स्मृती ठेउनी जाती – भाग १६ – तात्या अभ्यंकर

मी हा लेख माझ्या आनंदघन या ब्लॉगवर तीन वर्षांपूर्वी लिहिला होता. आज या ठिकाणी देत आहे.

स्व.तात्या अभ्यंकर यांना त्यांच्या चाहत्यांनी मनोगत, फेसबुक आणि मिसळपाव या स्थळांवर दिलेल्या श्रद्धांजलींचे एक संकलन इथे वाचा.
https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D/

तेरा वर्षांपूर्वी रिटायर झाल्यानंतर मला आंतर्जालावर भटकायला भरपूर वेळ मिळायला लागला. त्या काळात मराठीमधून तिथे लिहिण्याची सुरुवातच होत होती. ते पाहून लहानपणापासून माझ्या मनात दडून बसलेली एक ऊर्मी उफाळून आली आणि मी माझा ब्लॉग सुरू केला. पण त्या काळात तो कोणी वाचतात का ते मला समजायला मार्ग नव्हता. कुणालाही मुक्त प्रवेश असलेल्या मनोगत या संकेतस्थळाची माहिती मला काही दिवसांनी मिळाली आणि मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला. इथले सदस्य तिथे आलेले बहुतेक लेखन कसेही असले तरी वाचत असत आणि लगेच त्यावर कॉमेंट्सही देत असत.

तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस, ३.१४विक्षिप्त, चित्त, केशवसुमार, अत्त्यानंद अशांसारखी नावे धारण करणारी दादा मंडळी होती आणि काही लोक आपल्या खऱ्या नावानेही तिथे वावरत असत. त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. नंतरच्या काळात त्याने रौशनी या नावाची एक दीर्घकथा लिहिली. सुरुवातीच्या काळात मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उद्योग बहुतेक सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मीसुद्धा त्याचा फॅन झालो होतो.

मनोगतवरील लेखांवर होत असलेल्या टोलवाटोलवीचे रूपांतर कधी कधी व्यक्तीगत भांडणांमध्ये व्हायला लागले ते पाहून तत्कालीन संचालकांनी एक प्रकारची सेन्सॉरशिप जाहीर केली. त्यामुळे प्रत्येक लिखाण किंवा त्यावरील टीका, टोमणे वगैरे आधी कुणीतरी नजरेखालून घातल्यानंतर ते प्रकाशित करायचे असे त्याचे स्वरूप झाले. पण स्पॉंटेनियटी हा तर त्या वादविवादांचा जीव होता. ती उत्स्फूर्तता गेली तर ते स्थळ निर्जीव किंवा सपक झाले असते. यावर विचार करण्याच्या निमित्याने विसोबाच्या पुढाकारातूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. (ही गोष्ट मला आता समजली.) मनोगतवर वावर असलेली ही मंडळी आहेत तरी कोण? याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली.

ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२५ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. गोरा गोमटा, अंगाने स्थूल, चेहऱ्यावर बेदरकारीचा आणि तितकाच आपुलकीचा भाव, मनमोकळे अघळपघळ बोलणे वगैरेंनी युक्त अशा तात्याचे माझ्यावर पहिले इंप्रेशन चांगले पडले. आम्हा दोघांच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तात्या तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपुलकीने सर्वांची चांगली आवभरत केली, आपल्या विनोदी बोलण्यामधून थट्टामस्करी करत सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडी तात्विक चर्चाही केली आणि थोडा बिहाग रागही गाऊन दाखवला. सगळ्या अनोळखी लोकांनी जमवलेला तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय असा अनुभव होता. तिथे मला पहिल्यांदा भेटलेले काही सदस्य माझे जन्मभराचे मित्र झाले.

तात्याचे बिंधास वागणे किंवा बेछूट लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवत नसेल आणि त्यांनी ढवळाढवळ केलेली तात्याला चालत नसेल. यावर उपाय म्हणून तात्याने स्वतःचे मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि त्याच्याच शब्दातले त्याचे हे ‘हॉटेल’ उत्तम प्रकारे चालवले. तिथली सदस्यसंख्या आणि तिथे येणाऱ्या लेखांची संख्या भराभर वाढत गेली. मनोगतवरील तात्याचे अनेक मित्र तिथे रोजच्या रोज काहीबाही लिहीत होतेच, इतरही अनेक नवे सदस्य तिकडे आकर्षिले गेले आणि ज्ञान व मनोरंजन यांचा एक खजिनाच मराठी वाचकांना उपलब्ध झाला. या अजब प्रकारच्या हॉटेलातले काम कसे चालत असे यावर मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक हलका फुलका लेख खाली दिला आहे.

काही वर्षांनंतर तात्याने बहुधा मिसळपावमधूनही आपले अंग काढून घेतले आणि फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. तिथेही रोजच त्याचे स्वतःचे आणि इतर मित्रांचे मजेदार लेखन वाचायला मिळत असे. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने या दोन्ही ठिकाणी मला पाचारण केले होते आणि मीसुद्धा तो माझा बहुमान समजून अधून मधून दोन्हीकडे चकरा मारून येत होतो. अलीकडच्या काळात वॉट्सॅप आल्यानंतर बेसुमार वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नव्हतो. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.

तात्याच्या व्यक्तीगत जीवनाविषयी मला काहीच माहिती नव्हती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तो कसला तरी व्यवसाय करतो एवढेच समजले होते. त्याचा परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी दिसत होती. तो आपल्या लेखांमध्ये स्वतःबद्दल काहीबाही लिहायचा, पण त्यातले किती खरे मानायचे आणि किती काल्पनिक ते समजायला मार्ग नव्हता. तो गेल्यानंतर त्याला दिल्या गेलेल्या श्रद्धांजलींमधून मला माहीत नसलेली बरीच नकारात्मक माहिती पुढे आली. त्याच्या कुठल्याशा व्यवसायामध्ये त्याला मोठी खोट बसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे वाटते. तो इतके छान लिहीत असे, पण या उपजत प्रतिभेमधून त्याला कधीच खूप पैसे मिळवता आले नाहीत. त्याने दिवसातला बराच वेळ लेखनामध्ये खर्ची घातला, पण त्यातून कमाई करायचा प्रयत्नच केला नाही की आज घडीला त्याला सोयिस्कर मार्केट नाही कोण जाणे! पुस्तके लिहून प्रकाशित करणे किंवा कथा, पटकथा, संवाद वगैरे लिहिणे अशा गोष्टी तो छानपणे करू शकला असता असे मला तरी वाटते. तो एक उत्तम गायक होता, त्याचे मोठमोठ्या संगीतकारांशी किती चांगले संबंध होते ते तो फोटोंसह आपल्या लेखांमध्ये सांगत असे. पण त्याने या कलागुणाचाही व्यवसाय केला नसावा. “गंधर्वांना शाप असतात म्हणे” असे पु.ल.देशपांड्यांनी नंदा प्रधान या पात्राबद्दल लिहितांना लिहिले आहे. तात्या अभ्यंकरच्या जीवनाकडे पाहतांना तोसुद्धा एक असाच शापित गंधर्व असावा असे मला वाटले.

ठाण्यातल्या कट्ट्यात झालेल्या ओळखभेटीनंतर पुन्हा कधी आमची गाठभेट झाल्याचे आठवत नाही कारण आमची विश्वे संपूर्णपणे वेगवेगळी होती. त्यात आम्हाला एकत्र येण्याचे काही प्रयोजन किंवा कारण नव्हते. तसा योगायोगही आला नाही. पण मनोगत, मिसळपाव आणि शिळोप्याची ओसरी या स्थळांवर अधूनमधून माझे जाणे होत असल्यामुळे त्याचे प्रखर तसेच खेळकर अस्तित्व मात्र सतत जाणवत राहिले. आता ते सगळे संपले, पण त्याच्या स्मृती मनाच्या एकाद्या कोपऱ्यात नेहमी राहणार आहेत.

आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. जे वाचक जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील.
…. आनंद घारे

मिसळपाववरील पहिले वर्ष

एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने “या, बसा.” असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.

“तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?” असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल.

मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.

मिपाच्या सर्व विभागात ‘जनातलं, मनातलं’ हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्‍या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्‍या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्‍या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्‍या अशा नाना तर्‍हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्‍या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.

काथ्याकूट या सदरात होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. “वादे वादे जायते तत्वबोधः।” या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.

आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने ‘पदार्थ’ वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.

“जे न देखे रवी ते देखे कवी” असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्‍याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.

प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्‍याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात.

चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्‍या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक “परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?” वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ इथे तसेच दुसर्‍या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण “आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?” असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही.

बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. “पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना” असे म्हणतात ना!

मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्‍या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्‍याच्या पेटीत टाकायची सोय आहे. “आज आपण आपली बशी साफ केलीत कां?” अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही.

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.

अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.

  • आनंद घारे

तेथे कर माझे जुळती – भाग १८- श्रीकांत भोजकर

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या व्यक्तींबद्दल मला खूप आदर वाटला, ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडला अशा लोकांची लहानशी व्यक्तीचित्रे मी ‘तेथे कर माझे जुळती’ या मथळ्याखाली माझ्या ब्लॉगवर चितारलेली आहेत आणि जी माणसे माझ्या मनाला चटका लावून हे जग सोडून गेली त्यांच्या आठवणी मी ‘स्मृती सोडुनी जाती’ या लेखमालेमध्ये लिहिल्या आहेत. गेला बराच काळ मी या दोन्ही विभागात नवे लेख लिहिलेच नव्हते. आता पुन्हा या मालिकांमध्ये भर घालणार आहे. मी आज ज्या व्यक्तीविषयी लिहायला घेतले आहे त्या माझ्या प्रिय मित्राबद्दल मला आदरही वाटतो, एके काळी त्याने माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला होता, पण आता त्याच्या फक्त आठवणीच राहिल्या असल्यामुळे हुरहूरही वाटते. यामुळे त्याच्या आठवणींचा समावेश कोणत्या मथळ्याखाली करावा हा मलाही एक प्रश्नच पडला होता.

मी पुण्याच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांच्या वसतीगृहात रहायला गेलो तेंव्हा प्रिन्सिपॉलपासून विद्यार्थ्यांपर्यत किंवा रेक्टरपासून मेसमधल्या वाढप्यापर्यंत त्या परिसरातली एकही व्यक्ती माझ्या ओळखीतली नव्हती. मी अचानक एका पूर्णपणे अनोळखी अशा जगात रहायला गेलो होतो आणि त्यामुळे मनातून थोडा भांबावलेलाच होतो. माझ्या खोलीत माझ्याच वर्गातली आणखी दोन मुले होती, त्यातला प्रदीप मुंबईहून आला होता आणि अशोक कोल्हापूरचा होता. त्या दोघांचेही पूर्वीपासूनचे काही मित्र आमच्या तसेच आधीच्या बॅचमध्ये शिकत असल्यामुळे ते दोघे नेहमी आपल्या मित्रांच्या कंपूत जाऊन बसायचे आणि मी थोडासा एकटा पडलो होतो, नवीन मित्र जोडण्याच्या प्रयत्नात होतो.

मी अशा अवस्थेत असतांना “तो काय म्हणतोय् काय की रेss, मी ते काय ऐकणार नै बsघss …” असे काहीतरी माझ्या ओळखीचे हेल काढून मोठ्याने बोलत असल्याचे आवाज कानावर पडले. ते आवाज आजूबाजूच्या खोलीमधून येत होते म्हणून मी पहात पहात गेलो आणि मला त्या आवाजाचा मालक श्रीकांत भोजकर दिसला, मध्यम उंची पण पिळदार बांधा, तशाच पिळदार मिशा, भेदक नजर वगैरेनी युक्त असे रुबाबदार व्यक्तीमत्व असलेला मुलगा. त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला विचारले, “तू पणss बेळगावकडचा का रेss?” माझा अंदाज बरोबर होता. तो बेळगावचाच होता, पण दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहिल्याने त्याच्या बोलीभाषेवर पुण्याचे संस्कार झाले होते. मी दोन वर्षे मुंबईत राहून आलो असल्यामुळे माझ्या जमखंडीच्या बोलीभाषेत बंबइया हिंदीतले धेडगुजरी शब्द घुसले होते, पण माझ्या बोलण्याची मूळची कानडी स्टाइल फारशी बदललेली नव्हती. आम्ही दोघे एकाच भागातले असल्याची खूण लगेच पटली आणि आमची अशी ओळख झाली. पुढे तिचे रूपांतर कधी गट्टीत झाले आणि ‘मिस्टर भोजकर’चा ‘भोज्या’ होऊन गेला ते कळलेही नाही.

