बोलणे आणि लिहिणे

‘बोलका ढलपा’ व ‘वर्णमाला’ हे भाग लिहित असतांना बोलणे आणि लिहिणे याबद्दल मनात आलेले कांही विचार या भागात देऊन ही लघुमालिका संपवीत आहे. जन्माला येणारे प्रत्येक लहान मूल ट्याहाँ ट्याहाँ करीतच या जगांत येते. त्यानंतर थोड्याच दिवसात ते नाद, दृष्टी व स्पर्श या माध्यमातून इतर लोकांबरोबर संवाद साधू लागते. हा ‘शब्देविण संवादू’ आयुष्य असेपर्यंत कांही प्रमाणांत होतच असतो, पण बोलायला लागल्यानंतर ‘बोलणे’ हेच संवादाचे प्रमुख साधन बनते. बोलणारा व ऐकणारा या दोघांनी एका वेळी एका जागेवर हजर असणे मात्र यासाठी जरूरीचे आहे.

आपला निरोप अक्षरांच्या माध्यमातून दूरवर पाठवता येतो व तो कालांतराने व पुनःपुनः वाचता येतो हे बोलक्या ढलप्याच्या गोष्टीमध्ये मी दाखवले आहे. अशा प्रकारे स्थळकाळाची बंधने ओलांडून संवादाच्या कक्षा लेखनाच्या माध्यमातून रुंदावता आल्या. माणसाने निर्माण केलेल्या या अद्भभुत कलेला अनेक आकार प्राप्त झाले व प्राचीन काळातील भूर्जपत्रे, ताम्रपट, शिलालेख वगैरे पासून मध्ययुगातील पोथ्या, खलिते वगैरे अनेक मार्गाने ती विकसित झाली. कागदाची उपलब्धता निर्माण झाल्यानंतर व्यक्तिगत पत्रव्यवहार, नोंदवह्या वगैरे सुरू झाले. छपाईचे तंत्र आल्यानंतर एकाच मजकुराच्या अनेक प्रती बनवणे शक्य झाले. यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे वगैरे मोठ्या प्रमाणात प्रचारात आली व त्याद्वारे संवादाच्या कक्षा विस्तृत झाल्या.

गेल्या शतकात आलेल्या कांही साधनांमुळे बोलण्यावर असलेल्या स्थळकाळाच्या मर्यादा गळून पडल्या. ध्वनिक्षेपकांचा उपयोग करून आपला आवाज दूरवर बसलेल्या हजारो श्रोत्यांपर्यंत पोचवता येऊ लागला, दूरध्वनीमार्फत त्यापेक्षाही दूरच्या व्यक्तीबरोबर बोलता येऊ लागले आणि रेडिओच्या माध्यमातून एकाच वेळी तो अनेक ठिकाणच्या अनंत श्रोत्यांपर्यंत पोचू लागला. ध्वनिमुद्रित करून तो टिकवून ठेवताही आला व पुनःप्रसारित करता आला. त्यामुळे बोलक्या ढलप्याऐवजी अगदी आपल्या आवाजाची ध्वनिफीत पाठवता येऊ लागली. याच काळात लेखन व छपाईमध्येसुद्धा प्रचंड प्रगती होऊन ते अधिकाधिक सुकर झाले. दौत टांक जाऊन पेन आले, वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या आकारांचे कागद वेगवेगळ्या रंगात वेगाने छापता आले, लहान मोठ्या आकारांची पुस्तके बनू लागली. या प्रगतीमुळे लेखन व वाचन यांचा प्रचंड विस्तार झाला तसेच त्याला विलक्षण गति प्राप्त झाली. संगणक आल्यानंतर व विशेषतः इंटरनेटच्या जमान्यात या दोन्ही क्रियांमध्ये अभूतपूर्व प्रगती होऊन दोन्ही माध्यमातून जगभर पसरलेल्या लोकांबरोबर संवाद साधता येऊ लागला.

आपल्याला हवे असलेले बहुतेक सर्व कांही या दोन्ही प्रकारे व्यक्त करता येते व दुस-या व्यक्तीपर्यंत ते पोचवता येते. जरी असे असले तरी बोलणे आणि लिहिणे हे संपूर्णपणे एकमेकांचे पर्याय कधीच बनले नाहीत. सात आठ वर्षांपूर्वी एस.टी.डी चे दर भारतातील कांही गांवासाठी स्थानिक टेलीफोनच्या दराच्या दहापट होते तर आय.एस.डी.चे दर शंभरपट होते व इंटरनेट सुविधा फक्त टेलीफोनमधूनच उपलब्ध होती. त्यामुळे चॅटिंगसाठीसुद्धा टेलीफोन लागायचाच. त्या काळात स्थानिक लोकांबरोबर मी कधीच चॅटिंग केले नाही, नेहमी त्यांच्याबरोबर टेलीफोनवरच बोललो, परगांवी असलेल्या लोकांबरोबर कधी चॅट कधी फोन आणि परदेशी राहणा-या आप्तांबरोबर मुख्यतः चॅटिंग करीत होतो. पण तरीसुद्धा दर तासभराच्या चॅटिंगमागे पांच दहा मिनिटे तरी बोलल्याखेरीज चैन पडत नसे कारण ‘शब्दांच्या पलीकडले’ बरेच कांही जे आपल्या बोलण्यामधून व्यक्त होत असते, ते निर्जीव अक्षरात उतरत नाही. आनंद, मौज, काळजी, चेष्टा, उत्सुकता, वैताग यासारख्या भावना जशा आवाजावरून लगेच समजतात तशा तितक्या स्पष्टपणे व उत्कटपणे त्याच शब्दांच्या वाचनांत त्या जाणवत नाहीत. कदाचित याच कारणाने चॅटिंगची सोय करणा-या लोकांनी लवकरच ‘व्हॉईस एनेबल’ सुरू करून दिले.

टेलीफोन उचलताच ‘हॅलो’म्हणायची पद्धत आहे. या एकाच शब्दाच्या उच्चारावरून आपणास निदान वीस पंचवीस लोकांचे आवाज ओळखता येतात. तसेच एकाच व्यक्तीच्या आवाजात भावनेनुसार फरक पडतो. उदाहरणादाखल ‘कां’या एक अक्षरी शब्दाने कारण विचारतांना त्यामागे उत्सुकता, उत्कंठा, आश्चर्य, जाब विचारणे, अगतिकता असे वेगवेगळे उद्देश असू शकतात. त्यानुसार प्रत्येक वेळी त्याच अक्षराचा वेगळा उच्चार होतो. प्रसिद्ध संगीतकार श्री.यशवंत देव यांनी त्यांच्या ‘शब्दप्रधान गायकी’ या कार्यक्रमात एक सोपे उदाहरण दिले होते. ‘हा रामा काल सकाळी कां आला नाही ?’ हे एकच वाक्य वेगवेगळ्या शब्दांवर जोर देऊन वाचा, त्यातून वेगवेगळे अर्थ ध्वनित होतील. या जागी मला ते आवाज ऐकवता येणार नाहीत. वाचकांनी स्वतःच उच्चार करून पहावा.
१.हा रामा काल सकाळी कां आला नाही ?….. दुसरा कोठला तरी रामा आला.
२.हा रामा काल सकाळी कां आला नाही ? …. कदाचित गोविंदा आला.
३.हा रामा काल सकाळी कां आला नाही ? …. परवाच येऊन गेला किंवा आज उगवतो आहे.
४.हा रामा काल सकाळी कां आला नाही ? …. दुपारी किंवा संध्याकाळी आला.
५.हा रामा काल सकाळी कां आला नाही ? …. कारण जाणून घेणे, काळजी, वैताग, राग इ.
६.हा रामा काल सकाळी कां आला नाही ? …. बहुतेक दुसरीकडे गेला असेल.

असेच “रोको मत जाने दो” हे शब्द दोन गवयांना दिले होते. एकाने गातांना “रोओओओको … मत जाने दोओओओ” (त्याला थांबवा, जाऊ देऊ नका) असा उच्चार केला, तर दुस-या गवयाने तीच ओळ “रोको मअअअत … जाआआआने दो” (त्याला थांबवू नका, जाऊ द्या) अशी गाइली.

अर्थातच शब्दांच्या योग्य उच्चाराला खूप महत्व असते.

वर्णमाला

भारतीय भाषांमधील वर्णमाला आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व शास्त्रशुध्द पध्दतीने बनवली आहे. आपण जेंव्हा बोलतो त्यावेळी फुफ्फुसातील हवा हळूहळू तोंडातून बाहेर सोडतो व त्याचबरोबर स्वरयंत्र, जीभ आणि जबडा यांच्या विशिष्ट हालचालीमधून ध्वनि निर्माण करतो. या प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास करून त्याअनुसार अक्षरांची रचना या वर्णमालेत केलेली आहे. स्वर व व्यंजन असे अक्षरांचे दोन मुख्य गट आहेत अ, आ, इ ई वगैरे स्वरांचा उच्चार मुख्यतः घसा व जबडा यांच्या माध्यमातून होतो “आ” म्हणतांना आपण तोंड पूर्णपणे उघडून आ वासतो तर “ऊ” म्हणतांना ओठांचा चंबू करतो. अं म्हणतांना तोंड मिटून घेऊन नाकाद्वारे हवा बाहेर सोडतो तर अः च्या उच्चारात तोंड उघडून झटक्यात हवा बाहेर टाकतो. स्वरांच्या उच्चारात जिभेचा फारसा वापर होत नाही.

व्यंजनांच्या उच्चारात जिभेची हालचाल आवश्यक आहे. किंबहुना त्यावरूनच व्यंजनांची वर्गवारी केलेली आहे. क,ख,ग,घ,ङ या पहिल्या गटाचा उच्चार करतांना जीभ आतल्या बाजूला घशाकडे ओढली जाते म्हणून त्याला “कंठ्य” म्हणतात. या गटातील पहिले अक्षर थोडेसे तीव्र किंवा कठोर आहे तर तिसरे ग हे अक्षर सौम्य वा मृदु आहे. या अक्षरांच्या जोडीने घशातून जास्त जोरात हवा सोडली की अनुक्रमे ख आणि घ या दुस-या व चौथ्या अक्षरांचा उच्चार होतो. शेवटी नाकातून आवाज काढला की ङ हे अनुनासिक होते.  अशा प्रकारे प्रत्येक गटात पांच व्यंजनांचा संच बनवला आहे.

वरच्या दंतपंक्तींच्या हिरड्यांच्याही वर जिभेने स्पर्श करून च,छ,ज,झ,ञ या अक्षरांचा उच्चार होतो. या गटाला तालव्य असे म्हणतात. जीभ उभी करून वरच्या पडद्याला लावली की ट,ठ,ड,ढ,ण या मूर्धन्य गटाचा उच्च्रार होतो, तर वरच्या दातांना स्पर्श करून होणा-या त,थ,द,ध,न या अक्षरांच्या गटाला दंत्य हे नांव दिले आहे. प,फ,ब,भ,म या औष्ठ्य गटामध्ये जीभ तोंडातच राहते आणि वरचा ओठ खालच्या ओठाला भेटतो. या पांच गटांतील पंचवीस व्यंजनांमध्ये कुठे तरी स्पर्श होणे आवश्यक आहे.
त्यानंतर येणा-या य,र,ल,व या व्यंजनाच्या उच्चारासाठी जीभ ज,ड,द,ब या अनुक्रमे तालव्य, मूर्धन्य, दंत्य व औष्ठ्य गटांतील व्यंजनासाठी लागणा-या स्थानांच्या अगदी जवळ जाते पण त्यांचा उच्चार एखाद्या स्वराप्रमाणे मुख्यतः घशातून होतो, तसेच जीभ किंचित आतल्या बाजूला ओढली जाते. या व्यंजनांना अंतस्थ म्हणतात. त्यानंतरची श,ष,स अक्षरे उच्चारतांना जीभ पुन्हा अनुक्रमे तालव्य,मूर्धन्य व दंत्य स्थितीत जाते पण किंचित पुढे ढकलली जाते. श,ष,स आणि ह,ळ यांच्या उच्चारात हवा कांहीशा जोरात फेकली जाऊन तिच्या घर्षणामधून ऊष्णता निर्माण झाल्यासारखे वाटते. या अक्षरांच्या गटाला ऊष्म नाव दिले आहे. तोंडाची वाफ दवडणे हा वाक्प्रचार बहुधा या गटामुळेच आला असावा. ह चा उच्चार करतांना तर त्याचा उछ्वास अगदी बेंबीच्या देठापासून जाणवतो. त्याला महाप्राण असेही म्हणतात. क्ष आणि ज्ञ ही दोन नेहमी वापरली जाणारी जोडाक्षरे आहेत त्यांना ही मुळाक्षरांमध्ये स्थान दिले आहे. कांही भाषांमध्ये त्यांच्या जोडीने त्र सुध्दा गणले जाते.

