सांचीचे स्तूप – भाग ३

 सांची येथील स्तूपांची प्रवेशद्वारे किंवा तोरणे हा सांचीदर्शनाचा सर्वात जास्त आकर्षक, सुंदर आणि महत्वपूर्ण भाग आहे. कल्पकता, कलादृष्टी, हस्तकौशल्य आणि चिकाटी या सर्व गुणांचा परमोच्च असा संगम या शिल्पकृतींमध्ये झालेला दिसतो. सांची येथील मुख्या स्तूपाच्या चार दिशांना चार भव्य अशी तोरणे आहेत, तर इतर स्तूपांसमोर एक किंवा दोन आहेत. मूळ स्तूपांचे बांधकाम होऊन गेल्यानंतर शेदोनशे वर्षांनंतर ही तोरणे बांधली गेली असे पुरातत्ववेत्ते सांगतात. तशी ती मुख्य स्तूपांपासून वेगळीच आहेत.

प्रत्येक तोरणासाठी जमीनीवर दोन उंच असे स्तंभ उभे केले आहेत. प्रामुख्याने हे चौकोनी आकाराचे आहेत, पण कांही ठिकाणी त्याच्या कडा घासून तिथे नक्षीकाम केले आहे तर कांही जागी त्यात सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. चार हत्ती, चार सिंह किंवा चार बटू वगैरे आकृती अशा खुबीने कोरल्या आहेत की वरील तोरणाचा भार ते उचलून धरत आहेत असेच वाटते. या दोन खांबाच्या माथ्यावर विशिष्ट अशा वक्र आकाराच्या तीन आडव्या शिळा ठेवल्या आहेत. त्यातील दर दोन शिळांमध्ये एक पोकळी ठेऊन त्या पोकळ्यांमध्ये तसेच सर्वात वरील शिळेच्या माथ्यावर सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. हे सारे शिल्प एकाच अखंड प्रस्तरातून कोरले आहे असे वाटत नाही, पण त्यामधले सांधे बेमालूम पध्दतीने जोडले आहेत, त्यामुळे ते सहजपणे दिसून येत नाहीत.

या कमानींचे उभे खांब व आडव्या पट्ट्या यांवर अगणित सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. ती सारी पॅनेल्सच्या स्वरूपात आहेत. द्विमिती चित्रांनाच थोडा उठाव देऊन त्यातून त्रिमितीचा भास निर्माण केला आहे. अनेक प्रकारच्या आकृती या चित्रांमध्ये एकमेकीमध्ये गुंतवल्या असल्यामुळे सत्य आणि कल्पित यांचे अगम्य असे मिश्रण या कलाकृतींमध्ये दिसते. यातील चित्रांचे मुख्य विषय आहेत :
१. जातक कथांमधील दृष्ये
२. गौतम बुध्दाच्या आयुष्यातील प्रसंग
३. बौध्द धर्माशी निगडित बुध्दानंतरच्या काळातील प्रसंग
४. मानुषी बुध्दांशी निगडित दृष्ये
५. विविध प्राणिमात्र व वनराई वगैरेंची चित्रे आणि कलाकुसर

जातक कथांमध्ये गौतमबुध्दाच्या पूर्वायुष्याच्या गोष्टी आहेत. ती बौध्दधर्मीयांची पुराणे आहेत असे म्हणता येईल. या पूर्वजन्मांमध्ये गौतमाने मनुष्य रूपात तसेच विविध प्राणी व पक्षी यांच्या रूपात जन्म घेतले होते. त्यात छद्दंत नांवाचा सहा दांत असलेला गजराज, महाकपी नांवाचा वानर, एक शिंग असलेले हरिण वगैरेंच्या उद्बोधक कथा आहेत. समा नांवाच्या मातृपितृभक्त मुलाची गोष्ट श्रावणबाळाच्या गोष्टी सारखी आहे. या कथांमधील प्रसंग चित्रमय पध्दतीने दाखवले आहेत. प्रत्येक चित्रामधील अनेक पात्रांच्या मुद्रा व त्यांचे हांवभाव पाहण्यासारखे आहेत.

