मैसूरमधील देवालये – भाग २

चामुंडा हिलवर देवीच्या मंदिरापासून थोडे दूर अंतरावर एक प्रचंड आकाराची नंदीची मूर्ती आहे. देवीच्या देवळाकडे जाणारा अर्धापाऊण रस्ता चढून गेल्यानंतर मुख्य रस्त्याला एक फाटा फुटतो तो या नंदीपर्यंत जातो. नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे. आपल्याला नेहमी तो शंकराच्या पिंडीच्या समोर बसलेला पहायला मिळतो. ब-याचशा शंकराच्या देवळात गाभा-यातील पिंडीपर्यंत पोंचण्यापूर्वी सभामंटपातल्या नंदीला नमस्कार करूनच भक्त पुढे जातात. चामुंडा हिलवर मात्र फक्त महाकाय नंदीच तेवढा उघड्यावर बसवलेला आहे. त्याच्या आसपास दोन तीन लहान लहान घुमट्या आहेत, पण शंकराची मोठी पिंडी मला त्यात कोठे ठळकपणे तरी दिसली नाही. या नंदीच्या आकाराएवढा प्रचंड शिलाखंड बाहेरून उचलून आणून या डोंगरावर चढवला जाणे खूपच कठीण दिसते. टेकडीच्याच एकाद्या सुळक्याला छिन्नीने फोडून त्यातून हा नंदी कोरून काढला असावा असे वाटते. पण आजूबाजूच्या चौथ-याच्या दगडाचा रंग वेगळा दिसतो. ” ही जागा संरक्षित आहे, इथे कोणी कांही केल्यास भारतीय दंडविधानाच्या अमक्या तमक्या कलमाखाली कडक कारवाई करण्यात येईल.” असे धमकी देणारे फलक जिकडे तिकडे तत्परतेने लावणारे आपले पुरातत्व खाते त्या जागेवरील वास्तू किंवा कलाकृतीविषयी अधिकृत माहिती स्पष्ट शब्दात देण्यासाठी तेवढे तत्पर नसते. उगाच त्यावरून वादविवाद, मोर्चे, निषेध वगैरे व्हायला नकोत म्हणूनही कदाचित हे काम करायला कोणी धजावत नसेल. त्यामुळे ही नंदीची मूर्ती कोणी आणि कधी घडवली याबद्दल कांही माहिती समजली नाहीच.

काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती अत्यंत प्रमाणबध्द आणि रेखीव आहे. नंदीच्या गळ्यातील व अंगाखांद्यावरील अलंकारांचे सारे तपशील कौशल्यपूर्वक कोरीव कामाने त्यातल्या बारकायांसह दाखवले आहेत. त्याच्या पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा ही मूर्ती घडवतांनाच आणला की वर्षानुवर्षे तेलाने माखून आणला आहे ते समजत नाही. चामुंडामातेचे ओझरते दर्शन दुरूनच घ्यावे लागते, इथे मात्र आपण नंदीच्या अगदी जवळ जाऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचे आणि त्याच्यासह आपले फोटो काढू शकतो. कोणीही त्यात आडकाठी आणत नाही.

उत्तर भारत व महाराष्ट्राच्या तुलनेने दक्षिण भारतात चांगल्या देवळांची संख्या थोडी जास्तच दिसते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचनेमुळे ती इतर इमारतींपेक्षा पटकन वेगळी दिसूनही येतात. मीनाक्षी आणि चिदंबरम यासारख्या मोठ्या मंदिरांची प्रचंड गोपुरे जगप्रसिध्द आहेत. चामुंडीमातेच्या देवळाचे गोपुरसुध्दा चांगले उंच आहे. पण मैसूर शहरातल्या मध्यम आकाराच्या अनेक अप्रसिध्द देवालयांच्या प्रवेशद्वारावर देखील दोन तीन मजल्यांइतकी उंच गोपुरे बांधलेली दिसतात. अगदी लहान देवळाचे प्रवेशद्वारसुध्दा कलाकुसर आणि छोट्या मूर्ती यांनी सजवलेले असते आणि त्यावरून कोठलेही मंदिर बाहेरून ओळखता येते. याशिवाय अनेक जागी ते कोणत्या देवाचे आहे हे लिहिलेला फलक त्या जागी लावलेला दिसला.

देवांच्या नांवापुढे स्वामी हा शब्द लावण्याची इकडे प्रथा आहे. मारुतीच्या देवळावर आंजनेयस्वामी लिहिलेले असते तर गणेशाच्या मंदिरावर विनायकस्वामी. मैसूरजवळ श्रीरंगपट्टण इथे श्रीरंगनाथस्वामींचे पुरातन मंदिर आहे तेसुध्दा प्रसिध्द आहे. मैसूरला मी रहात असलेल्या घराजवळ एक सुंदर शिवमंदिर आहे त्यावर श्रीचंद्रमौलेश्वरस्वामी असा फलक आहे. बहुतेक देवांना अशा मोठ्या नांवाने संबोधिले जाते. पांडुरंगस्वामी नांवाचे एक विठ्ठलमंदिरही दिसले. भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचीच उपासना अधिककरून केली जाते. इतर अवतारांची मंदिरे सहसा दिसत नाहीत. पण मैसूर शहरात श्रीवराहस्वामी आणि श्रीलक्ष्मीनरसिंहस्वामी यांची वेगवेगळी मंदिरे आहेत. नरसिंहाअवताराच्या वेळी ते खांबामधून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादाला आशीर्वाद देऊन पुन्हा अदृष्य झाले अशी कथा मी ऐकली होती. पण या मंदिरात जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्यात श्रीनृसिंहस्वामी मांडी घालून बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मीदेवी विराजमान आहेत अशी प्रतिमा आहे. मी मैसूरला असतांना त्या लहान शहरात दोन जागी नरसिंहजयंतीचा उत्सव साजरा केला गेला. यापूर्वी महाराष्ट्रात मी कधी त्याबद्दल ऐकलेसुध्दा नव्हते.

नाशिक सोडल्यास इतर कोठे मला रामाचे देऊळ प्रामुख्याने दिसले नव्हते असे मी रामनवमीच्या दिवशी लिहिले होते. मैसूरची सगळी मंदिरे कांही मी आतून पाहिली नाहीत, पण रस्त्यावरून जाताजाता जेवढे नजरेस पडत गेले त्यावरून पाहतां प्रवेशद्वारावरील कमानीत मात्र कोदंडपाणी (धनुर्धारी) श्रीरामाच्या मूर्ती मला निदान तीन चार ठिकाणी दिसल्या. बाजूला सीतामाई आणि लक्ष्मण होतेच. कांही जागी त्याच्या बरोबर किंवा त्यांच्याऐवजी देहुडाचरणी वेणू वाजवीत उभा असलेल्या मुरलीधराची मूर्ती होती. बहुतेक ठिकाणी विघ्नहर्त्याची प्रतिमा होतीच, कांही जागी हांतावर पर्वत धरून उड्डाण करणारा हनुमान होता.
अंबा, दुर्गा, काली, राजराजेश्वरी, वगैरे देवीच्या अनेक रूपांची अनेक मंदिरे मैसूरमध्ये रस्त्यामधून फिरतांना दिसली, अर्थातच त्यात चामुंडामातेची देवळे जास्त संख्येने होती. कांही ठिकाणी राघवेंद्रस्वामींचे मठ आहेत. त्यात पूजा अर्चा वगैरे धार्मिक कृत्यांचेशिवाय अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन वगैरेंसारख्या मोठ्या संस्थांनी चालवलेल्या शाळा, कॉलेजे आणि आश्रम मैसूर शहरात कार्यरत आहेत. यातल्या बहुतेक संस्था जुन्या शहरात नसून नव्या विस्तारित क्षेत्रात आहेत. एकंदरीत पाहता आजच्या परिस्थितीच्या मानाने मैसूरमधले लोक मला जास्तच सश्रध्द वाटले.

मैसूरमधील देवालये – भाग १ श्रीचामुंडादेवी

पुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज जिथे मैसूर शहर वसलेले आहे त्याच जागी होती असे ऐकले. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुध्दा जसा दिवसेदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्याचा उन्माद चढला, नागरिकांवर तो अधिकाधिक अत्याचार करू लागला, त्याच्या जुलुमाने संत्रस्त झालेले प्रजाजनच नव्हे तर देवादिकसुध्दा जगन्मातेला शरण गेले आणि त्यांनी आपले संरक्षण करण्यासाठी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला आणि सर्वांना त्याच्या जांचातून मुक्त केले. त्यानंतर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. मैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असेच नांव दिले आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, सभोवतालचे रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्वाचे स्थान असा त्रिवेणी संगम या जागी असल्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्याशिवाय स्थानिक श्रध्दाळू भक्तलोकही देवीच्या दर्शनासाठी, तिला नवस बोलण्यासाठी किंवा बोललेला नवस फेडण्यासाठी इथे मोठ्या संख्येने येत असतात.

