
संपादन दि.२१-०७-२०२० – नागपंचमीची गाणी हा वेगळा लेख या लेखात समाविष्ट केला.
जीवशास्त्राच्या (बायॉलॉजीच्या) अभ्यासातून असे दिसते की नाग हा एक थंड रक्ताचा आणि सरपटणारा प्राणी आहे. त्याला हात, पाय, सोंड, शिंगे वगैरे बाह्य अवयव नसतात. दोन दात असले तरी त्यांचा उपयोग अन्नाच्या चर्वणासाठी होत नाही. उंदीर, बेडूक यासारखे लहान प्राणी आणि पक्षी, त्यांची अंडी वगैरे तो न चावताच गिळतो. अजगराचा अपवाद सोडल्यास कोणताच साप माणसाला गिळू शकत नसल्यामुळे माणूस हे नागाचे भक्ष्य असत नाही आणि काहीही खाऊ शकणारे चिनी सोडल्यास इतर माणसेही, विशेषतः भारतीय लोक नागाला खायचा विचारही करत नाहीत. त्यामुळे नाग आणि मनुष्य हे एकमेकांचे नैसर्गिक शत्रू नाहीत. नाग कधीही आपण होऊन माणसाच्या वाटेला जात नाहीत. पण स्वसंरक्षणासाठी नागाकडे अत्यंत जालिम असे विष असते. त्याच्यावर कोणी हल्ला करीत आहे असे त्याला वाटल्यास नाग त्या प्राण्याला दंश करतो आणि बहुधा तो प्राणी मरून जातो. या कारणामुळे माणसे त्याला घाबरून असतात आणि नागाला पाहताच शक्य असल्यास त्याला मारून टाकायचा प्रयत्न करतात. माणसाला नागापासून प्रत्यक्ष कोणताही लाभही मिळत नाही. उपद्रवकारी उंदरांना खाऊन त्यांची संख्या कमी करण्याची मदत तो अप्रत्यक्षरीत्या करत असतो. स्वतः जमीन खणण्याचे कसलेही (नखे, शिंग यासारखे) साधन नागाकडे नसते, पण मुंग्या, उंदीर किंवा खेकड्यांनी केलेली वारुळे आणि बिळे त्याला लपून बसायला सोयीची असल्यामुळे तो त्यात जाऊन राहतो. यावरूनच ‘आयत्या बिळात नागोबा’ ही म्हण पडली आहे.
हिंदू धर्मशास्त्रांमध्ये नागाला फार मोठे स्थान मिळाले आहे. श्रीविष्णू नेहमी शेषनागावर शयन करत असतात, तसेच त्यांच्या अवतारांमध्ये शेषनागसुध्दा अवतार घेऊन त्यांच्यासोबत असतात. अमृतमंथन करण्यासाठी वासुकी या नागाचा दोरीसारखा उपयोग केला होता. त्या मंथनाच्या वेळी निघालेले हालाहल विष शंकराने प्राशन केले आणि त्याची बाधा होऊ नये म्हणून ते गळ्यातच साठवून ठेवले. त्या विषामुळे गळ्याचा रंग निळा झाला म्हणून शंकराला नीळकंठ असे नाव पडले. हालाहलामुळे गळ्याचा अतीशय दाह होत होता तो कमी करण्यासाठी शंकराने गळ्याभोवती एक थंडगार नाग गुंडाळून घेतला. शंकराच्या चित्रात हा नाग दाखवलेला असतो. अशा प्रकारे शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांमध्ये नागाला खूप महत्व आहे. अर्जुनाने वनवासात असतांना एका नागकन्येशी विवाह केला होता असाही उल्लेख आहे. या पुराणातल्या रूपककथांमधून निरनिराळे अर्थ शोधण्याचे काम विद्वान लोक करत असतात. सर्वसामान्य माणसे नागाच्या प्रतिमेची देव मानून पूजा करतात आणि प्रत्यक्षात तो समोर आला तर भीतीने त्यांची घाबरगुंडी उडते किंवा ते त्याला मारायला उठतात.