आमच्या भोज्याचा स्वभाव बोलका होता आणि त्याला सगळ्या बाबतीत आवडही होती आणि गतीही होती. त्यामुळे त्याच्याशी बोलायला विषयांची कमतरता नव्हतीच, मला त्याच्याशी संभाषण सुरू करण्यासाठी मुद्दाम काही करायची गरजच कधी पडली नाही. बहुतेक वेळा तोच काही ना काही मजेदार गोष्टी रंगवून सांगत असे. त्याला आमच्या लहानशा जगातल्या सगळ्या विषयांची माहिती असायचीच, त्यातल्या प्रत्येकावर त्याचे मत असायचे आणि त्यावर तो ठाम असायचा. काही बाबतीत तर हट्टीसुद्धा म्हणता येईल. रूढी परंपरांच्या काही बाबतीत तो जुन्या विचारांचा होता. तो शुद्ध किंवा कट्टर शाकाहारी होता. त्यासाठी त्याने पूर्णपणे शाकाहारी असलेल्या कर्नाटक क्लबच्या सेक्रेटरीशी कानडीमधून बोलून त्या मेसमध्ये प्रवेश घेतला होता. आधी संमिश्र स्वरूपाच्या महाराष्ट्र क्लबमधल्या सामिष पदार्थांची चंव पाहून घेतल्यानंतर भोज्याच्या ओळखीने मीसुद्धा कर्नाटक क्लबचा सदस्य झालो.

चीनबरोबर झालेल्या युद्धानंतरच्या त्या धामधुमीच्या काळात पाकिस्तानशीसुद्धा युद्ध होण्याची शक्यता दिसत होती आणि आम्ही कॉलेजात असतांनाच ते युद्ध झालेही. त्या काळातली परिस्थिती पाहता आम्हाला एन सी सी चे प्रशिक्षण कंपल्सरी केले होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांनी परेड मैदानावर जाऊन हजेरी लावली. कमांडंटने सांगितले की सर्वांनी संपूर्ण चेहेऱ्याची चांगली गुळगुळीत दाढी करूनच परेडला यायला पाहिजे, म्हणजे मिशा सफाचट करायला हव्या होत्या. श्रीकांतला आपल्या पिळदार मिशांचा अभिमान तर होताच, पण वडील जीवंत असणाऱ्या मुलाने मिशा उतरवणे हे त्याच्या दृष्टीने अक्षम्य होते. त्याने या प्रॉब्लेमवरही मार्ग काढला. त्या वेळी नौदलाच्या एन सी सी ची वेगळी शाखा होती आणि त्या शाखेत दाढी ठेवली तर मिशा ठेवायला परवानगी होती. भोज्याने लगेच त्या शाखेत नाव नोंदवले आणि जितका काळ एन सी सी चे ट्रेनिंग होते तितका काळ तो सरदारजी होऊन राहिला होता.

त्याच्या अंगात उपजतच भरपूर नेतृत्वगुण होते. त्यामुळे तो पाहता पाहता आपसूकच आम्हा सर्वांचा लीडर बनला. दोन मुलांमधले भांडण मिटवायचे काम असो किंवा रेक्टरकडे जाऊन कसली तक्रार करणे असो सगळ्यांची नजर भोजकरकडे जाई आणि तो पुढाकार घेऊन ते काम यशस्वीपणे तडीला लावून देत असे. त्याने निवडणूक लढवली असती तर कुठलेही पद त्याच्याकडे सहज चालून आले असते, पण हातात घेतलेले कोणतेही काम मन लावून लक्षपूर्वक करायचे अशी सवय त्याला होती आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अशी कुठलीही जास्तीची जबाबदारी अंगावर घ्यायची नाही यावर तो ठाम होता.

कॉलेजच्या तीन वर्षांच्या काळात हॉस्टेलमधल्या ज्या सात आठ मित्रांचा आमचा एक ग्रुप तयार झाला होता त्यात भोजकर नैसर्गिक लीडर होता. नेहमीचे डेक्कनवर फिरायला जाणे असो किंवा हॉटेलमध्ये (शाकाहारी) खाद्यंती, रेडिओवरली गाणी ऐकणे, कधी नाटकसिनेमा, लहानशी पिकनिक, पत्त्यांचा अड्डा जमवणे, सबमिशन्सचे काम उरकणे असो, किंवा नुसताच हसतखिदळत टाइमपास करणे असो या सगळ्यांमध्ये त्याचा उत्साह असायचाच आणि तो इतरांनाही सोबत घेऊन, कधी कुणाला डिवचून तर कधी धीर देऊन सगळ्यांना कामाला लावायचा. पुढे जाऊन इनिशिएटिव्ह, ड्राइव्ह, मोटिव्हेशन वगैरे मॅनेजमेंटमधले शब्द ऐकतांना माझ्या नजरेपुढे भोजकरचे उदाहरण लगेच उभे रहात असे. सकारात्मक विचार आणि धडाडी या गुणांचे वस्तुपाठ त्याच्या वागण्यामधून मिळत होते. अशा मित्रांमुळेच आमच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाची खडतर तपश्चर्येची वर्षे बरीच सुखावह झाली होती.

१९६६ मध्ये माझे इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण संपले आणि मी नोकरीसाठी मुंबईला जाऊन तिथे स्थायिक झालो. त्या काळात संपर्काची काही साधनेच नव्हती. हॉस्टेलमधल्या मित्रांचे परमनंट अॅड्रेस नसायचेच, माझ्याप्रमाणेच ते सगळेही नोकरी मिळेल तिकडे जाणार हे ठरलेलेच होते. मग त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा तरी कसा करायचा? आमच्यातल्या कुणाकडेच टेलीफोनही नव्हते आणि त्या काळात ते लगेच मिळण्याची सुतराम शक्यताही नव्हती. त्यामुळे अचानक कोणीतरी एकादा कॉलेजातला मित्र प्रवासात किंवा सिनेमा थिएटरात अशा ठिकाणी भेटला तर त्याच्याशी थोडे बोलणे व्हायचे आणि त्याला अशाच कुठेतरी भेटलेल्या इतर मित्रांची खबरबात त्याच्याकडून कळायची. अशा प्रकारे पहिली दोन तीन वर्षे मला भोजकरबद्दल थोडी उडती माहिती मिळत गेली आणि नंतर तीही मिळणे कमी कमी होत थांबले. या अथांग दुनियेत तो कुठे रहात होता, काय करत होता याचा मला मागमूसही लागत नव्हता.

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या मुंबईत घर घेतले होते. तिथे आजूबाजूला काही नवेजुने मित्र रहात होते ते नेहमी मला भेटत असत. तोपर्यंत इंटरनेट सुरू झाल्यामुळे माझे अनेक मित्र आधी ईमेलमधून आणि नंतर ऑर्कुट, फेसबुक वगैरेतून संपर्कात राहिले होते, पण ते सगळे मला नोकरीच्या अखेरच्या काळात भेटलेले होते. शाळा आणि कॉलेजमधला माझा कोणताच मित्र माझ्या या नव्या संपर्कमाध्यमांच्या कक्षेत अजून आला नव्हता. दहा वर्षांनी मी पुण्याला स्थलांतर केल्यावर मुंबईतल्या मित्रांचे प्रत्यक्ष भेटणे थांबले आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले माझे जुन्या काळातले कोणते मित्र आता कुठे भेटतील याचा शोध मी सुरू केला.

जेंव्हा श्रीकांत भोजकर आता पुण्यातच राहतो हे मला समजले तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला भेटायची प्रचंड उत्कंठा मला लागली आणि तो योगही लगेचच आला. आम्ही इंजिनियरिंग कॉलेजमधून केलेल्या निर्गमनाला पन्नास वर्षे पूर्ण होण्याचा सुवर्णमहोत्सव समारंभपूर्वक साजरा करायचे माझ्या काही मित्रांनी ठरवले आणि त्यासाठी पुण्यातल्या सगळ्या बॅचमेट्सची एक बैठक मल्टीस्पाइस हॉटेलमध्ये ठेवली गेली. मी त्या मीटिंगला आवर्जून हजेरी लावली आणि यापूर्वी मी ज्यांना विशीमध्ये पाहिले होते असे पण आता सत्तरीमध्ये गेलेले अनेक मित्र एकसाथ भेटले. त्यातल्या ज्याला मी अगदी सहजपणे ओळखू शकलो तो श्रीकांत भोजकरच होता. त्या कार्यक्रमानंतर आम्ही एकमेकांची थोडी विचारपूस केली आणि पुन्हा भेटायचे ठरवून निरोप घेतला. त्या काळात मी स्वतः बिकट परिस्थितीमधून जात होतो त्यामुळे भोजकरच्या घरी जाऊन त्याला भेटणे मला शक्य झाले नाही, पण आम्ही टेलीफोनवरून अनेक वेळा बातचित केली, ई मेल, फेसबुक आणि वॉट्सॅपवरून संदेशांची देवाणघेवाण करीत राहिलो.

त्याच्या बोलण्यावरून मला असे समजले की भोजकरने आधीची काही वर्षे इंजिनियरिंगच्या क्षेत्रात काम केले आणि त्यामधून तो मॅनेजमेंटकडे वळला. पण दुसऱ्याची चाकरी करून तो सांगेल ते काम करण्यापेक्षा स्वतः शिक्षक होऊन इतरांना ज्ञानदान करणे श्रेष्ठ आहे असे त्याच्या मनाने घेतले आणि तो जीवनाचे रूळ बदलून शिक्षणक्षेत्रात गेला. तो जिथे जाईल तिथे त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो चमकणार तर होताच. त्याने या क्षेत्रातही थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये दौरे करून व्याख्याने दिली, कार्यशाळा चालवल्या आणि त्यातून असंख्य मॅनेजर्सना प्रशिक्षण दिले होते. तो कुणाकडे नोकरी करीत नसल्यामुळे सक्तीच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न नव्हता आणि आपले आवडते विद्यादानाचे व्रत सत्तरीमध्ये गेल्यावरसुद्धा जमेल तेवढे चालवतच राहिला होता. यामधून त्याचे अनेक चाहते निर्माण झाले होते आणि त्याचा लोकसंग्रह वाढतच होता.

सदानंद पुरोहित याने आमच्या बॅचच्या सुवर्णमहोत्सवासाठी पुढाकार घेऊन कामातला सिंहाचा वाटा उचलला होता, त्यासाठी तो रात्रंदिवस प्रचंड धडपड करीत होता, पण त्याच्या पाठीवर हात ठेऊन “तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत” असे त्याला सांगणाऱ्यांमध्ये श्रीकांत भोजकर प्रमुख होता. या कामासाठी सर्वानुमते जी समिति संगठित केली गेली होती तिचे अध्यक्षपण सहजपणे त्याच्याकडे आले होते आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेऊन तो समितीतल्या कार्यकर्त्यांना सतत योग्य मार्गदर्शन करत होता आणि त्यांच्या कामात सक्रिय सहभागी होत होता.

सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरसुद्धा पुण्यात राहणाऱ्या काही मित्रांनी एकमेकांना भेटण्यासाठी दर तीनचार महिन्यांमधून एकदा ब्रेकफास्ट मीटिंग करायची असे ठरवले आणि त्यातल्या पहिल्या एक दोन मीटिंग्जना भोजकरसुद्धा नेहमीच्या उत्साहाने हजर राहिला आणि आपल्या बोलण्यामधून त्याने रंग भरला. त्या दरम्यान आमच्या दोघांचाही कॉलेजमधला जवळचा मित्र असलेल्या कृष्णा कामतचा पत्ता मला लागला. तो बारा वर्षे आखाती प्रदेशात राहून नुकताच भारतात परत आला. त्याला मी आमच्या ब्रेकफास्ट मीटिंगबद्दल फोनवरून सांगितले आणि तो आला तर भोजकरसह आणखी काही जुन्या मित्रांची एकत्र भेट होईल असे आमिष दाखवले. त्याने यायचे लगेच कबूल केले आणि ठरल्याप्रमाणे तो पुण्याला आलासुद्धा.

पण त्या दिवशी भोजकर मात्र त्या मीटिंगला येऊ शकला नाही. मग मी त्याच्या घराचा पत्ता विचारून घेतला आणि कामतसह दोन मित्रांना सोबत घेऊन त्याचे घर गाठले. आम्ही त्याच्या घरी गेलो त्या वेळी तो खाटेवर झोपून राहिलेला नव्हता किंवा गंभीर आजारी असल्यासारखा वाटतच नव्हता, वरवर तरी तो तसा ठीकच दिसत होता. फक्त त्याने कंबरेला पट्टा बांधलेला होता आणि पाठीच्या कण्याला धक्का लागून त्रास होऊ नये म्हणून तो बाहेर हिंडत फिरत नव्हता असे त्याने सांगितले. वयोमानानुसार असा तात्पुरता त्रास अनेक लोकांना झालेला मी पाहिला होता म्हणून आम्हीही त्याला “चार दिवस आराम कर, मग सगळे ठीक होऊन जाईल.” असे सांगितले. आम्हाला भेटून त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही दीड दोन तास छान गप्पा मारल्या, पन्नास वर्षांपूर्वीचे हॉस्टेलमधले दिवस आठवून त्या वेळच्या अनेक मजेदार घटनांची उजळणी केली तसेच सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे काय काय करायचे प्लॅन आणि विचार आहेत यावरही थोडी हलकीफुलकी चर्चा केली. आता आमच्या जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा जुळायला सुरुवात झाली होती.

पन्नास वर्षांमध्ये भोजकरच्या मूळच्या उत्साही, सकारात्मक आणि हंसतमुख वृत्तीत काहीच फरक पडला नव्हता, तसेच आपल्या मतावर ठाम असण्याचा गुणही तसाच होता. फक्त दुसऱ्या कोणी विरुद्ध मत मांडलेच तर तो आता त्यावर वाद न घालता “जय जय रघुवीर समर्थ” किंवा “जेजेआरएस” असे म्हणून वादाला तिथेच पूर्णविराम द्यायला लागला होता. तो वॉट्सॅपवर काही धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकत असे ते पाहता त्याच्या धार्मिक वृत्तीत किंचित वाढ झाली असावी. टेलीफोन उचलल्यावर तो हॅलो न म्हणता “जय जय रघुवीर समर्थ” असे बोलायचा आणि संभाषणाची अखेरही त्या घोषवाक्याने करायचा. त्याची ही नवी लकब आता माझ्या कायम लक्षात राहणार आहे आणि त्याची आठवण करून देणार आहे.

पण त्यानंतरच्या आमच्या कुठल्याच ब्रेकफास्ट मीटिंगला तो येऊ शकला नाही. पण तो यारोंका यार होता. त्याला मित्रांबरोबर चार घटका हंसतखेळत घालवायची दांडगी हौस होती. परगावाहून किंवा परदेशामधून आलेला आमचा एकादा मित्र त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून यायचा आणि त्या भेटीची छायाचित्रे भोजकर स्वतःच वॉट्सॅप किंवा फेसबुकवर टाकायचा, असे दर महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी होतच असे. त्या फोटोतला त्याचा हंसरा चेहेरा पाहून त्याची तब्येत चांगली प्रगतिपथावर आहे असेच वाटायचे. त्याशिवाय सोशल मीडियावरून त्याचे इतर मेसेजेसही नेहमी येतच होते. मुळात त्याला एकादे गंभीर स्वरूपाचे दुखणे झाले होते हेच मला कित्येक महिने समजले नव्हते. दर मीटिंगच्या दिवशीसुद्धा “तो आज येणार आहे” असे कोणीतरी सांगायचा आणि सगळे खूश व्हायचे, त्याला जिने चढायची दगदग करावी लागू नये म्हणून आम्ही माडीवरच्या हॉलमध्ये न जाता खालच्या लॉनमध्ये जमायचो, पण वाट पाहून त्याला फोन केल्यावर तो या वेळी येऊ शकणार नाही असे समजत असे. असेही दोन तीन वेळा झाले.

त्याचे दुखणे म्हणजे वयोमानामुळे आलेली साधी पाठदुखी नसून त्याचे प्रोस्टेट ग्रंथींचे ऑपरेशन झाले असल्याचे मला बऱ्याच काळानंतर कळले. पण त्याच सुमाराला आमच्या दुसऱ्या एका मित्राचे तशाच प्रकारचे ऑपरशन झाले होते आणि तो तीनचार महिन्यात चांगला हिंडूफिरू लागला होता एवढेच नव्हे तर परदेशी जाऊन आला होता हे समजल्यामुळे मी भोजकरबद्दल निश्चिंत होतो. फक्त त्याला पूर्ववत धडधाकट व्हायला आणखी किती अवधी लागतो याची वाट पहात होतो.

मध्येच एकदा त्याला पुनः हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले आणि आता मात्र त्याला भेटून यायलाच हवे असे मी आपल्या मनाशी ठरवले. पण आज, उद्या, परवा करता करता मधले काही दिवस निघून गेले आणि एका सकाळी अचानकपणे तो आपल्यात राहिला नसल्याची धक्कादायक वार्ताच समजली. या वेळी आम्ही सगळे मित्र त्याच्या घरी जमलो ते त्याचे अंतिम दर्शन घेऊन साश्रु निरोप देण्यासाठी. तो तर आता काहीच बोलू शकत नव्हता, पण त्याने आम्हाला “जय जय रघुवीर समर्थ” असे म्हणूनच आमचा निरोप घेतला असणार असे मला वाटून गेले. या गोष्टींनाही आता तीन वर्षे होऊन गेली, पण त्या तशाच्या तशाच स्मरणात राहिल्या आहेत.

तेथे कर माझे जुळती – भाग १९ – माझ्या आत्या

मला तीन सख्ख्या आत्या होत्या. सर्वात मोठ्या गंगूआत्या आमच्या जमखंडी गावातच रहात होत्या, मधल्या कृष्णाआत्या कल्याणला होत्या आणि धाकट्या सोनूआत्या आमच्यासोबतच रहायच्या. या वर्षातल्या पक्षपंधरवड्याच्या निमित्याने मी त्यांना ही शाब्दिक आदरांजलि वहात आहे.

गंगूआत्यांचे घर आमच्या घरापासून लहान गावाच्या मानाने थोडे दूर म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते, पण तो रस्ता बाजारपेठेमधून आरपार जाणारा एक हमरस्ता होता. त्यामुळे आम्हाला तो फार लांब वाटत नव्हता. मी नेहमी त्यांच्या घरी जात येत होतो आणि ती मंडळीही नेहमी आमच्याकडे येत असत. आमचे जवळजवळ एकत्र कुटुंब असल्यासारखेच होते. आमच्या गंगूआत्या मनाने फारच चांगल्या होत्या. त्या शांत, सोज्वळ, प्रेमळ, स्वाभिमानी आणि कमालीच्या सोशिक व समजुतदार अशा होत्या. जुन्या मराठी सिनेमांमधल्या एकाद्या सुस्वभावी आदर्श आईसाठी सुलोचनाबाईंच्या जशा भूमिका असायच्या तशा आमच्या या आत्या प्रत्यक्षात होत्या. त्यांना प्रभावी चेहेऱ्याबरोबरच गोड आवाजाची देणगीही मिळाली होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते तरीही त्या भजने आणि जुनी गाणी अगदी तालासुरात गात असत आणि त्यांचे साधे गुणगुणणेसुद्धा मंजुळ वाटत असे .

आपले मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करून आणि त्या ती जबाबदारी खंबीरपणे आणि शांतपणे पेलत होत्या. मी लहान असतांना मला त्याचे महत्व समजत नव्हते, पण मला जाण येऊ लागल्यानंतर त्यांचे मोठेपण समजत गेले. माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात माझ्या चुलत बहिणी होत्या आणि माझा एक मावसभाऊही आमच्याकडे रहायचा. त्यात गंगूआत्यांची मुले आल्यावर घराचे गोकुळ होत असे. त्या काळात सख्खी, चुलत, मावस, आत्ते, मामे अशी सगळी भावंडे सगळ्यांसाठी सारखीच असायची. घरातले तसेच घरी आलेले सगळे मुलगे आपले भाऊ आणि सगळ्या मुली आपल्या बहिणी असायच्या. घरातली मोठी माणसेसुद्धा आमच्यात भेदभाव करत नव्हती. आमच्यातली ही आपुलकी पुढेही टिकून राहिली याचे श्रेय माझी आई आणि गंगूआत्या या दोघींना आहेच. त्यातही कुणावर न चिडता, न रागावता मुलांची शांतपणे समजूत घालण्याची अवघड कला गंगूआत्यांना चांगली अवगत होती. त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे.

आमच्या गंगूआत्या कामाला वाघ होत्या, त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, कुणा पूर्वजांचे श्राद्धपक्ष असे काही कार्यक्रम असले, कोणी पाहुणे आले किंवा दिवाळीचा फराळ करायचा असला तर अशा वेळी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असे. त्या वेळी गंगूआत्या पुढाकार घेऊन आणि गरज असल्यास मुलामुलींना हाताशी घेऊन हसत खेळत त्या सगळ्या कामांचा फडशा पाडत असत. स्वयंपाकघरातल्या अशा प्रकारच्या सामुदायिक मोहिमांची दृष्ये अजून माझ्या डोळ्यासमोर येतात.

गंगूआत्यांचा मोठा मुलगा विद्याधर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीता कामाला होता. त्यांच्या कंपनीला बीएआरसीतल्या एका मोठ्या बिल्डिंगचे काम मिळाले तेंव्हा विद्याधरची त्या कामावर नेमणूक झाली. त्यांच्यासाठी अणुशक्तीनगरमधल्या एका मोकळ्या जागेत लहानशी तात्पुरती वसाहत बांधली गेली आणि त्यात ते लोक रहायला आले. मी जमखंडी सोडल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी पुन्हा एकदा गंगूआत्या आमच्या घराच्या जवळ रहायला आल्या आणि आमचे नेहमी एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. आता त्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत आल्या होत्या आणि आमच्याबरोबर माझ्या मुलांनाही त्यांची माया मिळाली. त्या काळात माझी आईही आमच्याकडे रहात होती. त्या दोघींचीही पुन्हा एकदा गट्टी जमली आणि जुन्या काळातल्या आठवणींची उजळणी होत राहिली. अशी तीन चार वर्षे मजेत गेल्यावर ते बीएआरसीमधले बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गंगूआत्या आणि आपल्या कुटुंबासह विद्याधर डोंबिवलीला रहायला गेला, पण आम्हाला जमेल तसे आमचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले.

माझ्या दुसऱ्या आत्या म्हणजे कृष्णाआत्यासुद्धा पूर्वीच्या काळी जमखंडीतच रहात होत्या असे मी ऐकले आहे, पण मला समजायला लागले तेंव्हापासून मात्र त्या मुंबईजवळील कल्याणला स्थाईक झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कल्हळ्ळीच्या व्यंकटेशावर अपार श्रद्धा आहे. व्यंकोबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मुलांसह अधून मधून जमखंडीला येत असत आणि त्यांचे आमच्याकडे काही दिवस माहेरपणही होत असे. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे अगत्याने स्वागत होत असे आणि त्याही घरातल्याच होऊन जात. तेंव्हा त्या कल्याण मुंबईच्या वेगळ्या शहरी जीवनाच्या गंमती जंमती तेवढ्या आम्हाला सांगत असत. त्यासुद्धा खूप प्रेमळ, अगत्यशील आणि मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या लीलाताईचे म्हणजे माझ्या चुलत बहिणीचे लग्न दादरला करायचे ठरले तेंव्हा आम्ही सर्व मंडळी कल्याणला जाऊन कृष्णाआत्यांच्या घरातच उतरलो होतो आणि तिथले प्रत्यक्षातले शहरी जीवन पाहिले होते. पुढे मी शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आलो तेंव्हा कृष्णाआत्या आणि नाना माझे एक प्रकारचे स्थानिक पालक (लोकल गार्डियन) होते. वयपरत्वे त्यांना प्रवास करणे शक्य होत नव्हते, पण मी मात्र तीन चार महिन्यात अचानक कल्याणला एकादी चक्कर टाकून त्यांना भेटून येत होतो आणि हक्काने एकादा दिवस त्यांच्या घरी रहातही होतो. तेंव्हा माझेही अत्यंत प्रेमाने आणि अगत्याने स्वागत होत असे. पुढे मी संसाराला लागल्यावर त्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

माझ्या जन्माच्याही आधी आमच्या सोनूआत्यांना दुर्दैवाने वैधव्य येऊन त्या माहेरी परत आल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण करून जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम करायला लागल्या होत्या. त्यांचे सासरचे आडनाव करंदीकर असले तरी गावात आणि शाळेतही त्यांना ‘घारेबाई’ याच नावाने ओळखले जात होते. त्या घरातली एक प्रमुख मोठी व्यक्ती म्हणून आमच्याबरोबर रहात होत्याच, शिवाय त्यांची शाळा, तिथल्या इतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचे एक वेगळे विश्व होते. त्यांच्या त्या विश्वातली मुळगुंद सोनूताई आणि सुब्बाबाई ही नावे मला साठ वर्षांनंतर अजून आठवतात. सोनूआत्यांचा हा ग्रुप नेहमी भेटून काही ना काही प्लॅन करायचा. एकदा तर त्या मिळून भारताच्या सहलीवरसुद्धा गेल्या होत्या असे मला आठवते.

सोनूआत्यांकडे विलक्षण निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती होती. त्या किती तरी जुन्या घटनांचे अतीशय बारकाईने तपशीलवार वर्णन करून सांगायच्या. त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्या माहितीतल्या माणसांची संख्या अमाप होती. “ही शांता म्हणजे आपल्या गोदीच्या नणंदेच्या जावेच्या मावसबहिणीची शेजारीण” अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या साखळ्या त्या बोलता बोलता सहजपणे उलगडून दाखवत आणि त्या नेहमी अचूक असत. मी तर त्यांना ‘नात्यांचा काँप्यूटर’ असेच म्हणेन. जमखंडीच्या लहान विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काय नाते होते, इतकेच नव्हे तर त्यांचे आपसातले संबंध कसे होते हे त्यांना पक्के माहीत असायचे. त्यांना माणसांची चांगली पारख होती. “कुणीही काही सांगितले तर त्यावर भोळसटपणे विश्वास ठेवायचा नसतो. त्यामागे त्याचा काय हेतू असू शकेल हे आपण त्याला कळू न देता पहायला पाहिजे”. वगैरेसारखी मॅनेजमेंटची तत्वे त्यांना चांगली माहीत होती हे त्यांच्या बोलण्या आणि वागण्यामधून अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असे. लहान मुलांनी मोठे होत असतांना दुनियादारीसुद्धा शिकून घेणे कसे गरजेचे आहे याचे काही धडे आम्हाला त्यांच्याकडून मिळत गेले.

सोनूआत्या नेहमी घरातल्या सर्वांशी अगदी मिळून मिसळून छान मजेत गप्पागोष्टी करत असत, पण त्यांचे टेंपरामेंट जरा वेगळे होते. त्यांचा पारा जरासा लवकर चढत असे आणि उतरतही असे. कदाचित त्यांच्या लहानपणी त्या घरातल्या सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांकडून त्यांची खूप काळजी घेतली जात असणार यामुळे असेल, पण कळत नकळत त्या फटकन दुखावल्या जाऊन त्यांचा मूड जाऊ नये अशी काळजी सर्वांकडून घेतली जात असे. त्यांच्याशी बोलतांना जरा जपून बोलावे लागत असे. कदाचित त्या माझ्यावर कधीच रागावल्या नसतीलही, पण तरीही मला त्यांचा थोडा धाक वाटायचा. त्यांना घरकामाची किंवा स्वयंपाकपाण्याची मनापासून फारशी आवड नव्हती आणि त्या बाबतीत त्या विशेष पुढाकार घेत नव्हत्या. कदाचित त्या वेळी मला असे वाटणे चुकीचेही असेल, पण माझी लहानपणची आठवण अशीच आहे.

माझ्या आत्यांना जावई, सुना, नातवंडे वगैरे पहायला मिळाली. माझ्या मनात त्यांच्या कितीतरी खूप जुन्या आठवणी आहेत, त्या सांगाव्या तितक्या कमीच आहेत. माझ्या संस्कारक्षम वयात माझ्या मनाची जी जडणघडण होत गेली त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या आठवणी आल्यावर आज एवढेच म्हणावेसे वाटते, “तेथे कर माझे जुळती.”

एक ‘तो’ आणि एक ‘ती’

यातला ‘तो’ आणि ‘ती’ यांचा एकमेकांशी किंवा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी दहा वर्षांपूर्वी मला अचानक भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्तींची ही शब्दचित्रे काढली होती.

————–

तो’ आणि मी

दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्ती बोलतांना ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा खिशातला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या आप्तांपैकी कोणीतरी पुण्याहून वाशीला आणि वाशीहून ठाण्याला जाणार होते. तसे पाहता त्यांना माझ्या अनुमतीची किंवा मदतीची गरज नव्हती, त्यांचे ते बघायला समर्थ होते. पण संपर्काची सोय उपलब्ध असल्यामुळे त्यांची विचारपूस करणे हे माझे कर्तव्य असल्याचे मीच ठरवले होते. “इस रूटकी सभी लाइने व्यस्त हैं।, ये नंबर मौजूद नही है।, आप कतारमें हैं।” वगैरे निरर्थक वाक्ये ऐकत चार पाच प्रयत्न केले आणि ज्यांच्याशी संवाद साधला गेला त्यांना “निघालात कां? पोचलात कां?” वगैरे विचारून त्यांच्या ‘मूव्हमेंट्स ट्रॅक’ केल्या. (हा नेमका आशय मराठीत सांगणे मला तरी जमत नाही.)

मी आपल्या ‘सांगाती’ला त्याच्या म्यानात ठाणबंद करून ठेवले तेवढ्यात शेजारून शब्द ऐकू आले, “काँग्रॅच्युलेशन्स!” आता शेजा-याचा भ्रमणध्वनी सुरू झाला असावा असे आधी मला वाटले. पण “हॅलो, कोण बोलतंय्? पाटील आहेत कां? मी आप्पा!” असले कोणतेही इंजिन नसतांना ही संवादाची गाडी कशी सुरू झाली अशा विचाराने चमकून बाजूला पाहिले. तिथे बसलेला ‘तो’ माझ्याकडेच पहात होता. माझ्या डोक्यावर एकादा मुकुट, गळ्यात फुलांचा (नोटांचा असेल तर फारच छान) हार किंवा छातीवर एकादे बिरुदाचे पदक वगैरे अचानक येऊन पडलेले नाही याची खात्री करून घेतली. माझे हे अभिनंदन कशाबद्दल याचा पत्ता कांही लागत नव्हता. तेवढ्यात ‘तो’च पुढे म्हणाला. “इस उमरमेंभी आपके सभी दाँत साबूत हैं ने।”
मी मनात विचार केला, मला ‘इस उमरमें’ म्हणणारा हा कोण? योगायोगाने त्याच दिवशी मी एक किस्सा वाचला होता. साठीला आलेल्या एका माणसाला कोणी तरी विचारले, “कुणाला वृध्द म्हणायचे?” त्याने आपल्या बापाचा सल्ला घेतला. ऐंशीच्या घरातल्या त्याच्या पिताश्रींनी सांगितले, “हे बघ, माझ्याहून पंधरा वीस वर्षांनी मोठा असेल तो म्हातारा असे समज.”
म्हणजे वृध्दावस्था ही समजण्याची गोष्ट आहे तर! आणि माझ्याच वयाचा हा माणूस माझे वय काढतोय्! तो नक्कीच स्वतःला तरणाबांड समजत असावा. पण असे असेल तर तो या ज्येष्ठ नागरिकांच्या आसनावर कां बसला आहे? त्याला उठून उभे रहायला सांगावे म्हंटले तर आजूबाजूला कोणी वयस्क माणूस उभा नव्हता. असा प्रवासी येईपर्यंत वाट पहायचे ठरवले.
‘तो’ पुढे बोलत होता, “अभी आप फोनपर वात करते थे ने, तभी मैने देखा।” मी बोलण्यासाठी उचकटलेला माझा जबडा इतक्या जवळून कोणी पहात असेल या विचारानेच मला इतका मोठा धक्का बसला की आ वासण्यासाठी तो पुन्हा उघडला गेला. पटकन मी त्याचे रूपांतर बत्तीशीमध्ये करून घेतले. (ही ही करतांना समोरचे दहा बाराच दांत दिसत असले तरी त्यालाही मराठीत बत्तीशी असेच म्हणतात.) मी सांगितले, “अहो, हे समोरचे दाखवायचे दांत तेवढे आता जागेवर आहेत. (चांवून) खायचे मागचे दांत (दाढा) गायब झाल्या आहेत. काल परवापर्यंत त्यासुध्दा होत्या, पण फुटाणे आणि शेंगदाणे खातांना त्यांचेच तुकडे पडायला लागले म्हणून मी आता ते खाणे सोडून दिले आहे.”
“अरेरे ..”
मी लगेच म्हंटले, “अहो, तोंडात दातही आहेत आणि घरात चणेसुध्दा आहेत हे सुख मी निदान पन्नास वर्षे तरी उपभोगले आहे. त्या काळात मी चण्यांना भिजवून, भाजून, तळून किंवा शिजवून अगदी पोट भरेपर्यंत (किंवा बिघडेपर्यंत) त्यांचा आस्वाद घेतला आहे. आतासुध्दा मी शिजवलेल्या चण्यांना बोटांनी आणि इतर प्रकारांना यंत्राने चिरडून चण्यांना पोटात घालतो आहेच.”
पूर्वी एकदा मी ‘पावाचे पाचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थ’ या नांवाचा लेख ‘मिसळपाव’वर लिहिला होता. आता ‘चण्याचे चारशे चव्वेचाळीस चविष्ट पदार्थ’ त्याला सांगावे असा विचार मनात आला. पण ‘तो’ गुज्जूभाई असल्याचे एव्हाना माझ्या लक्षात आले होते आणि जन्मापासून फाफडा, गांठिया आणि फरसाणात रममाण होणा-याला चण्याच्या गुणांबद्दल मी बापडा काय सांगणार? त्याच्या आकारमानावरून ‘तो’ खाण्यापिणायाची चांगली आवड असणारा दिसत होता, पण त्यालासुध्दा या वेळी खाद्यसंस्कृती या विषयावर वायफळ बोलाचे चर्वितचर्वण नको असावे.
त्याने एकदम थेट विषयाला हात घातला, “आप अभीभी वर्किंग हैं?”
मी उत्तर दिले, “नाही. मी रिटायर झालो आहे. पण निष्क्रिय नाही. जोंवर हांतपाय चालत आहेत, तोंवर ते चालवत राहिले म्हणजे ठीक असतात. त्यामुळे मी काम करतो, पण ते पोट भरण्यासाठी नव्हे.”
आता मी कसले डोंबलाचे काम करतो ते सांगणे तसे कठीणच होते, पण त्यालासुध्दा त्यात रस नव्हता.
‘तो’ सांगत राहिला, ( यापुढील संभाषणाचा मराठीत अनुवाद) “मला मात्र अजूनही रोज बारा बारा तास काम करावे लागते. मला दोन मुले आहेत, पण ती कमावत तर नाहीतच, उलट माझ्याकडून दर महिन्याला पांच पांच हजार रुपये घेतात, पॉकेटमनी म्हणून.”
“अजून ती लहान आहेत का?”
“नाही हो, एक चाळिशीला आला आहे आणि दुसरा पस्तीशीच्या वर आहे. ते म्हणतात जोंपर्यंत मी कमावतो आहे तोंपर्यंत त्यांना कमावायची काय गरज आहे?”
मला नीटसा बोध होत नव्हता. ही मध्यमवयापर्यंत पोचलेली त्याची मुले, खरे तर बाप्पे, खरेच इतके कुचकामाचे असतील? आणि या महागाईच्या जमान्यात याने दिलेल्या महिन्याला पांच हजार रुपयात त्यांचे भागत असेल?
‘तो’ पुढे सांगतच राहिला, “अहो, घरात ‘अनुशासन’ म्हणून नाही.”
वेगवेगळ्या लोकांना भिजवायला माझा खांदा कां आवडतो हे मला न सुटलेले कोडे आहे. ‘तो’ एकादा लहान मुलगा असता तर मी त्याच्या पाठीवरून हांत फिरवून त्याला उगी उगी म्हणून नक्कीच शांत केले असते, युवक असला तरी त्याचा प्रॉब्लेम समजून घेऊन योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला असता, पण या माणसाचे काय करायचे ते मलाच कळेना. त्याची समजूत घालायची, त्याच्या मुलांचीही जी कांही बाजू असेलच ती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्याच्या सांगण्याची री ओढत त्याच्या त्या अज्ञात मुलांना दोष द्यायचा की त्यांनी अनुशासनहीन होण्यासाठी ‘त्या’लाच जबाबदार धरायचे?
मी थोडेसे अडखळत म्हंटले, “तुमची केस जरा वेगळीच दिसते आहे. अहो आपली मुले लहानाची मोठी होत असतांना त्यांच्याबरोबरची त्यांची मित्रमंडळी, शेजारची आणि नात्यातली मुलेसुध्दा प्रगती करत असतात. आपण केलेल्या उपदेशापेक्षा सुध्दा एकमेकांचे पाहूनच मुले जास्त हिरीरीने पुढे यायला धडपडत असतात. असे सर्वसाधारणपणे दिसते.”
‘तो’ लगेच म्हणाला, “माझी मुले चांगली आहेत हो, पण त्यांच्या बायड्यांनी त्यांना बिघडवले, आळशी बनवले.”
आता तर हद्द झाली होती. कमावण्याची सुरुवात होण्यापूर्वीच याने त्यांची लग्ने सुध्दा लावून दिली? की तो पराक्रम त्यांनी स्वतःच केला होता? असेल तर कशाच्या बळावर? त्यांना कुचकामी बनवण्यात त्यांच्या बायड्यांचा कसला हेतू असू शकेल? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. इथे स्त्रिया आपल्या पुरुषांच्या समोर उभ्या राहून त्यांना अडवत होत्या कां? दिवसाला बारा बारा तास कष्टवून ‘त्या’चा देह झिजल्यासारखा दिसत नव्हता की काळजीने काळवंडल्याची कोणतीही खूण त्याच्या चेह-यावर दिसत नव्हती. पण मला असे गोंधळात टाकून त्याला काय मिळणार होते? असली रडगाणी ऐकून लगेच मी कांही उदार होऊन मदतीचा हांत पुढे करणार नव्हतो आणि ते त्यालाही ठाऊक असावे. खरे सांगायचे तर ‘तो’ माझ्याकडून कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षाच करत नसावा. मलाही त्याच्या समस्यांच्या जंजालात स्वतःला गुरफटून घ्यावेसे वाटत नव्हते. पण हे सगळे कुतूहलजनक होतेच.

