मंगलयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत शिरून एक वर्ष पूर्ण झाले. हा अवधी अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. त्य यानावर ठेवलेले इंधन संपेपर्यंत म्हणजे आणखी काही काळ ते मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालत तिकडचीी माहिती पाठवत राहणार आहे.
—————————————————————————————————————————————————
दोन बिंदूंना जोडणा-या असंख्य वक्ररेषा असू शकतात पण तशी फक्त एकच सरळरेषा काढता येते, या सरळ रेषेची लांबी सर्वात कमी असते, वगैरे सिद्धांत आपण प्राथमिक भूमितीमध्ये शिकलो होतो. यांचे प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे दोन गावांना जोडणारा सरळसोट रस्ता असला तर एका गावाहून दुस-या गावाला जाणारा तो सर्वात जवळचा मार्ग असतो. त्यावरून प्रवास केल्यास कमी वेळ लागतो आणि कमी श्रम पडतात. दादर ते परळ यासारख्या लहानशा आणि सपाट भूभागात तसा सरळ रस्ता बांधणे शक्य असते, पण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता बांधणे शक्यच नसते. डोंगर- द-या, नदी- नाले यांच्यासारखे वाटेतले अनेक अडथळे ओलांडून पुढे जाण्यासाठी वळणावळणाने जाणारे रस्ते बांधावे लागतात.
आकाशात असले अडथळे नसतातच आणि रस्ताही बांधावा लागत नाही. कमीत कमी वेळ आणि खर्च यावा या दृष्टीने आकाशमार्गातले सगळे प्रवास अगदी सरळ मार्गाने केले जात असतील किंवा करता येत असतील ना? पण मूंबई ते न्यूयॉर्कचा विमानप्रवास असो किंवा चंद्रयान वा मंगलयान असोत, त्यांचे मार्ग वक्राकारच असतात. मुंबई आणि न्यूयॉर्क ही शहरे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंना वसलेली असल्यामुळे त्यांना जोडणारी सरळरेषा पृथ्वीच्या पोटातून जाते. विमानांचे उड्डाण आकाशातून, किंबहुना पृथ्वीच्या सभोवती पसरलेल्या हवेमधून होते. विमानात बसलेल्या माणसांना आपण अगदी नाकासमोर सरळ रेषेत पुढे जात आहोत असा भास होत असला तरी त्या मार्गाचा प्रत्यक्ष आकार एका प्रचंड आकाराच्या कमानीसारखा गोलाकार असतो. या दोन शहरांना जोडणा-या अशा अनेक कमानी काढता येतात. मी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा जातांना आमचे विमान मुंबईहून निघाल्यानंतर उत्तरेच्या दिशेने प्रवास करत कझाकस्तान, रशिया यासारख्या देशांवरून उडत उत्तर ध्रुवापाशी पोचले आणि तिकडून कॅनडा मार्गे अमेरिकेत (य़ूएसएमध्ये) दाखल झाले. परतीच्या प्रवासात मात्र आमच्या विमानाने पूर्व दिशा धरली आणि अॅटलांटिक महासागर ओलांडून ते युरोपमार्गे भारतात आले. दोन्ही मार्ग वक्रच, पण निराळे होते.
मुंबई आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पृथ्वी असते, पण चंद्र तर आपल्याला आभाळात दिसतो तेंव्हा आपल्या दोघांमध्ये कसलाच अडथळा नसतो. चंद्राचा प्रकाश सरळ रेषेत आपल्याकडे येत असतो. झाडाच्या फांदीवर लागलेल्या फळावर नेम धरून दगड मारला तर तो त्या फळाला लागतो त्याचप्रमाणे चंद्रावर नेम धरून बंदूक झाडली तर तिची गोळी सरळ रेषेत पुढे पुढे जाऊन चंद्राला लागायला हवी, पण तसे होत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती गोळी पुन्हा जमीनीवरच येऊन पडते. एकादी वस्तू दर सेकंदाला सुमारे अकरा किलोमीटर इतक्या वेगाने आकाशात भिरकावली तर ती पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही असे दोनतीनशे वर्षांपूर्वी सर आयझॅक न्यूटन यांनी प्रतिपादन केले होते. पण कोणत्याही वस्तूला एकदम इतका जास्त वेग कसा देता येऊ शकेल हे त्यालाही ठाऊक नव्हते आणि हे अजूनही शक्य झालेले नाही.
बंदुकीतून सुटणारी गोळी ही आपल्या माहितीतली सर्वात वेगवान वस्तू असते. ती प्रचंड वेगाने हवेमधून पुढे जात असतांना आपल्या डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. डोक्याची कवटी किंवा छातीचा पिंजरा तोडून आत घुसण्याइतकी शक्ती (कायनेटिक एनर्जी) त्या गोळीत असते, पण असे असले तरीही तिचा वेग दर सेकंदाला सुमारे दीड किलोमीटर एवढाच असतो. यामुळे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकत नाही. शिवाय हवेबरोबर होत असलेल्या घर्षणामुळेही तिचा वेग कमी होत जातो आणि काही किलोमीटर अंतरावर जाऊन ती जमीनीवर येऊन पडते. तोफेच्या गोळ्याची अवस्थाही फारशी वेगळी नसते.
अंतराळात पाठवल्या जाणा-या अग्निबाणांच्या रचनेत त्यात अनेक कप्पे ठेवलेले असतात. या रॉकेटच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा धमाका होऊन त्याला जेवढा वेग मिळेल तितक्या वेगाने ते आकाशात झेपावते. हा वेग एस्केप व्हेलॉसिटीइतका नसला तरी त्या रॉकेटला वातावरणाच्या पलीकडे नेतो. त्यानंतर काही सेकंदांतच दुस-या टप्प्याचा स्फोट होऊन त्याला अधिक वेग देतो, त्यानंतर आवश्यक असल्यास तिसरा, चौथा वगैरे टप्पे त्याचा वेग वाढवत नेतात. पण हे होत असतांना ते रॉकेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त झालेले नसते, ते चंद्राच्या दिशेने न जाता पृथ्वीला प्रदक्षिणा करू लागते. या भ्रमणामध्ये कोणतेही इंधन खर्च करावे लागत नाही. अशा प्रदक्षिणा करत असतांना त्या यानावरले योग्य ते रॉकेट इंजिन नेमक्या क्षणी काही क्षणांसाठी चालवून त्याचा वेग वाढवला जातो. यामुळे त्याची कक्षा अधिकाधिक लंबगोलाकार (एलिप्टिकल) होत जाते. ज्या वेळी ते चंद्राच्या दिशेने पृथ्वीपासून दूर जाते आणि चंद्राच्या जवळपास जाते तेंव्हा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाहून जास्त होते. त्या यानाला एका बाजूने पृथ्यी आणि दुस-या बाजूने चंद्र आपल्याकडे खेचत असतांना त्यात चंद्राचा जोर जास्त होताच ते यान चंद्राचा उपग्रह बनून त्याला प्रदक्षिणा घालायला लागते. त्या वेळी ते चंद्रावर पोचले असे म्हंटले जाते. एक लहानसे यान तिथून काळजीपूर्वक रीतीने चंद्रावर पाठवून उतरवले जाते. अशाच एका लहान यानात बसून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास प़थ्वीवरून चंद्रापर्यंतचा प्रवास हा सरळ रेषेत होत नाही. त्या प्रवासात पृथ्वीभोवती आणि चंद्राभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा मुख्य समावेश असतो.
मंगळयानाच्या प्रवासाचा पहिला भाग चंद्रयानासारखाच होता. त्या यानानेसुद्धा जमीनीवरून उड्डाण केल्यानंतर अनेक दिवस पृथ्वीप्रदक्षिणा घातल्या. पण पुढच्या टप्प्यात मात्र त्याला लगेच मंगळ ग्रह गाठायचा नव्हता. खरे तर मंगळग्रह त्याच्या आसपास कुठेही नव्हता. स्वतःच्या सूर्यप्रदक्षिणेत तो पृथ्वीच्या खूप पुढे होता. मंगळयानाने पृथ्वीपासून दूर जाणारी अशी अधिक लंबगोलाकृती कक्षा निवडून ते सूर्याभोवती फिरू लागले. पुढल्या सुमारे एक वर्षाच्या कालावधीत पृथ्वी तिच्य़ा सूर्यभ्रमणात मंगळाच्या आणि त्या यानाच्या पुढे निघून गेली, यानाने हळूहळू पुढे जात अखेर मंगळाला गाठले आणि ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्रात येताच त्या ग्रहाभोवती फिरायला लागले. मंगळयानाच्या प्रवासात त्याने पृथ्वीभोवती आणि मंगळाभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा समावेश होत असला तरी त्याने सूर्याभोवती घातलेली अर्धप्रदक्षिणा हा या यात्रेचा मुख्य भाग असतो.
चंद्र हा उपग्रह पृथ्वीभोवती एका लंबगोलाकृती कक्षेत फिरत असल्यामुळे तो पृथ्वीपासून सुमारे ३८४,००० किलोमीटर अंतरावर असतो. या दोघांमधील जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात सुमारे ४२५०० किमी एवढाच फरक असतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर सुमारे ४००,००० किलोमीटर्स असे धरले तरी यानाचा प्रत्यक्ष प्रवास याच्या कित्येक पटीने जास्त झाला आणि त्यासाठी त्याला तब्बल वीस दिवस लागले.
मंगळ ग्रह स्वतःच एका निराळ्या कक्षेमधून निराळ्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असल्यामुळे पृथ्वी व मंगळ या दोन ग्रहांमधले अंतर रोज बदलत असते आणि दोघांमधले जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात फार मोठा फरक असतो. मंगळयानाच्या प्रवासात या दोन ग्रहांमधल्या अंतराला काहीच महत्व नसते. या यानाच्या उड्डाणाच्या वेळीही पृथ्वी मंगळापासून खूप दूर आणि मंगळाच्या मागे होती आणि ते यान मंगळावर पोचले तेंव्हाही ती खूप दूर पुढे निघून गेली होती. जेंव्हा हे दोन ग्रह एकमेकांपासून कमीतकमी अंतरावर आले होते त्या वेळी मंगळयान या दोघांपासून खूप दूरच होते. या यानाने कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास करून मंगळाला गाठले आणि त्यासाठी त्याला एक वर्षाचा काळ लागला. तो सारा प्रवास त्याने सूर्याभोवती फिरण्याचा होता.
दर सेकंदाला सुमारे सात मैल (११.२ किलोमीटर) एवढ्या प्रचंड वेगाने तोफेचा गोळा आभाळात फेकला तर तो कधीच जमीनीवर परत येणार नाही असे गणित सर आयझॅक न्यूटन यांनी केले होते. त्याचे प्रात्यक्षिक करणे त्यांच्या काळात तर शक्य नव्हतेच, जमीनीवरून इतक्या वेगाने तोफेचा गोळा फेकणे किंवा साधे रॉकेट (अग्निबाण) उडवणे आजसुद्धा शक्य नाही. ही गोष्ट साध्य करण्यासाठी मल्टिस्टेज रॉकेट्स मात्र तयार केली गेली. त्यात अनेक रॉकेटांना जोडून त्यांचा समूह केलेला असतो. चार, तीन, दोन, एक अशी उलटी मोजणी (काउंटडाउन) संपताच अग्निबाणातल्या सर्वात मोठ्या त्याच्या पहिल्या टप्प्यावर (फर्स्ट स्टेज रॉकेटवर) ठिणगी पडून त्याचा भडका उठतो आणि धडाक्याने त्या रॉकेटचे लाँचिंग होते. त्याच्या उड्डाणाचा धक्का (प्रतिक्रिया) सहन करण्यासाठी अत्यंत मजबूत असे रॉकेट लाँचिंग पॅड तयार केलेले असते. आकाशात झेपावल्यानंतर ठराविक कालावधीने आणि ठराविक क्रमाने त्या रॉकेटचे पुढील टप्पे (स्टेजेस) एका पाठोपाठ एक पेटवून उडवले जातात. या अग्निबाणांची रचना अशी केलेली असते की प्रत्येक टप्प्याच्या वेळी त्याच्या विशिष्ट टप्प्याचा भाग सुटा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या भागाला मागे ढकलून उरलेले रॉकेट पुढे जाते. कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर जळून नष्ट होतो आणि त्याचे अवशेष अवकाशात फेकून दिले जातात. मोटार किंवा विमानाप्रमाणे एकाच अग्निबाणात पुन्हा पुन्हा नवे इंधन भरून त्याला अनेक वेळा वापरता येत नाही किंवा तो एकदा अयशस्वी झाला तर त्याची दुरुस्ती करून त्याचा उपयोग करता येत नाही. त्यामुळे त्याची रचना आणि निर्मिती अत्यंत अचूकच असावी लागते.
