डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मी हा लेख बारा वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर पाहिलेल्या मुलाखतींच्या आधारे लिहिला होता. त्यानंतर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर एक सुंदर चित्रपट येऊन गेला. त्यांना गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा, भामरागडच्या निबिड अरण्यातल्या अडाणी वनवासी लोकांसोबत जुळवून घेऊन तिथे आपले आरोग्यकेंद्र आणि शाळा वगैरे स्थापण्यात आलेल्या प्रचंड अडचणी आणि या दंपतीने कमालीच्या सोशिकपणाने अनंत कष्ट करून त्यात मिळवलेले यश यांचे सुरेख चित्रण या चित्रपटात केले आहेच, शिवाय त्यांनी अनेक वन्य पशूंचा मुलांसारखा सांभाळ करून त्यांचे अत्यंत प्रेमाने केलेले संगोपनही छान दाखवले आहे. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात अनेक कसोटीचे प्रसंग येऊन गेले आणि त्यांनी त्यावर कमालीच्या धैर्याने मात केली. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांचे जीवन अनेक युवकांना प्रेरणादायी ठरले आहे. आज त्यांच्या जन्मदिवशी मी हा लेख या ब्लॉगवर देत आहे.
. . . . . . . . .

स्व.पु.ल.देशपांडे यांनी वरोरा येथील आनंदवन आश्रमाला भेट देऊन आल्यानंतर त्यावर एक विस्तृत लेख लिहिला होता. तो वाचून मला पहिल्यांदा स्व. बाबा आमटे तिथे करत असलेल्या महान कार्याची सविस्तर माहिती वाचायला मिळाली. त्यानंतर स्व. बाबा आमटे हे नांव त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य यांवरील आलेले लेख, मुलाखती आणि बातम्या यातून सतत डोळ्यासमोर येत होते आणि त्या नांवाला एक वलय प्राप्त झाले होते. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनीसुध्दा समाजसेवेचे व्रत घेतले आहे असे जेंव्हा वाचले तेंव्हा त्यांचे नांव अशा वलयांकित रूपातच समोर आले.

तोंपर्यंत स्व.बाबा आमटे यांच्या कार्याचा व्याप खूप वाढला होता. त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम डॉ.प्रकाश करत असतील अशी माझी समजूत पूर्वी होती. नंदनवनाचीच एक शाखा भामरागड परिसरात कदाचित स्थापन केली असावी असे मला वाटले होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तेंव्हा मात्र आश्चर्य आणि आदर या दोन्ही भावनांनी मला भारून टाकले.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या अत्यंत दुर्गम परिसरातल्या गांवात जाऊन डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य त्या जागी सुरू केले. या भागातील मारिया गोंड या जनजातीतल्या लोकांची अवस्था अतिशय दारुण होती. त्यांचे अनेक प्रकाराने शोषण होत होते. दारिद्र्य आणि उपासमार त्यांच्या पांचवीलाच पूजलेली होती. शालेय शिक्षणाचे नामोनिशान नव्हते. शाळा चालवायला तिथे येण्यासाठी मुले मिळत नव्हती आणि दवाखान्यात येण्यासाठी रुग्ण तयार नव्हते. शहरातून आलेल्या लोकांबद्दलचा त्या आदिवासी लोकांचा अनुभव चांगला नसल्यामुळे त्यांचा शहरी लोकांवर विश्वासच नव्हता. शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी फी देण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण मोफत मिळत असलेल्या सेवांचा उपयोग करून घ्यायलाही कोणी धजत नसत.

एकीकडे आदिवासी समाजाची अशी वाईट परिस्थिती होती तर दुसरीकडे शहरात मिळत असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य सुखसोयी त्या भागात उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीची साधने नसल्यामुळे रोजच्या अन्नाची पंचाईत असे, भाजीपाला तर दृष्टीला पडत नसे. सठी सामासी कोणा कार्यकर्त्याने सायकलवरून दुरून भाजी आणली तर त्या दिवशी दिवाळी मनवायची अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आपण कोणतीही तक्रार करायची नाही असे डॉ.प्रकाश यांनी ठरवले आणि पडतील तेवढे कष्ट सहन करून त्यांनी आपले खडतर काम चालू ठेवले.

डॉक्टर प्रकाश यांनी मारिया गोंड लोकांची बोलीभाषा शिकून आत्मसात केली. आपल्या शहरी पोशाखाला ते लोक घाबरतात हे पाहिल्यावर ते अंगात बनियान आणि अर्धी चड्डी एवढ्याच कपड्यावर राहू लागले. या बाबतीत फक्त पंचा गुंडाळून राहणाऱ्या महात्मा गांधींचा आदर्श त्यांच्यापुढे असणार. त्यांची अत्यंत साधी, सौजन्यपूर्ण वागणूक, मदतीचा हात सतत पुढे करण्याची वृत्ती या सर्वांच्या जोरावर हळूहळू त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या दवाखान्याची कीर्ती आसमंतात पसरली आणि दूरवरून आजारी माणसे उपचारासाठी त्यांचेकडे येऊ लागली. त्यांच्या शाळेत मुलांची गर्दी होऊ लागली. दुर्गम भागातून रोज चालत येणे कठीण आणि धोकादायक असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केली. या सगळ्या कार्यासाठी लागणारा निधी गरीब आदिवासी समाजातून उभा राहणे शक्यच नव्हते. आपला खर्च कमीत कमी ठेऊन आणि उदार दात्यांकडून जे कांही मिळेल त्यात तो भागवून डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य पुढे नेले.

शाळा चालवण्यामागील त्यांचा हेतू स्पष्ट होता. स्थानिक निरक्षर लोकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, त्यांचे शोषण केले जाऊ नये, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायविरुध्द उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात यावे एवढी किमान अपेक्षा ठेऊन त्या दृष्टीने त्यांना शहाणे करण्याचा यज्ञ त्यांनी मांडला आणि तेवत ठेवला. वेळोवेळी आदिवासी समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यांच्या सुविद्य आणि सेवाव्रती अर्धांगिनी डॉ.मंदाकिनी यांही या कामात त्यांना बरोबरीने साथ देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव त्या दांपत्याला या वर्षाचे (२००८चे) मॅगसेसे पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात आहे. हा पुरस्कार त्यांना समाजाच्या नेतृत्वासाठी मिळत आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

आदिवासी लोकांचे शिक्षण, प्रबोधन आणि आरोग्य या गोष्टीवर काम करतांनाच त्यांनी आपल्या जागेत एक वन्य प्राण्यांचे संग्रहालय बनवले आहे. जंगलातले हिंस्र प्राणीसुध्दा त्यांना कांही इजा करत नाहीत. एकाद्या लहान मुलासारखे किंवा पाळीव जनावरासारखे त्यांच्यावर प्रेम करतात हे पाहून अचंभा वाटतो. अर्थातच डॉ.प्रकाश यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने त्यांना माया लावली आहे हे उघड आहे.

मागच्या महिन्यात राजू परुळेकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत ईटीव्हीच्या ‘संवाद’ या लोकप्रिय कार्यक्रमात चार भागात प्रसारित झाली होती. या मुलाखतीचे एक वैशिष्ट्य असे की त्यात डॉक्टर प्रकाश नेहमीच्या स्टूडिओतील आरामशीर खुर्चीवर बसून गप्पा मारत नव्हते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी श्री. परुळेकर हे हेमलकसा इथे गेले होते आणि वनराईच्या रम्य पार्श्वभूमीवर आपल्या नेहमीच्या पोशाखात असलेले डॉक्टर आमटे त्यांच्याशी अत्यंत विनयशील भाषेत सुसंवाद साधत होते.

श्यामची आई आणि साने गुरुजी

माझ्या पिढीमधल्या बहुधा प्रत्येक मुलाने शाळेत असतांना श्यामची आई हे पुस्तक वाचलेलेच असायचे आणि त्याने तो भारावून गेलेलाही असायचा. यातला श्याम म्हणजे लहानपणीचे साने गुरुजी अशी माझी तरी ठाम समजूत होती. त्यांची देशसेवा वगैरे गोष्टी मोठा झाल्यानंतर समजल्या.
मी अकरा वर्षांपूर्वी ‘श्यामची आई’ या चित्रपटावर लिहिलेला लेख आणि साने गुरुजींची माहिती देणारा वॉट्सअॅपवर मिळालेला एक लेख खाली दिले आहेत.

श्यामची आई

श्यामची आई

छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल ।
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल ।
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण ।
पचापचा शिव्या देई खाता खाता पान ।
“मोऱ्या मूर्खा- !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी ।
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी ।
म्हणा सारे एकदम, ओनामा सिद्ध्म्‌ ।।
छम्‌ छम्‌ छम्‌ ।।

हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंडरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते. कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हा ओळ तर आता मराठी भाषेतली एक म्हण बनली आहे. श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या
कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीवर त्याहून जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला’श्यामची आई’ हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला.
‘श्यामची आई’ हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तीन वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. “दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात.” असे ते सांगतात. पुस्तकातला आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.

—————————————–

साने गुरुजी

साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा स्मृतिदिन (११ जून,१९५०)

साने गुरूजी हे प्रसिद्ध, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लिखाणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. गावची खोती त्यांच्या घराण्यात होती.खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर,१८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचे जीवन घडले . त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला.

