जन्मतारीख – भाग ५

अत्यंत दुर्मिळ असे वाटणारे कांही योगायोग आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असतांना नेहमी दिसतात व त्याचे नवल वाटते. पण संख्याशास्त्राच्या नियमांप्रमाणे मुळात ते तितकेसे दुर्मिळ नसतातच असे मी मागे एका शास्त्रीय स्वरूपाच्या लेखात त्यातल्या गणितासह दाखवले होते. या बाबतीत जन्मतारखांचे उदाहरण नेहमी दिले जाते. रोज जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या सर्वसाधारणपणे वर्षभर समानच असते असे गृहीत धरले तर आपला जन्मदिवस वर्षामधील ३६५ दिवसापैकी कधीही येऊ शकतो. म्हणजे एका विशिष्ट तारखेला तो येण्याची शक्यता ३६५ मध्ये १ इतकी कमी असते. चाळीस किंवा पन्नास माणसांचा समूह घेतला तरी त्यातील कुठल्या तरी एका माणसाची जन्मतारीख त्या विशिष्ट तारखेला येण्याची शक्यता ३६५ मध्ये ४०-५० किंवा सात आठमध्ये एक इतकीच येईल. पण अशा समूहातील कुठल्याही दोन माणसांची जन्मतारीख कुठल्या तरी एका दिवशी येण्याची शक्यता मात्र माणसांच्या संख्येबरोबर झपाट्याने वाढत जाते. तेवीस जणांमध्ये ती पन्नास टक्क्यावर जाते, चाळीस माणसात सुमारे ९० टक्के आणि पन्नास माणसात तर ९७ टक्के इतकी होते. त्यामुळेच एका वर्गातील विद्यार्थी, एका इमारतीमधील रहिवासी, लोकप्रिय नटनट्या वगैरे कोणताही पन्नासजणांचा समूह घेतल्यास त्यात एका तारखेला जन्मलेल्या दोन व्यक्ती हटकून सापडतात.

पन्नास लोकांच्या समूहात एका दिवशी जन्माला आलेल्या दोन व्यक्ती जरी निघत असल्या तरी त्या दोनमध्ये आपला समावेश होण्याची संभाव्यता कमीच असते. त्यामुळे आपल्या जन्मतारखेलाच जन्माला आलेल्या व्यक्ती बऱ्याच लोकांना कधी भेटतही नसतील. या बाबतीत मात्र मी फारच सुदैवी आहे असे म्हणावे लागेल. आधुनिक इतिहासात जगद्वंद्य ठरलेल्या विभूती हाताच्या बोटावरच मोजता येतील. त्यांच्यातल्या एका महापुरुषाच्या वाढदिवसालाच जन्म घेण्याचे भाग्य शेकडा एक दोन टक्के एवढ्यांनाच लाभत असेल. गांधीजयंतीच्या दिवशी जन्म घेऊन मला ते लाभले. पंडित नेहरूंच्यापासून मनमोहनसिंगांपर्यंत भारताचे पंधरा सोळा पंतप्रधान झाले असतील. त्यातल्या एकाचा, पं.लालबहादूर शास्त्री यांचा, जन्मदिवससुद्धा त्याच दिवशी येतो हा आणखी एक योगायोग. असे भाग्यसुद्धा चार पांच टक्क्यापेक्षा अधिक लोकांना मिळणार नाही.

माझे सख्खे, चुलत, आते, मामे, मावस वगैरे सगळे मिळून वीस पंचवीस बहीणभाऊ आहेत, ते देशभर वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. त्यातल्या फारच थोड्याजणांची जन्मतारीख मला माहीत आहे कारण आम्ही जेंव्हा कारणाकारणाने भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात वाढदिवस हा विषयच सहसा कधी निघत नाही. तरीसुद्धा एकदा कधीतरी हा विषय निघाला आणि चक्क माझ्या एका जवळच्या आप्ताची जन्मतारीखसुद्धा २ ऑक्टोबर आहे हे समजले. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलांच्या वयाची जी पंधरा वीस इतर मुले होती त्यातल्या गौरवचा वाढदिससुद्धा गांधीजयंतीलाच येत असे.

या सगळ्या लोकांची जन्मतारीख एक असली तरी ते वेगवेगळ्या वर्षी जन्मलेले होते. जुळी भावंडे सोडली तर एकाच दिवशी जन्माला आलेली दोन माणसे शाळेतच भेटली तर भेटली. त्यानंतर ती भेटण्याची शक्यता फारच कमी असते. असे असले तरी मी ज्या दिवशी जन्माला आलो नेमक्या त्याच दिवशी जन्म घेतलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीशी माझी ओळखच झाली एवढेच नव्हे तर घनिष्ठ संबंध जुळले. खरे तर आधी संबंध जुळले आणि त्यातून पुरेशी जवळीक निर्माण झाल्यानंतर हा योगायोग समजला. त्याचे नांवदेखील मोहन हेच होते. कदाचित त्याचा जन्म गांधीजयंतीला झाला हे त्याच्या मातापित्यांच्या लक्षात आले असेल म्हणून त्यांनी त्याचे नांव मोहनदास यावरून मोहन ठेवले असणार असे कोणालाही वाटेल. पण त्या कुटुंबातील लोकांची एकंदर विचारसरणी पाहता महात्मा गांधींच्या हयातीत, त्यातही भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात महात्माजींच्याबद्दल इतका आदरभाव त्यांच्या मनात वाटत असेल याची शक्यता मला कमीच दिसते.

