आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ५

दुस-या महायुध्दानंतर साम्राज्यशाही नष्ट होऊन आशिया आणि आफ्रिका खंडातले बहुतेक सारे देश स्वतंत्र झाले. त्यामुळे अनेक नवी राष्ट्रे निर्माण झाली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुध्दा ‘इंडिया’चा संघ युनियन जॅकखाली ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत होता. तो कदाचित अपवाद असेल. स्वातंत्र्याच्या आधीच त्यातून बर्मा (आताचा मायनामार) आणि सिलोन (श्रीलंका) वेगळे झाले, भारताच्या स्वातंत्र्याबरोबर पाकिस्तान जन्माला आले आणि त्यातून कालांतराने बांगलादेश वेगळा निघाला. नेपाळ व भूतान यांनीही ऑलिम्पिकमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या इथेच एकाचे सात झाले. यू.एस.एस.आर.ची सोळा शकले झाली, कित्येक अरब शेख आणि महासागरातल्या छोट्या बेटांनी आपापल्या जागा बनवल्या. अशा रीतीने ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवात भाग घेणा-या संघांची संख्या वाढत गेली.

महायुध्दानंतर लगेच यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये जगाचे धृवीकरण झाले. पं.नेहरूंनी नॉनअलाइन्ड देशांचा तिसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा समर्थ बनला नाही. ध्रुवीकरण झालेल्या देशांमध्ये शीतयुध्द सुरू होऊन बराच काळ ते चालले. त्याचा परिणाम ऑलिम्पिक खेळांवरही झाला. कधी एका गटाने त्यावर बहिष्कार टाकला तर कधी दुसरा गट त्यापासून दूर राहिला. त्यामुळे कांही वर्षी खेळाडूंची उपस्थिती किंचितशी घटली. तरीसुध्दा याच काळात विमानवाहतूकीत प्रचंड प्रगती होऊन दूरचा प्रवास सुरक्षित, सोपा आणि स्वस्त झाला यामुळे दरवर्षी खेळाडूंची संख्या वाढत गेली. १९४८ साली लंडनला ५९ देशातून ४१०४ खेळाडू आले होते. त्यांची संख्या वाढत वाढत २००८ या वर्षी बीजिंग इथे २०४ संघातून ११०२८ इतकी झाली. क्रीडास्पर्धांची संख्यासुध्दा १३६ वरून दुपटीपेक्षा जास्त ३०२ इतकी झाली.

पहिली अनेक वर्षे  यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्याची चुरस होती. कधी यातला एक संघ पुढे असे तर कधी दुसरा. जेंव्हा एका गटाने बहिष्कार टाकला तेंव्हा यातला जो संघ उपस्थित असे त्याची चंगळ होत असे. तो निर्विवादपणे इतर सगळ्या देशांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येत असे. यू.एस.एस.आर.चे विघटन झाले आणि चीनने या स्पर्धेत प्रवेश केला त्यानंतर रंग पालटला. २००८ साली चीनने यू.एस.ए आणि रशिया या दोघांनाही मागे टाकून अव्वल नंबर पटकावला.

मधल्या काळात टेलिव्हिजनच्या प्रसारणात झालेल्या क्रांतीमुळे ऑलिम्पिकचे खेळ पाहणे आता घराघरात पोचले आहे. यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळते आणि त्याबरोबरच त्याला व्यवसायाचे परिमाण प्राप्त झाले आहे. अर्थातच आता तो संपूर्णपणे हौशी खेळाडूंचा खेळ राहिलेला नाही. ऑलिम्पिकबद्दल अजून खूप कांही लिहिण्यासारखे आहे. पण चीनमधील स्पर्धासुध्दा आता जुनी झालेली असल्यामुळे २०१२ पर्यंत कोणाला या विषयात फारसा रस वाटणार नाही. तेंव्हा ही मालिका इथेच आटोपती घेतलेली बरी.

.  . . . .. .  . . (समाप्त)

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४

दोन महायुध्दांच्या दरम्यान जगभरातले राजकीय वातावरण अस्थिरच राहिले. रशियात राज्यक्रांती होऊन कम्युनिस्टांनी सत्ता हातात घेतली. रशिया या मूळच्या देशासह त्याच्या झार सम्राटांनी वेळोवेळी जिंकून घेतलेला मध्य आणि उत्तर आशिया व पूर्व युरोप खंडामधला अतीविस्तृत भूभाग सोव्हिएट युनियन या नांवाने ओळखला जाऊ लागला. जगातील सर्व कामगारांना एकत्र आणण्याची घोषणा देऊन कम्युनिस्टांनी पश्चिमेकडे विस्तार करायला सुरुवात केली. पहिल्या महायुध्दातल्या पराभवाने आणि त्यानंतर झालेल्या तहामधल्या जाचक अटींनी दुखावलेला जर्मनी हिटलरच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभा राहिला आणि सैनिक सामर्थ्य वाढवून शेजारच्या लहान सहान राष्ट्रावर दमदाटी करू लागला. इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला आणि तो देशही दंड थोपटू लागला. घरात चाललेला समाजवादाचा लढा आणि जगभर पसरलेल्या साम्राज्यातल्या देशांचे स्वातंत्र्यलढे या दोन आघाड्या सांभाळतांना  इंग्लंड, फ्रान्स आदि परंपरागत मुख्य राष्ट्रांमधली लोकशाही सरकारे मेटाकुटीला आली. यापासून दूर असलेल्या अमेरिकेने (य़ू.एस.ए.ने) औद्योगिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आर्थिक महासत्ता बनण्यात यश मिळवले. पूर्वेला जपाननेही औद्योगिक, आर्थिक व सैनिकी या सर्वच आघाड्यांवर अभूतपूर्व अशी प्रगती करून आपला जम चांगला बसवला. चीनमधली राजेशाही नष्ट झाली पण तिथे लोकशाही रुजली नाही यामुळे अस्थिरता होती. अशा प्रकारे जगभर अशांत आणि संशयाचे वातावरण होते.

तशाही परिस्थितीत क्रीडाप्रेमी लोक विश्वबंधुत्वाचा नारा देऊन ऑलिंपिक खेळांचे आयोजन करीत राहिले. तोपर्यंत या खेळांना जागतिक महत्व प्राप्त झाले असल्यामुळे हे खेळ आपल्या देशात भरवणे हादेखील एक राजकीय पटावरला पराक्रम समजला जाऊ लागला होता. त्यामुळे ते खेळ भरत राहिले, पण राजकीय परिस्थितीची सावलीही त्याच्या आयोजनावर पडतच राहिली.

१९२०, १९२४, १९२८, १९३२ आणि १९३६ साली अनुक्रमे बेल्जियम, फ्रान्स, नेदर्लँड, युनायटेड स्टेट्स आणि जर्मनीमध्ये हे खेळ झाले. त्यात तीस चाळीस देशांमधल्या दोन तीन हजारांच्या संख्येने खेळाडूंनी भाग घेतला. ही संख्या कमी जास्त होत राहिली. सर्व जागी शंभरावर स्पर्धा झाल्या. युनायटेड स्टेट्स फार दूर असल्यामुळे यापूर्वी सेंट लुईला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांची पुनरावृत्ती होऊन फक्त तेराशेहे खेळाडूच येऊ शकले. यापूर्वीच्या तीन्ही जागी य़ू.एस.ए ने पदकांच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला होताच, स्वगृही झालेल्या स्पर्धातली तर बहुसंख्य बक्षिसे तिथल्या खेळाडूंनी मिळवली. त्यानंतर १९३६ मध्ये बर्लिन इथे झालेल्या स्पर्धात सर्वात जास्त खेळाडू आले तरी त्यांची संख्या चार हजारापर्यंत पोचली नाही. इथे मात्र जर्मनीच्या खेळाडूंनी य़ू.एस.ए वर मात करून पहिला क्रमांक पटकावला. हिटलरच्या हडेलहप्पीचा परिणान खेळाडूंच्या आणि पंचांच्या कामगिरीवर पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यानंतर दुसरे महायुध्द सुरू झाले व त्यामुळे १९४० आणि १९४४ साली ऑलिंपिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण ऑलिंपिकचे असे वैशिष्ट्य आहे की या न होऊ शकलेल्या स्पर्धांचीसुध्दा क्रमांकानुसार नोंद ठेवली जाते. त्यामुळे १९१६ साली बर्लिन येथे न झालेली ६ वी तसेच १९४० व १९४४ साली न झालेल्या स्पर्धा १२ व १३ व्या धरल्या जातात. बर्लिन येथे झालेल्या ११ व्या ऑलिंपियाडनंतर १९४८ साली लंडन येथे एकदम १४ वे ऑलिंपियाड भरले.
. .  .. . . . . . . . . .  (क्रमशः)

पुढील भाग (अंतिम) : आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ५

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ३

 

कोबर्टीनच्या अथक प्रयत्नाने १८९६ साली आधुनिक ऑलिंपिक गेम्सची सुरुवात झाली. ग्रीसची राजधानी अथेन्स इथे घाईघाईने भरवलेल्या या क्रीडामहोत्सवात युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडातील १४ देशातल्या २४१ खेळाडूंनी भाग घेतला. ९ प्रकारच्या खेळात एकंदर ४३ स्पर्धा ठेवल्या होत्या. अॅथलेटिक्स, सायकलिंग, फेन्सिंग (तलवारबाजी), जिम्नॅस्टिक्स, शूटिंग (नेमबाजी),  स्विमिंग (जलतरण), टेनिस, वेटलिफ्टिंग आणि रेसलिंग (कुस्ती) एवढेच ते ९ क्रीडाप्रकार होते. य़ूएसए ने सर्वात जास्त म्हणजे ११ सुवर्णपदके पटकावली तर ग्रीक क्रीडापटूंनी एकंदरीत सर्वात जास्त, ४३ इतकी पदके मिळवली. हा उत्सव १० दिवस चालला होता.

त्यानंतर चार वर्षांनी झालेल्या पॅरिस येथील दुस-या ऑलिंपिकमध्ये सर्वच आंकड्यात चांगली घसघशीत वाढ झाली. २४ देशातील ९९७ म्हणजे जवळजवळ हजार स्पर्धकांनी या खेळात हजेरी लावून आपले कौशल्य दाखवले.  त्यामुळे खेळाडूंची संख्या एकदम चौपट झाली.  प्रथमच महिला खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच युनियन जॅकच्या झेंड्याखाली भारतीय पथकाचा समावेश करण्यात आला. क्रीडाप्रकार आणि स्पर्धा यांच्या संख्याही दुप्पट झाल्या. १९ क्रीडाप्रकारातल्या ९५ स्पर्धा पॅरिस येथील महोत्सवात घेतल्या गेल्या. २६ सुवर्णपदकासह १०१ पदके मिळवून फ्रान्सने यूएसएवर आघाडी मारली. हे खेळ तब्बल चार महिने चाललेले होते.

त्यानंतर १९०४ मध्ये अमेरिकेतील सेंट लुई इथे स्पर्धा झाल्या. त्यात १७ क्रीडाप्रकारातल्या ९१ स्पर्धा झाल्या. त्या काळात राईट बंधूंचे विमानउड्डाणाचे अजून प्राथमिक प्रयोग चालले होते. परदेशी जाण्यासाठी जहाज हेच एक वाहन उपलब्ध होते. या कारणाने अमेरिकेसारख्या दूरच्या खंडात भरलेल्या या स्पर्धांमध्ये येणा-या स्पर्धकांची संख्या रोडावली. १२ देशातून फक्त ६५१ खेळाडू आले. त्यातले बहुतेक करून (५७८) अमेरिकेतलेच होते. इतर खंडांतून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत स्पर्धक आले. साहजीकच अमेरिकन लोकांनी ९० टक्क्याहून अधिक पारितोषिके मिळवली. ही स्पर्धा नुसती नांवालाच आंतरराष्ट्रीय झाली असे म्हणता येईल.

त्यानंतर दोनच वर्षानंतर ग्रीसमधील अथेन्स इथे पुन्हा हा मेळावा भरवला गेला होता, पण त्याला अधिकृत मान्यता मिळाली नाही. १९०८ साली लंडन इथे आणि १९१२ साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे अनुक्रमे चौथी आणि पांचवी ऑलिंपिक स्पर्धा घेतली गेली. स्पर्धा आणि स्पर्धक यात प्रत्येक वेळी वाढ होत होत गेली. १९०८ मध्ये लंडन इथे २२ देशातून २००८ तर १९१२ मध्ये स्टॉकहोम इथे २८ देशातून २४०७ स्पर्धक आले, त्यात ४८ मुली होत्या. लंडनला ब्रिटनने अर्धी पदके पटकावली तर स्टॉकहोम इथे यूएसए व स्वीडन यांनी मिळून तेवढी घेतली. दोन्ही स्पर्धात स्थानिक स्पर्धकांनी सर्वात जास्त पदके मिळवली. लंडनला २२ खेळांच्या ११० स्पर्धा झाल्या तर स्टॉकहोम इथे प्रकारांची संख्या १४ वर मर्यादित केली असली तरी त्यातल्या स्पर्धांची संख्या  १०२ वर नेली गेली.

त्यानंतर १९१६ साली जर्मनीमधील बर्लिनमध्ये ऑलिंपिक खेळ ठेवण्याचे ठरले होते, पण त्यापूर्वी १९१४ मध्येच पहिले महायुध्द भडकले आणि जर्मनीकडे त्यातली मुख्य भूमिका होती. युध्दाच्या त्या धुमश्चक्रीच्या काळात इतर दुसरीकडे कोठेही या स्पर्धा घेणेसुध्दा अशक्यच होते. त्यामुळे त्या रद्दच कराव्या लागल्या. या दरम्यान सन १९१३ साली पांच खंडांचे प्रतिनिधित्व करणारी पांच रंगांतली एकमेकात गुंतलेली कडी हे ऑलिंपिकचे बोधचिन्ह ठरवले गेले होते. ते १९१४ साली सर्वमते मान्य करण्यात आले होते पण मधल्या काळात या स्पर्धाच न झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी १९२० सालापर्यंत थांबावे लागले.

युध्दाची धामधूम संपून सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर सन १९२० मध्ये बेल्जियममधील अँटवर्प इथे सातवे ऑलिंपिक झाले. २९ देशांतील २६२६ स्पर्धकांनी त्यात भाग घेतला, त्यात ६५ महिला होत्या. २२ क्रीडाप्रकारातल्या १५४ निरनिराळ्या स्पर्धा त्यात ठेवल्या होत्या. म्हणजे युध्दापूर्वी होऊन गेलेल्या स्टॉकहोम येथील स्पर्धांच्या तुलनेत सर्वच आघाड्यांवर प्रगती झाली होती. अँटवर्प इथे यूएसए ने सर्वाधिक पदके पटकावण्यात बाजी मारली, तर स्वीडन व ब्रिटन अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. छोटासा बेल्जियम हा यजमान देश पांचव्या स्थानावर आला.

(क्रमशः)

पुढील भाग : आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – २

 

वैश्विक शांती, समता, बंधुभाव वगैरे आदर्श उद्देश कोबर्टिनच्या मनात असले तरी सन १८९६ चे वातावरण त्याला मुळीसुध्दा पोषक नव्हते. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांना एटलांटिक महासागराचा किनारा लाभला होता आणि त्यांनी सामर्थ्यवान नौदलांची उभारणी केली होती. त्याच्या जोरावर त्यांनी आशिया व आफ्रिका खंडांचा बराचसा भाग जिंकून तिथे आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. अमेरिका व ऑस्ट्रेलिया ही नव्याने सापडलेली खंडे तर त्यांनी पूर्णपणे काबीज करून आपसात वाटून घेतली होती. त्यातल्या कांही वसाहती फुटून बाहेर निघाल्या होत्या तर कांहींनी अंतर्गत स्वराज्य मिळवले होते. इटली व फ्रान्सने भूमध्य समुद्रापलीकडचा आफ्रिका खंडातला भाग व्यापला होता तर रशियाने त्याला सलग असलेला पॅसिफिक महासागरापर्यंतचा आशिया खंड गिळंकृत केला होता. हॉलंड आणि बेल्जियम या छोट्या राष्ट्रांनी देखील इंग्लंड व फ्रान्सच्या अनुमतीने आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. जर्मनीसारखी बलाढ्य राष्ट्रे हे करू शकले नव्हते याचे शल्य बाळगून होती. थोडक्यात सगळे जगच युरोपियन देशांच्या आधिपत्याखाली होते आणि त्या देशांचे एकमेकात आपसात फारसे पटत नव्हते. बाकीची राष्ट्रे तर गुलामगिरीत होती. जेंव्हा एकमेकांचा विश्वाससुध्दा कोणाला वाटत नव्हता तर बंधुभाव कसा असणार? अशा परिस्थितीतदेखील नाउमेद न होता खेळांच्या निमित्याने सर्वांना एका छपराखाली आणण्याचे प्रयत्न कोबर्टिन करत राहिला आणि त्याला त्यात य़श मिळाले.

स्पर्धा म्हंटले की त्यात चुरस आली, जिंकण्याहरण्यातून रागलोभ आले. मग त्या खेळाडूंना एकमेकाबद्दल प्रेम कसे वाटणार? यासाठी सुरुवातीपासून खास प्रयत्न करण्यात आले. कोबर्टिनने असे प्रतिपादन केले की ऑलिंपिक खेळात जिंकण्याहरण्यापेक्षा त्यात भाग घेणे अधिक महत्वाचे आहे.
“The most important thing in the Olympic Games is not to win but to take part, just as the most important thing in life is not the triumph but the struggle. The essential thing is not to have conquered but to have fought well.”
कोबर्टिनचा हा संदेश आजपर्यंत क्रीडाक्षेत्रात सर्वत्र शिरोधार्य मानण्यात येतो. याच कारणासाठी ऑलिँपिकमध्ये जिंकणा-या वीराला आयोजकांतर्फे फार मोठे बक्षिस दिले जात नाही. प्राचीन काळात तर फक्त ऑलिव्ह वृक्षाची फांदी देत असत. आता सोन्याचांदीचे व काँस्याचे बिल्ले दिले जातात. हे बिल्ले विकून त्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता नसते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्यापुरतीच मर्यादित असते. परवा परवापर्यंत कोठल्याही व्यावसायिक खेळाडूला ऑलिंपिक खेळात भाग घेण्याची परवानगी नव्हती. एकाद्या खेळाडूने खेळण्यासाठी पैसे घेतले असे सिध्द झाल्यास त्याचे पदक काढून घेण्यात येत असे. हे खेळ निव्वळ हौशी क्रीडापटूंसाठी होत होते. टेलीव्हिजनच्या प्रसारानंतर ऑलिंपिकसकट सर्व क्रीडाक्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. त्याचे व्यावसायिकरण झाले त्यामुळे हे निर्बंध थोडे सैल करावे लागले.

(क्रमशः)

पुढील भाग : आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ३

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा -१

 

ग्रीसमधील ऑलिंपिया इथे हजार बाराशेहे वर्षे नेमाने चाललेले खेळ इसवी सनाच्या चौथ्या शतकात बंद पडले. पण त्याच्या आठवणींचे संदर्भ जुन्या ग्रीक वाङ्मयातून येत राहिल्याने ते शिल्लक राहिले. एकोणीसाव्या शतकात युरोपात थोडे स्थैर्य आल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या क्रीडामहोत्सवाचे आयोजन करावे असे विचार सुजाण लोकांच्या मनात येऊ लागले. अर्थातच ग्रीकमध्ये हा विचार पुढे आलाच, तसा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी इतर अनेक युरोपियन राष्ट्रात तसा विचार होऊ लागला. यातल्या कांही देशात स्थानिक पातळीवर खेळांच्या स्पर्धा सुरूदेखील झाल्या.

फ्रान्समधील पीय़रे ला कोबर्टिन या गृहस्थाने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांचे आयोजन केले पाहिजे असा नवा विचार मांडला. प्राचीन ग्रीसमध्येसुध्दा नगरांनगरांमध्ये लढाया चाललेल्या असत पण ऑलिंपिकचे खेळ करण्यासाठी तात्पुरता युध्दविराम करून सर्वत्र शांतता प्रस्थापित होत असे असा इतिहास आहे. त्यावरून बोध घेऊन सर्व जगात बंधुभाव व शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेऊन हे खेळ खेळले जावेत असे प्रतिपादन पीयरेने केले. त्याला त्याच्या देशात म्हणजे फ्रान्समध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण त्याने धीर न सोडता इंग्लंड, अमेरिका वगैरे देशातील जनतेला आवाहन करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याला फळ आले आणि सन १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नांवाची संस्था स्थापन झाली.

पॅरिसमध्ये सन १९०० मध्ये पहिली स्पर्धा सुरू करावी असा विचार आधी होता. पण उत्साही कार्यकर्त्यांनी विशेषतः कोबर्टिन याने सन १८९६ मध्येच सुरुवात करावी आणि या खेळांची जननी असलेल्या ग्रीसमध्येच ती करावी असा आग्रह धरला. त्या वेळेस ही जबाबदारी घेण्यास ग्रीसचा राजाच तयार नव्हता.  कोणाही यजमानाला पाहुण्यांचा सोय करावी लागणारच. यावर होणारा अवाढव्य खर्च कसा परवडणार याची त्याला चिंता होती. एका धनाढ्याने यासाठी स्वखर्चाने अथेन्स इथे भव्य स्टेडियम बांधून देण्याची घोषणा केली, इतर उदार हात पुढे आले आणि ठरल्याप्रमाणे १९९६ साली आधुनिक ऑलिंपिक क्रीडामहोत्सवाचा शुभारंभ झाला. खुद्द ग्रीसच्या सम्राटाच्या हस्तेच दि.५ एप्रिल १८९६ रोजी पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाले.

प्राचीन काळातील ग्रीक ऑलिंपिक खेळात धांवणे, भालाफेक यासारख्या मैदानी क्रीडांचा समावेश होता तसेच मुष्टीयुध्द, कुस्ती वगैरे मर्दानी वैयक्तिक खेळ खेळले जात. नव्या ऑलिंपिकची सुरुवातही तिथूनच झाली आणि तीही फक्त पुरुषांपासून. पण वीसाव्या शतकातल्या महिला मागे कशा राहतील? सन १९१२ ला स्वीडन देशात झालेल्या स्पर्धात महिलांच्या स्पर्धांना समाविष्ट करण्यात आले. टेबल टेनिस, बॅडमिंटन यासारखे नव्या युगातले खेळ आले, फुटबॉल, हॉकीसारखे सांघिक खेळ सुरू झाले, पोहणे आणि सूर मारणे यांमधील कौशल्याला सामील करून घेतले गेले. अशा प्रकारे ऑलिंपिक खेळांचा पसारा वाढतच गेला.

दुस-या महायुध्दापूर्वी ऑलिंपिक खेळ फक्त युरोप किंवा अमेरिकेत होत असत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात झाले तसेच जपान, कोरिया आणि चीन या अतिपूर्व आशियाई देशांनीसुध्दा या स्पर्धा भरवल्या आहेत. २००८ साली चीनमध्ये यासाठी अतिभव्य असे पक्ष्याच्या घरट्याच्या आकाराचे अद्ययावत नवे स्टेडियम उभारले गेले. त्या वर्षीचे खेळ आतापर्यंत झालेल्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांपेक्षा अधिक सुव्यवस्थितपणे झाले अशी प्रशंसा सर्वांकडून चीनने मिळवली.

पुढील भाग : आधुनिक ऑलिंपिक खेळांची कथा – २

ऑलिम्पिकराजाची कहाणी

 

आटपाट नगर होतं, ते युरोपमधील ग्रीस या देशात होतं, त्याचं नांव एलिस असं होतं. एलिस नगराजवळ ऑलिंपोस पर्वत होता. त्याच्या पायथ्याला मोकळी जागा होती. तिथे अनेक खांब असलेला एक आखाडा बांधला होता.  त्या जागेला ऑलिंपिया म्हणत. एलिस या गांवाला राजा नव्हता. तिथले सुजाण नागरिक शहाण्यासारखे वागत. भांडण तंटा झालाच तर पंचांकडे जात. अनुभवी पंच त्याचा निवाडा करीत. ग्रीस या देशात तेंव्हा अशीच बरीच नगरे होती. कधी कधी ती एकमेकांशी भांडत. त्यांच्यात लढाया होत. पण लढाई संपली की पुन्हा गुण्यागोविंदाने नांदत.

ग्रीक लोकांचे अनेक देव होते. झीयस हा त्यातलाच एक. या देवाला सारे लोक भजत. त्याची पूजाअर्चा करीत. दर चार वर्षातून एकदा त्याचा उत्सव साजरा करीत. त्या दिवशी ते काय करीत? सारे पुरुष ऑलिंपियामध्ये जमत. स्त्रियांना तिथे यायची बंदी होती. लहान मुलींना आणणे धोक्याचे होते. त्यामुळे फक्त पुरुष तेवढे जमत. सारे लोक झीयस देवाची पूजा करीत. सर्वांच्या भल्यासाठी त्याची प्रार्थना करीत. त्याचे भजन सामूहिकपणे गात. त्याला बकरे आणि डुकरे या जनावरांचे बळी देत. प्रसाद म्हणून त्यावर तांव मारीत. प्रसादाबरोबर तीर्थ आलेच. खाऊन पिऊन आणि गाणी गात सारे धमाल करीत.

त्या समारंभातच एक धांवण्याची शर्यत लागे.  एलिसमधले तसेच बाहेरून आलेले धांवक त्यात भाग घेत. कांही खेळाडू दूरदेशातून सुध्दा तिथे येत. शर्यत जिंकणा-याला बक्षिस देत. पूर्वी कांशाची तिवई मिळत असे. कालांतराने ऑलिव्ह वृक्षाची फांदी देऊ लागले. या मानाच्या पानांना खराच मोठा मन असे. विजेते लोक त्याला शिरोधार्य मानून डोक्याला बांधीत. त्यांची मिरवणूक निघे. गाजत वाजत ते आपल्या घांवी परतत. तिथे त्यांचा सत्कार होई. ऑलिव्हच्या फांद्याचे रोपटे लावून त्याचा वृक्ष बने. त्याचा खूप आदर होई. त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळे.

तरुण मुले त्या विजयी वीराकडे जात. त्याला ऑलिंपिकचा वसा विचारीत. तो म्हणे,  “पहा हं, चुकाल माताल, घेतला वसा टाकून द्याल.”
मुले सांगत, “आम्ही चुकणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. मनापासून हे व्रत करू.”
मग तो व्रत सांगे, “या व्रताला काय करावं? रोज नियमितपणे व्यायाम करावा, भरपूर पौष्टिक अन्न खावं, कसरतीमध्ये घाम गाळून ते अंगात जिरवावं. एकमेकांच्याबरोबर शर्यती लावाव्यात. त्यात जिद्दीने धांवावं. पायातली शक्ती आणि छातीतला दम वाढवत न्यावा. कसलेही व्यसन बाळगू नये. असे दोन तीन वर्षे करावे. चौथ्या वर्षी ऑलिंपिकला जावे. महिनाभर तिथल्या मैदानात सराव करावा. त्या दिवसात रोज चीजचा फराळ करावा, महिनाभर व्रतस्थ रहावे, गुरुजन सांगतील त्या सूचनांचे पालन करावे. उत्सवाच्या दिवशी झीयसचे नांव घेऊन बेभान होऊन धांवावे.  ज्याच्यावर झीयसदेव प्रसन्न होईल तो विजय़ी वीर बनेल. सगळे त्याचे कौतुक करतील. कवी त्याच्यावर कविता लिहितील, चित्रकार त्याची चित्रे काढतील, मूर्तीकार त्याचे पुतळे बनवतील. अशा प्रकारे तो प्रसिध्दी पावेल. ज्यांचा पहिला क्रमांक येणार नाही त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत रहावे.” 

या व्रताची सुरुवात कधी झाली? असे म्हणतात की झीयसदेवाचा पुत्र हेराक्लेस याने ऑलिंपियाचे क्रीडांगण आणि झीयसचे मंदिर बांधून याची सुरुवात केली. त्यानंतर शतकानुशतके हजारो माणसे हे व्रत घेत असत. या आख्यायिकेची कोठे नोंद नाही. पण सत्तावीसशे वर्षापूर्वी होमर नांवाचा कवी होऊन गेला. त्याने महाकाव्ये लिहिली. त्यात एका उत्सवाचा उल्लेख आहे. ही स्पर्धा इसवी सनापूर्वी ७७६ वर्षापूर्वी झाली. त्यात १७० मीटर धांवण्याची शर्यत झाली. त्यात कोरोइबोस नांवाच्या एका आचा-याने पहिला नंबर पटकावला. कांही वर्षांनी वेगवेगळी अंतरे धांवण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा होऊ लागल्या.  धांवण्याबरोबरच घोडदौडीच्या, रथांच्या शर्यती सुरू झाल्या. कुस्ती, भालाफेक, थाळीफेक वगैरे अनेक खेळांना त्यात सामील करून या स्पर्धांची कक्षा वाढत गेली. हे खेळ खूप लोकप्रिय होत गेले. दूरवर असलेल्या बाहेरच्या देशातून खेळाडू या क्रीडांसाठी ग्रीसमध्ये येऊ लागले.

पुढे रोमन साम्राज्य उदयाला आले. रोमन राजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे झीयससारख्या जुन्या दैवतांची पूजा करण्याला बंदी आली आणि हे खेळ हजार वर्षे चालल्यानंतर बंद पडले. अशी ही ऑलिंपिक या खेळांच्या राजाची साठा उत्तरांची सुरस कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

पुढील भाग : आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा -१
https://anandghare2.wordpress.com/2011/11/26/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%91%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%81%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95/