विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग ६

“तूच घडविसी तूच तोडिसी” हे कडवे या संदर्भात समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्य़ा व्यक्तीमत्वातला प्रत्येक पैलू आपल्या अंतर्यामी बसलेल्या त्या अदृष्य निर्मात्यानेच पाडलेला असतो. त्याचे श्रेय किंवा त्याचा दोष आजूबाजूच्या परिस्थितीली देण्याची पद्धत आहे, पण ते पूर्णपणे खरे नाही. एका कुटुंबातील मुले कष्टाळू आणि अभ्यासू निघाली आणि त्यांनी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले तर “त्याच्या आईवडिलांनी त्यांना चांगले वळण लावले, कडक शिस्तीत वाढवले, भरपूर प्रोत्साहन दिले, म्हणून ती यशस्वी झाली.” असे म्हणतात. ती तशी निघाली नाहीत तर “अती धांकामुळे ती मुले बिथरली, त्यांच्या मनाचा कोंडमारा झाला, त्यांच्या प्रतिभेला फुलायला वावच मिळाला नाही” किंवा या उलट “फाजील लाड झाल्यामुळे ती बिघडली, वाया गेली.” वगैरे म्हणतात. आता वळण लावणे, शिस्तीत ठेवणे आणि धांक दाखवणे यामधील सीमारेषा नेमकी कुठे असते? प्रोत्साहन आणि लाड यातला फरक कोण सांगू शकेल? एकाच वातावरणात वाढलेली दोन मुले सुद्धा एका साच्यात घालून निघाल्यासारखी नेहमी वागतात कां? सद्वर्तनी मातापित्यांची मुले सद्गुणी निपजली तर आपण “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।” असे म्हणतो आणि तसे झाले नाही तर “सूर्यापोटी शनैश्वर जन्माला आला.” असे म्हणतो. बदनाम कुटुंबातील मुले वाईट रीतीने वागली तर लगेच “खाण तशी माती” हा वाक्प्रचार आठवतो आणि याउलट त्यांनी चांगुलपणा दाखवला तर “चिखलातून कमळ उमलते, भांगेत तुळस उगवली.” वगैरे दाखले देतो. एकाच घरातील भावंडे वेगळी निघाली तर “हांताची पांच बोटे तरी कुठे सारखी असतात?” हे उदाहरण आहेच! कोणी चांगला गायक समृद्ध कुटुंबात जन्माला आला असेल तर, “त्याला काही खायची प्यायची ददात नव्हती, आपलं सगळं लक्ष आपल्या कलेकडे देणं शक्य होतं, म्हणून तो इथपर्यंत पोचला. नोकरीधंद्याच्या रगाड्याला जुंपला असता तर त्याला हे जमलं असतं कां?” असे विचारतात आणि दुसरा कोणी तितकाच चांगला कलाकार हलाखीच्या परिस्थितीमधून वर आला असेल तर, “त्याला आपल्या कलेकडे लक्ष देण्याखेरीज गत्यंतरच नव्हते, तो त्याच्या पोटाचा प्रश्न होता ना? कंटाळा करून त्याला चालणारच नव्हते.” वगैरे मुक्ताफळे उधळली जातात. थोडक्यात सांगायचे झाल्यास सगळ्या प्रकारची उदाहरणे आपल्याला दिसतात आणि त्यातल्या प्रत्येकाचे स्पष्टीकरण मिळते.

याचा अर्थ माणसाच्या जडणघडणीत परिस्थितीचा कांही वाटा नसतो असा अजीबात घेता येणार नाही, कांही प्रमाणात तो असतोच. प्राप्त परिस्थितीमधूनच संधी उपलब्ध होतात किंवा अडथळे येतात. पण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेणे वा न घेणे आणि समोर आलेल्या अडथळ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे वा न करणे हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्याच्या अंतरात दडलेला ‘वेडा कुंभार’ जसा कौल देईल तशा प्रकाराने त्याची वाटचाल होते. कोठल्याही ठिकाणची व कोठल्याही वेळची परिस्थिती ही एका दृष्टीने कांही प्रमाणात अनुकूल असते तशीच दुस-या कांही बाबतीत प्रतिकूल असते. त्यावर होणा-या माणसांच्या प्रतिक्रिया मात्र एकमेकीच्या विरुद्ध असू शकतात. आपण काय करू शकत नाही, कशात किती अडचणी आहेत, किती त्रास आहेत याचे रडगाणे सतत गाण्याची  कांही लोकांना आवडच असते. नेहमी ते अडचणी शोधण्याच्याच प्रयत्नात असलेले दिसतात. गंमत म्हणजे काम करण्यासाठी प्रतिकूल असलेली परिस्थिती या लोकांना गळा काढण्यासाठी मात्र खूप सोयीची ठरते. या उलट, प्राप्त परिस्थितीबद्दल तक्रार करीत बसणे हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे असे कांही लोकांना वाटते आणि असेल त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो इकडे ते सगळे लक्ष देतात, त्या दृष्टीने कामाला लागतात आणि प्रगतीपथावर पुढे जातात. माणसामाणसातला हा फरक त्यांच्यातल्या ‘त्या वेड्या कुंभारा’मुळे पडतो आणि गंमत म्हणजे प्रत्येकाला आपला ‘तो’ शहाणा आणि इतरांचा ‘तो’ वेडा वाटतो.

