केवढा चांगुलपणा ?


स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुसऱ्यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

प्रभाताई ही प्रमोदची सर्वात थोरली बहीण होती आणि त्यांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या प्रमोदला प्रभाताईंनी तिच्या अंगाखांद्यावर खेळवले होते आणि प्रमोदला समज आल्यापासून तो तिला घरातल्या एकाद्या वडीलधारी व्यक्तीसारखा मान देत आला होता. दोघेही मोठे झाले, त्यांनी आपापले संसार थाटले, त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले. प्रभाताई अशीच एकदा प्रमोदकडे थोडे दिवस रहायला आली होती. तिचा सारा जन्म लहान गावातल्या मध्यमवर्गीय घरात गेला होता, तिथे तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती, पण प्रमोदला त्या मानाने जरा चांगले दिवस आले होते. आपल्या बहिणीने आपल्या घरी चार दिवस चांगले ऐशोआरामात रहावे, तिला कसलेही कष्ट पडू नयेत असे प्रमोदला वाटत होते. घराची साफसफाई, धुणी भांडी वगैरे कामे करण्यासाठी ठेवलेल्या कामवाल्या बायका दिवसातून दोन वेळा येऊन ती सर्व कामे करून जात असत. श्रम आणि वेळ वाचवणारी स्वयंपाकघरातील जेवढी उपकरणे आणि यंत्रे बाजारात आली असतील त्यातली बहुतेक सगळी प्रमोदच्या घरी होती. त्यामुळे स्वयंपाकाचे कामसुध्दा बरेच सोपे झाले होते. घरातले कोणीही प्रभाताईला कसल्याच कामाला हात लावू देत नव्हते. तिने दिवसभर बसून किंवा वाटल्यास लोळत राहून पडल्या पडल्या आराम करावा, टीव्हीवरील कार्यक्रम पहावेत, रेडिओ किंवा टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकावीत, पुस्तके आणि मासिके वाचावीत, वाटल्यास आजूबाजूला फेरफटका मारून यावा, देवळात जाऊन यावे अशी प्रमोदची विश्रांतीची कल्पना होती. पण प्रभाताईच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. तिच्या दृष्टीने ज्ञान, मनोरंजन, अध्यात्म वगैरे गोष्टी चवीपुरत्या ठीक होत्या. दिवसातला सगळा वेळ त्यात घालवणे तिला कठीण जात होते. आयुष्यभर ती घरातली सगळी कामे आनंदाने करत आली होती. आतासुध्दा भावाच्या घरातही निदान थोडेसे काम केल्याखेरीज तिला चैन पडत नव्हती, पण कोणीही तिला काहीच करू देत नव्हते. प्रमोद आणि प्रतिभाला काय वाटेल अशा विचाराने ती आपल्या मनातली बेचैनी दाखवत नव्हती, आपण तिथे मजेत असल्यासारखी वागत होती.

एकदा असे झाले की प्रभाताईचा गुरुवारचा उपास असल्याने तिला संध्याकाळी जेवायचे नव्हते. हे समजल्यावर तिच्या उपासाच्या फराळासाठी प्रतिभाने साबूदाणा भिजवून ठेवला. अचानक काही जरूरीच्या कारणाने तिला एका मैत्रिणीकडे जाणे आवश्यक झाले. प्रभाताईंना सोबत नेले तर त्यांना दगदग झाली असती, शिवाय ऑकवर्डही वाटले असते. त्यांना घरी एकटीने बसवून ठेवणेही प्रतिभाला प्रशस्त वाटले नाही. तिने फोनवर प्रमोदशी बोलून घेतले आणि काय करायचे ते ठरवले. प्रमोद ऑफीसमधून परत यायच्या वेळी ती तयार होऊन बसली आणि तो घरी येताच मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली.

त्या दिवशी प्रमोदला त्याचे सर्व काम संपवण्यासाठी ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. तिथली एक दोन कामे त्याच्याबरोबर घरी आली. त्यांचा शांतपणे अभ्यास करून आणि त्यावर विचार करून त्याला निर्णय घ्यायचा होता. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले आणि बॅग उघडून तो कामाचे कागद बाहेर काढणार होता तेवढ्यात त्याला प्रभाताईची हाक ऐकू आली. आपल्याला नको म्हणणारे कोणी नाही असे पाहून प्रभाताई स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यांची हाक ऐकून प्रमोद लगेच तिथे गेला. तिने साबूदाण्याची खिचडी करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी तिला कढई पाहिजे होती. त्याच्या स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली खण करून त्यात भांडी ठेवण्याची व्यवस्था होती आणि काही डबे ठेवले होते. ओट्यापासून दोन हात मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला कप्पे केले होते आणि काही डबे त्यात ठेवले होते. ओट्याखाली ठेवलेले सामान काढण्यासाठी खाली वाकावे लागत होते आणि वर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलावर चढावे लागत होते. वयोमानानुसार प्रभाताईंना या दोन्ही गोष्टी करणे कष्टाचे किंवा धोक्याचे होते. तिला स्वयंपाकघरातले कसले काम न सांगण्यामागे हेही एक कारण होते. शिवाय गॅस, ओव्हन, मिक्सर वगैरेंचा वापर कसा करायचा हे तिला माहीत नव्हते.

स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ठेवले असेल हे प्रमोदलाही नीटसे ठाऊक नव्हतेच. त्याने अंदाजाने कढई शोधून काढून दिली, त्याबरोबर झाराही दिला. साबूदाण्याची खिचडी कशी करतात आणि त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात हे त्याला माहीत नव्हते आणि ते कुठे ठेवले असतील याचीही कल्पना नव्हती. स्वयंपाकघरात आणलेला प्रत्येक पदार्थ ते नाव लिहिलेल्या ठराविक डब्यातच भरून तो डबा ठराविक फडताळातल्या ठरलेल्या जागीच ठेवायचा अशी शिस्त त्यांच्या घरी नव्हती. प्रभाताईला पाहिजे असलेले जिन्नस तिलाच शोधायला सांगणे त्याला योग्य वाटले नाही. कढई मिळताच तिने शेंगदाण्याचे कूट कुठे आहे ते विचारले. तयार केलेले कूट घरात असेल की नाही याची प्रमोदला खात्री नव्हती. निरनिराळे डबे काढून ते उघडून पहातांना त्याला एका डब्यात कच्चे शेंगदाणे सापडले. त्याने ते भाजले आणि मिक्सर चालवून त्याचे कूट करून दिले. त्यानंतर तूप, जिरे, खोबरे, मीठ, साखर वगैरे एक एक गोष्टीचं नाव काढताच प्रमोद ती शोधून काढून देत राहिला, तसेच गॅस पेटवायचा, विझवायचा, त्याची आच कमी किंवा जास्त करायची वगैरे कामांसाठी तो स्वयंपाकघरात जा ये करत राहिला.

तो विचार करत होता की प्रभाताईला साबूदाण्याची खिचडी हवी आहे असे तिने तासाभरापूर्वी सांगितले असते तर प्रतिभाने ती करून दिली असती. तिला मैत्रिणीच्या घरी जायला उशीर होऊ नये म्हणून कदाचित तिने प्रतिभाला सांगितले नसेल. अजून तासाभरात प्रतिभा परत आली असती आणि तिने त्यानंतर खिचडी करून दिली असती. पण तिला यायला उशीर लागला असता तर प्रभाताईला तोपर्यंत उपाशी रहावे लागले असते. त्याला स्वतःला साबूदाण्याची खिचडी करणे येतच नव्हते. त्यामुळे ताईला जे जे भांडे किंवा जिन्नस लागेल ते ते तो शोधून देत राहिला. सगळे काम संपले असे पाहून प्रमोदने आपली बॅग उघडून त्यातले कागद बाहेर काढले. ते वाचायला तो सुरुवात करत होता तेवढ्यात प्रभाताईने साबूदाण्याच्या खिचडीने भरलेली प्लेट आणून त्याच्या हातात दिली. तो उद्गारला, “अगं ताई, तुझा उपास आहे ना? तूच ही प्लेट घे. मी जेवणात खाईन.”

संध्याकाळच्या या वेळी काही खाण्याची त्याला सवय नव्हती आणि गरजही वाटत नव्हती. उलट अवेळी जास्तीचे खाण्यामुळे रात्रीचे जेवण व्यवस्थित होणार नाही आणि पचनसंस्था नीट राहणार नाही असे त्याला वाटत असे आणि तो शक्य तोवर ते टाळत असे. पण प्रभाताई म्हणाली, “अरे, आत्ता गरम गरम खाऊन घे. जेवणापर्यंत ती थंड होऊन गेल्यावर तिची चंव राहणार नाही.”
तो म्हणाला, “ठीक आहे. तू ही प्लेट घे. मी बशीत थोडी खिचडी घेऊन खाईन.”
ताई म्हणाली, “नाही रे, तुपातले पदार्थ खाऊन अलीकडे मला खोकला येतो आणि शेंगदाण्याने पित्त होते म्हणून मी खिचडी खाणं सोडलं आहे.”
हा धक्का प्रमोदला अनपेक्षित होता. तो म्हणाला, “मग तू रात्री काय खाणार आहेस ? आणि ही खिचडी कुणासाठी बनवलीस ?”
ताई म्हणाली, “मी थोडी फळं आणि दूध घेईन. तुला खिचडी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी तर ही बनवली आहे.”
प्रमोदने नाइलाजाने प्लेटमधून चमचाभर खिचडी उचलून तोंडात टाकली. घास खाऊन झाल्यावर “मस्त झाली आहे.” असं तो सांगणार होता तेवढ्यात ताई उद्गारली, “कशी झालीय् कुणास ठाऊक!”
तो म्हणाला, “असं का म्हणतेस? किती वर्षांपासून तू खिचडी करते आहेस? ती बिघडणं कसं शक्य आहे? “
ताई म्हणाली, ” अरे, फोडणीत घालायला ताजी हिरवी मिरची मिळाली असती तर चांगला स्वाद लागला असता. “

आता मात्र प्रमोदला रहावलं नाही. आपल्या हातातलं महत्वाचं काम सोडून इतका वेळ तो निरनिराळ्या वस्तू आणि जिन्नस शोधून तिला देत होता. ‘मिरची’ म्हंटल्यावर त्याने शोधून काढून दिलेल्या मिरच्या हिरव्या होत्या की लाल, शिळ्या होती की ताज्या इकडे त्याने पाहिले नव्हते आणि त्याने काही फरक पडेल असेही त्याला वाटले नव्हते. आता तेवढीच उणीव ताईने का काढावी असे त्याला वाटून गेले.
तो म्हणून गेला, “आपल्या आईबाबांनी तर असं शिकवलं होतं की समोर येईल ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं असतं आणि त्याला नावं ठेवायची नसतात. त्यामुळे मी तरी असली एवढी बारकी चिकित्सा कधी केली नाही.”

प्रभाताईंचा चेहेरा खर्रकन उतरला आणि त्या देवासमोर जाऊन स्तोत्र म्हणत बसल्या. प्रमोदनं आपली प्लेट बाजूला सरकवून दिली आणि ऑफीसमधून आणलेल्या कागदात डोके खुपसले. पण आपण काय वाचत आहोत ते त्याला समजत नव्हते.
प्रभाताई आणि प्रमोद दोघेही मनाने खूप चांगले होते, दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा विचार करून कृती करत राहिले, पण अखेर त्यातून त्यांच्यात थोडासा दुरावाच निर्माण झाला. त्यापेक्षा त्यांनी आधीच एकमेकांना विचारून घेतले असते तर ?

गणेशोत्सवातली उणीव

मी सहसा ललित वाङमयाच्या  वाटेला जात नाही.  थोडीशी रुचिपालट  म्हणून  मागे एकदा लिहिलेली एक लघुकथा  यावेळी सादर करीत आहे.


 

प्रमोदचे लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या एकत्र कुटुंबात गेले होते. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून लहानपणीच करून घेतली होती.

शिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बिऱ्हाड थाटले आणि ते नवराबायको दोघे मिळून दरवर्षी मोठ्या हौसेने आणि भक्तीभावाने आपल्या घरात गणपती बसवायला लागले. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघेही प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत.

यथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते कुटुंब करत असे.

त्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने आपल्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे सगळे लोक त्यांच्याकडे येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत त्या उत्सवाच्या दिवसांमध्ये त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की त्या दोघांनी “आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या” असे म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनाशी झाली. गणेशोत्सव सुरू झाला की नेहमीचे आप्त स्वकीय औपचारिक बोलावण्याची वाट न पाहता आपणहून येऊ लागले.

गणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही दर्शनाला येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावी लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.

अशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्या प्रमाणेच उत्साहात साजरा होत होता.

पण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते.