कृत्रिम उपग्रहांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी सॅटेलाइट लाँच व्हेइकल्स नावाचे खास प्रकारचे अग्निबाण तयार केले जातात. त्यातही एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आदि निरनिराळे प्रकार असतात. कशा प्रकारचा केवढ्या आकाराचा उपग्रह अवकाशात सोडायचा आहे ते पाहून त्यानुसार योग्य त्या प्रकारचे यान तयार केले जाते. चंद्रयान किंवा मंगलयान अशा प्रकारच्या मोहिमांसाठी तयार केलेली याने तर जास्तच स्पेशल असतात. त्याचे अग्निबाण अनेक कप्प्यांनी मिळून तयार केले जातात आणि ते टप्प्याटप्प्याने उडवले जातात. अशा प्रकारे वेग वाढवत ते यान पृथ्वीपासून दूर जात राहते आणि तिला प्रदक्षिणा घालत राहते. या यानांमध्ये काही रॉकेट इंजिनेही असतात. जेट विमानांच्या इंजिनांप्रमाणे त्यांच्या चेंबरमध्ये इंधनाचे ज्वलन होऊन अतितप्त वायू तयार होतात आणि त्यांचा दाब (प्रेशर) खूप वाढतो. नॉझल्समधून त्यांचा झोत (जेट) विमानाच्या मागच्या दिशेने वेगाने बाहेर सोडला जात असतो त्यामुळे ते विमान पुढे जाते. विमानातल्या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूची हवा पंख्याने आत ओढून घेतली जात असते, पण अवकाशात हवाच नसते. तिचा उपयोग करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यानांच्या रॉकेट इंजिनमध्ये इंधनाबरोबरच प्राणवायूचाही (ऑक्सीजनचा) पुरवठा केला जातो. त्यासाठी ऑक्सिडायजर केमिकल्सचा पुरेसा स्टॉकसुद्धा बरोबर नेला जातो.
दि.५ नोव्हेंबर २०१३ रोजी म्हणजे मागल्या वर्षातल्या भाऊबीजेच्या दिवशी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी आंध्रमधील श्रीहरीकोटा या ठिकाणी बांधलेल्या खास लाँचिंग पॅडवरून मंगलयानाने यशस्वी उड्डाण केले. त्या दिवशी मंगळवारच होता हा योगायोग म्हणा किंवा कदाचित तसे ठरवून केले असेल. खरे तर हे उड्डाण याच्याही आधीच करायचे ठरले होते आणि भारतातल्या रॉकेट लाँचिंग स्टेशनमध्ये त्याची जय्यत तयारी झाली होती. पण पॅसिफिक महासागरात आलेल्या वादळामुळे तिथल्या भागातल्या काही ट्रॅकिंगच्या सोयी तयार नव्हत्या. यामुळे मंगलयानाच्या उड्डाणाचा मुहूर्त लांबणीवर टाकावा लागला. आकाशात झेप घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच रॉकेटच्या सगळ्या स्टेजेस एकामागून एक कार्यान्वित झाल्या आणि हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागले. हे सगळे त्या दिवशी टेलिव्हिजनवर लाइव्ह टेलिकास्टमध्ये पहायला मिळाले. ते यान पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचे निरीक्षण जगातल्या इतर खंडांमधून किंवा महासागरांमधूनसुद्धा करावे लागते. त्यासाठी जगभर पसरलेल्या अनेक प्रयोगशाळा किंवा वेधशाळांचे सहाय्य घ्यावे लागते. अशा प्रकारे ही मोहीम जरी भारतीयांची असली तरी ती आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच राबवली जाते.
मंगलयानाची पृथ्वीभोवती फिरत राहण्याची कक्षा वर्तुळाकार (सर्क्युलर) नाही. ती कमालीची लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) आहे. त्याने घातलेल्या पहिल्या दिवसातल्या प्रदक्षिणांमध्ये हे यान पृथ्वीच्या जवळ येतांना (perigee) २६४ किलोमीटरपर्यंत येत होते आणि दूर जाई तेंव्हा (apogee) सुमारे २३,९०० किलोमीटर इतके लांब जात होते. गेल्या दोन आठवड्यात त्याची ही कक्षा क्रमाक्रमाने वाढवत नेत गेली. काहा दिवसांमंतर हे यान जेंव्हा अॅपोजीवर असतांना पृथ्वीपासून तब्बल १९२००० किंवा जवळ जवळ दोन लक्ष किलोमीटर्स इतक्या दूर जात होते आणि जवळ येतांना मात्र फक्त दोन अडीचशे किलोमीटर्सवरच असायचे. मंगळयानाच्या या निरनिराळ्या कक्षा सोयीसाठी एकाच चित्रात दाखवल्या आहेत. पण प्रत्यक्षात एका वेळी त्यातली एकच कक्षा असते. पहिल्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला त्याची सर्वात लहान कक्षा होती आणि ती क्रमाक्रमाने वाढवत नेली गेली. तिच्यात आणखी वाढ होऊन ती १ डिसेंबरला सर्वात मोठी झाली होती. सोयीसाठी चित्रामध्ये त्यांचा आकार खूपच जास्त वाढवून दाखवला आहे. प्रत्यक्षात पाहता ग्रह आणि सूर्य यांच्यामधले अंतर काही कोटी किलोमीटर्स इतके असते आणि मंगलयान पृथ्वीपासून फार तर दोन लक्ष किलोमीटर्स एवढेच दूर जाणार आहे. स्केलमध्ये पाहिल्यास त्याच्या सगळ्या कक्षा फक्त एका ठिपक्यात येईल, पण त्यामुळे त्या दिसणारही नाहीत आणि समजणारही नाहीत.
उड्डाण केल्यानंतर आणखी काही दिवस हे मंगलयान असेच पृथ्वीभोवती फिरत राहिले. १ डिसेंबरच्या सुमाराला या त्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे सोडून मंगळाच्या दिशेने प्रयाण कंले. त्याआधी ते सुद्धा पृथ्वीच्या सोबतीने सूर्याभोवतीही फिरतच राहिले होते आणि पृथ्वीपासून दूर जातांनाही ते सूर्याभोवती फिरतच राहिले. सूर्यावरून पाहिल्यास १ डिसेंबरच्या दिवशी मंगळ हा ग्रह त्याच्या सूर्यप्रदक्षिणेमध्ये पृथ्वीच्या बराच पुढे होता. त्या दिवशी मंगळयानाला जास्त गति आणि वेगळी दिशा देऊन पृथ्वीपासून दूर लोटले गेले. त्यामुळे पृथ्वीची सू्र्याभोवती फिरण्याची गति अधिक त्या यानाची पृथ्वीभोवती फिरण्याची गति अधिक त्याला मिळालेली जास्तीची गति एवढा त्याचा एकूण वेग होता. तसेच सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्याही गुरुत्वाकर्षणाचा प्रभावही त्याच्यावर पडत होता. या सर्वांमधून त्याची स्वतःची एक वेगळी कक्षा तयार होत झाली. ती चित्रात दाखवल्यासारखी होती. चित्रावरून पाहता हे आपल्या लक्षात येईल की ही कक्षा साधारणपणे बरीचशी पृथ्वीच्या कक्षेसारखीच होती. शेतकरी ज्याप्रमाणे गोफणीत दगड ठेऊन तिला गरागरा फिरवतो आणि त्याला दूर फेकतो तसेच काहीसे मंगलयानाच्या बाबतीत पृथ्वीकडून केले गेले असे म्हणता येईल. त्याला मिळणारी मुख्य गति पृथ्वीपासूनच मिळाली होती. त्यात स्वतःची थोडी भर घालून ते यान मंगळाकडे जायला निघाले.
हे यान पृथ्वीपासून जसजसे दूर दूर गेले तसतसा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावरचा प्रभाव कमी कमी होत जाऊन मंगलयानसुद्धा पृथ्वी किंवा मंगळ ग्रह यांच्याप्रमाणे फक्त सूर्याभोवती फिरणारा एक पिटुकला ग्रह होऊन गेला. मंगळाची कक्षा पृथ्वीहून मोठी आणि गति कमी असल्यामुळे आणखी चार पाच महिन्यांनी पृथ्वीने मंगळाला गाठले म्हणजे हे दोन ग्रह एकमेकांच्या सर्वात जवळ आले. त्यावेळी मंगळयान मध्येच कुठेतरी होते. त्यानंतर पृथ्वी मंगळ ग्रहाच्या पुढे पुढे जात राहीली आणि मंगळयानसुद्धा पृथ्वीच्या मागे पडत आणि मंगळाच्या थोडे मागे उडत राहिले.
सप्टेंबर २०१४ मध्ये पृथ्वीने तिच्या प्रदक्षिणेचा सुमारे पाऊण हिस्सा पूर्ण केला होता आणि ती चित्रात दाखवलेल्या जागी आली होती तर मंगळ ग्रहाने अजून अर्धी प्रदक्षिणासुद्धा संपवली नसल्याने तो चित्रात दाखवलेल्या ठिकाणी पृथ्वीच्या बराच मागे होता. त्याच वेळी मंगलयान आणि मेव्हन हे पृथ्वीवरून पाठवलेले पाहुणे मंगळ ग्रहाच्या जवळ जाऊन पोचले आणि त्यांनी त्याला गाठले. मंगळाच्या जवळ पोचल्यानंतर त्यांच्या इंजिनांचा उपयोग करून त्यांचा वेग थोडा कमी केला गेला, तसेच त्यांना योग्य त्या दिशा देऊन मंगळग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर ते मंगळ ग्रहाचे उपग्रह होऊन त्याला घिरट्या घालू लागले आहेत.
हे काम मात्र तारेवरच्या कसरतीसारखे जोखमीचे आणि कौशल्यपूर्ण असते. एकादे यान जर त्याचा मार्ग बदलून थेट मंगळाच्या दिशेने जायला लागले तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने ते नक्कीच ओढले जाईल आणि समजायच्या आत खूप वेगाने त्याच्या पृष्ठभागावर धाडकन जाऊन आपटून नष्ट होईल. यानाने मंगळाच्या जवळून पण बाजूने जात असतांना त्या ग्रहापासूनचे अंतर, यानाची आणि ग्रहाची पुढे जाण्याची दिशा आणि वेग या सर्वांकडे अत्यंत बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यात थोडीशी गफलत झाली तरी ते यान कदाचित मंगळावर जाऊन धडकेल किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षणाला न जुमानता त्याला वळसा घालून परत न फिरता थेट अथांग अंतरिक्षात दूर चालले जाईल. पृथ्वीपासून दूर उपग्रहांवर जाऊन परत येणा-या अॅस्ट्रोनॉट्सना सुध्दा रीएन्ट्रीचे काम अत्यंत कौशल्याने करावे लागते. यातच काही तरी अनपेक्षित घडले होते आणि त्यात आपल्या कल्पना चावलाला आपले प्राण गमवावे लागले होते. तिचे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर (फक्त सूर्याच्या कक्षेत) गेलेले नव्हते, ते पृथ्वीहून जवळच होते. मंगलयानाला तर आधी सूर्याच्या कक्षेमधून मंगळाच्या कक्षेत शिरायचे आहे. धनुर्धारी अर्जुनाने डोक्यावर फिरत असलेल्या माशाचे खाली ठेवलेल्या परातीतले प्रतिबिंब पाहून शरसंधान केले आणि बरोबर त्याचा डोळा फोडला असे द्रौपदीस्वयंवराचे आख्यान आहे. मंगलयानाचे नियंत्रण जर पृथ्वीवरून होत असल्यामुळे ते काम अशाच प्रकारचे आहे असे म्हणता येईल. शिवाय यात आणखी एक तिढा आहे. पृथ्वीच्या भोवती फिरत राहणा-या कृत्रिम उपग्रहांपासून येणारे संदेश आणि त्यांना दिले जाणारे आदेश एका सेकंदाच्या आत येतात किंवा जातात. पण मंगलयान मंगळ ग्रहाजवळ पोचेल तेंव्हा ते पृथ्वीपासून काही कोटी किलोमीटर अंतरावर होते आणि या संदेश वहनाला सुमारे वीस मिनिटे लागत.होती त्यामुळे नियंत्रण जास्तच आव्हानात्मक होते.