आम्ही एका रविवारी सकाळी थोड्या उशीरानेच देवीच्या दर्शनाला गेलो. शहर सोडून डोंगराचा चढाव सुरू झाल्यानंतर रस्त्यात वाहनांची फारशी गर्दी नव्हती. त्या रस्त्यावरून पायी चालत जाणारेही कोणी दिसत नव्हते. पण माथ्यावर पोंचल्यावर पाहतो तो देवळाचा परिसर माणसांनी नुसता फुललेला होता. इतकी शेकडो किंवा हजारो माणसे तिथे कुठून आणि केंव्हा आली होती कोण जाणे. वाहनतळापासून मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर जत्रेत असतात तसे ओळीने स्टॉल लावलेले होते आणि त्यात नाना प्रकारच्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. पूजेचे सामान, धार्मिक पुस्तके, देवतांच्या मूर्ती आणि चित्रे, स्वयंपाकाची भांडी, शोभेच्या वस्तू, घरकामाची हत्यारे, अवजारे, कॅसेट्स, सीडी आदि सगळे कांही त्या बाजारात विकायला ठेवले होते. दर्शनाला येणा-या लोकांबरोबर लहान मुले असणार, ती हट्ट धरणार आणि त्यांचे पालक तो पुरवणार हे अनुभवाने गृहीत धरून छोट्या छोट्या खेळण्यांची खूप दुकाने मांडलेली होती.

त्या दुकानांसमोरील गर्दीतून मार्ग काढीत हळूहळू पुढे सरकलो. मंदिराचे आवार सुरू होताच वीस पंचवीस फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा स्वागतासाठी उघड्यावरच उभा होता. अगदी लहान मुले त्याला पाहून थोडी घाबरत होती, पण मोठी मुले आणि माणसे त्याच्याकडे कौतुकानेच पहात होती. मला तरी त्यातल्या कोणाच्याही चेहे-यावर तिरस्कार किंवा घृणेचे भाव दिसले नाहीत. “मरणांतानि वैराणि।” अशीच शिकवण आपल्याला दिली जाते ना! आणखी पुढे गेल्यावर एक मोठा फलक दिसला. देवीच्या दर्शनासाठी २० रुपये आणि १०० रुपये किंमतीच्या तिकीटांची सोय केलेली आहे असे त्यावर लिहिले होते. वीस रुपयांचे तिकीटाच्या रांगेतच शंभर लोक उभे होते आणि तिकीट काढून दर्शनासाठी उभे राहिलेल्या लोकांनी देवळाला पूर्ण वेढा घातलेला होता. निःशुल्क दर्शनाचा लाभ त्या दिवशी बहुधा नसावाच. त्या मारुतीच्या शेपटाएवढ्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याएवढे त्राण शरीरात नसल्याने आम्ही शंभर रुपयाची तिकीटे काढून थेट महाद्वार गांठले. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे, पण आम्ही आधी देवीचे दर्शन घेऊन नंतर सावकाशपणे त्याच्या सौंदर्याकडे पहायचे ठरवले.

महाद्वारातून थेट प्रवेश मिळाल्यानंतर आंत माणसांची रांग होतीच. सभामंटप पार करून गाभा-याच्या दारापर्यंत पोचण्यासाठी बराच वेळ लागला, पण तिथपर्यंत पोचून चामुंडीमातेच्या मुखकमलावर जेमतेम एक दृष्टीक्षेप पडताच तिथल्या रक्षकाने हात धरून बाजूला काढले. तिरुपती देवस्थानाप्रमाणेच त्या जागी कोणाला क्षणभरसुध्दा उभे राहू देत नव्हते. देवीच्या दर्शनासाठी बाहेर ताटकळत उभे असलेल्या लोकांचा विचार करता ते योग्यच होते, पण असल्या क्षणिक दर्शनाने मनाला समाधान मिळत नाही. देवीला अर्पण करण्यासाठी भाविकांनी नेलेले खण, नारळ, फुले, हार वगैरे कशाचाही स्वीकार तिथे केला जात नव्हता. देवीच्या मूर्तीवर एक नजर टाकायची आणि बाजूला व्हायचे. भाविकांची गर्दीच इतकी अनावर असते की देवीसमोर उभे राहण्यासाठी प्रत्येकाच्या वाट्याला एकादा सेकंदच मिळू शकतो.

गाभा-याला घालण्याच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर एका जागी चामुंडा देवीच्या मूर्तीची प्रतिकृती ठेवली आहे. नेहमी येणारे श्रध्दाळू भक्त तिथे थांबत नाहीत. तिच्यासमोर थोडा वेळ उभे राहून आपण स्तोत्र म्हणू शकतो किंवा आपण आणलेली पूजाविधीची सामुग्री तिला अर्पण करू शकतो. बंगाली लोकांची दुर्गा किंवा कालीमाता हातात शस्त्रात्रे धारण करून वीरश्रीयुक्त मुद्रेत उभ्या असलेल्या दाखवतात. इथे तसे कांही नव्हते. चामुंडामातेच्या मुखवट्यावर शांत मुद्रा दिसली. देवीच्या अंगावर इतकी वस्त्रे प्रावरणे होती की ती उभी आहे की बसली आहे, अष्टभुजा आहे की चतुर्भुजा तेसुध्दा समजले नाही. पुढे गेल्यावर एक बाई हातात भला मोठा कोयता घेऊन उभी होती. भाविकांनी आणलेले नारळ ती एका फटक्यात फोडून त्याची शकले करून देत होती. तसेच चामुंडीचा प्रसाद म्हणून लाडवांची पाकिटे विकणारे विक्रेते आपल्याकडून प्रसाद घेऊन जाण्याची गळ वाटेवरून जाणा-या प्रत्येकाला घालत होते. ते सर्वजण बहुधा अनधिकृत असतात, सुजाण भाविकांची फसगत होऊ नये यासाठी लवकरच त्याला आयएसआय की एगमार्क असा कुठला तरी मार्क देण्यात येणार आहे वगैरे वृत्त नंतर वर्तमानपत्रात आले होते.

दर्शनाचा विधी आटोपून पुन्हा महाद्वारापाशी आलो. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देव देवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्तींनी ते छान सजवले आहे. दक्षिणेकडील देवालयांच्या रचनेत प्रवेशद्वारावरील गोपूर हा सर्वात उंच आणि सर्वात आकर्षक भाग असतो. त्यानंतर आंत गेल्यावर कुठे गरुडध्वजाचा खांब असतो, कुठे दीपमाळ असते. पुढे गेल्यावर खूप खांब असलेले प्रशस्त असे बसके सभामंटप असते आणि त्याच्या पलीकडे गाभा-याची घुमटी असते. गाभा-यावर शिल्पकृतींनी आणि कधी कधी सोन्याचांदीने मढवलेला कळस असतो, पण तो गोपुराइतका उंच नसतो. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमूना म्हणूनसुध्दा ही मंदिरे प्रेक्षणीय असतात, पण भाविकांच्या गर्दीमुळे ती लक्ष देऊन पाहण्याइतकी सवड मिळत नाही. चामुंडेश्वरीचे मंदिरही असेच प्रेक्षणीय आहे. कुठलेही यांत्रिक सहाय्य उपलब्ध नसतांना केवळ मानवी प्रयत्नांनी इतके भव्य दगडी मंदिर कसे उभे केले असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
(क्रमशः)

राजवाड्यांचे शहर मैसूर

 

आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे. गांवातील कोठल्याही धनाढ्य माणसाचा वाडा, हवेली, कोठी वगैरेपेक्षा तिथला राजवाडा नेत्रदीपक आणि आलीशान असायलाच हवा. राजघराण्यातील व्यक्तींचे कडेकोट संरक्षण करण्यासाठी त्याचे बांधकाम चांगले भरभक्कम असे, त्याच्या सभोवती अभेद्य अशी तटबंदी, त्यावर तोफा ठेवण्यासाठी बुरुज, हत्तीला सुध्दा दाद देणार नाहीत असे मजबूत दरवाजे वगैरे सारा सरंजाम त्यात असे. पुरातन कालापासून असेच चालत आले आहे. इंग्रजी भाषेतल्या परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कृतीपूर्ण किस्से, आपल्या पौराणिक कथा-कहाण्या या सगळ्यात पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यांचे रसभरित वर्णन असतेच. त्यांच्या बांधकामामुळे हजारो मजूरांना रोजगार मिळतो, कुशल कारागीरांना आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, त्यातून नवे कुशल कलाकार तयार होतात, प्रजेला सुंदर कलाकृती पहायला मिळतात, त्यामुळे तिची अभिरुची विकसित होते, वगैरे अनेक कारणे दाखवून त्यासाठी त्यावर होणा-या अमाप खर्चाचे समर्थन किंवा कौतुकच केले जात असे. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर आताचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यकर्ते देखील व्हाइट हाउस किंवा राष्ट्रपती भवन यासारख्या भव्य वास्तूमध्येच रहातात. ही परंपरा अशीच यापुढे राहणार असे दिसते.

