लीड्सच्या चिप्स – १२ रस्त्यामधील पुतळे

महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे असंख्य पुतळे आपल्याला भारतातील गांवोगांवी चौकाचौकांमध्ये दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ किवा इतर मुद्रांमधील पुतळे महाराष्ट्रात अनेक गांवी मोक्याच्या ठिकाणी आहेत. चौपाटीवरील सरदार पटेल व दादर येथील थोर साहित्यिक राम गणेश गडकरी अशा इतर मान्यवरांचे पुतळे कांही सार्वजनिक ठिकाणी उभारले आहेत. पण केवळ शोभेसाठी रस्त्याच्या कडेला किंवा चौकात उभे केलेले पुतळे त्या मानाने कमीच आहेत. बोरीबंदरचे रेल्वे स्टेशन किंवा फ्लोरा फाउंटन वगैरे ठिकाणी ब्रिटीशांच्या कारकीर्दीत जे कांही पुतळे उभारलेले असतील त्यात स्वातंत्र्यानंतर फारशी भर पडलेली दिसत नाही. फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक असे नामकरण केले त्या वेळेस तेथे हुतात्म्यांचे स्मारक बांधले गेले तेवढेच एक उल्लेखनीय वाटते. थोर व्यक्तींचे दर्शन घडतांना त्यांचे चरित्र व त्यांची शिकवण याची आठवण व्हावी असा एक उद्देश त्यांचे पुतळे उभारण्यामागे असतो तो कितपत साध्य होतो हे माहीत नाही. मात्र हल्ली कांही समाजकंटक एखाद्या पुतळ्याचा अवमान करतात व त्यातून दंगे धोपे, सामाजिक तेढ वगैरे निर्माण होतात हा एक नवाच प्रश्न उभा राहिला आहे.

लीड्सच्या रस्तोरस्ती इतके पुतळे दिसतात की आपल्याला त्याला पुतळ्यांचे शहर म्हणावेसे वाटेल. कदाचित इंग्लंडलाच पुतळ्यांचा देश म्हणता येईल. यांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील थोर वंदनीय विभूती तर आहेतच पण पौराणिक काल्पनिक संकल्पना, इतिहासकालीन व्यक्ति, सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील प्रसंग, कलात्मक शिल्पकृति अशा अनेक प्रकारचे पुतळे तेथे सार्वजनिक जागी पहावयास मिळतात.   कधीही कोणी त्यांची पूजा करतांना दिसत नाही आणि त्यांची अवहेलना करायचा उपद्व्यापही कोणी करत नाही.  जी चांगल्या प्रकारची स्वच्छता तिकडल्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणांमध्ये एकंदरीतच बाळगली जाते तिला अनुसरून या स्मारकांचीही वेळोवेळी झाडलोट आणि पुसापुशी होत असते.

लीड्सच्या सिटी स्क्वेअर या मुख्य रेल्वेस्टेशनसमोरील चौकात मधोमध मोक्याच्या जागी असाच एक पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आहे.  तो ब्लॅक प्रिन्स या नांवाने ओळखला जातो.  या राजकुमाराचा लीड्स शहराशी कांहीच संबंध नव्हता.  इतिहासात गौरवपूर्वक नोंद व्हावी असे कसलेच मोठे कार्य त्याने केले नाही. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या अनेकांना “कोण तो कुठला राजकुमार? ” असे मी विचारले. पण बहुतेक सर्वसामान्य लीड्सवासियांना त्याच्याबद्दल कांहीसुध्दा माहिती नाही. त्यामुळे त्या पुतळ्याच्या दर्शनाने कोणाला स्फूर्ती मिळेल किंवा कोणाच्या मनात देशभक्ती जागृत होत असेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. त्या गजबजलेल्या चौकातून रोज जाणारे हजारो स्थानिक लोक मान वर करून त्याच्याकडे पहात सुध्दा नाहीत. आपल्याकडील मुंबईतल्या म्यूजियमजवळचा काळा घोडा आता पूर्णपणे अज्ञातवासांत गेला असला तरी लीड्सचा हा ब्लॅक प्रिन्सचा पुतळा मात्र आजसुध्दा आपल्या जागी दिमाखाने उभा आहे. शहराला भेट देणारे पर्यटक एक देखणी शिल्पकृती म्हणून त्याचेकडे कौतुकाने बघतात.  त्याच्या आजूबाजूला उभे राहून फोटो काढून घेतात आणि पुढे जातात. याच चौकात रस्त्याच्या कडेकडेने हातात दिवा घेऊन उभ्या असलेल्या आठ पूर्णाकृती निम्फ्सचे पुतळे आहेत.  मनुष्याला मोह पाडणा-या एक प्रकारच्या अप्सरा असे त्यांना म्हणता येईल. त्याशिवाय सुप्रसिध्द शास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली व आणखी एक दोन मोठ्या व्यक्ति सुध्दा तिथेच दाटीवाटीने उभ्या आहेत.

तेथील आर्ट गॅलरीसमोर आधुनिक शैलीचे सुप्रसिध्द शिल्पकार हेन्री मूर यांनी निर्माण केलेली एक भव्य शिल्पकृती ठेवलेली आहे तर मिलेनियम स्क्वेअर या प्रदर्शने, मेळावे वगैरे भरवण्याच्या जागेच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या समोर दोन उंच स्तंभ उभारून त्यावर सोनेरी घुबडांच्या आकर्षक प्रतिमा ठेवल्या आहेत. घुबड हे येथील प्रतीक असून त्याची आकृती जागोजागी दिसते. लीड्स ब्रिजवर सुध्दा हे चिन्ह ठळकपणे कोरले आहे.  आर्ट गॅलरीसमोरच व्हिक्टोरिया क्रॉस या ब्रिटनमधील सर्वोच्च बहुमानाने सन्मानित केल्या गेलेल्या लीड्स येथील सर्व वीरांचे स्मारक आहे. दिल्लीच्या शहीद स्मारकासारख्या उभ्या मनो-याच्या पायथ्याशी एका सैनिकाचा पुतळा व माथ्यावर एक सुंदर पंखधारी परी असे त्याचे स्वरूप आहे.  अठराशे सत्तावन पासून दुस-या महायुध्दापर्यंत अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेल्या सा-या शूरवीरांची नांवे बाजूला एका शिलालेखावर कोरून ठेवली आहेत. इथे मात्र अनेक पुष्पचक्रे अर्पण केलेली दिसतात. 

याशिवाय ब-याचशा चर्चच्या समोर क्रूसावरील येशूच्या प्रतिमा आहेत. क्वचित कुठे माता मेरी आहे. जुन्या इमारतींच्या आत किंवा दर्शनी भागावर सजावटीसाठी मांडून ठेवलेल्या आणि वस्तुसंग्रहामधील पुतळ्यांची तर गणनाच नाही.

लीड्सच्या चिप्स – ११ देखण्या इमारती

लीड्सच्या सिटी सेंटर या शहराच्या मध्यवर्ती भागात इतिहास आणि वर्तमानकाल अगदी हातांत हात घालून उभे असलेले दिसतात. शंभर दीडशे पासून चारपांचशे वर्षापूर्वी बांधलेल्या पुरातत्व विभागाच्या संरक्षित मालमत्ता वाटाव्यात अशा जुन्या पुराण्या वास्तू कांचेच्या अवाढव्य कपाटांसारख्या दिसणा-या अत्याधुनिक इमारतींना खेटून उभ्या असलेल्या इथे पहायला मिळतात. बहुतेक जुन्या इमारतींमध्ये चर्च, कॅथेड्रल अशी धार्मिक प्रार्थनास्थळे आहेत. त्याशिवाय गेल्या शतकातील आर्थिक भरभराटीच्या काळांत बांधलेल्या सामाजिक उपयोगाच्या इमारती आहेत.

