निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स

निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स (पूर्वार्ध)

रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा येतात आणि त्यांच्या बरोबर आपल्या सभोवतालच्या सृष्टीमध्ये सारखे बदल होत असतात. निसर्गामधील प्रत्येक पदार्थाला विशिष्ट गुणधर्म असतात आणि ते सुध्दा परिस्थितीनुसार बदलत असतात. पण हे सारे बदल निसर्गाच्या ज्या नियमांमुळे होत असतात ते नियम मात्र शाश्वत आहेत. त्यात बदल होत नाहीत. प्राणीमात्रांचे गुणधर्म आणि स्वभावधर्म देखील निसर्गाने ठरवून ठेवले आहेत. वाघासारखा शक्तीशाली आणि हिंस्र प्राणी हरणासारख्या निरपराध, दुर्बल आणि गरीब प्राण्याला मारून खातो हे क्रौर्य वाटले तरी नैसर्गिक आहे. “बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी.” हा निसर्गाचा नियम दिसतो. तरीसुध्दा जगातले बहुतेक सगळे प्राणी कळप करून राहतात. त्या कळपात बलिष्ठापासून दुर्बलापर्यंत असमान शक्ती असलेल्यांची उतरंड असते. त्यातला प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो. पण सर्वांनाच कळपात रहायचे असल्यामुळे या बाबतीत त्यांच्यात तडजोडही होत असते. बलवान प्राणीसुध्दा काही गोष्टी दुर्बलांना घेऊ देतात. प्राण्यांची नवजात पिल्ले स्वतः अत्यंत अशक्त आणि असमर्थ असतात, पण त्यांची सशक्त माता त्या पिल्लांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी तिची सगळी शक्ती पणाला लावते. कळपातले इतर बलिष्ठ प्राणीसुध्दा सर्वार्थाने त्यांच्याहून दुबळ्या असलेल्या लहान पिलांशी मायेने वागतात. निसर्गाचे हे नियम वर दिलेल्या नियमाशी विसंगत वाटतात, पण ते तसे आहेत. स्वतःचा जीव वाचवणे, अन्न गोळा करणे आणि पुनरुत्पादन एवढेच सगळ्या प्राण्यांचे जीवन मुख्यत्वाने असते. त्यांच्या या तीन मुख्य क्रियांशी संबंधित सगळ्या बाबींसाठी निसर्गाचे वरील नियम लागू पडतांना दिसतात. मुंग्या, माशा, डास यांसारखे कीटक किंवा डोळ्यांनाही न दिसणारे रोगजंतूंसारखे सूक्ष्म जीव पहायला गेल्यास कोठल्याही प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत दुर्बल दिसत असले तरी त्यांचा लहान आकार आणि चपलपणा यामुळे ते स्वतःचा बचाव करून घेतात, त्यांची अन्नाची गरज अतीशय कमी असते आणि पुनरुत्पादनाची क्षमता अचाट असते. हीच त्यांची बलस्थाने असतात आणि त्यांच्यामुळे ते तग धरून राहतात. वनस्पतींवर कोणी हल्ला केला तर त्या कोणाशी लढूही शकत नाहीत किंवा पळूनही जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होण्याची आणि नवी झाडे निर्माण करण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे त्या शिल्लक राहतात. ‘बलिष्ठ’ या शब्दाचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर हे निसर्गाच्या नियमानुसारच आहे.

मनुष्य हासुध्दा एक ‘प्राणी’ आहे आणि निसर्गाचे हे नियम त्यालाही लागू पडतात. माणसेसुध्दा अशीच वागतात याची असंख्य उदाहरणे रोज डोळ्यासमोर येत असतात. ‘बळी तो कान पिळी’ आणि ‘माइट ईज राइट’ अशा अर्थाच्या म्हणी सर्व भाषांमध्ये प्रचलित आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ या हिंदी म्हणीचा अर्थसुध्दा तशाच प्रकारचा आहे. यातला लाठीधारी इसम इतरांपेक्षा आणि म्हशीपेक्षाही जास्त बलवान असल्याने म्हशीवर त्याचा हक्क सांगू आणि गाजवू शकतो. माणसाला इतर प्राण्यांच्या मानाने खूप जास्त बुध्दी मिळालेली असल्यामुळे त्याने बुध्दीच्या जोरावर अनेक प्रकारची आयुधे, अवजारे, उपकरणे आणि यंत्रे तयार केली आणि त्यांच्या जोरावर आपले सामर्थ्य अनंत पटीने वाढवून त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले. शेती, कारखानदारी आणि उद्योगव्यवसायांमधून तो उत्पन्न घेऊ लागला, घरे, बंगले, इमारती बांधून त्यात राहू लागला, अनेक मार्गाने ज्ञान संपादन करू लागला, कला, क्रीडा, करमणूक वगैरे क्षेत्रांमध्ये भाग घेऊ लागला, वगैरे वगैरे. पण हे करत असतांना त्याने जी असंख्य निरनिराळी क्षेत्रे तयार केली त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची शक्तीस्थाने तयार झाली. बुध्दी, ज्ञान, अनुभव. कौशल्य, चलाखी, कष्टाळूपणा वगैरेंच्या आधाराने त्यातसुध्दा तुलनेने पाहता कोणी बलवान आणि कोणी दुर्बल हे भेद तयार झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यात तडजोड आणि सहकार्य यांचीही आवश्यकता पडत गेली. त्यांनाही वेगळ्या अर्थाने निसर्गनियम लागत गेले.

इतिहासपूर्व काळात कळपांमध्ये रानावनात हिंडणारा माणूस गावे, नगरे वसवून एका जागी रहायला लागल्यानंतरसुध्दा तो समूहातच रहात आला. एक राजा, म्होरक्या किंवा मुखिया त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या माणसांचे नेतृत्व करत असे आणि इतर सगळे त्याला मान देत असत. त्याने केलेल्या आज्ञा निमूटपणे पाळत असत. हे सगळे होत असतांना माणसांच्या वागणुकीसाठी नियम बनत गेले. काही हुषार, विद्वान, अनुभवी लोकांनी काही नियम बनवून त्याप्रमाणे आचरण करायला इतरांना सांगितले. त्यातले जे नियम लोकांना पटले ते त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले आणि इतरांना सांगितले, पहिल्या पिढीने पुढच्या पिढीला दिले अशा प्रकारे अनेक प्रथा, रूढी, परंपरा वगैरे तयार होत गेल्या. संत, महंत, विचारवंत लोकांनी आपल्या ग्रंथांमधून चांगल्या आचरणाचा उपदेश केला, देवदेवतांच्या कथांमधून अनेक उदाहरणे मांडली गेली. चांगल्या आचरणाला सगळ्याच धर्मांनी त्यांच्या विचारसरणीमध्ये महत्वाचे स्थान दिले. “दुराचरण करणाऱ्या माणसांना देव शिक्षा करेल” असा धाक दाखवला गेला. अशा निरनिराळ्या मार्गाने निरनिराळे नियम प्रचारात आले. हे मानवनिर्मित नियम स्थलकाळसापेक्ष असतात. निरनिराळ्या ठिकाणची माणसे त्यांच्या गरजेप्रमाणे आणि सोयीनुसार वेगवेगळे नियम करत आले आणि कालांतराने त्यात बदलही होत गेले. या नियमांचे पालन होते की नाही यावर समाजाचे लक्ष असे आणि एकादा माणूस एकादा नियम तोडतांना आढळला तर त्याला काय शिक्षा करायची हे समाजाचे नेते किंवा राज्यकर्ते ठरवत असत. ते लोक अर्थातच इतरेजनांपेक्षा जास्त शक्तीशाली असत. नियमांचा भंग करणा-याचे काय करायचे हे बहुधा परंपरेनुसार किंवा ते ठरवणाऱ्या बलिष्ठाच्या लहरीनुसार ठरत असे. म्हणजे अप्रत्यक्षपणे पुन्हा त्यात निसर्गाच्या नियमांचेच पालन होत असे.

लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी घरात त्यांचे पालक आणि शाळेतले शिक्षक काही नियम करतात आणि वाटल्यास त्यात बदलही करतात. कारखाने, बाजार, ऑफिसे वगैरे जिथे जिथे माणसे एकत्र येतात तिथे औपचारिक किंवा अनौपचारिक अशा आचारसंहिता असतात आणि एकमेकांना पाहून त्या पाळल्या जातात. देशामधील सर्वांना पाळावे लागणारे नियम राज्यकर्ते ‘सरकार’ करते तेंव्हा त्याला ‘कायदा’ असे संबोधले जाते. त्याचे पालन करायला लावणारी आणि ते न करणा-यांना शिक्षा करणारी पोलिस, न्यायाधीश, तुरुंग वगैरेंनी युक्त अशी व्यवस्था निर्माण होत गेली. इंग्रजांनी भारतात चालवलेल्या राज्यव्यवस्थेबरोबर त्यांच्या देशातली न्यायव्यवस्थाही इकडे आणली. त्यातून ‘कायदा’ या शब्दाला आज प्रचलित असलेला विशिष्ट अर्थ मिळाला. मुद्रणाचा प्रसार झाल्यानंतर सरकारने केलेले कायदे छापील रूपात उपलब्ध होऊ लागले. त्यापूर्वी समाजासाठी असलेले बरेचसे नीतीनियम अलिखित स्वरूपात असत आणि आपापल्या समजुतीनुसार त्यांचे पालन होत असे. त्यात वाद किंवा दुमत झाले तर शास्त्री, पंडित, काझी, धर्मगुरू वगैरे लोक आपापल्या पोथ्या पुराणांमधून दाखले देऊन त्यावर निर्णय देत असत. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर जनतेसाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी त्यांनी एक यंत्रणा उभी केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या तत्वानुसार कायदे करणे हे काम जनतेच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देशाच्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजांनी उभारलेली शासकीय यंत्रणाच स्वीकारली गेली.

मानवांच्या समाजाने एकत्र रहावे, त्यांच्या जीवनात स्थैर्य असावे, एकमेकांशी सहकार्य करून सर्वांनी उन्नती साधावी हा मुख्य उद्देश कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या या सर्व डोला-याच्या मुळाशी असतो. माणसामाणसांमध्ये किंवा त्यांच्या गटांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे स्पर्धा आणि संघर्ष होणार आणि त्य़ात प्रबलांची सरशी होणार हे निसर्गनियमानुसार असते, पण त्यामुळे अनागोंदी माजू नये, समाज पूर्णपणे विस्कटून जाऊ नये, त्यात स्थैर्य रहावे यासाठी समाजातल्या आततायी, दुष्ट किंवा विघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने कायदे केले जातात. समाजातल्या एका व्यक्तीने फसवणूक, चोरी, मारामारी यासारखे कृत्य केले तर त्यापासून इतरांना त्रास होतो, ते स्वस्थ बसून राहणार नाहीत. त्या पहिल्या व्यक्तीला आवरले नाही तर तशा प्रकारची कृत्ये तो करतच राहील आणि इतर काही लोकांना त्याचे अनुकरण करावेसे वाटेल. अशामुळे समाजामधील अधिकाधिक लोकांना त्रास होत राहील, ते अस्वस्थ होतील आणि त्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन समाजाचे विघटन होईल. याला आळा घालण्यासाठी समाजामधील प्रत्येकाला बंधनकारक असे काही नियम केले जातात. त्यांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो त्यासाठी शिक्षा होऊ शकते. शिक्षा होण्याच्या भीतीमुळे गुन्हे करण्यापासून बहुतेक लोक परावृत्त होण्याची शक्यता असते. या उद्देशाने अनेक कायदे केले गेले. पण एक तर देशामधले हजारो कायदे आणि त्यातली लक्षावधी कलमे सामान्य जनतेला माहीत असू शकत नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांची भाषा अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ स्पष्टपणे कळत नाही. वर्तमानपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांवरून जेवढे समजेल तेवढेच आणि तेसुध्दा फक्त सुशिक्षितांना ठाऊक असते. त्यामुळे इतिहासकाळातले परंपरागत नियम असोत किंवा आताचे जाडजूड पिनल कोड असोत त्या कायद्यांच्या माहितीच्या बाबतीत फार मोठा फरक पडलेला नाही, त्यामुळे त्यांच्या पालनालाही मर्यादा पडतात. याशिवाय हे कायदे राबवणारी सरकारची यंत्रणा किती कार्यक्षम आणि प्रामाणिक असते त्याचाही परिणाम त्यांच्या पालनावर पडत असतो.

परकीय सत्ता, राजेशाही, सरंजामशाही किंवा हुकूमशाही यासारख्या राज्यव्यवस्थेत बलिष्ठ सत्ताधीशांकडूनच दुबळ्या जनतेवर दडपशाही केली जाऊ शकते. अशा वेळी नीतीनियम आणि कायदे असले तरी ते गुंडाळून ठेवले जातात. न्याय अन्याय या शब्दांना अर्थ उरत नाही. असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. “पावसाने झोडपले किंवा राजाने मारले तर कुणाकडे दाद मागायची?” अशी एक म्हण आहे. अशा बहुतेक प्रसंगी बिचारी सामान्य जनता अगतिक असते. क्वचित काही ठिकाणी पीडित जनतेला संघटित करून त्या दडपशाहीचा प्रतिकार केला जातो आणि जुलमी राजवट उलथून पाडली जाते अशा घटना घडलेल्या आहेत, पण त्या दुर्मिळ असतात. जेंव्हा सरकारचा कारभार अंतर्गत बेबनावामुळे ढिसाळ झालेला असतो तेंव्हाच हे बंडखोर सरकारच्या सामर्थ्यापेक्षाही अधिक बलवान होऊ शकतात आणि सत्ताधीशाला खाली खेचून त्याची जागा घेतात. पण या राज्यक्रांतीमध्ये न्यायव्यवस्था विस्कटली जाते आणि कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी पुष्कळ परिश्रम आणि वेळ लागतो. अलीकडील काळात बहुतेक सर्व पुढारलेल्या देशांमध्ये चालत असलेल्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी वर्गाकडे अमर्याद सत्ता जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी अनेक तरतुदी केल्या जातात. जनतेमधून निवडून आलेले तिचे प्रतिनिधी फक्त ठराविक कालावधीपुरतेच असतात, त्यानंतर निवडणुका होतात आणि आपले प्रतिनिधी बदलण्याची संधी जनतेकडे असते. सत्तेवर असतांनासुध्दा सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा आदि जागी विरोधकांना तोंड द्यावे लागते. न्यायालये आणि शासनयंत्रणा यांना स्वतंत्र स्थान असते. शासनाने अन्याय केल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. वृत्तपत्रे, टेलिव्हिजन यासारखी माध्यमे जनतेची गा-हाणी प्रभावीपणे मांडू शकतात.

या सगळ्यामुळे समाजात सगळे काही अगदी अलबेल झाले आहे असे म्हणता येणार नाही आणि ते कधीही होण्याची शक्यता नाही, कारण हे सगळे मानवी प्रयत्न आहेत. निसर्गाचे नियम यापेक्षा जास्त बलवान आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या निसर्गाने दिलेल्या भावनांच्या प्रभावाखाली माणसे चुका किंवा गुन्हे करतात आणि करत राहणार. शिक्षेच्या भीतीपोटी त्यावर अंशतः नियंत्रण येईल, पण गुन्हेगाराला पकडणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे, त्याचा न्यायनिवाडा करणे आणि त्याला शिक्षा देणे, तसेच ती अंमलात आणणे ही सगळी कामे माणसांनीच करावयाची असल्यामुळे त्यात मानवी चुका आणि निसर्गनियमामुळे काही बाधा येतात आणि त्या येत राहणार.

निसर्गाचे नियम, कायदा आणि कॉमनसेन्स (उत्तरार्ध)

“बलिष्ठाने शिरजोरी करावी आणि दुर्बलाने ती सहन करावी. प्रत्येक प्राणी आपल्याहून जास्त बलवान असलेल्यांची अरेरावी सहन करतो, त्यांना जे हवे असेल ते घेऊ देतो आणि आपल्याहून दुर्बळ असलेल्यांकडून काहीही हिसकावून घेतो.” हा निसर्गाचा नियम दिसतो. असे मी पूर्वार्धात लिहिले होते. आपण ज्याला न्याय- अन्याय, नीती- अनीती, कायदेशीर- बेकायदेशीर वगैरे म्हणतो त्याची निसर्ग कधीच पर्वा करतांना दिसत नाही. वादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप, सुनामी वगैरे निसर्गाचे प्रकोप होतात तेंव्हा त्याच्या चपाट्यात जे कोणी सापडतील त्यांचा विनाश किंवा नुकसान होते. ते लोक धर्मनिष्ठ, परोपकारी, पुण्यवान, निरपराधी असोत किंवा अधर्मी, दुष्ट, दुर्जन, पातकी, अपराधी असोत, निसर्गाच्या विघातक शक्ती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्याच्या शाश्वत नियमांनुसार जे काही व्हायचे ते होते. कुणालाही चांगले फळ देतांनाही निसर्ग त्यात भेदभाव करत नाही. ज्या माणसाने झाड लावले, त्याची निगा राखली, त्याला पाणी दिले तो माळीसुध्दा त्याला लागलेल्या फळांचा मालक नसतो, ती फळे त्या झाडाच्या मालकाची असतात असे माणसांनी केलेला कायदा ठरवतो. पण कोणीही ती फळे काढू लागला तर ते झाड त्याला ती काढू देते. त्याला थांबवण्याची शक्ती निसर्गाने झाडांना दिलेली नाही. माणसांनी केलेल्या कायद्यांना इतर पशू, पक्षी मुळीसुध्दा जुमानत नाहीत. संधी मिळाली की ते येतात आणि त्यांना पाहिजे ते घेऊन जातात. माणसे घर बांधतात, पण किडे, मुंग्या, झुरळे, पाली इत्यादि असंख्य जीव त्यात येऊन आपलेच घर समजून राहतात. उंदीर, मांजर, माकडे या सारखे प्राणी आणि चिमण्या, कावळे, कबूतरे वगैरे पक्षी संधी मिळाली की दरवाजा किंवा खिडकीमधून घरात प्रवेश करतात आणि त्यांना मिळेल त्या अन्नपदार्थावर डल्ला मारतात. निसर्गाच्या शाश्वत अशा नियमांनुसार हे घडत असते. “कोणालाही संधी मिळाली तर त्याने तिचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही.” असाही निसर्गाचा नियम असावा.

पण एक माणूस दुसऱ्याच्या घरात शिरून वस्तू उचलून घेऊन गेला तर मात्र कायद्यानुसार ती ‘चोरी’ ठरते आणि त्या ‘गुन्ह्या’साठी त्या चोराला ‘शिक्षा’ होऊ शकते. पण ती लगेच होत नाही. हे घडण्यामध्ये अनेक स्टेप्स असतात. मी कायद्यांचा अभ्यास केलेला नाही, पण सामान्यज्ञान आणि कॉमनसेन्सच्या आधारे मला असे वाटते की त्या अशा असतात.
१. ज्याच्या वस्तू घरामधून नाहीशा झाल्या तो माणूस पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार करतो.
२. पोलिस अधिका-याला पटल्यास त्या तक्रारीची नोंद करण्यात येते.
३. संशयित अपराध्यांची चौकशी केली जाते.
४. पोलिसांना मुद्देमालासह चोर सापडला तर त्याला अटक करून त्याच्यावर खटला भरला जातो.
५. साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तीवाद न्यायाधीश ऐकून घेतात.
६. आरोपीने गुन्हा केला आहे असे त्यावरून सिध्द होत आहे असे न्यायाधीशाला वाटले तर तो त्याला शिक्षा सुनावतो.
७. त्या गुन्हेगाराला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते.
८. त्या गुन्हेगाराने त्यावर वरच्या कोर्टात दाद मागितली तर वरील काही स्टेप्सची पुनरावृत्ती होते.
चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून पोलिस स्टेशनवर आणले तरीसुध्दा तो माणूस आधी ‘संशयित’, मग ‘आरोपी’ आणि अखेर ‘गुन्हेगार’ या अवस्थांमधून गेल्यानंतरच त्याला शिक्षा होते. गैरसमज किंवा आकस यामधून कोणाही निरपराध माणसाला नाहक शिक्षा भोगावी लागू नये या विचाराने कायद्याच्या या सगळ्या पाय-या निर्माण केल्या गेल्या आहेत.

