जय बोलो हनुमान की

hanumanSm

माझ्या लहानपणातल्या आठवणींमध्ये चैत्र महिन्यात येणारी रामनवमी आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी येणारी हनुमानजन्मोत्सव या सणांना एक विशिष्ट स्थान आहे. रामनवमीच्या दिवशी गावातल्या रामाच्या देवळात दुपारी कीर्तन असायचे आणि त्यात दर वर्षी रामाच्या जन्माचेच आख्यान असायचे. कीर्तनकार आपले निरूपण छान रंगवून सांगत असत आणि बरोबर दुपारी बाराच्या ठोक्याला त्यांच्या कथेत रामाच्या जन्माची घटना आणत. त्यानंतर रामाला पाळण्यात झोपवून पाळणा, आरती, सुंठवड्याचा प्रसाद वगैरे होत असे.

आमच्या गावात मारुतीची अनेक देवळे होती. रामाच्या देवळात वर्षातून एकदाच जाणे होत असले तरी गावाच्या मधोमध म्हणजे आजच्या भाषेतल्या ‘सिटीसेंटर’ला असलेल्या मारुतीच्या देवळासमोरील चांगल्या ऐसपैस कट्ट्यावर दररोज संध्याकाळी झाडून माझ्या सगळ्या मित्रांची हजेरी लागायचीच. आधी निरनिराळ्या मैदानांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये खेळून आणि फेरफटका मारून झाल्यानंतर सगळ्यांनी त्या कट्ट्यावर घोळक्याने जमून थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि नंतर आपापल्या घरांच्या दिशेने प्रयाण करायचे असे ठरलेले होते. तिथून निघायच्या आधी त्या देवळामधील हनुमानाच्या पूर्णाकृती प्रतिमेला प्रदक्षिणा घालून त्याच्या पायाला हात लावणे होत असे. एका आठदहा फूट उंच शिलेच्या एकाच बाजूला चित्र काढल्याप्रमाणे ही उभी मूर्ती कोरलेली होती. त्या भव्य मूर्तीच्या खोल बेंबीत बोट घालणेसुध्दा शक्य होते, पण तसे करायची कुणाचीच कधी हिंमत झाली नाही. शिवाय तिथे विंचू दडून बसलेला असण्याची भीतीही होती. ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीत असेलच.

गावातल्या इतर देवांच्या देवळातल्या गाभाऱ्यात कोणी ना कोणी पूजारी असायचे आणि तिथे लहान मुलांना सहसा प्रवेश मिळत नसे, काही ठिकाणी तर अत्यंत कडक सोवळे ओवळेही असे, पण आमच्या मारुतीच्या देवळात मात्र कुणालाही कोणाचीही आडकाठी नव्हती. त्या मारुतीच्या भव्य मूर्तीला हाताने धरूनच आम्ही त्याला प्रदक्षिणाही घालत होतो. इतकी सलगी असल्यामुळे तो देव आम्हाला जास्तच जवळचा वाटायचा. बोलतांना त्याचा उल्लेखही नेहमी एकवचनामध्येच होतो. हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशीसुध्दा त्या देवळात उत्सव किंवा समारंभाचा फारसा फापटपसारा नसायचा. भल्या पहाटे उठून दर्शनाला येणाऱ्यांची संख्या त्या दिवशी थोडी जास्त असायची एवढेच. त्या काळात तरी तिथे उत्सवासाठी भजन, पूजन, कीर्तन वगैरे काही विशेष समारंभ नसायचा.

हनुमानजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी आमची काही मित्रमंडळी भल्या पहाटे उठून एकाद्या मित्राच्या घरी जमत असू. त्याच्या आदल्या दिवशीच कोणाकडून लहानशी पालखी, कोणाची चादर किंवा शाल, कोणाकडे असलेली मारुतीची तसबीर, शोभेची फुले, माळा आणि सजावटीचे सामान वगैरे जमवून तयारी केलेली असायची. सकाळी थोडी ताजी फुले तोडून वहायची आणि मग त्या हनुमानाच्या प्रतिमेची गल्लीमध्ये मिरवणूक निघत असे. “राम लक्षुमण जानकी। जय बोलो हनुमानकी।” अशा आरोळ्या देत आमची छोटीशी वानरसेना दोन तीन गल्ल्यांमधून फिरून परतत असे. हा फक्त लहान मुलांचा उत्सव असायचा. मोठ्या लोकांनी वाटले तर दोन हात जोडून नमस्कार करावा यापेक्षा जास्त अपेक्षा नसे. कसलाही खास प्रसादही वाटला जात नसे.

मारुतीरायाच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. त्याची आई अंजनी आणि वायुदेवता हे एकमेकांना कसे आणि कुठे भेटले आणि त्यांचे लग्न कुठे झाले, त्यांचा संसार कसा झाला वगैरे तपशीलात शिरायची गरज मला लहानपणी कधी पडली नाही आणि मोठेपणी मला त्यात काही स्वारस्य उरले नाही. बालक मारुतीने जन्माला येतांनाच उगवत्या सूर्याचे बिंब पाहिले आणि ते एक गोड असे लालबुंद फळ आहे असे वाटल्यामुळे ते खाण्यासाठी त्याने आकाशात उड्डाण केले अशी कथा आहे. हनुमन्ताच्या अंगात अचाट शक्ती होती, पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नव्हती किंवा त्याच्या मनात कसली महत्वाकांक्षा नव्हती, त्यामुळे तो आधी सुग्रीवाचा आणि नंतर रामाचा दास राहिला आणि त्यांनी दिलेली कामगिरी करत राहिला असेही म्हणतात. मारुतीची शेपूट त्याला हवी तेवढी वाढवता येत होती. तिच्या लांबीला अंत नव्हता. त्यामुळे अनंत किंवा ‘इन्फिनिटी’ या शब्दांचा अर्थ ‘मारुतीचे शेपूट’ या वाक्प्रचारामधून लक्षात ठेवला होता.

समुद्र उल्लंघून मारुती लंकेत गेला, तिथल्या अशोकवाटिकेमध्ये बसलेल्या सीतेला त्याने शोधून काढले, रामाच्या बोटामधील मुद्रिका तिला दाखवून आपली ओळख पटवून दिली, त्यानंतर झाडांवरून पिकलेली फळे खाली पाडण्यासाठी त्या वनाचा विध्वंस केला. राक्षसांकडून स्वतःला कैद करून घेतले. रावणासमोर गेल्यावर धिटाई आणि उध्दटपणा दाखवून त्याला डिवचले, आपला जीव आपल्या शेपटीत आहे असे सांगून फसवले आणि त्याने शेपटीला लावलेल्या आगीने त्याची सोन्याची लंका जाळून भस्मसात केली वगैरे रामायणामध्ये दिलेला कथाभाग खूपच मजेदार आहे. लहान असतांना तो ऐकतांना आणि रंगवून सांगतांना आम्हाला खूप मजा वाटत असे. त्यानंतर रामरावणाचे भयंकर युध्द झाले. मारुतीच्या अंगात प्रचंड ताकत असली तरी त्याने युद्धात मोठा पराक्रम करून कुठल्या राक्षसांना ठार मारले असे रामायणाच्या गोष्टीत सांगितले जात नाही. त्या युद्धात लक्ष्मणाला एक शक्ती वर्मी लागली आणि तो मूर्छित झाला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी संजीवनी नावाच्या वनौषधाची आवश्यकता होती. ते वृक्ष फक्त एकाच पर्वतावर होते आणि ते ठिकाण युध्दस्थळापासून खूप दूर होते. तिथे जाऊन ते औषध घेऊन येण्याचे काम फक्त हनुमानच करू शकत होता. तो लगेच उड्डाण करून मनोवेगाने त्या पर्वतावर गेला, पण त्याला वनौषधींची माहिती नसल्यामुळे त्यातली संजीवनी कुठली हे समजेना. यात वेळ घालवण्याऐवजी त्याने सरळ तो अख्खा डोंगर उचलला आणि एका हाताच्या तळव्यावर त्याला अलगद धरून तो लंकेला घेऊन गेला. हा भागसुध्दा चमत्कृतीपूर्ण आहे. मारुती आणि कृष्ण या दोघांनी डोंगर, पर्वत वगैरेंना हाताने उचलले असल्यामुळे हे भूभाग भाताच्या मुदीसारखे जमीनीवर अलगद ठेवलेले असतात असेच मी लहानपणी समजत होतो. ते पृथ्वीशी सलग रीतीने जोडले असल्याचे मोठेपणी समजले.

जय बोलो हनुमान की १

संतांच्या वाङ्मयामध्ये हनुमानाची उपासनाही होती. संत रामदास तर रामाचे आणि त्याच्याबरोबर मारुतीचेही परमभक्त होतेच, त्यांनी गावोगावी हनुमंताची देवळे उभारून त्याच्या उपासनेमधून शरीरसौष्ठव कमावण्याची मोहीमच हाती घेतली होती आणि जन्मभर चालवली होती. रामदासांनी स्थापन केलेली अकरा मंदिरे प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या शिष्यगणांनी त्यांची परंपरा पुढे नेत गांवोगांवी मारुतीची देवळे उभारली. “हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी।” असा संत तुकारामांचा एक अभंग आहे. हनुमंताची स्तुती करणारा रामरक्षेमधला एक श्लोक सगळ्या मुलांना नक्की शिकवला जात असे.
मनोजवम् मारुततुल्यवेगम् । जितेंद्रियम् बुध्दीमताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम् । श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये।।
या श्लोकानुसार हनुमान हा फक्त शक्तीशाली दांडगोबा नव्हता, तो सामर्थ्यवान तसेच अत्यंत चपळ तर होताच, शिवाय सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला तो एक महान योगी होता, तसेच अत्यंत बुध्दीमान होता. यामुळेच प्रभू रामचंद्राच्या या सेवकाची गणनासुद्धा देवांमध्ये केली गेली. माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना “भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती” हे स्तोत्र शिकवले जात होते आणि ते म्हंटल्याने मारुतीराया अंगात भरपूर शक्ती देतो असा विश्वास असल्यामुळे आम्ही ते रोज संध्याकाळी म्हणत होतो. त्यानंतर दंडातल्या बेटकुळ्या फुगवून पहात होतो.

समर्थ रामदासांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे किंवा कदाचित त्याआधीपासून महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या गावांमध्ये मारुतीची देवळे आहेतच, शिवाय भारताच्या अनेक भागात ती दिसतात. दक्षिण भारतात मारुतीला आंजनेयस्वामी म्हणतात. त्यांची मंदिरे मी कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये पाहिली आहेत. जगातली सर्वात प्रचंड अशी हनुमानाची मूर्ती आंध्रमध्येच आहे आणि ती जगातल्या इतर कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा अधिक उंच आहे. उत्तर प्रदेशातसुद्धा मी आजूबाजूच्या इमारतींपेक्षाही उंच अशा बजरंगबलीच्या मूर्ती काही ठिकाणी पाहिल्या आहेत. तुलसीदासांनी रचलेली हनुमान चालीसा उत्तर भारतीय लोकांमध्ये महाराष्ट्रातल्या भीमरूपी या स्तोत्रापेक्षाही अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा पाठ केल्यामुळे भुतेखेते, इडापिडा वगैरे सगळ्यांपासून संरक्षणाचे कवच मिळते अशी भाविकांची गाढ श्रद्धा असते. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये जिथे जिथे भारतीय लोक पूर्वीच्या काळात गेले होते तिथे तिथे त्यांनी मारुतीची मोठी देवळे आणि भव्य मूर्तींची स्थापना केली आहे. त्यातले त्रिनिदादमधले देऊळ जगप्रसिद्ध आहे.

हनुमान त्रिनिदाद
माझी मारुतीसंबंधी लहानपणची दुसरी एक आठवण थोडी विसंगत पण मजेदार आहे. त्या काळात मोहरमच्या दिवसात अनेक लोक निरनिराळी सोंगे घेऊन रस्त्यामधून फिरत असत. बागवान लोकांची मुले बहुधा पट्ट्यापट्ट्यांचे वाघ बनत असत आणि डफावर थाप मारून काढलेल्या झडाड्डी झकनकच्या तालावर नाच करत असत, तर काही जण अस्वलासारख्या इतर वन्य प्राण्यांची सोंगे घेत. यातले कित्येक लोक गैरमुस्लिम असत. ‘भीम्या’ की ‘शिद्राम्या’ अशा नावाचा असाच एक माणूस दरवर्षी मोहरममध्ये चक्क मारुतीचे सोंग घेत असे. अंगापिंडाने धिप्पाड आणि आधीच काळा कभिन्न असलेला तो माणूस त्याच्या केसाळ अंगाला काळा रंग फासून गोरिल्लासारखा दिसत असे. तो कंबरेला जाड दोरखंडाची एक लांब शेपटी बांधून तिला हाताने फिरवत रस्त्यातून उड्या मारत धावत सुटे आणि पटकन एकाद्या घराच्या छपरावर, विजेच्या खांबावर किंवा झाडाच्या उंच फांदीवर चढून बसे. दोन्ही गाल फुगवून हुप्प करणे, नखांनी अंग खाजवत बसणे, हातानेच आपली शेपूट उचलून इकडे तिकडे आपटणे अशा त्याच्या अचरट अचाट लीला चाललेल्या असत. पट्टेदार वाघ वाजत गाजत आणि संथगतीने फिरत असायचे आणि मोठ्या रस्त्यांवरून चालतांना सहजपणे समोर दिसायचे, पण या हनुमानाला शोधत मुलेच गाव पिंजून काढत असत. मुलांमध्ये तो अतीशय पॉप्युलर होता एवढे नक्की. यात त्याला कसली कमाई होत असे कोण जाणे. एरवी त्याचा चरितार्थ कसा चालतो हे ही कुणाला माहीत नव्हते. त्याच्या अंगातली चपळाई पाहून लोकांना त्याच्या धंद्याबद्दल थोडी शंकाच येत असावी. हा ‘हिन्दू धर्माचा घोर अपमान’ आहे अशी ओरड त्या काळात कोणी करत नव्हते किंवा त्यासाठी कोणीही त्याला त्रास देत नव्हते. कुठल्याशा पीराला कुणीतरी केलेला नवस फेडण्यासाठी तो माणूस असले सोंग घेतो अशी गावात अफवा होती. ‘सेक्युलर’ हा शब्द त्या वेळी कानावर आला नसला तरी गावातले वातावरण एका प्रकारे सर्वधर्मसहिष्णुतेचे असायचे.

उद्या हनुमानजन्मोत्सव आहे. त्या निमित्याने मारुतीरायाचे स्मरण आणि त्याला प्रणाम करून हा छोटासा लेख त्याच्या पायाशी अर्पण.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या देवळांविषयी माहिती इथे पहावी.
https://anandghare.wordpress.com/2018/09/03/%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3/

वीर हनुमान आणि दास हनुमान हा लेख इथे पहावा.
https://anandghare.wordpress.com/2021/04/27/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8/

घटाघटाचे रूप आगळे

घटाघटाचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ।।

असे कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी लिहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रामधील जीवनावरील या गीतात अगदी चपखलपणे बसणारी ही उदाहरणे आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या गोपिकांपासून ते माझ्या आधीच्या पिढीमधल्या काळातल्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या घराघरातल्या गृहीणींपर्यंत सगळ्याजणी आपापल्या घरांमधले दूध, दही, लोणी वगैरे खाद्यपेय पदार्थ मातीच्या गाडग्यामडक्यांमध्ये ठेवत असत. त्या काळात स्टेनलेसस्टीलची भांडी अजून निघालेली नव्हती, काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रांची किंमत परवडत नसे आणि त्या वस्तू खेडेगावातल्या बाजारात मिळत नसल्यामुळे मुद्दाम बाहेरून आणाव्या लागायच्या. त्या मानाने स्थानिक कुंभाराने तयार केलेली मातीची मडकी, घडे वगैरे स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असत. ती फुटली तरी त्याची फारशी हळहळ वाटायची नाही. मोठे तोंड असलेली अनेक लहानमोठी मडकी घरात आणून रचून ठेवलेली असत. गरजेप्रमाणे त्यातले एक एक काढून घेऊन त्यात दूध, दही, लोणी वगैरे ठेवले जात असे. घरातला सगळा स्वयंपाक चुलींवर होत असल्यामुळे तो झाल्यानंतर चुलींमधले धगधगते निखारे वेगळ्या मडक्यात काढून ठेवले जात असत आणि तळाशी पडलेली राख वेगळी ठेवली जात असे. निखारे थंड केल्यानंतर त्याचा कोळसा पुन्हा ज्वलनासाठी वापरला जाई आणि राखेचा उपयोग भांडी घासण्यासाठी होत असे. एका चुलीतले निखारे बाहेर काढून त्यांचा उपयोग दुसरी चूल, शेगडी किंवा बंब पेटवण्यासाठी केला जात असे. अशा वेळी त्यांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी मातीच्याच उथळ पात्रांमध्येच ठेवले जात असे.