लीड्सचा टाउन हॉल ही अर्थातच सर्वात भव्य आणि आकर्षक इमारत आहे. अठराशे सत्तावन, अठ्ठावन साली जेंव्हा भारतात स्वातंत्र्ययुध्दाची रणधुमाळी सुरू होती त्याच काळांत या इमारतीचे विधिवत उद्घाटन झाले. त्यासाठी प्रत्यक्ष महाराणी एलिझाबेथ यांनी लीड्सला भेट दिली होती. दर्शनी भागावर अनेक पाय-यांची उतरंड, त्यावर प्रचंड दंडगोलाकार उभे खांब, सुरेख कमानी, त्यामध्ये कोरीव नक्षीकाम केलेले भव्य दरवाजे, वर उंच घुमट, त्यामध्ये प्रचंड क्लॉक टॉवर अशी त्या काळातील वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून ती इमारत पहाण्यासारखी आहे. आत गेल्यावर तर तेथील अंतर्गत सजावट पाहून डोळे दिपून जातात. सर्व बाजूला कलाकुसर, हंड्या, झुंबरे आणि छोट्या छोट्या पुतळ्यामधून सजवलेली मोहक दृष्ये. मूळ कलाकृतींचे सौंदर्य अधिकच खुलून दिसावे अशा खुबीने त्यावर विजेच्या दिव्यांचा साज सजवला आहे, पण भिंतींवर किंवा खांबांवर कुठेही त्यासाठी लावलेल्या बेढब तारा दिसून येत नाहीत. महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही इमारत आजही रोज प्रत्यक्ष उपयोगात येते. महत्वाच्या सभा संमेलने तर तेथे होतातच पण चक्क लग्नेसुध्दा लावली जातात. बाहेरून पुरातनकालीन वाटणारी पण आंतून सर्व आधुनिक सोयींनी सज्ज अशी ही इमारत लीड्सची शान आहे.

अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण इमारत म्हणजे बाजाराच्या मध्यवर्ती भागातील कॉर्न एक्सचेंज. बाजूलाच सिटी मार्केट आहे ते आपल्या मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटची आठवण करून देते. तशाच प्रकारचे गाळे व तसेच गजबजलेले, फक्त अतिशय स्वच्छ. कॉर्न एक्सचेंज ही एक बाहेरून वर्तुळाकार वाटणारी आणि आतून लंबवर्तुळाकार दिसणारी अजब इमारत आहे. वर प्रचंड वक्राकार तुळयांवर आधारलेले मोठे घुमटाकार छप्पर आहे. दोन मजली परीघामध्ये त-हेत-हेची दुकाने आहेत तर मधल्या जागेत खाण्यापिण्याची रेस्टॉरेंट्स व शोभेच्या वस्तूंचे अनेक छोटे छोटे स्टॉल्स. एके काळी या भागातील धान्याची मुख्य बाजारपेठ भरवण्यासाठी ही खास इमारत बांधली होती. आजूबाजूचे शेतकरी व व्यापारी रोज तेथे येऊन देवाण घेवाण करत असत. आता त्या व्यापाराला पूर्वीचे महत्व राहिले नाही. पण आजच्या काळातील उपयोगाच्या वस्तूंच्या दुकानांनी ती भरलेली आहे व हजारो ग्राहकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेली असते. ही इमारतसुध्दा पुरातनकाळात बांधली गेली असली तरी उत्तम स्थितीत ठेवलेली आहे आणि रोजच्या उपयोगातली आहे.

आयर नदीवरील लीड्स ब्रिज हा एक असाच जुन्या काळाची साक्ष देणारा पण आजही उपयोगात येत असलेला छोटेखानी पूल आहे. या नदीचे पात्र आपल्या पुण्याच्या मुठेपेक्षाही अरुंद असले तरी त्यातला पाण्याचा प्रवाह मात्र बारा महिने वहात असतो.  पुलावरून त्याचे दृष्य पहायला छान दिसते. या पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात प्रथम चलचित्राचे चित्रीकरण हे या पुलावरील एकोणिसाव्या शतकातील रहदारीचे झाले होते.

येथील विश्वविद्यालय, पुस्तकालय, आर्ट गॅलरी, जुनी इस्पितळे वगैरे सर्व बिल्डिंग्ज तत्कालिन वास्तुशिल्पाची वैशिष्टे दाखवणा-या देखण्या इमारती आहेत. व्यवस्थित डागडुजी करून त्या आजतागायत उपयोगात ठेवलेल्या आहेत. नव्या जमान्यातील वाढलेल्या रहदारीसाठी मोठा रस्ता बांधतांना येथील इन्फर्मरीच्या पुरातन इमारतीच्या खालून मोठा बोगदा काढून वाट करून दिली. लीड्समधील रहिवाशांच्या बहुतेक सर्व जुन्या इमारती मात्र एकसारख्या लाल रंगाच्या विटांनी बांधलेल्या दिसतात आणि सिमेंटकाँक्रीटच्या नव्या इमारती मोठमोठ्या चौकोनी ठोकळ्यांसारख्या दिसतात. अनेक भागात बंगले आहेत, पण खास आकर्षक वाटावेत आणि चांगले लक्षात रहावेत असे बंगले मला तरी फारसे दिसले नाहीत.

लीड्सच्या चिप्स – १० तिकडचे खाद्यजीवन

माझ्या लहानपणच्या आमच्या घरी मांसाहारालाच नव्हे तर मांसाहारी पदार्थांच्या नांवाच्या नुसत्या उच्चारालादेखील मनाई होती. बोलण्यात अंडी, मटण वगैरेचा उल्लेख आलाच तर बोटांच्या हालचालीने दाखवायचा. पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे खूळ कुणीतरी माझ्या डोक्यात भरवले. आता रोमला गेल्यावर रोमन लोकांच्या सारखे वागायचे म्हणजे त्यांच्यासारखे खाणेपिणे करणे ओघानेच आले. तिकडे गेल्यानंतर त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या पोटाला आधीपासूनच त्याचीही संवय करून दिलेली बरी असा सूज्ञ आणि दूरदर्शी विचार केला. तरीही महाराष्ट्रात त्या काळी कडक दारूबंदी असल्यामुळे पिण्याचा विचार करणे त्या वाळी शक्यच नव्हते. पण खाण्यासंबंधी प्रयोग करायला सुरुवात केली.

नाश्त्याला डोसा किंवा पराठ्याऐवजी आमलेट घेणे फारसे कठीण गेले नाही. ऑमलेट दिसायला आपली आंबोळी किंवा उडप्याचा डोसा यासारखेच दिसायचे. माझ्या जिभेला कशाचेच वावडे नसल्यामुळे ऑमलेटची नवी चंव देखील तिला आवडली. मात्र उकडलेले अंडे डोळ्याने पाहूनच आधी पोटात गोळा उठायचा. एके दिवशी हिंमत करून त्याचे बारीक तुकडे तुकडे केले व ब्रेडच्या आंत लपवून गट्ट केले. तशीच खिमा व बोनलेस चिकनसारख्या उसळ किंवा भाजीसारख्या निरुपद्रवी दिसणा-या पदार्थांपासून सुरुवात करून हाडे चघळण्यापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रगती केली. पण महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला पोचेपर्यंत डोक्यात लख्ख प्रकाश पडला की उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी जी.आर.ई., टोफेल, प्रवेशपत्र, पारपत्र वगैरे बारा भानगडी आधी इथे असतांना कराव्या लागतात व त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो, ते कांही आपल्याला जमण्यासारखे नव्हते. त्यामुळे खाद्यक्षेत्रात केलेल्या प्रगतीचा त्या कामासाठी तत्काळ उपयोग झाला नाही, पण त्या निमित्याने खाद्यजगताचे एक नवे दालन उघडले ते कायमचेच.

पुढे कामानिमित्त परदेशाच्या वा-या झाल्या. त्यात हॉटेलात राहून पिझ्झा बर्गरसारख्या फास्टफूड पासून ते सेवन कोर्स डिनरपर्यंत सारे अनुभव घेतले. लीड्सच्या या वारीच्या वेळेस मात्र मी परदेशात गेलो असलो तरी घरीच राहणार होतो. तसे मी आपल्याच मुलाच्या घरी जात होतो पण तो तिकडे राहून किती इंग्रजाळलेला आहे ते मला माहीत नव्हते. तिकडे पोचल्यावर पहिले जेवण समोर आले ते अगदी शंभर टक्के मराठी होते. फोडणीत घालायच्या मोहरी, हिंग आणि हळदीपासून दालचिनी, तमालपत्रासारख्या मसाल्यापर्यंत सगळे पदार्थ तिकडे विशिष्ट दुकानांत मिळतात. आपल्या देशात असतांनाच सांबार, बुंदी रायता, ढोकळा, पनीर मटर, राजमा वगैरेंची परप्रांतीय आक्रमणे सर्व बाजूने होत असल्याने असे चटणी, कोशिंबीर, वरण भात, पोळी भाजी वगैरे साग्रसंगीत मराठी जेवण खरे तर आता मुंबईकडेसुध्दा दुर्मिळ होत चालले आहे. त्याचा आस्वाद घेताघेताच मी आपला मनसोक्त खादाडीचा इरादा जाहीर केला व माझ्या तिकडच्या खाद्यजीवनाची सुरुवात झाली.