एकाद्या उपाशी भुरट्या चोराने कोणाच्या घराच्या खिडकीतून हात घालून फक्त दोन केळी चोरली, तर तो सुध्दा कायद्याच्या चौकटीमध्ये ‘दंडनीय अपराध’ असतो. पण वर दिलेल्या सगळ्या पाय-यांमधून तो बहुधा कधीच जात नाही. केळ्यांचा मालक तेवढ्यासाठी पोलिस स्टेशनवर जायचे कष्ट सहसा घेत नाही, त्याने केलेली तक्रार नोंदवली जाण्याची शक्यता कमी असते, त्या चोराचा तपास लागण्याची शक्यता त्याहून कमी आणि त्याने केलेला अपराध साक्षीपुराव्यानिशी सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य असते. यामुळे असे गुन्हे कायदेशीर अंमलबजावणीपर्यंत पोचतच नाहीत. चोरी करून बाहेर पडतांनाच त्या माणसाला वॉचमनने पकडले आणि त्याच्या बकोटीला धरून घरमालकाकडे आणले तरीसुध्दा तो त्याला पोलिस स्टेशनवर घेऊन जाणार नाही, कारण पुढील सगळ्या कारवाईमध्ये त्याला आपला वेळ घालवण्याची इच्छा नसते. पण म्हणून त्या चोराला माफही केले जात नाही. त्या ठिकाणी जमलेले सगळे लोक त्या चोराला दोन चार थपडा मारून घेतात. अशा प्रकारे त्याच्या अपराधाची त्याला तडकाफडकी शिक्षा मिळते. खरे तर हे कृत्यसुध्दा कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. त्यासाठी चोराने त्या लोकांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली तर त्या अपराधासाठी त्या लोकाना शिक्षा होऊ शकते, पण तसे सहसा कधी होत नाही, कारण हे कृत्य ‘बेकायदेशीर’ आहे हेच लोकांना माहीत नसते आणि कायदा काहीही असला तरी चोराला शिक्षा देण्याची पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेली ही पध्दत कॉमनसेन्सला समर्थनीय वाटते. क्वचित या प्रकारात तो चोर प्राणाला मुकला तर मात्र त्याची गंभीरपणे दखल घेतली जाते, कारण ती शिक्षा त्याच्या अपराधाच्या प्रमाणाने फारच जास्त असते. .

प्रत्यक्ष कायदेशीर व्यवहारात दोन केळ्यांच्या चोरीची दखल सहसा घेतली जात नाही हे पाहिले. केवढ्या मोठ्या चोरीचा गुन्हा कायद्याच्या वरील सात पाय-यांमधून जायला हवा? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या मते वेगवेगळे निघेल. चोरीला गेलेल्या वस्तूच्या मूल्याशिवाय त्याच्या मालकाची सांपत्तिक परिस्थिती, त्याने मुळात ती वस्तू कशा प्रकारे संपादन केली, त्याच्याजवळ त्या वस्तूच्या मालकीचा कोणता पुरावा उपलब्ध आहे, कायदेशीर कारवाईसाठी वारंवार पोलिस स्टेशन आणि कोर्टांमध्ये जाण्याची त्याची किती तयारी आहे, त्याला ते शक्य आहे का वगैरे वगैरे अनंत मुद्दे त्यात उपस्थित होतात. त्यामुळे कायदे झालेले असले तरी त्यांची अंमलबजावणी प्रत्येक गुन्ह्याच्या घटनेत होतेच असे नाही.

जेंव्हा जेंव्हा कोठेही मोठे दरोडे पडल्याची बातमी येते, तेंव्हा त्याबरोबरच सगळ्या जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि “सरकार काय झोपा काढत आहे का? नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? असले मोठे गुन्हे घडतातच कसे?” वगैरे प्रश्न विचारले जातात. प्रत्यक्षात कायदे असे आहेत की गुन्हा घडून गेल्यानंतरसुध्दा ते निर्विवादपणे सिध्द करून अपराध्यांना शासन करण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. मग गुन्हे घडायच्या आधीच पोलिस तरी कोणाला आणि कशासाठी पकडणार आणि कोणत्या पुराव्याच्या आधारे डांबून ठेवणार? असा प्रश्न मनात येतो. पोलिसांनी गस्त घालावी, कुठेही काही अनुचित दिसले तर त्याला हटकावे, त्याची चौकशी करावी असे प्रतिबंधक उपाय काही प्रमाणात यशस्वी ठरतात, पण संघटितपणे आणि योजनापूर्वक गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार या सगळ्याचा अभ्यास आणि विचार करून आपला कार्यभाग साधत असतील तर त्यांना अडवणे कठीण असते. चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी दुस-याच्या घरात घुसला आणि त्याला प्रत्यक्षात चोरी करणे शक्य झाले नाही तरीही तो एक गुन्हा असतो, पण ते सिध्द कसे करणार? मग दुस-याच्या हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणे यावर कायदा करण्यात आला. दरोडा घातला गेल्यानंतर त्यामुळे मोठे नुकसान होते आणि लोकांना गंभीर इजा पोचते, प्रसंगी प्राणहानीसुध्दा होते. पण हे टाळायचे असल्यास दरोडा पडण्याच्या आधीच काही तरी करायला हवे. हत्यारबंद दरोडेखोरांनी कुठेतरी दरोडा घालण्याच्या उद्देशाने हल्ला करायचे ठरवले आहे हे आधीपासून कसे समजणार? पोलिसांच्या यंत्रणेमध्ये यासाठी गुप्तहेरांची व्यवस्था असते, त्यामधून काही वेळा त्याची खबर पोलिसांना लागते. त्यामुळे त्या वेळी ठरलेला दरोडा कदाचित टाळता येईल. पण त्या संभाव्य दरोडेखोरांना पकडले तरी त्यांच्या मनातला उद्देश न्यायालयात सिध्द कसा करणार? अशा वेळी दरोडा घालण्याचा गुन्हा त्यांच्या हातून घडला नसला तरी त्यांना शिक्षा करता यावी यासाठी ‘घातक शस्त्रे जवळ बाळगणे’ हाच गुन्हा ठरवला गेला आणि त्यासाठी शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली.

कुठले शस्त्र ‘घातक’ समजावे याबद्दल एकमत होणार नाही. स्वयंपाकघरातल्या वरवंट्यापासून अंगणातले गवत कापायच्या कोयत्यापर्यंत अनेक अवजारांनीसुध्दा प्राणघातक हल्ला करता येतो, पण त्या घरातल्या आवश्यक वस्तू आहेत. त्या घरात ठेवायला प्रतिबंध करता येणार नाही. यामुळे यासंबंधी कायदा करतांना कशाला ‘शस्त्र’ म्हणावे, कुठले शस्त्र किती प्रमाणात ‘घातक’ आहे वगैरे ठरवून ते बाळगणा-याला कोणती शिक्षा करावी याचा सविस्तर विचार केला गेला. काही लोकांना ‘स्वसंरक्षणा’साठी हत्यार जवळ बाळगण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे त्यासाठी सरकारकडून परवाना मिळण्याची व्यवस्थाही केली गेली. हे सगळे सर्वसामान्य माणसांना तपशीलवार माहीत नसते. एकाद्या माणसाने दुसऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारले किंवा जखमी केले या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होणे कॉमनसेन्सला पटते, किंबहुना असे व्हायलाच हवे याबद्दल त्याच्या मनात शंका नसते, पण एकाद्याच्या घरात विना परवाना शस्त्र सापडले किंवा त्याच्या घरात असे शस्त्र ठेवलेले होते याचा पुरावा मिळाला एवढ्या कारणावरून त्याला जबर शिक्षा होणे याबद्दल तसे ठामपणे वाटत नाही. त्यातून तो माणूस सराईत गुन्हेगार असला, त्याने यापूर्वी शस्त्र चालवले असले आणि त्याला शिक्षा मिळाली असली किंवा पुराव्याअभावी त्याला संशयाचा फायदा मिळून तो सुटला असला तर त्याला घातक शस्त्रे जवळ बाळगण्याचा काही अधिकार नाही, त्याला शिक्षा व्हायलाच हवी असे कोणीही म्हणेल, पण तसे नसेल तर सर्वसामान्य माणूस त्यावर वेगळा विचार करण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी उदाहरणादाखल फक्त चोरीसंबंधी लिहिले आहे. हीच गोष्ट इतर असंख्य बाबतीत लागू पडते. निरनिराळ्या बाबतीतले कायदे नेमके काय आहेत? त्यात कोणत्या तरतुदी आहेत? कोणत्या पळवाटा आहेत? यावर विरुध्द पक्षाचे वकीलच परस्परविरोधी विधाने करतांना दिसतात. सर्वसामान्य माणसाला ते त्याच्या आवाक्याबाहेर वाटते. पण प्रत्येक माणसाला जो कॉमनसेन्स असतो त्यावरून कुठल्याही बाबतीत ते ‘चांगले की वाईट?’, ‘खरे की खोटे?’, बरोबर की चूक?’, ‘नैतिक की अनैतिक?’ याबद्दल त्याला काहीतरी वाटत असते. ते त्याच्या मनावरील संस्कार, त्याचे वाचन, त्याचे अनुभव वगैरेंमुळे ठरते. बऱ्याच वेळी त्याची मतेसुध्दा अनेक बाबतीत ठाम नसतात, ती बदलत असतात. असे असले तरी आपण वेळोवेळी कसे वागायचे हे तो त्यानुसारच ठरवू शकतो. निसर्गाच्या नियमांनुसार त्याला काही इच्छा होत असतात, नैतिकता आणि कायदा यांचा विचार करून त्या पूर्ण करण्यात काही गैर नसेल तर उत्तम, पण ते चुकीचे किंवा धोकादायक असले तर मनावर संयम पाळणे आवश्यक असते.

ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

देव आणि दैव यावरील वादविवाद किंवा संवाद अनंत काळापासून चालत आले आहेत आणि दोन्ही बाजूंनी सबळ पुरावे आणि मुद्दे मांडले जातात. माणसाच्या जीवनात त्याला मिळणारे किंवा न मिळणारे शिक्षण, यश, सुख, दुःख, संपत्ति, विपत्ति वगैरे सगळे काही कोणी ब्रह्मदेव आधीच ठरवतो किंवा सटवाई देवी त्याच्या कपाळावर लिहून ठेवते आणि ते सगळे वेळेनुसार तसेच होत जाते अशी पारंपरिक श्रद्धा आहे. ती सगळी त्याच्याच या किंवा पूर्वीच्या जन्मामधील कर्मांची फळे असतात असे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानात सांगितले जाते. देव सगळे बघत असतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे घटना घडत असतात असे इतर धर्मीयसुद्धा मानतात. पण यात खूप विसंगति दिसतात आणि हे तर्कसंगत तर वाटतच नाही, त्यामुळे हे बुद्धीला पटत नाही. पण कधी कधी संख्याशास्त्रात बसणार नाहीत इतके योगायोग जुळून येतात. त्यामुळे देवावर आणि नशीबावर विश्वास बसावा असे वाटते. मी निरनिराळ्या काळात या विषयावर लिहिलेले तीन लेख एकत्र करून प्रस्तुत केले आहेत. यात प्रामुख्याने मला आलेले अनुभव त्या त्या वेळीच लिहून काढलेले आहेत.

१. विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद

Tuesday, November 22, 2011

विज्ञानाच्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. “देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।” अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा “धर्म ही अफूची गोळी आहे.” असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानात देवाला स्थान नाही, पण कदाचित प्रारब्धाला असावे.

विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. “हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत” अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.

अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव ‘अणुशक्तीनगर’ असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणाऱ्या अनेक विद्वानांबरोबर माझा व्यक्तीगत परिचय झाला, मला अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

आपण ‘निधर्मी’ आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न मानणारे इतरधर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने त्यांच्या ईश्वराची प्रार्थना करीत. त्यासाठी त्यांनी आपापली वेगळी प्रार्थनास्थळे बांधली होती आणि तिथे विशिष्ट दिवशी ते मोठ्या संख्येने जमत असत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.

कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात कधीही येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.

वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच ‘विज्ञान’ आणि ‘ईश्वर’ या एकमेकांच्या विरोधी ‘म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह’ संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, “आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला ‘काँन्स्टंट’ हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे …” थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.

माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते सगळे एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते.

आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी “मी इलाज करतो, ‘तो’ बरे करतो (आय ट्रीट, ‘ही’ क्युअर्स)” असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, “कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही.” आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, “हे सगळे ‘तो’ ठरवतो.” त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.

गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी खाली दिलेल्या एका लेखात केले आहे. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची (‘नियर मिस्’ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. ‘त्या’चे कार्यक्षेत्र ‘संकटमोचन’ एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी ‘त्या’च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे.

मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. “हे आपले नाही, परक्याचे आहे” असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुसऱ्यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुसऱ्याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही.

शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. मला स्वतःलासुध्दा हा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणाऱ्या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणाऱ्या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभरही शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. ‘पॉझिटिव्ह’ किंवा ‘निगेटिव्ह व्हायब्रेशन्स’, ‘आत्मिक’ किंवा ‘प्राणिक’ प्रकारची ‘कॉस्मिक एनर्जी’ असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. ‘सिध्दीं’द्वारे तो ‘छूमंतर’ करणाऱ्यांकडे जात नाही. पुराणातील ‘सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां’ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तरच त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुसऱ्या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात.

थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल.



२. ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव

… Friday, November 18, 2011

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे.

सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.

असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुसऱ्या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.

प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.

जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुसऱ्याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.

पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.

आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात फार काही विशेष नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.

मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!


३. देव तारी ……. मला

Friday, May 08, 2015
भाविक लोक मोठ्या श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत असतात. नास्तिक वाटणारे लोकसुद्धा “अरे देवा (ओ माय गॉड)”, “देव जाणे (गॉड नोज)” असे उद्गार काढत असतात तेंव्हा देवाचे नावच घेत असतात. अचानक एकादे मोठे संकट कोसळते तेंव्हा तर बहुतेक सर्वांनाच ‘देव आठवतो’ असा वाक्प्रचार आहे. ज्या वेळी साक्षात काळ समोर उभा राहिलेला दिसतो आणि त्यामुळे बोबडी वळलेली असते अशा वेळी तर कोणीही दुसरे काही करूच शकत नाही. पण कदाचित अवेळी आलेला काळ कधी कधी मागच्या मागे अदृष्य होतो आणि तो माणूस भानावर येऊन सुखरूपपणे आपले पुढले आयुष्य घालवू लागतो. असे प्रसंग बहुतेक सर्वांच्या आयुष्यात येऊन जातात आणि केवळ देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे तो सांगतो. त्याला तसे मनापासून वाटते सुद्धा. माझ्या आयुष्यात नुकताच असा एक प्रसंग येऊन गेला.

माझी आई सांगत असे की मी लहान म्हणजे दोन तीन वर्षांचा असतांना एकाएकी माझ्या हातापायांमधली शक्ती क्षीण होऊ लागली आणि चांगला दुडूदुडू पळणारा मी लुळ्यापांगळ्यासारखे निपचित पडून रहायला लागलो. त्या काळातले आमच्या लहान गावातले डॉक्टर आणि त्यांना उपलब्ध असलेली औषधे देऊन काही फरक पडत नव्हता. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सगळ्याच कुटुंबांमध्ये आठ दहा मुले जन्माला येत असत, त्यातली दोन तीन किंवा काही घरांमध्ये तर चार पाच दगावत असे घरोघरी चालत असे. मीही त्याच मार्गाने जावे अशी ईश्वरेच्छाच असेल तर त्याला कोण काय करू शकणार होते?

पण माझ्या आईने मला उचलले आणि घरगुती औषधांमधल्या तज्ज्ञ माई फडके आजींच्या समोर नेऊन ठेवले. मला पाहून झाल्यावर त्यांनी त्यांच्या एका गड्याला हाक मारली. गावापासून तीन चार कोसावर असलेल्या त्यांच्या शेतावर तो रहात असे. माईंना काही वस्तू आणून देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून घेऊन जाण्यासाठी नेमका त्या दिवशी तो त्यांच्या घरी आला होता. “शेतातल्या अमक्या झाडाखाली तमूक प्रकारचे किडे तू पाहिले आहेस का?” असे त्याला विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. त्या किड्याच्या अळ्या आणून द्यायला माईंनी त्याला सांगितले.

त्यानंतर दर चार पाच दिवसांनी तो माणूस थोड्या अळ्या आणून माझ्या आईला द्यायचा. संपूर्ण शाकाहारी आणि अहिंसक असलेली माझी आई किळस न करता त्या अळ्यांना चिरडून त्यात पिठी साखर मिसळून त्याच्या चपट्या गोळ्या करायची आणि बत्तासा म्हणून मला भरवायची. या उपायाने मात्र मी उठून बसायला, उभे रहायला, चालायला आणि पळायला लागलो. मी जगावे अशी देवाची इच्छा होती म्हणून आईला, माईंना आणि त्या गड्याला त्या वेळी ही बुद्धी सुचली असे म्हणून याचे सगळे श्रेय माझी आई मात्र देवालाच देत असे. माझी ही कहाणी माझ्यासमक्षच आईने कितीतरी लोकांना सांगितली असल्यामुळे आपल्याला आता कसली भीती नाही कारण प्रत्यक्ष देव आपला रक्षणकर्ता आहे ही भावना माझ्या मनात रुजली. माझ्या हातून काही पुण्यकर्म झाले की नाही कोण जाणे, पण माझ्या आईवडिलांची पुण्याई मला नेहमी तारत राहिली. लहानपणी माझी रोगप्रतिकारात्मक शक्ती थोडी कमीच असल्याने गावात आलेल्या बहुतेक साथींनी मला गाठले. त्यातल्या काही घातक होत्या, तरीही मी त्यामधून सुखरूपपणे बरा झालो. आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्याभोवती देवाचे संरक्षणाचे कवच असण्यावरचा माझा विश्वास जास्तच वाढला.

कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंतच्या चार दशकांमध्ये मात्र मला कोणताही मोठा आजार झाला नाही. त्यानंतर एकदा मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठ्यात बाधा आल्यामुळे डोक्याच्या चिंधड्या उडतील असे वाटण्याइतक्या तीव्र वेदना होऊन मला ग्लानी आली होती तर एकदा गॅस्ट्रोएंटरटाईजच्या जबरदस्त दणक्याने क्षणार्धात डोळ्यापुढे निळासार प्रकाश दिसायला लागला होता आणि कानात पूर्णपणे शांतता पसरली होती. या दोन्ही वेळा आपला अवतार संपला असे आत कुठेतरी वाटले होते. पण त्याच्या आतून कोणीतरी उसळून वर आले आणि मी भानावर आलो. त्या वेळी आलेल्या दुखण्यांवर केलेल्या उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन मी कामालाही लागलो. देवाच्या कृपेने आपण त्यातून वाचलो असे मलाही मनापासून वाटले आणि मीही सांगायला लागलो.

माझ्या आयुष्यात बसने किंवा कारने रस्त्यावरून, रेल्वेगाडीत बसून आणि विमानांमधून मी एवढा प्रवास केला आहे की त्यांची अंतरे जोडल्यास या प्रत्येकातून निदान तीन चार तरी पृथ्वीप्रदक्षिणा झाल्या असत्या. अर्थातच यादरम्यान काही अपघातही झाले. पण ते फार गंभीर स्वरूपाचे नसावेत. थोडे खरचटणे, थोडा मुका मार यापलीकडे मला इजा झाली नाही. अनेक वेळा ड्रायव्हरच्या किंवा पायलटच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि हुषारीमुळे तर काही वेळा निसर्गाने साथ दिल्यामुळे आमचे वाहन अपघात होता होता त्यातून थोडक्यात वाचले. “असे होण्याएवजी तसे झाले असते तर आमची खैर नव्हती, ईश्वरकृपेने आणि नशीबाची दोर बळकट असल्यामुळे आपण वाचलो.” असे उद्गार काढले गेलेच.

महिनाभरापूर्वी झालेल्या मोटार अपघातात आम्ही जिच्यात बसलो होतो त्या टॅक्सीची पार मोडतोड आली होती आणि मला आणि माझ्या पत्नीला जबर इजा झाली होती. रस्त्यावरून जात असलेल्या सात आठ मोटारगाड्या आम्हाला पाहून थांबल्या आणि त्यातून उतरलेली दहापंधरा माणसे गोळा झाली, जवळच उभे असलेले हवालदारही आले. ड्रायव्हरच्या बाजूची दोन्ही दारे मोडून जॅम झाली होती. डाव्या बाजूच्या दरवाजामधून लोकांनी ड्रायव्हरला बाहेर काढले. तो ठीक दिसत होता. माझ्या बाजूला बसलेली अलका असह्य वेदनांनी आकांत करत होती, पण शुद्धीवर होती. तिलाही बाहेर पडता आले. माझ्या डोक्याला खोक पडून त्यातून भळाभळा रक्त वहात होते आणि एक दात पडल्यामधून तोंडातूनही रक्त येत होते. दोन्ही हात पूर्णपणे कामातून गेले असल्यामुळे मला कणभरही हलवता येत नव्हते. डोळ्यावर आलेल्या रक्तामधून एक क्षण सगळे लालभडक दृष्य दिसले की दुस-या क्षणी सगळा काळोख आणि तिस-या क्षणी नुसती पांढरी शुभ्र भगभग अशा प्रकारचा विचित्र खेळ डोळ्यांसमोर चालला होता. मी ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या सीटवर अडकून पडलो होतो.

अँब्युलन्सला बोलावून तिथपर्यंत येण्यात अमूल्य वेळ गेला असता. तिथे जमलेल्यातला एक सज्जन गृहस्थ आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला. पोलिसाने कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलचे नाव काढताच अलकाने आम्हाला बीएआऱसीच्या हॉस्पिटलमध्येच जायचे आहे असे निक्षून सांगितले. पोलिस केस असल्यामुळे त्यात वेळ जाईल का अशी शंका तिला वाटत होती, पण तसे काही झाले नाही. आमचा टॅक्सीड्रायव्हर त्या सज्जनाला वाट दाखवण्यासाठी त्याच्या शेजारी गाडीत बसला. अलका त्याच्या मागच्या सीटवर बसली. .मी आमच्या टॅक्सीमधल्या माझ्या जागेवरच अडकून बसलेलो होतो. एका माणसाने त्या टॅक्सीत शिरून मला खेचत पलीकडच्या दारापाशी आणले आणि दोघातीघांनी धरून बाहेर काढून उभे केले, त्यांच्या आधाराने मी त्या दुस-या कारपर्यंत चालत आल्यावर त्यांनीच मला आत बसवले आणि अपघात झाल्यावर पाच मिनिटांच्या आत आम्ही तिथून निघालो.

