पावसाची गाणी – भाग ४

पूर्वीचे भागः भाग १,   भाग २,   भाग ३    अनुक्रमणिका

पूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे सुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत. त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे. या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते. भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.

आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।

आजवरी यांना किती जपलं जपलं ।
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।

येगळी माती आता ग येगळी दुनिया ।
आभाळाची माया बाई करील किमया ।
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।

आकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका कवितेत मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।

वरील गाणे खूप वर्षांपूर्वीचे आहे. थोड्याच वर्षांपूर्वी आलेल्या आईशप्पथ या सिनेमासाठी कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या एका वर्षागीतालाही अशोक पत्की यांनी नव्या प्रकारची छान संगीतरचना केली आहे. त्यांनी दिलेल्या चालीवर साधना सरगम या हिंदी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या मराठी गायिकेने हे मधुर गाणे गायिले आहे.

ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची ……

सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।

जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची …….

‘येरे येरे पावसा’ या काही पिढ्यांपासून चालत आलेली पावसावरील बालगीतांची परंपरा चालतच राहिली आहे. ‘पाऊस आला वारा आला’ हे श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले एक गाणे आधीच्या भागात येऊन गेले आहे. त्यांनीच संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले श्रीनिवास खारकर यांचे एक गीत असेच अजरामर झाले आहे. अलीकडे सारेगमपच्या स्पर्धेमध्ये बालकराकारांनी हे गाणे सादर केले तेंव्हा ”हे गाणे आमच्या लहानपणी आम्ही गात होतो” असे उद्गार परीक्षकांनी काढले होते.

टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।

ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।

फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?

लतादीदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंडे संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आणि दीर्घकाळ त्यांनी त्या क्षेत्रावर राज्य केले आहे. त्यांनाच मीना खडीकर नावाची एक सख्खी बहीण आहे आणि ती देखील त्यांच्यासारखीच संगीतात प्रवीण आहे या गोष्टीला मात्र तेवढी प्रसिध्दी मिळालेली नसल्यामुळे काही लोकांना ते माहीत नसण्याची शक्यता आहे. या मीनाताईंनी सुप्रसिध्द कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवरील खाली दिलेले गाणे गाजले होते. सारेगमपच्या बालकलाकारांच्या स्पर्धेमधून ते अलीकडे पुन्हा ऐकायला मिळाले. ते ऐकतांना मला जगजितसिंगांच्या ‘वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी’ या सुप्रसिध्द गाण्याची आठवण आली.

ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।

मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।

खिडकीखाली तळे साचले ।
गुडघ्याइतके पाणी भरले ।
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे ।।
बदकांचा बघ थवा नाचतो ।
बेडुक दादा हाक मारतो ।।
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे ।।

धारेखाली उभा राहुनी ।
पायाने मी उडविन पाणी ।
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे ।।

आताची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, सीए वगैरे होऊन पैसे कमावण्याच्या मागे लागतात. त्यामुळे मराठी भाषा, त्यातले साहित्य, विशेषतः काव्य वगैरे लयाला चालले आहे अशी भीती काही जुन्या लोकांना वाटते. अशा या वर्तमानकाळात फक्त कवितांचे वाचन आणि गायन यांचा कार्यक्रम करायचे साहस कोणी करेल आणि त्याला भरपूर श्रोते मिळतील अशी कल्पनासुध्दा कुणाच्या मनात आली नसेल. पण कवी संदीप खरे आणि गायक व संगीतकार सलील कुळकर्णी या जोडगोळीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या नावाने असा एक अफलातून कार्यक्रम रंगमंचावर आणला आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्याचे हाऊसफुल प्रयोग करून दाखवले. त्यातल्याच एका पावसावरील बालगीताने या लेखमालेची सांगता करतो. ‘येरे येरे पावसा’ पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ पर्यंतचा हा प्रवास वाचकांना पसंत पडावा अशी त्या इंद्रदेवालाच मनोमन प्रार्थना करतो.

अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
ढगाला उन्हाची केवढी झळ ।
थोडी न्‌ थोडकी लागली फार ।
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ।
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।

खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
बुडबुड बेडकाची बडबड फार ।
डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।।

. . . . . . . . . . . .. . . . . . . . (समाप्त)

पावसाची गाणी – भाग ३

पूर्वीचे भागःभाग १ , भाग २      पुढील भाग ४       अनुक्रमणिका

“जे न देखे रवि ते देखे कवी” असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. तरीही ते स्वतः मात्र सहसा फारसे नजरेला पडत नाहीत. बालकवी ठोंबरे ज्या काळात होऊन गेले तेंव्हा दृकश्राव्य माध्यमे नव्हतीच, पण टेलिव्हिजन आल्यानंतरच्या काळातसुध्दा सुप्रसिध्द कवींचेही दर्शन तसे दुर्मिळच असते. स्व.ग.दि.माडगूळकरांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये मी पाहिले. त्यांच्या सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकायची संधी कधी मिळाल्याचे आठवत नाही. सुरेश भट, आरती प्रभू, पी.सावळाराम वगैरे नावे हजारो वेळा ऐकली असली तरी त्यांना पडद्यावरसुध्दा क्वचितच पाहिले असेल. यशवंत देव यांना मात्र अनेक वेळा जवळून प्रत्यक्ष पहायची संधी मला सुदैवाने मिळाली, ती एक संगीतकार, गायक, विद्वान, विचारवंत, फर्डा वक्ता वगैरे म्हणून. प्रवीण दवणे यांना निवेदन करतांना पाहिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या त्रिमूर्तींनी काव्यवाचन या प्रकाराला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यातील वसंत बापट यांना एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना आणि विंदा करंदीकर यांना सत्कारमूर्ती म्हणून मी पाहिले. मंगेश पाडगावकर हे मात्र मला त्यांच्या कविता कळू आणि आवडू लागल्यापासून नेहमी नजरेसमोर येत राहिले आहेत. त्यांचे कार्यक्रम काही वेळा प्रत्यक्ष आणि अनेक वेळा टीव्हीवर पाहिले असल्यामुळे ते जवळचे वाटतात. माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक नवी दृष्टी दिली. बहुधा प्रथम मराठी आकाशवाणीवर आलेले आणि तुफान प्रसिध्दी पावलेले, अरुण दाते यांनी गायिलेले आणि पाडगावकर यांनी लिहिलेले पावसाच्या संदर्भातले एक अत्यंत भावपूर्ण प्रेमगीत पहा.

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।

अचाट कल्पकता आणि अद्भुत भाषासौंदर्य याचे सुरेख मिश्रण मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यातील रूपके, प्रतिमा वगैरे माझ्या पार डोक्यावरून जात नाहीत. वर्षा ऋतूमधील सृष्टीचे रंग आणि गंध आपल्यासमोर साक्षात उभे करणारे पाडगावकरांनी लिहिलेले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबध्द केलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाणे पहा.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ।
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी ।
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ।।

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले ।
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले ।
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ।।

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा ।
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा ।
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ।।

संगीतकाराने दिलेल्या तालासुरावर शब्द गुंफून गीतरचना करणे मंगेश पाडगावकर यांना पसंत नव्हते. तसे त्यांनी कधीच केले नाही, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना अंतःप्रेरणेने स्फुरतात असे ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांच्या नावावर चित्रपटगीते दिसणार नाहीत. पण कवितेचे गाणे व्हायचे असल्यास तिची रचना एकाद्या वृत्तानुसार किंवा ठेक्यावर केलेली असणे आवश्यक असते. संगीताची उत्तम जाण पाडगावकरांना असणार आणि त्यामुळेच तालावर व्यवस्थित बसणारे नादमय शब्द गुंफून त्यांनी रचना केली आहे हे त्यांची गोड गीते ऐकतांना लक्षात येते. त्यांनी मुख्यतः भावगीते लिहिली असली तरी अगदी विडंबनासकट इतर प्रकारची गाणीसुध्दा लिहिली आहेत. त्यांनी पावसावर लिहिलेले एक मजेदार गाणे ज्यांना लहानपणी अत्यंत आवडले होते असे सांगणारे लोक आता वयस्क झाले आहेत, प्रश्न ऐकून मुंडी हलवणा-या नंदीबैलाला घेऊन रस्त्यावर हिंडणारे लोक आजकाल शहरात तरी दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांना त्यांचा संदर्भ लागणे कठीण झाले आहे, असे असले तरी या गाण्याचे शब्द आणि चाल यामुळे हे गाणे मात्र अजून लहान मुलांना आकर्षक वाटते.

सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?
भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

आरती, पूजा, अक्षता यासारखी नावे मुलींना ठेवणे अजून सुरू झाले नव्हते त्या काळात प्रसिध्दीला आलेले आरती प्रभू हे नाव ऐकून ते एका कोवळ्या कॉलेजकुमारीचे नाव असेल असेच त्या काळात कोणालाही वाटले असते, पण चिं.त्र्यं,खानोलकर असे भारदस्त नाव असलेल्या एका प्रौढ माणसाने हे टोपणनाव धारण केले आहे असे समजल्यानंतर आपण कसे फसलो याचा विचार करून त्याला त्याचेच हंसूही आले असेल. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेवरचा एक लेख मी वाचला होता. त्यात असे लिहिले होते की खाली दिलेल्या कवितेचे ध्रुपद आणि पहिले कडवे खानोलकरांनी खूप पूर्वी लिहिले होते आणि ती अर्धवटच सोडून दिली होती. कदाचित त्या वेळी त्यांना ती तेवढीच कविता पुरेशी वाटलीही असेल. पुढे अनेक वर्षांनंतर त्यांच्या काही गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि त्यांचे सोने झाले. त्या वेळी ही कविता बाळासाहेबांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी बोलता बोलता त्याला चाल लावून ती गुणगुणून पाहिली. यातून एक मस्त गीत तयार होईल असे दोघांनाही वाटले आणि ते करायचे त्यांनी ठरवले. पण यासाठी एवढे लहानसे गाणे पुरेसे न वाटल्यामुळे आरती प्रभूंनी आणखी दोन कडवी लिहून दिली. या गाण्याचा अर्धा भाग एका वयात असतांना अंतःप्रेरणेने स्फुरला असेल आणि उरलेला भाग वेगळ्याच वयात आल्यानंतर मार्केटसाठी विचार करून रचला असेल असे हे गाणे ऐकतांना कधीच जाणवले नाही.

ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।
ये रे घना ।।
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ।।
ये रे घना ।।
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ।।
ये रे घना ।।

ना.धों.महानोर यांची आता आजकालचे निसर्गकवी अशी ओळख तयार झाली आहे. ग्रामीण भागाचे दर्शन त्यांच्या कवितांमध्ये होत असल्यामुळे त्यात निसर्गाला मोठे स्थान असतेच. पावसाच्या आठवणीतूनच मनाला चिंब भिजवणारे त्यांचे हे सुप्रसिध्द गीत नव्या पिढीमधील संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वरबध्द केले आहे.

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।

पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा ।
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ।
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ।।
मन चिंब पावसाळी …….

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ।
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना ।
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे ।।
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी ………

निसर्गाचा परिणाम मनावर होतोच, पण कधी कधी मनातल्या भावनांमुळे निसर्गाचे रूप वेगळे भासते. आज तसाच पडत असलेला पाऊस कालच्या पावसाहून वेगळा वाटायला लागतो. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या गीताला सुप्रसिध्द संगीतकार श्री.यशवंत देव यांनी अत्यंत भावपूर्ण चाल लावली आहे. श्री यशवंत देव यांनी ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर पुस्तक लिहिले आहे आणि ते यावर प्रात्यक्षिकासह कार्यक्रम करतात. अर्थातच त्यांच्या गाण्यांमधले सर्व शब्द स्पष्ट ऐकू येतात आणि चांगले समजतात.

