स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान …. (खास पुरुषांसाठी) – भाग १ -३

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग १ – प्रस्तावना

कोणे एके काळी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र असायचे असे मी लहानपणी कुठेतरी वाचले होते. त्या काळातले राजेरजवाडे, नबाब, सुलतान वगैरे लोक सतत एकमेकांच्या राज्यांवर चढाया, स्वाऱ्या किंवा हल्ले करायचे आणि त्यामुळे पुरुषमंडळी नेहमी युध्दांच्या मोहिमांवर असायची. घरातल्या महिला ‘चूल’ आणि ‘मूल’ या दोन्ही कार्यक्षेत्रांवरील आपली निरंकुश सत्ता सुखेनैव उपभोगायच्या. इंग्रजांचे राज्य भारतावर आल्यानंतर या सगळ्या आपापसातल्या लढाया बंद झाल्यामुळे पुरुष घरी राहू लागले आणि त्यामुळे अडचणी यायला लागल्या. आता महिलांनी आपला मोर्चा बाहेरच्या क्षेत्रांकडे वळवावा या हेतूने कांही समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणसंस्था काढल्या. त्यातून तय्यार होऊन बाहेर आलेल्या स्त्रियांनी सर्वात आधी शिक्षणक्षेत्रच सर करून टाकले. तिथले ‘सर’ दिसेनासे झाले आणि मानिनीसारख्या चित्रपटातले आदर्श शिक्षक अदृष्य होऊन बाकीचे मास्तरसुध्दा मराठी ग्रामीण चित्रपटातले ‘मास्तुरे’ झाले. या जुन्या सिनेमांच्या वेळेवरच डीव्हीडी काढून त्या जतन करून ठेवल्या तर हे प्राणी कसे असायचे ते भावी पिढ्यांमधल्या मुलांना समजायला मदत होईल.

शिक्षण क्षेत्रानंतर किंवा त्याच्या पाठोपाठ अनेक महिलांनी ऑफिसांमध्येही शिरकाव करून तिथल्या कारकुंड्यांना हद्दपार केलेच, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट), दूरध्वनिसंयोजिका (टेलिफोन ऑपरेटर) यासारख्या खास राखीव जागा तयार करून घेतल्या. वैद्यकीय (मेडिकल), अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) इत्यादि विविध क्षेत्रांत आता महिलांची घोडदौड चालली असतांनाच परिवारनियोजनामुळे मुलांची संख्या घटून आता घरटी एकदोनवर आली आहे. ती मुले देखील बोलायला आणि चालायाला लागली की “बाबा, बाबा” करत बापाला चिकटतात आणि त्याच्या मांडीवर बसून टीव्ही, डीव्ही़डी आणि यूट्यूब पहात पटापट मोठी होऊन जातात. शिवाय प्लेस्कूल्स, पाळणाघरे वगैरे निघाल्यानंतर त्यांना कळायला लागायच्या आधीच ती मुले कांही काळ घराबाहेर राहू लागतात. पूर्वीच्या काळातल्या महिलांकडे ‘बालसंगोपन’ हा एक ‘फुललाइफ’साठी ‘फुलटाइम परमनंट जॉब’ असायचा, तो या सगळ्यांमुळे आता ‘शॉर्ट टाइम’साठी ‘पार्टटाइम’ झाला आहे. पण स्वयंपाकघराचे ‘किचन’ झाले आणि त्यातली चूल जाऊन तिच्या जागी गॅसची शेगडी, इलेक्ट्रिक हॉटप्लेट आणि मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे साधने आली असली तरी त्यावर घट्ट आवळून ठेवलेली आपली मजबूत पकड मात्र कोणत्याही महिलेने अजूनपर्यंत सैल केलेली दिसत नाही. “मी किचनमध्ये बिझी आहे तोवर जरा डॉलीकडे बघ ना प्लीज” किंवा “गिळायला पाहिजे असेल तर आपल्या कार्ट्याला सांभाळा” असे संवाद ऐकायला मिळतात, पण आई मुलाला मांडीवर घेऊन टॉम अँड जेरीची कार्टून पहात खिदळत बसली आहे आणि स्वैपाकघरात कांदे चिरत असलेल्या बाबाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहताहेत असे चित्र कांही केल्या माझ्या डोळ्यासमोर तरी येत नाही. पण ते लवकरच येण्याची शक्यता असल्याने मी त्यांना मदत करायचे ठरवले आहे. ही सगळी प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात मला स्वयंपाकघरात लुडबुड करायची फारशी संधी मिळाली नाही, पण आता आंतर्जालावरल्या ई जीवनातल्या मुदपाकखान्यात धुडगुस घालायच्या इराद्याने मी दाखल झालो आहे.

माझी मुळातलीच चिकित्सक वृत्ती आणि त्यातून विज्ञानतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दीर्घ काळ काम केल्यामुळे (आधीच मर्कट तशातचि मद्य प्याला .. वगैरे सिनर्जीच्या धर्तीवर) त्यांचा चश्मा आता माझ्या कवटीतच कायमसाठी फिट्ट होऊन रुतून बसला असावा. कांही केल्या तो निघतच नसल्यामुळे स्वैपाकघरातसुध्दा मला तिथले विज्ञान आणि तंत्रज्ञानच दिसते आणि मी या लेखात त्याच्याबद्दलच लिहिणार आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहातांना प्रत्येक गोष्टीचा जरासा मूलभूत विचार करावा लागतो. आपण सजीव प्राणी असल्यामुळे आपल्या शरीराला अन्नाची गरज लागते. रानातली हरणे, ससे, माकडे वगैरे शाकाहारी प्राणी झाडांची पाने, फळे, मुळे वगैरे तोडून त्यांना कच्चेच खातात आणि आतापर्यंत शिल्लक उरलेले वाघ, सिंह, तरस, लांडगे वगैरे मांसभक्षी प्राणी त्यांच्या शिकारींचे लचके तोडून ते कच्चेच गिळतात. गुरेढोरे वगैरे माणसाललेल्या प्राण्यांना कधीमधी शिजलेले आंबोण मिळत असले तरी त्यांच्या रोजच्या खाण्यात चारा, भुसा किंवा कडबाच असतो. कुत्र्यामांजरींसारख्या लाडावलेल्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचे कितीही लाड केले तरी हाडुक दिसले की कुत्री सुखावतात आणि मांजरीला उंदीर किंवा चिमणी दिसली की ती त्याच्यावर झेपावते. या प्राण्यांच्या हजारावर पिढ्या माणसांच्या सहवासात गेल्या असल्या तरी कच्चे अन्न खाण्याचे आपले सामर्थ्य त्यांनी अजून शाबूत राखले आहे. माणूस मात्र ते बहुतांशाने गमावून बसला आहे. आश्रमात रहाणारे कांही योगीराज आणि फक्त बदाम, पिस्ते, मनुका वगैरे सुका मेवा खाऊन जगणे ज्यांना परवडू शकते असे जुन्या काळातले थोर नेते किंवा हल्लीचे प्रशिक्षित अतिरेकी अशांचे अपवाद सोडले तर इतर सर्वसामान्य माणसांना रोज तीन्ही त्रिकाळ खाण्यासाठी शिजवलेले अन्न लागते. त्यामुळे पाकसिध्दी ही आपल्या जीवनातली अत्यावश्यक गोष्ट आहे यात शंका नाही.

स्वयंपाक कशासाठी करायचा ? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर तो कसा करायचा याचा विचार करावा लागेल. पूर्वीच्या जमान्यात वर्षातून एकदा किंवा दोनदा शेतातली पिके घरात आली की ते धान्यधून्य पोत्यात किंवा पिपात भरून ठेवत असत आणि त्यातले थोडे थोडे काढून ते नंतरच्या काळात उपयोगात आणले जात असे. त्या धान्यांना अधूनमधून ऊन दाखवणे, मोठी छिद्रे असलेल्या पत्र्याच्या चाळणीतून चाळणे, सुपाने पाखडणे वगैरे कामे वर्षभर करावी लागत असत. शिवाय भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातले दाणे काढणे, हरभरा, तूर, मूग यासारखी द्विदल धान्ये जात्यावर भरडून त्यातल्या डाळींना त्यावरील कवचातून मुक्त करून एकमेकींपासून विलग करणे वगैरे संस्कार केल्यानंतर त्यांचा उपयोग स्वयंपाकात होत असे. अशा प्रकारची कामे मी लहानपणी नुसती डोळ्यांनी पाहिलेलीच नाहीत तर स्वतः हाताने करून अनुभवली आहेत. पण शहरातल्या पॉश घरांमध्ये या कामांसाठी जागा नसते, ती करण्यासाठी वेळही नसतो आणि साधनेही नसतात. आजकाल सगळ्या संस्करित (प्रोसेस्ड) वस्तू बाजारात आयत्या विकत मिळत असल्यामुळे त्या प्रकारच्या कामांची आता गरजही उरलेली नाही. त्यामुळे मी या लेखातल्या विज्ञानाची सुरुवात निसर्गातून मिळालेल्या अन्नपदार्थांच्या कच्च्या मालावर संस्कार करून ज्या स्वरूपात ते माल आपल्या घरी येतात तिथून करणार आहे.

बाजारात मिळणारे ‘रेडी टू ईट’ प्रकारचे तयार पदार्थ खाणाऱ्या लोकांना त्यामागील कला किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची आवश्यकता नसते, कोणता पदार्थ कोणत्या खाद्यालयात किती रुपड्यांना मिळतो एवढे वाणिज्य समजणे पुरेसे असते. इंस्टन्ट नूडल्स, पुलाव मिक्स वगैरे झटपट तयार करता येण्याजोग्या पदार्थांच्या पाकिटांवर त्याची सविस्तर कृती छापलेली असते. ती देखील वाचायचा जे लोक आळस करत असतील ते महाभाग हा लेख वाचायचे कष्ट घेतील अशी शक्यता कमी आहे. त्यानाही या लेखाचा फारसा उपयोग नाही. ‘रेडी टू कुक’ असे पदार्थ घरी आणून त्यावर प्रक्रिया करण्यातले तंत्रज्ञान आणि त्यामागे असलेले विज्ञान मात्र एकदा समजून घेतले तर निदान अर्धे तरी नवे खाद्यपदार्थ खातांनाच ते कसे तयार केले याचा साधारण अंदाज येतो आणि एकदा वाचलेली रेसिपी सहज लक्षात येते असे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

स्वयंपाकाच्या क्रियेत कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांचा सुरेख मिलाप असतो. विज्ञाननिष्ठ माणूस कोठलेही काम सुरू करायच्या आधी ते कसे करायचे याची रूपरेखा ठरवून त्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे वगैरे जमवून झाल्यानंतर ते काम पध्दतशीररीत्या करत जातो. कलाकार थोडा कलंदर वृत्तीचा असल्यामुळे तो सर्वच कामे उत्स्फूर्तपणे करतो. सायंटिफिकली आधी ठरवून तयार केलेला पदार्थ बहुतेक वेळा अपेक्षेच्या जवळपास पोचतो आणि एका किमान गुणवत्तेचा असतो. पुन्हा पुन्हा केला तरी तो तसाच दिसतो आणि त्याची चव तशीच लागते. आर्टिस्टिकली बनवलेल्या पदार्थाची भट्टी मात्र जमली तर तो केंव्हा केंव्हा अफलातून बनतो पण पुन्हा कधी तो तसा बनेलच याची ग्वाही देता येत नाही. याचे कारण कलाकार पूर्णपणे आपल्या तंद्रीत गेल्यावर आधी ठरवलेले त्याला आठवत नाही आणि त्यातून भानावर आल्यानंतर मागच्या बाबी त्याच्या लक्षात रहात नाहीत असा हा एक प्रकारचा मेंदूतला ‘केमिकल लोचा’ आहे. पण सर्वच माणसांच्या अंगात सायंटिस्ट आणि आर्टिस्ट कमीअधिक प्रमाणात असतात. त्या दोघांचाही उपयोग स्वयंपाकात होतो असे म्हणण्यापेक्षा ते आपणहून त्यात शिरतातच.

निसर्गानेच स्त्रियांना अधिक प्रमाणात कलासक्ती दिलेली आहे. याचा पुरावा हवा असेल तर कोणत्याही कलामहाविद्यालयात जाऊन पहा. तिथे गोपिकांच्या मोठ्या घोळक्यात एकादाच कृष्ण आणि त्याच्या आसपास दोन तीन पेंद्या दिसतील. ‘स्वयंपाकघरातले विज्ञान’ हा मथळा वाचल्यानंतर किती महिला वाचक (की वाचिका ?) हा लेख वाचतील याची मला शंका आहे. ”याला स्वयंपाकातलं काय डोंबल कळतंय्?”, ”आमचा मेला सारा जन्म स्वैपाक करण्यात गेला, आता हा आणखी वेगळं असं काय सांगणाराय् ?” हे तर आहेच. शिवाय “ते विज्ञान बिज्ञान नको बाई” वगैरे विचाराने या लेखावर त्या बहुधा टिचकी मारणार नाहीत असा माझा अंदाज आहे. एवीतेवी त्या हा लेख वाचणार नाहीतच असे वाटल्यामुळे मीच त्याच्या मथळ्यात ‘ खास पुरुषांसाठी’ असे जोडून दिले आहे. कदाचित त्यामुळे कुतूहलापोटी कांही टिचक्या मारल्या जातील अशी आशा आहे. ‘खास पुरुषांसाठी’ हे पाहून कोणी भलत्याच अपेक्षेने हा लेख उघडला तर त्यांच्या पदरी मात्र निराशा पडेल. पण दोन्ही बाजूंनी माझ्या लेखाच्या वाचनांची टीआरपी रेटिंग वाढायला मदतच होईल. वर दिलेल्या परिच्छेदात अनेक लोकांना मी वाचकवर्गातून वगळले आहे, त्याची अंशतः भरपाई होईल.

हा लेख वाचतांना कोणाच्या दुखऱ्या नसेला स्पर्श झाला असला तर त्यांनी मला उदार मनाने माफ करावे आणि ते जमले नाही तर माझ्यावर आलेला आपला राग दोन चार दिवस जमा करून ठेवावा. त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे मी या मालिकेच्या पुढील भागात सांगणार आहे. ( तेवढेच थोडेसे अॅडव्हान्स बुकिंग !)

. . . . . .

भाग २ – प्रयोजन आणि नियोजन

मी एक इंजिनियर आणि सायंटिस्ट असल्यामुळे माझा जन्म कार्यशाळा (वर्कशॉप्स) आणि प्रयोगशाळांमध्ये वावरण्यात गेला. मी स्वयंपाकघराकडेसुद्धा त्याच दृष्टीकोनामधून पहात आलो आहे. म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

कारखान्यामध्ये काही तयार करायचे असते किंवा प्रयोगशाळेत प्रयोग करायचे असतात तेंव्हा त्यामागील उद्देश आणि त्यांचे उपयोग वगैरे पाहून त्यानुसार कच्चा माल निवडतात, त्यावर कोणकोणत्या प्रक्रिया किंवा प्रयोग करायचे हे ठरवून त्यासाठी लागणारी सर्व साधने, उपकरणे आणि यंत्रसामुग्री जमवतात. त्या उत्पादनात किंवा प्रयोगात करावयाच्या कृतींचा क्रम आणि त्यांच्यासाठी लागणारा वेळ या सगळ्यांचा अंदाज वगैरे घेऊन त्यानुसार एक सविस्तर प्रोसीजर निश्चित केली जाते. ही सगळी तयारी करून झाल्यानंतर प्रत्यक्षात ती वस्तू तयार करण्याचे किंवा तो प्रयोग करण्याचे काम सुरू केले जाते. निर्मितीचे काम किंवा प्रयोग कुठे न अडता सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी ही पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते.

विशिष्ट महत्वाच्या उपयोगासाठी एकादी खास वस्तू बनवायची असेल तर त्यासाठी उत्तमोत्तम साहित्य आणून त्यावर प्रगत तंत्राने आणि काळजीपूर्वक रीतीने सगळ्या प्रक्रिया करून घेऊन ती वस्तू जास्तीत जास्त चांगली कशी करता येईल हे पाहिले जाते. पण जर दुसरी एकादी सामान्य वस्तू तांतडीने हवी असेल तर मात्र जवळ उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून ती किंवा तत्सम वस्तू लगेच तयार करावी लागते. एरवी बाजारात कोणता कच्चा माल सहज आणि रास्त भावात उपलब्ध असेल, कार्यशाळेतल्या यंत्रसामुग्रीचा, उपकरणांचा आणि कामगारांच्या कौशल्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, कोणत्या पक्क्या मालाला बाजारात चांगला उठाव असेल वगैरे बाबतींचा विचार करून कारखाने चालवले जात असतात.

स्वयंपाकघरातसुध्दा प्रयोगशाळा किंवा कारखान्यांसारखेच घडत असते. दिवाळसणाला जावई येणार असला तर त्याला खूश करण्यासाठी जेवणात कोणकोणते बेत करायचे याचे सविस्तर नियोजन करून त्याला पंचपक्वान्नांची मेजवानी देण्याची संपूर्ण तयारी केली जाते आणि रात्री अपरात्री एकादा अगांतुक पाहुणा अचानकपणे घरी आला तर त्याला जेऊ घालण्यासाठी घरात जी काही साधनसामुग्री उपलब्ध असेल त्यानुसार पटकन तयार होण्यासारखे एक दोनच पदार्थ बनवले जातात, मग ते भातपिठले असेल, मुगाची खिचडी असेल, चटणीभाकरी असेल, पोळीभाजी असेल किंवा ब्रेडआमलेट असेल. एरवी मात्र गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये, भाजीपाला वगैरे ज्या गोष्टी बाजारात सहज उपलब्ध असतील तसेच स्वयंपाकघरात कशाचा साठा असेल ते पाहून, तसेच घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, पथ्यपाणी, उपास तापास वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यातल्या त्यात सकस आणि चविष्ट असे खाद्यपदार्थ रोजच्या जेवणासाठी रांधले जातात.

सकाळी उठल्या उठल्या होणाऱ्या चहापानानंतर सकाळची न्याहरी (नाश्ता), दुपारचे जेवण, मधल्या वेळेतला चहा फराळ, रात्रीचे जेवण आणि झोपण्यापूर्वी दूध किंवा कॉफी अशा नाना मिषाने आपण अनंत खाद्यपदार्थ पोटात ढकलत असतो. तंत्रज्ञानाचा विचार करता ते केंव्हा तोंडात टाकायचे यापेक्षा ते कसे तयार करायचे हे जास्त महत्वाचे असल्यामुळे मी त्यांचे त्यानुसार वर्गीकरण करणार आहे. सरबतासारखे पदार्थ तयार करतांना ऊष्णतेची गरजच नसते, पण पन्ह्यासाठी ती लागते. स्वयंपाक करतांना चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड वगैरे साइडमेनूला थोडे बाजूला ठेऊन वरणभात, पोळीभाजी यासारख्या जेवणातल्या मुख्य पदार्थांकडे आधी जास्त लक्ष दिले जाते. कुकरमध्ये वरणभात शिजत असतांना किंवा मध्येच थोडी सवड काढून इतर पदार्थ झटपट तयार केले जातात. यातल्या कुठल्याही पदार्थाची पाककृती देणे हा या लेखाचा उद्देश नाही. कोणत्या कृतीचा कशासाठी उपयोग होऊ शकेल याचे काही उल्लेख अनुषंगाने येतील.

प्रयोग किंवा उत्पादन सुरू करायच्या आधी त्यासाठी आणलेले साहित्य तपासून घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्या साहित्याचे गुणधर्म माहीत असायला हवेत. जगातला प्रत्येक पदार्थ हा घनरूप किंवा द्रवरूप किंवा वायुरूप असतो एवढे सर्वांनाच माहीत असते. खाद्यपदार्थांपैकी दूध आणि नारळातले पाणी एवढेच नैसर्गिक रीत्या द्रवरूप असतात, अंड्यातला बलक हा बराच दाट द्रव असतो. इतर सारे खाद्य पदार्थ दिसायला घनरूप दिसतात, पण त्यात कमीजास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो. शेंगदाणे, खोबरे, सोयाबीन, काजू, बदाम यासारख्या तेलबियांमध्ये द्रवरूप तेल भरलेले असते. बहुतेक भाज्या आणि फळे यात तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ओलावा असतो म्हणजे त्यांच्या कणाकणांमध्ये रसाच्या रूपात पाणी असते. त्यांचेमधील बहुतेक जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) पाण्यात किंवा तेलात विरघळणारे असतात.

या द्रवरूप पदार्थांचा एक गुणधर्म असा आहे की त्यांचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यातले पाणी हळूहळू हवेत उडून जात असते. भाज्या आणि फळे ठेवल्या जागी सुकून जातात. उन्हाळ्यात ते वेगाने घडते. रेफ्रीजरेटरमध्येसुद्धा ते थोड्या कमी प्रमाणात पण घडतच असते. या क्रियेमध्ये त्यांच्यामधली काही सत्वे नष्ट होत असतात.

पाण्याचा दुसरा एक गुणधर्म असा आहे की ते जसे आपल्यासाठी जीवन आहे तसेच ते कीटक, जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) वगैरेंसाठीसुद्धा आहे. त्यांची वाढ ओलसर पदार्थांमध्ये झपाट्याने होते. यामुळे ओलसर किंवा दमट वस्तूंना बुरशी लागते, त्यांच्यावर माशा, चिलटे वगैरे घोंघावतात, ते पदार्थ सडतात, कुजतात, त्यांच्यात अळ्या होतात वगैरे अनेक प्रकारे ते लगेच खराब व्हायला लागतात. रेफ्रीजरेटरमध्ये सुद्धा या क्रियाही कमी प्रमाणात पण होत असतात.

आपल्या शरीराला जसे कातडीचे संरक्षक कवच लाभलेले असते, तसे ते अनेक वनस्पतीजन्य पदार्थांवरही सालीच्या रूपात असते. ते काही प्रमाणात किड्यांना व सूक्ष्म जंतूंना आत शिरू देत नाही. ऊष्णतेमुळे हे कवच आधी सुकते आणि आतल्या रसांचे संरक्षण करते. पण भाज्या किंवा फळे सोलून किंवा चिरून जास्त वेळ ठेवली तर त्यांच्यातले रस आणि त्यातली काही जीवनसत्वे व खनिजे पाण्यासोबत हवेत उडून जातात. त्याच्या कुजण्याची क्रियासुद्धा अधिक वेगाने घडायला लागते. याखेरीज हवेमधील प्राणवायूच्या संपर्कात आल्यावर काही भाज्या व फळे यांचे ऑक्सिडेशन सुरू होते. चिरून ठेवलेल्या फोडींचे रंग बदलतांना दिसतात ते याचमुळे. हे सुद्धा आपल्या आरोग्याला हितकारक नसते.

तर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी त्यासाठी आणलेला सर्व माल ताजा आहे की नाही हे दृष्टी, स्पर्श आणि गंध यांनी तपासायला हवे म्हणजे नजर फिरवून, हातात घेऊन आणि वास घेऊन पहायला हवा. शंका वाटल्यास चाखून पहायला हवा आणि तो किती प्रमाणात सुकला, किडला किंवा नासला आहे हे पाहून निदान तेवढा भाग काढून टाकला पाहिजे. कुजायला सुरुवात झाली असल्यास ते पूर्ण फळ किंवा शेंगच टाकून देणे बरे असते. सुकणे, कुजणे आणि कीड लागणे या नैसर्गिक क्रिया काही प्रमाणात ती फळे किंवा भाज्या अजून शेतात असतांनाच सुरू होत असतात आणि तिथून बाजारात आल्यानंतरही चालत असतात. आपल्याला त्या संपूर्णपणे टाळता येतच नाहीत. बाजारामधून आणलेल्या मालामधून आपल्या उपयोगासाठी आपणच चांगला निर्दोष माल वेचायचा असतो. निवडणे हा स्वयंपाकातला पहिला महत्वाचा टप्पा असतो. त्यात गफलत झाली तर ती नंतर सुधारता येत नाही.

. . . . . . . . .. . . . .

भाग ३ … पूर्वतयारी

स्वयंपाकासाठी घेतलेला प्रत्येक अन्नपदार्थ निर्जंतुक असणे खाणाऱ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यासाठी सर्वात आधी त्या पदार्थांना पाण्याने धुवून घेणे हा साधा नेहमीचा उपाय आहे, पण त्यामागील विज्ञान समजून घ्यायला हवे. बहुतेक भाजीपाला शेतांमधून सरळ बाजारात येतो. त्यांना शेतातल्या ओल्या मातीचे कण चिकटलेले असतात. त्या कणांमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. जमीनीमधून उपटून आणलेल्या पालेभाज्या तर चिखलाने माखलेल्या असतात. याशिवाय शेतात घातलेली सेंद्रिय किंवा रासायनिक खते, रासायनिक जंतुनाशके वगैरेंचे सूक्ष्म कणही भाज्यांना लागलेले असतात ते मानवांना अपायकारक असतात. पाण्याने धुण्याच्या क्रियेत या सर्वाना भाज्यांपासून संपूर्णपणे दूर केले जाईल हे पहायला पाहिजे. यासाठी पुरेसा वेळ आणि पाणी खर्च करणे आवश्यक आहे. यात बचत करण्यासाठी बहुतेक पालेभाज्या धुवायच्या आधीच निवडून घेतल्या जातात. पण आधी सांगितल्याप्रमाणे बहुतेक भाज्या आणि फळे यांच्या कणाकणांमध्ये असलेली बहुतेक जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) पाण्यात विरघळणारे असतात. पुन्हा पुन्हा धुण्याच्या नादात आपल्याला उपयुक्त व आवश्यक अशी नैसर्गिक तत्वे नष्ट होणार नाहीत याची काळजीही घ्यायला हवी. हे मोजण्याचे कोणतेही साधन आपल्या घरी असत नाही. आपला अंदाज आणि अनुभव यावरूनच ते ठरवावयचे असते.

फळांच्या सालींमध्ये मुख्यतः असणारे सेल्युलोज अन्नपचनानंतर पोट साफ होण्यासाठी गुणकारक असते. यामुळे फळांना सालांसकट खाणे शक्य असल्यास त्यांच्या सालींना काढून टाकू नये. पण काही फळे किंवा फळभाज्यांच्या साली इतक्या कठीण किंवा चोथट असतात की आपण त्यांना चावून खाऊ शकतच नाही, अशा साली शिजवल्यानंतरही मऊ होत नसतील तर मात्र त्यांना काढून टाकणे आवश्यक असते. या साली जरी काढूनच टाकायच्या असल्या तरीसुद्धा आधी ती फळे सालांसकट धुणे आरोग्याच्या दृष्टीने इष्ट असते. कारण त्या फळांमधली जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) त्यांच्या रसांमध्ये सामावलेली असतात. संरक्षक सालीमुळे ती बाहेर पडत नाहीत. पण साली काढून भाज्या किंवा फळांना धुतल्यास ते उपयुक्त द्राव पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात. कुठल्याही भाज्यांना आधी बारीक चिरून नंतर धुतल्याने तर आपण त्यातली बहुतेक सगळीच सत्वे गमावून बसतो.

पिठे. कणिक, रवा, मैदा, बेसन यासारखे दळलेले पदार्थ पाण्याने धुता येणे शक्यच नसते. गहू, ज्वारी, चणे वगैरे मुळातल्या धान्यांची त्यांना दळण्याच्या आधीच आवश्यक तेवढी सफाई केली गेली असावी असे गृहीत धरावे लागते. पण ही पिठे जराशी जुनी झाली असल्यास त्यात थोडी जाळी धरली असल्याची शक्यता असते. तशी शंका आल्यास त्यांना एकदा चाळून घ्यावे लागते. पिठांपासून तयार केले जाणारे बहुतेक तगळेच पदार्थ भाजले, शिजवले किंवा तळले जात असल्यामुळे या क्रियांमध्ये त्यांचे निर्जंतुकीकरण होतेच. पूर्वीच्या काळात घरातल्या साठवणीच्या धान्यांना अधूनमधून ऊन दाखवणे, मोठी छिद्रे असलेल्या पत्र्याच्या चाळणीतून चाळणे, सुपाने पाखडणे, निवडून त्यातले खडे बाजूला काढणे वगैरे कामे सवडीने घरीच करावी लागत असत. पण आजकाल निवडलेले धान्य आणि दळलेली पिठे दुकानात मिळायची सोय झाली आहे.

डाळ, तांदूळ, कडधान्ये वगैरेंना मात्र शिजायला ठेवायच्या आधी निदान दोन तीन वेळा पाण्यात धुवून काढायला हवे. या धान्यांमध्ये माती मिसळलेली असण्याची शक्यता कमी असली, तरी त्यांना किंचित कीड लागलेली असू शकते किंवा कीड लागू नये यासाठी त्यात बोरिक पॉवडरसारखे जंतुनाशक मिसळून ठेवलेले असू शकते, ते आपल्या पोटात गेल्यास अपायकारक ठरते. शिजवण्यासाठी घेतलेले धान्य थोड्याशा पाण्यात टाकून खळबळून घेतल्यास आपल्याला त्या पाण्यात गढूळपणा दिसला तर तो जाईपर्यंत ते धान्य धुवून घेणे बरे असते. या धान्यांमध्ये एकाद दुसरा किडलेला दाणा असला तर तो पाण्यावर तरंगतो आणि धुतांना टाकून दिला जातो. पण जास्त प्रमाणात कीड लागलेले धान्य खाणे इष्ट नसते कारण आपल्या डोळ्यांना दिसणारे किडे धान्यामधून काढून टाकले तरी त्यांची अंडी, अळ्या आणि त्या किड्यांनी उत्सर्जन केलेली घाण ते मागे ठेऊन जातात.

“चणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रह्म पदी नाचे.” अशी एक म्हण आहे. लोखंडाचे सोडाच, नैसर्गिक चणे खाणेसुद्धा बहुतेक लोकांसाठी खूप अवघड किंवा अशक्य असते. त्याचे कठीण दाणे चावून चिरडण्याइतकी शक्तीच आजकाल माणसांच्या तोंडाच्या स्नायूंमध्ये नसते. पण तेच हरभरे काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यावर टम्म फुगतात आणि बरेच मऊ आणि खाण्यायोग्य होतात. मूग, मटकी, चवळी यासारखी आणखी काही कडधान्ये आपण पाण्यात भिजवून फुगल्यावर खाऊ शकतो. ही भिजवलेली कडधान्ये कापडात बांधून ठेवली तर दिवसभरात अंकुरित होतात, म्हणजे मोडाच्या स्वरूपात त्यांना अंकुर फुटतात. संपूर्ण नवीन वनस्पतींना जन्म देण्याचे सामर्थ्य या बारीकशा मोडांमध्ये असल्यामुळे ते जीवनसत्वांनी भरलेले असतात आणि आरोग्यासाठी पोषक असतात.

गहू, तांदूळ, ज्वारी यासारखी तृणधान्ये पाण्यात भिजवूनसुद्धा आपण खाऊ शकत नाही आणि कशीबशी खाल्लीच तर ती पचणे कठीण असते. यामुळे या धान्यापासून तयार करायच्या खाद्यपदार्थांना भाजणे, शिजवणे, तळणे अशा अग्निदिव्यामधून जावेच लागते. काही प्रकारची ज्वारी आणि मके यांचे दाणे तीव्र आंचेवर भाजल्यावर फुटून त्यांचे रूपांतर लाह्यांमध्ये होते. चणे भाजल्यावर त्याचे फुटाणे बनतात. हे पदार्थ चविष्टही असतात आणि त्याना चावून खाणे सोपे असते. शेतातल्या हुरडा पार्टीमध्ये आपण ही सगळीच धान्ये कोवळी असतांना खाऊ शकतो, पण ते स्वयंपाकघरातले विज्ञान या सदरात येणार नाही.

तर स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये खालील गोष्टी केल्या जातात.
भाजीपाला निवडणे आणि स्वच्छ धुणे,
डाळ, तांदूळ, भिजवून ठेवलेली कडधान्ये स्वच्छ धुणे
गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ, रवा, मैदा, बेसन वगैरे (गरज असल्यास) चाळून घेणे.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग :

स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग ४ – ६
https://anandghare2.wordpress.com/2022/11/23/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-2/

इंद्र देवा रे देवा ….

मी काही वर्षांपूर्वी लिहिलेला हा हलकाफुलका लेख
नुकताच जागतिक महिला दिवस येऊन गेला. त्या वेळी पृथ्वीवर केली गेलेली वक्तव्ये स्वर्गामधल्या देवांचा राजा इन्द्र याच्या दरबारापर्यंत जाऊन पोचली आणि मग तिथे काय झाले? त्या वर्षी होळीच्या निमित्याने लिहिलेले एक थोडे हलके फुलके वगनाट्य.

. . . . . . . . . . . . . . . . . .

इंद्रमहाराज आपल्या प्रधानाची वाट पहात आहेत. धावत पळत आणि घाम पुसत प्रधानजी प्रवेश करतात.
इंद्रदेवः अहो प्रधानजी, मी केंव्हाची तुमची वाट पहातो आहे, इतका वेळ न सांगता कुठं गेला होतात?
प्रधानः महाराज, मी त्या आधारकार्डाच्या रांगेत उभा होतो तेंव्हा नारदमुनीचा अर्जंट टेक्स्ट मेसेज आला, त्यामुळे मला रांगेतला नंबर सोडून ‘शाडा’कडे धावावं लागलं.
इंद्रदेवः कुठं?
प्रधानः अहो स्वर्गलोक हाउसिंग …
इंद्रदेवः कशाला?
प्रधानः त्यांच्या फ्लॅट्सची उद्या सोडत आहे ना? तुमचं नाव त्यांच्या यादीत घुसवायचं होतं.
इंद्रदेवः का?
प्रधानः तुम्ही सांगा, इतकी वर्षं इंद्रपद सांभाळलंत, स्वतःचा एकादा तरी बंगला, फार्महाउस नाही तर पेंटहाउस बांधून ठेवलंय्त?
इंद्रदेवः नाही.
प्रधानः निदान बटाट्याच्या चाळीतली खोली?
इंद्रदेवः कुठली?
प्रधानः अरे हो, ती चाळ तर पाडून टाकलीय् नाही का, पण तिथं बांधलेल्या खिरानंदानी टॉवर्समध्ये फ्लॅट घेतलाय्त?
इंद्रदेवः अहो, त्यातले काही नाही. पण मी त्या शाडाच्या गळत्या छप्परांखाली रहायला जाणार आहे का?
प्रधानः मग कुठं जाणार आहात?
इंद्रदेवः का? आपला इतका मोठा इंद्रमहाल असतांना आणखी कुठे कशाला जायचं?
प्रधानः आज आहे, पण उद्या तो तुमचा असणार नाही.
इंद्रदेवः का?
प्रधानः महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आता इंद्रपदालाही लागू होणार आहे. हीच बातमी नारदमुनींनी मला तातडीने कळवली होती. उद्या तुमची सध्याची टर्म संपली की पुढची पाच युगे हे स्थान महिलांसाठी आरक्षित राहणार आहे.
इंद्रदेवः का रे, पृथ्वीवरच्या सगळ्या स्त्रीमुक्तीवाल्या एकदम स्वर्गवासी झाल्या का?
प्रधानः नाही, तिथे त्यांचा लढा चालूच आहे, पण त्यांच्या लाटण्यांचा खणखणाट आता गगनाला भेदून स्वर्गापर्यंत येऊन पोचला आहे.
इंद्रदेवः काय म्हणतोस?
प्रधानः अहो, पृथ्वीवरच्या प्रदूषणामुळे आकाशाला भोकं पडून त्याची नुसती चाळण झाली आहे. आपला स्वर्गलोक आता मुळीसुध्दा साउंडप्रूफ राहिलेला नाही.
इंद्रदेवः हो!
प्रधानः शिवाय ती रोहिणी आपल्या प्रत्येक उड्डाणात गुपचुपपणे स्वर्गामध्ये लाटणी पाठवत आली आहे. ती सुनीताबाई परवाच आपल्या यानात बसून इकडची पाहणी करून गेली आणि नव्या यानामधून तिनं आता अद्ययावत लाटण्यांचं मोठं कन्साइनमेंट इकडं पाठवलं आहे.
इंद्रदेवः बापरे!
प्रधानः अहो सगळ्या गोपिका आता दांडिया आणि गरबा नृत्याऐवजी लाटणीडान्स करायला लागल्या आहेत. राधा ही बावरी राहिली नाहीय्, तीच त्यांना कोरिओग्राफी करून देते आहे.
इंद्रदेवः हो! त्यांची समजूत घालायला आपल्या मेनका रंभांना सांगा.
प्रधानः अहो, तुमच्या मनोरंजनासाठी भरणारी इंद्रसभा आता यापुढे भरणार नाही, म्हणून मेनका, रंभा, ऊर्वशी वगैरे सर्व अप्सरा आता जुडो, कराटे, ताय्केवान्डो वगैरे मार्शल आर्ट्सची प्रॅक्टिस करताहेत. स्वर्गलोकातल्या महिलांना त्या सेल्फडिफेन्सचे ट्रेनिंग देणार आहेत.
इंद्रदेवः खरं सांगताहात?
प्रधानः आणखीही जय्यत तयारी चालली आहे, हेमा, रेखा, जया और सुषमा यांनी निरमाची पोतीच्या पोती स्वर्गात धाडली आहेत. उद्यापासून स्वर्गलोकात साचलेला सगळा मळ काढून त्याला स्वच्छ करायला सुरुवात होणार आहे.
इंद्रदेवः अरे, एवढी कशाला काळजी करतोय्स, महिलांना आरक्षण पाहिजे असेल तर आपल्या इंद्राणीला माझ्या सिंहासनावर बसवून देऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?
प्रधानः ते चालणार नाही. आता अहिल्या, द्रौपदी, सीता यासारख्या शोषित महिलेलाच इंद्रपद मिळावे असे ठरवले जात आहे. त्यात अहिल्येला मिळाले तर तुमचं काही खरं नाही. मग तुम्हाला शाडातसुध्दा जागा मिळणार नाही, डायरेक्ट पर्णकुटी बांधून त्यात रहावे लागेल.
इंद्रदेवः इंद्राणीदेवींना पण?
प्रधानः त्यांनी जर तुमच्या बारा मुलांना जन्म दिला असता, तर तुमची गादी सांभाळण्यासाठी शोषित म्हणून कदाचित त्यांचाही विचार केला गेला असता, पण त्यांना तर नटून थटून सगळीकडे पुढे पुढे करायची हौस आहेना? कुणाला त्याची कणव वाटेल?
इंद्रदेवः हे फारच गंभीर प्रकरण दिसते आहे. मला लगेच ब्रह्माविष्णूमहेशांची भेट घ्यायला हवी.
प्रधानः काही उपयोग नाही, यापुढे व्हीआरएस घेऊन आणि ध्यानमग्न होऊन काही युगे चिंतन करायचे त्या तीघांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः कसले?
प्रधानः ब्रह्मदेवांच्या चार वेदांना आता फारसे महत्व राहिले नाही, अनेक लोकांनी वैदिक वैदिक या नावाखाली इतक्या गोष्टींचं मार्केटिंग करून पाहिलं, पण त्यांच्या मालाला उठावच मिळत नाहीय्. त्यामुळे आता एकदम दहा नवे कोरे वेद लिहायचे त्यांनी ठरवले आहे. ते तर नेहमीच पद्मासन घालून बसलेले असतात. त्याच अवस्थेत ते आता ध्यानमग्न होणार आहेत.
इंद्रदेवः विष्णू भगवान?
प्रधानः त्यांनी तयार केलेली या विश्वाची ऑपरेटिंग सिस्टिम आता ऑब्सोलेट आणि करप्ट झाली आहे आणि त्यात इतके बग्ज निर्माण झाले आहेत की जागोजागी त्यात एरर दिसायला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना एक वेगळी व्हायरसप्रूफ ऑपरेटिंग सिस्टिम बनवायची आहे. तिचे व्ही अँड व्ही वगैरे करायला काही युगे तरी त्यांना हवी आहेत. तोवर ते आपल्या शेषनागाच्या स्पायरल गॅलेक्सीवरच अनअॅप्रेचेबल राहणार आहेत.
इंद्रदेवः आणि महेशांचा काय विचार आहे?
प्रधानः त्यांच्यासमोर तर खूप प्रश्न आहेत. नरकासूर, तारकासूर, भस्मासूर, रावण वगैरे सर्वांनी निरनिराळ्या रूपांमध्ये पृथ्वीवर अवतार घेऊन लोकांना छळायला सुरुवात केली आहे. हे सगळेजण तपश्चर्या करून आपल्याकडे वरदान मागायला आले तर त्यांना डिप्लोमॅटिकली कसा नकार द्यावा यावर मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्यांना अभ्यास करायचा आहे. त्यांनी मदनाला जाळून टाकल्यावर त्या राखेमधून तो फिनिक्स पक्ष्यासारखा पुन्हा जीवंत झाला आणि आता तर त्याने माणसांमध्ये नुसता कहर माजवला आहे. त्याला पुन्हा भस्म करायसाठी आपल्या तिस-या डोळ्याची पॉवर कशी वाढवायची यावर त्यांना चिंतन करायचे आहे.
इंद्रदेवः आणखी?
प्रधानः त्या शिवमणीच्या तालवाद्यांवर प्रभुदेवाचा डान्स पाहून त्यातल्या कोणत्या स्टेप्स आपल्या पुढल्या डमरूवादन आणि तांडवनृत्यात घालाव्यात यावर ते विचार करताहेत.
इंद्रदेवः म्हणजे यातले सगळे बाजूला झाल्यानंतर मग हे जग कसे चालणार आहे?
प्रधानः का? आपल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहेत ना! विश्वाचा सगळा कारभार त्यांच्याकडे सोपवायचे ब्रह्माविष्णूमहेशांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः त्यांनाही आपले नारदमुनी तरी लागतीलच ना?
प्रधानः त्यांची काही गरज नाही. पृथ्वीवरच्या टेलीव्हिजनवरच्या सीरियल पाहिल्यात तर प्रत्येकींमध्ये एक दोन तरी कळलावी स्त्री पात्रं हमखास असतात. कुठेही, कोणीही आणि काहीही बोलत असलं तरी त्यावेळी त्याजागी या साळकाया माळकाया नेमक्या हजर असतात आणि ते बोलणं ऐकून इकडचं तिकडे करत असतात. टायमिंगच्या बाबतीतलं त्यांच्या इतकं परफेक्शन नारदमुनींनाही जमलं नसतं. त्यांनीही आता कुठल्या तरी अरण्यात जाऊन तपश्चर्या आणि चिंतन करायचे दिवस आले आहेत.
इंद्रदेवः मग तुम्ही काय करायचं ठरवलंय?
प्रधानः ते पहायचंय्. महिलांच्या राज्यात माझे प्रधानपद तर राहणार नाही, मंत्रीणबाईंचा स्टेनो वगैरेची नोकरी मिळेल का ते पहायचंय्. टायपिंग, शॉर्टहँड, काँप्यूटर डेटाएन्ट्री, इंटरनेट वगैरे सगळ्यांचा एक कम्बाइंड क्रॅश कोर्स मी आजच जॉइन केला आहे.
इंद्रदेवः अरे देवाधिदेवा!

पावाच्या ५५५ पौष्टिक पदार्थांची पाककृती

मी दहाबारा वर्षांपूर्वी हा उपहासात्मक लेख लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मिळत गेलेल्या भेटींचा आकडा पाहून मलाच आश्चर्य वाटले होते. आजपर्यंत अडीच हजाराहून अधिक वाचकांनी या लेखाला भेट दिली आहे. यामुळे वाचकांनी ‘निवडक’ ठरवलेला हा जुना लेख मी आज या ब्लॉगवर देत आहे.


पावाच्या ५५५ पौष्टिक पदार्थांची पाककृती

अलीकडे आंतर्जालावर रोज येणाऱ्या पाककृतींचा लोंढा पाहून मलाही आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल जरा जास्तच आपुलकी वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या विपुल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे मी हा लेख लिहिला आहे. तेच ते पुन्हा पुन्हा लिहिण्यात वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी ‘गागरमें सागर’ म्हणतात ना तसे पावाचे पांचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे मी ठरवले आहे.

साहित्य:

१) पावरोटीची लादी किंवा चौकोनी ठोकळा किंवा स्लाइस्ड ब्रेड (पांढरी किंवा तपकिरी रंगाची). (बनपाव, फ्रूट ब्रेड, मिल्क ब्रेड, डोनट आदी गोड प्रकार ‘पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने’ या प्रस्तावित लेखासाठी राखून ठेवले आहेत. ते या कृतीसाठी घेऊ नयेत.)
त्यामुळे एकंदर पर्याय: फक्त ४
२) स्निस्ग्ध पदार्थ : लोणी, साय, पाश्चराइज्ड बटर, पीनट बटर, चीज स्प्रेड, चीज वगैरेपैकी एक किंवा दोन
एकंदर पर्याय :६
३) भाज्या: काकडी, गाजर, मुळा, बीटरूट, कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, भोपळी मिरची इत्यादी
एकंदर पर्याय: १० किंवा अधिक
५) चटण्या: ओले किंवा सुके खोबरे, शेंगदाणे, तीळ, कारळे, लसूण, कोथिंबीर, पुदिना, भोपळ्याची साल, दोडक्याची साल इत्यादीपासून तयार केलेल्या
एकंदर पर्याय: १० चे वर
६) अवांतर: टोमॅटो सॉस किंवा केचप, हॉट अँड स्वीट, स्वीट अँड सॉवर, चिली गार्लिक इत्यादी बाटलीतली पातळ किंवा दाट द्रव्ये, चवीला तिखट, मीठ, मिरपूड, साखर, पिठीसाखर
एकंदर पर्याय: ५ पेक्षा अधिक

कृती:
पावाला आडवा छेद देऊन त्याचे काप करावेत. आधीच कापून मिळालेल्या स्लाइस्ड ब्रेडच्या कडा व पाठ वाटल्यास कापून बाजूला ठेवावेत. त्यांचा चुरा करून त्यापासून इतर स्वादिष्ट पदार्थ बनवता येतील. पावरोटीच्या लादीचे पाठपोट कापू नयेत. नाहीतर “तेलही गेलं, तूपही गेलं आणि धुपाटणे हांती आलं” अशी अवस्था होईल.
पावाच्या कापाच्या एका अंगाला आपल्याला हवा असेल आणि उपलब्ध असेल त्या स्निग्ध पदार्थाचा लेप बोथट सुरीने लावावा. चीजच्या लाट्या घेतल्या किंवा ते किसून घेतले तर पसरवण्यास सोपे जाईल. लेपाच्या थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल मनात वाटत असलेल्या भीतीच्या व्यस्त प्रमाणात ठेवावी.
भाज्यांचे पातळ काप करावेत किंवा त्या बारीक चिरून किंवा किसून घ्याव्यात. कोबी, गाजर व बीटरूट वाटल्यास वाफेवर किंचित नरम करून घ्यावेत. मंद आंचेवर तेलात परतून घेतल्यास त्यांना, विशेषतः कांद्याला, अधिक चव येते. बटाटा आधी उकडून घेऊन नंतर सोलून त्याचे काप करावेत. उलट क्रमाने केल्यास वेळ आणि जिन्नस या दोन्हीचा अपव्यय होईल.
स्निग्ध पदार्थाचा लेप दिलेल्या बाजूवर हव्या त्या चटणीचा पातळसा थर द्यावा किंवा पाहिजे ती पेस्ट पसरावी. त्यावर हव्या तेवढ्या भाज्यांचे काप, कीस किंवा चुरा पसरावा. भाज्यांच्या थराची जाडी आपल्या आवडीच्या सम प्रमाणात आणि कोलेस्टेरॉलबद्दल वाटत असलेल्या भीतीच्याही सम प्रमाणातच ठेवावी. त्यावर चवीनुसार तिखट, मीठ, मिरपूड, साखर वगैरे बारीक चिमटीने शिंपडावे. शिंपडण्यासाठी खास छिद्रयुक्त झाकणे असलेल्या छोट्या बाटल्यासुद्धा मिळतात. त्यांचा उपयोग करता येईल. पावाचा दुसरा काप त्यावर ठेवून चारी बाजूंनी एकदम हलकेसे दाबावे.
हा पदार्थ वाटल्यास थंड गार खावा, वाटल्यास तव्यावर किंवा हिंज असलेल्या टोस्टरमध्ये भाजून घ्यावा. पॉपअप टोस्टरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करू नये. वाटल्यास पहिल्या पायरीनंतर लगेच पावाचे काप त्यात वेगळे भाजून घ्यावेत आणि त्यानंतरच्या कृती कराव्यात.

ही सगळीच साधी सॅँडविचेस आहेत असे कोणी म्हणेल, पण प्रत्येक कॉंबिनेशनची रुची कशी वेगळी आहे हे खवैयांना माहीत असतेच, इतरांनी ते ध्यानात घ्यावे. वर दिलेल्या साहित्याच्या यादीतील प्रत्येक वस्तूला अनेक पर्याय आहेत, तसेच कृतीमधील प्रत्येक पायरीवर कांही पर्याय आहेत. यांच्या परम्यूटेशन्स आणि कॉंबिनेशन्स करून एकंदर किती प्रकारचे पदार्थ बनू शकतील त्याचे गणीत मांडण्याचे ‘फॅक्टोरियल’युक्त फॉर्म्यूले मराठी भाषेत मला लिहिता येणार नाहीत. पण संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व पर्यायांचा साधा गुणाकार करून येणारी संख्या (४x६x१०x१०x५xअनेक) देखील पाचशे पंचावनपेक्षा अनेकपटीने मोठी होईल. साहित्याची उपलब्धता, वैयक्तिक आवड निवड वगैरेंचा विचार करून तिच्यात काटछाट केली तरी पाचशे पंचावन्न वेगवेगळ्या चवी असलेले पदार्थ त्यातून बनू शकतीलच. वेळ जात नसल्यास वाटल्यास त्यांची यादी करून पहावी, पण त्यापेक्षा ते पदार्थच बनवायला घेतल्यास काही तरी चविष्ट खायला मिळून तो वेळ सत्कारणी लागेल.

मांसाहार वर्ज्य नसल्यास उकडलेले किंवा तळलेले अंडे, शिजवलेला खिमा, माशाचे किंवा चिकनचे शिजवलेले, भाजलेले किंवा तळलेले हाडविरहीत बारीक तुकडे भाजीच्या ऐवजी त्यात घालता येतील. तेही कमी पडले तर वडा पाव, उसळ पाव, मिसळ पाव, बर्गर वगैरेंचे अनेक प्रकार घ्यावेत. हे सगळे प्रकार स्वतःच करून पहावेत असा माझा मुळीच आग्रह नाही. ते जिथे कुठे चांगले मिळत असतील तिथे जाऊन खाण्यास कांहीच हरकत नसावी. तरीसुद्धा आणखी पदार्थ हवे असल्यास ‘पावाची पाचशे पंचावन्न पक्वान्ने’ मिळण्याची वाट पहावी.

धन्यवाद. हे पदार्थ तयार करून खात रहा, सुखी रहा.

वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स

हे लेख मी चार वर्षांपूर्वी मागच्या वर्ल्डकप क्रिकेटच्या वेळी लिहिले होते.  दुर्दैवाने या वेळीसुद्धा आपला संघ उपांत्य सामन्यातच पराभूत झाला. दि.१०-०७-२०१९

भाग १ : आपण आधीचे क्रिकेटचे सामने कसे जिंकले?

इसवी सन २०११ या वर्षातल्या वर्ल्डकपसाठी झालेले बहुतेक सगळे सामने टीव्हीवर पाहून मी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी भरलेले जास्तीचे पैसे वसूल करून घेतले. त्या वर्षी भारताच्या संघाने पहिले सात सामने ओळीने जिंकले होते. ते कशामुळे जिंकले असतील? खरे तर कोणालाही असा प्रश्न पडायचे कारण नव्हते. आपला कप्तान महेंद्रसिंह धोनी ऊर्फ आपला लाडका माही याने या खेळाचा तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधली पिचेस, हवामान वगैरेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठेवला होता. प्रत्येक सामन्यातल्या प्रत्येक क्षणी तिथल्या पिचची अवस्था, त्या वेळचे हवामान, वाहत्या वा-याची गती आणि दिशा, खेळत असलेल्या विरुद्ध बाजूच्या फलंदाजाच्या संवयी आणि त्याचे वीक पॉइंट्स वगैरे पाहून कोणाला गोलंदाजी द्यायचे हे तो ठरवत होता. त्या बॉलरने कशा प्रकारचा चेंडू टाकावा, आखूड पल्ल्याचा (शॉर्टपिच्ड) की यॉर्कर, ऑफ ब्रेक की गुगली वगैरेंच्या बारीकसारिक सूचनाही माही त्या गोलंदाजांना सारखा देत होता आणि तंतोतंत तसेच बॉल ते गोलंदाज टाकू शकत होते. पिचवरल्या विशिष्ट पॉइंटवर ठरलेल्या वेगाने ते चेंडू पडत होते आणि अपेक्षेइतकेच वळत होते. यामुळे विरोधी फलंदाजांच्या फटकेबाजीवर नियंत्रण येत होते, तसेच ते पटापट बाद (आउट) होऊन जात होते. अशा प्रकारे आपण सातही सामन्यांमधल्या सात विरोधी संघांना सर्वबाद करून एक नवा विक्रम नोंदवला.

आपले फलंदाजही फलंदाजी करतांना प्रत्येक चेंडूकडे निरखून पहात होते, त्यातल्या कुठल्या चेंडूला नुसतेच अडवावे, कुठल्या बॉलला जरासे ढकलून एकादी धांव काढावी, केंव्हा त्याला सीमारेषेच्या बाहेर टोलवून चार किंवा सहा रन्स मिळवाव्यात आणि कुठल्या चेंडूला शांतपणे जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ द्यावे हे ओळखून त्यांनी तुफान फलंदाजी केली आणि प्रत्येक सामन्यात धावांचे पर्वत रचले. यामुळेच आपण हे सातही सामने जिंकू शकलो. असेच कोणाला वाटेल. मला त्यातले तंत्र फारसे काही समजत नाही, पण या सामन्याचे धावते वर्णन (कॉमेंटरी) करत असलेल्या आणि तज्ज्ञ म्हणून त्या खुर्च्यांवर बसलेल्या आपल्या संघातल्या पूर्वीच्या दिग्गजांनीच हे सगळे रोजच्या रोज सांगितल्यामुळे मलाही त्या वेळी ते पूर्णपणे पटले होते.

असे सगळे काही सुरळीत चालले होते, पण मग उपांत्य सामन्यात काय झाले कोण जाणे? या वेळी आपल्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक अगदी सोपे सोपे बॉल्स टाकले आणि त्यांनी त्या चेंडूंना मनसोक्त फटकारून आपल्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आपल्या मुख्य फलंदाजांनी नको त्या चेंडूंना नको त्या वेळी बॅटने निष्कारण स्पर्श करून आपल्या विकेट्स घालवल्या. अशा प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर खेळायला आलेला माहीसुद्धा आपल्या संघाची थोडीबहुत लाज राखण्यापलीकडे फारसे काही करू शकला नाही. यामुळे आपण पहिले सात सामने नक्की कशामुळे जिंकले असतील? हा प्रश्न मनात डोकावायला लागला. त्याचे उत्तर मला दुसरे दिवशी सकाळच्या टीव्हीवरील आणि वर्तमानपत्रांधील बातम्या पहात असतांना मिळाले.

त्या बातम्यांमधल्या हकीकतींबद्दल लिहितांना मी त्यातल्या पात्रांची नावे आणि गावे बदललेली आहेत. तरीही त्याच नावांच्या व्यक्ती त्या गावांमध्ये प्रत्यक्षात रहात असल्यास हा एक योगायोग समजावा आणि या लेखाशी त्यांचा काहीही संबंध असणे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्यावे. अशी एक बातमी होती की लखनऊच्या लखनसिंग यादव नावाच्या युवकाने आधी त्याच्या मिशा सफाचट केल्या होत्या. त्या मूछमुंड्याने महिनाभरापूर्वीपासून त्याच्या मिशा पुन्हा चांगल्या वाढवल्या आणि त्यांना पीळ भरू शकण्याइतपत त्या भरघोस वाढल्या. वर्ल्डकपचा प्रत्येक सामना टीव्हीवर पहात असतांना लखन आपल्या मिशांना आलटून पालटून पीळ भरत असे. आपल्या टीमची बॅटिंग चाललेली असतांना इकडे त्याने मिशीला पीळ भरला की तिकडे फलंदाजाला चौका मिळत असे आणि जरा जोरात पीळ भरला की सरळ सिक्सर. विरुद्ध संघाची फलंदाजी चाललेली असतांना याने इकडे पीळ भरला की तिकडे विकेट पडायचीच म्हणे. तर वाराणशीच्या बनारसीदासने त्याच्या डोक्यावर चांगली जाड आणि लांबलचक शेंडी वाढवून ठेवली होती. तोसुद्धा आपल्या शेंडीला मागेपुढे किंवा डाव्याउजव्या बाजूला झटके देऊन तिकडे चौकार, षट्कार घडवून आणत होता किंवा विकेट्स घेत होता म्हणे. हे दोघे भय्ये इथे टीव्हीसमोर बसल्याबसल्या मिशी आणि शेंडीच्या रिमोट कंट्रोलने तिकडे दूर देशात चाललेले सामने खेळवत होते.

भारताच्या खेळाडूंच्या कपड्यांचा रंग निळा असल्यामुळे प्रेक्षकांमध्येसुद्धा बहुतेक लोक तर निळ्या रंगाचे टी शर्ट घालून मॅच पहायला येत होतेच, पण इकडे भारतात रहात असलेले बरेचसे प्रेक्षक नीलकमल, नीलकांत, निळूभाऊ किंवा निळे कोल्हे बनून टीव्हीसमोर बसून ते सामने पहात होते. यामुळे निळ्या रंगाच्या लहरी इकडून निघून त्या खेळाडूंपर्यंत पोचत असा त्यांचा दावा होता. पण पुण्यातले कॅप्टन कर्णिक मात्र ‘अंग्रेजोंके जमानेके’ कर्नल असल्यामुळे क्रिकेटसाठी ‘प्रॉपर’ असा पांढरा शुभ्र पोशाख घालूनच मॅच पहायला बसत. गांधीनगरचे डाह्याभाईसुद्धा त्या दिवशी सफेद खादीचा कुर्ता, धोती आणि टोपी परिधान करत असत. त्या दोघांच्या मते शुभ्र रंगामध्ये अचाट सामर्थ्य असते आणि त्याचा फायदा आपल्या संघाला होत असे. सुरतेचा छगनभाई ड्रेसवाला मात्र मुद्दाम विरोधी संघाच्या गणवेशाच्या रंगाचे कपडे घालून बसत. यामुळे ते कन्फ्यूज होऊन सामने हरत असत असे त्याचे म्हणणे पडले.

क्रिकेटच्या मैदानात स्लिप, गली, कव्हर, मिडऑन, मिडऑफ, लाँग लेग, शॉर्ट लेग वगैरे ठिकाणी क्षेत्ररक्षकांना उभे करून व्यूहरचना केली जाते. आपल्या हैद्राबादच्या तिम्मय्याने त्याच्या घरातल्या हॉलमध्येच टीव्हीच्या समोर अनेक खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या आणि सामने पहात असतांना तो घरातल्या मंडळींना या किंवा त्या खुर्चीवर बसायला सांगत असे. त्याने इकडे अशी व्यूहरचना केली की प्रत्यक्षातल्या मॅचमध्ये एकादा कॅच उडून बरोबर त्या ठिकाणच्या फील्डरकडे जात असे आणि तो पकडला जात असे असे त्याचे सांगणे होते. यातल्या एकाद्या ठिकाणच्या खुर्चीवरून तिथे बसलेली व्यक्ती उठून गेली की नेमका तिकडे मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप होत असे असाही त्याचा अनुभव होता.

याशिवाय कित्येक लोकांनी प्रत्येक मॅचच्या दिवशी कडकडीत उपास पाळले होते आणि मॅचमध्ये विजय मिळाल्यावर पोटभर गोडधोड खाऊन ते सोडले होते. कित्येक लोकांनी आपापल्या देवांना साकडे घातले होते तर कोणी विजयासाठी नवस बोलले होते. अशा प्रकारांचे असंख्य वैयक्तिक प्रयत्न तर होत होतेच, शिवाय गावोगावच्या लोकांच्या समुदायांनी एकत्र येऊन अनेक सांघिक उपाय योजले होते. काही ठिकाणी मंत्रोच्चारासह होमहवन, यज्ञयाग वगैरे चाललेले होते, काही ठिकाणी खूप लोक एकत्र येऊन एकाद्या मंत्राचा हजारो किंवा लाखो वेळा जप करत होते, काही लोक एकाद्या स्तोत्राचे शेकडो किंवा हजारो वेळा पारायण करत होते. या सगळ्या लोकांच्या अशा प्रकारच्या प्रयत्नामुळेच आपला संघ वर्ल्ड कपमधल्या एकापाठोपाठ एक सामन्यांमध्ये विजयी होत होता अशी त्या सर्वांची गाढ श्रद्धा होती.

पण मग उपांत्य सामन्यात काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. बहुधा त्या वेळी कुणातरी ऑस्ट्रेलियन माणसाने तिथल्याच एकाद्या पॉवरफुल बाबाकडून जादूटोणा करवून घेतला असेल आणि तो प्रभावी झाल्यामुळेच आपल्या खेळाडूंची मति भ्रष्ट झाली असेल असे झाले असेल असे माझे आपले साधे अनुमान आहे कारण मला जसे क्रिकेट समजत नाही तसेच चेटूकही समजत नाही.

भाग २ : वर्ल्डकपचे साइड इफेक्ट्स – देशभक्त आणि द्वेषभक्त

वर्ल्डकपाचे सगळे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातल्या दोन देशांमध्ये खेळले गेले होते. तरीसुद्धा हजारो भारतीयांनी यातल्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांच्या कक्षांमध्ये गर्दी केली होती. भारतातले सर्वसामान्य नागरीक तर नाहीच, पण उच्च मध्यमवर्गीय लोकसुद्धा स्वतःच्या खर्चाने तिकडे जाऊन हे सामने पाहू शकतील एवढी सुबत्ता अजून आपल्याकडे आलेली नाही. बडे उद्योगपती, सिनेकलाकार किंवा राजकारणी अशा अतीश्रीमंत वर्गातले लोकच हे काम करू शकतात. ग्राहक, प्रेक्षक किंवा करदाता या नात्याने त्याचा बोजा अखेर आपल्यावरच पडत असला तरी तो कोट्यावधी लोकांमध्ये विभागून जात असल्यामुळे आपल्याला त्याचा वेगळा भार जाणवत नाही. अर्थातच हे सामने पहायला आलेले बहुतेक सर्व भारतीय वंशाचे प्रेक्षक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वास्तव्य करणारेच असणार. कदाचित त्यातले काही जण अमेरिका, सिंगापूर, दुबई वगैरे देशांमधून तिकडे गेलेले असले तरी तेसुद्धा गडगंज झालेले अनिवासी भारतीयच (नॉनरेसिडेंट इंडियन्स) असणार.

यातले काही लोक थोड्या काळासाठी तिकडे जाऊन परत येणारे असले तरी बरेचसे लोक कायमसाठी तिकडे स्थायिक झाले तरी आहेत किंवा तसा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा हे सगळे प्रेक्षक भारतीय खेळाडूंना अगदी मनापासून भरभरून दाद आणि खूप प्रोत्साहन देत होते. त्याते काही जण मोठमोठे तिरंगी झेंडे हातात धरून मोठ्या उत्साहाने जोरजोरात फिरवतांना दिसत होते, तर काही लोकांनी आपले चेहेरे तीन रंगांमध्ये रंगवून घेतले होते. हा म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असा सूर काढणारे काही अतीशिष्ट लोक आपल्याकडे आहेत. पण त्यांच्या नकारात्मक दृष्टीकडे दुर्लक्ष केल्यास या सगळ्या लोकांना आपल्या भारत देशाबद्दल मनातून काही तरी आपुलकी वाटते हे जाणवत होते. केवळ हौस किंवा गंमत म्हणून त्यांना एकादा झेंडा फिरवायचा असता किंवा आपले तोंड रंगवून घ्यायचे असते तर त्यांनी मलेशिया, ग्वाटेमाला, झुलूलँड असल्या कुठल्याही देशाचा छान दिसणारा झेंडा किंवा चित्रविचित्र रंगांमध्ये रंगवलेले कसलेही फडके आणले असते किंवा आपल्या चेहेऱ्यावर कुठलेही चित्र रंगवून घेतले असते. पण या प्रसंगी त्यांनी यासाठी तिरंग्याचीच निवड का केली? त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी देशभक्तीची एक लहानशी ज्योत अजूनही तेवत आहे याचेच हे लक्षण होते. परदेशी गेलेल्या भारतीयांच्या मनातसुद्धा अशी देशभक्तीची झलक दिसलीच, भारतातल्या लोकांचा उत्साह तर अमाप होता. टेलिव्हिजनवर सामना पाहणारे लोक आपल्या संघाच्या फलंदाजांनी मारलेल्या प्रत्येक चौकार किंवा षट्कारावर आणि मिळवलेल्या प्रत्येक विकेटवर जागच्याजागीच उड्या मारत होते, आरडाओरडा करून नाचत होते, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर सगळीकडे फटाक्यांचे दणदणीत आवाज कानावर पडत होते. यातही एका प्रकारे त्यांची देशभक्ती दिसून येत होती.

पण स्वतःच्या अत्यंत जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा नगारा सदैव वाजवत असणाऱ्या काही लोकांना मात्र क्रिकेट या शब्दाचेसुद्धा वावडे आहे असेही दिसले. असे लोक प्रामुख्याने सोशल मीडियावर आपली मुक्ताफळे उधळत असतात. गोऱ्या रंगाच्या आणि ख्रिश्चन धर्म पाळणाऱ्या परकीय आक्रमक लोकांचा हा खेळ भारतीय लोकांनी खेळावा हाच मुळात त्यांना देशद्रोह वाटतो. इथल्या कोट्यावधी लोकांनी तो विदेशी खेळ पहाण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवावा म्हणजे तर त्यांच्या मते देशद्रोहाची परिसीमा झाली. यामुळे क्रोधाने लालपिवळे होऊन त्यांनी सगळ्या जनतेवरच सैरभैर आगपाखड सुरू केली. जगभरातली आजची परिस्थिती काय आहे? आजच्या काळातले इंग्रज हे आपले शत्रू राहिले आहेत का? त्यांनी पूर्वीच्या काळात सुरू केलेला खेळ आता फक्त त्यांचा राहिला तरी आहे का? खेळ हा द्वेष करण्याचा विषय असू शकतो का? असा कोणताही विचार त्यांच्या मनाला शिवत नाही इतके ते द्वेषाने भरून गेलेले आहे. त्यांच्या मते आजच्या काळातल्या भारतातल्या लोकांच्या मनाला किंवा त्यांना मिळणाऱ्या आनंदाला कवडीइतके महत्व देण्याचे कारण नाही. देशामधली माणसेच वगळली तर कुठला देश शिल्लक राहतो? या शिष्ट लोकांना स्वतःला नक्की कशाचा अभिमान वाटतो? देश किंवा राष्ट्र या शब्दाची कसली संकल्पना या लोकांच्या डोक्यात भरलेली आहे? हेच मला समजत नाही.

हे लोक स्वतःला अत्यंत प्रखर राष्ट्रनिष्ठ असे मानतात आणि तसे ते उठताबसता सारखे सांगतही असतात. अशा लोकांना देशभक्त म्हणावे की द्वेशभक्त असा प्रश्न पडतो.

क्रिकेट क्रिकेट

मी कधीच खास अंगात ड्रेस घालून, डोक्यावर कॅप चढवून आणि पायाला पॅड्स, हातात ग्लोव्ह्ज वगैरे जामनिमा करून मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. पण माझ्या साध्यासुध्या आयुष्याला विविध प्रकाराने क्रिकेटचा निसटसा स्पर्श झाला त्याच्या काही मजेदार आठवणी

क्रिकेट क्रिकेट – भाग १

आमच्या घराजवळ फक्त तीन चार इमारतींना जोडणारी एक लहानशी गल्ली  आहे. ही गल्ली लांबीला फारशी नसली तरी टाउन प्लॅनिंग करतांना तिला चांगली प्रशस्त रुंद बांधून ठेवली आहे पण सकाळ संध्याकाळचा थोडा कालावधी वगळता एरवी तिच्यावर वाहनांची विशेष वर्दळ नसते. शाळेला सुटी लागलेली असल्याने बरेच वेळा गल्लीतली मुले त्यावरच ‘क्रिकेट क्रिकेट’ खेळत असतात. परवा मी त्या गल्लीमधून चाललो असतांना सात आठ मुले तिथे ‘गल्ली क्रिकेट’ खेळत होती. लाकडाच्या एका आडव्या ठोकळ्यावर तीन वर्तुळाकार भोके पाडून त्यात तीन उभे दांडे बसवलेले पोर्टेबल स्टम्प्स अलीकडे मिळतात. त्या मुलांनी एका बाजूला असले स्टम्प्स ठेवले होते. अर्थातच हे डांबरी रस्त्याचे सुपर हार्ड पिच होते आणि त्यांचा खेळ टेनिसच्या सॉफ्ट बॉलने चालला होता. पिचच्या दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच खडूने रेघा मारून ‘क्रीज’ बनवली होती. गल्लीच्या तोंडाशी एकादी मोटरगाडी य़ेतांना दिसली की लगेच स्टंप्सना उचलून बाजूला ठेवून आणि स्वतः रस्त्याच्या कडेला जाऊन ती मुले गाडीला वाट करून देत होती. पायी चालणाऱ्यांनी मात्र स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची असल्यामुळे मी चेंडूवर लक्ष ठेवून रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून जपून चालत होतो.

मी हा खेळ पहात पहात पुढे जात असतांना बॅट्समनने टोलवलेला चेंडू थोडा जास्तच उडाला आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला निसटता लागून त्याच्या दाट पानांमध्ये घुसला आणि एक दोन सेकंदांनंतर पानांमधून वाट काढून सरळ घरंगळत खाली उतरला. तिथे उभ्या असलेल्या मुलाने त्याला अलगदपणे झेलून घेऊन झपाट्याने रस्त्यावर स्टम्पच्या ऐवजी मारलेल्या रेषेला लावला आणि “औट, औट” असा पुकारा केला. विरुध्द संघाची मुले प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पहायला लागताच तो मुलगा म्हणाला, “मी हा त्याचा कॅच पकडला आहे आणि याला रनआउट केले आहे. म्हणजे दोघेही औट ना?”
“चल रे, एका बॉलवर कधी दोघेजण औट होतात का?” एक मुलगा उद्गारला.
“पण त्यांच्यातला कोणी तरी औट व्हायलाच पाहिजे ना?”
यावर बॅट्समन म्हणाला, “अरे, माझा टोला तुझ्या डोक्याच्या किती तरी वरून जात होता आणि मागे दुसरा कोणी फील्डरही नव्हता. म्हणजे हे झाड मध्ये आले नसते तर बॉल नक्की बाउंडरीच्या पार जाऊन चौका किंवा छक्का होणार होता. त्यासाठी मला चार किंवा सहा रन मिळायला पाहिजेत.”
“आणि बाउंडरीपलीकडे गेला की बॉल डेड होतो. मग रनआउटचा प्रश्नच येत नाही.” त्याचा मित्र म्हणाला,
“पण प्रत्यक्षात काय झालं आहे ते बघा ना. बाउंडरीच्या आतच आणि जमीनीवर टप्पा पडायच्या आधीच मी या बॉलचा कॅच पकडला आहे ना? आणि तो डेड व्हायच्या आतच मी याला रनआउटही केले आहे.”
“टप्पा म्हणजे फक्त जमीनीवरच बॉल पडायला पाहिजे असे काही नाही हं, भिंतीला किंवा झाडाच्या फांदीला आपटून बॉल उडाला तरी तो टप्पाच झाला. आज आपण “वन टप्पा औट गेम” खेळत नाही आहोत. त्यामुळे मी काही औट झालेलो नाही.” बॅट्समन म्हणाला. दुस-या बाजूचा बॅट्समन लगेच म्हणाला, “अरे मी काही रन काढायसाठी पळालो नव्हता. आपला बॉल कुठे गडप झाला ते पहायसाठी थोडा पुढे आलो होतो. आजच आत्ताच मी हा नवीन बॉल विकत आणला होता, अजून एक ओव्हरपण झाली नाही, एवढ्यात तो हरवला असता तर पंचाईत झाली असती. म्हणून मी बॉल कुठे जातो आहे ते पहात होतो.”
“म्हणून तू असा रडी खेळणार का?”
“मी नाही काही, तूच रडी खेळतोय्स.”
अशी हमरातुमरी सुरू होताच त्यांच्यातला एक मोठा आणि समंजस मुलगा पुढे होऊन म्हणाला, “अरे, असे भांडताय्त काय? आपण आज असे रूल्स करूया की असं झालं तर औट, तसं झालं तर नॉटऔट ….. वगैरे.”
तोंपर्यंत मी पुढे चालला गेलो होतो, त्यामुळे त्याने हा विवादग्रस्त बॉल कॅन्सल केला, की ती ओव्हर किंवा मॅचचा तो भागच रद्द करून नव्याने सुरुवात केली ते काही मला समजले नाही. माझ्या मनात विचार येत होते की खऱ्याखुऱ्या क्रिकेटमध्ये किती शेकडोंनी नियम आहेत! तरीसुध्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वान आणि अनुभवी मंडळी जमून त्यात सारख्या सुधारणा करत असतात, ते नियम शिकून घेऊन व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले अंपायर प्रत्येक मॅचसाठी नेमले जातात आणि तेच प्रत्येक मॅचवर नियंत्रण ठेवतात. कुठल्याही सामन्यात सारखे ऐकू येणारे ‘हौज्झॅट्’चे आवाज आणि त्यावर पंचाने कोठलाही निर्णय दिला की तो ज्या बाजूच्या विरोधात गेला असेल त्यातल्या खेळाडूंनी दिलेली प्रतिक्रिया पाहता या खेळाडूंना तरी सगळे नियम नीटपणे समजलेले आहेत की नाही किंवा या नियमांची त्यांना किती पर्वा करावीशी वाटते याबद्दल शंका येते. या वेळी खेळाडूंनी काढलेले उद्गार, त्यांच्या चेहेऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या देहबोलीमधून व्यक्त झालेली नाराजी हीसुध्दा किती प्रमाणात असली तर चालेल याविषयी सभ्यपणाचे नियम केले आहेत आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंना दंड केला जातो असे आपण पाहतो. या ऑफिशियल क्रिकेटबद्दल इतके छापले आणि सांगितले जात आहे की ते वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांना अजीर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मला त्यात भर घालायची नाही.

पण आपल्या देशात असे जागतिक नियमांनुसार खेळले जाणारे क्रिकेट फार फार तर एकादा टक्का असेल आणि आपापले नियम तयार करून स्वैरपणे खेळले जाणारे क्रिकेट नव्याण्णऊ टक्के असणार असे मला वाटते. याचे कारण क्रिकेट या अद्भुत खेळात विलक्षण लवचिकपणाही आहे. दोन तीन पासून वीसपंचवीसपर्यंत कितीही मुले जमलेली असली तरी त्यांचे दोन गट पाडून ती क्रिकेट खेळायला लागतात. तसेच घरातल्या अंगणापासून विशाल क्रीडांगणापर्यंत कुठल्याही मोकळ्या जागेत तो खेळला जातो. लगान किंवा इकबाल या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खेड्यापाड्यातली मुले रिकाम्या शेतांमध्ये देखील क्रिकेट खेळतात. शहरांमधल्या गल्ल्यांमध्ये हा खेळ सर्रास खेळला जातोच, शहरांमध्ये कोणी ‘बंद’ पुकारला असल्यास मोठमोठ्या हमरस्त्यांवरसुद्धा क्रिकेट खेळणे सुरू होते. आझाद मैदान, क्रॉसमैदान, शिवाजी पार्क यासारख्या मोठ्या मैदानांवर एकाच वेळी अनेक गट क्रिकेट खेळतांना दिसतात. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा आकार, खेळणाऱ्यांची उपस्थिती, हवामान वगैरे पाहून आपापसातच रोजच्या रोज सोपे असे नवे नियम तयार केले जातात आणि पाळले जातात. पुढे जगभरात नावलोकिक मिळालेल्या कितीतरी खेळाडूंनी आपल्या खेळाची सुरुवात गल्लीतल्या किंवा चाळीमधल्या क्रिकेटमधून झाली असल्याचे मुलाखतींमध्ये सांगितलेले मी ऐकले आहे.

खेळाडूचा विशिष्ट गणवेश अंगावर धारण करून, पॅड्स आणि गार्ड्स वगैरे बांधून औपचारिक स्वरूपाचा क्रिकेटचा सामना खेळण्याचे भाग्य माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वाट्याला आले नाही कारण मला टोपी (क्रिकेटची कॅप) घालण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. पण मला कळायला लागल्यापासून ‘क्रिकेट क्रिकेट’चा खेळ मात्र माझ्या आवडीचा होता. अगदी लहान असतांना कचाकड्याच्या ‘बॅटबॉल’ने आमच्या घराच्या गच्चीवर सुरुवात करून मी हळूहळू गल्लीपासून मैदानापर्यंत प्रगती केली, पण चुकूनसुध्दा कधीही मैदान गाजवले मात्र नाही. शाळेत असतांना मी माझ्या वर्गातला वयाने सर्वात लहान मुलगा होतो कारण अॅडमिशन घेण्याच्या वेळी माझ्या वयाच्या मानाने बुध्दीची वाढ जरा जास्तच झाली होती आणि अक्षरे व अंक यांचे ज्ञान घरातच झाले होते. त्यामुळे पहिलीच्या मास्तरांनी मला काय काय येते हे पाहून दुसरीत आणि त्या मास्तरांनी थेट तिसरीत नेऊन बसवून दिले होते. त्या काळात फॉर्म भरणे आणि त्याला बर्थसर्टिफिकेट जोडणे वगैरे भानगडी नव्हत्याच. माझ्या शरीराची वाढ मात्र वयाच्या मानाने थोडी हळू हळूच होत असावी. त्यामुळे माझ्या वर्गात माझे वय कमी होते तसेच वजनही सर्वात कमी होते. आमच्या वर्गातला गिड्ड्या रास्ते सुरुवातीपासून शालांत परीक्षेपर्यंत उंचीने ‘डेढफुट्या’च राहिला असला तरी तोसुध्दा शक्तीच्या बाबतीत मला जरा भारीच पडत असे. यामुळे हुतूतूपासून क्रिकेटपर्यंत सगळ्या मैदानी खेळात मी नेहमी ‘लिंबूटिंबू’च मानला जात असे. या परिस्थितीत क्रिकेटच्या बाबतीत मी अभिमानाने सांगावे असे काहीच माझ्या जीवनात कधीच घडले नाही, पण लहानपणच्या काही मजेदार आठवणी मात्र आहेत.

. . . . . . . . . .

क्रिकेट क्रिकेट – भाग २

क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूच्या संघांमध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू असतात, त्यातला जो संघ बॅटिंग करत असतो त्याचे फक्त दोनच खेळाडू मैदानात प्रत्यक्ष खेळत असतात, उरलेले मैदानाबाहेर बसलेले असतात. खेळणारा एक बॅट्समन औट झाल्यावर तो मैदानाच्या बाहेर जातो आणि दुसरा त्याची जागा घेतो. दुसरा संघ बॉलिंग आणि फील्डिंग करत असतो त्याचे सारे म्हणजे अकराही खेळाडू मैदानावर उतरून खेळात भाग घेत असतात. एवढी तरी प्राथमिक माहिती आजकाल सगळ्यांनाच असते. पण आमच्या मुलांच्या क्रिकेटमध्ये असले मूलभूत नियमसुध्दा नसायचे. दुपार टळली की मित्रमंडळी एकमेकांना बोलावून आणि ज्याच्याकडे बॅट, बॉल, स्टंप्स वगैरे जी सामुग्री असेल ती घेऊन मैदानाकडे येऊ लागत आणि जितकी मुले जमतील तेवढ्यावर खेळ सुरू करून देत. त्यासाठी दोन टीम बनवण्याचीसुध्दा गरज पडत नसे. मुलांची आपापसातच आळीपाळीने बॅटिंग आणि बॉलिंग चालत असे. एक मुलगा बॉल टाकायचा आणि दुसरा बॅटिंग करायचा. तिसरा वाट पहात फील्डिंग करायचा. बॅटिंग करणारा मुलगा औट झाला तर तिसरा त्याची जागा घ्यायचा आणि पूर्ण ओव्हरमध्ये तो औट नाही झाला तर तिसरा मुलगा बॉलिंग करायचा. चौथा, पाचवा, सहावा वगैरे मुले अशाच प्रकारे आपल्याला आळीपाळीने बॅटिंग किंवा बॉलिंग मिळायच्या संधीची वाट पहात फील्डिंग करत रहायचे. टीमच नसल्यामुळे धावा मोजायची गरज नसायची. कधी कधी तर असे व्हायचे की बॅट्समन औट होताच ती ओव्हर अर्धवट सोडून बॉलरच “माझी पाळी आली” म्हणून बॅट हातात घ्यायचा आणि त्याची उरलेली ओव्हर औट झालेला मुलगा पूर्ण करायचा. म्हणजे एका ओव्हरमध्येच बॉलर आणि बॅट्समन यांचे ‘रोल रिव्हर्सल’ होत असे. दोन गट बनवण्याएवढी म्हणजे दहा बारा इतकी गणसंख्या झाल्यावर लीडर टाइपची दोन मुले कॅप्टन होत आणि “मन्या, तू माझ्या टीममध्ये”, “पक्या तू माझ्याकडे”, “सुऱ्या तू इकडे ये”, “रम्या, इकडे”, “चंद्या”, “नंद्या” ….. असे करून सगळ्या मुलांची दोन गटात वाटणी करून घेत. त्यानंतर उशीराने येऊन पोचलेली मुलेही एकजण या आणि दुसरा त्या अशा प्रकारे या ना त्या संघात सामील होत जात.

जमलेल्या मुलांची संख्या वीस पंचवीस इतकी मोठी संख्या कधी झाली तरच क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एक ‘बॅटिंग साइड’ आणि दुसरी ‘फील्डिंग साइड’ अशी विभागणी होत असे. एरवी दोन लहान लहान संघ बनले असले तरी त्यातले दोन बॅट्समन सोडून इतर सगळी मुले आनंदाने फील्डिंग करत, बॉलिंग मात्र फक्त विरुध्द संघाच्या मुलांनी करायची. फिल्डिंग करतांना आपल्या संघातल्या खेळाडूचा कॅच सोडायचा, त्याने मारलेला फटका अडवायचा नाही अशा प्रकारची ‘चीटिंग’ कोणी करत नसे. कोणीही तसे मुद्दाम केलेले आढळल्यास त्याला बॅटिंगचा चान्स मिळणार नाही एवढीशी शिक्षा असायची. शिवाय त्या दिवशीचे दोन संघ त्या खेळापुरते, दुसऱ्या दिवशी इकडची काही मुले तिकडे आणि तिकडची इकडे असे होणार असल्यामुळे त्या तात्पुरत्या संघात संघभावना कशी तयार होणार? रोजच्या खेळातला डाव जिंकण्याहरण्याला फार महत्व असायचेही नाही. खेळण्यातला आनंद उपभोगणे इतका साधा उद्देश मनात ठेवून खेळणे होत असे.

आजकाल क्रिकेटच्या मॅचसाठी मुद्दाम वेगळी खेळपट्टी (पिच) तयार केली जाते. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधून वाळू आणि न्यूझीलंडमधून खडी आणली अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात. अमाप खर्च आणि श्रम करून ती तयार केली असली तरी मॅच सुरू झाल्यानंतर संपण्याच्या आधीच ही नखरेल खेळपट्टी आपले गुण पालटत राहते. सुरुवातीला तिच्यावर टाकलेला चेंडू चांगली उसळी घेतो त्यामुळे ती जलदगती गोलंदाजांना (पेस बोलर्सना) साथ देते. तेच पिच जुने झाल्यानंतर त्यावर बॉल चांगले वळायला लागतात. त्यामुळे ते फिरकी गोलंदाजांना (स्पिनर्सना) मदत करते. असे असे घडले असे कॉमेंटेटर्स कधी कधी सांगत असतात. काही खेळपट्ट्या फलंदाजांच्या सोयीसाठी अशा प्रकारे बनवल्या जातात की त्या कुठल्याच प्रकारच्या बोलरला कसलीच साथ देत नाहीत. पिचच्या या गुणधर्मांमुळे टॉस जिंकून झाल्यावर आधी बॅटिंग करायची की फील्डिंग असा एक मोठा निर्णय कॅप्टनने घ्यायचा असतो. नाणेफेक जिंकूनसुध्दा एकादी टीम हरली तर तिच्या कर्णधाराने चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल त्याला जबाबदार धरले जाते. हे सगळे वाचतांना मला तरी हसू येते. कोणची टीम जिंकणार हे जर टॉसवरच ठरत असेल तर त्या मॅचला काय अर्थ राहिला? आमच्या लहानपणच्या क्रिकेटमध्ये खेळपट्टीची भानगडच नसायची. गावाबाहेरच्या ज्या सार्वजनिक मोकळ्या मैदानावर आम्ही खेळायला जात असू तिथे मुलांची इतर टोळकीही येत, तसेच फिरायला आलेली माणसेही गवतावर बसून गप्पा मारत. त्यामुळे आमची खेळण्याची जागाच रोज बदलत असे. सोयिस्कर मोकळी जागा बघून त्यातल्या त्यात सपाट अशा जागेवर स्टंप ठोकून आणि त्याच्या आसपासचे दगड धोंडे वेचून ते बाजूला करून आमचे नित नवे पिच तयार होत असे.

खेळाच्या इतर बाबतीतसुध्दा परिस्थितीनुसार नवनवे नियम बनवले जात आणि पाळले जात. दोन्ही बाजूला तीन तीन स्टंप ठेवणे आम्हाला कधीच शक्य होत नसे. त्यामुळे ओव्हर संपल्यानंतर विकेट कीपर त्याच्या जागेवरच उभा रहात असे, सगळे बोलर एकाच बाजूने बॉल टाकत. तिथे पॅव्हिलियन एंड, चर्च एंड अशासारख्या दोन बाजू नसत. ओव्हर झाली की दोन्ही बाजूचे बॅट्समन रन काढल्याप्रमाणे आपल्या जागा बदलत. जिथे खेळपट्टीचाच पत्ता नसायचा तिथे आखलेल्या सीमारेषा कुठून येणार? डाव सुरू करतांनाच काही खुणा ठरवून ती बाउंडरी मानली जात असे. शहरातल्या गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले सुध्दा पहिल्या मजल्यावर बॉल गेला किंवा कोणाच्या खिडकीची काच फुटली कि बॅट्समन आउट, ठराविक रेषे पर्यंत बॉल गेला कि दोन रन्स, त्याच्या पुढे दुसऱ्या रेषे पर्यंत बॉल गेला कि चार रन्स, रेषेवरून गेला कि ६ धावा असे नियम करतात. फील्डर्सची संख्या कमी असली तर बॉल कुठल्या दिशेने फटकारायचा याचे नियम ठरवले जातात. आमच्या खेळात असेच काही नियम एकदा ठरवले होते, त्या दिवशी मी उशीरा पोचलो होतो. पण माझी क्षमता पाहून मला ते नियम सांगण्याची गरज कुणाला वाटली नाही. नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी माझी बॅटिंगची पाळी आली. तोपर्यंत अंधार पडायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन तीन चेंडूमध्ये माझी विकेट काढून घरी परतायचा माझ्या मित्रांचा विचार होता. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडून उसळतांना मला दिसला आणि काही विचार न करता मी बॅट फिरवली आणि तो चेंडू लाँग लेगच्या दिशेने पार नजरेपल्याड चालला गेला. कित्येक दिवसात मी एवढा दूर फटका मारला नसल्याने मी स्वतःवर भयंकर खूष झालो होतो, पण सगळे मित्र मात्र चिडून माझ्या अंगावर धावून आले. स्टंपच्या मागच्या बाजूला ठेवायला क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्याने “कोणीही त्या बाजूला फटका मारायचा नाही, बॉलला फक्त पुढच्या बाजूलाच ढकलायचा.” असा त्या दिवसापुरता नियम केला होता म्हणे. त्यामुळे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून मलाच एकट्याने मागे जाऊन अंधुक होत असलेल्या प्रकाशात गवत आणि काट्याकुट्यामधून तो चेंडू शोधून आणण्याचे काम करावे लागले. करकरीत तीन्हीसांजेच्या वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत केलेल्या या प्रायश्चित्ताची आठवण जन्मभर राहिली.
————–

क्रिकेट क्रिकेट – भाग ३

माझ्या लहानपणच्या काळात मामलेदार कचेरी, नगरपालिका कचेरी, पोस्ट ऑफिस आणि एक सहकारी बँक एवढीच ‘ऑफिसे’ आमच्या लहान गावात होती. त्या सगळ्या इमारतींमधले वातावरण थोडे गावठीच असायचे. पट्टेवाले किंवा पोस्टमन यांच्यासारखे मोजके गणवेशधारी सेवक वगळल्यास तिथे दिसणारे बहुतेक लोक अंगात सदरा (शर्ट), डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि कंबरेला धोतर किंवा लेंगा (पायजमा) अशासारख्या गावठी पोशाखात असत. गावातल्या पांढरपेशा लोकांची संख्या एकंदरीत कमीच असल्यामुळे पँट धारण करणारे तरुण कमीच दिसत पण त्यांची संख्या दिवसेदिवस वेगाने वाढत जात होती. तरीही फक्त खेळासाठी म्हणून डोक्यावरील कॅपपासून पायातील बुटांपर्यंत नखशिखांत पांढरा शुभ्र ड्रेस घालून क्रिकेटची मॅच खेळू शकणारे युवक त्यांच्यात शोधूनही निघाले नसते. त्या काळात मुलांचे ‘खेळायचे वय’ संपले की त्यांनी पूर्णवेळ ‘कामाला’ किंवा ‘उद्योगधंद्याला’ लागायचे अशी रीत असल्यामुळे त्या गावात मोठ्या माणसांचे मैदानी खेळांचे फारसे सामने होत नसत. मी आमच्या गावातल्या प्रौढांना हुतूतू, कुस्ती आणि व्हॉलीबॉल याव्यतिरिक्त इतर कोणता मैदानी खेळ खेळतांना पाहिल्याचे मला आठवत नाही. त्या काळात भारतात टेलिव्हिजन सुरू झालेला नसल्यामुळे घरबसल्या क्रिकेटचा सामना पाहण्याची सोयही नव्हती. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर क्रिकेटचा खरा नियमानुसार असा खेळ पहिल्यांदा पाहिला.

त्या काळात क्रिकेटच्या कसोटी सामन्यांच्या कॉमेंटरीचे प्रसारण रेडिओवर येत होते. पण वर्षभरामध्ये क्रिकेट या खेळाचा फक्त एकच ‘सीझन’ येत असे आणि त्या कालावधीतसुध्दा दोन तीन वर्षांमध्ये एकदा एकादी परदेशी टीम क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असे किंवा आपले खेळाडू ‘फॉरेन टूर’वर जात असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांचे संघ माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीत फक्त एकेकदाच भारतात येऊन गेले असावेत. क्रिकेटची कॉमेटरी हा तेंव्हा आजच्यासारखा रोजचा मामला नव्हता. गावात प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा नाही आणि असला तरी तो घरातल्या मुलांच्या वाट्याला क्वचितच येत असे. चुकून एकाद्या घरातल्या मोठ्या लोकांना क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्याचा षौक असलाच तर मग त्या घरातल्या मुलांच्या कानावर कॉमेंटरी पडायची. क्रिकेट टेस्ट मॅचेसच्या दिवसात अभ्यासाचे किंवा खेळायचे निमित्य करून त्या मुलाचे मित्र त्याच्या घरी जाऊन आणि थोडीशी कॉमेंटरी ऐकून धन्य होत. हॉटेले, पानपट्टीचे ठेले, सायकलीची (म्हणजे सायकली भाड्याने देण्याची) दुकाने अशा गावातल्या काही ठिकाणी नेहमीच रेडिओवर सिनेमाची गाणी मोठ्याने लावलेली असत. त्यातले काही लोक मात्र टेस्ट मॅचेस सुरू झाल्यावर गाण्यांऐवजी क्रिकेटची कॉमेंटरी लावून ठेवत. काही उत्साही लोक, मुख्यतः पोरेटोरे दुकानांच्या दारात उभी राहून ती ऐकत असत.

आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजी भाषेचीही हकालपट्टी करायचा चंग त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. आम्ही आठवी इयत्तेत गेल्यानंतर एबीसीडी शिकण्यापासून सुरुवात केली. ए टु झे़ड ही सव्वीस अक्षरे गिरवून झाल्यानंतर हळूहळू शब्द, वाक्यरचना, व्याकरण वगैरे थोडे फार शिकेपर्यंत आमचे शालेय शिक्षण संपून गेले. शालांत परीक्षेसाठी इंग्लिश हा एक ऐच्छिक विषय होता. ज्यांनी कॉलेज शिक्षण घेण्याचा विचारही केला नव्हता अशा बहुसंख्य मुलांनी तो घेतलाच नाही. आम्हाला इंग्रजी शिकवणारे अपसंगी, दोडवाड वगैरे सरांची गणना गावामधल्या विद्वान व्यक्तींमध्ये होत असे, पण शेक्सपीयर, शॉ, वर्डस्वर्थ वगैरेंचे साहित्य ते कोळून प्यायले असले तरी एबीसीडी शिकण्याच्या पातळीवरल्या आम्हाला त्याचा काय उपयोग होणार? त्यातून त्यांची मातृभाषा कानडी असल्याने त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हते. आम्हाला इंग्रजी सिनेमा किंवा मालिका, डॉक्युमेंटरीज वगैरेंचे दर्शनही झाले नव्हते. या परिस्थितीत शाळेत असेपर्यंत आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान यथातथाच राहिले. शाळेमधला इंग्रजीचा तास सोडल्यास एरवी त्या भाषेतला चकार शब्द बोलण्यात किंवा ऐकण्यात येत नसे. त्या वेळी क्रिकेटच्या कॉमेटरीमधूनच त्या भाषेतली चार वाक्ये कधी तरी आमच्या कानावर पडत होती. त्याचा अर्थ लावायच्या प्रयत्नातून आमचे किंचित ट्रेनिंग होत होते.

ऐकलेल्या कॉमेंटरीमधले फारच थोडे त्या वेळी आम्हाला समजत असे, पण पुन्हा पुन्हा ऐकून आणि शहाण्या लोकांना विचारून विचारून त्यातली क्रिकेटची परिभाषा ध्यानात येऊ लागली. इनस्विंगर, औटस्विंगर, लेग स्पिन, ऑफस्पिन, स्लिप, शॉर्ट लेग, कव्हर, हिट विकेट, क्लीन बोल्ड यासारख्या शब्दांचे अर्थ समजायला लागले. मैदानातल्या कोणकोणत्या जागांवर क्षेत्ररक्षक उभे आहेत (फील्ड प्लेसमेंट्स) हे पुन्हा पुन्हा सांगितले जात असल्यामुळे ते चित्र कल्पनेने डोळ्यासमोर येऊ लागले. पण आम्हाला त्यात त्या काळी फारसे स्वारस्य वाटत नव्हते. कोणती टीम बॅटिंग करते आहे, कोणकोण बॅट्समन खेळत आहेत, त्यांच्या आणि संघाच्या किती धावा झाल्या, किती विकेट्स गेल्या ही माहिती तेवढीच महत्वाची. अखेर कोण जिंकत आहे आणि कोण पराभूत होत आहे हे त्यावरून ठरते. यामुळे सर्वांना त्यातच इंटरेस्ट असायचा.

त्या काळात ‘पियरसन’ अशा इंग्लिश नावाचे एक भारतीय कॉमेंटेटर होते, त्यांचा भरदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल सर्वांना इंप्रेस्सिव्ह वाटायची. ‘महाराजकुमार ऑफ विजयानगरम्’ एवढे लांबलचक आणि ‘विझी’ असे छोटेसे नाव धारण करणारे गृहस्थ अचाट लांबण लावायचे आणि त्यातले अवाक्षरही आम्हाला समजत नसे. कुठल्याशा जुन्या आठवणी घोळवून सांगता सांगता “दरम्यानच्या काळात चार विकेट पडल्या आहेत आणि आता अमके तमके क्रीजवर आले आहेत” अशी त्या सुरू असलेल्या खेळाबद्दल थोडीशी माहिती ते देत. विजय मर्चंट हे कॉमेंटेटर मात्र सर्वांचे अत्यंत लाडके होते. त्यांच्या खणखणीत आवाजात प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते अक्षरशः ‘बॉल टू बॉल’ कॉमेंटरी करत असत, ते स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू होते, त्यामुळे त्यांना क्रिकेटमधल्या खाचाखुचा चांगल्या ठाऊक होत्या आणि सोप्या शब्दात ते श्रोत्यांना समजावून सांगत असत. मुख्य म्हणजे रेडिओवरील खरखरीमधून फक्त त्यांचेच बरेचसे उच्चार आम्हाला समजत होते. तटस्थ वृत्ती न बाळगता ते खेळाशी समरस होऊन जात आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना त्यांच्या कॉमेंटरीमध्ये उतरत असे.

मला गणितात पहिल्यापासूनच आवड आणि गति असल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीचे थोडेसे वेड होते. क्रिकेटमध्ये जेवढे स्टॅटिस्टिक्स येते तेवढे अर्थकारणातदेखील कदाचित येत नसेल. कोणत्या संघाने किंवा खेळाडूने कुठे कुठे आणि कोणकोणते पराक्रम केले याची सविस्तर जंत्री वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये येत असे. आम्ही ती गोळा करून सांभाळून ठेवत होतोच, पण प्रत्येक सीझनमध्ये कितीतरी जुने रेकॉर्ड्स मोडले जात आणि नवे विक्रम प्रस्थापित केले जात असत. या सगळ्याची इत्थंभूत माहिती आम्हाला तोंडपाठ असे. एकादा बॅट्समन किंवा बोलर जरासा यशस्वी व्हायला लागला की लगेच तो कोणत्या विक्रमापासून किती दूर आहे हे पाहिले जात असे आणि नव्या विक्रमाचे वेध लागत असत. तो सामना जिंकण्याहरण्यापेक्षाही त्या सामन्यात अमूक रेकॉर्ड मो़डला जाणार की नाही याची उत्सुकता कधी कधी जास्त वाटत असे.

त्या काळातली एक मजेदार आठवण आहे. आमच्यातला अरविंद पोटे नावाचा एक मुलगा चांगला क्रीडापटू होता आणि थोडी दादागिरीही करायचा. सुरुवातीपासून शाळा सोडेपर्यंत तोच आमचा कॅप्टन असायचा. एरवी तो स्वतःला देव आनंद समजत असे आणि त्याच्यासारखा केसाचा कोंबडा ठेवून थोडे हावभावही करत असे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिची बेनो त्याचा हीरो होता. फील्डिंग करतांना सिली मि़ड ऑफ या जागेवर बॅट्समनच्या अगदी पुढ्यात हा रिची उभा रहात असे आणि एकादा बॉल प्लेड करतांना किंचितसा जरी वरच्या बाजूला उडाला तर हनुमानउडी मारून त्याचा कॅच पकडत असे. अर्थातच कॉमेंटरीमध्ये ऐकून आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचून ही माहिती आम्हाला मिळाली होती. असले धाडस करणे त्या काळात दुर्मिळ असायचे. आमचा अरव्यासुध्दा एकदा असा रिची बेनोसारखा सिली मि़ड ऑफला उभा राहिला असतांना योगायोगाने माझी बॉलिंगची पाळी आली होती. मलाही वेगाने बॉल टाकता येतो हे दाखवायचे म्हणून मी सगळा जोर लावून चेंडू फेकला आणि कधी नव्हे तितक्या वेगाने तो गेला, पण त्या नादात त्याची दिशा थोडी चुकली आणि सरळ अरव्याच्या पाठीवर दाणकन आपटला.

. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

क्रिकेट क्रिकेट – भाग ४

कॉन्व्हेंट स्कूल, मिलिटरी स्कूल, पब्लिक स्कूल यासारख्या काही शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळांनासुध्दा खूप महत्व दिले जाते. अशा शाळांमधून आलेली काही मुले आमच्याबरोबर इंजिनियरिंगला होती, तसेच काही मुलांनी क्लब, जिमखाना वगैरेंमध्ये जाऊन क्रिकेटचे खास प्रशिक्षण घेतलेले होते. यामुळे आमच्या इंजिनियरिंग कॉलेजमधल्या क्रिकेटचा दर्जा खूपच वरचा होता. सिलेक्शन ट्रायल्ससाठी येणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्येकाची तयारी चांगली होती. तिथे लिंबूटिंबूंसाठी काहीच स्कोप नव्हता. मी शिकत असतांना तीनही वर्षी पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा आमच्या कॉलेजच्या संघानेच जिंकल्या. या कॉम्पिटिशनमधल्या प्रत्येक मॅचच्या वेळी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमच्या हॉस्टेलमधून मुलांच्या झुंडी त्या ग्राउंडवर जाऊन पोचायच्या. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजबरोबर सामना असेल तर त्यांच्या बाजूने मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मुलीही यायच्या हे एक अॅडेड अट्रॅक्शन असायचे. प्रत्येक चौकार, षट्कार किंवा विरुध्द संघाची विकेट यावर टाळ्या, शिट्या, आरडाओरड, नाच वगैरे मनसोक्त धांगडधिंगा घालण्याची चढाओढ चालत असे. मैदानात आमचा संघ जिंकायचाच, प्रेक्षकांमधल्या धांगडधिंग्याच्या सामन्यातसुध्दा आमचाच आवाज वरचढ असायचा. क्रिकेटमुळे कशी धुंदी चढते हे मी त्या काळात अनुभवले. तसेच प्रत्यक्ष क्रीजवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान नेमके काय घडत असते हे दुरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना नीट दिसतसुध्दा नाही हेही समजले. हजारो रुपयांची तिकीटे काढून मॅच पहायला स्टेडियमवर गर्दी करणाऱ्यांची मला धन्य वाटते. त्यापेक्षा घरबसल्या टीव्हीवर मॅच पहात असतांना क्लोज अप व्ह्यूमध्ये जास्त चांगले दाखवले जाते. आता तर अॅक्शन रिप्लेमधून ते व्यवस्थित दिसते. स्टेडियममधले प्रेक्षकही ते मोबाईल फोनवर पाहू शकतात.

शाळेत असतांना कधी कधी आमची टीम आणि इतर मुलांच्या टीममध्ये मॅचेस होत असत. अर्थातच त्यातसुध्दा आम्हीच बनवलेल्या नियमांनुसार क्रिकेट क्रिकेटचा स्वैर खेळ होत असे. माझ्या गणितातल्या कौशल्यामुळे मला काही वेळा अशा सामन्यांमध्ये स्कोअररचे काम मात्र मिळत असे आणि माझ्या समजुतीनुसार झालेल्या धावांची संख्या आणि विकेट्स यांची नोंद ठेऊन मी स्कोअरकार्ड तयार करत असे. एका इंटरकॉलेज क्रिकेट मॅचच्या वेळी मी कुतूहलाने स्कोअररपाशी जाऊन बसलो. माझा एक मित्र सुधीर त्यासाठी एक वही घेऊन आला होता आणि प्रत्येक बॉल पिचवर कुठे पडला, त्याला बॅट्समनने कोणत्या दिशेने टोलवले, किंवा त्या बॉलने बॅट्समनला चकवले, तो चेंडू कुठे अडवला गेला, त्यावर किती धावा मिळाल्या वगैरेंची सचित्र नोंद तो ठेवत होता. आजकाल अशा गोष्टी काँप्यूटरच्या सहाय्याने अॅक्शन रिप्लेमध्ये दाखवल्या जातात, कदाचित त्या रेकॉर्डही केल्या जात असतील, पण पन्नास वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अशा तपशीलवार नोंदी पाहून मी चाट पडलो होतो.

कॉलेजला गेल्यानंतर क्रिकेटच्या बाबतीत माझी भूमिका फक्त आणि फक्त प्रेक्षकाचीच राहिली. सामन्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा त्यातला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. अजूनही मी काही वेळा टीव्हीवर हा खेळ पहातो, पण आता त्याची तितकी क्रेझ राहिली नाही. वर्ल्ड कप सारखे सामने मात्र आवर्जून पहातो.

माझ्या मुलांच्या जन्माच्या आधीच आमच्याकडे टीव्ही आला होता आणि ते दोघेही त्यांना समज येण्याच्याही आधीपासून टीव्हीवर भरपूर क्रिकेट पहात होते. अगदी लहान असतांना सुध्दा ते निरनिराळे बोलर, बॅट्समन, फील्डर्स आणि अंपायर यांच्या विशिष्ट लकबी नक्कल करून दाखवत आणि सर्वांना हसवत असत. ते वर्ष दीड वर्षाचे झाले असतांनाच वीतभर लांबीची प्लॅस्टिकची पोकळ बॅट आणि लिंबाएवढा बॉल या वस्तू त्यांच्या खेळण्यांमध्ये जमा झाल्या आणि त्या बॅटने ते बॉलशी ठोकाठोक करायला लागले. पुढे त्या खेळण्यांचे आकार आणि प्रकार बदलत गेले असले तरी बॅटबॉल खेळतच ते लहानाचे मोठे झाले, शाळेत आणि कॉलेजात रेग्युलर क्रिकेट खेळले. ते आता ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर खेळत आहेत आणि जिंकून आणलेल्या ट्रॉफीजनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. ते अगदी लहान असतांना मी घरात किंवा बाहेरच्या पॅसेजमध्ये त्यांच्या बरोबर खेळत होतो, ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मित्रांबरोबर खेळू लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये सगळ्या नियमांप्रमाणे क्रिकेट खेळत असतांना बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांचे गल्ली क्रिकेटही चालत असे. खेळायला कोणी मित्र नसेल किंवा धो धो पाऊस पडत असेल अशा वेळी ते दोघेच आमच्या एकोणीसाव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या लॉबीमध्ये खेळायचे. एकाने सरपटत चेंडू टाकायचा आणि दुसऱ्याने तो जमीनीलगतच परत (बॅक टू द बोलर) पाठवायचा. शेजाऱ्याचे दार म्हणजे स्टंप्स, त्याला बॉल लागला की बॅट्समन औट आणि परत केलेला चेंडू बोलरला अडवता आला नाही आणि त्याच्या मागे असलेल्या भिंतीला लागला की एक रन अशा प्रकारचे नियम ते पाळायचे. चुकून बॉल उडाला आणि कठड्यावरून खाली गेला तर मात्र तो मिळायची शक्यता फारच कमी असायची. मग त्या दिवसाचा खेळ बंद.

कधी कधी तर ते डाईस घेऊन काल्पनिक क्रिकेट खेळायचे. जगभरातले उत्तमोत्तम खेळाडू निवडून त्यांचे दोन संच बनवत आणि त्यातल्या एकेकाच्या नावाने डाईस फेकून १, २, ३, ४ किंवा ६ आकडा आला तर तितके रन्स आणि ५ आकडा आला तर औट असे स्कोअर लिहीत असत. हा खेळ एकटासुध्दा खेळू शकतो आणि खेळला जात असे. घरी काँप्यूटर आणल्यानंतर थोड्याच दिवसात क्रिकेट या खेळाची सीडी आली आणि त्यांचे त्यावर व्हर्च्युअल क्रिकेट खेळणे सुरू झाले. काँप्यूटरची क्षमता जसजशी वाढत गेली त्यासोबत या खेळाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपार सुधारणा होत गेली. अगदी खरेखुरे छायाचित्र वाटेल इतके चांगले खेळाडू आजकाल या खेळामधल्या स्क्रीनवर दिसतात आणि आपण त्यांना आज्ञा देऊ त्यानुसार ते बोलिंग व बॅटिंग करतात. इतकेच नव्हे तर गॅलरीमधले प्रेक्षकसुध्दा टाळ्या वाजवून दाद देतात आणि चीअर गर्ल्स नाचतांना दिसतात. हा एक काँप्यूटर गेम आहे की प्रत्यक्ष होत असलेल्या मॅचचे थेट प्रक्षेपण आहे असा संभ्रम पडावा इतके ते रिअॅलिस्टिक वाटते.

मॅच फिक्सिंगच्या प्रकारांमुळे या खेळात अप्रामाणिकपणा शिरला असला तरी तो एक आकर्षक खेळ आहे आणि आज मनोरंजनाचे एक साधन बनला आहे असा विचार केला तर त्यात भावनात्मक रीत्या गुंतून पडण्याचे (इमोशनली इन्व्हॉल्व्ह होण्याचे) कारण नाही. नाटक सिनेमांमध्ये दाखवले जाणारे सगळेच काल्पनिक असते, त्यांच्या कथांमध्ये आपण सत्य शोधत नाही. आयपीएल हा प्रकार मला तरी यापेक्षा कधीच वेगळा वाटला नाही. त्यातही मुंबई, दिल्ली किंवा चेन्नै या नावाच्या संघांचा त्या गावांशी संबंध नसतो. जगभरातले क्रिकेटर लिलावात विकले जाऊन त्यांच्याकडे येतात आणि भाडोत्री खेळाडू म्हणून खेळतात. त्यामुळे मला त्यातला कुठलाच संघ आपला वाटत नाही आणि एक बाजू आपली नसली तर त्या खेळातल्या कुणाच्या जिंकण्याहरण्याचे आपल्याला काही वाटत नाही. तरी पण बॅट्समनांची अप्रतिम फटकेबाजी आणि फील्डरांनी उड्डाण करून किंवा जमीनीवर सूर मारून घेतलेले झेल यातली कलाकारी पाहण्यासारखी असते.

तर अशा प्रकारे निरनिराळ्या स्वरूपांमध्ये माझ्या जीवनात क्रिकेट आले आणि ते काही त्याने घेऊन ठेवलेला एका कोपऱ्याचा ताबा सोडायला तयार नाही.
. . . . . . . . . (समाप्त)

आठवणीतले उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस

“नेमेचि येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।” ही कविता मी लहानपणी पाठ केली होती. पण ज्या दुष्काळी प्रदेशात माझे लहानपण गेले त्या भागात एकंदरीतच फारसा पाऊस पडत नसे. त्यामुळे कौतुक वाटण्याइतका मुसळधार पाऊसही कधी पडायचा नाही आणि वर्षभरातून ज्या काही दोन चार जोरदार सरी पडायच्या त्यांचा तर अजीबात ‘नेम’ नसे! मग कौतुक तरी कशाचे वाटणार? पूर्वेकडून येणाऱ्या आदिलशहाच्या फौजांना अडवून धरण्याचे काम करून शिवाजी महाराजांचा त्यांच्यापासून बचाव करण्याचे महत्कार्य जो सह्याद्री करत असे असे आम्ही इतिहासात शिकलो तोच सह्याद्री नैऋत्येकडून येणाच्या पावसाळी ढगांना अडवून धरत किंवा रिकामे करून टाकत असल्यामुळे आम्हाला सृष्टीचे हे कवतिक पाहू देत नाही हे भूगोलात वाचून मला त्याचा राग येत असे. तसेच नजरेलासुद्धा न पडणारा हा पर्वत त्याची वर्षाछाया इतक्या दूरवर कसा टाकतो हेही समजत नसे. अवचित येणाऱ्या पावसाच्या आधीपासून उन्हाळा सुरू होत असे आणि नवरात्रानंतर येणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’पर्यंत तो चालत असे.

रखरखीत असा हा उन्हाळासुध्दा आम्हाला मात्र बराच प्रिय वाटत असे, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या कालावधीत शाळांना लागणाऱ्या लांबचलांब सुट्या. आमची शाळा तशी वाईट नव्हती, पण तरीही सुटी ही सुटीच! आमचा मामासुध्दा त्याच गावात रहात असल्यामुळे झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याचे अप्रूप आमच्या नशीबात नव्हते, पण आमच्या एकत्र कुटुंबातल्या सासरी गेलेल्या माझ्या मोठ्या बहिणींपैकी कोणी ना कोणी उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्या लहान मुलांसह आमच्या घरी माहेरपणासाठी यायच्याच. ‘मामाच्या गावा’ला जाण्याची मौज त्या मुलांना मिळायची. कॉलेजशिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी राहणारे माझे मोठे भाऊही त्या सुमारास घरी येऊन बरेच दिवस रहायचे आणि त्या मुलांच्या मामांच्या संख्येत भर पडायची. या सगळ्या लोकांमुळे आमचे घर अगदी भरून जात असे. शाळेत जायची कटकट नसल्यामुळे मौजमस्ती दंगा वगैरे करण्यासाठी आम्हाला दिवसभर मोकळाच असे. बदाम सात, झब्बू, पास्तीन्दोन, ल्याडीस, मार्कंडाव यासारखे पत्त्याचे अनेक प्रकारचे खेळ, सोंगट्या, बुध्दीबळ वगैरेंचे डाव रंगायचे, गाण्याच्याच नव्हे तर गावांच्या, नावांच्या वगैरे भेंड्या, कोडी घालणे आणि सोडवणे, नकला वगैरेंना ऊत येत असे. सर्वात मुख्य म्हणजे या ना त्या निमित्याने काहीतरी कुचाळकी काढून एकमेकांची चिडवाचिडवी करणे!

पोहायला जाणे हा उन्हाळ्याच्या सुटीतला एक आवडता कार्यक्रम असायचा. त्या काळात जलतरणतलाव (स्विमिंग पूल) हा प्रकार आमच्या लहान गावात कोणी ऐकलासुध्दा नव्हता. आमच्या गावातले एकमेव तळे उन्हाळ्यात बरेचसे आटून जात असे. शिवाय ते अगदी उथळ होते आणि काही लोक त्याचे पाणी प्यायला नेत असल्यामुळे तिथे डुंबायला बंदी होती. तिथे पोहणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्हाला गावाबाहेरील एकाद्या मळ्यातल्या विहिरीवरच पोहण्यासाठी जावे लागत असे. निदान दहा बारा वेळा तरी हातपाय मारायला जागा मिळावी एवढी आकाराने मोठी तसेच बुडण्याइतपत खोल पाणी असलेली आणि आत उतरून जाण्यासाठी पायऱ्या असलेली अशी आसमंतातली विहीर शोधून काढणे आणि तिच्या मालकाची परवानगी मिळवणे हे जिकीरीचे काम कोणी उत्साही मोठी मंडळी करत असत.

एका वर्षी कल्याणशेट्टी, दुसऱ्या वर्षी परसप्पा, तिसऱ्या वर्षी असाच आणखी कोणी उदार मनाचा जमीन मालक मिळाला की ती बातमी गावभर पसरत असे आणि सकाळ झाली की आम्ही सगळी मुले उत्साहाने एका पंचात चड्डी गुंडाळून घेऊन आपला मोर्चा तिकडे वळवत असू. ‘स्विमिंग कॉस्च्यूम’ असले अवघड आणि बोजड शब्द तेंव्हा अजून माझ्या कानावर पडले नव्हते. भक्त प्रल्हाद, वीर हनुमान यासारखे जे सिनेमे पहायची संधी मला लहानपणी मिळाली त्यातली पात्रे घातल्यास नेहमीच तोकडे कपडे घालत, पोहण्यासाठी त्यांचे खास वेगळे कपडे नसत. पोहतांना घालायच्या कपड्यांच्या बाबतीत आमच्यापुढे कसलेही उदाहरण नव्हते आणि आम्ही नेहमीच्या चड्डीतच पाण्यात उतरत असू. मैल दीड मैल पायपीट आणि तास दीडतास पोहणे करून घरी परत आल्यावर आम्हाला सडकून भूक लागलेली असायची आणि घरातील स्त्रीवर्गाला हे ठाऊक असल्याने त्यांनी आमच्या क्षुधाशांतीची जय्यत तयारी करून ठेवलेली असे. त्या वेळी खाल्लेल्या थालीपीठाची चंव कदाचित पंचतारांकित हॉटेलांमध्ये घेतलेल्या ग्रँड डिनर पार्टीतसुध्दा कधी आली नाही.

‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’त बसून मामाच्या गावाला जाण्याची मला लहानपणी न मिळालेली संधी माझ्या मुलांना मात्र मिळाली आणि त्यांनी तिचा पुरेपूर उपभोग घेतला. त्यांचे आजोळ बरेच दूर होते आणि तिथे रेल्वेनेच जावे लागत असे. काळाबरोबर रेल्वेमध्ये सुधारणा होत गेल्यामुळे “कू” करत ‘धुरांच्या रेघा हवेत काढणारी’ कोळशाची इंजिने नाहीशी झाली आणि त्यांच्या जागी मोठ्ठा “भों” करणारी आधी डिझेलची आणि नंतर विजेची इंजिने आली आणि ‘पळती झाडे’ जास्तच वेगाने पळायला लागली. ते एक टुमदार गाव होते आणि तिथे जुना ऐसपैस चौसोपी वाडा, शेतीवाडी, गुरेढोरे, कुत्रीमांजरे वगैरे मुंबईत पहायला न मिळणारी अनेक वैविध्ये होती. त्यांच्या वयाची इतरही काही मुले सुटीसाठी तिथे येत असत. त्यांच्यात आमची मुले चांगली रमत असत.  त्यांना परत आणण्याचे निमित्य करून मीसुध्दा चार आठ दिवस सासुरवाडीला जाऊन येत असे आणि ‘जमाईराजा’ म्हणून माझेही भरपूर कोडकौतुक होत असे. काही वेळा आम्ही थंड हवेच्या ठिकाणांना वगैरेसुद्धा जाऊन आलो. उन्हाळ्याचा ताप सहन करावा लागत असला तरीही या सगळ्यांचा विचार करता त्यात एक वेगळी मजा येत असे.

अशी ही टोलवाटोलवी

आंतर्जालाच्या विकासामधल्या एका टप्प्यावर अनेक मुक्तद्वार संकेतस्थळे स्थापन झाली होती आणि ती अत्यधिक लोकप्रिय झाली होती. त्या काळात मी सुद्धा मनोगत, मिसळपाव, ऐसी अक्षरे यासारख्या काही संकेतस्थळांवर नियमाने हजेरी लावत होतो. तिथे काय काय चालत असे याचे मला जेवढे आकलन झाले होते ते मी एका रूपकाद्वारे या लेखात लिहिले होते. त्या काळात एका पानाच्या किंवा एका ओळीच्या लेखावरसुद्धा पानेच्या पाने चर्चा, वादविवाद, हमरातुमरी किंवा वनअपमॅनशिप चालत असे. आजसुद्धा ही स्थळे जोरात चाललेली असतील. कदाचित त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले असेल, किंवा कदाचित नसेलही. माझ्यासारखे आणखी काही जुने खेळाडू रिटायर झाले असतील आणि त्यांच्या जागी नव्या दमाचे नवे खेळाडू आले असतील, तांत्रिक दृष्ट्या झालेल्या प्रगतीचे प्रतिबिंबही त्यात पडलेले असणारच. पण मी आजकाल तिकडे भेट देत नसल्यामुळे मला त्याची तितकीशी माहिती नाही. पाच वर्षांपूर्वीची परिस्थितिबद्दल लिहिलेला हा एक हलकाफुलका लेख या लेखात कदाचित काही जुन्या खेळाडूंना आवडेल.

अशी ही टोलवाटोलवी

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर टोलवाटोलवीचा एक अद्भुत खेळ खेळला जात असतो. हा खेळ ‘डे अँड नाइट मॅच’प्रमाणे एका दिवसातले काही तास आणि रात्रीतले काही तास एवढाच वेळ चालत नाही. मैदानाची साफसफाई आणि डागडुजीसाठी एकाद दुसरा दिवस सोडल्यास तो बारा महिने चोवीस तास सतत चालत असतो. यात भाग घेणाऱ्यात मुलामुलींपेक्षा बाप्ये, बाया आणि म्हातारे-कोतारे यांचीच संख्या जास्त असली तरी त्यांचे निरनिराळे गट नसतात, सगळेजण एकत्रच खेळतात. हा खेळ पहायला येणाऱ्यांची संख्या अर्थातच खेळणाऱ्यांच्या काही पटीने तरी जास्त असते.

रात्रंदिवस चालत असलेल्या या खेळात भाग घेणारे सगळेजण आपापल्या सोयीनुसार जमेल तेंव्हा किंवा इच्छा होईल तेंव्हा मैदानावर येऊन, खेळात भाग घेऊन त्यांना हवे तेंव्हा परतही जाऊ शकतात. दिवसा कामावर जाणारे लोक रात्री तिथे येत असतील आणि रात्रपाळीवर काम करणारे दिवसा येत असतील असेच काही नसते. चेंडूफळीचा एकादा मोठा सामना चाललेला असतांना एका कानाने त्याचा वृत्तांत ऐकत नेहमीचे काम करत राहण्याची जुनी आणि थोर परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे काही लोक कामाच्या वेळेतही इथला खेळ पहायला किंवा त्यात भाग घ्यायला आले तर त्यात नवल किंवा काही चुकीचे वाटायला नको. या मैदानांकडे जाण्यात कुंपण, भिंत यासारखा कसलाही अडथळा नसल्यामुळे कोणीही आणि केंव्हाही तिथे जाऊन तिथे चाललेला खेळ अगदी चकटफू पाहू शकतो. खेळ पाहतांना त्याला त्यात आपणही भाग घ्यावा असे वाटले तर तो सरळ मैदानात उतरूही शकतो. पण पहिल्या वेळेला ते करण्याआधी त्याला त्या मैदानाच्या वहीत एक नाव आणि पत्ता लिहून ठेवावा लागतो एवढेच.

सरळ नाकासमोर बघून चालणाऱ्या लोकांना आईवडिलांनी ठेवलेले एकच नाव माहीत असते. त्यांच्या जन्मपत्रिकेपासून ते शाळा, कॉलेज, ऑफीस, सोसायटी वगैरे सगळीकडे त्यांचे तेच नाव असते, रेल्वे किंवा विमानाची तिकीटे काढतांना आणि हॉटेलमध्ये खोली घेतांनासुद्धा ते लोक नेहमी तेच नाव देत असतात. पण काही लोकांना मात्र निरनिराळ्या विश्वांमध्ये निरनिराळी नावे धारण करण्याची हौस असते. कवि, लेखक, नट, दिग्दर्शक वगैरे कलाकारांमध्ये एकादे आकर्षक असे टोपणनाव घेणे पूर्वीपासून प्रचलित आहे. सायबरनगरीतल्या खेळात भाग घेणाऱ्या काही मुलामुलींनासुद्धा या मैदानातल्या विश्वातली त्यांची ओळख वेगळी ठेवायची असते. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तशी सोयही करून ठेवलेली आहे. तिथे नाव नोंदवतांना कोणतेही ओळखपत्र (आयडी प्रूफ) द्यायची गरज नसते. फक्त ते नाव आधीच आणखी कोणी घेतलेले नसावे एवढीच साधी अट असते. ‘गौतम बुद्ध’, ‘येशू ख्रिस्त’ किंवा ‘सम्राट अशोक’ यासारख्यांची फारच सुप्रसिद्ध नावे कदाचित तिथे मान्य केली जात नसतील म्हणून माझ्या पाहण्यात आली नाहीत.

या बाबतीतली काही लोकांची कल्पकता अचाट असते. एकादा डेढफुट्या नानू आपले नाव ‘ब्रह्मांडाम्लेटभक्षक’ असे ठेवतो तर कोणी आपले नाव ‘डेव्हिडेशुद्दौलासिंगताथा’ असे सर्वधर्मसमभावसूचक ठेवतो. कोणाला फक्त ‘भै’, ‘ठो’ असे एक अक्षर पुरेसे वाटते, आपले नाव प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, टिंब वगैरेंमध्ये ठेवावे असे कोणाला वाटते. काही लोकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला जास्त ताण द्यायचा नसतो. आधी दिलेली नावे ते वाचतात आणि त्यावरून त्यांना ‘काळ्या खवीस’ किंवा ‘म्यूमूढमिता’ अशी नवीन नावे स्फुरतात. “उगाच किती नावे लक्षात ठेवायची?” आणि “कुठल्या जागी आपले कोणते नाव आहे हे आयत्या वेळी आठवले नाही तर घोटाळा व्हायचा!” असा सूज्ञ विचार साधेसुधे बापडे करतात आणि आपले नेहमीच्या वापरातले नाव लिहून मोकळे होतात. त्या वहीत पत्ता लिहितांना ‘अॅड्रेस प्रूफ’ देण्याची गरज नसली तरी दिलेल्या पत्त्यावर एक संदेश पाठवला जातो आणि त्यामधून कळीचा शब्द (पासवर्ड) दिला जातो. यामुळे तिथे जो कोणता पत्ता द्यायचा असेल तो सायबरनगरीतल्या पोस्टमनला सापडायला हवा आणि त्याने तिथे टाकलेले पत्र हातात पडायला हवे एवढीशी काळजी मात्र घ्यावी लागते.

एवढे काम करून झाल्यावर एकदा कोणत्याही मैदानाचा बिल्ला मिळाला की त्या नावाचा मुखवटा चेहेऱ्यावर चढवून केंव्हाही तिथे जाऊन खेळायला मिळते. बहुतेक लोक एकाच किंवा निरनिराळ्या नावांनी सगळीकडचे बिल्ले घेऊन ठेवतात आणि आपल्या मर्जीनुसार त्या मैदानावर चाललेला खेळ पहायला किंवा खेळायला जातात. या खेळाची मुख्य गंमत अशी आहे की यात एकाच वेळी कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. पहायला गेल्यास पत्यांमधल्या ‘पेशन्स’प्रमाणे तो खेळ सुद्धा एकट्यानेही खेळता येतो, पण दोन चार भिडू मिळाले तर ते बरे असते, खेळ पहायला येणाऱ्यांना त्याशिवाय त्यात फारशी मजा वाटत नाही. बहुतेक वेळा त्या मैदानावर इतर काही खेळाडू काही तरी खेळत असतात आणि एकादा नवा डाव सुरू झाला की त्यातले काहीजण आपणहून त्या डावात भाग घ्यायला येतात. या खेळात जास्तीत जास्त किती खेळाडूंनी खेळावे यावर कसलेच बंधन नसते. क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानांसारख्या ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी स्टंप्स रोवून खेळाडूंचे निरनिराळे गट आपापसात चेंडूफळीचा खेळ खेळतांना दिसतात. त्याचप्रमाणे सायबरनगरीतल्या या टोलवाटोलवीच्या खेळाचेसुद्धा अनेक डाव प्रत्येक मैदानात एकाच वेळी चाललेले असतात. पण यातली दुसरी गंमत अशी आहे की त्यातला कोणताही खेळाडू त्या मैदानांवर अनेक ठिकाणी चालत असलेल्या निरनिराळ्या डावांमध्येसुद्धा एकाच वेळी खेळू शकतो. एक टोला इकडे तर दुसरा टोला तिकडे, तिसरा तिसरीकडे असे मारू शकतो. इतकेच नव्हे तर यातले काही नामवंत खेळाडू रोजच निरनिराळ्या मैदानांमध्ये जाऊन तिथे चाललेल्या वेगवेगळ्या डावांमध्ये थोडा थोडा वेळ खेळतात. काही खेळाडू मात्र नेहमी विशिष्ट मैदानांवर येत असतात. सायबरनगरीतल्या भाषेत सांगायचे झाल्यास ती मंडळी त्या मैदानांमध्ये ‘पडिक’ असतात.

हा खेळ कशा स्वरूपाचा असतो हे आधी थोडक्यात समजून घेऊ. नवा डाव सुरू करण्यासाठी प्रत्येक खेळाडू एकादा रंगबिरंगी झेंडा, बावटा, चवरी किंवा गुढी यासारखी त्याला जमेल तेवढी सुबक आणि कलात्मक अशी एक वस्तू सोबत घेऊन येतो. ती वस्तू जरा बरी दिसावी यासाठी तिला रंगरंगोटी करून, किनार, गोंडे वगैरे लावून, सजवून धजवून आणलेली असते. पण नेहमी असे होतेच असे नाही. कधीकधी एकादी धुणे वाळत घालायची साधी काठीही आणली जाते. आणलेल्या वस्तूचे वर्गीकरण करता येण्यासाठी तिचे एक दोन शब्दांमध्ये वर्णन करावे लागते. नवा खेळ सुरू करण्यासाठी एक छोटासा अर्ज भरून मैदानाच्या कार्यालयात द्यायचा असतो. त्या अर्जात दिलेल्या काही ठराविक शब्दांमधूनच वर्णनाची निवड करायची असते. त्यातल्या त्यात ज्या शब्दाचा त्या वस्तूशी काही संबंध जोडता येईल असे त्याला वाटले की तो त्यावर टिचकी मारून देतो. हा खेळ कुठे मांडायचा हे त्या शब्दानुसार ठरते. मग मैदानाच्या त्या भागात ती कलाकृती रोवून ठेऊन तो खेळाडू तिच्या शेजारी उभा राहतो.

इतर खेळाडू तिथे येऊन नव्या खेळाडूने ठेवलेल्या वस्तूचे थोडे फार निरीक्षण करतात आणि त्यांना ती आकर्षक वाटली तर तिला बारकाईने पाहतात. कोणाला तिचे कौतुक वाटते, कोणाला आदर वाटतो, कोणाला प्रश्न पडतात, तर कोणाला कींव येते. कोणाला हंसू येते, कोणाला रडू येते आणि कोणाला राग येतो किंवा कोणाला त्याचे काहीच वाटत नाही. पाहणाऱ्याच्या मनात अशा नाना प्रकारच्या भावना येतात. त्यानुसार कोणाला त्या खेळाडूची पाठ थोपटावी असे वाटते, कोणाला त्याच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते, कोणाला साधे तर कोणाला खोचक प्रश्न विचारासे वाटते किंवा त्याला एक ठेऊन द्यावी असेही कोणाला वाटते. इतर खेळाडूंच्या मनात आलेले हे विचार किंवा भावना प्रकट करण्यामधून हा टोलवाटोलवीचा खेळ सुरू होतो आणि चालत राहतो.

ज्यांना जे वाटते त्यानुसार ते खेळाडू निरनिराळ्या आकारांचे आणि प्रकारचे चेंडू त्या नव्या खेळाडूकडे टोलवतात. एकाद्याला ती वस्तू खूप आवडली तर तो फुलाफुलांची चित्रे काढलेला सुंदर चेंडू अलगदपणे त्याच्याकडे सरकवतो. दुसरा कोणी एकादा मऊ चेंडू मंद वेगाने त्याच्या दिशेने ढकलतो, आणखी कोणी फटकारलेला चेंडू गिरक्या घेत येतो आणि साफ चकवतो, तर कोणाचा एकादा वेगवान आणि कडक चेंडू त्याच्या अंगावर उसळून येतो. कोणी टाकलेल्या क्रेझी बॉलचे काहीच सांगता येत नाही आणि काही मुलांनी त्याच्या दिशेने टोलवलेले चेंडू तर त्याच्या पार डोक्यावरून जातात. तो मुलगाही त्याच्याकडे येणाऱ्या चेंडूंची वाट पहात तयार उभा असतो. तो यातल्या काही चेंडूंना त्याच्या हातातल्या फळीने जमेल तसे टोलवतो. या खेळात सराईत झालेला खेळाडू त्याला वाटल्यास जोरकस टोले हाणून काही प्रतिहल्लेही चढवतो. त्या मुलाच्या दिशेने टोलवलेल्या काही चेंडूंना इतर मुले परस्पर इतरांकडे टोलवतात. यातल्या प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते आणि तितके टोल्यांक त्या खेळाडूच्या नावावर जमा होतात. इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाडलेल्या चेंडूचे गुण त्याला मिळतात आणि त्याने मारलेल्या टोल्याचेही मिळतात, तसेच इतरांनी परस्पर टोलवलेल्या चेंडूचे टोल्यांकही त्यालाच मिळतात. कधीकधी असेही घडते की हा खेळ मूळात कुठून सुरू झाला किंवा तो कुणी सुरू केला याला नंतर फारसे महत्व उरत नाही. इतर काही खेळाडू त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहतात आणि त्यांचे एकमेकांमध्ये जुंपते. त्या वेळी त्यांच्यात चाललेली टोलवाटोलवी खूप प्रेक्षणीय असते. त्याचाही फायदा त्या मूळ खेळाडूला जास्त अंक मिळण्यात होतो.

या खेळात प्राविण्य संपादन केलेल्या मुलांची टोलवाटोलवी पाहण्यासारखी असते. त्यातल्या एकेकाचे हस्तलाघव, पदलालित्य, मुखावरला आविर्भाव वगैरे नमूनेदार असतात. झपाट्याने चाललेली त्यांची ‘अशी ही टोलवाटोलवी’ पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कोणत्याही मैदानात एकाच वेळी आजूबाजूला इतर अनेक डाव चाललेले असतात, त्यातले काही चांगले रंगलेले असतात. इतर मुलांनी त्या मजेदार डावांना सोडून नव्याने आलेल्या मुलाकडे आणि त्याच्या झेंड्याकडे लक्ष देणे हेच बहुतेक वेळा कौतुकाचे असते. त्यामुळे त्याच्या टोलवाटोलवीला दहावीस अंक प्राप्त झाले तरी तो खुष होतो. आपला खेळ खेळत असतांनाच इतर मुलांनी सुरू केलेल्या डावात थोडी टोलवाटोलवी करायची मजाही त्याला घेता येते. हा खेळ पहायला येणाऱ्यांची संख्या मोजली जात असते. त्यात कोणता डाव कितीजणांनी पाहिला याची नोंद होत असते. जास्त टोलवाटोलवी न करतासुद्धा आपण ठेवलेली सुंदर वस्तू किंवा आपला थोडासा खेळ चार लोकांना पहावासा वाटला हे पाहिल्यावर त्याचे एक वेगळे समाधान मिळते.

या अद्भुत खेळातला गडी त्याच्या डावामधून कधीच ‘बाद’ होत नाही. यात कोणाचा त्रिफळा उडत नाही की झेल टिपला जात नाही. क्वचित कधी तो खेळाडू ‘जखमी म्हणून निवृत्त’ (रिटायर्ड हर्ट) होतो, पण बहुतेक वेळी दुसऱ्या कोणी तरी टोलवलेल्या चेंडूमुळे जखमी (हर्ट) झालेल्या मुलाला जास्तच चेव चढतो आणि तो त्वेषाने चौफेर फटकेबाजी करू लागतो. त्याच्या टोल्यांना प्रत्युत्तर मिळत जाते. त्यातून त्याची गुणसंख्या वाढतच जाते. काही वेळाने इतर सगळी मुले कंटाळून दुसरीकडे खेळायला गेल्यावर मात्र त्यालाही तिथे थांबायचे कारण उरत नाही. त्या डावामधून तोही निवृत्त (रिटायर) होतो आणि इतरांच्या डावात टोलवाटोलवी करायला जातो किंवा नवा डाव मांडायच्या तयारीला लागतो.

या खेळात संघ नसले तरी काही अनुभवी मुलांचे गट झालेले असतात, काही वात्रट लोक त्यांना ‘कंपू’ म्हणतात. खरे तर त्यांना सुद्धा अशा गटात सामील होण्याची इच्छा असते, पण ते नाही जमले तर मग ते त्यांच्याबद्दल खंवचटपणे बोलतात. अशा गटातली काही मित्रमंडळी मैदानावर जमल्यावर कोंडाळे करून उभी राहतात. त्यातल्या एकाने एखादी कुठलीही वस्तू आणून ठेवली तरी लगेच दुसरा त्याच्याकडे एक चेंडू टोलवतो, पहिल्याने त्या चेंडूला तिसऱ्याकडे टोलवले तर चौथा त्याला मध्येच अडवून पाचव्याकडे पाठवतो. तेवढ्यात तिसऱ्याने टोलवलेल्या चेंडूला दुसऱ्याने ‘कट्’ (हलकासा स्पर्श) करून चौथ्याकडे धाडलेले असते. अशा प्रकारची अनेक आवर्तने भराभर होत राहतात आणि त्या खेळाडूचे गुण बघता बघता वाढत जाऊन तो शतकवीर होतो. यातली टोलवाटोलवीही सामान्य प्रकारची नसून ती प्रेक्षणीय असते. झपाट्याने चाललेली त्यांची ‘अशी ही टोलवाटोलवी’ पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कधीकधी या गटातली मुले दुसऱ्या एकाद्या नवख्या मुलाच्या डावात सामील होतात आणि त्याला बाजूला सारून त्या मुलांची आपापसातली टोलवाटोलवी सुरू होते. हे चालले असतांनाही त्या मुलाची टोलेगुणसंख्या वाढायला लागते आणि आता आपलेही अर्धशतक किंवा शतक झळकणार अशी आशा त्याला वाटायला लागते. पण ती जशी अचानक सुरू होते तशीच जागच्या जागी थांबूनही जाते.

टोलवाटोलवीच्या या अद्भुत खेळाचे काही समान नियम असले तरी प्रत्येक मैदानाचे काही पोटनियम आणि परंपरा असतात. पण त्या खेळावर नियंत्रण ठेवणारे पंच, अंपायर, रेफरी वगैरे कोणी या मैदानावर सदोदित उपस्थित नसतात. जे कोणी असतात ते काही वेळा व्यवस्थापकांच्या कक्षांमध्ये डुलक्या घेत बसलेले असतात. एकाद्या मुलाने कोणताही नियम मोडला असे इतर खेळाडूंना वाटले तर ते आपले मत काळ्या रंगाचा चेंडू फटकारून त्यांच्या टोल्यामधूनच व्यक्त करतात. प्रत्येक मैदानातले काही खेळाडू या विषयातले तज्ज्ञ असतात आणि त्यांचे खेळाकडे बारीक लक्ष असते. ते खेळाडू लाल चेंडू टोलवून इशारा देतात किंवा काळा चेंडू टोलवून निषेध व्यक्त करतात. जरा जास्तच गोंगाट, गलबला वगैरे झाला तर पंच लोकही त्यात लक्ष घालतात. अपवादास्पद परिस्थितीत त्या मुलाला मैदान सोडून जाण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा त्याने ठेवलेली वस्तू जप्त केली जाऊ शकते. या खेळात कुठल्याही प्रकारचा आणि आकाराचा चेंडू आणला तरी चालत असले तरी कधी कधी एकादा मुलगा सडलेला टोमॅटो किंवा अंडेच चेंडू म्हणून घेऊन आला तर त्यामुळे मैदानाचे वातावरण खराब होते. अशा खेळाडूवर कारवाई केली जाते. पण असे सहसा घडत नाही. कोणाच्या बाबतीत घडलेच तर ते खेळाडू त्या मैदानावर पुन्हा येत नाहीत. पण इतर मैदानांवरचे नियम वेगळे असू शकतात. ते तिथे जाऊन रमतात.

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर अशी ही टोलवाटोलवी दिवसरात्र चाललेली असते. यात खेळणाऱ्यांना एक वेगळी मजा मिळते तशीच हा खेळ पाहणाऱ्यांनाही.

आपण सारे कोट्याधीश!….. होणार का नाही होणार!

निवडणुकांच्या मोसमात घोषणांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात त्याचा हा थोडासा उपहास.

मी हा लेख बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली लिहिला होता. त्या काळात अशी बातमी उडवण्यात आली होती की स्विस बँकांमध्ये १५०० अब्ज डॉलर इतके काळे धन भारतीयांच्या नावाने जमा आहे. या विषयावर सगळ्या माध्यमांवर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक लोकांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते.
“१.स्वीस बँकेतले हे पैसे काढून सर्व उधाऱ्या (जागतिक बँकेच्या कर्जासहीत) देऊन टाकाव्यात आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करावी.”
“२. हा पैसा जर भारतात आणला, समजा जर तो पैसा जनतेमध्ये वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा.”

शेकड्यांनी अब्ज बिब्ज आणि ते सुध्दा डॉलर्स ! (म्हणजे कित्त्त्ती रुपये होतील!) यासारख्या अगडबंब संख्या वाचूनच आपली तर मतीच गुंग होते. पण या चर्चेत भाग घेणाऱ्यांपैकी कोणीही वरील विधानांना मात्र आक्षेप घेतला नाही त्या अर्थी त्यातले आंकडे आणि हिशोब बरोबरच असणार असे समजायला हरकत नसावी. शिवाय भारताच्या एका थोर नेत्याने ही आंकडेवारी जाहीर सभेत सांगून ते पैसे ताबडतोब भारतात परत आणण्याची मागणी केल्याचे वृत्त वाचले. हे सद्गृहस्थ कोणत्याही क्षणी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी कधीचे सज्ज होऊन बसले आहेत. त्यामुळे ते बेजबाबदार विधाने किंवा अशक्यप्राय मागण्या करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. पंतप्रधान होताच लगेच याबाबत कारवाई करण्याचे वचनही त्यांनी जाहीरपणे जनतेला दिले. सत्यवचनी प्रभू श्रीरामचंद्र या चांगल्या कार्याला आपले आशीर्वाद देतील, त्यांच्या कृपाप्रसादाने हे नेताजी पंतप्रधानपद भूषवतील आणि दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील असे मला त्या वेळी वाटले. त्यानंतर एकदाचा स्विस बँकेतल्या पैशाचा ओघ भारताच्या दिशेने वहायला लागला की एकदम सगळीकडे आबादी आबाद होईल या विचाराने मी हरखून गेलो होतो.

रस्त्यावरल्या दुकानांच्या कांचेच्या खिडक्यांतून दिसणाऱ्या कांही छुटपुट वस्तू कधीपासून मला खिजवत आहेत, पण पैशांअभावी तूर्तास नको म्हणत मी आतापर्यंत त्या घेतल्या नव्हत्या. आता लवकरच आपल्या घरात माणशी रोकड लाखलाख रुपये येणार. ते पैसे आले की एका दमात त्या सगळ्या एकदाच्या घरात आणून टाकता येतील. याबद्दल आश्वस्त झाल्यानंतर “ये दिल माँगे मोअर” या उक्तीप्रमाणे आणखी काय काय मिळू शकते याचे स्वप्नरंजन सुरू झाले. जर स्विस बँकेतले पैसे जप्त करून इकडे आणता येत असतील तर दुबई किंवा मॉरिशससारख्या इतर ठिकाणी दडवलेली संपत्तीसुध्दा ताब्यात घेता येईल. तसे झाले तर आपल्याला किती धनप्राप्ती होऊ शकेल याची आकडेमोड करायला सुरुवात केली. हजारो अब्जावधी, म्हणजे खर्व, निखर्व का काय म्हणतात तसली ही प्रचंड संख्या आपल्याने पेलवली जात नसल्यामुळे बीजगणितातल्या पहिल्या धड्यात शिकल्याप्रमाणे ही संख्या ‘क्ष’ इतकी आहे असे मी समजून घेतले. कोणाला ‘क्ष’ हे जोडाक्षर पसंत नसेल, लिहिता येत नसेल किंवा उच्चार करायला कठीण वाटत असेल तर त्याने ती संख्या (स्वतः नव्हे) ‘ढ’ आहे असे मानले तरी तिच्यात कांही फरक पडत नाही.

जगातल्या कुठल्याही देशातली कुठलीही बँक लोकांनी दिलेले पैसे आपल्याकडे ठेवून घ्यायला नेहमीच तयार असते. ते काम फक्त स्विस बँकांनाच जमते अशातला भाग नाही. अल्बानियापासून झांबियापर्यंत (ए टू झेड्) शेकडो देश या जगात आहेत. कांही माणसे ऊठसूट मॉरिशस, दुबई किंवा सिंगापूरला जात येत असतात म्हणे. सगळ्या पैसेवाल्या लोकांनी स्विस एअरमध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या दिशांना जाण्याने इतरांपासून आपले तोंड लपवायलाही त्यांना सोयीचे पडत असेल. त्यामुळे स्विट्झरलंडशिवाय जगातल्या इतर देशातील बँकांतसुध्दा त्या लोकांनी बरेचसे पैसे ठेवलेले असण्याची दाट शक्यता वृत्तपत्रातूनच व्यक्त केली जात होती. यासंबंधी निश्चित माहितीच्या अभावी जरी फिप्टीफिफ्टी परसेंट धरले तरी भारतीय कुबेरांची जितकी माया स्विस बँकांत ठेवलेली आहे तितकी तरी इतर सर्व देशांत मिळून आहे असे मानले तर एकंदर ‘२ क्ष’ झाले.

धनवान लोक आपल्याकडचे सगळे पैसे कधीच रोकड्यात ठेवत नाहीत. अनेक प्रकाराने त्याची गुंतवणूक करतात. या लोकांनी सुध्दा परदेशात जमीनी, बागबगीचे, बंगले, हॉटेले, कारखाने, इतर इमारती, मोटारगाड्या, जहाजे, विमाने वगैरे घेऊन ठेवली असतीलच. कांही लोकांनी तर कुठकुठल्या महासागरांमधली अख्खी बेटे विकत घेऊन ठेवली आहेत असे ऐकले. पुन्हा एकदा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची परदेशातली एकंदर मालमत्ता ‘४ क्ष’ इतकी होईल. आज हातात पैसे आले की लगेच ते तिकडे नेऊन ठेवले किंवा कशात गुंतवले असे कोणालाही इतक्या सहजासहजी करता येणार नाही. परदेशाची वारी करण्यासाठी कांही वेळ लागतो आणि खर्च येतोच. त्यासाठी लागणाऱ्या वर्किंग कॅपिटलचा विचार करता या लोकांची परकीय चलनातील संपत्ती ‘५ क्ष’ इतकी असेल असा अंदाज करता येईल.

परदेशात इतकी अपार माया राखून ठेवणारे लोक आपल्या देशातसुध्दा रुबाबानेच राहणार. कांहींच्या घरातल्या मंडळींच्या अंगावर सोने, हिरे, माणके, मोती वगैरे नवरत्नांचे अलंकार असतील, तर कांही लोकांच्या मालकीचे बंगले, राजवाडे, फार्महाउसेस, मॉल्स वगैरे जागोजागी घेऊन ठेवलेले असणार आणि सुंदर व महागड्या हंड्या, झुंबरे, पुतळे, गालिचे वगैरेंनी त्या इमारती सुशोभित केलेल्या असतील. त्याशिवाय जमीनजुमला, बागबगीचे, बड्या कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स वगैरे असतीलच. पॅन कार्डाची भानगड सुरू झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या नांवाने त्यातल्या सगळ्या गोष्टी नसतील; त्यांचे आप्तेष्ट, विश्वासू नोकरचाकर, कुत्री, मांजरे, पोपट वगैरेंची नांवे रेकॉर्डवर असतील, पण कसल्या ना कसल्या रूपात ही संपत्ती अस्तित्वात असेलच. पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची स्वदेशातली संपत्ती धरून एकंदर मालमत्ता ‘१० क्ष’ होईल.

ही फक्त जे स्विस बँकांत खातेधारक आहेत अशा बड्या लोकांची गोष्ट झाली. बक्षिसी, खुषी, चिरीमिरी, वर्गणी, निधी, हप्ता वगैरे मार्गांनी सामान्य माणसांकडून ज्यांना लाभप्राप्ती होते ते सगळे लोक आपली कमाई थेट स्विस बँकांत नेऊन ठेवू शकत नाहीत. त्यातल्या हजारात फार फार तर एकादा कधीतरी एकदा परदेशी जाऊन आला असेल आणि तिथे खाते उघडून त्यात पैसे ठेवणारा तर दशसहस्रेषु एक सुध्दा मिळेल की नाही याची शंका आहे. या लोकांच्या मानाने बड्या लोकांची क्षमता दहा हजारपट आहे असे जरी धरले तरीसुध्दा जेवढी माया त्यांनी जमवली असेल तेवढी तरी या सर्व लहान सहान लोकांकडे मिळून असेलच. म्हणजे पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या सर्व लोकांनी गैरमार्गाने मिळवलेली एकंदर मालमत्ता ‘२० क्ष’ इतकी होईल. म्हणजेच या अवैध मार्गाने मिळवलेल्या धनाच्या हिमनगाचा ‘क्ष’ इतक्या आकाराचा भाग आता स्विस बँकेतल्या ठेवींच्या रूपात पाण्याच्या वर दिसू लागला असला तरी त्याचा अंतर्गत विस्तार ‘२०क्ष’ इतका असावा.

हा सगळा हिशोब पैसे घेणाऱ्या लोकांचा झाला. पण इतका पैसा त्यांना कोणी आणि कशासाठी दिला असेल? याचाही विचार करायला पाहिजे. कोणाही माणसाच्या मनात कधी वैराग्याची किंवा औदार्याची भावना जागृत झाली तर तो आपली जास्तीची संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करेल. जेंव्हा त्याला स्वतःला भरपूर लाभ होईल किंवा होण्याची खात्री वाटेल तेंव्हाच तो त्यातला कांही भाग त्या कामात सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाला तरी खाऊ घालेल. सर्वसामान्य माणसाला शंभर रुपये मिळाले तर खूष होऊन तो त्यातला एकाद दुसरा रुपया बक्षिसी देईल किंवा पाचदहा रुपये कमिशन कुरकुरत देईल. कशाचा तरी गैरफायदा उठवायचा असेल तर त्यातली टक्केवारी वाढून कदाचित वीसपंचवीसावर जात असेल. म्हणजेच जर पैसे घेणाऱ्या लोकांनी अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता ‘२० क्ष’ इतकी असेल तर ते पैसे देणाऱ्या लोकांना त्यातून ‘१०० क्ष’ इतका फायदा मिळाला असणार. ‘क्ष’चा अर्थ माणशी लाख रुपये असेल तर ‘१०० क्ष’ म्हणजे दर डोई कोटी रुपये इतका झाला. याचाच अर्थ आपला देश केवढा श्रीमंत आहे! अर्थातच हे सगळे धन आपल्या अर्थव्यवस्थेतच कुठे तरी असायला हवे, कदाचित असेलही. आपल्या चर्मचक्षूंना ते दिसून येत नाही, पण अर्थशास्त्रज्ञ ते शोधून काढू शकतील.
आता हरिदासाची कथा मूळ पदावर आणतो. आपले संभाव्य पंतप्रधान स्विस बँकेतून ‘क्ष’ इतकी संपत्ती परत आणणार होते. त्यांनी भारतातल्या सर्व जनतेला ते पैसे वाटले तर आपल्याला प्रत्येकी लाख लाख रुपये मिळाले असते. एकदा कां त्या खातेधारकांची नांवे समजली की आणखी एक पाऊल पुढे टाकून त्यांची ‘१० क्ष’ इतकी सारी बेहिशेबी संपत्ती जप्त करून ती जनतेमध्ये वाटली तर प्रत्येकी दहा दहा लक्ष रुपये मिळतील. लांच खाणे हा जसा गुन्हा आहे तसेच ती देणेसुध्दा गुन्हाच आहे. त्यामुळे ती देऊन ज्यांचे उखळ पांढरे झाले असेल त्यांची संपत्तीसुध्दा (‘१०० क्ष’ इतकी) सरकारने ताब्यात घेऊन लांच घेणारे आणि देणारे यांच्यासकट तमाम जनतेला ती सम प्रमाणात वाटली तरी प्रत्येकाच्या वाट्याला एक कोटी रुपये येतील. मग तर सर्वांची मज्जाच मज्जा ! तिथेही सगळे पैसे मिळाले नाहीत आणि फिफ्टीफिफ्टीचा नियम लावला तरी सुध्दा घरटी एक एक कोटी रुपये येतील.

इतका मोठा पांढरा पैसा विनासायास आणि बिनाटेन्शन मिळाला तर अपवादास्पद अशा कांही फार मोठ्या अब्जाधीश व्यक्ती वगळता बहुतेक सर्वसामान्य पैसेखाऊ लोकसुध्दा खूषच होतील आणि कदाचित आपले आचरण सुधारतीलसुध्दा. लांच देऊन कामे करवून घेणारे लोक कांही न देताच त्यांना मिळणाऱ्या लाभाने नक्कीच सुखावणार. इतर सर्वसामान्य लोकांना तर प्रत्यक्ष देवानेच छप्पर फाडून त्यांचेवर खैरात केल्याचा आनंद मिळेल. अशा रीतीने सर्व जनता सुखसागरात डुंबू लागेल. पण एक अडचण येण्याचा धोका मात्र दिसतो. आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोपऱ्यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर ते पोटासाठी कशाला काम करतील? ते कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत, ते कोणीच नसतील तर त्यांच्याविना आपली सारी कामे अडतील, आपल्याला खायला प्यायलाही कुठेच काही मिळणार नाही की कुठे जायची यायची सोय नसेल, घरात किंवा घराबाहेर आपल्याला कोणीच विचारणार नाही आणि आपण कोट्याधीश कशाला झालो? असे वाटायला लागेल.

या भीतीमुळे मी कुणालाही माझे गणित सांगितले नव्हते. पण निवडणुका झाल्यावर ते नेताजी सत्तेवर आलेच नाहीत. तो प्रश्नच आपोआप मिटल्यानंतर मी हळूच एका मित्राच्या कानात पुटपुटलो. त्यावर तो लगेच उद्गारला,”अरे तुला आता वेडा म्हणायचं कां खुळा म्हणायचं? (जाऊ द्या, हे नेहमीचेच आहे आणि हा त्याचा प्रॉब्लेम आहे.) तुझ्या त्या नेताजींनी स्विट्झर्लंडमधले पैसे परत आणू असं म्हंटलं असेल, पण ते तुला मला त्यातले लाख लाख रुपये देतो असे कांही म्हणाले होते कां? त्यांनी पैसे आणलेही असते तरी त्याच्या बातमीनेच महागाई तेवढी वाढली असती मात्र आणि त्याच्या झळा आपल्यालाच लागल्या असत्या. म्हणूनच कदाचित लोकांनी त्यांना निवडून आणलं नसेल!”

तळटीपः- या लेखात वर्तवलेले सगळे निव्वळ अंदाज आहेत, त्यामागे कोठलेही शास्त्र नाही. ते ज्या तर्कांच्या आधारावर केले आहेत ती कारणे वर वर पटण्यासारखी वाटली तरी त्यात कांही ढोबळ मूलभूत चुका आहेत. चाणाक्ष वाचक त्या दाखवून देतीलच.
————————
हा लेख मी २००९ साली लिहिला होता. त्यानंतर २०१४च्या निवडणुका झाल्या. तोपर्यंत दर डोई १ लाखाचा आकडाच फुगून चक्क १५ लाखांवर गेला होता आणि माझ्या गणितानुसार तो १५ कोटी झाला होता. त्या वेळी मात्र हा आकडा सांगणारा नेता (आणि त्याचा पक्ष) चक्क निवडणुका जिंकून सत्तेवर आला आणि त्याने आपल्या खाका वर केल्या. पण त्या दिवसापासून विरोधी पक्षाने मात्र १५ लाखांची मागणी धरून ठेवली आहे. या वर्षीच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या हिणवण्याला जास्तच धार आली आहे. शिवाय त्या विरोधकांनी आता दर महिन्याला बारा बारा हजार रुपये देण्याची घोषणाही केली आहे. अशा रीतीनेही लाखाचे बारा हजार होतील असे वाटले नव्हते. पंधरा लाखांची आशा तर सगळ्यांनी कधीच सोडली आहे, पण बारा हजाराच्या गळाला कोण कोण लागणार आहेत हे काळच ठरवेल.

पण हा चमत्कार घडलाच नाही

शाळेतल्या वरच्या वर्गांत गेल्यावर त्या वर्गांना लावलेल्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये मराठी साहित्यातले निवडक उतारे शिकायला मिळायचे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला किंवा त्याच्या खाली त्याच्या लेखकाचा किंवा कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला असायचा. त्यात त्यांच्या सुप्रसिद्ध साहित्यकृती आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती असायची. परीक्षेत गुण मिळवण्यासाठी ती महत्वाची असल्यामुळे आम्ही इतिहासातील सनावलीप्रमाणे पाठ करत असू. “अमक्या अमक्या साली तमक्या शहरात झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.” हे वाक्य त्यात हमखास असायचे. त्या संमेलनात नेमके काय घडत असेल याची सुतराम कल्पना मला त्या काळी सुद्धा नसायची आणि अजूनही ती फारशी स्पष्ट नाही. पण परिक्षेत मार्क मिळवण्यासाठी त्याची गरज नव्हतीच.

शाळा सुटल्यानंतर पुस्तके आणि मासिके यांचे थोडे फार वाचन होत राहिले असले तरी साहित्यिकांची चरित्रे वाचून ती लक्षात ठेवण्याची गरज उरली नव्हती. संमेलनाचे अध्यक्षपद हा तर त्यातला फारच गौण भाग असायचा. कामाचा आणि संसाराचा व्याप वाढल्यानंतर माझे अवांतर वाचनही कमी कमी होत गेले. ‘नेमेची येतो बघ पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी कुठे ना कुठे साहित्यसंमेलने भरायची. पण त्या नेमाने येणाऱ्या पावसाळ्याबद्दल सृष्टीचे कौतुक वाटण्यापेक्षा आता छत्र्या, रेनकोट, पावसाळी पादत्राणे वगैरे आणावी लागणार आणि सर्दीखोकला व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागणार याचीच या ‘बाळा’ला जास्त तीव्रतेने जाणीव होत असे. घरात येणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्राला या संमेलनाचे फारसे कौतुक असायचे नाही. त्यामुळे त्याच्या वृत्ताला त्यात महत्वाचे स्थान नसायचे.

दूरदर्शनवर त्या संमेलनाचा सविस्तर वृत्तांत येत असे, पण साहित्याशीच संबंध न राहिल्यामुळे मुद्दाम लक्षात ठेऊन तो कार्यक्रम लावावा आणि टीव्हीसमोर बसून राहून लक्ष देऊन तो पाहावा असे मात्र कधी वाटले नाही. चुकून दिसलाच तर पाहतही असे. गेल्या वर्षीपर्यंत कुठे कुठे ही संमेलने झाली आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण झाले ते त्या त्या वेळी समजलेही असले तरी त्यातले कांही माझ्या लक्षात राहिले नाही.

आमच्या घरातल्या कांही मंगलकार्यांच्या निमंत्रणपत्रिका आणि मंगलाष्टके वगळल्यास मराठी भाषेत माझे नांव कोठे छापले गेल्याचे मला स्मरत नाही. त्यामुळे एकाद्या साहित्यसंमेलनाचा सुगावा मला आधीपासून लागला असता आणि तिथे हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी मनात आला असता, तरी तिथे कोण म्हणून मी आपले नांव नोंदवायचे? त्यासाठी कोणती अर्हता लागते? त्याचे प्रमाणपत्र कोणाकडून मिळवावे लागेल? त्यासाठी किती तिकीट असते? ते दिवसागणिक असते की संपूर्ण संमेलनाचे एकत्र असते? असे अनेक प्रश्न मनात उठायचे. शिवाय ती जागा लातूर किंवा इंदूर सारखी दूर असली तर तिथे जाणेयेणे, राहणे, खाणे सगळे आलेच. आधीच तुटीच्या असलेल्या अंदाजपत्रकात या जादा खर्चाची तरतूद कशी करायची? त्यासाठी ऑफीसातून सुटी मागतांना कोणते कारण द्यायचे? वगैरे प्रश्न तर माझ्या आंवाक्याबाहेरचे होते. अगदी माझ्या घराजवळ ते अधिवेशन असते तरी ते लोक कांही आपणहून मला आमंत्रण द्यायला येणे शक्यच नव्हते. त्यामुळे वरील बहुतेक प्रश्न शिल्लक राहणारच होते.

२००९ साली त्या वर्षीचे अधिवेशन अमेरिकेत सॅन होजे नांवाच्या गांवात घ्यायचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठोले पाटील यांनी घेतला असे वर्तमानपत्रात वाचले तेंव्हा ही दोन्ही नांवे मी जन्मात पहिल्यांदाच ऐकली. अमेरिकेतली न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, लॉस एंजेलिस आदी कांही प्रमुख शहरे ऐकून ठाऊक होती. अल्फारेटा, बाल्टिमोर, पिटसबर्ग वगैरे कांही अनोळखी नांवे तिकडे जाऊन राहिलेल्या लोकांकडून ऐकली होती. तरीही त्या काळापर्यंत माझ्या यादीत सॅन होजे हे नांव आले नव्हते. त्याचप्रमाणे कौतिकराव ठोले पाटील या नांवाने प्रसिद्ध झालेली एकादी कथा, कादंबरी, नाटक वगैरे माझ्या अत्यल्प वाचनात तरी कधी आलेले नाही. इतर लोकांनीसुद्धा कदाचित हे नांव ऐकले नसावे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर गजहब सुरू केल्यामुळे त्यांचे नांव वर्तमानपत्रात पुनःपुन्हा छापून येत राहिले. पण पाटील महाशयांनी हा प्रश्न कमालीच्या कौशल्याने हाताळला. “इकडच्या लोकांना हवे असेल तर एक अधिवेशन महाराष्ट्रात घेऊ आणि तिकडच्यांना पाहिजे असेल तर एक तिकडे घेऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून टाकले. या दोन्ही जागांशी माझे कसलेही सोयरसुतक नव्हतेच.

आमच्या शेजारच्या ठमाकाकूंनी ही बातमी टीव्हीवर ऐकली आणि “अगंबाई, खरंच कां? बघा, मराठी माणसानं केवढी प्रगती केली? त्या राघोबादादाने अटकेपार झेंडा लावला होता, आता तर तो सातासमुद्राच्या पार जाणार!” वगैरे उद्गार काढले. पुढे जेंव्हा आमचेसुद्धा अमेरिकेला जायचे ठरले तेंव्हा साहजीकच त्यांनी विचारले, “म्हणजे तुम्ही पण ते अधिवेशन का काय भरतंय तिकडे चालला आहात कां?” त्यांना उगाच नाराज कशाला करायचे म्हणून मी हो ला हो म्हणून टाकले. पण एक सूक्ष्म असा किडा माझ्याही डोक्यात जन्माला आला. आम्ही सप्टेंबरमध्ये तिकडे जाणार होतो म्हणजे मार्चपर्यंत राहण्याची परवानगी मिळणार होती. हे अधिवेशन फेब्रूवारीत भरणार होते. तेंव्हा फिरत फिरत तिकडेही एकादी चक्कर मारून यायला हरकत नव्हती. या वेळी रजेचा प्रश्न नव्हता आणि अमेरिकेतले लोक बाकीची व्यवस्था करतीलच अशी आशा होती. संमेलनातल्या ग्रंथ दिंडीचा दांडा किंवा निशाण उचलून धरायला, नाही तर लोड, सतरंज्या घालायला आणि उचलायला त्यांनासुद्धा मनुष्यबळ लागणारच ना? तिकडे ते अत्यंत दुर्मिळ आहे. शिवाय श्रमाला मोल आहे, त्यामुळे असली थोडी शारीरिक कष्टाची कामे करायचीही माझी तयारी होती, कारण आपण ती कामे केली तरी तिथे आपल्याला कोण विचारणार आहे? त्यातून स्थानिक उत्साही कलाकार कमी पडले आणि आपल्यालाही व्यक्त होण्याची संधी मिळालीच तर कुठला लेख वाचायचा, कुठलं गाणं म्हणायचं किंवा कुणाची नक्कल करून दाखवायची याचा मी मनोमनी थोडासा शोध सुरू केला.

प्रत्यक्ष अमेरिकेत मुलाकडे जाऊन पोचल्यावर असे समजले की आम्ही अमेरिकेच्या पूर्व भागात रहात होतो आणि हे सॅन होजे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर होते. तिथे राहणाऱ्या एकाही गृहस्थाचे नावसुद्धा मला माहीत नव्हते. मग मी तिथे शिरण्याचा प्रयत्न तरी कसा करणार? रूडयार्ड किपलिंगने काढलेले “ईस्ट ईज ईस्ट अँड वेस्ट ईज वेस्ट, दे शॅल नेव्हर मीट.” हे उद्गार अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना लागू पडतात असेही तिकडे गेल्यावर समजले. एकमेकांना ओळखणारी मुंबईतली किती तरी मुले आता तिकडे दोन्ही बाजूंना आहेत. सदैव त्यांची फोनाफोनी चॅटिंग, ईमेल, स्क्रॅप्स वगैरे चाललेले असते. पण प्रत्यक्षात भेट मात्र कधी ते एकाच वेळी भारतात आले तर इकडेच घडते. अमेरिकेतला प्रवास काही त्यांना परवडत नाही. स्थानिक प्रवास, हॉटेलात राहणे वगैरे तिकडचे खर्च डॉलरमध्ये कमाई असणाऱ्या लोकांनाच भारी पडतात तर मी रुपये मोजून विकत घेतलेल्या डॉलरमध्ये ते कुठून भागणार? आता एकादा दैवी चमत्कार घडला तरच मला त्या साहित्यसंमेलनात जायला मिळणार होते. माझा जरी चमत्कारावर विश्वास नसला तरी काय झाले? तो कांही मला विचारून घडणार नव्हता. कुठे तरी कोणी तरी कसली तरी चावी फिरवेल आणि मला घरबसल्या तिकीटांसह सॅन होजेला येण्याचे आमंत्रण आणून देईल म्हणून वाट पाहत राहिलो.

पण हा चमत्कार काही घडलाच नाही

बाराचा महिमा आणि …. भाव

मुलाचा जन्म झाल्यापासून बारावे दिवशी त्याचे बारसे करतात. बाराव्या दिवशी त्याचे नामकरण करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही म्हणून त्या दिवशी बारशाचा समारंभ करतात असे म्हणतात. आतासारखी सगळ्या प्रकारच्या मुहूर्तांची माहिती देणारी जाडजूड छापील पंचांगे पूर्वीच्या काळात मिळत नसत. ज्योतिषविद्या जाणणाऱ्या कोणा विद्वानाने आधी बाळाची जन्मतिथी, वेळ, प्रहर वगैरे पाहून त्याची पत्रिका तयार करायची आणि त्यातली राहू, केतू, शनि, मंगळ वगैरेंची स्थाने पाहून त्याच्या कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा हे जरा अवघड असेल.

नुकतेच जन्माला आलेले बाळ फारच नाजुक असते आणि त्याची आईसुध्दा अशक्त झालेली असते. त्यांच्याकडे सगळे लक्ष पुरवून त्यांना संपूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते, शिवाय त्या वेळेस जंतुसंसर्गाचा धोका जास्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते टाळणे गरजेचे असते. अशा कारणांमुळे लगेच घरात कुठल्याच प्रकारच्या समारंभाची धांदल असणे उचित नसते. पूर्वीच्या काळात घरात नवीन मूल जन्माला आल्यास सोयर किंवा सोहेर पाळले जात असे. चार दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पाचवे दिवशी त्या बाळासाठी जिवतीमातेची पूजा केली जात असे. यावरूनच “अगदी सुरुवातीपासून असलेली गोष्ट” या अर्थाने ‘पाचवीला पूजलेली’ हा वाक्प्रचार पडला. त्यानंतर आणखी आठवडाभराने बारशाचा समारंभ केला जात असे. तोपर्यंत बहुतेक बाळे आणि बाळंतिणींच्या तब्येती सुरळीत झालेल्या असत. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकणारे डॉक्टर त्या काळात नसायचे. अनुभवी शहाण्या लोकांच्या विचारावरून बाराव्या दिवशी बारसे करण्याची प्रथा पडली. बारा हा आकडा अशा प्रकारे जन्मापासूनच आपल्या जीवनात येतो.

पुढे त्या बाळाचा दर महिन्याला वाढदिवस होत राहतो. असे बारा महिने झाल्यावर मासिक वाढदिवस थांबतात आणि वार्षिक सुरू होतात. आकाशातल्या सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणामधून वर्ष आणि महिने यांच्या द्वारे कालगणना करणे सुरू झाले. त्यामुळे एका वर्षात बारा महिने असणे हे सूर्यचंद्रांनी ठरवले. बहुधा त्यावरून प्रेरणा घेऊन आकाशामधील तारकापुंजांचे बारा गट करून आकाशगोलाची बारा राशींमध्ये विभागणी करण्यात आली. दिवस आणि रात्र यांचेही बारा बारा भाग करून दिवसाची विभागणी चोवीस तासांमध्ये केली गेली. एकपासून चोवीसपर्यंतचे इतके सगळे आकडे पटकन समजणे आणि लक्षात ठेवणे थोडे कठीण असल्यामुळे घड्याळांच्या डायलची रचना करतांना त्यात फक्त बाराच तास दाखवले गेले. दिवस आणि रात्र यांच्यातला फरक उघड असल्यामुळे घड्याळात पाहून अकरा किंवा चार वाजलेले दिसले तर त्या वेळी ते दिवसाचे की रात्रीचे हे सांगण्याची सहसा गरज नसते. आपले जीवन आजकाल घड्याळाशी बांधले गेले आहे आणि त्यातला बाराचा आकडा सारखा आपल्या नजरेसमोर येत राहतो.

माझ्या लहानपणी प्राथमिक शालेय शिक्षण हे अक्षरे आणि अंक यांच्या ओळखीपासून सुरू होऊन त्यातच बराच काळ रेंगाळत असे. आधी अक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेंमधून भाषा साधारणपणे समजायला लागल्यानंतर त्या भाषेतून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यासारखे विषय शिकवावेत असा विचार त्यात होता आणि माझ्या मते तो बरोबर होता. अक्षरओळखीमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः हे बारा स्वर आणि कखगघङ पासून षसहळक्षज्ञ पर्यंत सगळी व्यंजने शिकून झाल्यावर ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः ही बाराखडी आणि त्यानंतर किंवा तिच्या सोबतीने ख ग घ वगैरे इतर व्यंजनांच्या बाराखड्या गिरवल्या जात. निदान दोन वर्षे तरी मी स्लेटच्या पाटीवर सगळ्या बाराखड्या गिरवल्या आहेत. या बाराखड्या गिरवून गिरवून त्यातील प्रत्येक अक्षराचा आकार डोळ्यात बसला की कोठलाही शब्द पटकन वाचता किंवा लिहिता येतो. त्यानंतर अर्थ समजो वा न समजो, कुठलेही वाक्य, उतारा किंवा पान वाचायला अडचण येत नाही. बाराखड्यांच्या गिरवण्यामधून बारा हा शब्द आणि अंक मनावर खोलवर खोदला गेला.

आतासुद्धा मराठी किंवा हिंदी शिकतांना बाराखड्या शिकाव्या लागतातच, शिवाय शालेय शिक्षणात दहावी आणि बारावी हे मोठे टप्पे झाले आहेत. कॉलेजात पदार्पण करण्यासाठी बारावीमध्ये चांगले मार्क मिळणे आवश्यक असल्यामुळे मुलगा (किंवा मुलगी) बारावीला आला की घरातले सगळे वातावरण ढवळून निघते आणि बारा महिने तसे सुपरचार्ज्ड अवस्थेत राहते. तो बारावीचा विद्यार्थी म्हणजे घरातली सर्वात महत्वाची व्यक्ती बनून जाते आणि बाकी सगळ्यांनी आधी त्याची सोय पहायची असे ठरते.

इंग्रज लोकांना बारा हा आकडा फारच आवडत असावा. आता त्यांनीही दशमान पध्दत अंगिकारली असली तरी त्यांच्या पूर्वीच्या चलनात १२ पेन्स म्हणजे एक शिलिंग असायचा. त्यावरूनच त्यांनी भारतात सुरू केलेल्या चलनात सुध्दा बारा पै म्हणजे एक आणा असायचा. पै या नाण्याचा उपयोग माझ्या आजोबांच्या काळात होत असे. आता पै हे फक्त एक आडनाव राहिले आहे. लांबीरुंदी मोजण्यासाठी असलेल्या परिमाणात बारा इंचांचा एक फूट असतो. आता इंग्रजांनी मेट्रिक पध्दत स्वीकारली असली तरी अमेरिकन लोक अजूनही फूटपट्ट्या वापरतात. अजूनही सगळीकडे बारा नगांना एक डझन म्हणतात. होमिओपाथी या चिकित्सापध्दतीत बारा मुख्य क्षार असतात.

आपल्या पूर्वजांनाही बारा आकडा आवडत असे. देशभरात शंकराची लक्षावधी देवळे असतील, पण त्यातली बारा ज्योतीर्लिंगे प्रसिध्द आहेत आणि सर्वाधिक पवित्र व जागृत देवस्थाने मानली जातात. सूर्याच्या बारा नावांनी त्याला बारा सूर्यनमस्कार घालतात. गणपतीच्या बारा नावांची दोन स्तोत्रे आहेत. अनेक गावांची नावे बारा या शब्दापासून तयार झालेली आहेत, जसे महाराष्ट्रात बारामती, उत्तर भारतात बाराबंकी आणि काश्मीरात बारामुल्ला. आणखीही असतील, पण ही तीन गावे बातम्यांमध्ये येत असतात.

हिंदी आणि मराठी सिनेमामधल्या गाण्यांमध्येही बारा हा शब्द खुबीने वापरला गेला आहे. चलती का नाम गाडी या सिनेमातले किशोरकुमारचे पाँच रुपय्या बारा आना हे मधुबालाबरोबर मस्करी करतांना गायिलेले विनोदी गाणे एके काळी खूप गाजले होते. अलीकडच्या काळातल्या नटरंग सिनेमातल्या बेला शेंडेच्या जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा या गाण्याने धमाल उडवली होती.

ही सगळी बारा या अंकाचे महत्व दर्शवणारी उदाहरणे आहेत. पण बारा याच संख्येचा उपयोग निगेटिव्ह अर्थानेही केला जातो. एकाद्याचे वाटोळे होण्याला त्याचे बारा वाजले म्हणतात. व्यापार व्यवसायात एकाद्याला खूप मोठा तोटा झाला तर त्याने लाखाचे बारा हजार केले असे म्हणतात. एकाद्याची किंमत कमी झाली की तो बाराच्या भावात गेला. हा वाक्प्रचार कदाचित ‘चीपर बाय डझन Cheaper by dozen’ वरून आला असेल. ‘केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य येतसे फार’ असे सुभाषित आहे. पण या चातुर्याचा उपयोग कोणी इरसाल बनण्यात किंवा लबाडीमध्ये करत असेल तर तो (किंवा ती) बारा गावचे पाणी पिऊन आला (आली) आहे असे बोलले जाते.

या ना त्या कारणाने आणि अर्थाने बाराचा आकडा नेहमी आपल्या आसपास कुठे तरी फिरत असतो.
——————————————

नवी भर दि.१२-१२-२०२०

बारा अंकाची बहाद्दुरी

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू,शनि,मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत, गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळी भरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे पूर्वी १२ पयांचा एक आणा होत असे
इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच न ऐकणाऱ्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही ‘ काय बाराचा आहे हा!’ असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया…..

म्हणूनच
…..
पुण्याच्या वैशिष्टपूर्ण बेरकीपणासाठी RTO ने पुण्यास MH 12 हा नंबर बहाल केला आहे !
😀😀

************

आता वाजणार की हो बारा बारा बारा …………

(हा लेख दि.१२ डिसेंबर २०१२ च्या निमित्याने लिहिला होता.)

विसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणाऱ्या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणाऱ्या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांचे बँकांमधले खाते बंद पडेल आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. सर्वात भयानक बातमी अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण बाहेर निघून ते भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना वायटूकेफ्रेंडली किंवा वायटूकेकंप्लायंट बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही. पण आयटीवाल्या कंपन्यांच्या हातातल्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या मात्र त्याबरोबर एकदम नाहीशा झाल्या आणि त्यांच्याकडल्या बाकीच्या सगळ्या कोंबड्यांचे भाव धडाधडा कोसळू लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले ते बराच काळ राहिले.

त्यानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटांनी ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, त्याला फारसे महत्व मिळाले नाही. त्यानंतर दर वर्षी ०२:०२…, ०३:०३… वगैरे विशेष वेळा येत राहिल्या. त्या सगळ्या रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातच माणसाने बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८… ०९:०९… वगैरे क्षण येऊन गेले. मागील वर्षी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. आता १२-१२-१२ हा दिवस उजाडणार असून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ वाजणार आहेत. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ही या शतकातली शेवटची संधी आहे. इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल.

गेली अकरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठल्याशा दिवसापासून वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या अकरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र मानणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

आता या वर्षी या शतकातले १२:१२:१२:१२:१२:१२ असे सहावार बारा वाजणार आहेत. तेंव्हासुध्दा त्यामुळे काही विशेष घडण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही. पहायला गेल्यास बारा वाजणे या वाक्प्रचाराला मराठी भाषेत (आणि कदाचित हिंदीतसुध्दा) वेगळा खास अर्थ आहे. दोन हजार बारा या वर्षात त्या अर्थाने अनेकजणांचे बारा वाजून गेले. भारतीय क्रिकेट टीम त्या बाबतीत आघाडीवर दिसते. इंडियन ऑलिंपिक समिती, बॉक्सिंग फेडरेशन वगैरेंचेही असेच हाल झाले आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली म्हणून संबंधित लोकांचे बारा वाजले म्हणावे तर त्यासाठी सुरू झालेल्या लढ्यातच फाटाफूट पडून त्याचेही बारा वाजल्यागत झाले आहे. हे वर्ष संपेपर्यंत उरलेल्या तीन आठवड्यात आणखी कोणाकोणाचे काय काय होणार हे पहायचे आहे. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच आता बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत आहेत. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, आता हे दैवी सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले इंकांचे तथाकथित भविष्यही काही दिवसांनी टाईमबार्ड होईल.
…. आणि अगदी तसेच झालेसुद्धा.
ते काही का असो, परवा येणा-या बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटे आणि बारा सेकंद हा फक्त त्यातल्या संख्येच्या दृष्टीने विलक्षण असा क्षण तुम्ही आपल्या घड्याळात पाहून टिपू शकता आणि मनातल्या मनात त्यातला काल्पनिक थरार अनुभवू शकता. या क्षणी जन्माला आलेला एकादा महाभाग त्यामुळे अचाट सामर्थ्यवान झाला आणि तो सगळ्या जगाचे बारा वाजवणार आहे असे भविष्य कदाचित उद्या कोणी सांगेल आणि भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतील. पण त्याचा पराक्रम किंवा ते भविष्य खोटे ठरलेले पहायला खूप वर्षे वाट पहावी लागेल.