एक दोन मिनिटांनी थोडा भानावर आल्यानंतर मी अलकाला सांगितले, “या क्षणी मी तर काहीही हालचाल करू शकत नाही, तुला शक्य असले तर कोणाला तरी फोन कर.” तिने कसाबसा तिच्या पर्समधसा सेलफोन काढून आमच्या भाचीला लावला. आमच्या नशीबाने तो पहिल्या झटक्यात लागला आणि रश्मीने तो लगेच उचललाही. सुटीचा दिवस असला तरी त्या क्षणी ती आणि परितोष दोघेही बीएआरसी क़लनीमधल्या त्यांच्या घरीच होते. “अगं, आम्हा दोघांनाही मोठा अँक्सिडेंट झाला आहे, आम्ही आपल्या हॉस्पिस्टलमध्ये येत आहोत.” एवढेच अलका बोलू शकली पण तिच्या आवाजाचा टोन ऐकूनच रश्मी हादरली आणि आमच्या पाठोपाठ ते दोघेही हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी आमच्याक़डे लक्ष दिले. रश्मीशी बोलल्यानंतर अलकाने लगेच पुण्याला उदयला फोन लावून जेमतेम तेवढेच सांगितले. तोही लगेच हिंजेवाडीहून निघाला, त्याने शिल्पाला ताबडतोब वाकड जंक्शनवर यायला सांगितले त्याप्रमाणे तीही तिथे जाऊन पोचली. ती दोघेही अंगावरल्या कपड्यातच पुण्याहून निघून थेट हॉस्पिटमधल्या कॅज्युअल्टीत येऊन पोचले आणि त्यांनी पुढच्या सगळ्या कांमाचा भार उचलला. रश्मी आणि परितोष होतेच, आमचे एक शेजारीगी वाशीहून तिथे आले. त्या सर्वांनी मिळून माझी आणि अलकाची हॉस्पिटलमधली व्यवस्था पाहिली.

हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत मला अर्धवट शुद्ध हरपत असल्यासारखे वाटायला लागले होते. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सतत माझ्याशी बोलत राहून मला जागृतावस्थेत ठेवले होते आणि सलाईनमधून पोषक द्रव्ये पुरवून अंगातली शक्ती थोडी वाढवली होती. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिझल्ट हातात येईपर्यंत शरीरात कुठे कुठे काय काय झाले असेल याची शाश्वती वाटत नव्हती. सगळ्या तपासण्या होऊन गेल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले की डोक्याला मोठी खोक पडली असली तरी आतला मेंदू शाबूत होता, छाती व पोट या भागात कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत इजा शालेली नव्हती. पायाला झालेल्या जखमा आणि आलेली सूज फक्त वरवरची होती. उजव्या हाताचा खांदा आणि डाव्या हाताचे मनगट यांच्या जवळची हाडे मोडली असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले होते. जखमांमधून खूप रक्तस्राव झालेला असला तरी रक्ततपासणीमध्ये सगळे घटक प्रमाणात आले होते. पत्नीला माझ्यापेक्षा जास्त ठिकाणी मुका मार लागून सगळ्या अंगाला सूज आली होती, त्यातली एक तर डोळ्याला लागून होती, पण डोळा बचावला होता. दोघांच्याही शरीरातले सर्व महत्वाचे अवयव व्यवस्थित कामे करीत होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही जिवाला धोका नव्हता. ज्याची सर्वांना धास्ती वाटत होती अशा मोठ्या संकटातून आम्ही देवाच्या कृपेने वाचलो होतो. यापुढे काही काळ आम्हा दोघांनाही असह्य अशा वेदना सहन करत राहणे मात्र भाग होते. तेवढा भोग भोगायचाच होता. पण पुन्हा एकदा देवाने मला तारले होते हे जास्त महत्वाचे होते.


४. योगायोग की भाग्य?

Thursday, August 07, 2008

दोन तीन दिवस निवांत वेळ मिळाला होता म्हणून एक जुनेच पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. पहिल्या प्रकरणातच “भाद्रपद वद्य द्वादशीला माझा जन्म झाला.” अशा अर्थाचे एक वाक्य वाचले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक तिथीला कितीतरी माणसे जन्माला येतात व त्यातली कांही प्रसिद्ध होतात, तेंव्हा त्यात नवल करण्यासारखे काय आहे असे कोणालाही वाटेल. पण जी गोष्ट मला पन्नास वर्षापासून माहीत असायला पाहिजे होती, ती इतक्या वर्षात कधीच कशी माझ्या लक्षात आली नाही याचे मला आश्चर्य वाटले, तसेच स्वतःचाच थोडा रागही आला.

पन्नास साठ वर्षापूर्वीच्या काळात आमच्या घरी कोणाच्याही वाढदिवसाला केक कापून “हॅपी बर्थडे टू यू” म्हणावयाची पद्धतच नव्हती. मुलांचे वाढदिवस त्यांच्या जन्मतिथीनुसार वेगळ्या प्रकारे साजरे केले जात. ज्या मुलाचा वाढदिवस येणार असेल त्याला आधीपासूनच त्या दिवसाचे वेध लागलेले असत. त्या दिवशी तो आपण होऊन पहाटे लवकर उठून कधी नाही ती आंघोळीची घाई करी. सचैल स्नान करून झाल्यावर तो नवीन कपडे घालून देवाच्या व सर्व वडील मंडळींच्या पाया पडत असे. या संधीचा फायदा घेऊन मोठी भावंडे त्याच्या पाठीत कौतुकाने हलकासा धपाटा घालून घेत. त्या दिवशी जेवणात अगदी चटणीपासून ते पक्वांन्नापर्यंत सारे पदार्थ त्याच्या आवडीचे बनत. त्या दिवशी कोणीही त्याला रागवायचे, चिडवायचे किंवा रडवायचे नाही आणि त्यानेही कसला हट्ट न धरता शहाण्यासारखे वागायचे असा एक अलिखित संकेत होता. कोणाच्याही जन्मतारखेची चर्चाच घरात कधी होत नसे त्यामुळे घरातल्या लोकांच्याच नव्हे तर अगदी स्वतःची जन्मतारीख देखील कोणाच्या लक्षात रहात नसे, किंवा ती माहीतच नसे. आमच्या लहानपणच्या जगात जन्मतारखेला कांहीच महत्व नव्हते. घरी असेपर्यंत माझा वाढदिवससुद्धा प्रत्येक भाद्रपद वद्य द्वादशीला अशाच पद्धतीने साजरा होत गेला.

शालांत परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या प्रवेशाचा फॉर्म भरण्यासाठी स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरील माझी जन्मतारीख पहिल्यांदा पाहिली आणि जवळजवळ हर्षवायू झाला. चक्क एका अत्यंत महत्वाच्या तारखेला माझा जन्म झाला होता. दरवर्षी त्या तारखेला आम्हाला शाळेला सुटी तर असायचीच, त्याशिवाय त्या दिनानिमित्त शाळेत निरनिराळे कार्यक्रम व स्पर्धा वगैरे असायच्या. माझी जन्मतारीखसुद्धा त्याच दिवशी आहे हे् आधी समजले असते तर किती मजा आली असती! मित्रांवर रुबाब दाखवता आला असता, चार लोकांकडून कौतुक करून घेता आले असते. पण आता तर मी आपली शाळाच नव्हे तर गांव सुद्धा मागे सोडून शिक्षणासाठी शहरात आलेलो होतो. त्या काळातल्या आमच्या हॉस्टेलमधली बहुतेक मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेली होती व आपापला न्यूनतम खर्च ओढाताण करून जिद्दीने कसाबसा भागवत होती. त्यात आपला वाढदिवस जाहीर करणे म्हणजे पार्टीचा खर्च अंगावर ओढवून घेण्यासारखे होते व ते कुवतीच्या पलीकडे असल्यामुळे सहसा कोणी करीत नसे. माझ्या वाढदिवसाला तर सार्वत्रिक सुटी असल्यामुळे सगळी मुले हुंदडायला मोकळीच असायची. त्यामुळे मीसुद्धा याबाबत मौनव्रत धारण करण्यात शहाणपण होते. फार फार तर गुपचुप एकाद्या मित्राला बरोबर घेऊन सिनेमा पाहून येत असे. अशा प्रकारे मधली कांही वर्षे जन्मतिथी किंवा जन्मतारीख यातला कुठलाच दिवस साजरा न करता येऊन गेली.

लग्न करून मुंबईला संसार थाटल्यावर मात्र दरवर्षी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा होऊ लागला. नवऱ्याकडून चांगले घसघशीत प्रेझेंट मिळवण्याची ही संधी कोणती पत्नी हातची जाऊ देईल? आणि स्त्रीपुरुष समानता राखण्याकरता दोघांचेही वाढदिवस खाणे पिणे व खरेदी करून साजरे करणे क्रमप्राप्त होते. आजूबाजूच्या सगळ्या घरांतल्या लहान मुलांचे वाढदिवस फुगे व पताकांनी घर सजवून, कागदाच्या टोप्या व मुखवटे घालून, इतर मुलांना बोलावून, केक कापून, गाणी म्हणत, नाच करत मोठ्या उत्साहाने साजरे होत असत तसेच आमच्या मुलांचेही झाले. ती मोठी झाल्यावर बाहेरच्या लोकांना घरी बोलावण्याऐवजी आम्हीच त्या निमित्ताने बाहेर जाऊ लागलो. पण कांही तरी खाणे पिणे आणि मजा करणे या स्वरूपात घरातल्या सगळ्या व्यक्तींचे तारखेप्रमाणे येणारे वाढदिवस साजरे होत राहिले आणि कोणी दूरदेशी गेले तरी त्या दिवशी आठवणीने टेलीफोन व इंटरनेटवर संपर्क साधून शुभेच्छा पाठवल्याशिवाय रहात नाही.

पण या दरम्यानच्या काळात पंचांग, तिथी वगैरे गोष्टी जवळजवळ नजरेआड झाल्या आहेत. गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे मुख्य सण त्या दिवशी ऑफीसला सुटी असते त्यामुळे वेळेवर साजरे होतात. इतर फुटकर सणवार कधी येतात ते समजतच नाही. त्याचप्रमाणे दर वर्षी भाद्रपद वद्य द्वादशीसुद्धा नियमितपणे येऊन जात असे पण ती कधी आहे हे जाणून घेण्याचे कष्ट घ्यावे असे मला कधीच वाटले नाही इतकी ती विस्मरणाच्या पडद्याआड गेली होती. आज अचानक एक पुस्तक वाचतांना त्यांत तिचा उल्लेख आला आणि ती एकदम मला भूतकालात घेऊन गेली. ज्या तिथीला त्या पुस्तकाच्या महानायकाचा जन्म झाला ती तर आपलीच जन्मतिथी आहे ही गोष्ट अचानक नजरेसमोर आली.

खरे तर यात आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. भारतीय पंचांग व इंग्रजी कॅलेंडर यातील कालगणनेचा तौलनिक अभ्यास करून पृथ्वी व चंद्र यांच्या भ्रमणकालानुसार येणारा १९ वर्षांचा कालावधी दोन्ही प्रकारात जवळजवळ सारखा असतो हे मी गणिताद्वारे एका लेखात यापूर्वी सिध्द करून दाखवले आहे. यामुळे दर १९ वर्षानंतर त्याच तारखेला तीच तिथी येत असते हे मला माहीत आहे. अर्थातच १९ च्या पाढ्यातील ३८, ५७, ७६ वगैरे वर्षानंतर तिथी व तारीख यांची पुनरावृत्ती होत रहाणार. पण ही सगळी थिअरी सांगतांना माझ्या स्वतःच्याच आयुष्यातले उदाहरण मात्र मला दिसले नाही. त्यामुळे माझ्या जन्माच्या बरोबर ७६ वर्षे आधी जन्माला आलेल्या महापुरुषाची जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही माझ्या जन्माच्या वेळी त्याच असणार हे माझ्या लक्षातच आले नव्हते.

मीच लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात योगायोगांचे गणित मांडून त्यांची शक्याशक्यता वर्तवली होती. माझ्या जन्मतारखेबद्दलचा योगायोग त्यावेळी मला माहीत होता. पण असे योगायोग फारसे दुर्मिळ नसतात असे मी त्या लेखात साधार प्रतिपादन केलेले असल्यामुळे त्याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. मात्र माझी जन्मतारीख व जन्मतिथी या दोन्ही गोष्टी एका महान व्यक्तीच्या जन्मतारीख व जन्मतिथी यांबरोबर जुळाव्यात हा मात्र खराच दुर्मिळ योगायोग आहे किंवा हे माझे महद्भाग्यच आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी भाद्रपद वद्य द्वादशीला जन्मलेल्या या महात्म्याचे नांव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नांव आहे ‘सत्याचे प्रयोग’!

माझा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी जन्माला आलेली मोहन सहस्रबुद्धे नावाची आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली हा आणखी एक योगायोग. जुळ्या भावंडांचा जन्म एकाच दिवशी झालेला असतो. त्यांना सोडूनही शाळेतल्या वर्गात एकच जन्मतारीख असलेली दोन मुले असण्याची शक्यता असते, पण माझ्या बाबतीत तसे काही झाले नाही. शाळा, कॉलेज किंवा नोकरीतले समवयस्क सहकारी यातला कोणीच नेमका माझ्याच जन्मतारखेला जन्माला आलेला नव्हता, पण पत्नीच्या दूरच्या नात्यातला हा मोहन मला योगायोगाने कुठेतरी भेटला, आमचे जन्मतारखेबद्दल बोलणे झाले आणि त्यातून हा योगायोग दोघांना समजला. पण आमचे भाग्य किंवा आयुष्य यात फारशी साम्यस्थळे नव्हती. त्यामुळेही माझा ज्योतिषशाास्त्रावर मात्र कधीच विश्वास बसला नाही.

विद्युतनिर्मितीचे अर्थशास्त्र

सायन्स न शिकलेल्या अनेक लोकांना ‘अॅटॉमिक’ या शब्दाचा अर्थ माहीत नसतो. “हे ऑटोमेटिक एनर्जीवर काम करतात.” अशा शब्दात अनेक लोकांनी माझी ओळख करून दिली आहे. त्यामुळे आपोआप तयार होत जाणारी वीज पुरवण्याचे अजब तंत्र मला अवगत आहे अशी काही लोकांची गैरसमजूत होते. “तुमची वीज केवढ्याला पडते हो? ” या प्रश्नाला मला नेहमीच उत्तर द्यावे लागते. विजेचे बिल भरणाऱ्या कोणाच्याही मनात हा प्रश्न उठणे जेवढे साहजीक आहे तेवढेच या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. कोणत्याही वस्तू किंवा सेवेचा बाजारभाव ‘मार्केट फोर्सेस’मुळे ठरत असतो. मागणी आणि पुरवठा यातील समतोलाप्रमाणे तो कमी जास्त होत असतो असे ढोबळमानाने म्हंटले तरी हे दोन्ही घटक सहसा स्थिर पातळीवर नसतात. या दोन घटकांमध्ये उतार चढाव निर्माण करणारी असंख्य इतर कारणे असल्यामुळे त्याबद्दल काहीही नेमकेपणाने सांगता येणे कठीण असते. शिवाय त्यावर सरकारी नियंत्रण असले तर त्यामधला गोंधळ जास्तच वाढतो. विजेच्या दरावर तर संपूर्णपणे सरकारचे नियंत्रण आहे.

विजेचेच उदाहरण घेतले तर केवळ मुंबईतीलच दक्षिण मुंबई, उपनगरे आणि नवी मुंबई या भागात विजेच्या दरांची निरनिराळी कोष्टके आहेत. घरगुती, औद्योगिक किंवा वाणिज्यिक उपयोग, कृषी, सार्वजनिक यासारख्या ग्राहकांच्या निरनिराळ्या श्रेणी आहेत, प्रत्येक श्रेणीमध्ये पहिले १०० युनिट्स, पुढील २०० किंवा ३०० युनिट्स, त्यावरील जास्तीचे युनिट्स वगैरेंच्या वीजशुल्कासाठी निरनिराळे दर आहेत, याशिवाय वीज आकार, इंधन समायोजन आकार, कर, उपकर वगैरे त्यात जोडले जाऊन एकूण बिल बनते. त्यामुळे आपल्या घरी येणारी वीज नेमकी ‘केवढ्याला’ पडते हे मीच काय, हा प्रश्न विचारणाराही सांगू शकत नाही.

वीज वितरण (डिस्ट्रिब्यूशन) करणाऱ्या कंपनीकडून आपल्याला विजेचे बिल येते आणि आपण ते भरतो. त्यातला काही हिस्सा विजेचे वहन (ट्रान्स्मिशन) करणाऱ्या कंपनीला आणि काही भाग विजेची निर्मिती (जनरेशन) करणाऱ्या कंपनीला मिळतो. त्यांना किती पैसे मिळावेत यावरसुध्दा सरकारी नियंत्रण असते. एकाच कंपनीच्या निरनिराळ्या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये निर्माण झालेल्या विजेचे मूल्य वेगवेगळे असते. त्यात पुन्हा ड्यूअल प्राइसिंग पॉलिसीनुसार पहिले काही मेगावॉट्सपर्यंत एक दर आणि त्याहून अधिक विजेसाठी दुसरा दर असतो. भारतात निदान हे दर तरी सारखे सारखे बदलत नाहीत. युरोप आणि अमेरिकेत दररोज दिवसातल्या वेगवेगळ्या काळासाठी निरनिराळे दर लागू होत असतात. इतर वस्तू किंवा सेवांप्रमाणे तिकडे विजेचे ऑन लाइन ट्रेडिंगही चालते. थोडक्यात सांगायचे झाल्यास विजेच्या विक्रीचे दर अत्यंत अनिश्चित असतात.

विजेची निर्मिती करण्यासाठी किती खर्च येतो याचा काही प्रमाणात हिशोब करता येतो. कारखान्यात तयार होत असलेल्या इतर वस्तूंप्रमाणेच यासाठी काही भांडवली खर्च (कॅपिटाल एक्स्पेंडिचर) आणि काही महसुली खर्च (रेव्हेन्यू एक्स्पेंडिचर) असतो. वीजकेंद्राच्या उभारणीसाठी जमीनीची खरेदी करणे, इमारतीचे बांधकाम, यंत्रसामुग्रीची खरेदी आणि जोडणी वगैरेसाठी लागणारा खर्च भांडवली स्वरूपाचा असतो. कामाला सुरुवात होताच या खर्चाची सुरुवात होते आणि त्यासाठी लागणारे भांडवल कर्जाने घेतलेले असल्यास त्यावरील व्याजाची आकारणीही सुरू होते. पण विजेची निर्मिती करून तिच्या विक्रीमधून उत्पन्न यायला अवकाश असतो. या दरम्यानच्या काळात द्याव्या लागणाऱ्या व्याजाला आय.डी.सी. (इंटरेस्ट ड्यूरिंग कन्स्ट्रक्शन) म्हणतात आणि भांडवली खर्चात त्याचा समावेश केला जातो. वीजकेंद्र काम करू लागल्यानंतर ते चालवत ठेवण्यासाठी जो खर्च येतो तो दोन प्रकारचा असतो. कामगारांचे पगार आणि भत्ते, ऑफीसमधील दिवे, पंखे वगैरे चालवण्यासाठी लागणारा खर्च यासारखे काही फिक्स्ड एक्सपेंडिचर्स असतात, केंद्र बंद असले तरी हे खर्च होतच राहतात, तर इंधनाची किंमत, यंत्रे चालवण्यासाठी येणारा खर्च वगैरे काही खर्च वीजनिर्मितीच्या प्रमाणात होतात.

भांडवली खर्चासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावे लागते, तसेच त्याची परतफेडही करायची असते. याप्रमाणे त्याचे हप्ते ठरतात. हे हप्ते भरणे, फिक्स्ड खर्च भागवणे आणि खर्ची पडलेल्या इंधनाची किंमत भरून येणे हे सारे झाल्यानंतर जी शिल्लक राहील तो नफा असतो. व्यावसायिक तत्वावर कोणतेही काम करणाऱ्याला नफ्याची अपेक्षा असतेच, तसा वाजवी नफा त्याला मिळावा असा विचार करून त्यानुसार विजेची किंमत ठरवली जाते. तयार झालेली वीज कधीही साठवून ठेवता येत नाही, तिचे उत्पादन होताच क्षणभरात वितरणही होते. त्यामुळे या सगळ्या खर्चांचे अंदाज बांधून आणि अमूक इतके युनिट्स वीज तयार होईल असे ठरवून तिचा दर आधीच ठरवला जातो. ठराविक कालावधीनंतर मागील अनुभवाचा आढावा घेऊन पुढील काळासाठी त्यात बदल केले जातात.