अर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि तो पूर्णवेळ घरी रहायला लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती. प्रमिलाच्या तबेतीबद्दल चिंतेचे कारण नव्हते. त्यामुळे मुलांच्या हौसेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले.

कुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने गणेशोत्सवासाठी एक वेगळी वही उघडली आणि वेगवेगळ्या पानांवर पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, खाद्यपेये वगैरे सर्व गोष्टींच्या तपशीलवार याद्या लिहून काढल्या. तसेच गणपती बसवायला रिकामी जागा करण्यासाठी घरात कोणते बदल करायचे, कोणते सामान कोठे हलवायचे, या कालावधीत काय काय करायचे, काय काय करायचे नाही वगैरे सगळ्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या.

त्यातल्या कांही त्याने स्वतः लिहिल्या, काही प्रमिलाने सांगितल्या आणि काही मुलांनी सुचवल्या. सर्वांनी मिळून उत्सवासाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे कांही लिहून काढले. वहीत पाहून त्याने सगळ्या वस्तू आणि पदार्थ बाजारातून आणलेच, शिवाय आयत्या वेळी समोर दिसल्या, आवडल्या, मुलांनी मागितल्या वगैरे कारणांनी चार जास्तच गोष्टी आणल्या.

दरवर्षी प्रमोदला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ऑफिसातून आल्यानंतर रात्री जागून गणपतीची जमेल तेवढी सजावट करावी लागत असे. त्या वर्षी दोन तीन दिवस आधीपासूनच एकत्र बसून त्यांनी सुंदर मखर तयार केले, त्याच्या आजूबाजूला छानशी सजावट केली. प्रमोदला हौसही होती आणि त्याच्या हातात कसबही होते. घरगुती गणेशोत्सवांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवण्याइतका चांगला देखावा त्याने उभा केला. त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले.

घरी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फुलवाल्याला देऊन ठेवली.

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली.

यापूर्वीच्या वर्षापर्यंत त्याला रोज पहाटे लवकर उठून ऑफीसला जायच्या आधी घाईघाईने गणपतीची पूजा आटपून, त्याला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून ऑफिसची बस पकडायला धांवत जावे लागत असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी सावकाशपणे गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. “सर्वांना सुखी ठेव”, विशेषतः “प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे” यासाठी रोज प्रार्थना करत होता.

शेजारच्या स्वीटमार्टमधून रोज नवनवी पक्वान्ने आणून तो त्यांचा नैवेद्य दाखवत होता. त्यामुळे बाप्पांची आणि मुलांची चंगळ झाली. संध्याकाळची आरती वेळेवर होत होती. प्रमोदने भरपूर मिठाया आणि नमकीन पदार्थ आणि ते वाढून देण्यासाठी पेपर प्लेट्स आणि ग्लासेस आणून ठेवले होते. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला तत्परतेने प्लेटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेल्यामध्ये शीतपेय प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. प्रमिलाचा सहभाग नसल्यामुळे कसलेही न्यून राहू नये याची तो प्रयत्नपूर्वक काळजी घेत होता.

यापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे.

शिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर “खरंच तुला लाडू आवडत नाही का? थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते.” असे म्हणून प्रमिला आत जायची आणि “काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे.” असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर “तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ.” असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची.

पण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.

प्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चौकशी करून तिला “गेट वेल सून” म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.
“अगं तुला काय सांगू? मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय? देवा रे, मला माफ कर रे बाबा.”
“खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय्? तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना.”
“अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय? जे काही चाललंय तसं चाललंय्” …. वगैरे वगैरे
“खरंच गं, यंदा जरासुध्दा मजा नाही आली.” एकादी मैत्रिण उद्गारायची.

शेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा. तो मनातून थोडा खट्टू झाला. आपल्या प्रयत्नात न्यून राहून गेले याची खंत त्याच्या मनाला बोचत राहिली, तसेच नेमके काय कमी पडले याचे गूढ त्याला पडले.
“मी काही विसरतोय का? माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का?” असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर “मी कुठं असं म्हणतेय्?” असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे “या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली?” या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.

त्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय कामे करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता.

पहिल्या दिवशी दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या साड्यांचे गठ्ठे काढून ते पलंगावर ठेवले आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातल्या एकेक साडीचा प्रकार, पोत, किंमत, ती कोणत्या प्रसंगी आणि कुठल्या शहरातल्या कुठल्या दुकानातून विकत घेतली की भेट मिळाली वगैरेवर चर्चा करता करताच “ही साडी खूप तलम आहे तर ती जास्तच जाड आणि जड आहे, एकीचा रंग फारच फिका आहे तर दुसरीचा जरा भडकच आहे, एक आउट ऑफ फॅशन झाली आहे तर दुसरी एकदम मॉड आहे” वगैरे कारणांनी त्या बाद होत गेल्या.

एक साडी चांगली वाटली पण तिचा फॉल एका जागी उसवला होता, तर दुसरीच्या मॅचिंग ब्लाउजचा हूक तुटला होता. असे करून नाकारता नाकारता अखेर एक छानशी साडी प्रमिलाला पसंत पडली, त्याला अनुरूप ब्लाउज, पेटीकोट वगैरे सारे काही नीट होते. चांगली दिसणारी ती साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, “आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का?”
“कुठे बाहेर जाणार आहेस का?” एका मैत्रिणीने विचारले
“छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय्? आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना?”
“हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का?”
“ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना?”
“मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल.”
“इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्?”
“अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे.”
“पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेसले होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील?”
“हो ना? हिच्याकडे एकच साडी आहे की काय? असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या.”
या चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी आली.
“त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच.” असे प्रमोदला सांगून प्रमिलाने एक साडी निवडली आणि ती परिधान करून, त्या साडीला पिना, टाचण्या टोचून आणि वेगवेगळ्या कोनातून आरशात निरखून झाल्यानंतर ती पंधरा वीस मिनिटांनी बाहेर आली. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या होत्या. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नव्हते. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत त्याने कसाबसा वेळ काढून नेला.
ताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत गेली. मैत्रिणी तिची वाट पहातच होत्या. त्यात आणखी एका मैत्रिणीची भर पडली. त्यांच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे आणि त्याची कारणे सांगून झाल्यावर ती तिसरी मैत्रिण उद्गारली, “हे काय? आज ही साडी नेसणार आहेस तू?”
दोघी मैत्रिणी एकदम म्हणाल्या “कां ग? काय झालं?”
“अगं, मागच्या महिन्यात प्रतीक्षाच्या नणंदेच्या मंगळागौरीला तू हीच साडी नेसली नव्हतीस का?”
“हो का? त्या दिवशी मी मला माझ्या जावेकडे जावं लागलं होतं त्यामुळे मी आले नव्हते. पण तिचं म्हणणं बरोबर आहे, आज प्रतीक्षा इथे आली तर ती काय म्हणेल?”
त्यामुळे वेगळ्या साडीसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. आधी पाहिलेल्या बनारसी, कांजीवरम, पटोला, चंदेरी, आसाम सिल्क, इटालियन क्रेप, आणखी कुठली तरी जॉर्जेट वगैरे सगळ्यांची उजळणी झाली. शिवाय साडीच कशाला म्हणून निरनिराळे ड्रेसेसही पाहून झाले, प्रमिला एकटी असती तर तिने पंधरा मिनिटात निर्णय घेतला असता, दोघींना मिळून दुप्पट वेळ लागला असता. आता तीन डोकी जमल्यावर तिप्पट चौपट वेळ लागणे साहजीक होते.

“ही साडी नेसल्यावर मस्तच दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय?” मग प्रमिलाने कपाटातले खऱ्या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढले. त्यातला एक एक उघडून “अय्या कित्ती छान?”, “कुठून घेतलास गं?” “केवढ्याला पडला?” वगैरे त्या अलंकारांचं साग्रसंगीत रसग्रहण सुरू झाले. त्याला फाटा देत “यातलं मी आज काय काय घालू?” असे म्हणत प्रमिलाने मुद्द्याला हात घातला. तिलाही होत असलेल्या उशीराची थोडी जाणीव होत होती. त्यावर मग “हे छान दिसेल.”, “नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.”, “तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ.” वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी आल्याचे समजले.

ठीकठाक पोशाख करून प्रमोद केंव्हाच तयार होऊन बसला होता. त्याने पाहुण्यांचे स्वागत केले. “एक मिनिटात मी येतेय् हं.” असे आतूनच प्रमिलाने सांगितले. बाहेर आणखी दोन तीन कुटुंबे आली. प्रमोदने त्यांची आवभगत करून संभाषण चालू ठेवले. महागाई, पर्यावरण, ट्रॅफिक जॅम यासारख्या विषयावर पुरुषमंडळी थोडी टोलवाटोलवी करत होती आणि महिलावर्ग प्रमिलाची वाट पहात होता.
“हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत.” असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघाली.
“अगं, अशीच बाहेर जाणार? जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय?”
मग प्रमिलाने घाईघाईत तोंडावरून हात फिरवला, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून ती बाहेर आली.

तोपर्यंत आलेली कांही मंडळी तिची वाट पाहून “आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे” असे सांगून निघून गेली होती. प्रमिला फणफणत पुन्हा आत गेली. जरा साग्रसंगीत तयार होऊन झाल्यावर दहा बारा मिनिटांनी तीघी मैत्रिणींसह बाहेर आली. आता बाहेर चाललेल्या चर्चांची गाडी सांधे बदलून साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, ज्युवेलरी वगैरे स्टेशनांवरून धावू लागली. पुरुषमंडळी प्रसादाच्या प्लेटची वाट पहात आणि त्यातले पदार्थ चवीने खाण्यात गुंगली. प्रमिलाही त्यानंतर आलेल्या मंडळींना मात्र हसतमुखाने सामोरी गेली. त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करता करता ती अखेरीस दमून गेली. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात होता. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी गेली.

हे सगळे पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत झाला. “मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती? ती काय मिस् करत होती?” या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते. त्याला वर्षभर सतावणारे कोडे सुटले होते, त्याच्या मनातली खंत मिटली होती आणि त्यांच्या घरातल्या गणेशोत्सवात येऊन भेटणारी सर्व मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी किंवा त्यांना भेटायला येतात हा त्याचा गोड गैरसमज दूर झाला होता.

कोंडी – एक लघुकथा

मी सहसा कथा, कादंबरी, नाटक वगैरे फिक्शनल साहित्याच्या वाट्याला जात नाही कारण तो माझा प्रांत नाही. पण कधी कधी आजूबाजूला घडलेल्या किंवा कानावर आलेल्या घटनांचा आपल्या परीने अर्थ लावावयाचा प्रयत्न करावासा वाटतो. दहा वर्षांपूर्वी केलेला असाच एक प्रयत्न.

कोंडी

अगदी आडबाजूला असलेल्या एका लहान गांवातल्या एका बाळबोध वळणाच्या कुटुंबात जनार्दन म्हणजेच जन्या जन्माला आला, तिथल्या सरकारी शाळेत गेला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. शाळेत जाऊन तो नक्की काय काय शिकला ते सांगणे थोडे कठीण आहे, पण त्या काळातली बहुतेक मुले शाळेत जाऊन जे कांही करायची तेच तोसुध्दा करत असे.

शिक्षकांच्या नेमणुका, बदल्या वगैरेंची सूत्रे दूर कुठेतरी असलेल्या शिक्षणखात्याच्या मुख्यालयातून हलवली जात असल्यामुळे त्या लहान गांवातल्या शाळेतल्या वर्गांची आणि ते सांभाळणार्‍या शिक्षकांची संख्या यातले गणीत कांही नेहमीच सरळ सोपे नसे. नेमून दिलेल्या मास्तरांपैकी कोणाची गांवाजवळच शेतीवाडी किंवा गांवात दुकान असायचे, आणिक कोणी पूजाअर्चा, अभिषेक वगैरेमध्ये मग्न असत. त्या व्यापातून वेळ मिळेल तसे ते शाळेत येत, वर्गातल्या मुलांना बाराखड्या, जोडाक्षरे किंवा पाढे लिहून काढायला सांगत आणि खुर्चीवर बसून आराम करत असत. परीक्षेत मात्र ते मुलांना सर्वतोपरी प्रयत्न करून वरच्या वर्गात ढकलत असत. बहुतेक सारी मुलेसुध्दा शेतीची कामे, दूधदुभते, सुतारकाम, लोहारकाम, विड्या वळणे वगैरे घरातल्या उद्योग व्यवसायाला हातभार लावत असत. जेंव्हा त्यांना देण्याजोगे काम नसे त्या वेळी घरातला दंगा कमी व्हावा म्हणून त्यांना शाळेत पिटाळले जात असे.