मंगलयान आणि मेव्हन ही दोन्ही याने मंगळाजवळ पोचली आहेत आणि त्याला प्रदक्षिणा घालता घालता ती याने त्याचे निरीक्षण करत राहणार आहेत, त्याचे फोटो काढणार आहेत, त्या ग्रहावर कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, किती पाणी, बर्फ किंवा वाफ आहे, मिथेन वायू आहे का वगैरेंचा ते जास्त कसोशीने तपास लावण्याचा प्रयत्न करणार आहेत, मंगळ ग्रहासंबंधी आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे ती पडताळून पाहून जास्त सखोल अभ्यास करता येण्यासाठी सामुग्री मिळवणार आहेत आणि ती सारी माहिती पृथ्वीवरील केंद्रांकडे पाठवत राहणार आहेत. या कामासाठी लागणारी वीज त्या यांनांना जोडलेल्या सोलर पॅनेल्समधून मिळत राहील. हे सगळे आता ठरलेले प्लॅन आहेत. त्यातले किती प्रत्यक्षात उतरतात हे काळच ठरवेल.
मॅव्हेन किंवा मेव्हन हे अमेरिकेच्या नासाच्या यानानेही १९ नोव्हेबर २०१३ रोजी जमीनीवरून उड्डाण करून मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू केला. भारताच्या मंगलयानाप्रमाणेच ते सुद्धा पहिले काही दिवस पृथ्वीप्रदक्षिणा करत राहील आणि त्यानंतर योग्य वेळी मंगळाच्या दिशेने कूच करेल. या दोन्ही यानांची ही अंतराळातली सफर कोणत्या मार्गाने आणि कशी होणार आहे हे पाहण्यापूर्वी काही मूलभूत शास्त्रीय मुद्द्यांची उजळणी करायला हवी.
आपण जेंव्हा जमीनीवरून चालत असतो तेंव्हा प्रत्येक पाऊल पुढे टाकतांना आपण हलकेच जमीनीला मागे ढकलत असतो आणि त्याच्या प्रतिक्रियेमुळे जमीन आपल्याला पुढे ढकलते यामुळे आपण पुढे जातो. बुळबुळीत शेवाळे किंवा अतीशय गुळगुळीत अशा बर्फाच्या थराला आपण पायाने मागे ढकलल्यास आपला पायच त्यावर घसरतो त्यामुळे आपण त्या वेळी जमीनीला मागे ढकलू शकत नाही आणि त्यामुळे आपण पुढेही जात नाही. एकादी उडी मारतांना आपण जमीनीला पायाने एक जोराचा झटका देतो आणि त्याची जमीनीकडून जी प्रतिक्रिया होते तिच्या जोरामुळे (फोर्समुळे) आपण वर फेकले जातो. पण गुरुत्वाकर्षणाने जमीन आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असतेच, त्यामुळे थोडे वर गेल्यानंतर आपण पुन्हा खाली येतो. दलदलीत किंवा रेतीच्या ढिगावर उभे राहून उडी मारायचा प्रयत्न केला तर पायाखालचा चिखल किंवा रेती बाजूला सरकल्याने जमीनीकडून प्रतिक्रिया मिळत नाही. यामुळे आपण वर उचलले न जाता जास्तच खोल रुतत जातो. पाण्यातून जाणारे जहाजसुद्धा पाण्याला मागे सारूनच पुढे जात असते आणि सगळे पक्षी त्यांच्या पंखांनी हवेला खाली किंवा मागे ढकलून हवेत उडत असतात. स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारणारे किंवा बंगी जंपिंग करणारे खेळाडू उडी मारून झाल्यावर काही क्षण हवेत असतात, त्या काळात ते कोलांट्या मारतात, गिरक्या घेतात, अनेक प्रकारे हातपाय हलवतात, पण खाली पडत असतांना ते मध्येच थांबू शकत नाहीत, किंवा हवेत असतांनाच उसळी मारून पुन्हा उडी मारून वरच्या दिशेने जाऊ शकत नाहीत. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खाली येण्याची त्यांची ट्रॅजेक्टरी जशीच्या तशीच राहते. थोडक्यात सांगायचे झाल्यास पुढे जाण्यासाठी दुस-या कशाला तरी मागे ढकलणे (किंवा ओढणे) आवश्यक असते तसेच वरची पातळी गाठण्यासाठी कशाला तरी खाली ढकलणे (किंवा खेचणे) आवश्यक असते. याच्या उलट असेही दिसेल की बुळबुळीत शेवाळे किंवा अतीशय गुळगुळीत बर्फाच्या थरावर आपण घसरत असलो तर ती घसरणूक थांबवण्यासाठी देखील आपल्याला कशाचा तरी भक्कम आधार घ्यावा लागतो. फक्त आपल्या शरीराच्या हालचालींमधून त्याचे घसरणे थांबवता येत नाही. त्यासाठी बाह्य कारणाची गरज असते.
अवकाशाच्या निर्वात पोकळीत (स्पेसमध्ये) जमीन, पाणी, हवा वगैरे काहीही नसते. कशालाही ढकलून त्याच्यापासून दूर (किंवा ओढून त्याच्या जवळ) जाण्याची सोय तिथे नसते. अंतराळातल्या प्रयोगशाळेतला (स्पेसलॅबमधला) एकादा अॅस्ट्रोनॉट त्यामधून स्पेसवॉक करण्यासाठी बाहेर निघाला तर त्या लॅबला ढकलून तो तिच्यापासून दूर जाऊ शकतो, पण त्याने तसे केले तर त्या रिकाम्या जागेत त्याला अडवणारा कसलाच अडथळा नसल्यामुळे तो दूर दूरच जात राहील. त्याने कितीही हातपाय हलवले किंवा झटकले तरी तो दूर जाण्याची दिशा बदलून मागे परत येऊ शकणार नाही. पण असे होऊ नये यासाठी एका मजबूत साखळीद्वारे त्याला त्या लॅबशी जोडून ठेवलेले असते, तो फक्त एक सेफ्टी बेल्ट नसतो, त्या अॅस्ट्रोनॉटला सुखरूप परत येऊ शकण्यासाठी ही सोय करावीच लागते. त्या साखळीमुळे एक तर तो यानापासून जास्त दूरवर भटकत जाणार नाही आणि दुसरे म्हणजे तिला धरूनच तो हळूहळू परत येऊ शकतो.
अवकाशाच्या निर्वात पोकळीत इतर काही नसले तरी निरनिराळ्या ग्रह आणि ता-यांचे गुरुत्वाकर्षण कार्यरत असते. जमीनीवरून आकाशात उडवलेला अग्निबाण (रॉकेट) किंवा उपग्रह (सॅटेलाईट) पृथ्वीच्या जवळ असतांना पृथ्वीचे आकर्षण त्या उपग्रहाला खेचून घेत असते त्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरत असतो आणि चंद्राच्या जवळ गेल्यानंतर चंद्राचे आकर्षण जास्त प्रभावी झाल्यामुळे तो उपग्रह चंद्राभोवती फिरू लागतो. त्यावेळी सुद्धा त्याच्यावर पृथ्वीचे आकर्षण काम करतच असते आणि त्याच्या प्रभावाखाली तो उपग्रहसुद्धा चंद्राच्या सोबतीने पृथ्वीभोवती देखील फिरत राहतो. या शिवाय ते सगळेच जण सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असल्यामुळे वर्षातून एकदा ते सगळे मिळून सूर्यालाही एक प्रदक्षिणा घालत असतात. पण या आकर्षणामुळे ते सतत खेचले जात असतात तर एकमेकांवर जाऊन आपटत का नाहीत? असा प्रश्न पडणे साहजीक आहे.
जर सफरचंदाचे फळ झाडावरून सुटल्यावर पृथ्वीच्या आकर्षणामुळे खाली पडत असेल तर त्या पृथ्वीने चंद्रालाही आपल्याकडे आकर्षित करायला पाहिजे आणि तसे असेल तर तो सुद्धा जमीनीवर येऊन कोसळत का नाही? हा प्रश्न सर आयझॅक न्यूटनलाही पडला होता आणि यावर सखोल विचार करतांनाच त्याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे आकलन झाले होते. ते कसे ते थोडक्यात पाहू. पौर्णिमेचा पूर्ण चंद्रगोल आपल्याला स्पष्ट दिसतो. त्याच्यावर नेम धरून आपण एक दगड आकाशात भिरकावला तर तो आपल्या समोरच खाली येऊन पडतांना दिसेल, चंद्रावर नेम धरून एक मोठी तोफ डागली तर तिचा गोळा बराच दूर, बहुधा नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे कुठे तरी जाऊन पडेल आणि आयसीबीएमसारखे एकादे मोठे रॉकेट उडवले तर ते सुद्धा काही हजार किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर, पण खाली जमीनीवरच येऊन पडेल. यातल्या प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्वतःकडे खेचतच असते. त्यामुळे त्या वस्तूचा वरच्या दिशेने म्हणजे पृथ्वीपासून दूर जाण्याचा वेग कमी कमी होत जातो आणि तो शून्यापर्यंत पोचल्यानंतर ती वस्तू आणखी वर न जाता खाली यायला लागते. सुरुवातीचा वेग जितका जास्त असेल तितका जास्त वेळ त्या वस्तूला वर जाऊन खाली यायला लागेल. पण त्या वस्तूला मिळालेला जमीनीला समांतर जाण्याचा वेग कायम असल्यामुळे तेवढ्या वेळात ती वस्तू दूर दूर जाऊन खाली पडते. पण ती खाली येईपर्यंत पृथ्वीच्या गोलाच्याही पार जाईल इतक्या जास्त वेगाने ती सुरुवातीलाच भिरकावली गेली तर मात्र ती वस्तू पृथ्वीच्या भोवती फिरत राहील हे गणिताने सिद्ध करता येते असे न्यूटनने दाखवून दिले. चंद्रमा पृथ्वीवरून बाहेर भिरकावला गेला नसला तरी तो त्याच्या वेगाने आकाशात भ्रमण करत असतांना पृथ्वीच्या भोवती कसा फिरू लागतो हे खाली दिलेल्या चित्रावरून दिसते.
चित्रात दाखवलेल्या आकृतीमधला चंद्र एकाद्या क्षणी १ या जागी असला तर तो आडव्या सरळ रेषेत जाऊन एका सेकंदापर्यंत २ या जागी पोचेल, पण पृथ्वीने त्याला स्वतःकडे खेचल्यामुळे तो प्रत्यक्षात ३ या जागी जातो. तसेच त्या क्षणी तो बाणाने दर्शवलेल्या वाकड्या दिशेने पुढे जाऊ लागतो. अशाच प्रकारे दिशा बदलत जात तो पृथ्वीसभोवती फिरत राहतो. अखेरच्या चित्रात दाखवलेला उपग्रह जास्त वेगाने पुढे जात त्या चित्रातल्या २ या ठिकाणी जाऊ पाहतो, पण पृथ्वीच्या आकर्षणामुळे ३ या जागी येतो. पण या चित्रातली ३ ही जागा पृथ्वीच्या मध्यापासून १ च्या मानाने दूर आहे. अशा प्रकारे पुढे जात जात तो उपग्रह लंबगोलाकृती कक्षेत फिरत राहतो. हा उपग्रह १ पासून ३ वर जातांना पृथ्वीपासून दूर जातो, म्हणजे चढणीच्या मार्गावर असल्यामुळे त्याची गति कमी कमी होत जाते. काही काळानंतर तो उपग्रह पृथ्वीच्या जवळ येऊ लागतो आणि उताराला लागल्याप्रमाणे त्याचा वेग वाढत जातो. अशा प्रकारे लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणा-या ग्रहांचा आणि उपग्रहांचा वेग कमी जास्त होत असतो. या उपग्रहाचा वेग वाढवला तर त्याची कक्षा जास्त लंबवर्तुळाकार होईल हे या चित्रावरून स्पष्ट होते. कृत्रिम उपग्रहांना ते फिरत असतांनाच रॉकेट इंजिनांद्वारे जास्त ऊर्जा दिली की त्यांची कक्षा मोठी होते. मुद्दा समजण्यासाठी ही चित्रे अशा प्रकारे काढली आहेत. यातली अंतरे स्केलनुसार नाहीत.