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।।
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते ।
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।।
वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते ।
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।।

पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही ।
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।।
जीवनदायी पाऊस कधी कधी रौद्ररूप धारण करतो आणि विध्वंस करतो. अशा धिंगाणा घालू पाहणा-या पावसाला उद्देशून सुप्रसिध्द कवयित्री इंदिरा संत चार गोष्टी एका सुंदर कवितेत सांगतात.  “माझे चंद्रमौळी घरकूल, दारातला नाजुक सायलीचा वेल वगैरेंना धक्का लावू नको, छप्पराला गळवू नको, माझे कपडे भिजवू नकोस वगैरे सांगून झाल्यानंतर माझ्या सख्याला सुखरूप आणि लवकर घरी परतून आण, त्यानंतर वाटेल तेवढा धुमाकूळ घाल, मी तुला बोल लावणार नाही, तुझी पूजाच करीन.” श्री.यशवंत देव यांनी लावलेल्या अत्यंत भावपूर्ण चालीवर गायिका पुष्पा
पागघरे यांनी हे गाणे गायिले आहे.

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ।।

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून ।
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून ।।

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण ।
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ।।

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून ।
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ।।

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना ।.
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना ।।

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत ।
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ ।।

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून ।
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ।।

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन ।
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ।।

आपल्याला हव्या असलेल्या खुबीने सांगण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये उपजत असते. सोंगाड्या या चित्रपटातल्या या लावणीत कवी वसंत सबनीसांनी ही गोष्ट किती खुमासदार पध्दतीने दाखवली आहे पहा. तमाशाप्रधान चित्रपटांना संगीत देण्यात हातखंडा असलेल्या राम कदमांनी लावलेल्या चालीवर हे गाणेसुध्दा पुष्पा पागघरे यांनीच गायिले आहे.

नाही कधी का तुम्हास म्हटलं, दोष ना द्यावा फुका ।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।
खबूतरागत हसत बसू या ।
उबदारसं गोड बोलू या ।
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या ।
लावून घेऊ खिडक्या दारं, पाऊस होईल मुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

ग्रामीण चित्रपटांना स्व.दादा कोंडके यांनी एक वेगळेच वळण लावले आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठून चमत्कार करून दाखवले. त्यांच्या सगळ्याच गाण्यांनी भरपूर खळबळ माजवली होता, त्यातल्या एका गाण्याने तर काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यातला मुखडा सोडला तर कुठेच पावसाचा उल्लेख येत नाही आणि मुखडा पण थोडा विचित्रच वाटतो. कसा ते पहाच.

जसा जीवात जीव घुटमळं ।
तसा पिरतीचा लागतयं बळ ।
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं ।
ह्ये बघून दुष्मन जळं ।
वर ढगाला लागली कळ ।
पाणी थेंब थेंब गळं ।।

चल गं राणी, गाऊ या गाणी, फिरूया पाखरासंग ।
रामाच्या पार्‍यात, घरघर वार्‍यात, अंगाला भिडू दे अंग ।
जेव्हा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा ।
काय बाई अप्रित, झालया विपरीत, सश्याला भितुया छावा ।
माझ्या पदरात पडाळंय खुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

जमीन आपली, उन्हानं तापली, लाल लाल झालिया माती ।
करूया काम आणि गाळूया घाम, चला पिकवू माणिकमोती ।
एका वर्षात होईल तिळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय, झोक्यात नाचतोय धोतरा ।
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा, लपलाय भूईमूग भित्रा ।
मधे वाटाणा बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

बामनाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात, येशील का संध्याकाळी ।
जाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं, बसलाय संतू माळी ।
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

झाडावर बुलबुल, बोलत्यात गुलगुल, वराडतिया कोकिळा ।
चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा ।
मोर लांडोरीसंगं खेळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

थुईथुई नाचते, खुशीत हासते, मनात फुलपाखरु ।
सोडा की राया, नाजूक काया, नका गुदगुल्या करु ।
तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

आलोया फारमात, पडलोय पिरमात, सांग मी दिसतोय कसा ।
अडाणी ठोकळा, मनाचा मोकळा, पांडू हवालदार जसा ।
तुझ्या वाचून जीव तळमळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पावसाची गाणी – भाग २

आधीचा भाग : पावसाची गाणी १    पुढील भाग  : भाग ३,   भाग ४           अनुक्रमणिका

‘आषाढस्य प्रथमदिवसे’ आभाळात ‘मेघमाला’ दिसायला लागतात आणि पाहता पाहता त्याला झाकोळून टाकतात, टप टप, रिमझिम करता करता मुसळधार पाऊस पडायला लागतो, नदी-नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत त्याचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गात घडवलेली जादू बहराला आलेली असते. निसर्गकवी म्हणून प्रख्यात झालेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी या श्रावणमासाचा महिमा एका सुंदर कवितेत सांगितला आहे. याची परंपरागत चालीमध्ये ध्वनिफीतपण निघाली आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।

