मुंबई ते लीड्सचा प्रवास

Leeds
(मी हा प्रवास डिसेंबर २००५ मध्ये केला होता आणि त्यावरील हा लेख २००९ मध्ये लिहिला होता.)

पूर्वीच्या काळी मुंबईहून पुण्याला जायचं म्हंटलं की “कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी” करीत जाणारी झुकझुक गाडीच पटकन आठवत असे. कालांतराने एस्.टी बसेस, एशियाड, टॅक्सी वगैरे आल्या. आता व्होल्व्हो बसेस बोकाळल्या आहेत. पण पुण्याजवळ लोहगांवला एक विमानतळ आहे आणि सांताक्रुझहून तेथे विमानाने जायची सोय आहे हे मात्र कधीच पटकन डोक्यात येत नाही. इंग्लंडमध्ये लीड्स हे असेच एक शहर आहे. आपल्या पुण्यासारखीच त्यालाही ऐतिहासिक परंपरा आहे, तिथे अनेक नांवाजलेल्या शिक्षणसंस्था आहेत आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. लंडन या महानगरापासून दीडदोनशे मैलावरील हे टुमदार शहर उत्तम रेल्वे आणि रस्त्यांनी लंडनशी जोडलेले आहे. त्यामुळे बहुतेक लोक हा प्रवास कारने करतात नाही तर ट्रेनने.

आमचे लीड्सला जायचे ठरले तेंव्हा आम्हीही तसाच विचार केला. पण लंडन विमानतळावरून थेट लीड्सला टॅक्सी केली तर सुमारे तीन चारशे पौण्ड लागत होते म्हणे, म्हणजे त्या काळात पंचवीस तीस हजार रुपये. हे मात्र फार म्हणजे फारच झाले. एवढ्या पैशात तर मुंबई ते लंडनला जाऊन परत यायचं तिकीट मिळत असे. मग लंडन विमानतळावरून मुख्य रेल्वेस्टेशनपर्यंत लोकल ट्यूब आणि तिथून लीड्सपर्यंत मेन लाईन ट्रेनने प्रवास करायचा असे ठरले. पण अवजड सामान बरोबर घेऊन ही शोधाशोध करण्याची दगदग आम्हाला वयोमानाप्रमाणे झेपेल कां हाही एक प्रश्न होता. त्यामुळे आम्हाला उतरवून घेण्यासाठी कोणी तरी लंडनला यायचे हे ओघानेच आले. त्यातही एकंदर शंभर दीडशे पौंड तरी खर्च झालेच असते. शिवाय वेळ आणि दगदग वेगळी. तेवढ्यात विमानाचं तिकीट मिळाले तर?

मी विमानाची तिकीटं बुक करायला ट्रॅव्हल एजंटकडे गेलो तेंव्हा सगळ्याच चौकशा केल्या. त्यावरून लक्षात आलं की विमानाच्या तिकीटांच्या किंमती ही एक अगम्य आणि अतर्क्य गोष्ट आहे. एअरलाईन्सची नॉर्मल भाडी खरे तर अवाच्या सवा असतात. ऑफीसच्या खर्चाने जाणार्‍यानाच ती परवडतात आणि गरजू लोक नाईलाजापोटी देतात. कमी खर्चाच्या प्रवासासाठी इतक्या प्रकारच्या स्कीम्स, पॅकेजेस आणि डील्स असतात की अनुभवी एजंटकडे सुध्दा त्यांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे तो अचूक मार्गदर्शन करू शकत नाही. कुठल्या दिवशी कुठल्या कंपनीच्या विमानाने कुठून कुठे जायचं आहे हे आधी ठरवून इंटरनेटवर फीड करायचे आणि उत्तराची वाट पहायची. त्या दिवशी कुठल्या फ्लाईटमध्ये किती किंमतीची तिकिटे उपलब्ध आहेत हे त्यानंतर कळणार, अशी पध्दत आहे. बर्‍यापैकी बिजिनेस चालत असलेल्या कुठल्याही एजंटकडे तीन चार पेक्षा जास्त ट्रायल मारायला वेळ नसतो.

आमच्या एजंटला पहिल्या ट्रायलमध्येच मुंबई लंडन लीड्स आणि त्याच मार्गाने परतीचे तिकीट वाजवी वाटणार्‍या किंमतीत उपलब्ध असल्याचे दिसले पण त्या फ्लइटने आम्ही तिथे रात्री उशीरा पोचणार होतो, तेही डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. आणि परतीच्या प्रवासात तर एक रात्र स्वतःच्या खर्चाने लंडनला घालवावी लागणार होती. एकंदरीत गैरसोयच जास्त असल्यामुळे हा प्रस्ताव मी अमान्य केला. आणखी दोन तीन ट्रायलमध्ये मुंबई लंडन मुंबई आणि लंडन लीड्स या प्रवासांसाठी वेगवेगळ्या स्कीम्समध्ये पण सोयिस्कर वेळच्या फ्लाईट्समध्ये तिकीटे मिळाली ती तर खूपच स्वस्तात पडली. लंडन ते लीड्स विमानाचे तिकीट चक्क ट्रेनपेक्षासुध्दा स्वस्त असलेले पाहून धक्काच बसला. मात्र त्यात अशी अट होती की कुठल्याही परिस्थितीत ते बदलता येणार नाही किंवा त्याचा रिफंड मिळणार नाही. कुठल्याही कारणाने ती फ्लाईट चुकली तर मात्र ते पैसे वाया गेले आणि आयत्या वेळी नवीन तिकीट दामदुपट किमतीत घ्यावे लागणार। हा धोका पत्करणे भाग होते. परतीच्या प्रवासात लीड्सहून लंडनला कसे यायचे ते नंतर पाहू असे ठरवले.

आम्ही ठरलेल्या दिवशी वेळेवर सहार विमानतळावर पोचलो. कुठल्या दरवाजातून आत शिरायचे हे काही समजेना कारण आमचे तिकीट ज्या ब्रिटिश मिडलॅंड एअरलाईन्सचे होते तिचा उल्लेख कुठल्याच बोर्डावर दिसेना. मुंबईहून सुटणारी ही फ्लाईट त्या काळात कदाचित नव्यानेच सुरू झाली होती. दोन तीन दरवाजावर धक्के खाल्यावर एकदाचा प्रवेश तर मिळाला. तोपर्यंत आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट मॉनिटरवर झळकली होती ती पाहून जीव भांड्यात पडला. आम्ही दोघांनीही जीन्स आणि जॅकेट परिधान केले असले तरी मूळ मराठी रांगडेपण काही लपलं नव्हतं. एक्सरे मशीन वरून बॅगा उतरवणार्‍या लोडरने आम्ही कुठल्या फ्लाईटने जाणार आहोत याची अगदी आपुलकीने मराठीत विचारपूस केली. मी त्याला मारे ऐटीत बी.एम.आय.ने लंडनला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याने बारा एअरलाईन्सच्या बत्तीस बाटल्यातील रंगीबेरंगी पाणी प्याले असल्याच्या आविर्भावात आमची कींव करीत कुठल्या फडतूस कंपनीच्या भुक्कड विमानाने प्रवास करायची वेळ आमच्यावर आली आहे असा शेरा मारला आणि ती सगळी मद्राशांनी भरलेली असते अशीही माहिती पुरवली. बहुधा बी.एम. म्हणजे बंगलोर मद्रास असा अर्थ त्याच्या डोक्यात भरवून कोणीतरी त्याची फिरकी घेतली असावी.

अशा प्रकारचा प्रथमग्रासे मक्षिकापात मनावर न घेता आम्ही पुढे गेलो. बी.एम.आय.च्या काउंटर वर आमचं अगदी सुहास्य स्वागत झालं. तिथल्या सुंदरीने वेगवेगळी तिकीटे असूनही आमचे थेट लीड्सपर्यंतचे चेक इन करून दिले आणि सामान आता लीड्सपर्यंत परस्पर जाईल, आम्हाला लंडनला कांही कष्ट पडणार नाहीत असे आश्वासन सुध्दा दिले. इमिग्रेशन, कम्टम्स वगैरे सोपस्कारसुध्दा आता एकदम लीड्सलाच होतील अशी चुकीची माहितीही दिली. लंडन हे पोर्ट ऑफ एंट्री असल्यामुळे यू.के. मध्ये आम्हाला प्रवेश देणे सुरक्षित आहे की नाही हे तिथलाच साहेब ठरवेल असे मला वाटत होते, पण ही गोष्ट कदाचित लीड्समधला साहेब ठरवेल आणि तसे असेल तर ते माझ्याच सोयीचे आहे अशा विचाराने मी वाद घातला नाही.

चेक इन झाल्यावर बराच अवकाश होता म्हणून आरामात थोडा अल्पोपहार घेतला तोपर्यंत मॉनिटरवर अनेक फ्लाईट्सचे स्टेटस बदलून इमिग्रेशन, सिक्युरिटी, बोर्डिंग वगैरे जाहीर झाले होते पण आमच्या फ्लाईटची मात्र जैसे थे परिस्थिती होती. मुंबई विमानतळाच्या लेखी तिचे अस्तित्व नगण्य असावे. पुन्हा चौकशी केल्यावर मॉनिटरकडे लक्ष न देता स्थितप्रज्ञ वृत्ती ठेऊन आपली यात्रा पुढे चालू ठेवण्याचा सल्ला मिळाला. त्याप्रमाणे सारे सोपस्कार सुरळीतपणे पार करून आम्ही विमानात स्थानापन्न झालो व पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने मुंबईहून पश्चिम दिशेला उड्डाण केले.

एअरबस ए ३३० मॉडेलच्या त्या नव्या कोर्‍या विमानात सर्व आधुनिक सोयी होत्या. रात्री दीड वाजता सुध्दा बर्‍यापैकी खायला आणि थोडेसे प्यायलासुध्दा मिळाले. वेगवेगळे इंग्लिश व हिन्दी चित्रपट पहात, संगीत ऐकत आणि डुलक्या घेत चांदणी रात्र संपून सोनेरी पहाट केंव्हा झाली ते नाश्ता आला तेंव्हाच कळले. कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्टमध्ये ज्यूस, ऑमलेट, फळे. योघर्ट, सॉसेजेस वगैरे भरपूर खादाडी होती. शाकाहारी भारतीय पर्याय सुध्दा होता त्यात मात्र कांजीवरम उपमा नावाचा एक पदार्थ आणि मोनॅको बिस्किटाएवढ्या आकाराचे उत्तप्पे ठेवले होते. कदाचित हा सो कॉल्ड मद्रासी टच असेल. न्याहारी उरकेपर्यंत लंडन शहर दिसायला लागले आणि विमान जमीनीवर उतरावयाची तयारी सुरू झाली.

लंडनला उतरल्यावर पॅसेजमध्येच प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्थित खुणा आणि फलक जागोजागी ठळकपणे लावलेले होते. तिथेच विमानतळाच्या बाहेर जाणारे, यू. के. मधीलच दुसर्‍या गावाला जाणारे आणि परदेशी तिसर्‍याच देशाला जाणारे असे प्रवाशांचे तीन गट करून त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी जायच्या सूचना होत्या. आम्ही दुसर्‍या प्रकारचे प्रवासी असल्यामुळे मध्यममार्ग पत्करून त्यानुसार बाणांचा पाठपुरावा करीत पुढे पुढे जात राहिलो. आमचे लीड्सला जाणारे विमान सुदैवाने त्याच टर्मिनलवरून सुटणार होते. सहारहून सांताक्रूझ विमानतळाला जाण्यासाठी लागते त्याप्रमाणे त्यासाठी बिल्डिंगच्या बाहेर जाऊन बस घ्यायची गरज पडली नाही. पण त्याच विमानतळाच्या एका भागातून दुसर्‍या भागात जाणेसुध्दा कांही सहज गोष्ट नव्हती. कितीतरी लांबलचक कन्व्हेअर बेल्ट पार करून आणि अनंत एस्केलेटरवरून चढउतार केल्यावर एका प्रशस्त दालनांत येऊन पोचलो.

तिथे लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामधून प्रत्येक प्रवाशाची अगदी कसून सुरक्षा तपासणी झाली. अंगावरील ओव्हरकोट, जॅकेट आणि खिशातील मोबाईल फोनसुध्दा काढून त्या सर्व गोष्टी एक्सरे मशीन मधून तपासल्या. खरे तर आधीच विमानातून आलेल्या प्रवाशांची पुन्हा तपासणी कशाला ? पण बहुधा ही पुढील प्रवासाची तयारी होती. दुसर्‍या देशांमधील तपासणीवर ब्रिटीशांचा विश्वास नसावा. त्यानंतर पासपोर्ट कंट्रोल नावाच्या कक्षामध्ये गेलो. ब्रिटीश पासपोर्ट धारकांसाठी खुला दरवाजा होता. इतरांसाठी इंटरव्ह्यू देणे आवश्यक होते. आमचीही जुजबी विचारपूस झाली. यू. के. च्या सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक व्यवस्थेला आमच्यापासून कांही धोका पोचेल अशी शंका येण्याचे कांही कारण नसल्यामुळे आमची लवकर सुटका झाली.

आता लीड्सला जाणारे विमान गेट नंबर आठ वरून पकडायचे होते. पुन्हा अनेक कन्व्हेअर्स व एस्केलेटर्स पार करून तिथे पोचलो. हे एकच गेट भारतातल्या एकाद्या छोट्या एअरपोर्टवरील पूर्ण इमारतीच्या आकारमानाएवढे मोठे आहे व त्यामध्ये ए,बी,सी,डी,ई अशी छोटी गेट्स आहेत. इथे पूर्णपणे बी.एम.आय.चे अधिराज्य आहे. चार पाच प्रशस्त दालने, त्यात भरपूर खुर्च्या मांडलेल्या, विमानतळाचे विहंगम दृष्य दिसेल अशा गॅलर्‍या, फास्ट फूडचा स्टॉल, कोल्ड ड्रिंक व्हेंडिंग मशीन्स, स्मोकर्स चेंबर, टेलीव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सचे बूथ वगैरेने सुसज्ज असा हा कक्ष आहे. बाजूलाच मोठमोठी ड्यूटी फ्री शॉप्ससुध्दा आहेत आणि तिथे हिंडणार्‍याने खरेदी केलीच पाहिजे असा आग्रह नाही. विमानतळावर एका बाजूला एकापाठोपाठ एक विमाने उतरत होती आणि दुसर्‍या बाजूने उड्डाण करीत होती. आमच्या गेटवरूनच दर वीस पंचवीस मिनिटांनी कुठे ना कुठे जाणारी फ्लाईट सुटत होती त्यामुळे प्रवाशांची भरपूर जा ये सुरू होती आणि वेगवेगळे आंतरराष्ट्रीय नमुने पहायला मिळत होते. एकंदरीत छान टाईमपास होत होता.

यथावकाश आमच्या विमानाने आम्हाला घेऊन उत्तरेला झेप घेतली. या फ्लाईटमध्ये फुकट खाणे नव्हते. सर्वांना अन्नपदार्थ वाटायला आणि त्यांनी तो खायला फारसा वेळही नव्हता. सॅंडविचेस, चहा, कॉफी वगैरे घेऊन एक ट्रॉली एकदाच समोरून मागेपर्यंत नेली आणि आमच्यासारख्या कदाचित बाहेरून आलेल्या थोड्या लोकांनी कांही बाही विकत घेऊन थोडीशी क्षुधाशांती केली. तोपर्यंत लीड्सला पोचून गेलो. आता आपल्या माणसांना भेटायला मन अधीर झाले होते.