पृथ्वीवरून भिरकावल्या गेलेल्या वस्तूचा सुरुवातीचाच वेग वाढवत जाऊन दर सेकंदाला ११.२ किलोमीटर इतका म्हणजे पृथ्वीच्या जमीनीवरल्या एस्केप व्हेलॉसिटीपर्यंत नेला तर मात्र ती वस्तू पृथ्वीपासून दूर दूरच जात राहील आणि ती कधीच परत येणार नाही असा निष्कर्ष गणितामधून काढता येतो, पण प्रत्यक्षात असे करण्यात काही महत्वाचे अडथळे आहेत. इतका मोठा वेग कसा निर्माण करायचा हा तर मुख्य प्रश्न आहेच, गुरुत्वाकर्षणाने तिचा वेग कमी होत असतो, त्याच्या बरोबर हवेचा विरोधही त्या वस्तूच्या उड्डाणाला अडथळा आणत असतो. पृथ्वीवरील वातावरणाबरोबर होणा-या घर्षणामुळे तिचा वेग कमी होत जातो. जितका वेग जास्त तितकेच हे घर्षणही जास्त असते, त्यामुळेही सुरुवातीला तो वेग भराभर कमी होत जातो. शिवाय हवेबरोबर होत असलेल्या घर्षणात खूप मोठ्या प्रमाणात ऊष्णता निर्माण होते आणि त्यात ती वस्तू जळून खाक होण्याची किंवा वितळून जाण्याची शक्यता असते. या सगळ्या कारणांमुळे अशा प्रकारे आकाशात दिसत असलेल्या चंद्राला पाहून त्या दिशेने खूप जास्त वेगाने निघून पृथ्वीपासून दूर जात थेट चंद्रापर्यंत पोचणे निदान सध्या तरी शक्य होणार नाही. मंगळ ग्रह तर चंद्रापेक्षासुद्धा खूप दूर असतो.
जेंव्हा मंगळयानाने अवकाशात झेप घेतली होती त्या काळात, म्हणजे सुमारे एक वर्षांपूर्वी मी ही लेखमाला लिहिली होती.
पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती. त्या निमित्याने त्या वेळी मी एक लेखमाला लिहिली होती. त्यात सुरुवातीला गुरुत्वाकर्षणाच्या नियमांसंबंधी सांगून झाल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून आकाशात झेप घेण्याच्या मानवाच्या प्रयत्नांची माहिती दिली होती. हवेपेक्षा जड असूनसुद्धा हवेत तरंगत पुढे जाणारी विमाने, वातावरणाला भेदून त्याच्या पलीकडे जाणारे अग्निबाण (रॉकेट्स), पृथ्वीपासून बरेच दूर जाऊनही तिच्याभोवती फिरत राहणारे अनेक प्रकारचे कृत्रिम उपग्रह (सॅटेलाइट्स) आणि चंद्रापर्यंत जाणारी याने या त्यातल्या महत्वाच्या टप्प्यांविषयी सविस्तर माहिती मी त्या लेखमालेत करून दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल. (आता हे घडले आहे)
वर्तमानपत्रांमधून या प्रयोगाची थोडी कुचेष्टा झाली आणि त्याला थोडा विरोधसुद्धा केला गेला. सगळ्याच नव्या कल्पना या चक्रातून जात असतात, हे अपरिहार्य आहे. पण या वेळी टीका करणा-यांपेक्षा अधिक लोकांनी कौतुकसुद्धा केले हे महत्वाचे आहे. काही लोकांना मात्र या बातमीचे विशेष महत्वच वाटले नाही. एकदा तुमच्याकडे मोटरगाडी आली आणि ती चालवता यायला लागली की त्यानंतर त्यात बसून मुंबईहून ठाण्याला जा, पुण्याला जा किंवा सोलापूरला जा, त्यात विशेष असे काय आहे? लागेल तेवढे पेट्रोल भरायचे आणि हवी तेवढी गाडी पळवायची! त्याच प्रमाणे एकदा आपले यान चंद्रावर गेले असल्यानंतर दुस-या यानाला मंगळावर पाठवायचे असेल तर त्यासाठी मोठे रॉकेट घ्यायचे, त्यात भरपूर इंधन भरायचे आणि त्याला मंगळापर्यंत पाठवून द्यायचे अशी अनेक लोकांची कल्पना असणे शक्य आहे. त्यासाठी तब्बल पाच वर्षे कशाला लागली? असेही त्यांना वाटले असेल
फेसबुकावरल्या माझ्या काही मित्रांनी तर हे यान इतके किलोमीटर जाणार आहे आणि त्यासाठी इतका खर्च होणार आहे वगैरेंचे त्रैराशिक मांडून दर किलोमीटरमागे फक्त बारा रुपये एवढा खर्च येणार आहे हे उत्तर काढले आणि हे मुंबईमधल्या टॅक्सीभाड्यापेक्षाही स्वस्त असल्याचे दाखवून दिले. अवकाशामधल्या (स्पेसमधील) निर्वात पोकळी(व्हॅक्यूम)मधून पुढे जात राहणा-या वाहनाला कसलाच विरोध नसतो, त्यामुळे तिथे भ्रमण करतांना ऊर्जा खर्च होत नाही आणि ती पुरवावीही लागत नाही. हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. जवळचे उदाहरण घ्यायचे झाल्यास उतारावरून सायकल चालवतांना पायाने पॅडल मारावे लागत नाही. पण सायकल रस्त्यावरच रहावी यासाठी हातांनी हँडल धरून गरज पडल्यास मनगटाच्या जोराने ते थोडेसे वळवावे लागते. जोराने पॅडल मारतांना अंगाला घाम येतो, दम लागतो तसले काही सायकलचे हॅडल वळवतांना होत नाही, कारण त्यासाठी अगदी नगण्य असे परिश्रम करावे लागतात. त्याचप्रमाणे अवकाशात पाठवलेल्या चंद्रयान किंवा मंगळयान यांनाही वेळोवेळी आपली दिशा बदलण्यासाठी जोर लावावा लागतो, त्यात थोडे इंधन ख्रर्च होते. पण रॉकेटमध्ये भरलेले बहुतांश मुख्य इंधन त्याला सुरुवातीला जमीनीवरून प्रचंड वेगाने उड्डाण करण्यातच भस्म (किंवा वाफ) होऊन जाते. त्या वेळी निघालेला त्याच्या आगीचा भयानक भडका पाहूनच याची कल्पना येईल. आणखी काही दिवसांनी पृथ्वीला टा टा, बाय बाय करून हे मंगळयान मंगळ ग्रहाला भेटायला जायला निघेल त्यानंतरचा काही कोटी किलोमीटरचा त्या यानाचा प्रवास चकटफूच होईल. मंगळाजवळ गेल्यानंतर त्याला आपला मार्ग बदलून त्याच्या कक्षेत शिरण्यासाठी पुन्हा थोडे इंधन जाळावे लागेल.
हे असे असेल, तर मग चंद्राहून शेकडोपट दूर अंतरावर असलेल्या मंगळापर्यंत पोचण्यासाठी तितक्या पटीने इंधनाचीही गरज पडत नाही. यामुळे हे काम जास्तच सोपे व्हायला पाहिजे आणि एका दृष्टीने पाहता तसे आहे. पण हा मार्गच फार वेगळा असल्यामुळे त्यातली आव्हानेही अनेकपटीने कठीण आहेत. यामुळेच जगातल्या मोजक्या प्रगत देशांनी ती आतापर्यंत पेलली आहेत. दुस-या महायुद्धानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (थोडक्यात यूएसए किंवा फक्त अमेरिका) आणि सोव्हिएट युनियन (यूएसएसआर किंवा रशिया) या दोन महाशक्ती उदयाला आल्या आणि जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपणच जास्त प्रगत आहोत असे जगाला दाखवणे हा त्या स्पर्धेचा एक भाग होता. अवकाशविज्ञानाच्या (स्पेस सायन्स) बाबतीत रशियाने सुरुवातीला थोडी आघाडी मिळवली होती. स्पुटनिक हा पहिला उपग्रह, लायका ही कुत्री आणि युरी गागारिन हा पहिला कॉस्मोनॉट यांना अवकाशात पाठवण्यात त्या देशाने पहिला मान मिळवला. १९६१ साली युरी गागारिनने अंतराळात जाऊन यायच्याही आधी १९६० सालापसून रशियाने मंगळावर यान (स्पेसक्राफ्ट) पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण पहिल्या दहा वर्षांमध्ये ते ओळीने नऊ वेळा अपयशी ठरल्यानंतर १९७१ साली त्यांचा दहावा प्रयत्न यशस्वी झाला. अमेरिकेने त्या मानाने उशीरा सुरुवात केली असली तरी दुस-याच प्रयत्नात म्हणजे १९६५ साली त्यांचे यान मंगळापर्यंत जाऊन व्यवस्थितपणे पोचले. त्यानंतर काही प्रयोगांमध्ये अमेरिकासुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आतापर्यंत मंगळावर यान पाठवण्याचे ५१ प्रयत्न केले गेले आहेत, पण त्यातल्या फक्त २१ वेळा त्यांना यश आले आहे. त्यातले युरोपियन स्पेस एजन्सीचे दोन आहेत आणि बाकीचे प्रयत्न अमेरिका किंवा रशियाचे आहेत. युनायटेड किंग्डम (थोडक्यात इंग्लंड), जपान आणि चीन या देशांना अजूनपर्यंत यश आलेले नाही. भारताचा प्रयत्न आता नुकताच सुरू झाला आहे.
हिमालयातल्या अमरनाथ गुहेमधल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन वर्षामध्ये फक्त काही दिवसच घेता येते असे म्हणतात. तो कालखंड सोडून इतर वेळी कोणीही यात्रेकरू तिथे जाऊ शकत नाही. पृथ्वीवरून मंगळावर जायचे असल्यास तिकडे सुद्धा आपल्या मनाला वाटेल तेंव्हा कधीही जाता येत नाही. आकृती क्र.१ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात, तशा परिस्थितीत ते सहज शक्य वाटते. पण या दोन ग्रहांमधले अंतर इतके जास्त आहे की ते पार करेपर्यंत काही महिने निघून जातील. तोपर्यंत ते दोघेही कुठल्या कुठे गेलेले असतील. आकृती क्र.२ मध्ये पाहिल्यास पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्यापासून खूप दूर गेलेले दिसतात, इतकेच नव्हे तर ते सूर्याच्या दोन विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे त्या यानाने मंगळाकडे जाण्यासाठी सूर्याच्या जवळून जायला पाहिजे आणि तसे गेले तर सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने ते त्याच्याकडे खेचले जाईल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचायच्या आधीच सूर्यप्रकाशामधील ऊष्णतेनेच त्याची वाफ होऊन जाईल. या सगळ्यांचा विचार करता मंगळावर जाण्याची मोहीम काही विशिष्ट कालखंडातच हाती घेणे शक्य असते. क्र.१ मध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे एका रेषेत येण्याचा योग दर दोन वर्षांनंतर येतो. प्रत्येक वेळी ते ग्रह आकृती क्र.१ मध्येच दाखवलेल्या जागीच नसतील, आपापल्या कक्षांमधल्या इतर ठिकाणी (पण एकमेकांच्या जवळ) असू शकतील. ते कुठेही असले तरी त्या सुमारासच ही मोहीम हाती घेता येते.
यापूर्वी मार्च २०१२ मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता, पण मंगळाच्या दिशेने पाठवलेली याने त्याच्या चार महिने आधी म्हणजे नोव्हेंबर २०११ मध्ये पृथ्वीवरून निघाली होती. यानंतर २०१४ च्या एप्रिल मे च्या सुमाराला पुन्हा एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्याला भेटायला पृथ्वीवरून या वर्षीच्या नोव्हेंबरपासून जानेवारी २०१४ पर्यंतच प्रस्थान करणे आवश्यक आणि शक्य आहे. या कारणामुळे या काळात भारताचे मंगळयान निघालेले आहे आणि नासाचे मॅव्हेन हे यानसुद्धा प्रस्थान करणार आहे. ही दोन्ही याने मंगळाच्या कक्षेत फिरून दुरूनच त्याचे निरीक्षण करण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. मंगळावर उतरण्याची त्यांची योजना नाही. यानंतरच्या मोहिमा सन २०१६ किंवा २०१८ मध्ये घेण्यात येतील, त्यांची तयारी मात्र आतापासून सुरू झाली आहे.
