नऊ वर्षांपूर्वी सात भागात लिहिलेला हा वृत्तांत एकत्रित करून या लेखात दिला आहे.
कौटुंबिक संमेलन – १
अनीशच्या मुंजीला खूप लोक आले होते. त्याच्या आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक, बिल्डिंगमधले शेजारी, अनीशच्या शाळेतले त्याचे दोस्त, त्याच्या आईवडिलांची आणि आजोबाआजींची घनिष्ठ मित्रमंडळी आणि त्यांच्या ऑफिसांमधले सहकारी वगैरे वेगवेगळ्या कारणांनी त्या कुटुंबाशी जोडले गेलेले लोक आपापल्या ओळखीतल्या लोकांच्या लहान लहान कोंडाळ्यात जमून गप्पा मारत होती. त्यातले काही लोक एक ग्रुप सोडून त्यांच्या परिचयातल्या दुसऱ्या तिसऱ्या घोळक्यांमध्ये सामील होत होते, पण आधीपासून असलेल्या ओळखींच्या पलीकडे कोणीच फारसा जात नव्हता. त्यामुळे तो समुदाय एकजिनसी असा वाटत नव्हता.
प्रसादच्या डोक्यात त्यावेळीच एक कल्पना चमकून गेली की आधीपासून तो ठरवून आला होता कोण जाणे, त्याने आमच्याकडच्या सगळ्या आप्तांना बोलावून एकत्र जमवले. तो पंचवीस तीस लोकांचा जमाव झाला असेल. त्यांच्यापुढे त्याने एक प्रस्ताव मांडला, “इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे, आपले जे नातेवाईक आज उपस्थित नाहीत त्यांनाही बोलवायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. प्रत्येकजण आपापल्या येण्याजाण्याचा खर्च करतोच, त्या दिवशी राहण्याजेवण्याचा खर्च सर्वांनी समान वाटून घ्यायचा, यात कोणी यजमान नसेल की कोणी पाहुणा नसेल. आदरातिथ्य, मानपान, देणे घेणे असले कांही नाही. किती लोकांची तयारी आहे?”
आधी तर सर्वांना ही कल्पना जराशी धक्कादायक वाटली. पूर्वीच्या काळी वाहतुकीची फारशी सोय नसल्यामुळे प्रवास करणे जिकीरीचे वाटत असे. माझ्या मागच्या पिढीतले लोक फक्त महत्वाच्या कारणापुरता अगदी किमान अत्यावश्यक तेवढाच प्रवास करत असत. माझ्या पिढीतल्या लोकांनी कधी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी, तर कधी निसर्गसौंदर्य, प्रेक्षणीय स्थान किंवा ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी पर्यटन करायला सुरुवात केली होती. कधी ऑफीसकडून मिळणाऱ्या लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन किंवा असिस्टन्स वगैरेमधून तर कधी स्वतःच्या खर्चाने यासाठी कारणाशिवाय भ्रमण करणे सुरू झाले होते. पुढच्या पिढीमधली मुले एक दोन दिवस मजेत घालवण्यासाठी एकाद्या रिसॉर्टमध्ये सर्रास जायला लागली होती. पण अशा रीतीने सगळ्या आबालवृध्द नातेवाइकांनी एका ठिकाणी जमायचे ही कल्पना भन्नाट वाटत होती. एक दोन सेकंद सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून अंदाज घेत राहिले. सर्वांना ती कल्पना आवडली आणि ती प्रत्यक्षात आणायचे एकमुखाने ठरले. ठरले खरे, पण कशी हा प्रश्न होता. लग्नकार्य वगैरे ज्याच्याकडे असेल ते कुटुंब सारी व्यवस्था करते, पण अशा संमेलनाची व्यवस्था कोण करणार? अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून गेली.
या प्रश्नावर सविस्तरपणे विचार विनिमय झाला. व्यवस्था करण्यासाठी ती किती माणसांची आणि कुठे करायची याचा अंदाज करायचा होता. त्यासाठी या कार्यक्रमात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे हे आधी ठरवायला पाहिजे. एरवी पिकनिकसाठी जातांना एकाद्या भागात राहणारे लोक एका जागी जमून बसने प्रयाण करतात. बसमध्ये जागा शिल्लक असली तर जवळचे आप्त, मित्र वगैरेंना घेऊन जातात, पण तसे केले तर सर्वांना बांधणारे समान सूत्र त्यात राहणार नाही, लहान लहान ग्रुप होतील आणि आम्हाला हे टाळायचे होते. त्यामुळे फक्त जे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत अशांनाच बोलवायचे असे ठरले. माझे आजोबा आणि त्यांची मुले म्हणजे आमचे बाबा, काका आणि आत्या यातले कोणीच आता हयात नाहीत. पण या लोकांच्या पुढल्या पिढीतले आम्ही सर्वजण सख्खे, चुलत, आत्तेमामे भावंडे आहोत. ते आणि त्यांची मुले, नातवंडे एवढाच परिवाराचा आवाका निश्चित करण्यात आला. एकाद्या बहिणीचा दीर आणि तिच्या भावाची मेहुणी असे नातेवाईक त्या लोकांना कितीही जवळ वाटत असले तरी इतरांना ते परकेच वाटणार. त्यामुळे समान सूत्र रहाणार नाही. असा गोंधळ होऊ नये याचा विचार करून नातेवाइकांसाठी ही मर्यादा ठरवण्यात आली. त्या दिवशी मुंजीच्या ठिकाणी ज्या लोकांना या चर्चेसाठी एकत्र आणलेले होते ते सारे या व्याख्येत बसणारे असेच होते. ते आणि त्यांच्या परिवारातले इतर मेंबर किती आहेत त्यांची संख्या मोजली. तसेच जे आले नव्हते त्यांची नांवे लिहून संपूर्ण यादी तयार केली आणि तिथल्या तिथे त्यांना मोबाईलवरून फोन करून त्यांचे मत विचारले गेले. एकंदरीत सगळ्यांनाच उत्साह दिसत असल्यामुळे ही कल्पना पुढे रेटायचे एकमताने ठरले.
माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात संततीनियमन, कुटुंबनियोजन वगैरे शब्दसुध्दा निर्माण झाले नव्हते. त्यामुळे सरसकट सगळ्या कुटुंबांमध्ये आठ दहा मुले असतच. त्यातले अपमृत्यू, वैराग्य, आजारपण वगैरेमध्ये गाळले गेलेले वगळून घरटी सरासरी पाच धरले तरी दोन पिढ्यांमध्ये त्यांची संख्या पंचवीसपर्यंत जायचीच. माझ्या पिढीमधल्या भावंडांची संख्या त्यांच्या जोडीदारांसह पन्नासापर्यंत पोचते. त्यांनी हम दो हमारे दो या मंत्राचा अवलंब केला तरी माझ्या मुलांच्या पिढीत घरातल्या चाळीस पन्नास व्यक्ती आणि तितकेच त्यांचे जोडीदार धरून ऐंशी नव्वद होतात. त्यांच्या पुढच्या पिढीमधल्या म्हणजे आताच्या लहान बालकांची गणना धरून एकंदर संख्या दीडशेच्या वर गेली.
