात थॉमसची उपस्थिती तर हवीच. टीव्हीवर दिसणा-या थॉमसच्याच रूपाचे एक खेळातले मोठे इंजिन बनवून ठेवले आहे. त्यात एका वेळी दोन मुले बसून डॅशबोर्डवरील बटने दाबू शकतात, वेगवेगळ्या लीव्हर खेचू शकतात. त्यावर ते इंजिन आवाज काढते, धडधडते आणि त्याचे दिवे लुकलुकतात. थॉमसमध्ये बसण्यासाठी सर्व लहान मुले खूप उत्सुक असतात. त्यासाठी वेगळे तिकीट लावून म्यूझियमचीही कमाई होते. वृद्ध वा अपंग लोक बॅटरीवर चालणा-या व्हीलचेअरवर बसून सगळीकडे हिंडू शकतात आणि चढउतर न करता जेवढे पाहता येईल ते पाहू शकतात.

असे हे म्यूझियम आहे. त्यात बच्चेभी देखे, बच्चेका बापभी देखे, बच्चेका दादाभी देखे. सगळ्यांसाठी कांही ना कांही आहे. वाटले तर माहिती मिळवावी, वाटले तर तास दोन तास मजेत घालवावे. यामुळेच लक्षावधी लोक या ठिकाणाला भेट द्यायला येतात. लंडनच्या बाहेर इंग्लंडमध्ये सर्वात जास्त पर्यटक यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम पहातात. त्याला त्यासाठी अनेक बक्षिसेही मिळाली आहेत.

यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)

york2

 

यॉर्कच्या रेल्वे स्टेशनाला लागूनच खास रेल्वेचे संग्रहालय आहे. पण तिथे जाण्यासाठी स्टेशनाला बाहेरून वळसा घालून जावे लागते. हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे रेल्वेचे म्यूजियम आहे असा तेथील लोकांचा दावा आहे आणि तसे असेलही. बोरीबंदरएवढ्या विस्तीर्ण आकाराच्या शेडमध्ये सात आठ प्लॅटफॉर्मवर दीडदोनशे तरी वेगवेगळी इंजिने आणि डबे सजवून मांडून उभे करून ठेवलेले आहेत. ते पाहता पाहता आपण थकून जातो पण त्यांची रांग कांही संपत नाही. त्याशिवाय लांबच लांब हॉल्स आणि पॅसेजेसमध्ये हजारोंच्या संख्येने चित्रे, छायाचित्रे, रेखाचित्रे, स्थिर व चालणा-या प्रतिकृती कलात्मक रीतीने मांडल्या आहेत. वेगवेगळ्या कॉंम्प्यूटर स्क्रीन्सवर आणि साध्या पडद्यावर सारखी दाखवली जात असलेली चलचित्रे वेगळीच! लीड्स येथे असलेल्या आर्मरीज या शस्त्रागाराप्रमाणेच यॉर्कचे हे नॅशनल रेल्वे म्यूझियम आपल्याला एका आगळ्याच अनुभवविश्वात घेऊन जाते.

‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आधी रेल्वेचे इंजिन आले की आधी त्याचे डबे हा प्रश्न कधीपासून माझ्या मनात होता. यॉर्कच्या म्यूझियममध्ये सारा इतिहासच चित्ररूपाने डोळ्यासमोर उभा ठाकल्याने या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडले. रेल्वेच्याच काय पण कोठल्याही प्रकारच्या स्वयंचलित इंजिनाचा शोध लागण्याच्या कित्येक वर्षे पूर्वीच रुळावरून गडगडत चालणा-या वॅगन अस्तित्वात आल्या होत्या. यॉर्कशायरमधील कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणींमधून खनिजांचा ढिगारा जमीनीवर उचलून आणण्यासाठी एक उतार तयार करून त्यावर लोखंडाचे रूळ बसवले होते. त्यावरून गडगडणा-या एका ट्रॉलीत खोदलेली खनिजे भरून मजूरांच्या सहाय्याने किंवा घोडे जुंपून ती वर ओढून आणीत असत. जेम्स वॉटने पहिले वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन तयार करून दाखवल्यानंतर तशा प्रकारच्या इंजिनाचा पहिला व्यावसायिक उपयोग लीड्स येथील खाणीत करण्यात आला. घोड्यांऐवजी एक इंजिन जुंपून त्यांच्याद्वारे जमीनीतून खनिज पदार्थ बाहेर आणणे सुरू झाले. दोन, चार किंवा आठ घोडे जेवढे वजन ओढू शकतील तेवढे काम हे एक इंजिन करू शकते म्हणून इंजिनाची शक्ती अश्वशक्तीच्या परिमाणात मोजू लागले. त्या काळात ‘दर सेकंदाला अमूक इतके फूटपाउंड’ अशासारखी परिमाणे लोकांना समजणे शक्यच नव्हते. अजूनही तांत्रिक ज्ञान नसलेल्या किती लोकांना त्याचा अर्थ उमजतो यात शंकाच आहे. विजेचा शोध लागला नसल्यामुळे किलोवॉट तर अजून अस्तित्वात आलेले नव्हते. अश्वशक्तीचा उपयोग मात्र आजतागायत सर्वसामान्य लोक करतात.

