संत एकनाथांच्या कथा आणि रचना

Eknath

“दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई।।”
“नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्याला। सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।।”
“विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? कुणाला सांगू?”
“वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।”
वरील रचना एका महान संताने लिहिल्या असतील असे या ओळी वाचून कदाचित कोणाला वाटणार नाही. पण ज्या संताने त्या ओळी रचलेल्या आहेत, त्यांचे नांव संत एकनाथ! सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या एकनाथ महाराजांनी लोकांना आवडतील, त्यांच्या सहज लक्षात राहतील असे आकर्षक मुखडे रचून पुढे त्या कवनांमध्ये अध्यात्माचे दर्शन घडवले आहे. उदाहरणार्थ याच भारुडांच्या खालील ओळी पहा.
“एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे न्हाई । मला दादला नको ग बाई !”
“कामक्रोध विंचू चावला । तम आंगासी आला ॥ ….ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचु इंगळी उतरे झरझरा ॥सत्य उताऱ्या येऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दनीं ॥”
संत एकनाथांनी फक्त भारुडांचीच रचना केली नाही, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अपार आहे, पण त्यांनी रचलेली भारुडे इतकी अप्रतिम आहेत की चारशे वर्षांनंतर आजसुध्दा ती लोकांना भुरळ पाडतात आणि भारुड म्हंटल्यावर सर्वात आधी एकनाथांचेच नांव डोळ्यासमोर येते.
संत एकनाथांनी लिहिलेले “माझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी ।।”, आणि “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल। ” हे अभंग पं.भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीमधले प्रमुख अभंग आहेत. श्री.राम फाटक यांनी त्यांना अप्रतिम चाली लावून संगीतबध्द केले आहे. नव्या पिढीतले संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर यांनी मिळून तयार केलेल्या ध्वनिफितीमध्ये “ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो”, “गुरु परमात्मा परेशु”, “रुपे सुंदर सावळा गे माये”, ” माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद”, “येथोनी आनंदू रे आनंदू, कृपासागर तो गोविंदू रे” हे अत्यंत अर्थपूर्ण अभंग आहेत. अलीकडच्या काळात निघालेल्या उत्कृष्ट ध्वनिफितींमध्ये या ध्वनिफितीचा उल्लेख होतो. या अभंगातील शब्दरचना पाहताच सुंदर सोप्या शब्दात उपमा, रूपक आदि अलंकारांचा उपयोग करून त्यांनी भक्तीमार्गाचे सुगम तत्वज्ञान किती सुरेख मांडले आहे हे ध्यानात येईल.
संत एकनाथ हे संस्कृत भाषेचे आणि त्यातील धर्मशास्त्रांसंबंधित ग्रंथांचे प्रकांड पंडित होते, पण त्यांनी संत ज्ञानेश्वरांकडून प्रेरणा घेऊन ते ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अठरा हजार आठशे ओव्या रचून त्यांनी भागवत पुराणच मराठी भाषेत आणले. ते एकनाथी भागवत या नांवाने प्रसिध्द आहे. गोष्टीरूप असल्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे आणि त्याची पारायणे नियमितपणे जागोजागी होत असतात. त्यांनी भावार्थ रामायणाच्या २५००० ओव्या रचल्या होत्या. तरीही ते काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यांच्या शिष्याने ते पुरे केले. या खेरीज त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, प्रल्हाद विजय, आनंदलहरी वगैरे अनेक रचना करून ठेवल्या आहेत.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थ दीपिकेत, म्हणजे आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथात अनेक पाठभेद निर्माण झाले होते. एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी लिहितांना त्यात चुका झाल्या होत्या आणि ज्ञानेश्वरांच्या नांवाने त्या पुढच्या पिढीला दिल्या जात होत्या. संत एकनाथांसारखा विद्वानच अधिकारवाणीने त्या दुरुस्त करू शकत होता. एकनाथांनी त्या ग्रंथांच्या प्रतींचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करून एक निर्दोष प्रत तयार केली आणि तिला प्रमाणग्रंथ समजून यापुढे तिच्याच प्रती काढल्या जाव्यात यासाठी तिचा प्रचार केला. संत एकनाथांच्या प्रयत्नांमुळेच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले गीताज्ञान पुढील काळातील जनतेपर्यंत शुध्द रूपात पोचायला मदत झाली.

संत एकनाथांच्या जीवनाबद्दल खूप कांही सांगण्यासारखे आहे ते पुढील भागात लिहीन. आज एकनाथषष्ठी या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना शतशः साष्टांग दंडवत.
—————————-

संत एकनाथांच्या गोष्टी

संत एकनाथांचा जन्म पैठण या प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नगरीत झाला आणि त्यांचे बहुतेक सारे जीवन त्याच गांवात व्यतीत झाले. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांचा अभ्यास केला. पुरातन धर्मग्रंथांचे अध्ययन केल्यानंतर मानवता आणि बंधुभाव हेच धर्माचे सार असल्याचे त्यांना जाणवले. आपल्या विविध रचनांमधून त्यांनी हे खुबीने मांडले तर आहेच, पण “जे जे देखिले भूत, तयासी मानि़जे भगवंत” या तत्वाचे त्यानी स्वतःच्या आचरणात पालन केले. यासंबंधी एक अशी आख्यायिका आहे.

एकदा संत एकनाथ काशीहून गंगेच्या पाण्याने भरलेली कावड घेऊन रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते. तत्कालिन प्रथेनुसार त्यातले गंगाजल रामेश्वरावर वाहिल्यानंतर त्यांच्या तीर्थयात्रेची सांगता होणार होती. पण वाटेतच एका जागी त्यांना तहानेने आसुसलेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. महत्प्रयासाने काशीहून जपून आणलेले गंगाजल त्यांनी सरळ त्या गाढवाच्या तोंडात ओतून त्याचे प्राण वाचवले. रामेश्वराला गंगाजलाने अभिषेक करून स्वतःसाठी पुण्य मिळवण्यापेक्षा त्या तृषार्त गाढवाचे प्राण वाचवणे हे जास्त महत्वाचे धार्मिक कार्य आहे असे त्यांना वाटले.