१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीच वापरत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले , दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले , जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य केले . १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दु:खी’ या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले. ‘करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही कविता त्या काळी सर्व शाळांमधून शिकवली जायची

मातृहृदयी गुरुजींनी आईच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे याच नावाचा मराठी चित्रपट निघाला. रमेश देव ,सीमा,इंदिरा चिटणीस यांनी सुंदर अभिनय करून गुरुजींच्या कादंबरीला न्याय दिला .

आचार्य अत्र्यांसारख्या डोंगराएवढ्या प्रचंड माणसाने १०००० वर्षात पुन्हा होणार नाही असा अजरामर चित्रपट “श्यामची आई ” निर्माण केला. या चित्रपटाला भारत सरकारने त्याच वर्षी (१९५४)सुरु केलेला सुवर्ण कमळ पुरस्कार दिला.

१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.

प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती

माणगावचे सानेगुरुजी स्मारक

साने गुरुजींच्या स्मरणार्थ ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग ग्राउंड बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.

या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात ‘सानेगुरुजी भवन’ आणि ‘आंतरभारती अनुवाद केंद’ अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘सानेगुरुजी भवना’मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच ‘आंतरभारती अनुवाद केंद्र’ हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक समानता येईल असे त्यांना वाटत होते परंतु समाजातील असमानता वाढतच गेली.तशातच महात्मा गांधीजींचा खून झाला त्या मुळे हळव्या मनाचे गुरुजी निराश झाले होते आणि त्यांनी २१ दिवसांचा उपवास देखील केला आणि शेवटी आपला मनोभंग झाला म्हणून ११ जून,१९५० रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेऊन जीवन संपवले आणि सारा देश एका महान देशभक्ताला मुकला.

सुधीर फडके यांनी गुरुजींचे बलसागर भारत होवो हे गाणे गायले आहे.

विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार करणाऱ्या शुचिर्भूत व्यक्तिमत्वाच्या परमपूज्य सानेगुरुजींची आठवण सगळ्यांना कायमच होत राहील.

आजच्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली

…… लेखक अज्ञात – वॉट्सअॅपवरून साभार दि.११-०६-२०२०

नवी भर दि.२४-१२-२०२०

लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्य-मिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )

  • माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरून साभार

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय

ABGMM

गांधर्व महाविद्यालय (भाग १)

मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).

त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुसऱ्या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, ग्रामोफोनच्या रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाढ्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
……….

गांधर्व महाविद्यालय (भाग २)

gandahrva

आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पायऱ्या निर्माण केल्या. पुढील काळात या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या शास्त्रीय संगीतातल्या अवघड बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणाऱ्या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. पुढील काळात या संस्थेचे नामकरण “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ” असे झाले. येणाऱ्या काळात त्यांचे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

आज या संस्थेचा खूप विस्तार झाला आहे. तिचे रजिस्टर्ड ऑफीस मिरज येथे आणि मुख्य कार्यालय वाशी इथे आहे. तिच्याशी संलग्न अशा १२०० संस्था भारताच्या कान्याकोपऱ्यात पसरल्या आहेत आणि ८०० केंद्रांवर तिच्यातर्फे परीक्षा घेतल्या जातात. त्यात दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थी परीक्षा देतात. येणआऱ्या काळातही तिचा विस्तार होत राहो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही प्रसार होत राहो अशा या पोस्टमधून शुभेच्छा.

महर्षी धोंडो केशव कर्वे

karvecollge

‘दगड्या’, ‘धोंड्या’, ‘काळ्या’ असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना “शतायुषी भव” असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव ‘धोंडो’ असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत ‘एतद्देशीय मनुष्यांना’) जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे ‘व्हर्नाक्युलर फायनल’ ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील कऱ्हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणाऱ्या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी कऱ्हाड की साताऱ्याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहेऱ्यावरील निरागस भाव पाहून त्याला ‘अजाण बालक’ ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.

ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणाऱ्या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्या लोकांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.

कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.

दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुसऱ्या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. या विषयावर हिमालयाची सावली नावाचेे एक सुंदर नाटक आले होते. कर्वे तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.

धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्यांच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.

पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

कर्वे बहुमान

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो.

पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.

**********************

नवी भर दि. १९-०४-२०२१ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांची समग्र माहिती देणारा श्री.भरतकुमार राऊत यांचा लेख खाली दिला आहे.

महर्षी !
गेल्या दोन शतकांत महाराष्ट्राने जे सेवाभावी शिक्षणतज्ज्ञ निर्माण केले, त्यातीलच एक अर्वाचीन गुरू म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांचा आज जन्मदिन! त्यांच्या सेवाभावी स्मृतींस भावपूर्ण आदरांजली !
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव . शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.
१८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.
लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाहासाठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली.
रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि ७५० रुपयांची देणगी संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केली. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.
१९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत.
आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘निष्काम कर्म मठा'ची स्थापना १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ निर्माण झाली. तिचेच नाव पुढे ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे झाले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला बाया कर्वे पुरस्कार देते. अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचेश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे झाले.
अण्णांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून १९१० मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची त्यांनी स्थापना केली.
१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली.
स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. महिलांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ हे नाव देण्यात आले.
या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता परमोशक्ति।’

इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.
अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. पद्मविभूषण' हा किताब त्यांना १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानभारतरत्‍न’ने सन्मानित करण्यात आले.
१०४ वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आज २०२१ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ दिमाखात उभी आहे, जड उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

  • भारतकुमार राऊत

त्यांच्याविषयी ऐकलेल्या काही हकीकती : महर्षी कर्वे यांचा पुनर्विवाह झाला तेंव्हा त्यांची खूपच कृश शरीरयष्टी पाहून त्यांना काही झाले तर त्यांच्या पत्नीचे काय होईल? या काळजीने पंडिता रमाबाईंनी अशी अट घातली की त्यांनी आपला विमा उतरवून घ्यायला हवा. पुढे त्या विम्याची मुदत संपली तेंव्हा त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की “मी आता विधवांसाठी आश्रम स्थापन केला आहे, त्यामुळे तुला या पैशाची गरज उरली नाही.” असे म्हणत त्यांनी ते सगळे पैसे आपल्या संस्थेवर खर्च केले. अण्णासाहेब कर्वे तर शतायुषी झाले होते, पण त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्यांचे सांत्वन करायला आलेल्या एका माणसाला त्यांनी निर्विकारपणे सांगितले “अहो, त्याचे वय झाले होते, तो गेला”

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके

आद्य क्रांतीकारक

काही वर्षांपूर्वी एकदा १७ फेब्रूवारीच्या पेपरात मी वाचले की वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यूदिन १७ फेब्रूवारी १८८३ हा होता. त्या दिवसानिमित्य वासुदेव बळवंतांबद्दल इतरत्र आणखी कांही लिहिले आहे का हे पाहिले, पण तसे कोणतेच वृत्त त्या एक दोन दिवसातल्या वर्तमानपत्रात आले नाही. आजकाल रोजच कोणा ना कोणा संत, महंत, पुढारी, हुतात्मा यांपैकी कोणाची तरी जन्मतारीख किंवा पुण्यतिथी असते त्यामुळे या आद्य क्रांतीकारकाच्या पुण्यातिथीला आता बातमीमूल्य (न्यूजव्हॅल्य्) राहिले नसावे. शिवाय तत्कालिन महत्वाच्या अनेक घडामोडी होत असतात, त्यांनाच वर्तमानपत्रांमध्ये प्राधान्य मिळणे साहजीक आहे.

इतर कोणाचे कांही विचार असोत, वासुदेव बळवंत फडके हे नांव वाचताक्षणीच त्यांचा अद्भुत जीवनपट सर्रकन माझ्या डोळ्यासमोरून तरी उलगडत गेलाच. माझ्या लहानपणी आम्हाला वर्षातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जात असत. ते एक तर देवदेवतांच्या कथानकांवरचे पौराणिक चित्रपट असत किंवा भक्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या ईश्वराने केलेले चमत्कार त्यात दाखवले जात. त्यातल्या ट्रिकसीन्सवर आम्ही बेहद्द खूष होत असू. त्या काळातच मला वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरचा जुना सिनेमा पहायला मिळाला. कदाचित इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असा तो अपवाद असल्यामुळे माझ्या बालमनाला जास्त भिडला आणि कायमचा लक्षात राहिला. त्यानंतर पन्नास वर्षांनी तिसऱ्या पिढीतल्या कलाकारांनी निर्माण केलेला त्याच विषयावरचा चित्रपट मी अलीकडच्या काळात पाहिला. अर्थातच या वेळी मला तो जास्त समजला आणि अधिक परिणामकारक वाटला. याशिवाय अधून मधून वाचलेले लेख, ऐकलेली भाषणे वगैरेंमधून वेळोवेळी वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल माहिती मिळत गेली होतीच.

