परतलो मातृभूमीला

आम्ही दोघे २००८-०९ मध्ये अमेरिकेला जाऊन तिथे काही दिवस राहून आलो होतो. आमच्या त्या वेळच्या आठवणी आणि गंमती जंमती मी ४०-५० भागांमध्ये सविस्तर लिहून ठेवल्या होत्या. त्या इथे वाचायला मिळतील.
https://anandghare2.wordpress.com/category/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a8/%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be/page/5/

या आठवणींमधला एक राहून गेलेला लेख या पोस्टमध्ये देत आहे. त्यानंतर २०१९-२० मध्ये मी पुन्हा अमेरिकेला जाऊन आलो. त्या वेळच्या वेगळ्या गंमतीजमती मी आता या ब्लॉगवर क्रमाक्रमाने देणार आहेच. पण त्याची सुरुवात मी परतीच्या प्रवासापासून करीत आहे कारण तोसुद्धा या शीर्षकाखाली चपखल बसतो.

१. परतलो मातृभूमीला

मला पहिल्यापासूनच प्रवासाची आवड आहे. प्रवास करण्यात मला कसलाही त्रास वाटत नाही किंवा कधी कंटाळा येत नाही अशा नकारार्थी कारणांमुळे नव्हे तर त्यात पहायला मिळणारी अनुपम दृष्ये, कानावर पडणारे मंजुळ ध्वनी, चाखायला मिळणारे चविष्ट खाद्यपदार्थ, भेटणारी वेगवेगळी माणसे आणि निरनिराळ्या वातावरणात रहाण्याचा मिळणारा अनुभव या सर्वांमधून जी एक सर्वांगीण अनुभूती होते ती मला सुखावते. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या निमित्याने मी प्रत्येकी कांहीशेहे वेळा परगांवी जाऊन आलो आहे. असे असले तरी नोकरीत असेपर्यंत कधीही सलग दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेरगांवी जाऊन तिथे राहिलेलो मात्र नव्हतो. मला तशी संधीच मिळाली नसेल असे कोणी म्हणेल, किंवा नाइलाजाने कुठेतरी जाऊन राहण्याची आवश्यकता पडली नसेल असेही कोणी म्हणेल. दोन्हीही कारणे खरीच असतील, तसे घडले नाही एवढे मात्र खरे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच्या काळात प्रवासाला गेल्यावर घरी परतण्याची एवढी घाई नसायची आणि त्यासाठी सबळ अशी कारणे देता येत नव्हती त्यामुळे हा कालावधी चार पाच आठवड्यांपर्यंत लांबत गेला. आम्ही मागच्या वर्षी (२००८ मध्ये) मुलाला भेटून येण्यासाठी अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा त्यासाठी सहा आठवडे एवढा कालावधी माझ्या मनात आला होता. त्यासंबंधी सखोल अभ्यास, विश्लेषण वगैरे करून त्यावर मी कांही फार मोठा विचार केला होता अशातला भाग नव्हता, पण सहा आठवड्याहून जास्त काळ आपण परदेशात राहू शकू की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. उन्हाळ्यात अमेरिकेतले हवामान अनुकूल असते, त्यामुळे बहुतेक लोक तिकडे जायचे झाल्यास उन्हाळ्यात जाऊन येतात, पण आम्हाला गेल्या वर्षी ते कांही जमले नाही. उद्योग व्यवसायात आलेली जागतिक मंदी आणि अमेरिकेची होत चाललेली पीछेहाट पाहता पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत वाट न पाहता त्याआधीच जाऊन यायचे ठरले. शिवाय उद्या कुणी पाहिला आहे हा एक प्रश्न होताच. घरातला गणेशोत्यव झाल्यानंतर इकडून निघायचे आणि दिवाळी साजरी करून कडाक्याची थंडी सुरू होण्याच्या आधी परतायचे असा माझा बेत होता.

आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात वेगळे विचारचक्र फिरत होते. आमचे अमेरिकेला जायचे नक्की झाल्यापासून सर्व संबंधित दस्तावेज गोळा करून त्यासाठी लागणारी सरकारी अनुमती मिळवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवासाला निघण्यासाठी बांधाबांध करणे यात कित्येक महिन्यांचा काळ लोटला होता. एवढ्या सायासाने अमेरिकेला जाऊन पोचल्यानंतर तिथे सहा महिने राहण्याची परवानगी मिळाली होती तिचा पुरेपूर फायदा आम्ही घेतला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. तर्कदृष्ट्या ते अगदी बरोबर होतेच आणि तशी त्याची मनापासून इच्छा होती. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे ‘पोटापुरता पसा’ तो ‘देणाऱ्याच्या हाता’ने अगदी घरबसल्या मिळत होता आणि जास्तीची ‘पोळी पिकण्या’साठी मी भारतातसुध्दा कसलीच हालचाल करत नव्हतो. अमेरिकेत तर मला कुठलाही कामधंदा करून अर्थार्जन करायला तिकडच्या कायद्याने बंदी होती. तसे झाल्याचे आढळल्यास तडकाफडकी माझी उचलबांगडी करण्यात येईल असा दम मला प्रवेश करण्याची परवानगी देतांनाच भरला गेला होता. माझा तसा इरादाही नव्हता. मी स्वतःला इथल्या कुठल्या समाजकार्यात गुंतवून घेतलेले नव्हते. इथे भारतात राहतांना मी कधी लश्करच्या भाकऱ्याही भाजल्या नाहीत तेंव्हा परदेशात जाऊन तिथल्या कुणा परक्यासाठी कांही करायला मी कांही अमेरिकन नव्हतो. त्यामुळे इथे असतांनाही माझा सगळा वेळ स्वतःच्या सुखासाठी आणि आपल्या माणसांसाठी यातच खर्च होत असे आणि ते करणे मला अमेरिकेतसुध्दा शक्य होते. मग भारतात परत जायची घाई कशाला करायची? या युक्तीवादाला माझ्यापाशी तोड नव्हती.

अमेरिकेतील आमचे वास्तव्य अत्यंत सुखासीन रहावे यासाठी मुलाने चंगच बांधला होता असे दिसत होते. भारतात आमच्या घरात असलेल्या एकूण एक सुखसोयी तिथे उपलब्ध होत्याच, त्या चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे सहसा त्यात बिघाड उत्पन्न होत नसे. पाणी टंचाई, विजेचे भारनियमन यासारख्या कारणांमुळे त्या कधी बंद ठेवाव्या लागत नसत. यात घरकाम आणि आराम करण्याची साधने आली तसेच करमणुकीचीसुध्दा आली. तिकडच्या टेलीव्हिजनवर शेकडो वाहिन्यांवर चाललेले कार्यक्रम लागायचे, शिवाय दीडशेच्या वर चित्रपट ‘ऑन डिमांड’ म्हणजे आपल्याला हवे तेंव्हा पाहण्याची सोय होती. भारतात जर आपल्याला पहायचा असलेला चित्रपट टीव्हीवर लागणार असेल तर आधीपासून ठरवून त्या वेळी करायची इतर कामे बाजूला सारून टीव्हीच्या समोर फतकल मारून बसावे लागते आणि दर दहा मिनिटांनी येणा-या जाहिराती पहाव्या लागतात तसे तिथे नव्हते. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तेंव्हा तो सिनेमा पाहता येत असेच, शिवाय वाटल्यास आपणच पॉज बटन दाबून त्यात लंचब्रेक घेऊ शकत होतो. ब्लॉकबस्टर नांवाच्या कंपनीकडून दोन नवीन सिनेमांच्या डीव्हीडी घरपोच येत, त्या पाहून झाल्यानंतर दुकानात देऊन आणखी दोन डीव्हीडी निवडून घ्यायच्या आणि त्या परत केल्या की लगेच आणखी दोन नव्या डीव्हीडी घरी यायच्या अशी व्यवस्था होती. त्यातून नवनव्या तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटांचा एक प्रवाहच वहात होता असे म्हणता येईल.

असे असले तरी इतके इंग्रजी पिक्चर्स पाहण्यात आम्हाला रुची नसेल म्हणून हवे तेवढे हिंदी चित्रपट पहायची वेगळी व्यवस्था होती. मुलाने भारतातून जातांनाच अनेक सीडी आणि डीव्हीडी नेल्या होत्या, इतर जाणाऱ्या येणाऱ्यांकडून काही मागवल्या होत्या, तसेच आमच्याकडील हिंदी आणि मराठी डिस्क आम्हीही नेल्या होत्या. अशा प्रकारे घरात जमवून ठेवलेला बऱ्यापैकी मोठा स्टॉक होताच, त्याशिवाय आता अमेरिकेतसुध्दा हिंदी चित्रपटांच्या डीव्हीडीज विकत किंवा भाड्याने मिळू लागल्या आहेत. मुलाच्या मित्रांच्याकडून कांही मिळाल्या आणि किती तरी सिनेमे चक्क इंटरनेटवर सापडले. मी त्यापूर्वी आयुष्यातल्या कुठल्याही तीन महिन्यात, अगदी कॉलेजात असतांनासुध्दा पाहिले नसतील इतके हिंदी, मराठी आणि इंग्रजी सिनेमे मी या वेळी अमेरिकेत पाहून घेतले.

सिनेमा पाहणे हा मनोरंजनाचा एक थोडा जुना झालेला भाग झाला. आज टेलिव्हिजन पाहणे हा एक मनोरंजनाचा भाग न राहता जीवनाचा भाग बनून गेला आहे. आपली आवडती मालिका पाहिल्याखेरीज चैन पडेनासे झाले आहे. पण कांही हरकत नाही. भारतात जे कार्यक्रम पाहण्याची संवय जडली आहे तेसुध्दा वॉच इंडिया नांवाच्या वेबसाइटवर जगभर दाखवले जातात. त्याचेही सभासदत्व घेऊन ठेवले होते. भारतात रात्री प्रक्षेपित होत असलेले कार्यक्रमच आम्ही मुख्यतः पहात असू, पण त्यावेळी अमेरिकेत सकाळ असे एवढा फरक होता. त्यामुळे आपली रोज सकाळी करायची कामे विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळा पाहून त्यानुसार करीत होतो.

निवृत्तीनंतर रिकामेपणाचा उद्योग म्हणून आणि कांही तरी करीत असल्याचा एक प्रकारचा आनंद प्राप्त करण्यासाठी मी ब्लॉगगिरी सुरू केली आहे. त्यात खंड पडू नये याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. अमेरिकेत दुर्लभ असलेली मराठी (देवनागरी) लिपी घरातल्या संगणकावर स्थापित झाली होती. अत्यंत वेगवान असे इंटरनेट कनेक्शन तर चोवीस तास उपलब्ध होतेच. मला एकाच कॉम्प्यूटरवर टेलिव्हिजन पाहणे आणि लेखन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणार नाहीत म्हणून चक्क एक वेगळा संगणक घरी आणला.