एवढ्यात त्याचा उतरण्याचा बसस्टॉप आला. तो शांतपणे उठला, मागच्या लेडीजसीटवर बसलेल्या आपल्या बायडीला सोबत घेऊन उतरून गेला. मी त्याचाच विचार करत राहिलो. त्याने सांगितले ते खरे होते की टाइम पास करण्याचा त्याचा हा एक आगळा मार्ग असेल?

———-

ती

पूर्वी ऑफिसात असतांना होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा प्रवासात मला ‘तो’ भेटला होता, ‘त्या’च्यावर मी लिहिलेला लेख थोडासा जमला असे माझे मलाच वाटले आणि दोन चार लोकांनी तो (लेख) वाचून तसे मला सांगितलेही. पुन्हा एकदा अशाच आणखी कोणा अनामिक व्यक्तीबद्दल लिहावे असा विचार मनात येत होता, तेवढ्यात योगायोगाने बसच्या प्रवासातच मला ‘ती’ भेटली. म्हंटले, चला आता ‘ति’च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मुळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणाऱ्या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.

आपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी ‘ती’ समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा …… (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) ‘लटपट लटपट’, ‘ठुमक ठुमक’ वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या साऱ्या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप?) तिने घातला होता. ‘ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असली तर अशालासुद्धा त्या ‘शब्दांच्या पलीकडले’ दिसल्यावाचून राहिले नसते.

कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहेऱ्यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केलेला दिसतो. ‘ती’ आली, ‘ति’नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.

त्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेस्ध्दा ‘ति’ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर ‘ति’च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही जागा नव्हती. ‘ती’ बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. बस आल्यानंतर रांग मोडून सारे लोक धांवले आणि धक्काबुक्की करत आत घुसले. अशा धक्काबुक्कीपासून स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर ‘चुकून’ बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि मला ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.

एका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतरच कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला उतरायचे होते. एक हात खिशावर ठेवून आणि दुसऱ्या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपली क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचा फारसा त्रास वाटतही नव्हता. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती.

राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली ‘ती’ जवळच बसली होती. अचानक ‘ती’ उठून उभी राहिली. ‘ति’च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून ‘ति’ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच ‘स्त्रियांसाठी राखीव’चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, “मी माझी जागा तुम्हाला देते आहे.”
“ते ठीक आहे. पण …” असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलीकडे हळूच बोट दाखवले.
“तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन.” त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने ‘ती’ अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुसऱ्या मुलीला झाली नाही.
आता तिने दिलेल्या सीटचा स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांच्या ऐवजी आता माया, ममता, करुणा वगैरे मूर्तिमंत होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास मला होत राहिला.

डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मी हा लेख बारा वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर पाहिलेल्या मुलाखतींच्या आधारे लिहिला होता. त्यानंतर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर एक सुंदर चित्रपट येऊन गेला. त्यांना गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा, भामरागडच्या निबिड अरण्यातल्या अडाणी वनवासी लोकांसोबत जुळवून घेऊन तिथे आपले आरोग्यकेंद्र आणि शाळा वगैरे स्थापण्यात आलेल्या प्रचंड अडचणी आणि या दंपतीने कमालीच्या सोशिकपणाने अनंत कष्ट करून त्यात मिळवलेले यश यांचे सुरेख चित्रण या चित्रपटात केले आहेच, शिवाय त्यांनी अनेक वन्य पशूंचा मुलांसारखा सांभाळ करून त्यांचे अत्यंत प्रेमाने केलेले संगोपनही छान दाखवले आहे. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात अनेक कसोटीचे प्रसंग येऊन गेले आणि त्यांनी त्यावर कमालीच्या धैर्याने मात केली. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांचे जीवन अनेक युवकांना प्रेरणादायी ठरले आहे. आज त्यांच्या जन्मदिवशी मी हा लेख या ब्लॉगवर देत आहे.
. . . . . . . . .

स्व.पु.ल.देशपांडे यांनी वरोरा येथील आनंदवन आश्रमाला भेट देऊन आल्यानंतर त्यावर एक विस्तृत लेख लिहिला होता. तो वाचून मला पहिल्यांदा स्व. बाबा आमटे तिथे करत असलेल्या महान कार्याची सविस्तर माहिती वाचायला मिळाली. त्यानंतर स्व. बाबा आमटे हे नांव त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य यांवरील आलेले लेख, मुलाखती आणि बातम्या यातून सतत डोळ्यासमोर येत होते आणि त्या नांवाला एक वलय प्राप्त झाले होते. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनीसुध्दा समाजसेवेचे व्रत घेतले आहे असे जेंव्हा वाचले तेंव्हा त्यांचे नांव अशा वलयांकित रूपातच समोर आले.

तोंपर्यंत स्व.बाबा आमटे यांच्या कार्याचा व्याप खूप वाढला होता. त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम डॉ.प्रकाश करत असतील अशी माझी समजूत पूर्वी होती. नंदनवनाचीच एक शाखा भामरागड परिसरात कदाचित स्थापन केली असावी असे मला वाटले होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तेंव्हा मात्र आश्चर्य आणि आदर या दोन्ही भावनांनी मला भारून टाकले.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या अत्यंत दुर्गम परिसरातल्या गांवात जाऊन डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य त्या जागी सुरू केले. या भागातील मारिया गोंड या जनजातीतल्या लोकांची अवस्था अतिशय दारुण होती. त्यांचे अनेक प्रकाराने शोषण होत होते. दारिद्र्य आणि उपासमार त्यांच्या पांचवीलाच पूजलेली होती. शालेय शिक्षणाचे नामोनिशान नव्हते. शाळा चालवायला तिथे येण्यासाठी मुले मिळत नव्हती आणि दवाखान्यात येण्यासाठी रुग्ण तयार नव्हते. शहरातून आलेल्या लोकांबद्दलचा त्या आदिवासी लोकांचा अनुभव चांगला नसल्यामुळे त्यांचा शहरी लोकांवर विश्वासच नव्हता. शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी फी देण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण मोफत मिळत असलेल्या सेवांचा उपयोग करून घ्यायलाही कोणी धजत नसत.

एकीकडे आदिवासी समाजाची अशी वाईट परिस्थिती होती तर दुसरीकडे शहरात मिळत असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य सुखसोयी त्या भागात उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीची साधने नसल्यामुळे रोजच्या अन्नाची पंचाईत असे, भाजीपाला तर दृष्टीला पडत नसे. सठी सामासी कोणा कार्यकर्त्याने सायकलवरून दुरून भाजी आणली तर त्या दिवशी दिवाळी मनवायची अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आपण कोणतीही तक्रार करायची नाही असे डॉ.प्रकाश यांनी ठरवले आणि पडतील तेवढे कष्ट सहन करून त्यांनी आपले खडतर काम चालू ठेवले.

डॉक्टर प्रकाश यांनी मारिया गोंड लोकांची बोलीभाषा शिकून आत्मसात केली. आपल्या शहरी पोशाखाला ते लोक घाबरतात हे पाहिल्यावर ते अंगात बनियान आणि अर्धी चड्डी एवढ्याच कपड्यावर राहू लागले. या बाबतीत फक्त पंचा गुंडाळून राहणाऱ्या महात्मा गांधींचा आदर्श त्यांच्यापुढे असणार. त्यांची अत्यंत साधी, सौजन्यपूर्ण वागणूक, मदतीचा हात सतत पुढे करण्याची वृत्ती या सर्वांच्या जोरावर हळूहळू त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या दवाखान्याची कीर्ती आसमंतात पसरली आणि दूरवरून आजारी माणसे उपचारासाठी त्यांचेकडे येऊ लागली. त्यांच्या शाळेत मुलांची गर्दी होऊ लागली. दुर्गम भागातून रोज चालत येणे कठीण आणि धोकादायक असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केली. या सगळ्या कार्यासाठी लागणारा निधी गरीब आदिवासी समाजातून उभा राहणे शक्यच नव्हते. आपला खर्च कमीत कमी ठेऊन आणि उदार दात्यांकडून जे कांही मिळेल त्यात तो भागवून डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य पुढे नेले.