जेंव्हा इंग्रजी भाषेच्या प्रसाराला सुरुवात झाली त्यावेळी Boy, Cat हे शब्द ब्वाय, क्याट असे लिहीत. मध्यंतरी कोण्या विद्वानाने ॅ ही देवनागरी लिपीत नसलेली मात्रा मराठीत आणून बॉय, कॅट असे सुटसुटीतपणे लिहिण्याची सोय केली. हिन्दी भाषेमध्ये उर्दू शब्दांच्या मुलायम उच्चारातील मार्दव दाखवण्यासाठी कांही अक्षरांच्या खाली नुक्ता नांवाचा एक बिंदु देण्याची प्रथा पडली. तसेच चॉन्द सारख्या शब्दांच्या उच्चारासाठी चन्द्रबिंदु आणला आणि चाँद असे लिहिले जाऊ लागले. कन्नड भाषेत -हस्व आणि दीर्घ ए कार व ओ कार आहेत. त्यामुळे Get आणि Gate या शब्दांमधील गे चे वेगळेपण दाखवता येते.

अशा प्रकारे मूळ संस्कृत भाषेतील वर्णमालेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भर वेगवेगळ्या भाषांच्या लिपींमध्ये घातलेली आहे. तामीळ भाषेची मात्र एक वेगळीच त-हा म्हणायची. तिथे क,ख,ग,घ या सर्वांसाठी मिळून एकच अक्षर आहे. त्यामुळे एकच वाक्य कोणी खाना खाओ असे वाचेल तर दुसरा गाना गाओ असे. पंजाबी ढंगाच्या हिंदीमध्ये घर शब्दाचा उच्चार क्कार आणि भाई चा उच्चार प्पाई असा होत असलेला आपण अनेक मालिकांमध्ये पाहतोच.

भारतातील विविध भाषा आणि लिपी एकत्र पहायच्या आहेत ? आपली कुठलीही एकादी नोट घ्या. तिचे मूल्य हिन्दी आणि इंग्रजीशिवाय आसामी पासून उर्दूपर्यंत पंधरा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले आपल्याला पहायला मिळेल.

बोलका ढलपा

एक वैद्यबुवा आपल्या वनौषधी बनवण्यासाठी लागणारी पाने, फुले, कंदमुळे वगैरे गोळा करण्यासाठी अधून मधून रानावनात दूरवर जात असत. कधी कधी रानात राहणारा एक चुणचुणीत मुलगा त्यांना मदत करायला त्यांच्याबरोबर असायचा. रानातील वेगवेगळी ठिकाणे दाखवणे, झाडावर चढून उंचावरील पाने, फुले, फळे तोडून आणणे, त्यांच्यासाठी घरून जेवण आणि पाणी घेऊन येणे अशा अनेक कामामध्ये तो त्यांना मदत करीत असे.

एके दिवशी दूरवरच्या एका डोंगरावर चढून गेल्यावर त्यांना एक उपयुक्त वनस्पती तेथे उगवलेली दिसली, तिची कोवळी पाने खुडण्यासाठी लागणारे एक विशिष्ट प्रकारचे छोटे हत्यार त्यांच्या घरी होते पण त्यांनी या वेळेस बरोबर आणलेले नव्हते. तेवढ्यासाठी घरी जाऊन येण्यात तो दिवस वाया गेला असता. “त्यांनी आता काय करायला हवे?” हा प्रश्न मी वेगवेगळ्या लोकांना विचारला आणि त्याची निरनिराळी उत्तरे मिळाली.
एका बालगटातील मुलाने सांगितले, “अगदी सोप्पं आहे. रानात राहणा-या वनराणीला बोलावून सांगायचं की मला ते हत्यार हवं आहे. ती लगेच आपली जादूची कांडी फिरवेल आणि ते आणून देईल.”
एका विशीतल्या मुलाने सांगितले, “त्यात काय आहे? बाईकला किक मारायची आणि काय पाहिजे ते घेऊन यायचे.”
त्याच वयाच्या मुलीने सांगितले, “मी त्याच्या जागी असते ना, तर सेलवर बायकोशी बोलले असते आणि ते आणायला कुणाला तरी घरी पाठवून दिले असते.”
चाळीशीतल्या माणसाने सांगितले, “तो मुलगा बरोबर आहे ना ? त्याला घरी पाठवून दिले की झाले.”
“पण त्या हत्याराला काय म्हणतात हे तो मुलगा विसरून गेला तर?”
“ठीक आहे. वैद्यबुवांनी आपल्या बायकोच्या नांवाने एक चिठ्ठी लिहून द्यायची.”