वर्गात डोकावून पाहून गुरूजी दिसले नाहीत की ते शाळेच्या प्रशस्त आवारात गोट्या, विटीदांडू, लपंडाव वगैरे खेळू लागत किंवा चिंचा, आवळे, बोरे, कैर्‍या वगैरे ऋतुकालोद्भव फळांच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवत. कांही मुले वर्गातच बसून गप्पा व थापा मारणे, नवनव्या गोष्टी सांगणे, कविता किंवा गाणी म्हणणे वगैरे गतिविधींमध्ये आपला वेळ घालवत आणि मास्तर येतांना दिसले तर बाहेर जाऊन आपल्या वर्गातल्या मुलांना गोळा करून आणत. जन्याचे कधी या गटात तर कधी त्या गटात असे आंतबाहेर चालले असे. प्राथमिक शाळेत असा आनंद होता.

माध्यमिक शाळेत गेल्यानंतर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या संख्येत थोडी वाढ झाली. त्याबरोबरच वर्गात बसल्या बसल्या टिंगल-टवाळ्या, कुचाळक्या वगैरें करण्याचे नवनवे प्रयोग मुले करू लागली. जन्या त्यात उत्साहाने सहभागी होत राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर बाहेरून येत आणि तपासण्यासाठी बाहेर पाठवले जात यामुळे त्या परीक्षेची सर्वांनाच धास्ती वाटत असे. शाळेतले त्यातल्या त्यात कामसू आणि अनुभवी शिक्षक जास्तीचे खास वर्ग घेऊन परीक्षेचा सारा अभ्यासक्रम कसाबसा संपवत असत. जन्याला कधीच अभ्यासाची गोडी लागली नसली तरी त्याचे डोके तल्लख असल्यामुळे कानावर पडलेल्या कांही गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या, नशीबाने त्याला थोडी साथ दिली आणि शाळेचा मॅट्रिक परीक्षेचा निकाल जेमतेम वीस बावीस टक्के लागला असला तरी त्यात जन्याचा नंबर लागून गेला. एकदाचे गंगेत घोडे न्हाले.

जन्याच्या गांवात महाविद्यालय नव्हते आणि त्याने शहरात राहून शिक्षण घेण्याइतकी त्याच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे कॉलेज शिकण्याचे स्वप्न त्याने कधी पाहिलेच नव्हते. किंबहुना स्वप्नरंजन हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. आज मिळते तेवढी मौजमजा करून घ्यायची, उद्याचा विचार उद्या करू, त्याचा ताप आज कशाला ? असे तो वर्तमानकाळातच जगत आला होता. पण मॅट्रिकचा अडसर त्याने पहिल्या फटक्यात ओलांडल्याचे ऐकून शहरात राहणार्‍या त्याच्या कांही आप्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्या काळात तांत्रिक शिक्षणाला आजच्याइतकी मागणी नव्हती, पण भविष्यकाळाचा विचार करून कांही नवी तंत्रशिक्षणाची केंद्रे उघडली गेली होती. तशा एका तंत्रनिकेतनात त्याला प्रवेश मिळवून दिला, आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर नादारी मिळाली आणि कोणा उदार गृहस्थांकडे राहण्याजेवण्याची सोय झाली. अशा प्रकारे कांहीशा अनपेक्षित रीतीने जन्याचे उच्च शिक्षण सुरू झाले.

पण त्यापूर्वी त्याने कधीही मन लावून अभ्यास केला नव्हता किंवा अंग मोडून कामही केले नव्हते. तंत्रनिकेतनातील शिक्षणात रोज तीन चार तास कार्यशाळेत (वर्कशॉप) किंवा चित्रशाळेत (ड्रॉइंग ऑफिस) उभे राहून काम करावे लागे आणि त्याशिवाय तीन चार तास कधी न ऐकलेल्या विषय़ांवरील व्याख्याने ऐकावी लागत असत. त्यानंतर घरी येऊन त्याचा अभ्यास करायचा. हे बहुतेक सारे विषय विज्ञान आणि गणितावर आधारलेले होते आणि ते इंग्रजी माध्यमातून शिकायचे होते. गणीत, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय जन्याचे जरा जास्तच कच्चे राहिले असल्यामुळे त्याला वर्गात शिकवलेले कांही समजत नव्हते आणि ते शिकण्यात रस वाटत नव्हता. आलेला दिवस जनार्दन कसाबसा ढकलत होता. अखेर पहिल्याच परीक्षेत तो एकूण एक विषयात नापास झाला आणि त्याचे बिंग फुटले. ज्यांनी त्याला मदत केली होती त्यांना ती वाया गेल्याचा राग आला आणि ज्यांनी त्याच्यासाठी आपला शब्द टाकला होता ते तोंडघशी पडले. शहरातला आधार न राहिल्यामुळे जनार्दन गांवाकडे परत गेला.

पण तिथले चित्र तोंपर्यंत बदलले होते. त्याच्या वर्गात शिकणारी धनिक लोकांची मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरांत गेली होती. त्यातली कांही मुले तिथे अभ्यासात चांगली प्रगती करत होती, पण ज्यांना ते एवढे जमत नव्हते ती सुध्दा त्या निमित्याने शहरात राहू शकत होती. गरजू मुले वेगवेगळ्या जागी नोकरीला लागली होती किंवा नोकरीच्या शोधात हिंडत होती. ज्या मुलांचा घरचा उद्योग व्यवसाय होता ती पूर्णवेळ कामाला लागली होती. जनार्दनाबरोबर घालवण्यासाठी आता त्यातल्या कोणाकडेच फारसा वेळ नव्हता. घराची सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातले लोक त्याच्याकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांची बोलणी आणि शेजार्‍यांचे टोमणे सहन करणे दिवसेदिवस कठीण होत चालले होते. थोड्याच दिवसात आपले बालपण संपले असल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो नोकरीच्या शोधाला लागला.
. . . . . . . .

‘अन्नासाठी दाही दिशां’ना शोध घेता घेता जनार्दनाला मुंबईजवळच्या एका गांवात नोकरी मिळाली. तिथल्या नगरपालिकेच्या जकातनाक्यावर कारकुनाच्या जागेवर त्याची नेमणूक जाली. ‘पोटापुरता पसा’ मिळण्याची सोय झाली आणि त्या गांवात राहणार्‍या एका नातलगाच्या बाल्कनीत पथारी पसरून झोपायला आडोसा मिळाला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा दुसरा खंड सुरू झाला. तिथले काम फारसे कठीण नव्हते, पण नोकरीच्या तीन पाळ्या असत, त्यामुळे कधी भल्या पहाटे, कधी भर दुपारच्या उन्हात, तर कधी अपरात्री तंगड्या तोडत गांवाच्या वेशीपर्यंत जावे यावे लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊसवारा सहन करत पाण्यातून व चिखलातून जाणे त्याच्या जीवावर येत असे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्याला पूर्णपणे कळून चुकले.

कामावर नसतांना तसेच असतांनाही त्याला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. त्याचा सदुपयोग करून घेऊन त्याने सार्वजनिक आरोग्यावरचा एक लहानसा अभ्यासक्रम पुरा केला आणि त्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याच्या आधारावर त्याला नगरपालिकेच्या आरोग्यविभागात बदली मिळाली. महिन्याचा पगार, कामाची जागा आणि कामाचे तास या तीन्ही गोष्टीत चांगला फरक पडला. दीड दोन वर्षे लक्षपूर्वक काम करून त्याने त्या कामाबाबतची सगळी माहिती शिकून घेतली. शिवाय इकडे तिकडे त्याचे लक्ष होतेच. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कांही जागा रिकाम्या असल्याचे कळताच त्याने त्यासाठी अर्ज केला.

चांगल्या व्यक्तीमत्वाची देण जनार्दनाला जन्मतःच मिळालेली होती, त्याचा स्वभाव बोलका होता आणि कामाबद्दलची माहिती आणि अनुभव यातून त्याचा आत्मविश्वास वाढला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्या जागेसाठी त्याची निवड झाली आणि मुंबईच्या सीमेच्या पलीकडे असलेल्या लहान गांवातून तो मुख्य महानगरात आला. तरी त्याची पहिली नेमणूक मुंबईच्या पार सीमेवरच्या एका उपनगरात झाली होती. त्या काळात दळणवळणाची आणि संदेशवहनाची एवढी साधने नव्हती तसेच त्या भागात इतर नागरी सुखसोयीसुध्दा फारशा सुलभ नव्हत्या. त्या बाबतीत तो भाग थोडा गैरसोय़ीचा असल्याने मुंबईमधील रहिवासी तिथे जाऊन राहण्यास फारसे उत्सुक नसायचे. योगायोगाने जनार्दन नोकरीला लागल्यानंतर लवकरच तिथल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वसाहतीतली एक जागा रिकामी झाली आणि जनार्दनाला ती विनासायास मिळून गेली.

पंचविशी गाठेपर्यंत जनार्दन नोकरीत चांगला रुळला होता, रहायला जागा मिळाली होती आणि कामावर जाण्यायेण्यासाठी त्याने हप्त्यांवर एक स्कूटर घेतली होती. साहजीकच उपवर कन्यांच्या पालकांची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. या बाबतीतही त्याचे दैव जोरावर होते. फार काळ वाट पहावी न लागता अनुरूप अशी जीवनसंगिनी त्याला सापडली आणि जान्हवीबरोबर तो विवाहबध्द झाला. जान्हवी सर्व दृष्टीने जनार्दनाला हवी तशीच, किंबहुना त्याला पूरक अशी होती. प्राप्त परिस्थितीतील अडचणी व गैरसोयींबद्दल कुरकुर करत न बसता त्यात जमेल तेवढी सुधारणा करायची आणि उरलेल्यांची खंत मनात न बाळगता त्या शांतपणे सोसायच्या असे तिचे जीवनसूत्र होते. त्याचबरोबर मिळत असलेले सुख आनंदाने उपभोगायची तिची वृत्ती होती. जीवनात जास्त आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करायला ती नेहमी तयार असे. घराजवळच असलेल्या महानगरपालिकेच्या इस्पितळात तिलाही नोकरी मिळाली आणि दुहेरी अर्थार्जनाचे सुपरिणाम दिसू लागले. रंगीत टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, टेलीफोन, धुलाईयंत्र वगैरे उपयोगाच्या एकेक आधुनिक काळातल्या वस्तू त्यांच्या घरात येत गेल्या.

जनार्दन आणि जान्हवीच्या संसारात प्राजक्ताने चिमुकले पाऊल टाकले आणि एका अनोख्या सुगंधाने तो दरवळला. लहानग्या प्राजक्ताचे अत्यंत मायेने लालन पालन होत गेले. तिला वसाहतीमधल्या इतर मुलांबरोबर तिथल्या महापालिकेच्या शाळेत न घालता मैलभर अंतरावरील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात शिकायला पाठवले. शाळेत जायच्या आधीच घरच्या घरी तिचा अभ्यास सुरू झाला होता. जान्हवीने तिच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष ठेवले होते आणि प्राजक्ता सुध्दा अभ्यासात हुषार निघाली. पहिल्या इयत्तेत तिने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आणि शालांत परीक्षेपर्यंत तो टिकवून धरला. त्यानंतर ती इंजिनियरिंग कॉलेजला गेली आणि तिथेही प्रत्येक वर्षी पहिला वर्ग टिकवून धरून ती उत्तम टक्केवारी घेऊन पदवीधर झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेंव्हा चांगले जोरात प्रगतीपथावर होते. एका प्रतिष्ठित कंपनीतली चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी प्राजूकडे आपणहून चालून आली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ती आपल्या आई वडिलांच्या दुप्पट तिप्पट अर्थार्जन करू लागली. तिची प्रगती पहात असतांना जनार्दन आणि जान्हवी मनोमन हरखून जात होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळतांना पाहून त्यांना अपूर्व समाधान वाटत होते.
. . . . . . . .