शहरात वाढलेल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना फ्रीजमधून काढून खायचे अमूल बटरच ओळखीचे झाले असणार.  मातीच्या डेऱ्यामध्ये रवीने ताक घुसळून काढलेला ताज्या लोण्याचा गोळा त्यांना क्वचितच पहायला मिळाला असेल आणि त्या छान लोण्याच्या गोळ्याला मातीच्या मडक्यात घालून ठेवण्याची कल्पनासुध्दा कदाचित सहन होत नसेल. गॅस, ओव्हन किंवा इलेक्ट्रिक हॉटप्लेटवरच घरातला स्वयंपाक होत असल्यामुळे निखारा किंवा अंगार हे शब्दसुध्दा त्यांच्या कानावर पडले असण्याची शक्यताही कमीच आहे. कुंभाराने तयार केलेल्या एका मडक्याला लोण्याची स्निग्धता आणि मऊपणा अनुभवायला मिळतो तर तशाच प्रकारच्या दुसऱ्या मडक्याला मात्र निखाऱ्याचे दाहक चटके सहन करावे लागतात, हे ज्याचे त्याचे नशीब आहे हे या ओळींमधून सांगितलेले सत्य किती विदारक आहे याची पूर्ण जाणीव त्यांना कदाचित होणार नाही. त्यासाठी दुसरी उदाहरणे द्यावी लागतील.

गदिमांच्या गीतातले घट या जगातल्या माणसांची प्रतीके आहेत हे उघड आहे. मातीची सगळी मडकी कुंभारांकडून एक एक करूनच बनवली जातात, अजून तरी त्याचे यांत्रिक साचे निघालेले नाहीत. त्यामुळे ती एकासारखी एक दिसत असली तरी त्यांचा आकार, गोलाई. कडांची जाडी यात थोडा थोडा फरक असतोच. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, तामीळनाडू, किंवा जर्मनी, चीन, आफ्रिका वगैरे भागातली माणसे त्यांच्या वंशानुसार साधारणपणे सारखी दिसली तरी त्यातल्या प्रत्येकाचा चेहेरा वेगळा असतो. त्याचप्रमाणे उतरंडीमधले प्रत्येक मडके वेगळे आहे हे त्यांना निरखून पाहिल्यास समजेल. निरनिराळ्या घटाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातोच. वर दिल्याप्रमाणे काही मडक्यांमध्ये लोणी आणि कांहींमध्ये अंगार ठेवला जातोच, काही मडकी तर अंत्यविधीच्या वेळी फक्त काही मिनिटांसाठीच वापरली गेल्यावर लगेच फोडून टाकली जातात. याच्या उलट हजार दोन हजार वर्षांपूर्वी तयार केले गेलेले काही सुबक नक्षीकाम केलेले रांजण आपल्याला पुरातनवस्तूसंग्रहालयांमध्ये (म्यूजियम्समध्ये) आजही पहायला मिळतात. जगभरातले रसिक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी येतात आणि त्या रांजणांची व त्यांना बनवणाऱ्या कारागीरांची तोंड भरून तारीफ करतात. त्यातल्या काही रांजणांमध्ये एका काळी सुवर्णमुद्रा भरून ठेवल्या गेल्या असतील आणि प्राणपणाने त्यांचे संरक्षण करणारे सैनिक त्यांच्या पहाऱ्यावर ठेवले जात असतील.

निरनिराळ्या घटांमधल्या कशाचा उपयोग कोणत्या कामासाठी व्हावा हे ठरवण्याचा काडीमात्र अधिकार त्या पात्रांना नसतो. या बातीत काहीही करायला ती असमर्थ असतात. माणसे त्यामानाने थोडी सुदैवी असतात. माणसाचे आयुष्यसुध्दा सर्वस्वी त्याच्या नशीबावर अवलंबून असते असे गदिमांच्या गीतात ध्वनित होत असले तरी याबाबतीत माझी मते थोडी वेगळी आहेत. मी इतका सर्वस्वी दैववादी नाही. निदान काही प्रमाणात तरी माणूस स्वतःच्या प्रयत्नाने आपली वर्तमानकाळातली परिस्थिती बदलून आपले भविष्य घडवू शकतो. सर्वच बाबतीत ते शक्य होणार नसले तरी काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो, नशीबाने आलेल्या परिस्थितीमुळे निर्माण झालेले मनातले रागद्वेषाचे निखारे फेकून देऊन त्यांच्या जागी सुंदर, मोहक आणि कोमल भावनांची फुले गोळा करून ठेऊ शकतो, हे करता करता इतरांच्या प्रेमाचा किंवा मायेचा लोण्याचा गोळासुध्दा त्याला मिळू शकतो.

हे सगळे मला आज कां आठवले असेल? सकाळी उठून फिरायला जायला निघालो आणि शेजारी असलेल्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्सपर्यंत गेलो तर तिथे कोप-यावर बरीच गर्दी जमलेली दिसली. जवळ जाऊन पाहिले तर सुंदर सजवलेल्या मटक्यांचे ढीग रचून ठेवलेले होते आणि त्या भागातल्या कोकिळाबेन, ऊर्मिलाबेन वगैरे शेठाण्या, त्यांच्या सेजल, हेतल वगैरे सुना आणि चिंकी, डिंकी वगैरे मुलींना सोबत घेऊन त्याला गराडा घालून उभ्या होत्या. एक एक घट निरखून पहात होत्या, त्यांचे आकार, त्यावर रंगवलेली नक्षी, कांचांच्या तुकड्यांना चिकटवून केलेली डिझाईन्स वगैरे पाहून पसंत केलेल्या मडक्याच्या भावावरून घासाघीस करत होत्या. या सगळ्या घटाघटांचे रूप आगळे वेगळे असले तरी त्या सर्वांचे दैव मात्र साधारणपणे सारखेच असावे. त्या सगळ्यांची आज छान पूजा केली गेली असेल, नऊ दिवस त्यांच्या सभोवती रासगरबा खेळला जाईल. त्यासाठी तयार केलेली खास गाणी लाऊडस्पीकरवर जोरजोरात वाजवली जातील, रंगीबंरंगी कपडे आणि अलंकार लेऊन सजलेल्या युवती प्रचंड उत्साहाने आणि बेभान होऊन त्या गाण्यांच्या तालावर नाचतील. त्यांची यात सतत चढाओढ होत राहील. या घटांना (ते सजीव नसतात, पण असले तर) ती सगळी मौजमजा पहायला मिळेल आणि …. नऊ दिवसांनंतर ते सगळे संपुष्टात आल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही, बहुधा त्यांचे आयुष्यही तिथेच संपेल, पण नऊ दिवसांचेच त्यांचे आयुष्य मात्र दिमाखात जाईल.

नवलरात्री

विजयादशमी

परंपरागत शास्त्रांमध्ये १.श्रृंगार, २.हास्य, ३.करुण, ४.रौद्र, ५.वीर, ६.भयानक, ७.बीभत्स, ८.अद्भुत, आणि ९.शांत असे नऊ प्रमुख रस सांगितले गेले आहेत. नवरात्री नावाच्या एका जुन्या तामिळ चित्रपटात यातील एकेका रसाचे प्रामुख्याने दर्शन घडवणारी एक घटना रोज घडत जाते, अशा घटनांची साखळी दाखवली आहे. (बहुधा) शिवाजी गणेशन या नटश्रेष्ठाने नऊ सर्वस्वी भिन्न अशा भूमिकांमधून ही रसनिष्पत्ती अप्रतिमरीत्या साधली आहे. पुढे या सिनेमाचे हिंदीकरण करण्यात आले. नया दिन नयी रात नावाच्या या चित्रपटात हरहुन्नरी आणि गुणी नट संजीवकुमार यानेसुध्दा जवळ जवळ त्याच नऊ निरनिराळ्या भूमिका छान वठवल्या आहेत. धोपटमार्गाने जाणाऱ्या माझ्यासारख्याच्या जीवनात असे लागोपाठ नऊ दिवस एवढे नाट्य घडणे शक्य नाही. पण दरवर्षी येणारे नवरात्र एक अनपेक्षित आणि वेगळा अनुभव देऊन जाते असे मात्र योगायोगाने काही वर्षे घडत आले. त्यातल्या कांही वेगळ्या आठवणी मी या लेखात सांगणार आहे.

नव(ल)रात्री – भाग १

इसवी सन २०१० या वर्षातल्या नवरात्रात आम्ही दहाबारा दिवस बाहेरगावी जाऊन फिरून येण्याचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीच ठरवला होता आणि आयत्या वेळी मिळणार नाहीत म्हणून जाण्यायेण्याची तिकीटेही काढून ठेवली होती. त्या आठवडाभरात काय काय मौजमजा करायची याचे थोडे नियोजन करून मनातल्या मनात मांडे खाणे चालले होते. पण ते तसेच हवेत विरून गेले. घटस्थापनेच्या दोनच दिवस आधी पहाटे अचानक आम्हा दोघांनाही अस्वस्थ वाटायला लागले म्हणून शेजारच्या मुलाने दवाखान्यात नेऊन पोचवले. तिथे मला आणि पत्नीला वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये अॅड्मिट करून घेतले.

पहिल्या दिवशी तर आजार आणि त्यावरील औषधोपचार यांच्या संयुक्त प्रभावाने आलेल्या ग्लानीत मी आपल्या खाटेवर निपचित पडून होतो. दुसऱ्या बिछान्यावरला रुग्ण बरा दिसत होता. सकाळपासून तो कोणाची तरी वाट पहात होता. दुपारच्या सुमाराला चाळिशीला आलेल्या त्याच्या दोन मुली आणि तिशीमधली भाची की पुतणी (नीस) अशा तीघीजणी मिळून आल्या. बराच वेळ त्या रुग्णाशी बोलत बसल्या. सगळी तयारी झाल्यानंतर त्याला व्हीलचेअरमध्ये बसवून बाहेर घेऊन गेल्या. संध्याकाळ उलटून गेल्यानंतरच तो आपल्या बेडवर परत आला. मेंदूचे स्कॅनिंग करण्यासाठी त्याला नेले होते असे त्याच्याकडून समजले.

त्या तीन्ही मुली एकमेकींशी आणि त्याला उद्देशूनसुध्दा फर्मास इंग्रजीत बोलत होत्या. अधून मधून एक दोन वाक्ये तो इंग्रजीतच पण ज्या टोनमध्ये बोलला त्यावरून तो कारवारी किरिस्तांव असावा अशी अटकळ मी बांधली होती. हॉस्पिटलमध्ये परत आल्यानंतर त्याने पत्नीला फोन लावून “माका तुका” केले तेंव्हा माझा अंदाज खरा ठरला. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये मी त्याच्याशी बोलू शकत होतो, पण यातल्या कोणत्याही भाषेत त्याने सांगितलेल्या गोष्टी मला समजत तरी नव्हत्या किंवा माझा त्यांचेवर विश्वास तरी बसत नव्हता. त्यामुळे फारसा संवाद साधता आला नाही. एक अजब व्यक्ती भेटली एवढीच त्याची मनात नोंद झाली. त्याला व्हीलचेअरमधून नेले आणले असले तरी तसा तो बरा दिसत होता आणि त्याच्यावर कसलेच उपचार चाललेले दिसत नव्हते. बहुधा तपासण्या करवून घेण्यासाठी त्याला अॅड्मिट केले असावे. त्या झाल्यावर आणि त्यावरून त्याच्या आजाराचे निदान झाल्यावर त्याला घरी पाठवले.

या व्यक्तीच्या जागेवर आलेला माणूस मात्र वल्ली निघाला. जेवढा वेळ तो जागा असेल, तेवढा वेळ त्याच्या तोंडाची टकळी चाललेली असायची. त्यातून तो केंव्हा केंव्हा मला काहीतरी सांगायचा आणि केंव्हा केंव्हा स्वतःशीच पुटपुटायचा. दोन तीन वेळा नर्सने येऊन त्याला चुप रहायला सांगितले, पण बोलणे बंद झाले की तो कण्हायला लागायचा. त्याच्या विव्हळण्यापेक्षा बोलणे कानाला जरा बरे वाटायचे. निदान ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडता येत असे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला त्यालाही काही वाटत नव्हते. त्यामुळे न ऐकलेले वाक्य काही वेळानंतर पुन्हा कानावर पडत असे आणि वाटले तर त्या वेळी ते समजून घेता येत असे. या वल्लीवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल इतका त्याच्याबद्दलचा मालमसाला मला त्याच्याकडूनच समजला.

हॉस्पिटलमध्ये मला काही काम करण्याचा प्रश्नच नव्हता. आयव्हीला जोडलेल्या नळीने मी कॉटशी जखडलेला गेलो होतो. गरजेनुसार नर्सने ती तात्पुरती सोडून मोकळीक दिली तरच मी आजूबाजूला थोडा फिरू शकत होतो. त्यामुळे वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या पत्नीकडे जाऊन पाहणेसुध्दा मला शक्य नव्हते. सुदैवाने दोघांनीही आपापले मोबाईल सोबत नेले असल्यामुळे त्यावरून थोडा संवाद करता येत होता. उरलेला वेळ काय करायचे हा एक प्रश्न होता. ब्लॉगवर मी ज्या प्रकारचे लेखन नेहमी करत असतो, त्यासाठी मला काही संदर्भ पहावे लागतात, थोडे उत्खनन करावे लागते. हॉस्पिटलमध्ये त्याची सोय नव्हती. त्यामुळे पूर्णपणे काल्पनिक असे काय रचता येईल याचा विचार करता करता मनात एक कल्पना सुचली. त्यावर काम करतांना मजा वाटू लागली.

हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी टीव्हीवरील एक मालिका मी अधून मधून पहात असे. त्यातली केंद्रीय कल्पना, कथासूत्र आणि पात्रे ओळखीची झाली होती. शेवटचा जो भाग मी पाहिला होता त्यानंतर त्यात काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. पण यापुढे ही मालिका जास्त ताणून धरण्यापेक्षा तिला आता संपवून टाकण्याची वेळ आली आहे असे माझे मत होते. लेखकाच्या जागी मी असलो तर ती कशा रीतीने संपवता येईल आणि त्याआधी तिचे अस्ताव्यस्त पसरलेले धागे कसे जुळवून आणता येतील याचा विचार करून मी त्यानुसार काही नाट्यमय घटना रचल्या आणि मनातल्या मनात संवाद रचायला लागलो. त्यात एक सूत्रबध्दता असल्यामुळे ते माझ्या लक्षात राहतील असे वाटले. घरी परतल्यानंतर ते टंकून सहा भागात ब्लॉगवर चढवले देखील.

चार दिवसात माझ्या प्रकृतीला आराम पडला. आयव्हीमधून (शिरेतून) औषध देण्याची गरज उरली नाही, तसेच कोणी सेवाशुश्रुषा करण्याची जरूरी उरली नाही. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिपोर्ट आले होते. आता हॉस्पिटलात राहण्याची आवश्यकता उरली नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. पण घर म्हणजे चार भिंतीच होत्या कारण पत्नीचा हॉस्पिटलमधला मुक्काम लांबला होता. संपर्कासाठी टेलीफोन, मनोरंजनासाठी टेलीव्हिजन आणि बहुउपयोगी संगणक हे साथीदार साथीला होते. तसे शेजारी येऊन चौकशी करून गेले. त्यातल्या एकाने नाश्त्यासाठी आणि दुसऱ्याने जेवणासाठी आग्रह केला. नात्यातला एक मुलगा ऑफीस सुटल्यानंतर झोपायला आला. अशा रीतीने मी तसा माणसात होतो. पण अजून खडखडीत बरा झालो नसल्यामुळे नेहमीचे रूटीन सुरू करू शकत नव्हतो. तान्ह्या मुलाप्रमाणे आलटून पालटून थोडा वेळ झोपणे आणि थोडा वेळ जागणे चालले होते. वेळ घालवण्याची साधने हाताशी होतीच.

आमचे नेहमीचे हॉस्पिटल घरापासून दहा किलोमीटर दूर आहे. अद्याप पत्नी तिथे होती. दोन तीन दिवसांनंतर काही वेगळ्या तपासण्या करण्यासाठी तिला चाळीस किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. माझ्या अंगात पुरेसे त्राण आले नसतांनासुध्दा उसने अवसान आणून तिला भेटायला आणि तिची प्रगती पहाण्यासाठी जावे लागत होतेच, पण स्वतःला थकवा येऊ नये यासाठी विशेष काळजी घेणेही आवश्यक होते. जराशी तारेवरची कसरत होत होती. पहिल्या दिवशी मलाच आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे एका शेजाऱ्याला सोबत नेले. दुसऱ्या दिवशी मला गरज वाटत नव्हती तरी पत्नीच्या आग्रहावरून त्याला आणले. त्यानंतर वेगळ्या आप्तांना ही ड्यूटी लावून दिली.