या गोष्टीचा कालखंड मी मुद्दामच सांगितला नव्हता. पण तो इतका जुना होता की त्या काळात साधे पेन, पेन्सिल आणि कागद उपलब्ध नव्हते. तर सेल आणि बाईक कोठून असणार? त्या वनवासी बालकाला तर साक्षरता म्हणजे काय याचीसुद्धा मुळीच कल्पना नव्हती. तेंव्हा त्या वैद्यराजांनी काय केले असेल? त्यांनी एक लाकडाचा छोटासा ढलपा काढला आणि बाभळीच्या काट्याने त्या ढलप्यावर हत्याराचे नांव कोरून तो त्या मुलाला दिला आणि सांगितलं, “हा ढलपा वाटेत कुठे न हरवता माझ्या बायकोला नेऊन दे आणि जेवणाबरोबर ती आणखी एक वस्तू तुला देईल ती सांभाळून इथे घेऊन ये.”
त्याप्रमाणे तो घरी जाऊन ते हत्यार घेऊन आला. मुलगा निरक्षर असला तरी डोक्याने तल्लख होता. त्यामुळे  वैद्याला नेमके काय पाहिजे ते त्याच्या बायकोला कसे समजले हा गहन प्रश्न त्याला पडला. त्याने धीर करून तो प्रश्न वैद्याला विचारला सुद्धा. वैद्याने उत्तर दिले, “अरे मी तुला एक लाकडाचा ढलपा दिला होता ना? तो तिच्याशी बोलला.”
त्याचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, “तो हातात धरून मी तुमच्या घरी गेलो तेंव्हा माझ्यासंगट तो कांही नाही बोलला.” वैद्याने सांगितले, “तुला खरं वाटत नाही कां? आता तू माझ्याबरोबर पुन्हा आमच्या घरी चल. वाटलं तर तू माझ्या आधी पुढे जा. आपण घरी जाऊ तेंव्हा तूच माझ्या बायकोला विचारून घे.”
घरी गेल्यावर लगेच त्या मुलाने वैद्याच्या बायकोला विचारले, “कांहो, आपल्या वैद्यबुवांना रानात काय पायजेल होतं ते तुमाला घरी बसल्या कसं कळलं?”
“अरे तू तो ढलपा आणून दिला नव्हतास कां? त्याच्याकडून समजलं.”
“त्यो ढलपा कसा बोलतो ते मला बी बगू द्या की. कुटं हाय त्यो?”
“अरे त्याचं काम झालं म्हणून बंबात टाकला मी तो जाळायला.” बाई म्हणाल्या.
“आरं द्येवा, मला तो पहायचा होता ना! त्यासाठी मी इथपत्तूर आलो. आता असला ढलपा पुन्यांदा कुटं मिळंल?” मुलगा रडायला लागला.
रानात राहणा-या त्या मुलाला इतके काकुळतीला आलेले पाहून वैद्यवुवांना त्याची दया आली. ते म्हणाले, “अरे एका ढलप्याचं काय घेऊन बसला आहेस? हे लाकूड, ही माती, हा दगड हे सगळे बोलू शकतात.”
“थट्टा करताय् व्हय् माजी? या दगड माती आन् लाकडाला बोलाया त्वांड हाये का ऐकाया कानं हायती?” तो अविश्वासाने बोलला.
वैद्यबुवा समजावणीच्या सुरात म्हणाले, “चल बाहेर, आपण अंगणात बसू म्हणजे मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो.” येतांना त्यांनी तांब्याभर पाणी आणून अंगणाच्या एका कोप-यात शिंपडले. त्यामुळे तिथली धूळ खाली बसून माती थोडी ओलसर झाली. वैद्यबुवा म्हणाले, “तुझं म्हणणं बरोबर आहे. ही जमीन आपल्याबरोबर तोंडानं बोलणार नाही की तिच्या बोलण्याचा आवाज आपल्या कानाला ऐकू येणार नाही. पण आपण जे बोलतो ते हिच्यावर हाताच्या बोटांनी लिहू शकतो आणि नंतर ते डोळ्यांनी वाचू शकतो.”
“म्हंजे वं काय?” साक्षरता काय असते तेच त्या बिचा-याला माहीत नव्हते.
“मी आत्ता दाखवतो तुला.” वैद्य म्हणाले. त्यांनी पुढे विचारले, “तुझं नांव काय आहे ते सांग बघू.”
उत्तर आले, “रामू ”
“तुझ्या घरी आणखी कोण कोण असतं ?”
“माजी आई, बापू, माझा भाऊ विनू आणि भन पारू ”
तो मुलगा जसजसे एक एक नांव सांगत होता तसतसे वैद्य ते हातातील काटकीने ओल्या जमीनीवर लिहीत गेले.
“फक्त आपण दोघेच या इथे आहोत ना? म्हणजे ही नांवे आणखी कुणीही ऐकलेली नाहीत. बरोबर?”
“हो.”
“जमीनीवर मी मारलेल्या या रेघोट्या तुला दिसताहेत ना? तू सांगितलेली सगळी नांवे त्यात मी लिहून ठेवली आहेत.”
वैद्यांनी आपल्या मुलाला हांक मारून घरातून बाहेर बोलावले. तो अंगणात आल्यावर त्याला जमीनीवर लिहिलेले वाचायला सांगितले. त्याने घडाघडा सगळी नांवे वाचून दाखवली.
वैद्य पुढे म्हणाले, “असं बघ, तू बोललास ते मला ऐकू आलं आणि मला समजलं. हो ना ?”
“हो.”
“तसंच या जमीनीवर मी लिहिलेलं या पोरानं वाचलं, म्हणजे इथं काय लिहिलंय् ते त्याला समजलं. म्हणजे आवाज न करता जमीन त्याच्याशी बोलली असंच नाही कां? ”
मुलाला खूप मजा वाटली. म्हणाला, “खरं हाय.”
वैद्यबुवा पुढे म्हणाले, “तुला दिलेल्या ढलप्यावर असंच मी जे लिहिलं होतं ते माझ्या बायकोनं वाचलं आणि मला काय पाहिजे होतं ते तिला समजलं. यात आणखी एक गंमत आहे. पण ती सांगायच्या आधी मी तुला चार नांवं सांगतो. ती नीट ऐकून घेऊन ध्यानात ठेव.”
“सांगा.”
“श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी ”
“ही कुनाची नांवं हायती ?”
“तुला कृष्ण भगवानाची गोष्ट माहीत आहे?”
“न्हाई बा. पन आमच्या पाड्यातला किसना बरीक लई द्वाड हाय.”
“अरे कृष्णाला लहानपणी गोपाळकृष्ण म्हणायचे. तो पण लहानपणी खूप खोड्या करायचा. आमच्या गांवातलं देऊळ पाहिलं आहेस ? त्यात भिंतीवर गोपाळकृष्णाचं चित्र काढलं आहे.”
“म्हंजी त्यो असा पाय वाकडा करून पावा वाजवीत उभा हाय तेच ना ? मला किसन देव म्हाईत हाय. फकस्त त्याची गोष्ट म्हाइती न्हाय.”
रामूने कृष्णाची ‘देहुडाचरणी वाजवितो वेणू’ मुद्रा करून दाखवली. शिकलेला नसला तरी त्याची निरीक्षणशक्ती चांगली होती.
“हां तोच कृष्ण. त्याची कोणती नांवं मी तुला सांगितली ते आता सांग बघू.”
“शिरीकिशन, आनखीन झालंच तर हरी, मुरारी पन व्हतं, आनखी काय व्हतं कां ?” 
वैद्यबुवा म्हणाले, “विसरलास ना? आणखीन एक नांव गोविंद पण होतं. अरे असंच होतं. बोललेलं आपण फक्त एकदाच ऐकतो आणि थोड्या वेळानं ते विसरून जातो. पण लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचता येतं. हे पहा तू सांगितलेलं इथं लिहिलं आहे, रामू, आई, बापू, विनू आणि पारू. बरोबर?”
“हो.”
“मी काढलेल्या या रेघोट्यांना अक्षरं म्हणतात. जे टिकून रहाते ते अक्षर असा त्याचा अर्थ आहे.”
“पण हे लिहिलेलं किती वेळ टिकणार आहे?” रामूने शंका काढली.
वैद्यबुवांनी उत्तर दिलं, “ते फार काळ टिकणार नाही. वा-याने धूळ उडेल, माणसांच्या व जनावरांच्या पावलाने ते पुसलं जाईल, एकादी पावसाची सर आली तर वाहून जाईल. पण जोपर्यंत ते खोडलं जात नाही तोपर्यंत वाटेल तितके लोक ते पुन्हा पुन्हा वाचू शकतील. तोंडाने तू बोललास, मी ऐकलं. इथंच ते संपून गेलं, पण लिहिलेलं थोडा वेळ तरी शिल्लक राहिलं.”
“पण त्याचा उपयोग काय?”
“खरं सांगू? नुसतं रोजच्या रोज रानावनात हिंडून, फळे मुळे गोळा करून व पशुपक्ष्यांची शिकार करून पोट भरायला त्याची कांही गरज नाही आणि ते उपयोगी पडत नाही. म्हणूनच तुझ्या घरी कोणी लिहायला वाचायला शिकलं नाही आणि त्यांचं त्याच्याशिवाय काम अडलं नाही. पण माझं तसं भागणार नाही. कारण आजारी माणसाला पाहिल्यानंतर त्याच्यासाठी औषध शोधत फिरून मला चालणार नाही. वेगवेगळ्या रोगांची लक्षणं आणि त्यावरची औषधं आधीच लिहून ठेवलेली असली, ती गोळा करून ठेवली असली तर मला ती गरज पडेल तेंव्हा लगेच देता येतात.”
“पण ते लिहिलेलं टिकणार कसं?”
“अरे मी तुला मातीवर लिहून दाखवलं ते फक्त बोलक्या ढलप्याचा अर्थ तुला कळावा एवढ्याचसाठी. तो तुला समजला, त्या लिहिण्याचे चं काम झालं. तसेच तुला दिलेला ढलपा माझ्या बायकोनं वाचला, त्यात लिहिलेली वस्तू माझ्याकडे पाठवून दिली. आम्हाला पाहिजे ते काम झालं. त्यानंतर ते टिकलं नाही तरी हरकत नाही. आपण ज्या वस्तूवर कांही तरी लिहितो ती वस्तू जितका वेळ टिकेल त्यापेक्षा त्याच्यावर लिहिलेलं जास्त वेळ टिकणार नाही. पण तोपर्यंत त्याचा उपयोग होत राहील.”
“म्हणजे कसं?”
“आता या आमच्या घराच्या भिंतीवर मी ‘श्रीगणेशायनमः’ असे लिहून ठेवले आहे. जाता येता जितक्या वेळा मला ते दिसेल तेंव्हा मी ते वाचेन आणि आपोआपच तितक्या वेळा माझा गणपतीला नमस्कार होईल. माझ्या औषधांची नांवे वगैरे या पोथ्यांमध्ये लिहून ठेवली आहेत. त्यासाठी मुद्दाम एका वेगळ्या प्रकारच्या झाडाची मोठी मोठी पाने कापून वाळवून ठेवतात, तसेच कुठल्या कुठल्या पानांचा रंगीत रस काढून त्याने ही अक्षरे काढली आहेत. माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी दिलेली ही जुनी पोथी त्यांनी मला दिली, म्हणजे ती किती टिकली आहे बघ. अशाच कांही पोथ्या त्यांनी लिहिल्या, आता मी लिहीतो आहे. माझी मुले, नंतर त्यांची मुले ती वाचतील. त्यावरून ते नव्या पोथ्या लिहितील. मात्र या सगळ्या पोथ्या जपून वापराव्या लागतात, काळजीपूर्वकरीत्या सांभाळाव्या लागतात. पण अशा त-हेनं एकदा लिहिलेली माहिती टिकून राहते. एवढेच नव्हे तर त्यात भर पडत राहील. मोठे मोठे राजे आपल्या यशाच्या कांही गोष्टी दगडावर छिणीने खोदून लिहवून घेतात नाही तर तांब्याच्या पत्र्यावर कोरून घेतात. त्या इकडे तिकडे पडल्या तरी त्यांना कांही होत नाही. तो राजा मरून गेल्यानंतर सुद्धा त्याने काय केलं किंवा काय सांगितलं हे नंतरच्या लोकांना पिढ्यान पिढ्या ते वाचून समजतं. तसेच रामाच्या, कृष्णाच्या आणि अशा अनेक देवांच्या गोष्टी पूर्वी होऊन गेलेल्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यांवर गाणी रचून ती लिहून ठेवली आहेत. आपले शास्त्रीबुवा त्या वाचून दाखवतात, त्याचा अर्थ समजावून सांगतात. ते वाचून व ऐकून आपल्याला शहाणपण येतं. पूर्वी कोणच्या प्रसंगी कोण कसे वागले होते ते समजतं. असे खूप उपयोग आहेत.”
“मला बी शिकवा की लिहायला.” रामू उत्याहाने म्हणाला.
वैद्य म्हणाले, “शिकवीन की, पण ते तुला एकदम येणार नाही. तू रोज माझ्याकडे शिकायला ये. हळू हळू तू सुद्धा लिहायला आणि वाचायला शिकशील, पण त्याला वेळ लागेल.”

**********************************************************************
व्यंकोबाच्या डोळ्यात मोतीबिंदू वाढला होता. त्याचं ऑपरेशन करणा-या डॉक्टरांने त्याला घरी पाठवतांना सांगितले, “तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झाले आहे. आता घरी जाऊन ही डोळ्यावरची पट्टी सोडलीस की तुला सगळं कांही स्पष्ट दिसायला लागेल. अगदी वाटलं तर तू पुस्तकसुद्धा वाचू शकशील.”
व्यंकोबा म्हणाला,”डॉक्टरसाहेब, हे तुमी लई ब्येस केलंत बगा. अवो आमच्या साळंतला मास्तर लई मारकुट्या व्हता म्हून म्या पयल्या दिसाला साळंतून घरी आलो तो पुन्यांदा कदीबी  तिकडं गेलोच न्हाई. इतके दिवस आंगठ्याचाच छाप मारत व्हतो.”
————————————————————————————————————————————-

बोलू ऐसे बोल – ८

आतापर्यंतची उदाहरणे पाहिल्यावर असे दिसते की व्यक्तिगत बोलणे असू दे किंवा व्यावसायिक, दोन्ही ठिकाणी कांही प्रमाणात तरी आपले संवाद आधीपासून ठरवून बोलले जातात. म्हणजे ते एक प्रकारचे नाटकच असते. भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रात त्यांनी सांगितलेल्या नवरसापैकी शांत, करुण, हास्य, रौद्र, आश्चर्य वगैरे निदान चार पांच रस सुद्धा नेहमी त्यात येतांना दिसतात. “हे जग हीच एक रंगभूमी आहे, इथे पात्रे प्रवेश करतात, आपापल्या भूमिका वठवतात व इथून प्रयाण करतात.” अशा अर्थाचे कांही तरी विलियम शेक्सपीअरने म्हंटले आहे असे म्हणतात. त्याने ते नक्की कधी, कुठे आणि कां म्हंटले आणि कुणी ते ऐकले ते कांही माहीत नाही. पण इतके लोक सांगतात त्या अर्थी त्याने ते म्हंटलेच असेल. आणि असो वा नसो, ते खरेच आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या जागी आपण वेगवेगळ्या भूमिका वठवतच असतो. लहानपणी खोड्या करणारा मुलगा मोठेपणी शिस्तप्रिय बाप होतो, तसेच ऑफीसात दरारा निर्माण करणारा अधिकारी घरात अतिशय प्रेमळपणे वागतांना दिसतो. जगाच्या रंगभूमीवर आपण आपल्या भूमिका वठवत असतोच तर प्रत्यक्ष रंगमंचावर जाऊन नाटकात काम करण्यात आणखी वेगळे काय आहे? बाहेरच्या जगात आपले संवाद बहुधा आपणच ठरवतो, क्वचित कधी ते दुसरे देतात. इथे ते नाटककाराने लिहिलेले असतात. वेशभूषाकार, केशभूषाकार, रंगभूषाकार वगैरे मंडळी आपले जे सोंग रंगवतात ते आपण आपल्या परीने नाटकातील आपला भाग होईपर्यंत वठवायचे असते. आपण बाह्य रूपाने नाटकातील पात्र झालो असलो तरी आंत आपणच असतो. म्हणून तर श्रीराम लागू, दत्ता भट आणि यशवंत दत्त या तीघांनी साकारलेले नटसम्राट वेगवेगळे लक्षात राहतात.

सभामंचावर उभे राहून भाषण करणे ही त्या मानाने सोपी गोष्ट आहे कारण तिथे अंतर्बाह्य आपण आपणच असतो. त्यातसुद्धा भाषण, प्रवचन, व्याख्यान, कथाकथन, कवितावाचन, प्रबंधवाचन वगैरे अनेक उपप्रकार असतात. सभेचा प्रकार व विषय यांच्या अनुसार ते बदलतात, पण आपले बोल श्रोत्यांपर्यंत पोचवणे हाच त्या सर्वांचा मुख्य उद्देश असतो. आपल्या ज्ञानाचा प्रसार करणे, बरे वाईट अनुभव सांगणे, चांगली शिकवण देणे यापासून ते श्रोत्यांच्या मनावर आपली छाप पाडणे, त्यांना कांही क्रिया करण्यास उद्युक्त करणे यापर्यंत अनेक कारणासाठी हा सार्वजनिक जागी बोलण्याचा खटाटोप केला जातो. याशिवाय व्यक्ती किंवा संस्थांचे वाढदिवस, वार्षिक सभा, स्नेहसंमेलन, कुणाचे अभिनंदन, सत्कार, निरोप देणे, श्रद्धांजली वाहणे वगैरे विविध प्रकारच्या कार्यक्रमात प्रसंगानुरूप बोलायची वेळ येते. त्या वेळी समोर बसलेले लोक पाहून त्यांना किती समजावे (वा समजू नये) हे ठरवून त्याप्रमाणे शब्दयोजना करावी लागते. एखाद्या तांत्रिक विषयावरील परिसंवाद असेल तर समोर सगळी तज्ञ मंडळी बसलेली असतात. त्यांच्यावर आपली छाप पाडण्यासाठी किचकट समीकरणे व जटिल शास्त्रीय प्रयोग त्यांच्या समोर माडून ते करतांनाच आपली तांत्रिक गुपिते मात्र ती न सांगता सुरक्षितपणे सांभाळायची असतात. त्याच विषयावर आपल्याच सहका-यांना प्रशिक्षण देत असतांना तो विषय सर्व विद्यार्थ्यांना मुळापासून समजेल अशा सोप्या भाषेत नेहमीच्या आयुष्यातील उदाहरणे देऊन सोपा करून सांगायचा असतो.