प्राजक्ता नाकीडोळी नीटस तसेच रंगाने उजळ होती, गोडवा आणि शालीनता हे तिचे दोन्ही गुण तिच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसायचे, तिच्या बोलण्यात माधुर्य होते, ती बुध्दीमान होतीच, इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली होती आणि एका प्रख्यात कंपनीत ती चांगल्या पदावर नोकरी करत होती. तिचे लग्न तर अगदी चुटकीसरशी जमून जाईल याबद्दल सर्वच आप्तेष्टांना पूर्ण खात्री होती. तिला चांगला मनाजोगता जोडीदार मिळावा असेच सर्वांना आपुलकीपोटी वाटत होते आणि त्यातले थोडे श्रेय़ आपल्याला मिळाले तर तेही हवे होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून प्राजू नोकरीला लागताच जो तो आपापल्या वर्तुळात तिच्यासाठी वरसंशोधन करू लागला. वय, उंची, शिक्षण आणि उत्पन्न या चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या मानाने सरस असावा असा सर्वमान्य संकेत आपल्याकडे आहे. त्यात दोघांचे शिक्षण समान असले तरी चालते आणि उत्पन्नाचा आकडा सारखा बदलत असतो, पण लग्न जुळवण्याच्या वेळी तरी वराचेच उत्पन्न वधूपेक्षा जास्त असावे लागते. ठरवून केलेल्या विवाहात सहसा कोणीही परभाषिक, परजातीचे किंवा परधर्माचे स्थळ पहात नाही, सुचवत तर नाहीच नाही. एवढी किमान अवधाने पाळूनसुध्दा प्राजक्तासाठी योग्य अशा विवाहोत्सुक युवकांची कमतरता नव्हती. त्यामुळे सर्वच आप्तस्वकीयांनी आपापल्या परिचयातली दोन चार स्थळे सुचवली. प्राजक्ताचे लग्न जुळवण्याचा विचार मनात येतो न येतो तोंपर्यंत निदान शंभर तरी स्थळांची नांवे, माहिती, पत्ते आणि फोन नंबर जनूभाऊंच्याकडे आले. त्यांनी त्याची छाननी सुरू केली. या बाबतीत मात्र जनूभाऊ, जान्हवी आणि प्राजू यांचे निकष वेगवेगळे होते. त्यामागे तशीच सबळ कारणे होती.

जनार्दनाचा जनूभाऊ होण्यापर्यंत त्याची प्रगति झाली असली तरी महापालिकेचे सफाई कामगार आणि त्यांनी गोळा केलेला कचरा ट्रकमध्ये भरून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणारे ट्रक ड्रायव्हर यांच्यावर देखरेख ठेवणे हे त्याच्या कामाचे स्वरूप कांही बदलले नव्हते. त्यामुळे दिवसातला त्याचा बराचसा वेळ या लोकांच्या सहवासात जात असे. त्यातील अशुध्द शब्दोच्चारासह त्यांची गांवढळ भाषा त्याच्या जिभेवर बसली होती. कधी कधी अनवधानाने एकादा अपशब्द त्याच्या तोंडातून निघून जात असे. त्याचे दांत तंबाखूच्या सेवनाने रंगले होते आणि त्या लोकांचे हांतवारे, अंगविक्षेप वगैरे जनूभाऊंच्या देहबोलीचा भाग झाले होते. त्याच्या विचारसरणीवरही त्या कामगारांच्या सहवासाचा थोडा प्रभाव पडला असावा. जान्हवीचा संपर्क जास्त करून मध्यम वर्गातील पांढरपेशा महिलांबरोबर येत असे. त्यामुळे तिचे बोलणे, वागणे त्या वर्गाच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे झाले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ती जुन्या काळातल्या काकूबाईंची पण खूप सुधारलेली आधुनिक आवृत्ती वाटायची. प्राजूला लहानपणापासून जसे घरापासून दूर असलेल्या चांगल्या दर्जेदार अशा शाळेत घातले होते, तसेच घराच्या आसपासच्या मुलांपासूनही तिला थोडे दूरच ठेवले गेले होते. तिच्या बहुतेक वर्गमैत्रिणी उच्च मध्यवर्गीयांच्या हाउसिंग सोसायट्यातल्या फ्लॅटमध्ये रहात असत. प्राजू जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे आपल्या मैत्रिणींकडे जाणेयेणे वाढत गेले. इंजिनियरिंगसाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलवर रहात होती, तिथल्या मैत्रिणी सांपत्तिक व सामाजिक दृष्ट्या अधिकच वरच्या स्तरातून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून प्राजक्ताच्या वागण्यात सफाई, अदब आणि रिफाइनमेंट आली होती. वेषभूषा, केशभूषा, सौंदर्यसाधनांचा वापर वगैरे बाह्य स्वरूपाच्या गोष्टींच्या बाबतीत तिने आपल्या आईवडिलांना जितपत पसंत पडेल तितपतच मजल मारली असली तरी अंतरंगातून ती त्यांच्या विश्वापासून खूप पुढे गेली होती. त्या तीघांनीही कधीही ही गोष्ट आपल्या ओठावर येऊ दिली नसली तरी ती त्यांच्या कळत नकळत घडत होती. यामुळे लग्नसंबंधासाठी स्थळांचा विचार करून त्यांची छाननी करतांना त्या तीघांच्या हातात वेगवेगळ्या चाळणी होत्या.

जनार्दन आणि जान्हवी या उभयतांचे बहुतेक सर्व नातलग मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातच रहात असल्यामुळे आपले लहानपणी वास्तव्य असलेले खेडेगांव सोडल्यानंतर जनार्दनाचा सारा प्रवास एवढ्या भागातच झाला होता. त्यापलीकडचे विश्व त्याने कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कन्यकेला लग्न लावून सातासमुद्रापलीकडे पाठवून द्यायची कल्पनासुध्दा तो सहन करू शकत नव्हता. फार फार तर बडोदा, इंदूर किंवा धारवाडपर्यंत तिला पाठवायची त्याच्या मनाची तयारी होती. प्राजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात असावे असेच जान्हवीलाही वाटत होते. शिवाय नवरदेवाचे आईवडील, भाऊ बहिणी वगैरे मंडळीसुध्दा त्याच्यासोबतच रहात असली तर उत्तमच, निदान ती गरज पडतांच लगेच येऊ शकतील एवढ्या जवळ असावीत असे तिला वाटत होते. या बाबतीत प्राजूचे मत विचारण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. सांगून आलेल्या स्थळांमधली अनेक मुले परदेशी गेलेली होती, किंवा जायच्या तयारीत होती. ज्यांची भावंडे अमेरिकेत आधीच जाऊन स्थायिक झाली होती ती आज ना उद्या जाणारच असे गृहीत धरून अशी सर्व स्थळे जनूभाऊने यादीतून कटाप केली. नोकरीसाठी दिल्ली, कोलकाता किंवा बंगलोरला गेलेल्या मुलांचाही विचार केला नाही आणि ज्यांचे आईवडील डेहराडून किंवा कोचीनसारख्या दूरच्या ठिकाणी रहात होते त्यांनाही बाजूला ठेवले. मुंबई व पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या इतर विभागात प्राजूपेक्षा जास्त पगार मिळवणारी अशी कितीशी मुले असणार? त्यामुळे तिच्यासाठी वरसंशोधन करण्याचे क्षेत्र मुंबईपुण्याच्या सीमेतच मर्यादित राहिले.

प्राजूच्या ज्या मैत्रिणींची लग्ने झाली होती त्या माहेरच्या चांगल्या सुखवस्तू घरातून निघून सासरच्या अधिकच प्रशस्त घरी गेल्या होत्या. कांहीजणींची ठरलेली लग्ने त्यांच्यासाठी नवा फ्लॅट बांधून तयार होण्याची वाट पहात थांबवून ठेवली होती. तिलासुध्दा आपला नवा संसार छानशा जागी थाटावा असे वाटले तर त्यात काही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. पण तिला सांगून आलेल्या स्थळातली कांही मुले सध्या तरी दादर गिरगांवातल्या चाळीत किंवा डोंबिवली भायंदरसारख्या दूरच्या नगरातल्या दोन खोल्यात रहात असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय आईवडिलांकडे रहात होती. परदेशातल्याप्रमाणे वयात आल्याबरोबर मुलांनी लगेच स्वतंत्र होऊन राहणे अजून आपल्या देशात रूढ झालेले नाही. पुढे त्यांनी गरजेपोटी आपले वेगळे घर केले असतेच, पण लग्न झाल्या झाल्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्राजूला वाईटपणा घ्यायचा नव्हता. तसेच ते होण्याची वाट पहात त्या माणसांच्या गर्दीत जाऊन राहण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती आणि तिला तसा आग्रह करावा असे जनार्दनालाही वाटत नव्हते. आधीपासूनच व्यवस्थित परिस्थितीत रहात असलेल्या कुटुंबात लग्नानंतर जायची तिची इच्छा त्यालासुध्दा मान्य होती.

अशा प्रकारे मुंबईपुण्यात राहणारी सुस्थितीतली स्थळे निवडून त्यातील एकेकाला प्राजक्ताची माहिती, पत्रिका वगैरे पत्राने पाठवायला जनूभाऊंनी सुरुवात केली. तसेच संभाव्य वराची चौकशी केली. पत्रिका पाहणारे लोक गोत्र, मंगळ, एकनाड यासारख्या कांही किमान गोष्टींकडे लक्ष देतातच, सगोत्र विवाह कोणालाच चालत नाही आणि कांही गोत्रांचे आपसात जमत नाही. त्यामुळे त्या मुद्यांवरून १०-१५ टक्के पत्रिका वर्ज्य ठरतात. आकाशातील राशीचक्रातल्या एकूण बारा राशींपैकी पाच राशींमध्ये (म्हणजे सुमारे चाळीस टक्के लोकांच्या पत्रिकेत) मंगळ हा ग्रह असला तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे समजले जाते आणि उरलेल्या अमंगळ व्यक्ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नसतात. कोणाला मंगळ असला तर यात साठ टक्के जागी पत्रिका जुळत नाहीत. जगातील एक तृतियांश म्हणजे तेहतीस टक्के लोकांची नाड एकच असते, ते ही गेले. त्याशिवाय कोणाचा जन्म चांगल्या तिथीवर झालेला नसतो, तर कोणाचे जन्मनक्षत्र अशुभ मानले जाते. अशा सर्व नकारघंटा ऐकल्यानंतर सुमारे वीस टक्के पत्रिकांतल्या जोड्याच एकमेकीशी जुळतात आणि बहुसंख्य म्हणजे ऐंशी टक्के जुळत नाहीतच. असे सर्वांच्याच बाबतीत होत असते. त्याप्रमाणे अनेक लोकांनी प्राजक्ताची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळत नसल्याचा निकाल जनूभाऊंना कळवला.

म्युनिसिपल क्वार्टर्समधला जनूभाऊंचा पत्ता पाहूनच कांही वरपित्यांनी ते पत्र कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले असेल. त्याला उत्तर देण्याची गरज त्यांना वाटली नसेल. कांही लोकांना टेलीफोन करून जनूभाऊने आठवण करून दिली, पण रांगडेपणाचा स्पर्श असलेल्या भाषेतले त्याचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी ते संभाषण जास्त वाढवले नाही. बंगल्यात किंवा उत्तुंग गगनचुंबी इमारतीत रहात असलेल्या लोकांच्या घरी जायला त्याला संकोच वाटत होता, पण उद्या आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथे जावे लागणारच, असा विचार करून तो कांही लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आला. पण दर वाक्यात दोन तीन इंग्रजी शब्द आणि दर दोन तीन वाक्यात एक अख्खे इंग्रजी वाक्य असे मिश्रण असलेले त्यांचे बरेचसे बोलणे जनूभाऊच्या डोक्यावरून जात होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी केलेली वेषभूषा, केशभूषा व एकंदर साजश्रुंगार आणि त्यांचे मॅनर्स व एटिकेट्स सांभाळत कृत्रिमपणे बोलणे जान्हवीच्या मनात इन्फीरिएरिटी काँप्लेक्स निर्माण करत होते. त्यांना एकमेकांशी बोलता येईल असा समान विषय सापडत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद साधला गेला नाही. अर्थातच त्यांच्याकडून होकार येण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नव्हता.

प्राजक्ताला प्रत्यक्ष पाहून कोणी तिला नाकारले असे कधी झाले नाही आणि दाखवल्यानंतर तिला कोणीही नकार दिलाही नसता, पण तिच्या वरसंशोधनाच्या प्रवासाची गाडी त्या स्टेशनापर्यंत गेल्याशिवाय पुढे जायला पसंतीचा हिरवा कंदील मिळणार तरी कसा? मुलीला दाखवणे किंवा मुलगा व मुलगी यांची भेट घडवून आणणे इथपर्यंतसुद्धा बोलण्यातली प्रगती होत नव्हती. दरम्यानच्या काळात प्राजक्ताची नोकरीतली घोडदौड मात्र चालू होती. प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, रिवॉर्ड्स वगैरेमधून तिची प्राप्ती तीन वर्षात दुपटीवर गेली. त्याबरोबर वराबद्दलच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि छाननीच्या चाळणीतल्या जाळीची वीण अधिकाधिक दाट होत गेली. ज्या आप्तस्वकीयांनी उत्साहाने आधी परिचयातली दोन चार स्थळे सुचवली होती त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगली स्थळे मिळालीही नसती आणि मिळाली असती तरी त्यांची पहिल्यासारखीच गत झाली असती असे पहिला अनुभव पाहिल्यानंतर वाटल्यामुळे त्यांनी आणखी नवी स्थळे शोधण्यात रस घेतला नाही. वधुवर सूचक मंडळे, वर्तमानपत्रातल्या आणि इंटरनेटवरच्या जाहिराती वगैरे पाहून जनूभाऊने आपले प्रयत्न चालू ठेवले होते, पण त्यातून कांही निष्पन्न होत नव्हते. प्राजू तर रात्रंदिवस आपल्या कामातच गढून गेली असल्यासारखे दिसत होते आणि तिचे असे कांही फार मोठे वय झाले नसल्यामुळे आपल्या कमावत्या मुलीचे तातडीने लग्न करून तिची सासरी पाठवणी करण्याची जनार्दनालाही विशेष घाई वाटत नव्हती. प्राजूचे आणि अज्ञात असलेल्या संभाव्य वराचे आईवडील एकमेकांना नापसंत करत होते किंवा आकाशातले ग्रह त्यांच्या आड येत होते. तिच्या लग्नाची झालेली अनपेक्षित अशी ही कोंडी कशी फुटणार हेच कळत नव्हते.
. . . . . . .

अशातच एका दिवशी अचानक जनार्दनाचा फोन आला. तो घाईघाईने बोलला, “अरे या रविवारी कसलाही कार्यक्रम ठरवू नकोस हां, ठरला असला तरी तो रद्द कर, तुम्हाला दोघांनाही आमच्या गेट टुगेदरला यायचंय् बरं.”
मला कसलाच बोध होत नव्हता. त्या दिवशी त्याच्या घरी कोणाचा वाढदिवस नव्हता की दसरा, संक्रांत यासारखा सण नव्हता. यापूर्वी जनार्दनाने अशा निमित्याने सुध्दा कधीच असे संमेलन भरवले नव्हते. कधी कधी परदेशात राहणारे पाहुणे थोडी सुटी घेऊन भारतात येतात आणि सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी वेगवेगळे जाण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणून सर्वांना एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठेवतात. जनार्दनाच्या जवळचे असे कोणीच परदेशात रहात नव्हते. मी विचार करत असतांना जनार्दन पुढे सांगत होता, “तुझी मुलं इकडे आली असतील तर त्यांनाही घेऊन ये, नसतील तरी ती येण्यासारखी असतील तर त्यांना यायला सांग. त्यांच्याही सगळ्यांशी भेटी होतील.”
मी त्याला म्हंटले, “अरे हो, हे कशाबद्दल आहे ते जरा नीट सांगशील तरी, प्राजूचं लग्नबिग्न …” मी खडा मारून पहात होतो, पण माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, “हां, त्याबद्दलच आहे. तू आलास की सगळं कळेल तुला. आधी पत्ता तर लिहून घे. मला अजून खूप फोन करायचे आहेत.”
मी दिसेल ते पेन हातात घेऊन समोरच्या वर्तमानपत्रावरच त्याने सांगितलेला पत्ता, तारीख आणि वेळ लिहून घेतली. तेवढ्यात त्याने फोन बंदच केला. मी त्याला फोन लावून पाहिला, पण तो सारखा एंगेज्ड येत राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो फोनवर एकामागून एक बोलावणी करत असणार. रात्री त्याच्या घरी कोणी फोन उचलतच नव्हते. बहुधा तो समारंभाच्या तयारीसाठी बाहेर गेला असावा आणि मुक्कामाला तिकडेच राहिला असावा असा तर्क करून मी त्याचा नाद सोडून दिला.

रविवारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. अनोळखी भागातल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या जागेचा शोध घेताघेता थोडा उशीरच झाला. तीन मजले चढून गेल्यावर तिथे तो हॉल होता. त्याच्या अंवतीभोवती दिव्याच्या किंवा फुलांच्या माळांची आरास नव्हती की दाराला तोरण नव्हते किंवा स्वागतासाठी कोणी उभे नव्हते. बाहेर कसला बोर्डही नव्हता. उघड्या दरवाजातून आत बसलेली ओळखीची माणसे दिसली तेंव्हा त्यांना पाहून आम्हीही आत गेलो. मुंबई पुणे नाशिक त्रिकोणातली बरीचशी नातेवाईक मंडळी आमच्या आधी तिथे येऊन पोचली होती. आणखी कांही लोक यायला निघाले होते. दारातून आत गेल्यावर जे समोर दिसतील त्यांना “हॅलो, हाय्, कसं काय ?” वगैरे विचारत, वडिलधारी लोकांचा चरणस्पर्श करत आणि आमच्या पाया पडणार्‍या मुलांच्या पाठीवर थाप मारून त्यांची खुशाली विचारत आम्ही हळूहळू पुढे सरकत स्टेजपाशी जाऊन पोचलो. भेटवस्तू किंवा लिफाफे हातात घेऊन अभिनंदन करायला आलेल्या लोकांच्या छोट्याशा रांगेत उभे राहून समोरचे निरीक्षण केले.

नखशिखांत साजशृंगार करून स्टेजवर उभी राहिलेली प्राजक्ता दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती. तिच्या आमच्याकडच्या बाजूला उभे असलेले जनार्दन आणि जान्हवी भेटायला येणार्‍या लोकाचे हंसतमुखाने स्वागत करत होते. प्राजूच्या पलीकडे एक काळासावळा, तिच्या मानाने थोडा राकट वाटणारा पण तरतरीत दिसणारा एक युवक उभा होता. अर्थातच तो तिचा पती असणार. त्याच्या पलीकडे बरीच जागा सोडून स्टेजच्या कडेला दोन खुर्च्या मांडून त्यावर एक वयस्क जोडपे बसले होते. त्यातल्या गृहस्थाने सुटावर बो बांधला होता. अशा प्रकारच्या समारंभात मी प्रथमच बो बांधलेला पहात होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मॅडमने चक्क फ्रॉक घातला होता. तिच्या कपाळाला कुंकुवाची टिकली नव्हती की गळ्यात मंगळसूत्र नव्हते. तिथे फक्त एक टपोर्‍या मोत्यांची माळ दिसत होती. त्यांचे रंगरूप आणि चेहेरामोहरा पाहता ते त्या युवकाचे मातापिता असणार हे लक्षात येत होते. हॉलमध्ये आलेल्या लोकांकडे दुरूनच पहात ते फक्त एक दुसर्‍याशी बोलत बसले होते.

आमच्या पुढे असलेला ग्रुप स्टेजवरून उतरायला लागल्याबरोबर आम्ही पुढे झालो. जनार्जन आणि जान्हवीने एक पाऊल पुढे येऊन आमचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करून होताच त्याने ओळख करून दिली, “हे आमचे जावई, टॉम कार्व्हाल्लो. “मी ही “हौडीडू” म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले, “काँग्रॅट्स” म्हणून त्या जोडप्याला “ऑल द बेस्ट विशेस” दिल्या, आम्ही येऊन गेल्याची नोंद आल्बममध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि स्टेजवरून खाली उतरून जनार्दनाच्या सख्ख्या भावंडांच्या शेजारी जाऊन बसलो.

ती मंडळी अजून धक्क्यातून सावरलेली दिसत नव्हती आणि त्यांनाही संपूर्ण माहिती नव्हती. थोडी माहिती, थोडा तर्क, थोडा अंदाज यातून जे तुकडे कानावर पडले त्यातून मी एक सुसंगत वाटेल अशी गोष्ट गुंफली. प्राजू आणि टॉम सात आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोघेही शाळेत असतांना कसल्याशा कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांची नुसती तोंडओळख झाली होती. पुढे दोघे वेगवेगळ्या कॉलेजात शिक्षणासाठी गेले आणि कोण कुठे गेले तेसुध्दा त्यांना एकमेकांना समजायचे कांही कारण नव्हते. शिक्षण संपल्यावर टॉमला थेट दुबाईला नोकरी लागली आणि तो तिकडेच रहात होता. वर्षभरापूर्वी सहज ऑर्कुटवर मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींची नांवे वाचतांना त्यातल्या कोणा एकाला दुसरे नांव दिसले आणि “मला ओळखलंस का?, कांही आठवतंय् कां?” असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात झाली आणि “तूच ना?”, “आता तुझं कसं चाललंय्?”, सध्या तू कुठे आहेस?” वगैरेंमधून ते संभाषण वाढत गेले. स्क्रॅप नंतर मेल, चॅटिंग वगैरे करता करता आपण दोघे ‘एकदूजेके लिये’ निर्माण झालो असल्याचा साक्षात्कार होऊन त्याचे ई-लव्ह अफेअर सुरू झाले. प्राजक्ताने याबद्दल चकार शब्द न उच्चारल्यामुळे घरात किंवा तिच्या मैत्रिणींना त्याचा पत्ता लागला नाही.

ती इंजिनियरिंगला गेली तेंव्हा तिच्या अभ्यासासाठी घरी कॉम्प्यूटर आणला होता आणि नोकरीला लागल्यानंतर इंटरनेट कनेक्शन घेतले होते. घरी असतांना ती त्याच्यासमोर नेहमी बसलेली असते एवढेच तिच्या आईवडिलांना दिसत होते, पण ती इंग्रजी भाषेत काय गिटर पिटर करत असे ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नसुध्दा कधी केला नव्हता. आठवडाभरापूर्वी टॉम भारतात आला. दोघांनी कुठे आणि केंव्हा भेटायचे हे आधी ठरवलेलेच होते, त्याप्रमाणे भेटून त्यांनी सर्व तपशील पक्का केला. टॉमला सोबत घेऊन प्राजू घरी आली आणि तिने सांगितले, “आम्ही दोघे तीन दिवसांनी चेंबूरच्या चर्चमध्ये विवाहबध्द होत आहोत. तिथून परस्पर विमानतळावर जाऊन सिंगापूरला जाऊ आणि चार दिवसांनी परत आल्यावर आठवडाभर मुंबईला हॉटेलात राहून व्हिसा, इन्शुअरन्स, बँक अकौंट्स वगैरेची कामे आटपून अमक्या तारखेला दुबईला जाणार आहोत. माझी बदली दुबईच्या ऑफीसमध्ये झाली आहे आणि दोन आठवड्यात मला तिकडे जॉइन करायचे आहे. सर्व प्रवासांची आणि हॉटेलांची रिझर्वेशने झाली आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे.”

कुशल इंजिनियरच्या सफाईने त्यांनी एकूण एक गोष्टी विचारपूर्वक आणि पध्दतशीर रीतीने नियोजन करून केल्या होत्या. त्यात अविचार किंवा उतावळेपणा दिसत नव्हता. त्यामुळे ते त्यात बदल करतील अशी शक्यता नव्हती. त्यांना होकार देऊन आपल्या मायेचे उरले सुरले बंध जपून ठेवणेच जनार्दन आणि जान्हवी यांच्या दृष्टीने शहाणपणाचे होते. ते अशा गोष्टी नाटकसिनेमातून रोज पहात असले तरी गदिमांच्या शब्दात सांगायचे झाले तर “अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात” अशी गोष्ट आता त्यांच्याच जीवनात घडत होती. त्यांनी त्याला विरोध केला नाही. प्राजू आणि टॉमच्या बिझी शेड्यूलमधला रविवारचा सुटीचा दिवस तेवढा आपल्यासाठी मागून घेतला.

प्राजू जन्मल्यापासूनच तिच्या लग्नाची तयारी हळूहळू सुरू झाली होती. तिच्यासाठी एकेक ग्रॅम सोन्याची खरेदी करून ते साठवले होते. ती मोठी झाल्यावर त्याचे अलंकार घडवून घेतले होते. अलीकडे तर कुठेही छानशी साडी किंवा ड्रेस दिसला, एकादी नवी संसारोपयोगी वस्तू दिसली की तिच्यासाठी घेऊन ठेवली जात होती, आपण कोणाकोणाकडे लग्नकार्याला गेलो होतो त्या सगळ्यांना आग्रहाने प्राजूच्या लग्नासाठी बोलावून धूमधडाक्याने तिचा बार उडवायचा असे मनसुबे रचले जात होते. त्यासाठी सर्व नातेवाइकांचे लेटेस्ट पत्ते आणि फोन नंबर एका वेगळ्या वहीत उतरवून काढले होते. पण लग्नसमारंभ तर हे दोघे परस्पर ठरवून मोकळे झाले होते. तिथे इतर कोणाला बोलवायला वाव नव्हता. त्यामुळे जनूभाऊंनी या संमेलनाचा घाट घातला. त्या क्षणाला जो हॉल मोकळा सापडला तो बुक करून टाकला आणि दोन दिवस धांवपळ करून बाकीची सारी जमवाजमव केली. हे पाहता ते संमेलन छानच झाले होते आणि जवळ राहणारी झाडून सगळी आप्तेष्ट मंडळीसुध्दा आली होती. आजकाल कोणी ‘खानदानकी इज्जत’चा बाऊ करत नाही.

राहून राहून सर्वांना एकच प्रश्न पडत होता. प्राजक्ताच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींमध्ये भारतीय, हिंदू आणि मराठी मुले शेकड्यांनी असतील, त्यांना सोडून नेमका हा टॉमच कसा तिला भेटला ? त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही? कदाचित हे दोघे आपापल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळे त्या धाग्यानेच एकमेकांत गुंतत गेले असतील आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला फोडायचे ठरवले असणार!