नागाबद्दल अनेक अपसमज प्रचारात आहेत. पुराणातल्या काही गोष्टींमध्ये दाखवल्याप्रमाणे काही इच्छाधारी नाग त्यांना पाहिजे असेल तेंव्हा मनुष्यरूप धारण करतात आणि त्यांचे काम झाल्यावर पुन्हा साप बनतात. नाग आणि नागीण यांची जोडी असते आणि त्यातल्या एकाला कोणी मारले तर दुसरा किंवा दुसरी चवताळून डूख धरून राहते, त्या कृत्याचा बदला घेते. जमीनीत पुरून ठेवलेल्या द्रव्याचे रक्षण एकादा नाग करत असतो वगैरे गोष्टी आजच्या संदर्भातसुध्दा रंगवून सांगितल्या जातात. या समजुतीवर आधारलेले चित्रपट तुफान लोकप्रिय होतात. वस्तुतः नागाला पैशांचा किंवा दागदागीने, सोने चांदी वगैरेंचा काहीही उपयोग नसतो. पण अशा प्रकारच्या अफवांमुळे चोरी करायचा उद्देश मनात बाळगणाऱ्या लोकांवर कदाचित थोडा वचक बसत असेल.
नागांपासून माणसांना वाटणारी भीती थोडी कमी व्हावी, त्याच्याबद्दल द्वेष न वाटता आपलेपणा, आदर वाटावा या उद्देशाने कदाचित नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याचा रिवाज निर्माण केला असावा. पण नाग या वन्य प्राण्याला माणसांच्या पूजाविधीचा अर्थ कळत असेल आणि नागाची पूजा करण्याच्या निमित्याने लोकांनी रानातले एकादे वारूळ गाठले तरी त्यातला नागोबा बाहेर येऊन आपली पूजा करवून घेईल असे मला तरी वाटत नाही. पण लोकांना तर नागपंचमीला जीवंत नागाची पूजा करायची असते. त्यामुळे काही निर्भय (आणि निर्दय) गारुडी लोक नागांना पकडून आणून त्यांना घरोघर फिरवतात आणि पूजेसाठी लोकांनी देऊ केलेले दूध, नैवेद्य आणि दक्षिणा घेऊन जातात. नागाला त्यातले काहीही नको असते. वन्यजीवांचे रक्षण आणि भूतदया यांचा विचार करता आता सरकारने यावर बंदी घातली आहे असे ऐकले आहे. ती अंमलात आणली गेली तर बिचाऱ्या नागांचे होणारे हाल थांबतील. बत्तीस शिराळ्याचे लोक काय करतील कोण जाणे.
नागपंचमीच्यासुध्दा दोन कहाण्या प्रचलित आहेत.
पहिल्या कहाणीमध्ये एका ब्राह्मणाला पांच सुना होत्या. पण नागपंचमीच्या दिवशी कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना बाहेर गेल्या असतात. धाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते. ब्राह्मणाचा वेष घेऊन एक नाग त्या मुलीला नेण्याकरितां आला आणि तिला आपल्या वारुळांत घेऊन गेला. एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां तिने त्या मुलीला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढे तिची पिले वळवळ करूं लागली. त्यांना पाहून ही मुलगी भिऊन गेली. तिच्या हातांतला दिवा खालीं पडल्यामुळे पोरांची शेपटे भाजलीं. मनुष्यदेह धारण करून नागाने तिला सासरीं पोचती केली. नागाचीं पोरे मोठीं झाल्यानंतर त्याचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरीं गेले. तो सुध्दा नागपंचमीचा दिवस होता. पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढून ती मुलगी त्यांची पूजा करत होती. हा सर्व प्रकार पाहून पिलांच्या मनांतला सर्व राग गेला. एक नवरत्नांचा हार तिथे ठेवून ते निघून गेले.
दुसऱ्या कहाणीत शेत नांगरत असतांना एका शेतकऱ्याकडून चुकून एक नागाचे बीळ उध्वस्त केले जाते, त्यात नागाची पिले मरतात. त्याचा बदला घेण्यासाठी नागीण त्या माणसाच्या घरी जाऊन सगळ्यांना दंश करून मारून टाकते. त्याच्या बहिणीला मारण्यासाठी नागीण तिच्या घरी जाते. तिथे ती बहीण नागांची चित्रे काढून त्यांची भक्तीभावाने पूजा करत असतांना पाहून तिचा राग मावळतो, ती त्या मुलीला अमृत आणून देते, ते प्राशन करून तिचे सगळे आप्त जीवंत होतात. नागपंचमीला नागाची पूजा करण्यामुळे नागांचे गैरसमज दूर होतात आणि नंतर सगळे सुखाने राहू लागतात अशा कथा या दोन्ही कहाण्यांमध्ये आहेत. त्या कहाणीमधले नाग मनुष्यवेष धारण करून हिंडत असतात, त्यांची पूजा करणाऱ्यांना मदत करत असतात, त्यांच्याकडे अमृत, नवरत्नांचे हार वगैरे असतात अशा अद्भुत कल्पनांमुळे या कहाण्या सुरस वाटतात.