अनेक लोकांना सभेतील व्यासपीठावर उभे रहायचीच भीती वाटते. पहायला गेलो तर त्या ठिकाणी त्यांना कसला धोका असतो? ते नक्की कशाला घाबरतात? याचा विचार केला तर आपण अमक्या नटासारखे दिसण्यात देखणे नाही, आपल्याला त्याच्यासारखे ऐटबाजपणे चालता येणार नाही, तमक्या फर्ड्या वक्त्यासारखे अस्खलितपणे बोलता येणार नाही, त्यामुळे आपली फजीती होईल असे बहुतेक लोकांना वाटत असते असे दिसते. अशा प्रकारच्या तुलना दैनंदिन आयुष्यात सुद्धा होतच असतात, त्याला आपण तोंड देतोच ना? मग रंगमंचावर तरी वेगळी अपेक्षा कशाला करावी? “राजहंसाचे चालणे। भूवरी जालिया शहाणे। म्हणून काय आणिक कवणे। चालावेचि ना।।” असा परखड सवाल संत ज्ञानेश्वरांनी आठशे वर्षापूर्वी केला होता. राजहंसाने डौलदारपणे चालावे, बदकाने आपल्या संथ गतीने आणि कावळ्याने उड्या मारीत. कोणीही कुणाला हंसणार नाही. त्याच्या विपरीत कांही केले तर मात्र लोक “कौवा चला हंसकी चाल” म्हणून नांवे ठेवतील.

सगळ्या हंसांना तरी आपल्या श्रेष्ठत्वाची माहिती कुठे असते? हँन्स अँडरसन याच्या ‘अग्ली डकलिंग’ या सुप्रसिद्ध गोष्टीत व तीवर आधारलेल्या ‘एका तळ्यात होती’ या गाण्याच्या सुरुवातीला एका तळ्यात राहणा-या बदकांच्या सुरेख पिलांच्या कळपात एक वेडे कुरूप पिल्लू असते. बदकांच्या इतर पिल्लांहून वेगळे दिसणारे ते भोळे पिल्लू त्यांच्यात मिसळू शकत नाही, कोणी त्याला आपल्याबरोबर खेळायला घेत नाही, त्याच्याकडे बोट दाखवून सगळे फिदी फिदी हंसत असतात यामुळे ते दुःखी कष्टी असते. न्यूनगंडाने ग्रस्त झालेले असते. पण एक दिवस पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबावर एक चोरटा कटाक्ष टाकतांना त्याला आपल्या वेगळेपणाची जाणीव होते. ते आपली मान डौलाने ताठ उभारून बघते व स्वतःच्या देखणेपणावर खूष होते, पंखांची फडफड करून त्यातील शक्ती आजमावते. त्याचा आत्मविश्वास जागा होतो आणि गोष्टीच्या शेवटी आभाळात उंचावरून उडणा-या राजहंसांच्या थव्याबरोबर ते दूरदेशी उडून जाते. ही एक रूपककथा आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असे अनेक राजहंस लपलेले असतात. त्यांची त्यांना स्वतःला ओळख पटली की ते सुद्धा उंच उड्डाण करू शकतात. शांत, अबोल दिसणारी माणसे सुद्धा कधीकधी संधी मिळताच बरेच कांही मोलाचे बोल बोलून जातात.

बोलणे हा अथांग विषय आहे. त्याचे आणखी किती तरी पैलू आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर निवडणुकांचा प्रचार चालला असतांना त्यानिमित्ताने रोज मजेदार वक्तव्ये वर्तमानपत्रातून येत असतात. टीव्हीवर पाच मिनिटांच्या कार्यक्रमानंतर निदान दहा जाहिराती दाखवतात त्या पहातांना किंवा वाचतांना भरपूर मनोरंजन होते. सगळ्याच प्रकारच्या बोलण्यांचा या ठिकाणी आढावा घेता येणार नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी दिल्या जाणा-या ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ या शुभसंदेशावरून ही मालिका लिहिण्याची प्रेरणा माला मिळाली आणि कांही ऐकलेले बोल, कांही अनुभवाचे बोल आणि कांही वाचनात आलेले किस्से त्यात गुंफले.

बोलू ऐसे बोल (भाग ७)

देशोदेशीच्या राज्यप्रमुखांच्या भेटी होत असतात तशाच अनेकदा त्या मंत्र्यांच्या व सचिवांच्या पातळीवरही होत असतात हे आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो, टी.व्ही. वर पाहतो. त्यांचे शब्दशः संभाषण कधीच आपल्याला ऐकायला मिळत नाही पण जो वृत्तांत वाचायला मिळतो त्यावरून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते. ती म्हणजे जरी सर्व बोलणी मनमोकळेपणाने खेळीमेळीच्या वातावरणात झाली वगैरे लिहिले असले तरी त्या व्यक्तींना दिलखुलासपणे बोलणे फारसे शक्य नसते. त्या व्यक्ती ज्या राष्ट्राचे किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करीत असतात त्याच्या धोरणांशी सुसंगत असे, त्याचे हितसंबंध जपणारे बोलणेच करणे त्यांना भाग असते. त्या व्यक्तीच्या मनात जे काय विचार किंवा भावना असतील ते सगळे उघडपणे बोलण्याची मुभा त्याला नसतेच. त्या व्यक्तीचा बोलतांनाचा चेहेरा आपल्याला दिसतो पण तिच्या बोलण्यामागील विचार तिच्या राज्यसंस्थेचा असतो.

दोन व्यापारी संस्थांच्या पदाधिका-यांमधील चर्चासुद्धा सर्वसाधारणपणे तशाच स्वरूपाच्या होतात. इथेही ते लोक आपापल्या संस्थांचे प्रतिनिधित्व कसे करतात हे थोडे त्यांचे संभाषणावरून पाहू. मी एका कंपनीचा पदाधिकारी आहे आणि ‘क’ कंपनीच्या ‘प’ नावाच्या उच्च अधिका-या बरोबर माझी एक महत्वाची भेट ठरली आहे असे आपण कांही काळाकरता समजू. या भेटीमध्ये माझ्यातर्फे बोलायची तयारी मला करायची आहे.

सर्वप्रथम मी ‘क’ कंपनीची इत्थंभूत माहिती गोळा करीन. किती काळापासून कोठकोठल्या क्षेत्रात ती कंपनी काम करते आहे, तिचेकडे असलेले मनुष्यबळ, आर्थिक सामर्थ्य, वार्षिक उलाढाल, विशेष प्राविण्य, देशविदेशातील तिचे सहभागी, तिचा आतापर्यंतचा प्रवास, भविष्यातील तिच्या योजना वगैरेचा संक्षिप्त आढावा घेईन. त्यानंतर त्या कंपनीचे आपल्या कंपनीशी असलेले संबंध कसे आहेत ते पाहीन. कुठल्या क्षेत्रात ती आपली ग्राहक आहे, कुठे आपण तिचे ग्राहक आहोत, कुठे आपली स्पर्धा आहे आणि कोणत्या क्षेत्रात दोन्ही कंपन्यांना एकमेकींचे कांहीच देणेघेणे नाही ते नीटपणे समजून घेईन. आतापर्यंतचा उभयतांना एकमेकांचा आलेला अनुभव जाणून घेईन, सध्या हातात असलेली कामे कुठपर्यंत आली आहेत याची तपशीलवार माहिती मिळवीन, नजिकच्या भविष्यात तसेच पुढेमागे कधीतरी आपले कसे संबंध जडण्याचा शक्यता आहे व त्याचा आपल्या संस्थेला किती फायदा मिळण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेईन.

ही मूलभूत माहिती जमवत असतांनाच गेल्या महिन्या दोन महिन्यातील महत्वाच्या तसेच मनोरंजक घटनांची नोंद घेईन. त्यात उभय कंपन्यांच्या व्यवसायाशी निगडित अशा देशांतर्गत वा आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून ते ‘क’ कंपनी व ‘प’ ही व्यक्ती यांच्या बद्दल जे कांही कानावर येईल त्याचे टिपण ठेवीन. ‘प’ या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, शिक्षण, पूर्वानुभव, त्याच्या आयुष्यातील बढती, बदली, विवाह यासारखी एखादी चांगली घटना वगैरे समजल्यास चांगलेच.

अशा प्रकारे माहिती जमवत असतांनाच तिचा कसा योग्य प्रकारे वापर करायचा यावर विचार चालूच असेल. ‘प’ च्या जीवनांत कांही महत्वाची चांगली घटना घडली असेल तर त्याचे बरोबर हस्तादोलन करतांनाच त्याचे हार्दिक अभिनंदन करायचे, वाटल्यास त्याची पाठ थोपटायची. गंभीर आजार, अपघात यासारखा कांही दुर्दैवी दुःखद प्रसंग येऊन गेला असल्यास माफक सहानुभूति व्यक्त करून आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करायची इच्छा दाखवायची.

व्यक्तिगत जीवनानंतर त्याच्या कंपनीच्या बाबतीतल्या घटनांबद्दल बोलायचे. मोठी कंपनी असेल तर हमखास तिच्या बाबतीत कांही ना कांही बोलण्याजोगे असतेच. त्याबद्दल आपल्या सद्भावना प्रकट करायची हीच संधी असते. कोठल्या तरी क्षेत्रात तिने मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल अभिनंदन करण्याबरोबरच तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करायचे, एखाद्या ठिकाणी अपयश आले असेल तर त्याबद्दल हळहळ व्यक्त करून धीर द्यायचा, समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करायचा, त्यांनी केलेल्या सहाय्याबद्दन कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांच्या भावी योजना जाणून घेण्याची उत्सुकता दाखवायची, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि वाटलेच तर आपल्या अनुभवावरून शिकलेल्या दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगत संभाव्य धोके दाखवायचे.

कसल्याच गोष्टीबद्दल कांहीच समजले नसले तरीही ती कंपनी आपल्या कंपनीपेक्षा खूप मोठी असेल तर “आमचे केवढे अहोभाग्य म्हणून आम्हाला ही संधी मिळते आहे.” असे म्हणायचे आणि लहान असेल तर लहानपणाचे गुण गायचे. “आकारापेक्षा सुद्धा गुणवत्ता जास्त महत्वाची आहे नाही कां?” असे म्हणत त्याना आपल्या कंपनीच्या मोठेपणाची जाणीव करून दिली तरी चालेल. ती कंपनी आपल्या कंपनीच्या तुल्यबल असेल तर “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” म्हणायचे. ती जुन्या काळापासून चालत आलेली असेल तर, “आपल्या दीर्घकालीन अनुभवाचा लाभ आम्हालाही मिळावा.” अशी इच्छा प्रकट करायची आणि ती नवीन असेल तर, “नवे विचार, नव्या कल्पना, सळसळणारे चैतन्य ” वगैरे आज काळाची गरज आहे असे सांगायचे.