संत एकनाथांनी माणसांमाणसात भेदभाव केला नाही. एकदा एक माणूस नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पूर आलेल्या नदीत उतरून त्या माणसाला ओढून बाहेर काढले, पण या चांगल्या कृत्याची प्रशंसा करण्याऐवजी त्यांनी एका अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे त्यांना विटाळ झाला असे म्हणून त्या काळातल्या तथाकथित पुढारलेल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले. संत एकनाथांनी यासाठी प्रायश्चित्त घेऊन शुध्दीकरण करून घ्यावे असा दबाव त्यांच्यावर आणला, पण त्यांनी त्याला जुमानले नाही. यामुळे चिडून त्यांनी एकनाथांचा छळ सुरू केला. रोज सकाळी उठल्यावर आधी गोदावरीत स्नान करून देवपूजा करण्याचा त्यांचा नेम होता. त्यानुसार ते आंघोळ करून घरी परतत असतांना कांही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर घाण टाकली. ते शांतपणे परत नदीवर गेले आणि स्वच्छ स्नान करून देवाची स्तोत्रे म्हणत घराकडे फिरले. त्या दुष्ट लोकांनी पुन्हा त्यांच्या अंगावर घाण टाकली, एकनाथ पुन्हा स्नान करून परत आले असेच खूप वेळ चालत राहिले. अखेर ते लोक कंटाळून निघून गेले, पण एकनाथांनी त्यांच्याबरोबर भांडणही केले नाही की त्यांना शिव्याशापही दिले नाहीत. हा प्रकार समजल्यानंतर एकनाथांच्या चाहत्यांनी त्यांची विचारपूस करतांच त्यांनी त्या लोकांना सांगितले, “अहो, यांच्या कृत्यामुळे आज मला अनायासे उपवास घडला, माझे अनेक वेळा गोदावरीत स्नान झाले आणि माझा इतका वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात गेला, त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, मी कशाला त्यांच्यावर राग धरू?”

संत एकनाथांवर घातलेल्या गेलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांचा नोकर त्यांच्या घरी येईनासा झाला. तेंव्हा प्रत्यक्ष भगवान विठ्ठल श्रीखंड्या हे नांव घेऊन त्यांच्या घरी कामाला येऊन राहिले. एकनाथांना आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोकर नकोच होता, पण वयोमानामुळे रोजच्या रोज देवपूजेसाठी चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून गंध तयार करणे त्यांना झेपत नव्हते, त्यामुळे एवढे काम त्यांनी श्रीखंड्याला करायला सांगितले. म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर चंदनाचे विलेपन करण्यासाठी स्वतः विठ्ठलच एका मुलाच्या रूपात एकनाथांच्या घरी येऊन सहाणेवर चंदनाचे खोड घासत राहिले होते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे जीवंत समाधी घेतल्यानंतर त्या खोलीचा बंद दरवाजा उघडण्याचे धैर्य कोणीही कधीही केले नव्हते. आजसुध्दा कोणी ते करत नाही. पण त्या भूमीवर उगवलेल्या एका वृक्षाची मुळे खोलवर गेली आहेत आणि त्यांनी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती फास आवळला आहे असा दृष्टांत संत एकनाथांना झाला. ते त्वरित आळंदीला गेले. कोणाच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी ज्ञानेश्वर जिथे समाधिस्थ झाले होते त्या खोलीचे कवाड उघडले आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोंवती वाढलेल्या मुळ्या छाटून दूर केल्या अशी आख्यायिका आहे. माझ्या तर्काप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये घुसलेल्या चुका काढून टाकून तिचे शुध्द स्वरूप त्यांनी पुन्हा समाजापुढे आणले ही गोष्टच या रूपकातून व्यक्त होते. संस्कृत भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेवर भावार्थदीपिका लिहून संत ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली होती. संत एकनाथांनी त्यातले तत्वज्ञान अधिक सोपे करून सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रसार केला.
———————————

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. ‘ओवी ज्ञानेशाची’ आणि ‘अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची’ हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणाऱ्या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जाऊ मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरी हरि वाजवी मुरली । नदि भरली यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिने कौतुक केले । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसऱ्या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तृणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ठ गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना ‘जोशी’ म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की ‘मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो’. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी ‘फकीर’ या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.
——

नवी भर दि.२८-०९-२०२२

🙏🏻 जोगवा🙏🏻
अनादी निर्गुण प्रगटली भवानी|
मोह महिषासुर मर्दना लागोनी|
त्रिविध तापांची करावया झाडणी|
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं!!१!!
*आईचा जोगवा जोगवा मागेन*
द्वैत सारुनी माळ मी घालीन|
हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
भेद रहित वारीसी जाईन!!२!!
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा |
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा|
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा |
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा!!३!!
पूर्ण बोधाची घेईन परडी|
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी|
मनोविकार करीन कुर्वंडी|
अमृत रसाची भरीन दुरडी!!४!!
आतां साजणी झाले मी निःसंग|
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग|
काम क्रोध हे झोडियेले मांग|
केला मोकळा मारग सुरंग!!५!!
ऐसा जोगवा मागुनी ठेविला|
जाउनि नवस महाद्वारी फेडिला|
एकपणे जनार्दनीं देखियेला|
जन्ममरणाचा फेरा चुकविला!!६!!
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
—-


नवी भर दि. १३-०३-२०२३:

भागवत धर्माचे जे चार बळकट खांब आहेत त्यापैकी एक म्हणजे भागवत ग्रंथ प्रदान करणारे संत एकनाथ. कर्नाटकातून विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आणणाऱ्या भानुदासांच्या संत कुळात त्यांना जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हा वारसा त्यांनी असा पूढे नेला की ते भगवंत भक्तीचा आधार झालेत.