तिकडे राहूनसुध्दा आमच्या सुनेने शाकाहार सोडला नव्हता. लहान मुलांच्या पोटात पौष्टिक तत्वे जावीत म्हणून अंड्यांना घरात प्रवेश मिळाला होता. नाही तरी केक आणि कुकीजमधून एवीतेवी ती पोटात जाणारच होती. नाश्त्यासाठी त-हे त-हेच्या फळांचे रस आले, त्यात कधी कधी गोंधळ उडायचा. रसरशीत संत्र्यांचं चित्र पाहून ज्यूस घेतला तर त्यांत साली बियासकट काढलेला रस असल्यामुळे कडवट, तुरट चव आलेली. वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे व स्वाद असलेले रुचकर व पौष्टिक ब्रेड आले. वेगवेगळ्या प्रकारांचे चीज आणि लोणीसुध्दा. तिकडे ते सोयिस्कर आकाराच्या डब्यांमध्ये मिळते. त्याशिवाय क्रोइसाँ, मुफिन इत्यादींचे अनंत प्रकार. तिथली ही फक्त खाद्यवस्तूंनी भरलेली डिपार्टमेंट्स आपल्याकडच्या अख्ख्या दुकानांपेक्षा मोठी असायची. त्यामुळे रोज हिंडता फिरतांना नवनवीन शोध लागायचे. प्रत्येक पदार्थ व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला, त्यावर त्यातील कॅलरीज, पॅकिंगची तारीख व एक्स्पायरी डेट ठळकपणे छापलेली, त्यामुळे ताजेपणाबद्दल शंका नको. कस्टर्ड पुडिंगपेक्षा फारच वेगळा असा यार्कशायर पुडिंग नांवाचा एक प्रकार होता तो एका छोट्याशा द्रोणाच्या आकाराचा कुरकुरीत पदार्थ असायचा. त्यात वाफवलेले मटरचे दाणे भरून तोंडाचा मोठा आ करून तो पाणीपुरीसारखा अलगद जिभेवर ठेवून चावून चावून खातांना मस्त लागायचा. असे कांही छान छान प्रकार खायला मिळाले.

कडाक्याच्या बोच-या थंडीमुळे बाहेर फिरायला जाणे म्हणजे बहुधा कुठल्यातरी प्रचंड शापिंग सेंटरमध्ये घुसून यथेच्छ विंडो शापिंग करणेच होत असे. विनाकारण फिरण्याबद्दल तिथे कोणी विचारीत नाही. फक्त बाहेर पडतांना जेवढ्या गोष्टी हातांत वा ट्रालीवर असतील तेवढ्यांची किंमत चुकवायची. प्रत्येक पदार्थावर बार कोड असतो तो स्कॅन केला की आपल्याआप बिल बनते व बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात त्यामुळे किचकट हिशोबाची कटकटच नाही. तुमचे पैसे आपल्याआप दुकानदाराच्या खात्यावर ट्रान्स्फर होतात. या सगळ्या ठिकाणी मॅकडोनाल्ड, के.एफ.सी. किंवा पिझाहट यासारखे स्टॉल असतात, इतरही अनेक असतात. तिथून आपल्याला चांगले वाटतील ते पदार्थ पाहून निवडावेत. त्यातही अमुक अमुक घेतलं तर तमुक फुकट अशी आमिषे तसेच पॅकेज डील्स असतात. त्यामुळे प्रत्येक जण कांहीतरी फायदा झाला म्हणून खूष होतो.  मांसाहारी पदार्थांचे प्रमाण अर्थातच जास्त आहे पण व्हेज बर्गर, सँडविचेस, नूडल्स वगैरे शाकाहारी गोष्टीसुध्दा असतात. बटाट्याचे काप तर यंत्रांमधून धो धो वहात असतात आणि दुस-या खाद्यपदार्थांबरोबर भरभरून देतात. तिथल्या हॉटेलांमध्ये सहसा कोणी पाणी पीत नाही, त्यामुळे कधी कधी ते मिळत नाही आणि मिळाले तरी ते फुकट नसते. पाण्याची किंमत शीतपेयांहूनही जास्त असते. कोकोकोला किंवा पेप्सीकोला तर ब-याच जागी अनलिमिटेड असायचा. एक मग घेतला की पुनः फुकट भरून मिळायचा. कदाचित मानसिक कारणामुळे असेल, पण शीतपेय पिऊन आपल्याला समाधान मिळत नाही, म्हणून आम्ही घरूनच आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून न्यायचो.

अलीकडे लीड्समधल्या हॉटेलात मिळणारा खास इंग्रजी पदार्थ म्हणजे फार फार तर फिश आणि चिप्स. तो सुध्दा आजकालच्या फास्ट फूडच्या काळांत पुढे आला आहे. पूर्वीच्या काळी जेवणापेक्षा टेबल मॅनर्स पाळण्याला मोठे महत्व असायचे. त्यात तासन् तास जाणार. त्यावर वेळ वाचवण्यासाठी कुणीतरी तयार पदार्थांचा पर्याय काढल्यामुळे फिश अँड चिप्सचा जन्म झाला. औद्योगीकरणाच्या बाबतीत लीड्स आघाडीवर असल्यामुळे इकडेच त्याची सुरुवात झाली आणि भरभराट झाली असे म्हणतात.

इंग्लंडमधल्या लोकांना स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा अभिमानच नाही. बहुतेक हॉटेलवाले आपण फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, मेक्सिकन अशा कुठल्यातरी प्रकारच्या रिसीपीज ठेवतो असे सांगतात. चायनीज व इंडियन अन्न पुरवणारी कितीतरी हॉटेले लीड्समध्ये निघाली आहेत. त्याशिवाय या आशीयाई लोकांनी टेकअवेज लोकप्रिय केल्या आहेत. त्यात वेगवेगळे हॉटेलवाले स्वतः तयार केलेला खाना तर पुरवतातच पण एकाच जागी फोन करून एका ठिकाणची बिर्याणी, दुसरीकडचे हाका नूडल्स आणि तिसरीकडचा मशरूम पिझा मागवला परी अर्ध्या पाऊण तासात सारा माल घरपोच मिळतो अशी सोयसुध्दा आहे. या खाद्यपदार्थांचे डिलीव्हरी चार्जेससुध्दा माफक असतात. पदार्थांची नावे भारतीय असली तरी माझ्य़ा अनुभवात तरी असे पदार्थ बनवणारे बहुतेक लोक पाकिस्तानी किंवा बांगलादेशीच निघाले.

मुलाच्या सातआठ मित्रांकडे जेवणाचे बेत झाले. हे सगळे भारतीयच होते. त्यातल्या दोघांनी देवळालगत असलेला हॉल भाड्याने घेऊन त्यांच्या मुलांचे वाढदिवस जोशात साजरे केले. केटररला त्या जागी बोलावून मटर पनीर, उंधियु वगैरे इकडच्या रिसेप्शनसारखे जेवण त्यांनी तयार करून घेतले होते. दुस-या दोघांनी स्वतःच छोटासा घरगुती बेत केला होता. दोन तीन जागी गृहिणींनी आपापसात पदार्थ वाटून घेऊन ते घरूनच बनवून आणले होते व अंगत पंगत केली होती. एका ख्रिश्चन जोडप्याच्या मुलीच्या बाप्तिस्म्यानिमित्त पार्टी होती. तिथेही भारतीय पदार्थच बाहेरून मागवले होते. तीन चार गोरे पाहुणे होते त्यांनी सुध्दा ते आवडीने मिटक्या मारीत खाल्ले.

संपर्कसाधनांमधील क्रांतीमुळे आता जग एकत्र आले आहे. त्याचे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत विविधता आली असली तरी सगळीकडे तगळे मिळत असल्यामुळे त्यात फारसे नाविन्य किंवा औत्सुक्य शिल्लक राहिलेले नाही असेही वाटते.

