तेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या

मला तीन सख्ख्या आत्या होत्या. सर्वात मोठ्या गंगूआत्या आमच्या जमखंडी गावातच रहात होत्या, मधल्या कृष्णाआत्या कल्याणला होत्या आणि धाकट्या सोनूआत्या आमच्यासोबतच रहायच्या. या वर्षातल्या पक्षपंधरवड्याच्या निमित्याने मी त्यांना ही शाब्दिक आदरांजलि वहात आहे.

गंगूआत्यांचे घर आमच्या घरापासून लहान गावाच्या मानाने थोडे दूर म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते, पण तो रस्ता बाजारपेठेमधून आरपार जाणारा एक हमरस्ता होता. त्यामुळे आम्हाला तो फार लांब वाटत नव्हता. मी नेहमी त्यांच्या घरी जात येत होतो आणि ती मंडळीही नेहमी आमच्याकडे येत असत. आमचे जवळजवळ एकत्र कुटुंब असल्यासारखेच होते. आमच्या गंगूआत्या मनाने फारच चांगल्या होत्या. त्या शांत, सोज्वळ, प्रेमळ, स्वाभिमानी आणि कमालीच्या सोशिक व समजुतदार अशा होत्या. जुन्या मराठी सिनेमांमधल्या एकाद्या सुस्वभावी आदर्श आईसाठी सुलोचनाबाईंच्या जशा भूमिका असायच्या तशा आमच्या या आत्या प्रत्यक्षात होत्या. त्यांना प्रभावी चेहेऱ्याबरोबरच गोड आवाजाची देणगीही मिळाली होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते तरीही त्या भजने आणि जुनी गाणी अगदी तालासुरात गात असत आणि त्यांचे साधे गुणगुणणेसुद्धा मंजुळ वाटत असे .

आपले मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करून आणि त्या ती जबाबदारी खंबीरपणे आणि शांतपणे पेलत होत्या. मी लहान असतांना मला त्याचे महत्व समजत नव्हते, पण मला जाण येऊ लागल्यानंतर त्यांचे मोठेपण समजत गेले. माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात माझ्या चुलत बहिणी होत्या आणि माझा एक मावसभाऊही आमच्याकडे रहायचा. त्यात गंगूआत्यांची मुले आल्यावर घराचे गोकुळ होत असे. त्या काळात सख्खी, चुलत, मावस, आत्ते, मामे अशी सगळी भावंडे सगळ्यांसाठी सारखीच असायची. घरातले तसेच घरी आलेले सगळे मुलगे आपले भाऊ आणि सगळ्या मुली आपल्या बहिणी असायच्या. घरातली मोठी माणसेसुद्धा आमच्यात भेदभाव करत नव्हती. आमच्यातली ही आपुलकी पुढेही टिकून राहिली याचे श्रेय माझी आई आणि गंगूआत्या या दोघींना आहेच. त्यातही कुणावर न चिडता, न रागावता मुलांची शांतपणे समजूत घालण्याची अवघड कला गंगूआत्यांना चांगली अवगत होती. त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे.

आमच्या गंगूआत्या कामाला वाघ होत्या, त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, कुणा पूर्वजांचे श्राद्धपक्ष असे काही कार्यक्रम असले, कोणी पाहुणे आले किंवा दिवाळीचा फराळ करायचा असला तर अशा वेळी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असे. त्या वेळी गंगूआत्या पुढाकार घेऊन आणि गरज असल्यास मुलामुलींना हाताशी घेऊन हसत खेळत त्या सगळ्या कामांचा फडशा पाडत असत. स्वयंपाकघरातल्या अशा प्रकारच्या सामुदायिक मोहिमांची दृष्ये अजून माझ्या डोळ्यासमोर येतात.

गंगूआत्यांचा मोठा मुलगा विद्याधर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीता कामाला होता. त्यांच्या कंपनीला बीएआरसीतल्या एका मोठ्या बिल्डिंगचे काम मिळाले तेंव्हा विद्याधरची त्या कामावर नेमणूक झाली. त्यांच्यासाठी अणुशक्तीनगरमधल्या एका मोकळ्या जागेत लहानशी तात्पुरती वसाहत बांधली गेली आणि त्यात ते लोक रहायला आले. मी जमखंडी सोडल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी पुन्हा एकदा गंगूआत्या आमच्या घराच्या जवळ रहायला आल्या आणि आमचे नेहमी एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. आता त्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत आल्या होत्या आणि आमच्याबरोबर माझ्या मुलांनाही त्यांची माया मिळाली. त्या काळात माझी आईही आमच्याकडे रहात होती. त्या दोघींचीही पुन्हा एकदा गट्टी जमली आणि जुन्या काळातल्या आठवणींची उजळणी होत राहिली. अशी तीन चार वर्षे मजेत गेल्यावर ते बीएआरसीमधले बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गंगूआत्या आणि आपल्या कुटुंबासह विद्याधर डोंबिवलीला रहायला गेला, पण आम्हाला जमेल तसे आमचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले.

माझ्या दुसऱ्या आत्या म्हणजे कृष्णाआत्यासुद्धा पूर्वीच्या काळी जमखंडीतच रहात होत्या असे मी ऐकले आहे, पण मला समजायला लागले तेंव्हापासून मात्र त्या मुंबईजवळील कल्याणला स्थाईक झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कल्हळ्ळीच्या व्यंकटेशावर अपार श्रद्धा आहे. व्यंकोबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मुलांसह अधून मधून जमखंडीला येत असत आणि त्यांचे आमच्याकडे काही दिवस माहेरपणही होत असे. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे अगत्याने स्वागत होत असे आणि त्याही घरातल्याच होऊन जात. तेंव्हा त्या कल्याण मुंबईच्या वेगळ्या शहरी जीवनाच्या गंमती जंमती तेवढ्या आम्हाला सांगत असत. त्यासुद्धा खूप प्रेमळ, अगत्यशील आणि मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या लीलाताईचे म्हणजे माझ्या चुलत बहिणीचे लग्न दादरला करायचे ठरले तेंव्हा आम्ही सर्व मंडळी कल्याणला जाऊन कृष्णाआत्यांच्या घरातच उतरलो होतो आणि तिथले प्रत्यक्षातले शहरी जीवन पाहिले होते. पुढे मी शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आलो तेंव्हा कृष्णाआत्या आणि नाना माझे एक प्रकारचे स्थानिक पालक (लोकल गार्डियन) होते. वयपरत्वे त्यांना प्रवास करणे शक्य होत नव्हते, पण मी मात्र तीन चार महिन्यात अचानक कल्याणला एकादी चक्कर टाकून त्यांना भेटून येत होतो आणि हक्काने एकादा दिवस त्यांच्या घरी रहातही होतो. तेंव्हा माझेही अत्यंत प्रेमाने आणि अगत्याने स्वागत होत असे. पुढे मी संसाराला लागल्यावर त्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

माझ्या जन्माच्याही आधी आमच्या सोनूआत्यांना दुर्दैवाने वैधव्य येऊन त्या माहेरी परत आल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण करून जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम करायला लागल्या होत्या. त्यांचे सासरचे आडनाव करंदीकर असले तरी गावात आणि शाळेतही त्यांना ‘घारेबाई’ याच नावाने ओळखले जात होते. त्या घरातली एक प्रमुख मोठी व्यक्ती म्हणून आमच्याबरोबर रहात होत्याच, शिवाय त्यांची शाळा, तिथल्या इतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचे एक वेगळे विश्व होते. त्यांच्या त्या विश्वातली मुळगुंद सोनूताई आणि सुब्बाबाई ही नावे मला साठ वर्षांनंतर अजून आठवतात. सोनूआत्यांचा हा ग्रुप नेहमी भेटून काही ना काही प्लॅन करायचा. एकदा तर त्या मिळून भारताच्या सहलीवरसुद्धा गेल्या होत्या असे मला आठवते.

सोनूआत्यांकडे विलक्षण निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती होती. त्या किती तरी जुन्या घटनांचे अतीशय बारकाईने तपशीलवार वर्णन करून सांगायच्या. त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्या माहितीतल्या माणसांची संख्या अमाप होती. “ही शांता म्हणजे आपल्या गोदीच्या नणंदेच्या जावेच्या मावसबहिणीची शेजारीण” अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या साखळ्या त्या बोलता बोलता सहजपणे उलगडून दाखवत आणि त्या नेहमी अचूक असत. मी तर त्यांना ‘नात्यांचा काँप्यूटर’ असेच म्हणेन. जमखंडीच्या लहान विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काय नाते होते, इतकेच नव्हे तर त्यांचे आपसातले संबंध कसे होते हे त्यांना पक्के माहीत असायचे. त्यांना माणसांची चांगली पारख होती. “कुणीही काही सांगितले तर त्यावर भोळसटपणे विश्वास ठेवायचा नसतो. त्यामागे त्याचा काय हेतू असू शकेल हे आपण त्याला कळू न देता पहायला पाहिजे”. वगैरेसारखी मॅनेजमेंटची तत्वे त्यांना चांगली माहीत होती हे त्यांच्या बोलण्या आणि वागण्यामधून अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असे. लहान मुलांनी मोठे होत असतांना दुनियादारीसुद्धा शिकून घेणे कसे गरजेचे आहे याचे काही धडे आम्हाला त्यांच्याकडून मिळत गेले.

सोनूआत्या नेहमी घरातल्या सर्वांशी अगदी मिळून मिसळून छान मजेत गप्पागोष्टी करत असत, पण त्यांचे टेंपरामेंट जरा वेगळे होते. त्यांचा पारा जरासा लवकर चढत असे आणि उतरतही असे. कदाचित त्यांच्या लहानपणी त्या घरातल्या सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांकडून त्यांची खूप काळजी घेतली जात असणार यामुळे असेल, पण कळत नकळत त्या फटकन दुखावल्या जाऊन त्यांचा मूड जाऊ नये अशी काळजी सर्वांकडून घेतली जात असे. त्यांच्याशी बोलतांना जरा जपून बोलावे लागत असे. कदाचित त्या माझ्यावर कधीच रागावल्या नसतीलही, पण तरीही मला त्यांचा थोडा धाक वाटायचा. त्यांना घरकामाची किंवा स्वयंपाकपाण्याची मनापासून फारशी आवड नव्हती आणि त्या बाबतीत त्या विशेष पुढाकार घेत नव्हत्या. कदाचित त्या वेळी मला असे वाटणे चुकीचेही असेल, पण माझी लहानपणची आठवण अशीच आहे.

माझ्या आत्यांना जावई, सुना, नातवंडे वगैरे पहायला मिळाली. माझ्या मनात त्यांच्या कितीतरी खूप जुन्या आठवणी आहेत, त्या सांगाव्या तितक्या कमीच आहेत. माझ्या संस्कारक्षम वयात माझ्या मनाची जी जडणघडण होत गेली त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या आठवणी आल्यावर आज एवढेच म्हणावेसे वाटते, “तेथे कर माझे जुळती.”

पंपपुराण – भाग १ : लहानपणी पाहिलेले पंप

१. केरोसीनचा पंप

kerocenePump

माझा जन्म होण्याआधीच पंप या वस्तूने आमच्या घरात प्रवेश केला होता आणि तो रोजच्या वापरात होता. त्यामुळे पंप हा शब्द मला समजायला लागल्यापासून माझ्या ओळखीचा होता. आमच्या घरात दोन लहानसे पंप असायचे, पण त्यातल्या एकाचाही पाण्याशी कांही संबंध नव्हता. किंबहुना त्यांचा पाण्याशी स्पर्शसुध्दा होता कामा नये अशी काळजी घेतली जात असे.

त्या काळात चार गॅलनच्या टिनाच्या चौकोनी डब्यातून केरोसीन किंवा घासलेट घरी आणले जात असे. आमच्या घरी त्याचा उल्लेख ‘रॉकेल’ या नांवाने होत असे. एका पंपाचा उपयोग करून ते रॉकेल त्या डब्यातून एका उभ्या बाटलीत काढले जात असे आणि त्या बाटलीतून ते रोजच्या उपयोगासाठी वापरले जात असे. यासंबंधातल्या सगळ्या वस्तू परदेशातून आल्या तेंव्हा त्यांच्या नांवाची मराठी रूपांतरे होत गेली. ‘रॉक ऑइल’ चे ‘राकेल’ झाल्यावर खोबरेलसारखेच ते एक प्रकारचे तेल झाले. अत्यंत दुर्गंधी असल्यामुळे त्याचा उपयोग मात्र फक्त जाळण्यासाठी किंवा तैलरंगांचे डाग काढण्यासाठी होत असे. ‘गॅस लाईट’ चे ‘घासलेट’ झाले, ‘बॉटल’ची बाटली झाली. ‘फनेल’च्या आकाराला ‘नरसाळे’ हा शब्द होता, पण बोलीभाषेत त्याला आम्ही ‘नाळके’ म्हणत होतो. ‘पंप’ हा आंग्ल शब्द मात्र ‘संथ’, ‘कंद’, ‘संप’ यासारखा वाटत असल्यामुळे मराठी भाषेत चपखल बसला. हा शब्द परभाषेतून आला असेल असे मला कधी वाटलेच नाही. त्या काळात आमची घ्राणेंद्रिये जरा जास्तच संवेदनाशील असल्यामुळे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून रॉकेलचा डबा, बाटली, पंप आणि नाळके या सगळ्या वस्तू एका वेगळ्या खोलीतल्या कपाटात बंद करून ठेवल्या जात असत. गरज पडेल तेंव्हाच त्या बाहेर काढून काम झाल्यानंतर परत त्या जागी नेऊन ठेवल्या जात.

डब्यातून केरोसीन उपसण्यासाठी लागणाऱ्या पंपाची रचना अगदी साधी सोपी असते. एका उभ्या नळकांडीच्या तळाला एक भोक ठेवलेले असते. त्यावर एक साधी झडप बसवलेली असते. ती एकाच बाजूने उघडली जात असल्यामुळे पंपात आलेले रॉकेल डब्यात माघारी जात नाही. त्या पंपाच्या आत एक दट्ट्या असतो. एका बारीकशा सळीच्या तळाला एक पत्र्याची चकती जोडून तो तयार केलेला असतो. चिमटीत पकडून धरण्यासाठी ती सळी वरच्या टोकाला वाकवलेली असते. पंपाच्या वरच्या बाजूला एक तोटी बसवलेली असते. पंपाने वर खेचलेले तेल या तोटीतून बाहेर पडते.

डब्यातून रॉकेल काढण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे डब्याच्या शेजारी बाटली ठेऊन तिच्या तोंडावर नरसाळे बसवले जाते. डब्याच्या वरच्या बाजूच्या एका कोपऱ्यात असलेल्या लहानशा तोंडावरील झांकण उघडून तो पंप त्यातून आत सोडला की त्या पंपाच्या नळकांडीच्या तळाशी असलेल्या भोकामधून डब्यातले तेल पंपात शिरते. हाताने दट्ट्या वर उचलल्यावर त्याला जोडलेल्या चकतीच्या वर असलेला रॉकेलचा स्तंभ वर उचलला जातो आणि तोटीमधून ते तेल नरसाळ्यात पडून बाटलीत जाते. चकती आणि नळकांडे यामधील बारीक पोकळीतून ते या वेळी हळू हळू खाली पडत असते. पण दट्ट्या झटक्यात ओढल्याने बरेचसे रॉकेल त्याच्यासोबत वर उचलून बाहेर काढता येते. तो सावकाशपणे ओढला तर मात्र सर्व रॉकेल बाजूने खाली पडून जाईल आणि नरसाळ्यात कांहीच येणार नाही. त्यामुळे तेल बाहेर काढतांना हाताला झटके देणे आवश्यक असते. डब्यातील रॉकेलची पातळी जसजशी खाली जात जाईल तसतसे त्याचे दर स्ट्रोकमध्ये पंपातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होत जाते.

दट्ट्या खाली ढकलतांना मात्र याच्या उलट परिस्थिती असते. तो झटक्यात खाली ढकलला तर नळकांड्यामधील रॉकेलचा त्याला विरोध होतो आणि तो मोडून काढण्यासाठी जास्त जोर लावला तर पंपाच्या दट्ट्याची सळी वाकण्याचा किंवा तिला जोडलेली चकती निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे तो किंचित कमी गतीने जरा जपून खाली ढकलायचा आणि झटक्यात वर ओढायचा अशा प्रकारचे थोडे कौशल्य या कामात लागते. डब्यातून बाटलीत रॉकेल काढण्याचे काम नेहमी घरातल्या मुलांकडेच असायचे. त्यामुळे कमीत कमी सेकंदात किंवा कमीत कमी स्ट्रोक्समध्ये बाटलीभर रॉकेल कोण काढतो याची त्यांच्यात चढाओढ असायची. पण बक्षिस म्हणून हे कामच गळ्यात पडले आहे हे लक्षात आल्यावर तो मुलगा चँपियनचा इन्स्ट्रक्टर बनून लहान भावाला तयार करायच्या प्रयत्नाला लागत असे.

 

२. स्टोव्हचा पंप

Primus_Stove

आमच्या घरात असलेला दुसरा पंप हा घरातल्या प्रायमस स्टोव्हचा एक भाग होता. तो समजून घेण्याआधी या स्टोव्हची थोडी माहिती द्यायला हवी. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या ग्रामीण भागात घरोघरी खरोखरच फक्त मातीच्या चुलीच असत आणि जळाऊ लाकडे हे मुख्य इंधन असे. त्याखेरीज शेणाच्या गोवऱ्या, सुकलेले गवत, कागदाचे चिटोरे, कापडाच्या चिंध्या, लाकडाचा भुसा, नारळाची करवंटी, भुईमुगाच्या शेंगांची फोलपटे यासारखे जे कांही ज्वलनशील पदार्थ घरात असतील ते सारे बंबातल्या किंवा चुलीतल्या अग्नीनारायणाला स्वाहा केले जात असत. पण चूल पेटवायला बराच वेळ लागत असल्यामुळे तांतडीच्या कामासाठी किंवा फक्त थोडा वेळ काम असेल तर त्यासाठी प्रायमस स्टोव्हचा उपयोग केला जाई. चूल, शेगडी वगैरे साधने स्वयंपाकघरातल्या धुराड्याखाली एका ठराविक जागी जिथे जमीनीवर बांधलेली असतात त्या जागीच त्यांचा उपयोग करता येतो, पण हा स्टोव्ह उचलून कोठेही सहज नेता येत असल्यामुळे घराच्या कुठल्याही भागात त्याचा उपयोग करता येत असे. तसेच गरज पडल्यास चूल आणि शेगडी यांना पूरक म्हणूनही त्याचा उपयोग होत असे. असे हे एक सर्वगुणसंपन्न साधन असायचे. आज आमच्या जीवनाचा अत्यावश्यक अंग बनलेल्या गॅस आणि विजेवर चालणाऱ्या शेगड्या त्या काळात आम्हाला ऐकून सुध्दा ठाऊक नव्हत्या.

या प्रायमस स्टोव्हमध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पितळेची टांकी असते. तिच्यात रॉकेल भरायचे. त्या टाकीच्या मधोमध असलेल्या उभ्या नळीतून ते वर येऊन तिच्या तोंडाशी बसवलेल्या नॉझल्समधून त्याचा फवारा पसरतो. त्यापूर्वीच त्या रॉकेलचे बाष्पीभवन झालेले असल्यामुळे तो फवारा लगेच पेट घेतो आणि रॉकेलचे पूर्ण ज्वलन होऊन तीव्र ऊष्णता देणाऱ्या ज्वाला त्यातून निघतात. टांकीला जोडलेल्या तीन उभ्या सळ्यांवर एक तबकडी ठेवलेली असते. त्या तबकडीवर स्वयंपाकाचे भांडे ठेवले जाते. टांकीतले रॉकेल नळीतून वर चढण्यासाठी टांकीतल्या रॉकेलवर हवेचा दाब दिला जातो. हवेचा दाब जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने रॉकेल वर ढकलले जाते आणि त्या प्रमाणात ती ज्वाला प्रखर होते.

टांकीतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी पंपाचा उपयोग केला जातो. या पंपातसुध्दा एक लहानसा सिलिंडर (नळकांडे) आणि त्यात मागे पुढे सरकणारा पिस्टन (दट्ट्या) असतो. त्या दट्ट्याच्या तोंडाशी चामड्याचा खोलगट आकाराचा वायसर (वॉशर) बसवलेला असतो आणि सिलिंडरच्या दुसऱ्या टोकाला फक्त आंतल्या बाजूला उघडणारा व्हॉल्व्ह असतो. पिस्टन बाहेर ओढतांना बाहेरील हवा वायसरच्या बाहेरच्या बाजूने सिलिंडरमध्ये खेचली जाते आणि पिस्टन पुढे ढकलतांना खोलगट आकाराचा वॉशर सिलिंडरला घट्ट दाबला जातो. त्यामुळे आंतली हवा बाहेर पडू शकत नाही आणि तिचा दाब वाढत जातो. जेंव्हा तो टांकीमधील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यानंतर व्हॉल्ह उघडून जास्त दाबाची हवा टांकीत जाऊन तेथील हवेचा दाब अधिक वाढवते. अशा प्रकारे हवेचा दाब वाढवून स्टोव्हची आंच वाढवली जाते. स्टोव्हची आंच कमी करायची असेल तर टांकीमधील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक चावी ठेवलेली असते. ती थोडी सैल करताच आंतली थोडी हवा बाहेर पडून तिचा दाब कमी होतो. त्यानंतर ती लगेच आवळली नाही तर सगळा दाब नाहीसा होऊन स्टोव्ह बंद पडतो. काम संपल्यानंतर या चावीचा उपयोग करूनच स्टोव्ह विझवला जातो.

स्टोव्हमधील रॉकेल जळून कमी होत जाते तसतशी टांकीतली रिकामी जागा वाढत जाते आणि त्यामुळे तिच्यात असलेल्या हवेचा दाब कमी होतो. व्हॉल्व्ह आणि चावीमधून सूक्ष्म प्रमाणात हवा बाहेर पडूनसुध्दा तिचा दाब कमी होत असतो. त्यामुळे जळत असलेल्या स्टोव्हला अधून मधून पंप मारावाच लागतो. तसे नाही केले तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे रॉकेल नळीतून वर चढणार नाही आणि स्टोव्ह विझून जाईल. हा पंप मारण्यासाठी एका हाताने स्टोव्हची टांकी घट्ट धरून ठेवावी लागते आणि दुसऱ्या हाताने थोडा जोर लावावा लागतो. स्टोव्ह हा प्रकारच थोडा धोकादायक असल्यामुळे लहान मुलांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नसे. या पंपाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल असले तरी तो हाताळण्यासाठी मला बरीच वर्षे वाट पहावी लागली.

३. सायकलमध्ये हवा भरायचा पंप

bicyclepump

आमच्या घराजवळच एक सायकलचे दुकान होते; म्हणजे सायकली विकण्याचे नव्हे, त्या तासागणिक भाड्याने देण्याचे. तिथे काम करणारी मुले पंपाने सायकलींच्या चांकांमध्ये हवा भरतांना दिसायची. स्टोव्हची आग प्रखर करणे आणि सायकलची चाके टणक बनवणे हे त्या दोन कृतींचे अगदी वेगवेगळे उपयोग आहेत. पण वातावरणामधील हवेला एका बंदिस्त जागेत कोंबून तिचा दाब वाढवणे हे मात्र या दोन्हीं पंपांचे समान उद्दिष्ट असते. त्यामुळे त्यांची रचना आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये खूप साम्य आहे. स्टोव्हचा पंप जेमतेम बोटभर असतो आणि तो सुध्दा टांकीच्या आंत घुसवून ठेवलेला असल्यामुळे त्याच्या दट्ट्याचे बारके टोक तेवढे बाहेरून दिसते. त्याला चिमटीत पकडून तो पंप मारायचा असतो. सायकलचा पंप चांगला हांतभर लांब आणि मनगटाएवढा रुंद असतो, शिवाय त्याला रबराच्या नळीचे दोन हात लांब शेपूट जोडलेले असते. त्या पंपाच्या स्टँडवर दोन्ही पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यावर दोन्ही हातांनी त्या पंपाचा दांडा वर खाली करून हवा भरायची असते. ते काम करतांना अंगाला घाम फुटतो.