त्यानंतर वर्षा दोन वर्षातच पॅसेंजरांना घेऊन जाण्यासाठी इंजिनाचा उपयोग करण्याची कल्पना पुढे आली. त्या काळात इंग्लंडमध्ये घोडागाडी हेच श्रीमंत लोकांचे वाहन होते. गरीब लोक पायीच चालत असत किंवा घोड्यावर स्वार होऊन जात असत. त्यांना रेल्वेचा पर्याय देऊन तिकडे आकर्षित करणे हे काम सोपे नव्हते. वाफेच्या इंजिनाचा आकार व त्याबरोबर त्याहून मोठा बॉयलर आणि कोळशाने भरलेली वॅगन नेण्याची जरूरी लक्षात घेता एक दोन माणसांना वाहून नेणारी यांत्रिक बग्गी तयार करण्यात कांहीच अर्थ नव्हता. त्यामुळे खूप लोक एकदम प्रवास करू शकतील असे डबे बनवून ते एका शक्तीशाली इंजिनाच्या सहाय्याने ओढणे हेच शहाणपणाचे होते. पण लोकांना असा प्रवास करण्याची संवय नव्हती. तसेच सुरुवातीला या प्रचंड आवाज करणा-या धूडाची त्यांना भीतीही वाटायची. रेल्वे चालवायची म्हंटल्यास त्यासाठी आधी रूळ टाकायला हवेत. त्यासाठी जमीन हवी आणि ते काम करण्यासाठी लागणारा खर्च भरून निघायला हवा. यामुळे कोठल्याही अजब अशा नव्या कल्पनेला होतो तसाच या कल्पनेला भरपूर विरोध झाला. ती मांडणा-या लोकांना मूर्खात काढण्यात आले. पण कांही दूरदर्शी लोकांना ती कल्पना पटली आणि नाविन्याचे आकर्षण तर त्यात होतेच. त्यामुळे त्यांनी ती उचलून धरली. निदान मालवाहतूक करणे तरी त्यामुळे जलद आणि स्वस्तात होईल याची त्यांना खात्री होती. मात्र रेल्वेगाडी प्रत्यक्षात आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना ती इतकी आवडली की हां हां म्हणता जगभर रेल्वेचे जाळे विणले गेले. सैनिक आणि शस्त्रास्त्रे यांची जलदगतीने वाहतूक करण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांना ती फारच सोयीची असल्यामुळे भारतासारख्या दूरच्या देशात देखील कांही वर्षांतच रेल्वे सुरू करण्यात आली.

अगदी प्राथमिक स्वरूपाच्या इंजिनाच्या व गाडीच्या उपयोगापासून आतापर्यंत त्याचा कसा विकास होत गेला याचे सविस्तर चित्ररूप दर्शन घडणारी एक चित्रमालिकाच यॉर्कच्या संग्रहालयात एका विभागात मांडली आहे. तिच्या बरोबर त्या प्रत्येक काळात घडलेल्या महत्वाच्या राजकीय घडामोडीसुद्धा दिल्या आहेत. युरोपातील युद्धे, इंग्लंडचे राजे किंवा राण्यांचे राज्याभिषेक, भारतातील स्वातंत्र्यसमर (इंग्रजांच्या मते शिपायांचे बंड), अमेरिकेतील प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द, विजेच्या दिव्यांचा किंवा टेलीफोनचा शोध वगैरे गोष्टी रेल्वेच्या प्रगतीच्या सोबतीने पहावयास मिळतात. दुस-या एका दृष्यात दोन तीन स्टेशने, त्यामधील रेल्वे ट्रॅक्स, बोगदे, पूल इत्यादीचे सुरेख देखावे मांडले आहेत. त्यात खेळण्यातल्या आगगाड्या सतत ये जा करीत असतात. त्यांचे सुरू होणे, वेग घेणे, स्टेशन जवळ येताच वेग मंदावत बरोबर प्लॅटफॉर्मवर उभे राहणे, सिग्नल पडणे व उठणे, रुळांचे सांधे बदलणे असे सर्व बारकावे या मॉडेलमध्ये दाखवले आहेत. कांचेला विशिष्ट प्रकारची गोलाई देऊन पलीकडची हिरवळ आभाळाला टेकल्याचा त्रिमिती भास निर्माण केला आहे. लहान मुलांना तर ते दृष्य टक लावून पहात बसावेसे वाटतेच, पण मोठ्यांनाही ते पाहण्याचा मोह होतो.

वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन आणि विजेचे इंजिन यांचे सर्व भाग दाखवणा-या पूर्णाकृती प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. त्यांचे छेद घेऊन आंतली रचना दाखवली आहे. तसेच प्रत्येक भागाचे कार्य विशद करणारे तक्ते बाजूला दिले आहेत. थोडे लक्ष देऊन पाहिल्यास सामान्य माणसालाही ते इंजिन कसे काम करते ते समजून घेता येते. इंग्लंडमधीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशात इतिहासकाळात वापरली गेलेली इंजिने जमा करून आणि दुरुस्त करून या प्रदर्शनात ठेवली आहेत. प्रवाशांसाठी बनलेल्या डब्यांच्या अंतर्भागात कसकसा बदल होत गेला हे दाखवण्यासाठी अनेक ऐतिहासिक डबे गोळा करून ठेवले आहेत. सर्व सामान्य लोकांचा थर्ड क्लास आणि उच्चभ्रू लोकांसाठी आरामशीर पहिला वर्ग तर आहेतच, पण राजघराण्यातील लोकांसाठी निर्माण केलेले खास सुसज्ज डबेसुद्धा आहेत. कधी कधी तर फक्त एका वेळच्या प्रवासासाठी असा डबा तयार केला जायचा आणि तो प्रवास होऊन गेल्यानंतर तो डबा बाजूला ठेवला जात असे. अशा खास डब्यामधील जेवणाचे टेबल, त्यावरील प्लेट्स, काटे, चमचे, नोकरांचे पोशाख, खिडक्यांना लावलेले पडदे अशा सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे मांडून तो काळ निर्माण केला आहे. पर्यटकांना आंत जाऊन ते सारे पाहून घेण्याची अनुमती आहे तसेच त्यादृष्टीने रांगेने आंत जाऊन बाहेर पडण्याची व्यवस्था केलेली आहे.
. . . . .. .  .. . . . . . .  (क्रमशः)

यॉर्कला भेट

york1

न्यूयॉर्क या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध शहराचे नांव मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो होतो. सगळ्यांनीच ते ऐकलेले असते. या ‘नवीन यॉर्क’चे नांव मूळच्या ज्या गांवाच्या नांवावरून ठेवले गेले ते ‘जुने यॉर्क’ कोठे असेल याबद्दल मनात कुतूहल वाटत होते. क्रिकेटच्या बातम्यांमध्ये ‘यॉर्कशायर’ नांवाच्या कौंटीचा उल्लेख यायचा. पण ‘यॉर्क’ या नांवाच्या गांवाची बातमी मात्र कधी वाचनात आली नव्हती. लीड्सला गेल्यावर आपण यॉर्कशायरमध्ये आलो असल्याचे समजलो आणि यॉर्क बद्दलचे कुतूहल अधिकच वाढले. आता प्रत्यक्ष तिथे जाऊन पहाणे आवश्यक होते तसेच ते सहज शक्य होते.

लंडनच्या उत्तरेला सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर यॉर्क हे शहर आहे. यॉर्कशायर हा परगणा बराच लांब रुंद पसरला आहे. औद्योगीकरण आणि व्यापार यांमुळे गेल्या तीन चार शतकांत इतर शहरांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ती शहरे आता अधिक प्रसिद्ध झाली आहेत आणि पुरातनकालीन यॉर्क हे शहर आता मुख्यत्वे पर्यटनस्थळ बनले आहे. या शहराचे ऐतिहासिक स्वरूप जाणीवपूर्वक राखून ठेवले गेले आहे, तसेच पर्यटकांसाठी खास सुविधा व आकर्षणे तिथे निर्माण केली आहेत.

इसवी सनाच्या पहिल्याच शतकात रोमन साम्राज्याने इंग्लंडवर कब्जा मिळवला होता त्या वेळेस यॉर्क येथे आपले ठाणे प्रस्थापित केले होते. त्यानंतर रोमन सैनिक व सेनापती येथे येत राहिले. चौथ्या शतकात आलेल्या कॉँन्स्टन्टाईन याने यॉर्क इथूनच आपल्या रोमन साम्राज्याच्या सम्राटपदाची घोषणा केली आणि नंतर रोमला जाऊन सत्तेची सूत्रे हातात घेतली असे सांगतात. त्याने पुढे रोमन साम्राज्याचा अधिक विस्तार केला आणि त्याच्या स्वतःच्या नावाने कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर वसवले.