एके काळी मराठी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात स्व.ग.दि.माडगूळकरांचे एकछत्र साम्राज्य होते आणि त्याच काळात गीतरामायणाची रचना करून आधुनिक वाल्मिकी अशी ख्यातीही त्यांना प्राप्त झाली होती. अशा शब्दप्रभू गदिमांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी लिहिलेले पर्जन्यराजाचे एक गाणे इतके गाजले की पावसाळा म्हंटले की या गाण्याचेच शब्द चटकन ओठावर येतात. संगीतकार वसंत पवार यांनी वर्षाकालाला अनुरूप अशा मेघमल्हार रागात याची सुरावट बांधली होती आणि हिंदी चित्रपटसंगीतीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते गाण्यात हातखंडा असलेल्या मन्ना डे यांच्याकडून ते गाऊन घेतले होते.

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
तशात घुमवी धुंद बासरी ।
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली ।
लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
तिला अडविते कवाड, अंगण ।
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
कोसळती धारा ।।

पुराणकालीन श्रीकृष्ण, राधा, गोपी, यमुनातट वगैरेंचा संबंध हिंदी किंवा मराठी गीतांमध्ये अनेक वेळा येत असतो, तसाच या गाण्यातसुध्दा गदिमांनी दाखवला आहे. पण आजच्या काळातल्या गोष्टीवर आधारित मुंबईचा जावई या सिनेमासाठी गदिमांनीच लिहिलेल्या एक गाण्यातसुध्दा पावसाचा उल्लेख येतो आणि स्व.सुधीर फडके यांनी मल्हार रागावर याची संगीतरचना करून वर्षाकालाचे वातावरण निर्माण केले आहे. यौवनात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनात वयानुसार निसर्गाने निर्माण केलेल्या नाजुक भावना यात व्यक्त होतात. आशा भोसले यांनी त्या भावनांना छान उठाव दिला आहे.

आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।।
जशी अचानक या धरणीवर ।
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे ।।
विचारल्याविण हेतू कळावा ।
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ।।
सोडुनिया घर, नाती-गोती ।
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे ।।
आज कुणीतरी यावे ।।

जेंव्हा स्व.ग.दि.माडगूळकरांचे नाव चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात गाजत होते त्याच काळात सुप्रसिध्द कवयित्री शांताबाई शेळके यांनी काही चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतरचना केली आहे. जैत रे जैत या आदीवासींच्या जीनवावरील एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटासाठी त्यांनी ग्रामीण भाषेत हे गीत लिहिले होते किंवा त्यांनी लिहिलेल्या या सुरेख कवितेचा उपयोग केला गेला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या आगळ्या प्रकारच्या चालींमुळे या सिनेमातली सारीच गाणी तुफान गाजली होती. आशा भोसले यांच्याच स्वरातले हे गाणे सुध्दा सुगमसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळते.

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।

पं. हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी एकत्र येऊन आणि स्व.हेमंतकुमारांनाही साथीला घेऊन तीन कोळीगीतांची एक अप्रतिम ध्वनिमुद्रिका काढली होती. त्या गीतांची रचनासुध्दा शांता शेळके यांनीच केली होती. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागतो, खवळलेला समुद्र आपले रौद्ररूप सोडून शांत होऊ लागतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीचे काम पुनः सुरू करतात. पण कधी कधी निसर्ग अवचितपणे वेगळे रूप दाखवतो आणि त्याला न जुमानता निधड्या छातीचे वीर आपली नौका पाण्यात घेऊन जातात. अशा वेळी घरी राहिलेल्या त्याच्या सजणीचे मन कसे धास्तावते तसेच त्याच्यावर तिचा भरंवसाही असतो याचे सुंदर वर्णन शांताबाईंनी या कवितेत केले आहे.

वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !

गडगड ढगांत बिजली करी ।
फडफड शिडात धडधड उरी ।
एकली मी आज घरी बाय ।
संगतीला माझ्या कुनी नाय ।
सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
वादलवारं सुटलं गो !

सरसर चालली होडीची नाळ ।
दूरवर उठली फेसाची माळ ।
कमरेत जरा वाकूनिया ।
पान्यामंदी जालं फेकूनिया ।
नाखवा माजा, दर्याचा राजा,
लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
वादलवारं सुटलं गो !

शांताबाईंनी लिहिलेल्या कित्येक कवितांना बाबूजींनी म्हणजे स्व.सुधीर फडके यांनी चाली लावलेल्या आहेतच, पण त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी नव्या को-या पध्दतीच्या संगीतरचना करून गाणी बसवली, त्यांच्यासाठी देखील शांताबाईंनी गीते रचली. श्रावणाचा महिमा सांगणारे हे आणखी एक गाणे. यालाही आशाताईंनीच स्वर दिला आहे.

ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।

शांता शेळके यांनी पावसावर प्रेमगीते लिहिली, कोळीगीते लिहिली, तशीच बालगीतेही लिहिली. असेच एक गोड गाणे त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ट हिच्या आवाजात संगीतकार स्व.श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केले होते.

पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।

गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।

अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।

ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी – भाग ३

पावसाची गाणी – भाग १

ही पावसाची लोकप्रिय गाणी मी चार भागांमध्ये संकलित केली आहेत.

अनुक्रमणिका         पुढील भाग :  भाग २,   भाग ३,    भाग ४

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा ।।
ये गं ये गं सरी, माझं मडकं भरी ।
सर आली धाऊन, मडकं गेलं वाहून ।।
पाऊस पडतो रिम झिम, अंगण झालं ओलं चिंब ।
पाऊस पडतो मुसळधार, रान झालं हिरवंगार ।।

हे गाणे कोणी आणि कधी लिहिले हे मला ठाऊक नाही, पण मला बोबडे बोलता येऊ लागल्यानंतर आणि लिहिण्यावाचण्या किंवा अर्थ समजू लागण्याच्या आधी या मधल्या शैशवकाळात केंव्हा तरी ऐकून ऐकून ते पाठ झाले आणि आजतागायत ते स्मरणात राहिलेले आहे. लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांचा उगम कधीच माहीत नसतो आणि तो शोधावा अशी कल्पनाही सहसा कधी मनात येत नाही. ‘येरे येरे पावसा’ या गाण्याच्या मुळाचा गूगलवर शोध घेण्यचा प्रयत्न इतक्या वर्षांनंतर मी आता करून पाहिला. त्यात हे गाणे मला चक्क विकीपीडियावर सापडले, पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती मात्र मिळाली नाही. पण गंमत म्हणजे हेच्या हेच गाणे गेली निदान साठ वर्षे तरी असंख्य मराठी घरांमध्ये लहान मुलांना जसेच्या तसे शिकवले जात आहे. ‘पैसा’ हे नाणे तर कधीच चलनामधून हद्दपार झालेले आहे, माझ्या लहानपणीसुध्दा त्याला काहीच विनिमयमूल्य नव्हते. त्यामुळे हे गाणे रचले जाण्याचा काळ खूप पूर्वीचा असला पाहिजे. कदाचित माझ्या आजोबा आजींच्या काळात सुध्दा पावसाचे हे गाणे लहानग्यांना असेच शिकवले गेले असेल. या गाण्याच्या पहिल्या दोन ओळींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण आहे. “पावसाला पैसा कसा देणार?”, “खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल?” असले प्रश्न  बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल? काव्य, संगीत वगैरेंचा विचार केला तर काही क्ल्यू सापडतील. या गाण्यात एकसुध्दा जोडाक्षर नाही किंवा बोजड शब्द  नाही. लहान मुलांना ऐकून लगेच उच्चारता येतील असे मुख्यतः दोन तीन अक्षरांचे आणि सोपे असे शब्द आणि प्रत्येकी फक्त तीनच शब्द असलेली सोपी वाक्ये त्यात आहेत. हे गाणे ‘एक दोन तीन चार’ अशा चार चार मात्रांच्या ठेक्याच्या चार चार ओळींच्या कडव्यांमध्ये असल्यामुळे त्याला एक सिमेट्री आहे आणि कोणालाही ते ठेक्यावर म्हणतांना मजा येते. गाण्याच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये यमक साधले आहे. किंबहुना या शब्दांची निवड बहुधा केवळ यमक साधण्यासाठीच केली आहे. कडव्यांच्या शेवटच्या ओळीत अनपेक्षित कलाटणी देणारे असे काही सांगून धक्का दिला जातो, त्यामुळे ते मनोरंजक वाटते.