मातापित्याच्या पश्चात बाराव्या वर्षी पैठणहून गुरु शोधार्थ निघालेल्या एकनाथांना देवगीरी किल्ल्यावर गुरु लाभले ते जनार्दन स्वामी.
“जीवन सुखी होण्यासाठी ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद नष्ट व्हायला हवा.” जनार्दन स्वामींच्या गुरुप्रसादाने हीच शिकवण दिली. एकनाथांनी ती स्वतः आचरणात आणून लोकांनाही तोच मंत्र दिला. मनुष्य असो वा प्राणी सर्वांमध्ये ते परमेश्वर बघायचे. त्यांच्या मृदु स्वभावाने.. परिस्थिती कशीही उदभवो त्यांच्या शांतीपूर्ण आदर्श वागणूकीने त्यांना ‘शांतीब्रह्म’ ही उपाधी लाभलीय.
स्वप्न दृष्टांताने त्यांनी ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी भोवतीचे वेलींचे वेढे सोडविले आणि जातीभेदाचे वेढेही सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. चराचरातील सर्व प्राणीमात्र एकच जीव आहेत हे पंधराव्या शतकात त्यांनी मांडलेय.
भौतिक जगतापासून दूर अशा शांत जीवन जगणाऱ्या भगवंत भक्तांची संख्या वाढावी म्हणून एकनाथांनी लोकांना भगवंत भक्तीचा लळा लावला. त्यासाठीच आपली लेखणी वापरली.
दैवीस्पर्श लाभलेल्या त्यांच्या लेखणीने गहन अध्यात्मही लोकांना रुचेल अशा अत्यंत सुलभ.. रसाळ भाषेत लिहले. अभंग, गौळणी, भारुड, भागवत, भावार्थ रामायण असे विपुल साहित्य अवतरले.
आपल्या कवनात गुरुदेवांचा “एका जनार्दनी” असा उल्लेख करुन ते स्मरण करीत. गुरुंच्याच निर्वाणदिनी स्वतःही देह ठेवला. स्वतःला झालेले परमेश्वराचे दर्शन लोकांना घडविणारे हे श्रेष्ठ संत.
वृंदावनात तो वैकुंठातला सावळा सुंदर सुकुमार.. गोप होवून गोधन चारताना बासरी वाजवतोय. त्या मंजुळ सूरानी आमचे तन मन हरपलेय. त्याच्या हातची काठी ही आम्हाला वळणावर आणण्यासाठी आहे.
त्या गौळीणींची भक्ती एवढी श्रेष्ठ की ‘मी’ ‘तू’ पण खरच हरपले. कृष्णाला ओवाळताना त्या कृष्णामधेच लीन होत आहेत.

🌺🌿🌸☘🌺☘🌸🌿🌺

रूपे सुंदर सावळा गे माये
वेणू वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताहे

एका जनार्दनी भुलवी गौळणी
करिती तनमनाची वोवाळणी

🌹🌿🌸☘🌺☘🌸🌿🌹

रचना : संत एकनाथ ✍
संगीत : श्रीधर फडके
स्वर : सुरेश वाडकर

🎼🎶🎼🎶🎼 🎧

🌻🌿🌸🥀🌺🥀🌸🌿🌻

समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण

माझी आई समर्थ रामदासांची परमभक्त होती. तिचे शालेय शिक्षण अक्षरे ओळखण्याइतपतच झालेले असले तरी समर्थांनी लिहिलेले असंख्य श्लोक, ओव्या वगैरे नेहमीच तिच्या जिभेवर असत. तिच्या बोलण्यातून सज्जनगड, कल्याणस्वामी वगैरे उल्लेख येत असत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी “मला ते येत नाही”, “मी ते शिकलो नाही”, “मी ते यापूर्वी कधी केलेले नाही”, “उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल” वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. “शिकला नसशील तर आता शिकून घे”, “करायला घेतलेस की यायला लागेल”, “प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर”, “‘असं’च्या ऐवजी ‘तसं’ होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही ‘तसं’ झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू.” वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. सरकारी नोकरीत असतांना बहुतेक सहकारी ‘लकीर के फकीर’ मनोवृत्तीचे असायचे. प्रत्येक बाबतीत ‘प्रिसिडंट’ शोधत रहायचे. पण माझे कामच मुळी शून्यातून नवी निर्मिती करण्यासंबंधी होते. जी यंत्रसामुग्री भारतात यापूर्वी कधीच तयार झाली नव्हती ती तयार करवून घेण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे वरिष्ठांची अनुमती मिळवून आणि कनिष्ठांना सोबत घेऊन नवीन कल्पनांचा पाठपुरावा करायचा असे. लहान सहान प्रयोग करून धडपडत पुढे जात जेंव्हा ते यंत्र तयार होऊन मनासारखे काम करू लागे तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असे.

नऊ वर्षांपूर्वी मराठी ब्लॉगविश्व फारसे आकाराला आले नव्हते. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा ब्लॉग कसा तयार करायचा यासंबंधी मला कांहीच माहिती नव्हती. मी त्यापूर्वी ई मेल वगळता इंटरनेटवर कुठलेही काम केलेले नव्हते, कुठल्याही वेबसाईटवर काहीही अपलोड केलेले नव्हते. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हेसुध्दा कळत नव्हते. माझे बोट धरून मला चालवत घेऊन जाणारा कोणीही ओळखीचा माणूस नव्हता. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।’ असे म्हणत कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा पहिला ब्लॉग तयार झाला आणि याहू ३६० वर दुसरा ब्लॉगही सुरू केला. आता ते स्थळ बंद झाले आहे. त्या ठिकाणी ब्लॉगच्या मथळ्याशेजारीच एक बोधवाक्य द्यायचे असे, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती. ‘केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे।’ हे त्या काळात मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.

दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. “आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?” अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसूलागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन “जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन ” आपले बोधवाक्य बनवले. यांतील “शाहाणे करोन सोडावे” हा भाग नक्कीच माझ्या आंवाक्याबाहेरचा होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले. पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी “मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। ” हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो.

रामदासांचे आणखी एक वचन माझी आई आम्हाला नेहमी ऐकवत असे, ते होते, “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।”.  ” उद्यमेन हि सिध्द्यंती कार्याणि न मनोरथै। न हि सुप्तेषु सिंहेषु प्रविशंति मुखे मृगाः।” या सुभाषितामधला भाव या वचनाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये होता. तेवढा आम्हाला उद्देशून होता. त्याला भगवंताने पाठिंबा द्यायचा की नाही हे देवच जाणो, पण आपला उद्योग किंवा चळवळ विघातक असेल, त्यात दुष्टबुध्दी असेल, त्यातून कोणाचे नुकसान होणार असेल तर त्याला भगवंताचे अधिष्ठान मिळणार नाही आणि त्यमुळे त्याला सामर्थ्य मिळणार नाही हे ओघानेच आले. तेवढे करणे टाळले तरच ‘प्रयत्नांती परमेश्वर’ येतो.

रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. निरनिराळ्या संदर्भांमध्ये त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. मानवी जीवनावर भाष्य करणा-या या ओळी अनेक जागी उध्दृत केल्या जातात. उदाहरणार्थ
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

कोणाला उपदेश करतांना किंवा सल्ला देतांना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधील खाली दिलेल्या ओळी नेहमी सांगितल्या जातात.
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥

अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा मोलाची आहे. त्रिकालाबाधित  किंवा अजरामर असे यालाच म्हणतात.