आजूबाजूला नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात चाललेला दिसत होता. रस्त्यात जागोजागी मांडव घातलेले होते, त्यावर रंगीबेरंगी सजावट केली होती. संध्याकाळी परततांना उशीर झाला तर विजेची आकर्षक रोषणाई दिसत होती. आतापर्यंत बहुतेक दरवर्षी मी सुध्दा त्या उत्सवात हौसेने भाग घेत आलो होतो. यंदा पहिल्यांदाच या गोष्टी अलिप्तपणे पहात होतो. त्यामुळे वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्याबद्दल तक्रार करत होतो. या वर्षी मराठी, गुजराथी, बंगाली, उत्तर भारतीय यांतल्या कुठल्याच नवरात्राच्या मांडवात जाऊन दर्शनसुध्दा घेतले नाही.

अशा प्रकारे नवरात्र संपूनही गेले. दसऱ्याच्या दिवशी पत्नीला डिस्चार्ज मिळाला. त्या दिवशी तिला पहायला हॉस्पिटलात जाण्याची मला गरज नव्हती. विजयादशमीला सीमोल्लंघन करून गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्याचा रिवाज आहे. त्या वर्षी मी घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकले नाही. माझ्या पत्नीने उलट दिशेने सीमोल्लंघन करून गृहप्रवेश केला. असे हे त्या वर्षीचे एक वेगळे नवरात्र.
———————————–

नव(ल)रात्री – भाग २

नव(ल)रात्री १

त्या वर्षीच्या नवरात्रात ज्या आप्तांच्याकडे जाण्याचा आमचा बेत होता त्यांचे पूर्वज पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचे सरदार होते. बाळाजी विश्वनाथांप्रमाणे ते कोकणातून पुण्याला आले होते आणि शिंदे होळकरांच्या सैन्यासोबत दिग्विजयासाठी उत्तर हिंदुस्थानात गेले होते. तिकडल्या मोहिमांमध्ये त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या मोबदल्यात त्यांना त्या भागात (सध्याच्या मध्यप्रदेशात) काही जहागिरी, वतने वगैरे मिळाली होती. पुढे शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि मोठ्या मराठा सरदारांनी ब्रिटीशांबरोबर तह केले आणि ते सारे ब्रिटीशांचे मांडलीक राजे किंवा बडे संस्थानिक झाले. त्यांच्या दरबारातल्या दुसऱ्या फळीमधल्या सरदार मंडळींना त्यांच्याइतका बहुमान मिळाला नव्हता तरी त्यांच्या जहागिरी, वतने, जमीनी, वाडे वगैरे मालमत्ता शाबूत राहिली होती. त्याशिवाय त्यांना ब्रिटीश सरकारकडून सालाना तनखा मिळत असे. तसेच स्थानिक समाजामध्ये ते सरदार या सन्मानपूर्वक उपाधीने (सरदारजी नव्हे) ओळखले जात असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात सामाजिक समतेचे वारे वाहू लागले आणि अनुपस्थित भूमीधारकांना आपल्या जमीनीवर ताबा ठेवणे कठीण होत गेले. काळाची गरज पाहून या कुटुंबातील लोकांनी इतस्ततः असलेली मालमत्ता विकून टाकली आणि बऱ्हाणपूरचा वाडा, टिमरनी येथील गढी आणि शेतजमीनी यांवर आपले लक्ष केंद्रित केले.

त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून बऱ्हाणपूरच्या वाड्यात अंबाबाईच्या मूर्तीची उपासना केली जाते. अंबेजोगाई येथील योगेश्वरीमातेचा या मूर्तीमध्ये वास आहे अशी या कुटुंबातील आबालवृध्द सर्वांची नितांत श्रध्दा आहे. घरातील कोणत्याही महत्वाच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेतला जातो तसेच कार्यसिध्दी झाल्यावर तिचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कारणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळीसुध्दा हा प्रघात पाळत आली आहेत. तसेच लग्न करून सासरी नांदत असलेल्या माहेरवाशिणीसुध्दा काही प्रमाणात तो पाळतात. हे सारे अत्यंत भक्तीभावाने होत असल्यामुळे देवीच्या सभोवताली असलेले वातावरण पूर्णपणे मंगलमय वाटते. त्यात दांभिकतेचा किंवा व्यापारीकरणाचा अंशसुध्दा आलेला नाही.

त्यांच्या बऱ्हाणपूरच्या वाड्यात योगेश्वरी देवीसाठी प्रशस्त असे देवघर बांधलेले होते. त्याशिवाय नवरात्राच्या उत्सवासाठी एक मोठा दिवाणखाना होता. सुरेख नक्षीकाम केलेले खांब आणि कमानी, कडीपाटाच्या छपराला टांगलेल्या हंड्या झुंबरे यांनी तो छान सजवलेला होता. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना या दिवाणखान्यात केली जात असे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत तिचा उत्सव तिथे चालत असे. रोज पहाटेच्या वेळी देवीला जाग आणण्यासाठी ताशा सनई नगाऱ्याचा मंगल नाद करण्यापासून त्याची सुरुवात होत असे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर देवीची साग्रसंगीत शोडषोपचार पूजा केली जात असे. हा विधी चांगला दोन अडीच तास चालायचा. देवीला शोडष पक्वांन्नांचा नैवेद्य दाखवला जाई. त्यानंतर जेवणावळी सुरू होत आणि दुपार टळून जाईपर्यंत त्या चालत असत. नवरात्रीच्या उत्सवासाठी कुटुंबातील एकूण एक लोक आणि अनेक जवळचे आप्त या वेळी तिथे आवर्जून येत असत. त्यामुळे घराला एकाद्या लग्नघराचे स्वरूप येत असे.

नवलरात्री २

कालांतराने या कुटुंबाच्या बऱ्हाणपूरच्या शाखेतल्या पुढील पिढीमधील मुलांनी बऱ्हाणपूरहून पुण्याला स्थलांतर केले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा करायला तिथे कोणीच उरले नाही. तेंव्हा सर्वानुमते अंबाबाईच्या मूर्तीला बऱ्हाणपूरहून टिमरनीला नेण्यात आले. तिथल्या वाड्यामधल्या बैठकीच्या खोलीचे रूपांतर देवघरात करण्यात येऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवघरात केली गेली. तेंव्हापासून नवरात्रीचा उत्सव टिमरनीच्या वाड्यात साजरा केला जाऊ लागला. पूर्वीपासून परंपरागत पध्दतीने चालत आलेला हा उत्सव अजूनही जवळजवळ तशाच रूपात साजरा केला जात आहे. रोज सकाळी मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा, त्यानंतर सुग्रास अन्नाचा नैवेद्य, जेवणाच्या लांबलचक पंगती, जेवतांना सर्वांनी पाळीपाळीने श्लोक म्हणणे, संध्याकाळ झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी देवीसमोर बसून तिची अनेकविध स्तोत्रे म्हणणे, बराच वेळ चालणारी आरती, रात्रीची जेवणे झाल्यानंतर पुन्हा भजनांच्या गायनाने संगीतसेवा वगैरेमुळे दहा दिवस घर देवीमय झालेले असते आणि एक प्रकारच्या चैतन्याने भारलेले असते. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून महालक्ष्मीची प्रतिमा तयार करून तिची वेगळी पूजा केली जाते आणि घागर फुंकण्याचा विधी केला जातो.

पूर्वीच्या काळात रूढ असलेल्या सोवळेओवळे वगैरेच्या चालीरीती आता कालबाह्य झाल्या असल्यामुळे सामान्यपणे विस्मृतीत गेल्या आहेत. शहरात वाढलेल्या मुलांना त्यांचा गंधही नसतो. पण अजूनही नवरात्राच्या काळात मात्र या घरात त्या कटाक्षाने पाळल्या जातात. पूजाअर्चा करण्यासाठी देवघरात प्रवेश करणाऱ्या पुरुषांसाठी रेशमाचा कद आणि महिलांसाठी नऊवारी लुगडे, लहान मुलींसाठी परकर पोलके हा ड्रेसकोड अजूनही शक्यतोंवर पाळला जातो. नव्या पिढीतली मुले मुली त्यात जास्तच हौसेने सहभागी होतात. सकाळी उठून लवकर स्नान करणे वगैरे मात्र त्यांना समजावून सांगावे लागते.

यापूर्वीही काही वेळा मी या उत्सवात सहभागी झालो होतो. पाटरांगोळी केलेल्या भोजनाच्या पंगतीमध्ये केळीच्या पानात आग्रह करकरून वाढलेले मनसोक्त सुग्रास जेवण केले होते, जेवण चालू असतांना इतरांबरोबर नवा संस्कृत श्लोक (मुद्दाम पाठ करून) मोठ्याने म्हंटला होता. स्तोत्रपठण, आरत्या, मंत्रपुष्प, भजन आदींमध्ये आठवेल तेवढा आणि जमेल तेवढा सहभाग उत्साहाने घेतला होता. या सर्वांमध्ये मिळणारा वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगला होता. नोकरीत असतांना जास्त रजा मिळणे शक्य नसल्यामुळे नवरात्रोत्सवातल्या एक दोन दिवसाकरताच भोज्ज्याला शिवून आल्याप्रमाणे जाणे होत होते. त्या वर्षी चांगला आठवडाभराचा कार्यक्रम योजला होता, पण योग नव्हता. त्यानंतर आम्ही एकदा ते जुळवून आणले आणि अंबामातेच्या कृपेने ते शक्य झाले.
—————————–

नव(ल)रात्री – भाग ३

newJercyCombo

त्याच्या दोन वर्षे आधी म्हणजे २००८ साली सर्वपित्री अमावास्येच्या रात्री आम्ही दोघांनी मुंबईहून विमानाने प्रस्थान केले आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नेवार्क विमानतळावर उतरून अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आमच्या दृष्टीने एका अर्थाने हे सीमोल्लंघनच होते. नवरात्र संपून दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्याऐवजी आम्ही ते नवरात्राच्या सुरुवातीलाच केले होते. आमचे दुसरे पाऊल अजून अधांतरीच होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन ऑफीसरने परवानगी दिल्यानंतर आम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार होता. काँटिनेंटल विमान कंपनीच आम्हाला पुढे अॅटलांटाला नेणार होती, पण आमचे सामानसुमान आधीपासूनच पुढे पाठवण्यात अर्थ नव्हता. आम्ही नेवार्कलाच ते उतरवून घ्यावे आणि इमिग्रेशन क्लीअरन्स मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीकडे सुपूर्द करावे अशी आज्ञा झाली. इतर प्रवाशांबरोबर आम्ही बॅगेज क्लीअरन्सच्या विभागात जाऊन पोचलो.

भारतातल्या आणि युरोपातल्या विमानतळांवर मी जे बॅगेजचे कन्व्हेयर बेल्ट पाहिले होते त्यांचे एक शेपूट बाहेर गेलेले असायचे आणि त्यावर व्यवस्थित मांडून ठेवल्याप्रमाणे आमचे सामान आत येतांना दिसायचे. नेवार्कला मात्र वेगळेच दृष्य पहायला मिळाले. एका विशाल हॉलमध्ये अनेक लहान लहान वर्तुळाकार बेल्ट गोल गोल फिरत होते. कोणत्या विमानातले बॅगेज कोणत्या बेल्टवर येणार हे दाखवणारे मोठे तक्ते होते. त्यात आमचा नंबर पाहून त्या वर्तुळापाशी गेलो. त्याच्या मधोमध एक घसरगुंडी होती आणि डोक्यावर असलेल्या फॉल्स सीलिंगच्या आडून सामान येऊन छपरामध्ये असलेल्या एका पोकळीतून बदाबदा त्या घसरगुंडीवर पडून ते बेल्टवर येत होते. त्यात अनेक बॅगा उलटसुलट होत होत्या. आपले सामान दुरूनच पटकन ओळखू येण्यासाठी आम्ही बॅगांच्या वरच्या अंगाला मोठमोठी लेबले चिकटवली होती, पण ती काही दिसत नव्हती. काही लोकांना आपल्या बॅगा अचूक ओळखता येत होत्या, त्यांनी त्या पटकन काढून घेतल्या. इतर लोक अंदाजाने एक बॅग उचलून घेत होते आणि ती त्यांची नसल्यास तिला सुलट करून पुन्हा बेल्टवर ठेवत होते. या सस्पेन्समध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला आमचे सर्व सामान मिळाले. ते नसते मिळाले तर काय करायचे हा एक प्रश्नच होता, कारण आम्हाला तर लगेच पुढे अॅटलांटाला जायचे होते, बॅगांची वाट पहात नेवार्कला थांबायची कसली सोयच नव्हती. विमानातून आपले सामान न येण्याचा अनुभव आम्ही लीड्सला जातांना घेतला होता, पण त्यावेळी आम्ही सामानाविनाच निदान घरी जाऊन पोचलो होतो. त्यावेळी अर्ध्या वाटेत थांबायची गरज पडली नव्हती.

आमचे सामान गोळा करून आम्ही इमिग्रेशन काउंटरकडे गेलो. त्या ठिकाणी बरीच मोठी रांग होती, तिच्यात जाऊन उभे राहिलो. आमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही स्वतः फॉर्म भरून, तासन् तास रांगांमध्ये उभे राहून आणि आवश्यक असलेली सारी कागदपत्रे दाखवून मिळवले होते आणि पुन्हा पुन्हा त्यातला तपशील तपासून घेतला होता. त्यामुळे त्यात कसलीही उणीव निघण्याची भीती नव्हती. गरज पडली तर दाखवण्यासाठी ते सारे दस्तावेज आम्ही आपल्या हँडबॅगेत ठेवले होते. आम्ही केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वांना देणे असलेले सर्व कर वेळेवर भरले होते, आमचे वाईट चिंतणारा कोणी आमच्याविरुध्द कागाळी करेल अशी शक्यता नव्हती. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नव्हते, पण एक दोन ऐकीव गोष्टींमुळे मनात थोडीशी धाकधूक वाटत होती.

माझ्या एका मित्राच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीकडे गोड बोतमी होती. या प्रसंगी तिला धीर देण्यासाठी, तिची आणि होणाऱ्या बाळाची नीट काळजी घेण्यासाठी तिच्याकडे जायला तिची आई आतुर झाली होती. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीने माहेरी जायचे अशी आपल्याकडली पूर्वापारची पध्दत आहे. आजकालच्या जगात काही कारणामुळे ते शक्य नसेल तर मुलीच्या आईने काही दिवस तिच्याकडे जाऊन राहणेही आता रूढ झाले आहे. आपल्या मुलीकडे अमेरिकेत जाण्यासाठी केवळ पुरेसेच नाही तर चांगले भरभक्कम कारण आपल्याकडे आहे अशी त्या माउलीची समजूत होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. दुसरे एक गृहस्थ मुंबईतल्या धकाधुकीमुळे हैराण झाले होते. त्यांची म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा, अमेरिकेत ऐषोआरामात रहात होता. कांही दिवस त्याच्या आधाराने रहावे, सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्याच्या निवासस्थानाचा अनुभव आणि उपभोग घ्यावा अशा विचाराने ते अमेरिकेला जायला निघाले. त्यांनाही जाता आले नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या घरी आम्ही सुखी आहोत, चार दिवस अमेरिकेतली नवलाई पाहून परत जाणार आहोत असे आम्ही मुलाखतीत सांगितले होते. तेच पुन्हा सांगायचे होते, फक्त त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव करत होतो.

आमचा नंबर ज्या काउंटरवर आला त्या जागी कोणी खडूस तिरसिंगराव माणूसघाणे नव्हता. एका सुहास्यवदना ललनेने गोड हंसून आमचे स्वागत केले. “अमेरिकेत पहिल्यांदाच आला आहात ना?” असे विचारून “जा, मजा करा (एंजॉय युवरसेल्फ)” असे म्हणत एक चिटोरे आमच्या पासपोर्टमध्ये ठेवले आणि ते जपून ठेवायला सांगितले. आम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकतो ते त्यावर लिहिले होते आणि त्यापूर्वी अमेरिकेहून परत जातांना विमानतळावर ते परत द्यायचे होते. घटस्थापनेच्या दिवशी अंबाबाईनेच आपल्याला या रूपात दर्शन दिले अशी मनात कल्पना करून आणि तिचे आभार मानत आम्ही पुढे सरकलो.

. . . . . . . . . . . .