पनवेलजवळ असलेल्या शिरढोण गांवात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म सन १८४५ च्या ४ नोव्हेंबर रोजी झाला. तोंपर्यंत पेशवाईचा अस्त झाला होता आणि ब्रिटीश राजवटही पूर्णपणे प्रस्थापित झालेली नव्हती. त्या स्थित्यंतराच्या काळात शालेय शिक्षणाचे काय स्वरूप होते कोण जाणे, पण जे कांही होते ते मुळातच बंडखोर वृत्तीच्या असलेल्या लहान वासुदेवाला पटले नाही. त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि त्यापेक्षा व्यायाम, कुस्ती वगैरे माध्यमातून शरीरसंवर्धनाला महत्व दिले. पण पुढे त्याला नोकरी करावीशी वाटली किंवा त्याची गरज भासली यामुळे तो पुण्याला जाऊन इंग्रजांच्या लष्कराच्या मुलकी सेवेत काम करायला लागला. सन १८७० च्या सुमारास त्या काळातले भारतीय नेते सनदशीर मार्गाने ब्रिटीशांचे मन वळवून जनतेसाठी कांही सवलती मिळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटीश राजवटीत जनतेवर होत असलेला अन्याय त्यांच्या लिहिण्या बोलण्यातून व्यक्त होत होता. अंग्री यंग मॅन वासुदेवाला मात्र हे सहन होण्यासारखे नव्हते. तरीही संयम बाळगून त्याने आपली चाकरी चालू ठेवली, पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या राजवटीची बलस्थाने आणि त्यातले कमकुवत दुवे यांची बारकाईने पहाणी केली. एका अधिकाऱ्याच्या आंकडूपणामुळे त्याला आपल्या मरणासन्न आईची अखेरची भेट घेता आली नाही हा व्यक्तीगत घाव मात्र त्याला सहन झाला नाही आणि ब्रिटीशांचे अन्याय्य राज्यच उलथून पाडण्याचा चंग बांधला.

शहरात राहणाऱ्या सुशिक्षित किंवा पुढारलेल्या समाजाकडून त्याच्या प्रत्यक्ष कृतीला भरीव पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. जनमानसावर प्रभाव असलेल्या तत्कालीन संतमहंतांची भेटही त्याने घेऊन पाहिली, पण त्याचा उपयोग झाला नाही. रानावनातल्या तथाकथित मागासलेल्या जमातीतल्या लोकांची टोळी बनवून त्याने आपल्या संघर्षाची सुरुवात केली. इंग्रजांशी लढाई करायची असेल तर त्यासाठी सैन्याची उभारणी करायला हवी, त्यांच्या हाती शस्त्रे देण्यासाठी पैशाची तरतूद व्हायला हवी. तो कोठून आणणार? ब्रिटीशांबरोबर लढण्यासाठी त्यांचाच पैसा लुबाडण्याचे वासुदेवाने ठरवले आणि सरकारी तिजोरीवर डल्ला घातला. जनतेकडून लुबाडलेला कर जनतेच्या स्वातंत्र्ययुध्दासाठी कामी आणण्यात कांही गैर नाही अशी तात्विक बैठकही त्या मागे होती. मिलिटरीमध्ये नोकरी करतांना आलेल्या अनुभवाचा आणि मिळवलेल्या माहितीचा चांगला उपयोग करून घेऊन त्याने अशा गनिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटाच लावला. त्याला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षिस जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थेट गव्हर्नर पासून अन्य इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून देण्यासाठी वासुदेव बळवंताने बक्षिसे जाहीर केली. यावरून त्याच्या झुंजार स्वभावाचे दर्शन घडते.

पुण्याच्या परिसरातल्या जंगलामध्ये त्याने आपले ठाणे बनवले होते. सरकारी तिजोरी लुटण्यामागचा मुख्य उद्देश समजून न घेता त्या लुटीतूनच आपला वाटा मागायला कांही सहकाऱ्यांनी सुरुवात केली तेंव्हा निराश होऊन वासुदेव बळवंताने तात्पुरते दक्षिणेकडे स्थलांतर केले आणि तत्कालीन हैदराबाद संस्थानात जाऊन तिथल्या रोहिले आणि अरबांची फौज जमवली. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागात जमवाजमव करून इंग्रजांवर अनेक बाजूंनी हल्ला करण्याची मोठी योजना त्याने आंखली होती. पण आता ब्रिटीश सरकार सावध झाले होते. त्यांचे अधिकारी हात धुवून वासुदेवाच्या मागे लागले. दोघांच्या फौजांमध्ये एक चकमक सुध्दा झाली. अखेर जंगलातून मार्गक्रमण करत असतांना त्याच्याच एका सहकाऱ्याने केलेल्या दगाबाजीमुळे वासुदेव बळवंत पकडले गेले. त्यांच्यावर पुण्यातल्या कोर्टात खटला चालला आणि त्यांना तुरुंगवासासाठी दूर एडनला धाडण्यात आले. तिथल्या त्या तुरुंगातून पलायन करण्यातही ते यशस्वी झाले होते, पण परमुलुखात असल्यामुळे त्यांना पुन्हा पकडून तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर मात्र सुटकेची आशा न उरल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करून तुरुंगातच प्राणत्याग केला. अशा प्रकारे या अलौकिक पुरुषाची प्राणज्योत त्याने स्वतःच मालवली.
———
भाग २ : सव्वाशे वर्षांनंतर
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मला त्यांच्या पुण्यतिथीच्या तारखेला मिळाली हा जसा एक योगायोग होता. त्याचप्रमाणे दोन दिवसांनी आलेल्या शिवजयंतीच्या दिवशी मी या विषयावर पुढे लिहिण्याचा आणखी एक योगायोग जुळून आला. वासुदेव बळवंतांची कार्यपध्दती पाहिली तर त्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्फूर्ती मिळाली असणार असा विचार मनात येतो. जुलमी परकीय राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय सहन न करणे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी न डगमगता खंबीरपणे उभे राहणे, तळागाळातल्या गरीब व सामान्य जीवन जगणाऱ्या माणसांना प्रेरित करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना निष्ठेने कामाला लावणे, शत्रूला एकापाठोपाठ एक धक्के देत राहणे अशासारखी त्यांच्या जीवनातील उदाहरणे हे सुचवतात.

वासुदेव बळवंतांच्या जीवनाला आता सव्वाशे वर्षे लोटून गेली आहेत. या दरम्यान भारतातली परिस्थिती इतकी बदलली आहे की आज आपण त्या जुन्या कालखंडाची कल्पनासुध्दा करू शकत नाही. मी जे कांही वाचले, ऐकले किंवा पडद्यावर पाहिले आहे ते सगळे अलीकडील लोकांनी लिहिले, सांगितले आणि दाखवले आहे. त्या लोकांनी ते कशाच्या आधारावर केले होते याची मला सुतराम कल्पना नाही. हे असे लिहिण्यामागे तसेच एक कारण आहे.

हा लेख लिहिण्यापूर्वी मी आपल्याकडल्या माहितीची उजळणी करण्यासाठी आंतरजालावर थोडेसे उत्खनन केले. त्यात मला जी माहिती सापडली ती म्हणावे तर जराशी मनोरंजक आणि खरे तर चिंताजनक वाटली. विकीपीडिया या आजकाल थोडी फार मान्यता प्राप्त झालेल्या कोषावर दिलेली माहिती वाचून माझ्या मनात वासुदेव बळवंतांची जी प्रतिमा होती तीच दृढ झाली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तारीखवार तपशील मिळाला. मात्र वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरू तसेच अनुयायी यांचा जातीनिहाय उल्लेख त्या लेखात केला होता. (आता कदाचित त्यातले काही उल्लेख काढून टाकलेले दिसतात.) सव्वाशे वर्षांपूर्वी त्या गोष्टीला कदाचित प्रचंड महत्व होते. आजसुध्दा कदाचित कांही लोकांच्या किंवा ती नोंद लिहिणाऱ्याच्या मनात त्याविषयी तीव्र भावना असतील आणि त्यामुळेच ते तपशील विस्ताराने लिहिले गेले असेल. पण मला ते योग्य वाटले नाही म्हणून माझ्या लेखात मी कुणाचे जातीनिहाय उल्लेख केले नाहीत.

त्या काळातच या विषयावरील दुसरा लेख मला एका हिंदुत्ववादी संकेतस्थळावर वाचायला मिळाला. त्या लेखातील जवळजवळ प्रत्येक वाक्यात हिंदुत्वाचा उल्लेख घुसवला आहे. “ब्रिटीशांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले”. “अन्याय सहन न करण्याच्या हिंदू परंपरेनुसार वासुदेव बळवंत त्याच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले”, “हिंदूराष्ट्र उभे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला”, “ज्या हिंदू मराठा लोकांनी अफगाण आणि मोगलांचे कंबरडे मोडले अशा मर्द मराठ्यांची सेना उभारून त्यांनी इंग्रजांना बेजार केले”, “त्यासाठी अमक्या देवळात जाऊन देवदर्शन घेतले आणि तमक्या देवळात मुक्कामाला असतांना आपली रोजनिशी लिहिली” वगैरे लिहून झाल्यानंतर अखेरीस “एका मुसलमानाने त्यांना पकडून दिले” असे गरळ ओकून “वासुदेव बळवंत फडके हे आद्य हिंदू क्रांतीकारक होते” असा शोध लावला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात मुसलमान शिपाईसुध्दा हिंदू सैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढले होते आणि वासुदेव बळवंतांनी हैद्राबादला जाऊन आपल्या कामासाठी तिथे मदत मिळण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टी सोयिस्कररीत्या विसरून वासुदेव बळवंत यांनी मराठे आणि शीख लढवय्यांची परंपरा सांभाळली असे प्रतिपादन या लेखात केले होते.