समर्थ रामदास स्वामी

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।

हा श्लोक मी लहानपणी किती वेळा म्हंटला असेल त्याची गणती नाही. पण वैराग्य, ज्ञान आणि कवित्व या शब्दांचा अर्थच न समजण्याच्या वयात त्या सगळ्याचा अर्थ रामदासस्वामी हे एक महान सत्पुरुष होऊन गेले एवढाच तेंव्हा समजला असेल. सखोल अभ्यासामधून ज्ञान संपादन करता येते, कवीची प्रतिभा जन्मजात असते आणि हे दोन्ही गुण अंगात असलेल्या माणसाला अहंभाव असू नये, कसलीही आसक्ती असू नये असे वैराग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःवर केवढे नियंत्रण मिळवावे लागले असेल! हे तीन गुण ज्या समर्थांच्या अंगी एकवटले होते ते अलौकिक व्यक्तीमत्वच असणार!

रामदासांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातली पहिली अशी की नारायण नावाचा बालक लग्नाच्या बोहल्यावर उभा असतांना त्याने मंगलाष्टकामधले “शुभमंगल सावधान” हे शब्द ऐकले आणि तो लगेच सावध झाला. आपला जन्म संसारात रमण्यासाठी झालेला नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बोहल्यावरून जी धूम ठोकली ती पुन्हा मागे वळून न पाहण्यासाठी. तो रानोमाळ हिंडला, योग्य गुरू शोधून त्याने त्यांच्याकडून सर्व घर्मशास्त्रांचे शिक्षण घेतले, त्यावर चिंतन, मनन वगैरे करून आपण काही कार्य करायचे ठरवले आणि रामदास या नावाने ते हाती घेऊन आजन्म करत राहिले. या काळात त्यांनी अनेक ग्रंथरचना केल्या, तसेच गावोगावी हिंडून जनजागृती केली. अत्यंत सुबोध भाषेत तशाच तालबध्द आणि सुरेल अशा आरत्या त्यांनी रचल्या. गेली चारशे वर्षे त्या आरत्या घराघरातून गायिल्या जात आहेत. “करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी।” अशा सारखी शब्दरचना थक्क करते त्याचप्रमाणे ती गातांना जोश निर्माण करते. अत्यंत सोप्या भाषेतले आणि छंदबध्द असे मनाचे श्लोक नकळत किती चांगले मार्गदर्शन करून जातात! सर्वसामान्य लोक पाठ करू शकतील, त्यांच्या लक्षात राहू शकतील अशा छोट्या आरत्या आणि चार चार ओळींचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले त्याचप्रमाणे अभ्यास करू इच्छिणा-यांसाठी दासबोध हा मोठा ग्रंथ लिहिला. त्यातून परमार्थ आणि नित्य जीवन या दोन्हीसंबंधी उत्कृष्ट असा उपदेश केला.

ते स्वतः श्रीरामाचे अनन्य भक्त होते, पण त्यांनी रामभक्त हनुमानाची देवळे ठिकठिकाणी स्थापन केली. एक बलदंड आणि निष्ठावान सेवक अशी मारुतीची प्रतिमा आदर्श म्हणून समाजासमोर ठेवणे हा उद्देश त्यामागे होता. प्रत्यक्ष देवाचे, विशेषतः श्रीरामासारख्या उदात्त चरित्रनायकाचे अनुकरण करणे सामान्य मानवाला शक्य नाही, तसा प्रयत्नही कोणी करणार नाही, पण हनुमानासारखी बलोपासना करणे प्रयत्नसाध्य आहे आणि त्याची समाजाला गरज आहे असा दूरदर्शी विचार त्यामागे असण्याची शक्यता आहे. आपले कार्य पसरत आणि वाढत जावे यासाठी समर्थांनी शिष्यवर्ग तयार केला, मठांची स्थापना केली, त्यातून एक संप्रदाय निर्माण झाला.

समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होतेच. त्यांचे परस्पराशी नेमके कसे संबंध होते यावर वाद घातले जातात. खाली दिलेल्या उदाहरणाने या संबंधात काही माहिती मिळते. स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीची सत्ताच महाराष्ट्रावर चालत असे. शिवाजी तेंव्हा छत्रपती झालेले नव्हते. सह्याद्री पर्वतावरील अनेक किल्ले आणि आजूबाजूचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता, पण सपाट भूभागावर आदिलशहाची हुकूमतच चालत असे. त्या काळात जेंव्हा शिवाजीचे पारिपत्य करण्याचा विडा उचलून अफजलखान विजापूराहून निघाला तेंव्हा ती बातमी रामदासांना कळताच त्यांनी ती खुबीने शिवाजीमहाराजांपर्यंत पोचवली. खाली दिलेल्या श्लोकांमध्ये परमेश्वराचे गुणगान केले आहे आणि साधा उपदेश केला आहे असे वाटते, पण प्रत्येक चरणाचे पहिले अक्षर घेतले तर “विजापूरचा सरदार निघाला आहे” ही सूचना देऊन त्याचा विचार करून योजना करावी असा संदेश त्यात दिलेला दिसतो. पुढे शिवाजी महाराजांनी अप्रतिम योजनाकौशल्याने अफझलखानाला आणि त्याच्या अचाट सैन्याला कशी धूळ चारली हा इतिहास सर्वश्रुत आहेच.

विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याची खूप प्रशंसा केली आहे. त्यांची दोन अप्रतिम गीते मी या ब्लॉगवर दिली आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/02/blog-post_19.html
पहिल्या गीतात ते शिवाजी महाराजांना “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ॥” आणि त्याबरोबरच “यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा ॥  असे म्हणतात. “आचारशील विचारशील, दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठायीं ॥ धीर उदार गंभीर, शूर क्रियेसि तत्पर  ॥ ” अशा या राजाबद्दल बोलतांना “या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला, शिवकल्याणराजा॥” असे ते म्हणतात. या गीतामधला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि महाराजांचे नेमके गुण दर्शवणारा आहे.

छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये प्रत्यक्ष स्वर्ग कसा निर्माण झाला हे रामदास स्वामी “स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी । तीर्थासी तुळणा नाही। भक्तांसी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा । भक्तांसी दिधले सर्वे। बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी ।। यासारख्या शब्दांमध्ये समर्थपणे व्यक्त करतात.