सर्व विश्वाच्या कर्त्याकरवित्या परमेश्वराप्रमाणेच हा आपला आंतला ‘वेडा कुंभार’देखील बराच लहरी आहे. काल त्याने ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो ती मिळून गेल्यावर आज त्याला तिचे कांही महत्वच वाटत नाही, कदाचित उद्या तिचा कंटाळा किंवा तिटकारासुद्धा येईल. या उलट काल असह्य किंवा अशक्यप्राय वाटणारी कल्पना आज सुसह्य आणि सुलभ वाटू लागते, उद्या कदाचित ती आवडायलाही लागेल. याचे कारण आपल्या व्यक्तीमत्वात सतत बदल घडत असतो. हा वेडा कुंभार जुनी मडकी निकालात काढून त्यांच्या जागी नवनवीन मडकी बनवून रचत असतो. या घटांना तो प्रेमाने कुरवाळतो तेंव्हा आपल्याला धन्यता वाटते आणि एक चापट मारतो तेंव्हा मेल्याहून मेल्यासारखे होते. त्याच्या लीलेमुळे कधी दृष्टी असून दिसत नाही, कळते पण वळत नाही, समजते पण उमजत नाही अशी त-हा होते. असे कां होते? आपण असे अतर्क्यपणे कां वागतो याचे आपल्यालाच नंतर आश्चर्य वाटते. हा सगळा त्या वेड्या कुंभाराचा प्रताप असतो एवढेच म्हणता येईल.

एकादी उत्कृष्ट साहित्यकृती आपण पुनःपुन्हा वाचतो तेंव्हा आपल्या मनातील वेगवेगळ्या संवेदना जागृत होतात, वेगवेगळ्या आशयांच्या छटा त्यात दिसतात हे त्या कलाकृतीच्या महानतेचे लक्षण आहे. विठ्ठला, तू वेडा कुंभार हे गाणे ऐकतांना माझ्या मनात उठलेले तरंग आणि वेगवेगळ्या स्तरावरून पाहता मला दिसलेले आशय यांचे हे संकलन आहे. ग.दि.माडगूळकरांना या गीतामधून हेच किंवा एवढेच सांगायचे असेल असा माझा आग्रह नाही. त्यांनी लिहिलेल्या काव्यामधून मला जितका बोध झाला तो मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

. . . . .  . . .  . . . . . . .  (समाप्त) 

 

विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग ५

आता मी एका वेगळ्याच वेड्या कुंभाराची ओळख करून देणार आहे, म्हणजे त्याच्याकडे फक्त अंगुलीनिर्देश करणार आहे. मी त्याचा परिचय करून देणे हे ज्याचे त्याला त्याचे स्वतःचे नांव सांगण्यासारखे ठरेल. “माझे डोके, माझे हृदय, माझा स्वभाव, माझा स्वाभिमान, माझी गरज, माझी निष्ठा, माझी पारख, माझी व्यथा, माझी चिंता, माझे समाधान” किंवा “मला सुचलं, मला समजलं, मला आठवलं, मला वाटलं, मला आनंद झाला, मला कष्ट पडले” किंवा “मी जिंकलो, मी हरलो, मी हरवलो, मी हरखलो, मी थक्क झालो” किंवा “माझी बोबडी वळली, माझी चंगळ झाली, माझी वाट लागली” वगैरे गोष्टींबद्दल आपण बोलतो तेंव्हा त्यातला ‘मी’ म्हणजे नेमका कोण असतो? “माझे शरीर, माझी बुद्धी” असे त्यांच्याहून वेगळा कोण म्हणतो? “कोहम्?” या प्रश्नाचे नेमके उत्तर सापडणे आणि ते समजणे अतिशय कठीण आहे. पण हा जो कोणी आत्माराम आपले सारे नियंत्रण करू पहात असतो त्याला मी सोप्या शब्दात ‘वेडा कुंभार’ म्हणेन. तोसुद्धा एक अत्यंत कार्यदक्ष आणि कमालीचा कुशल कारागीर असतो. रात्रंदिवस, अष्टौप्रहर कार्यरत राहून तो आपल्या व्यक्तीमत्वाचे घडे घडवीत असतो. त्यांचे ढांचा बनवतो, त्यांची जडणघडण करतो, त्यांना विविध पैलू पाडतो, वेगवेगळ्या छटांनी त्याला रंगवतो. आपलीच निरनिराळी रूपे त्यामधून निर्माण करीत असतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र, उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा, बालपण, यौवन आणि वार्धक्य अशा कालचक्राच्या वेगवेगळ्या आवर्तनांवर तो कालानुसार आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणीत असतो. त्याच्या क्रिया अनेक वेळा आपल्याला अगम्य, अतर्क्य वाटतात. आपल्यालाच तो वेडा आहे की काय अशी शंका येते.

हा वेडा कुंभार आपले घट कशातून बनवतो? मूळची माती तर प्रत्येक मनुष्य जन्मतःच आपल्यासोबत आणतो. वाटले तर त्याला पूर्वसंचित म्हणावे नाही तर जेनेटिक कोड, पण प्रत्येकाचे स्वतःचे असे वेगळे गुणधर्म असतात. त्याची बुद्धीमत्ता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, ग्रहणशीलता, सहनशीलता, सदसद्विवेकबुद्धी वगैरे अनेक गोष्टी सूक्ष्मरूपाने उपजतांनाच येतात आणि नंतर त्या वाढीला लागतात. ते सगळे या मातीचेच घटक आहेत. बालपणी आईवडिलांच्या तसेच सहवासातील इतर लोकांच्या ममतेच्या ओलाव्यात भिजून त्या मातीचा गोळा तयार होतो. वाढ होत असतांना मातीही वाढत जाते आणि त्यात अनेक भावनांचा ओलावा मिसळत जातो. संस्कारांनी तो चांगला मळला जातो, तसेच त्याला थोडा आकार येऊ लागतो. या वेळी आपल्यातला हा वेडा कुंभार आपल्या नकळत कामाला लागलेला असतो. मुळातली माती आणि ममता, संस्कार वगैरेंच्या मिश्रणातून तो आपल्या व्यक्तिमत्वाची अनंत शिल्पे घडवतो आणि ज्ञानाचे तेज व विचारप्रवाहांचा वारा यांवर त्यांना पक्की करून त्यांच्या राशी रचत राहतो. त्याचे हे कार्य आयुष्यभर अव्याहत चालत राहते.