—————————————————–
यानिमित्य खाली दिलेली पौराणिक माहिती माझे ज्येष्ठ बंधू डॉ.धनंजय घारे यांनी पाठवली आहे.
परीक्षित राजाला तक्षक नाग चावल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेने कोपाविष्ट होऊन जन्मेजयाने सर्प यज्ञ केला व लाखो कोट्यावधी सर्पांची हत्या केली ही (सांकेतिक पौराणिक ) गोष्ट अर्धवटपणे खूप प्रसिद्ध झाली आहे. पण
अ) “अशी सर्प हत्या हॊऊन अनेक सापांच्या जाती नष्ट होऊ देत” असा शाप प्रत्यक्ष त्या जातीच्या मूळ आईनेच (कश्यप पत्नी कद्रूनेच ) त्यांना दिलेला होता व
आ) शेवटी तो जन्मेजयाने सुरू केलेला सर्पयज्ञ तक्षकाची हत्या न करताच थांबवला गेला वगैरे अनेक संबंधित माहिती मात्र आजच्या पिढीला दिली जात नाही हे योग्य नाही.
प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून नव नागांना दैवत मानले जाते. वैकुण्ठात विष्णु शेषावर झोपून असतात व कैलासात शंकर शेषांचे भूषण अंगा-खांद्यावर मिरवतात. गणेश लोकात गजानन सर्पाला पोटावर मौंजीबंधन बांधून मिरवतात. पृथ्वीला अंतरीक्षात (बहुधा स्पायरल गॅलॅक्सीजच्या रूपात – हा माझा अंदाज) शेष नागाच्या फ़ण्याचाच (सांकेतिक) आधार व आसरा आहे. कालिया नागाला श्रीकृष्णाने मारले नाही फक्त स्थलांतरित केले. वसुदेव जेंव्हा बाल वासुदेवाला शिरावर धारण करून जोरदार पावसातून यमुना पार करण्याला निघाला तेंव्हा शेषानेच आपल्या फ़ण्याने त्याच्या डोक्यावर छत्री धरून त्याचे संरक्षण केले. सोमवार व्रत कथेतील सुप्रसिद्ध सीमंतिनीचा नवरा (सुप्रसिद्ध ‘नल’ राजाचा नातू ) चन्द्रांगद जेंव्हा यमुनेत बुडाला तेंव्हा त्याला नाग कन्यांनीच वाचवले व नागांच्या राजानेच त्याला त्याचे गमावलेले राज्य परत मिळवून दिले, इत्यादिक सर्पांच्या बाबतीतील शेकडो पौराणिक कथाही त्यांच्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व पद्धतीने मुलांना सांगायला हव्यात.
सर्व जुन्या (विशेषत: प्राचीन प्रसिद्ध ) देवालयांमधून मुख्य दैवताचे पंचायतन व नव नाग व नव ग्रहांची छोटी देवळे असतात. याशिवाय शहरातूनच नव्हे तर अनंत खेड्या पाड्यातून अनेक वडांच्या व पिंपळांच्या पारावरून नव नागांची छॊटी छॊटी मंदिरे (किंवा नुसत्याच मुर्त्या बसवलेल्या सांपडतात ).
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नाग चतुर्थी व नागपंचमीचे दोन दिवस नाग या प्राण्याबद्दल “आदर” व “पूज्य” भावना समाजात रुजवण्यासाठी वार्षिक सण म्हणून पाळले जाण्याची परंपरा आहे. तिचा लाभ घेऊन समाजातील (विशेषत: पुढील पिढीच्या मुला बाळांच्या ) मनांतील सर्प जातीबद्दलची गैर समजूत दूर करून त्यांना आपल्या योग्य परंपरांचे योग्य प्रकारे शिक्षण दिले जायला हवे.
नव नाग स्तोत्र :
अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बलं
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।१।।
एतानि नव नामानी नागानां च महात्मनां
सायंकाले पठेत् नित्यं प्रात:काले विशेषत:
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।२।।
नाग पंचमीला वरील स्तोत्र पठण करून पुरणाची दिण्डी बनवून त्यांचा नैवेद्य नाग दैवताला समर्पण करण्याची प्रथा आहे.
नागपंचमीच्या संबंधित काही पारंपरिक आणि काही आजकालच्या कवींनी लिहिलेली लोकप्रिय गाणी खाली दिली आहेत.