शाळा चालवण्यामागील त्यांचा हेतू स्पष्ट होता. स्थानिक निरक्षर लोकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, त्यांचे शोषण केले जाऊ नये, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायविरुध्द उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात यावे एवढी किमान अपेक्षा ठेऊन त्या दृष्टीने त्यांना शहाणे करण्याचा यज्ञ त्यांनी मांडला आणि तेवत ठेवला. वेळोवेळी आदिवासी समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यांच्या सुविद्य आणि सेवाव्रती अर्धांगिनी डॉ.मंदाकिनी यांही या कामात त्यांना बरोबरीने साथ देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव त्या दांपत्याला या वर्षाचे (२००८चे) मॅगसेसे पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात आहे. हा पुरस्कार त्यांना समाजाच्या नेतृत्वासाठी मिळत आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

आदिवासी लोकांचे शिक्षण, प्रबोधन आणि आरोग्य या गोष्टीवर काम करतांनाच त्यांनी आपल्या जागेत एक वन्य प्राण्यांचे संग्रहालय बनवले आहे. जंगलातले हिंस्र प्राणीसुध्दा त्यांना कांही इजा करत नाहीत. एकाद्या लहान मुलासारखे किंवा पाळीव जनावरासारखे त्यांच्यावर प्रेम करतात हे पाहून अचंभा वाटतो. अर्थातच डॉ.प्रकाश यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने त्यांना माया लावली आहे हे उघड आहे.

मागच्या महिन्यात राजू परुळेकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत ईटीव्हीच्या ‘संवाद’ या लोकप्रिय कार्यक्रमात चार भागात प्रसारित झाली होती. या मुलाखतीचे एक वैशिष्ट्य असे की त्यात डॉक्टर प्रकाश नेहमीच्या स्टूडिओतील आरामशीर खुर्चीवर बसून गप्पा मारत नव्हते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी श्री. परुळेकर हे हेमलकसा इथे गेले होते आणि वनराईच्या रम्य पार्श्वभूमीवर आपल्या नेहमीच्या पोशाखात असलेले डॉक्टर आमटे त्यांच्याशी अत्यंत विनयशील भाषेत सुसंवाद साधत होते.

बरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी

मी हा लेख पाच वर्षांपूर्वी लिहिला होता. मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडून गेल्या . ओबामा यांची दीर्घ कारकीर्द संपून डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध यापूर्वी कधी नव्हते तितके दृढ झाले. मी या लेखात लिहिलेल्या आठवणी त्याच्या आधीच्या काळातल्या आहेत. नुकत्याच अमेरिकेतल्या निवडणुका झाल्या. त्या पार्श्वभूमीवर आज हा लेख या ब्लॉगवर देत आहे.

२००८ साली अमेरिकेत झालेल्या निवडणूकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फेऱ्या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यातले एक नाव ‘बरॅक ओबामा’ यांचे होते. अमेरिकेचे बरेचसे प्रसिद्ध अध्यक्ष वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, ट्रूमन, क्लिंटन यासारख्या ‘न’कारांती आडनावांचे होते, तर रूझवेल्ट आणि बुश यासारखी काही इतर नावेसुद्धा प्रॉपर इंग्रजी वाटत होती. ओबामा हे आडनाव मात्र लुमुंबा, मोबुटू, मोगॅम्बो अशासारखे वेगळे वाटत होते. बरॅक हे त्यांचे नाव तर झोपडी, ओसरी, पागा, गोठा असे कसलेसे वाटत होते. असल्या नावाच्या माणसाला अमेरिकेतले लोक आपला प्रेसिडेंट करतील का याबाबत मला शंकाच होती. नेत्याच्या निवडीचे हे नाटक दोन चार दिवस चालेल आणि संपेल असे मला वाटल्याने मी आधी तिकडे लक्षच दिले नव्हते. पण प्रत्यक्षात मात्र बाकीची सारी नावे वगळली जाऊन अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिली. त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. त्यातून अखेर ओबामांच्या नावाची निवड झाली. या घडामोडींबद्दल वाचतांना ओबामा यांच्याबद्दलचे माझ्या मनातले कुतूहल वाढत गेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणात इंटरेस्ट वाटायला लागला.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत तिथे निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी जाहीर सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टेलिव्हिजनवर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्ही.वरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या निवडणुकीतल्या प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या काही मुलाखतीसुध्दा मला पहायला मिळाल्या. जवळजवळ रोजच टेलिव्हिजनवर ओबामांचे दर्शन घडायचे. त्यांचे दिसणे आणि वागणे तर अत्यंत साधेपणाचे होते आणि त्यात किंचितही नाटकीपणा नसायचा. त्यांचे बोलणेही अगदी साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे माझ्यासारख्या परदेशी माणसालासुद्धा नीट समजत आणि पटत असे. अमेरिकन सामान्य मतदारांना ते नक्की समजत असणार आणि त्यांच्या मनाला जाऊन भिडत असणार. आपल्या भाषणात ओबामा कसलाच आव आणत नसले तरी अमेरिकेच्या सर्व प्रश्नांचा आणि त्यावरील संभाव्य उपायांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता आणि विचारलेल्या सर्व प्रश्नाची समर्पक आणि मुद्देसूद उत्तरे ते अगदी सहजपणे देत असत. त्यांच्या नसानसात हजरजबाबीपणा भरलेला होता. त्यांच्या नम्रतेत स्वतःकडे कमीपणा घेणे नव्हते आणि आत्मविश्वासात अहंकार नसायचा. त्यांचे साधे व्यक्तीमत्वच अत्यंत प्रभावशाली होते.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा आणि त्यासाठी बुश यांना दोष देण्याचा मोह ओबामा टाळायचे. “प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे.” असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. त्यांच्या बोलण्यात “मी” नसायचे “आपण” असायचे. मॅकेन यांनी मात्र मुख्यतः ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी त्या काळात केला तेवढाच त्याचा अनुल्लेख ओबामा यांनी स्वतःच्या भाषणात केला. “मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे.” असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री.ओबामा यांनी या शब्दात केली.
“If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer.”

“अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत.” या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती शक्य झाली होती आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले होते. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल मला पहिल्या दिवसांपासून त्यांचे कौतुक वाटत होते.

२०१० साली मी काही दिवस गांधीनगरला जाऊन राहिलो होतो. गांधीनगर हे एक प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात सुद्धा तेंव्हा मोठाले रस्ते बांधले जात होते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावलेली होती आणि त्यांचीही व्यवस्थित निगा ठेवलेली होती. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण नक्की कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. तिथले लोक या सगळ्या विकासाचे श्रेय नरेन्द्र मोदी यांना देत होते.

गांधीनगर शहराच्या चौकाचौकांमध्ये लावलेले भले मोठे फ्लॅक्स तितकेच डोळ्यात भरत होते. नरेंद्र मोदी यांचे निरनिराळ्या मुद्रांमधले मोठमोठे फोटो प्रत्येक फलकावर ठळकपणे रंगवून उरलेल्या जागेत एकादा संदेश, एकादे बोधवाक्य लिहिलेले होते किंवा गुजरात.सरकारची एकादी उपलब्धी किंवा भावी योजना लिहिलेली होती. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे प्रोजेक्ट केले जात असलेले मी यापूर्वी कुठेही पाहिले नव्हते. त्या काळात ते गुजरात राज्याच्या प्रगतीत इतके गुंतलेले दिसत होते की चारच वर्षात ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करणार असतील असे मात्र त्या वेळी माझ्या ध्यानीमनीसुद्धा आले नाही.

अमेरिकेतल्या १९०८ मधल्या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला बरेच साम्य दिसले. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. शिवाय भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. “अबकी बार मोदी सरकार” हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.

दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. निकालाच्या दिवशी सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, एनडीएला त्याहून जास्त भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते. या दोन्ही जागी बहुतेक लोकांना हवे वाटणारे निकाल लागले होते. त्यामुळे जल्लोश केला जात होता.

नरेन्द्र मोदी यांना यापूर्वी अमेरिकेने व्हिसा द्यायला नकार दिलेला असल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात अमेरिकेबद्दल आढी बसलेली असणार असे तर्क केले जात होते. पण आपल्या व्यक्तीगत मानापमानापेक्षा राष्ट्रहिताला जास्त महत्व देणे हे मोदींचे धोरण होते. त्यांनी अमेरिकेशी असलेले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर भर दिला. अमेरिकेत जाऊन तिथल्या जनतेशी थेट संवाद साधला आणि प्रेसिडेंट ओबामा यांच्याशी व्यक्तीगत मैत्रीसंबंध प्रस्थापित केले. याची परिणती होऊन हे दोन्ही देश पूर्वी कधीही नव्हते तितके आता जवळ आले आहेत. यंदाच्या २६ जानेवारीला झालेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होण्याचे निमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले, वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी या छोट्या भेटीत आपली छाप पाडली.

ओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकारपरिशदेमध्ये ओबामांनी केलेले छोटेसे खुसखुशीत भाषणसुद्धा सर्वांना खूप आवडले. इतर मुद्यांशिवाय त्यांनी असे सांगितले की “अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे” असे मी म्हणत होतो, आता मी म्हणेन की “भारत ही अशी आणखी एक जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे.” अर्थातच त्यांचा इशारा नरेंद्र मोदी यांच्या गरुडझेपेकडे होता. एका असामान्य राजकारण्याने दुसऱ्याला दिलेली दाद होती.

श्यामची आई आणि साने गुरुजी

माझ्या पिढीमधल्या बहुधा प्रत्येक मुलाने शाळेत असतांना श्यामची आई हे पुस्तक वाचलेलेच असायचे आणि त्याने तो भारावून गेलेलाही असायचा. यातला श्याम म्हणजे लहानपणीचे साने गुरुजी अशी माझी तरी ठाम समजूत होती. त्यांची देशसेवा वगैरे गोष्टी मोठा झाल्यानंतर समजल्या.
मी अकरा वर्षांपूर्वी ‘श्यामची आई’ या चित्रपटावर लिहिलेला लेख आणि साने गुरुजींची माहिती देणारा वॉट्सअॅपवर मिळालेला एक लेख खाली दिले आहेत.

श्यामची आई

श्यामची आई

छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
“मोऱ्या मूर्खा- !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म्‌ ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला’श्यामची आई’ हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
‘श्यामची आई’ हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. “दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात.” असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.

—————————————–

साने गुरुजी

साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा स्मृतिदिन (११ जून,१९५०)

साने गुरूजी हे प्रसिद्ध, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लिखाणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. गावची खोती त्यांच्या घराण्यात होती.खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर,१८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचे जीवन घडले . त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीच वापरत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले , दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले , जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले . १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही कविता त्या काळी सर्व शाळांमधून शिकवली जायची

मातृहृदयी गुरुजींनी आईच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे याच नावाचा मराठी चित्रपट निघाला. रमेश देव ,सीमा,इंदिरा चिटणीस यांनी सुंदर अभिनय करून गुरुजींच्या कादंबरीला न्याय दिला .

आचार्य अत्र्यांसारख्या डोंगराएवढ्या प्रचंड माणसाने १०००० वर्षात पुन्हा होणार नाही असा अजरामर चित्रपट “श्यामची आई ” निर्माण केला. या चित्रपटाला भारत सरकारने त्याच वर्षी (१९५४)सुरु केलेला सुवर्ण कमळ पुरस्कार दिला.

१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.

प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती

माणगावचे सानेगुरुजी स्मारक

साने गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग ग्राउंड बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.