बहुतेक दर शनिवार रविवार आसपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात जात असे. आता भारतातसुध्दा मॉल संस्कृती आली आहे, तिकडे ती पूर्णपणे विकसित झालेली आहे. त्यामुळे एक एक मोठा मॉल किंवा स्टोअर म्हणजे एक भव्य असे प्रदर्शनच असते. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, अत्यंत कलात्मक रीतीने सजवून आणि व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेल्या वस्तू पहातांना मजा येते. त्यातले शोभेच्या वस्तू असलेले दालन म्हणजे तर एकादे म्यूजियमच वाटावे इतक्या सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू तिथे पहायला मिळतात. त्या दुकानांत कोणीही वाटेल तितका वेळ हिंडावे, कांही तरी विकत घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाही. इतक्या छान छान गोष्टी पाहून आपल्यालाच मोह होतो यातच त्यांचे यश असते. दिवसभर भटकंती केल्यानंतर बाहेरची खाद्यंतीही ओघानेच आली. त्यासाठी मेक्सिकन, इटॅलियन ते चिनी आणि थाय प्रकारची भोजनगृहे आहेतच, पण उत्कृष्ट भारतीय भोजन देणारी निदान चार पांच हॉटेले मिळाली.

अशा प्रकारे आमची मजाच मजा चालली असली तरी घरी परतायची एक ओढ लागतेच. शिवाय घरात करता येण्याजोग्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करता आली तरी घराबाहेरचे वातावरण कांही आपल्याला बदलता येत नाही. तिथल्या कडाक्याच्या थंडीशी जमवून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपला हात दाखवते आणि शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यानंतर तो त्रास सहन करत तिथे राहणे सुखावह वाटत नाही. अशा कारणांमुळे मी योजलेले सहा आठवडे आणि मुलाने ठरवलेले सहा महिने म्हणजे सव्वीस आठवडे यातला सोळा हा सुवर्णमध्य अखेर साधला गेला आणि अमेरिकेत गेल्यापासून सोळा आठवड्यांनी आम्ही अमेरिकेचा निरोप घेऊन जानेवारी २००९च्या अखेरीस आम्ही मातृभूमीकडे परत आलो. आम्ही ज्या मार्गाने अमेरिकेला आलो होतो त्याच मार्गाने म्हणजे अॅटलांटा- नेवार्क- मुंबई असे परत आलो. परतीचा प्रवासही तसाच झाला. त्यात काही वेगळा अनुभव आला नाही. या भेटीत तिकडे पाहिलेल्या बहुतेक सगळ्या जागांची वर्णने मी या ब्लॉगवर केलेली आहेत.
Posted by Anand Ghare June 11, 2009

२. चीनमार्गे परतीचा प्रवास

आजकाल विमानाच्या प्रवासाची तिकीटे इंटरनेटवरूनच काढली जातात आणि त्यांची किंमत ठरलेली नसते. समजा मला आज पुण्याहून बंगलोरला जायचे तिकीट पाच हजाराला मिळाले असेल तर माझ्या शेजारच्या प्रवाशाला कदाचित सहा हजार रुपये मोजावे लागले असतील किंवा त्याला ते तिकीट फक्त चार हजारालाही पडले असेल. ‘मेक माय ट्रिप’ सारख्या काही कंपन्या हे बुकिंग करतात. आपल्याला कुठून कुठे आणि कधी प्रवास करायचा आहे ही माहिती कांप्यूटरवरून किंवा सेलफोनवरून दिली की त्या तारखेला जात असलेल्या अनेक विमान कंपन्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या व पोचण्याच्या वेळा आणि तिकीटाची यादी समोर येते. त्यातला सगळ्यात स्वस्त किंवा सोयिस्कर पर्याय निवडून आपण काय ते ठरवायचे आणि लगेच तितके पैसे क्रेडिट कार्डाने भरून ते बुकिंग करून टाकायचे. परदेशाला जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांच्या दरांमध्ये तर प्रचंड तफावत असते. दोन महिने आधीपासून बुकिंग केले तर ते तिकीट अर्ध्या किंवा पाव किंमतीतही मिळू शकते आणि आयत्या वेळी काढल्यास कदाचित तीन चारपट जास्त पैसे मोजावे लागतात किंवा ते विमान रिकामेच जात असेल तर आयत्या वेळी ते तिकीट अगदी स्वस्तातही मिळू शकते. जे लोक केवळ मौजमजेसाठी दोन चार दिवस कुठे तरी फिरायला जाऊन येत असतात ते अशा दुर्मिळ संधीचा लाभ उठवतात, पण त्यात खूपच अनिश्चितता असते. त्यामुळे आधीपासून ठरवून प्रवासाला जाणारे माझ्यासारखे रिकामटेकडे पर्यटक दोन महिने आधीपासून नियोजन करतात.

मी मागल्या वर्षी अमेरिकेला जाऊन आलो होतो. तिथे तीन महिन्याचा मुक्काम होऊन गेल्यावर मला परतीच्या प्रवासाचे वेध लागले. ख्रिसमसच्या सणाच्या काळात जगभर सगळीकडेच पर्यटकांची गर्दी होत असल्याने विमानांच्या तिकीटांना जास्त मागणी असते आणि अमेरिकेत राहणारे बरेचसे भारतीय लोकही तिथली थंडी टाळून उबदार भारताचा दौरा काढत असतात. त्यामुळे त्या काळात तिकीटांचे दरही वाढलेले असतात. म्हणून तो काळ संपल्यावर म्हणजे जानेवारीच्या अखेरीकडे मी भारतात परत यायचे असे नोव्हेंबरमध्येच ठरले. त्यानुसार निरनिराळ्या तारखांना उपलब्ध असलेल्या तिकीटांची चौकशी करतांना एक प्रचंड सवलतीची ‘डील’ मिळाली. वीस जानेवारीला लॉस एंजेलिसहून निघून बेजिंगमार्गे मुंबईला जायच्या प्रवासाचे तिकीट फक्त प्रत्येकी साडेतीनशे डॉलर्सला मिळत होते. यावर क्षणभर तरी माझा विश्वासच बसला नाही कारण मी अमेरिकेला जातांना एमिरेट्सच्या विमानाने दुबईमार्गे गेलो होतो तेंव्हा ते सहा सातशे डॉलर्स पडले होते. माझ्या मुलाने लगेच एअर चायनाची टिकीटे बुक करून टाकली. यात काही फसवाफसवी तर नसेल ना अशी शंका मला आली, पण माझा मुलगा गेली अनेक वर्षे याच कंपनीतर्फे बुकिंग करत आला होता आणि नेहमी त्याला चांगलाच अनुभव आला होता म्हणून तो निर्धास्त होता.

माझ्या मनात लहानपणापासूनच चीनबद्दल संमिश्र भावना होत्या. मी शाळेत शिकतांना भूगोल या विषयात मला चीनबद्दल जी माहिती मिळाली ती अद्भुत होती. आपल्या भारताच्या अडीचपट एवढा विस्तार असलेल्या या अवाढव्य देशात भारताच्या दीडपट एवढी माणसे रहातात, तरी ते सगळे लोक एकच भाषा बोलतात आणि एकाच लिपीत लिहितात हे कसे याचे मला मोठे गूढ वाटायचे. तिथेही काही हजार वर्षांपासून चालत आलेली जुनी संस्कृती आहे आणि हजारो वर्षांच्या इतिहासात तो देश अखंडच राहिला आहे. मुसलमानी आणि युरोपियन लुटारूंच्या धाडींना त्यांनी दाद दिली नाही आणि कडेकडेचा किंवा किनाऱ्यावरला थोडा भाग सोडला तर चीनच्या मुख्य भूमीवर कुणाही परकीयांना कधी कबजा करू दिला नाही. दुसऱ्या महायुद्धातला अगदी थोडासा काळ सोडला तर इतर सर्व काळ हा संपूर्ण देश स्वतंत्रच राहिला होता. कम्युनिस्टांनी आधी रशीयाची मदत आणि शस्त्रास्त्रे घेऊन उठाव केला आणि हा देश जिंकून घेऊन आपली सत्ता स्थापित केली, पण रशीयाच्या सैनिकांना तिथे शिरकाव करू दिला नाही. चीनने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले होते एवढेच नव्हे तर थोड्याच कालावधीत रशीयाचे बहुतेक सगळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले होते. त्या काळात भारताचे चीनबरोबरचे संबंध चांगले होते. माओझेदुंग आणि चौएनलाय या दुकलीने भारताला भेट दिली तेंव्हा त्यांचे प्रेमाने स्वागत केले गेले होते आणि “हिंदी चीनी भाई भाई” च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. कम्युनिस्टांच्या राज्यात तिथल्या जनतेवर प्रचंड दडपशाही केली जात होती असे काहीसे ऐकले असले तरी मला लहान वयात त्याचा अर्थ समजत नव्हता. त्यामुळे लहानपणी मला तरी चीनबद्दल कौतुक, गूढ आणि आकर्षण वाटत होते.

१९६२ साली चीनने विश्वासघात करून सीमाप्रदेशावर आक्रमण केले आणि तेंव्हा झालेल्या लढाईत भारताचे अनेक जवान मारले गेले, तसेच आपल्या देशाची नाचक्की झाली. यामुळे चीन हा एकदम एक नंबरचा शत्रू झाला आणि ते देश व तिथले लोक यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण झाला तो जवळजवळ कायमचा. मध्यंतरीच्या काळात तो राग हळूहळू कमी होत होता, पण गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि सीमेवर झालेल्या चकमकींमुळे तो आता पुन्हा वाढत गेला आहे.

असे असले तरी मी मुंबईला रहायला गेल्यावर आधी गंमत म्हणून तिथल्या चिनी हॉटेलांमध्ये जाऊन चिनी खाद्यपदार्थ खात होतो. पुढील काळात सरसकट सगळ्याच हॉटेलांमध्ये चायनीज अन्न मिळायला लागले, इतकेच नव्हे तर त्याचा थेट आमच्या स्वयंपाकघरातही प्रवेश झाला. परदेशांमध्ये तर बहुतेक सगळीकडे मला चायनीज फूड मिळत असे आणि ते सर्वात जास्त आवडत असे. मी पश्चिम अमेरिका दर्शनाची लहानशी ट्रिप केली होती ती एका चिनी कंपनीने काढली होती आणि त्यातले निम्म्याहून जास्त पर्यटक चिनी होते. त्यातले किती चीनमधून आलेले होते आणि किती अमेरिकेत स्थाईक झालेले चिनी होते कोण जाणे. पण त्यांच्यासोबत फिरतांना ना मला शत्रुत्व वाटले होते, ना त्या लोकांना. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये जिकडे तिकडे चीनमधून आलेल्या वस्तू प्रचंड प्रमाणात दिसत होत्या आणि त्या कमालीच्या स्वस्त भावाने विकल्या जात असल्यामुळे हातोहात खपत होत्या आणि घरोघरी जाऊन पोचत होत्या. इतकेच नव्हे तर मी कामानिमित्य ज्या कारखान्यांमध्ये जात होतो तिथेही यंत्रसामुग्री आणि कच्चा माल वाढत्या प्रमाणात चीनमधून यायला लागला होता. या सगळ्यांमुळे मला चीनविषयी अधिकाधिक कुतूहल वाटायला लागले होते.

माझ्या आयुष्यातल्या बहुतेक कालखंडामध्ये चीन हा देश बांबूच्या दाट पडद्याआड दडला होता आणि परकीय पर्यटकांना तिथे प्रवेश नव्हता, त्यामुळे मी कधी चीनला जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण पंधरावीस वर्षांपूर्वी चीनने आपली धोरणे बदलली आणि अर्थव्यवस्था थोडी मुक्त करून युरोपअमेरिकेतील भांडवलदारांना चीनमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिली. त्यानंतर अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने स्थापन केले, ऑफीसे उघडली आणि त्यानिमित्याने अनेक लोक चीनला जाऊन यायला लागले. काही प्रमाणात पर्यटकांचेही जाणेयेणे सुरू झाले. माझ्या माहितीतलेही काही लोक चीनचा दौरा करून आले. पण आता वयोमानाने माझ्यातच फिरायचे त्राण उरले नसल्यामुळे मला ते शक्य नाही. त्यामुळे असा अचानक चीनमार्गे प्रवास करायचा योग आला याचा मला मनातून थोडा आनंदच झाला. खरे तर वाटेत दोन दिवस बैजिंगला मुक्काम करून फिरायला मला आवडले असते, पण ते शक्य नव्हतेच. निदान तिथला विमानतळ तरी पहायला मिळेल, आभाळातूनच थोडे दर्शन घडेल आणि जमीनीवर आपले पाय टेकतील एवढे तरी होईल याचेच समाधान.

काही दिवसांनी आमच्याकडे भारतातला एक पाहुणा आला. त्याला आयटी उद्योगातला उदंड अनुभव होता आणि त्याने अनेक वेळा निरनिराळ्या मार्गांनी पृथ्वीप्रदक्षिणा केलेली होती. त्यात चीनमार्गे केलेला प्रवासही होता. तो म्हणाला, ” ते ठीक आहे, पण तुम्ही जेवणाचे काय करणार आहात?”
मी म्हंटले, ” मस्त दोन वेळा चायनीज फूड खाऊ, मला तर खूप आवडते.”
त्यावर तो म्हणाला, “अहो आपण पुण्यामुंबईला किंवा इथे अमेरिकेत जे चायनीज खातो तसले काही खरे चिनी लोक खातच नाहीत. ते लोक मीट म्हणून जे काय खायला घालतील त्याचा भयंकर वाससुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही आपले तुमच्यासाठी ‘हिंदू फूड’ बुक करा.” असा सल्लाही त्याने दिला. आम्ही तो ऐकून घेतला, पण त्यावर काही कारवाई केली नाही, कारण माझी सून एकदा चायना ए्रअरने प्रवास करून आली होती आणि ती तर पक्की शाकाहारी होती. ब्रेड, भात, बटाटे असे काही ना काही पोटभर अन्न तिला प्रवासात मिळाले होते.

वीस जानेवारीला आमचे उड्डाण होते. त्यासाठी आधी काही चौकशी करायची गरज आहे का असे मी मुलाला विचारले, पण त्याला पूर्ण खात्री होती. एक दोन दिवस आधी विमानकंपनीकडून का ट्रॅव्हलएजंटकडूनच आम्हाला स्मरणपत्र आले आणि प्रवासासाठी तयार रहाण्याची सूचना आली. मी आपले सगळे कपडे आणि औषधे वगैरे इतर सामान माझ्या बॅगेतच ठेवले होते. रोजच्या वापरातले कपडे हँगरला टांगले होते. ते गोळा करून बॅगेत ठेवायला तासभरसुद्धा लागला नसता. मी स्वतःसाठी अमेरिकेत काहीच खरेदीही केली नव्हती कारण मला लागणारे सगळे काही इथे पुण्यातच मिळते हेही मला ठऊक होते. पण भारतातल्या इतर नातेवाईकांना देण्यासाठी काही खेळणी, कॉस्मेटिक्स, खाऊ आणि इतर काही सटरफटर लहानशा गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या त्या सगळ्या वस्तूंना कपड्यांबरोबर अॅडजस्ट करून प्रवासाच्या बॅगा भरल्या.

ठरल्याप्रमाणे वीस जानेवारीला आम्ही लॉसएंजेलिस विमानतळाकडे जायला निघालो. विमानतळावरच काही बांधकाम सुरू केले होते आणि तिथे जाणारा मुख्य रस्ताच वहातुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे टॅक्सीवाल्याने वळसा घालून आम्हाला विमानतळाच्या दुसऱ्या भागात नेऊन सोडले. त्यात थोडा जास्तीचा वेळ खर्च झाला, पण थोडी घाई करून आम्ही आमच्या विमानाच्या निर्गमन स्थानावर वेळेवर जाऊन पोचलो. त्या भागात गेल्यागेल्याच मला चीनमध्ये गेल्याचा भास झाला. आमच्या चहूबाजूला सगळे चिनीच दिसत होते. कॅलिफोर्नियामध्ये चीन, जपान, कोरिया या भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातले काही लोक चीनला जायला निघाले असतील, तसेच चीनमधून अमेरिकेला फिरायला आलेले लोक परत जात असतील अशा लोकांमध्ये सगळे आपल्याला तर सारखेच दिसतात. तसे थोडे गोरे किंवा काळे अमेरिकन आणि भारतीय वंशाचे लोकही होते, पण ते सगळे मिळून पंधरावीस टक्के असतील.

आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे आमच्या समोरच शाळेतल्या मुलामुलींचा एक घोळका बसला होता आणि किलबिलाट करत होता. आठदहा वर्षाची ती गोल गोबऱ्या चेहेऱ्याची गुटगुटित मुले खूपच गोड दिसत होती. ती वीसपंचवीस मुले आईवडिलांना सोडून शिक्षकांच्या सोबतीने चीनच्या सहलीला निघाली असावीत किंवा चीनमधून अमेरिकेला येऊन आता परत मायदेशी चालली असावीत. त्यांच्या धिटाईचेच आम्हाला कौतुक वाटले. प्रत्येकाच्या हातात एक लेटेस्ट मॉडेलचा सेलफोन होता आणि ती त्यावर काही तरी आजूबाजूच्या मुलांना चढाओढीने दाखवत होती आणि ते पाहून खिदळत होती. मधून मधून त्यांचा गाईड त्यांना काहीतरी सूचना देत किंवा दटावत होता. मला त्यातले अक्षरही समजत नव्हते, पण पहाण्यतच मजा येत होती आणि वेळ चांगला जात होता.

विमानात जाऊन बसायला ठरवून दिलेल्या वेळेला अजून दहापंधरा मिनिटे अवकाश असतांनाच काही लोकांनी गेटच्या दिशेने रांगेत उभे रहायला सुरुवात केली आणि ते पाहून मला भारताची आठवण झाली. आमची जी सीट ठरलेली होती तीच आम्हाला मिळणार होती, आधी विमानात शिरून जागा पकडायचा प्रश्नच नव्हता. तरीही लोक का घाई करतात ते मला काही समजत नाही. म्हणून आम्ही आपल्या जागी शांतपणे बसून राहिलो होतो. पण ती रांगच मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत वाढत आमच्यापर्यंत आली तेंव्हा नुसते उठून उभे राहिलो आणि पाय मोकळे करून घेतले. तेवढ्यात ती रांग पुढे सरकायलाही लागली आणि आम्ही सगळे आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न झालो. ती गोड चिनी बालके मात्र अदृष्य झाली होती. त्यांना विमानाच्या वेगळ्या भागात जागा दिली गेली असणार आणि बहुधा आधी आत नेऊन बसवले असावे.

ते एक महाकाय जंबो जेट होते, तरीही त्यातल्या सगळ्या म्हणजे चारपाचशे जागा भरल्या असल्यासारखे दिसत होते. आमच्या आजूबाजूला तसेच मागेपुढे सगळे चिनीच होते. त्यांच्याशी काही संवाद साधायचा प्रश्नच नव्हता आणि मी तसा प्रयत्नही केला नाही. समोरच्या स्क्रीनवर काय काय दिसते ते पहायचा प्रयत्न केला, पण तो स्क्रीन, त्याची बटने आणि त्यावर दिसणारी हलणारी चित्रे या कशाचीच क्वालिटी वाखाणण्यासारखी नव्हती, त्यामुळे जे दिसेल ते कसेबसे पहावे लागत होते. मी घरी येईपर्यंत त्यातले काहीसुद्धा माझ्या लक्षात राहिले नाही. आता तर त्यात कुठले प्रोग्रॅम होते हेसुद्धा आठवत नाही.

विमानात ठरल्याप्रमाणे जेवणे आणि नाश्ते मिळाले ते अगदीच काही वाह्यात नव्हते. चिकन किंवा फिश मागून घेता येत होते त्यामुळे बैल, उंदीर किंवा बेडूक असे काही खायची वेळही आली नाही की नुसते उकडलेले बटाटेही खावे लागले नाहीत. विमानप्रवासात कुठेच झणझणीत पदार्थ देत नाहीत. सगळीकडे मिळतात तितपत सौम्य किंवा बेचव जेवण या विमानप्रवासातही मिळाले. आमच्या मित्राने घातलेली भीती सत्यात उतरली नाही.

लॉसएंजेलिसहून निघाल्यावर आम्ही पश्चिमेच्या दिशेने पॅसिफिक महासागरावरून झेप घेऊ अशी माझी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात आमचे विमान उत्तरेकडेच झेपावले आणि अमेरिकेच्या भूप्रदेशावरूनच पुढे जात राहिले. मला खिडकीजवळची सीट मिळाली नसल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हतेच, पण दूर क्षितिजावरसुद्धा पाणी दिसत नव्हते. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे उत्तरेच्या दिशेनेही आपण दुसऱ्या गोलार्धात जाऊ शकतो याचा अनुभव मी या आधीही घेतला होता, तसा या प्रवासातही आला. आमच्या विमानाने पुढे गेल्यावर कुठेतरी वळून पॅसिफिक महासागर ओलांडलाही असेल, पण ते माझ्या लक्षात आले नसेल.

आम्ही बैजिंगच्या जवळपास पोचलो तोपर्यंत तिथला स्थानिक सूर्यास्त व्हायची वेळ झाली होती आणि प्रत्यक्ष तिथे पोचेपर्यंत तर अंधारच पडला. त्यामुळे त्या शहराचे फारसे विहंगम दर्शन झालेच नाही. तिथे उतरल्यानंतर पुढे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी आमच्याकडे दीड तासांचा वेळ होता. त्यामुळे इकडेतिकडे रेंगाळायला जास्त फुरसत नव्हती. तरीही आपण ट्रान्जिट लाउंजमध्ये जाऊन आधी पुढील विमानाचे गेट पाहून घेऊ आणि बैजिंगची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू विकत घेऊन तिथला चहा किंवा कॉफी प्यायला वेळ मिळेल असे मला वाटले होते.