नव(ल)रात्री – भाग ४

LibertyCombo

परदेशभ्रमणाचा थोडा अनुभव माझ्या गाठीशी होता. पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला कोणत्या गेटवर विमान मिळणार आहे हे विमानतळावरील फलकावर पाहून घेतले आणि कॉरीडॉरमधील पाट्या वाचून त्यात दाखवलेल्या खुणांनुसार डाव्या उजव्या बाजूला वळत आणि एस्केलेटर्सने वर खाली चढत उतरत आमचे गेट गाठले. विमान गेटवर लागायला बराच अवकाश होता. मुंबईतल्या ऑक्टोबर हीटमधून थेट अमेरिकेतल्या फॉल सीझनमध्ये आल्याने तपमानात एकदम चांगला पंचवीस तीस अंशांचा फरक पडला होता. त्याने सर्वांग गारठून गेले होते. थंडीचा विचार करून गरम कपड्यांची गाठोडी आणली होती आणि एक एक करून ते कपडे अंगावर चढवलेही होते. तरीही नाकातोंडामधून आत जाणारी थंड हवा तिचा हिसका दाखवत होती. त्यावर इलाज म्हणून गरम गरम चहा घेतला. आधी थोडी चंव घेऊन पहावी या विचाराने घेतलेला तिथला स्मॉल पेला, आमच्या नेहमीच्या कपाच्या दुप्पट आकाराचा होता. तो घशात रिचवल्यानंतर अंगात पुरेशी ऊब आली. ठरल्यावेळी आमचे विमान आले आणि त्यात बसून आम्ही अॅटलांटाला जाऊन पोचलो.

हे विमान आकाराने लहानसे होते आणि अॅटलांटाला थोडा वेळ थांबून पुढे जाणार होते, तरीही ते अर्धवटच भरले होते. त्यातलेही अर्ध्याहून अधिक उतारू अॅटलांटाला न उतरता पुढे चालले गेले. आमच्यासोबत जेमतेम वीस पंचवीस लोक तिथे उतरले असतील. तिकडे विमानतळावर अनेक प्रकारची दुकाने असलेला बाजारच असतो आणि अनेक लोक त्यातून नेहमीच फिरत असतात. आम्हीसुद्धा स्टॉलवरून काही खरेदी करण्यासाठी एका जागी दोन तीन मिनिटे थांबलो तेवढ्यात आमच्याबरोबर उतरलेले इतर लोक इकडे तिकडे पांगले आणि कुठे अदृष्य झाले ते आम्हाला कळलेही नाही. आमचे सामान घेण्यासाठी बॅगेजची पाटी वाचून त्यात दाखवलेल्या बाणाच्या दिशेने आम्ही चालत राहिलो. तो एक लांबच लांब कॉरीडॉर होता आणि चालण्याचे कष्ट टाळायचे असल्यास सरकत्या पट्ट्यावर उभे राहून पुढे जायची सोय होती. पाचसहा मिनिटे पुढे जाऊनसुध्दा आमचे ठिकाण येण्याची लक्षणे दिसत नव्हती. कोणाला विचारावे म्हंटले तर आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही दिसत नव्हते. आम्हा दोघांच्या आजूबाजूला, मागेपुढे कोणीही त्या मार्गाने जात नव्हते. हे विचित्र वाटत असले तरी आम्ही कांहीच करू शकत नव्हतो. पुढे पुढे चालत राहिल्यानंतर एक ठिकाण आले. त्या ठिकाणी दुसरे लँडिंग गेट होते. त्या जागी थोडी माणसे नजरेला पडली. “सामान घेऊन विमानतळाबाहेर पडण्यासाठी ट्रेनने जायचे असते.” असे त्यांनी सांगितले. “ट्रेनचे स्टेशन कुठे आहे?” हे विचारल्यावर त्यांनी बोटाने एक जागा दाखवली.

लिफ्टच्या दरवाजासारखे दिसणारे असे काहीतरी तिथे होते आणि त्याच्या समोर चारपाच उतारू सामान घेऊन उभे होते. दोन तीन मिनिटातच आतल्या बाजूने हलकासा खडखडाट ऐकू आला आणि तो दरवाजा उघडला. पलीकडे एक अगदी पिटुकला प्लॅटफॉर्म होता आणि आगगाडीचा एकच डबा उभा होता. पटापट सगळे जण त्यात चढले, दरवाजे बंद झाले आणि त्या डब्याने वेग घेतला. हे लिफ्टमध्ये चढल्यासारखेच वाटत होते, फक्त ती उभ्या रेषेत वरखाली न करता आडव्या रेषेत धांवत होती. अॅटलांटाचा विमानतळ इतका विस्तीर्ण आहे की त्याचे ए, बी, सी, डी वगैरे विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांना बाहेरून जाण्यायेण्याच्या वाटेशी जोडणारी शटल सर्व्हिस आहे. इथे असे काही असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. सामान उतरवून घेण्याच्या जागी जाऊन पोचलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेले अजय आणि किरणराव पट्ट्याजवळच उभे होते आणि आमच्या बॅगाही पट्ट्यावर फिरत होत्या. आपले सामान उतरवून घेतल्यावर त्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसलो. कोणता माणूस कोणते सामान घेऊन बाहेर जात आहे याची चौकशी करणारा कोणीच इसम तिथल्या दरवाज्यावर नव्हता.

अॅटलांटाचा विमानतळ शहराच्या दक्षिण टोकाला आहे, तर अजय रहात असलेले अल्फारेटा गाव अॅटलांटाच्या उत्तरेला पंचवीस तीस मैलांवर आहे. आधीचे निदान पंधरावीस मैलतरी आम्ही अॅटलांटा शहराच्या भरवस्तीमधून जात होतो. पण वाटेत एकही चौक लागला नाही की ट्रॅफिक सिग्नल नाही. कुठे जमीनीखालून तर कुठे जमीनीवरून सरळसोट रस्त्यावरून आमची कार सुसाट वेगाने धांवत होती. वाटेत जागोजागी उजव्या बाजूला फाटे फुटले होते. शहरातल्या आपल्या इच्छित स्थळी जाणारे लोक आधीपासून आपली गाडी उजवीकडील लेनमध्ये आणत होते आणि वळण घेऊन हमरस्त्याच्या बाहेर पडत होते. हा हमरस्ता अॅटलांटापासून पन्नास साठ मैल दूर गेल्यानंतर एका राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वाटेत लागणाऱ्या उपनगरांना आणि लहान शहरांना जोडणारे अनेक एक्झिट्स होते. नऊ की दहा नंबराच्या एक्झिटमधून आम्ही एक्झिट केले आणि अल्फारेटा शहरातल्या अजयच्या घराकडे गेलो. या गावातल्या रस्त्यांवर मात्र जागोजागी ट्रॅफिक सिग्नल होते आणि रस्त्यात दुसरे वाहन असो वा नसो, लाल दिवा दिसताच लोक आपली गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट पहात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे नवनवे अनुभव घेत आम्ही घरी जाऊन पोचलो.

जेट लॅगचे निमित्य करून दोन दिवस झोपून काढले आणि चौथ्या दिवशी आम्ही पर्यटनासाठी निघालो. आम्ही उभयता आणि किरणराव व विद्याताई अशा चार लोकांचे नायगराचा धबधबा, वॉशिंग्टन डीसी आणि इतर काही ठिकाणे पहाण्यासाठी तीन दिवसांच्या एका लघुसहलीचे रिझर्वेशन केलेले होते. ती न्यूयॉर्कहून सुरू होऊन तिथेच संपणार होती. आपापल्या गांवांपासून न्यूयॉर्कला जाणेयेणे सर्व पर्यटकांनी आपल्या आपण करायचे होते. आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला एकदा आल्याने आता आम्ही त्या मार्गावरले तज्ज्ञ झालो होतो. नेहमीची सरावाची वाट असावी अशा आविर्भावात आम्ही अॅटलांटाहून निघालो आणि नेवार्कला सुखरूप जाऊन पोचलो. तो शनिवारचा दिवस असल्याने सौरभला सुटी होती. आम्हाला नेण्यासाठी विमानतळावर तो आला होताच. तिथल्या महामार्गावरून तो आम्हाला पर्सीपेन्नी या त्याच्या गावाला घेऊन गेला. खूप रुंद आणि सरळसोट रस्ते, त्यावरून कुठेही न थांबणारी वाहतुकीची रांग, एक्झिटवरून बाहेर पडणे वगैरे गोष्टी आता ओळखीच्या झाल्या होत्या.

रविवारी आम्ही सगळे मिळून बसने न्यूयॉर्कला गेलो. अर्थातच सर्वात आधी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वंदे।” हे स्फूर्तीदायक गीत लहानपणापासून म्हणत आलो असलो तरी स्वतंत्रता ही एक मनाला जाणवणारी आणि बुध्दीला आकलन होणारी संकल्पना होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहून ती दृष्य स्वरूपात नजरेसमोर आली. स्वातंत्र्यमातेच्या या मूर्तीचा भव्य आकार, तिची मुद्रा, तिच्या चेहेऱ्यावर असलेले भाव या सर्वांमधून तिचे स्वरूप प्रकट होत होते. आदिशक्तीचे हे आगळे रूपसुध्दा मला एका नवरात्रातच पहायला मिळाले.

त्यानंतर तीन दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून दसरा येईपर्यंत आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला परत आलो. या सफरीबद्दल मी पूर्वीच विस्तारपूर्वक लिहिलेले आहे. रोममध्ये असतांना रोमन व्हा अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. थोड्या वेगळ्या अर्थाने गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास असे हिंदीत म्हणतात. आम्ही मात्र अमेरिकेत गेल्यानंतरसुध्दा घरात मराठीच राहिलो होतो, पण चिनी लोकांनी चालवलेल्या अमेरिकन यात्रा कंपनीबरोबर जातांना समझोता करावाच लागला. ज्या हॉटेलांमध्ये आमची झोपायची व्यवस्था झाली होती त्यातल्या खोल्या इतर सुखसोयींनी युक्त असल्या तरी त्यांमध्ये आंघोळीची सोय नसायची. विमानात असते तशा प्रकारचे एक छोटेसे टॉयलेट रूमला जोडलेले असले तरी त्यात टब किंवा शॉवरसाठी जागाच नसायची. पहाटेच्या वेळी तपमान शून्याच्या जवळपास असायचे आणि बदलण्यासाठीसुध्दा अंगावरचे कपडे काढणे जिवावर येत असे. त्यामुळे बाथरूमचे नसणे आमच्या पथ्यावरच पडत असे. त्या वर्षीच्या नवरात्रातले दोन दिवस पारोसेच राहिलो. जेवणासाठी आमची बस एकाद्या केएफसी किंवा मॅकडीच्या रेस्तराँसमोर उभी रहात असे. आपल्याकडे मिळतात तसले उकडलेल्या बटाट्याचे व्हेजी बर्गर तिथे नसायचे. नवरात्र चालले असल्याची जाणीव बाजूला ठेवून नाइलाजाने थोडा मांसाहार करणे भाग पडत होते. गोडबोले की आठवले नावाचे एक तरुण जोडपे आमच्याबरोबर सहलीला आले होते. त्यांनी काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची मोठमोठी पुडकी आणि खूप सफरचंदे आणली होती. शिवाय मिळतील तिथे केळी, संत्री, मोसंबी वगैरे ते घेत होते. ते मात्र शुध्द शाकाहारी राहिलेच, कदाचित त्यांना तीन दिवस उपवाससुध्दा घडला असेल. रक्तामधली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे वाढण्याच्या भीतीने आम्ही तसे करू शकत नव्हतो आणि ते कमी होण्याच्या भीतीने उपाशीही राहू शकत नव्हतो. त्यामुळे जो काही पापसंचय होत होता त्याला इलाज नव्हता. हे नव(ल)रात्र नेहमीपेक्षा खूपच आगळे वेगळे असल्यामुळे कायम लक्षात राहील.
. . . . . . . . .

गणेशोत्सवातली उणीव

मी सहसा ललित वाङमयाच्या  वाटेला जात नाही.  थोडीशी रुचिपालट  म्हणून  मागे एकदा लिहिलेली एक लघुकथा  यावेळी सादर करीत आहे.


 

प्रमोदचे लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या एकत्र कुटुंबात गेले होते. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून लहानपणीच करून घेतली होती.

शिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बिऱ्हाड थाटले आणि ते नवराबायको दोघे मिळून दरवर्षी मोठ्या हौसेने आणि भक्तीभावाने आपल्या घरात गणपती बसवायला लागले. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघेही प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत.

यथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते कुटुंब करत असे.

त्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने आपल्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे सगळे लोक त्यांच्याकडे येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत त्या उत्सवाच्या दिवसांमध्ये त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की त्या दोघांनी “आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या” असे म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनाशी झाली. गणेशोत्सव सुरू झाला की नेहमीचे आप्त स्वकीय औपचारिक बोलावण्याची वाट न पाहता आपणहून येऊ लागले.

गणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही दर्शनाला येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावी लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.

अशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्या प्रमाणेच उत्साहात साजरा होत होता.

पण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते.

अर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि तो पूर्णवेळ घरी रहायला लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती. प्रमिलाच्या तबेतीबद्दल चिंतेचे कारण नव्हते. त्यामुळे मुलांच्या हौसेसाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले.

कुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने गणेशोत्सवासाठी एक वेगळी वही उघडली आणि वेगवेगळ्या पानांवर पूजेचे सामान, सजावटीच्या वस्तू, खाद्यपेये वगैरे सर्व गोष्टींच्या तपशीलवार याद्या लिहून काढल्या. तसेच गणपती बसवायला रिकामी जागा करण्यासाठी घरात कोणते बदल करायचे, कोणते सामान कोठे हलवायचे, या कालावधीत काय काय करायचे, काय काय करायचे नाही वगैरे सगळ्या गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या.

त्यातल्या कांही त्याने स्वतः लिहिल्या, काही प्रमिलाने सांगितल्या आणि काही मुलांनी सुचवल्या. सर्वांनी मिळून उत्सवासाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे कांही लिहून काढले. वहीत पाहून त्याने सगळ्या वस्तू आणि पदार्थ बाजारातून आणलेच, शिवाय आयत्या वेळी समोर दिसल्या, आवडल्या, मुलांनी मागितल्या वगैरे कारणांनी चार जास्तच गोष्टी आणल्या.

दरवर्षी प्रमोदला गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी ऑफिसातून आल्यानंतर रात्री जागून गणपतीची जमेल तेवढी सजावट करावी लागत असे. त्या वर्षी दोन तीन दिवस आधीपासूनच एकत्र बसून त्यांनी सुंदर मखर तयार केले, त्याच्या आजूबाजूला छानशी सजावट केली. प्रमोदला हौसही होती आणि त्याच्या हातात कसबही होते. घरगुती गणेशोत्सवांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवण्याइतका चांगला देखावा त्याने उभा केला. त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले.

घरी येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फुलवाल्याला देऊन ठेवली.

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली.

यापूर्वीच्या वर्षापर्यंत त्याला रोज पहाटे लवकर उठून ऑफीसला जायच्या आधी घाईघाईने गणपतीची पूजा आटपून, त्याला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून ऑफिसची बस पकडायला धांवत जावे लागत असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी सावकाशपणे गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. “सर्वांना सुखी ठेव”, विशेषतः “प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे” यासाठी रोज प्रार्थना करत होता.

शेजारच्या स्वीटमार्टमधून रोज नवनवी पक्वान्ने आणून तो त्यांचा नैवेद्य दाखवत होता. त्यामुळे बाप्पांची आणि मुलांची चंगळ झाली. संध्याकाळची आरती वेळेवर होत होती. प्रमोदने भरपूर मिठाया आणि नमकीन पदार्थ आणि ते वाढून देण्यासाठी पेपर प्लेट्स आणि ग्लासेस आणून ठेवले होते. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला तत्परतेने प्लेटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेल्यामध्ये शीतपेय प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. प्रमिलाचा सहभाग नसल्यामुळे कसलेही न्यून राहू नये याची तो प्रयत्नपूर्वक काळजी घेत होता.

यापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे.

शिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर “खरंच तुला लाडू आवडत नाही का? थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते.” असे म्हणून प्रमिला आत जायची आणि “काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे.” असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर “तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ.” असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची.

पण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.

प्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चौकशी करून तिला “गेट वेल सून” म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.
“अगं तुला काय सांगू? मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय? देवा रे, मला माफ कर रे बाबा.”
“खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय्? तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना.”
“अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय? जे काही चाललंय तसं चाललंय्” …. वगैरे वगैरे
“खरंच गं, यंदा जरासुध्दा मजा नाही आली.” एकादी मैत्रिण उद्गारायची.

शेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा. तो मनातून थोडा खट्टू झाला. आपल्या प्रयत्नात न्यून राहून गेले याची खंत त्याच्या मनाला बोचत राहिली, तसेच नेमके काय कमी पडले याचे गूढ त्याला पडले.
“मी काही विसरतोय का? माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का?” असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर “मी कुठं असं म्हणतेय्?” असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे “या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली?” या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.

त्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय कामे करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता.

