राणीचे शहर लंडन – भाग ६

राणीच्या गांवाला आल्यानंतर राणीचा राजवाडा पहावा असे वाटणारच. इंग्लंडच्या राणीचे ऑफीशियल रेसिडन्स असलेल्या बकिंगहॅम पॅलेससमोर त्यामुळे नेहमीच प्रेक्षकांची झुंबड उडालेली असते. त्या राजवाड्याच्या सुबक गेटामधून आतली भव्य वास्तू आणि तिच्या अंवतीभंवतीचा नीटस बगीचा दिसतो, पण राणीच्या नखाचेसुद्धा दर्शन घडत नाही. ते कसे घडणार? एकाद्या चाळीतल्या त्यांच्या वयाच्या राधाबाई दिवसातून केंव्हा तरी मिरच्या कोथिंबिर आणण्यासाठी नाहीतर मुरलीधराच्या देवळात चाललेले कीर्तन ऐकण्यासाठी बाहेर पडतांना गेटवर दिसतील. तशी इंग्लंडची राणी थोडीच पावलोणी आणायला नाही तर पाद्रीबाबांचे प्रवचन ऐकायला राजवाड्याच्या बाहेर पडणार आहे? पूर्वीच्या काळात राणीसरकारांच्या पुढे त्यांच्या आगमनाची वर्दी देऊन रस्ता मोकळा करून देणारे भालदार चोपदार आणि मागे त्यांच्या लांबलचक झग्याचा सोगा उचलून धरणा-या दासी असत. आता बुलेटप्रूफ गाड्यांच्या काफिला तिच्या गाडीच्या आगेमागे असतो.

बकिंगहॅम पॅलेसांत तब्बल सात आठशे खोल्या आहेत. त्यातल्या अत्यंत सुरक्षित आणि निवांत भागात राजपरिवाराचे वास्तव्य असते. त्यांना हवे ते तत्क्षणी आणून देण्यासाठी सेवकांचा ताफा सज्ज असतो. राजवाड्याच्या इतर भागांत वेगवेगळी कार्यालये आणि दिवाणखाने आहेत, तसेच पाहुण्यांची आणि नोकर चाकरांची व्यवस्था होते. निरनिराळ्या प्रसंगानुसार तिथे होणा-या मेजवान्यांमध्ये दर वर्षी पन्नास हजाराहून अधिक लोक सहभागी होतात. त्यातल्या अगदी खास प्रसंगी बोलावल्या गेलेल्या मोजक्या लोकांनाच प्रत्यक्ष राणीला पहायला मिळत असेल.

बकिंगहॅम पॅलेसच्या एका गेटासमोर पुरातन वेषातले रखवालदार घोड्यावर स्वार होऊन बसलेले असतात. हे रॉयल गार्डस या ठिकाणी शोभेसाठी असले तरी ते खरोखरचे सैनिक असतात. नियमितपणे कवाईत करून त्यांनी उत्कृष्ट शरीरसंपदा कमावलेली आणि राखलेली असते. पण ते इतके निश्चल असतात की त्यांच्या डोळ्य़ाची पापणी देखील हलत नाही. अशा प्रकारची समाधी लावल्याने काय साध्य होत असेल? तिकडे मादाम तुसाद म्यूजियममध्ये सजीव माणसासारखे भासणारे मेणाचे पुतळे ठेवले आहेत आणि इथे तडफदार जीवंत सैनिक पुतळ्यासारखे स्तब्ध असतात. या साहेब लोकांचे आपल्याला तर कांही कळतच नाही! या गार्डांची पाळी ठरलेली असते. ठराविक वेळेस ते बदलले जातात. त्याचाही साग्रसंगीत समारंभ असतो. त्यात या सैनिकांची परेड पहायला मिळते. ती पाहण्यासाठी इथे खूप मोठी गर्दी जमते.