जलविद्युतकेंद्रासाठी आधी नदीवर धरण बांधण्यासाठी खूप मोठी जागा घ्यावी लागते तिची किंमत आणि धरणाच्या बांधकामाचा खर्च अवाढव्य असतो, पण बहुतेक वेळा तो खर्च जनतेला पाणीपुरवठा, पूरनियंत्रण वगैरेच्या नावाने देशहितासाठी केला असे दाखवले जाते. पाण्यापासून वीजनिर्मिति करण्यासाठी लागणारी यंत्रे साधीसोपी आणि तुलनेने स्वस्त असतात. त्यासाठी लागणारे पाणी निसर्गाकडून फुकटच मिळत असते. त्यामुळे फक्त त्यांचाच विचार केला तर जलविद्युतकेंद्रामधून मिळणारी वीज सर्वात स्वस्त पडते आणि ती जितक्या प्रमाणात मिळणे शक्य आहे तेवढी तयार करण्याचे प्रयत्न होत असतात. पण याला नैसर्गिक मर्यादा आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरी बहुतेक सगळ्या नद्यांवर घरणे बांधून झाली आहेत. त्यामुळे यात आणखी वाढ करता येणे कठीण आहे. भारतातली सर्वात जास्त वीज औष्णिक ऊर्जेपासून तयार होते. यासाठी वर दिलेले भांडवली आणि महसुली खर्च करावे लागतात आणि त्याप्रमाणे तिचे दर ठरतात.

औष्णिक वीजकेंद्राच्या तुलनेत परमाणू वीज केंद्रामधील यंत्रसामुग्री अधिक गुंतागुंतीची असते, शिवाय ती वेगळ्या आणि खास प्रकारची असल्यामुळे तिच्या निर्मिती आणि तपासणीसाठी जास्त खर्च येतो, तसेच त्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे दर मेगावॉट कपॅसिटीसाठी अणुवीज केंद्राला अधिक भांडवल लागते. पण औष्णिक केंद्राला सतत प्रचंड प्रमाणात इंधन पुरवत रहावे लागते. त्यासाठी लागणारा कोळसा, तेल किंवा गॅस यावर खूप खर्च होतो. या इंधनांना खाणीमधून काढून वीजकेंद्रापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी भरपूर खर्च येतो, तसेच वाहतुकीच्या साधनांवर ताण पडतो. त्या मानाने अणु इंधन आकाराने अगदीच लहान असते आणि त्याच्या वाहतुकीवर कमी खर्च होतो. यामुळे असे म्हणता येईल की कोळसा किंवा तेलाच्या खाणीजवळ औष्णिक वीज कमी खर्चात तयार होते आणि त्यापासून दूर गेल्यास अणुविद्युत स्वस्तात तयार होऊ शकते. सतत वाढत जाणाऱ्या किंमतींचा विचार केला तर असे दिसते की वर्षे उलटून जात असतांना भांडवली खर्चावरील व्याजाचा बोजा कमी होत जातो, तर इंधनाच्या किंमती वाढत गेल्यामुळे तो खर्च वाढत जातो. अशा प्रकारे एकाच वर्षी सुरू झालेल्या या दोन प्रकारच्या केंद्रामधून तयार होणाऱ्या विजेच्या दरांमध्ये पंधरा वीस वर्षांनंतर फरक पडलेला दिसतो. जुन्या अणुविद्युतकेंद्रामध्ये तयार होणारी वीज तितक्याच जुन्या औष्णिक केंद्रामधून तयार झालेल्या विजेपेक्षा स्वस्त पडू शकते.

निरनिराळ्या प्रकारच्या अणुविद्युत केंद्रांचा तुलनात्मक अभ्यास करतांना त्यांच्या उभारणीवर आणि चालवण्यावर येणाऱ्या खर्चांचा विचार करावा लागेल. या केंद्राच्या उभारणीसाठी येणारा खर्च त्याच्या क्षमतेच्या समप्रमाणात वाढत नाही. केंद्राची क्षमता जितकी मोठी असेल त्या प्रमाणात त्यावरील दर मेगावॉटमागे येणारा भांडवली खर्च कमी होत जातो. यामुळे बहुतेक प्रगत देशांमध्ये १००० मेगावॉट युनिट्स बांधली गेली आहेत आणि चालवली जात आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात उभारलेली २०० – ३०० मेगावॉट्स किंवा त्याहून लहाल क्षमतेची युनिट्स त्यांनी बंदच केली आहेत. भारतासारख्या देशात मात्र ती चालवणे आजही शक्य आणि आवश्यक आहे. अर्थातच त्यातून निघणारी वीज तुलनेने जरा महाग पडते.

जगभरातले हजार मेगावॉटवर क्षमता असलेले रिअॅक्टर्स पी.डब्ल्यू.आर आणि बी.डब्ल्यू आर. या प्रकारचे आहेत. ग्राफाइट मॉडरेटेड रिअॅक्टर्स आता मागे पडले आहेत. हेवी वॉटर मॉडरेटेड रिअॅक्टर्स बनवणाऱ्या कॅनडामध्ये पाचशे मेगावॉट्सपासून सातआठशे मेगावॉट्सपर्यंतची अनेक युनिट्स त्यांनी उभारली. पुढे तिथली विजेची मागणी वाढणेच थांबल्यामुळे हजार मेगावॉट्सचे डिझाइन करूनसुध्दा ते उभारले गेले नाहीत. भारतातील परिस्थिती पाहून आधी दोनशे मेगावॉट्सची अनेक युनिट्स उभारल्यानंतर तारापूर येथे पाचशे मेगावॉट्सची दोन युनिट्स उभारली, आता सातशे मेगावॉट्स युनिट्स उभारण्याची सुरुवात झाली आहे. यातले पहिले युनिट गुजरातमधील काक्रापार इथे सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि तीन युनिट्सवर काम जोरात सुरू आहे. आणखी दहा अशी युनिट्स बांधायला सरकारची अनुमति मिळाली असून त्यातल्या काहींवर प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे.

बॉइलिंग वॉटर रिअॅक्टरमध्ये एकच कूलंट सर्किट असते. रिअॅक्टर आणि टर्बाईन यांची स्थापना एकाच इमारतीत होते. एकंदरच केंद्राचा विस्तार आणि त्यामधील यंत्रसामुग्री आटोपशीर असल्यामुळे त्यासाठी कमी खर्च येतो. मात्र हे पॉवर स्टेशन चालत असतांना त्यातील सर्वच भागात किरणोत्साराचे प्रमाण मोठे असल्यामुळे कोणीही त्यात प्रवेश करू शकत नाही. विजेची निर्मिती थांबवल्यानंतरसुध्दा रिअॅक्टर पुरेसा थंड होण्याची वाट पहावी लागते. काही यांत्रिक बिघाड झाला तर दुरुस्ती करण्यासाठी सुध्दा कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे याची काळजी घेण्यासाठी अनेक पाठीराख्या (बॅकअप) पर्यायी व्यवस्था केलेल्या असतात. पण जपानमध्ये आलेल्या सुनामीसारख्या प्रसंगी त्या तोकड्या पडल्याचे दिसून आले. परिस्थितीत सुधारणा होऊन तिच्यावर ताबा मिळवणे शक्य होईपर्यंत ती आणखी किती बिघडणार आहे हेच सांगता येत नव्हते आणि त्यामुळे अव्वाच्या सव्वा वावड्या उडवणाऱ्या लोकांना मोकळे रान मिळाले होते. जेवढी भीती दाखवली जात होती त्या मानाने प्रत्यक्षात तितके भयंकर असे काही घडले नसले तरी या प्रसंगातून निर्माण झालेले भीतीचे वातावरण मात्र जगभर पसरले. त्यामुळे नवी अणुविद्युतकेंद्रे इभारण्याच्या कामाला ब्रेक लागला.

प्रेशराइज्ड वॉटर रिअॅक्टरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन कूलंट सर्किट्स असल्यामुळे जास्तीची उपकरणे लागतात. त्यातील स्टीम जनरेटर आणि प्रेशराइजर ही अवाढव्य आकाराची असतात. प्रायमरी कूलंटचे तपमान आणि दाब या दोन्ही गोष्टी जास्त असल्यामुळे त्यासाठी लागणारे पंप्स, व्हॉल्व्हज, पाइप्स वगैरे सर्वांसाठी विशेष प्रकारच्या मिश्रधातूंचा उपयोग करावा लागतो. टर्बाइन आणि सेकंडरी कूलंट सिस्टिममधील सर्व उपकरणे वेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवली जातात. यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. या प्रकारच्या केंद्राची कार्यक्षमता कमी असते. वगैरे कारणांमुळे वीजनिर्मितीला थोडा अधिक खर्च येण्याची शक्यता असते. पण बी.डब्ल्यू.आर,मधील वर दिलेले दोष नसल्यामुळे गरज पडताच दुरुस्ती करणे सोपे असते आणि स्टेशन चालत राहिल्यामुळे विजेची अधिक निर्मिती झाली तर या खर्चाची भरपाई होते. शिवाय आणीबाणीची परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता तिला हाताळणे शक्य असते. या कारणांमुळे जगभरातील अर्ध्याहून अधिक रिअॅक्टर्स याच प्रकारचे आहेत आणि ते व्यावसायिक दृष्ट्या फायद्यात चालले आहेत.

प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टरमध्येसुध्दा प्रायमरी आणि सेकंडरी अशी दोन कूलंट सर्किट्स असल्यामुळे वरील सर्व गोष्टी लागू होतातच. त्याखेरीज हेवी वॉटरशी संबंधित (जड पाणी) इतर अनेक खास प्रकारची जास्तीची उपकरणे असावी लागतात. या रिअॅक्टरमधील तीनचारशे प्रेशर ट्यूब्स झिर्कोनियम नावाच्या खास धातूपासून बनवल्या जातात. मॉडरेटरसाठी निराळे सर्किट असते, त्यासाठी वेगळे पंप्स, व्हॉल्व्हज, हीट एक्स्चेंजर्स वगैरे असतातच. मॉडरेटरला थंड करतांना त्यातून निघालेली ऊष्णता वायाच जाते. लीक होऊन हवेत मिसळलेले हेवी वॉटर परत मिळवण्यासाठी व्हेपर रिकव्हरी सिस्टम असते आणि गोळा झालेल्या जड पाण्याचे शुध्दीकरण करून त्याचा दर्जा वाढवण्यासाठी अपग्रेडिंग सिस्टिम असते. ऑन पॉवर फ्यूएलिंग करण्यासाठी खास प्रकारची फ्यूएलिंग मशीन्स आणि ट्रान्स्फर सिस्टिम असते. या सर्वांसाठी बराच जादा खर्च येतो. त्यामुळे वीज उत्पादनाचा खर्च आणखी वाढतो. निरनिराळ्या प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये या प्रकारच्या रिअॅक्टरमधून तयाार होणारी वीज सर्वात जास्त महाग असते. मात्र या प्रकारच्या रिअॅक्टर्समध्ये ऑन पॉवर फ्युएलिंग होत असल्यामुळे ते केंद्र दरवर्षी इंधन भरण्यासाठी बंद ठेवावे लागत नाही. दोन अडीच वर्षे सतत चालू ठेवण्याचे सर्व जागतिक उच्चांक याच प्रकारच्या केंद्रांनी केले आहेत.

जगभरातील अनुभव पाहता पी.डब्ल्यू.आर. आणि बी.डब्ल्यू,आर. रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये निश्चितपणे स्वस्तात वीजनिर्मिती करत आहेत. जगातील सुमारे एक षष्ठांश वीजनिर्मिती यातून होत आहे. पी.एच.डब्ल्यू.आर. रिअॅक्टर्स तग धरून आहेत आणि माफक प्रमाणात नफा कमावत आहेत, पण या क्षेत्रात अर्थनिवेश करणाऱ्यांना (इन्व्हेस्टर्सना) ती आकर्षित करू शकत नाहीत असे दिसते. कॅनडा आणि भारत सोडता इतर देशांनी त्यात मोठा पुढाकार घेतला नाही. दक्षिण कोरिया, चीन. अर्जेंटिना, रुमानिया इत्यादि देशात अशी केंद्रेसुद्धा आहेत, पण इतरांच्या तुलनेत संख्येने ती कमी आहेत.

इतर मालाच्या बाबतीत तो कुठून सर्वात स्वस्त मिळेल याचा विचार केला जातो, पण आपल्या देशात सुरुवातीपासूनच विजेचा भयंकर तुटवडा असल्यामुळे तिच्या बाबतीत ‘इथून किंवा तिथून’ असा विचार न करता ‘इथून अधिक तिथून’ असाच विचार केला गेला आणि त्यामुळेच वीजनिर्मितीची क्षमता इतकी तरी वाढली आहे. अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे आणि त्यात सर्व प्रकारची वीज निर्माण करण्याची गरज पडणार आहे.

सत्तरीच्या दशकातील अणुशक्तीच्या सुवर्णयुगात जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात अणुविद्युतकेंद्रे उभारली गेली. किरणोत्साराच्या धोक्याचा विचार करता त्यानंतरच्या काळात ती बांधणे कमी झाले. औष्णिक केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरणाचा विचार करता अणुविद्युत केंद्रांच्या उभारणीला पुन्हा वेग येईल अशी चिन्हे अलीकडे दिसू लागली होती. पण फुकुशिमा येथील सुनामीत झालेल्या घटनांनंतर त्याला ब्रेक लागला आहे. कोळसा आणि तेल काही दशकांनंतर संपणारच आहेत. त्यांची उपलब्धता कमी होताच त्यांच्या किंमती कशा भडकतात हे आपण पाहतच आहोत. लोखंडासारख्या अनेक धातूंची निर्मिती आणि त्यावर प्रक्रिया करणे तसेच विविध प्रकारची रसायने तयार करण्यासाठीही त्या इंधनांची आवश्यकता असते. त्यामुळे ती इंधने जाळून टाकण्यापेक्षा जास्तीत जास्त पुरवून वापरण्यावर भर दिला जाईल यात शंका नाही. आपली आजची जीवनशैली पुन्हा बदलून शंभर दोनशेवर्षे मागे जायला कोणीही तयार होणार नाहीत. त्यामुळे काटकसर करूनसुद्धा विजेची मागणी फारशी कमी होणार नाही. सौर ऊर्जा, वायू ऊर्जा वगैरे अजूनही महागच आहेत, तरीही त्यावर चालणाऱ्या केंद्रांच्या उभारणीला आता गति आली आहे. पण सूर्याचा उजेड फक्त दिवसा असतो आणि वारा कधी वाहतो तर कधी वहातच नाही. यामुळे ही केंद्रे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतात. अणुशक्तीकेंद्रे मात्र बारा महिने चोवीस तास सतत वीज देत असतात. त्यामुळे काही काळ उलटून गेल्यानंतर जगाला पुन्हा अणुशक्तीच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करावा लागेल असे दिसते.

दशावतार

प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहून किंवा शेषावर शयन करून करत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे चालत रहावे यासाठी अगणित निसर्गनियम करून ठेवलेले आहेत. त्यानुसार कालचक्राचे रहाटगाडगे फिरत असते. तरीही कधीकधी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे असे वाटल्यास श्रीविष्णू स्वतः पृथ्वीतलावर अवतरतात. “यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ।।” असे भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून ठेवले आहे. याच कारणासाठी त्याने दहा अवतार घेतले असे सांगतात.

पण खरे तर मुळात याची त्याला काय गरज होती? उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या परमात्म्याने आधी कुठल्याही दुरात्म्याला जन्मालाच घातले नाही, चुकून तो जन्माला आलाच तर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला संधीसाधूऐवजी साधूसंत बनवले किंवा त्याला कुठल्या तरी आधीव्याधी किंवा अपघाताने त्वरित नष्ट करून टाकले तर जगातील सज्जनांना त्याचा त्रासच होणार नाही. त्याने मनात आणले असते तर कांहीही करणे जर त्याला शक्य होते तर समजा जेंव्हा सीतेचे हरण करायला रावण आला तेंव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या असत्या किंवा द्यूत खेळायला आलेल्या दुर्योधनाला लकवा मारला असता असे काहीही झाले असते तर पुढचे सगळे रामायण आणि महाभारत सहजपणे टळले असते आणि लक्षावधी कां कोट्यावधी निरपराध सैनिकांचे प्राण वाचले असते. पण देवाने असला सोपा मार्ग अवलंबिला नाही, त्याची तशी योजना नव्हती, त्याला सगळे रामायण आणि महाभारत घडायला हवेच होते. चांगले वाईट, सुष्ट दुष्ट वगैरेंचे सगळे प्रकार त्याच्या अनुमतीने या जगात उपस्थिती लावत असतात. त्यात जास्तच असंतुलन व्हायला लागते तेंव्हा तो अवतार घेऊन त्यात हस्तक्षेप करतो असे फार तर म्हणता येईल.

मुळात या जगात देव आहे किंवा नाही हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. कारण तो नसेलच तर या लेखाचे प्रयोजन उरत नाही. तेंव्हा घटिकाभरायाठी तो आहे असे गृहीत धरू. तरीसुद्धा अमूर्त असा परमेश्वर जेंव्हा मूर्त अवतार घेऊन या जगात येतो तेंव्हा तो या विश्वाच्या निसर्गनियमांचे पालनसुद्धा कटाक्षाने करणारच अशी माझी समजूत आहे. ते नियम तोडून अशक्यप्राय असे चमत्कार दाखवण्यासारखा रडीचा डाव खेळण्याची त्याला गरज नाही. पण दशावतारांच्या सर्व कथा सुरस आणि चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात तशा घडल्या असणे केवळ अशक्य आहे असे मला तरी वाटते. “आपले महान पूर्वज खोटे कशाला बोलतील? त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण?” वगैरे म्हणत लगेच माझ्या अंगावर धांवून यायचे कांही कारण नाही, कारण मी त्यांच्याबद्दल तसे कांही म्हणतच नाही.

“मुलांनी दंगा करून घर डोक्यावर घेतलं किंवा अमकी गोष्ट शोधण्यासाठी मी घर पालथं घातलं” असं कोणी म्हंटलं तर त्याचा अर्थ सर्व भिंती आणि छपरासकट ते घर उचलून डोक्यावर धरले किंवा पालथे केले असा होत नाही. ते मराठी भाषेतले वाक्प्रचार आहेत. ते खोटे बोलणे होत नाही. आपण जेंव्हा लहान मुलांना पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील गोष्टी सांगतो तेंव्हा थापा मारणे हा आपला उद्देश असतो कां? त्या गोष्टींच्या निमित्ताने त्यातील तात्पर्य त्यांच्या मनावर बिंबवावे हा चांगला हेतू मनात धरून आपण त्या मनोरंजक काल्पनिक गोष्टी त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे सर्वसामान्य वकूबाच्या माणसाला समजतील आणि आवडतील अशा सुरस कथा रचून त्या पुराणादिक वाङ्मयामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ज्या काळात त्या रचल्या गेल्या त्या वेळी त्यांचा मतितार्थ सुद्धा सांगितला जात असेल पण तो काळाच्या उदरात लुप्त होऊन गेला आणि मनोरंजक चमंत्कृतीपूर्ण कथा तेवढ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोचल्या असणार. मधल्या काळातील लोकांनी, विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांनी त्या गोष्टींची रंजकता वाढवण्याठी त्यात भरपूर तपशिलांचा मालमसाला मिसळला असणारच. तेंव्हा आपण आता जाणून बुजून त्यांचा शब्दशः अर्थ कशाला घ्यायचा?

त्या कथांच्या मागील अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले आहेतच. दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मत्स्यावतार हा विष्णूचा पहिला अवतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमीनीवर येणाऱ्या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशु आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक बुटकासा लघुमानव आहे. त्यानंतर परशुराम हा सशक्त शूर योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. त्यानंतर आलेल्या रामाकडे अनेक प्रकारची अमोघ अस्त्रे तर आहेतच, त्याशिवाय आदर्श जीवनाचे वस्तुपाठ तो आपल्या वागण्यातून घालून देतो. त्यानंतरच्या कृष्णावतारात तर त्याने अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या, दुष्टांचा संहार केला आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या पार्थाला गीतोपदेश करून कर्तव्याचा मार्ग दाखवला. मनाचा व बुद्धीचा विकास शारीरिक बलापेक्षा उच्च दर्जाचा असतो हे त्यानंतरच्या बुद्धावतारात दाखवून दिलेले आहे. कदाचित आता यापुढे काय हा प्रश्न पडल्यामुळे कल्की अवताराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसावी.

दशावतारांचा हा क्रम पाहूनसुद्धा लगेच “उत्क्रांतीचा सिद्धांत आमच्या द्रविणमहर्षींनी कधीच लावून ठेवला होता. पाश्चात्यांनी तो चोरून आपल्या नांवावर खपवला पहा.” अशी बाष्कळ बडबड करण्याचे धैर्य मी करणार नाही. निसर्गामध्ये रोज घडत असलेला बदल पाहून त्यामागील उत्क्रांतीचे तत्व आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले असणे सहज शक्य आहे. पण त्या सिद्धांताला पार पाताळात गाडून टाकून “विश्वाची उत्पत्ती करतांना परमेश्वराने सगळे कांही उत्कृष्ट निर्मिले होते. त्यानंतर प्रत्येक युगात अवनती होत होत आता घोर कलीयुगात जगाच्या अधःपाताची परमावधी झालेली आहे.” अशी एक उफराटी समजूत मधल्या काळातील आपल्याच विद्वानांनी पिढ्यान पिढ्या आपल्या समाजाच्या मनावर बिंबवून ठेवली आहे ते कशामुळे झाले हा अवघड प्रश्न समोर येईल. दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंनासुद्धा डार्विनचा सिद्धांत अजून मान्य नाही. तेंव्हा या बाबतीत धर्म आणि विज्ञान यांची गल्लत न करणेच श्रेयस्कर ठरेल.