लहानपणी अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झालेले आणखी एक गाणे आहे,
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच ।।
ढगांशि वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच ।।
झरझर धार झरली रे,
झाडांचि भिजली इरली रे,
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ,
करुन पुकारा नाच ।।
थेंबथेंब तळ्यात नाचती रे,
टपटप पानांत वाजती रे.
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत,
निळ्या सौंगड्या नाच ।।
पावसाचि रिमझिम थांबली रे,
तुझि माझि जोडी जमली रे,
आभाळात छान छान, सात रंगी कमान,
कमानीखाली त्या नाच ।।

या गाण्यातला मुखडा (ध्रुवपद) सोडला तर संपूर्ण गाणे पावसावरच आहे. आमच्या गावाला लागूनच आंबराई होती आणि त्यातल्या ‘आम्रतरूंवर वसंतवैभवाचे कूजन’ करणारे कोकीळ पक्षी आपले मधुर संगीत ऐकवायचे, पण मोर हा पक्षी मात्र मी त्या काळात फक्त चित्रातच पाहिला होता आणि आभाळात ढग आले की खूष होऊन तो आपला पिसारा फुलवून नाचतो असे ऐकले होते. मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन मोठेपणीच झाले. ढग, वारा, पाऊस,
तळे, झाडे वगैरे ओळखीचे असल्यामुळे त्यांचे संदर्भ समजत आणि आवडत होते. त्यामुळे मला तरी हे गाणे मोराबद्दल वाटायच्या ऐवजी पावसाचेच वाटायचे. अत्यंत लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी गायिलेले हे मजेदार गाणे महाकवी स्व.ग.दि.माडगूळकर यांनी देवबाप्पा या चित्रपटासाठी लिहिले आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले स्व.पु. ल. देशपांडे यांनी याला चाल लावली वगैरे तपशील नंतर समजत गेले. माझ्या लहानपणीचे हे गाणे रेडिओ, टेलिव्हिजन, मुलांचे कार्यक्रम वगैरेंवर आजतागायत अधूनमधून ऐकायला येत राहिले आहे.

संथ लयीवर बराच काळ पडत राहणा-या पावसाला ‘रिमझिम’ असे विशेषण बहुधा ‘येरे येरे पावसा’ या गाण्यामधून पहिल्यांदा मिळाले असावे. कदाचित ‘चिंब’ या शब्दाशी यमक जुळवण्याच्या दृष्टीने ‘रिमझिम’ हा शब्द आणला गेला आणि तो कायमचा त्याला चिकटून राहिला. त्यावरूनच लिहिलेले माझ्या लहानपणच्या काळात गाजलेले एक गाणे खाली दिले आहे.

रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

पहिल्या कडव्यात दिल्याप्रमाणे यमुनेला पूर येऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले असतांना कृष्ण कुठेच दिसत नाही म्हणून यशोदेलाच त्याची काळजी वाटत असेल, कारण वेळी अवेळी यमुनेच्या काठी जायची खोड त्याला होती. यामुळे ‘गेला मोहन कुणीकडे?’ हा प्रश्न नक्की यशोदामैयालाच पडला असणार अशी माझी लहानपणी खात्री झाली होती. पुढल्या कडव्यांचा अर्थ समजायला मध्यंतरी बरीच वर्षे जावी लागली. गीतकार स्व.पी. सावळाराम, संगीतकार स्व.वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयींनी मराठी रसिकांना दिलेली अनेक अप्रतिम गाणी अजरामर झाली आहेत. वसंत प्रभू यांनी संगीत देतांना पी.सावळाराम यांच्या या गाण्यासाठी मात्र आशा भोसले यांची निवड केली होती हे विशेष.