.. . . . . . . . (समाप्त)

ती

पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली माझ्या मनात आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर मात्र दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे टॅक्सीचा प्रवास शरीराला आरामशीर वाटत असला आणि खिशाला परवडत असला तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी तो करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा बसच्या प्रवासात मला ‘ती’ भेटली. म्हंटले, चला आता ‘ति’च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणा-या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मोकळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणा-या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.

आपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी ‘ती’ समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा …… (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) ‘लटपट लटपट’, ‘ठुमक ठुमक’ वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या सा-या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर कदाचित असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप?) तिने घातला होता. ‘ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला तिकडे निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असेल अशाला त्या ‘शब्दांच्या पलीकडले’ दिसल्यावाचून राहिले नसते.

कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहे-यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केला जातो. अशा नजरांना सामोरे जात तिच्या तो-यातच ‘ती’ आली, ‘ति’नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.

त्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेसुध्दा ‘ति’ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर ‘ति’च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही रिकामी जागा नव्हती. ‘ती’ बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या तरुण मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. नेहमीप्रमाणेच बस आल्यानंतर स्टॉपवरले सारे लोक रांग मोडून धांवले आणि धक्काबुक्की करत बसमध्ये घुसले. स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट अशा धक्काबुक्कीपासून सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर ‘चुकून’ बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि त्याला उठायला लावून ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.

एका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतरच कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला पण उतरायचे होते. म्हणजे मला त्या दिवशी उभ्यानेच प्रवास करायचा होता. एक हात खिशावर ठेवून आणि दुस-या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपल्या शरीराची राखीव क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचे असह्य असे कष्ट वाटतही नव्हते. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती. शिवाय सकाळच्या गर्दीच्या वेळात पुढल्या बसमध्येही सीट मिळण्याची खात्री नव्हतीच.

बसमध्ये जिथे मी उभा होतो तिथून जवळच राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली ‘ती’ बसली होती. अचानक ‘ती’ उठून उभी राहिली. ‘ति’च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून ‘ति’ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच ‘स्त्रियांसाठी राखीव’चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, “मी माझी जागा तुम्हाला देते आहे.”
“ते ठीक आहे. पण …” असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुस-या मुलीकडे हळूच बोट दाखवले.
“तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन.” त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने ‘ती’ अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुस-या मुलीला झाली नाही.
आता तिने दिलेल्या सीटचा साभार स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे भावना मूर्तिमंत होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास मला होत राहिला.

कोण गुन्हेगार? ………………………………………. भाग ३ (अंतिम)

महत्वाची सूचनाः हा भाग वाचण्यापूर्वी पहिले दोन भाग वाचून घ्या. कारण ही एक रहस्यकथा आहे.

 . . . . . (मागील भागातील . .  पुन्हा एकदा इन्स्पेक्टरने एल्माला समजावीत विचारले, “तसं नव्हे हो, पण तुमच्या अगदी जवळचं कोणी आलं असेल. . . . .  इथून पुढे )                                         
“समजा तुमचा मुलगा आला असेल.”
“हो, खरंच! रविवारी सकाळी मेजर चर्चला गेला होता ना, तेंव्हाच आमचा मुलगा इथं आला होता. त्या दिवशी माझ्याशी किती लाडात बोलत होता?” गळ्यात आलेला आवंढा गिळत एल्मा बोलू लागली, “मला म्हणाला की त्या दिवशी त्याला माझ्या हांतचं मशरूम सूपच प्यायचंय्. मी त्याला म्हंटलं की अरे आताशा कुठे सकाळ होते आहे, मी गरम गरम कॉफी बनवते, तर नको म्हणाला. म्हणे तो आताच कॉफी पिऊन आला आहे. त्याला थोडीशी सर्दी झाल्यासारखी वाटते आहे आणि म्हणून मी लहानपणी त्याला बनवून देत होते तसं छान गरम सूपच पाहिजे. माझ्यापाशी अगदी हट्टच धरून बसला. मग मीही म्हंटलं की बरं बाबा, मी आणते करून. तू बैस इथं.”
“तुम्हाला सूप बनवायला साधारण किती वेळ लागला असेल हो?” इन्स्पेक्टरने पृच्छा केली.
त्यावर एल्मा पुटपुटली, “आता मी काय हांतात घड्याळ लावून बसले होते कां? म्हणे किती वेळ लागला ते सांगा! अहो मशरूमचं सूप बनवायला वेळ लागणार नाही कां? आधी ते निवडा, वाफवा, सोला, चिरा. थोडा कांदा बारीक चिरून घेऊन परतून घातला चवीला, थोडं आलं पण किसून घातलं. माझे काम कांही आताच्या पोरींसारखं नाही हो. की एक कॅन बाजारातून आणा आणि गरम करून घशात घाला. पण मी तरी हे सगळं मेलं तुम्हाला कशाला सांगतेय्? तुमची बायको पण हेच करत असेल ना! पण मी सांगते इन्स्पेक्टर, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर आमच्याकडे या. खरं मशरूमचं सूप कसं असायला पाहिजे त्याची चंव तरी तुम्हाला कळेल.”
एल्माबाई वाहवत जात होत्या. त्यांना पुन्हा पहिल्या वळणावर आणीत इन्स्पेक्टरने विचारले, “तुमच्या मदतीला तुमचा मुलगा आला असेलच ना?”
“छे हो! तो बसला होता या इथे हॉलमध्येच. कसली तरी ती कर्कश रीमिक्सची टेप ढणाढणा लावून ऐकत बसला होता.”
“सूप तयार झाल्यावर तुमच्याबरोबर कांही बोलला असेलच ना?”
“हो. आपलं ते नेहमीचंच पुराण. त्याला म्हणे कसलासा बिझिनेस करायचाय् आणि त्यासाठी एकदम वीस हजार पौंड पाहिजेत. मी म्हंटलं, अरे आम्ही एवढे पैसे कुठून देणार रे? तर म्हणतो की डॅडींच्या फंडाचे आहेत ना? मी त्याला साफ सांगितलं की मी त्या पैशाला कुणालाही हात लावू देणार नाही. अरे हा फंड आहे म्हणून तर अडी अडचणीला आणि सणासुदीला त्याचा आधार आहे. नाही तर यांची ती जुन्या काळातली पेनशन कांही पुरणार आहे कां? त्यांत यांचं हे ढोसणं आणि खादाडी काय कमी आहे? मी त्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जरी तुझे डॅड तयार झाले तरी मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत त्यांना त्यांच्या फंडाच्या पैशाला हांत लावू देणार नाही. त्यावर तो काय म्हणाला माहीत आहे? म्हणे तू मेल्यावर तरी मला पैसे मिळतीलच ना? काय मेल्याच्या जिभेला हाड तरी आहे की नाही? म्हाता-या आईची कोणी अशी थट्टा करतात कां हो?” एल्माला गलबलून आलं.
“बस्स, एवढं बोलला आणि चालला गेला हो. नेहमीसारखी खाऊ म्हणून पाच दहा पौंडांची चिरीमिरी पण घेतली नाहीन!”
म्हातारीचा गळा पुन्हा दाटून आला. मेजरकडे वळून इन्स्पेक्टरने विचारले, “माफ करा मेजर, पण तुमचं तुमच्या पत्नीबरोबर कधी भांडण व्हायचं कां?”
मेजरने उत्तर दिलं, “अहो तिची बोलण्याची पद्धत पहातच आहात तुम्ही. त्यावर आमचीसुद्धा अधून मधून वादावादी जुंपायची.”
“आणि बरं कां इन्स्पेक्टर, हे मेजरसाहेब एकदा चिडले ना, की एकदम हांतात ते जुनं पिस्तुल घेऊन ओरडायचे!” एल्मा मिश्किलपणे पुढे म्हणाली, “आमचा बॉबीसुद्धा लहानपणी त्यांची छान नक्कल करायचा. आता एक छब्द बोललीस तल गोळी घालीन, ठो! ठो! ठो! आणि खाली पडल्याचं नाटक करायचा.” बाईंचे ओले डोळे पुन्हा पाणावले.
“ओके, सगळा खुलासा झाला. हे रहस्य तर उलगडलं.” इन्स्पेक्टरने निःश्वास टाकीत म्हंटले.
“हो, पण गुन्हेगाराला शिक्षा कधी देणार ?” एल्माने किंचाळत विचारले.
“तो तर आता कोणाच्या हाती लागणे शक्यच नाही, पण त्याच्या गुन्ह्याची फार मोठी शिक्षा त्याला आधीच मिळाली आहे.” इन्स्पेक्टरने सगळ्यांना अधिकच बुचकळ्यात टाकले.
सर्वांच्या चेहे-यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्याने खुलासा केला, “मेजर तुम्ही ते सांगितलं नाहीत पण आमच्या तपासात आम्हाला कळलं की रॉबर्टला म्हणजे तुमच्या मुलाला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच त्याची नोकरी टिकायची नाही, त्याला बेकारीचा भत्ता पुरायचा नाही आणि नैराश्याचे झटकेही येत असत. तुमच्याकडे असलेल्या फंडाच्या रकमेवर त्याचा डोळा होता पण आई हे पैसे मिळू देणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. कदाचित गुन्हेगारीवरील एखादी कादंबरी वाचून किंवा चित्रपट पाहून त्याच्या मनात एक दुष्ट विचार आला. हांतात पिस्तुल घेऊन बायकोला धांक दाखवायची तुमची संवय त्याला ठाऊक होती. त्यानेच जुन्या सामानाच्या बाजारातून त्या काळच्या गोळ्या शोधून काढून तुमच्या नांवाने विकत आणल्या. तुम्ही दर रविवारी ठरलेल्या वेळी निदान तासभरासाठी चर्चला जाता हे त्याला माहीत होतं. त्या दिवशी तुमच्यावर पाळत ठेऊन तुम्ही घराबाहेर पडतांच तो तुमच्या घरी आला, तुमच्या मिसेसना मशरूमचं सूप बनवायला सांगून स्वयंपाकघरात गुंतवून ठेवलं, बाहेर आवाज ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्याने टेप वाजवली आणि गुपचुपपणे तुमच्या पिस्तुलात गोळ्या भरून ठेवल्या. कधी तरी तुमचं भांडण होईल, तुम्ही संवयीप्रमाणे पिस्तुल रोखाल. रागाच्या भरात अनवधानाने त्यातून गोळी सुटून एल्माचा प्राण जाईल असं त्याला वाटत होतं. त्यानंतर तुम्हाला त्यात गुंतवण्यासाठी तुम्ही एल्माचा नेहमी छळ करता, त्यातूनच तिचा जीव घेतलात असे दाखवणारे एक निनावी पत्रसुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं. घटना घडताच तो ते पोस्ट करणार होता. पण जसजसा वेळ गेला तसतसा तो अस्वस्थ होऊ लागला. भांडण व्हायच्या आधीच पिस्तुलातल्या गोळ्या तुमच्या लक्षात आल्या तर आपलं बिंग फुटेल ही भीती त्याला वाटायला लागली. त्याचं मन तर त्याला खात होतंच. हांतात पैसे नसल्यामुळे त्याला ड्रग्ज मिळेनात. त्यामुळे त्याला अधिकच नैराश्य आलं. अशा परिस्थितीत सांपडलेल्या माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. तसा त्याच्या मनात येताच त्याने वैतागाच्या भरात खिडकी उघडून आपला जीव देण्यासाठी दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. योगायोगाने नेमक्या त्याच वेळी तुम्ही हांतात पिस्तुल घेऊन पत्नीशी भांडत होतात व अनवधानाने त्यातून गोळी सुटलीसुद्धा होती. पण त्याच क्षणी खिडकीबाहेर झालेल्या आवाजाने दचकून मॅडम बाजूला झाल्या ल पिस्तुलातून सुटलेली गोळी नेमकी खिडकीबाहेर वरून खाली पडत असलेल्या बॉबीच्या मस्तकात घुसली. तुमचे पिस्तुल असे अचानक फायर झाल्यामुळे तुम्हा दोघांनाही धक्का बसला. त्यामुळे खिडकीबाहेर काय झाले इकडे तुमचे लक्ष गेलं नाही. रॉबर्टने आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी तो खाली बांधलेल्या नायलॉनच्या नेटमध्ये पडल्यामुळे त्याचा प्रयत्न असफल झाला असता. पण ती पिस्तुलातली गोळीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. ती तशा प्रकारे उडावी असा डांव मात्र त्याने स्वतःच रचला होता. दैवयोगाने तो स्वतःच त्या डावाला बळी पडला. तुमच्या मनात खून करण्याचा उद्देश नव्हताच त्यामुळे या घटनेला खून म्हणता येणार नाही. तेंव्हा आता अपघात या नांवाखाली हे प्रकरण संपवावे हे उत्तम.”

 . . . . (समाप्त)
——————————————————————–
या गोष्टीचे बीज शेरलॉक होम्सच्या एका पुस्तकात असून ‘आत्महत्या की खून’ अशा कांहीशा नांवाने एक संक्षिप्त गोष्ट ईमेलद्वारा माझ्याकडे आली होती. त्यातील पात्ररचना, संवाद आणि त्यांची रहस्यकथेच्या दृष्टीने तिची मांडणी व विस्तार करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

कोण गुन्हेगार? ………………….. भाग २

महत्वाची सूचनाः हा भाग वाचण्यापूर्वी पहिला भाग वाचून घ्या. कारण ही एक रहस्यकथा आहे.

रॉबर्टबद्दल विचारलेली सर्व माहिती मेजरनी इन्स्पेक्टरला दिली. तो एक तिशीतला तरुण होता, पण अजूनही जीवनात स्थिरावला नव्हता. त्याने धड शिक्षण पुरे केले नव्हते की एकाही नोकरीत फार काळ टिकला नाही. कधी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले तर कधी त्यानेच नोकरी सोडली होती. सध्या तो बेकारभत्त्यावरच जगत होता. पण तो गुन्हेगारी जगापासून तसा दूरच राहिला होता. त्यामुळे त्याचे कोणाशी शत्रुत्व असेल किंवा त्याला मारण्यामुळे कोणाचा फायदा होऊ शकेल असे मेजरना वाटत नव्हते. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, पिस्तूल तर नव्हतेच. त्यामुळे कोणी तरी त्याचा गोळी घालून खून केला असेल हेच मेजरना खरे वाटत नव्हते. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

बोलत असतांनाच इन्स्पेक्टरचे लक्ष भिंतीवर लटकवून ठेवलेल्या एका शोभिवंत पिस्तुलाकडे गेले. तीस पस्तीस वर्षे जुन्या पण नियमितपणे पॉलिश करून चमकवलेल्या एका चामड्याच्या पाऊचमध्ये एक तितकेच जुनाट पिस्तुल खोचून ठेवलेले होते. त्याबद्दल विचारणा करतां मेजरनी सांगितले की ते त्यांचे आयुष्यातले पहिले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होते. एका चकमकीमध्ये त्यांनी दाखवलेल्या मर्दुमकीची आठवण म्हणून त्यांच्या युनिटतर्फे त्यांना ते स्मरणचिन्ह बक्षिस मिळाले होते. आता ते निव्वळ ऐतिहासिक वस्तू झाले होते. तसल्या बोजड पिस्तुलात भरायची काडतुसेसुद्धा आता बाजारात उपलब्ध नव्हती. त्यांनी आपले ते स्मरणचिन्ह मोठ्या कौतुकाने सांभाळून ठेवले होते, इतकेच नव्हे तर कायद्याप्रमाणे त्याचा लायसेन्सही काढून ठेवला होता एवढेच. एरवी त्या पिस्तुलाचा कांही उपयोग नव्हता. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दुसरे कोठलेही पिस्तुल नव्हते.

इन्स्पेक्टरने आपल्याकडील एक प्लॅस्टिकची पिशवी काढून ते पिस्तुल काळजीपूर्वकपणे त्यात ठेवले. मेजरनी सांगितले, “आणखी कांही माहिती पाहिजे असेल तर लगेच फोन करा आणि चौकशीची प्रगती मधून मधून सांगत रहा.” पुढील दोन दिवसात पोलिसांनी भरपूर तपास केला. ज्या खिडकीतून रॉबर्ट बाहेर पडला असावा तिच्या समोरील दलदलीचा भाग पिंजून काठला पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने वापरूनसुद्धा कोठलेही पिस्तुल किंवा गोळीसुद्धा हाती लागली नाही. मृताच्या मेंदूमध्ये रुतलेली गोळी बाहेर काढून तिची चिकित्सा केली. तशा प्रकारच्या गोळ्या सामान्यपणे बाजारात मिळत नसल्या तरी चार पांच दिवसापूर्वीच कुठल्याशा कबाड्याच्या जुनाट वस्तूंच्या दुकानातून तशा डझनभर गोळ्या विकल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली. मेजरकडून घेतलेले पिस्तुल उघडून पाहता त्यात पांच जीवंत काडतुसे सापडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे धाडी घालून आणखी सहा गोळ्या त्यांनी जप्त केल्या. त्यांच्याचसोबत ठेवलेले एक निनावी पत्र मिळाले. रॉबर्टच्या अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आला. त्याला लागलेल्या व्यसनांच्या खुणा सापडल्या.

पुन्हा एकदा डेव्हिडला सोबत घेऊन इन्स्पेक्टर मेजर स्मिथच्या घरी गेले. या वेळेस मिसेस स्मिथने म्हणजे एल्माने दार उघडले. तिने लगेच विचारले, “खुन्याचा कांही पत्ता लागला कां हो?”
तिच्याकडे दुर्लक्ष करीत समोर बसलेल्या मेजरना अभिवादन करून इन्स्पेक्टर बोलले, “आम्हाला मर्डर वेपन मिळाले आहे. आणि त्यातल्या गोळ्यांचाही तपास लागलेला आहे.”
“मग त्या बदमाश खुन्याला पकडून आधी फांसावर लटकवा ना.” एल्मा किंचाळली.
इन्स्पेक्टर थोड्याशा करड्या आवाजात म्हणाले, “मेजर, रॉबर्टच्या डोक्यात घुसलेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून सुटली असल्याची खात्री पटावी असा भक्कम पुरावा आम्हाला मिळाला आहे.”
“म्हणजे! तुम्ही खून केलात? अरे देवा! त्या दिवशी मलासुद्धा गोळी घातली होतीत. आता मी काय करू?” एल्माने आकांत मांडला.
“मिसेस स्मिथ, मला जरा यांच्याशी बोलू द्या.” इन्स्पेक्टरने एल्माला गप्प करून मेजरना विचारले, “मला तुम्ही दिलेत तेंव्हा हे पिस्तुल लोडेड होते हे खरे ना?”
“अं..अं, म..मला तशी शंका आली होती.” मेजर चांचरतच बोलले. “पण देवाशप्पथ खरं सांगतो, यातल्या गोळ्या कुठून, कधी व कशा त्यात आल्या यातलं मला कांहीसुद्धा ठाऊक नाही हो.”
“हो. तुमच्या पिस्तुलात आणखी कोण गोळ्या भरू शकतं? आणखी कोण कोण इथे असतात किंवा इथे येतात?”
“म्हणजे आता माझ्यावरच बालंट की काय?” एल्माने आपला बचाव सुरू केला, “बाई, बाई, मी तर लंगडी मेली, आठवडाभर लंगडते आहे, कधी दाराबाहेरसुद्धा पडलेली नाही.”
“तसं नाही मिसेस स्मिथ, तिसरंच कुणी येऊन गेलं असेल. गेल्या आठ दिवसात तुमच्याकडे कोण कोण आले होते ते आठवा बरं.”  इन्स्पेक्टर म्हणाले.
“अहो यांचेच उडाणटप्पू दोस्त आले तर येतात. फुकटचं ढोसायला मिळतं ना मेल्यांना?” एल्मा उद्गारली.
तेंव्हा डेव्हिडने ग्वाही दिली, “नाही हो. त्यातल्या कुणाचीही मेजरच्या पिस्तुलाला हांतसुद्धा लावायची हिम्मत होणार नाही. पिस्तुलाच्या बाबतीत ते किती पझेसिव्ह आहेत ते सगळ्यांना पक्कं ठाऊक आहे.”
“एल्मा, मी घरी नसतांना कुणी आलं होतं कां?” मेजरने विचारले.
“म्हणजे पुन्हा माझ्यावरच रोख! आता या वयात मला भेटायला कोण कशाला येतंय् ? आणि कोणी आलं तर त्याला मी बाहेरच्या बाहेरच पिटाळून लावते हे तुम्हाला माहीत आहे ना? तरी मेला संशय घ्यायचा!” एल्माचा आक्रस्ताळेपणा अधिक भडकला.

(क्रमशः)

कोण गुन्हेगार? …………… भाग १

टेलीफोन खणाणला आणि सिटी हॉस्पिटलचे ट्रॉमा युनिट क्षणार्धात कामाला लागले. दोन वॉर्डबॉय ट्रॉलीवर स्ट्रेचर घेऊन गेटपाशी पोचले तोवर एक कार तेथे आली. त्यात असलेल्या अत्यवस्थ रुग्णाला उचलून लगेच ऑपरेशन टेबलवर नेले. डॉक्टर व नर्स त्या ठिकाणी जय्यत तयारीनिशी हजर होते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण ते रुग्णाचे प्राण वाचवू शकले नाहीत.

त्या आवारात पोलिस इन्स्पेक्टर तैनात होते व त्यांनी चौकशीला सुरुवातही केलेली होती. शेजारच्याच उपनगरात रहाणारा डेव्हिड नांवाचा तरुण मरणप्राय अवस्थेतील रॉबर्टला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मोठी जखम झालेली होती. त्यामधून खूप रक्तस्राव झाला होता. पिस्तुलाची गोळी थेट मेंदूत जाऊन रुतली होती. तिनेच त्याचा प्राण घेतला होता. पण डेव्हिड म्हणाला की त्याला याबद्दल कांहीच माहिती नव्हती.

डेव्हिडला घेऊन पोलिस लगेच घटनास्थळी गेले. ईव्हान टॉवरच्या तळमजल्यावर त्याचे दुकान होते. त्या इमारतीच्या बाहेरील भिंतीचे रंगकाम सुरू होते. त्यासाठी स्कॅफोल्डिंग बांधले होते. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालच्या बाजूला नायलॉनच्या दो-यांचे भरभक्कम जाळे बांधलेले होते. बॉबी म्हणजे रॉबर्टला आपल्या डोळ्यादेखत या जाळ्यामध्येच वरून खाली पडतांना आपण पाहिल्याचे डेव्हिड सांगत होता. एका ठिकाणी जाळीचा थोडा भाग रक्ताळलेला होता तसेच त्या ठिकाणी खाली जमीनीवर रक्ताचे शिंतोडे उडलेले दिसत होते.

तिथली नोंद घेऊन लगेच इन्स्पेक्टर दहाव्या मजल्यावरील रॉबर्टच्या फ्लॅट नंबर १०१२ कडे गेले. त्याच्या खिशात मिळालेल्या चावीने दरवाचाचे कुलूप उघडल्याचा खट्ट आवाज आला पण दरवाजा कांही उघडला नाही. कारण त्याला आंतून खिटी लावलेली होती. याचा अर्थ घरात कोणी तरी, कदाचित एकाहून अधिक माणसे असावीत असा तर्क लावून पोलिसांनी जोरात घंटी वाजवली तसेच दरवाजा ठोठावला सुद्धा. पण आंतून कांहीच प्रतिसाद किंवा कसल्याही हालचालीचा आवाज आला नाही.

पोलिसांनी सावधगिरीचा पवित्रा घेत जोराने धक्का देऊन दार फोडून उघडले. पण आंत पहाता तेथे कोणीसुद्धा नव्हते. त्या लहानशा फ्लॅटमध्ये कुठे लपून बसण्यासारखी जागाही नव्हती. अगदी पलंगाखाली वाकून व माळ्यावर चढूनसुद्धा पाहून झाले पण तेथे कोणीच नव्हते. घरातील सामान फारसे अस्ताव्यस्त पडलेले नव्हते. एखाद्या सडाफटिंगाच्या घरात जसा असेल इतपतच पसारा होता. हॉलच्या दारासमोरच एक खिडकी उघडी होती. त्या खिडकीच्या बरोबर खालीच रॉबर्ट जाळ्यात पडला होता. खिडकीजवळ भिंतीला लागून एक खुर्ची ठेवलेली होती. एखाद्या सडपातळ माणसाला तीवर चढून खिडकीबाहेर जाता येणे शक्य दिसत होते. निश्चितपणे कोणीतरी त्या मार्गाने बाहेर गेला असणार असे सुचवणारे पावलांचे ताजे ठसे खुर्चीवर व खिडकीच्या चौकटीवर उमटलेले सापडले. पण घरात कुठेही झटापटीचे कसलेही चिन्ह तर नव्हतेच पण रक्ताचा एक थेंबसुद्धा दिसला नाही की कुठली जागा नुकतीच पुसून साफ केल्यासारखी दिसत नव्हती.