वासुदेव बळवंत फडके यांच्या नांवाने भारत सरकारने काढलेल्या तिकीटाचा शोध घेता घेता मी विशिष्ट उपजातीच्या संकेतस्थळावर जाऊन पोचलो. त्यात त्या उपजातीतील लोकांच्या नांवाने काढलेल्या टपाल तिकीटांची चित्रे मिळाली. त्यात दाखवलेल्या बहुतेक व्यक्तींनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवला आहे. त्या महात्म्यांनी आपले जीवन जातीयतेचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात घालवले होते. त्यातल्या कोणाला तेल्यातांबोळ्यांचा पुढारी म्हणून हिणवले गेले तर कोणाला जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजातून होणाऱ्या विरोधाकडे लक्ष न देता आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जागून त्यांनी आपले देशकार्य चालवले होते. वासुदेव बळवंतांची विचारसरणी देखील विशाल आणि पुरोगामीच होती अशी माझी कल्पना आहे. पण केवळ आडनांवावरून त्यांची गणना विशिष्ट उपजातीएवढ्या संकुचित विश्वात का व्हावी? याच कारणावरून त्यांचे महत्व कमी लेखण्याचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्नही चालले आहेत असे वाटते.

अशा प्रकारच्या लेखांचे वाचन करून भूतकाळात डोकावणारी भविष्यकाळातली पिढी आणखी काही वर्षांनंतर आपल्या राष्ट्रीय इतिहासातल्या महान व्यक्तींना किती खुजे ठरवेल याची मला चिंता वाटते.

***************************************

नवी भर दि. २७-०२-२०२१

मला वॉट्सअॅपवर मिळालेला लेख आणि कविता :

  • वासुदेव बळवंत –

आज 17 फेब्रुवारी. वासुदेव बळवंत ह्या आद्य क्रांतिकारकाचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस. 4 नोव्हेंबर 1845 ते 17 फेब्रुवारी 1883. जेमतेम 38 वर्षांचा आयुष्याचा कालखंड. जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभ्या राहणार्या ह्या आद्य क्रांतिकारकाला काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतांना एडनच्या तुरंगात मृत्यू आला.
1983 ते 1985 मधे रायगड जिल्ह्याला DSP म्हणून प्रवीणची नेमणूक असतांना कर्नाळ्याचा किल्ला पाहिला. तेथे 1818 पर्यंत वासुदेव बळवंतांचे आजोबा किल्लेदार होते. इंग्रजांशी निकराची झुंज देऊनही किल्ला पडला. वासुदेव बळवंतांचे जन्मग्राम शिरढोण तेथून जवळच आहे. तेथे त्यांची स्मृती अजूनही जपली आहे. अलिबागला समुद्राच्या किनार्यावर असलेल्या घरातून मी तेथून न दिसणारं एडन पहायचा प्रयत्न करायचे –

अलिबाग नाम गावी । सज्जात मी उभी ही
अंधारल्याच रात्री । भय ना शिवे मनासी ।

नव्हतेच चांदणेही । तरि जाग सागरासी
`चल मित्र तूच माझा’ । वदलेच मी तयासी ।

`बोलूच अंतरंगी । जे साठले दिसांचे
जे सांगण्यास कुणिही । नव्हतेच योग्यतेचे’ ।

लाटाच सागराच्या । फुटता तटी निनादे
गंभीर गाज कसली । तिमिरास भेदुनी ये ।

अस्वस्थ का करे ही । माझ्या मनास ऐसी
तो नाद का श्रुतीसी । पुसतोच प्रश्न काही ।

अंगावरीच माझ्या । रोमांच का उभे हे
सांगे मलाच भासे । सिंधूचि दुःख अपुले ।

“तू ऐकतेस नेमे । ध्वनि जो जळात वाहे
खळखळाट तो न माझा । ध्वनि दूरचाच तो ये ।

मी सांधतोच भूमी । मी जोडतो किनारे
मी पूर्व पश्चिमेचे । सांगतो एक नाते ।

तट जोचि भारताचा । येमेनशी जुळाला
तेथेच एडनमधे । कारागृहीच तिथल्या ।

अजुनी उठे ध्वनी तो । खळखळा जीवघेणा
त्या साखळ्याच पायी । बेड्या मणामणांच्या।

कंठात लोह बेडी । जखडेचि घट्ट जीवा
वनराज तोचि छावा । भय दावि इंग्रजांना ।

तो वासुदेव फडके । बळवंत पुत्र ऐसा
मृत्यूहि घाबरे त्या । होता असा दरारा ।

टोपीकरांस भीती । त्याचीच फार वाटे
स्वातंत्र्य भारताचे । मिळविण्या वीर झुंजे ।

उठविले भारतीया । झालेच लोक जागे
संग्राम थोर केला । स्वातंत्र्य लाभण्या ते ।

फितुरीच शाप आम्हा । वाटेचि खेद भारी
हा! हा! च घात झाला । आलाच सिंह हाती ।

त्यासीच एडनमधे । यातना दिल्या असह्य
तरिही वदे हसोनी । देहास दुःख बाह्य ।

संबंध भावनांशी । नाहीच यातनांचा
का अग्निदिव्य करण्या । भय कांचना मनी त्या ।

जळुनीच हीण जाते । अग्नीमधेच सारे
करुनीच अग्निदिव्या । उतरते खरेचि सोने

शिरढोण गाव त्याचे । माहीत ना कुणाला
तो पुत्र ह्याच भूचा । माहीत ना कृतघ्ना ।

स्पर्शून रोज येतो । कारागृहास तिथल्या
चरणावरीच भूच्या । नमवी सदैव माथा ।

बेड्याच खळखळा त्या । तोडून मृत्यु गेला
तो नाद त्या ध्वनीचे । अप्रूप ह्या जलाला ।

वाहून आणतो `तो’ । ध्वनि तोचि रोज येथे
लाटांसवेच माझ्या । शिरढोण ग्राम ऐके ”।

झाला तटस्थ सिंधु । देऊन वादळासी
माझ्या मनात लाटा । उठती अनंत वेगी
नयनांचिया किनारी । फुटतीच आदळोनी
नेत्रा झुगारिते का । भरतीच भावनांची

पुसुनीच नेत्र माझे । क्षितिजापलीकडे मी
पाहून वंदन करी । वीचींस थोर त्या मी ।

करुनी प्रणाम त्याची । रत्नाकरास विनवी
कर काम एक माझे । करु नको मला मनाई

नित जोडतो किनारे । गुज पोचवी मनीचे
दाही दिशात घुमतो । ध्वनि त्यास सांग वेगे ।

आहेच क्षुद्र जरि मी । कोणी अरुंधती रे
“हे क्रांतिवीर सिंहा । घे वचन तूचि माझे ।

स्वातंत्र्य भारताचे । टिकविण्या लेखणी ही
चालेल नित्य माझी । हे ध्येय एक चित्ती ।
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
लेखणी अरुंधतीची –

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

 

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर त्या ऐकणाऱ्या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, मग ते लोक दुसऱ्या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.

काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणाऱ्या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंचवीस तीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम श्री. भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी १८९२-९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून ‘लोकमान्य’ झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला ‘धर्मबुडवा’ म्हंटले तर कुचाळकी करणाऱ्यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीय लोकांचे. कोणाला मेळ्यामधील कार्यक्रमात बरेच काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. त्यांनी या सर्वांची टिंगल केली किंवा त्यांचा निषेध केला. पण त्यांनी केलेल्या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. ते आपल्या ध्येयाच्या दिशेने शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.

टिळकांचे कळकळीने केलेले सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनुकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुढल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानांमध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी तिथले अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रसार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . .

तेथे कर माझे जुळती – भाग १७ – स्व.भाऊसाहेब भुस्कुटे

 

Bhausaheb 1

(मी हा लेख २०१५ मध्ये लिहिला होता.)

माझे लग्न ठरल्यानंतर मी एक लहानसा फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे स्थिरस्थावर व्हायच्या आधीच मला एक निरोप आला की अलकाचे म्हणजे माझ्या भावी वधूचे भाऊसाहेबकाका मला भेटायला (आणि माझे घर पाहायला) अमक्या दिवशी संध्याकाळी येणार आहेत. पण तोंवर मी फक्त झोपण्यासाठी एक पलंग आणि चहा करण्यापुरती दोन चार जुजबी भांडी घरात आणून ठेवली होती. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या घरात (पहायला असे) काहीच नव्हते. फक्त भेटायचे असते तर ते जिथे आले असतील तिथे जाऊन मीच त्यांना भेटून आलो असतो, पण त्यांना माझे घर पहायचे होते.

ठरल्या वेळी एका प्रचारकाला बरोबर घेऊन ते माझ्या घरी येऊन पोचले. त्यांची उंच आणि सुदृढ शरीरयष्टी, गोरापान आणि तेजःपुंज चेहेरा, त्यावर अत्यंत सात्विक भाव वगैरे पाहून मी क्षणभर त्यांचेकडे पहात राहिलो. भानावर येताक्षणी लगेच त्यांना वाकून नमस्कार केला तो फक्त औपचारिक नव्हता. माझ्याहून सर्वतोपरीने खूप मोठ्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल मनात दाटून आलेला आदरभाव त्यात होता. माझे काडेपेटीएवढे आणि तेसुद्धा ओकेबोके असे घरकुल पाहून त्यांना काय वाटले असेल कोण जाणे, पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी थोडी विचारपूस केली आणि इकडच्या तिकडच्या काही गोष्टी झाल्या. माझे कौतुक करण्यासारखे माझ्याकडे काही नव्हतेच, माझ्याबद्दल त्यांचे कितपत अनुकूल मत झाले होते तेही मला कळले नाही. पण ठरल्याप्रमाणे आमचे लग्न झाले आणि भाऊसाहेबकाकांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला यात सगळे आले.