समाजात चाललेल्या घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या प्रवृत्ती पाहतांना मला नेहमी कोणत्या ना कोणत्या अवताराचे रूप त्यात दडलेले दिसते. त्याचा अनुक्रम कालानुसार न लावता दर्जानुसार लावला तर आपल्याला त्यातही दशावतार दिसतील. ते दाखवण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे. मोठा मासा छोट्या माशाला खातो आणि त्याच्यापेक्षा मोठा मासा त्याला गट्ट करतो हे जलचरांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. त्यामुळे सगळेच मासे आपल्या भक्षकापासून प्राण वाचवीत स्वतःचे भक्ष्य शोधत फिरत असतात. असे असले तरी त्या सगळ्यांना एकाच जलाशयात रहायचे असते. त्यातल्या मोठ्या माशांना खाणारा महाकाय देवमासा हा लहानग्या माशाला आपला रक्षक वाटतो. त्याच्याबद्दल तो एकाच वेळी भीती तसेच आदर बाळगून असतो. मानवी समाजाची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाही. आदिमानवाच्या काळात बलिष्ठ माणूस दुर्बलाला जिवानिशी मारून टाकीत असे. आजकाल अगदी तसे केले नाही तरी त्याच्या क्षेत्रामधील त्याचे अस्तित्व नष्ट करणे सर्रास चालते. हीच गोष्ट विलीनीकरण आणि संपादन या माध्यमातून व्यावसायिक संस्था करतात. विजेत्या समाजाने पराजित समाजाला उध्वस्त केल्याच्या कितीतरी घटनांनी इतिहास भरलेला आहे. हा सगळा प्रकार मत्स्यावतार झाला. सर्वात तळातला, प्राणिमात्रांच्या निव्वळ जगण्याच्या सहजप्रवृत्तीवर आधारलेला.

त्यानंतर कूर्मावतार. कासव हा तसा निरुपद्रवी प्राणी असतो. तो कुणावर हल्ला करायला जात नाही. हळूहळू सरपटत पुढे जातो. पण निग्रहपूर्वक चालत राहून चंचल सशाबरोबर लावलेली शर्यत जिंकू शकतो. त्याच्या अंगावर एक संरक्षक कवच असते. गरज पडल्यास आपले सारे अंग तो त्याच्या आंत दडवून ठेवतो. ते कवच त्याचे संरक्षण करतेच पण वेळ पडल्यास इतरांना आधार देते. समाजातला एक वर्ग असाच असतो. तो निमूटपणे आपला मार्ग चोखाळत असतो. विरोधाचे प्रहार त्याला प्रतिकार न करता सहन करतो पण त्यातून तो वाचतो. वाटल्यास स्वतःला कोषात गुरफटून घेतो. अप्रत्यक्षपणे तो अनेकांना आधार देत असतो. त्या आधाराच्या बळावर इतर लोक पुढे येतात. मेरू पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर पेलून घेऊन देवदानवांना समुद्रमंथन करणे शक्य करून देणाऱ्या व त्यात मिळालेली रत्ने त्यांनाच वाटून घेऊ देणाऱ्या कूर्मावताराची ती रूपे आहेत असे मला वाटते. सुरक्षितता आणि स्थैर्य या प्राणिमात्रांना हव्या असलेल्या प्रवृत्ती त्यात दिसतात.

पण सगळेच लोक अल्पसमाधानी वृत्तीचे नसतात. कांही जणांना वेगाने पुढे जायची इच्छा असते. इच्छित दिशेने एकाद्या वराहासारखी मुसंडी मारून त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ते बाजूला करीत जातात. मुद्दाम कोणाला इजा करावी असा त्यांचा उद्देश नसतो. त्यांना फक्त आपला मार्ग सुकर करून घ्यायचा असतो. आपला शक्य तितका विकास साधण्याची इच्छा नैसर्गिक रीत्या प्रत्येक जीवाच्या मनात उत्पन्न होतच असते आणि ती पूर्ण करण्याची धडपड तो करीत असतो. कासवाला जे जमणार नाही ते आपल्या ताकतीच्या जोरावर वराह करू पाहतो. प्रगतीची ही पुढची पायरी वराह अवतारात दिसते.

स्वतःचा हव्यास पुरवत असतांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा तोल सुटतो. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरांकडून त्या हिसकावून घेणे सुरू होते. त्यासाठी सत्ता मिळवणे आणि ती मुठीत ठेवणे यासाठी जरब बसवणे सुरू होते. दुर्बल जनता आधी कांही काळ ते अत्याचार एखाद्या निर्जीव खांबासारखे स्वस्थपणे पाहते, पण त्याचा अतिरेक असह्य होताच ती चवताळून उठते, अक्राळ विक्राळ रूप धारण करते. नृसिंहावतार हे या प्रकारच्या उत्स्फूर्त आणि हिंस्र उद्रेकाचे स्वरूप आहे. दुष्ट हिरण्यकश्यपूचे त्यात निर्घृणपणे निर्दाळण होते. फ्रान्स आणि रशीयामधील राज्यक्रांतीच्या घटना तसेच नागपूरच्या गोरगरीब महिलांनी कुख्यात गुंडाला लाथाबुक्क्यांच्या माराने चेचून टाकले त्यात समाजाचे तेच उग्र रूप दिसले. मानवी हक्कासाठी त्याने तात्पुरते पाशवी रूप धारण करणे या अवतारात दिसून येते.

बळी हा एक सज्जन राजा असतो. त्याच्या मनात आपल्या प्रजेवर अत्याचार करण्याची इच्छा नसते. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण आपल्या राज्याचा अनिर्बंध विस्तार करण्याच्या नादात तो अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करण्यात मग्न असतो. त्यामुळे त्याचा प्रजेबरोबर संपर्क रहात नाही. मात्र त्याच्या नांवाने कारभार हांकणाऱ्या अधिकाऱ्यांचा जुलूम असह्य झाल्यामुळे प्रजा नाराज होऊन बळीराजाची लोकप्रियता नाहीशी होते. बटु वामन जेंव्हा राजाला भेटतो तेंव्हा तो उदार मनाने त्याला पाहिजे ते मागायला सांगतो. आपण त्याच्या मागण्या सहज पुरवू शकू असा मोठा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर वाटत असतो. इथे बटु वामन हे त्याच्या राज्यामधील लहान (सामान्य) लोकांचे प्रतीक असावे. तो फक्त तीन पावलाइतकी जमीन मागतो. त्याचे पाऊल हे जनतेमधील असंतोषाचे प्रतीक धरल्यास पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापून जाते याचा अर्थ सगळ्यांनाच तो राजा अप्रिय झालेला असतो. दुसऱ्या पावलांने स्वर्ग व्याप्त होतो. तो तर त्याने जिंकून घेतलेला प्रदेश, तिथे कोणाला तो हवासा वाटणार? हा व्यापक असंतोष सत्तेच्या बडग्याखाली दडपून टाकल्यास तो हिंसक रूप धारण करून उसळी घेऊ शकेल याचा विचार करून बळी राजा तो जनादेश शिरसावंद्य मानून तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेऊन घेतो. थोडक्यात आपल्या राज्यात कुठेच थारा न मिळाल्यामुळे त्याला अज्ञात पाताळात स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारची रक्तहीन क्रांती हा निश्चितच पुढचा टप्पा म्हणता येईल.

राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा खड्गहस्त बनलेला समाजाचा एक वर्ग आपल्या बलाचा दुरुपयोग करून निःशस्त्र प्रजेला नाडू लागतो तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीतरी ठामपणे उभे रहावे लागते. ऋषीमुनींच्या कुळात जन्मलेला परशुराम जपतप करणे सोडून देऊन हातात परशु धारण करून त्या लढाईत उतरतो आणि त्या उद्दाम झालेल्या वर्गाला वठणीवर आणतो. या अवतारातसुद्धा मला परशुराम हा एक व्यक्ती न वाटता तो सुजाण समाजाचा प्रतिनिधी असावा असेच वाटते. मात्र त्याचा लढा पूर्वीच्या दोन अवतारामधे होता तशासारखा क्षणिक नसून तो प्रदीर्घ काळ चालत राहतो. त्याची एकवीस आवर्तने त्याला करावी लागतात.

रामावतारामध्ये राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष नाही. अयोध्या आणि लंका या दोन्ही राज्यामधील प्रजा आपापल्या राज्यकर्त्यावर खूष असलेली सुखी जनता असते. रामायणाच्या कथेमध्ये राम आणि रावण या दोन भिन्न प्रकृतीच्या मुख्य व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले, मित्र, भक्त वगैरे अनेक पात्रांची वेगवेगळ्या छटांनी युक्त व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. त्याचा चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्वनिष्ठ महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. रामरावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.

कृष्णावतारामध्ये त्याच्या जीवनात कमालीचे वैविध्य दाखवले आहे. बालपणी सवंगड्यांबरोबर खेळणारा नटखट कान्हा तसेच गोकुळातील सर्वांना आपल्या वर्तनाने तसेच बॉँसुरीच्या सुरावर भुलवणारा मोहन अचानक त्या सगळ्यांना सोडून मथुरेला जातो आणि कंसाची अन्यायी राजवट उलथून टाकतो. रुक्मिणीहरण करून तिच्याशी प्रेमविवाह करतो. स्वतः चक्रवर्ती सम्राट वगैरे बनून सत्ताधीश व्हायचा विचारही करीत नाही. त्याऐवजी पांडवांचा मित्र व सल्लागार बनतो. त्यांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाई करायला जातो आणि ती सफल न होऊन युद्धाला तोंड फुटल्यानंतर “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” असे म्हणत अर्जुनाचा सारथी बनतो. सुरुवातीलाच गुरुजनांना समोर पाहून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला रणांगणावरच धर्मशास्त्राची मूलतत्वे सांगून कर्तव्यपालनाला प्रवृत्त करतो. भीष्मपितामहांपासून दुर्योधनापर्यंत कौरवसैन्याचे जितके सेनापती झाले त्या प्रत्येकाच्या पतनाचा मार्ग शोधून पांडवांना मदत करतो. अशा प्रकारे त्याचे एक परिपूर्ण व्यक्तित्व दाखवले आहे.

नवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ या नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधीवृक्षाखाली विचारमग्न असतांना त्याला तत्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो दया, क्षमा, शांती, समता, बंधुत्व वगैरे सद्गुणांचा प्रसार करण्यात घालवतो. “अभिलाषा ही दुःखाची जननी आहे” हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे हे सत्य पुन्हा अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. त्याच्या भक्तजनांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

कल्की अवताराबद्दल मला अस्पष्ट अशी किंचित माहिती सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. सध्या वाहणारे वारे पाहता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर विश्वाला थक्क करणारा अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवणे कदाचित शक्य आहे. एका अधांतरी तर्कापलीकडे त्यात कांही अर्थ नाही.

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानवसमूहाच्या प्रवृत्ती आढळतात. राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच तर तो त्याच पठडीतला होणार अशी माझी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. यातील प्रत्येकाची उदाहरणे भूतकाळात होऊन गेलेली आहेत तसेच आजही आपल्या डोळ्यासमोर घडतांना दिसतात. ती ओळखून त्यातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हे समजण्याइतके शहाणपण आले तरी खूप फायदा होईल.

आध्यात्मिक ‘तो मी नव्हेच’ – चिदानंदरूपः शिवोSहम् शिवोSहम्

आदिशंकराचार्यांनी लिहिलेले निर्वाणषटकम् हे अप्रतिम स्तोत्र किंवा काव्य खाली दिले आहे, तसेच त्याचा इंग्रजी अनुवादही दिला आहे. त्यातील शिव या शब्दावरून हे शंकराचे स्तोत्र आहे असे कोणाला वाटेल, किंवा निर्वाणषटक या नांवावरून शिवरात्रीच्या दिवशी (रात्री) त्याचे पठण केल्यामुळे निर्वाण किंवा मोक्षाची प्राप्ती होते असेही कोणी सांगेल. पण या स्तोत्रामध्ये कोणत्याही देवाची स्तुती किंवा प्रार्थना केलेली नाही. मनुष्य आणि ईश्वर किंवा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधलेले आहे अशा अद्वैताच्या अवस्थेत कोण कुणाला काय मागणार? माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार? पण या रचनेतील छंदबद्धता, माधुर्य, विचारांची झेप, जगाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याविषयी असलेले ज्ञान, पांडित्य, अचूक शब्दरचना या सगळ्या गोष्टी मनाला थक्क करणार्‍या आहेत. इतर अनुवादांच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो कांही अर्थ माझ्या अल्पबुद्धीला अनुभूतीविना समजला तो आपल्या शब्दात देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.

कोSहम्? किंवा मी कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण “माझे शरीर” म्हणणारा ‘मी’ कोण आहे? हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां? निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तरी त्यात चैतन्य कशामुळे येते? स्वयंचलित यंत्रे निघण्यापूर्वीच्या काळात हा प्रश्न जास्तच महत्वाचा होता कारण जड वस्तूंमध्ये चैतन्य आणणारे एक वेगळे तत्व असणे त्या काळात आवश्यक वाटत होते. “मला कोणतीही गोष्ट समजते”, “ती माझ्या लक्षात राहते”, “मला आठवते” वगैरे मधला ‘मी’ कोण? या प्रश्नाचा वेध घेतांना ‘बुद्धी’ ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे “मला आवडते”, “मला चीड आणते” ही कामे करणारे मन आले आणि या ‘मी’पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग त्या वेळी आपल्या क्रिया कोण ठरवते? यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां? अशा आणखी किती अदृष्य गोष्टी आहेत? असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत? शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व जगभरातल्या बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो? हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे? या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. जगद्गुरु शंकराचर्चांनी त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे. यामध्ये “मी हे नाही”, “ते सुद्धा नाही” असे करीत शंकराचार्यांनी जगाचे सुंदर वर्णन केले आहे.

मन, बुद्धी, अहंकार व चित्त म्हणजे मी नाही, जीभ, नाक, कान, डोळे आदि (ज्ञानेंद्रिये) मी नाही, (पंचमहाभूतातील) जमीन, आकाश, हवा किंवा तेजसुद्धा नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी म्हणजे जीवनाचा प्राण नाही की प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच वायु नाही. रक्त, मांस, मज्जा, अस्थी, कातडी, चरबी आदि ज्या सात धातूंपासून हे शरीर बनलेले आहे किंवा ज्या पांच शारीरिक वा मानसिक आवरणामध्ये ते आच्छादित केलेले आहे ते म्हणजे मी नव्हे. हात, पाय, जीभ, व उत्सर्जक इंद्रिये ही पांच कर्मेंद्रिये म्हणजे मी नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू माझ्यात नाहीत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ही मला नकोत. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी पुण्याचा किंवा पापाचा धनी नाही. मला सुखही होत नाही की दुःखही होत नाही. मंत्रपठण, तीर्थयात्रा, यज्ञयाग किंवा वेदांताची मला गरज नाही. मी उपभोग घेणारा नाही, देणारा नाही की उपभोगाची वस्तूही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला मृत्यूचे भय नाही (कारण मला मृत्यूच नाही), मी जातींमध्ये भेदभाव करीत नाही, मला माता पिता व जन्मच नाही. भाऊ, मित्र, गुरू, शिष्य कोणीही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला विकल्प (विचार) नाही की आकार नाही. मी सर्वत्र आहे व सर्व इंद्रियांना चालवतो. पण मी कशाशीच बांधलेलोही नाही की कशापासून मुक्तही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.

निर्वाण षटकम्
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रौ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।।

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।।

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।।

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।।

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।।

अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।

——————————————————————–
I am not the thought, intellect, ego, life;
I have no ears, tongue, nostrils, eyes;
I am not the five great elements (ether, earth, fire, air, water);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।1।।

I am not the vital air nor do I have anything to do with the physiological functions of the body;
I am not the seven-fold material* nor am I attached to the five sheaths**;
I am not the five organs of action (Speech, hands, legs, genital organs, anus)
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।2।।

I have neither passion nor hatred, neither greed nor covetousness;
I have neither arrogant vanity nor do I compete with anyone;
I don’t need the four purposes of life (dharma: virtue, arTha: wealth, kAma: desire, mokSha: liberation);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।3।।

I am free of sin or merit, joy or sorrow;
I know no hymns, have no pilgrimage to make, I know no scriptures, nor have I anything to gain from rituals;
I am neither the food (the experience) nor the taster (the experiencer) nor the cook (experience-giver);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।4।।

I have no doubt of death, nor have I any caste distinction;
I have neither father nor mother, I was never born!
I have no kith or kin, no teacher or disciple;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।5।।

I am free from thoughts, formless is my only form;
I am the vitality behind the sense organs of all;
Neither attached to anything nor free from everything, all inclusive I am;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।6।।

Note:
*The seven-fold material that goes into the building up of the body: Marrow, bone, fat, flesh, blood, inner skin, outer skin
**The five sheaths of personality: Anatomical structure, Physiological structure, Mental sheath, Intellectual sheath, Bliss sheath

विजेची निर्मिती

वीजनिर्मितिकेंद्रे

भाग ३ – विजेची निर्मिती

याआधील भाग : ऊर्जेचे उगमस्थान
https://anandghare2.wordpress.com/2020/02/25/%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%97%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8/

वैज्ञानिकांनी केलेल्या निरीक्षणांमधून आणि संशोधनामधून निसर्गातल्या ऊर्जेची रहस्ये कशी उलगडत गेली याचे एक उदाहरण मागील भागात दिले होते. अशा संशोधनामधून मिळत गेलेल्या ज्ञानाचा अधिकाधिक उपयोग मानव आपल्या फायद्यासाठी करत गेला. त्यातून तो नवनवी कार्यक्षम आणि अचूक (प्रिसिजन) उपकरणे आणि यंत्रेसुध्दा बनवत गेला आणि त्यांच्याद्वारे त्याने आपली निरीक्षणशक्ती अमाप वाढवली. माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांना ज्यांची जाणीव होऊ शकत नाही अशी निसर्गातली अनेक रहस्ये त्यातून उलगडली गेली. कानाला ऐकू न येणारे आवाज (अल्ट्रासॉनिक वेव्हज), डोळ्यांना दिसू न शकणारे प्रकाशकिरण (अल्ट्राव्हायेलेट, इन्फ्रारेड लाइट, क्षकिरण वगैरे) आणि बोटाला न जाणवणारी स्पंदने (व्हायब्रेशन्स) यांचे अस्तित्व मानवाच्या या वाढलेल्या सामर्थ्यामुळे समजले, त्यांची निर्मिती आणि मोजमाप करणे शक्य झाले. ज्ञानसंपादनाच्या अनेक नव्या खिडक्या उघडल्यामुळे नवनवे वैज्ञानिक शोध लागत जाण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

निरनिराळ्या स्वरूपातील ऊर्जेचे अस्तित्व, तिचे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे वहन, ऊर्जेचे एका रूपामधून दुसऱ्या रूपात रूपांतर होणे वगैरेंसाठी निसर्गाचे निश्चित असे स्थलकालातीत नियम आहेत. ते व्यवस्थित समजून घेऊन त्यांचा उपयोग करून घेण्याचे काम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमधून ऊर्जेचे काही अद्भुत असे नवे स्रोत मानवाला मिळत गेले. आपली पृथ्वी स्वतःच एक महाकाय लोहचुंबक आहे आणि तिचे चुंबकीय क्षेत्र आपल्या संवेदनांना जाणवत नसले तरी ते आपल्या चहू बाजूंना पसरले आहे हे समजले. आकाशामधून धरतीवर कोसळणाऱ्या विद्युल्लतेकडे पाहून भयभीत होण्यापलीकडे काहीही करू न शकणारा मानव कृत्रिम रीत्या विजेचे उत्पादन करू लागला. यात त्याने इतकी विविधता आणली आणि इतके नैपुण्य संपादन केले की अत्यंत प्रखर अशी ऊष्णता निर्माण करणे, महाकाय यंत्रांची चाके फिरवणे, लक्षावधी गणिते चुटकीसरशी सोडवणे किंवा जगाच्या पाठीवरील दूर असलेल्या ठिकाणी आपले संदेश अतीशय सूक्ष्म अशा विद्युल्लहरींमधून कल्पनातीत वेगाने पाठवणे अशी निरनिराळ्या प्रकारची कामे तो विजेकडून करून घेऊ लागला आहे.

विश्वातील असंख्य पदार्थाची रचना असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या रेणूंपासून झाली असली सुमारे फक्त शंभर एवढ्याच मूलद्रव्यांपासून हे असंख्य पदार्थ निर्माण झाले आहेत. मागील भागात दिल्याप्रमाणे या मूलद्रव्यांच्या सूक्ष्मतम कणांना अणु (अॅटम) असे नाव ठेवले गेले. अर्थातच दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगातून रेणू (मॉलेक्यूल्स) बनतात हे ओघाने आले. या नव्या संयुगाचे (काम्पाउंड्सचे) आणि त्याच्या रेणूंचे गुणधर्म सर्वस्वी वेगळे असतात. हे मागील भागात उदाहरणासह सांगितले आहे. मी शाळेत शिकत असतांना मॉलेक्यूलला अणु आणि अॅटमला परमाणु असे म्हणत असत. आता त्या ऐवजी अनुक्रमे रेणू आणि अणु अशी नावे प्रचारात आली आहेत. गोंधळ टाळण्यासाठी इंग्रजी नावे कंसात दिली आहेत.