यातली अर्ध्याहून अधिक मंडळी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या भागात राहतात आणि उरलेली मंडळी कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरली आहेत. काही जण तर परदेशात गेलेले आहेत, त्यातले कोणी मुद्दाम या संमेलनासाठी येतील अशी शक्यता फार कमी होती. महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि इतर राज्यांमधले पन्नास टक्के लोक येतील असे धरले तरी ऐंशीच्या वर उपस्थिती अपेक्षित होती. सर्वांना येण्याच्या दृष्टीने पुणे हे मध्यवर्ती शहर सोयिस्कर पडत असल्यामुळे त्याची निवड झाली. शहरातल्या एकाद्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये जमलेले लोक तेवढ्यातल्या तेवढ्यात बाजारात जाऊन खरेदी करायचा, आणखी कुणाला भेटून यायचा किंवा असेच दुसरे एकादे काम करून यायचा विचार करतात असा अनुभव येतो. ते करायची संधी मिळू नये म्हणून शहरापासून दूर एकाद्या निवांत जागी असलेल्या रिसॉर्टवर जमायचे असे सर्वानुमते ठरले आणि पुण्यातल्या उत्साही तरुण मंडळींनी त्याची चौकशी करायची असे ठरले. दोन तीन आठवड्याच्या काळात सर्वांनी आपापल्या कुटुंबातल्या माणसांची संख्या सांगायची आणि लगोलग दर डोई पाचपाचशे रुपये जमा करायचे असेही ठरवण्यात आले.
. . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – २
संमेलनाची जागा ठरवल्यानंतर लगेच सर्वानुमते त्याची तारीखसुध्दा ठरवणे आवश्यकच होते, कारण ही पंचवीस तीस मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर पुन्हा सर्वांनी एकत्र जमून परस्पर विचार विनिमय करणे कठीण झाले असते. फार दूरवरचा विचार करण्यात बरीच अनिश्चितता येते आणि तयारी करण्यासाठी किमान थोडा तरी अवधी हवा. या दृष्टीने दीड दोन महिन्यात हे संमेलन भरवून घ्यायचे असे मत पडले आणि ते सर्वांना मान्य झाले. चातुर्मासात अनेक सणवार येतात, कोणाकोणाची व्रते वैकल्ये असतात, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी वगैरेंचे ठरलेले कार्यक्रम चुकवता येत नाहीत वगैरेंचा विचार करता त्याआधीच हे संमेलन भरवायचे ठरले. लगेच कॅलेंडर पाहून २४-२५ जुलैच्या तारखा ठरल्या आणि त्या दिवशी दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम कोणीही ठरवायचा नाही असा सर्वांना दम दिला. परगावी राहणाऱ्यांनी आताच रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवावे असे त्यांना सांगून टाकले.
हा कार्यक्रम करायचाच असे पक्के ठरवून सगळे आपापल्या घरी परतले. पुढच्या महिन्याभरात नक्की येणाऱ्यांची यादी तयार झाली आणि बरेचसे पैसेही गोळा झाले. कार्यक्रमाची जागा ठरवण्याचे काम पुण्यात रहात असलेल्या संजयने इतर पुणेकर मंडळींशी सल्लामसलत करून केले. सिंहगडाच्या पायथ्याशी, खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या किनारी आणि पानशेत धरणाच्या रस्त्यावर शांतीवन नावाचे एक रिसॉर्ट आहे. ध्यानधारणा, योगविद्या वगैरेंच्या कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग वगैरे तिथे चालत असावेत. शंभर लोकांची उतरण्याची आणि खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था या जागी ठेवले जाते असे रिपोर्ट मिळाले. ही जागा आमच्या बजेटमध्ये बसतही होती. जागेचे बुकिंग करून सर्वांना कळवून टाकले.
शांतीवनाची जागा इतर दृष्टीने जरी खूप चांगली असली तरी तिथे पोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहतुकीची व्यवस्था मात्र फारशी सोयिस्कर नाही. किंबहुना ती जवळ जवळ अस्तित्वातच नाही असेही म्हणता येईल. बाहेरगावच्या लोकांनी आधी पुण्यातल्या नातेवाइकांकडे यायचे आणि पुण्याहून तिकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करायची असा विचार सुरुवातीला केला होता. त्यासाठी एक मोठी बस भाड्याने घ्यायची की लहान मिनिबसने दोन तीन खेपा करायच्या असे पर्याय होते. जसजशी संमेलनाची तारीख जवळ येऊ लागली तसतसे लोकांचे कार्यक्रम निश्चित होऊ लागले.
वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे परिसरातल्या कांही लोकांनी आपल्या गाडीनेच पुण्याला जाऊन परत जायचा विचार केला आणि आपापल्या गाडीत आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत घेतले. नाशिक आणि बार्शीची मंडळीही आपापल्या गाड्या घेऊन आली. डोंबिवलीतल्या नातेवाइकांनी ट्रॅक्स किंवा तवेरासारखे वाहन भाड्याने घेऊन एकत्र जायचे ठरवले. म्हणजे ही सगळी मंडळी थेट शांतिवनातच पोचणार असे निश्चित झाले. उरलेल्या कांही जणांनी एक दिवस आधी पुण्याला जाऊन आपल्या आप्तांच्या घरी मुक्काम केला. आता पुण्याहून जाणारी किती मंडळी आहेत आणि त्यातल्या किती जणांच्या मोटारी आहेत यांची मोजणी आणि चर्चा झाली आणि थोडी दाटी वाटी करून बहुतेकजणांना सामावून घेता आले. ते लोक पुण्याच्या वेगवेगळ्या भागात रहात असले तरी कुणी कुणी कुणाकुणाला कुठून कुठून पिक अप करायचे हे ठरवून त्याची पध्दतशीरपणे अमलबजावणी केली. कांही लोकांचे पुण्यात असलेले नातेवाईक आमच्या कुटुंबाच्या परीघात बसत नव्हते, पण त्यांनीही मदत करून काही जणांना शांतीवनापर्यंत पोचवून दिले.