या घटांची किती रूपे आणि त्यांचे किती आकार मोजावेत? एकच मनुष्य कोणाचा तरी मुलगा म्हणून जन्म घेतांनाच कोणाचा तरी नातू, भाचा, पुतण्या किंवा भाऊ झालेला असतो. मुलगी असल्यास ती नात, भाची, पुतणी नाहीतर बहीण होते. मोठे होता होता ते काका, मामा, मावशी, आत्या वगैरे बनतात आणि लग्न करून आधी जांवई, सून, मेहुणा, नणंद वगैरे आणि कालांतराने आई, बाप, आजी, आजोबा वगैरे पदव्या मिळवत जातात. या काळातील प्रत्येक क्षणी त्यांची अनेका आप्तांबरोबर वेगवेगळी नाती असतातच. त्याशिवाय मित्रमैत्रीण, शेजारीपाजारी, विद्यार्थी, शिक्षक, नेता, अनुयायी, ग्राहक, विक्रेता, प्रेक्षक, श्रोता, गायक, वादक, नट, नटी, खेळाडू, नागरिक वगैरे इतर भूमिकांमधून तो किंवा ती असंख्य लोकांशी जोडलेली असतात. यातील प्रत्येक भूमिकेचे वेगळे नियम व रीतीरिवाज पाळायचे, वेगळी कर्तव्ये व जबाबदा-या पेलायच्या, वेगळे निर्बंध घालून घ्यायचे, वेगळ्या मर्यादा सांभाळायच्या हे करावे लागते आणि या सगळ्यासाठी वेगळे मापदंड असतात या सगळ्यांचा विचार करून तो आपले आचरण करीत असतो. यातील भिन्न भूमिका कधी एकमेकांशी सुसंगत असतात तर कधी त्या वठवतांना विसंगत आचरणही करावे लागते. त्याच्या अंतरंगातला कुशल शिल्पकार या सगळ्याचा तोल सतत सांभाळत असतो आणि त्याच्या स्वभावानुसार पण वेगवेगळ्या आकाराची मडकी, सुरया वा रांजण त्याच्या विविध भूमिकांसाठी बनवत असतो.

जशी या भूमिकांची रूपे आगळी दिसतात तशीच त्यांची नशीबेसुद्धा वेगळी असतात. यातील कोणाच्या कांही भूमिका विलक्षण यशस्वी होऊन त्यांची खूप प्रशंसा होते तर कांही सपशेल फसतात आणि त्यामुळे त्याच माणसाची त्या बाबतीत नाचक्की होते. कधी एका चांगल्या गुणाच्या प्रदर्शनाला तत्काळ उत्स्फूर्त दाद मिळते तर कधी पुष्कळ काळ लोटल्यानंतर त्याचे महत्व लोकांच्या लक्षात येते. व्यावसायिक वा सार्वजनिक जीवनात उत्तुंग यश मिळालेल्या कोणा व्यक्तीचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे व्यक्तीगत पातळीवर तिच्या जवळ जातांच जाणवावे इतकी ती सामान्य वाटते. नोकरी वा धंद्यात फारशी प्रगती करू न शकलेल्या कित्येक माणसांना कौटुंबिक जीवनात सगळे कांही साध्य झालेले दिसते. व्यवसायातले त्याचे प्रतिस्पर्धी किंवा विरोधकसुद्धा खाजगीमध्ये प्रशंसक किंवा जिवाला जीव देणारे प्रेमळ मित्र असू शकतात. कधी तर एका क्षेत्रात निराशा पदरात पडल्यामुळे निरुपायाने दुसरीकडे वळलेली व्यक्ती तिची दिशा बदलल्यानंतर दुसरीकडे कल्पनातीत यश मिळवते. त्यामुळे पहिले अपयश हे एक प्रकारचे वरदानच ठरते. पण कदाचित त्याच वेळी त्याची कांही जवळची माणसे दुखावली जाऊन दूर गेलेली असतात आणि त्याच्याभोवती आप्पलपोट्या जीहुजूरांचा घोळका जमलेला असतो. त्यामुळे मनातून तो नाराज असतो. हे सगळे इतके विचित्र आणि विलक्षण असते की त्या वेड्या कुंभाराखेरीज इतर कोणाला ते नीटसे समजतसुद्धा नाही.

या बदलत्या भूमिकांचे एक उदाहरण द्यायचे झाले तर आता मी या लेखाचा लेखक आहे. हे रूप माझ्यातल्या कुंभाराने घडवलेले एक कच्चे बोळके आहे असे वाटल्यास म्हणता येईल. थोडी माहिती, जरासे वाचन, त्यावर मनन, चिंतन आणि किंचित कल्पकता यांच्या मिश्रणातून त्याला कांहीसा आकार आला आहे. ज्या क्षणी यातली शेवटची ओळ लिहून होईल त्या क्षणी ही अल्पकालीन भूमिका संपेल. त्यानंतर ब्लॉगरचे पात्र कामाला लागेल. मी पुन्हा कधी या ओळी वाचल्या तर ती वाचकाची किंवा टीकाकाराची एक वेगळी भूमिका असेल. या लेखकाच्या भूमिकेचे नशीब काय आहे ते मलाही माहीत नाही. हे लेखन सुजाण वाचकांच्या नजरेला पडले आणि त्यांना आवडले तर त्याच्या पसंतीचे लोणी त्याच्या पदरात पडेल, नाही तर “कसली कंटाळवाणी लांबट लावली आहे?” असा जळजळीत ताशेरा मारून ते कोठलेतरी दुसरे संकेतस्थळ गांठतील!  