आपले सामान घेऊन लवकर बाहेर पडावे म्हणून धावतपळत बाहेर येऊन ट्रॉली घेऊन कन्व्हेअरपाशी उभे राहिलो. एकापाठोपाठ एक बॅगा बाहेरून आत येत होत्या आणि त्यांचे मालक त्या उतरवून घेऊन बाहेर जात होते. सगळे लोक चालले गेले, बॅगाही संपल्या आणि कन्व्हेअर बंद झाला पण आमच्या सामानाचा पत्ताच नव्हता. चौकशी करायला आत गेलो तर तिथे आमच्यासारखे चार त्रस्त प्रवासी आधीच उभे होते. त्यामुळे त्यातही पुन्हा आमचा शेवटचा नंबर लागला. तिथली बाई प्रत्येक त्रस्त प्रवाशाला आपल्या एकेका वस्तुचे सविस्तर वर्णन करायला सांगत होती. चाळीस पन्नास तर्‍हांच्या बॅगांच्या चित्रांचा एक आल्बम आणि एक कलर शेडकार्ड यांच्या सहाय्याने नेमके वर्णन मिळवायचा तिचा स्तुत्य प्रयत्न होता. पण आमची मात्र पंचाईत होत होती. परदेश दौर्‍यासाठी मुद्दाम विकत आणलेल्या आमच्या नव्या कोर्‍या बॅगा अजून नीट लक्षात रहाण्यासारख्या नजरेत बसलेल्या नव्हत्या. बेल्टवरून येत असलेल्या एकीसारख्या एक दिसणार्‍या बॅगामधून आपल्या बॅगा पाहिल्यावरसुध्दा पटकन ओळखता येतील की नाही याची खात्री नव्हती. नक्की ओळख पटावी यासाठी आम्ही त्यावर आमच्या नावाच्या ठळक चिठ्या चिकटवल्या होत्या. आता निव्वळ आठवणीतून त्यांचे वर्णन करणे कठीण होते. आधी कल्पना असती तर आम्ही बॅगांचे फोटो काढून आणले असते असे मी म्हंटले सुध्दा. आम्ही दोघांनी मिळून त्यातल्या त्यात जमेल तेवढा प्रयत्न केला आणि त्या बाईने निव्वळ कोड नंबर्सच्या आकड्यात त्यांची नोंद करून घेतली. या सगळ्या प्रकारात आमच्या बॅगांच्या वर्णनात चूक झाली म्हणून त्या आम्हाला दुरावतात की काय अशी एक नवीनच भीती उत्पन्न झाली. सामानाचा विमा उतरवलेला होता आणि विमान कंपनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार योग्य ती भरपाई देईलच वगैरे छापील माहिती त्या बाईने सराईतपणे सांगितली. पण म्हणून काय झाले? आपल्या वस्तु त्या आपल्या. त्यातल्या काही गोष्टी तर आम्ही किती हौसेनं सातासमुद्रापार आणल्या होत्या?

प्राप्तपरिस्थितीमध्ये आणखी कांहीच करता येण्यासारखे नव्हते. खट्टू मनाने हॅण्डबॅग्ज उचलल्या आणि बाहेर आलो. सगळे सहप्रवासी कधीच निघून गेले होते आणि त्या छोट्या विमानतळावर शुकशुकाट झाला होता. फक्त आमचा मुलगा, सून आणि नाती ही मंडळी तेवढी तिथे चिंताक्रांत मुद्रेने उभी होती. लंडनला पोचल्यानंतर आमचे फोनवर बोलणे झालेले होते आणि आम्ही इंग्लंचमध्ये आल्याचे त्यांना माहीत होते. सामानाचा काही तरी घोटाळा झाला आहे एवढे त्यांना कळले होते त्यामुळे आम्ही बाहेर येण्याची वाट पहात ते ताटकळत उभे होते. सामान नसेना का, आम्ही तरी सुखरूपपणे इथवर पोचलो तर होतो. किती दिवसांनी आमच्या भेटी झाल्या होत्या याच आनंदात घरी आलो. गळ्यात पडून आगत स्वागत झालं, गप्पागोष्टी रंगल्या. संध्याकाळी एक डिलिव्हरी व्हॅन घराच्या दिशेने येतांना दिसली. आमचे मागे राहिलेले सर्व सामान नंतरच्या फ्लाईटने लीड्सला सुखरूप पोचले होते आणि कुरीयरमार्फत आम्हाला अगदी घरपोच मिळाले. आता मात्र अगदी सर्व सामानासह सुखरूप यात्रा पूर्ण झाली होती.

लीड्सच्या चिप्स – भाग २१ – वैद्यकीय सेवा

आपल्या शहरातल्या डॉक्टरांना आपण एरवी कितीही नांवे ठेवत असलो तरी मनातून आपल्याला त्यांचाच केवढा आधार वाटत असतो हे बाहेरगांवी गेल्यावर लक्षात येते. मागे एकदा मैसूरसारख्या रम्य गांवी गेलो होतो आणि चांगले मजेत रहात होतो. पण किंचित प्रकृती अस्वास्थ्य वाटायला लागताच आपल्या मुंबईला परत यावेसे वाटायला लागले. परदेशात गेल्यावर तर ही भावना अधिकच प्रकर्षाने जाणवते. लीड्सला जायला निघण्यापूर्वी सर्दी खोकला, ताप, अपचन यासारख्या सामान्य रोगांवर आपल्याला लागू पडणारी सगळी औषधे आणि डेटॉल, कापूस, बँडएड आदि प्रथमोपचाराचे सामान मुद्दाम बरोबर नेले होते. मेडिक्लेमचा विमा काढला होताच. इंग्लंडमधील राहणी इथल्यापेक्षा चांगल्या दर्जाची असल्यामुळे तिथे सरस वैद्यकीय सेवा उपलब्ध असणारच असा ढोबळमानाचा विश्वासही होता, पण मनात कुठे तरी थोडी अस्वस्थता होती.

आरोग्याचा विमा काढला असला तरी पॉलिसीचा कागद कांही आपल्याला बरे करत नाही. डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यानंतर त्यावर खर्च झालेले पैसे क्लेम करण्यापुरताच त्यांचा उपयोग असतो. त्यामुळे तिथे गेल्यावर तिकडचे धन्वंतरी कुठे भेटू शकतात याचा शोध हळू हळू सुरू केला. पण आमच्या गल्लीच्या आसपासच नव्हे तर सिटी सेंटरच्या गजबजलेल्या भागातसुध्दा मला कुठल्या डॉक्टराच्या नांवाची एकादी पाटीसुध्दा दिसली नाही.  आपल्याकडल्या कोणत्याही शहरात मध्यमवर्गीयांच्या वस्तीत पंधरा मिनिटे फिरलात तर डॉक्टरांच्या नांवाचे पांच दहा तरी बोर्ड दिसतात. इंग्लंडमधले डॉक्टर लोक असतात तरी कुठे आणि रोगी त्यांना कसे शोधून काढतात याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना.

मुलाला त्याबद्दल विचारता त्याने सांगितले की तिथली सरकारी आरोग्यसेवा अत्यंत चांगली आहे आणि बहुतेक लोक त्याचाच लाभ घेतात. शहरात जागोजागी असलेली मोठमोठी हॉस्पिटले मला दिसली होतीच. ती चांगली सुसज्ज असतात आणि तिथे रोग्यांचा बजबुजाट नसतो. त्यातल्या कोठल्याही विभागात सहजपणे एपॉइंटमेंट मिळते. त्याच दिवशी भेटण्याची वेळसुध्दा तासभर आधी ठरवून ती कसोशीने पाळली जाते. आणीबाणीसाठी ट्रॉमाकेअर युनिट्स असतात तिथे मात्र रुग्ण येताच लगेच त्याचेवर उपचार केला जातो. त्याखेरीज शहराच्या वेगवेगळ्या भागात हेल्थ सेंटर्स असतात. लहान सहान तक्रारीसाठी रोगी तिथे जातात. हॉस्पिटल किंवा हेल्थ सेंटरमध्ये जाऊनच डॉक्टर त्या लोकांना तपासून त्यांचेवर उपचार करतात किंवा त्यांना औषधे लिहून देतात. पेशंटच्या घरी व्हिजिट करणे वगैरे गोष्टी तिकडे कधीच कालबाह्य झाल्या असाव्यात. डॉक्टरचे स्वतःचे खाजगी नर्सिंग होम असणे सुध्दा दुर्मिळ झाले होते.

सुदैवाने माझ्या मुलाला किंवा सुनेला डॉक्टरला भेटण्याची फारशी गरज पडली नव्हती, पण नियमित तपासण्या करून घेण्यासाठी किंवा उपचारासाठी मुलींना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागत असे. ‘बर्ली सेंटर’ नांवाच्या जागी त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या नांवाची नोंदणी झाली होती. ती जागा घरापासून दोन अडीच किलोमीटर लांब असल्यामुळे इंग्लंडच्या हवामानात इतके अंतर चालत जाणे शक्य नव्हते. प्रत्येक वेळी ते फोनवर अपॉइंटमेंट घेत आणि कार किंवा कॅबने तिकडे जाऊन येत.  “आम्हाला गरज पडली तर काय करायचे?”  या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे तयार नव्हते. त्याच्या एका मराठी मित्राचे आईवडील नुकतेच येऊन तीन चार महिने तिथे राहून गेले होते. त्याने काय केले याची चौकशी केल्यावर त्यांनी ‘हाइड पार्क सर्जरी’मध्ये रजिस्ट्रेशन केले होते असे समजले. ही जागा वाहनांच्या रस्त्याने आमच्या घरापासून दूर असली तरी टेकडी उतरून पायी गेल्यास शॉर्टकटने दहा मिनिटांच्या अंतरावर होती. प्रत्यक्ष आजारी पडून आवश्यकता निर्माण होण्यापूर्वी धडधाकट असतांनाच आपण चौकशी करावी म्हणून आम्ही दोघे तिथे चालले गेलो.

रस्त्यावरून पाहतांना ‘हाइड पार्क सर्जरी’ची इमारत दवाखान्यासारखी दिसत नाही. मला ते एक लहानसे क्लबहाउस वाटले. समोर सात आठ मोटारी उभ्या होत्या आणि आंत सगळी मिळून तितकीच माणसे होती. प्रशस्त अशा कॉरीडॉरमधून थोडे आंत गेल्यावर आच्छादन केलेली छोटीशी मोकळी जागा होती. तिच्या एका कोप-यात रिसेप्शन काउंटर होते आणि आजूबाजूला वीस पंचवीस लोकांनी बसण्याची व्यवस्था होती. पण त्यावर तीन चार लोक आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसले होते. सुंदर रंगीत चित्रे आणि छायाचित्रांनी सजवलेली गुळगुळीत पृष्ठांची खूप मॅगेझिन्स एका जागी ठेवली होती. त्यातले आपल्याला पाहिजे ते घेऊन चाळत बसाले आणि वाचून झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यावे. मुले, स्त्रिया आणि वृध्दांचे विकार, एड्स किंवा कँसरसारखे घातक रोग, थंडीपासून बचाव, धू्म्रपान आणि मद्यपानाचे दुष्परिणाम अशा विविध विषयांसंबंधी लोकशिक्षणार्थ तयार केलेली एक दोन पानाची आकर्षक पँफ्लेटस जागोजागी ठेवली होटी. त्यातली आपल्याला हवी ती घेऊन वाचावी किंवा घरी नेऊन इतरांमध्ये त्यांचा प्रसार करावा. एका कोप-यात अगदी लहान मुलांसाठी मिकी माउस, डोनाल्ड डक, बार्बी डॉल्स, हत्ती, घोडे, उंट, मोटारी, विमाने यासारखी भरपूर खेळणी ठेवली होती. मुलांनी ती पाहिजे तशी हाताळावीत, तिथे बसावे, लोळावे, नाचावे, बागडावे असे कांही करायला पूर्ण मुभा होती. पण ते करायला अलीकडे फारशी लहान बाळेच तिकडे दिसत नाहीत. देशाची सरासरी जनसंख्या प्रौढ होत चालली आहे.

खरे सांगायचे झाल्यास सहा महिन्याचा व्हिसा घेऊन परदेशातून आलेल्या माणसाला तेथे कोणी उभे राहू देईल असे मला वाटले नव्हते. त्यातून माझ्या मुलाचे रजिस्ट्रेशनसुध्दा तेथे नव्हते. त्यामुळे आमची नांवे रेशनकार्डाप्रमाणे त्याच्या खात्यात जोडण्याची सोय नव्हती. तरीही नक्की कुठे जाऊन काय करावे लागेल हे तरी समजून घ्यावे एवढ्या उद्देशाने तिथे गेलो. बरोबर पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यासाठी दिलेली सर्व कागदपत्रे असलेली फाईल नेली. सरकारी मामला म्हणजे केंव्हा कोणती माहिती आणि पुरावे लागतील याचा नेम नाही असा आपला अनुभव असतो. ‘हाइड पार्क सर्जरी’मध्ये गेल्यावर रिसेप्शन काउंटरवरल्या मुलीने आधी “अॅपॉंइंटमेंट घेतली आहे कां?” असे विचारताच आता नन्नाचा पाढा इथूनच सुरू होणार असे वाटले. पण तसे झाले नाही. “नाही” म्हंटल्यावर तिने मला थोडे बसून घ्यायला सांगितले आणि तिच्या हांतातले काम आटोपताच मला बोलावून घेतले.

मी भारतातून आलो असून चौकशी करण्यासाठी आलो आहे म्हणताच तिने एक छोटासा फॉर्म देऊन तो भरायला सांगितले. त्यात नांव, पत्ता, टेलिफोन नंबर, मुलाचे नांव एवढेच भरायचे होते. मी तिथला रहिवासी आहे की पाहुणा आहे तेसुध्दा लिहिण्याची गरज नव्हती.  त्यानंतर अनेक रोगांची किंवा ऑपरेशन्सची यादी दिलेली होती आणि त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी माझ्या शरीराने अनुभवल्या आहेत त्यावर टिक करायची होती. त्यामुळे तिथेच बसल्या बसल्या फॉर्म भरून मी तिला तो फॉर्म सुपूर्द केला. तिने लगेच संगणकावर आमची नांवे घालून आम्हाला तीन चार दिवसानंतर येण्याची तारीख आणि वेळ सांगितली. पासपोर्ट, व्हिसा, राहत्या जागेबद्दल कोणतेही कागदपत्र असला कसलाच पुरावा तिने मागितला नाही. आपल्याकडे जिकडे तिकडे फोटो आयडेंटिटी आणि अड्रेसप्रूफ मागतात आणि ते असल्याशिवाय पान हलत नाही. मी भरलेला फॉर्मदेखील त्यातील माहिती इनपुट झाल्यानंतर त्या पेपरलेस ऑफीसमध्ये नष्ट केला गेला असणार. 

आम्ही ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी तिथे गेलो. आमची ती एपॉइंटमेंट एका नर्सबरोबर आहे हे तेथे गेल्यानंतर समजले. त्या वयस्कर नर्सबाईंना सगळेच लोक डॉक्टर्सपेक्षाही जास्त मान देत होते असे दिसत होते. बाई हंसतमुख, मनमिळाऊ आणि बोलक्या होत्या. त्यांनी पटापट आमची उंची, वजन, रक्तदाब, नाडीचे ठोके, वगैरे तपासून त्याच्या नोंदी केल्या. रक्ताचे नमूने काढून तपासणीसाठी ठेऊन घेतले. हात पाय हलवून आणि नजर फिरवायला सांगून त्याच्या हालचाली पाहिल्या. पुन्हा एकदा भयानक आजारांची लांबलचक यादी वाचून त्यातले कोणकोणते आम्हाला होऊन गेले आहेत ते विचारले. त्यातली कित्येक नांवेसुध्दा मी ऐकलेली नव्हती. त्या अर्थी बहुधा मला ते झाले नसणार. पण हे सगळे अगदी खेळीमेळीने चालले होते. आम्ही परदेशातून आलो आहोत म्हंटल्यावर अगत्याने आमच्या कुटुंबाबद्दल ती विचारपूस करत होती. तिचे इंग्रजी उच्चार समजण्यात थोडी अडचण होत आहे हे पाहून सावकाशपणे बोलत होती. वर्णद्वेषाचा लवलेशही तिच्या वागणुकीत नव्हता.

त्यानंतर आठवड्यानंतर पुन्हा बोलावले होते. हा सगळा रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसचा भाग होता. तोपर्यंत रक्ताची तपासणी होऊन त्याचा रिपोर्ट येईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस आधी टेलीफोन करून अॅपॉइंटमेंट कन्फर्म करायची होती. ती विचारणी करता रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आला नसल्याचे समजले आणि त्याचे सँपल पुन्हा द्यावे लागले. तिकडे सुध्दा असे मानवी चुकांचे घोटाळे होतात. चालायचेच म्हणा! शिवाय सगळे कांही कॉम्प्यूटरमध्ये बंद असल्यामुळे नक्की काय झाले असेल याची कोणाला कांही माहिती नसते. आमची तपासणी रूटीन असल्यामुळे आणि ‘माहितीसाठी माहिती’ अशा प्रकारची असल्यामुळे कोणाला त्याची पर्वा करण्याची जरूर नव्हती.

कालांतराने दुसरे रिपोर्ट आले आणि नवी अॅपॉइंटमेंट घेतली. सगळे कांही आलबेल होते. लहान मुलांना जसे नियमितपणे रोगप्रतिबंधक लशी देतात तसे तिकडे वरिष्ठ नागरिकांनाही देतात. त्यानुसार आम्हाला ‘फ्ल्यूजॅब’ घ्यायला सांगण्यात आले. आम्हीसुध्दा मुकाट्याने ते घेऊन टाकले. एवीतेवी आम्ही दवाखान्यात जात होतोच त्यामुळे या सेवेचा उपयोग करून पहावा असे ठरवले. पत्नीला थोडा सर्दीखोकल्याचा त्रास होत होता म्हणून डॉक्टरची भेट घेतली. त्याने तपासणी करून त्यावर कोणतेच औषध दिले नाही. वाटल्यास लॉझेंजेस घेऊन चघळायचा सल्ला दिला आणि ताप आल्यास घेण्यासाठी चार गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले.

आपल्याकडे मोठ्या रस्त्यावरसुध्दा केमिस्टची लहान दुकाने दिसतात. तिकडे तशी दिसत नाहीत. मॉल किंवा डिपार्टमेंट स्टोअरमध्ये कॉस्मेटिक्सच्या बाजूला कोठेतरी फार्मसी असते किंवा बारक्या गल्लीत एकादे फार्मसीचे दुकान असते. असेच एक दुकान सापडले तिथे ते प्रिस्क्रिप्शन नेऊन दिले. तो दुकानदार बहुधा भारतीय असावा. त्याने सांगितले की या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे हे औषध दिले तर त्याचे साडेपांच पौंड पडतील. सरकारी दवाखान्यातून आलेल्या दर प्रिस्क्रिप्शनमागे तेवढेच पैसे घेतात आणि ते पैसे सरकारजमा होतात. त्या औषधाची किंमत कितीही असो, त्याचे साडेपाच पौंडच पडतात. फार्मसिस्टला कांही कमिशन किंवा ठराविक सेवाशुल्क मिळत असेल. दिलेल प्रिस्क्रिप्शन फार्मसिस्ट आपल्याकडे ठेवून घेतो आणि तेच औषध पुन्हा हवे असल्यास नवे प्रिस्क्रिप्शन द्यावे लागते. मात्र आम्हाला लिहून दिलेले औषध ‘एटीसी म्हणजे एक्रॉस दि काउंटर’ या प्रकारात मोडते आणि हवे असल्यास ते प्रिस्क्रिप्शनशिवाय एक दीड पौंडाला मिळेल. विकत घेऊन त्यावरील मजकूर वाचल्यानंतर ते ‘क्रोसिन’ चेच वेगळे नांव होते हे समजले. म्हणजे तो पौंडसुध्दा अक्कलखात्यातच जमा झाला, कारण आम्ही भारतातून जातांना क्रोसिन बरोबर नेलेले होतेच.

औषधविक्रीबाबत तिथे फारच कडक नियम आहेत आणि त्याचे कसोशीने पालन होते. फारच थोडी औषधे ‘एटीसी’खाली येतात. इतर औषधांसाठी प्रिस्किरप्शन आवश्यक असते आणि एका प्रिस्किरप्शनवर दुस-यांदा ते औषध मिळत नाही. आपल्याला एकच औषध डॉक्टरला न विचारता पुन्हा पुन्हा घेण्याची संवय असते. तसे तिकडे चालत नाही त्यामुळे ते जांचक वाटते. ग्राहकाच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखी वाटते. सर्दीखोकल्यासाठी तिकडे कोणतेच औषध देत नाहीत. त्या हवामानात बॅक्टीरिया एवढे वाढत नाहीत त्यामुळे त्यांच्या इन्फेक्शनचा संभव कमी असतो आणि व्हायरसवर अजूनही म्हणावी तेवढी परिणामकारक औषधे निघालेली नाहीत. शरीराची ताकद वाढवून त्यांचा प्रतिकार करणे हाच त्यावर उपाय आहे. रोग बळावल्यामुळे ताप आला, फुफ्फुसावर परिणाम झाला, रक्तदाब कमीजास्त झाला वगैरेवर सिम्प्टोमॅटिक उपचार करून ते काबूत आणले जातात.

तिकडच्या सा-या तपासण्या आणि रोगप्रतिबंधक उपाय संपेपर्यंत आमची परतीची तारीख आली होती. आम्ही अखेरच्या भेटीत नर्सला ते सांगून तिचा प्रेमळ निरोप घेतला. तिनेही “आता पुन्हा लवकर परत या आणि जास्त काळ इथे रहा.” असे अगत्याने सांगितले. “तुम्हाला हेच करायचे होते तर माझा इतका वेळ फुकट कां घालवला?” असा खडूसपणाचा प्रश्न विचारला नाही. आमच्याच मनात तो विचार आला होता. तिला तसे वाटले की नाही कोणास ठाउक. कदाचित यालाच सेवाभाव म्हणत असावेत. समोर जो आला असेल तो कोण आहे आणि काय करणार आहे याचा विचार न करता आपले कर्तव्य करत रहायचे, आणि तेसुध्दा हंसतमुख राहून!

लीड्सच्या चिप्स – भाग २० – कुटुंबसंस्था

आपल्या भारतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. पिढ्यानपिढ्या एका मोठ्या कुटुंबातील माणसे एकत्र रहात असत. शेती तसेच व्यवसायांमधील त्यांची उत्पन्नाची साधनेही समाईक असत. दुष्काळ व पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आक्रमणे, लढाया वगैरे बाह्य कारणामुळेच त्यातील कांही लोकांना गांव सोडून जावे लागत असे. क्वचित कधी अगदीच पटेनासे झाले तर भावंडे वाटणी करून वेगळी होत किंवा कोणी घर सोडून चालला जात असे, पण होईल तोवर एकत्रच रहायचा प्रयत्न होत असे. नोकरीसाठी शहरात येऊन स्थाईक झाल्यावर तिथे जागा अपु-या पडायला लागल्या तसेच उत्पन्नाची साधने वेगवेगळी झाल्याने लोक वेगळ्या चुली मांडू लागले. कुटुंबाची मर्यादा फक्त आई वडील व मुले एवढ्यापर्यंत संकुचित झाली. विभक्त कुटुंब पद्धत आल्यानंतरही बहुतेक अविवाहित मुले अजून आपल्या आईवडिलांच्या बरोबरच राहतात. मुलाचे लग्न होऊन त्याचा नवा संसार सुरू झाल्यानंतरसुद्धा त्याचे आई वडील त्याच्याबरोबर रहात असल्याचे अनेक घरात दिसते. त्यामुळे आजी आजोबा व नातवंडे एकत्र रहात असल्याचे दृष्य भारतातल्या अनेक घरांमध्ये पहायला मिळते. काका, मामा, मावशी, आत्या तसेच चुलत, मावस, आते, मामे भावंडे एकमेकांबरोबर संपर्कात असतात व लग्नासारख्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहतात. अशा प्रकारे आपले नातेसंबंध बळकट असतात.

पाश्चिमात्य देशात मात्र कुटुंबसंस्था कदाचित आपल्याइतकी मजबूत कधी नसावीच. काका, मामा वगैरे सगळे अंकल आणि काकू, आत्या वगैरे ऑंटी. सख्खी सोडून इतर सगळी भावंडे कझिन्स असा त्यांचा उल्लेख होत असे. ते फारसे एकत्र कधी रहातच नसत. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात समाजात जी प्रचंड उलथापालथ झाली, धर्माचा प्रभाव नाहीसा झाला, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व प्राप्त झाले, त्यात कुटुंबसंस्था चांगलीच ढासळली आहे. मुलाला घराण्याचे नांव मिळेल तसेच मुलगा घराण्याचे नांव उज्ज्वल करेल या जुन्या संकल्पना कालबाह्य झाल्या. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आई व वडिलांनी लग्न करून एकत्र रहात असण्याची गरज उरली नाही. तो मोठा होऊन सज्ञान बनेपर्यंत ते एकत्र राहतीलच याची शाश्वती नाही. तोपर्यंत ते वेगवेगळे होऊन त्यांनी निरनिराळ्या जोडीदारांबरोबर संसार थाटलेले असण्याचीही शक्यता असते. मग मुलांनी त्यातल्या कुणाबरोबर रहायचे?

आईवडिलांपासून वेगळे रहायची संवय तर त्यांना अगदी शैशवावस्थेपासून लावली जात असते. त्यांना कळायला लागण्यापूर्वीच त्यांच्यासाठी वेगळी खोली सुसज्ज करून ठेवलेली असते. त्यांचे उठणे, बसणे, खेळणे, अगदी झोपणेसुद्धा या स्वतंत्र खोलीमध्ये होत असते. कोणालाही सज्ञान झाल्यानंतर सहजगत्या नोकरी मिळते आणि ती न मिळाल्यास सरकारकडून पुरेसा बेकारीभत्ता मिळतो. त्यामुळे शालेय शिक्षण संपता संपता मुले आपली रहाण्याची वेगळी सोय करून घेतात. मात्र व्यवस्थित आणि सुसज्ज असे स्वतंत्र घर थाटण्याइतपत आर्थिक सुस्थिती आल्यानंतरच ते लग्नाचा विचार करतात. मी असे ऐकले की आईवडीलसुद्धा मुलाला भेटायला येतात तेंव्हा त्याच्या घरी पाहुण्यांसाठी वेगळी खोली असेल तर ठीक आहे, ते तिथे राहतात. ती सोय नसेल तर सरळ हॉटेलात झोपायला जातात.

कांही वर्षापूर्वी मी लंडनला गेलो असतांना दिवसभर इकडे तिकडे भटकून झाल्यावर संध्याकाळी एका भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या चार बेडरूम असलेल्या प्रशस्त बंगल्यात त्यांना भेटायला गेलो होतो. दिवसा ते घरी भेटलेच नसते. ते जोडपे मुंबईला आमच्याकडे आलेले असतांना त्यांनी आपल्या बंगल्याचे तोंडभर वर्णन करून मला आपल्याकडे येण्याचा आग्रह केला होता म्हणून मी मुद्दाम वाकडी वाट करून त्यांच्याकडे गेलो होतो. मी सातासमुद्रापलीकडून आलेला असल्यामुळे मला निदान रात्रभर वस्तीला त्यांच्याकडे रहायला सांगणे त्यांना भाग होते. त्यांची टीनेजमधली तीन मुले अजून त्यांच्याकडेच रहात होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या बेडरूम्सची वाटणी झालेली होती. माझी झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यातल्या सोफ्यावर करण्यात आली. लंडनच्या संस्कृतीमध्ये वाढलेली तीन्ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी, बहुधा पबमध्ये संध्याकाळ घालवून रात्री एक एक करून परतली व आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. कां कोणास ठाऊक, पण ती बहुधा सर्कसमधल्या पिंज-यात ठेवलेल्या प्राण्याकडे पहावे तसे सोफ्यावर पहुडलेल्या माझ्याकडे जाता जाता पहात आहेत असे मला राहून राहून वाटत होते. यालाच बहुतेक कल्चर शॉक म्हणत असावेत. कारण आमच्या घरी जर दूरचे पाहुणे आले तर हॉलमध्येच सगळ्यांच्या पथा-या पसरून निवांतपणे गप्पा मारल्या जातात. यात कुटुंबातील सगळ्यांची भेट होते, आपुलकी निर्माण होते वगैरे. इथे तर साधी ओळख करून घेण्याची इच्छा कोणाला झाली नव्हती. दुस-या दिवशी सकाळी मुले उठण्य़ापूर्वीच माझे महत्वाचे काम असल्याचे निमित्त सांगून मी तेथून सटकलो आणि तडक हॉटेल गाठले.

लीड्सला एका ख्रिश्चन कुटुंबात एका छोट्याशा पार्टीला जायचा योग आला. तिथे भारतीय तसेच इंग्लिश असे दोन्ही वंशांचे पाहुणे आले होते. एक सत्तरीला आलेले इंग्लिश जोडपेही होते. त्यातील बाई कुटुंबव्यवस्थेला लागलेल्या उतरंडीबद्दल खूपच जिव्हाळ्याने बोलत होत्या. त्यांची मुले कुठकुठल्या दूरच्या देशात रहात असावीत, फार क्वचितच त्यांची भेट होत असे. त्यांनी लग्ने केली होती किंवा नव्हती याची कल्पना नाही. बोलता बोलता दुसरा एक इंग्रज बोलून गेला, “आजकालच्या आईवडिलांच्या मनात आपल्या वयात आलेल्या मुलांबद्दल फक्त एकच अपेक्षा असते. ती म्हणजे त्यांनी लग्न करावे, तेही मुलाने मुलीबरोबर आणि मुलीने मुलाबरोबर.”

लीड्सच्या चिप्स – भाग १९ – वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता

पूर्व आणि पश्चिम हे कधीच एकमेकांना भेटणार नाहीत, इतक्या त्यांच्या संस्कृती भिन्न आहेत, असे रूडयार्ड किपलिंगसाहेब सांगून गेले, पण तरीही जगाच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणारी माणसे एकमेकांना भेटतच राहिली व त्यांच्या आचारविचारात बरीच देवाणघेवाण होत गेली. कांही बाबतीत मात्र त्यांच्या वागणुकीमधील ठळक फरक तसेच राहिले. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ही त्यातलीच एक गोष्ट आहे. दररोज नेमाने आंघोळ करण्याला आपल्याकडे फारच महत्व आहे. अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्याच आंघोळीचे वेध लागतात. आंघोळ केल्याशिवाय कसलेही अन्नग्रहण न करणारी माणसे आहेत. संध्याकाळी घरी परतल्यानंतर कांही लोक पुन्हा एकदा सचैल स्नान करून देहशुद्धी करून घेतात. देह घासून पुसून स्वच्छ करणे हा आंघोळीमागील सर्वात महत्वाचा उद्देश असतो. तसेच आंघोळ करून झाल्यावर धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करणे आवश्यक असते. इंग्लंडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथल्या थंड हवेत अंगाला घाम येत नाही. रस्त्यामध्ये धूळ नसते, त्यामुळे ती उडून अंगाला चिकटत नाही. चेहरा सोडून सर्वांग कपड्याने झाकलेले असल्यामुळे ती शरीरापर्यंत पोचतही नाही. त्यामुळे तिकडच्या लोकांना शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करण्याची गरज भासत नाही. गरम पाण्याचा शॉवर अंगावर घेऊन किंवा गरम पाण्याने भरलेल्या टबात आरामात बसून शरीराला ऊब आणणे हा आंघोळ करण्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सवड मिळेल त्याप्रमाणे आठवड्यातून एखाद्या दिवशी आंघोळीची चैन केली तरी पुरते. अंगावर घातलेले कपडे फारसे मळत नाहीत, त्यांना कुबट वास येत नाही शिवाय धुतलेले कपडे तिकडच्या थंड हवेत लवकर वाळत नाहीत या सगळ्या कारणामुळे  रोजच्या रोज कपडे बदलण्याची त्यांना गरज वाटत नाही.

आपल्याकडे पूर्वापारपासून पायातील चपला दाराच्या बाहेर काढून ठेवण्याची पद्धत होती. त्यानंतर अंगणामध्ये पाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करायचा रिवाज होता. कालांतराने राहती घरे लहान होत गेली व दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या चपला चोरीला जाऊ लागल्या. त्यामुळे त्या घरात आणून सर्वात बाहेरील दारापाशी ठेवू लागले. टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅट्स आल्यानंतर कांही लोकांच्या घरी पायात बूट घालून दिवाणखान्यापर्यंत येणे क्षम्य मानले जाऊ लागले. पण पायात जोडे घालून त्यापुढे स्वयंपाकघरात मात्र अजूनही कोणी जात नाही. इंग्लंडमध्ये हिंवाळ्यात पायाखालील जमीन बर्फाच्या लादीसारखी थंडगार झालेली असते, कधीकधी तर त्यावर बर्फाचा थरही साठलेला असतो. त्यामुळे “पादस्पर्शम् क्षमस्वमे” म्हणण्याला ती बधत नाही. तिच्यावर अनवाणी चालल्यास ती पायच काय सारे शरीर गोठवून बधीर करून टाकते. त्यामुळे चोवीस तास पायात मोजे चढवलेले तर असतातच, पण झोपणे सोडून इतर वेळी पायातील बूटसुद्धा फारसे काढले जात नाहीत. अलीकडच्या काळात घराच्या जमीनीवर लाकडाचा थर असतो आणि भिंतीसुध्दा तापवून थोड्या उबदार केल्या असल्यामुळे परिस्थिती सुसह्य झाली आहे.

आपल्याकडे सचैल स्नान करून शुचिर्भूत झाल्याखेरीज कोठलेही धार्मिक कृत्य सुरू करता येत नाही. तसेच ते करतांना पायात कसलेही पादत्राण घातलेले चालत नाही. पायातील जोडे, चपला बाहेर काढून ठेवल्याशिवाय देवळात प्रवेश करता येत नाही. दक्षिण भारतातील कांही देवळात तर उघड्या अंगानेच जावे लागते. इंग्लंडमध्ये असला कसलाच विधीनिषेध नाही. तुम्ही पारोशा अंगाने व पायातील बूट न काढता चर्चच्या कोठल्याही भागात फिरू शकता व तिथे जाऊन प्रार्थना करू शकता. गंमत म्हणजे आपण शुभकार्य करतांना डोक्यावर पागोटे किंवा टोपी घालतो तर तिकडे चर्चमध्ये आंत गेल्यानंतर डोक्यावरील हॅट काढून हातात घेतात.

पूर्वीच्या काळी घराबाहेरील अन्न खाणेसुद्धा निषिद्ध होते. त्यामध्ये स्वच्छता सांभाळण्याचा हेतू असावा असा माझा अंदाज आहे. सगळे लोक प्रवासाला जातांना आपापले जेवणखाण घरी बनवून आपल्याबरोबर बांधून नेत असत. मध्यंतरीच्या काळात ही बंधने बरीच शिथिल झाली होती. आता संसर्गजन्य रोगांच्या भीतीने पछाडले गेल्यामुळे पुन्हा एकदा लोक घरी शिजवलेल्या सात्विक व निर्जंतुक खाण्याला प्राथमिकता देऊ लागले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ठेल्यावरील पदार्थ खाणे टाळू लागले आहेत. हवेत धूळ नसली आणि माशांचा उपद्रव नसला तरीसुद्धा उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे इंग्लंडमध्ये पूर्वीच बंद झाले होते. पण रोज घरी स्वयंपाक करणेही कमीच. बेकरीमध्ये किंवा मोठ्या भटारखान्यात तयार केलेल्या असंख्य प्रकारच्या खाद्यवस्तू हवाबंद पॅकिंग करून विकायला ठेवलेल्या असतात. त्या घरी नेऊन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तापवायच्या आणि खायच्या ही आता सर्वमान्य पद्धत झाली आहे. त्यात पुन्हा हस्तस्पर्शविरहित यासारखे सोवळे प्रकार असतात. भाज्या सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यात बंद असतात. त्यात “हिरवी (ग्रीन)” म्हणजे रासायनिक खते व जंतुनाशके न वापरता पिकवलेली भाजी वेगळी मिळते. पण जमीनीतून उगवलेली एकदम ताजी भाजी पाहिजे असेल तर मात्र स्वतःचेच किचन गार्डन हवे. सर्वसामान्य लोक असले फरक सहसा करत नाहीत. जे कांही स्वस्त व मस्त असेल, ज्याची आकर्षक “डील” मिळत असेल त्यावर उड्या मारतांना दिसतात.

व्यक्तिगत जीवनात आपल्याइतकी शरीराची “स्वच्छता” न सांभाळणारे इंग्रज लोक सार्वजनिक जागा मात्र कमालीच्या स्वच्छ ठेवतात. रस्त्यावर थुंकणे, नाक शिंकरणे अजीबात चालत नाही, इतर विधींचा प्रश्नच येत नाही. रस्त्यात भटकी कुत्री नसतात. गाई बैल गावापासून खूप दूर त्यांच्या गोठ्यात ठेवलेले असतात. गोपूजनासाठी एका गायीला वाघसिंह ठेवायच्या पिंज-यात घालून बंदोबस्तात आणलेली मी पाहिली. रस्त्यामध्ये तसेच सर्व सार्वजनिक जागांवर जागोजागी आकर्षक कचराकुंडे ठेवलेली असतात. आपल्याकडील कचरा त्यातच टाकायची संवय लोकांना लालगलेली आहे. घराघरातील कचरा ठराविक प्रकारच्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या थैलीत घालून तमजल्यावरील एका खोलीत किंवा जवळच्या सार्वजनिक कचराकुंडात नेऊन ठेवायचा. रोज कचरा वाहून नेणारी गाडी येऊन यंत्राच्या सहाय्याने तो उचलून घेऊन जाते. रस्त्यावर दिसणारी घाण म्हणजे मुख्यतः झाडांची गळून पडलेली पाने असतात. त्यामुळे बाहेर जाऊन आल्यावर लगेच पायातील बूट काढून टाकावेत असे वाटावे इतके ते किळसवाणे वाटत नाहीत.

एकदा मी कुत्र्याला सोबत घेऊन फिरणा-या एका ललनेचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. ती मुलगीसुद्धा सर्व तयारीनिशी फिरायला आली होती. तिकडच्या कुत्र्यांच्या संवयी मात्र भारतातील कुत्र्यांच्यासारख्याच आहेत. कुत्र्याने आपले काम करताच तिने शांतपणे आपल्या पिशवीतून टॉयलेट पेपरचा रोल काढला, हातावर मोजे चढवले. कागदांनी ती जागा अगदी स्वच्छ करून ते कागद आणि मोजे जवळच्या कच-याच्या कुंडात टाकल्यानंतर ती पुढे गेली.

भारतातील कोणतीही मुलगी हे नुसते ऐकूनच ईईईईई करेल!

लीड्सच्या चिप्स – भाग १८ – थॅकरेज मेडिकल म्यूझियम

शत्रूचा संहार करण्यासाठी वापरात येणा-या विनाशकारी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणारे रॉयल आर्मरीज वस्तुसंग्रहालय जसे लीड्स येथे आहे तसेच माणसाचा प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाची जी धडपड सुरू आहे तिचे सम्यक दर्शन घडवणारे थॅकरेज मेडिकल म्यूझियमसुद्धा त्याच गांवात आहे. इसवी सन १९९७ मध्ये उघडलेल्या या संग्रहालयाने दरवर्षी इंग्लंडमधील ‘म्यूझियम ऑफ द ईअर’ हा बहुमान आपल्याकडे ठेवला आहेच, त्याशिवाय ‘म्यूझियम ऑफ द युरोप’ हा सन्मानसुद्धा पटकावला आहे. वैद्यकीय शास्त्रात व संबंधित तंत्रज्ञानात गेल्या दोन अडीचशे वर्षात कशी प्रगति होत गेली याचा माहितीपूर्ण तसेच कधी मनोरंजक तर कधी चित्तथरारक वाटणारा आढावा या ठिकाणी घेतला आहे. मात्र रॉयल आर्मरीजमध्ये संपूर्ण जगातील शिकारी व युद्धाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तसे इथे नाही. इथला सगळा प्रपंच मुख्यतः लीड्सच्या आसपासचा परिसर, युरोपमधील काही भाग इतक्याच प्रदेशापुरता मर्यादित आहे. जर्मनीमध्ये विकसित झालेली होमिओपथीसुद्धा त्यात अंतर्भूत नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेद, युनानी किंवा चिनी वैद्यकाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. वेगवेगळ्या काळात त्या भागात राहणा-या लोकांच्या अंधश्रद्धा, आरोग्यासंबंधी असणारे त्याचे अज्ञानमूलक गैरसमज वगैरे सुद्धा संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत. त्यातील कांही गोष्टी आपल्याला ओळखीच्या वाटतात, कांही चमत्कारिक वाटतात.

लीड्स येथील सेंट जेम्स या प्रमुख हॉस्पिटलच्या आवारातीलच एका वेगळ्या इमारतीत हे म्यूझियम आहे. बाहेरून त्याचा सुगावा लागत नाही. आपल्या जे.जे.हॉस्पिटलप्रमाणेच या हॉस्पिटलचे आवार अवाढव्य असून अनेक इमारतींमध्ये विखुरलेले आहे. त्यात नव्या जुन्या सगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्ज आहेत. रस्त्यावरील पाट्या व दिशादर्शक खुणा वाचत शोधतच तिथे जोऊन पोचलो. तिकीट काढून प्रवेश करतांक्षणी उजव्या हांताला एक दरवाजा लागतो. इथे लहान मुलांना प्रवेश निषिद्ध आहे. हृदय कमकुवत असलेल्या मोठया माणसांनीसुद्धा आंत जाण्याचा धोका पत्करू नये असे ठळक अक्षरात लिहिले आहे. त्यामुळे आपले हृदय धडधाकट आहे असे लहान मुलांना दाखवण्यासाठी त्यांना बाहेर थांबवून सज्ञान मंडळी आंत जातात.

तिथे एकच शो दर पांच मिनिटांनी पुन्हा पुन्हा दाखवतात. आधी सभागृहात अंधार गुडुप होताच आर्त संगीताच्या लकेरी सुरू होतात. अठराव्या शतकातील एक दृष्य पडद्यावर येते व खर्जातील घनगंभीर आवाजात कॉमेंटरी सुरू होते. त्यात सांगतात की हॅना डायसन नांवाच्या एका दहा अकरा वर्षाच्या मुलीला अपघातात झालेल्या व चिघळून सडू लागलेल्या जखमेचे विष तिच्या अंगात भिनू नये यासाठी तिच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या काळात भूल देणे नसतेच. भीतीनेच अर्धमेली झालेली ती पोर कण्हत असते. चारी बाजूंनी तिचे हातपाय करकचून आवळून धरतात. ती आणखीनच जोरात टाहो फोडते. कसायासारखा दिसणारा डॉक्टर हांतात सुरा पाजळत येतो आणि एका घावात तिचा पाय कापून वेगळा करतो. ती पोर जिवाच्या आकांताने किंचाळते आणि थंडगार पडते. एकदम भयाण नीरव शांतता पसरते. त्यानंतर कॉमेंटरीमध्ये सांगतात की या भयानक शस्त्रक्रियेनंतरसुद्धा तिच्या जगण्याची शक्यता कमीच असते. बरेचसे रुग्ण त्या धक्क्याने हृदयक्रिया बंद पडून दगावतात तर अनेक लोक त्यातून होणारा रक्तस्राव सहन करू शकत नाहीत. ज्यांच्या नशीबाची दोर बळकट असेल असे थोडेच लोक यातून वाचतात. पण इतर मार्गाने त्यांना वाचवणे अशक्य झालेले असते तेंव्हाच नाइलाजाने शस्त्रक्रिया केली जाई.

पुढे जाऊन आपण एका गुहेत प्रवेश करतो. त्यापूर्वीच वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळ्या व्यक्तीची नांवे लिहून ठेवलेल्या चतकोर कागदांचे सातआठ गठ्ठे ठेवलेले दिसतात. समोर मोठ्या फलकांवर त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती लिहिलेली असते ती पाहून आपण निवड करावी व  आपल्याला वाटतील तितके कागद उचलून हातात धरावेत. ही सारी माणसे दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील लीड्सची रहिवासी होती. कदाचित ती काल्पनिक असतील किंवा प्रत्यक्षात होऊन गेलेलीही असतील. त्यात कोणी बालक, कोणी वृद्ध, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी ऐशोआरामात रहाणारे तर कोणी काबाडकष्ट करणारे असे होते. त्या सर्वांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात एवढेच समान सूत्र. पुढे गेल्यावर त्या सर्वांचे प्रत्यक्ष दर्शन होते. त्या काळातील घरे, घरातील सामानसुमान, आजूबाजूचा परिसर कुठे स्वच्छ, कुठे गलिच्छ आणि त्यात बसलेली, उभी किंवा झोपलेली आजारी माणसे ही सगळी दृष्ये अप्रतिम कलात्मकतेने पण अत्यंत वास्तववादी वाटावीत अशी उभी केली आहेत. त्या काळातील घरामधील उजेड किंवा काळोख, नाकात घुसणारे सुवास किंवा उग्र दर्प, कानावर आघात करणारे विचित्र ध्वनि, गोंगाट वगैरे सगळे कृत्रिम रीतीने निर्माण करून ते दृष्य आपल्याला खरोखरच त्या भूतकाळात घेऊन जाते.

प्रत्येक रोग्यावर त्या काळानुसार कोणकोणते उपचार होण्याची शक्यता तेंव्हा होती याचे पर्याय त्या त्या ठिकाणी एकेका फलकावर मांडलेले होते. प्रत्येकासाठी त्या काळात लागणारा अंदाजे खर्च त्यापुढे लिहिला होता. एक दृष्य पाहून पुढे जाण्यापूर्वी रोगाचे गांभीर्य व रोग्याची आर्थिक क्षमता यांचा विचार करून त्यामधील आपल्याला जो बरा वाटेल तो निवडून आपण हातातील कागदावर तशी खूण करून ठेवायची. या प्रकारे आपणसुद्धा भावनिक रीत्या त्या गोष्टीत गुंततो. त्या रोग्यांना जडलेला रोग कशामुळे झाला असावा याबद्दल तत्कालिन लोकांची जी कल्पना असेल त्याप्रमाणेच उपचार ठरणार. बहुतेक लोकांना तो ईश्वरी कोप वाटायचा. कुणाला भूतबाधा, चेटूक, करणी वगैरेचा संशय यायचा तर कांही लोकांना अन्नातून विषबाधा झाली असेल किंवा एखादा विषारी पशु किंवा कीटक चावल्याची शंका यायची. रोगजंतु व विषाणूंचा शोध अजून लागला नव्हता. प्रारब्ध, पूर्वसंचित वगैरै गोष्टी हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.  

जसे रोगाचे निदान होईल त्यानुसारच उपचारसुद्धा होणार. त्यामुळे चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे, साधुसंतांचा आशीर्वाद घेणे, चेटकिणीकडून करणीवरील उतारा मिळवणे, गळ्यात किंवा दंडावर तावीज बांधणे, अंगावर, कपड्यावर किंवा भिंतीवर एखादे चिन्ह काढणे, गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहणे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे, डॉक्टरकडे जाऊन त्यांची अत्यंत महागडी औषध घेणे वगैरे पर्याय असत. डॉक्टरांची औषधेसुद्धा विविध खनिज रसायने आणि प्राणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थांचे परंपरा व अनुभव यानुसार केलेले मिश्रण असायचे. पूर्वानुभव व अनुमान धपक्याने ते दिले जायचे. त्याने गुण आला तर आला, नाहीतर रोग्याचे नशीब. इतक्या तपासण्या करून, वैज्ञानिक दृष्टीने विचारपूर्वक निदान करून व कार्यकारणभाव जाणून घेऊन आजकाल औषधयोजना केली जाते तरीही हे विधान ओळखीचे वाटते. या परिस्थितीत अजूनही आमूलाग्र बदल झाला आहे असे वाटत नाही. महाराणी व्हिक्टोरियाच्या काळातील त्यांतील प्रत्येक रोग्याचे प्रत्यक्षात शेवटी काय झाले याची उत्कंठा म्यूझियमतून बाहेर पडण्यापूर्वी शमवली जाते.

गुहेतून बाहेर पडल्यावर आपण वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य दालनात जातो. सुरुवातीला असे दिसते की लीड्समध्ये राहणा-या एका डॉक्टरने आरोग्य व स्वच्छता यातील परस्परसंबंध सर्वात आधी दाखवून दिला. ‘लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरीबी’ ही अतिशय चुकीची कल्पना आहे. उंदीर, माश्या, पिसवा यांचा सुळसुळाट असलेल्या, सांडपाण्याचा निचरा होत नसलेल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराई फैलावण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बंगल्यामध्ये राहणारे अमीर उमराव त्या मानाने निरोगी असतात. हे सगळे त्याने आकडेवारीनिशी मांडले व नगरपालिकेने यात लक्ष घालून नगराच्या दरिद्रनारायणांच्या भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे याचा पाठपुरावा केला. सूक्ष्म आकाराच्या अदृष्य रोगजंतूंचे अस्तित्व त्या काळात कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे घाण आणि रोगराई यातील प्रत्यक्ष संबंध कशा प्रकारे जुळतो हे त्या डॉक्टरला सांगता येत नव्हते, पण तो निश्चितपणे आहे असे त्याचे ठाम मत होते व ते आकडेवारीच्या प्रत्यक्ष पुराव्यानिशी त्याने दाखवून दिले.

त्यानंतरच्या काळात एडवर्ड जेन्नर व लुई पाश्चर प्रभृतींनी वेगवेगळे रोगजंतु सूक्ष्मदर्शक यंत्रातून आधी स्वतः पाहिले आणि जगाला दाखवले. तसेच ते मानवी शरीरात गेल्यामुळे संसर्गजन्य आजार होतात हे सिद्ध केले. हवेवाटे फुफ्फुसात, अन्नपाण्यावाटे जठरात व त्वचेवाटे किंवा तिला झालेल्या जखमांमधून रक्तप्रवाहात ते प्रवेश करतात आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निरनिराळे रोग निर्माण होतात हे समजल्यावर त्यावर प्रतिबंधक उपाय शोधणे शक्य झाले. अनेक प्रकारची जंतुनाशक रसायने तसेच रोगप्रतिबंधक लशींचा शोध लागत गेला. दुस-या महायुद्धकाळात सापडलेल्या पेनिसिलीनने या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठला व प्रभावी रोगजंतुनाशकांचा एक नवा वर्ग निर्माण केला. श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण आदि मानवी शरीराच्या मूलभूत क्रिया तसेच अस्थि, मांस, रक्त, मज्जा आदि शरीराच्या घटकांबद्दल जसजशी अधिकाधिक माहिती समजत गेली तसतसे रोगांचे स्वरूप समजत गेले व त्यावरील उपाययोजना करणे वाढत गेले हा सगळा इतिहास विविध चित्रे आणि प्रतिकऋतींच्या माध्यमातून सुरेख व मनोरंजक पद्धतीने मांडला आहे.

शस्त्रक्रिया आणि मुलाचा (किंवा मुलाची) जन्म या दोन विशिष्ट विषयासंबंधी माहिती देणारी खास दालने या संग्रहालयात आहेत. या दोन्हीमध्ये गेल्या दोनशे वर्षात कसकसे बदल होत गेले, त्यात आधी आणि नंतर घेण्याची काळजी, शस्त्रक्रिया सुरू असतांना कसली मदत लागते, कोणत्या आधुनिक सुविधा आता उपलब्ध आहेत वगैरे कालानुक्रमे व सविस्तर दाखवले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तान्ह्या बाळाचा मऊ स्पर्श, गरोदरपणामुळे शरीरावर पडणारा ताण वगैरेंची कृत्रिम प्रात्यक्षिके ठेवली आहेत. वाढत्या लहान मुलांचे संगोपन, त्यांना होऊ शकणारे आजार व त्यापासून दूर राहण्यासाठी बाळगायची सावधगिरी वगैरे गोष्टी एका वेगळ्या दालनात दाखवल्या आहेत.

डॉक्टरी पेशासाठी लागणारी थर्मॉमीटर व स्टेथोस्कोपासारखी साधने, शस्त्रक्रियेसाठी लागणारी आयुधे, एक्सरे फोटोग्राफी, सोनोग्राफी आदि यांत्रिक साधनांचीही  थोडक्यात ओळख करून दिली आहे. या वस्तुसंग्रहाच्या जोडीनेच या आवारात अशा सहाय्यक वस्तूंची तसेच वैद्यकशास्त्रावरील पुस्तकांची विक्री सुद्धा होते. तसेच या विषयावरील तज्ञांचे परिसंवाद वर्षभर सुरू असतात. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमुळे त्यावर होणारा खर्च भरून निघतो तसेच मानवजातीची एक प्रकारे सेवाच घडते. असे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय लीड्सच्या वास्तव्यात पहाण्याची संधी मिळाली.

लीड्सच्या चिप्स – भाग १७ – रॉयल आर्मरीज म्यूझियम

लीड्स शहराच्या लोकवस्तीच्या मानाने तेथे जास्तच वस्तुसंग्रहालये आहेत. कदाचित बाहेरून येणा-या पर्यटकांना आकर्षित करणे हा त्यामागील एक उद्देश असेल असे ती प्रदर्शने पाहणा-या प्रेक्षकांना पाहिल्यावर वाटते. या सर्वात रॉयल आर्मरीज म्यूझियम अव्वल नंबरावर खचित येईल. आपल्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमची भव्य वास्तु त्यापेक्षा आकाराने मोठी आहे. ग्वाल्हेर, बडोदा, म्हैसूर व जयपूरच्या राजेरजवाड्यांनी केलेले संग्रह विलक्षण आहेत, पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गोष्टी पहायला मिळतात, इंग्लंडमधील लंडनचे टॉवर म्यूझियम तसेच बर्मिंगहॅम व एडिंबरा येथील म्यूझियम्स वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत तसेच प्रेक्षणीय आहेतच. पण या सर्व म्यूझियम्समधील सारी शस्त्रास्त्रे एकत्र आणली तरीही लीड्सच्या ‘रॉयल आर्मरीज’ची सर त्यांना येणार नाही. इतर ठिकाणी फक्त ऐतिहासिक काळातील वस्तु दिसतील पण या ठिकाणी आदिमानवाने वापरलेल्या अणकुचीदार दगडापासून इराकमधील युद्धात उपयोगात आणलेल्या अत्याधुनिक अस्त्रापर्यंत सगळ्यांचे अनेक रूपात दर्शन घडते. 

लीड्स येथे आयर नदी व तिच्या समांतर वाहणारा कृत्रिम कालवा या दोन्हींच्या बेचक्यात या म्यूझियमची आधुनिक ढंगाची चार मजली इमारत उभी आहे. एका कोप-यावर कांचेचा पारदर्शक टॉवर आहे. कट्यार खंजीरापासून पिस्तुल बंदुकीपर्यंत हातात धरून चालवायची शेकडो हत्यारे त्यात वरपासून खालपर्यंत आंतल्या बाजूला चोहीकडे अत्यंत कलात्मक रीतीने टांगून ठेवली आहेत. पुन्हा त्यातील प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. खालून वरून किंवा कोठल्याही मजल्याला जोडणा-या मार्गिकेतून पाहिल्यास त्याच्या भव्य देखाव्याने डोळे दिपून जातात.

प्रत्येकी दोन मुख्य मजले व दोन उपमजले अशी त्या चार मजल्यांची रचना आहे. चारही मजल्यावर अनेक हॉल आहेत. प्रत्येक हॉलच्या भिंतींच्या कडेकडेने मोठमोठ्या कपाटात प्रेक्षणीय वस्तु मांडून ठेवल्या आहेत. मुख्य मजल्यांच्या हॉल्सच्या मधोमध कुठे श्रुंगारलेला हत्ती, तर कुठे उमद्या घोड्यावर आरूढ झालेला स्वार अशा भव्य प्रतिकृती उभ्या करून त्या जागी त्यावरील उपमजल्यावर भरपूर मोकळी जागा ठेवली आहे. त्यामुळे तो देखावा अधिक भव्य दिसतोच, शिवाय वरील गॅलरीतूनसुद्धा तो वेगवेगळ्या कोनातून पाहता येतो. कांही ठिकाणी मुख्य मजल्यावरील हॉलच्या मध्यभागी छोटेसे रंगमंच उभारून समोर बसून पहायला खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत. त्याच ठिकाणी वरील उपमजल्यांवर मध्यभागी ठेवलेल्या मोकळ्या जागेतूनही खालच्या रंगमंचावर चालणारे नाट्य पाहता येते. अशा प्रकारे सर्व जागेचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे.

इथे फक्त शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नाही. त्यांचा उपयोग होत असताना घडलेल्या घटना इथे तितक्याच प्रकर्षाने दाखवल्या आहेत. त्यामुळे त्याला जीवंतपणा आला आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी छोटीशी, फक्त दहा पंधरा माणसे बसू शकतील एवढी लहान बंदिस्त सभागृहे आहेत. विशेष घटना दाखवणारी चलचित्रे त्यांमध्ये पडद्यावर एकापाठोपाठ एक दाखवीत असतात. आपण वाटेल तितका वेळ बसून ती पहात राहू शकतो. जागोजागी कॉम्प्यूटर मॉनिटर्स ठेवलेले आहेत. त्यांच्यासमोर बसून आपल्याला पाहिजे ती दृष्यशृंखला निवडून पहात बसता येते, तसेच महत्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती वाचता व पाहता येते. एका बाजूला ‘शिकार’ आणि दुस-या बाजूला ‘युद्ध’ अशा दोन मुख्य विभागात हे म्यूझियम विभागलेले आहे.
इंग्लंडमधील कांटेरी झुडुपातून कुत्र्यांच्या सहाय्याने केलेली रानडुकराची शिकार असो, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीतील विशालकाय मगरींची किंवा भारतीय उपखंडातील घनदाट अरण्यातील हिंस्र पशूंची असो, त्यांची दृष्ये दाखवणारे त्रिमिति देखावे किंवा प्रचंड तैलचित्रे ‘शिकार’ या भागात पहायला मिळतात. त्यात पुन्हा वेगवेगळ्या कालखंडात वापरात आलेली तंत्रे, तत्कालिन शस्त्रे यांची माहिती दिलेली आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच त्याच्या हातातील आयुधांचा कसकसा विकास होत गेला याचा मागोवाही घेता येईल. अनादि काळापासून माणसाची निसर्गाबरोबर झटापट चाललेलीच आहे, तिचे सम्यक दर्शन या भागात घडते.

जगभर वेगवेगळ्या खंडात झालेल्या सर्व मुख्य लढाया ‘युद्ध’ विभागात दाखवल्या आहेत. त्यात कांही देखाव्यांच्या स्वरूपात आहेत तर अन्य सर्व चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत. इतिहासाचा अभ्यास करणा-या लोकांसाठी तर ही पर्वणीच आहे. इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाच्या सर्व युद्धघटनांची तारखेनिशी तपशीलवार माहिती विस्ताराने दिली आहे. भारत, चीन, जपान आदि पौर्वात्य राष्ट्रांमध्ये घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना, तेथील युद्धशास्त्र, प्राचीन काळातील शस्त्रे, युद्धात घालण्याचे पोषाख यांचे दर्शन घडवणारे स्वतंत्र दालन आहे. याशिवाय आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका खंडातील आदिम रहिवाशांची बूमरँगसारखी वैशिष्ट्यपूर्ण हत्यारेसुद्धा संग्रहात ठेवून त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जात असे याची सुंदर सचित्र माहिती दिली आहे.