स्टोव्हचा पंप आडवा असतो आणि सायकलीच्या चांकांत म्हणजे तिच्या टायरच्या आंतील ट्यूबमध्ये हवा भरणारा पंप उभा धरून चालवतात एवढा फरक सोडला तर सिलिंडर, पिस्टन, वॉशर वगैरे त्याचे भाग स्टोव्हच्या पंपासारखेच पण मोठ्या आकाराचे असतात. चांकात भरलेली हवा पंपात परत येऊ नये यासाठी आवश्यक असलेली झडप सायकलच्या चाकाच्या ट्यूबलाच जोडलेली असते. ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची नळी त्या व्हॉल्व्हला जोडतात. पंपाचा दांडा वर ओढतांना आजूबाजूची हवा सिलिंडरमध्ये शिरते आणि तो खाली दाबला की त्या हवेचा दाब वाढतो आणि व्हॉल्व्ह उघडून ती हवा सायकलच्या ट्यूबमध्ये भरली जाते. हवा भरून पंपाची नळी बाजूला केल्यानंतर तो व्हॉल्व्ह आंतील हवेला एकदम बाहेर जाऊ देत नाही. पण सायकलीचा उपयोग करतांना ती सूक्ष्म प्रमाणात हळू हळू लीक होते आणि तिचा दाब कमी होत जातो. त्यामुळे चांकाचे टायर मऊ आणि चपटे होऊ लागतात, ते आपल्याला जाणवते. ट्यूबला एकादे छिद्र पडले किंवा झिजून ती फाटली तर त्यातून आतली सगळी हवा फुसकन बाहेर पडते. त्या नंतर ट्यूबचे पंक्चर काढून किंवा ट्यूबच बदलून तिच्यात पंपाने हवा भरून तिला फुगवतात.

स्वयंचलित वाहनांच्या चांकामध्ये हवा भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वेगळे यंत्र बसवलेले असते. त्याला मात्र काँप्रेसर म्हणतात. यातही एक गंमत आहे. बंदिस्त जागेतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी त्यात आणखी हवेला घुसवणारे यंत्र काँप्रेसर म्हणून ओळखले जाते, पण त्याच जागेत आधीपासून असलेली हवा बाहेर काढून तिथे निर्वात पोकळी पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळे यंत्र लागते आणि त्याला व्ह्यॅक्यूम पंप असे संबोधतात. याचा अर्थ काँप्रेसर हा देखील पंपाचाच एक उपप्रकार आहे असे म्हणता येईल. हे पंपपुराण संपल्यानंतर त्यांचाही विचार करता येईल.

मी अगदी लहान असतांनासुध्दा आमच्या गांवाबाहेर दूर एक पेट्रोल पंपसुध्दा होता; म्हणजे आम्ही त्याबद्दल ऐकले होते. पूर्वी संस्थान असतांना आपल्या गाड्यांना व्यवस्थित तेल पाणी मिळावे या उद्देशाने संस्थानिकांनी कदाचित तो प्रायोजित केला असावा. पण संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर गांवात खाजगी मालकीच्या फारशा मोटारगाड्या उरल्या नव्हत्या आणि बाहेरगांवाहून मोटारीत बसून येणाऱ्यांची संख्याही नगण्यच असायची. मालवाहतूकीसाठी कधी तरी येणाऱ्या ट्रकगाड्या आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सर्व्हिसच्या गाड्या याच तिथे जात असतील किंवा कदाचित तो बंदच पडला असेल. तिकडे फिरकण्याचे मला कांहीच कारण किंवा निमित्य मिळाले नसावे. त्यामुळे तो ऐतिहासिक पंप पाहिल्याचे आठवत नाही. पण गांवाची प्रगती होत गेली, नवनवे चांगले रस्ते तयार झाले, तसतशी वाहतूक वाढत गेली आणि माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत गांवाच्या वेशीच्या आंतच एक नवा पेट्रोल पंप उभा राहिला. आम्हाला तो बांधला जात असतांना पासून रोजच तो जाता येतांना दिसत असल्यामुळे जमीनीखाली मोठमोठ्या टांक्या बांधल्या आहेत आणि टँकरमधून आलेले तेल त्यात साठवले जाते एवढे समजले होते आणि रबराच्या एका नळीतून ते मोटारीच्या टँकमध्ये भरतात हे दिसत होते. ते भरतांना किती तेल भरले आहे हे दाखवणारा कांटा फिरतांना पाहतांना मजा वाटायची. पण यात ‘पंप’ कशाला म्हणायचे? हे कांही त्या वेळी समजले नाही. जमीनीखाली असलेले पेट्रोल आपोआप त्या होजमधून वर चढून कसे येऊ शकते? असा भौतिकशास्त्रातला प्रश्नही त्या वयात मला त्रास द्यायला मनात आला नाही.

 

४. विहिरीवरील पंप

लहानपणी उन्हाळ्य़ाच्या सुटीत रोज सकाळी आम्ही सगळी मुले गांवाबाहेर असलेल्या एकाद्या मळ्यातल्या विहीरीत पोहायला जात असू. आमच्या गांवात तरणतलाव नव्हता आणि कृष्णा नदी चार मैल दूर अंतरावर होती. गांवातल्या विहिरींचे पाणी लोकांच्या रोजच्या उपयोगात येत असल्यामुळे गणपती विसर्जन सोडून इतर कधीही कोणीही त्यात उतरत नसे. त्यामुळे आधी पोहायला शिकण्यासाठी आणि नंतर त्याची मजा घेण्यासाठी आम्हाला गांवाबाहेरच जावे लागे. पूर्वी या सगळ्या विहिरींवर बैलाने ओढायची मोटच चालत असे. उन्हाळ्याच्या दिवसात मळ्यात फारशी पिके नसल्यामुळे तीसुध्दा क्वचितच चालतांना दिसे. पुढे एका विहिरीवर पंपसेट बसवला गेला. तेंव्हा त्याचे सर्वांना प्रचंड अपरूप वाटले.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच्या त्या काळात आमच्या जमखंडी संस्थानावर एका कांहीशा पुरोगामी विचारांच्या आणि थोड्या प्रजाहितदक्ष अशा राजाची राजवट होती. गांवाला वीज आणि पाणीपुरवठा करण्याची तत्कालीन उपलब्धतेनुसार त्याने चांगली सोय करून ठेवली होती. गांवाला वीजपुरवठा करणारे एक पिटुकले पॉवर हाऊस होते. तेलाच्या इंजिनावर चालणारा जनरेटर सेट त्यात बसवलेला होता. संस्थाने खालसा झाल्यानंतर त्याला कोणी वाली उरला नसावा. बरेच वेळा ते पॉवर स्टेशन बंदच असायचे. अधून मधून कधी कधी ते अनियमितपणे चालायचे. त्यातून डीसी (डायरेक्ट करंट) विजेचा पुरवठा होत असे. व्होल्टेज हा शब्द कोणी ऐकलेला नव्हता. संध्याकाळी अतीशय मंद दिवे लागत तेंव्हा विजेचे प्रेशर कमी आहे आणि मध्यरात्री ते प्रखर उजेड देत तेंव्हा ते प्रेशर फार वाढले आहे असे समजले जात असे. तांत्रिक दृष्ट्या योग्य परिभाषा वापरली गेली नसली तरी कॉमन सेन्सला पटणारा हा अर्थ बरोबरच होता. विजेवर चालणारे कोणतेही उपकरण, अगदी पंखादेखील, कोणाच्या घरी नव्हता. कदाचित एकाद्याने एकादे यंत्र आणले असले तरी त्या अनिश्चित आणि कमीजास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ते लवकरच बंद पडले असेल. पुढे अनेक वर्षानंतर आमच्या गांवात एक मोठा ट्रान्स्फॉर्मर बसवला गेला आणि ग्रिडमधून एसी विजेचा पुरवठा सुरू झाला. यातला फरक समजावून देणारा कोणीच ‘विंजनेर’ गांवात नसल्यामुळे त्या वेळी आम्हाला त्याचा फारसा उलगडा झाला नाही. गांवाबाहेर असलेल्या शेतात वीजपुरवठा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी पाहिलेला पहिला विहिरीवरचा पंपसेट डिझेल इंजिनाला जोडलेला होता.

गांवापासून चार पांच मैल अंतरावर कृष्णानदीवर छोटासा बंधारा घालून एक बारमहा पाणी साठवणारा डोह बनवला होता आणि पंपाच्या सहाय्याने ते पाणी गांवालगतच्या मेरूगिरीलिंगप्पा डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या टांकीत नेले जात असे. त्या टांकीमधून ते घरोघरी नळाद्वारे येत असे. हे पंपिंग स्टेशन कांही मला कधीच पहायला मिळाले नाही, गिर्यारोहण करून आम्ही बरेच वेळा मेरूगिरीलिंगप्पावरल्या टांकीवर मात्र जात असू. धाब्याची घरे असल्यामुळे छतावर टाकी बांधण्याची कल्पनाही कोणी करत नसे. नळातून आलेले पाणी घरातल्या जमीनीलगत असलेल्या हौदात साठवून वापरले जात असे. त्यामुळे पाण्याचा पंप हा प्रकार मला गांवाबाहेर असलेल्या मळ्यातच पहिल्यांदा दिसला.

घरी पाहिलेल्यी रॉकेलच्या किंवा स्टोव्हच्या पंपापेक्षा हा खूपच निराळा दिसत होता. एका बाजूने त्याला जोडलेला लांबलचक पाईप विहिरीत खोलवर नेऊन सोडला होता आणि दुसऱ्या बाजूचा छोटासा पाइपाचा तुकडा एका उथळ हौदात सोडून ठेवला असायचा. पंपाला जोडलेले इंजिन सुरू केले की विहीरीतले पाणी आपोआप त्या हौदामध्ये बदाबदा कोसळू लागायचे. तिथून पुढे पाटांमधून वळवत वळवत ते पाणी पिकांना दिले जात असे. इंजिन सुरू करण्यासाठी ते हँडल मारून फिरवले जाई. त्याआधी पंपात वरून पाणी ओतून तो पाण्याने भरला असल्याची खात्री केली जात असे. इंजिन सुरू होऊन भकाभका धूर काढू लागले की पंपातून बदाबदा पाणी बाहेर येत असतांना पहायला खूपच मजा वाटत असे. मग ते पाणी हाताने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा खेळ सुरू होत असे. मुले जरा जास्तच दंगा करत आहेत असे वाटले तर त्या मळ्याचा मालक दमदाटी करून त्यांना पिटाळून देत असे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

तार (टेलिग्रॅम)

सहा वर्षांपूर्वी जेंव्हा भारत सरकारने ही सेवा कायमची बंद करायचे ठरवले तेंव्हा हा लेख लिहिला होता.

तार (टेलिग्रॅम) (पूर्वार्ध)

दिवाळीच्या फटाक्यांमध्ये फुलबाजांना एक महत्वाचे स्थान असते. लोखंडाच्या एका जराशा कडक तारेला सगळ्या बाजूने शोभेची दारू चिकटवून फुलबाज्या तयार करतात. एकादा मोठा माणूस किंवा मुलगा आधी फुलबाजी पेटवतो आणि लहानग्याच्या हातात देतो. ते मूल बिचकत बिचकत त्या तारेचे टोक आपल्या चिमुकल्या चिमटीत पकडते हे दृष्य आपण दर दिवाळीला पाहतो. कुठल्याही प्रकारच्या तारेचा पहिला स्पर्श आणि ‘तार’ या शब्दाशी माझी ओळख सर्वात आधी अशीच झाली असावी. लहानपणी इतर काही तारासुध्दा माझ्या पहाण्यात आल्या होत्या. त्या काळात नायलॉनच्या दोऱ्या नसायच्या, कपडे वाळत घालण्यासाठी छताला दांड्या (आडव्या काठ्या) टांगून ठेवलेल्या असत आणि कपडे उन्हात वाळवण्यासाठी गच्चीवर तात्पुरत्या तारा बांधत. वीज वाहून नेण्यासाठी अंडरग्राउंड केबल्स नव्हत्या. रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर विजेचे खांब उभारलेले असायचे आणि एका खांबावरून दुसऱ्या खांबावर अशा विजेच्या तारा नेलेल्या असत. आमच्या घराजवळच्या खांबावरून दोन तारा आमच्या छपरावरच्या एका उंच खांबावर आणल्या होत्या आणि तिथून त्या घरातल्या वायरिंगच्या जाळ्याला जोडल्या होत्या. इलेक्ट्रिशियन (त्या काळात त्याला वायरमन म्हणत) सोडून अन्य कोणीही त्या तारांना स्पर्श करण्याचे धाडस करत नसे आणि कोणी हा वेडेपणा केलाच तर त्याला त्याची केवढी मोठी किंमत द्यावी लागली याच्या भीतीदायक गोष्टी विशेषतः मुलांना घोळून घोळून सांगितल्या जात असत. रस्त्यावर खेळ दाखवणारे डोंबारी लोक दोन बाजूला दोन तिगाडी (‘ए फ्रेम्स’) उभ्या करून त्याला एक जाड तार बांधायचे आणि त्या तारेवर तोल सांभाळून कौशल्यपूर्ण कसरत करून दाखवायचे. त्यावरूनच ‘तारेवरची कसरत’ हा वाक्प्रचार निघाला. भजनाच्या आणि गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये वीणा, तंबोरा, सतार, व्हायलिन अशा प्रकारची तंतूवाद्ये हमखास दिसत असत आणि त्यांच्या तारांना छेडून पहाण्याची अनावर उत्सुकता वाटत असे, पण तशी संधीही मिळत नसे आणि धीरही होत नसे. अशा प्रकारे ‘तार’ ही वस्तू अनेक रूपाने भेटत असली तरी ‘तार’ या शब्दाचा एक महत्वाचा अर्थ मला बराच काळ कळला नव्हता.

मी सात आठ वर्षाचा असतांना एकदा सकाळी एक पोस्टमन आमच्या घरी आला. आमचा नेहमीचा पोस्टमन थोडा वयस्क होता आणि तो दुपार टळून गेल्यानंतर हळू हळू चालत डुलत येत असे. पण सकाळी उजाडताच आलेला हा तरुण पोस्टमन वेगळा होता आणि सायकलवर बसून घाईघाईत आला होता. त्याला पाहून मी त्याच्याकडून पत्रे घेण्यासाठी दारात गेलो तेंव्हा त्याने मला घरातल्या कोणा मोठ्या माणसाला बोलावून आणायला सांगितले. अत्यंत गंभीर मुद्रेने काही सांगून त्याने आपल्या हातातला लिफाफा दिला. शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेल्या घरातल्या कोणी तरी त्यातला मजकूर वाचून त्याचा अर्थ सांगितला आणि घरात एकच हलकल्लोळ माजला. आमच्या घरातली रडारड ऐकून शेजारी धावत आले, त्यांनी जाऊन गावात रहात असलेल्या आमच्या इतर नातेवाईकांना ही बातमी सांगितली आणि ते सुध्दा धावत आले. मला कोणी काही सांगत नव्हते आणि तो भयाण गोंधळ पाहता काही विचारायचा धीर होत नव्हता. “आपले महादेवराव गेले अशी ‘तार’ आली आहे.” असे एक वाक्य कानावर आले. त्यातल्या ‘गेले’ याचा अर्थ थोडासा समजला, पण त्या घटनेचे कोणते गंभीर परिणाम होणार आहेत हे समजण्याचे माझे वय नव्हते. ही कसली ‘तार’ आणि कुठे आली आहे, हे मात्र काही लक्षात येत नव्हते. पोस्टमनने तर एक पाकिट दिले होते आणि त्यात चतकोर कागद होता. याचा कुठल्या तारेशी कसला संबंध होता?

माझ्या मोठ्या भावाने त्याच्या माहितीनुसार याचा थोडा उलगडा केला. नेहमीची पत्रे आधी कोणीतरी हाताने लिहितो, त्याच्या गावातल्या पोस्टात टाकतो, तिथून रेल्वे, बस वगैरेमधून प्रवास करून ती आपल्या गावातल्या पोस्टात येतात आणि मग आपला पोस्टमन ती आपल्याला आणून देतो. यात काही दिवस जातात. पण तार म्हणजे टेलिग्रॅममधला मजकूर मात्र एका गावामधून दूरवरच्या दुसऱ्या गावातसुध्दा एका विशिष्ट यंत्रांमधून क्षणभरात येतो आणि इथला पोस्टमन तो एका वेगळ्या कागदावर लिहून आपल्याला आणून देतो. त्यामुळे आपल्याला तो अर्जंट निरोप लगेच समजतो. यामुळे आत्ता तासाभरापूर्वीच बाहेरगावाहून केलेली ही तार आपल्याला लगेच मिळाली. त्या गावापासून आपल्या गावापर्यंत एक प्रकारची तार जोडलेली असते, तिच्यातून हा निरोप आपल्याकडे आला म्हणून त्याला ‘तार’ असे म्हणतात.

त्यानंतर मी जेंव्हा जेंव्हा पोस्ट कार्डे, पाकिटे, तिकीटे वगैरे आणण्यासाठी पोस्ट ऑफीसात जात असे तेंव्हा इतर खिडक्यांकडे लक्ष देऊन पहात होतो. तार पाठवण्यासाठी एक वेगळी खिडकी होती. तिथे कधीच गर्दी असायची नाही. एकादा माणूस तिथे आला तर तो एक फॉर्म मागून घेऊन आणि तो भरून देत असे आणि त्यात काय किंवा किती लिहिले आहे हे वाचून त्याप्रमाणे तिथला क्लार्क तार पाठवण्याचा चार्ज मागत असे. खिडकीच्या आतल्या बाजूला एक यंत्र होते. अधून मधून कधीतरी त्यातून कड कट्ट कडकट्ट असे आवाज येत असत आणि एक माणूस लक्ष देऊन तो आवाज ऐकून काही तरी लिहून घेत असे. हळूहळू या सगळ्या निरीक्षणांचा अर्थ समजत गेला. मोर्स नावाच्या शास्त्रज्ञाने डॉट् आणि डॅश या दोनच चिन्हांचा उपयोग करून एक सांकेतिक लिपी तयार केली. विशिष्ट वेळा आणि विशिष्ट क्रमाने ही चिन्हे लिहिली की त्यातून ए, बी, सी डी यासारखे एक एक अक्षर तयार होते आणि त्या अक्षरांमधून शब्द तयार करता येतात. डॉट् आणि डॅश या दोन चिन्हांच्या ऐवजी कड आणि कट्ट अशा दोन आवाजांमधून तशीच अक्षरे तयार करता येतात. पूर्वीच्या काळातल्या तारायंत्रांमध्ये एक विजेचा लोहचुंबक आणि वर खाली होणारा लहानसा हातोडा असे. त्या लोहचुंबकाला गुंडाळलेल्या तारेमधून विजेचा प्रवाह नेला आणि तो बंद केला तर तो हातोडा वर खाली होऊन खाली ठेवलेल्या पट्टीवर आदळून ध्वनि निर्माण करत असे. विजेचा प्रवाह सुरू किंवा बंद करण्यासाठी एक बटन असे. ते कमी किंवा जास्त वेळ दाबून दोन निरनिराळे ध्वनि उत्पन्न केले जात. निरोपात जी अक्षरे असतील त्याप्रमाणे हे ध्वनि तयार करून एका बाजूच्या यंत्रामधून पाठवले की दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या यंत्रामध्ये तसेच आवाज निघत आणि त्या ठिकाणी बसलेला ऑपरेटर ते आवाज ऐकून त्यांचे रूपांतर अक्षरांमध्ये करत असे. हा निरोप कोणाला द्यायचा आहे त्या माणसाचे नाव, गाव आणि पत्ता वगैरेसुध्दा अशाच प्रकारे सांकेतिक खुणांमधून पाठवले जाई. ते पाहून त्या गावातला पोस्टमन ते पत्र (ती तार) त्या माणसाच्या घरी नेऊन देत असे. या कामासाठी एक वेगळा पोस्टमन ठेवलेला असे. तो ही तार त्वरेने पोचती करत असे.

. . . . . . . . . . . . . . . . . . .

तार (टेलिग्रॅम) (उत्तरार्ध)

एका विद्युतचुंबकाच्या (इलेक्ट्रोमॅग्नेट) सभोवती विजेचा प्रवाह सोडला की लोखंडाचा एक दांडा थोडा उचलला जातो आणि बंद केला की गुरुत्वाकर्षणाने तो खाली येऊन एका पट्टीवर आदळून नाद निर्माण करतो. या तत्वावर आधारलेली सुरुवातीच्या काळातली तारायंत्रे त्या काळात क्रांतिकारी होती, पण त्यांची रचना सुटसुटीत होती. याच तत्त्वावर तयार केलेल्या एका यंत्रामध्ये एक काटा डायलवर पुढे किंवा मागे फिरत असे तर आणखी एका यंत्रातल्या कागदाच्या पट्टीवर . (डॉट) किंवा – (डॅश) उमटवत असे. एका युरोपियन शास्त्रज्ञाने तयार केलेल्या यंत्रामधला दांडा (रॉड) त्याने एका रसायनात बुडवून ठेवला होता, त्यातून विजेचा प्रवाह सोडला की हैड्रोजन वायूचा बुडबुडा निघत असे. अशा प्रकारच्या खुणांमधून कोणता अर्थ काढायचा याची एक परिभाषा निश्चित केली जात असे. त्यातले मोर्स कोड हे सर्वमान्य झाले आणि जगभरातले लोक त्याचा वापर करू लागले. भारतामधली तारेची सेवा मोर्सकोडवरच आधारलेली होती.

अशा प्रकारचा पहिला प्रयोग अमेरिकेत यशस्वी करून दाखवला गेल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीतच ब्रिटिशांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणले आणि कोलकाता, मुंबई, पेशावर, चेन्नै यासारख्या दूरवर असलेल्या शहरांना जोडणारे तारांचे जाळे पसरवले. भारतासारख्या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यामधील ठिकाणांबरोबर संपर्क ठेवण्यासाठी तारायंत्रांचा खूप उपयोग होऊ शकेल हे त्यांनी ओळखले असणार. म्हणजे तार किंवा टेलिग्रॅम आता दीडशे वर्षांहून जुने झाले आहे. ज्या काळात ही सेवा सुरू झाली होती तेंव्हा विजेचे उत्पादन आणि वितरणसुध्दा सुरू झालेले नव्हते. टेलिग्रॅम पाठवण्यासाठी आवश्यक असणारी वीजसुध्दा त्या यंत्रामध्येच तयार करायची व्यवस्था होती. त्यासाठी हाताने एक चक्र फिरवून वीजनिर्मिती करण्यासाठी एका डायनॅमोचा समावेश त्यात होता. अशा प्रकारची स्वयंपूर्ण यंत्रे माझ्या लहानपणी मीसुध्दा पाहिली आहेत. अनेक लहान रेल्वेस्टेशनांमध्ये विजेचे दिवे नसले तरी तारायंत्रे असत आणि हँडल मारून ती सुरू करून चालवली जात.

वीजवाहक तारेप्रमाणेच पोस्टाने आलेली तारसुध्दा नेहमी जबरदस्त शॉक देते असा माझ्या आधीच्या पिढीमधील लोकांचा अनुभव होता. त्यामुळे ‘तार’ या शब्दाची एक प्रकारची दहशत असायची. पुलंच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्या काळातल्या ‘उघड्या दरवाजांच्या संस्कृतीत’ तार घेऊन येणारा पोस्टमन जर एकादे वेळी गल्लीत शिरला तर त्या आळीतल्या सर्व लोकांना तो येतांना दिसत असे आणि त्याला पाहून सर्वांचे कान टवकारले जात. यमदूताचा अवतार वाटणारा तो माणूस ज्या घरात शिरे तिथे राहणाऱ्या लोकांची तर घाबरगुंडी उडत असे. मागील भागात जिचा उल्लेख झाला ती दुःखद वार्ता घेऊन आमच्या घरात आलेली तार अशा प्रकारेच त्या शब्दाबद्दलच मनात धडकी भरवून गेली होती. घरात कोणाचा टेलिग्रॅम येणे हा आमचा अगदी नेहमीचा अनुभव नसला तरी त्या घटनेच्या आधीसुध्दा इतर काही महत्वाचे संदेश असणाऱ्या तारा कदाचित आमच्या घरात आल्याही असतील, पण त्यातल्या मजकुराने घर ढवळून गेले नसेल, त्यामुळे त्याची बातमी आणि भीती लहान मुलांपर्यंत पोचली नसेल.

आजच्या मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या जमान्यात वाढलेल्या मुलांना कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात लहान गावांमध्ये साधे टेलिफोन्स (लँडलाइन फोन) देखील पोचलेले नव्हते. कुठलाही संदेश कोणालाही शक्य तितक्या लवकर पाठवण्यासाठी तार हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता, तोसुध्दा ज्या गावात पोस्ट ऑफीस असेल अशा मोठ्या गावांमध्येच. लहान खेड्यात राहणाऱ्या लोकांना तर तार करण्यासाठीसुध्दा जवळच्या मोठ्या गावात येऊन उत्तर मिळे पर्यंत तिथे थांबून रहावे लागत असे. तारेमधला सारा मजकूर खुल्लमखुल्ला असायचा. ती पाठवणाऱ्या पोस्टामधील कर्मचाऱ्याला तो मजकून वाचल्याशिवाय पाठवता येणे शक्य नव्हते आणि मोर्स कोडमधून त्याचे इंग्रजी लिपीत रूपांतर करण्याचे काम पोस्टामधला कर्मचारीच करू शकत असल्यामुळे त्यालाही तो समजत असे. अशा प्रकारे या यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व लोकांना तारेमधला मजकूर समजत असल्यामुळे त्यात गुप्तता राखणे जवळ जवळ अशक्य होते. यातूनही मार्ग काढायचा असला तर “लठ्ठ माणूस आला, म्हातारा झोपला, पक्षी उडाला” अशासारखे सांकेतिक निरोप पाठवणारे अवलिये ते पाठवत असतील आणि त्यावरून कोणते काम यशस्वीरीत्या झाले किंवा रखडले वगैरेचा बोध पलीकडच्या माणसाला होत असेल. पण असला निरोप फारच विचित्र असला तर त्या संदेशाची आणि तो पाठवणाऱ्यांची जास्तच चर्चा होण्याची शक्यतासुध्दा असते.

मी नववी दहावीला येईपर्यंत परिस्थिती बरीच बदलली होती. तोपर्यंत तारेमधून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये विविधता आली होती. मलाही पोस्टामधून तार पाठवणे अवगत झाले होते. पत्ता आणि मजकूर यामधील शब्दांच्या संख्येप्रमाणे त्याचा चार्ज लागत असे. पैसे वाचवण्याच्या उद्देशाने संक्षिप्तपणे तार पाठवण्याची एक भाषा तयार झाली होती. पोस्टातले लोकसुध्दा त्यांना दिलेल्या मजकुरात (कदाचित त्यांचे काम वाचवण्यासाठी) काटछाट करून देत असत. A, An, The यासारखे शब्द गाळून टाकले जात आणि is, was वगैरेंनाही फाटा दिला जात असे. संदर्भाप्रमाणे तारेमधला मजकूर वर्तमानकाळातला किंवा अगदी ताज्या भूतकाळातला आहे असे वाचक समजून घेत असे. आजकाल चॅटिंगसाठी तयार झालेली शॉर्टकटमधली भाषा वाचतांना मला पूर्वीच्या काळातली तारेची भाषा आठवते. मी पाठवलेल्या किंवा त्या काळात वाचलेल्या बहुतेच तारांमध्ये “ताबडतोब निघा”, “अमक्या तारखेला येतो” किंवा “सुखरूप पोचलो” हाच मजकूर असायचा. “मुलगा झाला, मुलगी झाली, लग्नाची तारीख ठरली, अमूक तारखेला बारसे अथवा लग्न” अशा आनंददायी बातम्यासुध्दा कधी कधी तारेमधून मिळत किंवा दिल्या जात. अशा तारा घेऊन येणारा पोस्टमन पेढे मागितल्याशिवाय रहात नसे.

नोकरदार मुलांना तडकाफडकी रजा मिळण्यासाठी तार हा पुरावा ग्राह्य मानला जात असे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास “अमूक तमूक सीरियस, स्टार्ट इमिजिएटली” अशा तारांच्या संख्येत एकदम खूप वाढ होत असे. महत्वाची परीक्षा द्यायला निघालेल्या मुलाला हार्दिक शुभेच्छा, परीक्षेमधले यश, लग्न, अपत्यप्राप्ती यासारख्या चांगल्या बातमीबद्दल अभिनंदन वगैरे संदेश तारेने पाठवून देण्याची प्रथा सुरू झाली. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटने अशा पंधरा वीस संदेशांची एक यादीच तयार करून त्यांना क्रमांक देऊन ठेवले होते. त्यातला क्र.४ किंवा १७ असा एक संदेश निवडून तो नंबर लिहून दिला तर त्याचा फक्त एकच शब्द मानला जाऊन तारेचा खर्च कमी होत असे आणि एका शब्दाच्या खर्चात आठ दहा शब्दांचा संदेश पाठवल्याचे समाधान तो पाठवणाऱ्याला मिळत असे. शिवाय अशा तारा छानशा रंगीत पाकिटांमधून पोचवल्या जात असत. तार घेऊन येणाऱ्या पोस्टमनबद्दल असलेले लोकांचे मत बदलण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असेल.

दूरध्वनि किंवा टेलीफोनच्या प्रसाराबरोबर टेलिग्राफला उतरती कळा लागली असे जगभरात सर्वत्र झाले. तार हा एकतर्फी संदेश आहे. त्याचे उत्तर यायला वेळ लागतो. आणखी माहिती हवी असेल, शंका विचारायच्या असतील तर त्यांचे निरसन व्हायला आणखी वेळ लागतो. टेलिफोनवर दोन माणसे संभाषण करू शकतात, त्यांनी एकमेकांना सांगितलेले एकमेकांना समजले आहे की नाही हे त्यात समजते. एकमेकांशी विचार विनिमय करून ते काही ठरवू शकतात, योजना आखू शकतात, त्यांना एकमेकांचा आवाज ऐकायला मिळतो अशे अनेक फायदे असल्यामुळे दूरध्वनि हा तारेच्या मानाने असंख्यपटीने चांगला पर्याय आहे. त्याच्यापुढे तारेचा टिकाव लागणारच नाही. तार या माध्यमात फक्त एकच विशेष असा होता की त्यामधून एक लेखी पुरावा तयार होतो आणि कायदेशीर बाबींसाठी त्याचा उपयोग होतो. यामुळे टेलिफोनवरून बोलणे झाल्यानंतर टेलिग्रॅम, टेलेक्स वगैरेंमधून कन्फर्मेशन पाठवणे सुरू झाले होते.

मी लहान असतांना लहान गावांमध्ये टेलीफोन सेवा नव्हतीच. मोठ्या शहरांमध्ये ती अनेक वर्षांपूर्वीपासून चालत आलेली असली तरी फक्त ऑफिसे आणि उच्चभ्रू समाजापर्यंतच पोचली होती. एका शहरामधून दुसऱ्या शहरातल्या कोणाला टेलिफोन करायचा असल्यास ट्रंककॉल लावावा लागत असे आणि तो अत्यंत वेळखाऊ प्रकार असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी गत्यंतर नसेल तरच त्याचा उपयोग केला जात असे. कालांतराने एसटीडी आणि आयएसडी या सेवा सुरू झाल्यानंतर टेलिफोनमधला हा अडसर दूर झाला आणि जगभरात कोणाशीही संभाषण करणे सुकर झाले. त्याच काळात टेलिग्राफचा विकास होऊन टेलिप्रिंटर, टेलेक्स वगैरे त्याची नवी रूपे आली. या प्रकारांमध्ये कडकट्ट करणारी यंत्रे जाऊन त्यांची जागा टाइपरायटर्सनी घेतली. एका गावातल्या यंत्रामध्ये टाइप केलेला मजकूर दुसऱ्या गावामधल्या मशीनवर जसाचा तसा आपोआप उमटू लागला. इंग्रजी भाषेमधील अक्षरांचे मोर्स कोडमध्ये आणि त्याचे पुन्हा इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याचे काम यंत्रांमध्ये होऊ लागले आणि त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ माणसांची आवश्यकता नाहीशी झाली. त्यामुळे टेलिफोनचा प्रसार झाल्यानंतरसुध्दा दोन तीन दशकेपर्यंत त्याच्यासोबतीला निरनिराळ्या प्रकारे टेलिग्रॅमचा उपयोगसुध्दा होत राहिला. टेलेक्सची यंत्रे ऑफिसांमध्येच बसवली जाऊ लागली. त्यांच्यायोगे चालणारे संदेशवहन थेट होत असल्यामुळे त्यासाठी पी अँड टी च्या मध्यस्थीची गरज राहिली नाही. पण घरगुती संदेशवहनासाठी ती परवडणे शक्य नसल्यामुळे तारेची आवश्यकता शिल्लक राहिली.

काँप्यूटर आणि इंटरनेटच्या प्रसारानंतर मात्र संदेशवहनात क्रांतीकारक बदल झाले. टेलिग्रॅम आणि टेलेक्समधून फक्त अक्षरे किंवा आकडे पाठवता येत होते, पण टेलिफॅक्समध्ये चित्र पाठवणे शक्य झाले. त्यामुळे ऑफिसेसमध्ये ते जास्त सोपे आणि प्रभावी तंत्र पॉप्युलर झाले. या तीन्ही माध्यमांसाठी विशिष्ट यंत्रसामुग्रीची गरज होती. पण इंटरनेटवरील ई मेलमधून टेक्स्ट, चित्रे आणि ध्वनिसुध्दा पाठवणे शक्य झाले. शिवाय त्यासाठी साधा पीसी पुरेसा असल्यामुळे कोणीही घरबसल्यासुध्दा ईमेल पाठवू शकू लागला. सेलफोनच्या तंत्रामध्ये झालेल्या क्रांतीनंतर संदेशवहन ही सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट झाली. फोनवर बोलणे तसेच टेक्स्ट आणि इमेजेस पाठवणे हे सगळे काम खिशात मावेल एवढ्या लहानशा यंत्राद्वारे होऊ लागल्यानंतर अशी यंत्रे सर्वसामान्य माणसाकडे असायला लागली. वॉट्सअॅपमुळे तर ते फारच सोपे आणि जलद होऊ लागले. त्यामुळे कोणीही कोणाशीही थेट संपर्क साधू लागला आणि कोणालाही संदेश पाठवण्यासाठी पोस्टात जाऊन तार करण्याची गरजच उरली नाही.

माझ्या लहानपणी आमच्या गावात तरी ‘तार’ हा त्वरित संदेश पाठवण्याचा एकमेव मार्ग होता, खेड्यांमध्ये तोसुध्दा नव्हता. चाळीस वर्षांपूर्वी मी मुंबईला आलो तेंव्हा इतर मार्ग उपलब्ध होऊ घातलेले असले तरी टेलिग्राफला खूप महत्व होते. मुंबईच्या फोर्ट विभागात सेंट्रल टेलिग्राफ ऑफीस नावाची मोठी इमारत होती (अजूनही असेल) आणि ती सदोदित गजबजलेली असायची. पण काळाच्या ओघात तारेचे महत्व कमी होत होत आता शून्याच्या जवळपास आल्याकारणाने २०१३मध्ये भारतातली ही सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी एकादी महत्वाची सेवा कधीकाळी अस्तित्वात होती हेसुध्दा पुढच्या पिढ्यांना कदाचित समजणार नाही.

क्रिकेट क्रिकेट

मी कधीच खास अंगात ड्रेस घालून, डोक्यावर कॅप चढवून आणि पायाला पॅड्स, हातात ग्लोव्ह्ज वगैरे जामनिमा करून मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. पण माझ्या साध्यासुध्या आयुष्याला विविध प्रकाराने क्रिकेटचा निसटसा स्पर्श झाला त्याच्या काही मजेदार आठवणी

क्रिकेट क्रिकेट – भाग १

आमच्या घराजवळ फक्त तीन चार इमारतींना जोडणारी एक लहानशी गल्ली  आहे. ही गल्ली लांबीला फारशी नसली तरी टाउन प्लॅनिंग करतांना तिला चांगली प्रशस्त रुंद बांधून ठेवली आहे पण सकाळ संध्याकाळचा थोडा कालावधी वगळता एरवी तिच्यावर वाहनांची विशेष वर्दळ नसते. शाळेला सुटी लागलेली असल्याने बरेच वेळा गल्लीतली मुले त्यावरच ‘क्रिकेट क्रिकेट’ खेळत असतात. परवा मी त्या गल्लीमधून चाललो असतांना सात आठ मुले तिथे ‘गल्ली क्रिकेट’ खेळत होती. लाकडाच्या एका आडव्या ठोकळ्यावर तीन वर्तुळाकार भोके पाडून त्यात तीन उभे दांडे बसवलेले पोर्टेबल स्टम्प्स अलीकडे मिळतात. त्या मुलांनी एका बाजूला असले स्टम्प्स ठेवले होते. अर्थातच हे डांबरी रस्त्याचे सुपर हार्ड पिच होते आणि त्यांचा खेळ टेनिसच्या सॉफ्ट बॉलने चालला होता. पिचच्या दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच खडूने रेघा मारून ‘क्रीज’ बनवली होती. गल्लीच्या तोंडाशी एकादी मोटरगाडी य़ेतांना दिसली की लगेच स्टंप्सना उचलून बाजूला ठेवून आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन ती मुले गाडीला वाट करून देत होती. पायी चालणाऱ्यांनी मात्र स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असल्यामुळे मी चेंडूवर लक्ष ठेवून रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून जपून चालत होतो.

मी हा खेळ पहात पहात पुढे जात असतांना बॅट्समनने टोलवलेला चेंडू थोडा जास्तच उडाला आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला निसटता लागून त्याच्या दाट पानांमध्ये घुसला आणि एक दोन सेकंदांनंतर पानांमधून वाट काढून सरळ घरंगळत खाली उतरला. तिथे उभ्या असलेल्या मुलाने त्याला अलगदपणे झेलून घेऊन झपाट्याने रस्त्यावर स्टम्पच्या ऐवजी मारलेल्या रेषेला लावला आणि “औट, औट” असा पुकारा केला. विरुध्द संघाची मुले प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहायला लागताच तो मुलगा म्हणाला, “मी हा त्याचा कॅच पकडला आहे आणि याला रनआउट केले आहे. म्हणजे दोघेही औट ना?”
“चल रे, एका बॉलवर कधी दोघेजण औट होतात का?” एक मुलगा उद्गारला.
“पण त्यांच्यातला कोणी तरी औट व्हायलाच पाहिजे ना?”
यावर बॅट्समन म्हणाला, “अरे, माझा टोला तुझ्या डोक्याच्या किती तरी वरून जात होता आणि मागे दुसरा कोणी फील्डरही नव्हता. म्हणजे हे झाड मध्ये आले नसते तर बॉल नक्की बाउंडरीच्या पार जाऊन चौका किंवा छक्का होणार होता. त्यासाठी मला चार किंवा सहा रन मिळायला पाहिजेत.”
“आणि बाउंडरीपलीकडे गेला की बॉल डेड होतो. मग रनआउटचा प्रश्नच येत नाही.” त्याचा मित्र म्हणाला,
“पण प्रत्यक्षात काय झालं आहे ते बघा ना. बाउंडरीच्या आतच आणि जमीनीवर टप्पा पडायच्या आधीच मी या बॉलचा कॅच पकडला आहे ना? आणि तो डेड व्हायच्या आतच मी याला रनआउटही केले आहे.”
“टप्पा म्हणजे फक्त जमीनीवरच बॉल पडायला पाहिजे असे काही नाही हं, भिंतीला किंवा झाडाच्या फांदीला आपटून बॉल उडाला तरी तो टप्पाच झाला. आज आपण “वन टप्पा औट गेम” खेळत नाही आहोत. त्यामुळे मी काही औट झालेलो नाही.” बॅट्समन म्हणाला. दुस-या बाजूचा बॅट्समन लगेच म्हणाला, “अरे मी काही रन काढायसाठी पळालो नव्हता. आपला बॉल कुठे गडप झाला ते पहायसाठी थोडा पुढे आलो होतो. आजच आत्ताच मी हा नवीन बॉल विकत आणला होता, अजून एक ओव्हरपण झाली नाही, एवढ्यात तो हरवला असता तर पंचाईत झाली असती. म्हणून मी बॉल कुठे जातो आहे ते पहात होतो.”
“म्हणून तू असा रडी खेळणार का?”
“मी नाही काही, तूच रडी खेळतोय्स.”
अशी हमरातुमरी सुरू होताच त्यांच्यातला एक मोठा आणि समंजस मुलगा पुढे होऊन म्हणाला, “अरे, असे भांडताय्त काय? आपण आज असे रूल्स करूया की असं झालं तर औट, तसं झालं तर नॉटऔट ….. वगैरे.”
तोंपर्यंत मी पुढे चालला गेलो होतो, त्यामुळे त्याने हा विवादग्रस्त बॉल कॅन्सल केला, की ती ओव्हर किंवा मॅचचा तो भागच रद्द करून नव्याने सुरुवात केली ते काही मला समजले नाही. माझ्या मनात विचार येत होते की खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये किती शेकडोंनी नियम आहेत! तरीसुध्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वान आणि अनुभवी मंडळी जमून त्यात सारख्या सुधारणा करत असतात, ते नियम शिकून घेऊन व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले अंपायर प्रत्येक मॅचसाठी नेमले जातात आणि तेच प्रत्येक मॅचवर नियंत्रण ठेवतात. कुठल्याही सामन्यात सारखे ऐकू येणारे ‘हौज्झॅट्’चे आवाज आणि त्यावर पंचाने कोठलाही निर्णय दिला की तो ज्या बाजूच्या विरोधात गेला असेल त्यातल्या खेळाडूंनी दिलेली प्रतिक्रिया पाहता या खेळाडूंना तरी सगळे नियम नीटपणे समजलेले आहेत की नाही किंवा या नियमांची त्यांना किती पर्वा करावीशी वाटते याबद्दल शंका येते. या वेळी खेळाडूंनी काढलेले उद्गार, त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या देहबोलीमधून व्यक्त झालेली नाराजी हीसुध्दा किती प्रमाणात असली तर चालेल याविषयी सभ्यपणाचे नियम केले आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंना दंड केला जातो असे आपण पाहतो. या ऑफिशियल क्रिकेटबद्दल इतके छापले आणि सांगितले जात आहे की ते वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांना अजीर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मला त्यात भर घालायची नाही.

पण आपल्या देशात असे जागतिक नियमांनुसार खेळले जाणारे क्रिकेट फार फार तर एकादा टक्का असेल आणि आपापले नियम तयार करून स्वैरपणे खेळले जाणारे क्रिकेट नव्याण्णऊ टक्के असणार असे मला वाटते. याचे कारण क्रिकेट या अद्भुत खेळात विलक्षण लवचिकपणाही आहे. दोन तीन पासून वीसपंचवीसपर्यंत कितीही मुले जमलेली असली तरी त्यांचे दोन गट पाडून ती क्रिकेट खेळायला लागतात. तसेच घरातल्या अंगणापासून विशाल क्रीडांगणापर्यंत कुठल्याही मोकळ्या जागेत तो खेळला जातो. लगान किंवा इकबाल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खेड्यापाड्यातली मुले रिकाम्या शेतांमध्ये देखील क्रिकेट खेळतात. शहरांमधल्या गल्ल्यांमध्ये हा खेळ सर्रास खेळला जातोच, शहरांमध्ये कोणी ‘बंद’ पुकारला असल्यास मोठमोठ्या हमरस्त्यांवरसुद्धा क्रिकेट खेळणे सुरू होते. आझाद मैदान, क्रॉसमैदान, शिवाजी पार्क यासारख्या मोठ्या मैदानांवर एकाच वेळी अनेक गट क्रिकेट खेळतांना दिसतात. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आकार, खेळणाऱ्यांची उपस्थिती, हवामान वगैरे पाहून आपापसातच रोजच्या रोज सोपे असे नवे नियम तयार केले जातात आणि पाळले जातात. पुढे जगभरात नावलोकिक मिळालेल्या कितीतरी खेळाडूंनी आपल्या खेळाची सुरुवात गल्लीतल्या किंवा चाळीमधल्या क्रिकेटमधून झाली असल्याचे मुलाखतींमध्ये सांगितलेले मी ऐकले आहे.

खेळाडूचा विशिष्ट गणवेश अंगावर धारण करून, पॅड्स आणि गार्ड्स वगैरे बांधून औपचारिक स्वरूपाचा क्रिकेटचा सामना खेळण्याचे भाग्य माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वाट्याला आले नाही कारण मला टोपी (क्रिकेटची कॅप) घालण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. पण मला कळायला लागल्यापासून ‘क्रिकेट क्रिकेट’चा खेळ मात्र माझ्या आवडीचा होता. अगदी लहान असतांना कचाकड्याच्या ‘बॅटबॉल’ने आमच्या घराच्या गच्चीवर सुरुवात करून मी हळूहळू गल्लीपासून मैदानापर्यंत प्रगती केली, पण चुकूनसुध्दा कधीही मैदान गाजवले मात्र नाही. शाळेत असतांना मी माझ्या वर्गातला वयाने सर्वात लहान मुलगा होतो कारण अॅडमिशन घेण्याच्या वेळी माझ्या वयाच्या मानाने बुध्दीची वाढ जरा जास्तच झाली होती आणि अक्षरे व अंक यांचे ज्ञान घरातच झाले होते. त्यामुळे पहिलीच्या मास्तरांनी मला काय काय येते हे पाहून दुसरीत आणि त्या मास्तरांनी थेट तिसरीत नेऊन बसवून दिले होते. त्या काळात फॉर्म भरणे आणि त्याला बर्थसर्टिफिकेट जोडणे वगैरे भानगडी नव्हत्याच. माझ्या शरीराची वाढ मात्र वयाच्या मानाने थोडी हळू हळूच होत असावी. त्यामुळे माझ्या वर्गात माझे वय कमी होते तसेच वजनही सर्वात कमी होते. आमच्या वर्गातला गिड्ड्या रास्ते सुरुवातीपासून शालांत परीक्षेपर्यंत उंचीने ‘डेढफुट्या’च राहिला असला तरी तोसुध्दा शक्तीच्या बाबतीत मला जरा भारीच पडत असे. यामुळे हुतूतूपासून क्रिकेटपर्यंत सगळ्या मैदानी खेळात मी नेहमी ‘लिंबूटिंबू’च मानला जात असे. या परिस्थितीत क्रिकेटच्या बाबतीत मी अभिमानाने सांगावे असे काहीच माझ्या जीवनात कधीच घडले नाही, पण लहानपणच्या काही मजेदार आठवणी मात्र आहेत.