 . . . . . . . .. . . . . . .  . (क्रमशः)

विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग ४

अशा प्रकारे मनाला उदास तसेच अस्वस्थ करणारे वातावरण या गीतामधून निर्माण होते हे प्रपंच या चित्रपटाच्या कथानकाला पोषक असेच आहे आणि ते बनवण्याची कामगिरी कवीवर्य स्व.ग.दि.माडगूळकरांनी कौशल्याने बजावली आहे. हे गाणे कशा प्रकारचे आहे त्याचा अंदाज त्याच्या ध्रुवपदावरूनच येतो, पण या सृजनशील कुंभाराला वेडा कां म्हंटले आहे याचे कुतूहलही निर्माण होते. पहिल्या कडव्यामध्ये ‘उत्पत्ती’ची प्रक्रिया दाखवतांना त्यात विश्वकर्म्याच्या कौशल्याची तोंड भरून प्रशंसाच केलेली आहे. दुस-या कडव्यात ‘स्थिती’मधील विविधतेचे गुणगान करता करता शेवटच्या ओळीत अंगाराचा (लयाचा) उल्लेख करून चटका लावला आहे. शेवटच्या कडव्यात ‘लय’ किंवा संहार करणा-या रूपाचे दर्शन घडवतांना कवीने त्याला कांही परखड प्रश्न विचारले आहेत. अशा रीतीने जीवनचक्राच्या तीन अवस्था तीन कडव्यातून दाखवतांना त्यामधील भाव क्रमाक्रमाने बदलतांना दिसतात. अखेरीस चित्रपटाच्या कथानकाला साजेसे उदास आणि तंग वातावरण निर्माण होते.

माडगूळकरांची एकंदर कारकीर्द पाहिली तर त्यांची ‘वारकरी संत’ किंवा ‘हरीभक्तीपरायण कीर्तनकार’ अशा प्रकारची प्रतिमा कांही आपल्या डोळ्यासमोर उभी रहात नाही. तसेच या गाण्यामधील ‘विठ्ठल’ हा दोन्ही कर कटीवर ठेवून अठ्ठावीस युगे स्वस्थ उभा राहिलेला पांडुरंग त्यांना अभिप्रेत असेल असे वाटत नाही. आपल्या अनंत हस्तांनी अविरत कार्य करीत राहणा-या आणि त्यातून अगणित नवनवीन रचनांची निर्मिती करणा-या त्या महान विश्वकर्म्याचे दर्शन या गीतामध्ये त्यांनी घडवले आहे.

मला तर असे वाटते की हे गाणे एकंदरीतच सृजनशीलतेच्या संबंधात लिहिलेले असावे. यातील कुंभार आणि घट ही एक सृजनशील कलाकार आणि त्याची निर्मिती यांची प्रतीके आहेत. अशा प्रकारचे विधान उदाहरण देऊन सिद्ध करायला पाहिजे ना? प्रत्यक्ष गदिमांच्या गीताची चर्चा करतांना त्यासाठी दुसरे उदाहरण शोधण्याची काय गरज आहे? त्यांनी एका जागी म्हंटले आहे, “ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे । माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ।।” तर त्या गदिमांनी परमेश्वराला उद्देशून जे गीत लिहिले आहे ते त्याचा अंश बाळगणा-या त्यांनाच कसे चपखल बसते याचा थोडा शोध आता घेऊ.

माडगूळकरांनी मुक्तछंदामध्ये कांही काव्यरचना केल्या असल्या तरी ते मुख्यतः गीतकार म्हणूनच ख्यातनाम आहेत. आणि गाणे म्हंटल्यावर त्याला वृत्त, छंद, चाल वगैरे आलेच. विविध ताल व छंद यामधील स्वरांच्या आवर्तनांच्या चक्रावर अक्षरांना आणि शब्दांना नेटकेपणे बसवून त्यांनी आपल्या विपुल गेय काव्याची निर्मिती केली. गीतांमधील विषयांची सुरेख मांडणी करून त्यांना सुडौल आकार दिले. त्यामधील आशयांना उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आदि अलंकारांनी चांगले सजवले. ठेक्याच्या समेवर यमके जुळवली, आकर्षक अनुप्रास रचले, गीतांची गतिमानता राखली.

ही रचना करतांना त्यांनी कोठल्या माती, पाणी, उजेड , वारा या तत्वांचा उपयोग करून घेतला असेल? अर्थातच त्यांनी अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा, त्यातील अर्थपूर्ण शब्द, चतुर वाक्प्रचार, विविध अलंकार या मातीच्या मिश्रणामधून आपली काव्यशिल्पे साकारली. त्यामध्ये भावनांचा ओलावा निर्माण करणारे पाणी मिसळले, त्यात डोळ्यामधून पाझरणारे अश्रूंचे बिंदू आले तसेच भावनातिरेकामुळे होणारे काळजाचे पाणीपाणीही आले. महत्प्रयासाने त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानसंपदेच्या तेजाने त्यांना उजाळा दिला. अनेक प्रकाराच्या मतप्रवाहांचा वारा त्यामधून खेळवला. या सर्वांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यरचनांमध्ये झालेला दिसतो. आपल्या अगणित रचनांमधून त्यांनी आभाळाएवढे एक वेगळे विश्व निर्माण केले.

गदिमांनी निर्माण केलेल्या असंख्य घटांच्या आगळेवेगळेपणाबद्दल तर काय सांगावे? त्यांनी किती त-हांचे विषय लीलया हाताळले आहेत? लहान मुलांसाठी आकर्षक आणि मजेदार बालगीते, यौवनावस्थेतील नाजुक भावनांनी युक्त प्रेमगीते आणि भावगीते, स्फूर्तीदायक समरगीते, भक्तीरसाने ओथंबलेली मधुर भक्तीगीते अशा अनेक प्रकारांची गाणी त्यांनी रचली. त्यातही परंपरागत पद्धतीची भजने, अभंग, लावण्या, पोवाडे आदि लिहिले तसेच आधुनिक काळानुसार नव्या चालींवर, अगदी पाश्चात्य ठेक्यावर गायची अनेक गाणी तितक्याच सहजपणे लिहिली. यांची उदाहरणे देण्यासाठी एक स्वतंत्र लेखमालिकाच लिहावी लागेल. या गीतांमधून शृंगार, करुण, शांत, रौद्र, वीर इत्यादी नवरसांनी भरलेले प्याले त्यांनी मराठी रसिकांना सादर केले.