लीड्सच्या चिप्स – ९ सहजीवन

आशीयाई व आफ्रिकी वंशाच्या लोकांनी इंग्लंडमध्ये व लीड्स शहरात स्थलांतर करणे इतिहासकाळात सुरू केले आणि आजतागायत ते चालले आहे हे आपण मागच्या भागांत पाहिले.  आज तेथे नेमकी कशी परिस्थिती आहे ते या भागांत पाहू. संपूर्ण ग्रेट ब्रिटनमध्ये आज आठ टक्के वस्ती वांशिक अल्पसंख्यकांची म्हणजेच काळ्या व निमगो-या लोकांची आहे. तसे म्हंटलेले मात्र आजच्या काळात त्यांना मुळीच खपत नाही, पण वाचकांच्या समजण्याच्या सोयीसाठी या ठिकाणी तसा उल्लेख केला आहे. यातील सुमारे निम्मे लोक लंडनमध्ये राहतात. तिथे त्यांचे प्रमाण २९ टक्क्यावर गेले आहे. म्हणजे दर तीनचार माणसागणिक एक तरी आशीया किंवा आफ्रिकेकडील वंशाचा भेटेल. या आठ टक्क्यात सर्वात जास्त सुमारे दोन टक्के लोक मूळ भारतीय आहेत. त्याखालोखाल पाकिस्तानी, कॅरीबियन, आफ्रीकन, बांगलादेशी व इतर वंशाचे लोक येतात तसेच संमिश्रांची गणना होते.

लीड्समध्येसुध्दा सुमारे आठ टक्के वांशिक अल्पसंख्य राहतात. पण त्यात सर्वाधिक पाकिस्तानी व त्यानंतर भारतीय येतात आणि त्यांतील निम्म्याहून अधिक शीख आहेत. इतर भारतीयांत जास्त करून पंजाबी व गुजराती भाषिक येतात. मुसलमान आणि शीख समाज बहुधा शहराच्या कांही विशिष्ट भागात एकवटलेला दिसतो. त्या भागांत त्यांनी मशीदी व गुरुद्वारा बांधलेले आहेत. हिंदू लोक सर्वत्र विखुरलेले आहेत आणि त्यांचे एकच मंदिर आहे पण त्या देवळात त्यांनी अनेक देवतांच्या अत्यंत सुबक व रेखीव मूर्तींची स्थापना केलेली आहे. हिंदुस्तानी वंशाच्या लोकांची वस्ती आज लीड्सच्या कोणत्या भागात प्रामुख्याने आहे हे वरील चित्रात दाखवले आहे.

वरील आकडेवारी ही अधिकृत संख्या झाली. पण सर्वच लोक जनगणनेच्या वेळेस नीट आणि संपूर्ण माहिती देत नाहीत. अल्प मुदतीचा व्हिसा घेऊन शिक्षण, नोकरी किंवा पर्यटन करायला आलेल्या मंडळींचा समावेश या आकडेवारीत होत नाही पण हेच लोक रस्त्यात मोठ्या प्रमाणावर हिंडतात व मुख्यतः सार्वजनिक वाहनांतून फिरतात. या कारणामुळे रस्त्यात, रेल्वेमध्ये, स्टेशनवर, दुकानांत वगैरे सगळ्या समाईक ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गौरेतर वंशाचे लोक भेटतात.

अनेक संस्थांनी लोकसंख्येतील या विभागाचा अनेक अंगांनी अभ्यास केला आहे. मुख्य म्हणजे हे आप्रवासी लोक वयाने जास्त तरुण आहेत. त्यामुळे सध्याच्या इतर ब्रिटिशांच्या मानाने ते दीर्घकाळ जगतील तसेच त्यांचा प्रजोत्पादनाचा वेग अधिक राहील. त्यामुळे येणा-या काळात लोकसंख्येमधले त्यांचे प्रमाण वाढतच जाणार असे दिसते. त्याशिवाय पुढील काळात नव्याने येऊ पहाणारे वेगळेच. भारतीय वंशाचे लोक शिक्षणाच्या क्षेत्रात गौरवर्णीयांच्या सुध्दा पुढे अगदी आघाडीवर आहेत तर बांगलादेशी सर्वात मागे आहेत. पाकिस्तानी व आफ्रिकी वंशाचे लोक सुध्दा सरासरीपेक्षा मागेच आहेत. याचा परिणाम रोजगारी व सरासरी उत्पन्नावर होणारच.  सामाजिक परिस्थितीमुळे बहुसंख्य मुसलमान स्त्रीवर्ग अजून मोकळेपणे घराबाहेर पडत नाही. त्याचाही या आंकडेवारीवर प्रभाव पडतो. या लोकांच्या शैक्षणिक मागासलेपणाकडे एक समस्या या दृष्टीने पाहून मुलामुलींनी पुढे येण्यासाठी सरकार व काउन्सिलतर्फे खास प्रयत्न केले जातात. त्यामागे फक्त दयेची भावना नसून या लोकांमधूनच उद्याचा काम करणारा वर्ग निर्माण होणार आहे, तो जितका चांगला निघेल तितका समाजाचा फायदाच होईल असा यामागचा व्यापक दृष्टीकोन आहे.

सर्व वांशिक अल्पसंख्य लोक आपापले सणवार मोठ्या उत्साहात साजरे करतात व त्यांना चांगले प्रोत्साहन मिळते. निग्रो लोकांचा कार्निवाल, मुसलमानांची ईद आणि हिंदूंची दिवाळी गाजते, अर्थातच प्रदूषण वगैरे सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करून. रोजच्या जीवनात आता वंशविद्वेश फारसा जाणवत नाही. पण कांही मूळ ब्रिटिश रक्ताचे लोक आंतून धुमसत असतात. भडक माथ्याच्या स्थानिक गो-या तरुणांबरोबर क्वचित कधी इतरांचे संघर्ष होतात. कुठे मारामारी, कुठे जाळपोळ झाल्याचे वृत्त येते. गेल्या वर्षदोन वर्षात घडलेल्या घटनानंतर थोडे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. भडक माथ्याच्या माथेफिरूला भारतीय व पाकिस्तानी यांत फरक करणे कठिण जाते त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. पण इथला समाज हे सर्व पचवून प्रगती करत आहे.  एकंदर परिस्थिती सुजाण लोकांच्या नियंत्रणांत आहे.

लीड्सच्या चिप्स – ८ वांशिक स्थलांतर

लीड्स इथे पूर्वी लॉइडिस नांवाचे सॅक्सन वंशाच्या लोकांनी वसवलेले खेडे होते. नवव्या शतकांत व्हायकिंग्जनी समुद्रमार्गे आक्रमण करून तेथे आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर अकराव्या शतकात नॉर्मन लोकांनी इंग्लंड जिंकून घेतले व पुढील काळांत या सर्व वंशांचा संकर झाला वगैरे माहिती यापूर्वी आलेलीच आहे. सुपीक जमीन व अनुकूल हवामान यामुळे कृषी आणि तिच्यावर आधारलेले मेंढीपालनासारखे उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालू राहिले व त्यामुळे आजूबाजूचे गरजू लोक पोटापाण्याच्या सोयीसाठी लॉइड्सकडे येतच राहिले.

सतराव्या शतकाच्या सुमाराला कारखानदारी व कोळशाच्या खाणी सुरू झाल्या तेंव्हा आयर्लंडसारख्या दूरच्या भागातून मजूर या बाजूला यायला लागले. एकोणिसाव्या शतकात रशिया व पूर्व युरोपातून मोठ्या संख्येने ज्यू लोकांनी इकडे स्थलांतर केले. यंत्रयुगात सुरू झालेल्या गिरण्या आणि कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी थेट तत्कालीन हिंदुस्थानातल्या पंजाबमधून सुध्दा मुसलमान तसेच शीख कामगार मोठ्या संख्येने या भागात आले. असे म्हणतात की कधीकधी एखाद्या गिरणीच्या एखाद्या पाळीमधील सर्व मजूर बाहेरून आलेले असत. उंचीपुरी शरीरयष्टी, कष्टाळू स्वभाव, बेदरकार वृत्ती, कडाक्याच्या थंडीचा थोडाफार अनुभव या गुणांमुळे इथे रुळायला त्यांना जड गेले नाही. असहकाराच्या आंदोलनामध्ये भारतात ज्या परदेशी कापडांच्या होळ्या पेटवल्या गेल्या त्याच्या निर्मितीमध्ये इथे स्थाईक झालेल्या मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा किती सहभाग होता हे कुणाच्या गांवीसुध्दा नसेल.