पहिल्या दिवशी दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या साड्यांचे गठ्ठे काढून ते पलंगावर ठेवले आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातल्या एकेक साडीचा प्रकार, पोत, किंमत, ती कोणत्या प्रसंगी आणि कुठल्या शहरातल्या कुठल्या दुकानातून विकत घेतली की भेट मिळाली वगैरेवर चर्चा करता करताच “ही साडी खूप तलम आहे तर ती जास्तच जाड आणि जड आहे, एकीचा रंग फारच फिका आहे तर दुसरीचा जरा भडकच आहे, एक आउट ऑफ फॅशन झाली आहे तर दुसरी एकदम मॉड आहे” वगैरे कारणांनी त्या बाद होत गेल्या.

एक साडी चांगली वाटली पण तिचा फॉल एका जागी उसवला होता, तर दुसरीच्या मॅचिंग ब्लाउजचा हूक तुटला होता. असे करून नाकारता नाकारता अखेर एक छानशी साडी प्रमिलाला पसंत पडली, त्याला अनुरूप ब्लाउज, पेटीकोट वगैरे सारे काही नीट होते. चांगली दिसणारी ती साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, “आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का?”
“कुठे बाहेर जाणार आहेस का?” एका मैत्रिणीने विचारले
“छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय्? आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना?”
“हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का?”
“ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना?”
“मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल.”
“इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्?”
“अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे.”
“पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेसले होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील?”
“हो ना? हिच्याकडे एकच साडी आहे की काय? असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या.”
या चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी आली.
“त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच.” असे प्रमोदला सांगून प्रमिलाने एक साडी निवडली आणि ती परिधान करून, त्या साडीला पिना, टाचण्या टोचून आणि वेगवेगळ्या कोनातून आरशात निरखून झाल्यानंतर ती पंधरा वीस मिनिटांनी बाहेर आली. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या होत्या. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नव्हते. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत त्याने कसाबसा वेळ काढून नेला.
ताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत गेली. मैत्रिणी तिची वाट पहातच होत्या. त्यात आणखी एका मैत्रिणीची भर पडली. त्यांच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे आणि त्याची कारणे सांगून झाल्यावर ती तिसरी मैत्रिण उद्गारली, “हे काय? आज ही साडी नेसणार आहेस तू?”
दोघी मैत्रिणी एकदम म्हणाल्या “कां ग? काय झालं?”
“अगं, मागच्या महिन्यात प्रतीक्षाच्या नणंदेच्या मंगळागौरीला तू हीच साडी नेसली नव्हतीस का?”
“हो का? त्या दिवशी मी मला माझ्या जावेकडे जावं लागलं होतं त्यामुळे मी आले नव्हते. पण तिचं म्हणणं बरोबर आहे, आज प्रतीक्षा इथे आली तर ती काय म्हणेल?”
त्यामुळे वेगळ्या साडीसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. आधी पाहिलेल्या बनारसी, कांजीवरम, पटोला, चंदेरी, आसाम सिल्क, इटालियन क्रेप, आणखी कुठली तरी जॉर्जेट वगैरे सगळ्यांची उजळणी झाली. शिवाय साडीच कशाला म्हणून निरनिराळे ड्रेसेसही पाहून झाले, प्रमिला एकटी असती तर तिने पंधरा मिनिटात निर्णय घेतला असता, दोघींना मिळून दुप्पट वेळ लागला असता. आता तीन डोकी जमल्यावर तिप्पट चौपट वेळ लागणे साहजीक होते.

“ही साडी नेसल्यावर मस्तच दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय?” मग प्रमिलाने कपाटातले खऱ्या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढले. त्यातला एक एक उघडून “अय्या कित्ती छान?”, “कुठून घेतलास गं?” “केवढ्याला पडला?” वगैरे त्या अलंकारांचं साग्रसंगीत रसग्रहण सुरू झाले. त्याला फाटा देत “यातलं मी आज काय काय घालू?” असे म्हणत प्रमिलाने मुद्द्याला हात घातला. तिलाही होत असलेल्या उशीराची थोडी जाणीव होत होती. त्यावर मग “हे छान दिसेल.”, “नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.”, “तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ.” वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी आल्याचे समजले.

ठीकठाक पोशाख करून प्रमोद केंव्हाच तयार होऊन बसला होता. त्याने पाहुण्यांचे स्वागत केले. “एक मिनिटात मी येतेय् हं.” असे आतूनच प्रमिलाने सांगितले. बाहेर आणखी दोन तीन कुटुंबे आली. प्रमोदने त्यांची आवभगत करून संभाषण चालू ठेवले. महागाई, पर्यावरण, ट्रॅफिक जॅम यासारख्या विषयावर पुरुषमंडळी थोडी टोलवाटोलवी करत होती आणि महिलावर्ग प्रमिलाची वाट पहात होता.
“हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत.” असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघाली.
“अगं, अशीच बाहेर जाणार? जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय?”
मग प्रमिलाने घाईघाईत तोंडावरून हात फिरवला, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून ती बाहेर आली.

तोपर्यंत आलेली कांही मंडळी तिची वाट पाहून “आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे” असे सांगून निघून गेली होती. प्रमिला फणफणत पुन्हा आत गेली. जरा साग्रसंगीत तयार होऊन झाल्यावर दहा बारा मिनिटांनी तीघी मैत्रिणींसह बाहेर आली. आता बाहेर चाललेल्या चर्चांची गाडी सांधे बदलून साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, ज्युवेलरी वगैरे स्टेशनांवरून धावू लागली. पुरुषमंडळी प्रसादाच्या प्लेटची वाट पहात आणि त्यातले पदार्थ चवीने खाण्यात गुंगली. प्रमिलाही त्यानंतर आलेल्या मंडळींना मात्र हसतमुखाने सामोरी गेली. त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करता करता ती अखेरीस दमून गेली. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात होता. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी गेली.

हे सगळे पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत झाला. “मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती? ती काय मिस् करत होती?” या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते. त्याला वर्षभर सतावणारे कोडे सुटले होते, त्याच्या मनातली खंत मिटली होती आणि त्यांच्या घरातल्या गणेशोत्सवात येऊन भेटणारी सर्व मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी किंवा त्यांना भेटायला येतात हा त्याचा गोड गैरसमज दूर झाला होता.

गणेश आणि लेखनकला

Ganapati vedavyasa

आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची लेखनसामुग्री मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असते आणि ज्याला कोणाला काही लिहायची इच्छा असेल तो ते लिहू शकतो. जगातील प्रत्येक माणसाने साक्षर व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. माझ्या लहानपणी म्हणजे साठ वर्षांपूर्वीसुद्धा कागद आणि शाई सहजपणे मिळत होती तरी ग्रामीण भागातली साक्षरता वीस टक्क्याहून कमी होती. ज्या काळात कागदच अस्तित्वात आला नव्हता तेंव्हा ती अगदीच नगण्य प्रमाणात असणार. काही महान सम्राट आणि बादशहासुध्दा निरक्षर होते असे म्हणतात. असे असले तरी अगदी प्राचीन काळापासून लेखन व वाचन चालत आले आहे. भाषांच्या विकासाबरोबरच किंवा पाठोपाठ त्या लिपीबध्द केल्या गेल्या. काही विद्वान मंडळी निरनिराळ्या भाषांमध्ये आणि निरनिराळ्या लिपींमध्ये लेखनाचे कार्य करीत असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे साधनांवरून अशा लेखनांचे पुरावे मिळतात. अशा लेखनामधून प्राचीन काळातले काही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे.

आजच्या काळातले बहुतेच लोक व्यक्तीगत स्वरूपाचे लेखन स्वतःच करतात, पण पत्रव्यवहार, रिपोर्ट्स किंवा रेकॉर्ड्स यासारख्या व्यावसायिक लेखनासाठी अनेक ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले लिपिक (स्टेनोटायपिस्ट) नेमलेले असतात. इतिहासकाळातसुध्दा मुनीम, चिटणिस वगैरेंकडून लेखनाचे काम करून घेतले जात असे. लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला नीट समजावा या दृष्टीने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला असणे आणि व्याकरणदृष्ट्या निर्दोष असणे आवश्यक असते. तशा पध्दतीने तो लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते तसेच सुलेखनकला अवगत असावी लागते. विद्या आणि कला या दोन्हीमध्ये प्राविण्य मिळवावे लागते.

बरेचसे वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे, ते कोणा माणसाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवापासून ते ज्ञान काही निवडक ऋषींना मिळाले आणि पुढे त्याचा प्रसार गुरूशिष्यपरंपरेनुसार मौखिक रीतीने होत गेला अशी काही लोकांची श्रध्दा असते. गुरूने सांगायचे आणि शिष्याने त्याचा वारंवार उच्चार करून ते तोंडपाठ करायचे अशी ज्ञानदानाची पध्दत प्राचीन काळात होती. अनेक सूक्ते, श्लोक, स्तोत्रे वगैरे अमक्या तमक्या ऋषीने विरचित केली असा उल्लेख त्यात केला जातो. सर्वाधिक प्रसिध्द आणि प्रचंड आकाराचे असे महाभारत हे महाकाव्य व्यासमहर्षींनी रचले आणि प्रत्यक्ष गणेशाने ते लिहिले असे समजले जाते. त्याचा विस्तार पाहता हे काव्य तोंडपाठ करणे जवळ जवळ अशक्यप्रायच वाटते. ते चिरकाळ टिकून रहावे यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवणे आवश्यक होते. ते लिहून काढणे हे सुध्दा सोपे काम नव्हते. ते कोण करू शकेल याचा विचार करता केवळ श्रीगणेशच हे करू शकेल असे दिसले.

त्यासाठी व्यासमहर्षींनी गणेशाची आराधना केली. त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले तेंव्हा महाभारताचे लेखनकार्य त्याने करावे असा वर व्यासांनी मागितला. हे काम करण्यासाठी गणेशाने एक अट घातली. ती म्हणजे व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर लगेच हे काम तिथेच थांबवून गणेशजी अंतर्धान होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. व्यासांनी ती अट मान्य केली आणि एका बैठकीत हजारो श्लोक रचून सांगितले आणि गणेशाने ते तत्परतेने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला. अशी कथा मी ऐकली होती. माझ्या वाचनात आलेल्या एका लेखात असे लिहिले होते की गणेशाने अशी अट घातली की व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर गणपती आपल्या मनाने काही तरी लिहीत जाईल. अशा प्रकारे त्याने लिहिलेला मजकूर इतका गूढ आहे की त्याचा अर्थ कोणालाच कधी नीटपणे समजला नाही.

सर्वात पहिला कुशल लेखनपटु गणेशच होता याबद्दल एकमत दिसते. कोणत्याही लेखनाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन, त्याची स्तुती करून ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे संपूर्ण होऊ द्यावे असा आशिर्वाद गणपतीकडे मागण्याचा प्रथा पडली आणि शतकानुशतके चालत राहिली. आधुनिक काळातील काही इतिहासकारांना असे वाटते की महाभारत हा ग्रंथ शतकानुशतके लिहिला जात होता. तसे असल्यास ते रचणारे सगळे विद्वान व्यास म्हणवले जात असतील आणि लिहिणारे विद्वान गणेशाचे अंश.

गणश

संस्कृत या देववाणीची देवनागरी ही लिपी गणेशानेच तयार केली असेही त्या लेखात लिहिले होते. या लिपीची रचना करतांना त्यात अशी खुबी केली आहे की ग, ण आणि श ही तीन अक्षरे इतर व्यंजनाहून वेगळी आहेत. फक्त या तीन व्यंजनांनाच एक स्वतंत्र अशी उभी रेघ आहे. ही तीन अक्षरेसुध्दा गणेश या नावात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने देवनागरी लिपीच्या मुळाक्षरांमध्ये येतात. आहे की नाही गंमत ?

अधिक मास

हा लेख मी २०१२ साली लिहिला होता. पण यामागील विज्ञान शेकडो वर्षे जुने आहे. या लेखात येणाऱ्या काही तारखा २०१२ सालच्या आहेत. या वर्षी म्हणजे २०२० साली पुन्हा अधिक महिना आला आहे. या वर्षी अधिक आश्विन आहे.

. . . . .. संपादन दि.१८-०९-२०२०

*****************

“या वर्षी दिवाळी नोव्हेंबर महिन्यात येते आहे, मागच्या वर्षी ती ऑक्टोबरमध्ये आली होती.”
“ती अशीच आलटून पालटून कधी ऑक्टोबरमध्ये तर कधी नोव्हेंबरमध्ये येत असते.” मी.
“ते तरी ठीक आहे, पण रमजानचा महिना तर काही वर्षांपूर्वी नवरात्रात आला होता, नंतर तो गणेशोत्सवाच्या वेळेला आला आणि या वर्षी आपल्या आषाढ महिन्याबरोबर येणार आहे.”
“आणि पुढच्या वर्षी तो कदाचित ज्येष्ठात येणार आहे.” मी.
“अलीकडे पावसाचा सुध्दा काहीच नेम राहिला नाही. यंदा सगळा आषाढ महिना कोरडा गेला आणि आता श्रावणात तो धो धो कोसळतोय्.”
“यंदा पावसाला थोडा उशीर झाला आहे, पण आपला श्रावण महिनाही बराच आधी आला आहे. पुढच्या वर्षी बघा आषाढातच पाऊस येईल, कदाचित ज्येष्ठातही सुरू होईल.” मी.
“तुम्ही असे कशावरून म्हणता?”
“कारण या वर्षातला पुढचा महिना अधिक महिना आहे, त्यामुळे पुढल्या वर्षी आषाढ महिना उशीरा येणार आहे.” मी.
“हा अधिक मास सुध्दा वाटेल तेंव्हा येत असतो. हा कधी अचानक उपटेल त्याचा काही नेमच नाही.”
“असं नाही बरं. तो केंव्हा आणि कशासाठी येतो याचे अत्यंत काटेकोर असे गणित आहे” मी.

अशा प्रकारचे संवाद होत असतात. वर आलेल्या तीन्ही विसंगतींचे कारण एकच आहे, ते म्हणजे आठवडाभरात येऊ घातलेला अधिक महिना. हा अधिक महिना का आणि कधी येतो हे समजून घेण्यासाठी महिना म्हणजे काय हे आधी पहायला लागेल. श्रावण, रमजान आणि ऑगस्ट हे महिने त्यांच्या आपापल्या कालगणनांच्या पध्दतींनुसार ठराविक वेळीच येत असतात, पण या पध्दती निरनिराळ्या असल्यामुळे त्यांच्यात फरक येतो.

आज आपल्या घरातल्या भिंतीवर, टेबलावर, डायरीमध्ये किंवा पाकिटात एकादे कॅलेंडर असते आणि आपण नेहमी त्यात महिना आणि तारीख पहात असतो. पण जेंव्हा छापखानेच नव्हते आणि लोकांच्याकडे अशी छापील कॅलेंडरे नसायची त्या काळातले लोक काय करत असतील? त्या काळातले लोक नोकरीसाठी रोज ऑफीसात किंवा कारखान्यात जात नव्हते, त्यांना महिन्याच्या एक तारखेला पगार मिळत नसे, त्यांना ठराविक तारखेच्या आत विजेचे बिल, टेलीफोनचे बिल, विम्याचे हप्ते भरावे लागत नव्हते, ते रेल्वेचे रिझर्व्हेशन करत नव्हते, सिनेमाची तिकीटे काढत नव्हते वगैरे वगैरे पाहता त्यांच्या रोजच्या जीवनात कॅलेंडरवाचून त्यांचे काहीच अडत नव्हते. पण माणसाला त्याच्या आयुष्यात पूर्वी होऊन गेलेल्या घटनांच्या आठवणी असतात, त्याही आधी काय घडून गेले हे जाणून घेण्याची इच्छा असते, पुढे येणाऱ्या काळासाठी त्यांच्या मनात काही योजना असतात, पुढे काय होणार आहे याबद्दल उत्सुकता असते. या गोष्टी क्रमानुसार कळण्यासाठी वेळेचा संदर्भ आवश्यक असतो. असा संदर्भ सर्वांना सहजपणे कळावा या उद्देशाने निसर्गातील घटनांच्या आधारे तो ठरवण्याच्या निरनिराळ्या पध्दती प्रचलित झाल्या.