त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण जाणवते, वेगळ्या भावना, वेगळे विचार, वेगळी मांडणी यांचे दर्शन होते. त्यांनी बनवलेले हे घट म्हणजे हिरेमाणकादि रत्नांनी भरलेले रांजण आहेत असे म्हणायला हवे. तरीही त्या सगळ्या गाण्यांचे दैवयोग कांही सारखे दिसत नाहीत. कांही गीतांना तितकेच उत्तम संगीत दिग्दर्शक लाभले आणि त्यांनी लोकांच्या ओठावर रेंगाळतील अशा चाली दिल्या, ती गाणी थोर गायकांच्या गोड गळ्यातून उतरून जनतेपुढे आली, ज्या चित्रपटासाठी ती लिहिली ते खूप लोकप्रिय झाले, अशा सगळ्या गोष्टी जुळून येऊन ती गाणी अजरामर ठरली. दुसरी कांही तितकीच अर्थपूर्ण आणि सुंदर गाणी कांही कारणाने लोकांसमोर तितकीशी आली नाहीत किंवा फारसा वेळ न राहता लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड गेली. गीतरामायणाने एका काळी लोकप्रियतेचे सारे उच्चांक मोडले होते आणि आजसुद्धा त्यातील गाणी निरनिराळ्या मंचावरून नेहमी ऐकू य़ेतात, पण गीतगोपालाला ते यश मिळाले नाही. माडगूळकरांची कांही गीते लोण्यासारख्या मुलायम कागदावर लिहून घेऊन लोकांनी आपल्या संग्रहात जपून ठेवली, तर कांही गाण्यांचे कागद बंबामध्ये स्वाहा झाले असतील. त्यांच्या मुखी अंगार पडले काय किंवा ते अंगाराच्या मुखात पडले काय, दोन्हीमध्ये त्यांचे होरपळणे सारखेच!

. . . .  .(क्रमशः)

विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग ३

या विठ्ठलाने निर्मिलेल्या घटांची रूपे खरेच किती आगळी वेगळी आहेत? इथे असंख्य त-हेच्या चराचर वस्तू आहेत, त्यामधील फक्त माणसांमध्ये केवढी विविधता आहे? कोणी गोरा तर कोणी काळा, कोणी उंच कोणी बुटका, कोणी स्थूल तर कोणी काटकुळा, कोण ह्सतमुख तर कोण सदानकदा रडतराऊत! जितकी माणसे तितके वेगळे चेहरे, त्यांचे निराळे स्वभाव, विशिष्ट लकबी, भिन्न मते आपल्याला आढळतील. त्यातील प्रत्येकजण आपापले नशीब घेऊन येतो आणि वेगवेगळे आयुष्य जगतो. गदिमांनीच आपल्या दुस-या एका गीतामध्ये लिहिले आहे, “या वस्त्राते विणतो कोण । एकसारखी नसती दोन । कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे ।। जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे ।।”

श्रीमंत घरातले मूल जन्मतःच चांदीचा चमचा घेऊन जन्माला येते असा इंग्रजी वाक्प्रचार आहे. कांही लोक तसे वैभवात जन्माला येतात आणि ऐषोआरामात वाढतात, तर कोणाला आयुष्यभर काबाडकष्टच उपसत रहावे लागते. कोणी हात लावेल त्याचे सोने होत जाते तर डोंगर पोखरूनसुद्धा कोणाला फक्त त्यातून उंदीरच निघालेला दिसतो. कोणी घामाने निथळून जाईपर्यंत ताक घुसळत राहतो आणि त्यातून निघालेला लोण्याचा गोळा भलताच कोणी गट्ट करतो. कोणावर यश, लौकिक, प्रेम वगैरेचा सुखद वर्षाव होतो तर अपयश, अवमान, नैराश्य यांची दाहकताच कोणा बिचा-याच्या पदरात पडते. “तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।” या शब्दांत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ही दाहकता त्यांच्या एका प्रसिद्ध काव्यामध्ये व्यक्त केली आहे, तर गदिमांनी “कुणामुखी अंगार” या शब्दांत.

एका अत्यंत सालस आणि निरागस कुटुंबाची दैवगतीमुळे कशी दुर्दशा होते याची हृदयविदारक कथा प्रपंच या चित्रपटात चितारली आहे. या कुटुंबामधील अगतिक अवस्थेत जगणा-या लोकांना “ईश्वरेच्छा बलीयसी।” म्हणत आलीया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नसते. “तूच घडविसी तूच मोडिसी, कुरवाळिसी तू तूच ताडिसी ।” यापेक्षा वेगळे तो देवाला तरी काय सांगणार? मनुष्यजन्म दिलास, चांगले संस्कार दिलेस, आयुष्याला कांही अर्थ दिलास म्हणून त्याचे आभार मानायचे की त्यावर दुःखाचे डोंगर देऊन सगळ्याचा पार विस्कोट केल्याबद्दल गा-हाणे गायचे? तक्रार तरी आणखी कुणाकडे करायची? असला जीवघेणा खेळ खेळून त्याला तरी कसले समाधान मिळते म्हणायचे? यातना अगदीच असह्य झाल्यामुळे तो “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार।।” अशा शब्दात त्याचा निषेध करतो.