या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात ‘सानेगुरुजी भवन’ आणि ‘आंतरभारती अनुवाद केंद’ अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘सानेगुरुजी भवना’मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच ‘आंतरभारती अनुवाद केंद्र’ हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक समानता येईल असे त्यांना वाटत होते परंतु समाजातील असमानता वाढतच गेली.तशातच महात्मा गांधीजींचा खून झाला त्या मुळे हळव्या मनाचे गुरुजी निराश झाले होते आणि त्यांनी २१ दिवसांचा उपवास देखील केला आणि शेवटी आपला मनोभंग झाला म्हणून ११ जून,१९५० रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेऊन जीवन संपवले आणि सारा देश एका महान देशभक्ताला मुकला.

सुधीर फडके यांनी गुरुजींचे बलसागर भारत होवो हे गाणे गायले आहे.

विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार करणाऱ्या शुचिर्भूत व्यक्तिमत्वाच्या परमपूज्य सानेगुरुजींची आठवण सगळ्यांना कायमच होत राहील.

आजच्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली

…… लेखक अज्ञात – वॉट्सअॅपवरून साभार दि.११-०६-२०२०

नवी भर दि.२४-१२-२०२०

लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्य-मिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )

  • माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरून साभार

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय

ABGMM

गांधर्व महाविद्यालय (भाग १)

मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).

त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुसऱ्या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, ग्रामोफोनच्या रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाढ्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
……….

गांधर्व महाविद्यालय (भाग २)

gandahrva

आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पायऱ्या निर्माण केल्या. पुढील काळात या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या शास्त्रीय संगीतातल्या अवघड बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणाऱ्या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. पुढील काळात या संस्थेचे नामकरण “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ” असे झाले. येणाऱ्या काळात त्यांचे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

आज या संस्थेचा खूप विस्तार झाला आहे. तिचे रजिस्टर्ड ऑफीस मिरज येथे आणि मुख्य कार्यालय वाशी इथे आहे. तिच्याशी संलग्न अशा १२०० संस्था भारताच्या कान्याकोपऱ्यात पसरल्या आहेत आणि ८०० केंद्रांवर तिच्यातर्फे परीक्षा घेतल्या जातात. त्यात दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थी परीक्षा देतात. येणआऱ्या काळातही तिचा विस्तार होत राहो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही प्रसार होत राहो अशा या पोस्टमधून शुभेच्छा.

महर्षी धोंडो केशव कर्वे

karvecollge

‘दगड्या’, ‘धोंड्या’, ‘काळ्या’ असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना “शतायुषी भव” असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव ‘धोंडो’ असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत ‘एतद्देशीय मनुष्यांना’) जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे ‘व्हर्नाक्युलर फायनल’ ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील कऱ्हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणाऱ्या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी कऱ्हाड की साताऱ्याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहेऱ्यावरील निरागस भाव पाहून त्याला ‘अजाण बालक’ ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.

ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणाऱ्या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्या लोकांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.

कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.

दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुसऱ्या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. या विषयावर हिमालयाची सावली नावाचेे एक सुंदर नाटक आले होते. कर्वे तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.

धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्यांच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.

पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

कर्वे बहुमान

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो.

पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.

**********************

नवी भर दि. १९-०४-२०२१ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांची समग्र माहिती देणारा श्री.भरतकुमार राऊत यांचा लेख खाली दिला आहे.

महर्षी !
गेल्या दोन शतकांत महाराष्ट्राने जे सेवाभावी शिक्षणतज्ज्ञ निर्माण केले, त्यातीलच एक अर्वाचीन गुरू म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांचा आज जन्मदिन! त्यांच्या सेवाभावी स्मृतींस भावपूर्ण आदरांजली !
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव . शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.
१८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.
लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाहासाठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली.
रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि ७५० रुपयांची देणगी संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केली. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.
१९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत.
आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘निष्काम कर्म मठा'ची स्थापना १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ निर्माण झाली. तिचेच नाव पुढे ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे झाले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला बाया कर्वे पुरस्कार देते. अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचेश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे झाले.
अण्णांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून १९१० मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची त्यांनी स्थापना केली.
१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली.
स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. महिलांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ हे नाव देण्यात आले.
या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता परमोशक्ति।’

इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.
अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. पद्मविभूषण' हा किताब त्यांना १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानभारतरत्‍न’ने सन्मानित करण्यात आले.
१०४ वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आज २०२१ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ दिमाखात उभी आहे, जड उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

  • भारतकुमार राऊत

त्यांच्याविषयी ऐकलेल्या काही हकीकती : महर्षी कर्वे यांचा पुनर्विवाह झाला तेंव्हा त्यांची खूपच कृश शरीरयष्टी पाहून त्यांना काही झाले तर त्यांच्या पत्नीचे काय होईल? या काळजीने पंडिता रमाबाईंनी अशी अट घातली की त्यांनी आपला विमा उतरवून घ्यायला हवा. पुढे त्या विम्याची मुदत संपली तेंव्हा त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की “मी आता विधवांसाठी आश्रम स्थापन केला आहे, त्यामुळे तुला या पैशाची गरज उरली नाही.” असे म्हणत त्यांनी ते सगळे पैसे आपल्या संस्थेवर खर्च केले. अण्णासाहेब कर्वे तर शतायुषी झाले होते, पण त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्यांचे सांत्वन करायला आलेल्या एका माणसाला त्यांनी निर्विकारपणे सांगितले “अहो, त्याचे वय झाले होते, तो गेला”

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके

आद्य क्रांतीकारक

काही वर्षांपूर्वी एकदा १७ फेब्रूवारीच्या पेपरात मी वाचले की वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यूदिन १७ फेब्रूवारी १८८३ हा होता. त्या दिवसानिमित्य वासुदेव बळवंतांबद्दल इतरत्र आणखी कांही लिहिले आहे का हे पाहिले, पण तसे कोणतेच वृत्त त्या एक दोन दिवसातल्या वर्तमानपत्रात आले नाही. आजकाल रोजच कोणा ना कोणा संत, महंत, पुढारी, हुतात्मा यांपैकी कोणाची तरी जन्मतारीख किंवा पुण्यतिथी असते त्यामुळे या आद्य क्रांतीकारकाच्या पुण्यातिथीला आता बातमीमूल्य (न्यूजव्हॅल्य्) राहिले नसावे. शिवाय तत्कालिन महत्वाच्या अनेक घडामोडी होत असतात, त्यांनाच वर्तमानपत्रांमध्ये प्राधान्य मिळणे साहजीक आहे.

इतर कोणाचे कांही विचार असोत, वासुदेव बळवंत फडके हे नांव वाचताक्षणीच त्यांचा अद्भुत जीवनपट सर्रकन माझ्या डोळ्यासमोरून तरी उलगडत गेलाच. माझ्या लहानपणी आम्हाला वर्षातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जात असत. ते एक तर देवदेवतांच्या कथानकांवरचे पौराणिक चित्रपट असत किंवा भक्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या ईश्वराने केलेले चमत्कार त्यात दाखवले जात. त्यातल्या ट्रिकसीन्सवर आम्ही बेहद्द खूष होत असू. त्या काळातच मला वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरचा जुना सिनेमा पहायला मिळाला. कदाचित इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असा तो अपवाद असल्यामुळे माझ्या बालमनाला जास्त भिडला आणि कायमचा लक्षात राहिला. त्यानंतर पन्नास वर्षांनी तिसऱ्या पिढीतल्या कलाकारांनी निर्माण केलेला त्याच विषयावरचा चित्रपट मी अलीकडच्या काळात पाहिला. अर्थातच या वेळी मला तो जास्त समजला आणि अधिक परिणामकारक वाटला. याशिवाय अधून मधून वाचलेले लेख, ऐकलेली भाषणे वगैरेंमधून वेळोवेळी वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल माहिती मिळत गेली होतीच.

पनवेलजवळ असलेल्या शिरढोण गांवात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म सन १८४५ च्या ४ नोव्हेंबर रोजी झाला. तोंपर्यंत पेशवाईचा अस्त झाला होता आणि ब्रिटीश राजवटही पूर्णपणे प्रस्थापित झालेली नव्हती. त्या स्थित्यंतराच्या काळात शालेय शिक्षणाचे काय स्वरूप होते कोण जाणे, पण जे कांही होते ते मुळातच बंडखोर वृत्तीच्या असलेल्या लहान वासुदेवाला पटले नाही. त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि त्यापेक्षा व्यायाम, कुस्ती वगैरे माध्यमातून शरीरसंवर्धनाला महत्व दिले. पण पुढे त्याला नोकरी करावीशी वाटली किंवा त्याची गरज भासली यामुळे तो पुण्याला जाऊन इंग्रजांच्या लष्कराच्या मुलकी सेवेत काम करायला लागला. सन १८७० च्या सुमारास त्या काळातले भारतीय नेते सनदशीर मार्गाने ब्रिटीशांचे मन वळवून जनतेसाठी कांही सवलती मिळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटीश राजवटीत जनतेवर होत असलेला अन्याय त्यांच्या लिहिण्या बोलण्यातून व्यक्त होत होता. अंग्री यंग मॅन वासुदेवाला मात्र हे सहन होण्यासारखे नव्हते. तरीही संयम बाळगून त्याने आपली चाकरी चालू ठेवली, पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या राजवटीची बलस्थाने आणि त्यातले कमकुवत दुवे यांची बारकाईने पहाणी केली. एका अधिकाऱ्याच्या आंकडूपणामुळे त्याला आपल्या मरणासन्न आईची अखेरची भेट घेता आली नाही हा व्यक्तीगत घाव मात्र त्याला सहन झाला नाही आणि ब्रिटीशांचे अन्याय्य राज्यच उलथून पाडण्याचा चंग बांधला.

शहरात राहणाऱ्या सुशिक्षित किंवा पुढारलेल्या समाजाकडून त्याच्या प्रत्यक्ष कृतीला भरीव पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. जनमानसावर प्रभाव असलेल्या तत्कालीन संतमहंतांची भेटही त्याने घेऊन पाहिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. रानावनातल्या तथाकथित मागासलेल्या जमातीतल्या लोकांची टोळी बनवून त्याने आपल्या संघर्षाची सुरुवात केली. इंग्रजांशी लढाई करायची असेल तर त्यासाठी सैन्याची उभारणी करायला हवी, त्यांच्या हाती शस्त्रे देण्यासाठी पैशाची तरतूद व्हायला हवी. तो कोठून आणणार? ब्रिटीशांबरोबर लढण्यासाठी त्यांचाच पैसा लुबाडण्याचे वासुदेवाने ठरवले आणि सरकारी तिजोरीवर डल्ला घातला. जनतेकडून लुबाडलेला कर जनतेच्या स्वातंत्र्ययुध्दासाठी कामी आणण्यात कांही गैर नाही अशी तात्विक बैठकही त्या मागे होती. मिलिटरीमध्ये नोकरी करतांना आलेल्या अनुभवाचा आणि मिळवलेल्या माहितीचा चांगला उपयोग करून घेऊन त्याने अशा गनिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटाच लावला. त्याला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षिस जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट गव्हर्नर पासून अन्य इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून देण्यासाठी वासुदेव बळवंताने बक्षिसे जाहीर केली. यावरून त्याच्या झुंजार स्वभावाचे दर्शन घडते.