सूर्यनारायण रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे ढोबळपणे म्हंटले जाते. पण सकाळी ज्या डोंगरामधून तो वर येतांना दिसतो तिथली त्याच्या उगवण्याची विवक्षित जागा आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी तो क्षितीजाला टेकतो ती त्याची मावळण्याची जागा या दोन्ही नेमक्या जागा रोज किंचित बदलत असतात. वर्षातले सहा महिने त्या हळूहळू उत्तरेकडे सरकत जातात आणि सहा महिने दक्षिणेकडे सरकत असतात. यामुळे बरोबर एका वर्षानंतर त्या नेमक्या मूळ ठिकाणी परत येतात. याशिवाय पहाटे सूर्योदयाच्या आधी आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर जे तारकासमूह आकाशात दिसतात त्यातसुध्दा रोज थोडा पण निश्चित स्वरूपाचा बदल होत असतो. या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून पूर्वीच्या काळातल्या पाश्चात्य विद्वानांनी प्रत्येकी सुमारे ३०-३१ दिवसांचे बारा महिने असलेले कॅलेडर तयार केले आणि त्यात लीप इयरचे नियम वगैरे सुधारणा करून ते अचूक बनवले. युरोपियन लोकांनी जगभर साम्राज्ये स्थापन करतांना हे कॅलेंडर आपल्यासोबत नेले आणि जगभरातील लोक त्याचा वापर करू लागले. आपणही रोजच्या जीवनात याचाच उपयोग करतो. हे कॅलेंडर सौर पध्दतीचे म्हणजेच पूर्णपणे सूर्याच्या निरीक्षणावर आधारलेले असते. या कॅलेंडरमधील वर्षाच्या किंवा त्यातील कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला आकाशात काहीच विशेष लक्षणीय असे घडत नाही. त्यामुळे हे थोडेसे अवैज्ञानिक वाटण्याची शक्यता आहे. पण सूर्याच्या उन्हातून पृथ्वीला जी ऊर्जा मिळते त्यानुसारच उन्हाळा, हिंवाळा वगैरे ऋतू ठरतात. त्यामुळे या कॅलेंडरनुसार पृथ्वीवरील ऋतूचक्र अचूकपणे चालत असते. वर्षामधील सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठी रात्र आणि बारा बारा तासांचे दोन समान दिवसरात्र या कॅलेंडरनुसार ठराविक तारखेलाच येतात. शिवाय वापरासाठी ते सोपे असल्यामुळे सर्वमान्य झाले आहे

पृथ्वीवरील ऋतूचक्र सौर कालगणनेनुसार चालतांना दिसते, पण सूर्याच्या बाबतीत दररोज होत असलेले दृष्य बदल फार सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाला ते सहजपणे समजणार नाहीत. त्या मानाने चंद्राचे उगवणे रोजच आदल्या दिवसाच्या मानाने सुमारे दोन घटकांनी उशीरा होत असते, त्यामुळे त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या चांदण्यांचे समूह (नक्षत्रे) रोज बदलत असतात, तसेच चंद्राचा आकार रोज कलेकलेने बदलत असतो. चंद्राची उगवण्याची वेळ, त्याच्या सोबत दिसणारे नक्षत्र आणि चंद्राच्या कला यांचा विचार करून आणि त्यात रोज घडत असलेला फरक पाहून महिन्यामधील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य निश्चित करता येते. दर महिन्यात अमावास्येच्या रात्री चंद्र उगवतच नाही आणि दिवसाही तो दिसत नाही. त्यानंतर रोज कलेकलेने वाढत पंधरा दिवसांनी तो पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार दिसतो आणि त्यानंतर कलेकलेने लहान होत अमावास्येला पूर्णपणे अदृष्य होतो. अशा रीतीने एक महिना पूर्ण होतो आणि पुढील प्रत्येक महिन्यातसुध्दा चंद्राच्या कला याच क्रमाने वाढत किंवा घटत राहतात. अशा सुमारे तीस दिवसांचा एक महिना होतो. एका सौर वर्षात बारा चांद्र महिने येतात. अरबस्थानात अशा प्रकारचे (चांद्र) ल्यूनर कॅलेंडर अवलंबले गेले आणि प्रचलित झाले. या कालगणनेसाठी किचकट गणिते मांडून ती सोडवायची गरज नसते. काळ्याकुट्ट अमावास्येनंतर ज्या संध्याकाळी चंद्र दिसेल त्या दिवसापासून नवा महिना सुरू होतो आणि पुन्हा असेच नवचंद्रदर्शन घडेपर्यंत तो महिना चालत राहतो. असे बारा महिने होऊन गेले की नवे वर्ष सुरू होते. मुस्लिम धर्मीय आजतागायत या हिजरी कॅलेंडरचा उपयोग करतात.

प्राचीन काळातील भारतीय विद्वानांनी आकाशात घडत असलेल्या सर्वच घटनांचे खूपच बारकाईने निरीक्षण करून सौर आणि चांद्र अशा दोन कालगणना विकसित केल्या. पृथ्वीवरील आपल्या जागेवरूनच आकाशातले चंद्र आणि सूर्य कोणत्या वेळी कसे आणि कुठे दिसतात यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्या माहितीचा उपयोग या दोन प्रकारच्या कालगणनेसाठी केला गेला. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे निरीक्षण आणि त्याचा कालगणनेशी जोडलेला संबंध हे काम त्यात निष्णात असलेल्या तज्ज्ञांकडे गेल्यानंतर त्यांनी ते अचूक बनवण्याच्या दृष्टीने त्यात प्रचंड गुंतागुंत निर्माण केली. वर्तुळाकार आकाशाचे त्यांनी बारा समान भागात (राशीत) विभाजन केले तसेच त्याचीच सत्तावीस भागात वेगळ्या प्रकारे वाटणी करून प्रत्येक भाग म्हणजे एक नक्षत्र असे त्या भागांचे नामांकन केले. आकाशाच्या त्या भागात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या समूहांच्या आकारावरून त्यांना मेष, वृषभ आदि बारा राशी आणि अश्विनी, भरणी वगैरे सत्तावीस नक्षत्रांची नावे दिली. रात्रीच्या वेळी ही नक्षत्रे आणि राशी दिसतात आणि ओळखता येतात, तसेच चंद्राच्या आजूबाजूला दिसणाऱ्या ताऱ्यांवरून त्या क्षणी तो कोणत्या नक्षत्रात किंवा राशीत आहे ते समजते. त्यांनी प्रत्येक राशीत तीस अंश, प्रत्येक अंशाचे साठ भाग (कला), त्यातील प्रत्येक भागाचे पुन्हा साठ भाग(विकला) करून त्यानुसार अतीशय सूक्ष्म निरीक्षणे आणि त्याची आकडेमोड केली आणि आपल्याला दिसणारे चंद्राचे आकाशातील भ्रमण त्यांनी अचूकपणे समजून घेतले. त्या माहितीच्या आधाराने महिन्यामधील तिथी निश्चित केल्या, तसेच कोणत्या क्षणी चंद्र एका नक्षत्रामधून बाहेर पडून दुसऱ्या नक्षत्रात किंवा एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो याचे गणित मांडले. ही सर्व माहिती पंचांगात दिलेली असते.

पाश्चिमात्य कालगणनेच्या पध्दतीत मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, आपल्याला ही वेळ घड्याळ पाहूनच समजते कारण त्या क्षणी आभाळात काहीच घडत नाही. पण भारतीय पद्धत थोडी गुंतागुंतीची आहे. आपला दिवस कोणालाही सहजपणे दिसणाऱ्या सूर्योदयापासून सुरू होतो आणि त्या क्षणी जी तिथी चाललेली असते ती त्या दिवसाची तिथी मानली जाते. अर्थातच तिथीची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली जाते. ती सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीची तुलना करून ठरते. आकाशात दिसणारे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे हे सारेच पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात असे असले तरी पूर्वेच्या क्षितिजाकडून पश्चिमेच्या क्षितिजापर्यंतचा त्यांचा प्रवास एकमेकांच्या सोबतीने समान गतीने होत नाही. तारकामंडळाच्या तुलनेत सूर्य किंचित धीम्या गतीने जात दररोज सुमारे एका अंशाने मागे पडत जातो तर चंद्रमा सूर्यापेक्षाही थोडा संथ गतीने जात दिवसाकाठी सुमारे तेरा अंशाने मागे राहतो. आपल्याला आभाळातले तारकामंडळ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते असे दिसते, पण ते जागच्या जागी स्थिर आहे असे गृहीत धरले (तसे ते आहेच), तर त्याच्या तुलनेत सूर्य आणि चंद्र हे दोघेही हळूहळू पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असतात. ज्या वेळी चंद्र बारा अंशाने सूर्याच्या पुढे जातो तेंव्हा तिथि बदलते. ही गोष्ट दिवसा किंवा रात्री आणि चंद्र व सूर्य आकाशात असतांना किंवा नसतांना कोणत्याही वेळी सतत घडत असते.

नभोमंडळाची बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागणी केलेली असल्यामुळे सूर्य, चंद्र (आणि इतर ग्रह) या राशी व नक्षत्रांमधून प्रवास करतांना आपल्याला दिसतात. या प्रवासात चंद्राचा वेग सूर्याच्या जवळ जवळ तेरा पट इतका जास्त असतो. त्यामुळे एक वर्ष इतक्या कालावधीत सूर्य जेंव्हा एक फेरी पूर्ण करतो तेवढ्यात चंद्राने तेरापेक्षा जास्त घिरट्या घातलेल्या असतात. एकाद्या लहानशा वर्तुळाकार मैदानाच्या कडेकडेने एक माणूस पायी फेऱ्या घालत असेल आणि त्याच रस्त्याने दुसरा माणूस सायकलवर बसून फेऱ्या मारत असेल, तर तो माणूस पायी चालत जाणाऱ्या माणसाला वारंवार ओव्हरटेक करत राहील. त्याचप्रमाणे दर महिन्यात अमावास्येला सूर्याला ओव्हरटेक करून चंद्र पुढे जात असतो. अशा दोन ओव्हरटेकिंगच्या मधला काळ हा भारतीय पंचांगानुसार एक चांद्र महिना असतो.

प्राचीन भारतीयांनी वेगळी सौर कालगणनासुध्दा तयार केली होती. सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्याने वर्षाचा पहिला महिना, वृषभ राशीत जाताच दुसरा असे करीत मीन रास पार केल्यानंतर बारावा महिना आणि ते वर्ष संपते. अशा प्रकारचे पंचांग भारताच्या काही भागात आजसुध्दा वापरात आहे. केरळीय लोकांचे सौर वर्ष ओणमला सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश केल्याने सुरू होते आणि बारा महिन्यानंतर बदलते. भारताच्या बहुतांश भागात उपयोगात येत असलेल्या पंचांगात चांद्र आणि सौर पध्दतींचा समन्वय करून दोन्हींमधील फायद्यांचा लाभ उठवला आहे. हे साधण्यासाठी अधिकमास जोडला जातो. याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पृथ्वीच्या सूर्याभोवती होत असलेल्या भ्रमणामुळे वर्षभराचे ऋतूचक्र निर्माण होते, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेमुळे महिन्यामधील अमावास्या, पौर्णिमा वगैरे होतात आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे आता आपल्याला चांगले माहीत झाले आहे, पण पृथ्वी आणि चंद्र यांचे हे अवकाशामधले फिरणे आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकत नाही. चंद्र, सूर्य आणि ग्रह, तारे पृथ्वीवरून जसे दिसतात त्याचेच निरीक्षण करणे शक्य असते आणि त्यांच्या अभ्यासामधून आणि त्याच्या विश्लेषणातूनच शास्त्रज्ञांनी वरील निष्कर्ष काढले. प्राचीन काळात जेंव्हा कालगणनांचा विकास होत होता तेंव्हा या गोष्टी सर्वश्रुत झालेल्या नव्हत्या. पण त्या काळातील विद्वानांनी तयार केलेल्या पंचांगाचे आकलन होण्यात आपल्याला अलीकडील वैज्ञानिकांच्या संशोधनाचा उपयोग होतो.

पृथ्वीचे स्वतःभोवती फिरकी घेणे सतत एकाच गतीने होत असते आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एक दिवस धरून त्या वेळेचे तास, मिनिटे, सेकंद किंवा प्रहर, घटिका, पळे, विपळे वगैरेंमध्ये विभाजन केले आहे. पृथ्वीला सूर्यप्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे ३६५ दिवस आणि ६ तास इतका आहे. अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळरेषेत येतात. त्या दिवसापासून सुरू झालेली चंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा सुमारे सव्वासत्तावीस दिवसात पूर्ण होत असते. पण तेवढ्या काळात सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी पुढे सरकली असल्यामुळे सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरळरेषेत येण्यासाठी चंद्राला आणखी दोन दिवस लागतात. त्यामुळे अमावास्या ते अमावास्या होणारा चांद्र महिना सुमारे साडेएकोणतीस दिवस एवढा असतो. (प्रत्यक्ष कालावधींमध्ये यात काही मिनिटे आणि सेकंदांचे सूक्ष्म फरक आहेत, पण ते या लेखासाठी महत्वाचे नाहीत.) एक महिन्याचा कालावधी दिवसांच्या पटीत नसतो आणि एक वर्षाचा कालावधी महिन्यांच्या कालावधीच्या पटीत नसतो. साडेएकोणतीस दिवसांचा चांद्रमास कधी तीस दिवसांचा आणि कधी एकोणतीस दिवसांचा धरावा लागतो आणि अशा बारा महिन्यांचा कालावधी फक्त ३५४ दिवस एवढाच होतो. एवढ्या काळात बारा महिन्यांच्या बारा अमावास्या येऊन जातात, पण सौर वर्ष संपायला अजून सव्वाअकरा दिवस शिल्लक असतात. तेवढ्या काळात पुढील चांद्रवर्ष सुरू होऊन जाते. ते संपेपर्यंत हा फरक साडेबावीस दिवसांचा होतो, तीन वर्षांच्या काळात तो एक महिन्यापेक्षा जास्त होतो आणि सात आठ वर्षांमध्ये महिना आणि ऋतू यांच्यातला संबंध संपून जातो. या कारणामुळे रमझानचा महिना कधी उन्हाळ्यात, कधी पावसाळ्यात, तर कधी थंडीच्या दिवसात येऊ शकतो.

आपला श्रावण महिना मात्र नेहमी पावसाळ्यातच येतो, कारण चांद्र आणि सौर पध्दतींमधला हा फरक एक महिना एवढा झाला की लगेच एक अधिकमास घेऊन त्याला शून्यावर आणले जाते. हे कसे करायचे, अधिक महिना केंव्हा पाळायचा, हे ठरवण्याची सुव्यवस्थित पध्दत पुढीलप्रमाणे आहे. पाश्चात्य पध्दतीत रोज मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, पण भारतीय पध्दतीत सूर्याच्या तुलनेत चंद्र १२ अंशाने पुढे जातो तेंव्हा तिथी बदलते. हा क्रिया दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी वगैरे केंव्हाही होऊ शकते, त्यामुळे पंचांगामधली तिथी त्यानुसार केंव्हाही लागते किंवा संपते. असा पंधरा तिथींचा शुक्लपक्ष आणि पंधरा तिथींचा कृष्णपक्ष हे दोन्ही मिळून एक महिना होतो. तो सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्याही कक्षा लंबवर्तुळाकार (एलिप्टिकल) आहेत आणि त्यांच्या भ्रमणाची गती किंचित कमीअधिक होत असते, त्यामुळे चंद्राला सूर्याच्या पुढे १२ अंश जाण्यासाठी लागणारा वेळ समान नसतो. पाश्चिमात्य पध्दतीतला प्रत्येक दिवस हा बरोबर चोवीस तासांचाच असतो तर भारतीय पध्दतीमधील तिथीचा काळ कमी जास्त (बहुतेक वेळा २४ तासांपेक्षा कमीच) होत असतो.

खरे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पण आपण पृथ्वीवर रहात असल्यामुळे आपल्याला सूर्यच राशीचक्रामधून फिरतो असे वाटते. एका वर्षात तो बारा राशींमधून फिरून येत असतो. प्रत्येक राशीमधील त्याचा भ्रमणकाल एक महिना (३०-३१ दिवस) एवढा असतो. पण चांद्रमहिन्याचा काळ साडेएकोणतीस दिवस एवढाच असतो. त्यामुळे सूर्याने एका राशीत शुध्द प्रतीपदेला प्रवेश केला असेल तर तो महिना संपून गेला आणि पुढील महिना सुरू होऊन गेला तरी सूर्य अजूनही आधीच्या राशीत असतो. शुक्ल प्रतीपदेला सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्या महिन्याचे नाव ठरत असते. पण चंद्राचा महिना बदलला तरी सूर्याची रास तीच असेल तर त्या महिन्याला पुढील महिन्याचे नाव देतांना ‘अधिक’ असे विशेषण लावले जाते. आज १६ मे २०१२ ला सुरू होणारा महिना ‘अधिक ज्येष्ठ’ मानला जाईल. तो महिना सुरू असतांना सूर्याने पुढील राशीत प्रवेश केला असेल आणि पुढल्या महिन्याच्या शुक्ल प्रतीपदेला तो त्या राशीत असल्यामुळे त्याप्रमाणे १४ जून २०१२ ला सुरू होणारा महिना ज्येष्ठ असेल. त्याला ‘निज ज्येष्ठ’ असे म्हणतील.