जेंव्हा कोळशाचा म्हणजे कार्बन या मूलद्रव्याचा प्राणवायू (ऑक्सीजन)शी संयोग होतो. तेंव्हा कर्बद्विप्राणिल (कार्बन डायॉक्साइड) वायू तयार होतो आणि त्याबरोबर ऊष्णता बाहेर पडते. या रासायनिक क्रियेमधून निर्माण होणारी ऊर्जा कोठून येते? असा प्रश्न पूर्वी अनुत्तरित होता. संशोधन, विचार आणि संवाद यामधून त्याचे उत्तर मिळाले ते साधारणपणे असे आहे. जेंव्हा दोन कमावत्या व्यक्ती एकत्र राहू लागतात, तेंव्हा त्यांचे काही आवश्यक खर्च समाईकपणे भागवले जातात आणि त्यामुळे पूर्वी त्यावर खर्च होत असलेले त्यांचे काही पैसे शिल्लक राहतात. त्याप्रमाणे जेंव्हा दोन वेगवेगळे अणु (अॅटम) किंवा रेणू (मॉलेक्यूल्स) अस्तित्वात असतात तेंव्हा त्यांना त्यासाठी काही ऊर्जा आवश्यक असते. पण ते एकत्र आले की त्या नव्या संयुगाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली ऊर्जेची गरज कमी होते आणि ही उरलेली जास्तीची ऊर्जा ऊष्णतेच्या स्वरूपात त्या नव्या रेणूला (मॉलेक्यूलला) मिळते. वर दिलेल्या उदाहरणात कार्बन आणि प्राणवायू यांच्या अणूंना स्वतंत्रपणे राहण्यासाठी एकंदर जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा कर्बद्विप्राणिलच्या रेणूला कमी ऊर्जेची गरज असते, उरलेली ऊर्जा त्याला मिळते आणि तापवते. अर्थातच ही ऊर्जा आधीपासूनच कार्बन आणि ऑक्सीजन या पदार्थांमध्येच सुप्त रूपाने (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) वास करत असते, ज्वलनाच्या रासायनिक क्रियेमुळे आपल्याला जाणवेल अशा ऊष्णतेच्या स्वरूपात ती बाहेर पडते. अग्नीमधून मिळणारी ऊर्जा कोठून आली या प्रश्नाला मिळालेल्या या उत्तराबरोबर ऊष्णता निर्माण करणाऱ्या असंख्य रासायनिक प्रक्रियांचे (एक्झोथर्मिक रिअॅक्शन्सचे) गूढ उलगडले.

एकाद्या रसायनामध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्यामधून विजेचा सूक्ष्म प्रवाह सुरू होतो हे प्रयोगांमधून सिद्ध झाले. त्यानंतर निरनिराळे धातू, अधातू आणि रसायने यांच्यावर प्रयोग करण्यात आले आणि त्यामधून एकापेक्षा एक चांगल्या बॅटरी सेल्स तयार करण्यात आल्या. या उपकरणामध्ये दोन्ही इलेक्ट्रोड्स आणि त्यांच्या बाजूला असलेले रसायन यांच्या दरम्यान रासायनिक क्रिया (केमिकल रिअॅक्शन्स) होतात. या क्रिया विद्युतरासायनिक (इलेक्ट्रोकेमिकल) असा प्रकारच्या असल्यामुळे घन (पॉझिटिव्ह) आणि ऋण (निगेटिव्ह) इलेक्रोड्समध्ये विजेचा भार (चार्ज) निर्माण होतो आणि त्यांना तारेने जोडल्यास त्यामधून विजेचा प्रवाह वाहू लागतो. या ठिकाणी इलेक्ट्रोड्स आणि रसायने यामध्ये सुप्त रूपाने असलेल्या केमिकल पोटेन्शियल एनर्जीचे विजेत रूपांतर होते. अर्थातच यामुळे ते रसायन क्षीण होत जाते आणि ही क्रिया मंद मंद होत काही वेळाने थांबते. विजेची बॅटरी लावून ठेवली तर फार वेळ टिकत नाही हे आपल्याला माहीत असते. काही विशिष्ट रसायनांच्या बाबतीत याच्या उलट करता येते. त्यातल्या इलेक्ट्रोड्सना बाहेरून विजेचा पुरवठा केला तर क्षीण झालेले रसायन पुन्हा सशक्त होते. कार किंवा इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज करतांना हे घडत असते. अशी चार्ज झालेली बॅटरी पुन्हा डिसचार्ज होत विजेचा पुरवठा करू शकते.

लोहचुंबकाच्या क्षेत्रात (मॅगेन्टिक फील्डमध्ये) तांब्याची तार वेगाने नेली किंवा तारेच्या वेटोळ्यामधून लोहचुंबक वेगाने नेला तर त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह वाहतो. तसेच तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याच्या मध्यभागी साधी लोखंडाची कांब ठेवली आणि त्या तारेमधून विजेचा प्रवाह सोडला तर तो लोखंडाचा तुकडा लोहचुंबक बनतो. याला विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) परिणाम असे म्हणतात. याचे आकलन झाल्यानंतर कृत्रिम रीत्या वीज कशी निर्माण करता येते हे मानवाला समजले. त्यानंतर विजेचे उत्पादन जोरात सुरू झाले. सायकलला जोडता येईल इतक्या लहानशा डायनॅमोपासून ते हजारो मेगावॉट वीज तयार करून लक्षावधी लोकांच्या गरजा भागवू शकणाऱ्या मेगापॉवरस्टेशन्सपर्यंत अनेक प्रकारचे विद्युत उत्पादक (जनरेटर्स) तयार केले गेले आणि केले जात आहेत. या सर्वांमध्ये फिरणाऱ्या चाकामधील मेकॅनिकल एनर्जीचे रूपांतर विजेमध्ये होत असते.

एका चक्राला गरागरा फिरवून त्यातून वीजनिर्मिती करणे साध्य झाल्यानंतर ते चक्र फिरवण्यासाठी अनेक मार्ग शोधले गेले. पूर्वीच्या काळात गावोगावी वीजपुरवठा उपलब्ध झाला नव्हता तेंव्हा हाताच्या जोराने फिरवण्याचे एक चाक खेडेगावांमधल्या रेल्वेस्टेशनवर असायचे. ते फिरवून त्यातून निघालेल्या विजेमधून पुढच्या स्टेशनला संदेश पाठवले जात असत. पायाच्या जोराने मारायच्या पॅडलला जोडलेला डायनॅमो सायकलला लावला जात असे. स्कूटर आणि मोटार या वाहनांच्या मुख्य चक्रालाच एक वीज निर्माण करणारे यंत्र जोडलेले असते. त्यातून निघालेल्या विजेने बॅटरी चार्ज होत असते. नदीला धरण बांधून साठवलेल्या पाण्याच्या दाबाच्या जोरावर हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्समधल्या टर्बाईन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये सुद्धा याच प्रकारचे एक अवाढव्य आकाराचे यंत्र असते. त्यात पुन्हा वाफेच्या जोरावर फिरणारे स्टीम टर्बाईन किंवा ऊष्ण वायूंच्या जोरामुळे फिरणारे गॅस टर्बाइन असे उपप्रकार आहेत. विजेचा मुख्य पुरवठा काही कारणाने खंडित झाला तर अंधारगुडुप होऊ नये यासाठी आजकाल लहानमोठे डिझेल जनरेटर सेट्स सर्रास बसवले जातात. त्यांमध्ये डिझेल तेलाच्या ज्वलनामधून निघालेल्या ऊष्णतेचे रूपांतर विजेत केले जाते.

वाऱ्याच्या जोरावर चालणाऱ्या पवनचक्क्यांमध्ये एक चाक फिरवले जात असे. आता विंड टर्बाईन्समध्ये अशा चाकाला जनरेटर जोडून त्यातून वीज तयार केली जाते. सूर्यप्रकाशामधल्या ऊर्जेचे थेट विजेत रूपांतर करणारे सोलर सेल निघाल्यानंतर अशा अनेक सेल्सना जोडून सोलर पॉवर स्टेशन बांधली जात आहेत. अशा प्रकारच्या निसर्गामधून मिळणाऱ्या विजेचा उपयोग वढत्या प्रमाणात केला जात आहे. यामधून शून्य प्रदूषण होते हा त्यांचा मुख्य फायदा आहे.

विजेच्या वाढत्या उपयोगाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा आहे. आभाळात चमकणारी निसर्गातली वीज जरी खाली आणून तिचा उपयोग करणे माणसाला शक्य झाले नसले तरी कृत्रिमरीत्या विजेची निर्मिती करण्याचे अनेक मार्ग त्याने शोधून काढले आणि ते त्याच्या जीवनात क्रांतिकारक ठरले.
. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

ऊर्जेचे उगमस्थान

मागील भाग : निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत
https://anandghare2.wordpress.com/2020/02/23/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%be/
आपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते? आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे ‘वदनि कवळ घेता .. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।’ या श्लोकात म्हंटले आहे. पण “आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते? लाकडाच्या जळण्यामधून तरी ऊष्णता आणि उजेड का बाहेर निघतात?” असले प्रश्न बहुतेक लोकांना कधी पडतच नाहीत. यासारखे “नदीच्या खळाळणाऱ्या पाण्याला कशामुळे जोर मिळतो? ती नेहमी पर्वताकडून समुद्राकडेच का वाहते? त्या वाहण्याच्या क्रियेसाठी लागणारी ऊर्जा तिला कुठून मिळते? वारे कशामुळे वाहतात?” असे अनेक प्रश्न असतात. “परमेश्वराची योजना किंवा लीला” असेच अशा प्रश्नांचे उत्तर बहुतेक लोकांकडून मिळेल. लहान मुलांनी जिज्ञासेपोटी असे प्रश्न विचारले असता ती वेळ निभावून नेण्यासाठी सगळी जबाबदारी देवबाप्पावर टाकली जाते आणि “देवबाप्पा जे काय करेल ते अंतिम, त्याच्यापुढे काही विचारायचे नाही.” अशी ताकीद देऊन त्यांना गप्प केले जाते. नंतर असल्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसली तरी “त्यावाचून आपले काही अडत नाही” असे म्हणून मोठेपणी त्यांचा सहसा कोणी विचार करत नाही.

सर्वसाधारणपणे असे असले तरी काही लोक याला अपवाद असतात. पूर्वी त्यांना तत्वज्ञ (फिलॉसॉफर) म्हणत, आता वैज्ञानिक (सायंटिस्ट) म्हणतात. “देवाची करणी” या उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. उपलब्ध असलेली माहिती, आपली बुद्धी, विचारशक्ती आणि अनुभव यांच्या आधारे ते यापेक्षा वेगळे उत्तर शोधू पाहतात. त्यासाठी ते कष्ट घेतात, प्रयोग आणि निरीक्षण करतात, त्यावर मनन चिंतन वगैरे करून समर्पक आणि सुसंगत असे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतात. अशा विद्वान लोकांनी अग्नि, वायू, सूर्यप्रकाश यासारख्या ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपांचा आणि निसर्गातल्या ऊर्जास्रोतांचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्यामागे असलेली शास्त्रीय कारणे शोधली, सिद्धांत मांडले, ते सगळे समजून घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचे प्रयत्न केले. यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती होत गेली.

“झाडावरून वेगळे झालेले सफरचंद नेहमी खाली जमीनीवरच का येऊन पडते?” या प्रश्नावर विचार करता “जमीनच त्याला तिच्याकडे ओढत असणार.” अशी न्यूटनची खात्री पटली आणि त्याने या आकर्षणाचे गणिती नियम समजून घेऊन ते जगाला सांगितले. सुप्रसिद्ध सफरचंदाप्रमाणे ढगातल्या पाण्याच्या थेंबांनाही पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळे आकाशातून जमीनीवर पाऊस पडतो. पण मग “पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी जर पर्वताच्या आकर्षणामुळे ढगामधून खाली येऊन पडले असेल तर त्याच आकर्षणामुळे ते तिथेच का थांबत नाही? डोंगर हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना? मग ते पाणी त्याला सोडून उतारावरून आणखी खाली का धावत येते आणि त्यातून तयार झालेली नदी वहात वहात पुढे जात अखेर समुद्राला का जाऊन मिळते?” असे काही प्रश्न उठतात. याचे कारण पृथ्वीचे आकर्षण त्या पाण्याला फक्त जमीनीकडे ओढण्यापुरते नसते तर ते त्याला पृथ्वीच्या गोलाच्या केंद्राच्या दिशेने खेचत असते. पर्वताचा भाग त्या गोलाच्या मध्यबिंदूपासून दूर असतो आणि समुद्राचा तळ त्यामानाने जवळ असतो. यामुळे पावसाचे पाणी डोंगरावरून जिकडे उतार असेल त्या दिशेने वाहू लागते आणि समुद्राला मिळेपर्यंत वहात राहते. नदीचे वाहणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडत असते. याचाच अर्थ नदीमधल्या वाहत्या पाण्यामधली वाहण्याची शक्ती त्या पाण्याला पृथ्वीकडून मिळते.

पण मग त्या आधी ते पाणी समुद्रामधून उठून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उंच पर्वतावर कसे जाऊन पोचते? याचे उत्तर असे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची सूर्याच्या उन्हाने वाफ होते. ही वाफ हवेपेक्षा हलकी असते. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हवेला अधिक जोराने आपल्याकडे ओढत असते आणि त्यामुळे तिच्या तुलनेने हलकी असलेली वाफ पृथ्वीपासून दूर (वातावरणात उंचावर) ढकलली जाते. म्हणजे या गोष्टीलासुध्दा पृथ्वी कारणीभूत असते. पण उंचावर गेलेली वाफ थंड होऊन तिच्यात पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात आणि त्यातून ढग तयार होतात. वाऱ्यामुळे हे ढग समुद्रापासून दूर दूर ढकलले जात राहतात. वाटेत एकादा डोंगर आडवा आला तर ते पुढे जाऊ शकत नसल्याने त्याला आपटून ते आणखी वर जाऊ पाहतात, पण तिथले तापमान कमी असल्याने ढगातली वाफ थंड होऊन पाण्याचे थेंब आकाराने वाढत जातात आणि ते हवेहून जड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली येऊन जमीनीवर बरसतात. याचाच अर्थ जमीनीवरील किंवा समुद्रामधील पाण्याला आधी सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती वाफेमध्ये सुप्त अवस्थेत (लेटेंट हीट) असते, उंच पर्वतावर पडलेल्या पाण्यातही ती सुप्तरूपाने (पोटेन्शियल एनर्जी) असते. पृथ्वीच्या आकर्षणाने ते पाणी नदीमधून वाहू लागल्यावर त्याला गतिमान रूप (कायनेटिक एनर्जी) मिळते. अशा प्रकारे या ऊर्जेचा मूळ स्त्रोत सूर्य असतो आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या ऊर्जेच्या रूपात बदल घडवून आणते असेही म्हणता येईल. याचप्रमाणे वाळवंटामधील हवा उन्हाने तप्त होऊन विरळ होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या हवेचा तिच्यावर जो दाब पडत असतो तो कमी (हलका) होतो आणि जास्त दाब असलेली तुलनेने थंड हवा तिकडे धाव घेते. याला आपण वारा म्हणतो. म्हणजेच वाहत्या वाऱ्यामधील ऊर्जासुध्दा त्याला अप्रत्यक्षपणे सूर्याकडूनच मिळते. पण सूर्य आणि अग्नी यांची ऊर्जा कोठून येते? या प्रश्नाची उकल समजून घेण्यापूर्वी आणखी काही गोष्टी ठाऊक असणे आवश्यक आहे.

आपल्या समोर आलेली कुठलीही नवी वस्तू किंवा पदार्थ कशापासून तयार झाला असेल हा विचार पटकन आपल्या मनात येतो. व्यापक विचार करणाऱ्या विद्वानांना आपले विश्व कशापासून बनलेले असावे हे एक मोठे आकर्षक कोडे वाटत आले आहे. ते सोडवण्याचे प्रयत्न वैज्ञानिक लोक पूर्वापारपासून करत आले आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत. जगातले सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून तयार झालेले आहेत असे मुनिवर्य कणाद यांनी सांगितले होते. या कणांसंबंधी त्यांनी आणखी काही तपशील सांगितला असला तरी तो मला माहीत नाही. पृथ्वी, आप (पाणी), तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून प्रत्येक जड पदार्थ तयार झाला आहे असे आपल्या प्राचीन काळातल्या शास्त्रकारांनी सांगितले होते पण हे निदान ढोबळ मानाने झाले. पृथ्वीवरील दगडमाती सगळीकडे एकसारखी नसते, त्यात विपुल वैविध्य आहे, सागर, नदी, तलाव, विहिरी यांमधले पाणी थोडे वेगवेगळे असते याचे कारण त्यांमध्ये निरनिराळे क्षार मिसळलेले असतात, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि काही इतर वायू मिसळून हवा तयार होते. यामुळे याहून जास्त तपशीलात जाणे आवश्यक आहे. या विश्वामधील सर्व पदार्थ अतीसूक्ष्म अशा कणांपासून बनले आहेत ही कल्पना दोन तीन शतकांपूर्वी सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केली आणि सर्वांच्या मनात ती रुजली. त्यानंतर त्यांनी या कणांच्या गुणधर्मांचा कसून अभ्यास केला.

जगामधले पदार्थ जसे एकमेकांपासून वेगळे असतात त्याचप्रमाणे त्यांचे कणसुद्धा एकमेकांसारखे नसणारच. शास्त्रज्ञांनी सर्व पदार्थांचे तीन प्रमुख वर्ग केले, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. लोह (लोखंड), ताम्र (तांबे), कर्ब (कार्बन), गंधक (सल्फर). प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यासारखी सुमारे शंभर मूलद्रव्ये असतात. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून पाणी तयार होते, सोडियम आणि क्लोरिनच्या संयोगातून मीठ होते, अशा प्रकारची असंख्य संयुगे (कॉम्पाउंड्स) असतात. पण दगड, माती, दूध, दही, पानेफुले वगैरे आपल्या ओळखीच्या बहुतेक पदार्थांमध्ये अनेक संयुगांचे किंवा मूलद्रव्यांचे मिश्रण (मिक्श्चर) असते. ऑक्सीजन आणि हैड्रोजन मिळून तयार झालेल्या पाणी या संयुगाचे गुणधर्म त्या दोन्हींपेक्षा सर्वस्वी वेगळे असतात. पण पाण्यात मीठ विरघळले तर त्यात पाण्याचे आणि मिठाचे अशा दोन्ही द्रव्यांचे गुण असतात. यामुळे ते एक मिश्रण असते. पितळ किंवा स्टेनलेस स्टील हीसुद्धा संयुगे नसून मिश्रणे आहेत. हवा हेसुद्धा एक मिश्रण आहे आणि तिच्यामधील निरनिराळे वायू स्वतःचे गुणधर्म बाळगून असतात.

मूलद्रव्यांच्या सर्वात सूक्ष्म कणाला अणू (अॅटम) आणि संयुगांच्या सर्वात सूक्ष्म कणाला रेणू (मॉलेक्यूल) असे नाव दिले आहे. अर्थातच एका रेणूमध्ये दोन किंवा त्याहून जास्त (कितीही) अणू असतात, पण ते एकमेकांना रासायनिक बंधनाने (केमिकल बाँडिंगने) जुळलेले असतात. हे रेणू साध्या डोळ्यांनी तर नाहीच, पण दुर्बिणीमधूनसुध्दा प्रत्यक्षात दिसत नसले तरी शास्त्रज्ञांनी त्यांच्या रचनेबद्दल काही काल्पनिक संकल्पना मांडल्या आणि पदार्थांच्या गुणधर्मांच्या निरीक्षणांमधून त्यांना अप्रत्यक्षपणे पण निश्चित स्वरूपाचा दुजोरा मिळत गेला. या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून त्यांचे जे गुणधर्म समजले, त्यात असे दिसले की हे सर्व कण चैतन्याने भारलेले असतात. याची अनेक सोपी उदाहरणे दाखवता येतील.