इंग्रजांचे राज्य चालवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी व सैनिक कांही वर्षासाठी भारतात येऊन रहात. चहाचे मळे, कारखानदारी व व्यापार उद्योग सुरू केल्यावर त्यासाठी अनेक लोक यायला लागले. त्यातील फारच थोडे लोक कायमचे रहिवासी झाले. पण तिकडे राहतांना त्यांना भरपूर नोकरचाकर ठेवायची संवय लागायची. यातले अनेक लोक आपल्या नोकरांना आपल्याबरोबर इंग्लंडला घेऊन गेले. या कारणानेही अनेक भारतीय वंशाचे लोक लीड्सला आले. पूर्वीच्या काळी कोलकाता हेच ब्रिटिशांचे मोठे केंद्र होते. त्यामुळे यात बंगाल्यांचा भरणा मोठा आहे. पूर्वीच्या काळात समुद्रप्रवासाला महिनोन् महिने लागत तसेच त्यांचा एकेका जागचा मुक्कामही मोठा असे. त्यामुळे जहाजावरील खलाशी बंदरांच्या आसपास वस्ती करून रहात. भारतातून आलेले अनेक खलाशी परत न जाता इथेच राहून गेले. अशा वेगवेगळ्या प्रकारे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत आताच्या पाकिस्तान व बांगलादेशासह भारतातून आलेल्या भारतीय वंशाच्या लोकांची संख्या चांगली जाणवण्याइतपत वाढली होती. यातील बहुतेक लोक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल वा निम्न वर्गातील होते. इंग्लंडमधील समाजावर त्यांचा ठसा उमटण्याइतपत त्यांचा प्रभाव नव्हता.

वीसाव्या शतकात श्रीमंतांची मुले उच्च शिक्षणासाठी इकडे येऊ लागली. त्यातली कांही इथेच रमली. गुजराथी लोक व्यापार उदीमाच्या शोधार्थ आले व स्थिरावले. दुस-या महायुध्दानंतर स्वतंत्र झालेल्या आशिया व आफ्रिका खंडातल्या इतर देशातील भारतीय वंशाचे रहिवासी असुरक्षिततेच्या भावनेतून ते देश सोडून इकडे आले. इडी अमीनच्या रानटी राजवटीनंतर पूर्व आफ्रिकेमधून भारतीयांनी पलायन केले ते थेट इंग्लंडला. भारतात परत जावे असे कांही त्यातल्या फारशा लोकांना वाटले नाही. जसे भारतीय वंशाचे लोक आफ्रिकेतून इंग्लंडमध्ये आले तसेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात मूळ आफ्रिकन वंशाचे लोक कॅरीबियन्स म्हणजे वेस्ट इंडीज, नायजेरिया, टांगानिका वगैरे भागातून इकडे आले व स्थाईक झाले.

गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मात्र डॉक्टर्स, इंजिनियर्स वगैरे उच्चविद्याविभूषित मंडळी करियरसाठी मोठ्या संख्येने इंग्लंडमध्ये येत आहेत आणि चांगले बस्तान बसवू लागले आहेत. संगणक क्रांती आल्यापासून तर संगणक तंत्रज्ञांचा ओघच सुरू झाला आहे. पण ही मंडळी वर्ष दोन वर्षासाठी येतात, जमलेच तर मुक्काम वाढवतात पण बहुधा इथून तिस-याच एकाद्या जागी चालले जातात. हल्ली त्यातले कांही जण मायदेशी भारतात परतू लागलेही आहेत. लीड्सला स्थाईक व्हायचा त्यांचा विचार नसल्याने इथे असतांना ते उप-यांसारखेच राहतात. त्यांना इथली फारशी माहितीही नसते आणि आस्थाही वाटत नाही.

लीड्सच्या चिप्स -७- गणेशोत्सव २००५

या चित्रातला गणपतीबाप्पा इंग्लंडमधील लीड्स या गांवातला आहे. तेथील भारतीय वंशाच्या रहिवाश्यांनी एक सुंदरसे देऊळ बांधले आहे. त्यात सर्व सुख्य देवांच्या अत्यंत सुबक मूर्तींची स्थापना केली आहे. आपल्या पौराणिक कथांमधील महत्वाच्या गोष्टी चित्रांद्वारे रंगवल्या आहेत. हिंदूंचे सारे सण इथे नियमितपणे सामूहिक रीत्या साजरे करतात. वेगवेगळ्या वैयक्तिक पूजा अर्चा सुध्दा साग्रसंगीत करण्याची व्यवस्था इथे आहे.

२००५ सालच्या काळात लीड्समधील सगळ्या उत्साही भारतीयांनी मिळून धूमधडाक्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले. अर्थातच मराठी मंडळींनी विशेष पुढाकार घेतला. श्रीगणेशाची सुबक मूर्ती भारतामधून मागवून घेतली व तिची हिंदू टेंपलमध्ये विधिवत् प्राणप्रतिष्ठा केली. सर्वांनी मिळून रोज पूजा अर्चा, भजन, आरती वगैरे कार्यक्रम यथासांग साजरे केले. सुटीच्या दिवशी चित्रकला, गायन, नृत्य, आरत्या, रांगोळ्या वगैरेच्या स्पर्धा ठेवल्या. त्यांत मुलांनी तसेच प्रौढांनी उत्साहाने भाग घेतला. विसर्जनाची मिरवणूक थाटामाटात काढली. तेंव्हा तर उत्साहाला उधाण आले. सगळ्यांनी त्यात मनसोक्त गाऊन व नाचून घेतलं. वाहतुकीसाठी आणलेल्या कोचच्या गो-या वाहकांनी सुध्दा कपाळाला टिळे लावून मोठ्या उत्साहाने त्यात सहभाग घेतला.

विसर्जनासाठी श्रीगजाननाची मूर्ती मोटारीने समुद्रकिना-यावरील स्कारबरो इथे नेली. तिथून बोटीने किना-यापासून दूरवर भर समुद्रात नेऊन तिचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणसंबंधीच्या सर्व कडक नियमांचे संपूर्णपणे आणि काटेकोर पालन करून, सा-या परवानग्या शासनाकडून संपादन करून असा हा आगळा वेगळा सोहळा साजरा करण्यांत आला. यासाठी आपापल्या जबाबदा-या सांभाळून वेळांत वेळ काढून किती  लोकांनी किती खटपट केली असेल? त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. 
बी.बी.सी ने सुध्दा या कार्यक्रमाची दखल घेतली व आपल्या वेबसाईटवर त्याला स्थान दिले. त्याची लिंक खाली दिली आहे.
http://www.bbc.co.uk/leeds/content/articles/2005/09/12/faith_ganesh_utsav_2005_feature.shtml

लीड्सच्या चिप्स -६- वस्त्रोद्योग

ढुम् ढुम् ढुमाक् करणा-या उंदीरमामाच्या टोपीची मजेदार गोष्ट आपण बालपणीच वाचली असेल, थोडं कळायला लागल्यावर सुखी माणसाचा सदरा किंवा राजाचे काल्पनिक कपडे वगैरे बोधप्रद कथा ऐकल्या असतील. या सगळ्याच गोष्टी बहुधा परदेशातून आल्या असाव्यात. आपल्या पौराणिक काळातील देव, दानवच नव्हे तर ऋषि- मुनी, यक्ष- गंधर्व वगैरे सारी मंडळी पितांबर, शेले, उपरणी अशी अंगाभोवती गुंडाळण्यासारखी चौकोनी वस्त्रे वापरत. अंगाच्या मापाने शिवलेली कुरत्यासारखी वस्त्रे वापरण्याची प्रथा मध्ययुगात कधीतरी सुलतान, नबाब, राजेरजवाडे यांच्यात सुरू झाली आणि सरदार, दरकदार, जमीनदार वगैरे धनिक वर्गात ती रूढ झाली. भारतातला गोरगरीब वर्ग मात्र बहुधा अगदी महात्मा गांधींच्या काळापर्यंत बाह्या वगैरे असलेला शिवलेला अंगरखा अंगात घालतच नसावा.

पश्चिमेकडले सगळे लोक मात्र कडाक्याच्या थंडीमुळे प्राचीन काळापासून अंगभर कपडे परिधान करत असत. चामडे, गवत, गोणपाट, लोकर आदि विविध प्रकारच्या जाड्याभरड्या पदार्थांचा शरीररक्षणासाठी सदुपयोग केला जात असे. कालांतराने रेशमापासून बनवलेली तलम वस्त्रे श्रीमंतांच्या चैनीखातर आली. तिकडे सुध्दा कपडे शिवणे तसे महागच होते. थंडीमुळे अंगाला घाम येत नाही आणि हवेत धूळीचे प्रमाण फारसे नसल्यामुळे त्यांचे कपडे लवकर मळत नसावेत आणि त्यांना ते वारंवार धुवावे लागत नसत. त्यामुळे पुन्हा पुन्हा शिवून, रफू करून व ठिगळे लावून एक दोन जोडावरच वर्षानुवर्षे काम भागवले जाई. त्या काळात व्यक्तीच्या गरजेनुसार तो आपल्यासाठी कपडे शिवून किंवा विणून घेत असे.