समर्थ रामदास स्वामींचे पत्र

रामदास स्वामी शिवाजी

समर्थ रामदास स्वामींचे पत्र (Wikisource मधून उद्धृत)
अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥
पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥
आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे समकालीन होते. छत्रपती स्वामीजींना गुरुस्थानी मानत होते असे कांही लोक म्हणतात. पण कांही लोकांना ते तितकेसे मान्य नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी रामदास स्वामी त्या स्थळी उपस्थित होते असे उल्लेख निदान मी वाचलेल्या लोकप्रिय साहित्यात तरी वाचल्याचे मला आठवत नाही. कौरव व पांडवांना लहानपणी विशिष्ट शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य किंवा दशरथ राजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वसिष्ठ ऋषी अशा प्रकारचे घनिष्ठ असे गुरु शिष्य नाते त्या दोघांमध्ये नसावे. त्या दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी होती. राज्य स्थापन करण्याच्या, त्यात वाढ करण्याच्या आणि आपल्या अंमलाखालील मुलुखाचा कारभार सुव्यवस्थितपणे चालवण्याच्या धामधुमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गुंतलेले असल्यामुळे त्यांची व रामदास स्वामींची प्रत्यक्ष गांठभेट नेहमी होत नसेल. पण समर्थ रामदास सगळ्या जगालाच उद्देशून चार उपदेशाच्या गोष्टी सांगत हिंडत असतांना शिवाजी महाराजांच्या कार्याकडे लक्ष ठेऊन होते व व समाजाचे प्रबोधन करून त्याद्वारे अप्रत्यक्षपणे त्यांना हातभार लावत होते असे दिसते.
त्यांनी लिहिलेली कांही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. विकीपीडियावरून घेतलेले एक पत्र वर दिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यकारभाराच्या दृष्टीने कांही सूचना किंवा उपदेश दिला आहे. समर्थ रामदास स्वामींनी हे पत्र  छत्रपती संभाजी राजे यांना लिहिले आहे.” या पत्रामधील उपदेश महत्वाचा आहे आणि सर्वच राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.

https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dVlJNRjA2ZXh6ekU/edit
वर दिलेले चित्र स्वामी समर्थांच्या वेबसाईटवर दिले आहे. रत्नागिरीजवळील शिवसमर्थगडावर हे भित्तीचित्र चितारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा समर्थ रामदासस्वामींना भेटायला आलेले असतांना स्वामींनी त्यांना सहजच एक खडक फोडायला सांगितले. वरून सर्व बाजूंनी बंद दिसणारा तो खडक फोडल्यावर त्याच्या आंत थोडे पाणी निघाले, इतकेच नव्हे तर त्या पाण्यात एक जीवंत बेडूक सुद्धा होता. जगातील यच्चयावत् जीवांची काळजी परमेश्वर वाहतो आहे आणि प्रजेचे पालन करणा-या राजापेक्षा तो किती तरी श्रेष्ठ आहेहे यावरून महाराजांच्या निदर्शनास आले आणि त्यांच्या मनात कणभरही अहंकार उरला नाही. अशी कथा या चित्रामधील घटनेबद्दल सांगतात.

तुका आकाशाएवढा

विठ्ठलाच्या भक्तीच्या संप्रदायाचा “ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा” असे म्हंटले जाते. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या या कार्याचा प्रसार नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सांवता माळी, सेना न्हावी, एकनाथ प्रभृती अनेक संतांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला. तुकारामांनी आपल्या रसाळ वाणीमध्ये लिहिलेल्या अभंगातून भक्तीमार्ग घराघरात नेऊन पोचवला. त्यांनी रचलेल्या अभंगांची मोठी संख्या, उच्च दर्जा आणि अमाप लोकप्रियता यामुळे ‘अभंग’ हा शब्द ऐकताच तुकारामांचेच नांव लगेच डोळ्यासमोर येते, इतकी “अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची” झालेली आहे.

संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये विषयांची भरपूर विविधता आहे. परमेश्वराची, मुख्यतः विठ्ठलाची भक्ती हा मुख्य उद्देश असला तरी त्यातसुद्धा “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥”, “राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥” आणि “सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे॥” यासारख्या कांही अभंगामध्ये त्या देवाचे वर्णन किंवा स्तुती केली आहे. “घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।”, “विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥” आणि “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥” सारख्या अभंगात त्याच्या नामस्मरणाचा महिमा वर्णिला आहे. “जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥” अशा अभंगात त्याच्या गांवाला जाऊन त्याचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच त्यामुळे नक्की मनाला विसावा मिळेल असे सांगितले आहे. “अगा करुणाकरा करितसे धांवा । या मज सोडवा लवकरी॥” यासारख्या कांही अभंगात काकुळतीला येऊन त्याचा धांवा केला आहे. त्याला भेटण्याची मनाला लागलेली आस आणि त्यामुळे होणारी जिवाची तगमग खालील प्रसिद्ध अभंगात व्यक्त केली आहे.

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥

कन्या सासुराशीं जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा।  केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळे ॥४॥

विठ्ठलाची प्राप्ती झाल्यावर झालेली मनाची उन्मन अवस्था काय वर्णावी?
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो झालें कांहीचिया बाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

विठोबाखेरीज इतर देवांची आराधनासुद्धा तुकारामांनी केली आहे. “ॐकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥” यात गणेशाची तर “कृष्ण माझी माता, तर कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा।।” यात कृष्णाची प्रार्थना केली आहे. विष्णूची स्तुती करतांनाच भागवत धर्माचे मर्म खालील अभंगात विषद केले आहे.
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आइकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥

चांगल्या वागणुकीचा उपदेश करणारे अनेक अभंग आहेत. नरसी महेतांच्या “वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीर परायी जाणे रे।” परदुःखे उपकार करे ते मन अभिमान न आणे रे।।” या सुप्रसिद्ध भजनामधील उपदेश तुकारामांनी “पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥” या अभंगात केला आहे. त्यांच्या खालील अभंगाचा उल्लेख आपल्या नव्या (२००८ मधल्या) राष्ट्रपतींनी आपल्या शपथविधीमध्ये केला होता.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासीं अपंगिता पाही । त्यासी धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी ।  तोचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

पंढरीला जाण्याची इच्छा, त्यासाठी लागलेली अतीव ओढ व्यक्त करून तेथे गेल्यावर काय पहायला मिळेल याचे सुंदर वर्णन “खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ।।” या अभंगात तुकारामांनी केले आहे. पण त्यांना सुद्धा सर्व विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभररूपाची ओळख पटली होती. एका अभंगात ते म्हणतात,
“जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरुनियां ॥ चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सवें माझा ॥” दुसऱ्या एका अभंगात भक्त आणि देव यांचे अद्वैत त्यांनी कोणालाही सहज समजाव्यात इतक्या सुंदर उपमा देऊन दाखवले आहे.