अर्थातच आम्हा दोघांची जन्मतिथीसुद्धा एकच होती. मागे भारतीय आणि पाश्चात्य कालगणनापद्धतींचा तौलनिक अभ्यास करतांना माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती. ती म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये एकोणीस वर्षांचा कालावधी जवळजवळ तंतोतंत समान असतो. म्हणजे आजच्या तारखेला पंचांगात जी तिथी आहे तीच तिथी एकोणीस वर्षांपूर्वी याच तारखेला होती आणि एकोणीस वर्षांनंतर येणार आहे. हे गणिताने सिद्ध होत असले तरी ते पडताळून पाहण्यासाठी माझ्याकडे जुनी पंचांगे नव्हती. त्यामुळे मनाची खात्री होत नव्हती. त्यानंतर मी जेंव्हा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्यातल्या पहिल्याच प्रकरणात या माझ्या द़ष्टीने आगळ्या वेगळ्या ‘सत्याची’ प्रचीती आली. एकोणीस वर्षानंतर हा योग येतो म्हंटले तर दोन माणसांची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी जुळण्याची संभवनीयता सात हजारांत एक इतकी कमी आहे. तरीही मला अशा एका महान व्यक्तीची माहिती मिळाली आणि दुसरी अशी प्रत्यक्षात भेटली हा तर पांच कोटींमध्ये एक इतका दुर्मिळ योगायोग मानावा लागेल.

खरोखरच हा निव्वळ योगायोग होता की मला ठाऊक नसलेले एकादे कारण त्याच्या मागे आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो.

(समाप्त)

जन्मतारीख – भाग ४

माझ्या लहानपणी जन्मतारखेला जसे फारसे महत्व नव्हते, तसेच आमच्या जीवनात शुभेच्छांचा प्रवेशसुद्धा अजून झाला नव्हता. आम्ही संक्रांतीला आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना तिळगूळ देत असू आणि दसऱ्याला सोने. दिवाळीला तर एकमेकांच्या घरी जाऊन फराळ झोडणे हेच मुख्य काम असे. या सगळयांबरोबर आणि इतर वेळांसुद्धा वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांनी प्रेमाने थोपटून आशीर्वाद द्यायचे यातच सर्व शुभेच्छा, सदीच्छा वगैरे येत असत. लहान मुलाने मोठ्या माणसाकडे जाऊन त्याला “देव तुमचे भले करो” वगैरे म्हणणे हा तर फारच चोंबडेपणा झाला असता. आता काळ बदलला आहे. माझ्या नातवंडांच्या वयाची मुले मला नेहमी “हॅपी अमुक तमुक डे” असे ‘विश’ करतात आणि मी अत्यंत आनंदाने व कौतुकाने त्या सदीच्छांचा स्वीकार करतो.

आमच्या लहानशा गांवात दुसऱ्या कोणाला पत्र लिहून पाठवणारा माणूस वेडाच ठरला असता. त्याला अपवाद एकाद्या प्रेमवीराचा असेल; पण तोही एक प्रकारचा वेडाच झाला ना! परगांवाहून आलेली पत्रे टपालखाते इमाने इतबारे घरपोंच आणून देत असे. त्या काळांत दाराला टपालपेटी लावलेली नव्हती आणि मुळांत दरवाजाच दिवसभर उघडा असे. पोस्टमन त्यातून दहा पावले चालत आंत यायचा आणि सोप्यामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हांतात अदबीने पत्रे द्यायचा.

अमीन नांवाचा एकच वयस्कर पोस्टमन मी अगदी लहान असतांना वर्षानुवर्षे आमच्या घरी पत्रे द्यायला येत असल्यामुळे तो  घरच्यासारखाच झाला होता. तो कितव्या इयत्तेपर्यंत शाळा शिकला होता आणि त्याला कोणकोणत्या भाषा वाचता येत होत्या कुणास ठाऊक. त्याला पत्तादेखील वाचायची गरज वाटत नसे. फक्त नांव वाचल्यावर ती व्यक्ती कुठे राहते ते त्याला समजायचे. “मजमूँ भाप लेते हैं लिफाफा देखकर” असे हुषार माणसाबद्दल म्हणतात. या अमीनला सुद्धा पत्र हांतात देतादेताच त्यातल्या मजकुराची कल्पना येत असावी. एखादे लग्न ठरल्यासारखी गोड बातमी आणल्याबद्दल त्याचे तोंड गोड केले जायचेच. क्वचित प्रसंगी वडिलपणाच्या अधिकाराने तो दोन शब्द बोलून धीरसुद्धा देत असे. पण त्याने आणलेल्या पत्रात कधीसुद्धा एकादे ग्रीटिंग कार्ड पाहिल्याचे मात्र मला आठवत नाही. त्या काळात ग्रीटिंग कार्ड पाठवायची प्रथा अजून सुरू झालीच नव्हती.