फार पूर्वीपासून लीड्स इथे लोकरीपासून कापड बनवण्याचे काम होत असे. आधी ते हस्तकौशल्य होते. हळूहळू यंत्रे आली तशा गिरण्या उभ्या राहिल्या. येथील आर्मली मिल्स ही अठराव्या एकोणीसाव्या शतकांत संपूर्ण जगांत अग्रगण्य मानली जाई. तिच्याशिवाय शंभरावर इतर गिरण्या होत्या. त्यांना लागणारी यंत्रसामुग्री व इतर वस्तु निर्माण करणारे अनेक कारखानेही लीड्समध्ये उदयाला आले. या कारखानदारीमुळे स्थानिक समाजात अनेक बदल झाले. कामगार करत असलेल्या कामावर नजर ठेवणे, त्याचे व्यवस्थापन वगैरेसाठी काम करणारा मध्यमवर्ग समाजात निर्माण झाला. कामगारांना व अधिका-यांना दर महिना पगार मिळू लागून त्यांच्या हातात चार पैसे खुळखुळू लागले. मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाल्यामुळे कापडांच्या किंमतीही ग्राहकांच्या आवाक्यात आल्या.

याच सुमारास रशीयामधून तिथे रहात असलेल्या ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले, त्यांतले बरेचसे लोक लीड्स किंवा यॉर्कशायरच्या भागांत आले. हे लोक जात्याच सुदृढ, कष्टाळू व कुशल कारागीर होते. त्यातील कांही लोकांना गिरण्यामध्ये काम मिळाले तर इतरांनी घरच्या घरी बसून कपडे शिवण्यासारखी कामे करायला सुरुवात केली. कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे कापड, शिलाई कारागीरांची सुलभ उपलब्धता आणि वाढता ग्राहकवर्ग या सर्वांचा मेळ घालून वेगवेगळ्या मापांचे तयार कपडे बनवण्याची आणि ते बाजारात आणून विकण्याची एक नवीन कल्पना कुणाच्या तरी सुपीक डोक्यांत आली आणि त्याने हा व्यवसाय सुरू केला. तो इतका यशस्वी झाला की पहाता पहाता फोफावत जाऊन तो लीड्सचा एक प्रमुख उद्योग बनला.  सैनिकांचे,  कामगारांचे व विद्यार्थ्यांचे गणवेष ठरवले जाऊ लागले. या सर्वांसाठी बाहेरूनदेखील मोठ्या मागण्या आल्या आणि लीड्सच्या बाजारपेठेतला व्यापारसुध्दा अनेक पटीने वाढला. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस युरोपात अनेक ठिकाणी कापडगिरण्या सुरू झाल्या आणि बाहेरील स्पर्धेमुळे लीड्सच्या कापडगिरण्यांना अवकळा आली. परंतु इथला तयार कपड्यांचा उद्योग मात्र आजतागायत तेजीत सुरू आहे. आजच्या सर्व प्रमुख ब्रँडच्या कपड्यांची मोठमोठी दुकाने लीड्समध्ये दिसतात.

लीड्सच्या चिप्स -५- यंत्रयुग (उत्तरार्ध)

“मी माझ्या वाडवडिलांच्या खांद्यावर उभा आहे म्हणून मला थोडेसे पलीकडचे दिसते आहे एवढेच.”  असे महान शास्त्रज्ञ सर आइझॅक न्यूटन यांनी सांगितले होते. हा त्यांचा विनय होता हे तर खरेच पण यांत बरेच सत्यही आहे. जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला म्हणजे त्यासाठी लागणारे सर्व सुटे भाग त्याने शून्यातून तयार केले असे नाही. पाण्यापासून वाफ बनवणारा बंब (Boiler), वाफेच्या दाबाने ढकलला जाणारा दट्ट्या (Piston), त्याला जोडता येण्यासारखा फिरणारा दांडा (Shaft), क्रॅंक (crank), जोडणारा दांडा (Connecting rod), चक्र (Wheel) वगैरे इंजिनाच्या जवळ जवळ सर्व भागांचा वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या प्रकाराने विकास झालेलाच होता. त्यांच्या मागे असलेले मूलभूत शास्त्र, तसेच धातूंच्या खनिजांपासून आवश्यक असलेल्या आकारांचे ते भाग बनवण्याचे तंत्र वॉटच्या उदयाच्या आधीच प्रस्थापित झालेले होते.

सॅव्हरी या तंत्रज्ञाने वाफेचा उपयोग करून खाणींमध्ये साठणारे पाणी बाहेर उपसणारे उपकरण सर्वांच्या आधी बनवले. त्यात कुठलाही फिरणारा किंवा मागे पुढे सरकणारा यांत्रिक भाग नव्हता. त्याच्या आधाराने न्यूकोमने बनवलेल्या इंजिनांत बंबामधील वाफ एका गोल पात्रांत (Cylinder मध्ये) जाऊन वाफेच्या दाबाने त्यातील दट्ट्या वर ढकलला जात असे आणि त्यावर थंड पाणी शिंपडून ती वाफ थंड केली की तिचा दाब कमी झाल्याने दट्ट्या परत खाली येई. पण यांत बराच वेळ जात असे. पण अशा प्रकारे एक जवळ जवळ संपूर्ण इंजिन वॉटच्या आधी आलेल्या यंत्रज्ञांनी तयार केलेलेच होते. मात्र ते अजून प्रयोगावस्थेत होते. तो आपोआप चालत नसे आणि दट्ट्याला एकदाट वरखाली करायला खूप वेळ लागत असल्यामुळे व्यवहारात त्याचा फारसा उपयोग नव्हता.

वॅटने वाफेला इंजिनाच्या बाहेर काढून कंडेन्सरमध्ये तिला थंड करण्याची महत्वाची सुधारणा केली आणि इंजिनातला सिलिंडर व कंडेन्सर या दोघांना वेगळे करून त्या दोघांमध्ये एक झडप (valve) बसवली. त्यामुळे पाण्याची वाफ बनणे, तिने दट्टयाला वरखाली ढकलणे आणि वापरलेल्या वाफेला थंड करून तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर करणे ही कामे वेगवेगळी झाली. एका झडपेमधून सिलिंडरमध्ये वाफ गेली की दट्ट्या बाहेर ढकलला जाई आणि दुस-या एका झडपेतून वाफ बाहेर पडली की तो सिलिंडरच्या आत परत येई. आता हे काम क्षणार्धात होऊ लागले. त्यानंतर त्याने दट्ट्या व दोन्ही झडपा एका चक्राला जोडून त्या एका विशिष्ट क्रमाने आपोआप उघडतील व मिटतील अशी व्यवस्था केली आणि संपूर्णपणे स्वयंचलित असे इंजिन त्यातून तयार झाले. ऊष्णतेच्या माध्यमातून बॉयलरमध्ये वाफेला दिलेल्या ऊर्जेचा कसा चांगला वापर होतो व कुठे ती वाया जाते या संपूर्ण प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून व सर्व भागांच्या रचनेमध्ये आमूलाग्र बदल करून एक सक्षम असे स्वयंचलित यंत्र जेम्स वॉटने जगाला दिले.

पण अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही घटना घडण्याच्याही ब-याच आधीपासूनच लीड्समधील कारखानदारीला सुरुवात झालेली होती. मेंढ्या पाळणे, त्यांच्या केसापासून लोकर बनवून त्याचे कापड विणणे हा व्यवसाय या भागात पूर्वापार हस्तकौशल्यावर चालत आला होता. सोळाव्या शतकांत विणकामाच्या कांही कार्यांसाठी सोयिस्कर अशी यंत्रे तयार झाली. असे कांही यांत्रिक भाग असलेला व त्याबरोबरच मक्याच्या पिठाची गिरणी चालवणारा आर्मली मिल हा कारखाना सोळाव्या शतकातच सुरू झाला. कालांतराने त्याची चाके फिरवण्यासाठी पाणचक्क्या बसवल्या व आयर नदीवर धरण बांधून कालव्याद्वारे पाण्याच्या सतत वाहणा-या प्रवाहाची सोय केली. अशा प्रकारचे आणखी कांही कारखाने व त्यांच्या यंत्रसामुग्रीच्या निर्मितीसाठी लोखंडाला आकार देणा-या भट्ट्या सुध्दा लीड्सच्या आसपास उभ्या राहिल्या.

