आनंदघन आणि निवडक आनंदघन

आनंदघन

जानेवारी २००६ मध्ये हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्या वेळी ते तसेही अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची एकूण संख्या शंभराच्या आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. त्याआधी मी आंतरजालावर एकंदरीतच जेमतेम दहा बारा ब्लॉग्ज वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्यामधील एकादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व ब्लॉग्जची शीर्षके निरर्थक तरी होती किंवा अनाकलनीय ! त्यामुळे मी तरी त्या नावांकडे एकेक खुणेचे दगड याहून अधिक लक्ष दिलेच नाही.

माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. आधी सगळे सोपस्कार तर होऊन जाऊ देत, ब्लॉगची सुरुवात तर होऊ दे, नंतर कधी तरी वाटल्यास नांव बदलून घेऊ असा विचार त्या क्षणी माझ्या मनात होता. पण नंतर मला कधी तसे करावेसे वाटलेच नाही कारण आनंदघन हेच नांव चांगले वाटायला लागले होते.

आनंदघन या शब्दाचा अर्थ काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे घनदाट आनंद, आनंद बरसणारा मेघ असा कांही तरी तो असणार. गणित विषयात ज्यांना गोडी वाटते ते त्याचा अर्थ आनंद गुणिले आनंद गुणिले आनंद अशी बीजगणितातील व्याख्या किंवा भूमितीमधील आनंदाचे त्रिमिति रूप असा काढू शकतील. आनंदघन म्हणजे आनंदाचा अर्क किंवा निर्भेळ आनंद असे परमेश्वराचे वर्णन आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केले आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्या खाली दिल्या आहेत.
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥

भारतरत्न लता मंगेशकर यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी स्व.भालजी पेंढारकरांच्या कांही मराठी चित्रपटांना अत्यंत मधुर असे संगीत देतांना संगीत दिग्दर्शक म्हणून आनंदघन हे नांव घारण केले होते. त्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांसोबत हे नांवसुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडावर झाले होते. अशा या नांवाचा उपयोग मी करू शकतो कां व ते कितपत योग्य आहे असे प्रश्न मनात येत होते. त्यावर मला असे वाटले होते की लता, आशा, मीना व उषा ही मंगेशकर भगिनींची नांवे धारण करणाऱ्या लक्षावधी स्त्रिया महाराष्ट्रात दिसतील. प्रसिद्ध व्यक्तींचे नांव आपल्या मुलाला ठेवण्याची आपल्याकडे पद्धतच आहे. तर मग मी आपल्या नवजात ब्लॉग बाळाला आनंदघन हे नांव ठेवणे तसे रूढीला धरूनच नाही का ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काळांत पूजनीय लतादीदी आनंदघन या नांवाने चित्रपटसंगीत देत होत्या, तेंव्हासुद्धा एक आघाडीची गायिका व एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्या लता मंगेशकर या मूळच्या नांवानेच प्रसिद्ध होत्या. गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी आनंदघन या नांवाने कांही कार्य केले असल्याचे मी तरी ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या टोपणनांवाचा उपयोग करून मला कांही फायदा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, किंवा त्यांच्या नांवावर मी आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही कुणाला वाटायला नको. या सगळ्या कारणांनी मी आनंदघन हेच नांव चालू ठेवले. आता सोळा वर्षे होऊन गेली तरी माझा हा ब्लॉग याच नावाने चालला आहे आणि पाच लाखांवर वाचकांनी त्याला भेटी दिल्या आहेत.

आनंदघन https://anandghan.blogspot.com/ हा ब्लॉग लिहिण्यामागील माझा मूळ उद्देश आधी नाविन्याचा आनंद मिळवणे हा होता आणि नाविन्य संपल्यानंतर निर्मितीचा आनंद मिळवणे हा होता. त्याचप्रमाणे तो वाचणाऱ्या लोकांनाही त्यापासून आनंद मिळणे आवश्यक आहे. तसाच माझा प्रयत्न अजूनही सुरू आहे.

निवडक आनंदघन

मी आनंदघन या ब्लॉगची सुरुवात ब्लॉगस्पॉटवर केली होती, पण याहू ३६० नावाच्या एका नव्या स्थळावर अधिक सुविधा होत्या म्हणून मी हा ब्लॉग याच नावाने तिथे लिहायला लागलो होतो. पण काही काळानंतर ते स्थळच बंद पडले आणि ब्लॉगस्पॉटची मालकी बदलून ती गूगलकडे गेली तरी ते स्थळ मात्र चालू राहिले, म्हणून मी या ब्लॉगचे पुनरुज्जीवन केले आणि तिकडचे बरेचसे लेख इथे पुनःप्रसारित केले. त्यानंतर मला वर्डप्रेस या आणखी एका नव्या स्थळाची माहिती मिळाली आणि त्यांची मांडणी अधिक आकर्षक वाटली. यदाकदाचित ब्लॉगरनेही आपले धोरण बदलले आणि तिथली ब्लॉगची सुविधा अडचणीत आली तर आपले लिखाण आंतरजालावर कुठे तरी उपलब्ध असावे अशा विचाराने मी वर्डप्रेसवर ‘निवडक आनंदघन’ हा वेगळा ब्लॉग सुरू केला. आनंदघन या मूळ ब्लॉगमधले मला स्वतःला जास्त पसंत पडलेले लेख पुन्हा वाचून आणि त्यात काही सुधारणा करून मी ते लेख या स्थळावर देत आलो आहे. वाचकांनी माझ्या या उपक्रमालाही भरघोस पाठिंबा दिला आणि या स्थळाला भेटी देणाऱ्या वाचकांची संख्याही आता तीन लाखांवर गेली आहे याचे मला समाधान आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार.

बक्षिससमारंभाचे प्रमुख पाहुणे

बक्षिससमारंभाचे प्रमुख पाहुणे

एक खूप जुना पण आठवणीत राहिलेला अनुभव

रेडिओवर ऐकलेली गाणी (अर्थातच सुगम) आपल्याला डिट्टो म्हणता येतात असा माझा शाळेत असतांना गोड गैरसमज होता. शाळेत होणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये मला भाग घ्यायलासुद्धा मिळायचा, तो बहुधा माझ्या चांगल्या पाठांतरामुळे किंवा स्पष्ट उच्चारांमुळे असावा. सूर, ताल व लय हे गायनासंबंधीचे शब्द कधी माझ्या कानावर पडलेच नव्हते. मोठेपणी संगीताबद्दल वाटणारी गोडी वाढत गेली आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीत गाणाऱ्या अनेक दिग्गजांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यामधून ताल, सूर व लय यांचे व्याकरण आणि चांगल्या गायनातील खास जागा वगैरेंची किंचितशी जाण आली, तसेच हे काही आपले काम नाही हे समजले आणि आपण आपली श्रवणभक्ती करावी हे निश्चित झाले.

शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या एका स्थानिक संस्थेच्या गुरूपौर्णिमेला होणाऱ्या वार्षिक समारंभाला मी दरवर्षी एक चाहता आणि प्रेक्षक किंवा श्रोता म्हणून हजेरी लावत असे. वेगवेगळ्या वर्गांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या गायनाची चुणूक दाखवणारा छोटासा कार्यक्रम करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना या वेळी प्रमाणपत्रे देत असत. मी अशाच एका समारंभाला दरवर्षीप्रमाणे गेलो होतो. हळूच डुलक्या घेतांना किंवा चुकीच्या जागी दाद देतांना उगाच पकडले जाऊ नये म्हणून मी नेहमी शेवटच्या रांगेत बसण्याची खबरदारी घेतो. तशी त्या दिवशीसुद्धा घेतलेली होती. तरीसुद्धा आयत्या वेळी माझे नांव पुकारून मला प्रमाणपत्रे वाटण्यासाठी मंचावर पाचारण करण्यात आले. इतकेच नव्हे तर शेजारी बसलेल्या सद्गृहस्थाने मला हात धरून जागेवरून उठवले. त्यामुळे मला पुढे होण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.

खरे तर मी संगीताची प्रारंभिक परीक्षासुद्धा दिलेली नव्हती आणि ती दिली असती तर त्यात मी उत्तीर्ण झालो असतो की नाही याची शंकाच होती. पण एक दोन पासून सात आठ वर्षांपर्यंत संगीतसाधना करून परीक्षा पास झालेली मुलेमुली क्रमाक्रमाने येत होती, भारतीय परंपरेप्रमाणे माझ्या पाया पडून माझ्या हस्ते प्रमाणपत्र घेऊन हंसल्यासारखे करून जात होती. मला मात्र भयंकर अवघडल्यासारखे झाले होते. माझे वय व हुद्दा बघूनच मला तेथे बोलावले गेले असणार हे उघड होते. कदाचित संस्थेच्या संचालक मंडळींना संगीताव्यतिरिक्त इतर कारणांमुळे माझ्याबद्दल आदर वाटतसुद्धा असेल. पण ज्या मुलामुलींना मी प्रमाणपत्रे देत होतो त्यांना मनातून काय वाटत असेल? त्यांच्या मनात कितपत आदरभावना असेल? अमक्या अमक्या गृहस्थांच्या हस्ते मला हे प्रमाणपत्र मिळाले हे ते लक्षांत ठेवतील कां? तसे अभिमानाने कुणाला सांगतील कां? हे प्रश्न विचारायचा धीर मला झाला नाही. एक दोन अपवाद सोडले तर  त्यांच्यातले किती जण आज मला ओळखतील याचीही शंकाच आहे.