गौतमबुध्दाच्या जीवनातले प्रसंग त्याच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. त्याची आई मायादेवी हिला एक दृष्टांत होऊन एक महात्मा तिच्या उदरी जन्माला येणार असल्याचे समजते. सिध्दार्थाच्या जन्मामुळे राजधानीत सर्वांना आनंदीआनंद होतो, त्यानंतर कुमार सिध्दार्थाचे बालपण, यशोधरेबरोबर विवाह, त्याने रथात बसून राज्याचे निरीक्षण करायला बाहेर पडणे, घरदार सोडून रानात जाणे, बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होणे वगैरे सारा कथाभाग कांही प्रत्यक्ष रूपाने तर कांही अप्रत्यक्ष रूपाने दाखवला आहे.

एक सजवलेला घोडा त्यावर आरूढ झालेल्या राजकुमाराला घेऊन रानाच्या दिशेने जातो आणि उलट दिशेने एक रिकामा घोडा खाली मान घालून परत येतांना दिसतो एवढ्या दोन चित्रांतून गौतमाचे तपश्चर्या करण्यासाठी रानात जाणे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे बोधीवृक्षाखाली गौतमाची आकृती न दाखवताच त्याचे तिथे असणे सूचित केले आहे.

बौध्द धर्माच्या प्रसारार्थ गौतमबुध्दाने तसेच त्याच्या प्रमुख अनुयायांनी मोठमोठे दौरे काढून जागोजागी प्रवचने दिली, संघ स्थापन केले, त्यांना अनेकविध माणसे भेटली. त्यात कांही राजे होते तर कांही दीनवाणे पीडित लोक होते, कांही पंडित होते तशाच गणिकासुध्दा होत्या. या सर्वांचा कसा उध्दार झाला हे वेगवेगळ्या कथांमध्ये सांगितले आहे. महावीर हा अखेरचा तीर्थंकर होता तसेच गौतम हा शेवटचा बुध्द होता, त्याच्या आधीसुध्दा कांही बुध्द होऊन गेले अशी बौध्दधर्मीयांची मान्यता आहे. त्या सर्वांच्या जीवनाशी निगडित कथा आहेत. या सर्वच गोष्टी चमत्कारांनी भरल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या शक्यतेच्या कोटीतल्या वाटतात त्यांचा समावेश इतिहासात केला गेला असावा. सांची येथील तोरणांवरील चित्रांत शक्य व अशक्य या दोन्ही प्रकारच्या गोष्टी दाखवल्या असल्यामुळे त्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत. लक्षपूर्वक पाहून त्या चित्रांचा अर्थ लावावा लागतो.

याशिवाय अनेक प्रकारचे जलचर व थलचर पशु, पक्षी तसेच झाडे, पाने, फुले वगैरेंनी ही चित्रे सुशोभित केलेली आहेत. त्यातले अनेक पाकळ्यांचे कमळ, धम्मचक्र, स्तूपाचा बाह्य आकार, बोधीवृक्ष, त्याखाली जिच्यावर बसून गौतमबुध्दाने तप केले ती शिला, सम्राट अशोकाचे चार सिंह वगैरे कांही प्रतीके अनेक जागी कोरलेली दिसतात. हे चार सिंह आणि चक्र यांना भारताच्या नाण्यांवर व नोटांवर स्थान मिळाले आहे.

तोरणाचे स्तंभ आणि आडव्या शिला यांच्या माथ्यावरील मोकळ्या जागांवर पूर्णपणे त्रिमित अशा आकृती आहेत. यांत घोड्यावर किंवा हत्तींवर बसलेले स्वार, नृत्य करणा-या नर्तकी वगैरे आहेत. कांही मनुष्याकृतींना तर आतल्या बाजूला पहाणारे एक आणि बाहेरच्या बाजूने पहाणारे दुसरे अशी दोन दोन तोंडे आहेत. माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे तसेच अंतर्मुखसुध्दा व्हावे असे यातून सुचवले आहे.

अशा प्रकारच्या खूप मजा इथे आहेत. ही चित्रे पाहण्यासारखी आहेतच, पण त्याबरोबर विचार करायला लावणारी आहेत. मात्र त्यासाठी बौध्द धर्म, त्याचे तत्वज्ञान, त्यांच्या समजुती वगैरेंची माहिती असायला हवी.

. .  . . . . . . . . (समाप्त)

सांचीचे स्तूप – भाग २

बौध्द धर्माच्या पुरातनकालीन परंपरेत स्तूप म्हणजे एक समाधी किंवा स्मारक असते. महात्मा गौतम बुध्दाचे महानिर्वाण ख्रिस्तजन्माच्या पाचशे वर्षे आधी होऊन गेले. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार त्यांचेवर दाहसंस्कार करून त्यावर एक समाधी बांधली गेली. ती कदाचित स्तूपाच्या आकाराची असावी. त्यानंतर सुमारे तीन शतकांनी सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्या प्रसाराचे काम हिरीरीने पुढे नेले. त्याने त्यापूर्वी केलेल्या निरनिराळ्या लढायांत प्रचंड मानवसंहार झाला होता. त्या पापातून मुक्त होऊन चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बोधिसत्वाचे चौर्‍याऐंशी हजार स्तूप बांधले होते अशी आख्यायिका आमच्या मार्गदर्शकाने सांगितली. एकाच पुण्यात्म्याच्या अनेक जागी समाध्या असणे मी तर कधी ऐकले नाही. त्यात तीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या मानवाच्या पार्थिवाचे चौर्‍याऐंशी हजार भागात विभाजन करणे शक्यतेच्या कोटीतले वाटत नाही. त्यामुळे यात अतीशयोक्ती वाटली. चक्रवर्ती सम्राट अशोकाकडे सत्ता आणि समृध्दी या दोन्ही गोष्टी मुबलक असल्यामुळे त्याने गांवोगांवी भिक्खूंसाठी मठ बांधून दिले असतील आणि ते दुरूनही चटकन ओळखू यावेत यासाठी टेकड्या टेकड्यांवर स्मारकाच्या रूपात स्तूप उभे केले असण्याचीही शक्यता आहे. त्या कालातले सारेच बांधकाम दगड, माती, विटा वगैरेंपासून केलेले असल्यामुळे ते दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालौघात वाहून गेले असणार. त्यातल्या त्यात सांची येथील काम आज जास्तीत जास्त सुस्थितीत दिसते, पण त्यामागे वेगळीच कारणे आहेत.

महात्मा गौतम बुध्दाचा जन्म आजच्या नेपाळमधील लुंबिनी या जागी झाला. राजकुमार सिध्दार्थ या नांवाने तो कपिलवस्तू या नगरात वाढला. राजवाड्यातील सुखी जीवनाचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला आणि बिहारमधल्या गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करतांना त्याला ज्ञानप्राप्ती झाली. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी तो आजचा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ या भागात पुढे आयुष्यभर भ्रमण करत राहिला. आजच्या मध्यप्रदेशातील सांची या गांवाला गौतमबुध्दाने कधीच भेट दिली नव्हती. मग त्याची समाधी किंवा एवढे मोठे स्मारक इथे कां बांधले गेले? या प्रश्नाचे एक कारण असे दिले जाते की सम्राट अशोकाच्या एका राणीचे माहेर नजीकच असलेल्या विदिशानगरीत होते. त्यामुळे त्याचा थोडा ओढा या बाजूला होता. हा भाग आर्थिक दृष्टीने समृध्द होता आणि विदिशा हे एक महत्वाचे शहर होते. मोठ्या शहराच्या जवळ पण उंच टेकडीवर असल्यामुळे त्यापासून थोडे अलिप्त अशी ही निसर्गरम्य जागा भिख्खूंना राहण्यासाठी आकर्षक होती. असा सर्व बाजूंनी विचार दूरदृष्टीने करून सम्राट अशोकांने या जागी फक्त एक स्तूपच बांधला नाही, तर बौध्द धर्माच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे एक प्रमुख केंद्र या जागी उभे केले.