अंधार या शब्दाचा अर्थ या जागी काळोख किंवा उजेडाचा अभाव एवढ्यापुरता सीमित नाही. किती प्रकारचे अंधःकार या जगात दिसतात? कोणी अज्ञानाच्या अंधःकारात हरवलेले आहेत, बिचा-यांना आपली वाटच दिसत नाही. कोणी नैराश्याच्या खोल गर्तेत सांपडले आहेत, आशेचा एक किरण पाहण्याची आस धरून आहेत. कोणी अन्यायाच्या अंधारकोठडीत तडफडत आहेत. किती लोकांनी डोळ्यांना झापडे बांधून घेतली आहेत, त्यातही कोणी मदांध, कोणी धर्मांध तर कोणी कामांध! कोणाला सत्तेचा माज चढलेला तर कोणाला संपत्तीचा.कोणी स्वार्थापोटी डोळ्यावर कातडे ओढून घेतल्यामुळे उघड्या डोळ्यांनी आंधळे झाले आहेत तर कोणाला उपासमारीमुळे भोंवळ येऊन डोळ्यापुढे अंधेरी दाटली आहे किंवा भयापोटी डोळ्यासमोर काजवे चमकत आहेत. किती त-हेचे अंधार इथे निर्माण करून ठेवले आहेत?

या चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने कवी देवाला विचारतो की जर चोहीकडे अंधारच पसरवायचा होता तर तो पहायला डोळे तरी कशाला दिलेस? जगाकडे पहाण्य़ाची, ते समजून घेण्याची दृष्टी दिलीस आणि दाट अंधाराचे असले कसले दृष्य डोळ्यासमोर आणलेस? हे असले कसले जग तू निर्माण केले आहेस? इथे तर लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार असला अजब कारभार तू चालवतो आहेस. तुला कोण शहाणा म्हणेल? तू तर ठार वेडा आहेस. अशा उद्वेगपूर्ण उद्गाराने हे गीत संपते.

. . . . .  . . . . . . . . . (क्रमशः)

विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग २

तूच घडविसी तूच मोडिसी । कुरवाळिसी तू तूच ताडिसी । नकळे यातुन काय जोडिसी । देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ।।

विठ्ठल हा वेडा कुंभार इतर व्यावसायिक कुंभाराप्रमाणे आपली उपजीविका चालवण्यासाठी गाडगी मडकी तयार करून विकत नाही. आपला एक चाळा केल्याप्रमाणे तो वेगवेगळ्या आकारांची, रंगाढंगांची पात्रे बनवतो, त्यांना अंजारतो गोंजारतो, कधी एकादी टिचकी नाहीतर चापटी मारून पहातो आणि अखेर एक जोरात तडाखा मारून त्यांना उध्वस्त करून टाकतो. हा सगळा खेळ करून त्यात त्याला काय मिळतय् कोण जाणे! गीताच्या शेवटच्या कडव्यामध्ये त्या अद्भुत कुंभाराचा वेडेपणा दाखवता दाखवता अखेरच्या ओळीमध्ये कवी त्या रूपकातून बाहेर पडतात. दृष्टीसाठी डोळे देऊन समोर अंधारच दिला तर त्याचा काय फायदा? पण हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परमेश्वरच असणार हे कोणाच्याही सहज ध्यानात येईल.

गदिमांनी हे अजरामर गीत प्रपंच या चित्रपटासाठी लिहिले आणि सुधीर फडके यांनी त्याला स्वरबद्ध करून स्वतःच ते गायिले आहे. या चित्रपटाचे कथानक खेड्यामधील कुंभारवाड्याच्या पार्श्वभूमीवर घडतांना दाखवले आहे. त्या वातावरणाला साजेशी अशी सोपी शब्दरचना गदिमांनी या गीतात केलेली आहे. त्याची भाषा अस्सल ग्रामीण म्हणता येणार नाही, पण संस्कृतप्रचुर क्लिष्ट शब्द कुठेही वापरलेले नाहीत किंवा उगाचच आपल्या अथांग पांडित्याचे प्रदर्शन केलेले नाही. सुधीर फडके यांनीही एक दोन वेळा ऐकताच सहज लक्षात राहील आणि गायला अवघड असली तरी गुणगुणायला सोपी अशी मधुर चाल या गीताला दिली आहे. सुरुवातीच्याच चाकाssवरती या ओळीनंतर कोठेही मध्येच पॉज येऊन कोणताही शब्द तुटत नाही, कुठलाही शब्द अवास्तव ताणलेला नाही की घाईघाईत एकात एक गुंतवलेला नाही. अपवादासाठीसुद्धा कोठलाही निरर्थक फिलर गदिमांनी या गाण्यात घातलेला नाही. सुधीर फडक्यांची गायकीच अशी दमदार असते की प्रत्येक शब्दाचा अगदी खणखणीत उच्चार ते नेहमीच करतात. त्यामुळे तो स्वच्छ व स्पष्टपणे ऐकू येतोच, शिवाय गीताचे स्वर त्यातील भाव नेमकेपणे टिपतात. शब्द आणि स्वर यांचा असा अजोड मिलाप झाल्यामुळे हे गाणे चित्रपटातून बाहेर काढले तरी एक स्वतंत्र काव्य म्हणूनसुद्धा सर्व रसिकांना खचित आवडेल. यामधील आशय सर्वस्पर्शी आहे. तो चित्रपटाच्या कथानकापुरता मर्यादित नाही. आजच्या जगात मातीची भांडीच वापरात नाहीत त्यामुळे खेड्यातला कुंभार, त्याची गाडगी, मडकी आणि गाढव यांच्यात शहरात राहणा-या कुणाला इंटरेस्ट वाटेल? तरीसुद्धा हे गीत तुफान लोकप्रिय झाले याचे कारण माडगूळकरांनी मुळातच ते कुंभाराच्या रूपकामधून पण परमेश्वराला उद्देशून लिहिलेले आहे. तेंव्हा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आता पाहू.