एखाद्या बक्षिससमारंभाला प्रमुख पाहुणा ठरवतांना ज्यांचा गौरव करावयाचा असतो त्या लोकांना त्या पाहुण्याबद्दल आदर वाटण्यासारखे त्याचे त्या क्षेत्रातील कर्तृत्व असायला हवे असे मला तरी वाटते. मला आधी विचारले असते तर मी नकारच दिला असता, पण बहुधा ते आधीपासून ठरवलेलेच नसावे. आयत्या वेळी सभागृहात कोण कोण उपस्थित आहेत ते पाहून कुणीतरी माझी निवड करून ते जाहीर करून टाकले असावे. माझ्या ऑफिसमधल्या अशा अनेक बक्षिस समारंभांमध्ये मी बक्षिसे दिली आहेत, पण ती माझ्या क्षेत्रातल्या नव्या लोकांना दिली होती आणि त्यांना माझ्याबद्दल आदरभाव वाटावा इतपत कामगिरी मी केलेली होती. या बक्षिस समारंभाचा अनुभव मात्र थोडा वेगळा आणि मला अनपेक्षित असा होता.
—————————————————————————————–
तुमचं नांव काय हो?
एका गांवातील वाचनालयाच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनासाठी एका प्रथितयश साहित्यिकाला पाचारण केले होते. सभेचे अध्यक्षपद एका स्थानिक पुढा-याने भूषविले होते. त्याला साहित्याचा फारसा व्यासंग नव्हता. त्यामुळे साहित्यिकांची फारशी माहिती नव्हती. आपल्या सराईत वाक्पटुत्वाचा उपयोग करून त्याने भाषण ठोकायला सुरुवात केली. “माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजचा दिवस या गांवाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. आज या गांवाला, या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला चांगल्या सुसंस्कृत नागरिकांची अत्यंत गरज आहे. तसे चांगले नागरीक घडायला पाहिजे असतील तर त्यांनी चांगली चांगली पुस्तके वाचून प्रबुद्ध व्हायला पाहिजे. आपले महान नेते महात्मा गांधीजी, पंडित नेहरूजी, लोकमान्य टिळक वगैरे मंडळींनी मोठमोठी पुस्तके लिहून देशाला मार्गदर्शन केले. त्यामधील कांही पुस्तके तर त्यांनी तुरुंगात बसून लिहिलेली आहेत. या गांवातील लोकांना चांगली पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून आम्ही या गांवात हे वाचनालय सुरू करीत आहोत. या प्रसंगी आपल्याला एक फार मोठे साहित्यिक पाहुणे लाभलेले आहेत. त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा लिहून साहित्याच्या जगात मोलाची भर घातली आहे. त्या पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी या वाचनालयाचे उद्घाटन करावे व आपले विचार आपल्यासमोर मांडून आम्हांस उपकृत करावे.” एवढे म्हणून ते खाली बसले आणि शेजारी बसलेल्या पाहुण्यांना त्यांनी हळूच विचारले, “खरंच, तुमचं नांव काय हो?”

समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण

माझी आई समर्थ रामदासांची परमभक्त होती. तिचे शालेय शिक्षण अक्षरे ओळखण्याइतपतच झालेले असले तरी समर्थांनी लिहिलेले असंख्य श्लोक, ओव्या वगैरे नेहमीच तिच्या जिभेवर असत. तिच्या बोलण्यातून सज्जनगड, कल्याणस्वामी वगैरे उल्लेख येत असत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी “मला ते येत नाही”, “मी ते शिकलो नाही”, “मी ते यापूर्वी कधी केलेले नाही”, “उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल” वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. “शिकला नसशील तर आता शिकून घे”, “करायला घेतलेस की यायला लागेल”, “प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर”, “‘असं’च्या ऐवजी ‘तसं’ होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही ‘तसं’ झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू.” वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. सरकारी नोकरीत असतांना बहुतेक सहकारी ‘लकीर के फकीर’ मनोवृत्तीचे असायचे. प्रत्येक बाबतीत ‘प्रिसिडंट’ शोधत रहायचे. पण माझे कामच मुळी शून्यातून नवी निर्मिती करण्यासंबंधी होते. जी यंत्रसामुग्री भारतात यापूर्वी कधीच तयार झाली नव्हती ती तयार करवून घेण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे वरिष्ठांची अनुमती मिळवून आणि कनिष्ठांना सोबत घेऊन नवीन कल्पनांचा पाठपुरावा करायचा असे. लहान सहान प्रयोग करून धडपडत पुढे जात जेंव्हा ते यंत्र तयार होऊन मनासारखे काम करू लागे तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असे.

नऊ वर्षांपूर्वी मराठी ब्लॉगविश्व फारसे आकाराला आले नव्हते. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा ब्लॉग कसा तयार करायचा यासंबंधी मला कांहीच माहिती नव्हती. मी त्यापूर्वी ई मेल वगळता इंटरनेटवर कुठलेही काम केलेले नव्हते, कुठल्याही वेबसाईटवर काहीही अपलोड केलेले नव्हते. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हेसुध्दा कळत नव्हते. माझे बोट धरून मला चालवत घेऊन जाणारा कोणीही ओळखीचा माणूस नव्हता. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।’ असे म्हणत कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा पहिला ब्लॉग तयार झाला आणि याहू ३६० वर दुसरा ब्लॉगही सुरू केला. आता ते स्थळ बंद झाले आहे. त्या ठिकाणी ब्लॉगच्या मथळ्याशेजारीच एक बोधवाक्य द्यायचे असे, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती. ‘केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे।’ हे त्या काळात मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.

दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. “आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?” अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसूलागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन “जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन ” आपले बोधवाक्य बनवले. यांतील “शाहाणे करोन सोडावे” हा भाग नक्कीच माझ्या आंवाक्याबाहेरचा होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले. पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी “मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। ” हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो.

रामदासांचे आणखी एक वचन माझी आई आम्हाला नेहमी ऐकवत असे, ते होते, “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।”.  ” उद्यमेन हि सिध्द्यंती कार्याणि न मनोरथै। न हि सुप्तेषु सिंहेषु प्रविशंति मुखे मृगाः।” या सुभाषितामधला भाव या वचनाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये होता. तेवढा आम्हाला उद्देशून होता. त्याला भगवंताने पाठिंबा द्यायचा की नाही हे देवच जाणो, पण आपला उद्योग किंवा चळवळ विघातक असेल, त्यात दुष्टबुध्दी असेल, त्यातून कोणाचे नुकसान होणार असेल तर त्याला भगवंताचे अधिष्ठान मिळणार नाही आणि त्यमुळे त्याला सामर्थ्य मिळणार नाही हे ओघानेच आले. तेवढे करणे टाळले तरच ‘प्रयत्नांती परमेश्वर’ येतो.

रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. निरनिराळ्या संदर्भांमध्ये त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. मानवी जीवनावर भाष्य करणा-या या ओळी अनेक जागी उध्दृत केल्या जातात. उदाहरणार्थ
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

कोणाला उपदेश करतांना किंवा सल्ला देतांना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधील खाली दिलेल्या ओळी नेहमी सांगितल्या जातात.
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥

अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा मोलाची आहे. त्रिकालाबाधित  किंवा अजरामर असे यालाच म्हणतात.

शुभारंभ

आनंदघन या माझ्या ब्लॉगवरील निवडक पाने आता या जागी देणार आहे. त्या ब्लॉगवरील लेखांची संख्या सहाशेवर गेल्यामुळे हवा असलेला जुना लेख शोधणे जरा कठीणच असते. या ठिकाणी त्यांची वर्गवारी करून हे काम सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. हा थोडा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असला तरी माझ्या कल्पनेनुसार जे विषय कालातीत आहेत अशा विषयावरील लेखांना काळाचे बंधन नसते. ते वाचण्याजोगे असले तर केंव्हाही वाचायला आवडतात अशी माझी श्रध्दा असल्यामुळे हा प्रयत्न करणार आहे. यालाही वाचकांचा भरघोस पाठिंबा मिळाला तर मला धन्यता वाटेल