दगडी कोळसा व लोखंडाचे खनिज यांच्या खाणीसुध्दा लीड्सच्या आसमंतात सुरू झाल्या होत्या. पूर्वीच्या काळात तेथील सर्व काम माणसेच बाहुबलाने करीत असत. घोडे जुंपलेल्या गाड्यामधून खाणीतले मजूर त्यांनी उकरून काढलेले खनिज वर आणीत असत. त्यांचे श्रम वाचवण्याच्या दृष्टीने तिथे साध्या रस्त्यांऐवजी रुळावरून गडगडत जाणारे गाडे बनवले गेले, त्या गाड्यांवरून जास्त माल वाहून नेता येऊ लागला. एक लांबलचक कालवा खणून त्याच्या दोन्ही बाजूने रस्ते बांधले. नावेमध्ये सामान ठेऊन ती दोरीने घोड्यांना बांधीत व दोन्ही बाजूला रस्त्यावर धांवणारे घोडे ती नाव पाण्यातून ओढून नेत. अशा प्रकारच्या अनेक युक्त्या वापरून कमी कष्टात अधिक उत्पादन होऊ लागले. त्यामुळे ही कारखानदारी भरभराटीला आली तसेच व्यापार नांवारूपाला आला.

वाफेच्या इंजिनाचा शोध लागताच त्याचा अनेक प्रकारे उपयोग सुरू झाला. सर्वात प्रथम लीड्स जवळील कोळशाच्या खाणीमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी घोड्यांच्या जागी वाफेचे इंजिन वापरण्यात आले. त्यासाठी लागणारे रूळ आणि गाडे आधीपासून तयार झाले होतेच, त्यांना घोड्यांऐवजी इंजिन जोडले गेले. व्यापारी तत्वावर चालणारे आणि वाहतुकीचा खर्च वाचवणारे हे जगातील पहिले इंजिन होते. आर्मली मिलमध्येसुध्दा तेथे असलेल्या पाणचक्क्यांना पूरक किंवा पर्यायी व्यवस्था या दृष्टीने पहिले वाफेचे इंजिन बसवले गेले. पुढे ही इंजिनेच त्या संपूर्ण कारखान्याच्या ऊर्जेचा मुख्य श्रोत बनली. थोड्याच कालावधीत लीड्समध्ये आणि इतर ठिकाणी असलेल्या हजारो कारखान्यांतील यंत्रे इंजिनांवर चालू लागली, रुळावरून मोठ्या रेल्वेगाड्या घावू लागल्या व समुद्रात महाकाय आगबोटी येऊन जगभर मोठ्या प्रमाणावर सामानाची वाहतूक सुरू झाली. अर्थातच या सगळ्या कामांसाठी त-हेत-हेची यंत्रसामुग्री निर्माण करणारे कारखाने सुध्दा लीड्समध्ये उभे राहिले. एकोणिसाव्या शतकांत लीड्स शहर संपूर्ण जगाची यंत्रशाळा (workshop of the world) म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील कांही वैशिष्ट्यपूर्ण उद्योगाबद्दल माहिती पुढील भागांत येईल.

हळूहळू जागतिक स्पर्धेमध्ये इथले जुने झालेले उद्योग मागे पडत गेले तरी नवनवे उद्योग सुरू होत गेले. सध्याचे वाहते वारे ओळखून तेथे व्यापार, अर्थपुरवठा, शिक्षण, संगणक सॉफ्टवेअर असे सेवा व्यवसाय (Service industry) जोरात सुरू आहेत. गेल्या दशकामध्ये इंग्लंडमधील बहुतेक शहरांची लोकसंख्या कमी झाली असली तरी लीड्सची लोकसंख्या मात्र वाढतच राहिली. अशा प्रकारे लीड्स शहराने यंत्रयुगाचा पुरेपूर फायदा उठवून जोरांत प्रगति केली आणि ती सुरूच आहे.
                                                                                    (क्रमशः)

लीड्सच्या चिप्स -४- यंत्रयुग (पूर्वार्ध)

शाळेत असतांना मला एका गोष्टीचे प्रचंड कुतुहल वाटायचे. आमच्या छोट्याशा गांवांतले कांही यंत्रमाग, छपाईयंत्रे, पिठाच्या गिरण्या वगैरे धडधड आवाज करणारी कांही यंत्रे मी पाहिली होती. जवळच्या भागातील शहरात असलेल्या कापडाच्या गिरण्या, साखरकारखाने वगैरेबद्दल लोकांना बोलतांना ऐकले होते. तिथल्या मोठाल्या यंत्रांमध्ये एका बाजूला कापूस किंवा ऊस घातला की दुस-या बाजूने आपोआप कापड किंवा साखर बाहेर पडते अशी माझी भोळसट समजूत होती. ही असली अवजड यंत्रे बनवणारे मोठमोठे कारखाने असतात असेही ऐकले होते. अर्थातच त्या कारखान्यातली यंत्रे नक्कीच आणखी कोठे तरी बनत असतील, पण तिथली यंत्रे कशा प्रकारची असतील व ती कोण आणि कोठे तयार करीत असेल हे कोडे कांही सुटता सुटत नव्हते.
 
इंजिनिअरिंगला गेल्यावर त्याचा बराचसा उलगडा झाला. यंत्रांची निर्मिती करणारे अशा प्रकारचे कांही कारखानेसुध्दा प्रत्यक्ष पाहिले. पण मनांत एक नवीन कोडे उगवले. आज दिसणारी यंत्रे फार फार तर शे दोनशे वर्षापूर्वी अस्तित्वात आली असतील. पण त्यापूर्वी जगातली अगदी पहिली यंत्रे कशी बनली असतील? या प्रश्नाचे सुसंगत उत्तर मिळायला मात्र बराच काळ लागला. ब-याच अवांतर अभ्यासानंतर लक्षांत आले की हा प्रवास कांही शेकडो नव्हे तर कित्येक हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला होता.

अगदी आदिमानवाच्या काळापासून मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा वागत आला आहे. इतर पशुपक्षी फक्त आपापली शिंगे, नखे, चोच वगैरे त्यांच्या स्वतःच्या अवयवांचाच उपयोग लढण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी करतात तर मनुष्यप्राणी मात्र लाकडाचे दांडके, काटेरी फांदी, मोठे हाड, अणकुचीदार दगड अशा प्रकारच्या हत्यारांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी आणि दुस-यावर आक्रमण करण्यासाठी खूप पूर्वीपासून करू लागला होता. तसेच झाडांची फळे व पाने तोडणे, मुळांना जमीनीच्या वर काढण्यासाठी जमीन खणणे अशा कामासाठीही तो विविध हत्यारांचा उपयोग करू लागला. त्यांत सतत सुधारणा होत गेली. कालांतराने माणसाला अग्नीवर नियंत्रण मिळवता आले आणि त्याच्या सहाय्याने विविध धातूंचे उत्पादन करून तो त्यांना मनासारखे आकार देता येऊ लागले. यातून पुराणकाळातील गदा, त्रिशूल, धनुष्यबाण व इतिहासकाळातील तलवारी, भाले, बरच्या तयार झाल्या. त्यांच्या बरोबरीनेच कु-हाडी, फावडी, कुदळी, पहारी यासारखी अनेक अवजारे तयार होऊन ती उपयोगात आणली गेली. माणसाने वनस्पतींवर व इतर प्राण्यांवर ताबा मिळवून शेती सुरू केली व तो एका जागी राहू लागला. बराच काळ गेल्यानंतर अग्नी आणि धातू या दोन्हींचा संयोग करून तोफा, बंदुका आल्या.

माणसाला चक्राचे महत्व समजल्यावर गाडीची चाके, जाते, रवी, रहाटगाडगे इत्यादि अनेक प्रकारे त्याचा रोजच्या जीवनात वापर सुरू झाला. कुंभाराचे चाक, तेलाची घाणी किंवा पाण्याचा रहाट यांना आद्य उत्पादक यंत्रे म्हणता येईल आणि अर्थातच त्यांना बनवण्यासाठी लागणारी सुतारकामाची औजारे ही आद्य मशीन टूल्स. या सर्वांचा विकास हजारो वर्षे होत गेला. सुरुवातीला ती अवजारे व यंत्रे फक्त हातानेच चालवीत असत. जास्त जोर लावण्याची गरज असलेली कांही यंत्रे पायांचा उपयोग करून चालवता येत आणि कांही दोन किंवा अधिक माणसे मिळून चालवीत.
 