अखेरीस अपवादात्मक दोन तीन लोकच उरले होते, जिथपर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध होती तिथपर्यंत ते आले आणि कोणीतरी तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्या गाडीतून घेऊन आले. मोबाईलवरून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे कोण कोण कुठपर्यंत आणि कसे येऊन पोचले आहेत याची वित्तंबातमी कळत होती आणि एकमेकांना मार्गदर्शन करणे शक्य होते. एकमेकांबद्दल मनात असलेल्या आत्मीयतेचा प्रत्यय या पूर्वतयारीतच दिसून येत होता. ज्याला ज्याला जे जे शक्य होते ते ते तो आपणहून करत होता. कुणालाही कुणाची मदत मागायची गरज पडली नाही की कुणी त्यात आढेवेढे घेतले नाहीत. डझनभर कारगाड्या, काही मोटरसायकली आणि एक व्हॅन यातून लहानमोठी सगळी मिळून नव्वद माणसे संध्याकाळपर्यंत शांतीवनाला जाऊन पोचली.
जुलैमधला दिवस ठरवतांना पाऊस पडण्याची थोडी शक्यता धरली होती आणि त्या दृष्टीने सर्वांनी छत्र्या, रेनकोट वगैरे आणले होते, पण तो आला नसता तरी चालले असते. आदल्या दिवशी पुण्यात पाऊस पडत नव्हता, त्या दिवशीसुध्दा आधी नुसतेच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सगळेजण खूष होते. पण घरातून निघण्याच्या सुमाराला रिमझिम पाऊस सुरू झाला. जसजसे खडकवासला जवळ यायला लागले तसतसा पावसाचा जोर वाढत गेला आणि शांतीवनात पोचेपर्यंत तो धो धो कोसळायला लागला. आम्हाला या अगांतुक पाहुण्याचे स्वागत करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.
शांतीवनामध्ये वस्तीसाठी अनेक वेगवेगळी कुटीरे आहेत आणि एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त हॉल आहेत. आमच्या कार्यक्रमासाठी जो हॉल ठरवला होता, त्यात पावसाचे पाणी येऊन साठायला लागले. त्यामुळे त्याऐवजी दुसऱ्या एका जास्त बंदिस्त जागेत आमची व्यवस्था करावी लागली. खरे तर या दुसऱ्या एका हॉलमध्ये गाद्या अंथरून झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यावरच वाटले तर गप्पा मारत बसावे, वाटले तर पाय पसरावे असे करण्याची सोय होती. पण तिथेच कार्यक्रम करावा लागल्यामुळे सुरुवातीला सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचे आणि नंतर ज्याला जेंव्हा झोप येईल तेंव्हा त्याने मागच्या बाजूला पसरलेल्या पथारीवर पहुडावे असे ठरवले. याला दुसरा पर्याय तरी कुठे होता?
निरनिराळ्या दिशेने येणारी मंडळी बरोबर ठरलेल्या वेळी येऊन पोचणार नाहीत हे माहीत होतेच. पुण्याच्या स्थानिक मंडळींनी आधी पुढे जाऊन सर्व व्यवस्था पाहिली. वृध्द, महिला आणि बालकांना आत पाठवून दिले आणि युवकवर्ग येणाऱ्या मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी उभा राहिला. एक एक ग्रुप येताच आधी आलेल्या मंडळींना भेटत होता. वडिलाधाऱ्यांच्या पाया पडणे, कडकडून मिठी मारणे, मुलांना उचलून घेणे, पाठ थोपटणे वगैरे अनेक मार्गांनी भावना व्यक्त होत होत्या. एकाची विचारपूस होईपर्यंत मागोमाग दुसरे येत होते आणि त्यात सामील होत होते. तासभर तरी हा कार्यक्रम चालला होता. चहा पुरवणाऱ्याला काय इन्स्ट्रक्शन्स होत्या कोण जाणे, बाहेर कोसळणारा पाऊस पाहून खरे तर त्याने चहाबरोबर कांद्याची भजी आणावीत असे वाटत होते, पण चहासुद्धा येता येत नव्हता. याबद्दल कोणाला आणि कोणी सांगायला हवे हे जो तो एकमेकांना विचारत होता. अखेर आमची आर्जवे त्याच्यापर्यंत पोचली आणि चहाने भरलेले पिंप घेऊन तो आला तेंव्हा टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले.
. . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ३
या कौटुंबिक मेळाव्यासाठी पुण्याजवळील शांतीवनात सर्वजणांनी संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत पोचायचे अशा सूचना दिल्या होत्या आणि बहुतेक सर्वांनी तसा प्रयत्न केला होता. पण घरातून निघतांना शेवटच्या क्षणी कोणाचा फोन वाजणे, दरवाजा बंद करतांना कांहीतरी लक्षात येणे, जिन्यातून खाली उतरल्यानंतर अचानक काहीतरी आठवणे, लहान मुले असल्यास त्यांना आयत्या वेळी तहान, भूक लागणे किंवा निसर्गाची हाक येणे वगैरे प्रकार होतातच. शिवाय रस्त्यातली गर्दी, पावसामुळे संथगतीने चालणारी रहदारी अशा कारणाने विलंब होत जातो. त्यामुळे स्थानिक संयोजक मंडळी जरी वेळेवर जाऊन पोचली असली तरी सहा वाजेपर्यंत थोडेसेच लोक शांतीवनापर्यंत येऊन पोचले होते. पण त्यानंतर ते एकामागोमाग एक येत गेले आणि अंधार पडण्यापूर्वी म्हणजे सातच्य़ा आत जवळजवळ सगळे आले आणि स्वच्छतागृहाला भेट देऊन ताजेतवाने झाले. बाहेरगावाहून आलेल्या आणि पावसात भिजलेल्या लोकांनी कपडे बदलले. लहान मुलांच्या आयांनी आधीच गोड दिसणाऱ्या आपल्या मुलांना आकर्षक कपडे घालून छान सजवले. चहाचा घोट घशाखाली गेल्यानंतर सर्वांना तरतरी आली आणि औपचारिक कार्यक्रमासाठी सगळे तय्यार होऊन बसले.
इतर कसलेही कारण नसतांना आपण सगळ्यांनी एकदा निव्वळ एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि एकादा दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करण्यात घालवायचा. अशी सुरुवात झाली होती आणि त्यासाठी मुबलक वेळ ठेवला होता. तरीसुध्दा हा कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय व्हावा, त्यात सर्वांनी उत्साहाने भाग घ्यावा, सर्वांना मनसोक्त आनंद मिळावा म्हणून त्याची एक रूपरेखा आखायचे ठरवले आणि आमच्यातल्या कांही उत्साही तसेच अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन फोनाफोनी केली आणि आपसातच कांही गोष्टी ठरवल्या. एकमेकांची माहिती आणि विविधगुणदर्शन ही दोन मुख्य सूत्रे ठरवून कांमाची वाटणी करून घेतली. त्यातले पहिले काम मी करायचे ठरले आणि पंधरा वीस दिवस आधीपासूनच मी त्यासाठी कामाला लागलो.