अधिक महिन्यामध्ये कोणतेही नेहमीचे सणवार साजरे केले जात नाहीत. ज्येष्ठ महिन्यातले वटपौर्णिमेसारखे सण व उत्सव ‘निज’ ज्येष्ठात पाळले जाणार आहेत. अधिक महिन्यात लग्नाचे मुहूर्तही नसतात. पूर्वी चातुर्मासातसुध्दा ते नसत. ज्या वर्षी अधिक महिना चातुर्मासात येतो त्या वेळचा चातुर्मासाचा व्रतकाळ पाच महिने चालतो. सुमुहर्त पाहून शुभमंगल करणाऱ्या लोकांना त्यासाठी पाच महिने वाट पहावी लागते. शेषशायी विष्णूभगवान त्या वर्षी पाच महिने सुखनिद्गा घेतात. ‘अधिक’ महिन्यामध्ये काही लोक वेगळे नेमधर्म धरतात आणि ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ म्हणून त्यातून जास्त फलप्राप्ती व्हावी असा त्यांचा विश्वास असतो. अधिक महिन्याबद्दल अशी कथा आहे की पुराणकाळात अधिक महिना विष्णूभगवानांच्याकडे गेला आणि आपल्याला नेहमी इतर कोणा महिन्याच्या नावाने ओळखले जाते याबद्दल त्याने रोष व्यक्त केला. त्याची समजूत घालण्यासाठी “माझेच पुरुषोत्तम हे नाव मी तुला देतो.” असा वर विष्णूने त्याला दिला. तेंव्हापासून अधिक महिन्याला ‘पुरुषोत्तममास’ असेही म्हणू लागले.

बहुतेक सर्व पंचांगांप्रमाणे आज १६ मे २०१२ ला अधिक महिना येत असला तरी काही पंचांगात तो येणार नाही किंवा कदाचित आधीच येऊन गेला असेल. त्यानुसार चालणाऱ्या लोकांचे सणवार वेगळ्या दिवशी साजरे होतात. त्या दिवशी त्यांना सुटी मिळत नाही आणि जेंव्हा सुटी असते तेंव्हा त्यांचेकडे उत्सव नसतात. यामुळे आजकाल अशा पंचांगांचे अनुकरण करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा फरक का येतो यालाही शास्त्रीय कारण आहे. राशी, नक्षत्रे वगैरेंच्या सीमारेखा आकाशात आखून ठेवलेल्या नाहीत आणि चंद्र किंवा सूर्याने या राशीतून त्या राशीत प्रवेश केलेला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. या सीमा काल्पनिक आहेत आणि वेगवेगळ्या विद्वानांनी त्यांच्या गणितानुसार त्या ठरवल्या असल्यामुळे त्यात किंचित फरक असतो. माझ्या लहानपणी टिळक पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत १० जानेवारीला येत असे आणि दाते पंचांगानुसार ती १४ जानेवारीला येत असे (हल्ली १४ किंवा १५ जानेवारीला येते), म्हणजे सूर्याच्या राशी संक्रमणात चार दिवसांचा फरक होता. अर्थातच अधिक महिना कोणता हे ठरवतांना यामुळे निश्चितपणे फरक येणारच.

पूर्वीच्या काळी दिवसातून ठराविक वेळ चालणारी ऑफिसे नव्हती, तसेच दर महिन्याला पगार देण्याची पध्दतही नव्हती. राजाच्या पदरी असलेल्या लोकांना वर्षासने मिळत आणि खेड्यातील बारा बलुतेदारांना दिवाळी किंवा होळीसारख्या सणाला धान्यधून्य मिळत असे. पीकपाण्याच्या आणेवारीनुसार दुष्काळाच्या वर्षी त्यात कपातही होत असे. वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना येई तेंव्हा ओढाताण होणे साहजीक आहे. त्यातून जर त्या वर्षी दुष्काळ पडला असेल आणि त्यामुळे चणचण झाली असेल तर दुहेरी आपत्ती ओढवत असे. यावरूनच ‘दुष्काळात तेरावा महिना’ ही म्हण पडली आहे आणि अधिक महिन्यात कुठलाच सण येत नसल्याने प्राप्ति होत नसे म्हणून त्याला रागाने ‘धोंडा महिना’ असे नावही  मिळाले आहे.

मकर संक्रांत आणि उत्तरायण- अनुभव व विवेचन

मकरसंक्रांत

या विषयावर मी लिहिलेले दोन लेख एकत्रपणे आज मकरसंक्रांतीच्या दिवशी या ब्लॉगवर देत आहे.

१. लहानपणच्या आठवणी आणि विवेचन

Makarsankranti

आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.

संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.

एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी तिळ आणि गुळ खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनु आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात आंखून ठेवलेल्या नाहीत. काही सूक्ष्म निरीक्षणे आणि प्रचंड किचकट आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ते ठरवले जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. आताचे लोक फार फार तर कालनिर्णय कॅलेंडर पाहतात.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली ती १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ – २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे.

पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो. यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजावर दिसणा-या तारकांच्या स्थानांमध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. राशीचक्रामध्ये फिरत रहाणारा सूर्य आणि ग्रह यांच्या भ्रमणावर आपले पंचांग पूर्णपणे आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात. धनु राशीमधून भ्रमण करत असतांनाच सूर्य दक्षिण दिशेने जाऊन टोकाला स्पर्श करून पुन्हा उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतो.

मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्यांचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे.
—————————————————————-

भीष्मपितामह, उत्तरायण आणि मकर संक्रांत

भीष्मकथा

मी लहान असतांना उत्तरायण हा शब्द फक्त भीष्मपितामहांच्या कथेमध्येच ऐकला होता. एरवी कधीसुद्धा कोणाच्याही बोलण्यातही तो येत नव्हता किंवा मी वाचत असलेल्या लिखाणामध्येही कधी डोकावत नव्हता. यामुळे भीष्मपितामह आणि उत्तरायण या शब्दांची जोडी झाली होती. हे उत्तरायण मकरसंक्रमणापासून सुरू होते एवढीच अधिक माहिती त्याच्या संबंधात समजली होती.

भीष्म हे महाभारतातले एक प्रमुख पात्र असामान्यांहून असामान्य असे आहे. सर्वसाधारण लोकांच्याच नव्हे तर लोकोत्तर अशा असामान्य माणसांच्या जीवनातसुद्धा आल्या नसतील इतक्या विचित्र घटना त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांना पहाव्या आणि सोसाव्या लागल्या आणि कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे काही वेगळ्याच वाटेने घडत गेले. त्यांची आई त्यांना जन्मतःच पाण्यात बुडवायला निघाली होती. “तू हे असं का करते आहेस बाई?” एवढासाच प्रश्न तिच्या नव-याने विचारल्यानंतर ती रुष्ट होऊन त्या बाळाला घेऊन तरातरा चालली गेली. त्या मुलाचे बालपण कसे गेले कोण जाणे, पण त्याला सगळी शास्त्रे आणि शस्त्रविद्या शिकवून सर्वगुणसंपन्न करून त्याच्या वडिलांच्या सुपूर्द केले गेले. त्यानंतर वडिलांना सुखी करणे एवढाच सिंगल पॉइंट प्रोग्रॅम घेऊन तो युवक देवव्रत त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार झाला. आधी स्त्रीस्वातंत्र्याचा अतिरेक करणारी पत्नी आणि त्यानंतर तिचाही विरह यांच्याबरोबर सगळे आयुष्य घालवून झाल्यानंतर देवव्रताच्या पिताश्रींना उतारवयात प्रेम करावेसे वाटले. पण ते सफळ होणार नाही या विचाराने ते दुःखी झाले. त्यांना निदान आता तरी चार सुखाचे दिवस मिळावेत म्हणून तरुण देवव्रताने राजसिंहासनावरचा आपला हक्क तर सोडलाच, कधीही लग्नच न करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. शिवाय हस्तिनापूरचा जो कोणी राजा असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहीन असे वचन दिले. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेले सगळे राजे एकाहून एक नालायक निघाले तरी भीष्माला मात्र आपल्या वचनपूर्तीसाठी त्यांना पाठीशी घालावे लागले, त्यांचेच संरक्षण करत रहावे लागले.

महाभारत युद्धात पांडवांचा पक्ष न्याय्य आहे हे मनापासून पटलेले असले तरी भीष्माला कौरवांच्या सेनेचे सेनापतीपद सांभाळून त्यांचाच विजय व्हावा यासाठी लढावे लागले आणि ते इतक्या निकराने लढले की अर्जुनाच्या रथाचा त्यांनी चक्काचूर केला. “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” असे आश्वासन दिलेल्या श्रीकृष्णाला हातात रथाचे चाक घेऊन त्यांच्यावर धावून जावे लागले. अखेर श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने शिखंडीला सारथ्याच्या जागी बसवले. तत्वनिष्ठ भीष्माचार्यांनी हातातले धनुष्य खाली ठेवले आणि शिखंडीच्या मागे दडून अर्जुनाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नाही की तो थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की रणांगणामधून पळ काढला नाही. त्याने सोडलेले बाण त्यांच्या शरीरात घुसत राहिले.

आपले सारे जीवन अर्पण करण्याच्या मोबदल्यात भीष्माला काय मिळाले? तर इच्छामरण ! त्याला स्वतःला जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत तो मरणारच नाही असा वर मिळाला. त्यामुळे त्याला युद्धामध्ये कोणीही मारूच शकत नव्हता, हस्तिनापूरच्या राजाच्या बाजूने तो लढाया लढत होता, त्या जिंकत होता आणि त्यातून धन, दौलत आणि राजकन्यांनासुद्धा जिंकून राजांकडे आणून देत होता. राजांची सगळी मदार भीष्मावरच असल्यामुळे आपल्यानंतर त्या राज्याचे काय होईल या चिंतेमुळे तो मरणाची इच्छासुद्धा करू शकत नव्हता. इतर माणसांच्या मनात ज्या प्रकारच्या इच्छा रूढपणे येत असतात, तशा भीष्मालाही कधी झाल्या असल्या तरी त्यांची पूर्ती मात्र कधीच होऊ शकली नाही. अखेरच्या क्षणी त्याने एकच शेवटची इच्छा बाळगली ती म्हणजे कधी प्राण सोडावा ही. या बाबतीत फक्त तो स्वतःच ठरवू शकत होता. त्याची कुठलीही कर्तव्ये, प्रतिज्ञा किंवा वचने त्याच्या आड येत नव्हती.

शिखंडीच्या आडून अर्जुनाने मारलेले अनेक बाण भीष्माचार्यांच्या शरीरामधून आरपार गेले तरी त्यांचे प्राण मात्र गेले नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या इच्छेशिवाय ते जाऊच शकत नव्हते. पण शरीराच्या तशा छिन्नभिन्न अवस्थेत किती वेदना होत असतील त्या सहन करीत त्यांनी आणखी काही काळ जगत रहायचे ठरवले. अंगात शिरलेले बाण बाहेर न काढता त्यांच्या शय्येवर ते पडून राहिले. कारण काय तर त्यावेळी दक्षिणायन चाललेले होते. ते संपून उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तर ते स्वर्गात जातील असा त्यांचा विश्वास होता. या घटनेच्या दहाच दिवस आधी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला होता, त्यात त्यांनी म्हंटले होते, “हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम्” म्हणजे “मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील.” युद्धात मरण पावला तर क्षत्रिय स्वर्गात जातील असे त्या काळात मानले जात होते. म्हणजे तसा विचार केल्यास हे दक्षिणायन त्यांच्या स्वर्गात जायच्या आड येत नव्हते. ही गोष्ट सगळी शास्त्रे जाणणा-या भीष्माला माहीत नसेल का? दक्षिणायनात चाललेल्या त्या युद्धामध्ये जे लक्षावधी योद्धे मारले गेले ते सगळे नरकात गेले असतील का? त्यांनी जन्मभर केलेल्या पापपुण्याचा हिशोब कुठे गेला? सगळे कौरवसुध्दा जन्मभर पापे करून अखेर स्वर्गातच गेले असेही सांगतात त्याचे काय? असले प्रश्न विचारायचे नसतात. यातला शाब्दिक अर्थ न घेता त्यात दडलेली रूपके किंवा अध्यात्म शोधायचे असते असे म्हणून ते टोलवले जातात.

उत्तरायण आणि मकर संक्रांत यांचा संबंध कसा आणि कधी जुळला असेल हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरेल. कोणत्याही वर्षातल्या मकर संक्रांतीपासूनच सूर्याने प्रत्यक्षात उत्तरेकडे सरकायला सुरुवात केली असे गेल्या दहा पिढ्यांमध्ये तरी झालेले नाही. पण प्रत्येक पिढीतल्या मोठ्या लोकांनी पुढल्या पिढीमधल्या मुलांना असेच सांगितले आहे. काल होऊन गेलेल्या संक्रांतीलासुद्धा असेच सांगितले जात होते. भूगोल किंवा खगोलशास्त्राच्या दृष्टीने या दोन निरनिराळ्या घटना असतात. दिवसांचे लहान किंवा मोठे होत जाणे यामुळे उन्हाळा आणि हिवाळा येणे हे चक्र दर वर्षी रिपीट होत असते. उत्तरायणामध्ये रोजचा सूर्योदय आदल्या दिवसाच्या मानाने थोडा आधी होतो आणि सूर्यास्त थोडा उशीराने होतो. यामुळे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. याचप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी त्याचे बिंब क्षितिजावरील ज्या बिंदूमधून वर येतांना दिसते तो बिंदू हळू हळू उत्तरेकडे सरकत असलेला दिसतो. दुपारी बारा वाजता माथ्यावर आलेला सूर्य बरोबर डोक्यावर नसतो, तो किंचित दक्षिणेच्या किंवा उत्तरेच्या बाजूला असतो. पूर्वेला सूर्योदय होतो असे म्हंटले जात असले तरी ते वर्षामधून फक्त दोनच दिवशी घडते. इतर सर्व दिवशी सूर्योदयाची जागा पूर्व दिशेच्या किंचित डावीकडे म्हणजे उत्तरेला किंवा थोडी उजवीकडे म्हणजे दक्षिणेच्या बाजूला असते. तिथून उगवल्यानंतर तो थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच आकाशामधून फिरून पुन्ः थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच मावळतीला टेकत असतो. २१ डिसेंबरच्या दिवशी ज्या ठिकाणाहून सूर्योदय होतो हे त्याचे दक्षिणपूर्वेकडले टोक झाले. त्यानंतर २२ डिसेंबरपासून तो बिंदू उत्तरेकडे सरकू लागतो म्हणून उत्तरायण सुरू होते. २२ डिसेंबर २०१२ रोजीच तसे ते होऊन गेले आहे. हे उत्तरायण सहा महिने चालेल. तोपर्यंत रोजचा सूर्योदय, त्याचे माथ्यावर येणे आणि असत हे बिंदू उत्तरेकडे सरकत जातील, दिवस मोठे आणि रात्री लहान होत जातील. त्यानंतर जून महिन्यातले लाँगेस्ट डे होऊन गेला की दक्षिणायन सुरू होऊन ते पुन्हा सहा महिने चालेल, अशा प्रकारे दर वर्षी याची पुनरावृत्ती होत जाईल. हे चक्र पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे घडते हे आपण भूगोलात शिकतो.

सूर्य आभाळात असतांना त्याच्या प्रकाशात इतर तारे दिसत नाहीत, पण भल्या पहाटे किंवा रात्री केलेल्या निरीक्षणावरून सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे हे अचूकपणे ठरवता येते. आकाशातल्या बारा राशींमधून त्याला फिरून मूळ जागेवर येण्यासाठीसुद्धा एक वर्षाचा काळ लागतो. याचे कारणसुद्धा पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्षाइतका म्हणजे सुमारे ३६५ दिवसांचा काळ लागतो हे आता आपल्याला माहीत झाले आहे. सूर्य हा मध्यभागी असून मंगळ, बुध, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणेच पृथ्वीसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालत असते हे गेल्या काही शतकांमध्ये शिकवले जात आहे. पण जमीनीवरूनच सूर्याचे निरीक्षण करून त्यावरून केलेल्या कालगणना त्याच्याही आधी कित्येक शतके किंवा हजार वर्षांपूर्वीपासून उपयोगात आणल्या जात आहेत. सूर्याची सारी निरीक्षणे एक वर्षानंतर पुनः जशीच्या तशीच रिपीट होत असतात हे पाहून त्यावरूनच वर्ष हा कालावधी ठरवला गेला.