कुठलेही ऐतिहासिक गांव पाहतांना त्या जागी कधीकाळी बांधलेले राजवाडे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मध्ययुगात बांधलेल्या दणकट ऐतिहासिक वास्तू दिल्ली वा आग्र्यासारख्या कांही थोड्या ठिकाणी अद्याप शाबूत राहिलेल्या दिसतात तर इतर अनेक ठिकाणी त्यांचे भग्न अवशेष पाहून इतिहास काळातील त्यांच्या गतवैभवाची कल्पना करावी लागते. इतिहासाच्या आधुनिक कालखंडात म्हणजे ब्रिटीशांच्या राजवटीत तत्कालीन राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांनी आपापल्या राज्यात एकापेक्षा एक सुंदर राजवाड्यांचे बांधकाम करवून घेतले. त्या बहुतेक इमारती आजही सुस्थितीत दिसतात आणि रोजच्या वापरात त्यांचा उपयोग होतांना दिसतो. वडोदरा (बडोदा), ग्वालियर (ग्वाल्हेर), जयपूर, हैदराबाद आदि अनेक गांवांमध्ये हे दृष्य आपल्याला दिसते. अशा सा-या शहरांत मैसूरचा क्रमांक सर्वात पहिला असावा असे वाटावे इतके भव्य आणि सुंदर राजवाडे या ठिकाणी बांधले गेले आहेत. मैसूरच्या सुप्रसिध्द मुख्य राजवाड्याखेरीज जगन्मोहन पॅलेस, जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहाल, वसंतमहाल, कारंजीविलास, चेलुअंबा विलास, राजेंद्र विलास वगैरे अनेक महाल किंवा पॅलेसेस या शहराची शोभा वाढवतात. मैसूरच्या राजवाड्याला मोठा इतिहास आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरीस वाडियार राजांनी मैसूरचे राज्य स्थापन केले तेंव्हापासून याच जागेवर त्यांचा निवास राहिला आहे. चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात बांधलेला पुरातन राजवाडा कधीतरी वीज कोसळून पडून गेल्यावर सतराव्या शतकात त्या जागी एका सुंदर राजवाड्याची उभारणी केली होती. तिचे वर्णन असलेल्या साहित्यकृती व दस्तऐवज उपलब्ध आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस तो जीर्ण झालेल्या अवस्थेत असतांना टिपू सुलतानाने तो पाडून टाकला. इंग्रजांनी टिपू सुलतानाला ठार मारून राज्याची सूत्रे पुन्हा वाडियार राजाकडे सोपवली. त्या राजाने त्याच जागी अल्पावधीत नवा राजवाडा बांधला. शंभर वर्षे टिकल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला.

तत्कालीन राणीने त्याच जागी आणि सर्वसाधारणपणे जुन्या राजवाड्याच्याच धर्तीवर नवा आलीशान राजवाडा उभारायचे ठरवले. त्यासाठी नेमलेल्या इंजिनियराने अनेक शहरांना भेटी देऊन तिथल्या उत्तमोत्तम इमारतींची पाहणी करून नव्या राजवाड्याच्या इमारतीचा आराखडा बनवला आणि एका भव्य वास्तूची निर्मिती केली. युरोपात विकसित झालेले आणि त्या काळात तिकडे प्रचलित असलेले स्थापत्यशास्त्र व वास्तुशिल्पकला आणि परंपरागत भारतीय हिंदू तसेच इस्लामी शैलींच्या शिल्पकलेचा आविष्कार या सर्वांचे अजब मिश्रण या इमारतीच्या रचनेत झाले आहे. ती इमारत बांधण्यासाठी दूरदुरून खास प्रकारचे संगमरवर आणि ग्रॅनाइटचे शिलाखंड आणून त्यावर कोरीव काम केले आहे. सुंदर भित्तीचित्रांनी त्याच्या भिंती सजवल्या आहेत. तसेच खिडक्यांसाठी इंग्लंडमधून काचा मागवून त्यावर सुरेख चित्रे रंगवून घेतली आहेत. रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाची आठवण करून देणारी अनुपम चित्रे छतावर रंगवली आहेत. रोममध्ये बायबलमधील प्रसंग दाखवले आहेत तर मैसूरच्या राजवाड्यात दशावतार आणि तत्सम पौराणिक कथांचे दर्शन घडते. या इमारतीतले खांब, कमानी, सज्जे, त्यावरील घुमट वगैरेंच्या आकारात पाश्चिमात्य, मुस्लिम आणि भारतीय अशा सर्व शैलींचा सुरेख संगम आढळतो. राजवाड्याच्या चारी बाजूंना भरपूर मोकळी जागा ठेवून त्याच्या सभोवती तटबंदी आहे.

मी कॉलेजमध्ये असतांना मैसूरचा हा राजवाडा दसरा महोत्सवासाठी शृंगारलेल्या स्थितीत पाहिला होता. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिलीच इतकी संदर इमारत असावी. कदाचित त्यामुळे आजही मला ही वास्तू ‘यासम ही’ वाटते. ताजमहालसारखे अत्यंत सुंदर महाल पहात असतांना ते रिकामे रिकामे वाटतात आणि व्हॅटिकनमधील सिस्टीम चॅपेलसारख्या इमारतीतल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शनासाठी मुद्दाम मांडून ठेवल्यासारख्या दिसतात. मैसूरच्या राजवाड्यातले सर्व सामान आणि शोभेच्या वस्तू मात्र नैसर्गिकरीत्या जागच्या जागी ठेवल्या असाव्यात असे वाटते. तिथले एकंदर वातावरण चैतन्यमय आहे. दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत भालदार चोपदार तिथे येतील असा भास होतो.

दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी संध्याकाळी तासभर राजवाडा आणि त्याच्या परिसरातील सर्व इमारतींवर दिव्यांची रोषणाई करतात. दस-याच्या महोत्सवात ती रोजच असते. लक्षावधी झगमगणा-या दिव्यांच्या प्रकाशात राजवाड्याची सुडौल इमारत अप्रतिम दिसते. समोर, पाठीमागे आणि दोन्ही बाजूला नजर पोचेपर्यंत सगळीकडेच दिवाळी असल्यामुळे तिथले वातावरणच धुंद होऊन जाते. त्या काळात राजवाड्याच्या प्रांगणात गणवेषधारी शिपाई बँड वाजवून त्यात आणखी भर टाकतात. हा सोहळा पहायला नेहमीच खूप गर्दी होते, पण राजवाड्यासमोरील पटांगण विस्तृत असल्याने त्यात ती सामावते.

येथील जगन्मोहन पॅलेसमध्ये सुरेख आर्ट गॅलरी आहे. त्यात अनेक जुन्या चित्रकारांनी रंगवलेली तैलचित्रे तसेच इतर माध्यमातल्या कलाकृती ठेवल्या आहेत. हळदणकर यांचे ‘ग्लो ऑफ होप’ हे अनुपम चित्र यातले खास आकर्षण आहे. एक संपूर्ण दालन फक्त राजा रविवर्मा यांनी काढलेल्या भव्य चित्रांनी भरले आहे. ललितामहालमध्ये आलीशान पंचतारांकित हॉटेल थाटले आहे. जयलक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मैसूर विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे, तसेच त्याच्या कांही भागात लोककला आणि पुरातत्व या विषयांवरील पुराणवस्तुसंग्रहालय आहे. चलुअंबा पॅलेसमध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यालय आहे. अशा प्रकारे इतर राजमहालांचा आज या ना त्या कारणासाठी चांगला उपयोग करण्यात येत आहे. मैसूरच्या रस्त्यांवरसुध्दा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, तसेच चौकौचौकात छत्र्या, चबुतरे वगैरे बांधून त्यावर राजा महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. कित्येक सरकारी ऑफीसे, इस्पितळे वगैरे सार्वजनिक इमारतींच्या सजावटीत खांब, कमानी, छत्र्या, घुमट वगैरेंचा कल्पकतेने वापर करून त्यांनासुध्दा महालाचे रूप दिले आहे. शहरातून फेरफटका मारतांना ते ‘राजवाड्यांचे शहर’ (‘ सिटी ऑफ पॅलेसेस’ ) आहे याची जाणीव होत राहते.

उद्याननगरी मैसूर

 

मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा ‘झनक झनक पायल बाजे’ हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण ‘म्हैसूरच्या वृंदावन गार्डन’मध्ये केले होते आणि “ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते.” अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे “म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग ” असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते. पुढे अनेक हिंदी चित्रपटात वृंदावन गार्डनमध्ये चित्रित केलेली गाणी सर्रास दिसू लागल्यामुळे आणि वृंदावनाच्या छोट्या आवृत्या गांवोगांवी तयार झाल्यानंतर त्याची एवढी नवलाई राहिली नाही. कालांतराने “स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.” ही म्हण ऐकली आणि त्याही पुढच्या काळात ‘स्वर्ग ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली एक निव्वळ कविकल्पना आहे’ याचा बोध झाला. यामुळे त्या समीकरणातून ‘स्वर्ग’ बाहेर गेला, पण ‘म्हैसूर शहर’ आणि ‘वृंदावन गार्डन’ ही सुध्दा दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत हे मात्र त्या जागांना भेट दिल्यानंतरच समजले.

मैसूरपासून सतरा अठरा किलोमीटर अंतरावर कावेरी नदीवर एक मोठे धरण पाऊणशे वर्षांपूर्वी तत्कालीन मैसूरचे राजे कृष्णराजा यांनी बांधवले आहे. प्रख्यात इंजिनियर स्व.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी बांधलेले हे धरण त्या काळात भारतात तर अद्वितीय असे होतेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या धरणांत त्याची गणना केली जात होती. त्याच्या जलाशयाला कृष्णराजसागर (के आर एस) असे नांव दिले आहे. यातून उपलब्ध झालेला मुबलक पाणीपुरवठा, निर्माण होणारी वीज आणि धरणाच्या बांधकामासाठी तयार केलेली मोकळी जागा यांचा अत्यंत कलात्मक रीतीने उपयोग करून घेऊन त्या ठिकाणी वृंदावन गार्डन या विशाल उद्यानाची निर्मिती केली गेली. अल्पावधीतच त्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि ते एक पर्यटकांचे अत्यंत आवडते आकर्षण बनले. जगभरातून लक्षावधी पर्यटक ही बाग पहाण्यासाठी मैसूरला येत असतात. कर्नाटक सरकारनेही या उद्यानाची उत्तम निगा राखली आहे आणि त्याचे आकर्षण टिकवून धरण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून घेतला आहे. बागेमध्ये हजारोंच्या संख्येने त-हेत-हेची सुंदर फुलझाडे आहेतच, त्यातून झुळूझुळू वाहणारे पाण्याचे झरे, लहान लहान धबधबे,संगीताच्या तालावर नाचणारे शेकडो लहान मोठे कारंजे आणि त्यांच्या फवा-यावर व उडणा-या शिंतोड्यावर पडणारे बदलत्या रंगांचे प्रकाशझोत यांतून एक अद्भुत असे दृष्य निर्माण होते. त्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहूनच घ्यायला हवा.