सर्व प्रवाशांबरोबर विमानातून उतरल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चालायला लागलो. मी आतापर्यंत जेवढे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठळक अक्षरातले इंग्रजी बोर्ड जागोजागी लावलेले पाहिले होते, पण बैजिंगला ते सापडतच नव्हते. आमच्या विमानातले बहुतेक प्रवासी बहुधा शहरातच जाणार हे मला अपेक्षित होतेच, पण ट्रँजिट लाउंज किंवा इंटरनॅशनल कनेक्शन्सकडे जाणारा रस्ता असा बोर्डच कुठे दिसला नाही. विचारपूस करायला कोणता काउंटरही नव्हता. सगळ्या प्रवाशांबरोबर बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जात असतांना एक युनिफॉर्म घातलेली महिला दिसली. ती बहुधा गर्दीवर लक्ष ठेवणारी सिक्यूरिटीवाली असावी. तिलाच आम्ही मुंबईला जायच्या विमानाकडे जायची वाट विचारली. भाषेचा प्रॉब्लेम तर होताच. त्यामुळे तिला आमचे बोलणे कळले की नाही ते ही आम्हाला समजत नव्हते. पण तिने एका बाजूला बोट दाखवले आणि आम्ही त्या बाजूला वळून चालायला लागलो.

त्या अरुंद रस्त्यानेही बरेच प्रवासी पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग पुढे गेल्यावर तिथे एक सिक्यूरिटी चेक लागला. कदाचित दुसऱ्या देशांमधील सुरक्षातपासणीवर चिनी लोकांचा विश्वास नसावा. त्यामुळे विमानातून आलेल्या प्रवाशांनीसुद्धा पुढल्या विमानात शिरायच्या आधी तिथल्या सिक्यूरिटीमधून जाणे आवश्यक होते. रांगेमध्ये शंभरावर लोक होते आणि फक्त दोनच एक्सरे मशीने होती. त्यांचे कामही सावकाशपणे चाललेले होते. तिथे गेल्यावर अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट आणि खिशातल्या सगळ्या वस्तू काढून ट्रेमध्ये ठेवल्या, एका सैनिकाने पायापासून डोक्यापर्यंत अगदी कसून तपासणी केली आणि पुढे जायची परवानगी दिली. पुन्हा सगळे कपडे अंगावर चढवून आणि पर्स, किल्ल्या, घड्याळ, मोबाईल वगैरे गोष्टी काळजीपूर्वक जागच्या जागी ठेवायचे सोपस्कार केले.

तोपर्यंत एक तास होऊन गेला होता आणि पुढे जाणारे विमान कुठे मिळेल हेही आम्हाला अजून समजले नव्हते. इकडे तिकडे पहातांना एका ठिकाणी सगळ्या फ्लाइट्सची यादी दिसली त्यावरून आम्हाला प्रस्थान करायचे गेट समजले. ते गेट कुठे आहे हे शोधून काढून तिथे जाऊन पोचेपर्यंत आमच्या फ्लाइटचे बोर्डिंग सुरू होऊन गेले होते. आता कुठले सोव्हनीर आणि कुठली कॉफी? तिथे आजूबाजूला कसली दुकाने आहेत, ती आहेत तरी की नाहीतच हेसुद्धा पहायला वेळ नव्हता. आम्हीही घाईघाईने विमानात जाऊन बसलो.

या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय होते. त्यामुळे एक वेगळा फील आला. हे विमान लहान आकाराचे असले तरी एअर चायनाचेच असल्यामुळे तिथली सर्व्हिसही पहिल्या विमानासारखीच होती. तसेच स्क्रीन, त्यावर तसलेच व्हीडिओ, तशाच हवाई सुंदरी आणि तसेच जेवण होते. बाहेर सगळा अंधारगुडुपच होता. थोडे स्क्रीनकडे पहात आणि थोड्या डुलक्या घेत वेळ काढला. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे एक दीड वाजता मुंबई विमानतळ जवळ आल्याची आणि थोड्याच वेळात विमान खाली उतरणार असल्याची घोषणा झाली आणि त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या त्याबरोबर एक खास आणि वेगळी सूचना दिली गेली. “जर कोणता प्रवासी वूहानहून आला असेल आणि त्याला ताप किंवा सर्दीखोकला असेल तर त्याने मुंबई विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्याला भेटावे.” असे त्यात सांगितले गेले. आम्हाला त्याचे थोडे नवल वाटले, पण आम्हाला तर वूहान नावाची एक जागा आहे हेसुद्धा माहीत नव्हते आणि आम्ही थेट अमेरिकेतून आलो असल्यामुळे ती सूचना आम्हाला लागू होत नव्हतीच. पण हा काय प्रकार असेल याचा पत्ता लागत नव्हता.

मुंबई विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन काउंटरकडे जायच्या रस्त्यावर एक मोठा उभा बोर्ड ठेवला होता आणि त्यावर ‘करोनाव्हायरस’ असा मथळा होता. ते वाचून मला पहिल्यांदा हा शब्द समजला. पुढे तो सगळ्यांच्या जीवनात इतके थैमान घालणार असेल याची मात्र तेंव्हा पुसटशी कल्पनाही आली नाही. त्या बोर्डावर खाली बरेच काही लिहिले होते, पण ते वाचायला त्यावेळी कुणाकडेच वेळ नव्हता. त्या काळात रात्रीच्या वेळी परदेशांमधून अनेक विमाने मुंबईला येत असत. त्यामुळे इमिग्रेशन काउंटरसमोर ही भली मोठी रांग होती. त्यातून पुढे सरकत सरकत आमच्या पासपोर्टची पाहणी झाल्यावर आम्ही सामान घ्यायला गेलो.

आम्हाला उशीर झाल्यामुळे आमच्या विमानातले थोडे सामान आधीच येऊन कन्व्हेयर बेल्टवर आले होते आणि काही सामान कुणीतरी उचलून बाजूला काढून ठेवले होते. परदेशातून आल्यावर बेल्टवरली आपली बॅग ओळखणे हेही एक मोठे दिव्य असते. एक तर आपण असल्या अवाढव्य बॅगा एरवी कधी कुठेच नेत नाही, त्यामुळे त्यांचे रंग, आकार वगैरे आपल्या ओळखीचे नसतात आणि इतर अनेक प्रवाशांकडेही तशाच दिसणाऱ्या बॅगा असतात. म्हणून आपली बॅग ओळखून येण्यासाठी मी त्यांवर मोठी लेबले चिकटवतो, त्यांना रंगीत रिबिनी बांधतो अशा खुणा करून ठेवतो, पण वाटेत बॅगांची जी आदळआपट होते त्यात कधीकधी त्या खुणा नाहीशा होण्याचीही शक्यता असते.

आम्ही आमच्या बॅगा शोधल्या, त्यात आमच्या दोन बॅगा आम्हाला सापडल्या आणि दोन सापडल्याच नाहीत. आता त्या आल्याच नाहीत की भामट्यांनी पळवून नेल्या हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही एअरलाइन्सच्या काउंटरवर चौकशी करायला गेलो. तिथे बॅगा न मिळालेले वीसपंचवीस प्रवासी तावातावाने भांडत होते. काउंटरवाल्या माणसावर जोरजोरात ओरडत होते. तो तरी काय करणार? मुकाट्याने सगळे ऐकून घेत होता. थोडी शांतता झाल्यावर त्याने सगळ्यांना एकेक फॉर्म दिला आणि तो भरून द्यायला सांगितले. आपले नावगाव, पत्ता, फ्लाइट नंबर, सामानाच्या रिसीटचे नंबर वगैरे सगळा तपशील भरून आम्ही तो फॉर्म परत दिला. तोपर्यंत त्याच्याकडे विमानकंपनीकडून काही माहिती आली होती त्यात बैजिंगलाच राहून गेलेल्या सामानाचा तपशील होता. आमच्या नशीबाने त्यात आमच्या बॅगाही होत्या असे वाटले आणि थोडा धीर आला.

ते सामान पुढच्या फ्लाइटने मुंबईला पाठवतील असे आश्वासन मिळाले, पण बैजिंगहून मुंबईला येणारे पुढचे विमान तीन दिवसांनंतर येणार होते. पण आम्हाला तर पुण्याला जायचे होते, मुंबईत राहणे शक्यच नव्हते. मग आमचे सामान कूरियरने पुण्याला पाठवले जाईल असे सांगून त्याने आमचा पुण्याचा पत्ता लिहून घेतला. या गोंधळामध्ये आणखी तासदीडतास गेला. पण जास्त सामान नसल्यामुळे कस्टममध्ये वेळ लागला नाही. आम्ही ग्रीन चॅनेलमधून लवकर बाहेर आलो. आम्ही पुण्याला जाण्यासाठी गाडी बुक केलेली होतीच आणि तिचा सज्जन ड्रायव्हर आमची वाट पहात थांबला होता. पुढे मात्र आम्ही दिवस उजाडेपर्यंत सुरळीतपणे पुण्याला घरी येऊन पोचलो आणि एकदाचे हुश्श म्हंटले. तीन दिवसांनंतर आमचे राहिलेले सामानही आले.

अमेरिकेतले लोक सहसा घरात वर्तमानपत्रे घेतच नाहीत. मी तिथे असतांना रोज टीव्हीवरल्या बातम्यासुद्धा पहात नसे. अधून मधून जेंव्हा ऐकल्या होत्या त्यात कधीच करोनाव्हायरसचा उल्लेखही झाला नव्हता. २० जानेवारी २०२० रोजी आम्ही लॉसएंजेलिस विमानतळावर चांगले दीडदोन तास बसलो होतो किंवा इकडेतिकडे फिरत होतो. तिथून तर दररोज कितीतरी विमानांची बैजिंग किंवा शांघायला उड्डाणे होत असतात, पण तिथेही या साथीच्या वृत्ताचा मागमूससुद्धा नव्हता. कुठेही मुंबईतल्यासारखा बोर्ड नव्हता आणि कोणीही प्रवासी मास्क लावून बसले नव्हते. बैजिंगच्या विमानतळावरसुद्धा आम्हाला काही वेगळे जाणवले नाही. तिथे काही लोकांनी मास्क लावलेले दिसले, पण त्या लोकांना काही त्रास असेल किंवा प्रदूषणामुळे त्रास होण्याची भीती वाटत असेल असे मला त्यावेळी वाटले असेल. खरे तर आम्हाला त्याबद्दल विचार करायला सवड नव्हती. त्यामुळे २२ जानेवारीला मी मुंबईला येऊन पोचेपर्यंत कोरोना हे नावही ऐकले नव्हते.