भरलेला फुगा फोडला की त्याच्या आतला वायू क्षणार्धात हवेत विरून जातो, त्याला परत आणता येत नाही. कारण त्या वायूचे सूक्ष्म कण स्वैरपणे वेगाने इतस्ततः भरकटत असतात. स्वच्छ पाण्याने भरलेल्या पेल्यात कोकाकोलाचा एक थेंब टाकला की तोसुध्दा सगळीकडे पसरतांना दिसतो, कारण द्रवरूप पदार्थांचे सूक्ष्म कण सुध्दा एका जागेवर स्थिर न राहता वायूंच्या मानाने हळूहळू पण सतत संचार करत असतात. घनरूप पदार्थांचे तपमान वाढले की ते प्रसरण पावतात आणि कमी झाले की आकुंचन पावतात, कारण त्यांचे सूक्ष्म कण सुध्दा जागच्या जागीच हालचाल करत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर सगळ्या जड पदार्थांच्या सूक्ष्म कणांमध्ये सुध्दा एक चैतन्य असते. निसर्गातल्या सर्व अणुरेणूंमध्ये एक प्रकारची सुप्त ऊर्जा भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिमानता यासारख्या रूपामध्ये प्रकट होते तेंव्हा ती आपल्या जाणीवांच्या कक्षेत येते. तिला ओळखणे, तिचे मोजमाप करणे, तिचा उपयोग करून घेणे अशा गोष्टी आपल्याला अवगत असतील तर आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली असे वाटते. प्रत्यक्षात कोणतीही ऊर्जा नव्याने निर्माण होत नाही किंवा ती नष्टही होत नाही असा काँझर्व्हेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे. निसर्गातली ही ऊर्जा कधी आपल्याला जाणवते आणि तिचा उपयोग करणे शक्य होते आणि कधी ती सुप्त रूपात असते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास ऊन, वारा, नदी वगैरेंमधील ऊर्जेचा उगम सूर्य किंवा पृथ्वी यांच्यामधून होतो आणि सूर्य, पृथ्वी आणि इतर ग्रहगोलांमध्ये असलेली ऊर्जा ही त्यांच्यातल्या अणुरेणूंमध्येच ठासून भरलेली असते. विशिष्ट परिस्थितींमध्ये ती ऊर्जा ऊष्णता, प्रकाश, ध्वनि आदि रूपांमध्ये बाहेर पडत असते.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

निरनिराळे परंपरागत ऊर्जास्रोत

 

“या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमोनमः।।” असे देवीच्या प्रार्थनेतल्या एका श्लोकात म्हंटले आहे. “सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने निवास करणाऱ्या देवीला नमस्कार.” असा या श्लोकाचा अर्थ होतो. वाघसिंहासारख्या हिंस्र श्वापदांच्या अंगात तर अचाट बळ असतेच, मुंग्या आणि डासांसारख्या बारीक कीटकांच्या अंगातही त्यांच्या शरीराच्या आकाराच्या मानाने अपार ताकत असते. सजीव प्राणीमात्रांकडे असलेली शक्ती आपल्याला त्यांच्या हालचालींमधून स्पष्टपणे दिसते. आपल्या स्वतःच्या तसेच सजीवांच्या शरीरातली शक्ती हे नैसर्गिक शक्तीचे एक रूप आहे. त्याशिवाय ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, पाण्याचा प्रवाह, हवेचा प्रवाह यांच्यासारखी निसर्गामधल्या ऊर्जेची रूपे आपल्याला रोजच्या पाहण्यात दिसत असतात, हे सगळे अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. ‘शक्ती’ या मराठी शब्दाचा रूढ अर्थ मोघम आणि व्यापक आहे. मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, दैवी शक्ती, इच्छाशक्ती वगैरेंचासुद्धा त्यात समावेश होतो. ‘शक्ती’ या शब्दाचा उपयोग ‘बळ’, ‘सामर्थ्य’ यासारख्या आणखी काही मोघम अर्थांनी केला जातो. शक्ती, बळ, ताकत, सामर्थ्य, क्षमता यासारखे समानार्थी वाटणारे अनेक शब्द रूढ आहेत. विज्ञानाच्या परिभाषेत ‘एनर्जी’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ऊर्जा असा केला जातो. हा लेख विज्ञानाच्या वळणाने जाणार आहे हे पाहता मी या लेखात शक्यतो ‘एनर्जी’ या अर्थाने ‘ऊर्जा’ या रूढ असलेल्या तांत्रिक शब्दाचा वापर करणार आहे.

ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव अनादिकालापासून आजतागायत करत आला आहे. प्रदूषण आणि भूमिगत साधनसंपत्ती यांचा विचार करून आता ऊन, वारा, पाऊस यांचा अधिकाधिक उपयोग करून घेणे आवश्यक झाले आहे. उदाहरणे द्यायची झाल्यास अनादि काळापासून कपडे किंवा धान्य वाळवण्यासाठी उन्हामधील ऊष्णतेचा उपयोग केला जात आला आहे, सोलर हीटर्स आणि फोटोव्होल्टाइक सेल्स वगैरेंचा वापर आता वाढत्या प्रमाणात होऊ लागला आहे. पूर्वीपासून वाऱ्यामधील ऊर्जेवर शिडाची जहाजे चालत असत, आताही यॉट्स नावाच्या नौकांना शिडे असतात, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत आणि विंड टर्बाईन्स हे आता जगभरात वीजनिर्मितीचे एक महत्वाचे साधन झाले आहे. लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली गेली आणि आता हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्समध्ये विजेची निर्मिती होते.

निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे नैसर्गिक स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा तिकडे जाऊन त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ढगाळ हवा असतांना कडक ऊन नसते. ते जेंव्हा आणि जिथे पडेल तिथेच आपले वाळवण न्यावे लागते. ज्या भागामधून नदी वहात असेल तिथे जाऊनच तिच्या प्रवाहाचा उपयोग करून घेता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपले काम करून घ्यावे लागते. आपल्याला निसर्गामधील ऊर्जांचा फक्त अभ्यास करता येतो, ते कुठे, कधी आणि किती उपलब्ध आहेत हे समजून घेता येते, पण आपल्याला हवे असेल तेंव्हा किंवा हवे तिथे त्यांना निर्माण करता किंवा आणता येत नाही.

अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला हवे तेंव्हा, हवे तिथे आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. साधे भात शिजवणे असो किंवा खनिजापासून धातू तयार करणे आणि त्याला तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे असो, गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला पाहिजे असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. त्यासाठी असंख्य प्रकारचे ज्वलनशील, ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थ मानवाने शोधून काढले, तोफा आणि बंदुकांसारखी शस्त्रास्त्रे निर्माण केली, वाफेवर आणि तेलावर चालणारी इंजिने तयार केली. आता अग्निबाणांच्या सहाय्याने अवकाशात याने पाठवत आहे. या सोयीमुळे आता अग्नि हे माणसासाठी ऊर्जेचे प्रमुख प्राथमिक साधन (प्रायमरी सोर्स) झाले आहे.

आकाशात अचानक चमकणारी वीज हा ऊर्जेचा एक अद्भुत असा प्रकार आहे. कानठळ्या बसवणाऱ्या गडगडाटासह ती अवचितपणे येते, डोळ्यांना दिपवणाऱ्या प्रकाशाने क्षणभरासाठी आकाश उजळून टाकते आणि पुढच्या क्षणी अदृष्य होऊन जाते. एकाद्या घरावर किंवा झाडावर वीज कोसळली तर त्याची पार राखरांगोळी करून टाकते. तिच्या या रौद्र स्वरूपामुळे पूर्वी माणसाला विजेबद्दल फक्त भीती वाटायची. तशी ती अजूनही वाटते कारण आकाशातल्या विजेवर कसलेही नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. तिच्या तडाख्यामधून वाचण्याचे काही उपाय मात्र आता उपलब्ध झाले आहेत. पण याच अवखळ विजेची कृत्रिमपणे निर्मिती करून तिच्यावर इतक्या चांगल्या प्रकारे नियंत्रण करणे शक्य झाले की त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. आजकाल कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि त्यातून आपल्याला रोज लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. .

ऊन, वारा यासारखे ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत पूर्णपणे निसर्गाच्या मर्जीनुसारच उपलब्ध होतात. इंधनाच्या ज्वलनातून मिळणारी ऊष्णता आणि प्रकाश काही प्रमाणात हवे तेंव्हा आपल्या नियंत्रणाखाली निर्माण करता येतात. पण ही ऊर्जा जिथे निर्माण होते तिथेच तिचा वापर करावा लागतो. खिचडी शिजवायची असेल तर पातेले चुलीवरच ठेवावे लागते, बिरबलाने केले त्याप्रमाणे ती हंडी उंचावर टांगून ठेवली तर तिच्यातली खिचडी कधीच शिजणार नाही. समयीचा मंद उजेड खोलीच्या एका कोपऱ्यात पडेल, बाहेरच्या अंगणात तो दिसणार नाही. विजेच्या बाबतीत मात्र एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून शेकडो किलोमीटर दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे वगैरेंना पुरवता येते. याच्या उलट पाहता मनगटी घड्याळासारख्या (रिस्टवॉचसारख्या) आणि सेलफोनसारख्या लहानशा यंत्राला लागणारी अत्यल्प वीज नखाएवढ्या बटनसेलमधून तयार करून त्याला पुरवता येते. विजेच्या या गुणामुळे तिचा उपयोग अनंत प्रकारांनी केला जातो.

वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, प्रवाह यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये तिचे परिवर्तन करणे सुलभ असते. मायक्रोफोनमध्ये ध्वनी पासून विजेचा प्रवाह तयार होतो आणि स्पीकरमध्ये याच्या उलट होते, विजेच्या बल्बमधून प्रकाशकिरण बाहेर पडतात आणि सोलर सेलमध्ये त्याच्या उलट होते, विजेद्वारे चक्र फिरवता येते आणि त्या चक्राला पाती जोडून त्याचा पंखा किंवा पंप केला की त्यांच्या उपयोगाने हवेचा किंवा पाण्याचा प्रवाह तयार करता येतो. यांच्या उलट वॉटरटर्बाइन्समधील पाण्याच्या प्रवाहामुळे एक चाक फिरते आणि त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. ओव्हन, हीटर, गीजर वगैरेंमध्ये विजेपासून ऊष्णता निर्माण होते तर स्टीम टर्बाइन किंवा गॅस टर्बाइन्समध्ये ऊष्णतेचे परिवर्तन विजेमध्ये केले जाते. घरकामात, ऑफीसांमध्ये किंवा अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये विजेचा वापर करणे सोयिस्कर आणि किफायतशीर झालेले असल्यामुळे अन्य मार्गांनी उपलब्ध झालेल्या ऊर्जेचे विजेमध्ये परिवर्तन करून तिचा कामासाठी उपयोग करणे आता रूढ झाले आहे. दुर्गम अशा अरण्यांमध्ये किंवा पर्वतशिखरांवर जिथे वीज नेऊन पोचवणे फार कठीण आहे असे अपवाद वगळल्यास बाकीच्या बहुतेक सगळ्या जगात आता विजेचा उपयोग हा माणसाच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

मानवी संबंध

संबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) गोष्टींशीसुद्धा असतात. आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.

आपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.

मानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद देतो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.

इंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का? असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते. एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो. आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.

संबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.

संपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात. ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात. अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो! आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.

आपण माणसामाणसांमधल्या संबंधांचा विचार करतो त्यावेळी बहुतेक वेळा तो विचार त्यांच्या आपसातल्या चांगल्या संबंधांबद्दल असतो. जवळच्या किंवा सर्वात आतल्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध असतात, माणसांमाणसांमधले अंतर जसजसे वाढत जाते तसतशी त्या संबंधांची वीण सैल होत जाते. थोड्या बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांशी सर्वांचे सलोख्याचे संबंध असतात आणि दूरच्या इतर लोकांशी कामापुरते वरवरचे संबंध असतात. ज्यांच्याबद्दल मनात वैरभाव किंवा द्वेष असतो त्यांच्याशी सहसा कोणी संबंध ठेवतच नाहीत आणि ठेवलेच तर ते औपचारिक तोंडदेखले खोटे खोटे असतात, म्हणजे खरे तर ते नसल्यातच जमा असतात. काही वेळा मात्र एका माणसाला दुसरा माणूस जवळचा वाटत असतो पण तो मात्र पहिल्या माणसापासून दूर दूर रहात असतो असे अनुभवसुद्धा येतात. यामुळे त्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होतात. दोन व्यक्तींमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होत असतांना त्यामधून आपुलकीची भावना निर्माण होते. आपुलकी आणि प्रेमाच्या धाग्याने ते लोक एकमेकांशी बांधले जातात, म्हणून त्यांना संबंध असे म्हणायचे. हे बंधन का आणि कसे होत असेल?

परमेश्वराने किंवा निसर्गाने जगातल्या सर्वच प्राणिमात्रांना स्वतःचा जीव वाचवण्याची एक जबरदस्त अंतःप्रेरणा (Instinct) दिलेली आहे. किडामुंगींपासून वाघ, सिंह. हत्ती वगैरेंपर्यंत प्रत्येक जीव स्वसंरक्षणासाठी सदोदित धडपडत असतो. आपल्या जिवाला धोका आहे असे वाटताच तो लपून बसतो, पळून जातो किंवा शत्रूवर प्रतिहल्ला चढवतो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या शरीराला अन्नाची गरज असते म्हणूनमुळे ते शोधत तो फिरत असतो आणि त्याला विश्रांती व निद्रा यांची गरज असते म्हणून त्यासाठी तो निवारा पाहतो. या दोन्हींचा समावेशसुद्धा त्या प्राण्याच्या जीव वाचवण्याच्या मूलभूत प्रेरणेबरोबरच करता येईल. या बाबतीत प्रत्येक प्राणी हा मुख्यत्वे स्वार्थीच असतो. सशक्त शाकाहारी प्राणी दुसऱ्या कमजोर प्राण्याच्या समोरचे अन्न बिनदिक्कतपणे खायचा प्रयत्न करतात तर मांसाहारी प्राणी दुसऱ्या प्राण्यांनाच खाऊन टाकतात. निवाऱ्याच्या बाबतीतसुद्धा निसर्गामध्ये बळकावणे चाललेले असते. सगळे नागोबा आयत्या बिळातच घुसून वास्तव्य करतात. तसे पाहता माणूससुद्धा त्याच्या मूळ स्वभावाने स्वार्थीच असतो, संस्काराने त्याच्यात बदल होतात. त्याशिवाय इतरही काही कारणे असतात.

समस्त प्राणीमात्र नेहमी स्वतःचा स्वार्थ पहात असले तरी त्यांना इतर प्राणीमात्रांच्या सोबतीनेही रहायचे असते. कदाचित त्यात त्यांना अधिक सुरक्षित वाटत असेल. म्हणजे हा सुद्धा आपला जीव वाचवण्याचाच एक भाग झाला. तशा प्रकारची दुसरी अंतःप्रेरणाही त्याला मिळत असते. यामुळेच जगातले बहुतेक प्राणी, कीटक, मासे, पक्षी वगैरे जीव कळप करून राहतात. तसे रहात असतांना त्यांना स्वतःच्या स्वार्थाला थोडी मुरड घालणे, थोड्या गोष्टी इतरांसाठी सोडणे, इतरांचा थोडा त्रास सोसणे वगैरे करणे भाग असते. एकाद्याने तसे नाही केले तर कळपातले इतर प्राणी त्याला हुसकावून लावतील अशी भीती असते. बहुतेक सगळी माणसेसुद्धा लहानमोठ्या समूहांमध्ये राहणेच पसंत करतात. आपले कुटुंब, वस्ती, गाव, प्रदेश, देश, जग किंवा कुटुंब, पोटजात, जात, धर्म अशा चढत्या भाजणीने त्यांच्या समूहाच्या व्याख्या बदलत जातात एवढेच. त्याचे वागण्याचे नियम त्यानुसार ठरत जातात आणि ते पाळण्याची गरज त्यांना वाटते. ते करत असतांना स्वार्थाला बाजूला ठेवावे लागतेच.

पण या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी आणखी एक दिव्य अशी अंतःप्रेरणा माणसाला तसेच इतर जीवांना मिळत असते. प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्या पिलांवर माया करतात, त्यांचे जिवापाड संरक्षण करतात, त्यांच्यासाठी अन्नाची तरतूद करतात. यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो किंवा हा परस्पर सहकाराचा भागही नसतो. यात शुद्ध आपुलकी आणि प्रेम असते. पक्षी जोडप्याने रहात असतात, त्यांनाही आपल्या जोडीदाराविषयीसुद्धा विशेष असे काही वाटत असणार. एका कळपातल्या प्राण्यांमध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण होत असते. पाळीव प्राणी नेहमीच त्यांना पाळणाऱ्यांशी मायेच्या नात्याने जोडले जातात. हे मुके जीव त्यांच्या डोळ्यांमधून किंवा अंगलटीला येऊन प्रेम व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी तर अत्यंत इमानदार समजला जातो. त्यांचे हे वागणे हे नैसर्गिक स्वार्थभावनेच्या विरुद्ध असले तरी होत असते. ते कशामुळे होत असेल ?

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा पगडा सर्व माणसांच्या आचार आणि विचारांवर असतो आणि त्यानुसार ती वागत असतात असे आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिले आहे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीन गुणांचे प्रमाण मात्र निरनिराळे असते. दुसऱ्याकडील वस्तू हिसकावून किंवा लुबाडून घेणे, तिचा विध्वंस करणे ही राक्षसी वृत्ती माणसातल्या तम या वाईट गुणाच्या प्रभावामुळे येते. आपल्याला हवे असेल ते आपल्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने मिळवण्याची धडपड सर्वसाधारण माणसे करत असतात. ही मानवी वृत्तीची क्रिया त्यांच्यातल्या रज या गुणामुळे त्यांच्याकडून घडत असते. काही दुर्मिळ लोक स्वतः उपाशी राहून आपला घास भुकेल्यांना भरवतात, इतरांचा फायदा व्हावा यासाठी स्वतः तोशीस सोसतात. इतरांना सुखी करण्यात स्वतःचा आनंद शोधतात. अशा लोकांची गणना देवमाणूस म्हणून केले जाते. परोपकार, दया, माया, भक्ती, सचोटी, कृतज्ञता वगैरे दैवी गुण माणसातल्या सत्त्वगुणामधून येतात. प्रेमाची भावना हे सत्त्वगुणाचे सर्वात सुंदर असे रूप आहे. प्रेमळ लोक सात्त्विक प्रवृत्तीचे असतात किंवा सात्त्विक लोक प्रेमळ असतात असे आपण पाहतोच. प्रत्येक माणसाच्या अंगात काही प्रमाणात सत्त्वगुण असतात आणि जे कोणी लोक त्याला आपलेसे वाटत असतात त्यांच्यासंबंधी त्यालासुद्धा प्रेम, माया, ममता वगैरे वाटत असते, तो त्यांची काळजी करतो आणि घेत असतो.

प्रेम ही भावना बांधून ठेवणारी असते. त्याने माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि राहतात. माणसांना जन्मतःच आईचे प्रेम मिळते आणि ते मिळत राहते. वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू वगैरे घरातील इतर व्यक्तींचा लळा त्यांना सहवासातून लागत जातो. त्यात हळूहळू इतर नातेवाईक, शेजारी, शिक्षक वगैरेंची भर पडत जाते. पुढे त्यांचा स्वतःचा मित्रपरिवार निर्माण होतो आणि तो वाढत जातो. तरुण वयात ते आपल्या जोडीदाराची निवड करतात. नैसर्गिक आकर्षणामुळे त्यांच्या एकमेकांवर वसलेल्या प्रेमाचे धागे खूप घट्ट होतात. ते बंध त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे वाटायला लागतात. अगाध मित्रप्रेमाविषयी खूप लिहिले गेले आहे. देश, धर्म यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमासाठी कित्येक भक्तांनी बलिदान केलेले आहे. देवभक्तीमध्ये लीन झालेल्या व्यक्तीला इतर कशाचेच भान रहात नाही. इतकेच काय पण लेखक, कवी, गायक, नटनट्या यांच्यावरील एकतर्फी प्रेमापोटी माणसे वेडी होतात. आवडत्या नेत्याचे अनुयायी आपले तनमनधन त्याला अर्पण करतात.

या सगळ्याच्या मागे असलेले प्रेमबंध हे समान कारण असते. ज्या व्यक्ती, संस्था किंवा समाज यांच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते, त्याच्या संबंधातले सगळे काही जाणून घ्यायला, ऐकायला, बोलायला आपल्याला आवडते, त्याला काही होणार तर नाही ना किंवा त्याचे कसे होणार याची चिंता वाटते आणि काही बिनसले तर दुःख होते, त्याला यश मिळाले तर आनंद होतो. कारण आपण त्याच्याशी जोडले गेलेले असतो. ग्वाटेमालात एकादा अपघात झाला किंवा सोमालियात दंगल झाली आणि त्यात जीवित वित्त यांची हानी झाली असे आपण बातम्यांमध्ये वाचले किंवा ऐकले तर क्षणभर हळहळ वाटेल, पण तसे काही पुण्यामुंबईला घडले तर आपण बेचैन होऊन जातो कारण ज्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते अशा अनेक व्यक्ती तिथे रहात असतात किंवा काही कारणाने तिथे गेलेल्या असतात, आपल्याला त्यांची काळजी वाटते, तिथल्या काही जागांना आपल्या भावविश्वात स्थान असते, त्या ठिकाणच्या नेमक्या परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. या सर्वांशी आपण बांधले गेलेलो असल्यामुळे तिथे काय घडले याचा आपल्यावर परिणाम होतो.

या विषयावर असंख्य लोकांनी अगणित वेळा अमाप लिहिले असले तरी पुन्हा त्यावर लिहावेसे वाटते कारण या विषयाबद्दल आपल्याला आणि वाचकांना वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमबंध.

कंकणाकृती सूर्यग्रहण

कंकणाकृती सूर्यग्रहण

नुकतेच एक कंकणाकृती सूर्यग्रहण होऊन गेले. अशा प्रकारचे ग्रहण हा निसर्गाचा चमत्कार क्वचित आणि काही ठिकाणांहूनच पहायला मिळतो. या वर्षी दक्षिण भारतातल्या काही भागांमध्ये हे अनोखे ग्रहण पहायला मिळाले. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे सावल्यांचे खेळ असतात एवढे शाळेतल्या शिक्षणात शिकवले जातेच. ते कसे होतात हे पहाण्यासाठी आधी सूर्य आणि चंद्राबद्दल थोडे समजून घेतले पाहिजे.