अनुपम असे हे वृंदावन गार्डन मैसूर शहराच्या हद्दीच्या बाहेर दूर अंतरावर आहे म्हणून त्याला वगळले तरीसुध्दा मैसूर शहराला मिळालेली उद्याननगरी (गार्डन सिटी) ही उपाधी सार्थ ठरेल इतकी मुबलक हिरवाई या शहरात सगळीकडे आहे. मुख्य राजवाड्याच्या सभोवती खूप मोठी रिकामी जागा आहेच, शहरातील इतर छोट्या राजवाड्यांच्या आजूबाजूलाही प्रशस्त मोकळ्या जागा आहेत आणि त्यात विस्तीर्ण हिरवीगार लॉन्स केलेली आहेत, तसेच अनेक त-हेची फुलझाडे व शीतल छाया देणारे वृक्ष लावलेले आहेत. महानगरपालिका, इस्पितळे, महाविद्यालये, मोठ्या बँका वगैरे सार्वजनिक महत्वाच्या सर्वच मोठ्या इमारतींच्या आसमंतात लहान मोठे बगीचे आहेतच. पुणे विद्यापीठाच्या परिसरातल्या विशाल मोकळ्या जागेचे मला खूप कौतुक वाटत आले आहे. मैसूर युनिव्हर्सिटीचे आवार आकाराने कदाचित तितके विशाल नसले तरी त्यातली वनराई मला जास्त गडद आणि नयनरम्य वाटली. मैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या संस्थेच्या आवारातली झाडी इतकी घनदाट आहे की त्याच्या कुंपणालगत वळसा घेत जाणा-या रस्त्यावरून झाडांमागे दडलेल्या आतल्या इमारती दिसतही नाहीत. मैसूरच्या प्राणीसंग्रहाला झूलॉजिकल गार्डन किंवा पार्क असे म्हणतात. मी आपल्या आयुष्यात जे चार पांच झू पाहिले असतील त्यातला फक्त मैसूरचाच वैशिष्ट्यपूर्ण झू माझ्या स्मरणात राहिला आहे. या वन्यप्राणिसंग्रहालयात शाकाहारी प्राण्यांसाठी मुक्तपणे गवतात चरत फिरण्यासाठी हिरवी कुरणे आहेत आणि वाघसिंहादि हिंस्र पशूंनासुध्दा पिंज-यात डांबून ठेवलेले नसते. आपले पाय मोकळे करण्यासाठी सुरक्षित कुंपण घातलेल्या मोकळ्या जागा त्यांच्यासाठी ठेवल्या आहेत. त्या पशूंना स्वतः शिकार करून ती खाण्याची व्यवस्था मात्र करता येण्यासारखी नाही. त्यांना सामिष अन्नाचा पुरवठा केला जातो. या झूमध्ये जितके पशू असतील त्याच्या अनेक पटीने वृक्षवल्ली लावलेल्या आहेत. नांवाप्रमाणे तोसुध्दा एक छान आणि मोठा बगीचा आहे. राणीबागेसारखी तिथे नुसती नांवापुरती बाग नाही.

जुन्या शहराच्या गजबजलेल्या जुन्या वस्त्यांमध्ये इतर शहरांप्रमाणेच एकाला लागून एक अशी घरे दाटीवाटीने बांधलेली आहेत, त्यामुळे त्यात वृक्षांना वाढायला फारसा वाव नाही. पण थोड्या थोड्या अंतरावर सार्वजनिक बागा, उद्याने वगैरे बनवलेली दिसतात. मोठ्या हमरस्त्यावर दुतर्फा झाडे त्या भागातसुध्दा दिसतातच. शहराचा विस्तार होतांना वाणीविलास मोहल्ला, जयलक्ष्मीपुरम, गोकुलम, विजयनगर आदि नव्या वस्त्या वसवण्यात आल्या आहेत. यात मात्र अनेक छोटे छोटे वेगवेगळे प्लॉट्स आहेत. त्यातल्या कांहींमध्ये जुनी बैठी कौलारू घरे आणि कांहींमध्ये दुमजली टुमदार बंगले यांचे मिश्रण आहे. चार पांच मजल्यांचे चौकोनी ठोकळ्यांच्या आकाराचे ब्लॉक्स अलीकडेच अधून मधून दिसू लागले आहेत, पण मला तरी मैसूरमध्ये कोठेच गगनचुंबी इमारती दिसल्या नाहीत. कदाचित गावातली अन्य कोठलीही वास्तू राजवाड्याहून उंच असता कामा नये हा जुना संकेत अजून पाळला जात असेल. या सर्वच एक किंवा दोन मजली घरांच्या व बंगल्यांच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत भरपूर झाडे लावलेली दिसतात. त्यात कुठे नारळाची किंवा अशोकाची जवळजवळ लावलेली उंच झाडे किंवा गुलमोहराची दूर दूर लावलेली झाडे प्रामुख्याने दिसतात. कांही लोकांनी केळ्यासारखी उपयुक्त झाडे लावलेलीही दिसतात. त्याखेरीज सुंदर आणि सुवासिक फुलांनी बहरलेली फुलझाडे किंवा वेली तर जागोजागी आहेतच. बहुतेक कुंपणांवर रंगीबेरंगी फुलांच्या बोगनवेलींचे आच्छादन घातलेले दिसते.

या सुनियोजित भागांत चांगले रुंद आणि सरळ रेषेत एकमेकांना समांतर किंवा काटकोनात जाणारे रस्ते आहेत. त्यांवर सगळीकडे दुतर्फा झाडे लावलेली आहेत. नारळ व गुलमोहरांशिवाय इतर प्रकारची मोठी झाडेही आहेत. अधून मधून दिसणा-या देवळांच्या आसपास पिंपळाचे डेरेदार वृक्ष आहेत. मधूनच एकादे आंब्याचे झाडसुध्दा दिसते. दर दोनतीनशे मीटर अंतरांवर एक तरी मोकळा प्लॉट उद्यानासाठी खास राखून ठेवलेला आहे, त्यातल्या ब-याचशा प्लॉटवर बगीचे तयार केलेलेही आहेत. त्यातल्या लहान मुलांसाठी ठेवलेल्या घसरगुंड्या, झोपाळे वगैरे चांगल्या अवस्थेत राखले आहेत, तसेच सगळीकडे प्रौढांसाठी जॉगिंग ट्रॅक्स आवर्जून ठेवलेले आहेत. यामुळे सायंकाळी हे पार्क मुलांनी व माणसांनी गजबजलेले असतात. यातल्या बहुतेक उद्यानांची निगा खाजगी संस्था राखत असाव्यात कारण त्यांची नांवे प्रवेशद्वारापाशी दिसतात. एका अर्थी हे प्रायोजित पार्क आहेत. आमच्या घरापासून पांच ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असे तीन चार वेगवेगळे पार्क आहेत. वीस पंचवीस मिनिटांच्या अंतरावर असलेला चेलुअम्बा पार्क तर अर्धा पाऊण किलोमीटरपर्यंत पसरला आहे. त्यात एका वेळेस निदान तीन चारशे माणसे तरी येऊन बसत किंवा फिरत असतील, पण तरीही त्यांची गर्दी वाटत नाही.

इथे आल्यावर सकाळी इतके प्रसन्न वातावरण असते की घरी बसवतच नाही. पोचल्याच्या दुस-याच दिवशी सकाळी मी फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावर कुठे गुलमोहराच्या लाल केशरी पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या दिसत होत्या तर मध्येच एकाद्या जागी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंधी सडा पडलेला. आजूबाजूच्या बंगल्यातल्या विविध सुवासिक फुलांचा मंद मंद सुगंध एकमेकांत मिसळत होता. एकदम मागच्या बाजूने एक छानशा सुवासाची झुळुक आली आणि तिच्या पाठोपाठ “हूवा मल्लिगे…. (फुलांच्या माळा)…. ” अशी लकेर आली. मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने तोल सांभाळत चालवत येत होता. थोड्या वेळाने एक बाई डोक्यावर फुलांची पाटी घेऊन माळा विकत जातांना दिसली.
सकाळच्या वेळी घरोघरी रतीब घालणारे दूधवाले आणि पेपरवाले रस्त्यात हिंडतांना सगळ्याच शहरात दिसतात. पण फुलांचे गजरे आणि माळा घेऊन विकण्यासाठी फिरणारी मुले आणि स्त्रिया मी मैसूरलाच  पाहिल्या. त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली “हूवा मल्लिगे….” ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील.