. . . . . . . . . .

क्रिकेट क्रिकेट – भाग २

क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूच्या संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात, त्यातला जो संघ बॅटिंग करत असतो त्याचे फक्त दोनच खेळाडू मैदानात प्रत्यक्ष खेळत असतात, उरलेले मैदानाबाहेर बसलेले असतात. खेळणारा एक बॅट्समन औट झाल्यावर तो मैदानाच्या बाहेर जातो आणि दुसरा त्याची जागा घेतो. दुसरा संघ बॉलिंग आणि फील्डिंग करत असतो त्याचे सारे म्हणजे अकराही खेळाडू मैदानावर उतरून खेळात भाग घेत असतात. एवढी तरी प्राथमिक माहिती आजकाल सगळ्यांनाच असते. पण आमच्या मुलांच्या क्रिकेटमध्ये असले मूलभूत नियमसुध्दा नसायचे. दुपार टळली की मित्रमंडळी एकमेकांना बोलावून आणि ज्याच्याकडे बॅट, बॉल, स्टंप्स वगैरे जी सामुग्री असेल ती घेऊन मैदानाकडे येऊ लागत आणि जितकी मुले जमतील तेवढ्यावर खेळ सुरू करून देत. त्यासाठी दोन टीम बनवण्याचीसुध्दा गरज पडत नसे. मुलांची आपापसातच आळीपाळीने बॅटिंग आणि बॉलिंग चालत असे. एक मुलगा बॉल टाकायचा आणि दुसरा बॅटिंग करायचा. तिसरा वाट पहात फील्डिंग करायचा. बॅटिंग करणारा मुलगा औट झाला तर तिसरा त्याची जागा घ्यायचा आणि पूर्ण ओव्हरमध्ये तो औट नाही झाला तर तिसरा मुलगा बॉलिंग करायचा. चौथा, पाचवा, सहावा वगैरे मुले अशाच प्रकारे आपल्याला आळीपाळीने बॅटिंग किंवा बॉलिंग मिळायच्या संधीची वाट पहात फील्डिंग करत रहायचे. टीमच नसल्यामुळे धावा मोजायची गरज नसायची. कधी कधी तर असे व्हायचे की बॅट्समन औट होताच ती ओव्हर अर्धवट सोडून बॉलरच “माझी पाळी आली” म्हणून बॅट हातात घ्यायचा आणि त्याची उरलेली ओव्हर औट झालेला मुलगा पूर्ण करायचा. म्हणजे एका ओव्हरमध्येच बॉलर आणि बॅट्समन यांचे ‘रोल रिव्हर्सल’ होत असे. दोन गट बनवण्याएवढी म्हणजे दहा बारा इतकी गणसंख्या झाल्यावर लीडर टाइपची दोन मुले कॅप्टन होत आणि “मन्या, तू माझ्या टीममध्ये”, “पक्या तू माझ्याकडे”, “सुऱ्या तू इकडे ये”, “रम्या, इकडे”, “चंद्या”, “नंद्या” ….. असे करून सगळ्या मुलांची दोन गटात वाटणी करून घेत. त्यानंतर उशीराने येऊन पोचलेली मुलेही एकजण या आणि दुसरा त्या अशा प्रकारे या ना त्या संघात सामील होत जात.

जमलेल्या मुलांची संख्या वीस पंचवीस इतकी मोठी संख्या कधी झाली तरच क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक ‘बॅटिंग साइड’ आणि दुसरी ‘फील्डिंग साइड’ अशी विभागणी होत असे. एरवी दोन लहान लहान संघ बनले असले तरी त्यातले दोन बॅट्समन सोडून इतर सगळी मुले आनंदाने फील्डिंग करत, बॉलिंग मात्र फक्त विरुध्द संघाच्या मुलांनी करायची. फिल्डिंग करतांना आपल्या संघातल्या खेळाडूचा कॅच सोडायचा, त्याने मारलेला फटका अडवायचा नाही अशा प्रकारची ‘चीटिंग’ कोणी करत नसे. कोणीही तसे मुद्दाम केलेले आढळल्यास त्याला बॅटिंगचा चान्स मिळणार नाही एवढीशी शिक्षा असायची. शिवाय त्या दिवशीचे दोन संघ त्या खेळापुरते, दुसऱ्या दिवशी इकडची काही मुले तिकडे आणि तिकडची इकडे असे होणार असल्यामुळे त्या तात्पुरत्या संघात संघभावना कशी तयार होणार? रोजच्या खेळातला डाव जिंकण्याहरण्याला फार महत्व असायचेही नाही. खेळण्यातला आनंद उपभोगणे इतका साधा उद्देश मनात ठेवून खेळणे होत असे.

आजकाल क्रिकेटच्या मॅचसाठी मुद्दाम वेगळी खेळपट्टी (पिच) तयार केली जाते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून वाळू आणि न्यूझीलंडमधून खडी आणली अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अमाप खर्च आणि श्रम करून ती तयार केली असली तरी मॅच सुरू झाल्यानंतर संपण्याच्या आधीच ही नखरेल खेळपट्टी आपले गुण पालटत राहते. सुरुवातीला तिच्यावर टाकलेला चेंडू चांगली उसळी घेतो त्यामुळे ती जलदगती गोलंदाजांना (पेस बोलर्सना) साथ देते. तेच पिच जुने झाल्यानंतर त्यावर बॉल चांगले वळायला लागतात. त्यामुळे ते फिरकी गोलंदाजांना (स्पिनर्सना) मदत करते. असे असे घडले असे कॉमेंटेटर्स कधी कधी सांगत असतात. काही खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोयीसाठी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या कुठल्याच प्रकारच्या बोलरला कसलीच साथ देत नाहीत. पिचच्या या गुणधर्मांमुळे टॉस जिंकून झाल्यावर आधी बॅटिंग करायची की फील्डिंग असा एक मोठा निर्णय कॅप्टनने घ्यायचा असतो. नाणेफेक जिंकूनसुध्दा एकादी टीम हरली तर तिच्या कर्णधाराने चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्याला जबाबदार धरले जाते. हे सगळे वाचतांना मला तरी हसू येते. कोणची टीम जिंकणार हे जर टॉसवरच ठरत असेल तर त्या मॅचला काय अर्थ राहिला? आमच्या लहानपणच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टीची भानगडच नसायची. गावाबाहेरच्या ज्या सार्वजनिक मोकळ्या मैदानावर आम्ही खेळायला जात असू तिथे मुलांची इतर टोळकीही येत, तसेच फिरायला आलेली माणसेही गवतावर बसून गप्पा मारत. त्यामुळे आमची खेळण्याची जागाच रोज बदलत असे. सोयिस्कर मोकळी जागा बघून त्यातल्या त्यात सपाट अशा जागेवर स्टंप ठोकून आणि त्याच्या आसपासचे दगड धोंडे वेचून ते बाजूला करून आमचे नित नवे पिच तयार होत असे.

खेळाच्या इतर बाबतीतसुध्दा परिस्थितीनुसार नवनवे नियम बनवले जात आणि पाळले जात. दोन्ही बाजूला तीन तीन स्टंप ठेवणे आम्हाला कधीच शक्य होत नसे. त्यामुळे ओव्हर संपल्यानंतर विकेट कीपर त्याच्या जागेवरच उभा रहात असे, सगळे बोलर एकाच बाजूने बॉल टाकत. तिथे पॅव्हिलियन एंड, चर्च एंड अशासारख्या दोन बाजू नसत. ओव्हर झाली की दोन्ही बाजूचे बॅट्समन रन काढल्याप्रमाणे आपल्या जागा बदलत. जिथे खेळपट्टीचाच पत्ता नसायचा तिथे आखलेल्या सीमारेषा कुठून येणार? डाव सुरू करतांनाच काही खुणा ठरवून ती बाउंडरी मानली जात असे. शहरातल्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले सुध्दा पहिल्या मजल्यावर बॉल गेला किंवा कोणाच्या खिडकीची काच फुटली कि बॅट्समन आउट, ठराविक रेषे पर्यंत बॉल गेला कि दोन रन्स, त्याच्या पुढे दुसऱ्या रेषे पर्यंत बॉल गेला कि चार रन्स, रेषेवरून गेला कि ६ धावा असे नियम करतात. फील्डर्सची संख्या कमी असली तर बॉल कुठल्या दिशेने फटकारायचा याचे नियम ठरवले जातात. आमच्या खेळात असेच काही नियम एकदा ठरवले होते, त्या दिवशी मी उशीरा पोचलो होतो. पण माझी क्षमता पाहून मला ते नियम सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी माझी बॅटिंगची पाळी आली. तोपर्यंत अंधार पडायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन तीन चेंडूमध्ये माझी विकेट काढून घरी परतायचा माझ्या मित्रांचा विचार होता. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडून उसळतांना मला दिसला आणि काही विचार न करता मी बॅट फिरवली आणि तो चेंडू लाँग लेगच्या दिशेने पार नजरेपल्याड चालला गेला. कित्येक दिवसात मी एवढा दूर फटका मारला नसल्याने मी स्वतःवर भयंकर खूष झालो होतो, पण सगळे मित्र मात्र चिडून माझ्या अंगावर धावून आले. स्टंपच्या मागच्या बाजूला ठेवायला क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्याने “कोणीही त्या बाजूला फटका मारायचा नाही, बॉलला फक्त पुढच्या बाजूलाच ढकलायचा.” असा त्या दिवसापुरता नियम केला होता म्हणे. त्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून मलाच एकट्याने मागे जाऊन अंधुक होत असलेल्या प्रकाशात गवत आणि काट्याकुट्यामधून तो चेंडू शोधून आणण्याचे काम करावे लागले. करकरीत तीन्हीसांजेच्या वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत केलेल्या या प्रायश्चित्ताची आठवण जन्मभर राहिली.
————–

क्रिकेट क्रिकेट – भाग ३

माझ्या लहानपणच्या काळात मामलेदार कचेरी, नगरपालिका कचेरी, पोस्ट ऑफिस आणि एक सहकारी बँक एवढीच ‘ऑफिसे’ आमच्या लहान गावात होती. त्या सगळ्या इमारतींमधले वातावरण थोडे गावठीच असायचे. पट्टेवाले किंवा पोस्टमन यांच्यासारखे मोजके गणवेशधारी सेवक वगळल्यास तिथे दिसणारे बहुतेक लोक अंगात सदरा (शर्ट), डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि कंबरेला धोतर किंवा लेंगा (पायजमा) अशासारख्या गावठी पोशाखात असत. गावातल्या पांढरपेशा लोकांची संख्या एकंदरीत कमीच असल्यामुळे पँट धारण करणारे तरुण कमीच दिसत पण त्यांची संख्या दिवसेदिवस वेगाने वाढत जात होती. तरीही फक्त खेळासाठी म्हणून डोक्यावरील कॅपपासून पायातील बुटांपर्यंत नखशिखांत पांढरा शुभ्र ड्रेस घालून क्रिकेटची मॅच खेळू शकणारे युवक त्यांच्यात शोधूनही निघाले नसते. त्या काळात मुलांचे ‘खेळायचे वय’ संपले की त्यांनी पूर्णवेळ ‘कामाला’ किंवा ‘उद्योगधंद्याला’ लागायचे अशी रीत असल्यामुळे त्या गावात मोठ्या माणसांचे मैदानी खेळांचे फारसे सामने होत नसत. मी आमच्या गावातल्या प्रौढांना हुतूतू, कुस्ती आणि व्हॉलीबॉल याव्यतिरिक्त इतर कोणता मैदानी खेळ खेळतांना पाहिल्याचे मला आठवत नाही. त्या काळात भारतात टेलिव्हिजन सुरू झालेला नसल्यामुळे घरबसल्या क्रिकेटचा सामना पाहण्याची सोयही नव्हती. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर क्रिकेटचा खरा नियमानुसार असा खेळ पहिल्यांदा पाहिला.

त्या काळात क्रिकेटच्या कसोटी सामन्यांच्या कॉमेंटरीचे प्रसारण रेडिओवर येत होते. पण वर्षभरामध्ये क्रिकेट या खेळाचा फक्त एकच ‘सीझन’ येत असे आणि त्या कालावधीतसुध्दा दोन तीन वर्षांमध्ये एकदा एकादी परदेशी टीम क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असे किंवा आपले खेळाडू ‘फॉरेन टूर’वर जात असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचे संघ माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीत फक्त एकेकदाच भारतात येऊन गेले असावेत. क्रिकेटची कॉमेटरी हा तेंव्हा आजच्यासारखा रोजचा मामला नव्हता. गावात प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा नाही आणि असला तरी तो घरातल्या मुलांच्या वाट्याला क्वचितच येत असे. चुकून एकाद्या घरातल्या मोठ्या लोकांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्याचा षौक असलाच तर मग त्या घरातल्या मुलांच्या कानावर कॉमेंटरी पडायची. क्रिकेट टेस्ट मॅचेसच्या दिवसात अभ्यासाचे किंवा खेळायचे निमित्य करून त्या मुलाचे मित्र त्याच्या घरी जाऊन आणि थोडीशी कॉमेंटरी ऐकून धन्य होत. हॉटेले, पानपट्टीचे ठेले, सायकलीची (म्हणजे सायकली भाड्याने देण्याची) दुकाने अशा गावातल्या काही ठिकाणी नेहमीच रेडिओवर सिनेमाची गाणी मोठ्याने लावलेली असत. त्यातले काही लोक मात्र टेस्ट मॅचेस सुरू झाल्यावर गाण्यांऐवजी क्रिकेटची कॉमेंटरी लावून ठेवत. काही उत्साही लोक, मुख्यतः पोरेटोरे दुकानांच्या दारात उभी राहून ती ऐकत असत.

आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी भाषेचीही हकालपट्टी करायचा चंग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. आम्ही आठवी इयत्तेत गेल्यानंतर एबीसीडी शिकण्यापासून सुरुवात केली. ए टु झे़ड ही सव्वीस अक्षरे गिरवून झाल्यानंतर हळूहळू शब्द, वाक्यरचना, व्याकरण वगैरे थोडे फार शिकेपर्यंत आमचे शालेय शिक्षण संपून गेले. शालांत परीक्षेसाठी इंग्लिश हा एक ऐच्छिक विषय होता. ज्यांनी कॉलेज शिक्षण घेण्याचा विचारही केला नव्हता अशा बहुसंख्य मुलांनी तो घेतलाच नाही. आम्हाला इंग्रजी शिकवणारे अपसंगी, दोडवाड वगैरे सरांची गणना गावामधल्या विद्वान व्यक्तींमध्ये होत असे, पण शेक्सपीयर, शॉ, वर्डस्वर्थ वगैरेंचे साहित्य ते कोळून प्यायले असले तरी एबीसीडी शिकण्याच्या पातळीवरल्या आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? त्यातून त्यांची मातृभाषा कानडी असल्याने त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हते. आम्हाला इंग्रजी सिनेमा किंवा मालिका, डॉक्युमेंटरीज वगैरेंचे दर्शनही झाले नव्हते. या परिस्थितीत शाळेत असेपर्यंत आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान यथातथाच राहिले. शाळेमधला इंग्रजीचा तास सोडल्यास एरवी त्या भाषेतला चकार शब्द बोलण्यात किंवा ऐकण्यात येत नसे. त्या वेळी क्रिकेटच्या कॉमेटरीमधूनच त्या भाषेतली चार वाक्ये कधी तरी आमच्या कानावर पडत होती. त्याचा अर्थ लावायच्या प्रयत्नातून आमचे किंचित ट्रेनिंग होत होते.

ऐकलेल्या कॉमेंटरीमधले फारच थोडे त्या वेळी आम्हाला समजत असे, पण पुन्हा पुन्हा ऐकून आणि शहाण्या लोकांना विचारून विचारून त्यातली क्रिकेटची परिभाषा ध्यानात येऊ लागली. इनस्विंगर, औटस्विंगर, लेग स्पिन, ऑफस्पिन, स्लिप, शॉर्ट लेग, कव्हर, हिट विकेट, क्लीन बोल्ड यासारख्या शब्दांचे अर्थ समजायला लागले. मैदानातल्या कोणकोणत्या जागांवर क्षेत्ररक्षक उभे आहेत (फील्ड प्लेसमेंट्स) हे पुन्हा पुन्हा सांगितले जात असल्यामुळे ते चित्र कल्पनेने डोळ्यासमोर येऊ लागले. पण आम्हाला त्यात त्या काळी फारसे स्वारस्य वाटत नव्हते. कोणती टीम बॅटिंग करते आहे, कोणकोण बॅट्समन खेळत आहेत, त्यांच्या आणि संघाच्या किती धावा झाल्या, किती विकेट्स गेल्या ही माहिती तेवढीच महत्वाची. अखेर कोण जिंकत आहे आणि कोण पराभूत होत आहे हे त्यावरून ठरते. यामुळे सर्वांना त्यातच इंटरेस्ट असायचा.

त्या काळात ‘पियरसन’ अशा इंग्लिश नावाचे एक भारतीय कॉमेंटेटर होते, त्यांचा भरदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल सर्वांना इंप्रेस्सिव्ह वाटायची. ‘महाराजकुमार ऑफ विजयानगरम्’ एवढे लांबलचक आणि ‘विझी’ असे छोटेसे नाव धारण करणारे गृहस्थ अचाट लांबण लावायचे आणि त्यातले अवाक्षरही आम्हाला समजत नसे. कुठल्याशा जुन्या आठवणी घोळवून सांगता सांगता “दरम्यानच्या काळात चार विकेट पडल्या आहेत आणि आता अमके तमके क्रीजवर आले आहेत” अशी त्या सुरू असलेल्या खेळाबद्दल थोडीशी माहिती ते देत. विजय मर्चंट हे कॉमेंटेटर मात्र सर्वांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या खणखणीत आवाजात प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते अक्षरशः ‘बॉल टू बॉल’ कॉमेंटरी करत असत, ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यामुळे त्यांना क्रिकेटमधल्या खाचाखुचा चांगल्या ठाऊक होत्या आणि सोप्या शब्दात ते श्रोत्यांना समजावून सांगत असत. मुख्य म्हणजे रेडिओवरील खरखरीमधून फक्त त्यांचेच बरेचसे उच्चार आम्हाला समजत होते. तटस्थ वृत्ती न बाळगता ते खेळाशी समरस होऊन जात आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना त्यांच्या कॉमेंटरीमध्ये उतरत असे.

मला गणितात पहिल्यापासूनच आवड आणि गति असल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीचे थोडेसे वेड होते. क्रिकेटमध्ये जेवढे स्टॅटिस्टिक्स येते तेवढे अर्थकारणातदेखील कदाचित येत नसेल. कोणत्या संघाने किंवा खेळाडूने कुठे कुठे आणि कोणकोणते पराक्रम केले याची सविस्तर जंत्री वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये येत असे. आम्ही ती गोळा करून सांभाळून ठेवत होतोच, पण प्रत्येक सीझनमध्ये कितीतरी जुने रेकॉर्ड्स मोडले जात आणि नवे विक्रम प्रस्थापित केले जात असत. या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला तोंडपाठ असे. एकादा बॅट्समन किंवा बोलर जरासा यशस्वी व्हायला लागला की लगेच तो कोणत्या विक्रमापासून किती दूर आहे हे पाहिले जात असे आणि नव्या विक्रमाचे वेध लागत असत. तो सामना जिंकण्याहरण्यापेक्षाही त्या सामन्यात अमूक रेकॉर्ड मो़डला जाणार की नाही याची उत्सुकता कधी कधी जास्त वाटत असे.

त्या काळातली एक मजेदार आठवण आहे. आमच्यातला अरविंद पोटे नावाचा एक मुलगा चांगला क्रीडापटू होता आणि थोडी दादागिरीही करायचा. सुरुवातीपासून शाळा सोडेपर्यंत तोच आमचा कॅप्टन असायचा. एरवी तो स्वतःला देव आनंद समजत असे आणि त्याच्यासारखा केसाचा कोंबडा ठेवून थोडे हावभावही करत असे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिची बेनो त्याचा हीरो होता. फील्डिंग करतांना सिली मि़ड ऑफ या जागेवर बॅट्समनच्या अगदी पुढ्यात हा रिची उभा रहात असे आणि एकादा बॉल प्लेड करतांना किंचितसा जरी वरच्या बाजूला उडाला तर हनुमानउडी मारून त्याचा कॅच पकडत असे. अर्थातच कॉमेंटरीमध्ये ऐकून आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचून ही माहिती आम्हाला मिळाली होती. असले धाडस करणे त्या काळात दुर्मिळ असायचे. आमचा अरव्यासुध्दा एकदा असा रिची बेनोसारखा सिली मि़ड ऑफला उभा राहिला असतांना योगायोगाने माझी बॉलिंगची पाळी आली होती. मलाही वेगाने बॉल टाकता येतो हे दाखवायचे म्हणून मी सगळा जोर लावून चेंडू फेकला आणि कधी नव्हे तितक्या वेगाने तो गेला, पण त्या नादात त्याची दिशा थोडी चुकली आणि सरळ अरव्याच्या पाठीवर दाणकन आपटला.

. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

क्रिकेट क्रिकेट – भाग ४

कॉन्व्हेंट स्कूल, मिलिटरी स्कूल, पब्लिक स्कूल यासारख्या काही शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनासुध्दा खूप महत्व दिले जाते. अशा शाळांमधून आलेली काही मुले आमच्याबरोबर इंजिनियरिंगला होती, तसेच काही मुलांनी क्लब, जिमखाना वगैरेंमध्ये जाऊन क्रिकेटचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. यामुळे आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधल्या क्रिकेटचा दर्जा खूपच वरचा होता. सिलेक्शन ट्रायल्ससाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्येकाची तयारी चांगली होती. तिथे लिंबूटिंबूंसाठी काहीच स्कोप नव्हता. मी शिकत असतांना तीनही वर्षी पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आमच्या कॉलेजच्या संघानेच जिंकल्या. या कॉम्पिटिशनमधल्या प्रत्येक मॅचच्या वेळी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमच्या हॉस्टेलमधून मुलांच्या झुंडी त्या ग्राउंडवर जाऊन पोचायच्या. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजबरोबर सामना असेल तर त्यांच्या बाजूने मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलीही यायच्या हे एक अॅडेड अट्रॅक्शन असायचे. प्रत्येक चौकार, षट्कार किंवा विरुध्द संघाची विकेट यावर टाळ्या, शिट्या, आरडाओरड, नाच वगैरे मनसोक्त धांगडधिंगा घालण्याची चढाओढ चालत असे. मैदानात आमचा संघ जिंकायचाच, प्रेक्षकांमधल्या धांगडधिंग्याच्या सामन्यातसुध्दा आमचाच आवाज वरचढ असायचा. क्रिकेटमुळे कशी धुंदी चढते हे मी त्या काळात अनुभवले. तसेच प्रत्यक्ष क्रीजवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान नेमके काय घडत असते हे दुरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना नीट दिसतसुध्दा नाही हेही समजले. हजारो रुपयांची तिकीटे काढून मॅच पहायला स्टेडियमवर गर्दी करणाऱ्यांची मला धन्य वाटते. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवर मॅच पहात असतांना क्लोज अप व्ह्यूमध्ये जास्त चांगले दाखवले जाते. आता तर अॅक्शन रिप्लेमधून ते व्यवस्थित दिसते. स्टेडियममधले प्रेक्षकही ते मोबाईल फोनवर पाहू शकतात.

शाळेत असतांना कधी कधी आमची टीम आणि इतर मुलांच्या टीममध्ये मॅचेस होत असत. अर्थातच त्यातसुध्दा आम्हीच बनवलेल्या नियमांनुसार क्रिकेट क्रिकेटचा स्वैर खेळ होत असे. माझ्या गणितातल्या कौशल्यामुळे मला काही वेळा अशा सामन्यांमध्ये स्कोअररचे काम मात्र मिळत असे आणि माझ्या समजुतीनुसार झालेल्या धावांची संख्या आणि विकेट्स यांची नोंद ठेऊन मी स्कोअरकार्ड तयार करत असे. एका इंटरकॉलेज क्रिकेट मॅचच्या वेळी मी कुतूहलाने स्कोअररपाशी जाऊन बसलो. माझा एक मित्र सुधीर त्यासाठी एक वही घेऊन आला होता आणि प्रत्येक बॉल पिचवर कुठे पडला, त्याला बॅट्समनने कोणत्या दिशेने टोलवले, किंवा त्या बॉलने बॅट्समनला चकवले, तो चेंडू कुठे अडवला गेला, त्यावर किती धावा मिळाल्या वगैरेंची सचित्र नोंद तो ठेवत होता. आजकाल अशा गोष्टी काँप्यूटरच्या सहाय्याने अॅक्शन रिप्लेमध्ये दाखवल्या जातात, कदाचित त्या रेकॉर्डही केल्या जात असतील, पण पन्नास वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अशा तपशीलवार नोंदी पाहून मी चाट पडलो होतो.

कॉलेजला गेल्यानंतर क्रिकेटच्या बाबतीत माझी भूमिका फक्त आणि फक्त प्रेक्षकाचीच राहिली. सामन्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा त्यातला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. अजूनही मी काही वेळा टीव्हीवर हा खेळ पहातो, पण आता त्याची तितकी क्रेझ राहिली नाही. वर्ल्ड कप सारखे सामने मात्र आवर्जून पहातो.

माझ्या मुलांच्या जन्माच्या आधीच आमच्याकडे टीव्ही आला होता आणि ते दोघेही त्यांना समज येण्याच्याही आधीपासून टीव्हीवर भरपूर क्रिकेट पहात होते. अगदी लहान असतांना सुध्दा ते निरनिराळे बोलर, बॅट्समन, फील्डर्स आणि अंपायर यांच्या विशिष्ट लकबी नक्कल करून दाखवत आणि सर्वांना हसवत असत. ते वर्ष दीड वर्षाचे झाले असतांनाच वीतभर लांबीची प्लॅस्टिकची पोकळ बॅट आणि लिंबाएवढा बॉल या वस्तू त्यांच्या खेळण्यांमध्ये जमा झाल्या आणि त्या बॅटने ते बॉलशी ठोकाठोक करायला लागले. पुढे त्या खेळण्यांचे आकार आणि प्रकार बदलत गेले असले तरी बॅटबॉल खेळतच ते लहानाचे मोठे झाले, शाळेत आणि कॉलेजात रेग्युलर क्रिकेट खेळले. ते आता ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर खेळत आहेत आणि जिंकून आणलेल्या ट्रॉफीजनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. ते अगदी लहान असतांना मी घरात किंवा बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांच्या बरोबर खेळत होतो, ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्या नियमांप्रमाणे क्रिकेट खेळत असतांना बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचे गल्ली क्रिकेटही चालत असे. खेळायला कोणी मित्र नसेल किंवा धो धो पाऊस पडत असेल अशा वेळी ते दोघेच आमच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या लॉबीमध्ये खेळायचे. एकाने सरपटत चेंडू टाकायचा आणि दुसऱ्याने तो जमीनीलगतच परत (बॅक टू द बोलर) पाठवायचा. शेजाऱ्याचे दार म्हणजे स्टंप्स, त्याला बॉल लागला की बॅट्समन औट आणि परत केलेला चेंडू बोलरला अडवता आला नाही आणि त्याच्या मागे असलेल्या भिंतीला लागला की एक रन अशा प्रकारचे नियम ते पाळायचे. चुकून बॉल उडाला आणि कठड्यावरून खाली गेला तर मात्र तो मिळायची शक्यता फारच कमी असायची. मग त्या दिवसाचा खेळ बंद.

कधी कधी तर ते डाईस घेऊन काल्पनिक क्रिकेट खेळायचे. जगभरातले उत्तमोत्तम खेळाडू निवडून त्यांचे दोन संच बनवत आणि त्यातल्या एकेकाच्या नावाने डाईस फेकून १, २, ३, ४ किंवा ६ आकडा आला तर तितके रन्स आणि ५ आकडा आला तर औट असे स्कोअर लिहीत असत. हा खेळ एकटासुध्दा खेळू शकतो आणि खेळला जात असे. घरी काँप्यूटर आणल्यानंतर थोड्याच दिवसात क्रिकेट या खेळाची सीडी आली आणि त्यांचे त्यावर व्हर्च्युअल क्रिकेट खेळणे सुरू झाले. काँप्यूटरची क्षमता जसजशी वाढत गेली त्यासोबत या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपार सुधारणा होत गेली. अगदी खरेखुरे छायाचित्र वाटेल इतके चांगले खेळाडू आजकाल या खेळामधल्या स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्यांना आज्ञा देऊ त्यानुसार ते बोलिंग व बॅटिंग करतात. इतकेच नव्हे तर गॅलरीमधले प्रेक्षकसुध्दा टाळ्या वाजवून दाद देतात आणि चीअर गर्ल्स नाचतांना दिसतात. हा एक काँप्यूटर गेम आहे की प्रत्यक्ष होत असलेल्या मॅचचे थेट प्रक्षेपण आहे असा संभ्रम पडावा इतके ते रिअॅलिस्टिक वाटते.

मॅच फिक्सिंगच्या प्रकारांमुळे या खेळात अप्रामाणिकपणा शिरला असला तरी तो एक आकर्षक खेळ आहे आणि आज मनोरंजनाचे एक साधन बनला आहे असा विचार केला तर त्यात भावनात्मक रीत्या गुंतून पडण्याचे (इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचे) कारण नाही. नाटक सिनेमांमध्ये दाखवले जाणारे सगळेच काल्पनिक असते, त्यांच्या कथांमध्ये आपण सत्य शोधत नाही. आयपीएल हा प्रकार मला तरी यापेक्षा कधीच वेगळा वाटला नाही. त्यातही मुंबई, दिल्ली किंवा चेन्नै या नावाच्या संघांचा त्या गावांशी संबंध नसतो. जगभरातले क्रिकेटर लिलावात विकले जाऊन त्यांच्याकडे येतात आणि भाडोत्री खेळाडू म्हणून खेळतात. त्यामुळे मला त्यातला कुठलाच संघ आपला वाटत नाही आणि एक बाजू आपली नसली तर त्या खेळातल्या कुणाच्या जिंकण्याहरण्याचे आपल्याला काही वाटत नाही. तरी पण बॅट्समनांची अप्रतिम फटकेबाजी आणि फील्डरांनी उड्डाण करून किंवा जमीनीवर सूर मारून घेतलेले झेल यातली कलाकारी पाहण्यासारखी असते.

तर अशा प्रकारे निरनिराळ्या स्वरूपांमध्ये माझ्या जीवनात क्रिकेट आले आणि ते काही त्याने घेऊन ठेवलेला एका कोपऱ्याचा ताबा सोडायला तयार नाही.
. . . . . . . . . (समाप्त)

आठवणीतले उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस

“नेमेचि येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।” ही कविता मी लहानपणी पाठ केली होती. पण ज्या दुष्काळी प्रदेशात माझे लहानपण गेले त्या भागात एकंदरीतच फारसा पाऊस पडत नसे. त्यामुळे कौतुक वाटण्याइतका मुसळधार पाऊसही कधी पडायचा नाही आणि वर्षभरातून ज्या काही दोन चार जोरदार सरी पडायच्या त्यांचा तर अजीबात ‘नेम’ नसे! मग कौतुक तरी कशाचे वाटणार? पूर्वेकडून येणाऱ्या आदिलशहाच्या फौजांना अडवून धरण्याचे काम करून शिवाजी महाराजांचा त्यांच्यापासून बचाव करण्याचे महत्कार्य जो सह्याद्री करत असे असे आम्ही इतिहासात शिकलो तोच सह्याद्री नैऋत्येकडून येणाच्या पावसाळी ढगांना अडवून धरत किंवा रिकामे करून टाकत असल्यामुळे आम्हाला सृष्टीचे हे कवतिक पाहू देत नाही हे भूगोलात वाचून मला त्याचा राग येत असे. तसेच नजरेलासुद्धा न पडणारा हा पर्वत त्याची वर्षाछाया इतक्या दूरवर कसा टाकतो हेही समजत नसे. अवचित येणाऱ्या पावसाच्या आधीपासून उन्हाळा सुरू होत असे आणि नवरात्रानंतर येणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’पर्यंत तो चालत असे.

रखरखीत असा हा उन्हाळासुध्दा आम्हाला मात्र बराच प्रिय वाटत असे, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या कालावधीत शाळांना लागणाऱ्या लांबचलांब सुट्या. आमची शाळा तशी वाईट नव्हती, पण तरीही सुटी ही सुटीच! आमचा मामासुध्दा त्याच गावात रहात असल्यामुळे झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याचे अप्रूप आमच्या नशीबात नव्हते, पण आमच्या एकत्र कुटुंबातल्या सासरी गेलेल्या माझ्या मोठ्या बहिणींपैकी कोणी ना कोणी उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्या लहान मुलांसह आमच्या घरी माहेरपणासाठी यायच्याच. ‘मामाच्या गावा’ला जाण्याची मौज त्या मुलांना मिळायची. कॉलेजशिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी राहणारे माझे मोठे भाऊही त्या सुमारास घरी येऊन बरेच दिवस रहायचे आणि त्या मुलांच्या मामांच्या संख्येत भर पडायची. या सगळ्या लोकांमुळे आमचे घर अगदी भरून जात असे. शाळेत जायची कटकट नसल्यामुळे मौजमस्ती दंगा वगैरे करण्यासाठी आम्हाला दिवसभर मोकळाच असे. बदाम सात, झब्बू, पास्तीन्दोन, ल्याडीस, मार्कंडाव यासारखे पत्त्याचे अनेक प्रकारचे खेळ, सोंगट्या, बुध्दीबळ वगैरेंचे डाव रंगायचे, गाण्याच्याच नव्हे तर गावांच्या, नावांच्या वगैरे भेंड्या, कोडी घालणे आणि सोडवणे, नकला वगैरेंना ऊत येत असे. सर्वात मुख्य म्हणजे या ना त्या निमित्याने काहीतरी कुचाळकी काढून एकमेकांची चिडवाचिडवी करणे!

पोहायला जाणे हा उन्हाळ्याच्या सुटीतला एक आवडता कार्यक्रम असायचा. त्या काळात जलतरणतलाव (स्विमिंग पूल) हा प्रकार आमच्या लहान गावात कोणी ऐकलासुध्दा नव्हता. आमच्या गावातले एकमेव तळे उन्हाळ्यात बरेचसे आटून जात असे. शिवाय ते अगदी उथळ होते आणि काही लोक त्याचे पाणी प्यायला नेत असल्यामुळे तिथे डुंबायला बंदी होती. तिथे पोहणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्हाला गावाबाहेरील एकाद्या मळ्यातल्या विहिरीवरच पोहण्यासाठी जावे लागत असे. निदान दहा बारा वेळा तरी हातपाय मारायला जागा मिळावी एवढी आकाराने मोठी तसेच बुडण्याइतपत खोल पाणी असलेली आणि आत उतरून जाण्यासाठी पायऱ्या असलेली अशी आसमंतातली विहीर शोधून काढणे आणि तिच्या मालकाची परवानगी मिळवणे हे जिकीरीचे काम कोणी उत्साही मोठी मंडळी करत असत.

एका वर्षी कल्याणशेट्टी, दुसऱ्या वर्षी परसप्पा, तिसऱ्या वर्षी असाच आणखी कोणी उदार मनाचा जमीन मालक मिळाला की ती बातमी गावभर पसरत असे आणि सकाळ झाली की आम्ही सगळी मुले उत्साहाने एका पंचात चड्डी गुंडाळून घेऊन आपला मोर्चा तिकडे वळवत असू. ‘स्विमिंग कॉस्च्यूम’ असले अवघड आणि बोजड शब्द तेंव्हा अजून माझ्या कानावर पडले नव्हते. भक्त प्रल्हाद, वीर हनुमान यासारखे जे सिनेमे पहायची संधी मला लहानपणी मिळाली त्यातली पात्रे घातल्यास नेहमीच तोकडे कपडे घालत, पोहण्यासाठी त्यांचे खास वेगळे कपडे नसत. पोहतांना घालायच्या कपड्यांच्या बाबतीत आमच्यापुढे कसलेही उदाहरण नव्हते आणि आम्ही नेहमीच्या चड्डीतच पाण्यात उतरत असू. मैल दीड मैल पायपीट आणि तास दीडतास पोहणे करून घरी परत आल्यावर आम्हाला सडकून भूक लागलेली असायची आणि घरातील स्त्रीवर्गाला हे ठाऊक असल्याने त्यांनी आमच्या क्षुधाशांतीची जय्यत तयारी करून ठेवलेली असे. त्या वेळी खाल्लेल्या थालीपीठाची चंव कदाचित पंचतारांकित हॉटेलांमध्ये घेतलेल्या ग्रँड डिनर पार्टीतसुध्दा कधी आली नाही.

‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’त बसून मामाच्या गावाला जाण्याची मला लहानपणी न मिळालेली संधी माझ्या मुलांना मात्र मिळाली आणि त्यांनी तिचा पुरेपूर उपभोग घेतला. त्यांचे आजोळ बरेच दूर होते आणि तिथे रेल्वेनेच जावे लागत असे. काळाबरोबर रेल्वेमध्ये सुधारणा होत गेल्यामुळे “कू” करत ‘धुरांच्या रेघा हवेत काढणारी’ कोळशाची इंजिने नाहीशी झाली आणि त्यांच्या जागी मोठ्ठा “भों” करणारी आधी डिझेलची आणि नंतर विजेची इंजिने आली आणि ‘पळती झाडे’ जास्तच वेगाने पळायला लागली. ते एक टुमदार गाव होते आणि तिथे जुना ऐसपैस चौसोपी वाडा, शेतीवाडी, गुरेढोरे, कुत्रीमांजरे वगैरे मुंबईत पहायला न मिळणारी अनेक वैविध्ये होती. त्यांच्या वयाची इतरही काही मुले सुटीसाठी तिथे येत असत. त्यांच्यात आमची मुले चांगली रमत असत.  त्यांना परत आणण्याचे निमित्य करून मीसुध्दा चार आठ दिवस सासुरवाडीला जाऊन येत असे आणि ‘जमाईराजा’ म्हणून माझेही भरपूर कोडकौतुक होत असे. काही वेळा आम्ही थंड हवेच्या ठिकाणांना वगैरेसुद्धा जाऊन आलो. उन्हाळ्याचा ताप सहन करावा लागत असला तरीही या सगळ्यांचा विचार करता त्यात एक वेगळी मजा येत असे.

जय बोलो हनुमान की

hanumanSm

माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजन्मोत्सव या सणांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात दर वर्षी रामाच्या जन्माचेच आख्यान असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवून सांगत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना आणत. त्यानंतर रामाला पाळण्यात झोपवून पाळणा, आरती, सुंठवड्याचा प्रसाद वगैरे होत असे.

आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेतल्या ‘सिटीसेंटर’ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील चांगल्या ऐसपैस कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून माझ्या सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. तिथून निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. एका आठदहा फूट उंच शिलेच्या एकाच बाजूला चित्र काढल्याप्रमाणे ही उभी मूर्ती कोरलेली होती. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायची कुणाचीच कधी हिंमत झाली नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीत असेलच.

गावातल्या इतर देवांच्या देवळातल्या गाभाऱ्यात कोणी ना कोणी पूजारी असायचे आणि तिथे लहान मुलांना सहसा प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण आमच्या मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नव्हती. त्या मारुतीच्या भव्य मूर्तीला हाताने धरूनच आम्ही त्याला प्रदक्षिणाही घालत होतो. इतकी सलगी असल्यामुळे तो देव आम्हाला जास्तच जवळचा वाटायचा. बोलतांना त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशीसुध्दा त्या देवळात उत्सव किंवा समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणाऱ्यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच. त्या काळात तरी तिथे उत्सवासाठी भजन, पूजन, कीर्तन वगैरे काही विशेष समारंभ नसायचा.

हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी आमची काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून लहानशी पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली मारुतीची तसबीर, शोभेची फुले, माळा आणि सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. “राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।” अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे. कसलाही खास प्रसादही वाटला जात नसे.

मारुतीरायाच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कुठे झाले, त्यांचा संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी मला त्यात काही स्वारस्य उरले नाही. बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमन्ताच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती किंवा त्याच्या मनात कसली महत्वाकांक्षा नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा ‘इन्फिनिटी’ या शब्दांचा अर्थ ‘मारुतीचे शेपूट’ या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर झाडांवरून पिकलेली फळे खाली पाडण्यासाठी त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना आम्हाला खूप मजा वाटत असे. त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. मारुतीच्या अंगात प्रचंड ताकत असली तरी त्याने युद्धात मोठा पराक्रम करून कुठल्या राक्षसांना ठार मारले असे रामायणाच्या गोष्टीत सांगितले जात नाही. त्या युद्धात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष फक्त एकाच पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी डोंगर, पर्वत वगैरेंना हाताने उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो. ते पृथ्वीशी सलग रीतीने जोडले असल्याचे मोठेपणी समजले.

जय बोलो हनुमान की १

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचेही परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. रामदासांनी स्थापन केलेली अकरा मंदिरे प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या शिष्यगणांनी त्यांची परंपरा पुढे नेत गांवोगांवी मारुतीची देवळे उभारली. “हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।” असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. हनुमंताची स्तुती करणारा रामरक्षेमधला एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे.
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो एक महान योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच प्रभू रामचंद्राच्या या सेवकाची गणनासुद्धा देवांमध्ये केली गेली. माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना “भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती” हे स्तोत्र शिकवले जात होते आणि ते म्हंटल्याने मारुतीराया अंगात भरपूर शक्ती देतो असा विश्वास असल्यामुळे आम्ही ते रोज संध्याकाळी म्हणत होतो. त्यानंतर दंडातल्या बेटकुळ्या फुगवून पहात होतो.

समर्थ रामदासांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे किंवा कदाचित त्याआधीपासून महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या गावांमध्ये मारुतीची देवळे आहेतच, शिवाय भारताच्या अनेक भागात ती दिसतात. दक्षिण भारतात मारुतीला आंजनेयस्वामी म्हणतात. त्यांची मंदिरे मी कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये पाहिली आहेत. जगातली सर्वात प्रचंड अशी हनुमानाची मूर्ती आंध्रमध्येच आहे आणि ती जगातल्या इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा अधिक उंच आहे. उत्तर प्रदेशातसुद्धा मी आजूबाजूच्या इमारतींपेक्षाही उंच अशा बजरंगबलीच्या मूर्ती काही ठिकाणी पाहिल्या आहेत. तुलसीदासांनी रचलेली हनुमान चालीसा उत्तर भारतीय लोकांमध्ये महाराष्ट्रातल्या भीमरूपी या स्तोत्रापेक्षाही अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा पाठ केल्यामुळे भुतेखेते, इडापिडा वगैरे सगळ्यांपासून संरक्षणाचे कवच मिळते अशी भाविकांची गाढ श्रद्धा असते. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये जिथे जिथे भारतीय लोक पूर्वीच्या काळात गेले होते तिथे तिथे त्यांनी मारुतीची मोठी देवळे आणि भव्य मूर्तींची स्थापना केली आहे. त्यातले त्रिनिदादमधले देऊळ जगप्रसिद्ध आहे.

हनुमान त्रिनिदाद
माझी मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी एक आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. त्या काळात मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले बहुधा पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत आणि डफावर थाप मारून काढलेल्या झडाड्डी झकनकच्या तालावर नाच करत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर वन्य प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. ‘भीम्या’ की ‘शिद्राम्या’ अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून गोरिल्लासारखा दिसत असे. तो कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून तिला हाताने फिरवत रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या अचरट अचाट लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे समोर दिसायचे, पण या हनुमानाला शोधत मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्या धंद्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा ‘हिन्दू धर्माचा घोर अपमान’ आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. ‘सेक्युलर’ हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

उद्या हनुमानजन्मोत्सव आहे. त्या निमित्याने मारुतीरायाचे स्मरण आणि त्याला प्रणाम करून हा छोटासा लेख त्याच्या पायाशी अर्पण.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या देवळांविषयी माहिती इथे पहावी.
https://anandghare.wordpress.com/2018/09/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3/

वीर हनुमान आणि दास हनुमान हा लेख इथे पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/04/27/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/

आमच्या वैनी (माझी आई)

vainee

माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे त्यांची भावंडे त्यांना ‘दादा’ म्हणत असत आणि त्यांचे नावच ‘दादा’ असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला ‘वहिनी’ म्हंटले जात असे. ‘वहिनी’ या शब्दाचा ‘वयनी’, ‘वैनी’ असा अपभ्रंश होऊन अखेर ‘वैनी’ हेच त्यांचे नाव पडले. माझ्या काकूंना मात्र त्यांच्या मुली ‘ताई’ म्हणत आणि आम्ही मुले नात्याप्रमाणे ‘काकू’ किंवा ‘मामी’ म्हणत होतो.

आमच्या वैनींचा जन्म मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद या गावी झाला होता. त्या लहान असतांनाच त्यांचे काका त्यांना जमखंडीला घेऊन आले आणि कालांतराने लग्न होऊन त्या तिथेच राहिल्या. त्यांची ही हकीकत मला माहीतसुध्दा नव्हती. त्या माझ्याकडे रहात असतांना एकदा रेशनिंगचा किंवा खानेसुमारीचा असा कोणतासा फॉर्म भरण्याच्या वेळी त्यांना सांगावी लागली म्हणून मला ती कळली. माझ्या लहानपणापासून वैनींच्या माहेरचे कोणीच सख्खे नातेवाईक नव्हते. त्यांचे एक चुलत भाऊ जमखंडीलाच रहात होते ते गोविंदमामा तेवढे चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणे येणेही होत असे. गोविंदमामांचे सख्खे भाऊ आणि बहिणी परगावाहून अधून मधून कधी जमखंडीला आले तर भेटून जात असत त्यामुळे तेही परिचयाचे होते. आमच्या वैनी आणि (त्यांच्यासोबत मी) माहेरपणासाठी कुणाकडे आठ दहा दिवस जाऊन राहिल्याचे मात्र मला आठवत नाही. ‘धुरांच्या रेघा’ हवेत काढणाऱ्या ‘झुकुझुकुगाडी’त बसून ‘पळती झाडे’ पहात ‘मामाच्च्या गावाला’ जाण्याचे भाग्य मला तरी कधीच लाभले नाही. वैनींनी आपणहून सहसा कधी त्यांच्या माहेरच्या लोकांचा विषय काढला नाही की घरातील इतरांच्या बोलण्यात तो कधी आल्याचे मला आठवत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या ९९.९९ टक्के सासुरवाशीण झाल्या होत्या. आमच्या काकूंची गोष्ट वेगळी होती. त्यांचे माहेर गावातच होते आणि अधूनमधून त्या तिकडे जाऊन बरेच दिवस राहून येत असत. त्यांच्या बोलण्यातही नेहमी त्यांच्या माहेरकडल्यांचे कौतुकच येत असे.

मी लहान असतांना आमचे दादा नोकरीमुळे परगावी रहात असत. त्यामुळे आमच्या एकत्र कुटुंबाची सगळी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी वैनींच्यावर असे आणि ती गोष्ट त्या अत्यंत कौशल्याने आणि सक्षमपणे करत होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबातल्या लोकांच्या निरनिराळ्या पसंती, आवडीनिवडी असतात. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, टेंपरामेंट असतात, मानापमानाच्या आगळ्या वेगळ्या कल्पना असतात. त्या सर्वांची मर्जी राखून, गोडीगुलाबीने पण परंपरेनुसार योग्य त्या रीतीने सगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या ही तारेवरची कसरत करणे वैनींना जमत असे. यासाठी ते काम करणारा माणूस स्वतःच्या आवडीनिवडी आणि अहम् (इगो) यांना थोडा वेळ बाजूला ठेवणे एवढीएकच गोष्ट करू शकतो. बहुतेक वेळी वैनी हेच करत आल्या होत्या, पण गरज पडल्यास त्या खंबीरपणाही दाखवत असत.

पू्वी आमच्या घरातल्या संयुक्त कुटुंबामधील सदस्यांची संख्या बरीच होती, शिवाय परगावाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाणही बरेच होते. गावात कोणा आप्ताचे घर असतांना हॉटेलात जाऊन राहणे किंवा जेवणे याची त्या काळात कल्पनाही केली जात नव्हती. त्यामुळे त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील स्वयंपाकघरातूनच केली जात असे. गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन यासारखी वेळ आणि कष्ट वाचवणारी साधनेही तेंव्हा उपलब्ध नव्हती. ‘रेडी टु ईट’ असे तयार खाद्यपदार्थ किंवा एमटीआरचे सेमीकुक्ड प्रॉडक्ट त्या काळी बाजारात मिळत नव्हते. घरात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून सुरुवात करून सर्व पाकक्रिया घरीच करावी लागत असे. त्यामुळे गृहिणींचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात राबण्यातच जात असे.

स्वयंपाकातले कलाकौशल्य वैनींना अवगत होतेच, त्यातले विज्ञान त्यांना चांगले समजले होते आणि त्याचा उपयोग करून त्यातील तंत्रज्ञानाचा त्या कुशलपणे उपयोग करून घेत होत्या. वहन, अभिसरण आणि उत्सर्जन (कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन) या तीन प्रकाराने ऊष्णता इकडून तिकडे जात असते याचे ज्ञान त्यांनी थर्मोडायनॅमिक्स विषयाच्या पुस्तकात वाचले नव्हते आणि शाळाकॉलेजात जाऊन त्यातली समीकरणे मांडून ती सोडवणे या गोष्टी त्या शिकल्या नव्हत्या. पण अनुभवामधूनच त्यांना या सर्वांचा उत्तम अंदाज आला होता.

कच्च्या मालापासून कोणताही खाद्यपदार्थ तयार करतांना त्याला तव्यावर किंवा प्रत्यक्ष आगीत घालून भाजणे, उकळत्या पाण्यात बुडवून ठेवून किंवा नुसत्या वाफेवर शिजवणे आणि तापलेल्या तेलात किंवा तुपात तळणे किंवा परतणे (बेक, रोस्ट, बॉइल, डीप किंवा शॅलो फ्राय) या प्रक्रियांचा उपयोग केला जातो. त्यासाठी कशा प्रकारच्या किती ऊष्णतेची आवश्यकता असते, त्याला किती वेळ लागतो आणि त्या प्रक्रियांमध्ये त्या पदार्थावर ऊष्णतेचा परिणाम होऊन त्यांच्या गुणधर्मांमध्ये कसे बदल होत असतात वगैरेंचे त्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधून बाहेर पडणारी वाफ, ऊष्ण हवा किंवा धूर पाहून, त्यामधून पसरणारा गंध, त्यावेळी होणारा सूक्ष्म आवाज वगैरेमधून त्या पात्राच्या आत काय चालले आहे याचा अचूक अंदाज त्यांना येत असे. कोणत्या पदार्थासाठी कोणते पातेले, कढई किंवा तवा घ्यायचा, कोणती चूल, शेगडी किंवा स्टोव्ह पेटवायचा वगैरे गोष्टी त्या पदार्थाच्या कृतीवर विचार करून त्या अचूकपणे ठरवायच्या. गरज पडल्यास काही खास पदार्थासाठी मुद्दाम वेगळ्या प्रकारची चूल किंवा शेगडी त्या दगडमातीमधून स्वतःच तयार करून घेत असत.

मी आठवी नववीत गेल्यानंतर वैनींना मदत करण्यासाठी अधून मधून आमच्या स्वयंपाकघरात जाऊ लागलो होतो. त्यांनी मला एकही रेसिपी सांगितली नाही, एकाही विशिष्ट पदार्थाची कृती शिकवली नाही, पण वर दिलेल्या सर्व औष्णिक प्रक्रिया आणि कुटणे, वाटणे, खोवणे, दळणे, लाटणे यासारख्या यांत्रिक (मेकॅनिकल) क्रियांसंबंधी मूलभूत माहिती दिली आणि मी जर हे शिकून घेतले आणि लक्षात ठेवले तर पुढील आयुष्यात मला हवा तो पदार्थ करता येईल असे शिकवले. यालाच प्रयोगामधून शास्त्रीय शिक्षण देणे म्हणतात. जमखंडीतल्या आमच्या स्वयंपाकघरातले पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, चूल-फुंकणी, सूप यासारखे कोणतेही उपकरण आमच्या आताच्या घरात नाही आणि आमच्या आताच्या स्वयंपाकघरातली फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर यातली एकही वस्तू त्या काळात उपलब्ध नव्हती. पण लहानपणी खाल्लेले खाद्यपदार्थ मात्र आम्ही आताही तयार करू शकतो कारण त्याच्या मागे असलेले पाकशास्त्र किंवा मूलभूत विज्ञान एकच आहे.

त्या काळात आमच्या स्वयंपाकघरात कुकिंग गॅस आणि विजेचा वापर होत नव्हता. वखारीतून फोडून आणलेली बाभळीची कोरडी लाकडे हे मुख्य इंधन होते आणि अर्धवट जळलेल्या लाकडांपासून कोळसा बाजूला काढून त्याचा उपयोग शेगड्यांमध्ये केला जात असे. न जळलेले लाकडाचे तुकडे, रद्दी कागद, चिंध्या, नारळाच्या करट्या वगैरे सटरफटर गोष्टी बंबार्पण केल्या जात असत. याशिवाय ऑइल मिल्समधून भुईमुगाची टरफले आणि सॉमिल्समधून लाकडाचा भुसा अशा वेगळ्या टाकाऊ वस्तू घरी आणून त्यांचा इंधनासाठी उपयोग करायचे स्पेशल तंत्रज्ञान वैनींकडे होते किंवा त्यांनी ते विकसित केले होते. त्यासाठी पत्र्यांच्या रिकाम्या डब्यांपासून खास प्रकारच्या शेगड्या त्या मुद्दाम तयार करून घेत असत. आमच्या घरात कसल्याही प्रकारची भट्टी किंवा ओव्हन नव्हती, पण अनेक ड्रॉवर असलेला एक पत्र्याचा डबा वैनींनी कुठून तरी आणला होता. त्याच्या खाली, वर आणि बाजूला निरनिराळ्या प्रकारांनी गरम हवा खेळवून त्या मस्त खुसखुशीत बिस्किटे घरीच तयार करत असत. कोणताही नवा पदार्थ खात असतांना तो कशापासून तयार केला गेला असेल आणि त्यात कोणकोणती इतर खाद्य द्रव्ये मिसळली असतील हे त्यांना चवीवरून समजत असे आणि लहान प्रमाणात प्रयोग करून तो पदार्थ स्वतः बनवून पहाण्याचा छंद त्यांना होता. हे करतांना त्यांना सामान वाया जाण्याची भीती वाटत नसे. ते तसे होऊच देत नसत. त्यांनी ठरवलेला पदार्थ त्यांच्या अपेक्षेनुसार होतांना दिसला नाही तर मध्येच त्यात बदल करून त्यातून एक वेगळा चांगला पौष्टिक व रुचकर पदार्थ करणे हा त्यांच्या हातचा मळ होता. यामुळे आम्हालाही अनेक नवे नवे अनोखे पदार्थ खायला मिळाले.

विणकाम, भरतकाम, शिवणकाम इत्यादी कलांची साधारण मूलभूत माहिती वैनींना होती, पण त्यांना त्यांची मनापासून खूप आवड नसावी. स्वयंपाकघरातील कामे संपल्यावर उरलेला वेळ अशा प्रकारच्या कलाकुसरीच्या आणि शोभेच्या कामामध्ये घालवण्यापेक्षा तो वाचनात घालवणे त्यांना आवडत असे. त्यांचे वाचन मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे होते, पण त्यांचे अवांतर वाचनसुध्दा भरपूर होते. मासिकांमधून येणारे लेख, कथा वगैरे साहित्य त्या आवडीने वाचत असत. त्यात मनोरंजनापेक्षा ज्ञानाला जास्त प्राधान्य असायचे. आमच्या घरात असलेली बहुतेक सगळी धार्मिक पुस्तके अनेक वेळा वाचून आणि पोथ्यांची पारायणे करून त्यांना ती जवळ जवळ तोंडपाठ झाली असतील. त्यांना संगीताचे वावडे नव्हते, साधे गाणे ऐकायला आवडत होते, पण संगीताच्या शास्त्रात मात्र त्यांना रुची किंवा गती नव्हती. संतांनी लिहिलेले अभंग, ओव्या वगैरेंचा खूप मोठा स्टॉक त्यांच्याकडे होता. त्यांना प्रसंगानुसार यथायोग्य अशा म्हणी, वाक्प्रचार किंवा सुवचने तत्काळ सुचत असत. रामायण, महाभारत आदि पुराणकालातल्या कथांमधील सगळी मुख्य पात्रे तर त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतीच, शिवाय त्या पात्रांचे काका, मामा, नणंदा, भावजया वगैरे आप्तसंबंधींची नावे आणि त्यांचा इतिहासही त्या सविस्तर सांगत असत. त्या पौराणिक कथा छान रंगवून सांगत असत. त्यांच्याकडे काव्य लिहिण्याची प्रतिभा आणि त्याचा छंद होता. त्यांनी लिहिलेल्या काही कवनांचे संकलन माझ्या मोठ्या भावाने केले आहे. त्यात देवाची स्तुती, प्रार्थना वगैरे आहेत, काही पौराणिक आख्याने आहेत, एक दोन व्यक्तीगत स्वरूपाच्या कविताही आहेत.

जमखंडीला त्यांच्या समवयस्क आणि समविचारी महिलांचा ग्रुप होताच, सवड मिळेल तेंव्हा भेटून त्या गप्पागोष्टींबरोबर थोडे धार्मिक स्वरूपाचे वाचन, पठण, मनन. चिंतन, चर्चा वगैरे करत असत. नंतरच्या काळात त्या मुलांकडे बार्शी किंवा अणुशक्तीनगरला असतांनासुध्दा त्यांच्याभोवती अशी मंडळे गोळा होत असत आणि त्यांच्या सुसंस्कृत सहवासाचा लाभ घेत असत. त्यांनी स्वतःचे म्हणून कसले विचार मांडून इतरांना उपदेश करण्याचा आव कधी आणला नाही, पण मुख्यतः संतविभूतींच्या काव्यामधील ओळी उद्धृत करून किंवा त्यांच्या जीवनामधील घटनांचे दाखले देऊन त्या सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करत असत. स्वतःच्या जीवनातसुध्दा त्यांनी अशाच प्रकारे नेहमी योग्य निर्णय घेतले असतील, आणि त्याला इतस्ततः भरकटू न देता योग्य ती दिशा दिली असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. सभोवतालच्या जगात बरीवाईट माणसे असतात, त्यांच्या कृती चांगल्या किंवा वाईट असतात, त्यातल्या चांगल्याकडे आपण पहावे, त्यात समाधान मानावे, इतरांमधल्या वाईटाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, आपण त्यापासून सावध व्हावे, आपल्याला उपसर्ग होणार नाही किंवा त्रास झाला तर तो कमी व्हावा असा प्रयत्न करावा असे त्या सांगत असत. पुढील आयुष्यात ऑफीसचे हजारो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सकारात्मक विचारपध्दतीबद्दल मी जे शिकलो ते शिकतांना त्याची बीजे लहानपणी वैनींनी माझ्या मनात पेरलेली होती हे मला जाणवत होते.

कोठल्याही नव्या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड उत्साह असायचा आणि नवनिर्मितीचे खूप कौतुक वाटत असे. घरातल्या किंवा परिसरातल्या कोठल्याही समारंभाच्या वेळी त्यांच्या अंगात हत्तीचे बळ येत असे आणि त्यात त्या उत्साहाने पुढाकार घेत असत. त्यातल्या बारीकसारीक बाबी त्या काळजीपूर्वक पहात असत. त्यांनी मला सांगितलेले कुठलेही काम “मला येत नाही किंवा जमणार नाही.” असे म्हणून टाळता येणे शक्यच नव्हते. “येत नसेल तर शिकून घे, जमणार नाही असे वाटत असेल तर आधी प्रयत्न तरी करून बघ. जमेल तेवढे तरी कर, त्यात काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहू.” असे सांगून ते काम त्या माझ्याकडून करवून घेतच असत. “या पूर्वी मी हे काम कधी केले नाही.” हे उत्तर तर त्यांना अजीबात मान्य नव्हते. “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे।” हे समर्थ रामदासांचे वचन लगेच त्यांच्या ओठावर यायचे. कोणतीही गोष्ट कधी तरी कोणी तरी पहिल्यांदा केलीच होती असा त्यांचा युक्तीवाद असे. “बालपणी बाळांची कोमल तरुतुल्य बुध्दी वाकेल। घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तेही फाकेल ।।” असा त्यांचा एक आवडता श्लोक होता. त्यामुळे लहानपणी कुठल्याही विषयातले जे जे काही ग्रहण करता येईल ते सगळे आमच्या डोक्यात कोंबण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील असत. पण ते आमचा मूड पाहून आमच्या कलाकलाने होत असल्यामुळे त्याचा भडिमार वाटत नसे किंवा वैताग येत नसे.

“दादांच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.” असे मी मागील लेखात लिहिले होते. वैनींच्या बाबतीत ते शंभरपट जास्त प्रकर्षाने जाणवते. एक तर त्यांचा आणि माझा सहवास खूपच निकटचा होता आणि आम्हाला तो दीर्घ काळ लाभला. मी लहान असतांना मला मिळालेल्या संस्कारांबद्दल मी थोडेसे वरील परिच्छेदांमध्ये लिहिले आहे. मोठेपणीसुध्दा सतत त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम आधार आम्हाला मिळत राहिला. माझ्या जीवनामधली त्यांची जागा कधीही भरून निघाली नाही आणि निघणारही नाही हे मात्र शंभर टक्के खरे आहे. पितृपक्षामध्ये मातृपक्षही असतोच. त्यानिमित्य माझ्या या महान मातेला माझी अल्पशी श्रद्धांजलि.

नवी भर दि. २६-०९-२०२१ : माझ्या आईने (ती.वैनींनी) रचलेल्या अनेक भक्तिरसपूर्ण कवनांपैकी मला मिळाल्या तेवढ्या निवडक रचनांचे एक संकलन मी या पानावर केले आहे. https://anandghan.blogspot.com/2020/06/blog-post_23.html

आमचे दादा

आमचे दादा

पूर्वीच्या काळात बहुतेक सगळेच मध्यमवर्गीय लोक एकत्र कुटुंबांमध्येच रहात असत. माझे वडील त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांची लहान भावंडे म्हणजे माझे काका आणि आत्या त्यांना ‘दादा’ म्हणत असत आणि इतर आप्तही त्यांना ‘दादा’ असे म्हणायला लागले. एकत्र रहात असल्यामुळे ते ऐकून दादांची मुलेही म्हणजे आम्ही भावंडे सुध्दा त्यांना ‘दादा’ म्हणायला लागलो आणि पुढे दादांच्या नातवंडांनीही त्याचे अनुकरण केले. माझ्या वडिलांचे नावच ‘दादा’ असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! मोठेपणी कधी त्याचे रूपांतर दादासाहेब, अप्पासाहेब वगैरेंमध्ये होत असे. आमच्या दादांना त्यांच्या लहानपणी बंडू म्हणत असत त्याचे मोठेपणी बंडोपंत झाले होते. दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला ‘वहिनी’ म्हंटले जात असे. ‘वहिनी’ या शब्दाचा ‘वयनी’, ‘वैनी’ असा अपभ्रंश होऊन अखेर ‘वैनी’ हेच त्यांचे नाव पडले. आजकाल पितृपक्ष चालला आहे. या पंधरवड्यात आपल्या प्रिय आणि आदरणीय अशा दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करावी या विचाराने आज हा लेख लिहीत आहे.

तात्या म्हणजे आमचे आजोबा ‘सावळगी’ नावाच्या लहानशा गावात (किंवा मोठ्या खेड्यात) स्थाईक झाले होते. त्या काळात हे गाव जमखंडी संस्थानांत होते, आता हा भाग कर्नाटकातील बागलकोट (पूर्वीच्या विजापूर) जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात येतो. दादांचा जन्म बहुधा सावळगीला झाला असावा आणि बालपण सावळगीतच गेले. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे दादांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याकडेच झाले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जमखंडी येथील परशुराम भाऊ (पी.बी.) हायस्कूलमध्ये झाले. या शाळेच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणिकेत उल्लेखनीय माजी विद्यार्थी म्हणून दादांची केलेली नोंद मी लहानपणी पाहिली आहे.

सावळगीपासून जमखंडी गाव बारा मैल (सुमारे एकोणीस कि.मि.) अंतरावर आहे, शिवाय वाटेत जमगी येथे कृष्णा नदी ओलांडावी लागते. पूर्वीच्या काळात वाहतुकीची सोय नव्हतीच. त्यामुळे सावळगीहून जमखंडीला जाण्यासाठी आधी आठ मैल चालत जाऊन, नावेमधून किंवा पोहत नदी पार करायची आणि पुन्हा पुढे चार मैल पायपीट असे करावे लागत असे. एरवी संथपणे वाहणाऱ्या कृष्णामाईला पावसाळ्यात महापूर आला की ती संथ न वाहता अतीशय वेगाने खळाळत धावते आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी उलट दिशेने शिरल्यामुळे त्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन कृष्णा नदीचे पात्रच मैल दीड मैल इतके रुंद होते. त्या काळात जमगीपाशी तिला पार करणे दुरापास्त होऊन जाते. या अडचणींमुळे शालेय शिक्षणासाठी दादा जमखंडीला स्थायिक असलेल्या आप्तांकडे रहात असावेत.

पहिल्यापासूनच दादा हुषार विद्यार्थी होतेच. कुशाग्र बुध्दी, चांगली आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. मॅट्रिक ही त्या काळातली शालांत परीक्षा ते उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्या काळात जमखंडीच्या आसपास कोठेही पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. आजोबांचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी असले तरी कॉलेजशिक्षणासाठी रोख पैसे बाजूला काढून देणे त्या काळात बरेच कठीण होते. तात्यांना शिक्षणाचे खूप महत्व वाटायचे आणि दादांनी आपली योग्यता सिध्द करून दाखवली होती. पण संसाधनांचा प्रश्न होता. अशा वेळी “आम्ही वाटल्यास एक वेळ जेवून राहू, पण दादाला कॉलेजला पाठवा.” असे दादांच्या लहान बहिणीने म्हणजे आमच्या गंगूआत्यांनी आपल्या वडिलांना सांगितले. ही गोष्ट दादांनी आयुष्यभर लक्षात ठेवली होती आणि त्यांच्या अखेरच्या दिवसात सुध्दा ती जुनी आठवण सांगतांना त्यांना गहिंवरून येत असे.

अशा ओढाताणीच्या परिस्थितीतही दादा निग्रहाने सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. तो सुमारे १९२० ते २२ चा काळ असेल. त्या काळात साधे ग्रॅज्युएशन हीच फार मोठी उपलब्धी असायची. दादाच्या पिढीमधील आमच्या नातेवाईकांमधला इतर कोणीच तेंव्हा स्नातक झाला नव्हता. त्या काळात बी.ए.नंतर एल. एल. बी. पास करून वकील बनणे हे आजकालच्या इंजिनियरिंग किंवा मेडिकलपेक्षासुध्दा अधिक प्रतिष्ठेचे आणि हमखास चांगले उत्पन्न मिळवण्याचे साधन समजले जात असे. अभ्यास करून ते लक्ष्य गाठण्याएवढी दादांची बौध्दिक पात्रता आणि तयारी होती. सहजपणे छाप पाडणारे प्रभावी व्यक्तीमत्व आणि तर्कशुध्द विचार करून ते सुसंगतपणे मांडण्याची क्षमता वगैरे गोष्टी त्यांच्या बाजूने असल्यामुळे ते वकीलीच्या व्यवसायात चांगले यशस्वी ठरलेही असते. पण त्या काळातल्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता त्यांनी या उच्च शिक्षणापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यातही मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे न वळता घराकडे परत येऊन ते जमखंडी संस्थानाच्या सेवेत रुजू झाले.

जमखंडी संस्थानच्या राज्यकारभारात त्यांनी चांगला लौकिक मिळवला. जमखंडी गावात ते ‘रावसाहेब’ या नावाने संबोधले जात असत. कर्नाटकातील हुबळीजवळील कुंदगोळ आणि सातारा जिल्ह्यातील शिरवडे या गावी जमखंडीच्या संस्थानिकांच्या जहागिरी होत्या. काही काळासाठी त्या ठिकाणचे वहिवाटदार म्हणून दादांची नेमणूक झाली होती. अर्थातच त्या ठिकाणचे ते सर्वेसर्वा असायचे. या घटना माझ्या जन्मापूर्वीच्या किंवा मी तान्हे बाळ असतांनाच्या असल्यामुळे मला यातले काहीच आठवत नाही, पण घरातल्या मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून त्याबद्दल मी असंख्य वेळा ऐकले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळासाठी भारतातले सगळे संस्थानिक जवळ जवळ सार्वभौम राजे झाले होते. पण सरदार वल्लभभाई पटेलांनी नेट लावून त्यांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणले. त्या वेळी सर्व संस्थानिकांच्या सेवकांना राज्य सरकारांच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले. जमखंडी संस्थान त्या काळातल्या मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे दादांना मुंबई इलाख्याच्या शासनात पद दिले गेले. पण त्यांची जमखंडीहून बाहेरगावी बदली झाली. राज्यपुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेले त्या काळातले मैसूर राज्य (आताचे कर्नाटक) किंवा द्विभाषिक मुंबई राज्य यातून त्यांना निवड करायची होती. जमखंडी हे आमचे गाव मैसूर राज्यामध्ये गेल्यामुळे दादांनीही तिथून जवळ राहण्याच्या दृष्टीने मैसूर राज्याच्या सेवेत जाण्याचे ठरवले. पण त्यानंतर त्यांना जमखंडीचे पोस्टिंग मात्र कधीच मिळाले नाही.

या काळात नोकरीच्या गावी ते एकटेच रहात असत आणि आमच्या एकत्र कुटुंबातील इतर सगळे सदस्य आमच्या जमखंडीच्या घरात रहात. मला समजायला लागल्यापासून मी हीच परिस्थिती पहात मोठा झालो. दरवर्षी दिवाळीला आणि आजी आजोबांचे श्राध्द व सर्व पितरांचे पक्ष या कार्यांसाठी दादा न चुकता जमखंडीला येऊन जात. त्याशिवाय महिना दोन महिन्यातून एकाद्या दिवशी धूमकेतूसारखे अचानक येऊन एक दोन दिवसात परत जात असत. त्यांच्या या भेटीमागे काही कारण असले तरी त्याची चर्चा मुलांसमोर कधीच होत नसे. बहुतेक वेळी ते आले म्हणून घरात आनंदाचे वातावरण व्हायचे त्यात आम्हीसुध्दा खूष होत असू. श्राध्दपक्षाच्या दिवशी कोणत्या पुरोहितांना बोलवायचे, नैवेद्याला कोणते विशिष्ट पदार्थ करायचे, गावातील कोणकोणत्या इतर नातेवाईकांना तर्पण आणि प्रसादासाठी घरी बोलवायचे वगैरेबद्दल ठरलेले नियम होते आणि घरातल्या सर्वांनाच ते चांगले ठाऊक होते. इतर वेळी दादांच्या आगमनानंतर आमच्या घरी त्यांच्या मित्रमंडळींची गप्पांची रंगदार बैठक हमखास भरत असे. त्यासाठी बोलवायच्या लोकांची यादी वेगळी होती. ते मित्र जमले की त्यांच्या हंसण्याखिदळण्याला ऊत येत असे, पण त्यांचे बोलणे ऐकण्याला मुलांना सक्त बंदी असल्यामुळे त्या काळात तरी मला त्याचे कुतूहल वाटत असे. त्यात काही चावटपणा किंवा नॉनव्हेज जोक्सचा भाग असणार हे दहा बारा वर्षांनंतर मी सज्ञान झाल्यावर माझ्या लक्षात आले.

नोकरीत असतांना दादांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या, पण त्या काळात मला भूगोलाचे फारसे ज्ञान नसल्यामुळे त्याचा अर्थ समजत नव्हता आणि त्या गावांची नावेही आता स्मरणातून नाहीशी झाली आहेत. ते धारवाड जिल्ह्याच्या पार दक्षिणेच्या टोकाला असलेल्या राणीबिन्नूर या गावी असतांना एकदा मे महिन्याच्या सुटीत आम्हीही तिकडे गेलो होतो. माझ्या आठवणीतला तो पहिलाच लांबचा प्रवास असल्यामुळे कायमचा चांगला लक्षात राहिला आहे. त्यानंतर काही वर्षे ते बागलकोट जवळील इलकल या गावी होते. हातमागावर विणलेल्या काठापदरांच्या खास इरकली लुगड्यांसाठी हे गाव प्रसिध्द आहे. दादा इलकल येथे असतांना त्याच्यासाठी रोज एस् टी बसमधून जेवणाचा डबा पाठवला जात असे आणि त्यासोबतच आम्ही पत्रेही पाठवत असू. इंग्रजी आणि गणित यासारख्या काही विषयांमधील प्रश्नोत्तरे मी त्यांना लिहून पाठवत होतो आणि ती तपासून त्यामधील चुका आणि दुरुस्त्या दादा लगेच पाठवत असत. अशा प्रकारे ते दूर राहूनही माझा अभ्यास घेत होते.

१९५८ साली रिटायरमेंटनंतर दादा कायमचे राहण्यासाठी जमखंडीला आले. तोपर्यंत माझे सगळे मोठे भाऊ कॉलेजचे शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी रहात होते. जमखंडीच्या घरात दादा, वैनी, सोनूआत्या आणि मी एवढे चारजणच होतो. दिवाळीच्या वेळी मात्र सगळी मंडळी गोळा झाली की घर भरून आणि गजबजून जात असे. आधीपासून दादांचा कल देवभक्तीकडे होताच, रोज पहाटे जाग आल्यानंतर अंथरुणावर पडल्यापडल्याच ते अभंग म्हणत असत. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि इतर संतांचे शेकडो अभंग त्यांना तोंडपाठ होते, त्यांना संगीताचे ज्ञान होते आणि अत्यंत सुरेल आवाजात आणि चिपळ्यांचा ठेका धरून ते अभंग गात असत. ते सेवानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ भक्तीमार्गाला लागले होते. दररोज विठ्ठल मंदिरात आणि विशिष्ट दिवशी दत्ताच्या देवळात ते भजनासाठी जात होते. अधून मधून त्यांची प्रवचनेही होत असत. या काळात त्यांच्या जुन्या मित्रमंडळींच्या टोळक्यांच्या बैठका कमी कमी होत बंदच पडल्या किंवा दादांनी त्यात सहभागी होणे थांबवले.

दादा संस्कृत भाषेतले पंडित होते. जमखंडीच्या राजपुत्राच्या मौंजीबंधनाच्या वेळी त्यांनी संस्कृतमध्ये मंगलाष्टके रचली होती. कवितांमधील विविध वृत्ते, छंद वगैरेंचे समग्र ज्ञान त्यांना होते. घरामधील लग्नमुंजींसारख्या प्रसंगी घरातल्या मुलांनी मंगलाष्टके रचण्याची सुरुवात माझ्या सर्वात मोठ्या भावापासून झाली होती आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ती परंपरा माझ्यापर्यंत आली होती. भारतीय पध्दतीच्या बुध्दीबळामध्ये ते निष्णात होते. या खेळात विरुध्द पक्षाचे सर्व मोहरे मारून चालत नाही. त्याचा कमीत कमी एक मोहरा जीवंत ठेऊन त्याच्यावर मात करावी लागत असे. आमच्याशी खेळतांना ते चांगल्या खेळी रचून आधी आमचे बरेचसे मोहरे खाऊन टाकत, पण उरलेला शेवटचा मोहरा मात्र मरणाची भीती नसल्यामुळे धीटपणे कसाही वावरत असला आणि बिनधास्तपणे कुठेही घुसत असला तरी त्याला न मारता त्याचा हल्ला चुकवून तो खेळ ते जिंकत असत. शिवाय मात देणारा शेवटचा शह प्यादे किंवा घोड्यानेच देऊन मात करायची अशा गंमती ते सांगून करून दाखवत असत. पाश्चात्य नियमांप्रमाणे चेस खेळून त्यांनी स्पर्धेत भाग घेतला असता तरीही त्यांनी त्यात नक्कीच बक्षिसे मिळवली असती. त्यांच्या काळात कदाचित अशा स्पर्धा होत नसाव्यात.

त्या काळात तशी विचित्र पध्दतच होती की काय ते देव जाणे, पण घरातल्या कर्त्या पुरुषांचा प्रमाणाबाहेर दरारा असायचा. वडीलधाऱ्यांच्या समोर मुलांची तोंडातून ब्र काढायची हिंमत नाही असे सांगायला लोकांना मोठा अभिमान वाटत असे. काही कामासाठी दादा घराबाहेर गेलेल्या वेळी इतर लोक हास्यविनोद किंवा वादाडी करू शकत, पण दादांचे पाऊल उंबऱ्यात पडल्याची चाहूल आली की सगळेजण चिडीचुप्प होऊन जात असत. त्यानंतर कोणीही मोठ्या आवाजात बोलायचे नाही, रडायचे, ओरडायचे किंवा भांडायचे तर नाहीच अशी सक्त ताकीद लहान मुलांना दिली जात असे. शोले चित्रपटातला “यहाँसे पचास पचास कोसतक ..” हा सुप्रसिध्द संवाद ऐकल्यानंतर मला अचानक दादांची आठवण झाली. त्यांना कोणीही कसलाही प्रश्न विचारायचा नाही, उलट उत्तर तर नाहीच, सरळ उत्तरसुध्दा शक्य तोवर मान हलवून निःशब्दपणे द्यायचे असा अलिखित नियम होता. अनवधानाने, अज्ञानामुळे किंवा गैरसमजुतीमधून त्यांनी एकादे चुकीचे विधान केले तरी ती चूक दाखवून देणे हा अक्षम्य अपराध होता. अगदी लहान एक दोन वर्षांची बाळे त्यांच्या अंगाखांद्यावर मजेत खेळायची पण जरा मोठे झाल्यानंतर त्यांच्याबरोबर अघळ पघळ गप्पागोष्टी, थोडी गंमत जंमत, मौजमस्ती करणे, हंसणेखिदळणे वगैरे गोष्टींना फारसा वाव नव्हता. हास्यविनोद याचा अर्थ त्यांनी कांही विनोद केला तर इतरांनी जरा जपून हंसायचे एवढाच असायचा.

लहान असतांना हे ठीक होते, पण कॉलेजात जाऊन शिंगे फुटायला लागली, बाहेरचे जग पाहिले आणि मला ते पटेनासे झाले, पण गत्यंतर नव्हते. त्यामुळे एक प्रकारची मनाची कुचंबणा होत होती. मनात एक प्रकारची आढी निर्माण होत गेली. त्यात माझ्या भल्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टीसुध्दा त्यावेळी मनाविरुध्द असल्यामुळे अनावश्यक किंवा अतीशयोक्त वाटल्या होत्या. त्यांचे मोल कित्येक वर्षांनंतर मला समजले. पण दादा हयात असेपर्यंत त्यांच्याबरोबर मनमोकळा संवाद करण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता आणि मला तो कधीच करता आला नाही ही खंत मात्र मनात राहून गेली.

इंटर सायन्सच्या परीक्षेत मला सुवर्णपदक मिळाले होते, पण त्याबद्दल मला दादांच्याकडून पुरेशी शाबासकी मिळाली नाही अशी समजूत करून घेऊन मी उगाचच खट्टू झालो होतो. मुलांचे जास्त कौतुक केले तर ते त्यांच्या डोक्यात जाऊन ती बिघडतात अशी त्यांची थिअरी होती. वास्तविक पाहता ही गोष्ट ते अभिमानाने गावात इतरांना सांगत होते हे मला नंतर समजले. कॉलेजमधील बक्षीससमारंभात मला ते पदक मिळाल्यानंतर मी सुटीसाठी घरी जाण्यापूर्वीच दादा आजारी पडल्याचे समजले. अशा वेळी त्यांना भेटायला जातांना सोबत पदक घेऊन जाणे योग्य ठरेल की नाही अशी शंका माझ्या मनात आली. शिवाय मनातील बारीकशा आढीमुळे मला मिळालेले सुवर्णपदक त्यांना दाखवायला मी बरोबर घेऊन गेलो नाही. आमच्या दुर्दैवाने त्या दुखण्यामधून ते वाचले नाहीत, माझ्या आठवणीतला तो त्यांचा पहिलाच मोठा आजार शेवटचा ठरला आणि आपल्या या मूर्खपणाची हुरहूर माझ्या मनात कायमची मनात राहून गेली.

दादा गेले तेंव्हा आमचे कुटुंब एकखांबी तंबूसारखे होते. तो आधार अचानक ढासळल्यानंतर होणाऱ्या पडझडीत आमचे काय होईल याची कल्पनाच करवत नव्हती. पण त्यांनी आयुष्यभर कमावलेली पुण्याई आमच्या पाठीशी होती आणि त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण लाखमोलाची होती. माणसे जोडणे हा त्यांचा सर्वात मोठा विशेष गुण होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल श्रध्देची भावना होती. कोणत्याही रीतीने मदत करून त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यामुळे कोणीही आम्हाला अनाथ वाटू दिले नाही.

काटकसर करून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा वस्तुपाठ दादांनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला दिला होता. घरातले कोणतेही काम घरातील सर्वांना यायलाच पाहिजे अशी शिकवण देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्या बाबतीत ते मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करत नव्हते. त्यामुळे शेणाने जमीन सारवणे, त्यावर रांगोळी काढणे, भांडी घासणे, कपडे पिळून वाळवत टाकणे यासारखी फक्त बायकांची समजली जाणारी कामे मी मुलगा असूनसुध्दा गरज पडल्यास सहजपणे करत आलो होतो. घरातले कोणतेही काम मुख्यतः आपले असते, त्यासाठी गडीमाणसे किंवा कामवाल्या बायका येत असल्या तरी ते काम त्यांचे ठरत नाही, त्याची मुख्य जबाबदारी घरातल्यांच्यावरच असते हे त्यांनी सर्वांच्या मनावर इतके ठसवले होते की रोज ते काम करणारी व्यक्ती एकाद वेळेस गैरहजर किंवा आजारी असली तरी इतर लोक ते काम बिनबोभाटपणे करून टाकत. कुठलेही काम कमीपणाचे न समजता मन लावून केले पाहिजे असे त्यांनी सांगितले होतेच, त्याची गुणवत्ता (क्वालिटी) चांगलीच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कसलाही कामचुकारपणा किंवा थातुरमातुरपणा ते मुळीच सहन करून घेत नसत. त्यात चुका आढळल्यास ते त्या लगेच दुरुस्त करायला लावत. यामुळे मला अभ्यासासकट सगळी कामे आळस न करता मन लावून करायची सवय लागली ती आयुष्यभर उपयोगी पडली.

दादाच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा  धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा.

नवी भर दि. २६-०९-२०२१ :

माझे शिक्षण जमखंडी गावातल्या परशुराम भाऊ हायस्कूल या विद्यालयात झाले. त्याच्या चाळीस वर्षे आधी माझे वडील कै.बाळकृष्ण पांडुरंग घारे हेसुद्धा त्याच शाळेत शिकले होते. या शाळेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्य निघालेल्या स्मारकग्रंथामध्ये माझ्या वडिलांनी एक सविस्तर लेख लिहून आमच्या शाळेने क्रीडाक्षेत्रात त्या काळात केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला होता. योगायोगाने हा दुर्मिळ लेख माझ्या हाती आला आणि मी तो इथे संग्रहित केला आहे. ऐंशी वर्षापूर्वीच्या वातावरणाचा आणि तेंव्हा प्रचलित असलेल्या भाषेचाही यामुळे परिचय होईल. माझ्या वडिलांनी आमच्या शाळेवर केलेली एक हृद्य कविताही खाली दिली आहे. https://anandghare.wordpress.com/2020/10/06/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%90%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96/

माझा एक नंबरचा शत्रू – ‘पसारा’ शब्दाचा जनक

मला जेंव्हा नीट बोलायलासुद्धा येत नव्हते, तेंव्हापासून “छुबंतलोती तल्लानं” वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. त्यातल्या “छतलूबुद्दी” या शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून माझ्या मनातला कुणाहीबद्दलचा वैरभाव काढून टाकण्याचा प्रयत्न मी अधून मधून करत असतो. माझ्या पाठीमागेसुद्धा माझ्याबद्दल बरे बोलणारे लोक मी सहसा कुणाला ‘वाईट’ म्हणत नाही किंवा कुणाचे वाईट चिंतत नाही असे काही वेळा सांगतात म्हणे. हे ऐकून मलाही बरे वाटते. पण मला माहीत आहे की काही शत्रूंनी माझ्या लहानपणापासून आजतागायत माझा पिच्छा पुरवला आहे. त्यांना कितीही वेळा हाकलले तरी बहिणाबाईंच्या ‘वढाय वढाय मना’सारखी ही शत्रूरूपी ढोरे ‘फिरी फिरी पिकावर’ माघारी येतच असतात.

त्यातल्या काही व्यक्ती तर इतिहासातल्या कोणत्या शतकात होऊन गेल्या तेही मला सांगता येणार नाही, पण त्यांनी करून ठेवलेल्या कृती मला अजून छळत असतात. त्यांनी केलेल्या एकाच पापामुळे त्यांनी माझ्यासारख्या इतक्या लोकांचा तळतळाट घेतला आहे की पुढच्या निदान हजार जन्मात तरी ते डास, ढेकूण किंवा झुरळ होणार आहेत याबद्दल माझी खात्री आहे. आज ते ज्या कोणत्या योनीत आणि जिथे कुठे असतील तिथे त्यांचे तळपट व्हावे अशी इच्छा मनात येते आणि एकादा डास, ढेकूण किंवा झुरळ समोर दिसला की त्याचा पार चेंदामेंदा करावा असे वाटते. “माझ्या आयुष्यात मला कधीही न भेटलेल्या या लोकांनी माझे असे कोणते घोडे मारले आहे?” असा विचार तुमच्या मनात येईल, पण मला विचाराल तर माझे फक्त घोडेच नाही तर हत्ती, उंट, गाय, हरीण, ससा वगैरे जो कोणता प्राणी मला कधी हवाहवासा वाटला त्याची या लोकांमुळे वाट लावली गेली आहे. आता एक उदाहरणच पहा ना!

मी तेंव्हा सात आठ वर्षांचा असेन. त्या काळात आताच्या मुलांसारखा ‘मी तो हमाल भारवाही’ झालो नव्हतो. माझी स्लेटची पाटी, पेणसिल, अंकल्पी (अंक लिपी), सर्वसमावेशक असे एक किंवा फार फार तर तशी दोन पाठ्यपुस्तके, कुणी तरी आणून दिलेले एकाददुसरे चित्रांचे पुस्तक, एकादी जुन्या पाटकोऱ्या कागदांची रफ वही, पाच दहा सुटे कोरे किंवा पाटकोरे कागद, शिस्पेन्सिल, रबर, रंगांच्या खडूंची पेटी इतकीच तेंव्हा माझी संपत्ती होती. आमचे प्रशस्त घर माणसांनी भरलेले होते. ऊनपाऊस, थंडीवारा आणि निवांतपणा पाहून मी एकाद्या जागी पुस्तक पहात किंवा चित्र काढत बसलो असेन, त्याच वेळी दारात आलेल्या रम्या किंवा अंत्याची हाक मला ऐकू आली तर लगेच जाऊन पहायला नको का? घरातले कपडे वेगळे आणि बाहेर जाण्यासाठी वेगळा ड्रेस म्हणजे ‘आत एक आणि बाहेर एक’ असा भेदभाव मी त्या काळात करत नसे. त्यामुळे “मी खेळायला चाललोय्” अशी दारातूनच आरोळी देऊन मी सटकलो तर त्याला काय हरकत होती? घरातल्या इतक्याजणांपैकी कोणी ना कोणी तरी ती नक्कीच ऐकणार याची खात्री असायची. खेळून परत आल्यावर सडकून भूक लागलेली असे, थोडे खाऊन होईपर्यंत घरातले कोणीतरी एकादे लहान सहान काम करायला सांगत असे. आपले अर्धवट सोडलेले पुस्तक पहाणे किंवा चित्र काढणे त्यानंतर पुढे चालवावे म्हंटले तर त्या वस्तू जिथे सोडून मी पळालेलो होतो तिथून त्या अदृष्य झालेल्या असायच्या. घरातल्या कोणत्या तरी ताईमाईने, आईने किंवा काकूने त्या उचलून कुठे तरी ठेवलेल्या असायच्या, पण नेमके काय झाले हे मात्र कोणीही मला सांगत नसे. कदाचित त्यांच्याही ते लक्षात येत किंवा रहात नसेल. जमीनीवर काही पडलेले दिसले की ते उचलून ठेवायचे अशी त्यांच्या हातांना यांत्रिक संवय झाली असावी.

“माझ्या त्या वस्तू कुठे गेल्या?” असे कोणाला विचारायचीही सोय नसे. त्याचे उत्तर कोणाकडे आहे? हेच मुळात माहीत नसल्याने कुणाला म्हणून विचारायचे? हा प्रश्न तर होताच आणि कोणालाही माझा प्रश्न विचारला तरी “तू आपापल्या वस्तू उचलून जागेवर ठेवायला कधी शिकणार आहेस? नुसता पसारा करून ठेवायला तेवढं येतं!” हेच उत्तर मिळण्याची खात्री असायची. त्यानंतर माझ्या मनात पुन्हा कधी पुस्तक पहायचा किंवा चित्र काढायचा विचार आला तर मग मी दोन चार कपाटे आणि कोनाडे धुंडाळून माझी मालमत्ता शोधून काढत असे. त्यात इतर दहा पंधरा वस्तू जमीनीवर येत आणि माझा अर्ध्याहून अधिक मूड गेलेला असे. उरल्यासुरल्या मूडला सांभाळत मी माझ्या कामात तंद्री लावायचा प्रयत्न करतो न करतो तेवढ्यात पुन्हा कोणी ताईमाईअक्का यायच्या आणि कानाला पकडून मला ओढत नेऊन मी नव्याने केलेला ‘पसारा’ दाखवायच्या, तो उचलून ठेवायला लावायच्या, पाठीत धपाटाही मिळायचा. त्या काळापासून मी ‘पसारा’ या शब्दाचा भयंकर धसका घेतलेला आहे.

माझा एक मोठा भाऊ कॉलेजशिक्षणासाठी शहरात चालला गेला तेंव्हा रिकाम्या झालेल्या कपाटातला एक खण मी हट्ट करून माझ्या ताब्यात घेतला. माझ्या पुस्तक आणि वह्यांची संख्या तोपावेतो थोडी वाढली होती, शिवाय कंपासपेटी, फुटपट्टी, रंगपेटी, रंगकामाचे ब्रश, दौतटाक, टीपकागद वगैरे काही साधनांची त्यात भर पडली होती. आता माझी हक्काची जागा मिळाल्यामुळे मी काही वस्तूंचा संग्रह करू शकणार होतो. मी तयार केलेल्या कागदाच्या होड्या, विमाने, पक्षी वगैरे कलाकृती आतापावेतो दुसरा दिवस उजाडायच्या आत बंबामध्ये “अग्नये स्वाहा” होत असत, आता मी त्या माझ्या खणात जपून ठेवू लागलो. काडेपेट्यांचे ‘छाप’, रिकाम्या झालेल्या डब्या, भोवरे, गोट्या, गजगे, चिंचोके, पोस्टाची रिकामी पाकिटे, त्यांच्यावरची तिकीटे, रंगीबरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले, खेडेगावात क्वचितच मिळणारी चमकदार नवी नाणी किंवा अती प्राचीन वाटणारी घासून गुळगुळीत झालेली जुनी नाणी अशा अनेक चित्रविचित्र वस्तू मला आकर्षक वाटायच्या आणि मी त्यांना माझ्या खणात स्थान देत असे. त्यातली कुठलीही गोष्ट चुकून जमीनीवर पडली तर ‘पसारा’ समजली जाईल आणि कदाचित मला पुन्हा तिचे दर्शन होणार नाही एवढे शहाणपण मी अनुभवावरून शिकलो होतो. त्यामुळे मला हवी असलेली वस्तू काढतांना इतर काही वस्तू बाहेर आल्याच तरीसुद्धा मी त्यांना पुन्हा खणात कोंबून ठेवत असे.

पण एकाद्या दिवशी मी शाळेतून परत येऊन पाहतो तो माझ्या खणाचे व्यवस्थित स्वरूप आणि मोकळेपण पाहून मला रडू आवरत नसे. मी प्रेमाने जमवलेल्या काही गोष्टी तर तिथून नाहीशा झालेल्या असतच, शिवाय “बघ, मी तुझा खण किती छान आवरून ठेवला आहे? तू त्यात नुसता बुजबुजाट मांडला होतास!” असले काही उद्गार ऐकावे लागत असत. पहायला गेल्यास माझ्या खणातला सोकॉल्ड ‘पसारा’ कुणाला आणि कसला त्रास देत होता? ताई, माई, अक्का, आई, काकू वगैरेंना तोसुद्धा का सहन होत नव्हता? “अचानक कोणीतरी पाहुणा घरी आला आणि त्याने ते कपाट उघडून पाहिले तर त्यातला तुझा खण बघून त्याला काय वाटेल? तो (बहुतांश वेळा ती) त्यावर काय म्हणेल?” असल्या प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर होत असे. कदाचित त्यात त्यांचीही काही चूक नसेल. “ज्या कोणत्या महाभागाने मराठी भाषेत ‘पसारा’ हा शब्द आणला त्यालाच धरून धोपटायला पाहिजे” असे माझे ठाम मत त्या काळात बनत गेले. आजवर ते बदललेले नाही.