दर तासातासाला होणारे लाईव्ह शोज हे या जागेचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. म्यूझियममध्ये प्रवेश करतांनाच आपल्या हातात एक कागद दिला जातो, त्यात त्या दिवशी होणारे कार्यक्रम दिलेले असतात. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी नट नट्या त्या प्रसंगाला साजेसे असे कपडे घालून रंगमंचावर येतात व वीस पंचवीस मिनिटे त-हेत-हेचे नाट्य सादर करतात. यात प्रचंड विविधता असते. मी पाहिलेल्या एका प्रसंगात अंगात चिलखत घालून व डोक्यावर चिरेटोप चढवून ढाल व तलवारीचा वापर करून दोन योध्यांनी केलेले लुटुपुटीचे द्वंद्वयुद्ध दाखवले तर सैनिकांच्या सेवेसाठी युद्धावर गेलेल्या एका परिचारिकेने पाहिलेल्या जखमी वीरांची करुण कहाणी तिच्याच शब्दात एका स्वगताद्वारे दुस-या प्रसंगात ऐकवली. यातील एका सैनिकावर तेचे मन जडलेले असल्याने ते नाट्य अधिकच भावनाप्रधान झाले होते. तिस-या खेळात इतिहासकाळातील एका सुप्रसिद्ध सेनापतीने आपल्या जवानांना उद्देशून केलेले वीररस व देशभक्तीपूर्ण भाषण सादर केले होते. कधीकधी तर इमारतीसमोरील मोकळ्या जागी घोडेस्वारांची लढाईसुद्धा दाखवतात.

युरोप अमेरिकेत कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी गेलात तर तेथून बाहेर पडण्याच्या वाटेवर दोन दालने नेहमी दिसतील. त्यापैकी एकात अल्पोपाहारगृह असते आणि दुसरे म्हणजे त्या जागेच्या ठळक खुणा दाखवणा-या सॉव्हेनीयर्सचे दुकान असते. तशी ती इथेही आहेतच. रॉयल आर्मरीजमध्ये आलेला प्रेक्षक दिवसभर इथेच गुंतून राहील याची त्याच्या व्यवस्थापकांना बहुधा खात्री असावी. कारण इथे दुस-या मजल्यावरसुद्धा एक प्रशस्त फास्टफूड सेंटर आहे. म्हणजे अर्धे प्रदर्शन पाहून झाल्यावर बाहेर न जाता खाण्य़ापिण्यासाठी मध्यंतर घेऊन, ताजे तवाने होऊन उरलेला अर्धा भाग निवांतपणे पहाण्याची सोय करून ठेवली आहे. नाना प्रकारची खेळण्यातली हत्यारे, मुखवटे आणि प्रदर्शनातील वस्तू व देखाव्यांची चित्रे काढलेल्या विविध वस्तु येथील स्मरणचिन्हांच्या दुकानात मिळतात. त्यात गालिचे, वॉल हँगिंग्ज, पिशव्या, रुमाल यासारखी कापडे तर असतातच, पण लहान मुलांसाठी पेन्सिल, रबर आणि फूटपट्ट्या, गळ्यात घालायच्या माळा वा कानात लटकवायची ईयररिंग्ज, कॉफी मग, फुलदाण्या वगैरे अगदी वाटेल त्या वस्तू असतात.

त्याशिवाय येथे आणखी एक नाविण्यपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. बाहेर पडायच्या वाटेवरील दालनात दोन मोठमोठ्या बंदुका माउंट करून ठेवलेल्या आहेत व त्याला दुर्बिणी वगैरे व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत. त्यांच्यासमोरील बंद केबिनमध्ये टार्गेट्स ठेवलेली असतात. त्यासाठी लागणारे शुल्क भरून कोणीही त्या लक्ष्यांवर नेम धरून या बंदुका चालवण्याची नेमबाजी करू शकतो व घरी जाता जाता कधी नव्हे तो बंदूक चालवण्याचा एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी परवाना वगैरे काढण्याची गरज नसते. 

अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. इथे शस्त्रास्त्रे नुसती दाखवायसाठी मांडून ठेवलेली नाहीत तर ती कुठे, कधी व कशी बनली, त्यांची वैशिष्ट्ये कोणती, ती कुणी कुणी कोठल्या प्रसंगी वापरली, त्याचा जगाच्या इतिहासावर कोणता ठसा उमटला अशा अनेक पैलूंचे एक समग्र दर्शन घडते, एवढेच नव्हे तर इथली शिल्पे, चित्रे, सिनेमे, नाट्यछटा, कॉंप्यूटर सिम्युलेशन्स वगैरे सारे पाहिल्यावर एक आगळाच सर्वंकश अनुभव घेऊन आपण बाहेर येतो.

लीड्सच्या चिप्स -भाग १६- लोह्डी आणि संक्रांत

भारतात असतांना नेहमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरील देवळांच्या आत सुद्धा मी क्वचित कधी तरी डोकावीत असेन. मला त्याचे आकर्षण जरा कमीच वाटते. पण लीड्सला राहतांना मात्र कधी कधी मुद्दाम वाकडी वाट करून तिथल्या मंदिरात जावेसे वाटायचे.  एक तर थोड्या काळासाठी आपल्या देशातल्या ओळखीच्या वातावरणात आल्याचा भास व्हायचा आणि दुसरे म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांसाठी गांवात कुठे कुठे खास कार्यक्रम होणार आहेत ते तिथे हमखास कळायचे. १३ जानेवारीच्या संध्याकाळी ‘लोह्डी दी रात’ आणि ‘मकर संक्रांत’ यानिमित्त एक सार्वजनिक कार्यक्रम त्याच जागी करायचे ठरवले आहे असे एके दिवशी तेथे गेलो असतांना समजले. माझ्या वास्तव्यातला तो तिथला एकमेव सामुदायिक कार्यक्रम होता व त्यासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण होते त्यामुळे एकदा जाऊन पहायचे असे ठरवले.

आमच्या लहानपणी संक्रांतीच्या आदले दिवशी ‘भोगी’ साजरी केली जायची. त्या दिवशीच्या जेवणात गरम गरम मुगाची खिचडी, त्यावर साजुक तुपाची धार, सोबतीला तळलेले पापड, तव्यावर भाजल्यानंतर आगीच्या फुफाट्यावर फुगवलेली बाजरीची भाकरी, अंधा-या रात्रीच्या आकाशात विखुरलेल्या तारकांसारखे काळसर रंगाच्या त्या भाकरीवर थापलेले तिळाचे पांढरे दाणे, त्यावर ताज्या लोण्याचा गोळा, मसाल्याने भरलेल्या लुसलुशीत कोवळ्या वांग्यांची भाजी असा ठराविक मेनू असायचा. हे सगळे पदार्थ अनेक वेळा जेवणात वेगवेगळे येत असले तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून त्या दिवशी ते खास जेवण जेवण्यातली मजा और असायची. मुंबईला आल्यावर तिथल्या दिव्यांच्या झगमगाटात बहुतेक लुकलुकणा-या तारका लुप्त झाल्या आणि तीळ लावलेली ती बाजरीची भाकरीही स्मरणातून हद्दपार झाली. एखाद्या तामीळ किंवा तेलुगुभाषी मित्राने त्यांच्या पोंगल निमित्त त्याच नांवाचा खास पद्धतीचा भात खायला घातला तर त्यावरून आपल्या मुगाच्या खिचडीची आठवण यायची. रात्र पडल्यावर आसपास कोठेतरी एक शेकोटी पेटवली जायची आणि त्याच्या आजूबाजूला घोळका करून ढोलकच्या तालावर पंजाबी लोक नाचतांना दिसायचे. कधी कधी एखादा पंजाबी मित्र बोलावून तिकडे घेऊन गेला तर त्याच्याबरोबर जाऊन आपणही थोडे ‘बल्ले बल्ले’ करायचे. यामुळे ‘लोह्डी’ हा शब्द तसा ओळखीचा झाला होता. या परदेशात तो कसा मनवतात याबद्दल कुतुहल होते.

त्या संध्याकाळी लीड्समधले हवामान फारच खराब होते. तपमान शून्याच्या खाली गेले होते, मध्येच बोचरा वारा सुटायचा नाहीतर हिमवर्षावाची हलकी भुरभुर सुरू व्हायची, त्यामुळे दिव्यांचा अंधुक उजेड आणखीनच धूसर व्हायचा. रस्ते निसरडे झालेले असल्यामुळे चालत जायची सोयच नव्हती. वाशीला घरातून बाहेर पडले की रिक्शा मिळते तसे तिकडे नाही. टॅक्सीला तिकडे ‘कॅब’ म्हणतात, ती सेवा चालवणा-या कंपनीला फोन करायचा, ते त्यांच्या वायरलेस नेटवर्कवर कोण कुठे आहे ते पाहून त्यातल्या त्यात जवळ असलेल्या कॅबला तिकडे पाठवतील. हे सगळे खर्चिक तर होतेच. शिवाय परत येतांना कुठून फोन करायचा हा प्रश्न होता. वातावरण खराब असते तेंव्हा या सेवासुद्धा अधिकाधिक कठिण होत जातात. त्यामुळे देवळाकडे जायला मिळते की नाही याची शंका होती.

थोडी चौकशी करतां शेजारी राहणारे आदित्य आणि पल्लवी सुद्धा या प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता तिकडे जाण्याचे दिव्य करणार आहेत असे योगायोगाने समजले आणि त्यांच्या गाडीतून त्यांचेबरोबर जाण्यायेण्याची सोय झाली. तेथे जाऊन पोचेपर्यंत तेथील हॉलमध्ये बसूनच ढोलक वाजवून गाणी म्हणणे सुरू होते. तो हॉल माणसांनी असा गच्च भरलेला मी प्रथमच पहात होतो. भांगडा नाच खेळायला रिकामी जागाच उरली नव्हती. गर्दी होण्यापूर्वीच कोणी नाचून घेतले असेल तर असेल. लोह्डी आणि सुंदर मुंदरीची गाणी गाऊन झाल्यावर थोड्या वेळाने एक वयस्क गृहस्थ पुढे आले. त्यांनी सोप्या शब्दात लोह्डीच्या प्रथेशी संबंधित दुल्ला भट्टीची पंजाबी लोककथा सांगितली. या काळात शेतात नवीन पिके हाताशी आलेली असतात, वातावरण प्रफुल्ल असते, त्यामुळे लोकांना एकत्र येऊन हा सण धूमधडाक्याने साजरा करण्यात मोठा उत्साह असतो वगैरे सांगितले. भारतात जन्माला येऊन मोठेपणी तिकडे आलेल्या लोकांना ‘देसमें निकला होगा चाँद’ वगैरे वाटले असेल. तिथेच जन्माला आलेली मुले नुसतीच आ वासून ती गोष्ट ऐकत होती.

लोह्डीसंबंधी सांस्कृतिक माहिती सांगून झाल्यावर थोडक्यात सूर्याच्या मकर राशीत होत असलेल्या संक्रमणाची माहिती दिली. संक्रांत जरी दुसरे दिवशी असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने त्यासंबंधी करण्याची धार्मिक कृत्ये आताच उरकून टाकण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. हल्ली अस्तंगत होत असलेल्या, आपल्याकडील जुन्या काळातील प्रथेप्रमाणेच या वर्षी संक्रांत कुठल्या आसनावर बसून अमुक दिशेने येते, तमुक दिशेला जाते, आणखी कुठल्या तरी दिशेला पहाते वगैरे तिचे ‘फल’ पंडितजींनी वाचून दाखवले. त्याचा कशा कशावर कशा कशा प्रकारे परिणाम होणार आहे याचे भाकितही वर्तवले. कुणालाच त्यातले कांहीसुद्धा समजले नाही आणि कुणाचे तिकडे लक्षही नव्हते. सगळेच लोक पुढील कार्यक्रमाची वाट पहात होते. त्यानंतर रोजच्यासारखी सर्व देवतांची महाआरती झाली. आता पुढील कार्यक्रम गोपूजेचा असल्याची घोषणा झाली आणि सगळेजण कुडकुडत्या थंडीत हळूहळू बाहेरच्या प्रांगणात आले.

मंदिरात शिरतांनाच एक विचित्र प्रकारचा ट्रेलर प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला मी पाहिला होता. त्या जागी त्याचे काय प्रयोजन असावे ते मला कळले नव्हते पण आत जाण्याची घाई असल्याने तो लक्षपूर्वक पाहिलाही नव्हता. सर्कशीतल्या वाघ सिंहांना ज्यात कोंडून ठेवतात तसला एक पिंजरा त्यावर ठेवला होता आणि त्या पिंज-याच्या आत चक्क एक विलायती जातीची सपाट पाठ असलेली गोमाता बसली होती. गांवाबाहेरील जवळच्या कुठल्या तरी गोठ्यातून तिचे या पद्धतीने आगमन झाले होते. तिलाही एक वेगळ्या प्रकारचे दृष्य प्रथमच पहायला मिळत असणार. तिचा मालक का रखवालदार जो कोण तिच्या बरोबर आला होता तो गोरा माणूस जवळच सिगरेट फुंकीत उभा होता. त्याने पिंज-याला लावलेले कुलूप उघडून आंत शिरण्याचा मार्ग किलकिला केला.

भटजीबुवा आणि मुख्य यजमान जरा जपूनच आंत गेले. दोन चार मंत्र गुणगुणत त्यांनी हांत लांब करून गोमातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले वगैरे हलकेच किंचितशी वाहून घेतली. गायीपुढे आधीपासूनच भरपूर चारा ठेवलेला असल्याने तो खाऊन ती शांतपणे रवंथ करीत होती. हे भक्तगण तिला नाही नाही ते कांही खायला घालणार नाहीत ना इकडे त्या मालकाचे बारीक लक्ष होते. यादरम्यान एक सुरेख भरतकाम केलेली झूल बाहेरच्या मंडळींमध्ये कोणीतरी फिरवत होता. सर्वांनी तिला हात लावून घेतला. अशा प्रमाणे प्रतीकात्मकरीत्या सर्वांच्यातर्फे ती झूल त्या गायीच्या पाठीवर पांघरण्यात आली. दिवा ओवाळून तिची थोडक्यात आरती केली. ती तर भलतीच ‘गऊ’ निघाली. अगदी शांतपणे पण कुतुहलाने आपले सारे कौतुक पहात होती. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मालकाच्या डोळ्यातसुद्धा नेमका तोच भाव दिसत होता. आपापल्या लहानग्यांना कडेवर घेऊन त्यांचे मातापिता “ती पहा गाय, ती तिची शिंगे, ते शेपूट, ती अशी मूऊऊऊ करते” वगैरे त्यांना दाखवून त्यांचे सामान्यज्ञानात भर घालीत होते. ती आपल्याला दूध कशी देते हे सांगणे कठीणच होते, पूजाविधीमध्ये त्याचा अंतर्भाव नव्हता आणि ती क्रिया तिकडे यंत्राद्वारे करतात. पिंज-याच्या गजांमधील फटीतून घाबरत घाबरत हांत घालून कांही लोकांनी गायीची पाठ, पोट, शेपूट वगैरे जिथे मिळेल तिथे हस्तस्पर्श करून घेतला. तेवढीच परंपरागत भारतीय संस्कृतीशी जवळीक! या गोपूजेचा लोह्डी किंवा संक्रांतीशी काय संबंध होता ते मात्र मला समजले नाही.

आता लगेच अग्नि पेटवणार असल्याची बातमी कुणीतरी आणली आणि सगळी गर्दी तिकडे धांवली. इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाकडांचा ढीग व्यवस्थितपणे रचला होता. ती जाळण्यासाठी प्रदूषणनियंत्रक अधिका-याची रीतसर परवानगी घेतलेली होती. ती जळाऊ लाकडे कुठून आणली होती कुणास ठाऊक! जशी गाय आणली होती तशीच तीही ग्रामीण भागातून आणली असणार. मंत्रपूर्वक अग्नि चेतवून झाल्यानंतर अर्थातच सगळी मंडळी जितक्या जवळ येऊ शकत होती तितकी आली. उबदार कपड्यांची अनेक आवरणे सर्वांनी नखशिखांत घातलेली असली तरी नाकाचे शेंडे गारव्याने बधीर झाले होते, नाकाडोळ्यातून पाणी वहात होते. यापूर्वी कधीही शेकोटीची ऊब इतकी सुखावह वाटली नव्हती.

सगळ्या लोकांनी शेकोटीभोवती प्रदक्षिणा घातल्या. बहुतेक लोकांनी येतांना पॉपकॉर्नची पाकिटे बरोबर आणली होती, कांही लोकांनी रेवडीचे छोटे गोळे किंवा गजखच्या वड्या आणल्या होत्या. त्या पाहून तोंडाला पाणी सुटत होते, पण कोणीच ते तोंडात टाकत नव्हते. सगळे कांही अग्निनारायणाला अर्पण करीत होते. त्याला नमस्कार करून प्रार्थना करीत होते. नवीन लग्न झालेल्या मुलीची पहिली मंगळागौर, संक्रांतीला हलव्याचा सण वगैरे आपल्याकडे कौतुकाने करतात. पण तो संपूर्णपणे महिलामंडळाचा कार्यक्रम असतो. पंजाबी लोकांत पहिली लोह्डी अशीच महत्वाची मानतात व त्यात नव्या जोडप्याने जोडीने भाग घ्यायचा असतो. इथेही दोन तीन नवी जोडपी आलेली होती. त्यांना भरपूर महत्व मिळाले.

जेवण तयार असल्याची बातमी येताच सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. हा कार्यक्रम आटोपून आपापल्या सुरक्षित घरट्यात परतण्याची घाई प्रत्येकालाच होती. ‘मक्केदी रोटी और सरसोंदा साग’चा बेत होता. आपल्याकडे कांही देवस्थानात पिठलंभाकरीचा प्रसाद असतो तसा. आमचा त्या कार्यक्रमात श्रद्धायुक्त सहभाग नव्हताच. आमचे वरणभात पोळीभाजीचे जेवण घरी आमची वाट पहात होते. यामुळे आम्ही तिथूनच निरोप घेतला.

देवळातल्या समूहात बहुतेक गर्दी पंजाबी लोकांचीच होती. थोडे गुजराथी लोक असावेत. नखशिखांत कपड्यावरून लोकांना ओळखणे कठीणच होते. इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधील जे शब्द कानावर पडत होते त्यावरूनच त्यांची भाषा कळत होती. आमच्याशिवाय कोणीच मराठी भाषेतून बोलणारे तिथे भेटले नाहीत. आपली खरी मकरसंक्रांत दुसरे दिवशी होती. त्या दिवशीसुद्धा लोकांनी आपापल्या घरीच तिळगूळ खाल्ला असणार. निदान तेवढ्यापुरती आपली संस्कृती अद्याप टिकून आहे. या दिवशी गांवभर फिरून आप्तेष्टांना भेटणे शहरांमध्ये तरी बंदच झाले आहे. त्यामुळे या सणाचे सामूहिक स्वरूप राहिलेले नाही. ई-मेल किंवा फोनने “तिळगूळ घ्या गोड बोला” चा संदेश दिला की झाले. भारतात ही परिस्थिती आहे तर परदेशात कोण काय करणार आहेत? महिलामंडळी मात्र यानिमित्त एखादा सोयीस्कर दिवस पाहून, त्या दिवशी हळदीकुंकू वगैरे करून थोडी किरकोळ गोष्टींची ‘लुटालूट’ करतात आणि त्या निमित्ताने चांगले कपडे परिधान करून दागदागीने अंगावर चढवायची हौस भागवून घेतात. कदाचित नंतर एकाद्या सोयिस्कर वीकांताला तसे काही तरी तिकडच्या मराठी महिलांनीही लहान प्रमाणात करून घेतले असेल पण तोपर्यंत आम्ही आपल्या स्वदेशात परत येऊन गेलो होतो.

लीड्सच्या चिप्स -भाग १५- हिंदू मंदिर

या मालिकेच्या सातव्या भागामध्ये गणेशोत्सवासंबंधी लिहितांना मी लीड्सच्या मंदिराचा उल्लेख केला होता. त्याबद्दल अधिक माहिती थोड्या विस्ताराने या लेखात देत आहे. लीड्सच्या आठ लाख लोकवस्तीमधील सुमारे आठ हजार हिंदूधर्मीय आहेत, पण शीख किंवा मुसलमान जसे शहराच्या विशिष्ट भागात मोठ्या संख्येने एकत्र राहतात तशा हिंदूंच्या वेगळ्या वस्त्या नाहीत. शहराच्या सर्व भागात ते विरळपणे विखुरलेले आहेत. ब-याच वर्षापूर्वीपासून तेथे रहात असलेल्या सधन गुजराथी व पंजाबी कुटुंबामधील काही दानशूर लोकांनी एकत्र येऊन येथील हाईड पार्क भागातील अलेक्झांड्रा रोडवर एक हिंदू मंदिर बांधले आहे.
या भागात मुस्लिम धर्मीयांची मोठी संख्या आहे. तेथून जवळच त्यांनी बांधलेली एक भव्य मशीद सुद्धा आहे, तसेच अबूबेकर व मामूनिया ही भारतीय उपखंडातील लोकांना आवश्यक अशा खास वस्तु पुरवणारी मोठी दुकाने ही या भागात आहेत. मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका बाजूला एकाला लागून एक पण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गाभा-यात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. त्याच छताखाली समोर शंभर दीडशे माणसे बसू शकतील एवढे सभागृह आहे. बाजूला एक छोटेसे कार्यालय व प्रवेश करण्याची खोली आहे. त्यांच्या माथ्यावर परंपरागत शिखर आहे.

श्रीगणेशजी, कार्तिकेय, अंबामाता, राधा कृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या अत्यंत सुबक संगमरवरी मूर्ती इथे आहेत, तसेच पार्वतीच्या प्रतिमेसह शिवलिंग आहे. आपण कार्तिकेयाला ब्रह्मचारी समजतो, पण दक्षिण भारतीय लोक त्याची दोन अर्धांगिनीसह पूजा करतात. तशा त्य़ा इथेही कार्तिकेयासोबत आहेत. या मंदिरात भगवान महावीराची प्रतिमा ठेऊन जैन बांधवांच्या पूजेअर्चेची सोय केली आहे. त्याशिवाय दशावतार, रामायण, महाभारतातील प्रसंग वगैरे दाखवणारी अनेक चित्रे व भित्तीशिल्पे लावून सभागृह सुशोभित केले आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या सगळ्या प्रांतातून आलेल्या भारतीयांना येथे येऊन आपापल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेऊन त्यांची प्रार्थना करता येते. रोज सकाळी साग्रसंगीत पूजा व संध्याकाळी आरती केली जाते. ती मुख्यतः संस्कृत व कांही प्रमाणात हिंदी गुजराती या भाषांमध्ये होते. मुद्दाम या कामासाठी एका पंडितजीची नेमणूक केली आहे. पूजा आणि आरत्यांच्या नंतर खोबरे, शेंगादाणे, बदाम, काजू, बेदाणे, केळी वगैरे प्रसाद वाटला जातो. सकाळी दहा पंधरा तर संध्याकाळी वीस पंचवीस लोक नेमाने त्या वेळी दर्शनाला येतात. सणवार असेल तर अधिक लोक मुलाबाळांसह येतात.

याशिवाय अनेक रविवारी भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे ठेवतात. त्यात भाग घेणारे बहुतेक लोक स्थानिक हिंदूच असतात. कधी कधी भारतातून आलेल्या पाहुण्यांना पाचारण करतात. त्याद्वारे भारतीय संस्कृतीची, विशेषतः सणवार व चालीरीती यांची ओळख करून देण्याचे प्रयत्न सुरू असतात. बाजूलाच एका स्वतंत्र दुमजली इमारतीत दोन लहानसे हॉल आहेत. वाढदिवस, अभिनंदन, स्नेहभोजन अशासारख्या छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी भारतीय वंशाचे लोक त्याचा वापर करतात. मात्र मद्यप्राशन किंवा मांसभक्षण या ठिकाणी वर्ज्य आहे. थोडी मोकळी जागा आहे. त्या जागेत दिवाळीची आतिषबाजी, होलिका दहन, रंग उडवून खेळणे वगैरे पारंपरिक हिंदू सण समारंभ एकत्र येऊन साजरे करतात. आठ हजारांपैकी जेमतेम शंभर लोक येत असतील, पण ज्यांना इच्छा व हौस आहे त्यांना या परमुलुखातसुद्धा ती भारतीय पद्धतीनुसार भागवण्याची सोय तर आहे.

लीड्सच्या चिप्स -भाग १४ – ब्रिटीश कुटुंबाशी संवाद

मारिओ आणि नताशा या भारतीय जोडप्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, त्यांच्या अपत्याचा, म्हणजे रीसाचा बाप्तिस्मा आणि २००६ च्या नववर्षाचे स्वागत अशा त्रिवेणी निमित्त त्यांनी आपल्या घरीच एक छोटीशी लंच पार्टी ठेवली होती.  क्रिस्टीना आणि बर्नार्ड हे एक स्थानिक वयस्कर जोडपे, ईव्हान हा चर्चमार्फत समाजकार्य करणारा युवक,  मारिओच्या ऑफीसमधील तीन चार भारतीय सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय अशी अगदी मोजकी मंडळीच या घरगुती पार्टीला आली होती.  याहून जास्त लोकांना बसायला तिथे जागाही नव्हती.

लीड्सला आल्यापासून ख-या ब्रिटीश लोकांबरोबर गप्पा मारायची ही पहिलीच संधी मला मिळाली होती. बर्नार्डने बरीच वर्षे सैन्यदलात काढली होती. ते लोक कांही काळ सायप्रस व फॉकलंड या द्वीपांमध्येही राहून आले होते पण त्या ठिकाणांच्या लोकांच्या, सैन्यदलाच्या किंवा प्रवासांच्या अनुभवांबद्दल किंबहुना एकंदरीतच फारसे बोलायला बर्नार्ड मुळीसुध्दा उत्सुक दिसला नाही. क्रिस्टीना मात्र खूपच बोलकी होती. अगदी चॅटरबॉक्स म्हणावी तशी.  जवळच्याच बीस्टन या गावात दोघांनीही घालवलेल्या रम्य बालपणापासून ते नुकत्याच तासाभरापूर्वी चर्चमध्ये घडलेल्या बाप्तिस्म्याच्या धार्मिक विधीपर्यंत अनेक विषयांवर रसभरीत भाष्य करीत तीच गप्पागोष्टींचे सारे सूत्रसंचालन करीत होती. “हो ना”, ” कदाचित्”, ” नक्कीच” असे एक दोन शब्द बोलत बर्नार्ड मधून मधून तिला साथ देत होता. त्यांचे कुटुंब आंतरराष्ट्रीय असावे. एका मुलीचा विषय निघाला, ती कधी जर्मनीमध्ये तर आफ्रिकेत होती आणि अमेरिका ते ऑस्ट्रेलियात कुठे ना कुठे भ्रमण करायला जात होती. ते कुटुंब नक्कीच नाना नानी होण्याच्या वयाचे होते, पण नातवंडांचे कौतुक त्यांच्या बोलण्यात कुठे डोकावले नाही. नसत्या चोंकशा करायचा चोंबडेपणा करायचे नाही असे मी ठरवूनच टाकले होते. आणि ज्या वेगाने ख्रिस्टीना या विषयावरून त्या विषयावर उड्डाण करत होती त्यात कोठलाच धागा हातात रहात नव्हता.

पारंपरिक कुटुंबसंस्थेबद्दल ख्रिस्टीना खूपच भावूक होती. त्यामुळे भविष्यकाळात आपल्या (ब्रिटीश किंवा ख्रिश्चन किंवा मानवी यातले काहीही समजावे) समाजाचे काय होणार याची घोर चिंता तिला लागली आहे असे वाटत होते. कुणीतरी गंमतीने म्हंटले की आजकालच्या पालकांच्या मनात आपल्या वयात येत असलेल्या मुलांबद्दल एकच इच्छा, अपेक्षा किंवा आकांक्षा असते की त्यांची लग्ने व्हावीत, ती ही मुलांची मुलींबरोबर आणि मुलींची मुलांबरोबर ! तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या भारतीय लोकांनी जाहीर करून टाकले की आपण बुवा आपली मुले मोठी व्हायच्या आत मायदेशी परतणार. इंग्लंडमधले वारे तिकडे पोचणारच नाही याबद्दल केवढा विश्वास त्यांना वाटत होता? आणि तुम्ही भारतात परत गेलात म्हणून तुमची मुले तिथेच कशावरून राहणार आहेत? त्यांना पंख फुटतीलच ! 

समाजसेवेच्या निमित्ताने केलेल्या भ्रमंतीमध्ये आलेले कांही मजेदार अनुभव ईव्हानने सांगितले. तो वर्षभर बांगलादेशात राहून गेला होता त्यामुळे त्याला भारतीय उपखंडातील जीवनशैलीची थोडीफार कल्पना होती. बांगलादेशात असतांना तो कामानिमित्य तिकडच्या ग्रामीण भागातही राहून आला होता. भाषा न समजल्यामुळे होणा-या गंमती त्याने सांगितल्या. एका कँपमध्ये गेला असतांना तिथल्या मुलांनी म्हणे त्याला एक ब्रिटीश डिश बनवायला सांगितले. त्याने एक मासा मागवला, त्याला चिमट्यात पकडला आणि शेकोटीच्या जाळावर धरून खरपूस भाजला आणि हेच आमची जगप्रसिध्द आणि लोकप्रिय स्मोक्ड सामन असे ठोकून दिले. जातीवंत मासेखाऊ बंगाली लोकांनी त्यावरून हे ब्रिटीश लोक या बाबतीत किती अडाणी आहेत अशी समजूत करून घेतली असेल असे त्याला नंतर वाटू लागले. 

मारिओ आणि नताशा यांची कुटुंबे भारताच्या पश्चिम किनारपट्टीतून म्हणजे गोवा ते केरळ या भागामधून मुंबईमध्ये आली होती आणि इकडून ते वर्षभरापूर्वीच लीड्सला गेले होते. अजून तरी त्यांचा तिथला सगळा मित्रपरिवार भारतीयच होता. ते स्थानिक लोकांमध्ये मिसळलेले दिसत नव्हते. आपल्याकडल्या बाळाच्या वाढदिवसाला जसे कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणायला चार सवाष्ण बायका लागतात तसेच बापतिस्म्यासाठी सुध्दा कोणी गॉडफादर गॉडमदर वगैरे लागत असावेत आणि तेवढ्या कामापुरतीच ही स्थानिक ब्रिटीश मंडळी चर्चतर्फे आली असावीत असे त्यांच्या अलिप्तपणाच्या बोलम्यावरून वाटत होते. नताशाच्या बाळंतपणासाठी कोणी मोठी मंडळी भारतातून गेली नसावीत. त्यामुळे स्वतःच्या आणि लहानग्या रीसाच्या प्रकृतीला सांभाळून जेवढे शक्य तेवढे आदरातिथ्य ती करत होती. मारिओच पुढाकार घेऊन सगळे काम करत होता आणि इतर भारतीय मित्र त्याला मदत करत होते. स्थानिक टेक अवे मधून काही भारतीय खाद्यपदार्थ आणि बेकरी किंवा स्टोअर्समधून छान छान केक, कुकीज, वेफर्स वगैरे आणून त्यांनी चांगली मेजवानी दिली. नैवेद्याला खीर किंवा पुरण करावे तसा एक पारंपरिक पदार्थ त्यांनी घरी शिजवला होता आणि त्याची थोडी चंव चाखण्यापुरता तो पानात वाढला होता.

