‘निवडक आनंदघन’ या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये मी मुळातल्या ‘आनंदघन’ या ब्लॉगमधले माझेच लेख थोडे संपादन करून पुनर्प्रकाशित करत आलो आहे. आज मी माझ्या त्या ब्लॉगसंबंधित एक जुना लेख देत आहे. माझ्या लेखनातल्या भूमिकेचे विवेचन मी या लेखात केले आहे. त्यात गेल्या आठ वर्षात फारसा बदल झालेला नसल्यामुळे मी आजवर याच भूमिकेत लेखन करत आलो आहे.
मी ‘आनंदघन’ हा ब्लॉग २००६ साली सुरू केला होता. काही वर्षे त्यात लेखन करत गेल्यानंतर त्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ लागली. लोकसत्ता या प्रमुख दैनिकामध्ये आठ वर्षांपूर्वी एका स्फुट लेखात माझ्या या ब्लॉगवर लिहून आले होते. ‘वाचावे नेटके’ या मथळ्याखाली दर सोमवारच्या लोकसत्तेमध्ये मराठी ब्लॉग्सची ओळख करून दिली जात होती. दि. ३ सप्टेंबर २०१२ च्या अंकात माझ्या या ब्लॉगबद्दल छापून आले होते. माझ्या पहिल्या पाच सहा वर्षांमधील लेखनाचा एक मार्मिक असा आढावाच त्यांनी या सदरात घेतला आहे. त्या काळात ‘उपक्रम’ या संकेतस्थळावर माझा बराच सहभाग होत असे. मी तिथे दिलेले लेख आणि प्रतिसाद यांचाही उल्लेख या लोकसत्तामधील लेखात आला आहे. अशा प्रकारे एका आघाडीच्या वृत्तपत्रात माझ्या लेखनाबद्दल लिहून आलेले वाचून माझ्या अंगावर मूठभर मांस चढले हे सांगायला संकोच कशाला? या लेखाचे लेखक अभिनवगुप्त यांचा मी अत्यंत आभारी आहे. वाचकांच्या सोयीसाठी हा लेख मी खाली उद्धृत केला आहे. तसेच त्यावर मला काय वाटले हे मी पुढील भागात व्यक्त केले आहे.
सोमवार, ३ सप्टेंबर २०१२
वाचावे नेट-के : अनाग्रही, सभ्य भूमिका
‘मला विचारांचा त्रास वगैरे होत नाही. एखाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वत: विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे.’ वरवर पाहता साधे वाटणारे हे वाक्य, आनंद घारे यांनी ‘उपक्रम’ या चर्चास्थळावर २०११च्या नोव्हेंबरात लिहिले होते. ‘आनंदघन’ या ब्लॉगवर घारे यांचे भरपूर लिखाण चालू असते. मात्र अशी काही वाक्ये, घारे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लिखाणामागचे हेतू स्पष्ट होण्यास उपयोगी ठरतील. वर दिलेले विधान उपयोगी कसे, ते पुढे पाहू. आधी आपल्या वाचनीयतेच्या शोधाबद्दल या ब्लॉगसंदर्भात काही स्पष्टीकरणे गरजेची आहेत.
घारे यांच्या ब्लॉगवरील ‘वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेखमालिका’ हा सर्वाधिक वाचनीय भाग. मात्र, अन्य प्रकारच्या नोंदी ‘सामान्य’ ठरवून पुढे जाता येणार नाही, इतपत वेगळेपण या ब्लॉगमध्ये आहे. आत्मचरित्र उलगडेल, अशा प्रकारे लिहिलेल्या जवळपास ४० टक्के नोंदी घारे यांच्या ब्लॉगवर आहेत. जमखंडी येथे जन्म व शिक्षण, कॉलेज शिक्षणासाठी गाव सोडणे, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा क्षेत्रात नोकरी, त्यादरम्यान ‘कॉलनी’त वास्तव्य आणि उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुले, प्रवासाची आवड भरपूर प्रमाणात भागवता येईल इतका सुखवस्तू निवृत्तिकाळ अशा अगदी व्यक्तिगत गोष्टी वाचकाला कळतात, पण त्या एकरेषीय पद्धतीने नव्हे. स्वत:च्या काकांबद्दल लिहिताना उच्चशिक्षणाचा उल्लेख घारे करतात, तर होळीबद्दल लिहिताना कॉलनीचा. तारापूरच्या अणुऊर्जा केंद्रात महत्त्वाची जबाबदारी घारे पार पाडत होते, हे वाचकाला कळते ते ‘अणुऊर्जा’ या विषयावर त्यांनी जी माहितीपर मालिका लिहिली आहे, त्यातून! असा- म्हणजे आत्मचरित्राच्या उपबोधाचा- परिणाम साधणारे लिखाण कित्येक मराठी ब्लॉगलेखकांनी आजवर केले आहे.
याखेरीज ‘स्व-समाजवर्णन’ हा शक्यतो खुसखुशीत शैलीत लिहिण्याचा प्रकारही घारे यांनी हाताळला आहे. या दोन्ही प्रकारच्या लिखाणांतून माणूस स्पष्ट होत जातो- म्हणजे अमुक एका समाजातली त्याने स्वत:कडे घेतलेली भूमिका काय आहे आणि ती कितपत खरी आहे, हे कळते. अशा लिखाणाला ब्लॉगवर स्थान देणारे ब्लॉगलेखक वा लेखिका जेव्हा काही मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांनी (त्याआधी/ वारंवार) ब्लॉगवरच रेखलेले आत्मचित्र वाचकासमोर असतेच. हे अनेकदा लेखकांनाही माहीत असते आणि ‘आपण बुवा असे’ असे गृहीतक त्यांच्या लिखाणामागे असल्याचे वाचकही समजून घेतात. यातून पुढे ‘नायकत्वा’ची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. ‘होय, मी तेव्हाही म्हटले होते आणि आजही म्हणणारच’ आदी सूर अशा नायकत्ववादी ब्लॉगलेखकांच्या लिखाणातून उघड होऊ लागतात. हे असे सूर अंतिमत: कर्कशच ठरणार, याचे भान पाळले गेले नाही, तर ब्लॉगच्या वाचनीयतेवर परिणाम होतो. हे झाले इतरांबद्दल. हा धोका घारे यांच्या लिखाणाला नाही, याचे कारण त्यांचे लिखाण मूलत: अनाग्रही आहे.
अनाग्रहीपणा म्हणजे गुळमुळीतपणा, असा अर्थाचा गोंधळ घारे यांच्या ब्लॉगबाबत होऊ नये. आग्रह हे पसंती आणि नापसंती यांच्याशी संबंधित असतात. गुळमुळीतपणामध्ये पसंती कशाला आणि नापसंती कशाबद्दल हे अस्पष्टच ठेवण्याची सोय असते. पसंती-नापसंतीची स्पष्टता असली की त्यापुढे जाऊन नापसंतीला झोडपणे वा पसंतीला सर्वोच्च मानणे ही ‘आग्रहा’ची पुढली पायरी सहज गाठता येते.. ती पायरी टाळणारे, ते अनाग्रही. घारे अनाग्रही कसे, याचे एक उदाहरण त्यांनी ‘उपक्रम’वरील चर्चेला उत्तर देताना आपसूकच समोर ठेवले आहे.
‘पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे’ हा घारे यांच्या ‘शिकण्याचा भाग’ असतो, असे ते म्हणतात. ‘पटेल’ आणि ‘बाकीचे’, यात पसंती-नापसंती आलीच, पण हा पसंती-निर्णय अंतिम नाही, तो ‘शिकण्याचा भाग’ आहे.
ब्लॉगलिखाणाची घारे यांची प्रक्रिया २००६ पासून बदलत गेलेली दिसेल. गेल्या तीन-चार वर्षांत, हा ‘शिकण्याचा भाग’ त्यांच्या लेखनप्रक्रियेतही आलेला आहे. घारे लिहितात तो मजकूर एखाद्या चर्चास्थळावरही चर्चेला खुला ठेवतात. चर्चेची सभ्यता पाळतात आणि क्वचित, ‘पटेल तेवढे घ्यावे’ या शिरस्त्याने ब्लॉगवरच्या लिखाणात बदलही करतात. एखाद्या लेखाच्या शीर्षकातच ‘सुधारित’ असा उल्लेख या ब्लॉगवर दिसतो, तोही याचमुळे. बँकेच्या एटीएम मशीनने कार्ड ‘खाऊन टाकल्या’वरचा अनुभव, यावरची घारे यांची नोंद केवळ आत्मरत न होता माहितीपर झाली आहे, तीही चर्चास्थळावर घडलेल्या संवादामुळे.
घारे यांनी कायकाय लिहिले, हे त्यांच्या ब्लॉगवर जाऊन पाहाता येते. (‘वाचावे नेट-के’चा परीघ ‘ब्लॉगचा परिचय आणि प्रसिद्धी’ एवढाच नसल्याने-) इथे वैपुल्य आणि सातत्य याबद्दलच्या एका मुद्दय़ाची चर्चा प्रस्तुत ठरावी. ‘मी लिहिलेली इतकी पुस्तके छापली गेलीत’ अशी संख्या सांगणाऱ्यांकडे जरा संशयाने पाहण्याचा जो दृष्टिकोन मराठी वाचकांपैकी सुजाण समाजाने काळानुरूप विकसित केला आहे, तो ब्लॉगलिखाणाची चर्चा करताना जरा बाजूला ठेवण्यास हरकत नाही, अशी एक विधायक शक्यता घारे यांचा ब्लॉग दाखवतो. घारे यांचे ब्लॉगलिखाण अभ्यासूपणे पाहणे त्यामुळे महत्त्वाचे ठरते.
उत्कृष्ट वैज्ञानिकाचा पुरस्कार स्वत:ला मिळाल्याचे घारे यांनी ब्लॉगच्या परिचय-समासातच, कुठल्याही पानावर दिसेल अशा ठिकाणी नमूद केले आहे. अशा व्यक्तीने ‘ईश्वरी कृपा, पूर्वपुण्याई, सुदैव..’ आदी संकल्पनांबद्दल सकारात्मक सूर लावावा, हे अनेकांना पटणे-पचणे अशक्य होते. तसेच एका चर्चेत झाले. परगावी गेले असता रेल्वे स्थानकात शुद्ध हरपण्याइतका उलटय़ा-जुलाबांचा त्रास होणे आणि त्यापुढे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जावे लागून खडखडीत बरे होणे, अशा अनुभवानंतर हा सकारात्मक सूर घारे यांनी लावला. त्या सुराची होणारी चर्चा मान्य केली, पण ‘सोडून देणे’ हा पर्याय इथे बलवत्तर ठरला. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची तात्त्विक किंवा आधुनिक तत्त्वज्ञानाधारित चर्चा घारे यांनी इथे केलेली नाही. त्यांना ती करायची आहेच, असेही नव्हे.
माणसाला हा अनुभव या विचारांकडे नेऊ शकतो, एवढेच त्यांना म्हणायचे आहे. इथे पुन्हा, त्यांच्या अनाग्रही भूमिकेचा पैलू दिसतो. अनुभव आणि त्यांचे परिणाम, अशा अनुभवसिद्ध जगण्यात पुन्हा नव्याने येणारे अनुभव आणि त्या नव्या अनुभवांचे परिणाम कोणते होऊ शकतात, याचा वेध घेण्यासाठी इतरांनाही आवाहन, हे घारे यांच्या एकंदर ब्लॉगलिखाणातील महत्त्वाचे संवादसूत्र आहे. त्यांचा ब्लॉग वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेख-मालिकांसाठी शिफारसपात्र ठरतोच ठरतो, परंतु ब्लॉगलेखक म्हणून जो सभ्यपणा घारे पाळतात आणि वादांच्या प्रसंगांमध्येही टिकवून ठेवतात, तो त्यांचा विशेष अन्य ब्लॉगलेखकांना अनुकरणीय वाटावा, असा आहे.
तात्पर्य हे की, ब्लॉगलिखाणात अनुस्यूतच- अपेक्षितच- असलेले सातत्य विचारात घेता आपण कोणत्या विषयांवर लिहितो आणि किती शैलीदार लिहितो याखेरीज आपण कोणत्या भूमिकेतून लिहितो याचाही विचार सर्वच ब्लॉगलेखकांनी केल्यास मराठी ब्लॉगांची वाचनीयता वाढेल.
अभिनवगुप्त
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता: http://anandghan.blogspot.in
लोकसत्ता वृत्तपत्राच्या सौजन्याने
अनाग्रही सभ्य भूमिका
लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ‘वाचावे नेटके’ या सदरात माझ्या या ब्लॉगची ओळख करून देतांना त्या लेखाचा मथळा ‘अनाग्रही सभ्य भूमिका’ असा दिला आहे. श्री.अभिनवगुप्त यांनी माझ्या लेखनामागील भूमिका इतक्या नेमक्या शब्दात पकडलेली पाहून मला त्याची थोडी गंमत आणि कौतुक वाटले. ‘अनाग्रह’ आणि ‘सभ्यपणा’ हा माझ्या नेहमीच्या वागण्यातला भाग असल्यामुळे माझ्या लेखनात तो आपोआप उतरला असावा आणि त्यातला स्थायी भाव झाला असावा. मला ते कधी वेगळे जाणवले नाही की ब्लॉग लिहीत असतांना मी मुद्दाम ठरवून ही भूमिका घेतलेली नाही. ती ठळकपणे उठून दिसेल एवढी महत्वाचीही वाटली नव्हती. त्यामुळे हा मथळा वाचतांना मला आधी किंचित नवल वाटले. अर्थातच या अभिप्रायाशी मी सहमत आहे. ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर कुणाचे कौतुक करण्याचा अधिकार मला आपोआप मिळाला आहे असे मला वाटते.
“जे जे आपणासी ठावे ते सर्वाशी सांगावे” आणि “मनात येईल ते लिहून मोकळे व्हावे” या दोन खांबांच्या मुख्य आधारावर माझे ब्लॉगवरील लिखाण होत असते. त्याची वाचनीयता वाढवण्याच्या दृष्टीने रंजकता, खुसखुशीतपणा वगैरेंचे टेकू मी त्याला देत असतो. आपल्याकडे असलेली माहिती इतरांना सांगत असतांना त्यांना ती समजणे महत्वाचे असते. माझे ब्लॉग वाचणारे वाचक भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या स्तरावर वावरणारे असतील, किंवा तसे असावेत असे गृहीत धरून सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना कळावे इतपत सोप्या शब्दात ती माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो. ती माहिती शक्य तेवढी अचूक आणि परिपूर्ण असणे महत्वाचे असल्यामुळे ती पडताळून पाहतो. याला मर्यादा असल्यामुळे माझेकडून काही चुका होतात, उणीवा राहतात. सुजाण वाचकांनी त्या दाखवून दिल्या तर मी त्यांचे आभार मानून आपल्या लेखात दुरुस्ती करणेच योग्य असते. एकाद्या गृहस्थाचे नाव ‘पाटील’ आहे असे कोणाकडून कळले म्हणून मी त्याला त्या नावाने संबोधले आणि तो ‘पटेल’ निघाला तरीसुध्दा तो ‘पाटील’च आहे असे आग्रह धरणे हास्यास्पद ठरेल. अशा वेळी मला जे बरोबर वाटते त्याचा आग्रह मी धरतो, पण माझेच सांगणे बरोबर होते असा हट्ट धरत नाही.
‘मनात येईल ते’ लिहितांना त्यात माझे विचार आणि मते येतात. माझ्यावर झालेले संस्कार, माझे शिक्षण, वाचन, श्रवण, मनन. चिंतन अनुभव वगैरेंच्या मिश्रणातून ते उद्भवतात. या गोष्टी प्रत्येक माणसाच्या बाबतीत निराळ्या असल्याकारणाने प्रत्येकाचे विचार आणि मते वेगळी असू शकतात. आपली मते दुसऱ्याला पटली तर चांगलेच आहे, पण पटली नाहीत तरी त्याच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे असे मी समजतो. यालाच लोकसत्तेच्या स्तंभलेखकाने ‘अनाग्रह’ म्हंटले असावे. आपल्याला न पटलेल्या निराळ्या मतांची टर उडवणे किंवा त्यांना तुच्छ लेखणे असे प्रकार माझ्या लेखनात नसतात. याला बहुधा ‘सभ्य भूमिका’ असे म्हंटले असावे. कोणाचेही विचार आणि मते ही इतर अनेक गोष्टींवर आधारलेली असल्यामुळे ती जन्मभर एकसारखीच रहावीत असे असणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, माणसाचे ज्ञान आणि अनुभव यात रोज नवनवी भर पडत असते आणि विचारसरणीवर त्याचा प्रभाव पडणे आणि त्या विषयावरील मत बदलणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मी मांडलेली मते त्या वेळच्या परिस्थितीत तशी असतात आणि मी ती ठामपणे मांडतो. त्यात गुळमुळीतपणा नसतो हे लेखकाने नमूद केले आहे. ती मते त्या क्षणापर्यंतच्या अनुभवावर आधारलेली असल्यामुळे एकाद्या अनुभवाने ती पार उलटी होणार नाहीत. अनुभवांची गोळाबेरीज बदलायला वेळ लागतो. ही प्रक्रिया संथ असते. त्यामुळे त्यात बऱ्यापैकी सातत्य असते. माझ्या बालपणी मी कोणत्या वातावरणात रहात होतो आणि त्या काळात माझ्या समजुती व विचार कसे होते आणि त्यात कसा आणि किती बदल होत गेला हे सांगणे हा माझा आवडता छंद आहे याची प्रचीती या ब्लॉगवरील अनेक लेखांमध्ये दिसेल.
आणखी एक गोष्ट अशी आहे की कोठल्याही गोष्टीमागे असलेला कार्यकारणभाव आपण एका मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तिखट व मसालेदार खाद्यपदार्थ किंवा उत्तेजक द्रवांच्या सेवनामुळे जठरामध्ये जास्त प्रमाणात आम्ल जमते आणि त्यामुळे जळजळ (हायपर अॅसिडिटी) होते हे डॉक्टरांकडून समजते, कोणती काळजी घेतली किंवा औषध घेतले तर कमी प्रमाणात आम्ल तयार होईल, तसेच कोणत्या औषधाने त्या आम्लाचे शमन होईल हे समजण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो, शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यास कोणत्या ग्रंथी हे काम करतात हे समजेल, पण मुळात या ग्रंथींची अंतर्गत रचना कशी असते आणि कोणत्या अन्नपदार्थामधून हे आम्ल तयार करण्याचे काम कोणत्या रासायनिक क्रियेने आणि का होते, ते कमी जास्त प्रमाणात कसे होते हे समजाऊन सांगणारा माणूस मला तरी अद्याप भेटलेला नाही. शरीर ठणठणीत आणि मन स्वस्थ असतांना आपली बुध्दी ज्या मर्यादेपर्यंत काम करते तिथपर्यंतसुध्दा काही वेळा आपण पोचू शकत नाही. त्या वेळी काही शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे आपली बुध्दी व विचारशक्ती क्षीण झालेली असल्यामुळे वेगळे विचार मनात येतात. असे अनुभव सुध्दा येतात आणि ते मान्य करून त्यापासून बोध घेणे शहाणपणाचे असते.
श्री.अनुभव गुप्त यांनी लिहिलेल्या लेखाच्या सुरुवातीलाच माझे एक वाक्य दिले आहे. हे वाक्य मी कोणत्या संदर्भात लिहिले होते हे समजून घेणे थोडे महत्वाचे आहे. माझ्यावर येऊन गेलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दल मी एक सविस्तर लेख लिहिला होता. त्याचा शेवट खाली दिलेल्या वाक्याने केला होता.
“परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!”
हा लेख मी उपक्रम या संस्थळावरसुध्दा प्रकाशित केला होता. त्यावर अनेक उलटसुलट प्रतिसाद आले. त्यातल्या एका मित्राने चांगले विश्लेषण करून झाल्यानंतर अखेर असे वाक्य लिहिले होते, “तुमच्या मनात डोकावणार्या विचाराने रंजन होत असेल, तर जरूर डोकावू द्यावा. विचाराने त्रास होत असेल, तर त्या विचाराला थारा देऊ नका.”
त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती, “मला विचारांचा त्रास वगैरे काही होत नाही . एकाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वतः विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेऊन घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे आणि ते जन्मभर चालतच असते. अशा एका घटनेमुळे माझे वागणे बदलणार नाही.”
एका संभाषणात सहजपणे आलेले हे वाक्य लेखकाला मार्गप्रदर्शक वाटले आणि त्या वाक्याला त्याने आपल्या लेखाच्या अग्रस्थानी जागा दिली यात त्याची गुणग्राहकता दिसून येते. पुन्हा एकदा त्याचे आभार.
. . . . . . . . . आनंद घारे
Filed under: Uncategorized | Leave a comment »