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची मांडणी दाखवण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण घेऊ. एका क्रिकेटच्या मैदानाच्या मधोमध लाल भोपळ्याएवढ्या आकाराचा सूर्य ठेवलेला असला तर त्याच्या बाउंडरीलाईनवरून वाटाण्याएवढी पृथ्वी आणि तिच्यापासून वीतभर अंतरावर मोहरीएवढा चंद्र फिरत असतात असे दिसते. त्या वाटाण्यावर बसलेल्या एकाद्या सूक्ष्म जंतूला आपण स्थिरच आहोत असे वाटेल आणि स्टेडियमच्या पार्श्वभूमीवर तो तेजस्वी भोपळा मात्र जागचा हलतांना दिसेल, त्याचप्रमाणे मोहरीएवढा चंद्रसुध्दा त्या पार्श्वभूमीवर फिरतांना दिसेल.

माणसांच्या जगातसुध्दा असेच कांहीसे होत असते. आपल्या सभोवती असलेली घरे, झाडे, शेते, डोंगर वगैरे सारे कांही नेहमी जागच्या जागी दिसते पण आकाशातले सूर्य, चंद्र आणि चांदण्या रोज इकडून तिकडे जातांना दिसतात. अनेक संशोधकांनी त्यांच्या फिरण्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरून कांही निष्कर्ष काढले, इतर अभ्यासकांनी त्यावर सखोल चर्चा करून ते मान्य केले आणि त्यातून खगोलशास्त्र विकसित झाले. त्यातल्या कांही ढोबळ गोष्टींचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्यामुळे पाठ्यपुस्तकांतून ती माहिती आपल्यापर्यंत पोचली. पण कांही थोडी मुलेच ते धडे लक्षपूर्वक वाचतात, बाकीची मुले नसती कटकट समजून ते धडे वाचतच नाहीत, कांही मुलांना ते वाचूनही समजत नाहीत, पटत नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर लक्षात रहात नाहीत. शाळेत शिकलेल्या ज्या माहितीचा पुढील जीवनात उपयोग होतो त्याची तेवढी उजळणी होत रहाते आणि बाकीची माहिती विस्मृतीत हरवून जाते.

रोजच्या जीवनाचा आधार असलेला सूर्य सर्वांना चांगला परिचयाचा असतो. विजेच्या दिव्यांच्या लखलखाटाची संवय झाल्यावर रात्रीच्या काळोखातल्या आकाशाकडे फारसे कोणी पहात नसले तरी अधून मधून अवचित नजरेला पडणारा आकर्षक चांदोबाही ओळखीचा असतो, चांदण्यांच्या गर्दीतून शनी आणि मंगळ यांना शोधून काढून त्यांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणारा इसम मात्र मला बरेच दिवसात भेटलेला नाही. पण वर्तमानपत्रे आणि टेलीव्हिजनवर त्यांच्याबद्दल जे रोज सांगितले जाते त्यावरून हे दोघेजण कुंडलीच्या एका घरातून दुसर्‍या घरात जात फिरत असतात किंवा कुठे तरी ठाण मांडून बसलेले असतात आणि जिथे कुठे असतील तिथून आपल्याला उपद्रव देत असतात अशी समजूत होणे शक्य आहे.

या विषयावर होत असलेल्या चर्चा मोठ्या मनोरंजक असतात. संशोधनातून सप्रमाण सिध्द झालेली तथ्ये बहुतेक लोकांना पटलेली असावीत असे वरवर वाटले तरी अनेक लोक आपल्या ‘महान आणि प्राचीन’ ज्योतिषशास्त्राच्या नावाने सांगितल्या जात असलेल्या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य नक्कीच असेल अशी सर्वसमावेशक भूमिका घेतात तर कांही लोकांना त्यात फारसा रस नसल्यामुळे ते सगळ्यांच्या बोलण्याला हो ला हो करत असतात. कांही लोकांच्या मनात विज्ञानाविषयी अढी असते तर स्वधर्म, स्वराष्ट्र, संस्कृती वगैरेंना विज्ञानामुळे बाधा पोचते अशी तक्रार कांही लोक करत असतात. चांगल्या आणि सुशिक्षित लोकांच्या मनात असलेल्या विज्ञानाबद्दलच्या औदासिन्य, अनादर, संशय, द्वेष वगैरे भावनांचा विचार करून मी विज्ञानाची पुस्तके बाजूला ठेवली आणि फक्त साध्या डोळ्यांना जेवढे दिसते किंवा आपण पाहू शकतो तेवढीच या विषयावरील माहिती या लेखात द्यायचे ठरवले.

कांही सुदैवी लोकांना अंथरुणात पडल्या पडल्या सकाळी खिडकीतून सूर्योदय पहायला मिळतो, कांही लोकांना त्यांच्या अंगणातून किंवा बाल्कनीतून तो दिसतो आणि इतरांना त्यासाठी जवळच्या मोकळ्या मैदानात किंवा टेकडीवर जावे लागते. भल्या पहाटे उठून आकाशात पहात राहिले तर तिथल्या काळोखाचा गडदपणा हळूहळू कमी होत जातो, तसतशा लुकलुकणार्‍या चांदण्या अदृष्य होत जातात. आकाशात धूसर प्रकाश पसरतो त्याच्या बरोबर विविध रंगांची उधळण होतांना दिसते. अचानक पूर्व दिशेला एक लालसर रंगाचा फुगवटा जमीनीतून वर येतांना दिसतो आणि पाहतापाहता त्या सूर्याचे पूर्ण बिंब वर येतांना दिसते. वर येतायेतांनाच त्याचा रंग पालटत असतो आणि तेज वाढत जाते. तो क्षितिजाच्या थोडा वर आल्यानंतर त्याच्याकडे पाहणे अशक्य होते. त्यानंतर तो आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हाच्या सुमारास माथ्यावर येतो आणि त्यानंतर दुसर्‍या बाजूने खाली उतरत जातो हे आपल्याला जाणवते. अखेर संध्याकाळ झाल्यावर सकाळच्या उलट क्रमाने तो अस्ताला जातो. हे रोजचेच असल्यामुळे आपल्याला त्यात कांही विशेष वाटत नाही आणि आपण ते पहाण्याचा मुद्दाम प्रयत्न करत नाही, पण एकादे दिवशी दृष्टीला पडले तर मात्र मंत्रमुग्ध होऊन ते अनुपम दृष्य पहात राहतो.

रोज होत असलेल्या सूर्योदय आणि सूर्यास्तात कांही फरक असतो कां? आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सूर्योदय पाहिला तर तिथून दिसणाऱ्या क्षितिजाच्या भागात तो जमीनीतून वर येतांना दिसेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अस्ताला जातांना तो क्षितिजाला वेगवेगळ्या जागी स्पर्श करतांना दिसेल. सूर्य, चंद्र आणि चांदण्या जेंव्हा आपल्याला दिसत नाहीत तेंव्हासुध्दा त्या अस्तित्वात असतातच. दिवसा सूर्याच्या प्रखर तेजामुळे आकाशातल्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत आणि रात्री जेवढ्या चांदण्या आपल्याला एका वेळी दिसत असलेल्या आकाशाच्या भागात असतात तेवढ्याच त्या वेळी दिसतात. बाकीच्या चांदण्या जमीनीच्या खाली असलेल्या आभाळाच्या भागात असतात.

आपण ठरवून रोज एकाच जागेवरून सूर्योदय पहायचे ठरवले तर काल तो जिथे आणि ज्या वेळी उगवला होता तिथेच आणि त्याच वेळी तो आज उगवला आहे असे कदाचित आपल्याला वाटेल, पण त्या दोन्हींमध्ये किंचित फरक असतो. काल आणि आज यामधला म्हणजे एका दिवसातला सूक्ष्म फरक आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त दर रविवारी सूर्योदय पाहून त्याची नोंद ठेवायची असे ठरवले तर मात्र मागल्या रविवारच्या मानाने या रविवारी उगवण्याच्या वेळी क्षितिजावरच तो थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूला सरकला असल्याचे तसेच काही मिनिटे लवकर किंवा उशीराने उगवल्याचे लक्षात येईल. एकदा (२२ जूनला) तो उजव्या बाजूला सरकायला लागला की सहा महिने तिकडे सरकत जातो आणि त्याबरोबर रोज आदल्या दिवसाच्या मानाने उशीराने उगवत जातो. त्यानंतर (२३ डिसेंबरपासून) त्याची उगवण्याची जागा पुढील सहा महिने डाव्या बाजूला सरकत जाते आणि तो लवकर उगवू लागतो असे चक्र चालत राहते. सूर्याच्या मावळण्याची जागासुध्दा अशीच डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकत जाते, मात्र तो जेंव्हा लवकर उगवतो तेंव्हा उशीरा मावळतो त्यामुळे दिवस मोठा वाटतो आणि उशीराने उगवल्यावर लवकर अस्ताला गेल्यामुळे दिवसाचा काळ लहान होतो.

माध्यान्ही सूर्य साधारणपणे आपल्या माथ्यावर येतो. मुंबईपुण्याला तो दुपारी सुमारे साडेबारा वाजता आकाशातली सर्वात जास्त उंची गांठतो आणि त्यानंतर खाली येऊ लागतो. पण तो आपल्या डोक्याच्या अगदी बरोबर वर क्वचितच म्हणजे वर्षभरात फक्त दोनदाच येतो. उगवतीकडे तोंड करून वर आकाशाच्या दिशेने पाहिले तर वर्षाच्या बर्‍याचशा काळात तो आपल्याला थोडा उजवीकडे (म्हणजे दक्षिणेकडे) दिसतो आणि थोडे दिवस तो डाव्या बाजूला कललेला वाटतो. भोपाळच्या पलीकडे ग्वाल्हेर किंवा दिल्लीला राहणार्‍या लोकांना वर्षभर रोज तो उजव्या बाजूलाच दिसतो, सकाळी उगवतांना उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही बाजूला सरकला असला तरीसुध्दा माथ्यावर येतायेता तो फक्त उजवीकडेच झुकलेला असतो. सूर्याचे उगवण्याचे ठिकाण, माथ्यावरचा बिंदू आणि मावळण्याची जागा यांना जोडणारी काल्पनिक कमान काढली तर तो त्या दिवशी सूर्याच्या आकाशातल्या भ्रमणाचा मार्ग झाला. बादलीची कडी उचलून थोडी तिरपी धरली तर जशी दिसेल तसा त्या कमानीचा आकार असतो. रोजच्या रोज तो किंचित बदलत असतो.

आकाशातल्या सूर्याकडे लक्षपूर्वक पाहणे कठीण असते, तसेच आकाशात कसलीही खूण नसल्यामुळे त्याचा मार्ग नीटसा समजत नाही. पण सूर्याच्या भ्रमणाचे अप्रत्यक्ष रीतीने निरीक्षण करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपल्या अंगणात किंवा गच्चीवर जिथे दिवसभर ऊन पडते अशा जागी एक हातभर उंचीची काठी उभी करून ठेवली तर तिची सावली जमीनीवर कुठे पडते ते पाहून त्याची नोंद करणे शक्य असते. सकाळी आणि संध्याकाळी आपली सावली लांबवर पडते आणि दुपारी ती लहान होते हे सर्वांना ठाऊक असते, पण तिची दिशा बदलत असल्याचे कदाचित लक्षात येत नसेल. मी दिलेला प्रयोग करून पाहिल्यास काठीची सांवली लहान मोठी होता होतांना घड्याळाच्या कांट्या प्रमाणे त्या काठीभोंवती फिरते हे दिसून येईल. त्या आडव्या सांवलीचे टोक आणि उभ्या काठीचे टोक यांना जोडून एक काल्पनिक रेषा काढली तर सूर्याच्या मार्गाचा अंदाज त्यावरून करता येतो.

चंद्राचे तेज एवढे प्रखर नसल्यामुळे त्याचा आकाशातला मार्ग पाहणे सोपे असेल असे वाटेल. पण दिवसा चंद्र दिसतच नाही आणि पौर्णिमा सोडल्यास इतर दिवशी तो रात्रभर आभाळात दिसत नाही. शिवाय रात्री जागून त्याला पहात राहणे कठीण असते. त्याशिवाय सूर्य जसा रोज सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो तसे चंद्राचे नाही. त्याच्या उगवण्या मावळण्याच्या वेळा रोज बदलत असतात. त्यामुळे त्याचे निरीक्षण करण्यासाठी महिनाभर सुटी घेऊन एकाद्या सोयिस्कर ठिकाणी जाऊन रहायला पाहिजे. पण आपल्याला जेवढे जमते तेवढे पाहिले तरी बरीचशी माहिती मिळू शकते.

पौर्णिमेच्या दिवशी एका बाजूला सूर्य मावळत असतो त्याच सुमाराला दुसर्‍या बाजूने पूर्ण गोलाकार चंद्र उगवतो आणि रात्रभर आपल्यावर चांदणे शिंपून दुसरे दिवशीच्या सूर्योदयाच्या सुमाराला त्याच्या विरुध्द बाजूला मावळतो. फक्त याच दिवशी आपण त्याचा उदय व अस्त हे दोन्ही पाहू शकतो. त्याच्या दुसर्‍या दिवशी सूर्य अस्ताला गेला तरी चंद्राचा पत्ताच नसतो. तो सावकाशीने उगवतो आणि रात्रभर आकाशात राहून दुसरे दिवशी उन्हे वर आल्यानंतर मावळतो, पण तोपर्यंत तो अत्यंत फिकट झाला असल्यामुळे आपल्याला नीट दिसत नाही. त्यानंतरही तो रोज सुमारे पाऊण तास उशीरा उगवत जातो आणि आकाराने लहान लहान होतांना दिसतो. आठवडाभराने पाहिल्यास मध्यरात्रीच्या सुमारास अर्धगोलाच्या आकाराचा चंद्र उगवतो आणि उत्तररात्री प्रकाश देतो. रोज असाच उशीर करता करता आणखी चार पाच दिवस गेल्यानंतर तो सूर्याच्या पुढे असल्यासारखा वाटतो. पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी उगवलेली चंद्राची कोर सूर्योदयाच्या आधी पूर्वेच्या आकाशात दिसते आणि सूर्याच्या प्रकाशात लुप्त होते. त्यानंतर अमावास्येला सूर्य आणि चंद्र साधारणपणे एकाच वेळी उगवतात आणि मावळतात. दिवसा सूर्याच्या उजेडात चंद्र दिसत नाही आणि रात्री तो आभाळात नसतोच. त्यामुळे अवसेची काळोखी भयाण रात्र होते. त्यानंतर चंद्राच्या पुढे गेलेला सूर्य आधी मावळतो आणि त्याच्या अस्तानंतर चंद्राची रेघेसारखी कोर थोडा वेळ दिसून सूर्याच्या पाठोपाठ अस्तंगत होते. चंद्राचे उशीराने आकाशात येणे आणि जाणे चालूच राहते. दिवसा तो उगवतो आणि सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात राहून मावळतो. या काळात तो आकाराने मोठा होत होत पौर्णिनेला त्याचे पूर्ण बिंब सूर्यास्ताच्या सुमाराला उगवते. हे चक्र चालत राहते. त्यामुळे पौर्णिमा सोडली तर इतर रात्री तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसू शकतो. तो जेवढा काळ आकाशात दिसतो त्याचे निरीक्षण करून तेवढ्या काळातला त्याचा मार्ग पाहता येतो आणि ती वक्ररेषा वाढवून त्या मार्गाच्या उरलेल्या भागाची कल्पना करता येते.

सूर्याचा आकाशातला मार्ग सूक्ष्म रीतीने रोज बदलतो तर चंद्राचा मार्ग जाणवण्याइतपत वेगाने बदलत असतो. हा मार्ग सुध्दा बादलीच्या तिरप्या कडीच्या आकाराचा असला तरी तो सूर्याच्या मार्गापासून भिन्न असतो. हे दोन्ही मार्ग एकमेकांना छेद देतात, पण सूर्य आणि चंद्र वेगवेगळ्या वेळी आकाशात येत असल्यामुळे त्यांची टक्कर होत नाही. पण कधीकधी ते दोघेही आपापल्या मार्गावरून जातांजातां एकमेकांच्या अगदी जवळ जवळ येतात. सूर्यग्रहणाच्या २-३ दिवस आधी जर कोणी पहाटे उठून आधी उगवलेला चंद्र आणि नंतर झालेला सूर्योदय पाहिला तर ते दोघेही जवळ जवळ एकाच ठिकाणी क्षितिजावरून वर येतांना दिसतील. ग्रहणाच्या दिवशी सकाळी उगवतांना ते दोघेही एकापाठोपाठ आणि एकाच जागेवरून उगवतील.

आधी उगवलेल्या चंद्राची काळोखात असलेली बाजू पृथ्वीकडे असल्यामुळे आपल्याला तो दिसणारच नाही. त्याच्या मागून उगवलेला सूर्य जराशा जास्त वेगाने वर वर चढत जातांना हळूहळू चंद्राच्या मागे जायला लागतो. चंद्राच्या आड गेल्यामुळे पलीकडे असलेला सूर्याचा कांही भाग झाकला जातो. सुरुवातीला चंद्र पुढे असल्यामुळे मागून आलेल्या सूर्याचा वरचा भाग त्याच्या आड जाऊन आपल्याला दिसत नाही. दोघेही क्षितिजापासून वर सरकत असतांना सूर्याचा वेग किंचित जास्त असल्यामुळे हळूहळू त्याचा मधला भाग दिसेनासा होतो. त्यानंतर खालचा भाग झाकला जातो तेंव्हा वरचा भाग दिसायला लागतो आणि कांही काळानंतर चंद्राच्या बिंबाला पूर्णपणे पार केल्यानंतर सूर्याचे पूर्णबिंब दिसू शकते. कांही ठिकाणी कांही मिनिटांकरता सूर्य पूर्णपणे झाकला जातो. त्याला खग्रास ग्रहण म्हणतात. किंवा तो एकाद्या प्रकाशाच्या बांगडीसारखा कंकणाकृती दिसतो. ही ग्रहणे पृथ्वीवरील एका लहानशा पट्ट्यावरच दिसू शकतात. पृथ्वीच्या इतर भागांमध्ये सूर्याचे बिंब अर्धवटच झाकले जाते त्याला खंडग्रास ग्रहण म्हणतात.

हे असे कां होते? कधी खग्रास, कधी कंकणाकृती आणि एरवी खंडग्रास अशी तीन प्रकारची ग्रहणे का होतात? सूर्याचा आकार चंद्राच्या आकाराच्या सुमारे चारशेपट मोठा आहे, पण तो चंद्राच्या तुलनेमध्ये चारशेपट दूरही आहे. त्यामुळे आपल्याला या दोघांचीही बिंबे साधारणपणे एकाच आकाराची दिसतात. सूर्य आणि चंद्र यांचे पृथ्वीपासून असलेले अंतर कमी जास्त होत असल्यामुळे त्यांच्या आपल्याला दिसणाऱ्या आकारात थोडा फरक येत असतो, त्यामुळे कधी सू्र्याचे बिंब किंचित मोठे किंवा लहान तर कधी चंद्राचे बिंब जरासे मोठे किंवा लहान दिसते. या वर्षी झालेल्या ग्रहणाच्या दिवशी चंद्र जास्त दूर गेलेला असल्यामुळे त्याच्या बिंबाचा आकार लहान होता आणि तो सूर्याला पूर्णपणे झाकण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे ज्या क्षणाला ही दोन्ही बिंबे आकाशातल्या एकाच बिंदूवर येऊन पोचली त्या वेळी सूर्याचा बहुतेक सगळा भाग झाकला गेला असला तरी सर्व बाजूने एक वर्तुळाकार कड शिल्लक राहिली. त्या क्षणाच्या आधी आणि नंतर सूर्य अर्धवटच झाकला जात असल्याने त्याची कोर दिसत होती. सूर्याच्या या निरनिराळ्या स्थिती वर दिलेल्या चित्रात दाखवल्या आहेत. खग्रास ग्रहणाच्या वेळी चंद्राचे बिंब किंचित मोठे असल्यामुळे संपूर्ण सूर्य त्याच्या मागे लपू शकतो. खग्रास आणि कंकणाकृती ग्रहणांच्या वेळी ही दोन्ही बिंबे आकाशातल्या एका बिंदूवर यावी लागतात, पण तसे सगळीकडे घडत नाही. या वर्षीसुद्धा मुंबईपुण्याहून दिसणारे सूर्याचे बिंब चंद्राने अर्धवट झाकले जाऊन उरलेला भाग चंद्राच्या बाजूला दिसतच राहिला असता. पुण्याला प्रत्यक्षात आभाळात खूप ढग आल्यामुळे सूर्याचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे त्याला लागलेले ग्रहणही दिसले नाही.

ग्रहणे कशी होतात याबद्दलच्या विज्ञानाची उजळणी करावीशी वाटली तर मी ती इथे दिली आहे.
तोच चन्द्रमा नभात – भाग १९ – हा खेळ सांवल्यांचा
https://anandghare2.wordpress.com/2010/07/06/%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%9a-%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7%e0%a5%af/