लीड्सच्या चिप्स -१३ – यॉर्कशायर रिपर

एखाद्या मुलीला किंवा महिलेला इमारतीच्या जिन्यांत एकटीला गांठून तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करून तिला लुटण्याच्या वाढत्या प्रकारांनी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव भागांत मागे एकदा भयंकर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या महिलेची पर्स, मोबाईल, गळ्यातील सांखळी अशा गोष्टींच्या चोरीसाठी एक पोरगा हे निर्घृण कृत्य  करीत होता असे उघडकीस आले होते. हांतातील हातोड्याने नेमका डोक्यावर नाजुक जागी घणाघात करून महिलांना एका फटक्यात जबर जखमी करण्याच्या तंत्राचा “विकास” त्याने केला होता. अशाच प्रकारे हल्ला करून पळ कांढतांना तो पकडला गेला. सुदैवाने त्याने जखमी केलेल्या बहुतेक सर्व महिलांना वेळेवर योग्य वैद्यकीय सहाय्य मिळाले व निदान त्यांचे प्राण तरी वांचले.

रामन राघव या क्रूरकर्म्याने १९६८ साली खुनी हल्ल्यांचे सत्र सुरू करून मुंबईत नुसता धुमाकूळ घातला होता. रात्री अपरात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन जागी झोपलेल्या माणसाला गांठून त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा करून त्याला ठार करण्याचा सपाटा त्याने लावला होता. या क्रूर कामासाठी त्याने एक बोथट हत्यार बनवून घेतले होते. त्याला तो कनपटी म्हणायचा. त्याच्या हल्ल्याला बळी पडलेले बहुतेक लोक गोरगरीब असल्यामुळे चोरी हा त्यामागील उद्देश असणे शक्य नव्हते. तो सर्वस्वी अनोळखी लोकांची हत्या करीत असल्यामुळे वैयक्तिक वैमनस्याचा प्रश्नसुद्धा उद्भवत नव्हता व संशयाची सुई त्यावरून त्याचेकडे वळत नव्हती. पोलिसांना कसलाच सुगावा लागत नसल्यामुळे तो बरेच दिवस सांपडत नव्हता. शेवटी गस्तीवरील शिपायाकडून पकडले गेल्यावर आणि भरपूर चिकन खाऊ घातल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला, पण आपण ही अघोरी कृत्ये प्रत्यक्ष परमेश्वराच्या आदेशावरून करीत आहोत असे ठणकावून सांगितले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे न्यायालयीन चौकशीत आढळल्याने त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात पाठवले गेले. तिथेच त्याचा अंत झाला. रामन राघवला अटक होण्यापूर्वी त्याचेसंबंधी अनेक अफवांचे पीक आले होते. कोणी म्हणे तो मनांत येईल तेंव्हा मिस्टर एक्ससारखा अदृष्य होऊन जातो तर कोणी म्हणे तो उंदीर मांजर, कावळा चिमणी असे कोणी तरी बनून निसटतो.

अनेकांनी त्याला ‘जॅक द रिपर’चा भारतीय अवतार ठरवले होते. या जॅक द रिपरने १८८८ साली लंड़नमध्ये पांच स्त्रियांचे खून केले होते असे मानले जाते. या पाचही बायका वाईट चालीच्या समजल्या जायच्या. त्यांचे खून रात्रीच्या काळोखांत शहराच्या सुनसान भागांत पण सार्वजनिक जागांवर करण्यात आले. आपल्या सावजांवर अचानक हल्ला करून ठार करतांना त्यांचेवर अत्यंत त्वेषाने वार करून त्यांच्या मृत देहाची अमानुषपणे चिरफाड केलेली होती. कुणाच्या शरीरातून तिचे हृदय, कुणाचे मूत्रपिंड तर कुणाचे गर्भाशय काढून नेले होते. हे सारे झटपट आटोपून झाल्यावर कसलाही पुरावा मागे न ठेवता, कुणालाही कळू न देता तो अत्यंत शिताफीने तेथून पसार व्हायचा. एका मागोमाग झालेल्या खुनांच्या या रहस्यमय मालिकेमुळे एकाच व्यक्तीने ते सारे केले असावेत असा अंदाज केला गेला. कदाचित प्रसार माध्यमातील कुणी तरी ‘जॅक द रिपर’ हे नांव त्या अज्ञात इसमाला ठेवले असेल. पण तो माणूस प्रत्यक्षात कधीच पोलिसांच्या हांती लागला नाही. त्यामुळे या खुनांचे गुपित तसेच गुलदस्त्यांत पडून राहिले. कदाचित हे खून वेगवेगळ्या लोकांनी केले असणेही शक्य आहे, त्याचप्रमाणे एकाच जॅकने इतर कांही लोकांचे खून वेगळ्या पद्धतीने केले असणेही अशक्य नाही.

या खुनांना जगभर अमाप प्रसिद्धी मिळाली, त्यावर आधारित शेकडो पुस्तके लिहिली गेली, अजून लिहिली जात आहेत, कथा, कादंब-या, नाटके, सिनेमे निघाले, रिपरालॉजिस्ट या नांवाची गुन्हेगारतज्ञांची एक शाखासुद्धा निर्माण झाली. याहू किंवा गूगल वर ‘जॅक द रिपर’ हे शब्द टाकले तर दहा वीस लाख तरी संदर्भ सांपडतात. ‘जॅक द स्ट्रिपर’ यासारखे त्याचे अनुकरण करणारे अनेक महाभाग जन्माला आले. त्यातल्याच एकाला ‘यॉर्कशायर जॅक’ हे नांव दिले गेले. ‘पीटर सटक्लिफ’ नांवाची ही व्यक्ती लीड्स ब्रॅडफोर्ड भागांत १९७५ ते १९८१ पर्यंत वावरत होती व आपली दुष्कृत्ये करीत होती. लीड्स इथे होऊन गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नामावळीत आपलेही नांव त्याने (काळ्या अक्षरांनी) ठळकपणे लिहून ठेवले आहे. हुवे बदनाम तो क्या नाम न हुवा? लीड्सच्या वास्तव्यात मीही त्याचे नांव ऐकले व त्याच्याबद्दलची थोडी माहिती कांनावर आली.

एका आडदांड आणि रंगेल बापाचा पण लहानपणी अगदीच शामळू वाटणारा हा लाजरा बुजरा मुलगा इतर चार मुलांसारखा शाळेत गेला, पण इतरांशी फटकून एकटाच वेगळा राही. इतर मुलेसुद्धा नेहमी त्याची टिंगल टवाळी करीत. अभ्यासांत फारशी प्रगति करणे न जमल्यामुळे शाळेला राम राम ठोकून तो नोकरीला लागला. त्याने अनेक कारखान्या व गिरण्यांमध्ये काम केले पण कोठेच स्थिरावला नाही. त्याच्या अनेक नोक-यांपैकी एकीत त्याने दफनभूमीत थडग्यांसाठी खड्डे खणण्याचे काम सुद्धा केले होते. कदाचित तेंव्हाच तो मनाने निर्ढावला असेल. एक ट्रक विकत घेऊन मालवाहतुकीचे काम त्याने केले. एका मुलीच्या प्रेमांत पडला आणि तिच्याबरोबर चक्क लग्नाची गांठसुद्धा बांधली. पण म्हणावा तसा त्याचा सुखी संसार झाला नाही. पत्नीचे गर्भपात होऊन तिला अपत्य होण्याची आशा उरली नाही. लहानपणापासून सहन करीत आलेल्या अनेक दुःखांची, अपमानांची, दुर्दैवी घटनांची टोचणी त्याच्या मनात सलत असेल पण मनांतील घालमेल त्याने उघड केली नाही. लपून छपून कोणावर तरी निर्घृणपणे हात चालवून मनातील सारा राग काढायचा, सगळ्या तेजाबाचा निचरा करायचा अजब मार्ग त्याने धरला. ‘जॅक’ या नांवाने पोलिसांना पत्रे पाठवून त्यात त्याने आपणच ही कृत्ये करीत असल्याची फुशारकी सुद्धा मारली. ही एक प्रकारची मानसिक विकृतीच म्हणावी लागेल. कुणाच्या मते हे दुस-याच कोणा विक्षिप्त माणसाचे काम होते. वैयक्तिक किंवा आर्थिक लाभ नसल्याने कोणाला पीटरचा सुगावा लागला नाही. इतके भयानक गुन्हे सफाईने करून सुद्धा कोणालाही फारसा संशय येऊ न देता एक सर्वसामान्य कुटुंबवत्सल गृहस्थ असल्याचे नाटक तो यशस्वीपणे वठवत राहिला. शेवटी जेंव्हा तो पकडला गेला त्या वेळी त्याला ओळखणा-या लोकांना आश्चर्य वाटले. “देवानेच या हत्या करण्याची बुद्धी आपल्याला दिली, इतकेच नव्हे तर त्याच्याच इच्छेने आपण पोलीसांच्या तपासातून आजवर सहीसलामत वाचलो, पोलीसांनी तर माझी चौकशी केली होती, त्यांना सगळे माहीत असायला हवे होते.” अशा थाटाचे जबाब त्याने दिले.

१९७५ साली त्याने आपल्या पहिल्या सांवजाला लीड्स येथील एका गल्लीतील घरासमोर गांठून तिच्यावर सुरीने जबरी हल्ला केला. पण एका शेजा-याला जाग येऊन त्याने आवाज दिल्याने आपले काम अर्धवट सोडून पीटर लगेच तिथून निसटला. पुढील पांच वर्षांत त्याने तेरा जणींना यमसदनाला पाठवले आणि सात जणींना गंभीररीत्या जखमी करून त्यांना सज्जड दम भरला आणि  आपले जीवन नकोसे केले. सुरुवातीच्या काळांत बळी पडलेल्या कांहीजणींचे चारित्र्य संशयास्पद होते पण नंतर कांही निष्पाप महिलांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या अघोरी कृत्यांचे रसभरीत वर्णन इथे करण्याचा माझा उद्देश नाही. एका गुन्हेगाराच्या निष्ठुरपणे वागण्यामुळे या अवधीत तेथील जनजीवन कसे पार विस्कळित झाले होते याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

या गुन्हेगाराच्या तपासाच्या एका कारवाईसाठी त्या काळी चाळीस लक्ष पौंड स्टर्लिंग खर्च झाले. रिपरला पकडण्यासाठी पंचवीस हजार पौंड रकमेचे बक्षीस लावले होते. अडीचशे डिटेक्टिव्ह त्यासाठी तीन वर्षे सतत राबले. हजारो इतरांनी त्यांना मधून मधून मदत केली. एकंदर एकवीस हजार मुलाखती घेतल्या गेल्या. संगणकाचा वापर सुरू होण्यापूर्वीच्या त्या काळात याचा परिणाम फक्त ढीगभर कागद गोळा होण्यात झाला. त्यांचा एक दुस-याशी संबंध जोडणे दुरापास्त होऊन बसले. खुद्द पीटरला नऊ वेळा तपासणीसाठी बोलावून घेतले होते. पण पठ्ठ्याने जरा सुद्धा दाद लावून न दिल्याने दर वेळी पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला संशयातीत इसम समजून त्याच्यावर साधी पाळत सुद्धा ठेवली गेली नाही. चाळीस संशयित व्यक्तींची जी यादी बनवली होती तीत पीटरचे नांव नव्हते. या पोलीस तपासाच्या कामाची (किंवा त्यातील हलगर्जीपणाची) चौकशी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने एक समिती नेमली. तिने दीडशे पानांचा अहवाल देऊन तपासातील कल्पनादारिद्र्य, तपास करणा-यांचा अडेलतट्टूपणा वगैरेवर ठपका ठेवला.

या काळांत यॉर्कशायरमधील सामान्य जनतेचा पोलिसांच्या यंत्रणेवरील विश्वास मात्र पार उडाला. ओव्हरटाईमचा भत्ता कमावायचे हे एक साधनच बनले आहे म्हणून त्याचा छडा लागत नाही आहे असे कोणाला वाटले. याच काळात स्थानिक पोलीस यंत्रणेची पुनर्रचना करून वेस्ट यॉर्कशायर पोलिस ऑथॉरिटी बनवण्यात आली होती. पण त्यापेक्षा आपले पूर्वीचे सिटी पोलीसच बरे होते असेही  कांही लोकांना वाटले. धोक्याच्या सूचना देणा-या उपकरणांची जोरदार विक्री होऊन ती करणा-यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अपरात्री पायी चालत जाण्यापेक्षा लोक टॅक्सीने जाऊ लागले व टॅक्सीड्रायव्हरांचा धंदा वधारला. कांही टॅक्सी ड्रायव्हर एकट्या गि-हाईकाला रस्त्यात सोडण्याऐवजी मानवतेच्या भावनेतून त्याच्या घराच्या दरवाज्यापर्यंत त्याला सुखरूप पोचवू लागले. तर कांही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी या संधीचा गैरफायदा उठवून आपला वाईट हेतू साधून घेतला आणि तो गुन्हा रिपरच्या नांवावर खपवला. प्रसारमाध्यमातील लोकांना तर एक सोन्याची खाण सापडली. गुन्हे घडायला लागल्यापासून त्यांना मोठी सविस्तर प्रसिद्धी मिळाली. न्यायालयात खटला उभा राहिल्यावर तर त्याला ऊत आला. दूरचित्रवाणीवर त्याचे खास वृत्तांत येऊ लागले.
 
महिलांनी तर या प्रकाराची धास्तीच घेतली. अगदी आवश्यक असल्याशिवाय त्या घराबाहेर पडेनाशा झाल्या. त्यांच्यासाठी जवळ जवळ रात्रीचा कर्फ्यू लागू झाला. त्यामुळे कुणाला शिक्षण सोडावे लागले तर कुणाला नोकरी. त्यांनी मोठ्या संख्येने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, आपापली स्वसंरक्षकदले बनवली. पांचशे महिलांनी भडक चित्रपट दाखवणा-या एका चित्रपटगृहावर मोर्चा नेला आणि तेथील पडद्यांची नासधूस केली. अशा प्रकारे एका अज्ञात भीतीने, असुरक्षिततेच्या, असहाय्यतेच्या भावनेने लीड्सचा सारा परिसर ग्रस्त झाला होता. पीटर सटक्लिफ पकडला गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पीटरला पकडणे, त्याच्यावर खटला चालवून त्याला शिक्षा करणे व त्या सुमारास बायकांचे खून पडणे थांबणे हा सगळाच बनाव होता, खरा कर्ता करविता कोणी वेगळाच होता आणि तो नामानिराळा राहिला असा शोध नुकताच कोणा संशोधकाने लावला आहे म्हणे. त्याचेकडे लक्ष द्यायला आता कुणाला वेळ आहे? समाजावर अचानक होणारे आघात आणि त्यांची अनामिक भीती आता नव्या स्वरूपात येत आहेत. बेछूट गोळीबार, बॉंबस्फोट, आत्मघातकी हल्ले वगैरेंच्या.