निदान एखाद्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या अगदी ताज्या घटनेचा उल्लेख करून त्याचे आपल्या व त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहेत, कोणत्या नव्या संधी उपलब्ध व्हायची शक्यता आहे, कोणती आव्हाने समोर उभी राहणार आहेत, देशाचे, जगाचे व मानवजातीचे भवितव्य वगैरेवर अघळ पघळ बोलायचे. हे करतांना आपल्या शक्तीस्थानांची मोघम कल्पना द्यायची, कमजोरींचा अवाक्षराने उल्लेख होऊ द्यायचा नाही. आपले पांडित्य, हुषारी, बहुश्रुतता वगैरेची एखादी चुणुक दाखवणे एक अस्पष्टशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुरेशी असते. मात्र त्याचे अवास्तव प्रदर्शन इथे करायच्या मोहात चुकूनही  पडायचे नाही. आपण केलेल्या पूर्वतयारीचा कोणाला थांगपत्ता लागू नये. सगळे कसे उत्स्फूर्त आणि सहज सुचल्यासारखे वाटले पाहिजे.

ही भेट घडवून आणण्यात आपण पुढाकार घेतला असेल तर असल्या प्रास्ताविकात जास्त घोळ न घालता शक्य तो लवकर मुख्य मुद्यावर यायचे आणि ही भेट त्या कंपनीने ठरवली असेल तर गप्पांमध्ये इकडे तिकडे यथेच्छ भरकटत राहून अधिकाधिक माहिती गोळा करायची. असली माहिती कधीतरी कुठेतरी उपयोगाला येते. आपले उभयतांमधील सर्व व्यवहार सुरळीतपणे चालत असतील तर सहसा अशा भेटीची आवश्यकताच नसते. बहुधा त्यात कांही तरी गुंते झालेले असतातच. ते हळुवारपणे सोडवणे हा त्या भेटीचा मुख्य उद्देश असतो आणि ते करतांना आपल्या कंपनीचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ते आपल्याला पहायचे असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल प्रशंसा करता करताच आपल्या अपेक्षा याहून अधिक असल्याचे सांगायचे आणि बिघडवलेल्या कामाबद्दल कानउघाडी करतांना आता यातून काय शिकायला हवे ते पाहू असे म्हणायचे. हातात घेतलेली कामे तत्परतेने कशी करता येतील याची चर्चा करतांना त्यांनी पूर्वी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करायची.

या भेटीमध्ये त्यांच्या बाजूने कोणत्या मागण्या वा सूचना केल्या जाणार आहेत याची आगाऊ माहिती जमवणे किंवा त्याबद्दल अचूक अंदाज बांधणे अत्यंत महत्वाचे असते. त्याबद्दल आधीपासूनच आपल्या संस्थेतील संबंधित लोकांबरोबर चर्चा करून आपले धोरण निश्चित करायचे असते. ते करतांना त्यांच्या कोणत्या संभाव्य सूचना स्वीकारायच्या आणि कोणत्या मागण्या नाकारायच्या हे ही गुप्तपणे ठरवून ठेवायचे असते. सर्वात सोपी गोष्ट त्यांनी मागण्याआधीच “आम्ही आपण होऊनच असे ठरवले आहे.” असे सांगून त्यांच्या बोलण्यातील हवा काढून घ्यायची. ते करतांना त्यात आपला केवढा मोठा त्याग आहे आणि त्यामुळे कोणाचे केवढे कल्याण होणार आहे ते रंगवून सांगायचे. दुसरी गोष्ट त्यांना सविस्तर सांगू द्यायची आणि “खरेच किती छान कल्पना आहे? आपल्याला तर बुवा सुचली नसती.” असे म्हणत मानायची. तिस-या सूचनेबद्दल “खरे तर हे फार कठिण आहे हो, पण तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही मान्य करू” असे म्हणत भाव खायचा. सर्वात महत्वाच्या चौथ्या प्रकारच्या सूचनांवर मात्र आपल्या अटी घालायच्या, देवाणघेवाणीनेच त्या अंमलात आणणे शक्य होईल असे निक्षून सांगायचे व त्यावर घासाघीस करायची.

ज्या मागण्या मान्य करायच्याच नसतील त्यातली एखादी मागणी “तुमच्या कडून कधी अशी अपेक्षाच केली नव्हती हो.” असे म्हणत मोडीत काढायची. दुस-या मागणीच्या अंमलबजावणीत केवढे प्रचंड धोके आहेत त्याचे विदारक दृष्य रंगवायचे. तिसरी मागणी “तशी छान कल्पना आहे, पण काय आहे की पूर्वीचा काही अनुभव नाही. उगाच कांही तरी नसता घोळ व्हायचा. त्यापेक्षा आहे तेच राहू द्यायला काय हरकत आहे?” असे म्हणत टोलवायची. आणि चौथ्या मागणीच्या बाबतीत, “तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे, कोणालाही पटेल, पण काय करणार? आमचेही हांत बांधलेले असतात. आम्ही काय करतो हेच बघायला किती तरी लोक टपून बसलेले असतात. आपण अगदी शुद्ध हेतूने कांही केले तरी तो लोक त्याचा नको तसा विपर्यास करतात, त्यावर गोंधळ निर्माण होतात. त्यामुळे आम्हाला कांही गोष्टी मनात असून सुद्धा करता येत नाहीत बघा.” वगैरे सांगत आपली असमर्थता दाखवायची.

आपले जवळ जवळ ९० टक्के संवाद आधीच ठरलेले असतात. त्यात कोणत्या वेळी कोणते दाखले द्यायचे, कोटेशन्स सांगायची, विनोद करायचे वगैरेंची यादी बनवलेली असते. इतकेच नव्हे तर विरुद्ध बाजूचेही ५० ते ६० टक्के संवाद अपेक्षित असतात. त्यातून आयत्या वेळी एखादा नवीन मुद्दा निघाला तर आपल्या एखाद्या मठ्ठ, तोत-या किंवा बोलघेवड्या सहाय्यकाला त्यासंबंधी विचारायचे. मठ्ठ किंवा तोत-याला तो मुद्दा समजावून सांगता सांगता विरुद्ध बाजूच्या लोकांची दमछाक होईल आणि वाचाळ माणूस “त्याचं काय आहे, खरं सांगायचं झालं तर, अशा प्रकारे विचार केला तर आणि तशा बाजूने पहायला गेलं तर” वगैरेची लांबण लावत पुरेसा वेळ खाईल तोपर्यंत आपण ती सूचना कोणच्या प्रकारात बसते ते ठरवून घ्यायचे. आणि नाहीच जमले तर, “या विषयावर असा तडकाफडकी निर्णय घेतलेलं बरं दिसणार नाही. आमच्याकडे त्यातले तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घ्यायला हवा, शिवाय आणखी कुणावर काय परिणाम होईल ते जरा तपासून पहायला हवं.” वगैरे सांगत एक नवीन प्रकार निर्माण करायचा.

आपण अशा प्रकारे जय्यत तयारी केलेली असली तर समोरचा माणूस कितीही टिपटॉप कपडे घालून आलेला असला, फाड फाड इंग्रजी बोलत असला किंवा मुलायम अदबशीरपणे वागत असला तरी हरकत नसते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर प्रभाव पाडूच द्यायचा नाही. तो आत्मस्तुती करणारा असेल तर फारच उत्तम. त्याच्या आत्मप्रौढीला हवा देत रहायचे आणि तो भरकटत बाजूला गेला की आपल्याला हव्या त्या मुद्यावर खेचून आणायचे. त्यानेही आपल्यासारखीच पूर्वतयारी केली असेल तर मात्र मुलाखतीचा खेळ छान रंगतो. निदान दोन चार बाबतीत आपले व त्यांचे हितसंबंध जुळत असतात, त्यावर एकमत होऊ शकते. ते करून “ही चर्चा अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात झाली, अनेक गैरसमज दूर झाले, कांही गोष्टींवर एकमत झाले. नव्या वाटा निर्माण झाल्या. प्रगतीचा मार्ग मोकळा झाला.” वगैरे विधाने करायला आपण मोकळे.

(क्रमशः)

बोलू ऐसे बोल (भाग ६)

व्यक्तिगत आयुष्यामध्ये बोलण्याचे कांही नमूने आपण पहिल्या पांच भागात पाहिले. आता थोडेसे व्यावसायिक व सामुदायिक जीवनातील बोलणे पाहू. हल्ली अनेक वेळा आपल्या घरातील दूरध्वनीची किंवा खिशातील भ्रमणध्वनीची घंटी वेळी अवेळी किणकिणते. “आत्ता या वेळी कुणाला आपली आठवण झाली?” असे म्हणत चडफडत आपण तो कानाला लावतो आणि त्यातून अतिशय मुलायम स्वरात कोणीतरी बोलते, “मी अमक्या अमक्या बँकेतून सौदामिनी बोलते आहे आपण मिस्टर तमुकच ना?”
मनात थोडेसे विरघळलेले असलो तरी आवाजात शक्य तेवढा तुटकपणा आणीत आपण म्हणतो. “हो, पण आपलं काय काम आहे?”
“त्याचं असं आहे की आमच्या बँकेनं एक खास योजना आंखली आहे आणि त्यांनी काढलेल्या भाग्यवान विजेत्यांच्या यादीत तुमचं नांव निघालंय्. मग तुम्ही त्या योजनेत सहभागी होणार ना?”
‘भाग्यवान’ हा शब्द ऐकून आपल्या तोंडाला थोडं पाणी सुटलेलं असतं. आपला आवाज थोडा सौम्य करीत आपण विचारतो,
“कसली नवीन योजना आहे?”
“आम्ही तुम्हाला एक नवीन क्रेडिट कार्ड द्यायचं ठरवलं आहे. ते वापरून आपण अमुक, तमुक, तमुक, तमुक, इतक्या गोष्टी सोयिस्कररीत्या करू शकाल. तुम्ही नुसतं हो म्हंटलंत की लगेच आमचा माणूस तुमच्याकडे एक कागद घेऊन येईल. तुम्हाला फक्त त्यावर एक सही करायची आहे. बाकी सगळं कांही तो भरेल. तुम्ही कुठं बरं राहता?”
आपला आवाज पुन्हा ताठर होतो, “अहो मला क्रेडिट कार्डचे सगळे फायदे माहीत आहेत. मी कधीपासूनचा ती वापरतो आहे. आणखीन एका कार्डाची मला गरज नाही.”
“हो कां? कुठली कार्डे? पण बघा, आमचं कार्ड की नाही अगदी नवीन निघालंय्. या पूर्वी कुणीही कधीही दिल्या नसतील इतक्या सुविधा आम्ही देणार आहोत. शिवाय अगदी मोफत आपला विमा सुद्धा उतरवून देणार आहोत. एकदा वापरून तर बघा. पुन्हा तुम्ही कुठल्याही जुन्या कार्डाकडे कधी वळणार नाही.”
“मला नको आहे बाई तुझं कार्ड. एकदा सांगितलेलं समजत नाही का?” आता आपण वैतागून एकेरीवर येऊन दम देतो.
आपली मनःशांति यत्किंचितही ढळू न देता ती म्हणते, “कांही हरकत नाही. निदान तुम्हाला खर्चासाठी कांही पैसै हवेच असतील ना? आमची बँक तुम्हाला अगदी सवलतीच्या दराने कर्ज देईल. तुम्ही ते तुम्हाला पाहिजे तितक्या काळात हप्त्या हप्त्याने परत फेडू शकता. तुमच्या नांवाने एक लाख रुपयांचा चेक लिहून तयार ठेवला आहे. तुम्ही फक्त हो म्हंटलंत की लगेच ….” पुढची रेकॉर्ड आणखी एकदा ऐकवली जाते.”
“अहो मला खरच सध्या पैसे बैसे नको आहेत. ते लागतील तेंव्हा मी येईन तुमच्याच बँकेकडे येईन बरं. आणखी कांही?” आपण काकुळतीने म्हणतो.
आपल्या आवाजातील मार्दव जराही कमी होऊ न देता ती शेवटचा प्रयत्न करते, “बरं बाई. पण ही स्कीम कांही तेंव्हापर्यंत चालणार आहे की नाही कुणास ठाऊक. त्यापेक्षा आताच कर्ज घेऊन ठेवलेत तर ते तुम्हाला कधीही उपयोगी पडेल. नाही कां?”