लग्न झाल्यानंतर मी अनेक वेळा सासुरवाडीला गेलो. मध्यप्रदेशातल्या टिमरनी नावाच्या गावी भुस्कुट्यांची पुरातनकाळातली गढी आहे. पेशवाईच्या काळात शिंदे होळकर आदि मराठे सरदार उत्तरदिग्विजयासाठी निघाले तेंव्हा त्यांच्यासमवेत भुस्कुट्यांचे पूर्वज या भागात जाऊन स्थाइक झाले होते. आपल्या संरक्षणासाठी त्यांनी ही गढी बांधली असेल किंवा काबीज करून आपल्या ताब्यात घेतली असेल. तेंव्हापासून ती या कुटुंबाकडे आहे. त्या भागात लहानशा भुईकोट किल्ल्याला गढी म्हणतात. शनिवारवाड्याप्रमाणे त्याच्या सगळ्या बाजूंनी तटबंदी आहे, त्यात मध्ये मध्ये बुरुज आहेत आणि आत जाण्यासाठी एक अवाढव्य आकाराचा दरवाजा आहे.

गढीच्या आत एक जुन्या काळातला प्रचंड मोठा वाडा आहे तसेच आणखी काही वास्तू आहेत. माझे लग्न झाले त्या वेळी भाऊसाहेब, बाबासाहेब आणि अण्णासाहेब यांची अशी तीन कुटुंबे त्यात रहात असत. त्यांच्यात कागदोपत्री वाटण्या झाल्या होत्या आणि तीन ठिकाणी वेगळ्या चुली मांडल्या गेल्या होत्या असे असले तरी मनाने ते सगळे कुटुंबीय एकमेकांशी घट्ट बांधलेले होते. काही तरी विचारायला किंवा सांगायला, मागायला किंवा द्यायला, नाहीतर अशाच नुसत्या गप्पा मारायला म्हणून रोजच बहुतेक सगळ्यांचे आपसात एकमेकांकडे जाणेयेणे चाललेले असे. गढीतली लहान मुले कुठेही एकत्र खेळत, कुणाकडेही खातपीत आणि कधीकधी झोपून पण जात असत. त्यांच्या दृष्टीने सगळे मिळून एकच कुटुंब होते, त्यांच्यात सख्खा, चुलत वगैरे भेदभाव नसायचा.

आपले भाऊसाहेब अशा त्या अद्भुत कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्रधार होते असेही कदाचित म्हणता येईल. त्यांच्या नावाचाच मोठा दरारा होता. निरनिराळ्या विषयांवरील आपापसातल्या बोलण्यातल्या संभाषणाची गाडी एका विशिष्ट वळणावर अनेक वेळा येत असे. “यावर भाऊसाहेब काय म्हणतील? त्यांना काय आवडेल? त्यांना हे पटेल किंवा चालेल का?” वगैरे वगैरे… . त्यापुढची चर्चा “त्या वेळी ते असे बोलले होते किंवा आणखी कधी त्यांनी तसे सांगितले होते किंवा तसे केले होते.” अशा पद्धतीने चालत असे. आपली मते मांडतांना सुद्धा अशा प्रकारचा त्यांचा आधार घेतला जात असे.

माझ्या लहानपणी आमच्या वडिलांचासुद्धा घरातल्या सर्वांना प्रचंड धाक वाटत असे. त्यांच्या विरोधात ब्र उच्चारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, चुकून काही तरी विसंवादी शब्द तोंडातून निघतील या भीतीमुळे त्यांच्यासमोर असतांना सहसा कोणीही मोकळेपणे बोलत नसत, कधी कधी तर त्यांच्या समोर यायचेच टाळत असत. अशा प्रकारच्या वातावरणाचा मला अनुभव होता आणि त्यात माझी तिथे घुसमट होत होती, पण इथे मी त्रयस्थपणे पाहू शकत होतो. त्यावर विचार करू शकत होतो. माझे वडील शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांचा राग अनावर होत असे याची सर्वांना धास्ती वाटायची. पण भाऊसाहेब मला तरी खूप शांत, प्रेमळ आणि सात्विक वृत्तीचे दिसत होते, त्यांच्या बोलण्यात मार्दव होते. तरीही सर्वांना त्यांची भीती का वाटावी हा प्रश्न मला पडत असे.

त्यांची बुध्दिमत्ता आणि विद्वत्ता सर्वसामान्यांहून खूप उच्च दर्जाची होतीच, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि अनुभवविश्व अचाट होते. याचा सर्वांवर प्रभाव पडत असणार. “केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार।।” असे एक सुभाषित आहे. मूळच्याच कुशाग्र बुध्दीला या सर्वांची साथ मिळाली तर तिचा अफाट विकास होणार आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत या चारही गोष्टी मुबलक प्रमाणात घडत असत. यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आपण मुकाटपणे त्या रस्त्याने जावे असे इतराना नेहमीच वाटत असणार. त्यापेक्षा वेगळे काही केले तर त्यावर “भाऊसाहेब काय म्हणतील?” यापेक्षा सुद्धा “यात आपलीच काही चूक होत आहे का?” अशी शंका येत असेल किंवा “बाकीचे लोक असे समजतील का?” असा प्रश्नही पडत असेल. त्यापेक्षा कुठलेही काम भाऊसाहेबांना विचारून काहीही केलेले सर्वांना सुरक्षित वाटत असावे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

तेथे कर माझे जुळती – भाग १७ – स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (उत्तरार्ध)

Bhausaheb 2

भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले होते. त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, कार्यकुशलता, जनसंग्रह, कर्तृत्व आदि गुणांच्या आधारे त्यांना तिथेही पदोन्नति मिळत गेली आणि एक एक पाय-या चढत ते सर्वात वरच्या स्तरापर्यंत जाऊन पोचून ते संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले होते. समाजसेवा, शिक्षण आदि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या संघपरिवारातल्या अनेक संस्थांशी ते संलग्न झाले होते. त्या संस्थांच्या उपक्रमांचे नियोजन, त्यांच्या कामाची पाहणी करणे, तसेच समित्या, उपसमित्यांच्या बैठका, शिबिरे, समारंभ यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे वगैरें कामांसाठी त्यांना नेहमी दौ-यावर जावे लागत असे आणि त्यामुळे बराचसा काळ ते बाहेरगावी गेलेले असत. जेंव्हा ते घरी असत तेंव्हाही त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असायची. काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी मुक्कामाला थांबत असत तेंव्हा त्यांच्या जेवणखाण्याची आणि राहण्याची व्यवस्था त्यांच्या वाड्यावरच होत असे.

भाऊसाहेबांच्या वाड्यातल्या एका सोप्यात ओळीने खुर्च्या आणि सोफे मांडून दहा बारा लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली होती. त्यांच्याकडचे पाहुणे आणि त्यांना भेटायला आलेली मंडळी तिथे बसून वर्तमानपत्रे चाळवीत किंवा चहाचे घोट घेत गप्पागोष्टी करत बसत. भाऊसाहेबांना त्यांच्या कामाच्या व्यापातून थोडा निवांत वेळ मिळाला की त्या सोप्याच्या एका बाजूला टांगलेल्या झोपाळ्यावर ते येऊन बसत, समोर बसलेल्या व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करत असत आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत असत. तो एक प्रकारचा छोटासा दरबारच असायचा. त्यात अनेक विषयांवर गप्पागोष्टी, संभाषण, चर्चा वगैरे चाललेल्या असायच्या. काही कारणाने मी त्यांच्या समोरून जात असलो तर ते मलाही हाक मारून बोलवायचे आणि समोर बसायला सांगायचे. आपल्यालाही ज्ञानामृताचे काही कण मिळतील म्हणून मी तत्परतेने तिथे बसून घेत असे.

या संभाषणांमधून मला निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे अनुभव ऐकायला मिळत होते, कोणत्या प्रसंगी कसे वागावे किंवा वागू नये आणि प्रत्यक्षात लोक कसे वागतात वगैरे ऐकणे मला खूप इंटरेस्टिंग वाटत असे. मला आधी ठाऊक नसलेल्या काही बातम्या त्या ठिकाणी समजत होत्याच, शिवाय काही घटनांना प्रसारमाध्यमांमध्ये कशी प्रसिद्धी मिळते आणि वास्तविक कशी वेगळी परिस्थिती असते हे ऐकायला मिळत असे. एकच घटना वेगवेगळ्या अँगल्समधून पाहता ती कशी वेगळी दिसते हे त्यातून समजत होते. त्या मैफलींमधले बहुतेक संभाषण तात्कालिक घडामोडींविषयी होत असले तरी त्या संदर्भात काही इतिहासकालीन किंवा पुराणातले दाखले ऐकायला मिळत. आपला अभिप्राय व्यक्त करतांना भाऊसाहेब गीतेमधले श्लोक किंवा संस्कृत सुभाषिते वगैरे अधून मधून सांगत असत. माझ्या दृष्टीने तो अनुभव एकंदरीत चांगला असायचा पण तो जरा एकांगी आहे, त्यात दुस-या बाजूचा पुरेसा विचार केला जात नाही असे मात्र मला कधी कधी वाटायचे एवढेच.