मी पुण्याला आल्यावर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात त्याविषयी उलटसुलट काहीतरी छापून आलेले समोर येत होते. त्या काळात तो फक्त चीनमधल्या वूहान या शहरापुरताच मर्यादित होता, पण तिथे तो झपाट्याने वाढत होता आणि टीव्हीवर दाखवली जाणारी त्या शहरातली दृष्ये भयानक असायची. आम्हा दोघांना सर्दीखोकला, ताप असले काही लक्षण नसल्यामुळे आम्ही बचावलो अशी खात्री होती, पण पुढे बातम्यांमध्ये असे यायला लागले की ती लक्षणे २-३ दिवसांनंतर दिसायला लागतात. आम्ही इथे येऊन पोचल्याच्या २-३ दिवसानंतर हा कालावधी क्रमाक्रमाने ४-५, ७-८, १०-१२ दिवस असा वाढतच गेला आणि त्याप्रमाणे आमच्या मनातली सुप्त भीतीही रेंगाळत राहिली. शिवाय असेही समजले की ज्याला अजीबात लक्षणे कधी आलीच नाहीत असा माणूससुद्धा संसर्गाचा वाहक असू शकतो. त्यामुळे मी शक्यतो स्वतःला इतरांपासून दूर दूरच ठेवत राहिलो. मी चीनमार्गे प्रवास केला आहे असे कुणाला सांगायचीही सोय राहिली नव्हती. त्यामुळे मी तो विषयच टाळत राहिलो. यातून पूर्णपणे मुक्त व्हायला जवळजवळ महिनाभर लागला, पण त्यानंतर लवकरच हा कोरोना इतर मार्गांनी भारतात आलाच आणि सगळा देश लॉकआउट झाला. त्यातून तो आजवर पूर्णपणे सावरलेला नाही.

थोडक्यात सांगायचे झाल्यास चीनमार्गे भारतात परत येण्याच्या प्रवासात किंवा त्यानंतर मला तसा काही त्रास झाला नाही. तो सुरळीतच झाला असे म्हणता येईल, पण त्यात काही मजा मात्र आली नाही आणि तो संस्मरणीय वगैरे काही झाला नाही.

चीन, चिनी आणि चायनीज – ४

चिनी लोक पूर्वीपासूनच कष्टाळू आणि उद्योगी समजले जात आहेत. चित्रविचित्र आकृत्यांनी सजवलेले चिनी मातीचे मोठाले रांजण आणि तबकड्या जगातल्या बहुतेक सर्व पुराणवस्तूसंग्रहालयात आढळतात. रेशीम हा तर तेथला प्रसिध्द उद्योग होता. रेशमाची निर्यात ज्या मार्गाने चीनबाहेर होत असे ते रस्ते  ‘सिल्क रूट’ याच नांवाने ओळखले जात.  कागद तयार करण्याची प्रक्रिया प्रथम चीनमध्ये विकसित झाली आणि नंतर जगभर पसरली. व्यास, वाल्मिकी किंवा सॉक्रेटिस, प्लूटो यांच्या बरोबरीने कॉन्फ्यूशिअस या चिनी तत्ववेत्त्याचे नांव आदराने घेतले जाते. ह्यूएनत्संग या इतिहासकालीन चिनी पर्यटकाने केलेल्या नोंदी प्रसिध्द आहेत. प्राचीन काळात चीन हा देश समृध्द मानला जात होता. मध्ययुगात तो थोडा वेगळा पडला होता आणि कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्याने सोव्हिएट युनियन सोडून अन्य जगाशी फारसे संबंधच ठेवले नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःभोवती घातलेल्या बांबूच्या पडद्याआड काय चालले आहे ते गुलदस्त्यात राहिले होते.

चिनी वंशाचे लोक पूर्वीपासूनच इतरत्र पसरले आहेत. पूर्व आशिया खंडातल्या सगळ्याच देशात ते मोठ्या संख्येने राहतात. सिंगापूरमध्ये ते बहुसंख्येने आहेत. चिनी वंशाच्या लोकांनी आपल्या पाककौशल्याचा जगभर प्रसार केला आणि सर्व प्रमुख शहरात चिनी जेवण मिळते हे मागील भागात पाहिलेच. त्यामुळे चिनी माणूस म्हंटला की तो खानसामा किंवा बावर्ची असेल असे कांही लोकांना वाटणे शक्य आहे. इतर कांही उद्योगातसुध्दा त्यांनी आपला जम बसवलेला आहे. कोलकात्याच्या बाजारात मिळणा-या वेताच्या आणि चामड्याच्या वस्तू बहुधा चायनाटाउनमधल्या असतात. कां ते कोणास ठाऊक, पण अनेक जागी चिनी दंतवैद्य असतात. इतर कांही दुखण्यांवरसुध्दा एकादे खास चिनी औषध अकशीर इलाज समजले जाते. त्यात वाघ, सिंह, गेंडा, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांचे रक्त, मांस, हाडे, चामडी वगैरेचा अंश असल्यामुळे ती प्रभावी ठरतात असा समज पसरवला गेला आहे. आजकाल कोणीही हौस म्हणून यातल्या कोणत्याही प्राण्याचे मुंडके आपल्या दिवाणखान्यात लावून ठेऊ शकत नाही तरीही या वन्य पशूंच्या देहाला चिनी औषधी बनवण्यासाठी मोठी किंमत मिळते या कारणामुळे जगभरातल्या अरण्यांत या बिचा-या वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी चिनी लोकांच्या मार्शल आर्ट्समधील मारामारीतल्या चमत्कारावर आधारलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाट आली होती. त्यानंतर जुडो, कराटे, कुंगफू, ताकिआंदो वगैरे चिनी, जपानी व कोरियन प्रकार बरेच प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले होते.

आजच्या चीनमधल्या लोकांनी मात्र असल्या परंपरागत क्षेत्रावर विसंबून न राहता आधुनिक यंत्रयुगातली नवनवीव क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास भारतातही फारशी यंत्रसामुग्री तयार होत नव्हती आणि चीनमध्येही होत नव्हती. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्विट्झरलंड यासारख्या प्रगत देशांतून आयात केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या यंत्रसामुग्रीवर भारताचे औद्योगीकरण सुरू झाले. चीनला सर्व यंत्रे कम्युनिस्ट देशांकडून जशी मिळतील तशी घ्यावी लागली. पुढे कांही भारतीय उद्योगसमूहांनी त्यातली कांही यंत्रे परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने इथेच बनवायला सुरुवात केली तर चीनने स्वतः त्यातले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आणि त्यात ते अधिकाधिक प्राविण्य संपादित करत गेले. लघुउद्योगाला प्रोत्साहन आणि मोठ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्याच्या आपल्या धोरणामुळे या क्षेत्रात होणा-या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. कालांतराने लुधियाना, बटाला, राजकोट यासारख्या गांवातल्या लहान कारखान्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची साधीसुधी यंत्रे मोठ्या प्रमाणावर बनून भारतात आणि मागासलेल्या देशात ती खपू लागली. मात्र मोठ्या कारखान्यांची व्हावी तेवढी वाढ झाली नाही. आता युरोप अमेरिकेत कष्ट करू इच्छिणारा मजूरवर्ग जवळजवळ नाहीसा झाल्यामुळे तिकडचा यंत्रोद्योग उतरंडीला लागला आहे. पण भारतीय उद्योग त्याची जागा घेऊ शकला नाही.  ते काम चीनने यशस्वी रीत्या केले आहे. त्यामुळे पहिल्या पिढीतली जी परदेशी यंत्रे जुनी झाली त्यांच्या जागी कांही काळ भारतीय बनावटीची यंत्रे येत होती, पण आता अधिकाधिक जागी चिनी बनावटीची नवी यंत्रे दिसू लागली आहेत. अशा प्रकारची काही यंत्रे भारतातसुध्दा तयार होऊ शकतात, पण चिनी यंत्रे जास्त आधुनिक असूनही स्वस्तात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.

मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरणाचा जास्तीत जास्त लाभ पूर्व आशियातील देशांनी करून घेतला आहे. या नव्या धोरणाचे वारे वहायला लागताच सोनी, नॅशनल पॅनासॉनिक, टोयोटा, होंडा, सुझुकी आदि जपानी कंपन्या आणि एलजी, सॅमसुंग, ह्युएंदाई सारख्या कोरियन कंपन्यांनी मोटारी, टीव्ही, रेफ्रिजरेटर वगैरेचे वाढते मार्केट काबीज केले. यासारखी कोणतीही मोठी चिनी कंपनी दिसत नाही पण या जपानी व कोरियन यंत्रांचे अनेक सुटे भाग मात्र चीनमध्ये बनतात असे समजते. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात लागणा-या अगणित वस्तू तर अमाप संख्येने चीनमध्ये तयार होतात आणि भारतातल्या शहरातल्याच नव्हे तर खेड्यापाड्यातल्या बाजारातसुध्दा त्यांचा महापूर येऊ लागला आहे. दिवे मिचकावणारी आणि वेगवेगळे आवाज काढणारी अतिशय आकर्षक अशी स्वयंचलित चिनी खेळणी अगदी स्वस्तात मिळतात. डासांना मारण्याची चिनी रॅकेट भारतातल्या घराघरात पोचली आहे. महागातले टॉर्च आणि बॅटरी सेल्स यासारख्या वस्तूंच्या चिनी डुप्लिकेट अर्ध्यापेक्षा कसी भावात मिळतात. कुठलेच ब्रँडनेम नसलेल्या या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कशा इकडे येतात, खेड्यात भरणा-या आठवड्याच्या बाजारापर्यंत त्यांचे वितरण कोण करतो आणि या साखळीतल्या सर्वांचे कमिशन कापल्यावर मूळ चिनी उत्पादकाला त्यातून किती किंमत मिळते आणि ती त्याला कशी परवडते या सगळ्याच गोष्टींचे मला गूढ वाटते. एका बाजूने ग्राहकाला त्याचा फायदा होत असला तरी त्या वस्तूंचे उत्पादन करणारा भारतीय उद्योग संकटात सापडला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञांनी बरीच आघाडी मारल्याचे आज दिसत असले तरी चीन हा या क्षेत्रातला जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊ पहात आहे. लार्सन अँड टूब्रो, विप्रो, इन्फोसिस यासारख्या भारतीय कंपन्यांनी आता चीनमध्ये शाखा उघडल्या आहेत आणि आपले कांही काम ते आता तिकडे वळवीत आहेत.