वाहतूक व कृषी यांमध्ये पाळीव प्राण्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला होताच. मोठमोठी यंत्रे ओढण्यासाठी सुध्दा त्यांचा वापर सुरू झाला. पण या सर्वाला ठराविक मर्यादा होत्या कारण माणसे व प्राणी काही काळ काम केल्यानंतर थकून जातात. ती अविरत काम करू शकत नाहीत आणि त्यांच्या आकारमानाला व शक्तीला नैसर्गिक मर्यादा असतात. त्याच्या पलीकडे जाणारे महामानव किंवा राक्षस फक्त सुरस गोष्टींमध्येच असतात.

माणसाने इतर पाळीव प्राण्यांना कामाला जुंपले, तसेच तो निसर्गातल्या शक्तींचासुध्दा आपल्या कामासाठी सदुपयोग करू लागला होता. वाहत्या वा-याने ढकलली जाणारी शिडाची जहाजे त्याने बनवली आणि त्यांचा तसेच पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग तो दळणवळणासाठी करू लागला होता. एका जागी स्थिर असलेल्या पवनचक्क्यांचा उपयोग करून वा-याच्या जोरावर आणि पाणचक्कीच्या आधारे वाहत्या पाण्याच्या जोरावर यंत्रांची चक्रे फिरवण्याची किमयासुध्दा त्याने साध्य केली. पण या नैसर्गिक शक्तींवर त्याचे नियंत्रण नसते. ज्या ठिकाणी, ज्या प्रमाणात, ज्या वेळी आणि ज्या स्वरूपात त्या उपलब्ध असतात, त्यानुसारच त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक असते.

वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावर मात्र या सगळ्या मर्यादा ओलांडता आल्या. यंत्रांच्या रचनेमध्ये क्रांतिकारक बदल झाला. कारण आता एक न थकणारे साधन मिळाले व त्याचे आकारमान आणि त्याची शक्ती अनेक पटीने वाढवता येणेही शक्य होते. यंत्रांची चाके फिरवण्यासाठी स्वयंचलित इंजिनांचा जसजसा उपयोग होऊ लागला तसतशी त्यानुसार अवाढव्य यंत्रे विकसित होत गेली व त्यातून औद्योगिक क्रांती झाली. लीड्सच्या मुक्कामांत या सर्व प्रवासाच्या माहितीची उजळणी तर झालीच पण यातील बरेचसे टप्पे इंग्लंडमध्ये लीड्सच्या आसपास विकसित झालेले असल्यामुळे त्यातील काही महत्वाचे दुवे प्रत्यक्ष जवळून पहायला मिळाले. त्यांबद्दल सविस्तर माहिती उत्तरार्धात.

.  . . . . . .  . .. . . . . .  . .. .  . . ..  .. . . . . . .. .  . . . . . . ..  ..  ..     (क्रमशः)

लीड्सच्या चिप्स- भाग ३ – इतिहास

लीड्सच्या परिसरात अश्मयुग, कांस्ययुग वगैरे अतिप्राचीन काळातील कांही अणकुचीदार दगड आणि खापराचे व पत्र्यांचे तुकडे सापडले असल्यामुळे इतिहासपूर्व काळापासून इथे मनुष्यवस्ती होती असा कांही संशोधकांचा दावा आहे. मात्र इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकांपासून सबळ पुराव्यानिशी नमूद केलेला इतिहास उपलब्ध आहे. त्याकाळी इथेही सॅक्सन वंशाच्या लोकांची वस्ती होती. कुठे एखादा खांब, एखादे धुराडे, एखादा क्रॉस अशा प्रकारचे त्यांच्या साध्यासुध्या घरांचे आणि प्रार्थनास्थळांचे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत.

नवव्या शतकात नॉर्स वंशाच्या व्हायकिंग्जनी समुद्रमार्गे आक्रमण करून हा भाग जिंकून घेतला व तेथे आपली वसाहत वसवली. जवळचेच  त्या काळी “यॉर्विक (Jorvik)” या नांवाने प्रख्यात असलेले आताचे यॉर्क शहर त्या वेळी त्यांची राजधानी होती. आजही इंग्लडचा हा भाग यॉर्कशायर या नांवाने प्रसिध्द आहे. मात्र यंत्रयुगामध्ये उद्योगधंद्यातील भरभराटीमुळे लीड्सची झपाट्याने वाढ होऊन ते यॉर्कशायरमधील प्रमुख शहर बनले. यॉर्क हे एक केवळ ऐतिहासिक महत्वाचे गांव उरले आणि त्यामुळे पर्यटकांचे नन्दनवन झाले. अकराव्या शतकात विजेत्या विलियम (विलियम द कॉन्करर)च्या नेतृत्वाखाली इंग्लंडवर नॉर्मन वंशाची राजवट आली. त्याने यॉर्कच्या व्हायकिंग्जनासुध्दा नामोहरम केले. नॉर्मन लोकांचे तंत्रज्ञान, विशेषतः स्थापत्यशास्त्र चांगलेच विकसित झालेले होते याची साक्ष देणारी त्या लोकांनी बाराव्या तेराव्या शतकात बांधलेली कांही प्रार्थनास्थळे आज या भागात भग्नावस्थेत उभी आहेत. “खंडहर बताते हैं कि इमारत कितनी बुलंद थी।” असेच उद्गार त्यांना पहातांना तोंडात येतात. या सगळ्याच जमाती कालांतराने एकमेकात मिसळून गेल्या.

सातव्या आठव्या शतकात आयर(Aire) नदीच्या किनारी लोइडिस (Loidis) नावाचे एक सर्वसामान्य खेडे होते. तिथल्या चर्चचा उल्लेख “इंग्लिश चर्च व समाज”(‘History of the English Church and People by Venerable Bede’) या सन ७३० च्या सुमारास लिहिलेल्या पुस्तकात केलेला आहे. आजूबाजूच्या टेकड्यांवर आर्मली, ब्रॅमली, हेडिंग्ली, हन्सलेट वगैरे इतर खेडी होती. तेराव्या शतकात लॉर्ड मॉरिस पेनेल याने लोइडिस खेड्याच्या जवळच एका नवीन आणि त्याकाळच्या मानाने आधुनिक अशा नागरी वस्तीची उभारणी केली. त्याचा विकास व विस्तार होत होत त्याचे कालांतराने लीड्स शहरात रूपांतर झाले आणि आसपासच्या इतर खेड्यांचाही त्यातच समावेश झाला. १६२६ साली चार्ल्स या ब्रिटनच्या राजाने लीड्स नगराला औपचारिक मान्यता दिली आणि तिथे पहिली नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर सतराव्या आणि अठराव्या शतकात तेथील उद्योग धंदे, व्यापार व्यवसाय वगैरेमध्ये विलक्षण प्रगति झाली. व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीत ब्रिटन हे जगातील सर्वात पुढारलेले आणि औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य राष्ट्र झाले तेंव्हा लीड्सला “जगाची कार्यशाळा” (‘workshop of the world’) म्हणून मान्यता प्राप्त झाली. सन १८५८ मध्ये जेंव्हा भारतात स्वातंत्र्ययुध्द भडकले होते त्याच वर्षी लीड्स येथील भव्य आणि दिमाखदार टाउन हॉलचे प्रत्यक्ष व्हिक्टोरिया राणीच्या हस्ते उद्-घाटन झाले. सन १८९६ मध्ये लीड्सला सिटी म्हणजे महानगराचा दर्जा मिळाला आणि सन १९७४ मध्ये आजूबाजूच्या इतर अनेक गांवांचा समावेश करून बृहन् लीड्स (Leeds Metropolitan District) निर्माण झाले. लोकसंख्येनुसार लंडन आणि बर्मिंगहॅमनंतर लीड्सचा क्रमांक लागतो. सन १९९१ ते २००१ या दशकात ब्रिटनमधील इतर सर्व शहरांची लोकसंख्या कमी झाली पण फक्त लीड्सची लोकसंख्या वाढली. असाच ट्रेन्ड राहिला तर लवकरच लीड्स दुस-या क्रमांकावर पोचेल. ब्रिटनच नव्हे तर युरोपमधील प्रमुख व्यापार व उद्योग केन्द्रांमध्ये आता त्याची गणना होऊ लागली आहे.
.  . . . . . . . . . . ..  . . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)