याशिवायही लंडनमध्ये पर्यटकांना पाहण्यासारख्या खूप जागा आहेत. टॉवर ब्रिज, वेस्टमिन्स्टर, बिग बेन, पिकॅडेली सर्कस, १० डाउनिंग स्ट्रीटवरचे पंतप्रधानांचे निवासस्थान, ट्रॅफल्गार स्क्वेअर, सेंट पॉल्स कॅथेट्रल, हाइड पार्क, व्हिक्टोरिया आणि आल्बर्ट म्यूजियम, मार्बल आर्च इत्यादी जागा जास्तच लोकप्रिय आहेत. लंडन आय नांवाच्या प्रचंड चक्रात बसून लंडन शहराचे विहंगम दृष्य पाहता येते. चाळीस मजली गगनचुंबी इमारतींपेक्षासुद्धा उंचवर झोका घेणारे हे चक्र हळू हळू फिरत अर्ध्या तासात एक आवर्तन पूर्ण करते. सायकलच्या चाकाच्या आकाराचे हे चक्र बनवण्यासाठी सतराशे टन एवढे लोखंड वापरले गेले आहे. त्याला बत्तीस कॅपसूल्स जोडली आहेत आणि प्रत्येक कॅपसूलमध्ये पंचवीस प्रवासी बसू शकतात. अशा प्रकारे एका वेळेस चारशे पर्यटकांना घेऊन हे चक्र फिरत असते. चक्र हळूहळू फिरत असल्यामुळे ते चालू असतांना प्रवाशांना कॅपसूलमध्ये उठून हिंडतफिरत हवे ते दृष्य पाहता येते आणि त्याचे फोटो काढता येतात.

टॉवर ऑफ लंडनपासून जवळच थेम्स नदीवर टॉवर ब्रिज आहे. त्याचा मधला भाग पाहिजे तेंव्हा फिरवून तिरकस उभा करता यावा आणि नदीतून जहाजांना प्रवास करता यावा अशा रीतीने याची रचना केली आहे. यासाठी दोन उंच टॉवर बांधलेले आहेत. या पुलावरून प्रचंड वाहतूक होत असल्यामुळे बहुतेक वेळा ती सुरू असते. पण आवश्यकता पडल्यास त्याचा मधला भाग फिरवून जलवाहतूकीचा मार्ग मोकळा करता येतो. ते करण्याची यंत्रसामुग्री शाबूत ठेवलेली आहे.

ट्रॅफल्गार स्क्वेअर हा एक छानसा चौक आहे. अनेक कारंजे आणि पुतळे यांनी सजवलेल्या या चौकात दीडशे फूट उंच असा एक खांब असून त्याच्या माथ्यावर अठरा फूट उंच असा नौसेनानी नेलसन याचा पुतळा आहे. ट्रॅफल्गारच्या युद्धात इंग्लंडने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ उभा केलेला आहे. या चौकात शेकडो कबूतरे पहायला मिळतात हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

राणीचे शहर लंडन – भाग ५

राजाबाई टॉवर, आयफेल टॉवर वगैरे नांवावरून टॉवर म्हणजे एक उंचच उंच मनोरा असणार असे वाटते. हल्ली बांधलेल्या कांही गगनचुंबी इमारती ‘मित्तल टॉवर’, रहेजा टॉवर’ यासारख्या नांवांने ओळखल्या जातात. पण टॉवर ऑफ लंडनच्या गेटपाशी आल्यानंतर देखील जवळपास कुठेच कोणताही मीनार दिसत नाही. मुंबईच्या फोर्ट भागात आता कुठे किल्ला दिसतो? पण दोनतीनशे वर्षांपूर्वी कधीतरी ब्रिटिशांनी त्या भागात किल्ला बांधला होता असा इतिहास आहे. टॉवर ऑफ लंडनमध्ये आपल्या अपेक्षेतला टॉवर नसला तरी त्या जागी एक अतीशय जुना किल्ला आहे आणि त्याचे बुरुज, तटबंदी वगैरे गोष्टी आजसुध्दा तिथे दिसतात. या किल्ल्यात असलेल्या सगळ्याच वीस पंचवीस इमारती ‘अमका तमका टॉवर’ या नांवाने ओळखल्या जातात. आजच्या काळात त्या फारशा उंच वाटणार नाहीत, पण पूर्वीच्या काळातल्या सामान्य बैठ्या इमारतींच्या मानाने त्या उंचच असणार. इथून जवळच ‘टॉवर हिल’ या नावाचे मेट्रोचे रेल्वे स्टेशन आहे ते तर चक्क जमीनीच्या खाली आहे आणि आसपास कोठे लहानशी टेकडीसुद्धा नाही. हा त्यातला आणखी एक विनोद!