उद्योगाच्या क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुध्दा चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातल्या मेडिकल कॉलेजमधल्या अव्वाच्या सव्वा झालेल्या कॅपिटेशन फी पेक्षा चीनमध्ये कमी खर्च येतो या कारणाने कांही भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत असे ऐकले. भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असूनसुध्दा चीनमध्ये शिक्षण घेणे ते पसंत करतात. व्यापारी वर्गाला अजून चीनबद्दल पूर्ण विश्वास वाटत नाही, पण तरीही जगभरातील मोठ्या कंपन्यांनी आपली जाळी चीनमध्ये पसरवायला सुरुवात तर केली आहे. रस्तेबांधणी, नगररचना आदि बाबतीत चीनने आश्चर्यजनक प्रगती केली आहे. आता तिथली प्रमुख शहरे युरोपमधील शहरासारखी दिसू लागली आहेत. त्यामुळेच आता मुंबईचे शांघाय करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.

क्रीडाक्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीने सर्व जग अचंभित झाले आहे. अगदी शून्यापासून सुरुवात करून आज चीन हा देश पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचला आहे. बीजिंग येथे होऊन गेलेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत एकाग्रता, चापल्य किंवा शरीरसौष्ठव लागणा-या एकूण एक क्रीडाप्रकारात स्त्रिया किंवा पुरुष, वैयक्तिक किंवा सांघिक अशा सर्व गटात चीनचे स्पर्धक एकामागोमाग एक विजय मिळवत गेले असे रोजच्या रोज पहायला मिळायचे. क्रीडास्पर्धांमध्ये हे यश खेळाडूंवर जोर जबरदस्ती करून किंवा बंदुकीच्या धांकाने मिळत नसते. त्यासाठी काय करायला हवे त्याचा सखोल विचार करून त्याला पोषक असे वातावरण तयार करावे लागते, खेळाडूंना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, तसेच त्यासाठी लागणारी उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्री द्यावी लागते. आजच्या युगात खेळातील कौशल्यातदेखील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. चीनने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे वापरून खेळाचा दर्जा वाढवण्यात चीनने एवढे यश मिळवले आहे.

ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ टीव्हीवर पाहतांनाच डोळ्याचे पारणे फेडणारा वाटत होता, प्रत्यक्षात तो केवढा भव्य वाटला असेल याची कल्पना करवत नाही. हजारोंच्या संख्येने त्यात भाग घेणारी लहान मुले आणि नवयुवक यांनी सादर केलेले कार्यक्रम फारच सुनियोजित होते. त्यातली कल्पकता, कौशल्य तसेच शिस्तबध्दता वाखाणण्याजोगी होती. दिव्यांची रोषणाई आणि आतिशबाजी अप्रतिम अशी होती. अवाढव्य आकाराचे कागद जमीनीवर अंथरून सर्व खेळाडूंच्या पायाचे ठसे त्यावर घेण्याची कल्पना अफलातून होती. हा एवढा मोठा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे बसवून कुठेही कसलेही गालबोट न लागता सादर करण्यामागे प्रचंड नियोजन केले गेले असेल आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस त्यात लागला असेल यात शंका नाही. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा भव्य सोहळा घडवून आणून चीनच्या लोकांनी “हम भी किसीसे कम नही” असेच जगाला दाखवून दिले आहे.

. . .  . .. .. . . . . . . . (समाप्त)

चीन, चिनी आणि चायनीज – ३

चीनने केलेल्या आक्रमणानंतर दहा वर्षात पाकिस्तानबरोबर दोन मोठ्या लढाया झाल्या आणि १९७१ साली झालेले युध्द भारतीय सेनेने निर्विवादपणे जिंकले. विजयाच्या या उन्मादात १९६२ सालची कटु ‘हकीकत’ मागे पडली आणि ‘चिनी’ या शब्दाबद्दल वाटणारी घृणा कमी झाली. ‘चायनीज’ या शब्दाला मात्र या भावनेचा स्पर्श बहुधा कधी झालाच नाही. चायनीज म्हणताच माओचा कम्युनिस्ट देश डोळ्यापुढे न येता जगभर पसरलेल्या चिनी वंशाच्या माणसांनी लोकप्रिय केलेली खाद्यसंस्कृती हीच पटकन आठवते. ‘चायनीज’ शब्दाच्या जोडीला ‘फूड’ हा शब्द कायमचा जोडलेला असावा.

मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर ‘मँडारिन’ की ‘नानकिंग’ अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत. पण लहानपणापासून चिनी लोकांच्या खाण्याबद्दल जे कांही ऐकले होते त्यावरून इथे कदाचित विंचवाच्या नांगीची चटणी, झुरळांची कोशिंबीर आणि सापाचे काप असले पदार्थ ‘लिंगचांगफू’ किंवा ‘हानछाऊशुई’ असल्या अजब नांवाने मिळत असतील असे वाटे.  त्यामुळे हॉटेलच्या समोरून जातांना ते कितीही खुणावत असले तरी आंत पाय ठेवण्याची इच्छा होत नसे. ताज आणि ओबेरॉयसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंच्या निमित्याने कधी तरी जाणे होत असे. एकदा चंव तरी घेऊन पहावी म्हणून तिथल्या खाद्यंतीतले चायनीज पदार्थ चाखून पाहिले आणि ते इतके आवडले की पोटभर खाऊन घेतले. त्यांची आवड दिवसेदिवस वाढतच गेली आणि अजून ती टिकून आहे.

धीर चेपल्यानंतर मित्रांच्यासोबत चायनीज हॉटेलांना भेट द्यायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणांचे मेनूकार्ड पूर्णपणे इंग्रजीतच असायचे आणि त्यात आक्षेपार्ह वाटणारा कोणताच जिन्नस दिसत नव्हता. ती हॉटेले जरी चिनी लोकांनी चालवली असली तरी तिथे येणारे सगळे ग्राहक हिंदुस्थानीच होते, त्यामुळे इथले लोक जे खाऊ शकतील असेच पदार्थ तिथे ठेवले जाणार हे उघड होते. यापूर्वी मी शेकडो मक्याची कणसे भाजून आणि तूपमीठ लावून खाल्ली होती, त्यांच्या किसाच्या गोळ्यांचे तळलेले वडे किंवा तो फोडणीला घालून तयार केलेले उपम्यासारखे पदार्थ खाल्ले होते, पण मक्याचे लुसलुशीत कोवळे दाणे वाफवून किती चविष्ट लागतात हे मला माहीत नव्हते. घरात टोमॅटोचे सार कधी केले गेले तर आम्ही जेवणाबरोबरच त्याचे भुरके मारीत असू, पुरणाच्या पोळीच्या सोबतीने कटाची आमटी व्हायचीच आणि आजारी पडल्यावर भाताची पेज प्यायला देत. या सगळ्या पेय पदार्थांना इंग्रजीत ‘सूप’ म्हणतात आणि पाश्चात्य लोक ते जेवणापूर्वी पितात हे मात्र तेंव्हा माहीत नव्हते. मुंबईला आल्यावर एक दोन वेळा उडप्याकडचे सूप पिऊन पाहिले, पण ते एकादी चटणी किंवा सॉस गरम पाण्यात मिसळून ढवळून दिल्यासारखे लागले, त्यामुळे फारसे पसंत पडले नाही. पण चायनीज पध्दतीचे स्वीट कॉर्न सूप पिऊन मात्र तिथल्या तिथे ‘कलिजा खलास झाला’. पुढे मी अनंत प्रकारची ‘क्लीअर’ आणि ‘थिक’ सूप्स चाखून पाहिली, त्यात ‘लेंटिल’, ‘ तिरंगा’, ‘लंगफंग’, ‘क्रॅब’ वगैरे प्रकारही आले. पण माझ्या मते तरी चायनीज हॉटेलांमध्ये मिळणारे चिकन कॉर्न सूप हाच सर्व ‘सूप’ प्रजातींचा निर्विवाद बादशहा आहे.

मसालेभात, बिर्याणी, पुलाव, खिचडी आदि प्रकारात मोडणारा चायनीज फ्राईड राइस दिसायलाही वेगळा असतो आणि चवीलाही. आपला मसालेभात साहजीकच मसालेदार असणार, हैदराबादी बिर्याणीही चांगली झणझणीत असते, पुलाव थोडा सौम्य असतो आणि मुगाची खिचडी तर ‘आजारी स्पेशल’ समजली जाते. चांगली शिजलेली पण सुटी सुटी शिते असलेला चायनीज फ्राईड राईस मुळातच चविष्ट पण बेताचा तिखट असतो आणि त्यात आपल्याला हव्या त्या चटण्या व सॉस मिसळून त्याचे पाहिजे तसे संस्करण करता येते. शिवाय त्यासोबत मांचूरियाची ग्रेव्ही असली म्हणजे आहाहा ! ! ! क्या बात है? नूडल्सची गुंतागुंतीची भेंडोळी सोडवावीत का कापावीत या संभ्रमात पडून ती खातांना आधी आधी थोडी पंचाईत होत असे. त्याचे तंत्र जमायला लागल्यानंतर ती आवडायला लागली. दोन हातात दोन काड्या धरून त्यांच्या सहाय्याने नूडल्सच्या ढीगाला भराभरा तोंडात ढकलण्याचा प्रकार मात्र कधीच विशेष रुचलाही नाही आणि जमलाही नाही.

या सगळ्या चायनीज पदार्थात भोपळी (सिमला) मिरची, पातीचे कांदे, फरसबी (फ्रेंच बीन्स), गाजर वगैरे एरवी वेगवेगळे खाण्यात येणारे पदार्थ एकत्र असतात आणि त्यातून एक निराळीच चंव निर्माण होते. कांही पदार्थात बांबूचे कोंब, बेबी कॉर्न,  लसणीची हिरवी पाती यासारखे नवखे पदार्थही असतात. मुख्य म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर “सर्वात मका” असतो. तो कधी दाण्यांच्या रूपात असेल तर कधी त्याचे मैद्यासारखे गुळगुळीत पीठ ग्रेव्हीला लावलेले असेल किंवा त्या पिठात बुडवून तळलेले गोळे असतील.  जोडीला सोया सॉससारख्या वेगळ्या चवी असतात. तेलाचा वापर माफक प्रमाणात केलेला असतो. कदाचित आले आणि लसूण या पाचक गोष्टी त्यात सढळ हाताने मिसळलेल्या असल्यामुळे ते पदार्थ पचायला हलके पडत असतीलही. निदान अशी समजूत तरी असते.  या सगळ्या गुणांमुळे चायनीज खाणे जगभर सगळीकडे दिवसेदिवस लोकप्रिय होत गेले. मुंबईतल्या फोर्टमधल्या खास हॉटेलांतून लवकरच ते उपनगरांमधल्या सर्वसामान्य उपाहारगृहांमध्ये आले आणि आता तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वडापावाच्या स्टॉल्समध्ये व हातगाड्यांवर चायनीज खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. अगदी लहान गांवातल्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉटेलातल्या मेनूकार्डावर चायनीज विभाग असलेले मी पाहिले आहे.  ‘मॅगी टू मिनिट नूडल्स’ने त्यांना घराघरात पोचवले आणि आता जागोजागी चायनीज पदार्थ करायला शिकवणारे क्लासेसही दिसतात. सगळेच खाद्यजग असे ‘चायनीजमय’ झाले असल्यामुळे निष्णात किंवा शिष्ट खवय्ये लोक आता ‘थाई’ आणि ‘मेक्सिकन’ ‘क्युझिन’चे कौतुक करू लागले आहेत.

पण आपल्या भारतीय हॉटेलात मिळणा-या चायनीज पदार्थांचे बरेचसे भारतीयीकरण झालेले असते. त्यातल्या जिरे, मिरे, लवंग, वेलदोडे, कोथिंबीर, पुदिना वगैरे मसाल्यांचा चंवी ओळखून येतात आणि लोकांना त्या आवडतात. चीनला जाण्याची संधी कांही मला मिळाली नाही, पण पश्चिमेकडे मात्र बहुतेक ठिकाणच्या चायनीज हॉटेलांत चिनी वंशाचे वाटणारे नकटे चपटे लोकच काम करतांना दिसतात. आता सगळीकडे ‘इंडियन फूड’ सुध्दा मिळते, पण त्याच्या खानावळी एकाद्या गल्लीबोळात आडबाजूला असतात. चायनीज रेस्तराँ मात्र शहरांच्या मध्यवर्ती भागांत मोक्याच्या नाक्यांवर झोकाने विराजमान दिसतात. तिथे मिळणा-या अन्नाची चंव वेगळीच असते. आपण जन्मात कधी न पाहिलेली पाने, फुले आणि बिया व त्यांचे अर्क त्यात घातलेले असतात. त्यातल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे व्हिनेगारसारख्या द्रवात भिजवून ठेवत असतील. एकादा पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की त्यात काय होते ते ओळखण्याएवढा मी त्यातला तज्ञ नाही, पण पूर्वी खाल्लेल्या पदार्थापेक्षा त्यात कांही तरी वेगळे असे आहे इतपत समजून येते.  या आगळ्या चंवी कधी खूप आवडतात तर कधी नाही. पण मिळमिळीत कॉंटिनेंटल पदार्थांपेक्षा त्या नक्कीच उजव्या असतात.

अलीकडच्या काळात युरोप अमेरिकेमध्ये चायनीज बूफे खूप प्रचलित झाला आहे. त्यात कमीत कमी पन्नास तरी निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक रीतीने मांडून ठेवलेले असतात. शाकाहारी पदार्थांत फारसे वैविध्य नसते आणि त्यांना फारशी चंवही नसते, पण मांसाहारामध्ये मात्र जमीनीवर चालणारे, पाण्यात पोहणारे आणि आकाशात उडणारे अशा अनेक प्रकारच्या जीवांपासून बनवलेले खाद्यपदार्थ असतात. त्यात पुन्हा भाजलेले, शिजवलेले किंवा तळलेले असे विविध प्रकार दिसतात. त्यातून आपल्याला हवा तो पदार्थ हवा तेवढा वाढून घेता येतो. एकेका पदार्थाची चंव घेऊन पाहतापाहताच पोट भरून जाते आणि आवडलेला पदार्थ पोटभर खाण्यासाठी पुन्हा त्या हॉटेलला भेट द्यावीशी वाटते.

. .  .. . . . . . . . . .  (क्रमशः)

चीन, चिनी आणि चायनीज – २

भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. आजवरच्या इतिहासात कोठलाही शत्रू तिला पार करून भारतापर्यंत येऊन पोचू शकला नव्हता. जी कांही आक्रमणे झाली ती वायव्येकडच्या ज्या खैबरखिंडीतूनच झाली होती, ती तर आता पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानशी सख्य नसल्यामुळे पाकिस्तानच्या सरहदीकडेच लक्ष ठेवावे लागले होते आणि आपला बहुतेक सारा फौजफाटा त्या सीमेवरच तैनात होता. चीनच्या सीमेवर हिमालय पर्वताच्या रांगा आणि निबिड जंगल यामुळे अत्यंत प्रतिकूल अशी भौगोलिक परिस्थिती होती.  ब्रिटीशांना तिथे सैन्य पाठवण्याची गरज कधीच पडली नसावी, त्यामुळे त्यांच्या काळात तिकडे दुर्लक्षच झालेले होते. सीमेपर्यंत पोचायला धड रस्तेसुध्दा बांधले गेले नव्हते. पं.नेहरूंच्या काळात राजकीय मंचावर “हिंदीचीनी भाईभाई” चा घोष चालला होता. साम्यवादी क्रांतीनंतर चिनी समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात तिथले राज्यकर्ते गुंतलेले होते. या खंडप्राय देशाच्या कान्याकोप-यापर्यंत क्रांतीचे लोण पोचवणे कर्मकठिण होते. या सर्व त-हेने विचार करता चीनच्या बाजूने भारतावर अकस्मात आक्रमण होऊ शकेल असे त्या काळात कुणालाही स्वप्नातदेखील वाटत नव्हते. या गाफीलपणाचाच फायदा घेऊन चीनने सन १९६२ मध्ये अचानकपणे हल्ला चढवला.

भारतीय जनतेच्या मनाला पहिल्या क्षणाला बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरताच त्याची जागा संतापाने घेतली. भाईभाई करत गळ्यात गळा घालताघालताच पाठीत खंजीर खुपसण्याच्या या विश्वासघातकी कृत्यामुळे चीन हा क्षणार्धात देशाचा शत्रू बनला. ज्या चिनी लोकांबद्दल कालपर्यंत कुतूहलमिश्रित कौतुक वाटत होते त्यांना दुष्ट, क्रूर, पाताळयंत्री, माणुसकीला काळिमा वगैरे विशेषणांची लाखोली वाहिली जाऊ लागली.  ब्रिटीशांच्या जमान्यातच कोलकात्याला येऊन स्थाइक झालेल्या चिनी लोकांनी तिथे एक चायना टाउन बनवले होते. पण तेवढा अपवाद सोडला तर भारतातल्या इतर शहरातल्या लोकांनी चिनी माणूस कधी पाहिला देखील नसावा.  मित्र म्हणूनही त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे तो एक अमूर्त असा शत्रू बनला. त्याचा निषेध तरी कसा करायचा? त्या काळात चीनबरोबर फारसा व्यापार होत नव्हता. त्यामुळे त्यावर बहिष्कार तरी कसा घालणार आणि चिनी वस्तूंची होळी पेटवण्यासाठी काय जाळणार? कागदावर माओ आणि चौ यांची चित्रे काढून आणि कापडांच्या बुजगावण्यावर त्यांची नांवे लिहून त्यांचे जागोजागी दहन करण्यात आले.

चिनी लोकांवर राग काढणे कठीण असल्याची कसर सरकारवर चिडून व्यक्त करण्यात आली. नेभळट, बावळट, पुळचट, अदूरदर्शी, मूर्ख वगैरे शेलक्या विशेषणांनी सरकारची संभावना करण्यात आली. त्या काळात देशापुढे काँग्रेसला आणि काँग्रेसपुढे पं.नेहरूजींना पर्यायच नव्हता. त्यांची जागा घेऊ शकणारे दुसरे कोणी नजरेसमोर नसल्यामुळे ते वाचले पण संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना जावे लागले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जागी केंद्र सरकारमध्ये बोलावून घेतले गेले. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धांवून गेला अशा शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले गेले. चीनने केलेल्या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी तांतडीने उपाययोजना करण्यात आल्या. सैन्याची कुमक आणि त्याला लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य, कपडेलत्ते, औषधपाणी वगैरेंची रसद सरहदीकडे रवाना करण्यात आली. पण सीमाभागातली दळणवळणाची साधने अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे ती तिथपर्यंत पोचण्यात अनंत अडचणी होत्या. त्यामुळे जेथपर्यंत रस्ते होते तेथपर्यंत जाऊन त्या ठिकाणची ठाणी मजबूत करणे एवढेच ताबडतोब करण्यासारखे होते.

दुर्गम भागातल्या या दळणवळणाच्या अडचणी चिनी सैन्यापुढेही होत्याच. पण त्यांनी कित्येक महिने आधीपासून गुपचुपपणे तयारी करून पुरेसा साठा त्यांच्या भागात करून ठेवला असणार. सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने सीमेवरील अनेक आघाड्यांवर एकदम हल्ला चढवला आणि मिळतील तेवढी छोटी छोटी भारतीय ठाणी उध्वस्त करीत ते धीमेधीमे पुढे चाल करीत राहिले. दोन्ही सैन्यांची अमोरसमोर येऊन हातघाईची लढाई अशी झालीच नाही. कांही दिवसांनी चिन्यांनी आपण होऊन युध्दविराम जाहीर केला. त्यांच्या सैन्यावर प्रतिहल्ला चढवून तिला सीमेपलीकडे हाकलून देण्याएवढी लष्करी शक्ती आपल्या सैन्याकडे त्या वेळेस नव्हती आणि भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्यामुळे असले धाडस करण्यात कांही अर्थ नव्हता. त्यामुळे झाली तेवढी मानहानी पत्करून ती लढाई तिथेच थांबवणे भाग पडले.

हळूहळू या युध्दाचे तपशील पुढे येत गेले. ज्या भागात चिनी सैन्याने चढाई केली होती तो सगळा अत्यंत विरळ लोकवस्ती असलेला जवळजवळ निर्जन असा प्रदेश होता. त्या दुर्गम भागाचा बाह्य जगाशी कसला संबंधच नव्हता. त्या भागात कशाचेच उत्पादन होत नव्हते, त्यामुळे तिथून कुठलाही माल बाहेर जात नव्हता की बाहेरचा माल विकत घेणारे कोणी ग्राहक तिथे रहात नव्हते. सीमेवरचा असा थोडासा ओसाड भाग जिंकून घेतल्याने चीनला त्याचा कांहीही आर्थिक फायदा झाला नाही की भारताच्या इतर भागांचे त्यामुळे कांही नुकसान झाले नाही. दोन्ही देशांतल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात त्यामुळे कांहीच फरक पडत नव्हता. चीनने घुसवलेले सैनिकसुध्दा अशा बर्फाच्छादित प्रदेशात अन्नपाण्यावाचून किती दिवस आणि कसे राहतील आणि अशा बिकट जागी नुसते बसून राहण्यासाठी किती काळ रसद पुरवता येईल या गोष्टींना मर्यादा येतातच. त्यामुळे कालांतराने तेही मायदेशी माघारी गेले. या लढाईत दोन्ही बाजूचे कित्येक लढवय्ये मारले गेले. हे भरून न येण्याजोगे नुकसान करून चीनने काय मिळवले हे एक अगम्य कोडे आहे. राजकारणाच्या पटावर त्याचा घसघशीत लाभ चीनला त्या काळात मिळाला असणार.