पुण्याच्या परिसरातल्या जंगलामध्ये त्याने आपले ठाणे बनवले होते. सरकारी तिजोरी लुटण्यामागचा मुख्य उद्देश समजून न घेता त्या लुटीतूनच आपला वाटा मागायला कांही सहकाऱ्यांनी सुरुवात केली तेंव्हा निराश होऊन वासुदेव बळवंताने तात्पुरते दक्षिणेकडे स्थलांतर केले आणि तत्कालीन हैदराबाद संस्थानात जाऊन तिथल्या रोहिले आणि अरबांची फौज जमवली. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागात जमवाजमव करून इंग्रजांवर अनेक बाजूंनी हल्ला करण्याची मोठी योजना त्याने आंखली होती. पण आता ब्रिटीश सरकार सावध झाले होते. त्यांचे अधिकारी हात धुवून वासुदेवाच्या मागे लागले. दोघांच्या फौजांमध्ये एक चकमक सुध्दा झाली. अखेर जंगलातून मार्गक्रमण करत असतांना त्याच्याच एका सहकाऱ्याने केलेल्या दगाबाजीमुळे वासुदेव बळवंत पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यातल्या कोर्टात खटला चालला आणि त्यांना तुरुंगवासासाठी दूर एडनला धाडण्यात आले. तिथल्या त्या तुरुंगातून पलायन करण्यातही ते यशस्वी झाले होते, पण परमुलुखात असल्यामुळे त्यांना पुन्हा पकडून तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर मात्र सुटकेची आशा न उरल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करून तुरुंगातच प्राणत्याग केला. अशा प्रकारे या अलौकिक पुरुषाची प्राणज्योत त्याने स्वतःच मालवली.
———
भाग २ : सव्वाशे वर्षांनंतर
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मला त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेला मिळाली हा जसा एक योगायोग होता. त्याचप्रमाणे दोन दिवसांनी आलेल्या शिवजयंतीच्या दिवशी मी या विषयावर पुढे लिहिण्याचा आणखी एक योगायोग जुळून आला. वासुदेव बळवंतांची कार्यपध्दती पाहिली तर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्फूर्ती मिळाली असणार असा विचार मनात येतो. जुलमी परकीय राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय सहन न करणे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी न डगमगता खंबीरपणे उभे राहणे, तळागाळातल्या गरीब व सामान्य जीवन जगणाऱ्या माणसांना प्रेरित करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना निष्ठेने कामाला लावणे, शत्रूला एकापाठोपाठ एक धक्के देत राहणे अशासारखी त्यांच्या जीवनातील उदाहरणे हे सुचवतात.

वासुदेव बळवंतांच्या जीवनाला आता सव्वाशे वर्षे लोटून गेली आहेत. या दरम्यान भारतातली परिस्थिती इतकी बदलली आहे की आज आपण त्या जुन्या कालखंडाची कल्पनासुध्दा करू शकत नाही. मी जे कांही वाचले, ऐकले किंवा पडद्यावर पाहिले आहे ते सगळे अलीकडील लोकांनी लिहिले, सांगितले आणि दाखवले आहे. त्या लोकांनी ते कशाच्या आधारावर केले होते याची मला सुतराम कल्पना नाही. हे असे लिहिण्यामागे तसेच एक कारण आहे.

हा लेख लिहिण्यापूर्वी मी आपल्याकडल्या माहितीची उजळणी करण्यासाठी आंतरजालावर थोडेसे उत्खनन केले. त्यात मला जी माहिती सापडली ती म्हणावे तर जराशी मनोरंजक आणि खरे तर चिंताजनक वाटली. विकीपीडिया या आजकाल थोडी फार मान्यता प्राप्त झालेल्या कोषावर दिलेली माहिती वाचून माझ्या मनात वासुदेव बळवंतांची जी प्रतिमा होती तीच दृढ झाली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तारीखवार तपशील मिळाला. मात्र वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरू तसेच अनुयायी यांचा जातीनिहाय उल्लेख त्या लेखात केला होता. (आता कदाचित त्यातले काही उल्लेख काढून टाकलेले दिसतात.) सव्वाशे वर्षांपूर्वी त्या गोष्टीला कदाचित प्रचंड महत्व होते. आजसुध्दा कदाचित कांही लोकांच्या किंवा ती नोंद लिहिणाऱ्याच्या मनात त्याविषयी तीव्र भावना असतील आणि त्यामुळेच ते तपशील विस्ताराने लिहिले गेले असेल. पण मला ते योग्य वाटले नाही म्हणून माझ्या लेखात मी कुणाचे जातीनिहाय उल्लेख केले नाहीत.

त्या काळातच या विषयावरील दुसरा लेख मला एका हिंदुत्ववादी संकेतस्थळावर वाचायला मिळाला. त्या लेखातील जवळजवळ प्रत्येक वाक्यात हिंदुत्वाचा उल्लेख घुसवला आहे. “ब्रिटीशांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले”. “अन्याय सहन न करण्याच्या हिंदू परंपरेनुसार वासुदेव बळवंत त्याच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले”, “हिंदूराष्ट्र उभे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला”, “ज्या हिंदू मराठा लोकांनी अफगाण आणि मोगलांचे कंबरडे मोडले अशा मर्द मराठ्यांची सेना उभारून त्यांनी इंग्रजांना बेजार केले”, “त्यासाठी अमक्या देवळात जाऊन देवदर्शन घेतले आणि तमक्या देवळात मुक्कामाला असतांना आपली रोजनिशी लिहिली” वगैरे लिहून झाल्यानंतर अखेरीस “एका मुसलमानाने त्यांना पकडून दिले” असे गरळ ओकून “वासुदेव बळवंत फडके हे आद्य हिंदू क्रांतीकारक होते” असा शोध लावला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात मुसलमान शिपाईसुध्दा हिंदू सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते आणि वासुदेव बळवंतांनी हैद्राबादला जाऊन आपल्या कामासाठी तिथे मदत मिळण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टी सोयिस्कररीत्या विसरून वासुदेव बळवंत यांनी मराठे आणि शीख लढवय्यांची परंपरा सांभाळली असे प्रतिपादन या लेखात केले होते.

वासुदेव बळवंत फडके यांच्या नांवाने भारत सरकारने काढलेल्या तिकीटाचा शोध घेता घेता मी विशिष्ट उपजातीच्या संकेतस्थळावर जाऊन पोचलो. त्यात त्या उपजातीतील लोकांच्या नांवाने काढलेल्या टपाल तिकीटांची चित्रे मिळाली. त्यात दाखवलेल्या बहुतेक व्यक्तींनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला आहे. त्या महात्म्यांनी आपले जीवन जातीयतेचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात घालवले होते. त्यातल्या कोणाला तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून हिणवले गेले तर कोणाला जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजातून होणाऱ्या विरोधाकडे लक्ष न देता आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जागून त्यांनी आपले देशकार्य चालवले होते. वासुदेव बळवंतांची विचारसरणी देखील विशाल आणि पुरोगामीच होती अशी माझी कल्पना आहे. पण केवळ आडनांवावरून त्यांची गणना विशिष्ट उपजातीएवढ्या संकुचित विश्वात का व्हावी? याच कारणावरून त्यांचे महत्व कमी लेखण्याचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्नही चालले आहेत असे वाटते.

अशा प्रकारच्या लेखांचे वाचन करून भूतकाळात डोकावणारी भविष्यकाळातली पिढी आणखी काही वर्षांनंतर आपल्या राष्ट्रीय इतिहासातल्या महान व्यक्तींना किती खुजे ठरवेल याची मला चिंता वाटते.

***************************************

नवी भर दि. २७-०२-२०२१

मला वॉट्सअॅपवर मिळालेला लेख आणि कविता :

  • वासुदेव बळवंत –

आज 17 फेब्रुवारी. वासुदेव बळवंत ह्या आद्य क्रांतिकारकाचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस. 4 नोव्हेंबर 1845 ते 17 फेब्रुवारी 1883. जेमतेम 38 वर्षांचा आयुष्याचा कालखंड. जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभ्या राहणार्या ह्या आद्य क्रांतिकारकाला काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतांना एडनच्या तुरंगात मृत्यू आला.
1983 ते 1985 मधे रायगड जिल्ह्याला DSP म्हणून प्रवीणची नेमणूक असतांना कर्नाळ्याचा किल्ला पाहिला. तेथे 1818 पर्यंत वासुदेव बळवंतांचे आजोबा किल्लेदार होते. इंग्रजांशी निकराची झुंज देऊनही किल्ला पडला. वासुदेव बळवंतांचे जन्मग्राम शिरढोण तेथून जवळच आहे. तेथे त्यांची स्मृती अजूनही जपली आहे. अलिबागला समुद्राच्या किनार्यावर असलेल्या घरातून मी तेथून न दिसणारं एडन पहायचा प्रयत्न करायचे –

अलिबाग नाम गावी । सज्जात मी उभी ही
अंधारल्याच रात्री । भय ना शिवे मनासी ।

नव्हतेच चांदणेही । तरि जाग सागरासी
`चल मित्र तूच माझा’ । वदलेच मी तयासी ।

`बोलूच अंतरंगी । जे साठले दिसांचे
जे सांगण्यास कुणिही । नव्हतेच योग्यतेचे’ ।

लाटाच सागराच्या । फुटता तटी निनादे
गंभीर गाज कसली । तिमिरास भेदुनी ये ।

अस्वस्थ का करे ही । माझ्या मनास ऐसी
तो नाद का श्रुतीसी । पुसतोच प्रश्न काही ।

अंगावरीच माझ्या । रोमांच का उभे हे
सांगे मलाच भासे । सिंधूचि दुःख अपुले ।

“तू ऐकतेस नेमे । ध्वनि जो जळात वाहे
खळखळाट तो न माझा । ध्वनि दूरचाच तो ये ।

मी सांधतोच भूमी । मी जोडतो किनारे
मी पूर्व पश्चिमेचे । सांगतो एक नाते ।

तट जोचि भारताचा । येमेनशी जुळाला
तेथेच एडनमधे । कारागृहीच तिथल्या ।

अजुनी उठे ध्वनी तो । खळखळा जीवघेणा
त्या साखळ्याच पायी । बेड्या मणामणांच्या।

कंठात लोह बेडी । जखडेचि घट्ट जीवा
वनराज तोचि छावा । भय दावि इंग्रजांना ।

तो वासुदेव फडके । बळवंत पुत्र ऐसा
मृत्यूहि घाबरे त्या । होता असा दरारा ।

टोपीकरांस भीती । त्याचीच फार वाटे
स्वातंत्र्य भारताचे । मिळविण्या वीर झुंजे ।

उठविले भारतीया । झालेच लोक जागे
संग्राम थोर केला । स्वातंत्र्य लाभण्या ते ।

फितुरीच शाप आम्हा । वाटेचि खेद भारी
हा! हा! च घात झाला । आलाच सिंह हाती ।

त्यासीच एडनमधे । यातना दिल्या असह्य
तरिही वदे हसोनी । देहास दुःख बाह्य ।

संबंध भावनांशी । नाहीच यातनांचा
का अग्निदिव्य करण्या । भय कांचना मनी त्या ।

जळुनीच हीण जाते । अग्नीमधेच सारे
करुनीच अग्निदिव्या । उतरते खरेचि सोने

शिरढोण गाव त्याचे । माहीत ना कुणाला
तो पुत्र ह्याच भूचा । माहीत ना कृतघ्ना ।

स्पर्शून रोज येतो । कारागृहास तिथल्या
चरणावरीच भूच्या । नमवी सदैव माथा ।

बेड्याच खळखळा त्या । तोडून मृत्यु गेला
तो नाद त्या ध्वनीचे । अप्रूप ह्या जलाला ।

वाहून आणतो `तो’ । ध्वनि तोचि रोज येथे
लाटांसवेच माझ्या । शिरढोण ग्राम ऐके ”।

झाला तटस्थ सिंधु । देऊन वादळासी
माझ्या मनात लाटा । उठती अनंत वेगी
नयनांचिया किनारी । फुटतीच आदळोनी
नेत्रा झुगारिते का । भरतीच भावनांची

पुसुनीच नेत्र माझे । क्षितिजापलीकडे मी
पाहून वंदन करी । वीचींस थोर त्या मी ।

करुनी प्रणाम त्याची । रत्नाकरास विनवी
कर काम एक माझे । करु नको मला मनाई

नित जोडतो किनारे । गुज पोचवी मनीचे
दाही दिशात घुमतो । ध्वनि त्यास सांग वेगे ।

आहेच क्षुद्र जरि मी । कोणी अरुंधती रे
“हे क्रांतिवीर सिंहा । घे वचन तूचि माझे ।

स्वातंत्र्य भारताचे । टिकविण्या लेखणी ही
चालेल नित्य माझी । हे ध्येय एक चित्ती ।
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
लेखणी अरुंधतीची –