वीस पंचवीस वर्षांपूर्वी आयुर्विमा, बँका, रेल्वे आदींच्या काँप्यूटरायझेशनला सुरुवात झाली त्या काळात बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत असत. त्या काळात सर्वसामान्य लोकांना या विषयाची जाण नव्हती. एकदा मी भाऊसाहेबांच्या दरबारात बसलेलो असतांना “ये काँप्यूटर क्या होता है?” असे कुणीतरी कुतूहल म्हणून विचारले. एकाद्या अनभिज्ञ माणसाला ते समजावून सांगण्यासाठी कुठून सुरुवात करावी याचा मी विचार करत होतो. पण भाऊसाहेबांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामधून असा तर्क केला असावा की काँप्यूट म्हणजे कॅल्क्युलेट तसेच काँप्यूटर म्हणजे कॅल्क्युलेटर असेल आणि त्यांनी तो अर्थ सांगूनही टाकला. अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रचंड आकडेमोड सुद्धा काँप्यूटरद्वारे चुटकीसरशी करता येते. या अर्थाने हे उत्तरही बरोबरच असले तरी हा त्याचा फक्त एक उपयोग आहे. काँप्यूटरच्या सहाय्याने त्याखेरीज इतर अनेक कामे सुलभपणे करता येत असल्यामुळे “काँप्यूटर म्हणजे फक्त एक मोठा कॅल्क्युलेटर” असे म्हणता येणार नाही. पण सर्वांच्या समोर त्या मतात दुरुस्ती करणे मला प्रशस्त वाटले नाही. एकादा माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी तो सर्वज्ञ होऊ शकत नाही, पण त्याच्याकडून लोकांची तशी अपेक्षा असली तर त्यामुळे कधीकधी असे प्रसंग घडू शकतात.

“हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारता जो घणी।। तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा।।” असे संत तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हंटले आहे. असामान्य माणूस सर्वसामान्यांपेक्षा कसा वेगळा असतो हे कठीण प्रसंगीच कळते. भाऊसाहेब असेच असामान्य पुरुष होते. आणीबाणीच्या काळात त्यांना बंदीवासात ठेवले गेले होते. त्याच काळात त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. आम्ही त्या समारंभासाठी नागपूरला गेलो होतो. या कारणासाठी तरी त्यांना नक्कीच मुक्त केले जाईल असे आम्हाला वाटत होते, पण लग्नाच्या व-हाडासोबत ते आलेले नव्हतेच, लग्नाच्या आदले दिवशी संध्याकाळपर्यंत कार्यस्थळी येऊन पोचले नव्हते. जेलच्या नियमांनुसार त्यांना सोडण्यासाठी त्यांनी काही कागदांवर सह्या करणे आवश्यक असावे. सुटकेसाठी अर्ज, विनंती, पुन्हा परत येण्याची हमी वगैरे त्यांच्याकडून मागितले गेले असणार, पण असे समजले की त्यांनी याला सपशेल नकार दिला होता. आपली काहीच चूक नसतांना ज्या लोकांनी आपल्याला (अन्यायाने) डांबून ठेवले होते, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांची मनधरणी करणे भाऊसाहेबांना अजीबात मान्य नव्हते असे समजले. त्यांच्याबद्दल असलेला आदर शतपटीने वाढला, पण या मंगल प्रसंगी त्यांची उपस्थिती नसल्यामुळे वाईटही वाटत होते. जड अंतःकरणाने सगळे धार्मिक विधी पार पाडले जात असले तरी कोणाला त्यात उत्साह वाटत नव्हता. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर “भाऊसाहेब आले.” असा अचानक गलबला झाला आणि सगळे पाहुणे जागे होऊन हॉलमध्ये आले. खरोखरच भाऊसाहेब प्रवेश करत होते. कदाचित त्यांच्या नावाचा इतका दबदबा होता की त्यांच्या स्वाभिमानाला धक्का न लावता त्यांना तिथे आणून पोचवण्याची व्यवस्था झाली होती. त्यांना प्रवासाचा थकवा आलेला दिसत असला तरी नेहमीसारख्याच शांत मुद्रेने आत येऊन त्यांनी सगळ्या पाहुण्यांना प्रेमाने अभिवादन केले, हंसतमुखाने सर्वांचे स्वागत केले. क्षणार्धात सगळे वातावरण चैतन्याने भारले गेले

तो लग्नसमारंभ संपेपर्यंत ते त्यात सहभागी होत राहिले. त्या दिवसभरात त्यांनी कोणावरही कसल्याही प्रकारचा राग किंवा द्वेष व्यक्त केला नाही, कसलेही दुःख सांगितले नाही की कोणाच्याही विरुद्ध तक्रारीचा सूर काढला नाही. तुरुंगवास भोगत असतांनासुद्धा जणू काही घडलेच नाही असे ते भासवत राहिले. इतका संयम, एवढे मनोबल एकादा योगीच बाळगू शकत असेल. भाऊसाहेब निश्चितपणे एक कर्मयोगी होते. त्यांनी “हिंदू धर्म, मानवधर्म” या नावाचे एक पुस्तक लिहून त्यात हिंदू धर्माबद्दलचे त्यांचे विचार मांडले होते. त्यातली मुख्य तत्वे त्यांनी स्वतः आचरणात आणली होती.

मला भेटलेल्या आणि वंदनीय वाटलेल्या व्यक्तींबद्दल या स्थळावर चार शब्द लिहिण्याचे काम मी गेली काही वर्षे करत आलो आहे. एकाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिण्याचा हा प्रयत्न नाही, त्या व्यक्तीसंबंधीच्या माझ्या काही व्यक्तीगत आठवणी मी यात नमूद करत आलो आहे. या मालिकेतले एक पुष्प श्रद्धेय श्री भाऊसाहेबांच्या चरणी वाहण्याची संधी मी त्यांच्या शतसांवत्सरिक वर्षाच्या निमित्यांने घेत आहे. .

 

तेथे कर माझे जुळती – १६ – स्व. कमलाताई काकोडकर

kamalatai kakodkar

(मी हा लेख चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये लिहिला होता.)

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तींवर लहानमोठे ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती एका लेखात थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. “मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे.” अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. मी या निमित्याने फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द लिहीत आलो आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. मी या लेख मालिकेतले हे सोळावे पुष्प प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मातोश्री स्व.कमलाताई काकोडकर यांना समर्पित करीत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे वृध्दापकालाने दुःखद निधन झाले. एक दुर्मिळ असे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व वर्तमानातून इतिहासात गेले! सध्या (२०१३ साली) सुरू असलेल्या नवरात्राच्या दिवसात आदिशक्तीच्या आधुनिक काळामधील या रूपाचे दर्शन समयोचितच आहे.

डॉ.अनिल काकोडकर आणि मी अणुशक्तीनगर वसाहतीच्या एकाच भागात वर्षानुवर्षे रहात होतो. आमच्या क्वार्टर्स साधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या, आमची मुले एकाच शाळेत शिकत होती, आम्ही वैद्यकीय उपचारांसाठी एकाच डिस्पेन्सरीत जात होतो आणि रोजच्या उपयोगी वस्तू आणण्यासाठी कॉलनीमधल्या एकाच बाजारात जात होतो. इतकेच नव्हे तर आम्हाला कॉलनीच्या बाहेर कुठे जायचे असेल तर त्यासाठी आम्ही एकाच बसस्टॉपवर उभे रहात होतो. त्यामुळे अधून मधून कुठे ना कुठे आमची एकमेकांशी गाठ भेट होतच असे. काकोडकरसाहेबांच्या मातोश्री कमलाताई त्यांच्याबरोबर रहात असल्यामुळे त्यासुध्दा आमच्या नेहमीच्या पहाण्यातल्या होत्या. त्यांच्या वयाचा विचार करता कॉलनीतले सगळेजण त्यांना आजीच म्हणत असत. माझे प्रत्यक्ष त्यांच्याशी कधीच फारसे बोलणे झाले नसले तरी त्या माझ्या पत्नीबरोबर नेहमी बोलत असत. कमलाताईंचे वागणे बोलणे अत्यंत साधेपणाचे असायचे. कॉलनीमधल्या त्यांच्या वयाच्या इतर काही आज्या खूप बोलक्या होत्या. आपली मुले, नातवंडे वगैरेंचे कौतुक करतांना त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत असे. त्यांच्या किरकोळ कामगिरींचे पुराणसुध्दा त्या आजीबाया रंगवून सांगतांना थकत नसत. पण काकोडकर आजी त्या सर्वांहून फार निराळ्या होत्या. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

खरे पाहता त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप म्हणजे खूपच होते. काकोडकरसरांनी अणुशक्तीखात्याच्या प्रशालेत प्रवेश केल्यापासूनच, किंबहुना त्याच्याही आधी इंजिनियरिंग शिकत असतांनापासून नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची बुध्दीमत्ता, ज्ञान, कर्तृत्व, संघभावना, कामाबद्दल असलेली तळमळ, निष्ठा हे सगळेच गुण इतके उच्च स्तरावरचे होते की पहिल्या भेटीमध्येच कोणावरही त्यांची छाप पडल्याखेरीज रहात नसे. अणुशक्तीशी निगडित असलेली एकापाठोपाठ एक नवनवी आव्हानात्मक कामगिरी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवली जात असे आणि ते रात्रंदिवस जिवाचे रान करून ती यशस्वीरीत्या फत्ते करून दाखवत असत. यामधून त्याच्या यशाची कमान सतत उंचावत राहिली आणि त्यांची निवड अधिकाधिक उच्च पदांवर होत गेली. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे करीयर नेहमीच सुपरफास्ट ट्रॅकवर राहिले होते. काकोडकर आजींना या सर्वाचे मनापासून कौतुक आणि सार्थ अभिमान वाटत असणारच. पण तरीही त्या नेहमी मितभाषीच राहल्या. मुलाच्या प्रगतीबरोबर कॉलनीमधल्या लोकांच्या मनातले त्यांचे स्थानसुध्दा उंचावत जात होतेच. अधिकाधिक लोक त्यांना जास्त मान देत होते, त्यांच्याकडे अधिक आदराने पाहिले जात होते, पण त्यांनी कधीही त्याचे भांडवल केले नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमीच अत्यंत साधेपणाचे राहिले.