या जुन्यापुराण्या किल्ल्याच्या आंत मध्यभागी व्हाईट टॉवर नांवाची चार मजली भव्य इमारत आहे. अकराव्या शतकातल्या विलियम दि काँकरर या राजाने ती बांधली. आज नऊशे वर्षानंतरदेखील ती चांगली सुस्थितीत ठेवलेली आहे आणि रोजच्या वापरात आहे. इंग्लंडच्या राजांच्या कित्येक पिढ्या या महालात राहिल्या. इतर महालात देखील कोणत्या शतकात कोण कोण राहून गेले, तिथे अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या. कोणा राजपुत्राला कोठे बंदीवासात ठेवले होते तर कोणा राणीचा कोठे शिरच्छेद करण्यात आला, कोठे खजिना ठेवलेला असे तर कोठे शस्त्रागार होते वगैरे. यातील कांही टॉवर्सचा उपयोग टेहेळणी करण्यासाठी केला जात असे तर कांहींचा संरक्षणासाठी. त्या किल्ल्यात फिरतांना तिथले मार्गदर्शक याबद्दल अनेक सुरस कथा सांगतात, पण मुळात इंग्लंडचा इतिहासच ज्याला माहीत नसेल आणि त्यात कांही स्वारस्य नसेल तर त्याला त्यातले किती समजणार आणि त्यातले किती लक्षात राहणार? हे वाटाडेदेखील इतिहासकाळातला पोशाख घालून येतात. ते पाहतांनाच गंमत वाटते.

टॉवर ऑफ लंडनमधल्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये त-हेत-हेची संग्रहालये आहेत. कुठे रस्ता, इमारती, दुकाने वगैरेमधून बाराव्या तेराव्या शतकातले संपूर्ण वातावरण तयार केले आहे, कुठे पुरातन काळातले पोशाख, तलवारी, बंदुका, चित्रे, हस्तलिखिते वगैरे वगैरे इतर पुराण वस्तुसंग्रहालयात असतात तसे मांडून ठेवलेले आहेत. यातील सर्वाधिक महत्वाचे संग्रहालय तेथल्या रत्नखचित मुकुटांचे आहे. ‘दि क्राउन ज्युवेल्स’ या नांवाने प्रसिद्ध असलेल्या या प्रदर्शनात इंग्लंडच्या सर्व आजी व माजी राजाराण्यांनी वेळोवेळी धारण केलेले मौल्यवान मुकुट अत्यंत कडेकोट बंदोबस्तात प्रदर्शनासाठी मांडून ठेवले आहेत. यातल्या एका मुकुटात जगप्रसिद्ध कोहिनूर हा हिरा बसवलेला आहे. रत्नांचा मुकुटमणी असलेल्या या हि-याखेरीज दोन हजार अन्य हिरे, माणके, पांचू, नीलमणी आदि नवरत्नांनी हा मुकुट सजवलेला आहे. शिवाय असे अनेक इतर मुकुट या ठिकाणी आहेत, पण कोहिनूर जडवलेल्या मुकुटाची सर अन्य कोणाला नाही. हे प्रदर्शन पहाण्यासाठी खूपच गर्दी असते आणि जेंव्हा पहावे तेंव्हा त्या इमारतीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. भारतातून आलेले पर्यटक तर हा मुकुट आवर्जून आणि निरखून पाहतात आणि तो पहात असतांना इंग्रजांच्या नांवाने खडे फोडतात.