मैसूरचे इन्फोसिस कँपस

मैसूरचे इन्फोसिस कँपस

हा लेख तीन वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यानंतर इन्फोसिसच्या कँपसमध्ये आणखी भर पडलेली आहे.


मैसूरचे इन्फोसिस कँपस

मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे. मैसूरला गेल्यावर पूर्वी पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांना पुन्हा भेट देण्याआधी या नव्या युगाच्या अग्रदूताची भेट घेतली.
सोमवार ते शुक्रवार कामात मग्न असलेल्या या कँपसला शनिवारी व रविवारी भेट द्यायची बाहेरच्या लोकांना मुभा आहे. मात्र इन्फोसिसमध्ये काम करणारा कर्मचारीच त्या दिवशी आपल्यासोबत पाहुण्यांना आंत घेऊन जाऊ शकतो. आजकालची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत कडक सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आधी गेटपाशी थांबवून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाते. एक सविस्तर फॉर्म भरून त्यात कर्मचा-याची आणि त्याच्या पाहुण्याची माहिती भरल्यानंतर आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते. प्रत्येक पाहुण्याला तिथल्या तिथे नवा फोटोपास तयार करून दिला जातो. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असते. संगणकाच्या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेला त्यात काय विशेष आहे म्हणा! पाहुण्याने त्या आवारात असेपर्यंत सतत तो पास गळ्यात अडकवून फिरायचे आणि गेटमधून बाहेर पडतांना तो परत करायचा. सर्व कर्मचारीगण आपापली ओळखपत्रे गळ्यात लटकवूनच हिंडत असतात. त्यामुळे आतला कोणताही माणूस कोण आहे हे तिथे फिरत असलेल्या सुरक्षा अधिका-याला शंका आल्यास किंवा त्याची गरज पडल्यास लगेच समजते.
ऑफीसच्या कामाशी आम्हाला कांही कर्तव्य नसल्यामुळे आम्ही सरळ मनोरंजनाच्या जागेकडे गेलो. क्लब हाउस, स्विमिंग पूल, सभागृह वगैरे सारे कांही तिथे एका विभागात बांधले आहे. त्यात एक बराच मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा तरणतलाव आहे. तो नेहमीसारखा सरळसोट आयताकार चौकोनी आकाराचा स्विमिंग पूल नाही. त्यात मध्ये मध्ये ओएसिससारखी छोटी छोटी वर्तुळाकार बेटे ठेवली आहेत. त्यातील प्रत्येक बेटात लिलीच्या फुलांचे ताटवे आणि मधोमध एक लहानसे पामचे झाड लावले आहे. त्यातून मॉरिशस आणि केरळ या दोन्हींचा आभास निर्माण होतो. तलावाच्या एका बाजूला पाण्यामध्येच एक थोडेसे उंच बेट बांधले आहे. त्यातून निर्झराप्रमाणे पाणी खाली पडत असते. तलावाच्या दुस-या बाजूला एका धबधब्यातून ते बाहेर पडत असते. अशा प्रकारे पाण्याचे अभिसरण चाललेले असते आणि दिसायलाही ते दृष्य खूप सुंदर दिसते. तलावाच्या कडेला लांबलचक लाकडाच्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. वाटल्यास त्यावर पाय पसरून आरामात बसून रहावे. सुटीचा दिवस असल्यामुळे त्या वेळी पूलमध्ये बरेच लोक होते. इतर दिवशी ऑफीस सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर फक्त त्या परिसरात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. तिथली फक्त एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटली. ती म्हणजे त्या तलावात खोल पाण्याचा विभागच नव्हता. या टोकापासून त्या टोकांपर्यंत तळाला पाय टेकवून चालत जाण्याइतपतच पाणी होते. पोहण्याचा तलाव म्हणण्यापेक्षा त्याला डुंबत बसण्याचे ठिकाण म्हणणे जास्त योग्य ठरेल. कदाचित अनुचित अपघात टाळण्यासाठी असे केले असेल. पण मी तरी एवढ्या मोठ्या आकाराचा एवढा उथळ तलाव कुठे पाहिला नाही. पाण्याची खोली कमी असल्यामुळे त्यात उडी किंवा सूर मारण्याला अर्थातच प्रतिबंध होता.
स्विमिंग पूलला लागूनच काटकोनी आकारात चांगले ऐसपैस दुमजली क्लब हाउस आहे. त्यात एका बाजूला पोहणा-यांसाठी शॉवर्स, चेंजरूम वगैरे आहेत. स्टीम बाथसुध्दा आहे. दुस-या कोनात खेळ आणि व्यायामासाठी अनेक आधुनिक साधनसुविधा आहेत. जिम्नॅशियममध्ये ट्रेड मिल, सायकल वगैरेसारखी हर त-हेची अत्याधुनिक यंत्रे ठेवली आहेत. त्यावर उभे राहून किंवा बसून हात, पाय, दंड, मनगट, मांड्या, पोट-या, पाठ, पोट, कंबर वगैरे शरीराच्या ज्या अवयवांच्या स्नायूंना जेवढा पाहिजे तेवढा व्यायाम देता येतो. बॅडमिंटन, टेबलटेनिस, बिलियर्ड, स्नूकर वगैरेंची कित्येक अद्ययावत कोर्टे आहेत. एका खोलीत स्क्वॅश खेळायची सोयसुध्दा आहे. कॅरम, ब्रिज यांसारखे बैठे खेळ खेळायची भरपूर टेबले आहेत. मला त्या ठिकाणी असलेली बाउलिंगची यंत्रणा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वाटली. एका वेळी आठ लोक खेळू शकतील अशी संपूर्णपणे यांत्रिक सामुग्री तिथे बसवली आहे. एका टोकाला उभे राहून बॉल टाकल्यावर दुस-या टोकाला ठेवलेल्या जितक्या पिना पडतात त्याप्रमाणे त्या खेळीचा स्कोअर इलेक्ट्रॉनिक बोर्डावर दाखवला जातो. टाकलेले बॉल एका नलिकेतून आपल्या आपण परत येतात आणि यंत्राद्वारेच सगळ्या पिना पुन्हा उभ्या करून ठेवल्या जातात. बाजूला टेनिस कोर्टे तर आहेतच.
थोडक्यात सांगायचे तर मुंबईतल्या सर्वात आधुनिक आणि सर्वात महागड्या क्लबमध्ये जितक्या सोयी उपलब्ध असतात त्या सगळ्या तिथे आहेत. त्या अगदी मोफत मिळत नसल्या तरी इन्फोसिसच्या नोकरदारांना परवडतील एवढ्या दरात त्यातील कोणीही (अचाट मेंबरशिप फी न भरता) त्यांचा लाभ घेऊ शकतो. तसेच दिवसाचा माफक आकार देऊन त्यांच्या पाहुण्यांनाही तिथे खेळता येते. इन्फोसिसची स्वतःची अशी मोठी कॉलनी त्या परिसरात नाही. कांही लोक आजूबाजूच्या भागात घरे घेऊन राहतात ते तेथे नेहमी येऊ शकतात. इन्फोसिसचे ट्रेनिंग सेंटर हे अशा प्रकारचे संपूर्ण जगात अव्वल क्रमांकाचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये येणा-या प्रशिक्षणार्थींसाठी मोठमोठी हॉस्टेल्स आहेत त्यात नेहमीच कांही हजार विद्यार्थी थोड्या थोड्या काळासाठी येऊन रहात असतात. ते सर्वजण या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यांना कोणत्याही कामासाठी मुख्य शहरात जायची गरजच पडू नये इतक्या सर्व सुखसोयी त्यांना कँपसमध्येच दिल्या जातात. त्यात त्यांच्या क्रीडा आणि मनोरंजनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.
क्लबहाऊसहून जवळच एक प्रचंड चेंडूच्या आकाराची बिंल्डिंग आहे. त्याला बाहेरच्या बाजूने अननसासारखे शेकडो खवले केले असून ते संपूर्णपणे कांचांनी मढवले आहेत. बाहेरून पाहिल्यावर ती एक इमारत आहे असेच वाटत नाही आणि त्या इमारतीच्या आंत काय असेल याची तर कल्पनाही करता येत नाही. ते एक मल्टिप्लेक्स आहे. त्याच्या आंत निरनिराळ्या आकारांची सभागृहे आहेत. लहान हॉलमध्ये शैक्षणिक चित्रपट, स्लाईड शो वगैरे दाखवले जातात तर मोठ्या सभागृहात शनिवारी व रविवारी हिंदी, इंग्रजी किंवा कानडी सिनेमेसुध्दा दाखवले जातात आणि पाहुणे मंडळी ते पाहू शकतात. बाजूलाच सुसज्ज असे ग्रंथालय, वाचनालय वगैरे आहेत. त्यात संगणकावरील आणि तांत्रिक विषयावरील सर्व पुस्तके आहेतच, शिवाय चांगल्या साहित्यकृतीसुध्दा उपलब्ध आहेत. रोम येथील कॉलेसियमची आठवण करून देणारे एक वर्तुळाकृती वास्तुशिल्प सध्या आकार घेत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येक मजल्यावर कोलेसियमप्रमाणेच खांब व कमानीच्या रांगा बांधल्या आहेत. या इमारतीत शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची योजना आहे.
एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या इमारतीत तरंगते उपाहारगृह (फ्लोटिंग रेस्तरॉं) आहे. त्यात जाऊन दुपारचे जेवण घेतले. सूपपासून स्वीट डिशेसपर्यंत परिपूर्ण असे सुग्रास व चविष्ट भोजन तिथे मिळाले. एकाद्या मोठ्या हॉटेलच्या रेस्तरॉंमध्ये ठेवतात त्या प्रमाणे विविध प्रकारची सॅलड्स, दोन मांसाहारी पदार्थ, दोन तीन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारचे भात, नान, पराठे, पापड, फळफळावळ, केकचे प्रकार, आइस्क्रीम वगैरे सगळे कांही तिथे मांडून ठेवले होते आणि ‘आपला हात जगन्नाथ’ पध्दतीने त्यावर मनसोक्त तांव मारायला मुभा होती. त्या मानाने त्याचे शुल्क यथायोग्य होते. रोज रोज अशी भरपेट मेजवानी खाल्ल्यानंतर इथले लोक काम कसे करतात असा विचार मनात आला. पण रोज जेवणासाठी त्या भोजनगृहात जाण्याइतका वेळच दिवसा तिथे कोणाला नसतो. त्यासाठी वेगळी फूडकोर्ट आहेत. त्या जागी झटपट थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रत्येकाला जेवणासाठीच नव्हे तर चहा, कॉफी किंवा अल्पोपाहारासाठी जवळच्या फूडकोर्टवरच जावे लागते. कॅटीनमधून कांहीही ‘मागवण्याची’ सोय उपलब्ध नाही.
प्रशिक्षणार्थींच्या निवासाची जशी कँपसवरच सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पाहुण्यांसाठी अतिथीगृहांची भरपूर व्यवस्था आहे. इन्फोसिसच्या इतर शाखामधून अनेक लोक निरनिराळ्या कामासाठी इथे येतच असतात. त्यांना दूर शहरात राहून तिथून रोज कामासाठी इथे येण्यापेक्षा इथेच राहणे निश्चितच सोयीचे पडते. नवी नेमणूक झालेल्या सर्वच कर्मचा-यांना पहिले आठवडाभर राहण्याची जागा इथे उपलब्ध करून देतात. त्यामुळे गांवात जागा पाहण्यासाठी त्यांना थोडा अवधी मिळतो. तीन चार महिन्यांसाठी इथल्या हॉस्टेलवर येऊन रहात असलेल्या लोकांचे आई वडील त्यांना भेटायला आले तर त्यांना एक दोन दिवस रहाण्यासाठी गेस्टहाउसमध्ये जागा मिळते. अशा प्रकारे इन्फोसिस ही एक काळजी घेणारी संस्था आहे असे मत लोकांमध्ये पसरावे हा उद्देश त्यामागे असावा. संचालक मंडळाचे सदस्य, उच्चपदस्थ अधिकारी, विशेष अतिथी वगैरे खास लोकांसाठी सुंदर बंगले व सूट ठेवले आहेत. त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते. निवासस्थाने व अतिथीगृहांच्या इमारतीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आकारांच्या आहेत. विहंगम दृष्यात त्यातून INFOSYS अशी अक्षरे दिसतात. मैसूरला सध्या तरी विमानतळ नसल्यामुळे आकाशात स्वैर भ्रमण करणारे विहंगच ते पाहू जाणे. ती पाहण्यासाठी आपल्याला किमान हॅलिकॉप्टरमध्ये बसून उड्डाण करावे लागेल. मात्र थेट उपग्रहामार्फत काढलेली छायाचित्रे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आपण पाहू शकतो.
चार पांच मोठमोठ्या इमारतींमध्ये सध्या ऑफीसे थाटलेली आहेत. यातली कुठलीच बिल्डिंग कॉंक्रीटच्या चौकोनी ठोकळ्यासाठी दिसत नाही. निरनिराळ्या भौमितिक आकारांचा अत्यंत कल्पक व कलात्मक उपयोग करून तसेच त्यात काम करणा-यांच्या सोयीचा विचार करून या वास्तुशिल्पांची रचना केली आहे. त्या बांधतांना त्यात अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा आणि नव्या साधनसामुग्रीचा सढळ हाताने उपयोग केला गेला आहे. अशा प्रकारच्या इमारती भारतात फारशा दिसत नाहीत. त्या भागात फिरतांना आपण एकाद्या प्रगत देशात असल्यासारखे वाटते. इन्फोसिसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले महत्वाचे स्थान मिर्माण केले आहे त्याला हे साजेसेच आहे.
या बाबतीत मी एक वदंता ऐकली. एका विकसनशील देशाचे कांही इंजिनियर या जागी संगणकाचे प्रशिक्षण घ्यायला आले. त्यांनी इथला कँपस पाहून घेतला आणि त्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की मायदेशी गेल्यावर त्यांनी आपला पेशाच बदलला. संगणकप्रणालीवर काम करण्याऐवजी ते वास्तुशिल्प, नगररचना यांसारख्या विषयांवर काम करू लागले आणि त्यांच्या देशात अशा जागा निर्माण करू लागले. त्यात त्यांना भरघोस यश आणि संमृध्दीसुध्दा मिळाली म्हणे.