फार पूर्वीच माझ्या माहितीनुसार मी एक वंशावळ तयार करून ठेवलेली होती. श्रीरंगनानाने त्याच्याकडली लिस्ट पाठवली. दोन्ही पाहून झाल्यावर गरजेप्रमाणे काही लोकांना फोन करून त्यातले कांही तपशील पडताळून पाहिले आणि नव्या सदस्यांची भर घालून ती वंशावळ अद्ययावत केली. आजोबा आजींपासून नवजात बालकांपर्यंत सुमारे दोनशे लोकांची ही यादी कशी सादर करता येईल याचा विचार करत असतांनाच पॉवर पॉइंटमध्ये ते काम करायची कल्पना श्रीने सुचवली आणि मी ती लगेच उचलली. वरपासून सुरुवात करून एक जोडपे आणि त्यांची अपत्ये एवढीच नांवे एका स्लाइडमध्ये घातली. त्यातली एक एक मुले, त्यांच्या पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले पुढल्या स्लाइडमध्ये दाखवली. अशा वीस पंचवीस स्लाइड्स तयार केल्या. पॉवर पॉइंट या दृष्य माध्यमाचा अधिक उपयोग करून घेण्यासाठी स्लाइडमध्ये दाखवलेल्या नांवांच्या पाठोपाठ त्यांची छायाचित्रे दाखवायचे ठरवले. त्यासाठी माझ्याकडे असलेले सारे आल्बम काढून त्यातले फोटो निवडले. अनेक जणांनी आपापल्या कुटुंबांचे फोटो मेलने पाठवले. चैतन्य आणि उत्कर्ष आपटे कुटुंबाचा आल्बम घेऊन माझ्याकडे आले. माझ्या जन्मापूर्वी काढलेला माझ्या आजीआजोबांचा एक ऐतिहासिक फोटो मिळाला. माझ्या लहानपणच्या आमच्या घरात असलेला ऐतिहासिक आल्बमच बार्शीहून आला. त्यातली लहान लहान बालके आता आजोबा किंवा आजी झाल्या आहेत. त्यातल्या फोटोंचे संकलन करून एक अमूल्य असा ठेवाच मिळाला. आमचे आजोबा आजी आणि आईवडील ज्या खेडेगावांमध्ये रहात होते त्या गावाचे स्थान दाखवण्यासाठी गूगलअर्थवरून नकाशा काढला आणि त्यात खुणा करून कोण कोण कुठे रहात होते किंवा आता राहतात ती गावे दाखवली. हे सगळे काम करतांना जी मजा आली तिचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.
पॉवर पॉइंटवर तयार केलेले हे प्रेझेंटेशन दाखवायची सोय कशी करायची हे पहायचे काम उदयला दिले. शिवाय शंभर लोकांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोलणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठी ध्वनिसंवर्धक, ध्वनिप्रक्षेपक असली उपकरणे (माइक, स्पीकर वगैरे) हवीतच. त्यांची सोय शांतीवनाच्या हॉलमध्ये असल्याचे समजले. पण तिथे प्रोजेक्टरची सोय मात्र नव्हती. ती करणे आवश्यक होते. त्या वेळी असा प्रक्षेपक कोणाच्याही घरी नव्हताच आणि कोणीच या व्यवसायात नसल्यामुळे माझ्या काँप्यूटरशी सख्य साधू शकेल असा प्रोजेक्टर शोधून काढून तो भाड्याने आणणे हे एक जास्तीचे काम होऊन बसले. (आज फक्त एक टीव्ही आणि एक मोबाईल स्मार्टफोनवर हे काम करता येते पण तेंव्हा तशी सोय नव्हती.) सोयीच्या दृष्टीने शांतीवनात घेऊन जाण्यासाठी मी आपला लॅपटॉप पुण्याला नेला आणि त्याच्याबरोबर कम्पॅटिबल असा प्रोजेकेटर बाजारात निवडून त्याची ट्रायल घेतली. तोपर्यंत तिकडे जाण्यासाठी निघण्याची वेळ झालीच होती. त्यातून आयत्या वेळी गोंधळ झालाच तर वेळ निभावून नेण्यासाठी पुरेसे प्रिंटआउट काढून नेले होते. त्यात चित्रे आली नसली तरी सुवाच्य अक्षरात नामावली तरी दिसली असती आणि सर्वांना वाचता आली असती.
इतर लोकांनीसुध्दा आपापल्या परीने पुरेपूर तयारी केली होती. गायन वादनात प्रवीण असणारे कलाकार आपापली वाद्ये घेऊन आले. तबले, डग्गे, हार्मोनियम वगैरे आलेच, ढोलक, कोंगो बोंगो, कीबोर्ड आणि गिटार वगैरे सर्व वाद्यांनी सुसज्ज असा वाद्यवृंद तयार झाला. मंचावर त्याची मांडणी करणे, त्यांना वीजपुरवठा जोडणे वगैरे तयारी पाहून आता इथे काहीतरी घडणार आहे हे सर्वांना समजले आणि ते सज्ज होऊन पुढे येऊन बसले.
. . . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ४

आमचा हा कौटुंबिक मेळावा २४- २५ जुलैला करायचा ठरवला होता आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आमच्यातल्या एका अत्यंत घनिष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणजे विमलताईचे देहावसान झाल्याच्या वृत्ताने साऱ्या कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. आता या मेळाव्याचे ठरल्याप्रमाणे आयोजन करावे की करू नये, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण दुःखाचा पहिला आवेग ओसरल्यानंतर सर्वांनी फोनवर विचारविनिमय केला. पुढच्या पिढीमधल्या मुलांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याची आखणी केली होती, त्यांच्या, मागल्या आणि पुढल्या पिढीमधल्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यातला प्रयत्न आणि उद्देश स्तुत्य आणि महत्वाचा होता हे पाहून त्याला हिरवा कंदील मिळाला आणि नियोजित कार्यक्रमाची गाडी पुढे सरकली. पण आमच्या कुटुंबाच्या एका शाखेतून मात्र कोणीच आले नाहीत. ती मंडळी आली असती तर उपस्थितांची एकंदर संख्या सहज शंभरावर गेली असती. या मेळाव्याबद्दल स्वतः विमलताईला खूप इंटरेस्ट होता आणि प्रकृती तितकीशी ठीक नसतांनाही तिथे यायचे ती ठरवत होती. जर तिला ते शक्य झाले असते तर बाकीचेही सगळेच आले असते आणि आमचे संमेलन परिपूर्ण झाले असते. पण काळाला ते मंजूर नव्हते. त्यामुळे निरुपाय झाला.