कागदावर काढलेल्या नकाशावर रेघा मारून सीमा दाखवणे सोपे असले तरी दुर्गम भागात प्रत्यक्षात त्या कोठे आहेत ते ठरवणेसुध्दा कठीण असते. ज्या ठिकाणी माणूस पोंचूच शकत नाही तिथला सर्व्हे करून, तिथे खुणा कशा करणार किंवा तिथे कुंपण कसे घालणार? “उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंचइंच लढवू” वगैरे आविर्भाव गाण्यात छान वाटतात. प्रत्यक्षात तो इंच कोठपासून मोजायचा तो बिंदूच सापडत नाही. खाजगी मालमत्तेमध्येसुध्दा जेवढ्या प्रदेशात माणसांचा वावर असतो तेथपर्यंतच तो मालक आपला मालकी हक्क बजावू शकतो. त्यापलीकडे असलेल्या ‘नो मॅन्स लँड’ मध्ये जेंव्हा तो स्वतः जाऊन राहू शकत नाही, त्या वेळी दुसरा कोणी तेथे येणार नाही तेवढे त्याला काळजीपूर्वकरीत्या पहात रहावे लागते. चीन आणि भारत यांच्या सीमा हिंदुस्थानचे ब्रिटीश सरकार आणि त्या काळात असलेले तिबेटचे राज्यकर्ते यांच्यात झालेल्या तहात ठरल्याप्रमाणे तयार केलेल्या नकाशाप्रमाणे ठरतात. कम्यूनिस्टांच्या क्रांतीनंतर चीनने अख्खा तिबेट आपला म्हणून गिळंकृत केला आणि अमेरिकेसकट बाकीचे जग काही करू शकले नाही. ब्रिटीश इंडियन गव्हर्नमेंट आणि तिबेट यांचेमधला करार मान्य करायला चीन तयार नव्हता. त्यामुळे सीमेवरचा कांही भाग दोन्ही देश आपापल्या नकाशात दाखवत. प्रत्यक्षात त्यातल्या कांही भागात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे कोणीच वस्ती करू शकत नाही.  तो अमक्याच्या ताब्यात आहे असे नक्की सांगता येणार नाही. तिकडे जाण्याचा रस्ता ज्याच्या नियंत्रणाखाली आहे त्याचाच त्या जागेवर ताबा आहे असे म्हणता येईल. अशा जागेवर जंगलचा कायदा चालतो असेसुध्दा म्हणता येणार नाही, कारण पहायला गेतो तर जिथे गवताचे पातेसुध्दा नसते, त्या भागात जंगली श्वापदे तरी कुठून येणार? त्या दुर्गम भागात नुसते उघडे बोडके खडक आहेत. त्यातल्या त्यात थोडे सौम्य हवामान असलेल्या मोक्याच्या जागी राहुट्या बांधून कांही सैनिकांच्या तुकड्या तिथे मुक्काम ठोकत आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत. शत्रूने देशाच्या आंतपर्यंत शिरू नये याची खबरदारी घेण्यासाठी हे मात्र जरूरीचे असते या गोष्टीकडे राज्यकर्त्यांनी त्या काळात विशेष लक्ष दिले नव्हते.

या सगळ्या गोष्टींची जाणीव हळूहळू होत गेली, सीमेवरील भागात रस्तेबांधणी आणि विकासाची कामे झाली, त्या भागातली गस्त वाढली आणि १९६२ च्या युध्दात झालेल्या मानहानीचे शल्य मनातून फिकट होत गेले, तसतशी चिनी लोकांबद्दल मनात बसलेली आढी सौम्य होत गेली. १९६५ नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात त्या युध्दाची आठवणदेखील असणार नाही. त्यामुळे या विषयावर ती अधिक मोकळेपणाने विचार करू शकते.

. .  .. . . . . . . . . .  (क्रमशः)

चीन, चिनी आणि चायनीज – १

दोन वर्षांपूर्वी बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवाचा अतिभव्य उद्घाटनसोहळा पहात असतांना नकळतच मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे मागे जात होते. आमच्या लहान गांवात पंजाबी किंवा तामिळ माणूससुध्दा पहायला मिळत नव्हता तिथे चिनीजपानी कोठून दिसणार? रात्रीची गस्त घालणारे एक दोन गुरखे होते, त्यांचे चेहेरे पाहून मंगोलियन वंशाच्या लोकांबद्दल थोडी कल्पना येत असे. गोष्टींच्या पुस्तकांमधल्या चिनी लोकांचे बसके चेहेरे, मिचमिचे डोळे, फुगीर गाल, नकटे नाक, डोक्यावरचा अंबाडा, विचित्र दाढीवर लोंबत्या मिशा, पायघोळ लोळणारे कमालीचे ढगळ कपडे वगैरेंनी बनलेले त्यांचे ‘ध्यान’ पाहून गंमत वाटत असे. त्यांची लिपी पाहून ते चित्र आहे की अक्षर याचा संभ्रम पडे, प्रत्येकी दहा बारा शेंड्या आणि शेपटे असलेले प्रत्येक अक्षर एक वेगळी कलाकृती वाटे आणि अशी किचकट अक्षरे काढून कांहीही लिहायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करवत नसे. कदाचित त्यामुळेच कागदावर कांही लिहिण्यापेक्षा त्याचा पतंग करून तो उडवणे अनेकांना अधिक आवडत असावे. ‘च्याओ, म्याव’ किंवा ‘लिंग, पिंग’ असली त्यांची नांवे वाचून ते पुरुषाचे असेल की बाईचे ते समजत नसे, अजूनही ते कळत नाहीच. कदाचित ते नाव त्यांच्या गांवाचे किंवा खाद्यपदार्थाचेदेखील असण्याची शक्यता असे.  कावळे-चिमण्या, उंदीर-मांजर, साप-विंचू असले कसलेही जीव ते सरसकटपणे जेवणात खातात हे ऐकल्यावरच कसेसे वाटून पोटात ढवळत असे. अशा या मुलखावेगळ्या चिनी लोकांच्याबद्दल मनात नेहमीच एक गूढ वाटत असे.

घरातल्या कपबशा ‘चिनी’ मातीच्या असत. त्यामुळे या पीतवर्णी लोकांच्या देशातली मातीसुध्दा पांढरी असते की काय असा प्रश्न पडे. पुढे भूगोल शिकतांना तिथेही सुपीक प्रदेश आहेत आणि त्यांवर चांगल्यापैकी भातशेती होते वगैरे वाचले. आपल्या भारताच्या अडीचपट क्षेत्रफळ असलेला हा देश अस्ताव्यस्त पसरलेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत तर तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण एवढ्या विस्तीर्ण भूभागावर राहणारी इतकी सारी माणसे एकच भाषा बोलतात याचे प्रचंड आश्चर्य वाटत असे. आपल्याकडे वीसबावीस वेगवेगळ्या भाषा आहेत आणि प्रत्येकीच्या दहाबारा तरी बोली बोलल्या जातात. आज शिक्षणाच्या प्रसारामुळे नागपूर, कोल्हापूर आणि डहाणूकडचे लोक एकच प्रमाण मराठी भाषा वेगवेगळे हेल काढून बोलतात, पण दर पंधरा कोसांवर भाषा बदलते अशी जुन्या काळातली समजूत होती. चिनीमध्येसुध्दा अशा असंख्य बोली असतील, पण एकच प्रमाण भाषा देशभरात सगळीकडे पसरवली गेली आणि इतक्या दूरवर पसरलेल्या कोट्यवधी लोकांनी ती निमुटपणे मान्य केली हे कौतुकाचे आहे.

भारताप्रमाणेच चीनलासुध्दा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे या साम्यामुळे एक प्रकारची आपुलकी वाटत असे. आपल्या गौतमबुध्दाच्या शिकवणुकीचा चीनमधील लोकांवर प्रभाव पडलेला आहे हे वाचतांना कॉलर ताठ होत असे. पण सर्वभक्षी चिनी लोकांनी अहिंसेचा उपदेश करणा-या गौतमबुध्दाचे कोणते विचार घेतले असतील ते कांही समजत नसे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे युरोपियन लोकांनी चीनच्या किनारपट्ट्यांवरचा थोडा मुलुख आपल्या ताब्यात घेऊन त्यांवर वसाहती बांधल्या होत्या आणि दुस-या महायुध्दाच्या काळात थोड्या दिवसांसाठी जपान्यांनी चीनचा बराच मोठा प्रदेश काबीज केला होता तेवढे अपवाद वगळता चीन हा देश नेहमी स्वतंत्रच राहिला. रेशमी वस्त्रे, कागद, सुरुंगाची दारू अशा अनेक वस्तू चीनने सर्वात आधी जगापुढे आणल्या असे सांगतात. चीनबद्दलची सर्वात अधिक प्रसिध्द असलेली गोष्ट म्हणजे चीनची हजारो मैल दूर पसरलेली ऐतिहासिक भिंत. डोंगर द-या पार करत जाणारी एवढी लांबलचक भिंत यांत्रिक साधने नसतांनाच्या काळात माणसांच्या श्रमातून उभी केली गेली आणि ती इतकी मजबूत आहे की शेकडो वर्षे ऊन, पाऊस, वारा सहन करून अजूनपर्यंत टिकून राहिली आहे. मला एकंदरीतच चीनबद्दल मोठे कुतूहल वाटत असे आणि त्या मानाने फारच थोडी माहिती मिळायची. त्यामुळे ” या बांबूच्या पडद्याआड दडलंय काय?” असा प्रश्न मनात रेंगाळत असे.

पंडित नेहरूंच्या परराष्ट्रधोरणात त्यांनी चीन या शेजारी देशाला खूप महत्व दिले होते. भारताला ब्रिटीशांकडून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्यामुळे वसाहतवादी पाश्चिमात्य देशांपासून त्याने अंतर बाळगणे साहजीकच होते. आकारमान, वैविध्य, नैसर्गिक रचना आणि त्यातून येणारी संकटे वगैरे अनेक बाबतीत भारत व चीन या दोन देशात बरेच साम्य असल्यामुळे त्यांना एकमेकांची मदत घेता येईल असा कयास त्यांनी बांधला असणार. या दोन्ही देशांतील लोकांनी इतिहासकाळात सुवर्णयुगे पाहिलेली असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन नव्या युगात चमत्कार घडवावा असे मनातले मांडे ते खात असावेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिळून ‘पंचशील’ या नांवाने कांहीतरी केले होते. तो एक करार होता की ती एक विचारसरणी होती ते त्या वेळी मला समजले नव्हते. पंडित नेहरूंना अभिप्रेत असलेला समाजवाद आणि माओचा साम्यवाद यातला फरक कळण्याचे माझे वय त्या काळी नव्हते. एकंदरीत ‘हिंदी चीनी भाई भाई’ ही घोषणा त्या काळात लोकप्रिय होती.

असे सुरळीत चालले असतांना काय झाले कोणास ठाऊक, चीनने भारतावर लष्करी आक्रमण केले असल्याची बातमी आली आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.

. .  .. . . . . . . . . .  (क्रमशः)