पाश्चात्य लोकांचे सौर वर्ष ठरवतांना फक्त सूर्याचा विचार केला जातो. इस्लामिक लोकांचे चांद्रवर्ष असते. त्याचा या विषयाशी काहीच संबंध नसल्याने ते बाजूला ठेवू. भारतीय पंचांगांमध्ये चंद्राच्या कलेकलेने मोठ्या आणि लहान होत अदृष्य होण्याच्या कालखंडाचा महिना ठरवला गेला आणि अशा बारा महिन्यांचे एक वर्ष. पण असे चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांची सांगड घालण्यासाठी अधिक महिना आणला गेला. प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि चंद्र दोघेही एका राशीत येतात. त्यात चंद्र पाठीमागून येतो आणि सूर्याला ओव्हरटेक करून पुढे जातो. असे दर महिन्यात घडत असते. सूर्याला एक राशी पार करायला सुमारे साडेतीस दिवस लागतात म्हणजे एक महिन्यानंतर तो पुढल्या राशीत असतो. तिथे असलेल्या सूर्याला गाठून पार करण्यासाठी चंद्राला सुमारे साडे एकोणतीस दिवस लागतात. यामुळे कधीकधी असे घडते की एका महिन्यातच ते दोन वेळा घडते. आधीच्या अमावास्येला ज्या राशीमध्ये सूर्य नुकताच गेलेला असतो त्याच राशीच्या दुस-या टोकाशी तो पुढल्या अमावास्येलासुद्धा असतो. त्यानंतरचा महिना अधिक ठरवला जातो. असा प्रकारे हा सांगड घातली जाते.

उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून होणारा एका वर्षाचा कालखंड आणि सूर्याने बारा राशींमधून फिरून आपल्या मूळ जागी लागणारा कालखंड हे दोन्ही सुमारे ३६५ दिवस आणि सहा तास इतके असतात. स्थूलमानाने हे ठीकच असले तरी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की त्यात काही मिनिटांचा फरक असतो. वाढत वाढत ७०-७२ वर्षांमध्ये तो एका दिवसाइतका होऊ शकतो. दर वर्षी सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण तीन चार वर्षांपूर्वी फक्त १४ जानेवारीलाच होत असे. आजकाल ते कधी १४ तर कधी १५ ला होते. या अनिश्चिततेचे कारण असे आहे की इंग्रजी कॅलेंडरमधला दिवस रात्रीच्या बारा वाजता सुरू होतो, तर भारतीय पंचांगांमधला दिवस सकाळी सूर्योदयाबरोबर होतो, शिवाय लीप ईयरमुळे इंग्रजी वर्ष कधी ३६५ तर कधी ३६६ दिवसांचे असते यामुळेही फरक पडतो. आणखी काही वर्षांनी ते फक्त १५ जानेवारीलाच होईल. सूर्याच्या राशीमधून फिरण्याच्या कालावधीवरून वर्ष ठरवण्याच्या पद्धतीला निरयन असे म्हणतात. भारतात ही पद्धत जास्त प्रचलित आहे. सूर्याचे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकणे यावरून ठरवले जाणारे वर्ष हे काही मिनिटांनी मोठे असते. याला सायन पद्धती म्हणतात. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही पद्धत वापरली जाते. पूर्वीच्या काळात तिकडेसुद्धा निरयन पद्धत होती, पण सातआठशे वर्षांपूर्वी ती बदलण्यात आली आणि कॅलेंडरमधल्या काही तारखा गाळून तोपर्यंत झालेल्या फरकाची पूर्ती करण्यात आली. भारतीय विद्वानांना सायन पद्धत माहीत झाली होती, पण ऋतूचक्रापेक्षा सूर्याचे राशींमधले भ्रमण अधिक महत्वाचे वाटल्यामुळे त्यांनी निरयन पद्धतच चालू ठेवली.

अशा प्रकारे आता उत्तरायणाची सुरुवात आणि मकरसंक्रमण याच्यामध्ये आता २२-२३ दिवसांचे अंतर पडले आहे, पण कधी काळी ते एकाच दिवशी होत होते त्या काळातली समजूत मात्र अजून टिकून आहे.

……………………………………….

संपादन : १३-०१-२०१९

कोजागरी पौर्णिमा

को जागर्ती ?

आजकाल रात्र पडली तरी घरात आणि घराबाहेरही विजेच्या दिव्यांचा झगमगाट असतो. त्यामुळे सगळे लोक हिंडून फिरून आणि बाजारहाट किंवा इतर कामे आवरून सावकाशपणे घरी परततात. जेवणे खाणे वगैरे आटोपून झोपी जाईपर्यंत रात्रीचे दहा अकरा तरी वाजतातच. बाकीचे सगळे झोपायला गेले असले तरी काही जणांना झोप येत नाही. त्यातला कोणी टीव्हीवर एकादी मालिका बघत बसतो तर कोणाला परदेशात चाललेली क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच पहायची असते, कोणाला इंटरनेटवर सर्फिंग करायचे असते नाहीतर वॉट्सअॅप किंवा फेसबुकवर रेंगाळत रहायचे असते. मुलांना सेलफोन किंवा टॅबलेटवर गेम्स खेळायचे असतात. त्यामुळे बाकीचे सगळे झोपले तरी त्यातला एकादा जागत राहतो किंवा हळूच उठून टीव्ही किंवा काँप्यूटर लावतो. त्यातून निघणारे आवाज आणि उघडझाप करणारे प्रकाशझोत यामुळे झोपमोड झालेला एकादा माणूस वैतागून उठतो आणि ओरडतो “कोण तो अजून जागतो आहे ? (को जागर्ती ?)” त्यानंतर त्या जागणाऱ्याच्या आणि ओरडणाऱ्याच्या वयानुसार पुढील संवाद ठरतात. जागणारा लहान मुलगा असल्यास “आता झोप पाहू मुकाट्याने, उद्या सकाळी शाळेला जायचं आहे ना?” असा दम दिला जातो आणि मोठी व्यक्ती असल्यास “काय मेली कटकट, सुखानं झोपावं म्हंटलं तर तेवढं सुख सुध्दा आमच्या नशीबात कुठं आलंय्?” किंवा “आता कृपा करून आम्हाला जरा झोपू देता का?” असे काही तरी बोलले जाते. त्यामुळे ‘को जागर्ती?’ हा प्रश्न आता त्रासिकपणाचाच झाला आहे.

पूर्वीच्या काळातली परिस्थिती वेगळी होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर चहूकडे अंधारगुडुप व्हायचा. सूर्यास्त होण्याच्या आधीच सगळी कामे आणि खेळबीळ संपवून फक्त मुलीच नव्हे तर मुले आणि मोठी माणसेसुध्दा ‘सातच्या आत घरात’ येऊन जायची. त्यानंतर मुलांनी शुभंकरोती कल्याणम्, परवचे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा, इतर श्लोक, स्तोत्रे वगैरे म्हणायची, देवाला आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा. तोपर्यंत रात्रीचे जेवण तयार झालेले असायचे. ते खायचे आणि पथाऱ्या पसरायच्या. रात्रीच्या काळोखात घराच्या बाहेर पडायची सोय नव्हती. गावातील ठिकठिकाणच्या झाडांवर मुंजा, हडळ, पिशाच वगैरे अतृप्त आत्मे दबा धरून बसलेले असायचे आणि त्यांच्या तावडीत कोणी एकटा दुकटा सापडला तर मग त्याची खैर नाही अशी भीती दाखवली जायची. पावसाळ्यात चमकणाऱ्या विजा आणि ढगांचा गडगडाट यामधून या समजांना जास्तच जोर चढत असे. यामुळे रात्र पडली की लोक दरवाजे खिडक्या घट्ट बंद करून घ्यायचे. बाहेर काय चालले आहे याची त्यांना शुध्द नसायची.

पण आषाढात जोरात सुरू झालेला पाऊस श्रावणात कमी होऊन ‘क्षणात येते सरसर शिवरे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ असा येत जात रहायचा आणि भाद्रपदानंतर तो जवळ जवळ संपून जात असे. त्यानंतर येणाऱ्या आश्विन महिन्यात पिठूर चांदणे पडायचे. प्रतीपदेपासून हळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला निरभ्र आकाशात पूर्ण चंद्र दिसायचा. त्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय असायचे. पण निसर्गाचे हे अद्भुत रूप पहाण्यासाठी आधी लोकांनी जागे तरी रहायला हवे ना ! यासाठी एक मजेदार अशी कथा सांगितली जात असे. त्या कथेनुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला रात्री प्रत्यक्ष लक्ष्मी देवी पिठूर चांदण्यामधून पृथ्वीतलावर येते आणि घरोघरी जाऊन “को जागर्ती ?” असे विचारते. तिला जो कोणी माणूस जागा दिसेल त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला ती भरपूर संपत्ती देते. ही संपत्ती मिळण्याच्या आशेने सगळे लोक त्या रात्री उशीरापर्यंत जागत राहिले आणि त्यांना निसर्गसौंदर्याच्या संपत्तीचा लाभ होत गेला. लोकांनी जागत राहून वेळ घालवण्यासाठी चांदण्यात एकत्र बसून गाणी म्हणायची, खेळ खेळायचे वगैरे सुरू केले. या दिवसात चांगले दूधदुभते मिळते. त्यामुळे आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी ते प्राशन करायचे वगैरे परंपरा पडत गेल्या. ‘को जागर्ती ?’ या वाक्यावरून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे नाव पडले आणि हा दिवस साजरा करायची एक सुंदर प्रथा पडली.

चंद्राची गाणी https://anandghare2.wordpress.com/2019/10/13/%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80/

आज शारदीय पौर्णिमा….अर्थातच कोजागिरी.
चंद्र चांदणी तेजाची आज अवकाशात मुक्त उधळण. याच थीमवर आधारीत संगीताची उधळण लुटूयात.

🌹 दिनविशेष- 🌕🌙 कोजागिरी🌙
  

      थीम- चंद्र 🌝 चांदणं 🌟

1 आधा है चंद्रमा
2 चांद मेरा दिल चांदनी हो
3 चांद सा रोशन चेहरा
4 ये रात भीगी भीगी
5 तू मेरा चांद मै तेरी
6 चांद जाने कहा को गया
7 चांद को क्या मालूम
8 चांद फिर निकला मगर
9 चोदवी का चांद हो
10 धीरे धीरे चल चांद गगन
11 एक रात में दो दो चांद
12 ना ये चांद होगा
13 ओ रात के मुसाफिर चंदा
14 तुझे सूरज कहूं या चंदा
15 वो चांद खिला वो तारे
16 ये रात ये चांदनी फिर

17 खोया खोया चांद

आज कोजागिरी पौर्णिमा आहे.
योगायोग की काय कुणास ठाऊक, मी ही छतावर आणि ती ही आली होती.
असे वाटले चंद्र छतावर उतरला होता, ती माझ्यासमोर आली आणि माझ्या लक्षात आले…
“तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला।
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला!”
चंद्र खळखळून हसला. मग त्याला मी विचारले,
“मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं, मेरे यार सा हसीं?
चाँद ने कहा, चाँदनी की कसम, नहीं, नहीं, नहीं।”
“रुक जा रात ठहर जा रे चंदा!”असं म्हणत मी चंद्राला थांबण्यासाठी आर्जव केली. त्याला आकाशात रेंगाळत चालण्याची मनधरणी केली..
“धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात,
टूट ना जायें सपने
धीरे धीरे चल, चाँद गगन में!”
कदाचित, चंद्राचा सुद्धा कोजागिरी पौर्णिमेलाच वाढदिवस असावा. नाहीतर शरदाच एवढ सुंदर चांदणं दिसलं नसतं. इतकी वर्ष झाली पण अजूनही..
“तोच चंद्रमा नभात आहे अन् तिच ‘अश्विन’ यामिनी आहे, आणि मज समेत तिच ती कामिनी आहे”.
अरे! पण हे काय बघतोय मी?..
“एक रात में दो दो चांद खिले,
एक घुँघट में एक बदरीमें”
ती लाजली अन् मी बावरून गेलो.
“चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घबराया”
नक्कीच काल रात्री काय घडले म्हणुन उद्या सारे चर्चा करतील,.
“कल चौदहवी की रात थी,
शब्बभर रहा चर्चा तेरा।
कुछ ने कहा ये चाँद है,
कुछ ने कहा चेहरा तेरा।।”
यामध्ये माझी काही चुक आहे का? मी विचारतो,
“ओ रात के मुसाफिर,
चंदा ज़रा बता दे
मेरा कसूर क्या है,
तू फ़ैसला सुना दे!!”
परंतु काही असो आजतरी…..
“वो चाँद खिला, वो तारे हँसे
ये रात अजब मतवाली है;
समझने वाले समझ गये है,
ना समझे, न समझे वो अनाड़ी हैं !”

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना संगीतमय शुभेच्छा !!

अनंतचतुर्दशी

मी हा लेख अनेक वर्षांपूर्वी एका अनंतचतुर्दशीच्या दिवशी लिहिला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे मधली दोन वर्षे या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपतींचे विसर्जन होत नव्हते. या वर्षी मात्र सगळे निर्बंध उठवले असल्यामुळे धूमधडाक्यात  विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या आहेत. सगळीकडे ढोलाचे आवाज दुमदुमत आहेत.

‘अनंत’ या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. माझ्या आधीच्या पिढीतली ‘आनंद’ हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि तेंव्हा या नावाची मुलेसुध्दा अनंतांच्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी ‘आनंद’ असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते ‘अनंत’ असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या ‘अनंत’ या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून मी त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले.

सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला स्थाइक झाल्यानंतरच्या काळात मात्र ‘अनंत’ नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणाऱ्या ‘आनंदां’ची संख्या वाढत गेली, काही चिदानंद, परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला ‘अनंत’ हे नाव आता ठेवत नसेल.

‘अनंत’ या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. ‘ज्याला अंत नाही’ असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालय असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे.

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवस अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दोऱ्याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार कडक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणाऱ्यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावत असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.

आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।

हा लेख पूर्वी लिहिलेला आहे आणि यात वर्णन केलेली मिरवणुकींची धमाल दर वर्षी होत असे. या वर्षी (२०२० साली) कोरोनोच्या दहशतीमुळे सगळीकडे सामसूमच आहे.
—————————————–

मकर संक्रमण

Sankrant 2014

आज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत से वाटायचे.

संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. ते संक्रांतीचे फल घरातील सर्वांनी एकत्र बसून ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने कायमची ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित असते याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.

sankrant vahan

एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे पौष्टिक आणि शक्तीवर्धक खाणे बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि राशींच्या सीमारेषा स्पष्टपणे दिसत नसल्या तरी त्या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. त्याचे कारण नंतरच्या काळात समजले. धनू आणि मकर राशींमधल्या सीमारेषा आभाळात कोणी आंखून ठेवलेल्या नाहीत. सूर्य या राशीमधून त्या राशीत गेला ही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. आज सकाळी मी सूर्योदय छान निरखून पाहिला, तो तर रोजच्यासारखाच होता आणि कोणत्या राशीमध्ये आहे हे काही समजत नव्हते. पूर्वीच्या काळात अनेक वर्षे करून ठेवलेली काही निरीक्षणे आणि प्रचंड आकडेमोड करून गणिताच्या आधाराने मकरसंक्रमणाची वेळ ठरवली जाते. या गणिताची पध्दत आणि त्यात उपयोगात आणलेली सूत्रे परंपरेनुसार ठरत गेली. आकाशाच्या निरीक्षणाची जी अचूक साधने आज उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून सूर्याची जागा ठरवली जात नाही. असे असल्यामुळे त्या ठरवण्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. माझ्या बालपणी इतर पंचांगांमधली  मकरसंक्रांत नेहमीच १४ जानेवारीला येत असे, हल्ली ती कधी १५ तर कधी १४ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ – २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे. रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी मी फिरायला जात असल्यामुळे सूर्योदयाचा बिंदू उत्तरेकडे सरकत असलेले नजरेला चांगले जाणवते आहे.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि त्याने उत्तरेकडे सरकायची सुरुवात करणे यामध्ये आलेल्या विसंगतीला भौगोलिक कारण आहे. पृथ्वीचा आंस आपल्याला वाटतो तेवढा स्थिर नाही. ध्रुव तारा अढळ नसून हजारों वर्षांमध्ये थोडा हलत असतो. यामुळे पृथ्वीच्या आंसाचा पृथ्वीच्या कक्षेशी असलेला कोन म्हणजे त्याचा तिरकसपणा अत्यंत सूक्ष्म गतीने बदलत असतो यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजाच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. आपले पंचांग पूर्णपणे राशीचक्रामध्ये होत रहाणा-या ग्रहांच्या भ्रमणावर आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात.

मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्या खास व्यक्तींचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. या विधीमध्ये किंवा कार्यक्रमात बोरे, सोलाणे, हिरवा वाटाणा, तिळगुळाचे लाडू वगैरे त्या लहान बोळाच्या मस्तकावर ओततात आणि त्याच्या सभोवती जमलेली मुले तो खाली पडलेला खाऊ वेचतात. काही मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे.

——————-