मुंबई ते मैसूर

ही तीन वर्षांपूर्वीची हकीकत आहे. त्या वेळी नव्या वाटलेल्या कित्येक गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत.

मैसूर (याला पूर्वी म्हैसूर किंवा मैसोर म्हंटले जायचे) हे सुंदर शहर स्वतः पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा एक पर्यटक म्हणून गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी तिथली सारी प्रेक्षणीय स्थळे पटापट एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. ती स्थळे पाहण्यासाठी इकडून तिकडे फिरतांना रस्त्यात शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण तेथे रहायला जाऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती. त्यामुळे तिथल्या रहिवाशांचा मनातून थोडा हेवा वाटला होता. पण अगदी ध्यानी मनी नसलेल्या कांही चांगल्या गोष्टीसुध्दा आपल्या आयुष्यात अचानक घडून जातात तसे झाले आणि या वर्षीच्या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन मुक्काम करायची संधी माझ्याकडे चालून आली.

यापूर्वी अनेक वेळा आम्ही उन्हाळ्यात बाहेरगांवी जातच होतो. मुलांच्या शाळांना सुटी लागण्याच्या आधीच सुटीत बाहेरगांवी जायचे वेध घरातल्या सगळ्यांना लागत असत. बहुतकरून मुलांच्या आजोळी म्हणजेच त्यांच्या ‘मामाच्या गांवाला’ जाणे होई. अधून मधून काका, आत्या, मावशी वगैरेंकडे किंवा कोणा ना कोणाच्या लग्नसमारंभाला जात असू. पण आमचे सारे आप्त भारतात जिथे जिथे राहतात त्या सगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात रखरखत्या उन्हात घराबाहेर पडायची सोय नसते आणि घरात असह्य असा ऊष्मा असतो. शिवाय नेमक्या त्याच काळात पाण्याचे दुर्भिक्ष आणि विजेची कपात वगैरे येत असल्यामुळे बरेच वेळा तिथल्या रहिवाशांचा जीवच मेटाकुटीला येत असतो. त्यात “दुष्काळात तेरावा महिना” म्हणतात तसे आपण जाऊन सगळ्यांचेच हाल वाढवण्यापेक्षा थंडीच्या दिवसात त्यांच्याकडे जाण्यात जास्त मजा असते. कधी कधी काश्मीर, उटकमंड यासारख्या थंड हवेच्या जागांची टूर काढली जाई. पण अशा ठिकाणी जाणेच खूप खर्चाचे असे आणि राहणे तर खिशाला परवडणारे नसायचेच, त्यामुळे तिथले प्रसिध्द असे मोजके निसर्गरम्य पॉइंट्स भराभर पाहून परत यावे लागत असे.

उमरखय्यामच्या सुप्रसिध्द चित्रात तो एका रम्य अशा जागी हातात मदिरेचा प्याला घेऊन अर्धवट डोळे मिटून धुंद होऊन बसला आहे आणि शेजारी त्याची कमनीय अशी मदिराक्षी प्रिया त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत सुरईने त्याच्या प्याल्यात मदिरेची धार धरत अदबशीरपणे उभी आहे असे दाखवतात. ही (पुरुषाच्या) सुखाची पहाकाष्ठा समजली जाते. मी शायर वगैरे नसल्यामुळे माझ्या सुखाच्या कल्पना मात्र जरा वेगळ्या आहेत. कसलाही उद्देश किंवा योजनांचे ओझे मनावर न बाळगता आरामात पाय पसरून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पहात नुसते पडून रहावे आणि तिथल्या थंडगार व शुध्द हवेचा मनमुराद आस्वाद घ्यावा, फार तर गरम चहाचा कप हांतात असावा आणि बाजूला बिस्किटे, वेफर, कांद्याची भजी असे कांही तोंडात टाकायला असावे एवढे सुख मला पुरेसे आहे. पण असा योग सुध्दा यापूर्वी कधीच जमून आला नव्हता. त्यामुळे या उन्हाळ्यात मैसूरला जाऊन निव्वळ आणि निर्भेळ आराम करायचा विचार चित्तथरारक वाटत होता.

उन्हाळ्यात मैसूरला जायचे असे तत्वतः ठरले तरी त्याचा नेमका कार्यक्रम ठरत नव्हता त्यामुळे रेल्वेचे रिझर्वेहेशन करता आले नाही. तेवढ्या काळात इतर लोकांनी तिकडे जाणा-या सर्व गाड्यांच्या सर्व वर्गाचे डबे भरून टाकले. त्यामुळे  राखीव जागा मिळेपर्यंत थांबायचे झाल्यास तोंपर्यंत उन्हाळा संपून गेला असता. आता काय करायचे हा प्रश्न पडला. माझ्या एका सहका-याचे मैसूर हेच ‘होम टौन’ असल्याचे आठवले म्हणून त्याच्याकडे चौकशी केली. “आपण तर हल्ली नेहमी विमानानेच जातो.” असे त्याने ऐटीत सांगितले आणि झपाट्याने बदलत चाललेल्या परिस्थितीची जाणीव झाली. माझ्या आई वडिलांनी आयुष्यभरात कोणतेही विमान कधीही आतून पाहिले नव्हते. त्यामुळे मलासुध्दा आपण कधी विमानातून प्रवास करू शकू असे लहानपणी वाटत नव्हते. नोकरीला लागल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कामानिमित्य विमानाने प्रवास करतात हे पाहिले. मला विमानप्रवासाची पात्रता प्राप्त करायला त्या काळात दहा वर्षे लागली. नंतर ते नेहमीचेच झाले असले तरी खाजगी कामाकरता विमानाने जाण्याइतकी आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. पुढची पिढी मात्र आता सर्रास सहकुटुंब विमानातून हिंडतांना दिसते.

गेल्या कांही वर्षात महागाईमुळे इतर गोष्टींचे भाव वाढत गेले असले आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढले असले तरी विमानप्रवासाचे दर कमी कमी होत गेले आहेत. पूर्वी ते बसच्या भाड्याच्या अनेक पटीने महाग होते, आता दुपटीच्या आसपास आले असल्यामुळे एवढे आकाशाला भिडल्यासारखे वाटत नाहीत. त्यामुळे आम्हीही विमानानेच जायचे ठरवले. त्यात वेळ आणि दगदग वाचण्याची सोय तर होतीच, शिवाय पुढे आम्हालाही माझ्या मित्राप्रमाणे तसे ऐटीत सांगता येईल! विमानाचे तिकीट काढणे इतके सोपे झाले असेल याची तर मला कल्पनासुध्दा नव्हती. ठरवल्यापासून पंधरा मिनिटात घरबसल्या इंटरनेटवर तिकीटाचे बुकिंग झाले आणि ई-तिकीट काँम्प्यूटरवर आले सुध्दा. लगेच उत्साहाच्या भरात त्याची प्रिंटआउट काढून घेतली.

त्या चतकोर कागदाकडे पाहून मनाचे समाधान मात्र कांही केल्या होत नव्हते. इतके दिवस ज्या प्रकारचे तिकीट पहायची मला संवय होती ते लालचुटुक रंगाच्या गुळगुळीत कागदाच्या वेष्टनात असायचे. त्यात पोथीसारखी दोन चार आडवी पाने असायची आणि त्यावर अतिसूक्ष्म अक्षरात कांहीतरी अगम्य असे लिहिलेले असायचे. मी एकदाच ते वाचायचा प्रयत्न केला. विमानात कोणकोणत्या गोष्टी बरोबर नेणे धोकादायक आहे याची भीती त्यात घातली होती, प्रवासात कांहीही झाले तर त्याला विमान कंपनी जबाबदार नाही वगैरे लिहिले होते आणि तुमचे कांही बरे वाईट झाले तर तुमच्या वारसाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त काय मिळेल वगैरेचे नियम होते. मी कांही ते सारे नियम पूर्णपणे वाचू शकलो नाही. वाचले असते तर कदाचित पुन्हा विमानात बसण्याचे धाडस करू शकलो नसतो. मधल्या फ्लाईट कूपन्सवर अनेक चौकोन काढून त्यात कित्येक आंकडे आणि अक्षरे लिहिलेली असत. त्यात आपले नांव, गांव व प्रवासाच्या तारखा कशा पहायच्या एवढे सरावाने जमत होते. इतर अक्षरे व आंकड्यांचा अर्थ समजून घेण्याची गरज कधीच पडली नव्हती.
 
हे ई-तिकीट मात्र मुळीसुध्दा तिकीटासारखे दिसत नव्हते. कॉलेजच्या नोटीसबोर्डावर एकाद्या पाहुण्याच्या भाषणाची सूचना लावलेली असावी तसे त्याचे रंगरूप दिसत होते. पण आता यापुढे बहुतेक सर्व खाजगी कंपन्या फक्त ई-तिकीटेच देणार आहेत अशी तळटीप त्यातच दिलेली होती. त्यामुळे घरी बसल्या इंटरनेटवर तिकीट काढा किंवा प्रत्यक्ष विमान कंपनीच्या ऑफीसात जाऊन ते काढा, असा चतकोर कागदच मिळणार! असला प्रिंटआऊट तर कोणीही स्वतःच टाईप करून काढून आणू शकेल असे मला क्षणभर वाटले. पुढची टीप वाचल्यावर ती शंका मिटली. विमानतळावर गेल्यानंतर त्या तिकीटात दिलेल्या नांवाचा प्रवासी तुम्हीच आहात हे तुम्ही फोटोआयडेंटिटी दाखवून सिध्द करायला पाहिजे. ते सिध्द करणारी कागदपत्रे त्यासाठी बरोबर नेणे आवश्यक होते. त्याशिवाय तुम्हाला विमानात प्रवेश मिळणार नव्हता. म्हणजे आता ती कागदपत्रे बरोबर बाळगायची आणि परत येईपर्यंत ती काळजीपूर्वक सांभाळायची एक वेगळी जबाबदारी अंगावर आली. माझे नशीब चांगले असल्यामुळे असे पुरेसे पुरावे माझ्याकडे उपलब्ध होते. एकादा खेडवळ गणपत गावडे किंवा सखूबाई साळुंखे या बिचा-यांनी काय करायचे?

विमानाने प्रवास करायचा म्हणजे पाहिजे तेवढे आणि हवे ते सामान बरोबर नेता येत नाही. ‘चेक्ड इन बॅगेज’मध्ये काय ठेवायचे आणि केबिनमध्ये बरोबर काय काय नेता येते याचे कडक नियम नीट समजून घेऊन त्यांचे पालन करावे लागते. ‘सुरक्षा जाँच’ करतांना आक्षेपार्ह असे कांही आढळले तर ते सरळ कच-याच्या टोपलीत टाकतात. जास्तच संशयास्पद असे कांही सांपडले तर मग तुमची धडगत नाही. मग प्रवास बाजूला राहील आणि पोलिसांच्या तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लागेल. आम्हाला तसेही फारसे ओझे न्यायची गरज नसल्यामुळे कांही अडचण नव्हती. फक्त औषधे, कागदपत्रे वगैरे अत्यावश्यक गोष्टी तेवढ्या केबिन बॅगेजमध्ये ठेवून बाकीचे सगळेच सामान चेक इन करायचे ठरवले.

मुंबईहून मे महिन्यात कुणाकडे जायचे म्हणजे फळांच्या राजापेक्षा चांगली दुसरी कोणती गोष्ट नेणार? त्यामुळे देवगडच्या उत्तम दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी घेतली खरी, पण ती न्यायची कशी? केबिन बॅगेजमध्ये ती लहान मुलासारखी हातात सांभाळून नेता आली असती पण त्याला परवानगीच नसेल तर काय करायचे? तिचा तो पुठ्ठ्याचा नाजुक खोका चेक-इन करण्यासाठी बेल्टवर ठेवल्यानंतर पुढे ठिकठिकाणी तो कसा हाताळला जाणार आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे अखेरपर्यंत शाबूत राहून बंगलोरला पोचल्यावर आपल्याला तो आतल्या फळांसकट व्यवस्थित परत मिळेलच याची शाश्वती नव्हती. शिवाय याच कारणामुळे विमान कंपनीने तो घेण्याचेच नाकारले तर काय करा? ज्या दिवशी आम्ही प्रवासाला निघालो त्या दिवसाच्या सगळ्या वर्तमानपत्रात जयपूरला झलेले भीषण बाँबस्फोट आणि त्यामुळे सगळीकडे बाळगली जात असलेली अधिकच कडक सिक्यूरिटी यांबद्दलच्या बातम्या होत्या. त्यामुळे वातावरणात जास्तच तणाव होता. अखेर त्या पेटीला एका मोठ्या घडीच्या पिशवीमध्ये घुसवून त्याला चारी बाजूंनी नायलॉनच्या जा़ड दोरीने करकचून आवळून त्याचे बोचके तयार केले. फक्त त्याला एक कुलुप लावणे तेवढे बाकी होते. त्या दिवसात मुंबईहून बाहेरगावी जाणारे अनेक प्रवासी या फळाच्या राजाला आपल्यासोबत नेत असावेत. विमानतळावर झालेल्या क्ष किरण तपासणीतून सुखरूप सुटल्यानंतर त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही आणि चेक-इन सामनात पट्टयावर आरूढ होऊन ते बोचके पुढे गेले.