आमचा पोस्टमन कितीही कर्तव्यदक्ष असला तरी त्या काळांतली दळणवळणाची साधने फारच तुटपुंजी होती. त्यातही वादळवारे, पाऊसपाणी यांमुळे व्यत्यय येत असे. त्यामुळे एका गांवाहून दुसऱ्या गांवी पत्र कधी जाऊन पोंचेल याचा नेम नव्हता. तांतडीचा संदेश पाठवण्यासाठी तारेची सोय होती. त्यासाठी येणारा खर्च त्यातील शब्दांच्या संख्येप्रमाणे वाढत असल्यामुळे तार पाठवण्यासाठी एक संक्षिप्त भाषा प्रचारात आली होती. त्यात अव्यये व विशेषणे तर नसतच, कधीकधी क्रियापददेखील गाळले जात असे. बहुतेक तारांमध्ये “अमका गंभीर” नाही तर “तमका दिवंगत” आणि “ताबडतोब निघा” अशाच प्रकारचे संदेश असल्यामुळे तार वाटणाऱ्या पोस्टमनची सायकल कोणाच्या दाराशी उभी राहिलेली दिसली की गल्लीत कुजबुज किंवा रडारड सुरू होत असे. तो कोणाच्या घरी पाणी प्यायला गेला असला तरी तो बाहेर पडलेला दिसतांच सांत्वन करण्याच्या उद्देशाने तिथे गेलेले लोक “या यमदूतापासून चार हांत दूर रहा” असा सल्ला त्या घरातल्या लोकांना देत असत. क्वचित कधीतरी परगांवी कोणाच्या घरी झालेल्या अपत्यजन्माची शुभवार्ता येई आणि तिथली मंडळी उत्साहाने बाळंतविडा तयार कराच्या कामाला लागत. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर पडणाऱ्या मुलांना त्यांच्या माता पोटाशी कवटाळून निरोप देतांनाच “पोचल्याची तार कर” असे सांगत, त्यामुळे “सुखरूप पोंचलो” अशा मजकुराच्या तारा येऊ लागल्या आणि तारेबद्दल मनात वाटणारी धास्ती कमी झाली.

हे ठराविक मजकुरांचे संदेश कडकट्ट करीत पाठवणाऱ्या लोकांना त्याचा कंटाळा आला असावा किंवा त्यांना पुरेसे काम नाही असे त्यांच्या अधिकाऱ्यांना वाटले असावे, यातल्या कोठल्याशा कारणाने तारेमधून शुभेच्छासंदेश पाठवण्याची योजना सुरू झाली. परीक्षेतील यश, नोकरी वा बढती मिळणे, विवाह, अपत्यप्राप्ती अशा घटना आणि दिवाळी, ईद, ख्रिसमस वगैरेनिमित्त पाठवायचे पंधरा वीस संदेश लिहून त्याला क्रमांक दिले गेले आणि आपण फक्त तो क्रमांक लिहिला की तो वाक्य लिहिलेली तार पलीकडच्या माणसाला मिळत असे. पोस्टऑफीसात वर्षानुवर्षे धूळ खात पडून मळकट झालेल्या पांढऱ्या कागदाऐवजी फुलापानांची चित्रे असलेल्या आकर्षक रंगीबेरंगी कागदावर हा बधाईसंदेश दिला जात असे. या नाविन्यामुळे म्हणा किंवा एका शब्दाच्या खर्चात अख्खे वाक्य पाठवण्याचे समाधान मिळत असल्यामुळे म्हणा, हे संदेश बरेच लोकप्रिय झाले. त्यांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करणारा संदेशसुद्धा असावा, पण मला तो मिळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. ज्या काळात तारांद्वारे संदेश पाठवणे सुरू झाले तेंव्हा कोणालाच माझी जन्मतारीख माहीत नव्हती आणि जेंव्हा तिला महत्व आले तोपर्यंत तार पाठवणेच कालबाह्य झालेले होते.

टेलीफोन या शब्दाला दिलेला ‘दूरध्वनी’ हा मराठी प्रतिशब्द जरी ‘तार’ या शब्दाप्रमाणे बोलीभाषेत रूढ झाला नाही तरी संदेशवहनाचे हे माध्यम मात्र तारेपेक्षा सहस्रावधीपटीने अधिक लोकप्रिय झाले. संदेश पाठवून त्याचे उत्तर येण्याची वाट पहात बसण्यापेक्षा परस्पर संवाद साधणे कितीतरी चांगले असते आणि तेही घरबसल्या होत असेल फारच उत्तम! त्यामुळे टेलीफोनचा विकास आणि प्रसार झपाट्याने झाला. माझ्या संपूर्ण आयुष्यात जेवढ्या तारा मला मिळाल्या असतील किंवा मी पाठवल्या असतील त्यापेक्षा अधिक वेळा हल्ली रोजच फोनवर बोलणे होते. त्यात घरी कोणाचा जन्मदिवस असेल तर विचारायलाच लको. कधीकधी एका हांतात एक रिसीव्हर आणि दुसऱ्या हांतात सेलफोन घेऊन एकदम दोघादोघांशीसुद्धा कधीकधी बोलावे लागते. एकदा माझ्या जन्मतारखेला मी पुण्यात होतो. तरीही अनेक लोकांनी माझ्या ‘जेथे जातो तेथे सांगाती’ येणाऱ्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर कांही लोकांनी प्रयत्नपूर्वक पुण्याचा लँडलाइन नंबर मिळवला. उरलेल्या लोकांचे ध्वनिमुद्रित केलेले संदेश आन्सरिंग मशीनवर दुसरे दिवशी मुंबईला गेल्यावर ऐकायला मिळाले. म्हणजे एकूण एकच!