रॉबर्टच्या फ्लॅटच्या एका बाजूचा फ्लॅट महिनाभरापासून बंदच होता कारण तिथे रहाणारे लोक परगांवी गेले होते. दारवाजावरील सांचलेली धूळ व तिथे जमलेल्या कोळ्याच्या जाळ्यावरून तो ब-याच दिवसात उघडलेला नाही हे सिद्ध होत होते. दुस-या बाजूच्या फ्लॅटमध्ये डेव्हिड स्वतः रहात होता. त्याने आपला फ्लॅट उघडून दाखवला. तिथेही संशयास्पद असे कांहीच नव्हते.

डेव्हिडला घेऊनच इन्स्पेक्टर खालच्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ९१२ मध्ये आले. तिथे एक सेवानिवृत्त लश्करी अधिकारी मेजर स्मिथ त्यांच्या पत्नीसह रहात होते. ते वयाच्या सत्तरीला आलेले चांगले उंचे पुरे, किंचित स्थूल पण तंदुरुस्त गृहस्थ होते. थोडे कडक शिस्त पाळणारे पण स्वभावाने अत्यंत सुशील, शांत व नेहमी सगळ्यांना मदत करणारे होते. मिसेस स्मिथ थोड्या तोंडाने फटकळ वाटल्या तरी सरळमार्गी व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. उभयतांना त्या बिल्डिंगमध्ये मानाचे व आदराचे स्थान होते. ही सगळी माहिती त्यांच्याकडे जाता जाता डेव्हिडने पुरवली.

इन्स्पेक्टरने बेल वाजवताच मेजर स्मिथ यांनी दरवाजा उघडला. डेव्हिडला पहाताच ते म्हणाले, “अरे डेव्हिड, ये ना. आज नवीन कोणते पाहुणे आणले आहेस?”
“मी इन्स्पेक्टर वेन, क्राइम ब्रँच.” स्वतःचा ओळख करून देतच त्याने लगेच सांगितले, “मी इथे रॉबर्टच्या खुनाच्या तपासासाठी आलेलो आहे.”
“बॉबीचा खून! अरे देवा!” असे म्हणत मेजर मटकन खाली बसते. बेल वाजण्याचा आवाज ऐकतांच एका हांताने काठीचा आधार घेत व “आता या वेळी कोण तडमडलं ?” असे पुटपुटत मिसेस स्मिथ बेडरूममधून बाहेर येत होत्या. इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून त्या तर धाडकन दारातच खाली कोसळल्या. मेजरनी लगेच उठून, पुढे होऊन व त्यांना हाताने उठवून छातीशी घट्ट धरले व हळूहळू त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना कोचावर बसवले. हे हृदयद्रावक दृष्य पाहून  इन्स्पेक्टरने विचारले, “मी थोड्या वेळाने येऊ कां?”
मेजरनी त्यांना हातानेच थांबवीत ते म्हणाले, “तुमची चौकशी ताबडतोब सुरू करा. उगाच उशीर करून अपराध्याला वेळ देता कामा नये. हो ना?”

 (क्रमशः)

झोपु संकुलातला स्वातंत्र्यदिनोत्सव

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

या निमित्य या ब्लॉगचा हा शंभरावा भाग सादर समर्पित.

झोपु (झोपडपट्टी पुनर्वसन) योजनेखाली बांधण्यात आलेल्या नव्या संकुलात अनेक प्रकारची घरे होती. झोपड्यांमध्ये राहणा-या मूळ रहिवाशांसाठी एकदीड खोल्यांचे गाळे बांधून उरलेल्या जागेत मध्यमवर्गीयांसाठी दोन किंवा तीन खोल्यांच्या सदनिका आणि श्रीमंत ग्राहकांसाठी आलीशान अपार्टमेंट्स असलेल्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या होत्या.  संकुलातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा करावा असे कांही उत्साही लोकांना वाटले. त्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी त्यांनी सगळ्या इमारतींमधील रहिवाशांच्या प्रतिनिधींची एक सभा घेतली.

लोकांनी एकत्र येऊन झेंडावंदन करायचे, थोडी देशभक्तीपर गाणी म्हणायची आणि मिठाई खाऊन तोंड गोड करायचे इतका साधा कार्यक्रम आयोजकांच्या मनात होता. पण त्यावरील चर्चा मारुतीच्या शेपटासारखी वाढत गेली. ध्वजारोहण कोणी करायचे हेच आधी ठरेना. कोणाला त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक हवा होता, पण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला सैनिक साठ वर्षानंतर कुठून आणायचा? शासकीय प्रमाणपत्र धारण करणा-याचे प्रमाणपत्र कशावरून खरे मानायचे? गेल्या साठ वर्षात त्याने इतर कसले उद्योग केले असतील? सध्याच्या काळातला प्रसिद्ध माणूस बोलवायचा तर कोणत्या क्षेत्रातला? कोणाला राजकीय पुढारी हवा तर कोणाला सिनेमानट! राजकीय पुढारी पुन्हा कुठल्या पक्षातला आणि नट का नटी, नवी का जुनी? शिवाय कोणाला क्रिकेटपटू हवा तर कोणाला गायक नाहीतर वादक! “बाहेरच्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे? तो मान संकुलातल्या रहिवाशालाच मिळाला पाहिजे.” असे कित्येकांचे म्हणणे होते. पुन्हा तो माणूस वयाने सर्वात ज्येष्ठ असायला हवा की शिक्षणाने किंवा अधिकारपदाने हा वाद झाला. मतमोजणी करून ठरवायचे झाले तर मताधिकार कोणाला द्यायचा आणि कोणाच्या मताला किती किंमत द्यायची? कोणी म्हणाला “प्रत्येक रहिवाशाला एक मत असायला हवे”, तर कोणाच्या मते प्रत्येक घराला एक मत. कोणाचे असे म्हणणे होते की जागेच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मताला वजन दिले पाहिजे, तर कोणाच्या मते येथील जागेसाठी ज्याने त्याने मोजलेल्या किंमतीच्या प्रमाणात ते मिळाले पाहिजे.

देशभक्तीपर गाणी म्हणण्यावर सुद्धा वाद झाला. “ती राष्ट्रभाषेतीलच हवीत” असे एकजण म्हणाला, तर दुस-याने मराठीचा आग्रह धरला. कांही लोकांना तामीळ, तेलगू, बंगाली आणि पंजाबीसुद्धा पाहिजे होती. कोणाला फक्त शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायची होती आणि त्यासाठी तबलापेटीची साथ हवीच, तर एकाद्या डीजेला बोलावून ट्रॅक्सवर किंचाळायची हौस काही लोकांना होती. त्यातसुद्धा पुन्हा “आधी आमचेच व्हायला हवे, वेळ उरला तर इतरांचे पाहू.” असा आग्रह प्रत्येकाने धरला.

मिठाईमध्येसुद्धा कोणाला पेढा पाहिजे तर कोणाला बर्फी. कोणाला पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा खव्याचा पदार्थ खाणे धोकादायक वाटले तर कोणाला मधुमेह असल्यामुळे साखर खायला बंदी होती. खा-या पदार्थातसुद्धा कोणाला वेफर्स पाहिजेत तर कोणाला सामोसा किंवा बटाटा वडा. कोणी चिवड्याचे भोक्ते तर कोणी सुक्या मेव्याशिवाय इतर कशाला हात न लावणारे! “याने तोंड कसे गोड होणार?” असे कोणी म्हणाले तर “ते गोडच कशाला व्हायला पाहिजे?” असे दुस-या कोणी विचारले.

इकडे अशी वादावादी चाललेली असतांना दुसरीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या चारपांच युवकांचे वेगळेच बेत सुरू होते. त्यातल्या एकाने पुढे येऊन सांगितले, “तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी हव्यात ना? आता कॉँप्यूटरच्या सहाय्याने ते सुद्धा शक्य आहे. आम्ही एक प्रोग्रॅम बनवून तुम्हाला आपापली निवड करायची संधी देऊ. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कॉँप्यूटरच्या स्क्रीनवर पाहू शकाल. झेंडा कोणी फडकवायला पाहिजे, पुरुषाने की स्त्रीने? त्यासाठी निवड करा आणि एक बटन दाबा. पुरुष असेल तर त्याने कोठला पोषाख घातला पाहिजे, सूटबूट कां धोतर कां कुर्ता पायजमा? करा निवड. स्त्रियांसाठी शेकडो ड्रेसेस असतात, पण आम्ही त्यातल्या त्यात पांच पर्याय देऊ. कपडे निवडून झाल्यावर त्या कपड्यात कोणती व्यक्ती हवी? नेते, अभिनेते, खेळाडू वगैरेंचे प्रत्येकी दहा चेहेरे आम्ही देऊ, त्यातला पाहिजे तो चेहेरा आपण निवडलेले कपडे परिधान करून पडद्यावर दिसेल आणि माऊसची कळ दाबली की ती तुमच्या मनाजोगती काल्पनिक व्यक्ती तुमच्या स्क्रीनवर ध्वजारोहण करेल.”

“तुम्हाला वेगवेगळी गाणी पाहिजेत ना? आम्ही पन्नास निरनिराळ्या गाण्यांच्या एम् पी थ्री फाईल्स देऊ. त्यातले पाहिजे ते निवडा आणि त्यावर क्लिक करा. लगेच ते गाणे ऐकू येईल.” दुस-याने पुस्ती जोडली. तिसरा म्हणाला, “तुम्हाला हवी ती मिठाईसुद्धा कॉंप्यूटरवरून सिलेक्ट करता येईल, पण ती घरपोच मिळण्यासाठी मात्र थोडा खर्च येईल.”

संगणकतज्ञांच्या कल्पना सगळ्यांनाच पसंत पडल्या. फक्त दोन विसंवादी सूर निघाले. एकजण म्हणाला, “ज्यांच्या घरी काँप्यूटर नसेल त्यांनी काय करायचं?” ज्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती त्यातील एकजण म्हणाला, “अहो, या निमित्ताने लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपापल्या घरात बसून ते काँप्यूटर पाहतील, नाही तर टीव्ही पाहतील. तो सार्वजनिक स्वातंत्र्यदिनोत्सव कसा होईल?”

या मुद्यांवर विचार करता कांही विधायक सूचना आल्या. हा उत्सव सार्वजनिक जागेवरच साजरा करायचा. ज्या लोकांकडे लॅपटॉप असतील आणि ज्यांना ऑफीसमधला लॅपटॉप एक दिवसासाठी घरी आणणे शक्य असेल त्यांनी आपापला लॅपटॉप आणायचा. त्यांना एकत्र जोडून घ्यायचे काम संगणकतज्ञ करतील. असे पंचवीस तीस लॅपटॉप जमले तरी शंभर लोक ते पाहू शकतील. मिठाईऐवजी चॉकलेटे वाटायची, तीही फक्त लहान मुलांना. संकुलात कार्य करणारे एक मंडळ त्याची व्यवस्था करेल. अशा रीतीने स्वातंत्र्यदिनोत्सवाचा कार्यक्रम निश्चित झाला.

ठरल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टला सकाळी बरेच लोक ठरलेल्या जागी जमले आणि उत्साहाने कामाला लागले. सगळे लॅपटॉप जोडून झाले. मुख्य कॉँप्यूटरवर प्रोग्रॅम लोड करून ठेवलेलाच होता. प्रत्येक लॅपटॉपवर वेगवेगळ्या लोकांच्या आपापल्या आवडीनुसार गाणी वाजू लागली. त्यांनी निवडलेले पाहुणे त्यांच्या आवडीच्या वेषात येऊन झेंडा फडकवण्यास सिद्ध झालेले प्रत्येक स्क्रीनवर दिसू लागले. पण एकाही स्क्रीनवरील ध्वज उंचावला जात नव्हता. माऊसची बटने दाबून लोक वैतागले, कारण ज्यासाठी ही सगळी तयारी केली होती ते झेंडावंदनच होत नव्हते. “कॉंप्यूटरचे काम असेच बेभरवशाचे! मोठे आले होते हायटेकवाले! झाली ना फजीती?” वगैरे ताशेरे सुरू झाले.

एक संगणकतज्ञ उभा राहून म्हणाला, “लोक हो, शांत व्हा. तुम्हाला ध्वजवंदन करायचे आहे ना? ते नक्की होईल. फक्त मी सांगतो तसे करावे लागेल. आपापल्या हातातील माऊसवर बोट टेकवून सज्ज रहा. मी एक दोन तीन म्हणेन. तीन म्हणताच सर्वांनी एकदम क्लिक करायला पाहिजे.” त्याने सांगितल्याप्रमाणे एकसाथ क्लिक करताच सर्व लॅपटॉपच्या स्क्रीनवर तिरंगा झेंडा फडफडू लागला. इतर सर्व गाणी थांबून राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे लोक उभे राहून एका सुरात गाऊ लागले, “जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता।”

—– या गोष्टीची मध्यवर्ती कल्पना श्री. गिरीश गोगटे यांची आहे. मी त्यांचा ऋणी आहे.