स्वस्तातल्या विमानाच्या प्रवासात कसल्याही सुखसोयी नसतात असे मोघम ऐकले होते. कुठली तरी जुनाट सेकंड हँड विमाने स्वस्तात विकत घेऊन, त्यांची थोडी डागडुजी करून स्वस्तातल्या उड्डाणासाठी ती वापरतात, त्यामुळे ती नेहमी नादुरुस्त होत राहतात आणि वेळापत्रकाप्रमाणे सहसा ती उडत नाहीत असे कोणी म्हणाले आणि कोणी तर त्यात हवाई सुंदरीच नसतात असेही सांगितले. त्यामुळे या प्रवासाबद्दल मनात थोडी धागधुग वाटत होती. पण ज्या अर्थी ती विमाने कोसळल्याच्या बातम्या रोज रोज येत नाहीत त्या अर्थी ती पुरेशी सुरक्षित तरी नक्कीच असावीत असे वाटत होते. पण आमचे विमान तर चक्क ब-यापैकी नवे एअरबस ए ३२० होते आणि ते ठरलेल्या वेळेच्या आधीच मुंबईहून निघाले. विमानात हवाई सुंदरींचा मोठा ताफा नसला तरी आमच्या विभागात एक हंसतमुख युवक आणि एक चुणचुणीत युवती होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर विमानकंपन्या निघाल्यावर त्यातल्या सगळ्यांना तितक्या लावण्याच्या खणी कोठून मिळणार आहेत? थोडे सौंदर्यप्रसाधन करून आणि सफाईदार बोलण्या वागण्याच्या सरावाने त्यांना एक प्रसन्न असे व्यक्तीमत्व प्राप्त होते आणि सेवावृत्ती, तत्परता, कार्यकुशलता वगैरेचे कसून प्रशिक्षण त्यांना दिले जात असावे.  

डेक्कन एअरच्या ‘नो फ्रिल्स’चा अनुभव तसा सुरुवातीपासूनच आला. सरसकट सर्व प्रवाशांना लिमलेट, चॉकलेटच्या गोळ्या, कापसाचे बोळे, स्वागतार्थ शीतपेय वगैरे वाटण्याच्या इंडियन एअरलाइन्समधील पूर्वापार पध्दतीला पूर्णपणे चाट देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवासात सगळ्यांना तहान लागणार होती. ती भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची छोटी बाटली तेवढी मिळाली. विमानातील प्रत्येक प्रवाशाला त्याची निवड विचारून हवा असलेला नाश्ता देणे आणि नंतर रिकाम्या झालेल्या सगळ्या प्लेट्स गोळा करणे हे एक केबिन क्र्यूचे मोठे किंबहुना मुख्य काम असे. आमच्या विमानात एका छोट्याशा ट्रॉलीवर सँडविच, पेस्ट्रीसारखे दोन तीन खाद्यपदार्थ, चहा कॉफी आणि थंड पेये ठेवून ती फिरवण्यात आली. त्यातून आपल्याला हव्या त्या गोष्टी रोख पैसे मोजून विकत घ्यायच्या होत्या. त्यांच्या अवाच्या सवा किंमती पाहून फारसे कोणी त्या विकत घेतच नव्हते. “त्याला एवढं कसलं सोनं लागलं आहे ते पहावं तरी” असे म्हणत आम्ही एक सँडविच विकत घेतले आणि दोघांनी ते वाटून खाल्ले. “यापेक्षा आपण आपल्या घरी किती चविष्ट सँडविच बनवतो” अशी त्यावर आमच्या मनात उठलेली प्रतिक्रिया आमच्या चेहे-यावर स्पष्ट दिसत असेल.

नाश्त्याचे काम पटकन आटोपल्यामुळे केबिन क्र्यूला भरपूर मोकळा वेळ होता. त्या वेळात त्यांनी कांही शोभेच्या, कांही उपयोगाच्या आणि कांही चैनीच्या अशा दहा बारा वस्तू ट्रॉलीवर ठेवून लिलावासाठी फिरवल्या. त्यासाठी प्रवाशांनी एका कागदावर आपली बोली लिहून द्यायची. सर्व कागद गोळा केल्यानंतर ज्या वस्तूसाठी ज्या प्रवाशाची बोली सर्वात अधिक असेल त्याने ती वस्तू तेवढ्या किंमतीला विकत घ्यायची. त्यातल्या कांही वस्तू माझ्याकडे आधीच असल्यामुळे त्याची गरज नव्हती, माझ्याकडे ज्या नव्हत्या त्या माझ्या कांही कामाच्या नव्हत्या आणि कांही वस्तू पाहून तर त्यांचे काय करायचे तेच समजत नव्हते. बहुतेक वस्तूंच्या लिलावातील बोली लावण्यासाठी ठेवलेली कमीत कमी किंमतच आंवाक्याबाहेर वाटत असल्यामुळे उगाच गंमत म्हणून हा खेळ खेळण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे मी कशावरच बोली लावली नाही.

विमानात काय चालले आहे हे पाहण्यात थोडा वेळ गेला, थोडा पेपर वाचण्यात आणि उरलेला त्यातले सुडोकू कोडे सोडवण्यात. ते कोडे सुटत आले होते तेवढ्यात विमान खाली येऊ लागले आणि एक दोन गिरक्या घेऊन बंगलोरच्या एचएएल विमानतळावर उतरले. या विमानतळाचे हे बहुधा माझे शेवटचेच दर्शन असावे. बंगलोरजवळ देवनहळ्ळी इथे बांधलेला नवा अद्ययावत विमानतळ सुरू होऊन सर्व उड्डाणे आता तिथून निघणार आणि तिथेच उतरणार असल्याची बातमी आधीच पसरली होती. मैसूरहून परतीचा प्रवास आम्ही तिथूनच केला. आमचे विमान ठरलेल्या वेळेआधीच उडाले होते आणि दहा मिनिटे आधीच बंगलोरला पोचलेसुध्दा. म्हणजे डेक्कन एअरने त्यांचे काम चोख बजावले होते. पण त्या दिवशी विमानतळावरील कर्मचारी सहकार्य करीत नव्हते की त्यातले बरेचसे लोक नव्या विमानतळाचे काम पहायला तिकडे गेले होते कोण जाणे, आमचे सामान कांही केल्या पट्ट्यावर येत नव्हते. त्या वेळेला दुसरे कोठलेही विमान तिथे उतरलेले नव्हते त्यामुळे फक्त आमच्या विमानातले प्रवासीच सामानाची वाट पहात उभे होते आणि ते सुध्दा सगळे मिळून फार फार तर चाळीस पन्नास लोक असतील. बाकीचे प्रवासी हातातल्या बॅगा घेऊन बाहेर चालले गेले होते. म्हणजे विमानात असे कांही फार सामान नसणार. तरीही ते अर्ध्या तासानंतर विमानतळावरील फिरत्या पट्ट्यावर आले आणि गोगलगायीच्या गतीने येत राहिले. 

बंगलोरहून मैसूरला जाण्यासाठी गाडीची सोय केलेली होती. बाहेर आमचा चालक ‘घोरे’ असे नांव लिहिलेला फलक हांतात घेऊन उभा होता. तो आमच्यासाठीच असणार हे मी त्याला पाहतांच ओळखले. यापूर्वीसुध्दा ‘गारे’, गोरे’, ‘घाटे’, ‘घासे’ वगैरे आडनांवे मला मिळालेली आहेत. एकदा तर मला ‘घोष’ करून टाकले होते आणि ‘गर्ग’ नांवाच्या माझ्या सहका-याला ‘जॉर्ज’. इतकेच नव्हे तर त्याला फॉरेनर समजून त्याच्यासाठी वातानुकूलित लिमोसिन पाठवलेली होती. पण गोरा साहेब न आल्याचे पाहून तिचा ड्रायव्हर आपली गाडी रिकामीच परत घेऊन गेला. ‘घोष’ साहेबासाठी म्हणजे माझ्यासाठी आलेल्या साध्या गाडीने आम्हा दोघांना गेस्टहाउसपर्यंत पोचवले. आता दूरसंचारव्यवस्थेत प्रगती झालेली असल्यामुळे आम्हाला न्यायला आलेल्या गाडीचा नंबर, रंग, त्याची मेक, ड्रायव्हरचे नांव, त्याचा मोबाईल फोन नंबर वगैरे सर्व इत्थंभूत माहिती मुंबईहून निघण्यापूर्वीच मला मोबाइल फोनवर मिळालेली होती. त्यामुळे त्याला सहज शोधता आले असते. पण त्याची गरज पडली नाही.
दुपारची वेळ असल्यामुळे बंगलोरचे रस्ते तुडुंब भरलेले नव्हते, पण ते रिकामेही नव्हते. शहरातले रस्ते पार करून बाहेर पडण्यातच पाऊण तास गेला. ट्रॅफिक जॅम असता तर आणखी किती वेळ लागला असता कोण जाणे. बंगलोर ते मैसूरचा हमरस्ता मात्र फारच सुरेख आहे. रस्त्यात कसलेही खाचखळगे किंवा अडथळे नाहीत आणि दोन्ही बाजूला मे महिन्यातसुध्दा हिरवी गर्द अशी वनराई. मध्येच एकादा गुलमोहर लाल चुटुक फुलांनी बहरलेला दिसायचा. कांही झाडांर पांढ-या किंवा पिवळ्या फुलांची नक्षी दिसायची. अधून मधून लहान मोठी गांवे लागत होती, त्यात दोन तीन ब-यापैकी मोठी होती. तिथे कॉलेजे, हॉस्पिटले वगैरे दिसली. रस्त्यात माणसांची गर्दी होती, पण कुठेही त्यातून जाणारा रस्ता अरुंद झाला नव्हता की त्यात वाहनांची कोंडी होत नव्हती. अपेक्षेप्रमाणे तीन साडेतीन तासात मैसूरला जाऊन पोचलो.