या मेळाव्यातल्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत गांभिर्याने झाली. सभामंचावरील रंगीत पडद्यावर एक शुभ्र बेडशीट लावून तयार केलेल्या कामचलाऊ स्क्रीनवर आधी विमलताईचे छायाचित्र दाखवले. अदृष्यपणे तीसुध्दा त्या ठिकाणी आली असेल अशी मनात कल्पना करून साश्रु नयनांनी तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आणि त्यानंतर मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात केली. आमच्या पिढीमधल्या सर्वांचे आजोबा आणि आजी यांची थोडक्यात माहिती सांगून त्यांचे वास्तव्य असलेले खेडेगांव नकाशात दाखवले. आमची पिढी त्या गावाच्या जवळपासच्या परिसरात वाढलेली आहे, पण पुढील पिढीमधल्या मुलांपैकी काहीजणांनी तो भाग पाहिला नसण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी त्या भागाची झलक दाखवली. माझ्या वडिलांच्या पिढीमधले सारेच लोक आजोबांचे खेडे सोडून आधी तालुक्याच्या गावात येऊन स्थाइक झाले होते. नंतरच्या काळात सगळे तिथूनही चारी दिशांना पांगले.
सत्तर वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक पण अजूनपर्यंत शाबूत असलेल्या छायाचित्रात मागील पिढीतल्या बहुतेक मंडळींचे दर्शन घडले. ती पिढी आता काळाआड गेली आहे. आमच्या पिढीमधले बरेचजण बालकांच्या स्वरूपात या फोटोत दिसतात. त्यातल्याही कांही व्यक्ती आता नाहीत, तर माझ्यासकट कांही भावंडांचे जन्मसुध्दा तेंव्हा झालेले नसल्यामुळे आम्ही त्या फोटोत दिसत नाही. ही सारी मंडळी जवळची आणि नेहमीच्या पाहण्यातली असल्यामुळे त्यांचे जुने बालरूप पाहून त्यातल्या लोकांना बालपणीच्या अंधुक झालेल्या आठवणी ताज्या झाल्या आणि इतरांना ते खूपच मनोरंजक वाटले.
त्यानंतर आमच्या पिढीमधील एक भाऊ किंवा बहिण आणि तो संपूर्ण परिवार यांची नावे स्क्रीनवर आली की त्यांच्यापैकी जेवढे लोक आले आहेत त्यांनी मंचावर यायचे आणि आपली ओळख करून द्यायची, त्यांच्या परिवाराचे निवडक फोटो दाखवायचे, जे आले नसतील त्यांची माहिती सांगायची असा क्रम सुरू केला. भिडस्तपणामुळे स्वतःबद्दल कोणी सहसा जास्त बोलत नाही हे पाहून एकेकाने इतरांबद्दल सांगितले आणि त्यातून निसटलेल्या कांही महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी मी किंवा प्रेक्षकांमधून कोणीतरी मंचावर येऊन सांगितल्या. अशा प्रकारे हा ओळख करून घेण्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि जवळ जवळ दोन तास चाललेला होता. तो संपत आलेला असतांनाच अचानक वीज गेल्यामुळे प्रोजेक्टर बंद पडला. तोपर्यंत भोजनाची तयारी झाली होती आणि लोकाच्या पोटात भुकाही लागल्या होत्या. त्यामुळे इमर्जन्सी लाइट्सच्या उजेडात सारे भोजनालयाकडे रवाना झालो.
भोजनालय शांतीवनातल्याच दुसऱ्या ठिकाणी होते. चांगला मोसम असता तर त्या रम्य परिसरात हिंडत फिरत जायला मजा आली असती. पण वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, खाली शेवाळ साठून निसरडा झालेला रस्ता, तोसुध्दा अनेक जागी उंच सखल, चढउतार आणि पायऱ्या वगैरेंने भरलेला, वीज गेल्यामुळे गुडुप काळोख यामुळे हे लहानसे अंतर चालणेसुध्दा जिकीरीचे वाटत होते. कांही लोकांनी दूरदर्शीपणा दाखवून टॉर्च आणले होते, कांही लोकांनी मोबाइलचा उजेड दाखवला. विशेषतः पायऱ्या असलेल्या जागी कोणी ना कोणी उभे राहून मागून येणाऱ्यांना सावध करत होता. जेवण मात्र छान असल्यामुळे केलेल्या श्रमांचे सार्थक झाले. बहुतेकांच्या आवडीचा कोणता ना कोणता पदार्थ त्यात असल्याने सर्व मंडळी तृप्त होऊन हॉलमध्ये परतली. जास्तच वयोवृध्द लोकांसाठी भोजनाची ताटे भरून त्यांना हॉलमध्ये नेऊन दिली.
कार्यक्रमाची रूपरेषा आखतांना सहा साडेसहाला सुरुवात करायची आणि तासाभरात ओळखीचा भाग संपल्यावर भोजनापूर्वी पुष्कळ वेळ शिल्लक असेल त्यात आपल्या कुटुंबाचा इतिहास थोडक्यात सादर करायचा असा विचार मी केला होता. गेल्या शंभर वर्षांचा त्रोटक आढावा घेतांना त्यातील प्रत्येक दशकातली जागतिक आणि देशामधली परिस्थिती आणि घटना यांच्या बरोबरीने त्या काळखंडात घडलेल्या आपल्या कुटुंबातल्या महत्वाच्या घटना सांगत जाणारा एक माहितीपट मी तयार केला होता. तो ऐकायला कदाचित रुक्ष वाटेल म्हणून त्यातील महत्वाच्या टप्प्यांवर त्या काळात लोकप्रिय असलेले एक गाणे टाकून लोकांचे थोडे मनोरंजन करायची कल्पना होती आणि त्यासाठी बरीच माहिती जमवली होती. चांगल्या आवाजाची देणगी लाभलेल्या मुलांमुलींमध्ये ही गाणी वाटायची, त्यांनी ती तयार करून ठेवायची आणि ठरलेल्या स्लॉटमध्ये गायची असा विचार होता. पण इतर अनेक उद्योग आणि अडचणी सांभाळता सांभाळताच वेळ निघून गेल्यामुळे या कार्यक्रमाचे पध्दतशीर नियोजनच करता आले नाही. रिहर्सल करायचा प्रश्नच उद्भवला नाही. हा कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेला टाइमस्लॉटही मिळाला नाही. ज्यांनी यासाठी थोडी तयारी केली होती तिचा उपयोग भोजनोत्तर कार्यक्रमात केला.
. . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ५

शनिवार रात्रीचे जेवणखाण उरकून सारी मंडळी शांतीवनातल्या हॉलवर परत येईपर्यंत वीज आली होती, रंगमंचावर तबला, पेटी, सिंथेसाइजर, गिटार वगैरे वाद्यांची मांडणी करून ठेवली होती आणि वादक मंडळी तयारीत होती. लोक परत येताच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. रात्रीचे साडेदहा वाजून गेले असले तरी अख्खा बालचमू टक्क जागा होता आणि उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पहात होता. काही मुलांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केली होती. पाच वर्षाच्या निधीने काही उत्कृष्ट कविता आणि गद्य उतारे पाठ करून ठेवले होते, ते अस्खलित वाणीत सादर केले. पाठांतराची आणि सादरीकरणाची तिची क्षमता बघून सगळे थक्क झाले. सहा वर्षाच्या इराला राधा ही बावरी हे गाणे आधीपासूनच तोंडपाठ होते आणि त्या गाण्याची चालही तिच्या ओठावर होती, तरीही आदले दिवशी ती हे गाणे सतत तासभर ऐकत होती. त्यातल्या आआआ, ईईई, एएए वगैरे खास लकेरींच्या जागा आणि रिकाम्या जागा (पॉजेस) लक्षपूर्वक ऐकून तिने घटवून ठेवल्या आणि वादक साथीदारांनी दिलेल्या ठेक्यावर जशाच्या तशा सादर करून तुफान टाळ्या मिळवल्या. तीन साडेतीन वर्षांच्या चिटुकल्या आणि धिटुकल्या प्रियाने बडबडगीते, प्रार्थना, नर्सरी ऱ्हाइम्स वगैरे जे जे त्या क्षणी सुचेल ते बिनधास्तपणे गाऊन घेतले. अजय-अतुल यांची गाणी श्रेयस आणि सर्वेश ही भावंडे फर्मास गातात. त्यांचे मल्हार वारी तर अफलातून झाले. केतकी, अक्षय, प्रणीता, सानिका वगैरे इतर मुलांनाही या गाण्यांवरून स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी एकेकट्याने किंवा समूहात निरनिराळी गाणी गाऊन धमाल आणली. शुभंकरोती ते अग्गोबाई ढग्गोबाई आणि ट्विंकल् ट्विंकल ते ऑल ईज वेल् पर्यंत अनेक लोकप्रिय मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी या मुलांनी म्हंटली. त्यात बालगीते, बडबडगीते ते भक्तीगीते आणि चित्रपटगीते वगैरे सगळ्या प्रकारची गाणी झाली. बहुभाषी तृप्तीने मराठी आणि हिंदीशिवाय कन्नड आणि तामीळ भाषेतली गाणी गाऊन दाखवली. जवळजवळ तासभर मुलांनीच रंगमंच गाजवला.
मुलांचा उत्साह ओसरल्यानंतर मोठ्या लोकांना संधी मिळाली. सुधा आणि अलका या पट्टीच्या गायिकांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवलेली आहे. त्यांनी त्यांची निवडक गाणी गायिलीच, कांही खास गाण्यांची फरमाईशही त्यांना झाली. प्रशांत आणि प्रिया (मोठी) आता तयार झाले आहेत. उदय, जितेंद्र आणि मंजिरी यांचे गळे चांगले आहेत आणि त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी थोड्या गाण्यांची तयारी करून ठेवली होती, ती सराईतपणे सादर केली. शिवाय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेकांना आग्रह करकरून एक दोन गाणी म्हणायला लावली. सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. एका लहानशा ग्रुपने कार्यक्रम करायचा आणि इतरांनी तो ऐकायचा असे त्याचे स्वरूप नव्हते. ज्यांना मंचावर यायला संकोच वाटत होता त्यांना बसल्या जागी माईक देण्यात आला. सत्तरीतल्या विजयावहिनी आणि सुलभावहिनी यांनीसुध्दा सुरेल गाणी गायिली.
आमच्याकडल्या संगीताच्या घरगुती बैठकींमध्ये हार्मोनियमची साथ नेहमी प्रभाकर करतात, तशी त्यांनी बराच वेळ केली. अधून मधून इतरांनीही पेटी वाजवून त्यांना विश्रांती दिली. प्रशांतला तबलावादनामध्ये तालमणी हा खिताब मिळालेला आहे. त्याला साजेशी कामगिरी थोडा वेळ करून त्याने तबला डग्गा मीराच्या स्वाधीन केला आणि तो स्वतः सिंथेसाइजरवर बसला. पुढले दोन अडीच तास तबला वाजवून मीराने सर्वांना चकित केले. प्राचीने शास्त्रीय संगीताची झलक दाखवली. मैत्रेय अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत गिटार वाजवून साथ देत होता. त्याने कांही सोलो पीसेसही वाजवून दाखवले. अच्युत, मिलिंद, चैतन्य वगैरे अधून मधून इतर तालवाद्यांवर ठेका धरत होते. यातली गंमत म्हणजे ही सगळी मंडळी वेगवेगळ्या गांवाहून आली होती आणि शांतीवनातल्या स्टेजवरच एकत्र जमली होती. त्यांनी कुठल्याच गाण्यांची आधी प्रॅक्टिस केलेली नव्हती. कोणची गाणी कोण गाणार आहे हेच मुळी ठरलेले नव्हते. संगीतसंयोजन, स्वरलिपी वगैरे प्रकार नव्हतेच. सर्वांनीच आपापल्या हातातली वाद्ये उत्स्फूर्तपणे सुचेल आणि जमेल तशी वाजवूनसुध्दा त्यात सुरेख मेळ जमून येत होता. अशा बैठकांमध्ये सूर ताल लय वगैरेंचा फारसा कीस कोणी काढत नाही, पण गोंगाट आणि संगीत यातला फरक कानाला समजतोच. संपूर्ण कार्यक्रमात गोगाटाचा अनुभव अगदी क्वचित आला आणि बहुतेक वेळ सुरेल संगीतच ऐकायला मिळत गेल्याने त्याची रंगत वाढत गेली.