आधी चार भागात असलेल्या या लेखाचे सर्व भाग एकत्र केले दि.२८-०९-२०२०
भाग १
रात्रीच्या वेळी आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकतांना दिसतात. त्यातल्या काही ठळक व स्पष्ट दिसणा-या चांदण्यांचे तारकासमूह किंवा काँस्टेलेशन्स वगैरेंना सप्तर्षी, बिग बेअर यासारखी विशिष्ट नावे दिलेली आहेत. पूर्व आणि पश्चिम या दिशांना जोडणा-या आकाशाच्या कमानीच्या वर्तुळाकार पट्ट्याचे बारा समान भाग केले गेले आणि त्या भागातल्या तारकांमधून सुचलेल्या आकारांवरून त्यांना मेष, वृषभ आदि राशींची नावे दिली आहेत, तसेच त्या पट्ट्याचे सत्तावीस भाग करून त्यांची अश्विनी, भरणी इत्यादि नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. कुठल्याही क्षणी या पट्ट्यातला अर्धा भाग आकाशात असतो आणि उरलेला अर्धा भाग जमीनीखाली असतो. आकाशातल्या असंख्य चांदण्यांमधले पाच तेजस्वी छोटे गोल इतर सर्वांहून वेगळे दिसतात. त्यांच्या प्रकाशमय ठिपक्यांचा आकार इतर चांदण्यांच्या तुलनेत किंचित मोठा असतो, त्यांचे चमकणारे तेज स्थिर असते, ते लुकलुकत नाहीत आणि मुख्य म्हणजे ते कोणत्याही नक्षत्र किंवा राशीचा कायमचा भाग नसतात, निरनिराळ्या काळात ते वेगवेगळ्या राशींमधील इतर तारकांच्या जवळ आलेले आणि त्यांच्यापासून दूर जातांना दिसतात. एका राशीमधून ते आरपार पलीकडे दुस-या राशीत जातात आणि असेच पुढे पुढे जात राहून बाराही राशींमधून भ्रमण करत राहतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे अगदी प्राचीन काळामध्येच त्यांची ‘ग्रह’ या नावाने वेगळी गणना केली. ‘ग्रह’ या शब्दाला ‘प्लॅनेट’ हा आता रूढ असलेला अर्थ त्या काळात प्राप्त झालेला नव्हता. आकाशात दिसणारा सूर्य हा तारा आणि चंद्र हा उपग्रह यांनासुद्धा पूर्वी ‘ग्रह’च म्हंटले जात होते. ते दोन मोठे प्रकाशमान गोल आणि मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनि हे पाच त्यांच्या मानाने लहान दिसणारे ग्रह यांची नावे दिवसांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला. .
सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यामधून दिवस व रात्र निर्माण होतात हे सगळ्यांना ठळकपणे जाणवत असते. दिवसाचा कालावधी सहा महिने रोज कमी कमी होत असतो, पण त्याच वेळी रात्रीचा कालावधी वाढत असतो. यामुळे दिवस आणि रात्र मिळून चोवीस तास किंवा साठ घटिका एवढा संपूर्ण दिवसाचा काल मात्र कायम असतो. त्यानंतर पुढील सहा महिने दिवसाचा कालावधी रोज वाढत जातो आणि त्याच वेळी रात्रीचा कालावधी कमी कमी होत असतो. या सहा सहा महिन्यांच्या भागांना मिळून वर्षभराचा काळ ठरवला गेला. अमावास्येच्या दिवशी चंद्र सूर्याच्या सोबत असल्यामुळे आणि त्याची पाठ पृथ्वीकडे झाल्यामुळे तो दिसतच नाही, त्यानंतर तो रोज आभाळात दिसणा-या सूर्यबिंबापासून थोडा थोडा दूर जातो, म्हणजे सूर्यास्तानंतर जास्त जास्त वेळ आभाळात दिसत राहतो, तसेच त्याचा आकार कलेकलेने वाढत जातो. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्य नावळत असतांना पूर्वेच्या क्षितिजावर पूर्ण गोलाकृती चंद्र उगवतो आणि रात्रभर उजेड देत राहतो. त्यानंतर तो रोज थोडा थोडा वेळ उशीराने उगवत जातो तसेच कलेकलेने लहान होत जातो. चंद्राच्या या बदलत्या रूपावरून महिन्यामधली तिथी समजते. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणावरून कालगणना ठरवली गेली.
पण माणसाचे सरासरी आयुष्य आणि स्मरणशक्ती यापेक्षा दीर्घकाळ असते. त्यामुळे त्याच्या आयुष्यातली एकादी घटना किती वर्षांपूर्वी होऊन गेली हे समजण्यासाठी त्याला इसवी सन, शालिवाहन शक, विक्रम संवत वगैरेंचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या आधाराशिवाय वर्षांची गणना करण्याची सोय निसर्गामध्ये अस्तित्वात आहे. चंद्रमा आपली आकाशातली जागा भराभर बदलत असल्याने एका राशीत फक्त सव्वादोन दिवस असतो, तर सूर्याला एक राशी पार करून पुढे जायला एक महिना लागतो. गुरू ग्रहाला यासाठी एक वर्ष आणि अत्यंत संथपणे म्हणजे शनैःशनै चालणा-या शनीला तब्बल अडीच वर्षे लागतात. याचा अर्थ गुरू आणि शनि हे ग्रह आज ज्या राशीमध्ये दिसतात तिथे पुन्हा परत यायला अनुक्रमे बारा आणि तीस वर्षे लागतात. त्यामुळे जन्म, मृत्यू, विवाह, राज्याभिषेक यासारख्या महत्वाच्या प्रसंगी हे ग्रह कोणत्या राशींमध्ये होते याची नोंद ठेवलेली असल्यास ती घटना गेल्या बारा वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या गुरूच्या ठिकाणावरून आणि गेल्या तीस वर्षांमध्ये कधी घडली हे आजच्या शनीच्या ठिकाणावरून समजू शकते. या दोघांचा संयुक्तपणे विचार केल्यास मागील साठ वर्षांपर्यंत जाता येते. हा आकडा सामान्य माणसासाठी पुरेसा आहे.
अशा प्रकारे गुरू आणि शनि या ग्रहांचासुध्दा कालगणनेसाठी चांगला उपयोग होतो. बुध हा ग्रह सूर्याच्या अगदी मागे पुढे फिरत असल्यामुळे तो दिसलाच तर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर अगदी थोड्या वेळाकरता क्षितिजाजवळ दिसतो. यामुळे त्याचा कालगणनेत काही उपयोग नसतो. हा ग्रह पूर्णपणे उपेक्षित असाच म्हणावा लागेल कारण त्याची कशातच खिजगणती होत नाही. कोणाच्या बोलण्यातही कुठल्याही संदर्भात त्याचा कधी उल्लेख आलेला मला ऐकल्याचे आठवत नाही. शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ असे एका सुप्रसिद्ध कवितेत म्हंटलेही आहे. शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.
राहता राहिलेला मंगळ हा ग्रह एकाद्या उनाड मुलाप्रमाणे वागतांना दिसतो. तो कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त झालेला असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या भ्रमणामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. त्याचा आकाशमार्गावरला प्रवास बराच गुंतागुंतीचा असला तरी विद्वान निरीक्षकांनी तो समजून घेतला आणि त्याची गणिते ठरवून घेतली. मंगळाच्या या काहीशा अनियमित प्रवृत्तीमुळे त्याचाही कालगणनेत काही उपयोग होत नाही. मंगळ या ग्रहाची ही वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून पाहिली गेली आहेत. आकाशातला हा एकच ग्रह तांबूस रंगाचा असा वेगळा दिसतो. हिंदू संस्कृतीनुसार लाल हा शुभ आणि मांगल्याचा प्रतीक असलेला रंग असल्यामुळेच कदाचित या ग्रहाचे नाव ‘मंगल’ असे ठेवले गेले असावे. वारांची नावे ठेवतांना सूर्य आणि चंद्र या मोठ्या आकाराच्या दिसणा-या गोलकांच्या पाठोपाठ मंगळाचे नाव ठेवले गेले.
पण पुराणातल्या नवग्रहांमध्ये मंगळाला फार मोठ्या मानाचे स्थान दिले गेले नसावे. बृहस्पती (गुरू) आणि शुक्राचार्य (शुक्र) हे अनुक्रमे देव आणि दानव यांचे गुरू होते आणि त्यांना मार्गदर्शन करून बलवान करत होते, त्यांचा उल्लेख अनेक कथांमध्ये येतो. शनीच्या अवकृपेला सगळेजण भीत असत. त्याच्या कहाण्याही पुराणांमध्ये येतात. त्याला तर देवच मानून त्याची देवळे उभारली गेली आणि अनेक भाविक लोक आजही अत्यंत भक्तीभावाने त्याची आराधना करत असतात. बिचारा बुध पुराणातही कुठे डोकावत नाही की आजही त्याची पूजा करणारा कोणता संप्रदाय नाही. तरी तोसुध्दा श्रावण महिन्यातल्या जिवतीच्या पटात मात्र हत्तीवर बसलेल्या राजस रूपात आपले दर्शन देऊन जातो. मंगळाचे मात्र कुठलेही चित्र किंवा विशिष्ट आकाराची मूर्ती मला दिसली नाही. त्याचे वेगळे देऊळही मी अद्याप पाहिलेले नाही की त्याची कोणती कथा ऐकली नाही. अनेक मोठ्या देवळांमध्ये एक नवग्रहांचे पॅनेल असते, त्यात तो तिस-या क्रमांकावर गर्दीत बसलेला पुसटसा दिसतो. इंटरनेटवर या देवतेची काही चित्रे मिळाली.
नवग्रहस्तोत्रामधील तिस-या श्लोकात मंगळाचे वर्णन असे केले आहे. धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणाम्यहम् ।। ३ ।। ‘धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.’ असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकातल्या ‘पृथ्वीपासून मंगळाची उत्पत्ती झाली होती’ या कल्पनेवर मात्र कधीच आणि कोणीही भर दिलेला दिसत नाही.
आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीच्या काळात मंगळ या ग्रहावरून ‘मंगळवार’ हे आठवड्यातल्या एका दिवसाचे नाव ठरवले होते. पण आज एकाद्या तरी मंगळवारी किती लोकांना त्या मंगळ ग्रहाची आठवण येते? भाविक लोकांना दर मंगळवारी मंगलमूर्ती मोरया आठवतो. त्या दिवशी ते गणपतीची पूजा, प्रार्थना, आराधना करतात, वेळात वेळ काढून त्याच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येतात. एकादी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेंव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणतात आणि त्या व्रताचे महात्म्य त्या वेळी अनेकपटीने वाढते. त्या दिवशी तर भल्या पहाटे उठून प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रांग लावणा-या लोकांची संख्या हजारोंमध्ये असते, कदाचित आता ती लक्षांमध्ये गेली असेल. पण ‘अंगारक’ हा शब्द अंगार किंवा निखारा यावरून आला असून लाल रंगाच्या मंगळ ग्रहाचे ते एक नाव आहे ही माहिती त्यातल्या किती लोकांना असते? श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. नवीन लग्न झालेल्या मुलींची पहिली मंगळागौर तर हल्ली एकाद्या हॉलवर गाजावाजा करून आणि अनेक आप्तेष्टांना आमंत्रण देऊन एकाद्या मंगल कार्यासारखी मोठ्या थाटामाटात साजरी होते. एरवीसुद्धा दर मंगळवार आणि शुक्रवारी अंबाबाईच्या देवळात दर्शन घ्यायला येणा-यांची गर्दी जरा जास्त असते. या सगळ्यात ‘मंगळ’ हा ग्रह मात्र कुठेच नसतो.
फक्त मंगळच नव्हे तर बुध, गुरू वगैरे आकाशातल्या कुठल्याच ग्रहाबद्दल आजकालच्या लोकांना फारशी उत्सुकता वाटत असावी असे दिसत नाही. शाळेत शिकतांना केंव्हातरी सूर्यमालिकेवर एकादा धडा शिकलेला असतो आणि ‘बॉर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट’ किंवा ‘कौन बनेगा करोडपती’ यासारख्या एकाद्या कार्यक्रमात त्याबद्दल एकादा प्रश्न विचारला जातो तेंव्हा त्याचे नाव कानावर पडते यापलीकडे कोणाचाच आकाशातल्या ग्रहांशी कधीही संबंध येत नसावा. खगोलशास्त्रामध्ये (अॅस्ट्रॉनॉमीत) रस घेणारे लोक संख्येने कमी आहेत. मुद्दाम प्रयत्न करून रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांमधून या ग्रहांना शोधून त्यांचा मागोवा घेणारे उत्साही लोक मला तरी फारच क्वचित वेळा भेटले आहेत. हिल स्टेशनवर फिरायला वगैरे गेले असतांना रात्रीच्या वेळी एकादा ग्रह कोणाला अचानक आकाशात दिसला तर त्याला तो ओळखता तरी येईल की नाही याची शंका आहे. दिवसेदिवस वाढत चाललेला रात्रीच्या वेळचा पृथ्वीवरील कृत्रिम उजेड आणि हवेमधील धुळीचे व धुराचे कण यामुळे वातावरणात येत असलेला धूसरपणा यामुळे रात्रीच्या निरभ्र आकाशात चमचमणारे ग्रहतारे अधिकाधिक निस्तेज आणि फिकट होत चालले आहेत. त्यांना पाहण्याचे आकर्षण वाटेनासे झाले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधल्या काँक्रीटच्या जंगलातल्या घरांच्या खिडक्यांमधून आकाशाचा एक सहस्रांश भागसुद्धा दिसत नाही. नेमक्या तेवढ्याशा तुकड्यात येऊन कोणता ग्रह आणि किती तारे दर्शन देणार आहेत?
माणसाला नेहमीच अज्ञाताची भीती वाटत असते असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. आकाशात घडत असलेल्या घटना आदिमानवाच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे सू्र्य, चंद्र, ग्रह, तारे, पर्जन्य, वीज या सगळ्यांपासून त्याला प्रचंड भय वाटत असे. त्यांना अज्ञात आणि अचाट शक्तीरूपी देव मानून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करायला लागला. विज्ञानामधील प्रगतीमुळे निसर्गाच्या या रूपांविषयी अधिकाधिक माहिती मिळत गेल्यानंतर त्याची भीती कमी होत गेली आणि त्यांना निरखून पाहून समजून घेण्याचे धैर्य तो करायला लागला. पण ग्रहांच्या बाबतीतली जवळीक संपुष्टात आल्यामुळे कित्येक लोक आता पुन्हा आदिमानवाप्रमाणे त्यांना घाबरायला लागले आहेत असे वाटते. याचा लाभ घेण्याचे प्रयत्न अर्थातच हुषार लोक करणारच.
बहुतेक माणसे आता प्रत्यक्षातल्या ग्रहांबद्दल अशी उदासीन झाली असली तरी त्या ग्रहांची नावे मात्र वेगळ्याच प्रकारे रोज आपल्या कानावर पडत असतात किंवा नजरेसमोर येत असतात. आजकाल कुठलेही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक घेऊन पहा, बहुतेक वेळा त्यात कुठे तरी राशीभविष्य दिलेले असतेच. काही लोक तर हातात अंक पडला की सर्वात आधी त्या पानावर जातात. टेलिव्हिजनच्या बहुतेक वाहिन्या भविष्याचा रतीब रोजच्या रोज घालत असतात. ते सांगणारी अनेक तज्ज्ञ मंडळी आजकाल जागोजागी आपापली दुकाने मांडून बसली आहेत आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी आधीपासून अॅपॉइंटमेंट घेऊन जावे लागते. पटावर सोंगट्या मांडाव्यात तशा प्रकारे ही तज्ज्ञ मंडळी कुंडलीच्या बारा घरात नऊ ग्रहांना मांडून ठेवतात आणि त्यातले ग्रह यथावकाश एक एक घर पुढे सरकवत असतात. त्यातला प्रत्येक ग्रह जिथे असेल तिथून अलीकडे, पलीकडे, तिस-या, पाचव्या, आठव्या वगैरे इतर सर्व घरांपैकी कोणावर आपली मेहेरनजर किंवा कोणावर वक्रदृष्टी ठेऊन त्यातून काही तरी उत्पात घडवून आणत असतो. एकाच वेळी निरनिराळ्या घरांकडे पाहण्याची त्याची दृष्टी वेगवेगळी असते आणि उडी मारून तो ग्रह पुढच्या घरात गेला की लगेच सगळ्याची उलटापालट होते, एकादा ग्रह नव्या घरात जाऊन आनंदित होतो, तर एकादा रुष्ट होतो, उत्साही होतो किंवा वैतागतो वगैरे सुरस आणि चमत्कृतीपूर्ण गप्पा मारून त्यात ऐकणा-याला गुंगवून ठेवण्यात आणि त्यांच्या मनात ग्रहांविषयी भीती निर्माण करण्यात ते ज्योतिषी लोक पटाईत असतात.
खगोलशास्त्राचा विचार केला तर आकाशातला फक्त एक चंद्रच तेवढा दर दोन किंवा तीन दिवसांनी एका राशीमधून निघून दुस-या राशीत जातो, सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह महिन्यातून एकदा पुढील राशीत सरकतात, गुरू आणि शनि एकेका राशीमध्ये अनुक्रमे एक वर्ष आणि अडीच वर्षे इतका दीर्घ काळ मुक्काम ठोकून बसलेले असतात आणि मंगळाच्या बाबतीत थोडी अनिश्चितता असली तरी तोसुद्धा दीडदोन महिने तरी एका राशीत वास्तव्य करत असतो. असे असतांना हे ज्योतिषाचार्य मात्र रोजच्या रोज किंवा दर आठवड्याला आपली भाकिते बदलत असतात आणि अमक्या तमक्या ग्रहांच्या भ्रमणामुळे ती बदलत असल्याचेही सांगतात.
शिक्षणाचा आणि विशेषतः विज्ञानाचा प्रसार वाढला की लोकांच्या अंधश्रद्धा आपोआप कमी होतील असे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या थोर समाजसुधारकांना वाटत होते. आता साक्षरता भरपूर वाढली असली तरी तिच्या सोबतीने किंवा कदाचित तिच्या आधाराने फलज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई, न्यूमरॉलॉजी, टॅरॉट वगैरे अनेक तथाकथित ‘विद्या’ जास्तच फोफावत चालल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आणलेल्या टेलिव्हिजनमधून त्या घरोघर पोचत आहेत आणि जास्तच लोकप्रिय होत आहेत. मुख्यतः विज्ञानाच्या अभ्यासासाठी म्हणून तयार झालेल्या संगणकांचा उपयोग करून या तथाकथित ‘शास्त्रां’च्या कामासाठी निरनिराळे खास सॉफ्टवेअर निघाले आहेत. कोणाचीही जन्मतारीख व वेळ सांगितली की आजचे ज्योतिषी लोक त्यांच्या काँप्यूटरवरून चार पाच प्रकारच्या कुंडल्या आणि दहाबारा पानांचे त्याच्या नावासकट भविष्य असलेले सुबक प्रिंटआउट काढून ते आकर्षक फोल्डरमध्ये घालून हातात देतात. ते घेणारे लोकसुद्धा आपल्याला अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनामधून निघालेले ‘लेटेस्ट प्रॉडक्ट’ मिळाले आहे या भावनेने खूष होतात. शिवाय ‘व्हायब्रेशन्स’, ‘एनर्जी’, ‘नॅचरल फ्रिक्वेन्सी’, ‘वेव्ह लेन्ग्थ’, ‘रेझॉनन्स’ यासारखे फिजिक्समधले आणि ‘सिनर्जी’, ‘सिम्बियॉटिक’ यासारखे वजनदार इंग्रजी शब्द आजकालचे ‘गुरू’ लोक आपल्या बोलण्यात अशा खुबीने पेरत असतात की शिकल्या सवरल्या लोकांचासुद्धा त्यांच्या सांगण्यावर आणि विद्वत्तेवर प्रचंड विश्वास बसावा.
भविष्य वर्तवणा-या निरनिराळ्या विद्वान लोकांचे होरे अनेक वेळा वेगवेगळे दिसतात, एकाच दिवसाची चार वर्तमानपत्रे पाहिली तर त्यात चार दिशांना जाणारी भाकिते दिसतात, पण मंगळ या ग्रहाच्या बाबतीत मात्र बहुतेक सगळ्या ज्योतिषशास्त्रतज्ज्ञांचे बहुतेक वेळा एकमत असलेले दिसते. खरे तर मंगळ हा ग्रह त्याच्या नावाप्रमाणे शुभ, मंगलकारक, आनंददायी, लाभदायी वगैरे चांगला उपकारक ग्रह असायला हवा. पण ज्योतिषाचार्यांनी मात्र त्याला सर्रासपणे ‘पापग्रह’ असे ठरवलेले दिसते. त्यामुळे जास्त करून त्याची भीतीच घातली जाते. त्यातल्या त्यात तो कधी सौम्य असेल किंवा दाहक असेल, पण प्रेमळ आणि हितकारक मात्र सहसा कधी असणार नाही असा समज मंगळाच्या बाबतीत उगाचच पसरवला गेला आहे. लग्न ठरवतांना तर मंगळाला एकदम अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. वर आणि वधू यांच्या जन्मपत्रिका पाहून त्या जुळवण्याचा प्रघात कधीपासून सुरू झाला आणि तो भारतातल्या कोणकोणत्या भागात कशा प्रकारे पाळला जातो कोण जाणे, पण मला समजायला लागल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी त्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ आहे की नाही हे आधी पाहतात. प्रत्येक जन्मकुंडलीमध्ये कुठल्या तरी घरात मंगळ असतोच, पण विशिष्ट चौकोन किंवा त्रिकोणात तो बसलेला असला तर “त्या व्यक्तीला मंगळ आहे” असे म्हणतात आणि इतरत्र असल्यास “त्याला मंगळ नाही” असे मानतात. मग त्याच्या किंवा तिच्यासाठी ‘मंगळ’ असलेलाच किंवा नसलेलाच जोडीदार शोधणे वगैरेमुळे अनेक चांगली स्थळे कटाप होतात. संख्याशास्त्रानुसार सुमारे ४० टक्के लोक ‘मंगळी’ आणि ६० टक्के ‘अमंगळी’ असतात. त्यामुळे मंगळ असलेल्यांना थोडा जास्त शोध घ्यावा लागतो. विशेषतः ‘मंगळी’ मुलीचे वडील जास्तच बेजार होतात. मुलीला ‘मंगळ’ असल्याकारणाने वारंवार नकार मिळालेल्या एका मुलीचे पिताश्री इतके वैतागले की त्यांनी मुलीच्या पत्रिकेची कॉपी काढतांना त्यातले ‘मं’ हे अक्षरच गाळून टाकले म्हणे. कुंडलीचा अर्थच बहुतेक लोकांना माहीत नसतो यामुळे यातला विनोदही त्यांच्यासाठी ‘बंपर’ असेल.
आजकाल अधिकाधिक मुले आणि मुली आपापसातच लग्न जमवायला लागली असल्यामुळे पत्रिका पाहणे, त्या जुळवणे वगैरेचे प्रमाण बरेच कमी झाले आहे, त्यामुळे मंगळाचा प्रभाव आणि भावही ओसरत चालला आहे. पुढे त्या दांपत्याचा संसार व्यवस्थित चालला तर कोणीही कसलीही चौकशी करत नाही. पण काही कारणाने त्यांच्यात काही बिनसले तर मात्र त्यांच्यातल्या एकाचे किंवा दोघांचेही आईवडील त्यांच्या कुंडल्या किंवा जन्मतारखा घेऊन आपापल्या तथाकथित तज्ज्ञांकडे धाव घेतात आणि योगायोगाने त्यांचे ‘मंगळ अमंगळ’ जुळत नसले तर सगळे खापर बिचा-या मंगळावर फोडून मोकळे होतात.
आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्यासारख्या महान भारतीय विद्वान शास्त्रज्ञांनी ग्रहांच्या आकाशमार्गावरील भ्रमणाचे विस्तृत आणि सूक्ष्म निरीक्षण केले होते आणि त्यावर चिंतन, मनन वगैरे करून काही महत्वाचे निष्कर्ष काढले होते, सिद्धांत मांडले होते आणि ते ग्रंथरूपात लिहून ठेवले होते. यातल्या कोणीतरी किंवा कदाचित सगळ्यांनीच मंगळाबद्दलसुद्धा काही माहिती लिहिली आहे असे म्हणतात. ते नेमके काय होते याची मला कल्पना नाही आणि मंगळ ग्रह म्हणजे दगडमातीचा एक प्रचंड आकाराचा निर्जीव गोळा अंतराळातल्या आपल्या ठराविक कक्षेत फिरत असतो असे त्यामधून ध्वनित होते किंवा नाही हे ही मला माहीत नाही. या शास्त्रज्ञांचे विचार लोकांपर्यंत पोचले असते तर बरे झाले असते. मंगळाला किंवा कोणत्याच ग्रहाला नाक, कान, डोळे, मेंदू, हृदय वगैरे कसलेही अवयव नसतात, त्यामुळे त्यांना राग, लोभ, आनंद, दुःख वगैरे काही होत नाही, त्यातले कोणीही कपट कारस्थान करून आपला घात करू शकत नाही किंवा प्रसन्न होऊन आपल्याला धनलाभ, पुत्रप्राप्ती वगैरे करून देत नाही ही वस्तुस्थिती लोकांना कळली असती, कोणीही कोणाला मंगळाचा धाक घालू शकला नसता, कोणीही त्यामुळे भयभीत झाला नसता आणि कोणीही आपल्या चुकीचा दोषही त्या आकाशातल्या मंगळाला दिला नसता.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
मंगल मंगळ – भाग ३
माझ्या लहानपणी घरात टीव्ही नव्हता आणि शाळेत होमवर्क देत नसत. रात्रीची जेवणे आठ साडेआठपर्यंत उरकायची आणि लगेच निजायची तयारी सुरू व्हायची. पाऊस किंवा कडाक्याची थंडी नसली तर मुलांची अंथरुणे गच्चीवर घातली जायची आणि अंथरुणावर पडूनच गप्पा गोष्टी, थट्टामस्करी करत आम्ही झोपी जात होतो. काळ्याशार आभाळात चमचमणा-या चांदण्याच तेवढ्या डोळ्यासमोर असत. त्यातले ठळक दिसणारे ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे वगैरेंची नावे विचारून आणि ऐकून घेतली होती. रोजच्या पाहण्यातून त्यांची उजळणी होऊन त्यातली बहुतेक नावे लक्षात राहिली होती. गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या भागातली माणसे नेहमी जशी रोज पाहून आपल्या ओळखीची होतात, कुठल्या घरात कोण माणसे राहतात ते ठाऊक असते, त्याप्रमाणे सगळे ग्रह माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातला मंगळ ग्रह रोज केंव्हा उगवतो, केंव्हा माथ्यावर येतो आणि केंव्हा मावळतो? वगैरेची सर्वसाधारण माहिती असायची. पण या काळात तो अमक्याच राशीत का असतो? किंवा तो पुढे सरकत काही काळाने वेगळ्या राशीत का जात असतो? अशा प्रकारचे प्रश्न तेंव्हा पडत नसत. एका सर्वसामान्य लहान मुलाकडून ते अपेक्षित नव्हतेच.
पण खूप प्राचीन काळापासूनच जगभरातल्या अनेक विद्वान आणि कर्तृत्ववान लोकांनी अतीशय चिकाटीने आणि बारकाईने आकाशातल्या ग्रह ता-यांचे आयुष्यभर निरीक्षण केले. काही विशिष्ट उपकरणांचा उपयोग करून त्या ग्रहांच्या आकाशातल्या स्थानांची अत्यंत सूक्ष्म अशी मोजमापे त्यांनी निरनिराळ्या वेळी घेतली, त्यातून मिळालेल्या आकड्यांवरून काळ काम वेगाची गणिते मांडली आणि त्यातून त्या ग्रहांच्या आकाशामधल्या भ्रमणासंबंधीची सूत्रे आणि कोष्टके तयार केली. भविष्यकाळात कोणता ग्रह कोणत्या जागी केंव्हा जाईल याचा अंदाज त्या माहितीच्या आधाराने त्यांना करता येऊ लागला आणि प्रत्यक्ष निरीक्षणावरून तो बरोबर असल्याची खात्री करून घेणे शक्य झाले. अशा रीतीने खगोलशास्त्राचा (अॅस्ट्रॉनॉमीचा) विकास होत गेला. त्याच काळात जमीनीवर घडत असलेल्या मुख्य घटनांची आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी सांगड घातली जाऊ लागली आणि यातून होरा किंवा फलज्योतिषशास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) तयार झाले. आकाशातले ग्रह अमक्या अमक्या ठिकाणी असल्यामुळेच जमीनीवर त्या घटना घडल्या असेही समजले जाऊ लागले आणि त्याच्या आधाराने भविष्यवाणी केली जाऊ लागली, शुभ अशुभ लाभदायक, हानीकारक वगैरे संकल्पना रूढ होत गेल्या. पुढल्या कालखंडात भारतात तेच शास्त्र अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आणि आकाशातल्या ग्रहता-यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे खगोलशास्त्र मात्र मागे पडले. मंगळ हा आकाशात भ्रमण करणारा लाल रंगाचा सुंदर ग्रह न राहता कुंडलीतला उपद्रवकारी पापग्रह ठरला.
कोपरनिकसने सूर्यमालिकेची कल्पना मांडली, केपलर आणि गॅलीलिओने ती निर्भयपणे आणि खूप त्रास सोसून ठामपणे जगापुढे ठेवली आणि न्यूटनने त्याला वैचारिक बैठक दिली. हे सगळे मी एका वाक्यात लिहिले असले तरी त्यात सुमारे दोनशे वर्षांचा कालखंड गेला. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर मात्र आकाशातल्या इतर ग्रहता-यांबरोबरच मंगळाचेही निरीक्षण करण्याला वेग मिळाला. अधिकाधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार करण्यात आल्या आणि मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील पर्वत, डोंगर, द-याखोरी वगैरेंचे लहानसहान तपशीलसुद्धा पहाता आले. निरनिराळ्या प्रकारची इतर उपकरणेही तयार होत गेली आणि मंगळावरील दृष्य माहितीशिवाय तिथल्या निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळ्या वेळचे तपमान (टेंपरेचर), तिथल्या दगडमातीमधील तसेच तिथल्या वातावरणातले रासायनिक घटक (केमिकल काँपोझिशन) आणि त्यांची मूलतत्वे (एलेमेंट्स) अशी अनेक प्रकारची अद्भुत माहिती पुढील संशोधनामधून मिळत गेली.
पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा पृष्ठभागसुद्धा खडकाळ जमीनीने व्यापलेला आहे, तिथे वातावरणसुद्धा आहे, पण ते अत्यंत विरळ आहे आणि त्यात मुख्यतः कार्बन डायॉक्साईड हा वायू आहे. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा किंचित जास्त असल्यामुळे भूमितीच्या नियमानुसार त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे पाव हिश्श्याहून थोडेसे जास्त आणि घनफळ एक अष्टमांशाहून जास्त म्हणजे सुमारे एक सप्तमांश इतकेच आहे आणि त्याची घनतासुद्धा पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या एक नवमांश इतके कमी आहे. यामुळे मंगळाच्या जमीनीवरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरच्या मानाने सुमारे तीन अष्टमांश इतकेच आहे. असे असले तरी हिमालयाहूनसुद्धा उंच असे पर्वत त्यावर आहेत आणि खूप मोठमोठे खोल खळगे आणि द-याही आहेत, पण सध्या तरी तिथल्या जमीनीवर वाहणारे द्रवरूप पाणी अस्तित्वात नसल्यामुळे त्या खळग्यांचे महासागर झालेले नाहीत. तिथे समुद्रच नसल्यामुळे समुद्रसपाटी कशी ठरवणार? एका सरासरी पृष्ठभागाची कल्पना करून त्याच्या तुलनेत पर्वत किती उंच आहेत आणि मोठाले खळगे किती खोल आहेत ते ठरवले जाते. मंगळाच्या जमीनीवरील खडकांमध्ये अनेक भागात लोखंडाचे खनिज (हेमेटाइट) असल्यामुळे आपल्याला हा ग्रह लालसर दिसतो, पण दुर्बिणीमधून पाहिल्यास पिवळी, सोनेरी, करडी. हिरवट वगैरे अनेक रंगाच्या छटा त्याच्या इतर भागात दिसतात. मंगळावर ज्वालामुखी पर्वत आणि वाळवंटेही आहेत, पण सगळा ग्रहच ओसाड असतांना कशाला वाळवंट म्हणतात कोण जाणे ! कदाचित त्या भागात खडक नसतील, चहूकडे बारीक वाळू किंवा मातीचे थर पसरलेले असतील.
पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालत असतो. मंगळावरचा (त्याने स्वतःभोवती फिरण्याचा) एक दिवस साधारणपणे आपल्या २४ तासांहून फक्त सुमारे अर्धा तास जास्त एवढाच असतो, यामुळे मंगळावर होणारे दिवस आणि रात्रसुद्धा साधारणपणे आपल्या एवढेच असतात. पण हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या मानाने बराच म्हणजे जवळ जवळ दीडपट दूर असल्यामुळे त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मात्र पृथ्वीच्या जवळ जवळ दुप्पटीपेक्षा थोडा कमी इतका वेळ लागतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा आंस (अॅक्सिस) सुद्धा त्याच्या कक्षेशी कललेला असल्यामुळे मंगळावरही दिवस आणि रात्र लहान मोठे होत राहतात आणि उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतू असतात. तिथल्या जमीनीवर समुद्र, नद्या, तलाव किंवा पाणीच नसल्यामुळे त्यांचेपासून ढगही होत नाही, पाऊसही पडत नाही आणि त्यामुळे तिथे पावसाळा मात्र नसतो. मंगळाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुवदेखील नेहमी पार गारठलेले असतात आणि ते मात्र पाण्याच्या बर्फाने आच्छादलेले आहेत आणि त्यावर सुका बर्फ (ड्राय आईस) म्हणजे गोठलेला कार्बन डायॉक्साइड वायू या पदार्थाचे काही थरही असतात. मंगळाला सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि ऊष्णता पृथ्वीच्या मानाने अर्ध्याहूनही कमी असल्यामुळे तिथल्या इतर भागातले सरासरी तपमानसुद्धा शून्य अंशाच्या खूप खाली असते. त्यामुळे तिथे द्रव स्वरूपातले पाणी सहसा मिळणार नाही. याचा अर्थ मंगळावर पाणी आहे, पण ते गोठलेल्या रूपात असते आणि मुख्यतः त्याच्या ध्रुवांजवळ आहे आणि कदाचित त्याचे साठे जमीनीखाली दडले असावेत अशीही शंका आहे. तिथल्याही हवेत पाण्याची थोडीशी वाफ असते आणि तिचेही गोठून हिमकण बनलेले ढग मंगळावर दिसतात.
दर वर्षी हिवाळ्यात हिमालयातल्या शिखरांवर बर्फ साठत जाते आणि उन्हाळ्यात ते वितळल्यामुळे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांना पूर येतात. मंगळ ग्रहाच्या ध्रुवप्रदेशातसुध्दा वर्षातला अर्धा भाग दिवस आणि अर्धा भाग रात्र असते. मंगळावरचे हे अर्धे वर्ष आपल्या दहा बारा महिन्यांइतके दीर्घकाळ असते. त्यातल्या उन्हाळ्यात सतत पडणा-या सूर्यकिरणांमुळे सुक्या बर्फाचे काही थर वितळून त्यातला कार्बन डायॉक्साईड वायू तिथल्या वातावरणात मिसळतो आणि हिवाळ्यात याच्या उलट हवेतला हा वायू गोठून ध्रुवप्रदेशात साठत जातो.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
मंगल मंगळ – भाग ४
शंभर वर्षांपूर्वी मंगळ या ग्रहासंबंधी जास्त तपशीलवार माहिती मिळालेली नव्हती, पण मंगळावरसुद्धा दिवस-रात्र, उन्हाळा-हिंवाळा, जमीन-वातावरण वगैरे असल्यामुळे हा ग्रह बराचसा पृथ्वीसारखा आहे एवढे नक्की झाले होते. त्यामुळे तिथेसुद्धा जीवसृष्टी निर्माण झाली असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी वर्तवली आणि विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) लिहिणा-यांच्या प्रतिभेला पंख फुटले. त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आला आणि मंगळावरील काल्पनिक प्राण्यांच्या जीवनावरील कथाकादंब-यांचा पाऊस पडायला लागला. मंगळावरचे हे जीव माणसासारखेच असतील का? त्यांनासुद्धा नाक, कान, डोळे, हातपाय वगैरे अवयव असतील का? असल्यास किती असतील? त्यांना कदाचित वेगळ्याच प्रकारचे अवयव असतील आणि त्यातून आपल्याला माहीतही नसलेल्या वेगळ्याच संवेदना मिळत असतील का? त्यांनाही मेंदू, हृदय, बुद्धी आणि मन असेल का? त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा जास्त विकसित असेल का? ते सुद्धा पृथ्वीवर काय चालले आहे याबद्दल विचार करत असतील का? त्यांना आपल्याबद्दल काही माहिती असेल का आणि ती किती असेल? असे एक ना दोन, शेकडो प्रश्न उभे करून त्यांची आपापल्या मनाने आणि कल्पनेनुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला. उडत्या तबकड्यांमध्ये बसून ते पृथ्वीवर येऊन गेल्याच्या वावड्यासुद्धा अनेक वेळा उठल्या.
दुर्बिणीतून मंगळाची पहाणी करत असतांना शास्त्रज्ञांना त्याच्या पृष्ठभागावर काही सरळ रेषा दिसल्या. निसर्गातल्या नद्या, नाले, नैसर्गिकरीत्या तयार होणारी द-याखोरी, यासारख्या गोष्टी पृथ्वीवर तरी कुठेच अशा सरळ रेषेत नाहीत. जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये त्या वेडीवाकडी वळणे घेतांना दिसतात, मग मंगळावर तरी त्या सरळ रेषेत कशा असू शकतील? तिथल्या बुद्धीमान जीवांनी किंवा महामानवांनी मुद्दाम खणून तयार केलेले हे प्रचंड आकाराचे कालवे असू शकतील असे पिल्लू कोणी तरी सोडले आणि मंगळवासीयांबद्दलचे कुतूहल जास्तच वाढले. ही अफवासुद्धा निदान काही दशके चालली. या सगळ्या रेषा मंगळावरील भूमीवर प्रत्यक्षात अस्तित्वात नसून तो एक प्रकारचा दृष्टीभ्रम होता हे नंतर झालेल्या संशोधनामधून सिद्ध झाले. याचा अर्थ फक्त पृथ्वीवरच मृगजळ दिसत नाही, अगदी मंगळावरसुद्धा एक प्रकारचे मृगजळ दिसले आणि त्याने भल्याभल्या शास्त्रज्ञांना चकवले म्हणायचे!
एकादा मनुष्य अत्यंत वक्तशीर असतो तेंव्हा त्याच्या जाण्यायेण्यावरून लोक घड्याळ लावतात असे म्हंटले जाते. सू्र्य आणि चंद्र यांचे आकाशामधील परिभ्रमण असेच इतके नियमितपणे अचूक होत असते, की कुठल्याही प्रकारच्या घड्याळाच्या आधीपासून त्यांच्या चलनाच्या आधारावर कालगणना केली जाऊ लागली आणि आजवर केली जात आली आहे. हे दोघेही कधीच वाटेत क्षणभरही थांबत नाहीत. ते आकाशमार्गे अविरत चालत असतात. कधीही त्यांनी उलट दिशेने जाण्याचा तर प्रश्नच नाही. बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे ग्रह आपापली गती थोडी बदलत असतात, पण त्याचे प्रमाण कमी असते आणि फार बारकाईने पाहिल्याखेरीज ते जाणवत नाही. याचे कारण बुध आणि शुक्र रात्रीचा थोडाच वेळ आकाशात दिसतात आणि गुरू व शनि अत्यंत मंद गतीने त्यांचे निरीक्षण करण्यातच उभा जन्म जातो. मंगळ हा ग्रह मात्र बराच अनियमितपणा दाखवत असतो आणि त्याला समजून घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत नाही किंवा खास दुर्बिणीचीही गरज पडत नाही. साध्या डोळ्यांनासुद्धा तो जाणवतो. मंगळ हा आगळा वेगळा ग्रह कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त होऊन रेंगाळत असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या दिसण्यामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. हे सगळे बदल कशामुळे होत असतील याचे कारणही त्यांना समजत नव्हते.
भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या ग्रहांना महाशक्तीशाली देव मानले गेले असल्यामुळे ते आपापल्या मर्जीनुसार कसेही वागायला मोकळे होतेच, शिवाय माणसांचे जीवनसुद्धा त्यांच्या राजीखुषीवर अवलंबून असते असे म्हंटल्यावर त्यांच्या वाटेला जाण्याचे धैर्य कोण आणि कशाला दाखवील ? त्यातून मंगळ हा तर शीघ्रकोपी ग्रह ! त्याच्या अनियमित वाटणा-या गतीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न कोण करेल ? पश्चिमेकडील म्हणजे युरोपमधील देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्यानंतर संपूर्ण जगात फक्त एकच परमेश्वर (गॉड) आहे असे मानले जाऊ लागले. त्यामुळे ग्रहांच्या कोपाला घाबरण्याचे कारण उरले नाही. त्यांच्या भ्रमणाची सविस्तर माहिती गोळा करणे आणि त्यावर विचारविनिमय, मनन, चिंतन वगैरे करून त्यातली सुसंगती शोधून काही शास्त्रीय सिद्धांत किंवा त्याविषयीचे नियम मांडणे शक्य झाले. पण आपली पृथ्वी संपूर्ण विश्वाच्या मध्यभागी नाही, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा-या अनेक ग्रहांमधली ती एक आहे हा विचार मात्र ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीच्या विरोधात आहे असा निर्णय प्रतिगामी विचारांच्या तत्कालिन धर्मगुरूंनी दिला आणि दोनशे वर्षे त्या विचाराला कडाडून विरोध केला. अखेर धर्मगुरूंची सत्ताच कमजोर झाल्यानंतर तो विचार आणि त्याला अनुसरून मांडलेला सिद्धांत सर्वमान्य झाला.
मुळात आभाळातले कोणतेही ग्रह अधून मधून वक्री होऊन उलट दिशेने का जातांना दिसतात यावर विचार करतांनाच सूर्यमालिकेची कल्पना शास्त्रज्ञांना सुचली होती आणि त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यातून मिळाले होते. मंगळाच्या बाबतीत वर दिलेल्या विचित्र गोष्टी का घडतात यासाठी वर दिलेली आकृती पाहू. या चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्यभागी असलेल्या सूर्याला पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून प्रदक्षिणा घालत असतात. पहिल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणे एके दिवशी सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे तीघेही एका सरळ राशीत आहेत असे समजले (तसे दर दोन वर्षात एकदा होत असते) तर एक वर्षानंतर सूर्याभोवती फिरून पृथ्वी पुन्हा पूर्वीच्याच जागी परत येईल, पण मंगळाला त्याच्या मोठ्या कक्षेमधून हा प्रवास करायला जवळ जवळ दुप्पट वेळ लागत असल्यामुळे एका वर्षानंतर तो आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असेल. अर्थातच त्या वेळी पृथ्वी आणि मंगळ यांच्यामधले अंतर अनेकपटीने जास्त झालेले असेल. त्यामुळे आपल्याला तो आकाराने लहान आणि फिक्कट दिसेल. त्या काळात पृथ्वीवरून पाहता तो सूर्याच्या जवळ दिसत असल्यामुळे त्याच्या सोबतीने उगवेल आणि मावळेल आणि त्याच्या प्रखर उजेडात बहुधा दिसणारच नाही. यामुळे सुमारे महिनाभर आपल्याला मंगळ ग्रहसुद्धा बुधाप्रमाणे दिसलाच तरी क्वचितच दिसेल. याउलट जेंव्हा तो आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असेल तेंव्हा तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचे बिंब मोठे आणि अधिक प्रकाशमान दिसेल आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्याकारणाने रात्रभर दिसत राहील. अमक्या अमक्या तारखेला मंगळ ग्रह चंद्राइतका मोठा दिसणार आहे अशा प्रकारच्या वावड्या अनेक वेळा उडवल्या जातात, माझे काही मित्रसुद्धा असा ईमेल्स मला फॉरवर्ड करतात आणि दरवेळी ते कसे अतिरंजीत आहे हे मला त्यांना समजाऊन सांगावे लागते असे घडत आले आहे.
पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून सतत पुढे पुढे जात असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या सापेक्ष गतींने जातांना दिसत असतो. पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असतांना एकाच दिशेने (आकृतीमध्ये वरच्या बाजूला) जात असतात आणि त्यात पृथ्वीची गति थोडी जास्त असल्यामुळे आपल्याला मंगळ ग्रह उलट दिशेने मागे मागे जात आहे असे दिसते. रस्त्यावरून जातांना आपण एकाद्या मोटारीला ओव्हरटेक करून पुढे जातो तेंव्हा ती गाडी मागे जात आहे असे मोटारीमधून पाहणा-याला वाटते तसे हे आहे. याच्या उलट हे ग्रह आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असतील तर ते उलट दिशांना (आकृतीमध्ये पृथ्वी वरच्या बाजूला आणि मंगळ खालच्या दिशेला) जात असल्यामुळे आपल्याला मंगळ हा ग्रह दुप्पट वेगाने जातांना दिसेल. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या माणसापेक्षा मोटारीत बसलेल्या माणसाला समोरून येणारी गाडी जास्त वेगाने येत आहे असे वाटते, तसेच हेही आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या कालखंडात हे दोन ग्रह ज्या जागांवर असतील त्यानुसार आपल्याला मंगळाचा वेग कमी किंवा जास्त होतांना दिसतो. तो कमी कमी होत शून्यावर येऊन मंगळाने दिशाच बदललेली आपल्याला दिसते. त्याच प्रमाणे यथावकाशाने त्याचा उलट दिशेचा वेग पुन्हा कमी होत शून्यावर येऊन तो पुन्हा दिशा बदलतो आणि मूळ दिशेच्या मार्गी लागतो म्हणजे नेहमीप्रमाणे पुढे जाऊ लागतो. हा ग्रह वेगांने पुढे जात असतांना एकादी रास महिनाभरातच ओलांडून पलीकडे जातो तर कधी एकाद्या राशीत हळू हळू दहा पंधरा दिवस पुढे गेल्यावर मागे वळून हळूहळू सरकत आधीच्या राशीत प्रवेश करतो, तिथे काही दिवस घालवल्यावर घूम जाव करून पुन्हा पुढे सरकत पूर्वीच्या जागी जाऊन आणखी काही काळानंतर त्याच्या पुढल्या राशीत जातो. हे करतांना पाचसहा महिनेही उलटून जातात. हे सगळे दर दोन वर्षांच्या कालावधीत घडत असल्यामुळे निरीक्षकांना ते सहजपणे जाणवते.
पृथ्वीपेक्षा एवढा लहान असूनसुद्धा मंगळाकडे फोबोस आणि डीमॉस नावाचे दोन दोन चंद्र आहेत, पण ते आपल्या चंद्रासारखे सुंदर गोल नसून बेढब ओबडधोबड आकारांचे आहेत आणि आकाराने ते फक्त काही किलोमीटर्स इतके लहान आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या उल्का (अॅस्टरॉइड) असेसुद्धा म्हणता येईल. त्यातला फोबोस हा उपग्रह मंगळाभोवतालच्या आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा उलट दिशेने फिरत असतो आणि फक्त ११ तासात त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतो. डीमॉस हा उपग्रह सुमारे ३० तासात प्रदक्षिणा घालत असला तरी मंगळ ग्रह स्वतःभोवती साडेचोवीस तासात फिरत असल्यामुळे तो उपग्रह आभाळातून खूप हळूहळू सरकतांना दिसतो आणि रोज रोज न उगवता तब्बल साडेपाच दिवसांमध्ये एकदाच उगवतो पावणेतीन दिवस आणि रात्री आभाळात इकडून तिकडे जातो आणि मावळल्यानंतर पुन्हा पावणेतीन दिवस त्याचा पत्ताच नसतो.
माणसाने चंद्रावर किंवा त्याच्या जवळपास जाऊन संशोधन करण्याच्या अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मंगळाकडे आपला मोर्चा वळवला. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मंगळाकडे याने पाठवली. काही युरोपीय देशांनी संयुक्तपणे मोहिमा राबवल्या. आजमितीला मंगळाच्या भूमीवर फिरत असलेली दोन स्वयंचलित वाहने (रोव्हर्स) आणि त्याच्या भोवताली आभाळात फिरत असलेले तीन कृत्रिम उपग्रह असे पृथ्वीवरील पाच दूत मंगळावर हजर आहेत आणि तिकडची माहिती पाठवत आहेत. जपान आणि चीन या देशांनीसुद्धा मंगळावर आपापली याने पाठवण्याचे प्रयोग केले होते, पण ते यशस्वी ठरले नाहीत.
*आता दिवाळीमध्ये आपल्या भारताने एक मंगलयान अवकाशात उडवले आहे. अजून पर्यंत ते पृथ्वीच्याच कक्षेत आहे, वर्षभरानंतर मंगळावर जाऊन पोचणार आहे. त्यासंबंधीची माहिती मी एका निराळ्या लेखमालिकेत द्यायचे ठरवले आहे. त्याची पूर्वपीठिका समजण्यासाठी मंगळ या ग्रहाची माहिती या लेखमालिकेत दिली आहे.
————–
* अशी माहिती हा लेख लिहिला तेंव्हा म्हणजे सहा वर्षांपूर्वी दिली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे भारताचे मंगलयान मंगळ ग्रहावर जाऊन पोचले आणि आता त्याला प्रदक्षिणा घालत आहे.