त्यांचे स्वतःचे जीवनसुध्दा अद्भुत किंवा कल्पनातीत वाटावे इतक्या वेगळ्या परिस्थितीमधून गेलेले होते, पण त्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती झाली असेल. आजींच्या बोलण्यात त्याचा उल्लेख त्या बहुधा कधीच करत नसाव्यात किंवा जाणीवपूर्वक मुद्दाम ते टाळत असाव्यात. कॉलनीमधल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याची पुसटशीसुध्दा कल्पना कधी आली नाही. एक सुसंस्कृत, सुस्वभावी, शांत, प्रेमळ आणि कर्तबगार मध्यमवर्गीय आजी एवढेच त्यांचे व्यक्तीचित्र माझ्या मनात तयार झाले होते. याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांनी खूप कष्ट सोसून आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना जीवनात इतक्या उंचीवर नेऊन पोचवले वगैरे अस्पष्ट कुणकुण कधी तरी कानावर आली असेल, पण त्याचा जास्त तपशील कधी समजला नव्हता. माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या अनेक मुलांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धडपड करून उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही खस्ता खाल्ल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्यामुळे कदाचित त्याला त्या काळात फार मोठे महत्व दिले गेले नसेल.

डॉ.काकोडकर अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर अणुशक्तीनगर सोडून मलबारहिलवरील निवासस्थानी रहायला गेले आणि आजीही तिकडे गेल्यानंतर त्यांचे दर्शन होईनासे झाले. माझ्या ऑफीसातल्या वाढत्या कामाचे आणि वाढत असलेल्या कुटुंबातले इतर व्यापही वाढत गेल्यामुळे माझ्या तात्कालिक स्मरणातून त्या जवळ जवळ बाहेर गेल्या होत्या. कमलाताई काकोडकर यांनी एक आत्मचरित्र लिहिले आहे असे अचानक मला कुणाकडून तरी समजले आणि त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या हे मला इतके दिवस कसे कळले नव्हते याचे नवल वाटले. त्या पुस्तकाचे नाव त्यांनी ‘एक धागा सुताचा’ असे का ठेवले आहे याचा काही उलगडा लागत नव्हता. या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्यावर मी त्याबद्दल चौकशी केली. ती ऐकून मी केवढा आश्चर्यचकित झालो ते सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभाला उपस्थित रहाण्याचे भाग्यही मला मिळाले.

सुप्रसिध्द गांधीवादी नेते कै.दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द निवृत्त न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून कमलाताईंना जवळून पाहिले होते. त्या काळातल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. कमलाताईंचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. स्वतः गांधीजी आणि स्व.कस्तुरबा यांचा सहवास त्यांना लाभला आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. त्या नेहमी खादीची साधी सुती वस्त्रेच वापरत राहिल्या. सन १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भूमिगत होऊन सक्रिय भाग घेतला. त्यांचे पती स्व.पुरुषोत्तम काकोडकर यांना दीर्घकाल पोर्तुगीजांच्या बंदिवासात रहावे लागल्यानंतर कमलाताईंनी मध्यप्रदेशातल्या खरगोण नावाच्या एका लहानशा गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी ती सोडून त्या मुंबईत आल्या आणि खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुध्दा ओलांडायला घाबरत असत त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही. कमलाताईंच्या आयुष्याचा धागा उलगडताना स्त्री जन्माची एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाल्याचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या काळातील मोठ्या माणसांच्या सहवासानंतर आताची माणसे पिग्मी वाटतात, अशी खंतही त्यांनी त्या प्रसंगी व्यक्त केली होती.

स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न् पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्य ते आणीबाणी, आणीबाणी ते टेलिकॉम क्रांती, टेलिकॉम क्रांती ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई असल्याचे पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. वयोमानानुसार स्वतः सगळे लिहून काढणे कदाचित कमलाताईंना आता अवघड झाले असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हकीकती कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे लिहून दिल्या असाव्यात.

डॉ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून फुलाला सुगंध मातीचा या नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देतांना काकोडकर आजींनी सांगितले होते, “प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं …” त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे, “रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुस-या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुस-याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल.”

दुनिया गोल आहे. यामुळे आपल्याला कोण कुठे आणि केंव्हा अकल्पितपणे भेटेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर काही काळाने आम्हाला समजले की आमच्या सुनेच्या आईचे (मंगलाताईंचे) माहेर खरगोणला कमलाताई काकोडकरांच्या घराजवळ होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या विहीणबाईंनी त्यांच्या लहानपणी काकोडकर आजींना खूप जवळून पाहिले होते. तेंव्हाच त्या गोष्टीला निदान वीस पंचवीस वर्षे उलटून गेली होती, पण त्याचा तपशील त्यांच्या चांगला लक्षात होता. आम्ही काकोडकर आजींना भेटल्यावर ही गोष्ट सांगितली तेंव्हा त्यांनाही ही खूप जुनी ओळख लगेच आठवली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आमची भेट झाली तेंव्हा त्यांनी “आमची मंगला कशी आहे..” याची जरूर चौकशी केली.

दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीच्या लग्नासाठी ठाण्याला गेलो होतो, तिथे काकोडकर आजी सौ.काकोडकरांना घेऊन नव-या मुलाकडच्या बाजूने आल्या होत्या. आपण कोणी व्हीआयपी आहोत असा कसलाही आभास त्यांच्या वागण्यात नव्हता. ही गोष्ट आधीपासून ठाऊक नसली तर कुणाला तसे मुळीसुध्दा वाटले नसते. भोजन संपल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ जवळ बसवून घेतले, अत्यंत आपुलकीने आमची चौकशी केली. तिथून आम्हाला ठाण्यातच दुस-या एका आप्तांना भेटायला जायचे होते हे आमच्या बोलण्यात आले. आपल्या घराकडे परत जातांना वाटेत त्या आम्हालाही आमच्या गंतव्य ठिकाणी त्यांच्या गाडीतून सोडून पुढे जातील अशी त्यांनी नुसती ऑफर दिली नाही तर आम्ही ती स्वीकारावी असा प्रेमळ आग्रह केला. पण ठाण्यातले त्यांचे घर आणि आम्हाला जायचे असल्याची जागा या दोन जागा एका बाजूला नसून मंगल कार्यालयाच्या भिन्न दिशांना आहेत आणि दिवसा उजेडी आम्हाला कुठेही रिक्शेने जायला कसलाही त्रास नाही वगैरे कारणे सांगून कसेबसे त्यांना ते पटवून दिले. आपण नेहमी दुस-यासाठी शक्यतो काही तरी करायला हवे असा त्यांनी नुसता संदेश दिला नव्हता, अखेरपर्यंत त्या स्वतः तसा विचार आणि आचरण करीत होत्या हे अशा छोट्या उदाहरणातून सहज लक्षात येते.

ठाण्याला घडलेली ती भेटच आमची काकोडकर आजींबरोबर झालेली अखेरची भेट ठरली. मागच्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि क्षणभर मन सुन्न होऊन गेले. स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.कमलाताई काकोडकर. “तेथे कर माझे जुळती” असे सांगण्याची गरजसुध्दा पडू नये असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आम्हाला त्यांना जवळून पहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द ऐकायला मिळाले आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा त्यांनी बोलण्यातून न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण

माझी आई समर्थ रामदासांची परमभक्त होती. तिचे शालेय शिक्षण अक्षरे ओळखण्याइतपतच झालेले असले तरी समर्थांनी लिहिलेले असंख्य श्लोक, ओव्या वगैरे नेहमीच तिच्या जिभेवर असत. तिच्या बोलण्यातून सज्जनगड, कल्याणस्वामी वगैरे उल्लेख येत असत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी “मला ते येत नाही”, “मी ते शिकलो नाही”, “मी ते यापूर्वी कधी केलेले नाही”, “उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल” वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. “शिकला नसशील तर आता शिकून घे”, “करायला घेतलेस की यायला लागेल”, “प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर”, “‘असं’च्या ऐवजी ‘तसं’ होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही ‘तसं’ झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू.” वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. सरकारी नोकरीत असतांना बहुतेक सहकारी ‘लकीर के फकीर’ मनोवृत्तीचे असायचे. प्रत्येक बाबतीत ‘प्रिसिडंट’ शोधत रहायचे. पण माझे कामच मुळी शून्यातून नवी निर्मिती करण्यासंबंधी होते. जी यंत्रसामुग्री भारतात यापूर्वी कधीच तयार झाली नव्हती ती तयार करवून घेण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे वरिष्ठांची अनुमती मिळवून आणि कनिष्ठांना सोबत घेऊन नवीन कल्पनांचा पाठपुरावा करायचा असे. लहान सहान प्रयोग करून धडपडत पुढे जात जेंव्हा ते यंत्र तयार होऊन मनासारखे काम करू लागे तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असे.