नागपंचमी गाणी
खानदेशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्यरचना केली आहे. “माझी माय सरसोती, माले शिकयते बोली।” असे त्यांनीच स्वतःबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजुक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी खाली दिलेल्या ओव्यांमध्ये केले आहे. बहिणाबाई शेतात काम करायला जात असत. तान्ह्या सोपानदेवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असतांना एक नाग त्या मुलाच्या जवळ आला. ते पाहून लोकांनी ओरडा केला. बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता. तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपानदेवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धांवा करून सांगितले की आपली बांसुरी वाजवून नागोबाची समजूत घाल. तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला. बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले. ते तिने नक्कीच पाळले असणार.
उचलला हारा, हारखलं मन भारी ।
निजला हार्यात, तान्हा माझा शिरीहारी ।।
डोईवर हारा, वाट मयाची धरली ।
भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।
उतारला हारा, हालकलं माझं मन ।
निजला हार्यात, माझा तानका ‘सोपान’ ।।
लागली कामाले, उसामधी धरे बारे ।
उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।
ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।
अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।
तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।
काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।
फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।
हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।
हात जोडते नागोबा, माझं वांचव रे तान्हं ।
अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।
आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।
सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।
तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।
त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।
तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।
फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।
देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।
सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।
कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।
येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।
ग्रामीण भागातल्या बायका नागपंचमीचा सण वटपौर्णिमेप्रमाणे सार्वजनिक रीत्या साजरा करतात. कोणत्याही मुलीला एकटीने रानात जाऊन नागोबाच्या वारुळापाशी जायला भीती वाटणारच. त्यामुळे सगळ्या सख्या मिळून नागोबाची पूजा करायला जात असतील. कवीवर्य स्व.ग.दि,माडगूळकरांनी या प्रसंगावर एक छान चित्रपटगीत लिहिले आहे. त्यात शेषशायी विष्णूभगवानाच्या शेषाचा उल्लेख आहे. त्याचेच पृथ्वीवरील रूप असलेल्या नागोबाची पूजा करून या मुली त्याच्याकडे मागण्या करतात. कुमारिकांना चांगला नवरा मिळावा, त्यांनी राजाची राणी बनावे आणि सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या धन्यांना दीर्घायुष्य मिळावे अशा प्रार्थना त्या करतात.
चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग ।
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग ।।
नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण ।
साती फडा ऊभारून धरती धरा सावरून ।
दूध लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला ।।
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी ।
रूपवंती कुवारिणी, कुवारिणी, कुवारिणी ।
नागोबाची पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी ।
राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला ।।
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग ।
नागिणीचा रंग घेऊ. रंग घेऊ, रंग घेऊ ग ।
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग ।
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला ।।
चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ।।
स्व. ग. दि. माडगूळकर यांनीच लिहिलेले दुसरे एक सुंदर गीत स्व.गजानन वाटवे यांनी अजरामर केले आहे. एका मुलाखतीमध्ये वाटवे यांनी सांगितले होते की त्यांच्या काळात चांगल्या स्त्रीगायिका होत्या तरीसुध्दा त्यांनीच स्त्रियांची गाणी म्हणावीत आणि पुरुष गायकांनी फक्त पुरुषांचीच गाणी म्हणावी असा लोकांचा आग्रह नव्हता. कवितेमधल्या भावना लोकांपर्यंत पोचवणे एवढे काम स्व. गजानन वाटवे करत होते. मग त्या भावना स्त्रीमनातील असतील तर त्यानुसार त्या कवितेला चाल लावून आणि आवाजात मार्दव आणून ती कविता पुरुषाने सादर केली तरी श्रोते त्या गाण्याला डोक्यावर घेत असत. नागपंचमीच्या सणानिमित्याने जमलेल्या सगळ्या मुली झाडांच्या फांद्यांना झोपाळे बांधून खेळत आहेत, श्रावणमासातल्या आनंदी वातावरणाने सगळे जग उल्हसित झाले आहे, पशूपक्षी, वनस्पती, नदीनाले सगळे सगळे आनंदात आहेत, नायिका तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहते आहे, पण तो घरी आला नाही म्हणून तिला प्रियाविना उदासवाणे वाटते आहे, तिच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकते आहे. अशा अर्थाचे हे एक सुंदर विरहगीत आहे.
फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोळे ।
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले ।।
श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी ।
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले ।।
जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी ।
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले ।।
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात ।
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले ।।
आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा ।
वळ्चणीची पाल काही भलेबुरे बोले ।।
Filed under: विविध विषय, श्रावणमास | 2 Comments »