आपण वैतागून कांहीही उत्तर न देता रिसीव्हर खाली ठेवतो. आता या मुलीला आपल्याबद्दल कांही खरी आपुलकी कुठे वाटत असते? तिचा आणि आपला कसलाही संबंध नसतो. तिचे खरे नांवसुद्धा आपल्याला कधी कळत नाही. इतकेच नव्हे तर तिचा त्या बँकेशीही कांही संबंध नसतो. ती एखाद्या कॉल सेंटरवर काम करीत असते आणि तिला मिळालेले दूरध्वनीक्रमांक फिरवून त्यावर प्रत्येकाशी तेच ते गळेपडूपणाचे शब्द ती बोलत असते. ही ‘साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी’ पण तिचा ‘बोलविता धनी दुसराची’ असतो. तिला फक्त तसे गोड बोलण्याबद्दलच पगार मिळत असतो. तिने दाखवलेल्या आमिषांना किंवा दिलेल्या आश्वासनांना काडीइतका अर्थ नसतो हे त्यावर विश्वास ठेवणा-यांना कालांतराने समजते.

यावरून एक खूप जुना किस्सा आठवला. एक नवा भाट एका राजाच्या दरबारात गेला. त्याने तोंड फाटेपर्यंत त्या राजाची स्तुतिसुमने भरभरून गाऊन त्याला प्रसन्न केले. राजाने त्याला सांगितले, “वा! आज आम्ही तुझ्यावर खूष झालो आहोत. उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा.” सगळे दरबारी लोक त्यावर गालातल्या गालात हंसले. आपल्या कवित्वाच्या प्रभावावर तो भाट भलताच खूष झाला. दुस-या दिवशी मिळणार असलेल्या हजार मोहरांमधून आपण काय काय घ्यायचे याची शेख महंमदी स्वप्ने पहात त्याने ती रात्र कशीबशी घालवली. दुसरे दिवशी सकाळीच तो कोषाध्यक्षाकडे जाऊन पोचला. कोषाध्यक्षाने सरळ कानांवर हांत ठेवले. तो भाट कोषाध्यक्षाची तक्रार घेऊन चिडून आरडाओरड करीत पुन्हा राजदरबारात गेला. राजाने विचारले, “काय झाले?” त्याने तक्रारीच्या सुरात सांगितले, “महाराज, तुम्ही देऊ केलेले बक्षिस हा तुमचा माणूस मला देत नाही आहे.” महाराज म्हणाले, “मी कधी तुला बक्षिस देऊ केले होते? नीट आठवून पहा. मी फक्त तुला एवढेच सांगितले होते की उद्या तू कोषाध्यक्षाकडून हजार मोहरा घेऊन जा. तू हजार शब्द उच्चारून मला खूष केलंस, मी दोन वाक्ये बोलून तुला खूष केलं. मी तर तुझं काव्य लगेच विसरूनसुद्धा गेलो होतो तरी तू रात्रभर खुषीत होतास ना! मग फिटान् फिट झाली तर. आता तू जाऊ शकतोस.”

टेलीफोनवर आजकाल आणखी एका प्रकारचे मंजुळ स्वर वाढत्या संख्येने ऐकू येऊ लागले आहेत. कोठल्याही मोठ्या संस्थेच्या मुख्य कार्यालयाला फोन लावला की लगेच, “अमक्या अमक्या स्थानावर आपले स्वागत आहे.” एवढेच गोड आवाजात उच्चारलेले शब्द ऐकू येतात आणि सतार वाजायला लागते. कांही काळाने “आपले कुणाकडे कशा प्रकारचे काम आहे?” एवढा एक प्रश्न ऐकू येतो आणि त्याचे उत्तर देताच पुन्हा सतार वाजायला लागते. नंतर तिसरा एक आवाज कानावर येतो आणि आपण वाट चुकून भलत्याच एक्स्टेंशनवर आला असल्याची माहिती देऊन फोन बंद करतो. कांही स्थळांवर तर आपल्याला सूचनामागून सूचना मिळत राहतात. “आपल्याला हिंदीमधून माहिती पाहिजे असेल तर क्रमांक १ चे बटन दाबा, इंग्रजीमधून हवे असेल तर २ चे बटन दाबा.” “आपला फोन सपूर्णपणे डेड झाला असेल तर अमुक बटन दाबा, खरखर येत असेल तर तमुक” किंवा “आपल्याला गाडीचे आगमनाची माहिती हवी असेल तर गाडीचा क्रमांक टाईप करा, आरक्षणासंबंधी विचारणा असेल तर पिनकोडचे सारे आंकडे दाबा” वगैरे वगैरे. ही सगळी माहिती जय्यत तयार ठेऊन फोन करणारे धन्य ते लोक! “आजकाल किती सुधारणा झाली आहे?”, “सगळी माहिती कशी पटापट मिळायला लागली आहे?” वगैरे त्यांनी केलेली भलावण ऐकून तर आपल्या मनात जास्तच न्यूनगंड निर्माण होतो. कारण आपल्याला सजीव माणसांबरोबर संभाषण करण्याची संवय असते. आपल्याला काय पाहिजे ते तो समजून घेईल व त्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा असते. कदाचित अधिक कार्यक्षम अशा पण निर्जीव यंत्राला आपली काडीइतकी पर्वा करण्याची गरज नसते. त्याला जसे प्रोग्रॅम केले असेल तसे ध्वनि ते एकामागून एक काढत जाते आणि बंद होते. मानवी आवाज ऐकू आला तरी ते कोणाचेही ‘बोल’ नसतातच. ते असतात फक्त विशिष्ट ‘ध्वनि’.

ऑफीसांमधील टेलीफोन्सचे असे यांत्रिकीकरण होण्याच्या पूर्वीची एक गोष्ट आठवते. अजूनही भारतात संपूर्ण यांत्रिकीकरण झालेले नाही. बहुतेक ठिकाणी टेलीफोन ऑपरेटर हे एक खास पद असते. अनेक ठिकाणी त्याची रिसेप्शनिस्ट वा डिस्पॅच क्लार्क यांचेबरोबर सांगड घातलेली असते. पण ते पद अजून नामशेष झालेले नाही. मधुर वाणी आणि संभाषणचातुर्य हे गुण ते काम करण्यासाठी आवश्यक समजले जातात. मी पूर्वी एक लघुकथा वाचली होती. त्यातील कथानायिका रंगाने काळी सांवळी आणि बेढब अंगाची असते. टेलीफोन ऑपरेटरची नोकरी मिळवण्यासाठी ती अनेक ठिकाणी अर्ज करते. तिच्या पात्रतेनुसार तिला ठिकठिकाणी मुलाखतीसाठी बोलावणीसुद्धा येतात. पण प्रत्येक वेळी नोकरी मिळण्यात तिचे रूप आडवे येत असते. शेवटी एका जागी ती मुलाखतीसाठी वेळेवर पोचलेली असते, पण तेथे येत असलेल्या इतर सुस्वरूप उमेदवारांना पाहून ती बाहेरच थांबते व जवळच्या एका सार्वजनिक टेलीफोन बूथवरून मुलाखत घेणा-या प्रमुख व्यक्तीला फोन करून “कांही अपरिहार्य कारणाने आपल्याला यायला कदाचित थोडा उशीर होण्याची शक्यता आहे” असे आपल्या मंजुळ आवाजात व आर्जवी स्वरात सांगून याबद्दल त्यांची क्षमा मागते व तिला मुलाखतीसाठी सर्वात शेवटी बोलावण्याची विनंती करते. या वेळेस मात्र तिचा आवाज तिच्या आधी पोचलेला असल्यामुळे मुलाखत घेणा-याला तो पसंत पडलेला असतो व त्यामुळे तिला ती नोकरी मिळते.

बोलू ऐसे बोल (भाग ५)

गोड बोलत बोलत आपला उद्देश साध्य करण्यासाठी लोक बोलतांना काय काय तरी युक्त्या लढवतात? चिंतोपंत त्याच्या चिकटपणाबद्दल प्रख्यात होते. विशेषतः आपली कुठलीही वस्तु इतर कुणाला वापरू देणे त्यांना अजीबात आवडत नसे. त्यांचे जवळच राहणारे बंडोपंत त्यांच्या बरोबर उलट स्वभावाचे होते. ‘हे विश्वचि माझे घर’ असे समजून त्यांचा सर्वत्र संचार असायचा, आपल्याकडील सगळ्या कांही वस्तू ते कुठल्याही गरजवंताला निस्संकोचपणे वापरायला देत. तसेच इतर कुणाचीही कुठलीही वस्तु हक्काने वापरायला त्यांना मुळीच संकोच वाटत नसे.

एके दिवशी सकाळीच बंडोपंतांना स्वतःच्या घराकडून निघून आपल्या घराच्या दिशेने येत असतांना चिंतोपंतांनी खिडकीतून पाहिले. आता ही ब्याद आपल्या घरी असलेल्या सगळ्या वस्तु पाहणार आणि त्यातील कांही तरी नक्की मागून नेणार. मैत्री आणि शेजारधर्म यामुळे त्यावर आपल्याला नाही म्हणता येणार नाही या विचाराने ते व्यथित झाले. आज आपण त्याला कांही द्यायचे नाही, त्याने एकादी वस्तु मागितलीच तर ती आपल्याकडे नाही किंवा कुणाला तरी आधीच दिली आहे असे सांगायचे असे त्यांनी ठरवले. ती त्यांच्या नजरेलाच पडू नये यासाठी त्याला घरातच घुसू द्यायचे नाही या विचाराने ते लगबगीने बाहेर अंगणात आले. तिथेच पडलेले एक खुरपे हांतात घेऊन एका कोप-यात जमीन उकरू लागले.

अपेक्षेप्रमाणे बंडोपंत बाहेरचे गेट उघडून अंगणात आले. त्यांनीसुद्धा चिंतोपंतांच्या हालचाली नजरेने टिपल्या असाव्या. आल्या आल्या विचारले, “काय चिंतोपंत, आज सकाळी सकाळीच बागकामाला सुरुवात केली वाटतं?”

चिंतोपंतांनी सांगितलं, “हो ना, बरेच दिवसांपासून हे काम पडून राहिलं होतं. आज विचार केला की गवत आणि तण उगवले आहेत ते जरा काढून टाकावेत आणि फुलझाडांच्या खालची माती खणून थोडी भुसभुशीत करावी, अहो बाग लावायची म्हणजे काय कमी कामं असतात कां?”

बंडोपंत, “हे मात्र खरं हं. तुम्ही आहात म्हणून हे सगळं व्यवस्थित करता हो. मला पण तुमच्याकडून हे काम थोडं शिकायचंय्. आणि आमची काय संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणतात ना त्यातली गत. अहो साधं खुरपं सुद्धा नाही बघाआमच्याकडे. खरंच तुमचं खुरपं किती छान आहे हो ? अशी खुरपी तर आजकाल कुठे पहायला सुद्धा मिळत नाहीत.”

चिंतोपंत, “अहो म्हणून तर आम्ही हे खुरपं मुद्दाम गांवाकडच्या लोहाराकडून खास बनवून घेतलंय् आणि व्यवस्थित संभाळून ठेवलंय्. मी कधी ही ते दुस-या कुणाच्या हातात देत नाही.”

बंडोपंत, “पण मला मात्र तुम्ही मुळीच नाही म्हणणार नाही याची खात्री आहे. वाटलं तर अगदी तुमच्या नजरेखाली ते काळजीपूर्वक चालवीन. म्हणजे काय आधी मी फक्त दहा पंधरा मिनिटे चालवून बघेन. जमतय् असं वाटलंच तर एक दोन दिवसात मी बाजारातून मिळेल ते नवीन खुरपं आणीनच ना! आता ते तुमच्या खुरप्याइतकं चांगलं असणार नाही म्हणा, पण आपलं काम तर भागून जाईल. नाही कां?”

चिंतोपंत,” पण आज तर मी दिवसभर माझ्या बागेत काम करणार आहे. मला मुळीसुद्धा वेळ नाही.”