राणीचे शहर लंडन – भाग ४

मादाम तुसाद यांचे संग्रहालय हे लंडन शहराचे एक प्रमुख आकर्षण आहे. ‘अनुपम’, ‘अद्वितीय’ यासारखी विशेषणेसुद्धा त्याचे वर्णन करायला अपुरी पडतात. दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मादाम तुसाद यांचे पूर्वीचे नांव मेरी ग्रोशोल्ज असे होते. मेणाचे मुखवटे आणि पुतळे तयार करण्याची कला त्यांनी डॉ.फिलिप कर्टियस यांच्याकडून शिकून घेतली. त्यांचे स्वतःचे कौशल्य आणि कल्पकता यांच्या जोरावर या कलेत त्या पारंगत झाल्या. अनेक तत्कालीन थोर व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे त्या दोघांनी मिळून बनवले आणि त्यांचे प्रदर्शन मांडले. त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत. मेरीच्या कौशल्याची कीर्ती फ्रान्सच्या राजवाड्यापर्यंत पोचली आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा तयार करण्याचे काम तिला मिळाले.

त्याच काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यात ज्यांचा शिरच्छेद झाला होता अशा व्यक्तींच्या चेहे-यांचे मुखवटे बनवण्याचे काम तिला देण्यात आले. त्यासाठी मुडद्यांचे ढीग उपसून त्यातून ओळखीचे चेहेरे शोधून काढण्याचे भयानक काम तिला करावे लागले. राज्यक्रांतीनंतर सुरू झालेल्या अराजकाच्या काळात या दिव्यातून जात असतांना तिलाच अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मेरीचाही गिलोटीनवर शिरच्छेद होणार होता. पण कोणा दयाळू माणसाच्या कृपेने ती कशीबशी तिथून निसटली. तुसाद नांवाच्या गृहस्थाबरोबर विवाह करून तिने संसार थाटला. त्यानंतरही तिच्या अंतरीची कलेची ओढ तिला नवनव्या कलाकृती बनवण्याला उद्युक्त करत होती आणि डॉ.कर्टिस यांच्या निधनानंतर त्यांचे सारे भांडार तिच्या ताब्यात आले होते.

फ्रान्समधील अस्थिर वातावरणापासून दूर ब्रिटनमध्ये जाऊन आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करायचे तिने ठरवले. त्यासाठी ती तिथे गांवोगांव हिंडत होती. एवढ्यात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध जुंपल्यामुळे तिचा परतीचा मार्ग बंद झाला. अखेरीस ती लंडनमध्येच स्थाईक झाली आणि तिथे तिने कायम स्वरूपाचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन इतके लोकप्रिय झाले की मादाम तुसादच्या निधनानंतरदेखील नवे कलाकार तिथे येत राहिले, मेणाच्या बाहुल्या बनवण्याचे तंत्र शिकून त्या प्रदर्शनात भर घालत राहिले. मादाम तुसाद हयात असतांनाच एकदा त्यांच्या कलाकृतीसकट त्यांची बोट बुडाली होती. नंतरच्या काळात एकदा त्यातले अनेक पुतळे आगीत जळून खाक झाले होते आणि दुस-या महायुद्धात झालेल्या बॉंबहल्यात या प्रदर्शनाची इमारत उध्वस्त झाली होती. अशा प्रकारच्या संकटातून हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा सावरले. नष्ट होऊन गेलेल्या पुतळ्यांच्या जागी त्यांच्या प्रतिकृती तयार करून उभ्या केल्या गेल्या आणि त्यांत नवी भर पडत राहिली.

या प्रदर्शनातले बहुतेक सर्व पुतळे मानवी आहेत आणि पूर्णाकृती आहेत. रस्त्यांमधल्य़ा चौकात उभे केले जाणारे पुतळे आकाराने जास्तच भव्य असतात तर घरात ठेवल्या जाणा-या प्रतिमा लहान असतात. या प्रदर्शनातले पुतळे मात्र अत्यंत प्रमाणबद्ध आणि बरोबर आकाराचे आहेत. त्यामुळे ती खरोखरची माणसेच वाटतात. दगड किंवा धातूंना आकार देण्यासाठी जितके परिश्रम करावे लागतात त्या मानाने मऊ मेणाला हवा तसा आकार देणे सोपे असेल, पण त्यावर हुबेहूब माणसाच्या त्वचेसारख्या रंगछटा चढवणे, चेहे-यावर भाव आणणे वगैरे गोष्टी करतांना सगळे कौशल्य कसाला लागत असेल. ते करणा-या कारागीरांना विशेष प्रसिद्धीसुद्धा मिळत नाही. या प्रदर्शनात ठेवले गेलेले पुतळे फक्त त्या माणसाचे दर्शन घडवीत नाहीत. त्याची वेषभूषा, केशभूषा, त्याच्या अंगावरले अलंकार इत्यादी प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह सादर केलेली असते. ते पुतळे असले तरी नुसतेच ‘अटेन्शन’च्या पोजमध्ये ‘स्टॅच्यू’ झालेले नसतात. रोजच्या जीवनातल्या सहजसुंदर असा वेगवेगळ्या मुद्रांमध्ये ते उभे केले आहेत.

प्रदर्शनात अनेक दालने आहेत. कोठे ऐतिहासिक व्यक्ती आहेत. आठव्या हेन्रीसारखे जुन्या काळातील राजे आहेत तर चर्चिल व हिटलरसारख्या मागल्या शतकातील प्रसिद्ध लोक आहेत. आजच्या राणीसाहेबा त्यांचे पतिदेव व मुलेबाळे, लेकीसुनांसह या जागी उपस्थित आहेत. कुठे जगप्रसिद्ध नटनट्या आहेत तर कुठे खेळातल्या छानशा पोजमध्ये खेळाडू उभे आहेत. मादाम तुसादच्या संग्रहालयात पुतळा असणे हाच आजकाल प्रसिद्धीचा मानदंड झाला आहे. या सर्व दालनांत फोटो काढायला पूर्ण मुभा आहे. आपल्याला हव्या त्या महान व्यक्तीसोबत आपण आपला स्वतःचा फोटो काढून घेऊ शकता. कांही लोक इंग्लंडच्या राणीच्या खांद्यावर किंवा कंबरेभोवती हात ठेऊन आपली छबी काढून घेत होते ते मात्र मला रुचले नाही. अभिरुची म्हणून कांही हवी की नको?

या प्रदर्शनात जशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत तसेच सर्वसामान्य लोकांचे पुतळेसुद्धा मोठ्या संख्येने या पुतळ्यांच्या गर्दीत दिसतात. ते पुतळे इतक्या खुबीने ठेवले असतात आणि सारखे इकडून तिकडे हलवले जात असतात की ते पुतळे आहेत की ती खरीच माणसे आहेत असा संभ्रम निर्माण होतो. एखाद्या बाकड्यावर कोणी म्हातारा पेपर वाचत बसला आहे, हांतात कॅमेरा धरून कोणी फोटो काढत उभा आहे अशा प्रकारचे हे पुतळे आहेत.

कांही खास दालनांमध्ये विविध प्रकारची दृष्ये उभी केली आहेत. त्यात चांगलीही आहेत आणि बीभत्स देखील आहेत. भयप्रद तसेच फक्त प्रौढासाठी राखीव विभाग आहेत. प्रसिद्ध घनघोर युद्धप्रसंग, भयानक दरोडेखोरांचा हल्ला, तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणा-या शारीरिक यमयातना वगैरेंची भीतीदायक चित्रे आपण अंधारातून पुढे जात असतांना अचानक दत्त म्हणून समोर उभी राहतात आणि आपली गाळण उडवतात. त्यासोबत कानठळ्या बसवणारे संगीताचे सूर असतातच. ते वातावरण अधिकच भयाण बनवतात.

मी हे म्यूजियम पहायला गेलो तेंव्हा अखेरीस एक टाईमट्रॅव्हलचा प्रयोग होता. वळणावळणाने जाणा-या एका गाडीच्या अगदी पिटुकल्या डब्यात प्रत्येकी दोन दोन प्रेक्षकांना बसवले. ती गाडी एका अंधा-या गुहेतून थेट व्हिक्टोरिया राणीच्या काळातल्या लंडनमध्ये घेऊन गेली. दहा पंधरा मिनिटे त्या काळातले रस्ते, दुकाने, माणसे, त्यांचे पेहराव, त्यांचे रोजमर्राचे जीवन यांचे दर्शन घडवून ती गाडी पुन्हा आजच्या युगात घेऊन आली. समोरच्या भिंतीवर या राईडमध्ये आमच्या नकळत काढलेले फोटो दाखवले जात होते. त्यातला आपल्याला हवा तो फोटो ताबडतोब छापून हांतात देण्याची सोय होती.

मादाम तुसादच्या म्यूजियमच्या शाखा इतर देशातही निघाल्या आहेत असे म्हणतात. त्या किती प्रगत आहेत ते माहीत नाही. पण हे दोनशे वर्षे जुने संग्रहालयसुद्धा सतत बदलत असते, त्यात भर पडत असते. अशा प्रकारे ते अगदी अद्ययावत ठेवले गेले आहे.

राणीचे शहर लंडन – भाग ३

हीथ्रो एअऱपोर्टहून मी ट्यूबने लंडनच्या मुख्य स्टेशनवर गेलो. बाहेरगांवी जाणा-या गाड्या तिथून सुटतात. माझ्या पुढच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि माझ्याकडचे सामान तिथल्या लॉकरमध्ये ठेऊन दिले. त्या जागेला तिथे लेफ्ट लगेज असे म्हणतात. त्या काळात टेररिस्टांची भीती नसल्यामुळे सामान ठेवण्याची अशी व्यवस्था होती. आता असेल की नाही ते सांगता येणार नाही. अत्यावश्यक असे सामान खांद्याला लोंबकळणा-या बॅगेत घेऊन मी पुन्हा ट्यूबने दुसरे एक स्टेशन गाठले. लंडन दर्शन घडवणारी बस तिथून घ्यायची होती.

लंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात जागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने हे दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या जागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो. मी नेमके हेच केले.

या बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. मला तरी नेहमी निवेदिकाच भेटल्या. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती त्या अगदी हंसत खेळत देत होत्या. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, “या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे.” ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि महत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. अशा प्रकारच्या बसमधून मी अजून मुंबई दर्शन घेतले नाही. त्यामुळे इथे कशा प्रकारचे निवेदन करतात याची मला कल्पना नाही. पण लंडनची निवेदिका इथे आली तर हुतात्मा चौक पाहून आपण धन्य झालो असे ती वाटायला लावेल ! ही कॉमेंटरी आजूबाजूला दृष्टीला पडत असलेल्या जागांबद्दलच असल्यामुळे आपण एका जागी बसमधून खाली उतरलो आणि थोड्या वेळाने मागून येणा-या बसमध्ये बसलो तर निवेदिका बदलली तरी कॉमेंटरीमधील दुवा तुटत नाही.

लंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या बिग बसने प्रवास करून पहावा असे वाटते.

राणीचे शहर लंडन – भाग २

माझ्या पहिल्याच परदेशाच्या वारीमध्ये लंडनला जाण्याचा योग जुळून आल्याने मला कांकणभर जास्तच आनंद झाला. जे लोक त्यापूर्वी लंडनला जाऊन आलेले होते त्यांना निघण्यापूर्वी जाऊन भेटलो. त्यांच्याकडून त्या शहराचा नकाशा, महत्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांची नांवे आणि भरपूर सूचना घेतल्या. त्या काळी इंटरनेट नसल्यामुळे अशा गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी बरीच शोधाशोध आणि मेहनत करावी लागत असे. अशी तयारी करून गेल्यानंतरसुद्धा प्रत्यक्षात हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर आता कुठून सुरुवात करावी आणि त्यासाठी नेमके काय करायला पाहिजे ते समजत नव्हते. त्या वेळेस माझा कोणी मार्गदर्शक माझ्यासोबत नव्हता. अखेर सरकारी मदतकेंद्राचीच मदत घ्यायचे ठरवले.

त्या काउंटरवर बसलेल्या उत्साही तरुणाने मला परम आश्चर्याचा धक्काच दिला. एक दोन मिनिटांत त्याने माझी गरज नेमकी जाणून घेतली, भराभर मला वेगवेगळे नकाशे काढून दिलेच, त्यांवर जागांच्या खुणा सुद्धा करून दिल्या एवढेच नव्हे तर रेल्वे आणि बसची तिकीटे देखील माझ्या हातात ठेवली आणि कसेकसे जायचे ते थोडक्यात समजाऊन पण सांगितले. या सगळ्या गोष्टी आणि पुरेपूर आत्मविश्वास बरोबर घेऊन मी विमानतळाच्या तळघरातल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो.

मुंबईहून निघण्यापूर्वी मी लंडनच्या भूयारी रेल्वेची कीर्ती ऐकली होती. आता तिथल्या स्थानिक प्रवासाची सुरुवात त्या गाडीनेच केली होती. पण विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडली तेंव्हा ती जमीनीवरच होती. आसमंतातली हिरवळ सकाळच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन ताजी तवानी दिसत होती. अधून मधून घरे, कारखाने, गोदामे वगैरे दिसत होती. कांही काळ जमीनीवरून प्रवास केल्यानंतर जेंव्हा शहरातली दाट वस्ती सुरू झाली तेंव्हा मात्र आमची गाडी भुयारात घुसली.

लंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत ‘ट्यूब’ ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डझनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे ते प्रत्यक्षात कुठेच एकमेकांना मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो.

लंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात इच्छित स्थळी पोचता येते. बटन दाबल्यावर तिकीट छापून देणारी यंत्रे मुंबईच्या तिकीटांच्या खिडकीत पाहिली होती. लंडनला ती स्वयंचलित आहेत. त्यात मोठे नाणे टाकले तर उरलेले सुटे पैसे बाहेर येतात. आता बहुतेक लोक इंटरनेट व क्रेडिट कार्डाचाच वापर करत असल्याने पाहिजे ती तिकीटे इंटरनेटवर बुक करून क्रेडिट कार्ड वापरून त्याचा प्रिंटआउट घेता येतो. शहराच्या मध्यभागातले आंतले वर्तुळ किंवा बाह्य वर्तुळ यात सर्वत्र दिवसभर किंवा आठवडाभर चालू शकणारे पास काढायची सोय आहे.

लंडनच्या मेट्रोमध्ये पाहिलेल्या एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. धडधाकट माणसे तर त्यातून प्रवास करतातच, पण अपंग लोकसुद्धा व्हीलचेअरवर बसून या गाडीत चढू उतरू शकतात. महत्वाच्या स्टेशनांवर त्यांच्यासाठी खास लिफ्ट आहेत. त्यातून ते भूमीगत प्लॅटफॉर्मवर येजा करू शकतात. त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा पडत असल्या तरी चाकांच्या खुर्चीत बसून ते रोजच्या जीवनातील जवळजवळ सर्व गोष्टी करू शकतात, अगदी रेल्वेप्रवाससुद्धा!

राणीचे शहर लंडन – भाग १

राणीचे शहर लंडन – भाग १

 “पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅड यू बीन? आय हॅड बीन टु लंडन टु लुकॅट द क्वीन.” आणि “लंडन ब्रिज ईज फॉलिंग डाऊन” अशासारख्या नर्सरी -हाइम्समधून मुलांची लहानपणीच लंडनशी ओळख होते आणि त्यांच्या मनात त्या मायानगरीबद्धल कुतूहल निर्माण होते. भारतातली सगळी संस्थाने त्यात विलीन होऊन गेल्यानंतर आता इथे कोणी राणीसाहेब उरलेल्या नाहीत. इंग्लंडमध्ये मात्र अजून एक नामधारी सम्राज्ञी राजसिंहासनावर बसलेली आहे. यू.के.चा सारा राज्यकारभार तिच्याच नांवाने हांकला जातो. तिथल्या नाण्यांवर आणि नोटांवर तिचे चित्र असते.     

एका काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. त्या काळी सर्व जगातील राजकीय आणि आर्थिक घडामोडीचे नियंत्रण लंडनहून होत असे. युद्धात जिंकलेली लूट, मांडलिक राजांच्याकडून घेतलेली खंडणी आणि व्यापारातला नफा अशा अनेक मार्गाने जगभरातल्या संपत्तीचा ओघ लंडनच्या दिशेने वहात होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेतला कांही भाग त्या नगरीच्या बांधणीमध्ये खर्च झाला असणार आणि त्यातून तिथले विशाल प्रासाद आणि कलात्मक टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या असतील. राजधानीचे शहर म्हणून तर लंडनचा दिमाख होताच. जागतिक व्यापाराचे केंद्र असल्यामुळे जगभरातील व्यापारी त्या शहराला भेट देत होते, त्यांनी आपल्या कंपन्यांची ऑफिसे तिथे थाटली. उच्च शिक्षणासाठी जगभरातले विद्यार्थी तिथे येऊन रहात होते. मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार वगैरेंनी लंडन ही आपली कर्मभूमी बनवली आणि तिचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. शंभर वर्षांहून अधिक काळ लंडन ही जगातल्या सा-या महानगरींची महाराणी होती असे म्हणता येईल.      

लंडनचा इतिहास देखील रोमइतकाच जुनापुराणा आहे. पण प्राचीन काळात त्या शहराला विशेष महत्व नव्हते. रोम या शहराचे नांव कसे पडले याबद्दल दुमत नाही, पण लंडन शहराच्या नांवाची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली याबद्दल दहा संशोधकांची दहा निरनिराळी मते दिसतात. जगभरात सगळीकडे प्राचीन कालापासून नद्यांच्या कांठावर वस्ती करून माणसे रहात आली आहेत. त्यांच्या आपसातील लढाया, लुटारूंचे हल्ले, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या वस्त्या उजाड झाल्या आणि नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. थेम्स नदीच्या कांठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात मानवांनी वस्त्या निर्माण केल्या होत्या. आज लंडन शहर जेवढ्या विस्तृत भागात पसरले आहे त्यातल्या कित्येक जागी अशा प्रकारच्या पुरातन वस्त्यांचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ही प्रक्रिया शतकानुशतके चालू होती. त्याप्रमाणे अनेक खेडी या भागात वसवली गेली होती. लीड्स या छोट्या शहरातच पन्नासाहून अधिक जुन्या काळातली खेडी सामावलेली आहेत तर लंडन या महानगरात मध्ये ती किती असतील?
        
रोमन साम्राज्याने इंग्लंडचा भागसुद्धा जिंकून घेतला होता आणि लंडनच्या भागात आपली छावणी बांधली होती. दळणवळणाची आणि संपर्काची साधने अत्यंत तुटपुंजी असलेल्या त्या काळात राजधानीपासून दूरवरच्या प्रदेशात जाऊन आणि सतत चालू असलेल्या लढायांमध्ये टिकाव धरून राहणे कठीणच असते. त्यामळे रोमसारख्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी बांधणे त्यांना कसे शक्य होणार? रोमन साम्राज्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर व्हायकिंग, नॉर्मन आदि लोकांनी ब्रिटनवर आक्रमणे केली आणि सॅक्सन लोकांबरोबर त्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यात विजयी झालेल्या जेत्यांनी आपापल्या जहागिरी, परगणे आणि राज्ये जागोजागी स्थापन केली होती. कांही शतकांचा काळ गेल्यावर या सर्वांचे एकत्रीकरण झाले आणि ब्रिटनवर एकछत्री अंमल सुरू झाला.
       
मध्ययुगाच्या काळात युरोपखंडातल्या सगळ्याच देशांचा झपाट्याने विकास झाला आणि या क्रांतिकारक प्रगतीमध्ये ब्रिटन आघाडीवर राहिला. त्या देशाने युरोपमधला दुसरा कोठलाही भाग जिंकून घेतला नाही, पण आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांतले प्रचंड भूभाग आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व कालखंडात ब्रिटनची राजधानी लंडन येथे असल्यामुळे ते जगातील अव्वल क्रमांकाचे शहर झाले.

     
. . . . . . . . .. . . (क्रमशः)