घरातल्या संगणकाचे बोट धरून आपला आंतर्जालावर प्रवेश झाला आणि संदेशवहनाचे एक आगळेच दालन उघडले. टेलीफोनची सुविधा सुलभ झाल्यानंतर टपालाने पत्रे पाठवणे कमीच झाले होते. नव्या पिढीच्या मुलांना तर पत्रलेखनाची कलाच फारशी अवगत झाली नसेल. पण ईमेल सुरू होताच कधीही पत्र न पाठवणारेसुद्धा उत्साहाने चिठ्ठ्या खरडू लागले. चॅटिंगबरोबर त्यासाठी वेगळी भाषाच तयार झाली. यात व्याकरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून शब्दांमधील अक्षरेसुद्धा गाळून फक्त आद्याक्षरांचा उपयोग होतो. कुठे अक्षरांऐवजी अंक वापरले जातात आणि विरामचिन्हांचा भरपूर वापर होतो. आधी विरामचिन्हांमधून राग, प्रेम, हंसू वगैरे सूचित केले जाई, आतां हंसरे, रडके, रुसलेले, खदखदणारे चेहेरेसुद्धा दाखवले जातात. या सर्वांबरोबर शुभेच्छापत्रांची एक लाटच आली आहे. चित्रमय कार्डांपासून त्याची सुरुवात झाली. नंतर ती चित्रे हलू लागली व बोलूसुद्धा लागली. शब्द, चित्रे आणि स्वर यंच्या मिश्रणातून अफलातून संदेश पाठवले जातात. त्यातसुद्धा मुलांसाठी, मित्रमैत्रिणीसाठी, आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुभसंदेश त्यांच्या जन्मतारखेला पाठवले जाऊ लागले आहेत. माझ्याकडील एका संदेशात तर मुलाने आईला व सुनेने सासूला एकत्र शुभचिंतन केले आहे.

. .  . . . . . . . . . (क्रमशः)

 —–> पुढील भाग ५

जन्मतारीख – भाग ३

मी एकदा गणेशोत्सवासाठी पुण्याला गेलो होतो, पण तो संपल्यानंतर माझा वाढदिवसही तिथेच साजरा करून मुंबईला परतायचा आग्रह माझ्या मुलाने धरला म्हणून तिथला मुक्काम आणखी वाढवला. वाढदिवस कसा साजरा करायचा यावर चर्चा सुरू झाली. त्या दिवशी सर्वांनी महाबळेश्वरला जाऊन येण्याचा एक प्रस्ताव समोर आला तसेच त्या दिवशी शिरडीचा जाऊन यायचा दुसरा. महाबळेश्वरला किंवा कोठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेल्यास तिथल्या रम्य निसर्गाची सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलत जाणारी रूपे पाहून घ्यायला हवीत, तिथली अंगात शिरशिरी आणणारी रात्रीची थंडी अनुभवायला पाहिजे तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा उबदारपणा जाणून घ्यायला हवा, शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यायला पाहिजे तसेच निसर्गाचे संगीत कानात साठवून घ्यायला हवे. हे सगळे करण्यासाठी पुरेसा निवांत वेळ द्यावा लागतो. धांवत पळत कसेबसे तिथे जाऊन पोचायचे आणि भोज्ज्याला शिवल्यागत करून घाईघाईने परत फिरायचे याला माझ्या लेखी कांही अर्थ नाही. शिरडीला हल्ली भक्तवर्गाची भरपूर गर्दी असते म्हणतात. त्यात सुटीच्या दिवशी तर विचारायलाच नको. तिथेही धांवतपळत जाऊन उभ्या उभ्या दर्शन घेऊन लगेच परत फिरावे लागले असते. मला साईनाथापुढे कसले गाऱ्हाणे मांडायचे नव्हते की मागणे मागायचे नव्हते. त्यापेक्षा “मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।। ” असे म्हणणे मला अधिक श्रेयस्कर वाटते.

अशा कारणांमुळे मी दोन्ही प्रस्तावांना संमती दिली नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय करायचे ते ठरवण्याचा माझा हक्क इतरांना मान्य करावाच लागला. पुण्याच्या वेशीच्या अगदी आंतबाहेरच कांही निसर्गरम्य विश्रांतीस्थाने (रिसॉर्ट्स) बांधली गेली आहेत असे ऐकले होते. त्यातल्याच एकाद्या जागी जावे, दिसतील तेवढ्या वृक्षवल्ली पहाव्यात, सोयरी वनचरे दिसण्याची शक्यता कमीच होती पण पक्ष्यांच्या सुस्वर गायनाचा नाद ऐकून घ्यावा आणि एक दिवस शांत आणि प्रसन्न वातावरणात घालवावा असा प्रस्ताव मी मांडला आणि सर्वानुमते तो संमत झाला.

दोन ऑक्टोबरचा दिवस उजाडल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्या दृष्टीने कोणीही कसलीही हालचाल करतांना दिसला नाही. “ऑफिस आणि शाळांच्या वेळा सांभाळायची दगदग तर रोजचीच असते, सुटीच्या दिवशी तरी त्यातून सुटका नको कां?” अशा विचाराने घरातले सगळे लोक उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडून राहिले. शिवाय “सुटीच्या दिवशी लवकर उठायची घाई नाही” म्हणून आदल्या रात्री सिनेमे वगैरे पहात जरा जास्तच जागरण झाले होते आणि जास्त वेळ झोपून राहण्यासाठी एक भूमिकासुद्धा तयार झाली होती. एकेकजण उठल्यानंतर त्यांची नित्याची कामेसुद्धा संथपणे चालली होती. घरकाम करणाऱ्या बाईला याची पूर्वकल्पना असावी किंवा तिच्या घरीसुद्धा संथगतीची चळवळ (गो स्लो) सुरू असावी. माध्यान्ह होऊन गेल्यानंतर ती उगवली. ज्या वाहनचालकाच्या भरंवशावर आमचे इकडे तिकडे जाण्याचे विचार चालले होते तो तर अजीबात उगवलाच नाही. त्याने सार्वत्रिक सुटीचा लाभ घेतला असावा. वेळेअभावी रेंगाळत ठेवलेली घरातली कांही फुटकळ कामे कोणाला आठवली तसेच कांही अत्यावश्यक पण खास वस्तूंची खरेदी करायला तोच दिवस सोय़िस्कर होता. एरवी रविवारी दुकाने बंद असतात आणि इतर दिवशी ऑफीस असते यामुळे ती खरेदी करायची राहून जात होती. माझ्याप्रमाणेच माझ्या मुलालाही पितृपक्षाचे वावडे नसल्यामुळे खरेदी करण्याची ही सोयिस्कर संधी त्याने सोडली नाही.

महात्मा गांधीजींच्या जन्मदिवशी त्यांनी सांगितलेली शिकवण थोडी तरी पाळायला हवी. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी शहाण्यासारखे वागायचे असे संस्कार माझ्या आईने लहानपणीच मनावर केले होते. कुठेतरी जाऊन आराम करण्यासाठी आधी घरी घाईगर्दी करायला कोणाला सांगणे तसे योग्य नव्हतेच. त्यामुळे मी आपले कान, डोळे आणि मुख्य म्हणजे तोंड बंद ठेऊन जे जे होईल ते ते स्वस्थपणे पहात राहिलो. वेळ जाण्यासाठी मांडीवरल्याला (लॅपटॉपला) अंजारत गोंजारत गांधीजयंतीवर एक लेख लिहून काढला आणि तो ब्लॉगवर चढवून दिला.

अखेर सगळी कामे संपवून आणि सगळ्यांनी ‘तयार’ होऊन घराबाहेर पडेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. यानंतर त्या रिसॉर्टपर्यंत पोचल्यानंतर काळोखात कुठल्या वृक्षवल्ली दिसणार होत्या? त्या रम्य आणि वन्य जागी रात्री खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते की नाही ते नक्की माहीत नव्हते. त्याऐवजी थोडा वेळ इकडे तिकडे एखाद्या बागबगीचात फिरून जेवायला चांगल्या हॉटेलात जाण्यावर विचार झाला. पण माझी पुण्याबद्दलची माहिती चाळीस वर्षांपूर्वीची होती. कॉलेजला असतांना आम्ही ज्या उपाहारगृहांना आवडीने भेट देत होतो त्यातली डेक्कन जिमखान्यावरील ‘पूनम’ आणि ‘पूना कॉफी हाउस’, टिळक रस्त्यावरील ‘जीवन’, शनीपाराजवळील ‘स्वीट होम ‘ अशी कांही नांवे अजून स्मरणात असली तरी आतापर्यंत ती हॉटेले टिकून आहेत की काळाच्या किंवा एकाद्या मॉलच्या उदरांत गडप झाली आहेत ते माहीत नव्हते. आजही ती चालत असली तरी त्यांचे आजचे रूप कसे असेल ते सांगता येत नव्हते. पुण्यात नव्यानेच स्थाईक झालेल्या माझ्या मुलाच्या कानांवर तरी ती नांवे पडली होती की नाही याची शंका होती. गेल्या चार दशकांच्या काळात तिथे कितीतरी नवी खाद्यालये उघडली आणि नांवारूपाला आली असली तरी माझा मुलगा मुख्य गांवापासून दूर वानवडीला रहात असल्यामुळे त्याला याबद्दल अद्ययावत माहिती नव्हतीच. त्यातून पुण्याला आल्यावर पहिल्याच आठवड्यात आम्ही एका नव्या उपाहारगृहात जाऊन स्पॅघेटी, मॅकरोनी, सिझलर वगैरेंच्या हिंदुस्थानी आवृत्या खाऊन आलो होतो. त्यानंतर गणेशोत्सवात डेक्कन जिमखान्यावरील श्रेयस हॉलमध्ये मराठी जेवणाचा महोत्सव चालला होता. त्याला भेट देऊन तळकोकणापासून महाविदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खास खाद्यपदार्थांचा समाचार घेऊन आलो होतो. त्यामुळे आता आणखी वेगळा कोणता प्रकार चाखून पहावा असा प्रश्न पडला. अखेरीस एका राजस्थानी पद्धतीच्या आधुनिक रिसॉर्टला भेट देण्याचे निश्चित झाले. त्याचे नांव होते “चोखी ढाणी.”

चोखी ढाणीला दिलेल्या भेटीमध्ये मात्र सगळ्यांनाच खूप मजा आली आणि अखेरीला मारवाडी राजस्थानी प्रकारची भरपेट मेजवानीही मिळाली. माझा हा एक वाढदिवस जन्मभर लक्षात राहण्यासारखा साजरा झाला.

.  . . . . . . . . . . . (क्रमशः)

   ———- > पुढील भाग ४

जन्मतारीख – भाग २

शालांत परीक्षा पास झाल्यानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र शाळेकडून मिळाले. त्यात माझे जन्मस्थान आणि जन्मतारीख या दोन्हींची नोंद होती. जन्मतारीख वाचल्यावर मी तर टाणकन उडालो. दोन ऑक्टोबर ! म्हणजे गांधीजयंती ! इतके दिवस मला हे कुणीच कसे सांगितले नाही? माझ्या जन्माच्या आधीच गांधीजी महात्मा झाले असले तरी पारतंत्राच्या त्या काळात त्यांच्या जन्मतारखेला कदाचित इतके महात्म्य आले नसेल. त्या दिवशी सुटी असणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे कदाचित त्या वेळेस ते कोणाच्या ध्यानात आलेही नसेल किंवा नंतर घरात कधी जन्मतारखेचा विषयच न निघाल्याने हा योगायोग सगळे विसरून गेले असतील. वाढदिवसासाठी तिथीलाच महत्व असल्याकारणाने “आपली दुर्गी अष्टमीची” किंवा “पांडोबा आषाढी एकादशीचे” असल्या गोष्टींचा बोलण्यात उल्लेख होत असे, पण जन्मतारखेच्या बाबतीत तसे होत नसे.

दर वर्षी दोन ऑक्टोबरला आमच्या शाळेला सुटी तर असायचीच, शिवाय सूतकताई, सभा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे गोष्टी शाळेत होत असत. त्यात गांधीजींच्या जीवनातल्या विविध प्रसंगावरील नाटुकल्या होत, निबंध किंवा वक्तृत्वाच्या स्पर्धा ठेवल्या जात, “ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती । तारकांच्या सुमनमाला देव त्यांना अर्पिताती ।।” यासारख्या कविता आणि “सुनो सुनो ऐ दुनियावालों बापूजीकी अमर कहानी” यासारखी गाणी म्हंटली जात असत. त्याच दिवशी माझीसुद्धा ‘जयंती’ आहे हे सांगून मला केवढा भाव मिळवता आला असता ! पण आता त्याचा काय उपयोग?

शाळेत असेपर्यंत मी हॉटेलची पायरीसुद्धा चढलेली नसली तरी हॉस्टेलमध्ये गेल्यावर तीन्ही त्रिकाळच्या खाण्यासाठी मेसवरच विसंबून होतो. तिथला आचारी कुणाकुणाच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार? शिवाय हाताशी पंचांगच नसल्यामुळे आपली जन्मतिथी कधी येऊन गेली तेसुद्धा कळायला मार्ग नव्हता. माझी जन्मतारीख मला आता समजली होती, पण त्याचा एवढा उपयोग नव्हता. तारखेनुसार वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात अजून अंगात मुरला नव्हता. माझ्या मित्रमंडळातली सगळीच मुले लहान गांवांतून आलेली होती. त्यांच्या घरी खायलाप्यायला मुबलक मिळत असले, त्यात कसली ददात नसली तरी शहरातल्या खर्चासाठी पैसे उचलून देण्यात अडचणी होत्या. त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी मिळवता मिळवताच नाकी नऊ येत असत. चार मित्रांना सोबत घेऊन त्यांना सिनेमा दाखवणे किंवा आईस्क्रीमची ट्रीट देणे हा चैनीचा किंवा उधळपट्टीचा अगदी कळस झाला असता. अशा परिस्थितीत कोणीही ‘बर्थडे पार्टी ‘ कुठून देणार? तोपर्यंत तसा रिवाजच पडला नव्हता. त्यामुळे फार फार तर एकाद्या जवळच्या मित्राला बरोबर घेऊन माफक मौजमजा करण्यापर्यंतच मजल जात होती.

मी मुंबईला बिऱ्हाड थाटल्यानंतर मुलांचे वाढदिवस मात्र तारखेप्रमाणेच आणि हौसेने साजरे करायला सुरुवात झाली. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे रंगीबेरंगी पताका भिंतीवर लावणे, फुगे फुगवून टांगणे वगैरे करून दिवाणखाना सजवला जायचा. केकवर मेणबत्त्या लावणे, सगळ्यांनी कोंडाळे करून ‘हॅपी बर्थडे’चे गाणे म्हणणे, मेणबत्त्यांवर फुंकर घालून केक कापणे इत्यादी सगळे सोपस्कार सुरू झाले. बिल्डिंगमधली आणि जवळपास राहणारी बच्चेमंडळी यायची. त्यांच्यासाठी खेळ, कोडी वगैरे तयार करायची, नाच व गाणी व्हायची. त्यानिमित्त्याने लहान मुलांच्या घोळक्यात आम्हीसुद्धा समरस होऊन नाचून घेत असू.

वीस पंचवीस वर्षाच्या काळात पुन्हा एकदा पिढी बदलली असली तरी वाढदिवसाचे हे स्वरूप जवळ जवळ तसेच राहिले आहे. त्यातील तपशीलात मात्र बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या काळी लहान घर असले आणि त्यात जास्त माणसे रहात असली तरी आम्ही मुलांचे वाढदिवस घरातल्या पुढच्या खोलीतच दाटीवाटी करून साजरा करीत असू. वेफर्स किंवा काजूसारखे अपवाद सोडल्यास खाण्यापिण्याचे बहुतेक पदार्थ घरीच तयार होत असत. अगदी केकसुद्धा घरीच भाजला जाई आणि त्यावरील आईसिंगचे नक्षीकाम करण्यात खूप गंमत वाटत असे. मॉँजिनीजच्या शाखा उघडल्यानंतर तिथून केक यायला लागला. बंगाली संदेश, पंजाबी सामोसे, ओव्हनमधले पॅटिस वगैरे गोष्टी बाहेरून मागवल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा या प्रसंगाच्या निमित्याने चार लोकांनी आपल्या घरी यावे आणि त्यांनी आपल्या हातचे कांही ना कांही खावे अशी एक सुप्त भावना मनात असायची. आता ती भावना लुप्त होत चालली आहे. घरात प्रशस्त दिवाणखाना असला आणि कमी माणसे रहात असली तरी बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे भिंतीला डाग पाडू नयेत, मुलांनी पडद्यांना हात पुसू नयेत आणि एकंदरीतच घरात पसारा होऊ नये म्हणून आजकाल बरेच लोक बाहेरचा हॉल भाड्याने घेतात. खाण्यापिण्याच्या वस्तू परस्पर तिथेच मागवतात आणि घरातली मंडळी देखील पाहुण्यांप्रमाणे सजूनधजून तिकडे जातात. तिथल्या गर्दीत बोलणे बसणे होतच नाही. कधीकधी तर आलेल्या गिफ्टवरचे लेबल पाहून ती व्यक्ती येऊन गेल्याचे उशीराने लक्षात येते.

आमचे स्वतःचे वाढदिवस मात्र कधी घरीच गोडधोड खाऊन तर कधी बाहेर खायला जाऊन आम्ही साजरे करीत असू. हळूहळू घरी कांही खाद्यपदार्थ बनवणे कमी होत गेले आणि जेवणासाठी बाहेर जाण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यातसुद्धा सुरुवातीच्या काळातल्या डोसा-उत्तप्पाच्या ऐवजी छोले भटूरे, पनीर टिक्का मसाला किंवा बर्गर-पीझ्झा किंवा नूडल्स-मांचूरिया वगैरे करीत सिझलर्स, पिट्टा वगैरेसारखे पदार्थ येत गेले. अलीकडच्या काळात वयोमानानुसार खाण्यापिण्यावर बंधने पडत गेली आणि स्वतः खाण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा इतरांना चवीने मनसोक्त खातांना त्यांच्या चेहेऱ्यावर फुललेला आनंद पाहतांना अधिक मजा वाटू लागली आहे.

.  . . . . . . . . . . . . . . . ..  (क्रमशः)

  ————-> पुढील भाग ३

जन्मतारीख – भाग १

लहानपणचा वाढदिवस

आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात असे दिसते. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या श आणि र चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या “सोळा जूनला माझा बड्डे आहे.” असे सांगायच्या. ‘सोळा’ ही एक ‘संख्या’ आहे आणि ‘जून’ हे एका ‘महिन्या’चे नांव आहे एवढेसुध्दा कळण्याइतकी समज त्यांना तेंव्हा आलेली नव्हती, कारण संख्या किंवा महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसाव्यात, पण ‘बड्डे’ म्हणजे ‘धमाल’ एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्यामुळे ते नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटत असे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे वाढदिवस ‘मनवत’ असत.

मला मात्र शाळेतून बाहेर पडेपर्यंत माझी जन्मतारीख माहीत सुध्दा नव्हती. सर्व प्रसिध्द लोकांना असते तशी मलासुद्धा एक जन्मतारीख असायला हवी अशी अनामिक जाणीव मला दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर झाली होती, पण ती तारीख नेमकी कोणती आहे हे मात्र कळले नव्हते. माझ्याच जन्मतारखेचे कांही गूढ होते अशातला भाग नाही, कारण त्या काळात घरातल्या कुणालाच कुणाचीच जन्मतारीख माहीत नव्हती. किंबहुना त्या काळात जन्मतारीख या विषयाचा बोलण्यात कधी उल्लेखच होत नसे. मोठ्या माणसांची वाढ होणेच थांबलेले असेल तर त्यांचा वाढदिवस कसला करायचा? लहान मुलांचे वाढदिवस तिथीनुसार येत. पण ते ‘साजरे’ केले जात असे म्हणणे आजच्या काळात धार्ष्ट्याचे होईल कारण त्या दिवशी घरात कसलाही समारंभ, गडबड, गोंधळ वा गोंगाट होत नसे.

तरीसुद्धा मला माझा वाढदिवस येण्याची खूप आतुरता वाटत असे. गणपतीचा उत्सव झाला की मला पक्षपंधरवड्याचे वेध लागत असत. हे दिवस मला कधीच ‘अशुभ’ वाटले नाहीत. मोठा झाल्यानंतरसुध्दा घरातल्या कित्येक वस्तू मी याच काळात विकत आणल्या आणि माझ्यासारख्याच त्यासुद्धा बऱ्यापैकी अनेक वर्षे चालल्या ! जन्मतिथीच्या एक दोन दिवस आधी ट्रंकेतले नवे कोरे कपडे काढून त्यातले कोणते कपडे त्या दिवशी घालायचे ते ठरवायचे. एकत्र कुटुंबांमधील घरातल्या सगळ्या मुलांसाठी ऊठसूट नवे कपडे त्या काळात शिवले जात नव्हते. पुण्यामुंबईकडे रेडीमेड कपडे विकत मिळतात असे नुसते ऐकले होते. आमच्या गांवात ड्रेसेसचे दुकान अजून उघडले गेले नव्हते. एकेका मुलासाठी वेगळ्याने तऱ्हेतऱ्हेचे कपडे शिवणे तर कल्पनेच्या पलीकडे होते. घरातल्या सरसकट सगळ्यांसाठी नवे कपडे शिवून आणल्यावर ते ट्रंकेत भरून ठेवले जात. सणवार, लग्नकार्य अशा प्रसंगी कांही वेळा घालून झाल्यानंतर यथावकाश गरजेनुसार ते रोजच्या वापरात येत असत. वाढदिवस हा खास माझा असल्यामुळे त्यासाठी फक्त माझे नवे कपडे ट्रंकेतून बाहेर निघत, याचे अप्रूप वाटायचे.

वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दिवाळीप्रमाणे अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करायचे, कोरे कपडे अंगावर चढवायचे, कोणाच्या तरी मुंजीत घरी आलेली एकादी जरीची टोपी डोक्यावर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पाटावर बसायचे. औक्षण वगैरे करून झाल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचे. मोठी माणसे “मोठा हो, शहाणा हो, उदंड आयुष्यवंता हो.” असे तोंडभर आशीर्वाद देत आणि मोठी भावंडे या निमित्याने पाठीत धपाटा घालून घेत. पण या दिवशी त्यावरून मारामारी करायची नाही, चिडायचे नाही, रडायचे नाही, हट्ट किंवा आक्रस्ताळेपणा करायचा नाही, शहाण्यासारखे चांगले वागायचे वगैरे ठरलेले असे.

सुसंस्कृत लोकांना बायकांमुलांसह एकत्र बसून जिथे खातापिता येईल अशा प्रकारचे हॉटेल आमच्या लहान गांवात अजून उघडलेले नव्हते. गरजू व शौकीन लोकांना चहा, चिवडा, भजी वा मिसळ वगैरे पुरवणाऱ्या ज्या जागा होत्या तिथे फक्त उडाणटप्पू लोक वात्रटपणा करण्यासाठी जातात अशी आमची पक्की समजूत करून दिलेली असल्यामुळे मी लहानपणी कधीही तिथे पाऊलदेखील टाकले नव्हते. त्यामुळे आमचे खाद्यजीवन घरी तयार होत असलेल्या खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित होते. कांही विशिष्ट बाबतीत ते आजच्यापेक्षा अधिक समृद्ध असले तरी त्याचा एकंदरीत आवाका लहान वयाला साजेसाच असायचा. त्या काळात ज्या मुलाचा वाढदिवस असे त्याच्या आवडीचे शक्य तितके पदार्थ जेवणात असत. जेवणात पंक्तीप्रपंच आणि मर्यादा नसल्याने ते सर्वांसाठी पोटभरच असत. वाढदिवस ज्याचा असेल त्याला अधिक आग्रहाने खाऊ घातले जाई एवढेच.

पण हे सगळे घरातल्या घरातच होत असे. त्या दिवशी बाहेरच्या इतर कुणाला आमंत्रण वगैरे दिले जात नसे. त्यामुळे भेटवस्तू देणे घेणे वगैरे प्रकार नव्हतेच. दिवसभर घराचे दरवाजे उघडेच असल्याने या ना त्या निमित्याने कोणी ना कोणी येत असे. त्यांना त्या दिवशी बनवलेल्या खास पदार्थाचा वाटा अनायास मिळून जात असे. इतर लोकांना या वाढदिवसाची खबरबात समजणे जवळजवळ अशक्य होते. तरीसुद्धा आपला वाढदिवस हा ‘खास आपला’ असा इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस आहे या विचाराने तो हवाहवासा वाटेच!

. . . . . . . . . . . . . . .  .(क्रमशः)

———- > पुढील भाग २

योगायोग की भाग्य?

एकदा दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच “भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला.” अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले तसेच स्वतःचाच थोडा रागही आला. पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून “हॅपी बर्थडे टू यू” म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्याचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला. शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शाळेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती! मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली. लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नव-याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल? आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही. पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली. खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्याच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते. मीच लिहिलेल्या दुस-या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे ‘सत्याचे प्रयोग’!