विश्व निर्माण करणारा आपली कारागिरी अर्थातच साधे लाकडाचे चाक फिरवून त्यावर करणार नाही. तो तर कालचक्र फिरवीत असतो. सकाळ संध्याकाळ आणि दिवस रात्र ज्यामुळे होतात ती पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी असो किंवा उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा यांचे ऋतुचक्र चालवणारी पृथ्वीची सूर्याभोवती घातलेली प्रदक्षिणा असो, ही त्या जगन्नियंत्याच्या यंत्रामधील छोटी छोटी चक्रे आहेत. अशा अवाढव्य यंत्रामधून तो विश्वामधील असंख्य चराचर वस्तू सदोदित निर्माण करीत असतो तसेच नष्ट करीत असतो. त्याचे हे काम अनादिकालापासून सदोदित अव्याहतपणे चाललेले आहे आणि अनंत कालापर्यंत ते असेच चालत राहणार आहे.

माती, पाणी, उजेड, वारा आणि अवकाश म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामधून सृष्टीमधील सारी निर्मिती होते अशी धारणा आहे. माती किंवा पृथ्वीमधून आपण अन्न घेतो, ते पाण्यात विरघळून द्रवरूप अवस्थेतच आपल्या शरीरात ग्रहण केले जाते आणि अभिसरणाद्वारे सगळ्या पेशींपर्यंत जाऊन पोचते. आपल्या शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी तेज किंवा ऊर्जा ही तर अतीशय आवश्यक असते. ती शरीरात निर्माण करण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा पुरवठा होत राहणे आवश्यक असते. अशा रीतीने माती, पाणी, उजेड वारा या पसा-यातून माणूस तयार होतो. अवकाश म्हणजे एक रिकामी पोकळी आहे. त्यामधून ऊर्जेखेरीज इतर फारसे कांही मिळत नाही हे माहीत झाले असल्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही तरी आता चालण्यासारखे आहे. ज्या काळात पंचमहाभूतांची संकल्पना रूढ झाली तेंव्हा मात्र वातावरणाच्या पलीकडे आकाश नांवाचे एक खास प्रकारचे छप्पर आहे असेच समजले जात असे. असे कांही अस्तित्वात असल्यास त्यापासून कांही घटक तरी मानवाला मिळत असतील असे वाटणे साहजीक आहे. या मुख्य घटकांमधून परमेश्वर जी निर्मिती करतो ती किती विस्तृत आहे हे “आभाळचि मग ये आकारा” या शब्दांमधून व्यक्त केले आहे. आभाळासारखाच तिचा अंत किंवा पार लागणार नाही हे दाखवले आहे.

. . .  . . . . . . .(क्रमशः)

विठ्ठला तू वेडा कुंभार – भाग १

“फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार । विठ्ठला तू वेडा कुंभार ।।” हे ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले माझे अत्यंत आवडते गीत मी अगणित वेळा ऐकले असेल. वयाबरोबर माझ्या अनुभवांचे विश्व जसजसे विस्तारत गेले तसतसा या गीतातील शब्दांचा नवनवा अर्थ मला कळत गेला. त्यातून निघणा-या वेगवेगळ्या आशयांच्या निरनिराळ्या छटा दिसू लागल्या आणि विचारांचे तरंग मनात उठत गेले. गहन अर्थ असलेल्या अजरामर काव्याचे हेच तर वैशिष्ट्य असते.

आठवणींची पाने चाळता चाळता माझे मन थेट बालपणात जाऊन पोचले. त्या काळात शाळेतील पहिली दुसरीच्या वर्गांना पाठ्यपुस्तके नसायची. मुळाक्षरे, बाराखड्या, अंक, पाढे वगैरे गिरवून घेताघेतांनाच मास्तर लोक अधून मधून मनोरंजक पद्धतीने सामान्यज्ञानाचे मौखिक धडे देत असत. त्यातलीच एक कविता अशी होती. आधी मास्तरांनी विचारायचे, “चाक फिरवतो गरा गरा, मडकी करतो भराभरा, तो कोण?” त्यावर सगळी मुले एका सुरात ओरडत,”कुंभाssर!” लहान गांवातल्या सगळ्या मुलांच्या घरी गा़डगी, मडकी, माठ, कुंड्या यासारखी मातीची पात्रे सर्रास असत आणि ती आणण्याच्या निमित्ताने मोठ्या लोकांच्याबरोबर कुंभारवाड्यात चक्कर मारतांना कधी ना कधी ओल्या मातीमधून वेगवेगळे आकार निर्माण करणा-या त्या अद्भुत किमयागाराचे कसब सर्वांनीच डोळे विस्फारून पाहिलेले असायचे. रूपक अलंकार, प्रतीके वगैरे माहित नसण्याच्या वयात कवितेचा शब्दशः अर्थ जरी समजला तरी मिळवली अशी परिस्थिती असायची. तेंव्हा हे गाणे विठ्ठल नांवाच्या कुठल्या तरी कुंभाराला उद्देशून दुस-या कोणीतरी म्हंटलेले असणार असेच वाटायचे. पण त्याला वेडा कां म्हंटले असेल? त्याने कसला वेडेपणा केला असेल? आपणही सुरुवातीला या गाण्याचा वाच्यार्थ पाहू.