निसर्गामधील बदलांचे परिणाम माणसांच्या मनावरसुध्दा होत असतात. पर्जन्य आणि प्रणयभावना यात तर एक जवळचा संबंध आहे. रिमझिम पाऊस पडू लागल्यावर कृष्णाला भेटण्याची अतीव ओढ राधेला लागली आणि ओली चिंब होऊनसुध्दा ती यमुनेच्या किनारी जाऊन त्याला शोधत राहिली हे वर दिलेल्या गाण्यात आपण पाहिलेच. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांनी आकाश झाकून टाकलेले पाहता मेघदूतामधील यक्षाला त्याच्या प्रियतमेची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. विरहाचा आवेग असह्य होतो. अशा वेळी प्रियकराशी मीलन झाले तर होणारा आनंदसुध्दा अपूर्व असतो. या भावना व्यक्त करणारे पूर्वीच्या काळातले एक लोकप्रिय गाणे होते.

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

अत्यंत भावपूर्ण असे हे गाणे रचतांना कवी मधुकर जोशी यांनी ‘रिमझिम’ या नेहमीच्या विशेषणाऐवजी ‘झिमझिम’ हा वेगळा शब्द योजून कदाचित ‘झिमझिम झरती’ असा अनुप्रास साधला असावा. पण अनेक लोक हे गाणे ‘रिमझिम झरती ….’ आहे असेच समजतात. एकदा टेलीव्हिजनवरील गाण्यांच्या भेंड्यांच्या एका प्रसिध्द कार्यक्रमात यावर वाद झाला होता, तसेच एका प्रमुख दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारावरसुध्दा यावर चर्चा झाली
होती असे मला आठवते. भावपूर्ण शब्दरचना, स्व.दशरथ पूजारी यांनी दिलेली अत्यंत सुरेल जाल आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे. हे गाणे अनेकांच्या आवडत्या ‘टॉप टेन’ मध्ये असेल.

पर्जन्य आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध प्राचीन कालापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्याचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत सौभद्र या नाटकामधील प्रसिध्द पदात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥

कड कड कड कड शब्द करोनी ।
लखलखतां सौदामिनी ।
जातातचि हे नेत्र दिपोनी ।
अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥

प्रजन्यराजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मीलनाची गोडीसुद्धा जास्त मधुर करतो. दुसरे आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल यांनी ‘संगीत मृच्छकटिक’ या शंभरी ओलांडलेल्या अजरामर नाटकामधील एका पदात ही गोष्ट काहीशा सोप्या भाषेत थेट सांगितली आहे.

तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥

नवकवितेच्या आधुनिक काळामधील कवी ग्रेस यांचे काव्य जरासे दुर्बोध किंवा अस्पष्ट असते. वाचकाने किंवा श्रोत्याने त्यातून आपापल्या परीने अर्थ काढून घ्यायचा असतो. त्यांनी लिहिलेल्या एका प्रसिध्द कवितेच्या ओळी अशा आहेत.

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने ।।
डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती ।
दु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती ।।
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला ।।
संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा ।
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ।।

कवी ग्रेस यांच्या पुढे दिलेल्या कवितेत त्यांनी आपल्या वेदना जास्त स्पष्ट केल्या आहेत. कदाचित या दुःखदायी आठवणींमुळेच त्यांना पाऊस कष्टदायी वाटत असावा.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ।।

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो ।
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता ।।

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ।
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ।।

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी – भाग २

पावसाची गाणी – अनुक्रमणिका

पाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह माझ्या ब्लॉगवर दिली होती. आता ती या ठिकाणी देणार आहे. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.

भाग १ –
१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे
४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
५. नभ मेघांनीं आक्रमिले
६. तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ।।
७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।

भाग २ –
९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।
१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।

भाग ३ –
१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।
२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
२३. राया मला, पावसात नेऊ नका ।
२४. वर ढगाला लागली कळ । पाणी थेंब थेंब गळं ।

भाग ४ –
२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
२९. ए आई मला पावसात जाउ दे ।
३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ ।