मातेची महता सांगणारी काही लोकप्रिय गाणी या लेखाच्या खाली दिली आहेत … संपादन १७-१२-२०१८
————————
सहज कॅलेंडर पहात असतांना दिसले की परवा ५ तारखेला ‘मातृदिन’ आहे. तीन महिन्यापूर्वीच एक ‘मदर्स डे’ येऊन गेला होता. काही मुलांनी त्या दिवशी त्यांच्या मातांना भेटकार्डे पाठवली होती, तर कोणी आपल्या माताश्रींना (मातोश्री हा शब्द आता जुना झाला असावा आणि आता त्याला एक वेगळाच अर्थ येऊन चिकटला आहे.) घेऊन मॉल्समध्ये गेले होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या लिपस्टिक्स, क्रीम्स आदि सौंदर्यप्रसाधने त्यांना घेऊन दिली होती, कांही मायाळू आयांनी तिथल्या रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांची खादाडी करून घेतली होती. त्या दिवसाच्या निमित्याने मी ही एक लेख लिहून मातांची महती सांगितली होती. पण त्यानंतर आता लगेच पुन्हा एक ‘मातृदिन’ आला आहे. अर्थातच हा भारतीय किंवा मराठी संस्कृतीतला सण असणार हे उघड होते.
माझ्या आठवणीत तरी मी हा सण साजरा केलेला मला आठवत नव्हता. मी अजून लहान असतो तर हा प्रश्न माझ्या आईला विचारला असता आणि तिने नक्की त्याचे उत्तर दिले असते. सणवार, व्रतेवैकल्ये या बाबतीत माझी आई तर चालता बोलता ज्ञानकोष होती. तिला सगळ्या कहाण्या तोंडपाठ होत्या. तरीसुध्दा दर वर्षी श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घरातल्या मुलांना एकत्र बसवून त्या त्या दिवसाची किंवा तिथीची कहाणी मोठ्याने वाचायला ती मुलांना सांगत असे आणि स्वतः शेजारी बसून भक्तीभावाने त्या ऐकत असे. वाचणा-या मुलाने चूक केली तर ती लगेच दाखवूनही देत असे. पण मला तरी कधी ‘मातृदिनाची कहाणी’ वाचल्याचे आठवत नव्हते. टीव्ही पहातांना त्यातल्या एका मालिकेतल्या आईला पिठोरी अमावास्येचे व्रत करतांना एकदा दाखवले होते. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो या इच्छेने माता हे व्रत करतात म्हणून याला ‘मातृदिन’ असे म्हणत असावेत एवढे त्यातून समजले. कधी कधी मनोरंजनातूनही ज्ञानात भर पडते असे म्हणतात ते यासाठीच.
आईला विचारण्याची सोय आता उपलब्ध नसल्यामुळे गुगलवर शोध घेऊन पाहिले. मातृदिन आणि पिठोरी अमावास्येसंबंधी त्रोटक माहिती मिळाली. आपण ‘मदर्स डे’ ऐवजी ‘मातृदिन’ का साजरा करू नये? असा प्रश्नसुध्दा एका अनुदिनी लेखकाने विचारला होता. पिठोरी अमावस्येचे व्रत माता आपल्या मुलांसाठी करतात आणि मदर्स डे हा दिवस मुले त्यांच्या मातांसाठी साजरी करतात हा फरक त्याच्या लक्षात आला नसावा. “फादर्स डे आणि मदर्स डे करून जीवंतपणीच आपल्या आईबापांचे कसते दिवस घालता?” असा प्रश्न मकरंद अनासपुरे एका चित्रपटात आपल्या इंग्रजाळलेल्या मित्रांना विचारतो ते ही आठवले.
या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्यावर घेऊन “कोण अतिथी आहे काय?’ असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. “मी आहे.” आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असणार.
पुराणकाळात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात चौसष्ट योगिनी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर “तुझी-मुले जगतील’ असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.
ज्ञात असलेली बहुतेक सगळ्या प्रकारची व्रते करणारी माझी आई हे व्रत का करत नव्हती असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचे उत्तरही मिळाले. ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे असे हे व्रत नाही. ज्यांची संतती जगत नाही, अशाच स्त्रियांनी हे व्रत करावे. आमच्या घरी हा प्रॉब्लेम नसल्यामुळे हे व्रत कधी झाले नाही.
यासंबंधी अधिक माहिती गूगलवर आणि खालील स्थळांवर मिळेल.
http://marathiakanksha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html
http://zampya.wordpress.com/
मातेचे गुणगान करणारी कांही अजरामर काव्ये मातृदिनानिमित्य देत आहे.
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी ।
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी ।
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !।
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी ।
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी ।।
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई ।
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई ।।
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही ।
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई ।।
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही ।
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई ।।
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी ।
काढून ठेवलेला । घालील घास ओठी ।।
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती ।
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती ।
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’ ।।
ताईस या कशाची । जाणीव काही नाही ।
त्या सान बालिकेला । समजे न यात काही ।।
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही ।
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’ ।।
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’ ।
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’ ।।
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे ।
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे ।।
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे ।
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे ।।
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे ।
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे ।।
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला ।
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला ।।
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला ।
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला ।।
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला ।
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला ।।
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे ।।
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे ।
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे ।।
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे ।
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे ।।
कवी – यशवंत
———————————
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ।
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई ।।
मुलांनो शिकणे अ, आई ।।
तीच वाढवी ती सांभाळी ।
ती करी सेवा तीन त्रिकाळी ।
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी ।।
कौसल्येविण राम न झाला ।
देवकीपोटी कृष्ण जन्मला ।
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई ।।
नकोस विसरू ऋण आईचे ।
स्वरूप माउली पुण्याईचे ।
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई ।।
कवी – ग. दि. माडगूळकर
————————————
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते ।।
वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा ।
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते ।।
आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा ।
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें ।।
हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही ।
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते ।।
सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी ।
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें ।।
नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें ।
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें ।।
कवी – बाळ कोल्हटकर
Filed under: धार्मिक, श्रावणमास, सणवार | 1 Comment »