माती पाणी उजेड वारा । तूच मिसळशी सर्व पसारा । आभाळचि मग ये आकारा । तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पाऱ ।।

कुंभार जे काम करतो त्याचा थोडक्यात सारांश या ओळीत दिला आहे. आधी चिक्कण माती खणून आणायची, त्यातले खडे, कचरा वगैरे काढून टाकून ती बारीक चाळणीने चाळून घ्यायची, त्यात पाणी ओतून ती चांगली कालवायची, तिच्यावर नाचून नाचून ती चांगली तिंबायची, ती लोण्यासारखी मऊ झाल्यावर तिचा गोळा करून तो चाकावर मधोमध ठेवायचा. चाक फिरवता फिरवता हलक्या हाताने त्या गोळ्याला हवा तसा आकार द्यायचा. ते कच्चे मडके वा-याने थोडे हडकले की भट्टीत पक्के भाजायचे अशी सारी कुंभारकामाची प्रक्रिया असते. त्याने बनवलेल्या बहुतेक पात्रांचा मुख्य आकार आभाळासारखा घुमटाकार असतो म्हणून त्याच्या कामातून आभाळच आकाराला येते आहे असे म्हंटले आहे. हा विठ्ठल नांवाचा कुंभार इतका उद्योगी आणि कार्यक्षम आहे की त्याने बनवलेल्या घटांची संख्या अक्षरशः अगणित आहे. जागा वाचवण्यासाठी माठ, गाडगी, मडकी वगैरे एकावर एक रचून त्याची उतरंड बनवतात. या विक्रमी कुंभाराने बनवलेल्या घटांची विशाल उतरंड कुठपासून सुरू होते आणि कुठपर्यंत ती पसरली आहे तेथपर्यंत नजर सुद्धा पोचू शकत नाही. आता त्याने तरी इतकी मडकी कशाला म्हणून बनवून ठेवायची? वेडा कुठला?

घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे दैव वेगळे । तुझ्याविना ते कोणा न कळे । मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार ।।

या निष्णात कुंभाराने किती प्रकारचे म्हणून घट बनवावेत? कांही गोलमटोल तर कांही सडसडीत अंगाचे, कांही पसरट भांडी कोल्ह्याच्या कामाची तर कांही चिंचोळ्या तोंडाची उभट पात्रे करकोच्याच्या उपयोगाची, कोठे सुडौल शरीरयष्टी आणि घोटीव उंच मान असलेली सुरई तर कांही नुसतेच काळेकभिन्न माठ! 

जसे या घटांचे आकार वेगळे तशीच त्यांची नशीबेही किती भिन्न त-हेची असावीत? पूर्वीच्या काळी मातीच्या पात्रांना खूपच महत्व असायचे. सकाळी उठल्यावर “करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षी” नदीवरून पाणी आणायला जायच्या. तिथे गेल्यावर “जळी वाकुनि घट भरतांना कुठून अचानक कान्हा” यायचा आणि हळूच पाठीमागून कुणाची वेणी ओढायचा. तर कधी “घट डोईवर घट कमरेवर” घेऊन ठुमकत चाललेल्या राधेचा पदर नंदलाला हळूच पकडायचा. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गोपिकांमधील कोणाला तरी एखादा वात्रट “ते दूध तुझ्या त्या घटातले कां अधिक गोड लागे न कळे” असे विचारायचा. मांजरांच्या आणि पोरांच्या हाती लागू नये म्हणून गवळणी आपले दही दूध हंडीत भरून उंच शिंक्यावर टांगून ठेवीत असत, पण कृष्ण आणि त्याचे बालगोपाल सवंगडी एकमेकांच्या खांद्यावर चढून ते फस्त करीतच असत. अशा त्या सुवर्णयुगात कुंभाला इतके अधिक महत्व प्राप्त झालेले होते की आकाशातील बारा राशींमध्ये त्यालाही स्थान मिळाले. हे सगळे नशीबवान कुंभ होते. त्यांचा उपयोग दही, दूध आणि लोणी ठेवण्यासाठी झाला आणि गोपिकांनी त्यांना कडेवर घेतले. तसेच कांही रांजण मोहोरांनी भरले जात असत तर कांही कलाकुसर केलेले चिनी मातीचे घट राजा महाराजांच्या वाड्यांना शोभा आणीत. आजसुद्धा चिनी मातीच्या फुलदाण्या घरोघरी सजावटीसाठी ठेवलेल्या असतात आणि पॉटरी, टेराकोटा वगैरे कलाकृती थोरामोठ्यांचे दिवाणखाने सजवतात.

पण फुटके नशीब घेऊन आलेल्यांचे काय? खेड्यापाड्यात जिथे चुलीवर स्वयंपाक केला जातो तिथे काम संपल्यावर चुलीमधील राख आणि धगधगते निखारे एका खापरामध्ये काढून ठेवले जातात. अंत्ययात्रेला जातांना एका मडक्यात निखारे घालून बरोबर नेण्याची प्रथा आहे. त्या बिचा-याची कहाणी मृत्तिकेपासून सुरू होते आणि मर्तिकाला संपते. त्यांच्या वाट्याला नुसताच रखरखाट ठेवलेला असतो. कांही विचारे घडे पालथेच पडून राहतात. पाणी साठवण्याचे भाग्यच त्यांना लाभत नाही. आजच्या स्टेनलेस स्टील आणि फिल्टरच्या युगात कोणीही स्वयंपाकासाठी किंवा साठवणीसाठी गाडगी मडकी वापरत नाहीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा उपयोगसुद्धा झपाट्याने नाहीसा होत चालला आहे. शहरात वाढलेल्या मुलांना ‘मटका’ या शब्दाचा अर्थ ‘जुगाराचा एक प्रकार’ एवढाच माहीत असावा हे केवढे दुर्दैव! अलीबाबाच्या गोष्टीमध्ये खजिना असलेल्या गुहेमधील रांजण जडजवाहिराने भरलेले असतात, तर चाळीस चोर मोठमोठ्या रांजणात बसून येतात आणि त्यांचे मरणसुद्धा त्यांतच ओढवते. कुणाचे दैव कसे आणि दुस-या कुणाचे कसे ते काय सांगावे?

 . . . . . . . (क्रमशः)