देशभरातील शिकाऊ तसेच अनुभवी भिख्खू इथे येऊन रहात असत आणि प्रशिक्षण घेऊन तयारीनिशी धम्मप्रसारासाठी बाहेर पडत असत. यात हे केंद्र चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आणि पुढील तेरा शतके त्याचा विकास अधून मधून होत राहिला. वेगवेगळ्या काळातल्या तत्कालिन राजांनी त्याच्या सौंदर्यात आणि समृध्दीत वेळोवेळी भर घातली. सम्राट अशोकाने बांधलेला मुख्य स्तूप फक्त विटांनी बांधलेला होता. कांही काळाने तो मोडकळीला आला. तेंव्हा त्याची डागडुजी करून त्याच्या सर्व बाजूंनी दगडी बांधकाम केले गेले. नंतर कोणी त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरुषभर उंच असा चौथरा सर्व बाजूंनी बांधून त्यावर चढण्याउतरण्यासाठी दगडी पायर्‍या बांधल्या. भारताचे सुवर्णयुग मानले जाणार्‍या गुप्तवंशाच्या राजवटीत अनेक सुंदर मूर्ती या परिसरात बसवल्या गेल्या. बौध्द धर्म परमेश्वराची मूर्तीपूजा मानत नाही. त्यांच्या मताप्रमाणे तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमेश्वराची कोणत्याही सगुण रूपातली प्रतिमा इथे दिसत नाही किंवा तिची पूजाअर्चा होत नाही, पण बुध्दाच्या मात्र अगणित रूपामधील प्रतिमा पहायला मिळतात. मुख्य स्तूप बांधून कांही शतके लोटल्यानंतर इतर स्तूप त्या जागी बांधले गेले, तसेच त्यांना आकर्षक अशी प्रवेशद्वारे बांधली गेली. सांचीच्या स्तूपामधील सर्वात सुंदर, अगदी अप्रतिम म्हणता येईल असा भाग म्हणजे स्तूपांच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उभ्या केलेल्या कमानी किंवा तोरणे आहेत. इतके सुंदर प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे विशेष असे कांहीच नाही असा अनुभव आपल्याला फार क्वचित येतो. या कमानींबद्दल सांगण्यासारखे खूप असल्यामुळे ते पुढील भागात देईन.

सम्राट अशोकाचे एकछत्र साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा भाग कधी एकाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या अधिपत्याखाली यायचा तर कधी स्थानिक राजेरजवाडे शिरजोर होत असत. त्यांच्या मर्जीनुसार कधी बौध्द धर्माला महत्व प्राप्त होत असे, तर कधी त्याचा राजाश्रय काढून घेतला जात असे. हा उतार चढाव तेरा शतके इतका प्रदीर्घ काळ चालल्यानंतर बहुधा बौध्द धर्मीयांनी या जागेला कायमचा रामराम ठोकला असावा. कारण अकराव्या शतकानंतरच्या काळातला एकही बौध्द धर्माशी संबंधित अवशेष येथील उत्खननात सापडला नाही. त्यानंतर इतर कोणीही या जागेचा सदुपयोग न केल्यामुळे ती पुढील सातआठ शतके पडून राहिली होती. मोठ्या स्तूपांची पडझड झाली होती, लहान लहान स्तूप दगडामातीच्या ढिगा-यांखाली गाडले गेले होते आणि सगळीकडे दाट झाडाझुडुपांची गर्दी झाली होती. भारतातील इतर कांही सौंदर्यस्थळांप्रमाणेच सांचीच्या प्राचीन स्तूपांचा नव्याने शोध एका इंग्रज अधिका-याने लावला.

अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी भारतात चांगलेच हातपाय पसरवले होते. मोगलाई आणि मराठेशाही लयाला चालली होती. त्यांच्या प्रमुख सरदारांना राजेपद आणि नबाबी देऊन इंग्रजांनी आपले मांडलिक बनवले होते. त्या राजांना संरक्षण, मदत, सल्ला वगैरे देण्याचे निमित्य करून जागोजागी इंग्रज अंमलदार पेरून ठेवले होते आणि त्यांच्या दिमतीला कवायती फौजा दिल्या होत्या. जे याला तयार झाले नाहीत त्यांची राज्ये खालसा करून इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणण्याचा सपाटा चालवला होता. सन १८१८ मध्ये त्यांनी पुण्यातली पेशवाई कायमची बुडवली त्याच वर्षी भोपाळच्या नवाबाच्या पदरी असलेल्या जनरल टेलरला सांचीचा स्तूप अचानक सापडला. टेहेळणी करण्याकरता तो तिथल्या टेकडीवर चढून गेला असतांना झाडाझुडुपांच्या आत लपलेल्या स्तूपाचा भाग त्याला दिसला. झाडेझुडुपे तोडून आणि दगडमातीचा ढिगारा बाजूला केल्यावर त्याला स्तूपाचा आकार दिसला आणि त्याने त्या गोष्टीची नोंद केली.

त्या पुरातन वास्तूच्या आत एकादा खजिना गाडून ठेवला असल्याची भूमका उठली आणि त्याच्याबरोबरच त्या द्रव्याचे रक्षण करणारी एकादी दैवी किंवा पैशाचिक शक्ती त्या जागी वास करत असल्याच्या वावड्याही उठल्या. त्यांना न जुमानता कांही धीट भामट्यांनी स्तूपाच्या आतमध्ये आणि आजूबाजूला बरेच खोदून पाहिले आणि खजिन्यांऐवजी अस्थी किंवा राखेने भरलेले कलश मिळाल्यावर कपाळाला हात लावला आणि हाताला लागेल ते उचलून नेले. या सगळ्या गोंधळात येथील प्राचीन ठेव्याचा बराच विध्वंस झाला. अशोकाने स्तूप बांधतांना त्याच्या समोर दगडाचा एक सुरेख स्तंभ उभा केला होता. त्याचे तुकडे नंतर शेजारच्या गावातल्या जमीनदाराकडे मिळाले. तेलबियांमधून तेल गाळण्यासाठी किंवा उसाचा रस काढण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता म्हणे.

इंग्रजी राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर ब्रिटीशांच्या केंद्रीय सरकारमध्ये पुरातत्वशाखेची स्थापना करण्यात आली आणि त्या खात्यातर्फे या जागी योजनाबध्द रीतीने उत्खनन आणि साफसफाई करून जमीनीखाली दडलेली देवळे, स्तूप, कमानी, निवासस्थाने वगैरे काळजीपूर्वक रीतीने शोधून काढण्यात आली. पडझड जालेल्या सर्व स्तूपांची डागडुजी आणि आवश्यक तेवढी पुनर्बांधणी करून त्यांना पूर्वीची रूपे देण्यात आले. या कामाचे सर्वाधिक श्रेय सर जॉन मार्शल यांनी सन १९१२ ते १९१९ या काळात केलेल्या अभूतपूर्व अशा कामगिरीला जाते. त्यांनी पाया घालून दिल्यानंतर पुढे आलेल्या संशोधकांनी हे काम चालू ठेवलेच आणि आजही ते चाललेले आहे. जागतिक कीर्तीच्या पुराणकालीन अवशेषांमध्ये म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सांचीचा समावेश होतो आमि जगभरातले अभ्यासू या जागंला भेट देण्यासाठी इथे येतात.

इतस्ततः सापडलेले कमानींचे तुकडे गोळा करून आणि जोडून त्या उभ्या करण्यात आल्या. अशोकस्तंभ मात्र पुन्हा एकसंध करता येण्यासारखा नसल्यामुळे खंडितच राहिला. त्याचा जमीनीलगतचा खालचा भाग स्तूपाच्या जवळच जमीनीत गाडलेल्या स्थितीत आहे. मधला मोठा तुकडा आडवा करून एका शेडमध्ये ठेवला आहे आणि चार दिशांना चार सिंहाची तोंडे असलेला शीर्षभाग म्यूजियममध्ये ठेवला आहे. आतून भरीव असलेले स्तूपसुध्दा कालौघात अभंग राहिलेले नव्हते त्या ठिकाणी बांधकाम करून उभारलेली देवळे टिकणे शक्यच नव्हते. त्यामुळे ती सगळी भग्नावस्थेत सापडली आणि त्याच अवस्थेत राखून ठेवली आहेत. उभे असलेले सुंदर खांब, कांही तुळया, चौकटी, कोनाडे, शिखरांचे भाग वगैरेवरून तत्कालिन वास्तुशिल्पकलेचा पुरेसा अंदाज येतो. त्यातली कोणतीच वास्तु आकाराने भव्य नाही, पण ज्या आकाराच्या दगडांचा वापर त्यात केलेला दिसतो ते पाहता कोणत्याही यांत्रिक सहाय्याशिवाय या शिला खडकातून खोदून कशा काढल्या असतील, कशा तिथवर आणल्या असतील आणि कशा रीतीने खांबांवर चढवल्या असतील याचे कौतुक वाटते. एका जागी रांगेत ओळीने उभ्या असलेल्या सात आठ उंच खांबांवर सरळ रेषेत मोठमोठ्या फरशांच्या तुळया मांडून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून अशा प्रकारच्या ग्रीक व रोमन अवशेषांची आठवण येते.

पूर्वीच्या काळातल्या मठांच्या अस्तित्वाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. त्यातील एका मुख्य जागी एक संपूर्ण मठच उत्खननातून बाहेर निघाला आहे. या आयताकृती जागेत सरळ रेषेत अत्यंत प्रमाणबध्द अशा अनेक लहान लहान चौकोनी खोल्या दगडांच्या भिंतीतून बांधल्या होत्या. देशविदेशातून आलेले बौध्द धर्माचे विद्वान, प्रसारक आणि विद्यार्थी तिथे राहून अध्ययन, अध्यापन, ध्यानधारणा वगैरे गोष्टी करत असतील. मठाच्या या इमारतींना लागूनच एक अवाढव्य आकाराचा दगडी कटोरा ठेवला आहे. सर्व भिख्खूंना मिळालेले अन्न त्यांनी त्यात टाकायचे आणि सर्वांनी मिळून ते भक्षण करायचे असा रिवाज त्या काळी असावा.

या जागी केलेल्या उत्खननात अगणित नाणी, मातीच्या भांड्यांचे तुकडे वगैरे मिळाले आहेत. अनेक लहान मोठ्या आकाराच्या दगडी प्रतिमा आहेत. त्यातील कांही बहुतांश शाबूत आहेत, कांहींचे थोडे तुकडे निघाले आहेत, तर कांही छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आहेत. अनेक शिलालेख आहेतच, शिवाय खांब, तोरण वगैरेंवर लिहिलेला बराच मजकूर स्पष्टपणे दिसतो. पण तो बहुधा ब्राम्ही लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि पाली भाषेत असल्यामुळे कळणारही नाही. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने सांची हे फार महत्वाचे ठिकाण आहे. त्यांचे तज्ज्ञ या सगळ्यांचा सुसंगत अर्थ लावून त्यातून निष्कर्ष काढत असतात.

…. . . . . . . (क्रमशः)

सांचीचे स्तूप – भाग १

शाळेत शिकतांना इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयात सांचीबद्दल थोडेफार वाचनात आले होते, त्या भागातून रेल्वेने जातांना मुद्दाम लक्ष ठेऊन सांची स्टेशनजवळच असलेल्या टेकडीवरील त्या वास्तूच्या घुमटांचे दर्शन घेतले होते, पण मुद्दाम मुंबईहून इतक्या दूर खास तेवढ्यासाठी जाण्याएवढी तीव्र इच्छा मात्र कधी झाली नव्हती. विदिशाला जाण्याचा योग आला तेंव्हा मात्र सांची पाहूनच परत यायचे ठरवले.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन वर येण्याच्या आधीच आम्ही घरातून निघालो आणि पंधरा वीस मिनिटात सांचीला पोचलो तोंवर ते अजून कोवळेच होते. विदिशाहून भोपाळकडे जाणार्‍या महामार्गावरून जातांना सांचीच्या स्तूपाकडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. त्या फाट्यावर वळताच लगेच पुरातत्वखात्याची चौकी लागली. तिथली तिकीटाची खिडकी उघडलेली होती. भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, बांगलादेश वगैरे भरतखंडातल्या पर्यटकांसाठी माणशी दहा रुपये तिकीट आहे तर इतर देशातील नागरिकांसाठी त्याचा दर थेट अडीचशे रुपये इतका आहे असे तिथल्या फलकावर लिहिलेले होते. अमेरिकेत जन्मलेल्या आपल्या लहानग्या नातवाला सोबत आणले तर इतके पैसे द्यावे लागतील असा शेरा कोणी मारला, पण जगातल्या सगळ्याच लहान मुलांना इथे विनामूल्य प्रवेश असल्यामुळे सध्या तरी तशी वेळ आलेली नाही अशी दुरुस्ती केली गेली. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळे दर दाखवणारा तक्ता दिला होता, पण त्याची वसूली करणारा नगरपालिकेच्या कंत्राटदाराचा कर्मचारी अजून आला नसावा. तो वाहनतळावर बसला असेल असे समजून आम्ही आपली गाडी पुढे दामटली.

स्तूप ज्या टेकडीवर आहेत तिथपर्यंत वर चढण्यासाठी चांगला रस्ता आहे. वर गेल्यावर एक लहानसा पार्किंग लॉट होता. वीस पंचवीस गाड्या तिथे उभ्या राहू शकल्या असत्या. तिथे जागा नसली तर तिथे पोचण्याच्या रस्त्याच्या कडेने आणखी चाळीस पन्नास गाड्या उभ्या करता येतील. एकाच वेळी याहून जास्त संख्येने तिथे येणार्‍या वाहनांची संख्या कधी होत नसणार. रमत गमत वेळ घालवण्यासारखे हे ठिकाण नसल्यामुळे कोणीही तिथे तासभरसुध्दा रहात नसेल.

त्या दिवशीच्या पर्यटनाची बोणगी आम्हीच केली होती. त्यामुळे रस्त्यावरही कोणी भेटले नाही आणि पार्किंग लॉटही अगदी रिकामा होता. वाहनतळाच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीला कार उभी करून आम्ही गेटपाशी गेलो. तिथली झाडलोट, राखणदारी वगैरे करणारे दोन तीन कर्मचारी गप्पा मारत बसले होते. आम्ही प्रवेश केल्यावर त्यातलाच एकजण माहिती द्यायला तयार झाला. त्याच्या बरोबर आम्ही समोरच असलेल्या मुख्य स्तूपाकडे वळलो.

यापूर्वी सारनाथला एकच भव्य आकाराचा स्तूप पाहिल्यासारखे मला आठवत होते आणि शाळेत असतांना पाहिलेल्या सांचीच्या चित्रांत एकच स्तूप असायचा. रेल्वेतून जातांनासुध्दा टेकडीच्या माथ्यावर असलेला एकच स्तूप पाहिला होता. प्रत्यक्षात ती टेकडी चढून वर गेल्यावर तिच्या शिखरस्तानी एक मोठा स्तूप आणि त्याच्या जवळच उतारावर दोन मध्यम आकाराचे स्तूप दिसले. लहान सहान अगणित स्तूपांचा तर सडा पडला होता. असे दृष्य पाहणे मला अगदी अनपेक्षित होते. एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेल्या इतक्या स्तूपांचे कांही प्रयोजन वरवर तरी दिसत नव्हते.

लहानपणी स्तूपाचे चित्र पाहून ती एक वर्तुळाकृती इमारत असावी आणि तिच्या माथ्यावर अर्धगोलाच्या आकाराचा घुमट बांधलेला असावा असाच माझा समज झाला होता. अशा प्रकारचे घुमट अडीच हजार वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राने बांधले गेले असतील आणि त्यांचा भार कशाच्या आधारावर तोलला जात असेल असे तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न इंजिनियरिंग शिकल्यानंतर पडू लागले. शिवाय असे घुमट बांधण्याचे कौशल्य जर ख्रिस्तपूर्व युगात भारतीयांकडे होते तर ते मध्येच लुप्त होऊन पुन्हा इस्लामी राजवटीत कां प्रगट झाले असाही प्रश्न सतावू लागला. त्यांचे उत्तर सारनाथला मला मिळाले. तेथील स्तूपाला प्रदक्षिणा घालून पाहिली, पण कोठेच आत जाण्याचा दरवाजा दिसला नाही. आजूबाजूला कोणता भुयारी मार्गही सापडला नाही. अखेर चौकशी करता स्तूप ही इमारत नसून तो एक प्रकारचा बुरुज आहे असे समजले. आंतमध्ये दगडमातीचा ढिगारा रचून त्याला विवक्षित आकार देण्यासाटी बाहेरून भिंत बांधली होती. त्याला पोकळी नव्हतीच, त्यामुळे त्याच्या आंत प्रवेश करण्याचा प्रश्नच नव्हता. ही माहिती मला मिळालेली असल्यामुळे सांचीच्या स्तूपाकडे पाहतांना तिच्याकडे एक इमारत या नजरेने मी पाहिलेच नाही.

. . . . . . . . . . . (क्रमशः)