बंडोपंत, “पण मध्ये थोडी विश्रांति घ्यायला, चहा प्यायला तर उठाल ना?”

चिंतोपंत, “छे! छे! आज काम म्हणजे काम! चहा ही इथेच बसून घेणार आणि वाटलं तर जेवणसुद्धा!”

बंडोपंत, “थोडं फिरायला जाणार असाल. झालंच तर भाजी आणायची असेल, वाण्याकडचं सामान आणायला जाणार असालच ना?”

चिंतोपंत, “आज कांही म्हणजे कांही नाही. सगळं सामान कालच आणून ठेवलंय् आणि इथेच मोकळ्या हवेत काम केल्यावर पुन्हा बाहेर मुद्दाम फिरायला जायची काय गरज आहे?”

बंडोपंत, “म्हणजे आज दिवसभरात तुम्ही कुठेही जाणार नाही, इथेच बसून काम करीत राहणार हे अगदी नक्की तर?”

चिंतोपंत, “नक्की म्हणजे काय अगदी काळ्या दगडावरची रेघ समजा.”

बंडोपंत, “अहो त्याचं काय आहे की मला थोडं स्टेशनपर्यंत जाऊन यायचं होतं. तसं ते अंतर जरा लांबच आहे, कसं जावं ते कांही समजत नव्हतं. तुम्हाला विचारावं तर वाटायचं उगाच तुमचा खोळंबा व्हायचा. आता तुम्हाला कुठं जायचंच नाही म्हंटल्यावर हे मात्र फारच चांगलं झालं हं. तेंव्हा थोड्या वेळासाठी तुमची ही सायकल वापरायला घेऊ ना?”

बोलू ऐसे बोल (भाग ४)

कसे बोलावे यावर “सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । प्रियम् च नानृतम् ब्रूयात् एवं वदति पंडितः । ”
असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे माणसाने खरे बोलावे आणि लोकांना रुचेल असे बोलावे. कटु सत्य सांगू नये आणि खोटेही बोलू नये. पण अनेक वेळा अशी परिस्थिती येते की हा उपदेश पाळणे केवळ अशक्य आहे असे वाटते.

आमच्या देशपांड्यांचा आप्तेष्ट आणि मित्रपरिवार इतका मोठा आहे की एका लग्नसराईच्या महिन्या दीड महिन्यात त्यांना १५-२० निमंत्रणे आली. आता इतक्या सगळ्या जागी कसे काय जाणार ? राजाभाऊंच्या सचिनचे लग्न तर दूर भिवंडीला होते. एरवी त्यांचे आपसांत फारसे जाणे येणेही नव्हते. त्यामुळे देशपांड्यांनी या लग्नाला जायचा कंटाळा केला आणि त्या ऐवजी शिवाजी मंहिरात एक झकास मराठी नाटक पाहून रविवारची सुटी सत्कारणी लावली. जोशीबुवांनीसुध्दा नेमके तेच केले.

त्यानंतर दोनतीन दिवसांनी देशपांड्यांना रस्त्यात कुठेतरी कुलकर्णी भेटले. ते तर सचिनचे सख्खे मामा. स्पष्टपणे खरे बोलून उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून देशपांड्यांनी सांगून दिले, “अहो, मिसेसला एकदम थंडी वाजून जोरात ताप भरला आणि डॉक्टरकडे न्यावं लागलं. त्यामुळे तुमच्या सचिनच्या लग्नाला यायला कांही जमलं नाही.” योगायोगाने कांही कामानिमित्त मिसेस देशपांड्यांचे मिसेस कुलकर्ण्याशी टेलीफोनवर बोलणे झाले. त्यात त्यांनी मिस्टर देशपांडे अचानक टूरवर गेल्याचे निमित्त सांगितले. हे क्षुल्लक संभाषण एकमेकांना सांगावे असं दोन्ही पतिपत्नींना वाटले नाही.

त्यानंतर सातआठ दिवसांनी पाटलांच्या गिरीशच्या लग्नात दोन्ही दांपत्ये भेटली. मिसेस कुलकर्ण्यांनी मिस्टर देशपांड्यांना त्यांचा प्रवास कसा झाला असे विचारले तर मिस्टर कुलकर्ण्यांनी मिसेस देशपांड्यांच्या नाजुक प्रकृतीची विचारपूस केली. दोघेही गोंधळलेल्या स्थितीत असतांनाच जोशी मंडळी तेथे आली. जोशीबुवांना कुणासमोर काय बोलावे याचा पोच तसा कमीच. आज तर त्यांच्या अंगात सत्यवादी हरिश्चंद्राचा संचार झाला होता. त्यांनीच सुरुवात केली, “हा हॉल किती छान आहे नाही? नाही तर आपल्या त्या कंजूस राजाभाऊंनी कुठलं आडगांवातलं कार्यालय शोधून काढलं होतं? नाहीतरी असल्या खडूस लोकांच्या घरच्या कार्याला कोण जातंय् म्हणा? आम्ही तर मस्तपैकी एक मराठी नाटक पाहिलं.” एवढ्यावर न थांबता देशपांड्यांचेकडे अंगुलीनिर्देश करीत त्यांनी बॉम्बस्फोट केला. “हे लोकसुध्दा तिथंच आलेले.”

अर्थातच कुलकर्ण्यांनी रुद्रावतार धारण करून सर्वांनाच धारेवर धरले. केवळ त्यांना दुखवू नये म्हणून देशपांडे खोटे बोलले आणि गोत्यात आले. तर स्पष्टपणे खरे बोलल्यामुळे जोशांची खरडपट्टी झाली. म्हणजे दोन्ही पर्याय चुकीचेच. मग माणसाने करावे तरी काय?

हे नाट्य घडत असतांनाच गोडबोल्यांनी एन्ट्री घेतली, “अरे वा! कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी एकत्र! अलभ्य लाभ!” पण कुणीच टाळी देण्याच्या मूडमध्ये नव्हते. जोशांनी खंवचटपणेच  विचारलं, “सचिनच्या लग्नाला तुम्ही गेलाच असाल ना?” “सचिन म्हणजे आपल्या राजाभाऊंचा ना? अहो राजाभाऊ म्हणजे अगदी राजा माणूल बरं. एवढा मोठा माणूस, पण कणभरसुध्दा आढ्यता नाही हो त्यांच्या वागण्यात! त्यांनी आठवणीनं प्रत्यक्ष फोन करून आम्हाला अगत्यानं बोलावलं, तेंव्हा अगदी धन्य वाटलं हो! लग्नात तर त्यांनी धमाल उडवून दिली असणार. किती हौशी स्वभाव आहे ना त्यांचा? खूप लोक आले असतील ना? कोण कोण आले होते हो?”
“श्रीकाका, सुधामावशी, करुणा, कविता …” सौ.कुलकर्णी सांगायला लागल्या. पण त्यांना मध्येच अडवत जोशांनी शेरा मारला, “म्हणजे गोडबोले, तुम्ही नव्हतातच!”
“अहो आम्ही नक्की जाणारच होतो. म्हटलं त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. मुख्य म्हणजे तात्यासाहेबांची भेट होईल. अहो भेट काय म्हणतोय मी ? दर्शन  घडेल म्हणायला हवं. अहो काय त्यांची विद्वत्ता? वाक्यावाक्यागणिक संस्कृत श्लोक, ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग आणखी कुठकुठली इंग्रजी कोटेशन्स यांची नुसती लयलूट! आता त्यांचं वय ऐंशीच्या घरात तरी असेलच. पण स्मरणशक्ती अगदी तल्लख बघा…” गोडबोले सांगत होते. त्यांच्या गाडीला ब्रेक लावत जोशांनी विचारलं, “अहो,सचिनच्या लग्नाला तुम्ही का गेला नव्हता ते सांगत होतात. त्याचं काय झालं?”
“त्यांना नसेल सांगायचं तर जाऊ द्या ना.” देशपांड्यानाही या विषयातून बाहेर पडायचंच होतं.
“छे हो! ते एवढ्या आपलेपणानं विचारताहेत तर सांगायलाच हवं. आपल्या लोकांबरोबर कशाला लपवाछपवी करायची? गोडबोल्यांनी उत्तर दिले. “तसं तुम्हा लोकांना सगळं माहीतच आहे म्हणा. आपलं मुंबईचं काय लाईफ आहे? नुसतं ऑफीसला जाऊन परत घरी येण्यातच अख्खा दिवस संपून रात्र होते. त्याशिवाय घरी, सोसायटीमध्ये आणि ऑफीसात किती प्रकारच्या इतर एक्टिव्हिटीज् सतत सुरू असतात त्यालाही वेळ द्यावा लागतो. शिवाय येणारे जाणरे, पाहुणे रावळे असतात…”
“पण सचिनचं लग्न मुद्दाम रविवारी ठेवलं होतं, तुमच्या राजाभाऊंनी.” जोशांनी शब्दात पकडायचा प्रयत्न केला.
“मी तेच तर सांगत होतो. इतर दिवस कसे पहाता पहाता निघून जातात, त्यामुळे रविवारी करायच्या कामांची ही मोठी यादी तयार होते. कशाची दुरुस्ती, कुठली चौकशी, कसलं बुकिंग, कोणची खरेदी वगैरे वगैरे. त्यशिवाय लग्नं, मुंजी, बारशी, वाढदिवस, सत्कार किंवा निरोप समारंभ वगैरे कांही ना कांही कार्यक्रम होतच असतात. रविवार तरी अगदी मोकळा कधी असतो?” गोडबोले.
“मागच्या रविवारी त्यातला कुठला प्रॉब्लेम आला?” जोशांची चिकाटी वाखाणण्याजोगी होती.
“छे हो, प्रॉब्लेम कसला आलाय्? हे सगळं आपण आपल्याच हौसेनं करतो आणि त्यातून आपल्यालाच कांही ना कांही मिळत असतं. मग उगाच त्याला प्रॉब्लेम कशाला म्हणायचं? आता कुठल्या दिवशी काय काय करायचं ठरवलं होतं, त्यातलं किती झालं नि किती राहून गेलं हे कुठवर लक्षात ठेवायचं हो? त्यापेक्षा आज काय करायचं ते जास्त महत्वाचं. म्हणून दुसरी सगळी कामं बाजूला ठेऊन आज इथंच यायचंच असं ठरवलं. अहो त्यामुळे  सगळ्यांच्या भेटी होतात. आणि इथल्या वातावरणातच किती चैतन्य भरलंय्? त्यातून एक प्रकारची एनर्जी मिळते असं वाटतं ना? खरंच तुम्ही लोक कुठला ज्यूस घेणार? ऑरेंज, ग्रेप्स का पाईनॅपल? फॉर ए चेंज टोमॅटो ट्राय करणार? मी वेटरला पाठवून देतो हं.” असं म्हणत गोडबोले अंतर्धान पावले.
कुणीतरी लाऊडस्पीकरवर गाणं लावलं होतं, “बोला, अमृतं बोला, शुभसमयाला गोड गोड बोला”

.  . . . . .  . . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

बोलू ऐसे बोल (भाग ३)

आमच्या बिल्डिंगमध्ये एक बाई रहायच्या, त्यांनाही असेच सरसकट सगळ्यांना हुकूम सोडायची संवय होती. कदाचित लहानपणी लागलेली ही संवय अजून गेली नव्हती. तशा त्या मनाने चांगल्या होत्या, त्यांच्या अंगी नानाविध कलागुण होते, कोणालाही कसलीही मदत करायला त्या सदैव तत्पर असायच्या. यामुळे इतर लोक त्यांची हडेलहप्पी चालवून घेत आणि प्रच्छन्नपणे त्यांची नक्कल करून टवाळी करीत. त्यांना त्याची कल्पना नसावी. एकतर त्यांचे वय आता संस्कारक्षम राहिलेले नव्हते, शिवाय वयाने त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. त्यामुळे त्यांना कांही उपदेश करायला जायचा अधिकार मला नव्हता आणि त्यांनी तो उपदेश ऐकूनही घेतला नसता. त्यामुळे त्यांच्याच वर्तनाचे प्रतिबिंब त्यांना आरशात दाखवावे असे मला वाटायचे. एकदा अचानक तशी संधी चालून आली.