सातव्या का आठव्या शतकात नॉर्वे स्वीडनकडून व्हायकिंग लोक समुद्रातून या भागात आले. इथले हवामान त्यांना आवडले आणि मानवले यामुळे ते इथेच स्थायिक झाले. यॉर्क इथे त्यांनी भक्कम तटबंदी बांधून एक गढी बनवली. आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी तेथे आपला अंमल सुरू केला. कित्येक शतके त्यांची राजवट तिथे होती आणि यॉर्क ही त्या प्रदेशाची राजधानी होती. हळूहळू वांशिक संकर होऊन त्यांचे वेगळे ‘व्हायकिंग’पण राहिले नाही. तसेच इंग्लंडच्या बलाढ्य राजाने त्यांचे राज्य आपल्या राज्यात विलीन करून घेतल्यानंतर यॉर्कशायर हा एक परगणा उरला.

लीड्सहून यॉर्क अगदी जवळ आहे, तसेच दर दहा पंधरा मिनिटांनी तिथे जाणा-या रेल्वेगाड्या आहेत. इंग्लंडमध्ये रेल्वेचे खाजगीकरण झाले असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या तिथल्या रुळावरून धांवत असतात. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा लीड्सहून यॉर्कला जाता येते. तिथे तिकीटांचे दर ठरलेले नसतात. कामाचा दिवस किंवा सुटीचा दिवस, सकाळची, दुपारची किंवा रात्रीची वेळ याप्रमाणे ते बदलत असतात. आयत्या वेळी तिकीट काढले आणि ‘रश अवर’ असेल तर ते सर्वात महाग पडते. त्यामुळे मला तरी कधीच गर्दीने भरलेल्या गाड्या दिसल्या नाहीत. दोन चार दिवस आधी तिकीट काढले तर त्यात अनेक प्रकारच्या ‘डील्स’ मिळतात. घरबसल्या इंटरनेटवरून बुकिंग करता येते आणि क्रेडिट कार्ड वापरून तिकीट देणा-या यंत्रामधून हवे तेंव्हा ते तिकीट छापून मिळते. आम्हीही सुटीचा दिवस पाहून यॉर्कला जाण्याचा प्रोग्रॅम आंखला आणि सोयिस्कर वेळेला जाण्यायेण्याची तिकीटे काढून ठेवली.

इंग्लंडमधल्या रेल्वेगाडीचा सामान्य दर्जाचा डबाच आपल्या राजधानी एक्सप्रेसच्या चेअरकारच्या तोडीचा असतो. त्याहून वेगळा वरच्या दर्जाचा डबा असला तरी मी कांही तो कधी पाहिला नाही. सर्वसामान्य गाड्यांना वेगवेगळ्या दर्जाचे डबे नसतातच. जवळचे अंतरासाठी धावणा-या गाड्याच मुळी दोन किंवा तीन डब्यांच्या असतात. त्यांना वेगळे इंजिन नसते. मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे एक लहानशी केबिन असते. प्रत्येकाच्या घरी माणशी एक कार असतांना रेल्वेने जाणारे लोक थोडेच असतात. लंडन ते एडिंबरो अशा लांब टप्प्याच्या गाड्या मात्र मोठ्या म्हणजे दहा बारा डब्यांच्या असतात. भारतात दिसतात तसल्या वीस पंचवीस डब्यांच्या गाड्यांची तिथे गरज नाही.

तिकीटात दाखवल्याप्रमाणे आम्हाला दिलेल्या डब्यात आणि स्थानांवर आम्ही जाऊन बसलो. पण आजूबाजूला दुसरे तिसरे कोणी आलेच नाही. गाडीत गर्दी अशी नव्हतीच. हवेत थंडी असल्यामुळे आम्ही जरी स्वतःला कपड्यांमध्ये गुरफटून घेतले असले तरी धुके निवळले असल्यामुळे बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. लीड्सपासून यॉर्कपर्यंतचा प्रवास अवघ्या अर्ध्या पाऊण तासात होतो. तेवढा वेळ इंग्लंडमधले रम्य ‘कंट्रीसाईड’, तिथली गालिच्यांसारखी पसरलेली यांत्रिक शेती, हिरवे गार डोंगर आणि त्यांच्या उतारावरले गवत, त्यात चरणारी मेंढरे, क्वचित दिसणारी गाय़ीगुरे वगैरे पाहिली आणि ईशा व इरा यांना दाखवली. यॉर्क स्टेशनात पोचलो तेंव्हा हवेत खूप गारठा होता. त्यामुळे स्टेशनाच्या इमारतीतच असलेल्या रेस्तरॉँमध्ये बसून न्याहरी केली आणि यॉर्क शहराचा फेरफटका करण्यासाठी बाहेर पडलो.

. . .. . . . . . . . . . . . .. . (क्रमशः)