तबला, पेटी, सिंथेसायजर, गिटार वगैरे वाद्ये आणि वादक मंडळींनी तिथला लहानसा मंच भरून गेला असल्यामुळे नृत्य किंवा नाटक सादर करायला जागाच नव्हती. स्टेजच्या समोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेत काही लहान मुले उडत्या चालीच्या गाण्यांच्या तालावर नाचून घेत एवढेच. पण गाण्यांखेरीज इतर काही आयटम सुध्दा या कार्यक्रमात सादर झाले. शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या चालीवर प्रसाद आणि सुनीतीने ‘दे आता करुनी चहा’ हे विनोदी द्वंद्वगीत गाऊन दाखवले तर देहाची तिजोरीच्या चालीवर यशवंत देवांची ‘पत्नीची मुजोरी’ ही कविता प्रसादने ऐकवली. कोल्हापूर रेडिओस्टेशनवर चालत असलेले पैलवानांच्या शरीरसौष्ठवावरचे भाषण आणि सांगली केंद्रावर चालत असलेली एक पाककृती यातली वाक्ये आलटून पालटून वाचून त्यातून येणारी धमाल या जोडीने ऐकवून पोट धरधरून हसायला लावले. स्वतःचे हंसू आवरून ठरलेली वाक्ये न विसरता गंभीरपणे म्हणणे हे कठीण काम त्यांनी सहज केले. टीव्ही येण्याच्या आधीच्या काळात अशा प्रकारचे विनोदी मिश्रण खूप पॉप्युलर होते. पण जवळ जवळ वेव्हलेंग्थ असलेली दोन आकाशवाणी केंद्रे एकाच वेळी रेडिओवर लागणे शक्य होते, तसे दोन टीव्ही चॅनल लागत नाहीत, शिवाय दृष्य चित्रांची मिसळ करणे जास्त कठीण असते यामुळे रेडिओबरोबरच विनोदाचा हा प्रकार मागे पडत गेला.
कॉलेजकुमार उत्कर्ष मासिकासारखे दिसणारे एक पुस्तक हातात धरून स्टेजवर आला आणि त्याने दोन अर्थपूर्ण कविता वाचून दाखवल्या. तो प्रसादनंतर लगेचच आल्याने त्यानेसुध्दा त्याला आवडलेल्या पण फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या कविता वाचल्या असाव्यात असे वाटले. त्या कविता त्याने स्वतः रचल्या होत्या, त्याच्या कॉलेजच्या स्मरणिकेत त्या प्रसिध्द झाल्या होत्या आणि प्रत्यक्ष कवीवर्य विंदा करंदीकर यांनी त्याबद्दल त्याला शाबासकी दिली होती हे नंतर बोलण्यातून कळले. माणसाने विनयी असावे, पण आपल्या गुणांची आणि मिळालेल्या यशाची थोडी प्रसिध्दी करावी किंवा खुबीने करवून घ्यावी असा सल्ला मी त्याला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीच करत नव्हता. सगळा उत्स्फूर्त मामला होता. पण अधून मधून स्टेजवर येऊन विनोदी चुटके सांगायचे काम मिलिंद करत होता. त्याच्याकडे विनोदी किश्श्यांचा भरपूर स्टॉक होता आणि होऊन गेलेल्या गाण्याशी सांगड घालून त्यातला नेमका जोक नाट्यपूर्ण पध्दतीने सांगण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. त्याच्या खुसखुशीत कॉमेंट्समुळे कार्यक्रमाला जीवंतपणा येत होता.
रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जेंव्हा सध्याचे टॉपहिट गाणे ‘आता वाजले की बारा’ सुरू झाले तेंव्हा घड्याळात अडीच वाजले होते. त्यानंतर तो आवरता घ्यायचे ठरले. तरीही आणखी एक आणखी एक असे करत भैरवी संपेपर्यंत तीन वाजले होते. हॉलभर गाद्या बिछवून ठेवल्या असल्याने बरीचशी मंडळी गाणी ऐकता ऐकता जागीच आडवी झाली होती. पाच सहा कॉटेजेसमध्ये ज्येष्ठ सदस्यांची सोय केलेली होती. आपापल्या जागी जाऊन निजानीज होईपर्यंत आणखी अर्धा तास गेला. पाऊस पडतच होता. कॉटेजच्या वर पत्र्याचे छप्पर असल्यामुळे तव्यावर लाह्या फुटाव्यात तसे पावसाचे थेंब त्यावर तडतड करत होते. पावसाच्या जोराबरोबर त्याची लय कमी जास्त होत होती. पण त्या लयीवरच निद्रादेवीची आराधना करत असतांना ती प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना आपल्या आधीन करून घेतले.
. . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ६
खडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात आयत्या वेळी बरेच बदल करावे लागले.
आदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणाऱ्या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण सर्वजण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे सर्वांना आता त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन टॉयलेट ब्लॉकपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता तशी कमीच झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी म्हणून पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.
नाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी आपल्याला इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर मात्र कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.
न्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.
आता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक कुटुंबामागे फक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी तू कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. पण हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच पुन्हा लाइट गेले आणि तो बंद पडला.
वीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.
. . . . . . .. . . . . . . . . . . . .
कौटुंबिक संमेलन – ७ (अंतिम)

मधुकरला पहिल्यापासूनच नाटकाची आवड आणि अभिनयाचे अंग असल्यामुळे तो गेली चाळीस पन्नास वर्षे या क्षेत्रात वावरतो आहे. बरीच वर्षे हैद्राबादला असतांना तो तिथल्या महाराष्ट्रमंडळाचा अत्यंत उत्साही आणि सक्रिय कार्यकर्ता होता. दरवर्षी नवनवी नाटके बसवून तिथल्या मराठी समाजापुढे सादर करण्यात तो नेहमीच पुढाकार घेत असे. पुण्याला स्थायिक झाल्यानंतरही तो त्याच्या वसाहतीतील सांस्कृतिक विश्वात सक्रिय आहे. आमच्या कौटुंबिक संमेलनात त्याच्या अभिनयकौशल्याची झलक दाखवायचे ठरलेलेच होते, पण शनिवारी रात्री झालेल्या विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमात संगीताचेच प्राधान्य होते आणि शांतीवनातल्या छोट्याशा मंचावर मांडलेली वाद्ये बाजूला करून मोकळी जागा करणे व पुन्हा ती सारी मांडून त्यांची विजेशी जोडणी करणे बरेच कठीण होते. त्यामुळे मधुकरचा नाट्याविष्काराचा कार्यक्रम रविवारी सकाळी करायचे ठरवले. त्या दिवशीही अनपेक्षितपणे वीज गेली. तरीही मायक्रोफोनच्या मदतीशिवाय त्याने शारदा नाटकातला एक प्रवेश अप्रतिम पध्दतीने सादर केला. त्यातल्या निरनिराळ्या पात्रांच्या बोलण्यातल्या वेगवेगळ्या लकबी आणि हावभावांमधले बारकावे वगैरे सारे त्याने एकट्याने सादर करून शारदा नाटकातला तो प्रसंग केवळ आपल्या अभिनयकौशल्याने जसाच्या तसा उभा करून दाखवला.
नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे सबकुछ जबाबदाऱ्या प्रभाकर एकट्याने पेलतात. त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि बसवलेल्या एका नाटकातला प्रवेश त्यांनी सादर केला. त्या नाटकाचे कथानक, त्यातली पात्रे आणि तो विशिष्ट प्रसंग वगैरेंचे मार्मिक विवेचन करून त्यांनी नाट्यसृष्टीतले अंतरंग थोडेसे उलगडून दाखवले. नटाने नाटकातल्या एकाद्या भूमिकेत शिरणे वगैरे सगळ्या गप्पा असतात, तसे करणे शक्य तर नसतेच आणि इष्टही नसते, कोणीही तसे प्रत्यक्षात करत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि शब्दांच्या फेकीतून तसा आभास तो निर्माण करतो. नाटक पहातांना आपल्यालाही त्या नटाचे अस्तित्व जाणवल्याशिवाय रहात नाही. असे त्यांनी ठामपणे सांगितले. मागे एकदा पुलंच्या एका मुलाखतीत त्यांनीसुध्दा असेच काहीतरी सांगितल्याचे मला आठवते.
सुधा, शैला वगैरेंनी त्यांच्या बालपणातल्या काही डोळ्यात पाणी आणणाऱ्या हृदयस्पर्शी आठवणी तर गुदगुद्या करणाऱ्या काही खुसखुशीत हकीकती सांगितल्या. इतरांनीही त्यात भर घातली. पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या आईने रचलेले अंबरीशाचे आख्यान सरोजला अजून तोंडपाठ आहे. ते तिने केवळ स्मरणातून पूर्ण ऐकवले. आईने केलेल्या आणखी कांही निवडक कवनांचे मी वाचन केले. नंतर आपण केलेले एक विडंबनही वाचून दाखवले. मानसीने रंगवलेल्या अप्रतिम चित्रांचे एक लहानसे प्रदर्शन त्या हॉलमध्ये भरवले होते. तिने काढलेली सुंदर चित्रे त्यासाठी रंगमंचावरील पडद्यावरच चिकटवली किंवा टाचली होती. प्रभाकरांनी आपल्या सुवाच्य अक्षरात लिहून आणि रेखाचित्रांनी सजवून प्रदर्शनात ठेवलेल्या कवितांचे नमूनेही हॉलमधल्या भिंतीवर लावले होते.
या प्रसंगी आलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या नातवंडांकडून सत्कार करण्यात आला. एक पुष्पगुच्छ आणि नारळ देणे आणि वाकून नमस्कार करणे एवढेच त्याचे स्वरूप होते. ज्यांची नातवंडे हजर नव्हती त्यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबातल्या तिथे आलेल्या सर्वात लहान असलेल्या व्यक्तींनी केला. या कार्यक्रमाचे संयोजन आणि त्यासाठी सारी धावपळ करणाऱ्या युवकांचाही नामनिर्देश करून वडिलधाऱ्यांच्या हस्ते त्या सर्वांना फूल आणि नारळ दिले. तोपर्यंत भोजनाची व्यवस्था झाली असल्याची वर्दी आली.
पुण्यातले कांही लोक जेवणासाठीही शांतीवनात न थांबता सरळ आपल्या घरी परतले आणि बाहेरगावाहून आलेले काही लोक जेवण आटोपून लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे भोजनोत्तर कार्यक्रमासाठी अर्धेच लोक शिल्लक राहिले होते. त्यांनाही परत जावेसे वाटायला लागले होते, पण त्यानंतर जादूचे प्रयोग असल्याची घोषणा केली गेल्यामुळे छोट्या मुलांनी त्यांना जाऊ दिले नाही. हा खेळ शांतीवनातर्फे दाखवला जाणार होता. सर्वांनी भोजनालयात जाऊन आणि जेवण करून परत हॉलमध्ये येईपर्यंत स्टेजवर टेबल ठेवून जादूच्या खेळाची तयारी सुरू झाली होती, पण विजेचा मात्र पत्ता नव्हता. आता मात्र ती येईपर्यंत थांबून तिची वाट पहायची कोणाचीही तयारी नव्हती आणि जादूगारालासुध्दा संध्याकाळी आणखी कुठे जायचे असावे. त्यानेही लाइटिंग आणि माइकशिवायच प्रयोग सुरू करून दिला. कदाचित त्याच्यासाठी हे रोजचेच असेल. तुकडे तुकडे केलेल्या रिबीनीमधून अखंड रिबीन काढून दाखवणे, एकादी वस्तू टेबलावरून अदृष्य करून कोणाच्या खिशातून किंवा टोपीतून ती बाहेर काढणे, रिकाम्या थैलीमधून कबुतरे काढणे वगैरे हातचलाखीचे नमूने दाखवून त्याने छान मनोरंजन केले. यातली ट्रिक शोधून काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्या जादूगाराच्या हुषारीची मजा घेत त्याला दाद देणेच मी जास्त पसंत करतो. मुलांना तर ते खरेच वाटते आणि ती विस्मयचकित होतात.
जादूचे प्रयोग संपल्यावर मात्र तिथे जास्त वेळ थांबायची कोणाची तयारी नव्हती. पावसाचा जोर वाढतच होता आणि तो कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. रविवारी संध्याकाळी खडकवासला धरणाच्या काठावर पिकनिकला किंवा भटकंतीला येणाऱ्या पर्यटकांची भरपूर गर्दी असणार हे माहीत होते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निघणे चांगले होते. परतीच्या प्रवासात कोणाकोणाच्या गाडीत कोणाकोणाला घ्यायचे याची चर्चा करून ते नक्की केलेले होतेच. आमच्या गाडीमधल्या पॅसेंजरांना गोळा करून आम्हीही परतीला निघालो. बरोबर नेलेल्या सगळ्या सामानाची आवराआवर करून आणि बिले भागवणे वगैरे उरलीसुरली कामे आटोपून शेवटची बॅचसुध्दा तासाभरात परतली.
औपचारिक रीतीने या कार्यक्रमाचा समारोप सोहळा असा झालाच नाही. टेलीफोनवर आणि ईमेल, ऑर्कुट, फेसबुक वगैरे माध्यमातून एकमेकांशी संवाद चालत राहिला आणि अजून तो चालला आहे. एकंदरीत पाहता मजा आली असाच सूर यातून निघत आहे.
———————————————-
हे लिखाण मी नऊ वर्षांपूर्वी केले होते. त्या वेळी जमलेल्यातल्या काही व्यक्ती दुर्दैवाने आज आमच्यात नाहीत. त्यानंतर असे कौटुंबिक संमेलनही पुन्हा होऊ शकले नाही.
. . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . (समाप्त)
Filed under: अनुभव, विविध विषय, सामाजिक समारंभ | Leave a comment »