. . . . . . . . . . . .

जरा निसर्गाकडे पहा. निसर्गातले डोंगर कधी तरी एकादा पिरॅमिड, देवळाचा घुमट किंवा भाताची मूद यांच्यासारखे सिमेट्रिकल असतात का? निरनिराळ्या नद्या कधी सरळ रेषेत आणि एकमेकींना समांतर किंवा काटकोन करून वाहतात का? आभाळातले ढग कधी वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी किंवा पंचकोनी असतात का? रानात उगवलेली झाडे कवायत करत असलेल्या सैनिकांसारखी एकेका रांगेत ठराविक अंतर सोडून उभी असतात का? जमीनीवर पडलेली त्यांची पाने सत्यनारायणाच्या पूजेसाठी मांडतात तशी एकाच बाजूला देठ करून उताणी ठेवलेली असतात का? जमीनीवर पडलेली पाने, फुले, गवत, दगड, गोटे वगैरेंचे त्यांच्या आकारानुसार किंवा रंगांप्रमाणे वेगवेगळे ढीग असतात का? निसर्गामध्ये तसले काहीसुद्धा नसते. तिथे सगळे काही अव्यवस्थितपणे मिसळलेले आणि पसरलेले असते. याचाच अर्थ पसारा असणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो करणे हा प्राणीमात्रांचा नैसर्गिक गुण आहे, अर्थातच मनुष्यप्राण्याचासुद्धा, हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

मी कॉलेजशिक्षणासाठी हॉस्टेलवर रहायला गेलो तिथे एकेका खोलीत तीन तीन मुलांची सोय केलेली होती. प्रत्येकासाठी एक लहानशी कॉट आणि टेबलखुर्ची दाटीवाटी करून ठेवली होती, कपाट मात्र नव्हते. सगळ्या मुलांनी पलंगाखाली आपापल्या ट्रंका आणि बॅगा ठेवून त्यात आपापले सामान ठेवायला सुरुवात केली. पण तिथे रोख पैसे सोडल्यास आणखी काही सहसा चोरीला जात नाही हे लवकरच सर्वांच्या लक्षात आले. रोज चार पाच तास लेक्चर्स ऐकण्यात आणि तीनचार तास प्रॅक्टिकल्स करण्यातच दिवसातला सगळा वेळ आणि शक्ती खर्ची पडत होती. नवीन ओळखी करून घेणे, नवे मित्र जोडणे, नवे वातावरण समजून घेऊन त्याच्याशी जमवून घेणे वगैरेंमध्ये उरलेल्या वेळात प्रयत्न करत होतो. सकाळी उठल्यानंतर समायिक स्वच्छतागृहांमध्ये नंबर लावून सकाळची कामे उरकून घेऊन आणि मेसमध्ये जाऊन पोटभर नाश्ता करून वेळेवर कॉलेजला पोचण्यात रोज खूप धावपळ करावी लागत होती. यामुळे त्यानंतर सगळ्या मुलांमधले नैसर्गिक गुण बाहेर येत गेले. मग अंगावरून काढलेले कपडे कॉटवर टाकले जायचे, लॅबकोट किंवा बॉयलरसूट असे काही चढवलेले असले तर ते कॉलेजमधून परत आल्यानंतर आधी काढून तिथेच भिरकावले जायचे, रात्री झोपायच्या आधी कपडे बदलले तर काढलेले कपडे त्यावरच पडायचे. वह्यापुस्तकेसुध्दा काही टेबलावर तर काही पलंगावर मस्तपैकी पसरलेली असायची. ही अवस्था सगळ्याच खोल्यांची होती. एकादा मुलगा कुठून तरी एकादे पिवळे पुस्तक घेऊन आला तर ते मात्र गादीखाली, उशीच्या अभ्र्यात वगैरे लपवून ठेवले जायचे आणि त्याची कुणकुण इतर कोणाला लागताच ते तिथून अदृष्य व्हायचे.

एका अतीश्रीमंत मुलाचे त्या काळातले फॉरेनरिटर्न्ड आईवडील त्याला भेटण्यासाठी दर रविवारी मुंबईहून मोटारगाडीने येत असत. त्यांनी त्या मुलाच्या खोलीतल्या एका कोपऱ्यात कॅनव्हासचा भला मोठा झोळा अडकवून ठेवला होता. अंगावरून काढलेला कोणताही कपडा, तसेच वापरलेला टॉवेल, नॅपकिन, रुमाल वगैरे सगळे तो लगेच त्या झोळ्यात टाकायचा. आईवडिलांनी त्यांच्याबरोबर आणलेला नोकर त्या मुलाच्या पलंगावरच्या चादरी, पलंगपोस, टेबलक्लॉथ आणि त्या झोळ्यात जमा झालेले सगळे कपडे काढून त्याचा गठ्ठा बांधून बाजूला ठेवायचा. व्यवस्थित धुवून इस्त्री केलेल्या कपड्यांचा त्याने सोबत आणलेला नवा गठ्ठा उघडून त्यातली चादर गादीवर व्यवस्थितपणे अंथरायचा, उशांचे अभ्रे बदलायचा, टेबलक्लॉथ बदलून त्यावरची सगळी वह्यापुस्तके लगोरीसारखी म्हणजे सर्वात मोठे पुस्तक तळाशी, त्याहून किंचित लहान आकाराचे त्यावर अशा रीतीने नीट मांडून ठेवायचा, रुमाल, टॉवेल्स, घरातले कपडे, बाहेर जातांना घालायचे कपडे, पांघरायच्या चादरी वगैरे सगळ्यांचा भरपूर नवा स्टॉक त्या मित्राच्या खोलीतल्या ट्रंकेत व्यवस्थित ठेवायचा आणि बांधून ठेवलेला गठ्ठा घेऊन जायचा. पसारा आणि नीटनेटकेपणा या विषयांवरील व्याख्यान ऐकायची इच्छा नसल्यामुळे त्या मुलाचे रूममेट दर रविवारी सकाळी उठून आपापल्या वस्तू जमतील तेवढ्या आवरून ठेवू लागले. पहिल्या एक दोन आठवड्यानंतर त्या मुलाचे वडील त्याला भेटायला हॉस्टेलवर क्वचितच आले असतील, त्याच्या आईचे येणेही हळूहळू कमी होत गेले, पण नोकर किंवा ड्रायव्हर मात्र न चुकता दर रविवारी येत राहिला आणि त्याचे कर्तव्य बजावत राहिला. पुढे त्याच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली तेंव्हा त्याचे चाळीस पन्नास किंवा जितके काही कपड्यांचे सेट होते ते एका मोठ्या ट्रंकेत घालून हॉस्टेलवर येऊन पडले. ते धुवून घेण्यासाठी त्याने स्थानिक व्यवस्था केली, पण लवकरच तो आणि त्याचे रूममेट माणसांत परत आले.

काही मुलांची घरे हॉस्टेलपासून दीडदोन तासांच्या अंतरावर होती किंवा पुण्यातच त्यांची एकादी ताई माई रहात असे. यामुळे घरातले कोणीतरी कधीही अवचितपणे त्यांच्या खोलीवर येण्याची दाट शक्यता असायची. ती मुलेसुद्धा रविवारची सगळी सकाळ आपापली खोली आवरण्यात घालवायची. एकदोन मुलांना बहुधा आवरोमॅनिया झाला होता. आपली प्रत्येक वस्तू कुठल्याही क्षणी विशिष्ट जागी, विशिष्ट अवस्थेतच असणे हेच सर्वात जास्त महत्वाचे असते असे ते समजत असत. एकाद्या पुस्तकातली माहिती पहायची असली तर ते लोक आधी त्या पुस्तकाच्या वर असलेली सगळी पुस्तके एक एक करून व्यवस्थितपणे बाजूला काढून ठेवत, हवे असलेले पुस्तक बाजूला ठेऊन इतर सगळी पुस्तके पुन्हा व्यवस्थितपणे रचून ठेवत आणि नंतर ते बाजूला ठेवलेले पुस्तक उघडून पहात. त्यातली माहिती वाचून किंवा पाहून झाली की पुन्हा ते पुस्तक त्याच्या ठरलेल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवत. अर्थातच इतर सगळ्या पुस्तकांना दोन वेळा व्यवस्थितपणे हाताळणे त्यात आलेच. हॉस्टेलमधल्या दुसऱ्या एकाद्या मुलाने त्या शिस्तप्रिय मुलाच्या टेबलावरच्या पुस्तकांच्या चंवडीमधले एकादे तळातले पुस्तक पाहण्यासाठी खस्सकन ओढून काढले किंवा ते पाहून झाल्यानंतर टेबलावरच कुठेसे ठेवले तर तो त्याचा अक्षम्य अपराध असायचा. सगळ्यात वर दिसत असलेले पुस्तकसुद्धा पाहून झाल्यानंतर त्याच्या मूळ जागेवर ठेवतांना ते उलटे ठेवले गेले, म्हणजे त्याचे मुखपृष्ठ खालच्या बाजूला किंवा शिवण डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला झाली तर त्या मुलांना ती गोष्ट अस्वस्थ करत असे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे कोणीही त्यांच्या कुठल्याच वस्तूला हात लावत नसत आणि त्यांचा सगळा वेळ आवरासावरीतच जात असल्यामुळे इतर कुणाशी मैत्री करणे, त्या मित्रांबरोबर गप्पा मारणे, खेळणे, भटकणे वगैरे काही आपल्या जीवनात असते हे त्यांच्या गावी नसायचे.

असे काही अपवाद सोडले तर इतर सगळी मुले मात्र रविवारी सकाळी उन्हे चांगली अंगावर येईपर्यंत आपल्या पलंगावरच्या पसाऱ्यात आरामात लोळत पडायची. मनसोक्त लोळून झाल्यानंतर मग आठवडाभरात साठलेली किरकोळ कामे हातात घ्यायची, एकादा मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा खेळाची मॅच पहायला जायची, उगाचच बाजारात फिरून विंडोशॉपिंग करायची आणि या सगळ्यामधून फालतू वेळ मिळाला तर खोलीची थोडी आवराआवर करायची असा त्या काळातल्या सुटीच्या दिवसाचा दिनक्रम असायचा. त्या काळात पसारा हा शब्द फारसा कानावर पडायचा नाही आणि पडला तरी त्याची मजा वाटायची. त्यामुळे या शब्दाच्या निर्मात्याबद्दल मनात बसलेली आढी तेंव्हा त्रासदायक वाटत नव्हती. किंबहुना मी त्याला विसरून गेलो होतो. बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणायची पद्धत असली तरी मला मात्र हॉस्टेलमधला काळ सुखाचा असेच तेंव्हा वाटत असे आणि ते फारसे चूक नव्हते.

. . . . . . . . . . . . .. . .

मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर ‘घर’ या संकल्पनेचे काही फंडे नव्याने समजत गेले. आपले घर म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तसे आरामात राहण्याची हक्काची जागा आहे असे मला वाटत असले तरी आपल्याकडे येणाऱ्याजाणाऱ्यांनी आपल्या घराला चांगले म्हणणे अतीशय आवश्यक असते. त्यांनी आपल्या घराचे (म्हणजे गृहिणीचे) कौतुक करावे, निदान त्यांना नांवे तरी ठेऊ नयेत हे सर्वात जास्त महत्वाचे असते. त्यांना नांव ठेवायला जागाच मिळू न देणे हे गृहिणीचे परमोच्च कर्तव्य तसेच ध्येय असते. अर्थातच आपल्या घराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातल्या उणीवा दाखवणे हा त्या येणाऱ्याजाणाऱ्यांचा मुख्य हेतू असणार. ते लोक आपल्याला भेटायला किंवा आपल्याशी बोलायला येत असतात असे मला उगीचच वाटते. आपले घर कसे असते यापेक्षा ते कसे दिसते याला जास्त महत्व असते. यात पुन्हा चांगलेवाईट ही विशेषणे सापेक्ष असतात. त्यामुळे “आपलं घर तर किती छान दिसतंय्?” असे मी म्हणून काही उपयोग नसतो. तसे इतरांनी म्हणायला हवे, पण दिवसभर मी कामासाठी बाहेरच असल्यामुळे हे येणारे जाणारे, खरे तर येणारजाणाऱ्या, आपल्या घराबद्दल काय बोलत असतात ते मला कसे समजणार? त्यामुळे मी या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकत नाहीच. घरासंबंधीच्या तत्वज्ञानाचे थोडे बाळकडू मी लहानपणी प्राशन केले होते, पण हॉस्टेल्समध्ये घालवलेल्या सुवर्णयुगात त्याचा अंमल ओसरला होता. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक मी संसार थाटल्यानंतर पुन्हा कलीसारखा माझ्या घरात घुसला.

घर चांगले दिसण्यात ‘पसारा’ या शब्दाला अवाच्या सव्वा निगेटिव्ह मार्क असतात. केर, कचरा, घाण वगैरेंना घरात थारा देता कामा नयेच हे कोणीही मान्य करेल, पण जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू वेचून तुम्ही घरी आणून ते सजवलेत तरी एकाद्या जागी झालेला पसारा त्या सगळ्यावर बोळा फिरवतो. ‘पसारा’ म्हणजे ‘पसरलेल्या वस्तू’ असा व्याकरणातला अर्थ असेल, पण घराच्या सौंदर्याच्या संदर्भात या शब्दाला एक वेगळाच व्यापक अर्थ असतो. कोणतीही टुकार, खराब किंवा वाईटच नव्हे, एकादी सुरेख, उपयुक्त आणि तुमची अत्यंत आवडती वस्तूसुद्धा जर का जमीनीवर, गादीवर, सोफ्यावर, खुर्चीवर, खिडकीत वगैरे पडली असेल तर ती वस्तू ‘वस्तू’ न राहता तिचे रूपांतर ‘पसाऱ्या’त होते. ‘नो पार्किंग झोन’मध्ये एकादी मर्सिडिज गाडी उभी असली तरी तिला खेचून नेणारे महाभाग असतात, त्याचप्रमाणे कुठेही ‘पसारा’ दिसला की त्याला उचलून नजरेआड करणारे हात सारखे शिवशिवत असतात. ‘टोइंग’वाल्यांनी नेलेली गाडी कुठे मिळेल याची थोडी फार कल्पना असते, पण ‘पसारा’ म्हणून गायब झालेल्या वस्तूंबद्दल काही सांगता येणार नाही. मिळाल्या तर एका मिनिटात मिळतील नाहीतर त्या कुठल्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाल्या हे कधीच समजणार नाही. त्यातून जर का हा ‘पसारा’ घरी आलेल्या पाहुण्याच्या नजरेला पडेल अशी शक्यता निर्माण झाली तर त्याला देहांताची शिक्षा होणे अटळ असते. खरे वाटत नसले तर एक अनुभव सांगतो.

मी जेंव्हा चारपाच वर्षांचा होतो त्या काळात आमच्या घरातल्या एकाद्या कोनाड्याचा एकादा कोपरासुद्धा ‘माझा’ नव्हता, पण या बाबतीत माझा मुलगा नशीबवान होता. तो तीनचार वर्षांचा झाला होता तोपर्यंत त्याला अनेक खेळणी आणि चित्रमय पुस्तके मिळाली होती. ती सगळी ठेवण्यासाठी आम्ही त्याला घरातली एक अख्खी खोलीच दिली होती. त्या खोलीत त्याला वाटेल तसे खेळायला मोकळीक दिली होती. ती खोली त्याला ‘त्याची’ वाटावी म्हणून भिंतींवर आकर्षक रंगीत चित्रे लावली होती. इतके सगळे करूनसुद्धा त्याला मात्र तसे काही वाटत नसे, कारण तो पठ्ठा ‘हे (संपूर्ण) घर माझेचि विश्व’ असे मानायचा आणि अर्थातच घरातल्या सगळ्या वस्तू त्याला हाताळून पहायच्या असत. एकाद्या सम्राटाच्या ऐटीत तो घरभर फिरायचा, लाटणे, झारा, टूथपेस्ट, पेन, घड्याळ असले जे काही हाताला लागेल ते उचलून कुठेही नेऊन तो त्याच्याबरोबर खेळत बसायचा. त्याला उचलून त्याच्या खोलीत नेऊन खेळवणे आणि त्याच्या हातातल्या इतर वस्तू काढून घेणे हे काम मला नाइलाजाने करावे लागत असे. एकादा कायदा तत्वतः मान्य नसला तरी जबाबदार नागरिकाला त्याचे पालन करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ‘पसाराविरोधी’ अध्यादेशाची अंमलबजावणी करणे मला भाग होते.

एकदा माझे सासरेबुवा आमच्याकडे आलेले होते. त्यांना त्यांच्या मुलीबरोबर निवांतपणे गुजगोष्टी करायला मिळाव्यात म्हणून मी माझ्या मुलाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो. पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सर्व घराबरोबर त्याची खोलीही आवरली गेली होतीच, सगळी खेळणी आणि पुस्तके कपाटात बंद केलेली होती. त्यातले एक चित्रमय पुस्तक काढून मी त्यातली परीकथा सांगायला सुरुवात केली. अनेकदा ऐकून त्याला ती गोष्ट पाठ झालेली होती, मी एक वाक्य बोलताच तो पुढचे वाक्य सांगायचा. अशा प्रकारे ते पुस्तक वाचेपर्यंत तो कंटाळला. त्याला थोड्या प्रॅक्टिकल आणि क्रिएटिव्ह कामात गुंतवण्याच्या दृष्टीने मी पत्त्यांचा जोड काढला आणि आम्ही दोघांनी मिळून बंगला बनवायला सुरुवात केली. दोन पत्त्यांचा त्रिकोण तयार करणे, त्याला धक्का न लावता शेजारी दुसरा त्रिकोण रचणे आणि त्यांना आडव्या पत्त्याने हलकेच जोडणे त्याला जमायला लागले आणि आमचा बंगला मोठा मोठा होत गेला. माझ्या मुलाला त्यात एक प्रकारचा अपूर्व आनंद मिळत होता, त्याच्या वयाच्या मानाने पाहता त्याचे हस्तकौशल्य खरोखरच कौतुक करण्यासारखे होते आणि ते करून मी त्याला प्रोत्साहन देत होतो.

“चहा तयार झालाय् रे” अशी माझ्या आईची हाक कानावर येताच मी उठलो आणि “मी पाच मिनिटात येतोय् हां.” असे मुलाला सांगून बाहेर हॉलमध्ये आलो. आम्ही सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली. एवढ्यात माझा मुलगाही बाहेर आला आणि “आजोबा, चला, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे.” असे म्हणत त्यांचे बोट धरून ओढायला लागला. एका हातात कप धरून ते त्याच्याबरोबर गेले असते तरी काही बिघडणार नव्हते आणि त्यांची तशी तयारीही होती. पण “अरे आजोबांना जरा चहा तर पिऊ दे. दोन मिनिटांनी ते येतील.” असे म्हणून त्याची समजूत घातली गेली. तो बिचारा निमूटपणे वाट पहात उभा राहिला. यामागचा कावा माझ्याही लक्षात न आल्यामुळे मीही गाफिल राहिलो.

चहाचा शेवटचा घोट घेतल्यावर आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत गेलो आणि तिथले दृष्य पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझा मुलगा तर आश्चर्याने आणि दुःखाने सुन्न होऊन गेला कारण तेवढ्यात कोणीतरी तिथे येऊन जमीनीवरचा पसारा हलवायचा म्हणून आम्ही बांधलेला बंगला पार नाहीसा करून टाकला होता आणि पत्त्यांचा जोड उचलून कपाटात ठेऊन दिला होता. कारण काय तर पाहुण्यांनी पहायला ती खोली चांगली दिसायला हवी ना! वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स कोसळल्यानंतर अमेरिकेच्या जनतेला उद्देशून आषण करतांना जेवढे दुःख अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावर दिसले होते त्याहूनही जास्त आक्रोश माझ्या मुलाच्या डोळ्यांमध्ये मला दिसत होता. पण “कुणाला काय हो त्याचे? कुणाला काय सांगावे?” अशी माझी अवस्था झाली. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक माझ्याकडे बघून खदाखदा हसतो आहे असे मला वाटून गेले.

मातेची माया, ममता वगैरेंची थोरवी असंख्य लोकांनी सांगितली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे जितक्या भाषा मला येतात त्या सगळ्यांमध्ये मी याबद्दल अनेक वेळा वाचले आहे. स्वाहिली किंवा हिब्रू वगैरे ज्या भाषा मला समजत नाहीत त्यांमध्येसुद्धा तिचे वर्णन असणार याची मला खात्री आहे. “मुलाचा आनंद म्हणजेच आईचा आनंद आणि मुलाचे दुःख म्हणजेच आईचे दुःख, मुलाला कुठे टोचलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि मुलाच्या डोळ्यातली चमक पाहून आईचे डोळे चमकायला लागतात.” वगैरे जे काही सगळेजण म्हणतात तसे असणारच, पण मला एक गोष्ट समजत नाही. घरात दंगामस्ती करून सगळे सामान इकडेतिकडे टाकणारी लहान मुले सगळ्या काळांमध्ये मी घरोघरी पाहिली आहेत. त्यात मुलांना होत असलेला आनंदही त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडतांना दिसत असतो, पण हा आनंद त्यांच्या माउलींच्या तोंडावर मात्र दिसत नाही. मुलाच्या आनंदामुळे आनंदी होण्याऐवजी त्या रागावतात, वैतागतात, मुलांना दटावून त्यांचा विरस करतात किंवा रट्टे देऊन त्यांना रडवतात. असे का होत असावे? आपल्या घरातला पसारा बघून कोणीतरी आपल्याला काय म्हणेल? ही इनसिक्यूरिटी इतकी तीव्र असते की आपल्या मुलाला काय वाटेल? हा विचार त्यावेळी करावासा वाटत नाही,

साक्षात मातेच्या मनावरसुद्धा सत्ता गाजवणारा हा विचार ज्याच्यामुळे निर्माण झाला तो म्हणजे पसारा या शब्दाचा जनक आपला शत्रूच नाही का? मी तर त्याला एक नंबरचा शत्रू समजतो.

. . . . . . . . . . . . .

अनंतचतुर्दशी

मी हा लेख अनेक वर्षांपूर्वी एका अनंतचतुर्दशीच्या दिवशी लिहिला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे मधली दोन वर्षे या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपतींचे विसर्जन होत नव्हते. या वर्षी मात्र सगळे निर्बंध उठवले असल्यामुळे धूमधडाक्यात  विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या आहेत. सगळीकडे ढोलाचे आवाज दुमदुमत आहेत.

‘अनंत’ या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. माझ्या आधीच्या पिढीतली ‘आनंद’ हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि तेंव्हा या नावाची मुलेसुध्दा अनंतांच्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी ‘आनंद’ असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते ‘अनंत’ असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या ‘अनंत’ या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून मी त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले.

सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला स्थाइक झाल्यानंतरच्या काळात मात्र ‘अनंत’ नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणाऱ्या ‘आनंदां’ची संख्या वाढत गेली, काही चिदानंद, परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला ‘अनंत’ हे नाव आता ठेवत नसेल.

‘अनंत’ या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. ‘ज्याला अंत नाही’ असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालय असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे.

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवस अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दोऱ्याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार कडक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणाऱ्यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावत असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.

आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।

हा लेख पूर्वी लिहिलेला आहे आणि यात वर्णन केलेली मिरवणुकींची धमाल दर वर्षी होत असे. या वर्षी (२०२० साली) कोरोनोच्या दहशतीमुळे सगळीकडे सामसूमच आहे.
—————————————–