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ॥२॥
जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥३॥
देव देहात देहात, का हो जाता देवळात ॥४॥
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥५॥

भक्तीरसपूर्ण रचना करतांनासुद्धा त्यातील विविध अलंकारांच्या प्रयोगातून आपल्याला तुकारामांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडते. सोप्या शब्दात अगदी रोजच्या जीवनामधील उदाहरणे देत ते आपला मुद्दा किती प्रभावीपणे मांडतात हे आपण वरील कित्येक उदाहरणात पाहिले आहे. त्यांच्या कल्पकतेचा एक आविष्कार खालील अभंगात कसा दिसतो हे पहा. “तुला स्वतःला तुझे महत्व कसे समजणार? ते तर आम्ही भक्तजनच जाणतो.” असे ते देवालाच तऱ्हेतऱ्हेची उदाहरणे देऊन विचारतात.
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
कैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटीं । नाही त्याची भेटी भोगती ये ॥४।।

आजकाल पर्यावरणाला मोठे महत्व प्राप्त झाले असल्यामुळे आपले लक्ष वनस्पतींकडे गेले आहे. निवांतपणा मिळण्यासाठी अनेक लोक चार दिवस शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत जातात. तुकारामांनासुद्धा निसर्गरम्य वातावरण भावत होते. पण या एकांताचा सदुपयोग ते मनन, चिंतन आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी करीत असत. ते म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

तुकाराम महाराजांनी जे लोकांना सांगितले तसेच वर्तन स्वतः केले. ते संसाराचा त्याग करून त्यापासून दूर गेले नाहीत. पण आपला प्रपंच करतांना “जोडावे धन उत्तम वेहारे” अशी सचोटी त्यांनी कठोरपणे पाळली. खरे तर त्यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे त्यांनी फारसे “धन” गोळा केलेच नाही. ते एकदा एका जमीनदाराच्या शेताची राखण करीत असतांना त्या शेतात जनावरे घुसवण्यात आली. तरी देखील विठ्ठलाच्या कृपेने त्यात भरघोस पीक आले. त्यामुळे खजील झालेल्या जमीनमालकाने त्याच्या अपेक्षेहून अधिक आलेले धान्य तुकारामांच्या घरी पाठवून दिले. तुकारामांनी ते सरळ गोरगरीबांना वाटून टाकले. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपल्या सेवकांकरवी त्यांच्या कुटुंबियांसाठी वस्त्राभूषणांचा नजराणा पाठवून दिला. “न बोलावता आपल्या पायाने चालत आलेली ही लक्ष्मी आहे.” असा लंगडा युक्तीवाद न घालता “आम्हाला ती विषासमान आहे.” असे म्हणून त्यांनी तो नजराणा साभार परत करून दिला. अशा कित्येक घटना त्यांची सात्विकता आणि सत्याचा आग्रह दाखवतात.

त्यांचा मत्सर करणाऱ्या सालोमालोमुळे तुकारामांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागला. पण “निंदकाचे घर असावे शेजारी” असे म्हणत त्यांनी तो स्वखुषीने सहन केला. तुकारामाच्या अभंगाची गाथा नदीच्या पाण्यात बुडवून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. इंद्रायणी नदीने स्वतः तिला तारून तुकारामाला ती परत आणून दिली अशी आख्यायिका आहे. “जनमानसाच्या अंतरंगात भिनलेले भाव कागद नष्ट केल्यामुळे नाहीसे होत नाहीत आणि अक्षर वाङ्मय अजरामर होण्यासाठी नश्वर कागदावर अवलंबून नसते.” हा याचा मतितार्थ आहे.

तुकाराम महाराजांना जनसामान्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही किंवा त्याचे आकर्षणही वाटले नाही. त्यांनी अहंकारावर पूर्ण विजय मिळवलेला होता. त्यांना मोठेपणाचा बडेजाव नकोच होता. सगळे लोक आपल्या समृध्दीची मागणी देवाकडे करतांना दिसतात. तुकाराम महाराज त्याच्या उलट लहानपणाचे वरदान देवाकडे मागतात.

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण ।  व्हावे लहानाहून लहान ॥५।।

पण लहान होणे याचा “किडामुंगीसारखे राहणे” असा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. त्याच्या जोडीला इतर अनेक गोष्टींची मागणी त्यांनी देवापुढे ठेविली आहे. “सगळ्या जगाचे भले होवो” असे दान त्यांनी मागितलेले नाही. स्वतःसाठी धनसंपदा तर त्यांना कधीच महत्वाची वाटली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांना मरणोपरांत स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षसुद्धा नको होता. या जन्मातच त्यांना ज्या गोष्टींची गोडी लागली होती त्या ईशभक्ती, संतसंग वगैरे देऊन “मला खुषाल पुन्हा जन्माला घालावे.” असे वरदान त्यांनी देवाकडे मागितले. खालील अभंगांवरून हे स्पष्ट होते.

हेचि मज व्हावी आंस। जन्मोजन्मी तुझा ध्यास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।
चंदभागे स्नान। तुका मागे हेचि दान।।

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,

अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता।।४।।

————————————————————–
ऋणनिर्देश
गेल्या महिनाभरात विठ्ठल आणि संतमंडळीं यासंबंधात लिहितांना संतांनी रचलेल्या अनेक सुंदर रचना मी उद्धृत केल्या आहेत. त्यातील बहुतेक गीते अनेक वेळा ऐकल्यामुळे त्यातील बऱ्याचशा ओळी स्मरणात राहिलेल्या असल्या तरी त्यामधील अचूक शब्दरचना वाचून नीट समजून घेण्यासाठी  ‘आठवणीतील गाणी’ आणि ‘मराठीवर्ल्ड’ या संकेतस्थळांचा भरपूर आधार मला मिळाला. या दोन्ही स्थळांनी लोकप्रिय तसेच कांहीशा अप्रसिद्ध पण उत्कृष्ट गाण्यांचा खजीना मराठी रसिकांसाठी मुक्तहस्ते उपलब्ध करून दिला आहे, तसेच आपल्याला हवे असलेले गाणे शोधण्याची उत्कृष्ट सोय करून दिलेली आहे. त्याबद्ल ही दोन्ही स्थळे चालवणा-या संयोजिकांचा मी शतशः ऋणी आहे. या संकेतस्थलांचे दुवे असे आहेत.

आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/
मराठीवर्ल्ड

संपादन दि.२४-०६-२०१९

 

ज्ञानेश्वर माउली

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्या इतर साहित्यिक रचनांवर कोणताही अभिप्राय देण्याएवढी माझी पात्रता नाही. पं.भीमसेन जोशी, स्व.बाबूजी, मंगेशकर मंडळी यांच्यापासून अजित कडकडे, सुरेश वाडकर वगैरेपर्यंत अनेक गायकगायिकांनी आजवर आपल्या सुस्वर संगीतामधून त्यांचे जे अभंग व ओव्या आपल्या मनावर ठसवल्या आहेत त्यावरूनच त्यातील दिव्यत्वाची प्रचीती येते. ज्ञानेश्वर महाराजांचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी त्याला चमत्कारांचा आधार देण्याची कधीच आवश्यकता नव्हती. विज्ञानामधून सिद्ध झालेल्या निसर्गाच्या नियमांचा भंग करणाऱ्या चमत्कृतीपूर्ण घटना वगळूनसुद्धा ज्ञानदेवांचे जीवनचरित्र अद्भुत म्हणावे लागेल.

जन्माला आल्यापासूनच त्यांची “संन्याशाची मुले” म्हणून हेटाळणी सुरू झाली. लहानपणीच माथ्यावरचे आईवडिलांचे छत्र अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हरपले. मोठा भाऊ निवृत्ती अरण्यात वाट चुकून हरवला. त्याला वाघाने खाल्ले असल्याची आशंका असल्याने तो परत येईल अशी फारशी आशा नव्हती. ज्या समाजाकडून त्यांचा पदोपदी अपमान होत होता त्याच्याकडेच भिक्षांदेही करून बालवयातील ज्ञानदेवांना आपल्या दोन लहान भावंडासह स्वतःचे पोट भरण्यासाठी धडपड करावी लागली. तरीही आपली ज्ञानपिपासा आणि अस्मिता जागृत ठेऊन जेवढे ज्ञान कानावर येत होते, दृष्टीला पडत होते ते त्यांनी ग्रहण करून ठेवले. निवृत्तीनाथ गुरूकडून दीक्षा घेऊन परत येताच ज्ञानेश्वरांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आणि रीतसर शास्त्राभ्यास सुरू केला.

त्या काळात धर्मशास्त्राचे सगळे ज्ञान संस्कृत भाषेमधील ग्रंथात दिलेले होते. पाठांतर करून ते पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेले असले तरी निव्वळ घोकंपट्टी करणाऱ्या लोकांना त्यामागील तत्वांचा बोध होत नव्हता. ते जाणू शकणारे पंडित काशी किंवा पैठण अशा तीर्थस्थळी रहात असत आणि संपर्कसाधनांच्या अभावी त्यांचा विचार घेणे सर्वसामान्य लोकांना अशक्य होत असे. याचा अतिशय दुःखद अनुभव ज्ञानदेवांच्या वडिलांना आला आणि त्यात त्यांचे कुटुंब होरपळून निघाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते ज्ञान लोकांच्या बोलीभाषेत आणणे आवश्यक आहे हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. इतर सर्व धर्मग्रंथांचे सार असे ओळखल्या जाणाऱ्या भगवद्गीतेवर ‘भावार्थदीपिका’ या नांवाचे भाष्य त्यांनी मराठी भाषेत लिहिले. तेच आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखले जाते. त्या काळात हा एक क्रांतिकारक आणि धक्कादायक उपक्रम होता. तो करतांना मूळ गीतेमधील गोडवा किंचितही कमी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. “माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।” एवढा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांचे समकालीन संत नामदेव म्हणतात,

“संस्कृत भाषा जनासी कळेना, म्हणूनि नारायणा दया आली हो ।
देवाजीने परी घेतला अवतार, म्हणति ज्ञानेश्वर तयालागी हो ।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ साराहूनि सार, फोडिले भांडार वैकुंठीचे ।
नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण । तयाचे चरण वंदीन मी ।।”

ज्ञानदेवांनी हा ग्रंथ तर लिहिला पण त्यातील भाव लोकांपर्यंत कसा पोचवायचा हा एक प्रश्न होता. त्या काळात मुद्रण आणि प्रकाशनाची सोय नव्हती. एका पोथीमधील एक एक शब्द काळजीपूर्वकरीत्या सुवाच्य अक्षरात लिहून तिची दुसरी प्रत काढावी लागत असे. त्या पोथीचे दहा जणांच्या समक्ष वाचन केले किंवा कोणी ती तोंडपाठ करून तिचे सार्वजनिक पारायण केले तरच त्यातील मजकूर इतरांना समजत असे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला भावार्थ या पद्धतीने फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकला असता. शिवाय गीतेमधील योगांच्या संकल्पना समाजातील निरक्षर घटकांना कळायला कठीण होत्या. त्यामुळे सर्व समाजाला चटकन समजू शकतील, लक्षात ठेवता येतील अशा सोप्या शब्दात लिहिलेल्या चार ओळींच्या अनेक अभंगांची रचना त्यांनी केली.

“देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेग करीं । वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥”

यासारखे रोज म्हणता येतील असे हरिपाठाचे अभंग त्यांनी सामान्य जनांना शिकवले. “रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी।” यासारखी विठ्ठलाची स्तुती करणारे अनेक अभंग लिहिले. त्याची भक्ती करण्यामध्ये संसाराचे सुखाचा मार्ग आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. एका अभंगात ते सांगतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेवीवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥”

“एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा। वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं। धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥”

यासारख्या अभंगातून “भक्तीमार्ग अगदी सोपा आहे. त्याचे पालन करणे सर्वांना शक्य आहे. ईश्वरप्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या करण्याची गरज नाही.” अशा अर्थाचा उपदेश जनसामान्यांना केला. “जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत” असे सांगून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भजनामध्ये गोडी वाटावी यासाठी “कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥” यासारखी आकर्षक भारुडे लिहिली. “पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥” आणि “रंगा येईं वो येईं, अंगणी । विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ।।” यासारख्या मनोरंजक रचना केल्या. “घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥” यासारख्या विराण्या  रचल्या. इतकेच नव्हे तर मोक्षपट नांवाच्या एका खेळाची संकल्पना त्यांनी दिली. आजकालच्या सापशिडीच्या खेळासारख्या एका पटावरील घरात वेगवेगळ्या पापपुण्यांची नांवे लिहिलेली असत. कवड्या किंवा फांसे टाकून मिळालेल्या दानाप्रमाणे आपली सोंगटी पुढे सरकवत न्यायची. परोपकारासारख्या पुण्यश्लोक घरात पोचल्यास तेथील सोपान चढून वरचे घर गांठायचे आणि चोरीसारख्या पापमय घरात गेल्यास सापाने गिळंकृत केल्यामुळे त्याच्या शेपटीपर्यंत खाली घसरत यायचे असा हा खेळ होता. पापपुण्याच्या खऱ्या कल्पना अगदी खेळता खेळता लोकांच्या मनात मुराव्यात यासाठी केलेला तो अफलातून प्रयत्न होता. आता तो मूळ स्वरूपात फारसा पहायला मिळत नाही.

भक्तीमार्गाचेच थोडे उच्च पातळीवरील वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केलेले आहे.
“समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान ।परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥”

तर थोडे गूढ वाटणारे वर्णन असे आहे.
“इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ।
मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता अति बहरू कळियासी आला ।।१।।
मनाचिये गुंथी गुंफियला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला ।।२।।”

सामान्य लोकांसाठी लिहिलेल्या अभग व ओव्यामधूनसुद्धा त्यांच्या विचारांची उंची कशी दिसते पहा! विठ्ठलाचे दर्शन घडल्यावर मनाला होणारा आनंद ते “अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥” असा व्यक्त करतात तर चंचल मनाला स्थिर राहण्यासाठी ते आवाहन करतात,
“रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥”

ज्ञानेश्वरी लिहितांना प्रारंभी गणपतीची आराधना करतांनासुद्धा सरळसोटपणे  “वक्रतुंड महाकाय” अशी गजाननाच्या शारीरिक वर्णनापासून सुरुवात न करता ते अशी करतात.
“ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥”

सामान्य लोकांना समजायला सोपा असा भक्तीमार्ग त्यांनी दाखवला असला तरी “चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ।” या शब्दात आदि शंकराचार्यांनी सांगितलेले अद्वैत त्यांनी अनुभवलेले होते. निर्गुण निराकार परब्रह्माची ओढ त्यांच्या मनात होती. तशा अर्थाच्या कित्येक रचना त्यांनी केल्या आहेत. खालील रचनांमध्ये ते स्पष्टपणे दिसते.

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।  तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति अपणांसकट ।  अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

“कानडा हो विठ्ठलू” या अभंगात ते निराकार विठ्ठलाचे वर्णन करून अखेरीस म्हणतात,
“बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।”

द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारात त्यांना विरोधाभास दिसत नाही. दोन्ही मार्ग आपापल्या जागी योग्यच आहेत असे ते  “तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।  सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।।” या अभंगात सांगतात. तर दुस-या ठिकाणी म्हणतात,
“अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥”

संस्कृत भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना आकलन व्हावे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली याचे जनाबाईसारख्या सुसंस्कृत मनाच्या, सगुणभक्ती आचरणाऱ्या आणि परमात्मज्ञानाची उत्सुकता बाळगणाऱ्या साधकाला खूपच अप्रूप होते. त्यामुळे  असा ज्ञानेश्वर आपला सखा, नातेवाईक असावा असे वाटल्यामुळे ती म्हणते.

ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर ।। १।।
मरोनिया जावे। बा माझ्या पोटा यावे ।। २ ।।
ऐसे करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ।। ३ ।।
जावे वोवाळूनी । जन्मोजन्मी दासी जनी ।।४।।

संतशिरोमणी तुकाराम महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वराच्या श्रेष्ठपणाचे गुणगान असे केले आहे.
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरासी काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळखणे । इतरां तुळणे काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥

राम जनार्दनांनी त्यांची आरती रचली आहे.
आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा । सेविती साधूसंत मनु वेधला माझा ।।
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी ।।
प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मचि केले । राम जनार्दनी, पायी ठकचि ठेले ।।

अशा प्रकारांनी अनेक संतांनी तर ज्ञानेश्वराच्या कार्याचा गौरव केलाच. संतपरंपरेचा जो धर्म होता तोच माझा धर्म आहे असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील कवीश्रेष्ठ ग.दि.माडगूळकरांनी ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांचे देदिप्यमान रूप या गीतामध्ये दाखवले आहे.

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ।
ज्ञानियांचा राजा, भोगतो राणीव, नाचती वैष्णव, मागेपुढे ।
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, कैवल्याचे ।
उजेडी राहिले, उजेड होऊन. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ।

ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात अनेक प्रकारांच्या रचना केल्या. त्यांची अगाध विद्वत्ता, लालित्यपूर्ण शब्दरचना, कल्पनेची भरारी, साध्या सोप्या तसेच गूढ रहस्यमय रचना करण्याची हातोटी वगैरे विविध अंगांनी त्या बहरल्या आहेत हे पाहून मन थक्क होते. हे सगळे करतांना आपण हा एक यज्ञ करीत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली. यातून त्यांना आपला कसलाही स्वार्थ साधण्याची मनोकामना नव्हती. संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो असे पसायदान त्यांनी अखेरीस मागितले आहे.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

“चिंता करतो विश्वाची” असे सांगणारे ज्ञानदेव अवघ्या जगावर प्रेम करीत होते. त्यांनी भोगलेल्या कष्टामुळे आलेल्या कडवटपणाचा लवलेशसुद्धा त्यांच्या स्वभावात आला नाही की त्याची छायासुद्धा त्यांच्या लेखनात डोकावली नाही. “पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद। ” इतक्या सहज भावनेने त्यांनी त्यांना त्रास देणा-या लोकांना क्षमा केली. म्हणूनच आजसुद्धा त्यांचे भक्त त्यांना ‘ज्ञानेश्वर माउली’ या नांवाने संबोधतात.

 

………. संपादन दि.२५-०६-२०१९