नऊ वर्षांपूर्वी मराठी ब्लॉगविश्व फारसे आकाराला आले नव्हते. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा ब्लॉग कसा तयार करायचा यासंबंधी मला कांहीच माहिती नव्हती. मी त्यापूर्वी ई मेल वगळता इंटरनेटवर कुठलेही काम केलेले नव्हते, कुठल्याही वेबसाईटवर काहीही अपलोड केलेले नव्हते. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हेसुध्दा कळत नव्हते. माझे बोट धरून मला चालवत घेऊन जाणारा कोणीही ओळखीचा माणूस नव्हता. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।’ असे म्हणत कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा पहिला ब्लॉग तयार झाला आणि याहू ३६० वर दुसरा ब्लॉगही सुरू केला. आता ते स्थळ बंद झाले आहे. त्या ठिकाणी ब्लॉगच्या मथळ्याशेजारीच एक बोधवाक्य द्यायचे असे, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती. ‘केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे।’ हे त्या काळात मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.

दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. “आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?” अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसूलागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन “जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन ” आपले बोधवाक्य बनवले. यांतील “शाहाणे करोन सोडावे” हा भाग नक्कीच माझ्या आंवाक्याबाहेरचा होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले. पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी “मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। ” हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो.

रामदासांचे आणखी एक वचन माझी आई आम्हाला नेहमी ऐकवत असे, ते होते, “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।”.  ” उद्यमेन हि सिध्द्यंती कार्याणि न मनोरथै। न हि सुप्तेषु सिंहेषु प्रविशंति मुखे मृगाः।” या सुभाषितामधला भाव या वचनाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये होता. तेवढा आम्हाला उद्देशून होता. त्याला भगवंताने पाठिंबा द्यायचा की नाही हे देवच जाणो, पण आपला उद्योग किंवा चळवळ विघातक असेल, त्यात दुष्टबुध्दी असेल, त्यातून कोणाचे नुकसान होणार असेल तर त्याला भगवंताचे अधिष्ठान मिळणार नाही आणि त्यमुळे त्याला सामर्थ्य मिळणार नाही हे ओघानेच आले. तेवढे करणे टाळले तरच ‘प्रयत्नांती परमेश्वर’ येतो.

रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. निरनिराळ्या संदर्भांमध्ये त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. मानवी जीवनावर भाष्य करणा-या या ओळी अनेक जागी उध्दृत केल्या जातात. उदाहरणार्थ
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

कोणाला उपदेश करतांना किंवा सल्ला देतांना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधील खाली दिलेल्या ओळी नेहमी सांगितल्या जातात.
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥

अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा मोलाची आहे. त्रिकालाबाधित  किंवा अजरामर असे यालाच म्हणतात.

समर्थ रामदास स्वामी

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।

हा श्लोक मी लहानपणी किती वेळा म्हंटला असेल त्याची गणती नाही. पण वैराग्य, ज्ञान आणि कवित्व या शब्दांचा अर्थच न समजण्याच्या वयात त्या सगळ्याचा अर्थ रामदासस्वामी हे एक महान सत्पुरुष होऊन गेले एवढाच तेंव्हा समजला असेल. सखोल अभ्यासामधून ज्ञान संपादन करता येते, कवीची प्रतिभा जन्मजात असते आणि हे दोन्ही गुण अंगात असलेल्या माणसाला अहंभाव असू नये, कसलीही आसक्ती असू नये असे वैराग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःवर केवढे नियंत्रण मिळवावे लागले असेल! हे तीन गुण ज्या समर्थांच्या अंगी एकवटले होते ते अलौकिक व्यक्तीमत्वच असणार!

रामदासांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातली पहिली अशी की नारायण नावाचा बालक लग्नाच्या बोहल्यावर उभा असतांना त्याने मंगलाष्टकामधले “शुभमंगल सावधान” हे शब्द ऐकले आणि तो लगेच सावध झाला. आपला जन्म संसारात रमण्यासाठी झालेला नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बोहल्यावरून जी धूम ठोकली ती पुन्हा मागे वळून न पाहण्यासाठी. तो रानोमाळ हिंडला, योग्य गुरू शोधून त्याने त्यांच्याकडून सर्व घर्मशास्त्रांचे शिक्षण घेतले, त्यावर चिंतन, मनन वगैरे करून आपण काही कार्य करायचे ठरवले आणि रामदास या नावाने ते हाती घेऊन आजन्म करत राहिले. या काळात त्यांनी अनेक ग्रंथरचना केल्या, तसेच गावोगावी हिंडून जनजागृती केली. अत्यंत सुबोध भाषेत तशाच तालबध्द आणि सुरेल अशा आरत्या त्यांनी रचल्या. गेली चारशे वर्षे त्या आरत्या घराघरातून गायिल्या जात आहेत. “करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी।” अशा सारखी शब्दरचना थक्क करते त्याचप्रमाणे ती गातांना जोश निर्माण करते. अत्यंत सोप्या भाषेतले आणि छंदबध्द असे मनाचे श्लोक नकळत किती चांगले मार्गदर्शन करून जातात! सर्वसामान्य लोक पाठ करू शकतील, त्यांच्या लक्षात राहू शकतील अशा छोट्या आरत्या आणि चार चार ओळींचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले त्याचप्रमाणे अभ्यास करू इच्छिणा-यांसाठी दासबोध हा मोठा ग्रंथ लिहिला. त्यातून परमार्थ आणि नित्य जीवन या दोन्हीसंबंधी उत्कृष्ट असा उपदेश केला.

ते स्वतः श्रीरामाचे अनन्य भक्त होते, पण त्यांनी रामभक्त हनुमानाची देवळे ठिकठिकाणी स्थापन केली. एक बलदंड आणि निष्ठावान सेवक अशी मारुतीची प्रतिमा आदर्श म्हणून समाजासमोर ठेवणे हा उद्देश त्यामागे होता. प्रत्यक्ष देवाचे, विशेषतः श्रीरामासारख्या उदात्त चरित्रनायकाचे अनुकरण करणे सामान्य मानवाला शक्य नाही, तसा प्रयत्नही कोणी करणार नाही, पण हनुमानासारखी बलोपासना करणे प्रयत्नसाध्य आहे आणि त्याची समाजाला गरज आहे असा दूरदर्शी विचार त्यामागे असण्याची शक्यता आहे. आपले कार्य पसरत आणि वाढत जावे यासाठी समर्थांनी शिष्यवर्ग तयार केला, मठांची स्थापना केली, त्यातून एक संप्रदाय निर्माण झाला.

समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होतेच. त्यांचे परस्पराशी नेमके कसे संबंध होते यावर वाद घातले जातात. खाली दिलेल्या उदाहरणाने या संबंधात काही माहिती मिळते. स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीची सत्ताच महाराष्ट्रावर चालत असे. शिवाजी तेंव्हा छत्रपती झालेले नव्हते. सह्याद्री पर्वतावरील अनेक किल्ले आणि आजूबाजूचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता, पण सपाट भूभागावर आदिलशहाची हुकूमतच चालत असे. त्या काळात जेंव्हा शिवाजीचे पारिपत्य करण्याचा विडा उचलून अफजलखान विजापूराहून निघाला तेंव्हा ती बातमी रामदासांना कळताच त्यांनी ती खुबीने शिवाजीमहाराजांपर्यंत पोचवली. खाली दिलेल्या श्लोकांमध्ये परमेश्वराचे गुणगान केले आहे आणि साधा उपदेश केला आहे असे वाटते, पण प्रत्येक चरणाचे पहिले अक्षर घेतले तर “विजापूरचा सरदार निघाला आहे” ही सूचना देऊन त्याचा विचार करून योजना करावी असा संदेश त्यात दिलेला दिसतो. पुढे शिवाजी महाराजांनी अप्रतिम योजनाकौशल्याने अफझलखानाला आणि त्याच्या अचाट सैन्याला कशी धूळ चारली हा इतिहास सर्वश्रुत आहेच.

विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याची खूप प्रशंसा केली आहे. त्यांची दोन अप्रतिम गीते मी या ब्लॉगवर दिली आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/02/blog-post_19.html
पहिल्या गीतात ते शिवाजी महाराजांना “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ॥” आणि त्याबरोबरच “यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा ॥  असे म्हणतात. “आचारशील विचारशील, दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठायीं ॥ धीर उदार गंभीर, शूर क्रियेसि तत्पर  ॥ ” अशा या राजाबद्दल बोलतांना “या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला, शिवकल्याणराजा॥” असे ते म्हणतात. या गीतामधला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि महाराजांचे नेमके गुण दर्शवणारा आहे.

छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये प्रत्यक्ष स्वर्ग कसा निर्माण झाला हे रामदास स्वामी “स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी । तीर्थासी तुळणा नाही। भक्तांसी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा । भक्तांसी दिधले सर्वे। बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी ।। यासारख्या शब्दांमध्ये समर्थपणे व्यक्त करतात.