त्या दिवशी कांही कारणाने मी ऑफीसला न जाता घरीच थांबलो होतो. तसे ऑफीसमध्ये कळवलेही होते. इतर कुणाला ते समजायचे कारण नव्हते. घरातल्या फोनची घंटी वाजली. या वेळी माझ्यासाठी घरी फोन येण्याची शक्यता कमीच होती. सगळे नवरे ऑफीसला गेल्यावर नोकरी न करणा-या बायकांचे हितगुज सुरू होते याची मला कल्पना होतीच. मी फोन उचलून मेहमीच्या संवयीप्रमाणे “हॅलो” म्हंटले. पलीकडून हुकूम आला, “आईला बोलाव रे.”
मी ओळखीचा आवाज बरोबर ओळखला. मी ऑफीसला गेलो असणार आणि माझ्या मुलाने फोन उचलला असणार असे त्यांनी गृहीत धरले होते. आमच्या दोघांच्या आवाजात व उच्चारांमध्ये थोडे आनुवंशिक साम्य होतेच. त्यामुळे तसा समज होणे शक्य होते. तिच्याच टोनची नक्कल करीत तिच्या स्वरापेक्षा वरच्या पट्टीमध्ये मी सांगितले, “मी नाही बोलावणार.”
हे ऐकून तिला धक्काच बसला असणार. आपण एका लहान मुलाशीच बोलत आहोत याच भ्रमात ती अजून होती. त्याला दम देण्याच्या उद्देशाने ती तार सप्तकात थरथरत किंचाळली,”ककककोण आहेस रे तू आणि कककोणाशी बोलतो आहेस ततते तुला माहीत आहे कां?”
अत्यंत शांतपणे पण करारी आवाजात मी उत्तर दिले, “हे पहा, तू झांशीची राणी असशील नाहीतर इंग्लंडची महाराणी. पण या वेळी तरी तू फोन केला आहेस तेंव्हा तुला तो करायची गरज आहे असे मी समजतो. तेंव्हा तू नक्की कोण आहेस ते आधी सांग आणि नंतर माझी चौकशी कर.”
आता मात्र ती पुरती वरमली होती. नरमाईच्या सुरात म्हणाली, “मी मिसेस …”
तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मी शक्य तितक्या मुलायम आवाजात म्हंटले, “वहिनी, नमस्कार. सॉरी हं. अहो त्याचं काय झालं माहिती आहे? आत्ताच कुठल्या तरी टकल्या पप्पू की पपल्या टकलूचा रॉंग नंबर कॉल आला होता. तो असाच भाईला बोलव म्हणाला होता. त्यानं माझं डोकं जरा सणकलं होतं. त्यानंतर लगेच तुमचा फोन आला. मी म्हंटलं हे काय चाललं आहे? कोण मला भाईला बोलाव म्हणतो आणि लगेच कोणी आईला बोलावायला सांगते? तुम्हाला माझा राग नाही ना आला? आधीच आपलं नांव सांगितलं असतं तर हा गोंधळ झाला नसता ना. मी मिसेसला बोलावतो हं. ती स्वैपाकघरात काम करते आहे.”

त्या नंतर दहा पंधरा दिवसांनी माझा मुलगा म्हणत होता, “त्या आँटीला काय झालंय् कोण जाणे ? मी मिसेस … बोलतेय्. आई आहे कां घरी? तिला जरा बोलावशील कां? असं किती छान बोलायला लागलीय्?”
मी मनात म्हंटलं, “गोळी बरोबर लागलेली दिसते आहे.”  

  . . . . . . .  . . . . . . (क्रमशः)

बोलू ऐसे बोल (भाग २)

असाच एक थोडासा मोठा बुजरा मुलगा एकदा आईने सांगितले महणून अनिच्छेने एका पार्टीला जायला निघाला. त्याच्या आईनं समजावलं, “जरा चार लोकात मिसळ, बहुतेक लोक क्रिकेटची मॅच किंवा पिक्चरबद्दल बोलत असतात, त्यात आपणही हृतीकनं काय छान काम केलंय्? नाहीतर तेंडुलकरनं अशी सेंचुरी मारली वगैरे ठोकून द्यायचं. तुला तर त्यातलं सगळं लेटेस्ट माहीत असतंच. आणि बायकांच्या बरोबर तर तुला कांही प्रॉब्लेमच येणार नाही, जे काय बोलायचं ते त्याच बोलतील. तू आपला “वा!वा!”, “छान” म्हणत रहा. त्यातूनच वाटलं तर “लग्न झालं कां? किती मुलं आहेत?” वगैरे चौकशी केली की झालं.” तो मुलगा “वा!वा!, छान छान” असे घोकत घोकत पार्टीला गेला.

दारावरच त्याच्याच वयाच्या एका मुलीने त्याचे स्वागत केलं. आपल्या मैत्रिणींची वाट पहात ती एकटीच उभी होती. ओळख करून देण्यासाठी आपले आणि आपल्या आईवडिलांचं नांव त्याने सांगितल्यावर तो चांगल्या घरातला मुलगा आहे हे तिला समजले. दिसायलाही तो गोरा गोमटा होता. त्याच्याशी थोडे सूत जमले तरीही फारशी कांही हरकत नाही अशा विचारानं आपल्या मैत्रिणी येईपर्यंत त्याच्या बरोबर संभाषणाचा धागा धरून ठेवावा असे तिला वाटले. पांच दहा मिनिटं हवापाण्यावर बोलण्यात गेली. तो आपला “हं हूं वा!वा! छान” वगैरे म्हणत होता. शेवटी “तुला कांहीच बोलायचं नाही आहे का?” असे तिनेच विचारलं. तो लगेच म्हणाला, “तुझं लग्न झालंय कां?”. हा भोळासांब दिसणारा मुलगा एकदम थेट मुद्यावर आला हे पाहून ती चाटच पडली. छानशी लाजून तिने खाली मुंडी घालत आपली मान नाजुकपणे हलवली. त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला, “तुला किती मुलं आहेत?”. आता मात्र तिचा एकदम भडका उडाला. आपली कांही तरी चूक झाली असे त्यालाही वाटलं. तो दुसरीकडे गेला.

एक मध्यमवयीन बाई एका गृहस्थापुढे आपल्या सुखी संसाराची पोथी वाचत होती, त्या गृहस्थाने त्याला हाक मारून बोलावून घेतले आणि त्याला तिच्या ताब्यात देऊन संधी मिळताच कुणाच्या तरी हांकेला ओ देण्याचं निमित्त करून ते तिथून सटकले. आपल्या मुलाचा अभ्यास, त्याचे खेळ, गिर्यारोहणाचा छंद, मुलीचं गाणं, नृत्यकला, चित्रकला, दोघांच्या खाण्यापिण्यातल्या आवडी निवडी, नखरे वगैरेचे पुराण चालू होते. कांही वेळाने त्यालाही “हं हूं वा!वा!छान” म्हणायचा कंटाळा आला. त्यानं आता प्रश्नांचा क्रम बदलून दुसरा प्रश्न आधी विचारला, “तुम्हाला किती मुलं आहेत हो?”
“म्हणजे काय? अहो दोनच ना! अभी आणि अस्मिता.” तिने अभिमानाने सांगितले,  “दोघंही आले आहेत ना! बघते हं मी ते कुठं आहेत ते.” असे म्हणत तिने मान थोडीशी फिरवली असेल तेवढ्यात तो दुसरा प्रश्न विचारून मोकळा झाला, “तुमचं लग्न झालंय कां हो?” त्यानंतर काय झालं असेल ते सांगायलाच नको. बोलण्यामागचा उद्देश, परिणाम वगैरे थोडे लक्षात ठेवत असल्यामुळे माझ्याकडून असा ब्रह्मघोटाळा मात्र कधी झाला नाही.

थोडे मोठे झाल्यावर एकदा मी एका मित्राकडे गेलो होतो. तो कुठे बाहेर गेला होता त्याच्या येण्याची वाट पहात थांबलो होतो. त्याचा बारा तेरा वर्षांचा लाडावलेला मुलगा तिथेच टी.व्ही. पहात बसला होता. मी समोर पडलेले एक मासिक घेऊन चाळवत बसलो होतो. मध्येच तो मुलगा म्हणाला, “काका, मला जरा तो रिमोट द्या ना.”
मी डोळे वर करून पाहिले, आमच्या दोघांच्या मध्ये एक टेबल होते. त्यावर तो ठेवला होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा मासिक वाचनात गुंग झालो. तो मुलगा म्हणाला, “काका, मी तुम्हाला कांही तरी सांगितलं.”
मी लगेच म्हणालो, “हो. मी ते ऐकलं.”
“मग मला रिमोट देत कां नाही?”
मी म्हंटले, “असं आहे, मी आत्ता हिमालय चढत नाही आहे की समुद्रात उडी मारत नाही आहे, दाढी करत नाही आहे आणि सायकलही चालवत नाही आहे. आता मी कुठकुठल्या गोष्टी करीत नाही आहे याची कारणं सांगू? एखादी गोष्ट करण्याला कांहीतरी कारण असतं, न करण्याला ते असायची गरज नसते.”
“पण मी तुम्हाला रिमोट मागितलाय ना?”
“म्हणून काय झालं? अरे, माझ्याजवळ एखादी वस्तु असेल आणि मला ती द्यावीशी वाटेल तरच मी ती देईन ना? मला एखादं तरी कारण दिसायला हवं ना?”
“पण हा रिमोट तर हा काय इथेच समोर पडला आहे.”
“हो. मी पाहिला आणि म्हणूनच तुला दिला नाही. तुझ्या जागी एखादे आजोबा असते तर मी तो उचलून आदरानं त्यांना दिला असता आणि एकादा आजारी माणूस असला तर त्याला कष्ट पडू नयेत म्हणून मदत करायच्या भावनेनं दिला असता. पण तू स्वतः पाहिजे असल्यास तो सहज घेऊ शकतो आहेस हे मला दिसतय्. मग मी तुझ्यासाठी ते काम करावं असं मला कां म्हणून वाटेल? तूच सांग.”
“पण माझी आई तर तिला कांहीही मागितलं की लगेच आणून देते.”
“त्याला एक कारण आहे. तिनं तुला लहानाचं मोठं केलं आहे. तुला स्वतःला कांही करता येत नव्हतं तेंव्हापासून तुला लागेल ते सगळं आणून द्यायची तिला संवय लागली आहे. ते करण्यात तिला एक प्रकारचा आनंद मिळतो. पण आता तू मोठा झाला आहेस. आता तुलाच आपल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. तुझी आई एक तू मागितलं म्हणून लगेच देईल. इतर लोक कशाला देतील?”
आमचे हे सारे संभाषण त्याची आई बाजूच्याच स्वयंपाकघरात उभी राहून ऐकत होती. हातात एक ट्रे घेऊन बाहेर येतायेता ती पुटपुटली,
“इतका मेला वाद घालण्यापेक्षा तो रिमोट देऊन टाकला असता तर काय विघडलं असतं?”
मी हंसत म्हंटलं, “खरंच हो, कांही सुद्धा बिघडलं नसतं.” त्या माउलीशी वाद घालण्याची माझी मुळीसुद्धा इच्छा नव्हती, कारण मला आपल्या मित्राची वाट पहात तिथे आणखी थोडा वेळ थांबायचे होते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिने आणलेले बशीभर कांदे पोहे चवीने खायचे होते. पण तो मुलगा उठून आपल्या हाताने रिमोट उचलून घेतांना दिसला आणि माझ्या बोलण्याचा परिणाम होतांना मला पहायला मिळाला.